|
श्रीमद् भागवत पुराण मुञ्जाटव्यां गवां गोपानां च दावानलाद् रक्षणम् - गाई आणि गोपांचा वणव्यातून बचाव - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) क्रीडासक्तेषु गोपेषु तद्गावो दूरचारिणीः । स्वैरं चरन्त्यो विविशुः तृणलोभेन गह्वरम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - एकदा खेळता बाळे गाई दूर तदा पहा । तृणाच्या बहु लोभाने घन आरण्यि पातल्या ॥ १ ॥
गोपेषु क्रीडासक्तेषु - गोप खेळण्यात गढून गेले असता - स्वैरं चरन्त्यः दुरचारिणीः तद्वावः - स्वच्छंदाने चरत दूर गेलेल्या त्यांच्या गाई - तृणलोभेन गह्वरं विविशुः - गवताच्या लोभाने एका गुहेत शिरल्या. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात, एकदा गोपाळ खेळांमध्ये गुंग झाले असता त्यांची गुरे स्वच्छंदपणे चरत गवताच्या लोभाने घनदात जंगलात शिरली. (१)
अजा गावो महिष्यश्च निर्विशन्त्यो वनाद् वनम् ।
ईषीकाटवीं निर्विविशुः क्रन्दन्त्यो दावतर्षिताः ॥ २ ॥
गाई शेळ्या तशा दूर अन्यची वनि पातता । उन्हीं व्याकुळल्या तृष्णे तागाच्या वनि पातल्या ॥ २ ॥
वनात् वनं निर्विशन्त्यः - एका वनातून दुसर्या वनात शिरणार्या - दावतर्षिताः क्रन्दत्यः - अरण्यात फिरल्यामुळे तहानेने व्याकुळ झालेल्या व आक्रोश करणार्या - अजाः गावः महिष्यः च - शेळ्या, गाई व म्हशी - ईषिकाटवीं निर्विविशुः - दाट गवताच्या रानात शिरल्या. ॥२॥
त्यांची गुरे एका वनातून दुसर्या वनात जाता जाता उन्हाने तहान लागून व्याकूळ झाली आणि हंबरत हंबरत मुंज नावाच्या गवताने भरलेल्या वनात शिरली. (२)
तेऽपश्यन्तः पशून् गोपाः कृष्णरामादयस्तदा ।
जातानुतापा न विदुः विचिन्वन्तो गवां गतिम् ॥ ३ ॥
कृष्णाने बलरामाने पाहता पशु ना तिथे । शोधिता नच त्या त्यांना मुळीही दिसल्या कुठे ॥ ३ ॥
तदा - त्यावेळी - पशून् अपश्यन्तः - गाईंना न पाहणारे - ते कृष्णरामादयः गोपाः - ते कृष्ण, बलराम आदिकरून गोपाळ - विचिन्वतः - शोधीत - जातानुतापाः - झाला आहे पश्चात्ताप ज्यांना असे - गवां गतिं न विदुः - गाईंचे काय झाले ते जाणते झाले नाहीत. ॥३॥
श्रीकृष्ण, बलराम आदि गोपाळांना जेव्हा शोधूनही जनावरांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही, तेव्हा त्यांना खेळण्याचा पश्चात्ताप झाला. (३)
तृणैस्तत्खुरदच्छिन्नैः गोष्पदैः अंकितैर्गवाम् ।
मार्गं अन्वगमन् सर्वे नष्टाजीव्या विचेतसः ॥ ४ ॥
सर्वस्व गाइ त्या त्यांच्या खिन्न सर्वचि जाहले । गोक्षूरचिन्ह पाहोनी गेले शोधीत ते पुढे ॥ ४ ॥
नष्टाजीव्याः विचेतसः सर्वे - खाणेपिणे सोडून दिलेले व भ्रांतचित्त झालेले ते सर्व गोप - तत्खुरदच्छिन्नैः - गाईंच्या खुरांच्या प्रहारांनी छिन्नभिन्न झालेल्या - गौष्पदैः अङ्कितैः तृणैः - गाईंच्या पावलांनी चिन्हित झालेल्या गवतांनी - गवां मार्गं अन्वगमन् - गाईंचा मार्ग काढीत गेले. ॥४॥
आपल्या उपजीविकेचे साधनच नाहीसे झाल्याने ते बेचैन झाले. नंतर त्यांनी गाईंच्या पावलांनी तुडवलेले व दातांनी ओरबाडलेले गवत आणि जमिनीवर उमटलेल्या खुरांच्या खुणांच्या आधारे, त्यांचा शोध घेण्यासाठी ते निघाले. (४)
मुञ्जाटव्यां भ्रष्टमार्गं क्रन्दमानं स्वगोधनम् ।
सम्प्राप्य तृषिताः श्रान्ताः ततस्ते संन्यवर्तयन् ॥ ५ ॥
शेवटी पाहिल्या गाई तागाच्या चुकल्या वनीं । तृष्णेने थकल्या सर्व व्याकूळ जाहल्या तशा ॥ ५ ॥
ततः - नंतर - तृषिताः श्रान्ताः - तहानेने व्याकूळ होऊन थकलेले ते गोप - मुञ्जाटव्यां भ्रष्टमार्गं - मुंज नावाच्या गवताच्या रानात चुकला आहे रस्ता ज्यांचा असा - क्रन्दमानं स्वगोधनं संप्राप्य - आक्रोश करणारा आपल्या गाईंचा समूह फिरवून - संन्यवर्तयन् - परत आले. ॥५॥
जाता जाता त्यांना आढळले की, त्यांची गुरे मुंजारण्यामध्ये वाट चुकली असून हंबरडा फोडीत आहेत. तेव्हा त्यांना त्यांनी तेथून वळवले. त्यावेळी ते अतिशय थकले होते. शिवाय त्यांना फार तहानसुद्धा लागली होती. (५)
ता आहूता भगवता मेघगम्भीरया गिरा ।
स्वनाम्नां निनदं श्रुत्वा प्रतिनेदुः प्रहर्षिताः ॥ ६ ॥
कृष्णे गंभीर शब्दाने तयांना हाक मारिता । ऐकता हर्षल्या गाई हुंकार दिधला तया ॥ ६ ॥
भगवता - श्रीकृष्णाने - मेघगम्भीरया गिरा आहूताः ताः - मेघासारख्या गंभीर वाणीने बोलाविलेल्या त्या गाई - स्वनाम्नां निनदं श्रुत्वा - आपापल्या नावाचा ध्वनी ऐकून - प्रहर्षिताः प्रतिनेदुः - आनंदित होत्सात्या हंबरू लागल्या. ॥६॥
भगवान श्रीकृष्ण आपल्या मेघगंभीर वाणीने, गाईंना नावांनी हाका मारू लागले. आपल्या नावाचा आवाज ऐकताच गाई अतिशय आनंदित होऊन हुंकार देऊ लागल्या. (६)
( मिश्र )
ततः समन्ताद् वनधूमकेतुः यदृच्छयाभूत् क्षयकृत् वनौकसाम् । समीरितः सारथिनोल्बणोल्मुकैः विलेलिहानः स्थिरजङ्गमान् महान् ॥ ७ ॥
( इंद्रवज्रा ) श्रीकृष्ण ऐसा रव देइ तेंव्हा पेटोनि दावानलकाळ आला । सवेचि वारे सुटले असे की चराचराला तै अग्नि जाळी ॥ ७ ॥
ततः - नंतर - वनौकसां क्षयकृत् - वनवासी प्राण्यांचा नाश करणारा - सारथिना समीरितः - वायूने पसरविलेला - उल्बणोल्मुकैः - वाढलेल्या ज्वाळांनी - स्थिरजङ्गमान् विलेलिहानः - स्थावरजंगम प्राण्यांना जाळणारा - महान् वनधूमकेतुः - मोठा रानातील वणवा - समन्तात् यदृच्छ्या अभूत् - सर्व बाजूंनी अकस्मात उत्पन्न झाला. ॥७॥
तेवढ्यात त्या वनाला सगळीकडे अचानक, जी वनवासी जीवांचा काळच अशी आग लागली. त्याचबरोबर वारे वाहू लागल्याने आग भडकली आणि आपल्या भयंकर लोळांनी चराचराला भस्मसात करू लागली. (७)
तं आपतन्तं परितो दवाग्निं
गोपाश्च गावः प्रसमीक्ष्य भीताः । ऊचुश्च कृष्णं सबलं प्रपन्ना यथा हरिं मृत्युभयार्दिता जनाः ॥ ८ ॥
गोपाळ गाई बघता मनात अत्यंत झाले भयभीत सारे । मृत्यूभयाने डरकाळल्या त्या श्रीकृष्ण रामासहि आर्त शब्दे ॥ ८ ॥
गोपाः गावः - गोप व गाई - परितः आपतन्तं तं दावाग्निं - सभोवार वेढा घालणार्या त्या वणव्याला - प्रसमीक्ष्य भीताः - पाहून भीतीयुक्त झाल्या - च - आणि - मृत्युभयार्दिताः जनाः - मृत्यूच्या भीतीने पीडिलेले लोक - यथा हरिं (तथा) - जसे श्रीविष्णूला शरण जातात तसे - सबलं कृष्णं प्रपन्नाः - बलराम व श्रीकृष्ण यांना शरण जाऊन - ऊचुः - म्हणाले. ॥८॥
जेव्हा गोपाळांनी आणि गुरांनी पाहिले की, वणवा चारी बाजूनी आपल्याकडेच येत आहे, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले; आणि मृत्यूच्या भयाने घाबरलेले जीव ज्याप्रमाणे भगवंतांना शरण जातात, त्याचप्रमाणे ते श्रीकृष्ण आणि बलरामांना शरण जाऊन म्हणाले. (८)
( अनुष्टुप् )
कृष्ण कृष्ण महावीर हे रामामित विक्रम । दावाग्निना दह्यमानान् प्रपन्नान् त्रातुमर्हथः ॥ ९ ॥
( अनुष्टुप् ) प्रीय कृष्णा महावीरा बलरामा पराक्रमा । शरणी पातलो आम्ही वाचवा आग जाळि ही ॥ ९ ॥
हे कृष्ण - हे श्रीकृष्णा - महावीर कृष्ण - हे मोठया पराक्रमी श्रीकृष्णा - अमितविक्रम राम - हे अगणित पराक्रमी बलरामा - दावाग्निना दह्यमानान् - वणव्याने जळत असल्यामुळे - प्रपन्नान् (नः) - शरण आलेल्या आम्हाला - त्रातुं अर्हथः - रक्षण करण्यास तुम्ही योग्य आहात. ॥९॥
महावीर श्रीकृष्णा ! श्रीकृष्णा ! परम प्रतापी बलरामा ! आम्ही आपणास शरण आलो आहोत. या दावानलात आम्ही होरपळून जाणार ! तुम्ही आम्हांला वाचवा. (९)
नूनं त्वद्बान्धवाः कृष्ण न चार्हन्त्यवसीदितुम् ।
वयं हि सर्वधर्मज्ञ त्वन्नाथाः त्वत्परायणाः ॥ १० ॥
जयांचा सर्व तू कृष्णा तयांना नच कष्टवी । श्यामसुंदर धर्मज्ञ रक्षिसी तूचि केवळ ॥ १० ॥
कृष्ण - हे कृष्णा - नूनं - खरोखर - त्वद्बान्धवाः - तुझे बांधव - अवसीदितुं न च अर्हन्ति - दुःखित होण्यास योग्य नाहीत - सर्वधर्मज्ञ - हे सर्व धर्म जाणणार्या कृष्णा - वयं हि - आम्ही खरोखर - त्वन्नाथाः - तूच आहेस रक्षणकर्ता ज्यांचा असे - त्वत्परायणाः - तूच आहेस सर्वस्व ज्यांचे असे. ॥१०॥
श्रीकृष्णा ! आमचे सर्व काही तूच आहेस. मग आमचा नाश कसा होणार ! हे सर्व धर्म जाणणार्या शामसुंदरा ! तूच आमचा रक्षणकर्ता. आम्हांला फक्त तुझाच आधार. (१०)
श्रीशुक उवाच -
वचो निशम्य कृपणं बन्धूनां भगवान् हरिः । निमीलयत मा भैष्ट लोचनानीत्यभाषत ॥ ११ ॥
श्रीशुकदेव सांगतात - आपुल्या मित्र गोपांचे ऐकता दीन शब्द हे । भगवान् वदला कृष्ण नेत्र झाका न भ्या कुणी ॥ ११ ॥
भगवान् हरिः - भगवान श्रीकृष्ण - बन्धूनां कृपणं वचः निशम्य - आपल्या बांधवांची ती दीन वाणी ऐकून - मा भैष्ट - भिऊ नका - लोचनानि निमीलयत - तुम्ही डोळे मिटा - इति अभाषत - असे म्हणाला. ॥११॥
श्रीशुकदेव म्हणतात - आपल्या बांधवांची ही दीनवाणी प्रार्थना ऐकून भगवान श्रीहरी म्हणाले - "भिऊ नका ! तुम्ही डोळे मिटा." (११)
तथेति मीलिताक्षेषु भगवान् अग्निमुल्बणम् ।
पीत्वा मुखेन तान्कृच्छ्राद् योगाधीशो व्यमोचयत् ॥ १२ ॥
ऐकता वदले ठीक सर्वांनी नेत्र झाकिले । अग्नि सर्व पिला कृष्ण संकटा टाळिले असे ॥ १२ ॥
योगाधीशः भगवान् - योग्यांचा स्वामी असा भगवान श्रीकृष्ण - तथा इति मीलिताक्षेषु (तेषु) - बरे आहे असे म्हणून डोळे मिटले असता - उल्बणं अग्निं मुखेन पीत्वा - पसरलेला अग्नी मुखाने पिऊन - तान् कृच्छ्रात् व्यमोचयत् - त्यांना संकटातून सोडविता झाला. ॥१२॥
ठीक आहे. असे म्हणून त्यांनी डोळे मिटताच योगेश्वर भगवंतांनी ती भयंकर आग तोंडाने पिऊन टाकली; आणि त्यांना त्या घोर संकटातून सोडविले. (१२)
विवरण :- मुंजाखीला दावाग्नीने घेरल्यावर गोपांनी कृष्णाचा धावा केला आणि कृष्णाने त्यांना डोळे मिटण्यास सांगून तो अग्नी पिऊन टाकला. श्रीकृष्णाने गोपांना डोळे मिटण्यास का सांगितले असावे ? कारण सर्वांसमोर अग्नी प्राशन केला असता तर त्याच्या मनुष्यत्वाबद्दल सर्वांना शंका आली असती. तो हे सर्व योगसामर्थ्याने, काही विशिष्ट शक्तीने, सामर्थ्याने करतो आहे, एवढेच ते समजत असत. (अर्थात असा दावाग्नी त्याने कालियामर्दनानंतरच्या रात्रीही प्राशन केला होता. त्यावेळी गोपांना त्याची जाणीव झाली नसावी. कारण दिवसभराच्या कृष्णाबद्दलच्या चिंतेने, तहान-भुकेने ते अत्यंत क्लांत, व्याकुळ होऊन झोपले होते. त्यामुळे अर्धवट झोपेत, गुंगीत त्यांना त्याची जाणीव झाली नसावी आणि रात्र असल्याने कदाचित नीट दिसलेही नसावे. श्रीकृष्णाची माया हेच खरे.) शिवाय या प्रकाराने कृष्णाला ते देवही समजू लागले असते आणि त्यांच्यात अंतर निर्माण झाले असते. सवंगडी, सखा हीच भावना कृष्णाला हवी होती. ते प्रेम ती भावना मिळाली नसती, जे मिळवायला तो अधीर होता. (११-१२)
ततश्च तेऽक्षीण्युन्मील्य पुनर्भाण्डीरमापिताः ।
निशाम्य विस्मिता आसन् आत्मानं गाश्च मोचिताः ॥ १३ ॥
उघडिताचि ते नेत्र बाळगोपाळ सर्व ते । गाईंच्या सहची होते भांडीर वनि त्या पुन्हा । विस्मयो जाहला सर्वा संकटो टळले असे ॥ १३ ॥
ततः च - आणि नंतर - पुनः भाण्डीरं आपिताः ते - पुन्हा भाण्डीरम् वनाला आणिलेले ते - अक्षीणि उन्मील्य - डोळे उघडून - आत्मानं (मोचितं) गाः च - आपल्याला व गाईंना - मोचिताः निशाम्य - सोडविलेले पाहून - विस्मिताः आसन् - आश्चर्यचकित झाले. ॥१३॥
यानंतर जेव्हा गोपाळ डोळे उघडून बघतात, तोच त्यांना आपण मांडीर वडाजवळ आहोत असे दिसले. अशा प्रकारे त्यांची आणि गुरांची दावानलापासून सुटका झाल्याचे पाहून ते गोपाळ आश्चर्यचकित झाले. (१३)
कृष्णस्य योगवीर्यं तद् योगमायानुभावितम् ।
दावाग्नेरात्मनः क्षेमं वीक्ष्य ते मेनिरेऽमरम् ॥ १४ ॥
योगमाया अशी कृष्णे दाविता बाळगोप ते । चुकले समजोनीया कृष्ण हा देवता असे ॥ १४ ॥
ते - ते गोप - कृष्णस्य योगमायानुभावितं - योगमायेच्या योगे प्रभावशाली असे - तत् योगवीर्यं - ते योगसामर्थ्य - दावाग्नेः आत्मनः क्षेमं - आणि वणव्यापासून स्वतःचे रक्षण - वीक्ष्य - पाहून - तं अमरं मेनिरे - त्याला ईश्वर मानिते झाले. ॥१४॥
श्रीकृष्णांची ही योगसिद्धी आणि योगमायेचा प्रभाव तसेच दावानलापासून आपले रक्षण झाल्याचे पाहून ते श्रीकृष्णांना देव मानू लागले. (१४)
गाः सन्निवर्त्य सायाह्ने सहरामो जनार्दनः ।
वेणुं विरणयन् गोष्ठं अगाद् गोपैरभिष्टुतः ॥ १५ ॥
सायंकाळी बलो कृष्ण वंशिनादात त्या व्रजीं । पातता बाळगोपाळे दोघांची स्तुति गायिली ॥ १५ ॥
गोपैः अभिष्टुतः - गोपांनी स्तविलेला - सहरामः जनार्दनः - बलरामासह श्रीकृष्ण - सायाह्ने वेणुं विरणयन् - संध्याकाळी मुरली वाजवीत - गाः संनिवर्त्य - गाईंना परत फिरवून - गोष्ठं अगात् - गोकुळात आला. ॥१५॥
संध्याकाळ झाल्यानंतर बलरामाबरोबर भगवान श्रीकृष्ण गाईंना माघारी बलवून बासरी वाजवीत व्रजाकडे आले. त्यावेळी गोपाळ त्यांची स्तुती करीत येत होते. (१५)
गोपीनां परमानन्द आसीद् गोविन्ददर्शने ।
क्षणं युगशतमिव यासां येन विनाभवत् ॥ १६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
गोपिकांना विना कृष्ण क्षण तो युग ते शत । वाटतो, पातता कृष्ण दर्शनी मग्न जाहल्या ॥ १६ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणविसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
गोविन्ददर्शने - श्रीकृष्णाचे दर्शन होताच - गोपीनां परमानन्दः आसीत् - गोपींना मोठा आनंद झाला - येन विना - ज्या श्रीकृष्णाशिवाय - यासां क्षणं - ज्यांचा क्षण - युगशतं इव अभवत् - शंभर युगाप्रमाणे होता. ॥१६॥
इकडे व्रजामध्ये श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत गोपींना एक एक क्षण शंभर शंभर युगांप्रमाणे वाटत होता. जेव्हा त्यांचे दर्शन झाले, तेव्हा त्यांना परमानंद झाला. (१६)
अध्याय एकोणिसावा समाप्त |