श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
अष्टदशोऽध्यायः

प्रलम्बासुरवधः -

प्रलंबासुर उद्धार -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
अथ कृष्णः परिवृतो ज्ञातिभिर्मुदितात्मभिः ।
अनुगीयमानो न्यविशद् व्रजं गोकुलमण्डितम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
आनंदी स्वजनांमध्ये गान त्यांच्या मुखातले ।
ऐकता कृष्ण तो आला गोठ्यात गोकुळीचिया ॥ १ ॥

अथ - नंतर - मुदितात्मभिः - आनंदित आहे अन्तःकरण ज्यांचे - ज्ञातिभिः परिवृतः - अशा बांधवांनी वेष्टिलेला - कृष्णः - श्रीकृष्ण - अनुगीयमानः - गायिला जाणारा असा - गोकुलमण्डितं - गाईंच्या समुदायांनी शोभिवंत झालेल्या - व्रजं न्यविशत् - गोकुळात शिरला. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - नंतर आनंदित झालेल्या स्वजनांसह त्यांच्या तोंडून आपल्या कीर्तीचे गोडवे ऐकत, श्रीकृष्णांनी गाईगुरांनी शोभणार्‍या व्रजात प्रवेश केला. (१)


व्रजे विक्रीडतोरेवं गोपालच्छद्ममायया ।
ग्रीष्मो नामर्तुरभवन् नातिप्रेयान् शरीरिणाम् ॥ २ ॥
या परी योगमायेने गोपाळ वेष घेउनी ।
क्रीडती राम नी कृष्ण उन्हाळा त्रासितो जना ॥ २ ॥

(तयोः) गोपालच्छद्ममायया - ते दोघे राम व कृष्ण मायेने गोपाळांची स्वरूपे घेऊन - एवं व्रजे विक्रीडतोः - याप्रमाणे गोकुळात खेळत असता - शरीरिणाम् नातिप्रेयान् - प्राणिमात्रांना फारसा न आवडणारा - ग्रीष्मः नाम ऋतुः - ग्रीष्म नावाचा ऋतु - अभवत् - चालू झाला. ॥२॥
अशा प्रकारे योगमायेने गोपाळ झालेले राम-कृष्ण व्रजामध्ये लीला करीत होते. असाच एकदा ऐन उन्हाळा होता. प्राण्यांना हा तसा विशेष आवडत नाही. (२)


स च वृन्दावनगुणैः वसन्त इव लक्षितः ।
यत्रास्ते भगवान् साक्षाद् रामेण सह केशवः ॥ ३ ॥
परी वृंदावना मध्ये वसंत फुलतो तसा ।
कृष्ण नी बलरामो ते राहता तेथ हो असे ॥ ३ ॥

सः च - आणि तो ग्रीष्म ऋतु - वृन्दावनगुणैः - वृंदावनाच्या गुणांमुळे - वसन्तः इव लक्ष्यते - वसन्ताप्रमाणे दिसला - यत्र - ज्या वृंदावनात - साक्षात् भगवान् केशवः - प्रत्यक्ष षड्‌गुणैश्वर्यसंपन्न असा श्रीकृष्ण - रामेण सह आस्ते - बलरामासह राहिला आहे. ॥३॥
परंतु वृंदावनातील स्वाभाविक गुणांमुळे तेथे वसंत ऋतूच वाटत होता. कारण तेथे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम निवास करीत होते ना ! (३)

विवरण :- कालियामर्दन केल्यानंतर कृष्ण-बलराम आपल्या सवंगडयांसह पुन्हा क्रीडेत रममाण झाले. तेव्हा अत्यंत कडक असा ग्रीष्मऋतु होता, उन्हाने शरीराची काहिली करणारा. पण रामकृष्णांच्या सह्वासाने तो वसंतऋतूसारखा आल्हाददायी झाला. भगवंताच्या सहवासाचा परिणाम किती सुखद असतो, निसर्गहि आपले मूळ रूप कसे बदलतो हे इथे सूचित केले आहे. (यापूर्वीही पशुपक्षी आपले जन्मजात हाडवैर कृष्णाच्या सान्निध्यात विसरतात, असा उल्लेख आला आहेच.) (३)



यत्र निर्झरनिर्ह्राद निवृत्तस्वनझिल्लिकम् ।
शश्वत्तच्छीकरर्जीष द्रुममण्डलमण्डितम् ॥ ४ ॥
झर्‍यात थंड पाण्याचे फोवारे उडती सदा ।
तेणे सदैव वृक्षांना हरीत रंग तो असे ॥ ४ ॥

यत्र - ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत - वृन्दावनं - ते वृंदावन - निर्झरनिह्रादनिवृत्तस्वन - झर्‍यांच्या घोषामुळे बंद झाला आहे आवाज ज्यांचा - झिल्लिकम् - असे झिल्लि नावाचे किटक आहेत जेथे असे - शश्वत्तच्छीकरर्जीष - नित्य उडणार्‍या त्या झर्‍यांच्या जलबिंदूंनी ओल्या झालेल्या - द्रुममण्डलमण्डितम् - वृक्षांच्या राईंनी शोभणारे ॥४॥
तेथे रातकिड्यांचा कर्कश आवाज, झर्‍यांच्या खळखळाटामध्ये झाकला गेला होता. त्या निर्झरांतून सदैव पाण्याचे तुषार उडत असत. त्यामुळे ते वन हिरव्यागार वनराईने शोभिवंत झाले होते. (४)


( वंशस्था )
सरित्सरःप्रस्रवणोर्मिवायुना
     कह्लारकञ्जोत्पलरेणुहारिणा ।
न विद्यते यत्र वनौकसां दवो
     निदाघवह्न्यर्क भवोऽतिशाद्वले ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा )
पाहो तिथे ते तृणची हरीत
     ओढे तळ्यांना हळु स्पर्शि वायू ।
स्पर्शी निळे लालहि पद्मगंध
     तेथे न स्पर्शी उन्ह ताप घाम ॥ ५ ॥

यत्र - ज्या ग्रीष्मऋतूमध्ये - अतिशाद्वले - हिरव्यागार गवतांनी व्यापिलेल्या प्रदेशात - कह्‌लारकञ्जोत्पलरेणुहारिणा - कुमुद, कमळ व पद्म यांचे पराग वाहून नेणार्‍या - सरित्सरःप्रस्रवणोर्मिवायुना - नद्या व सरोवरे ह्यांच्या प्रवाहांतील लाटांवरून वाहणार्‍या वार्‍याने - निदाघवह्‌न्यर्कभवः - उन्हाळ्यातील अग्नी व सूर्य ह्यांपासून होणारा - दवः - उकाडा - वनौकसां (व्रजवासिनाम्) न विद्यते - अरण्यात राहणार्‍या गोपगोपींना वाटत नसे. ॥५॥
नदी, सरोवरे व झर्‍यांच्या लाटांना स्पर्श करून जो वारा वाहात होता, त्यात पांढर्‍या, लाल, निळ्या कमळांचे पराग मिसळत होते. त्यामुळे हिरवळीने भरलेल्या त्या वनात राहणार्‍या लोकांना वणवा किंवा सूर्य यांच्या उष्णतेचा मुळीच त्रास नव्हता. (५)


अगाधतोयह्रदिनीतटोर्मिभिः
     द्रवत्पुरीष्याः पुलिनैः समन्ततः ।
न यत्र चण्डांशुकरा विषोल्बणा
     भुवो रसं शाद्वलितं च गृह्णते ॥ ६ ॥
नद्यात पाणी बहु थोर वाहे
     चुंबीत लाटा तट स्वच्छ होई ।
ओलाचि राही तट तो सदैव
     उन्हे न वाळे तृण त्या वनीचे ॥ ६ ॥

यत्र - ज्या ग्रीष्मऋतूत - अगाधतोय - खोल पाण्याच्या - ह्रदिनीतटोर्मिभिः - सरोवरांनी युक्त अशा नदीच्या काठांवर आपटणार्‍या लाटांनी - पुलिनैः सह - वाळवंटासह - द्रवत्पुरीष्याः भुवः रसं - जिच्यातील चिखल धुपून जात आहे अशा भूमीवरील पाणी - शाद्वलितं (च) - आणि गवताचा हिरवा रंग - विषोल्बणाः चण्डांशुकराः - विषासारखे भयंकर असे सूर्याचे प्रखर किरण - समन्ततः न गृहणते - सर्व बाजूंनी हरण करीत नाहीत. ॥६॥
नदीमध्ये भरपूर पाणी असे. तिच्या लाटा तटांवर येऊन थडकत. त्यामुळे आसपासच्या जमिनी ओलसर राहात आणि सूर्याचे विषासारखे प्रकर किरणसुद्धा तेथील जमिनी आणि हिरवेगार गवत सुकवू शकत नसत. (६)


( अनुष्टुप् )
वनं कुसुमितं श्रीमन् नदच्चित्रमृगद्विजम् ।
गायन् मयूरभ्रमरं कूजत्कोकिल सारसम् ॥ ७ ॥
( अनुष्टुप् )
वनात पान पानाला फुले ती नित्य दाटती ।
सौंदर्य फुलते नित्य फिरती हरिणे खग ।
नाचती मोर नी गाती भुंगे कोकिळ सारस ॥ ७ ॥

कुसुमितं - पुष्पयुक्त - नदच्चित्रमृगद्विजम् - शब्द करीत आहेत चित्रविचित्र मृग व पक्षी ज्यात अशा - गायन्मयूरभ्रमरं - गात आहेत मोर व भुंगे ज्यात अशा - कूजत्कोकिलसारसम् - मंजुळ ध्वनी करीत आहेत चक्रवाक पक्षी ज्यात अशा - श्रीमत् वनं - शोभायमान वनात. ॥७॥
त्या वनामध्ये फुले विपुल असल्याने तेथे सौंदर्य ओसंडत होते. कुठे रंगीबेरंगी पक्षी किलबिलाट करीत, तर कुठे हरिणे चीत्कार करीत. कुठे मोर केकारव करीत, तर कुठे भ्रमर गुंजारव करीत. कुठे कोकिळा कुहू कुहू गात तर कुठे सारस पक्षी कूजन करीत. (७)


क्रीडिष्यमाणस्तत् कृष्णो भगवान् बलसंयुतः ।
वेणुं विरणयन् गोपैः गोधनैः संवृतोऽविशत् ॥ ८ ॥
क्रीडाया इच्छिती तेथे कृष्ण नी बलराम ते ।
चालती पुढती गाई कृष्ण वेणूस वाजवी ॥ ८ ॥

क्रीडिष्यमाणः - खेळण्याची इच्छा करणारा - बलसंयुतः - बळरामासह - भगवान् - भगवान - कृष्णः - श्रीकृष्ण - वेणुं विरणयन् - मुरली वाजवीत - गोपैः गोधनैः संवृतः - गोपाळ व गाई यांसह - अविशत् - शिरला. ॥८॥
त्या वनात श्रीकृष्ण आणि बलराम यांनी क्रीडा करण्याचे ठरविले. म्हणून गोधन घेऊन बासरी वाजवीत ते त्या वनात शिरले. (८)


प्रवालबर्हस्तबक स्रग्धातुकृतभूषणाः ।
रामकृष्णादयो गोपा ननृतु-र्युयुधुर्जगुः ॥ ९ ॥
राम श्याम नि गोपांनी पल्लवो मोरपंख नी ।
फुलांचे घातले हार अंगालाही चितारले ।
नाचती गातही गाणे हाबूक ठोकिती कुणी ॥ ९ ॥

प्रवालबर्हस्तबक - पोवळी व मोरांची पिसे ह्यांच्या - स्रग्धातुकृतभूषणाः - झुबक्यांच्या माळा व धातू यांनी अलंकृत केलेले - रामकृष्णादयः गोपाः - रामकृष्ण इत्यादि गोपाळ - ननृतुः युयुधुः जगुः - नाचू लागले, कुस्ती खेळू लागले व गाऊ लागले.॥९॥
राम कृष्ण इत्यादि गोपाळ कोवळी पाने, मोरपिसांचे गुच्छ, फुलांचे हार आणि गेरूसारखे रंग लावून सजले. नंतर कोणी नाचू लागले, कोणी कुस्ती खेळू लागले आणि काहीजण गाऊ लागले. (९)


कृष्णस्य नृत्यतः केचित् जगुः केचित् अवादयन् ।
वेणुपाणितलैः शृङ्‌गैः प्रशशंसुः अथापरे ॥ १० ॥
श्रीकृष्ण नाचतो तेंव्हा बाळ बासुरि फुंकिती ।
टाळ्या त्या वाजवी कोणी वाहवा म्हणती कुणी ॥ १० ॥

कृष्णस्य नृत्यतः - श्रीकृष्ण नाचू लागला असता - केचित् - कित्येक - वेणूपाणितलैः - मुरली व टाळ्या यांनी - श्रृंगैः - शिंगांनी - अवादयन् - वाजवू लागले - अथ अपरे प्रशशंसुः - आणि दुसरे कित्येक वाहवा करू लागले. ॥१०॥
ज्यावेळी श्रीकृष्ण नाचू लागत, त्यावेळी काहीजण गाऊ लागत तर काहीजण बासरी व शिंगे वाजवू लागत. काहीजण हातांनीच ताल धरीत, तर काहीजण "वाहवा ! वाहवा !" म्हणत. (१०)


गोपजातिप्रतिच्छन्नौ देवा गोपालरूपिणः ।
ईडिरे कृष्णरामौ च नटा इव नटं नृप ॥ ११ ॥
नट जै नायकिणीला नाटकात प्रशंसिती ।
तसेचि कृष्ण रामाची करिती गोप ते स्तुती ॥ ११ ॥

च - आणि - नृप - हे राजा - गोपजातिप्रतिच्छन्नाः - गोपांच्या जातीत जन्म घेतल्यामुळे ज्यांची स्वरूपे झाकली आहेत असे - गोपालरूपिणः - गोपाळांची रूपे धारण करणारे - (ते) देवाः - ते देव - नटाः नटं इव - कित्येक नाटकी पुरुष दुसर्‍या नाटकी पुरुषाची प्रशंसा करितात त्याप्रमाणे - रामकृष्णौ ईडिरे - बलराम व श्रीकृष्ण यांची स्तुती करू लागले. ॥११॥
परीक्षिता ! त्यावेळी नट जसे नायकाची प्रशंसा करतात, त्याप्रमाणे देव गोपांचे रूप धारण करून तेथे येत आणि गोपजातीमध्ये जन्म घेऊन लपून राहिलेल्या बलराम व श्रीकृष्णांची स्तुती करू लागत. (११)


भ्रमणैर्लङ्‌घनैः क्षेपैः आस्फोटन विकर्षणैः ।
चिक्रीडतुर्नियुद्धेन काकपक्षधरौ क्वचित् ॥ १२ ॥
फुगडी खेळती दोघे राम नी कृष्ण तेधवा ।
हमामा घुमरी केंव्हा सूर पारंबि खेळती ।
ढेकळे फेकिती केंव्हा दोर ओढीस खेळती ।
परस्परात कुस्ती हे खेळ तो नित्य चालती ॥ १२ ॥

क्वचित् - काही वेळ - काकपक्षधरौ - झुलपे राखलेले ते दोघे बलराम व श्रीकृष्ण - भ्रामणैः - गरगर फिरण्यांनी - लङघनैः - उडया मारण्यांनी - क्षेपैः - दगड फेकण्यांनी - आस्फोटनविकर्षणैः - दंड ठोकणे व दुसर्‍याला ओढणे ह्यांनी - नियुद्धेन - मल्लयुद्धांनी - चिक्रीडतुः - खेळते झाले. ॥१२॥
झुलपे असणारे श्रीकृष्ण आणि बलराम कधी एकमेकांचे हात धरून गोल गोल फिरत, कधी उंच उड्या मारत, कधी पैज लावून ढेकळे फिकीत, कधी दंड थोपटत, कधी गट करून एकमेकांना ओढीत, कधी एकमेकांशी कुस्ती खेळत. अशा प्रकारे निरनिराळ्या तर्‍हेचे खेळ खेळत. (१२)


क्वचिन् नृत्यत्सु चान्येषु गायकौ वादकौ स्वयम् ।
शशंसतुर्महाराज साधु साध्विति वादिनौ ॥ १३ ॥
नाचता बाळ गोपाळ वाजवी वेणु कृष्ण नी ।
बळी तो वाजवी शिंगी वाहवा म्हणती नृपा ! ॥ १३ ॥

च - आणि - महाराज - हे राजा - क्वचित् - काही वेळ - अन्येषु नृत्यत्सु - दुसरे नाचू लागले असता - स्वयं गायकौ वादकौ च (भूत्वा) - स्वतः गाणारे व वाद्ये वाजविणारे होऊन - साधु साधु इति वादिनौ - वाहवा, फार चांगले असे म्हणत - शशंसतुः - ते दोघे त्यांची प्रशंसा करते झाले. ॥१३॥
हे राजा ! कधी कधी जेव्हा इतर गोपाळ नाचू लागत, तेव्हा स्वतः राम-कृष्ण गात किंवा वाजवीत किंवा "शाबास, शाबास !" म्हणून त्यांची प्रशंसा करू लागत. (१३)


क्वचित् बिल्वैः क्वचित् कुम्भैः क्व चामलकमुष्टिभिः ।
अस्पृश्यनेत्रबन्धाद्यैः क्वचित् मृगखगेहया ॥ १४ ॥
आवळा बेल नी जायफळ फेकून खेळती ।
लपण्या छपनी होई पशू पक्षासि चेष्टिती ॥ १४ ॥

क्वचित् - काही वेळ - बिल्वैः - बेलफळांनी - क्वचित् - थोडा वेळ - कुम्भैः - कुंभ्याच्या फळांनी - क्व च - आणखी काही वेळ - आमलकमुष्टिभिः - आवळ्यांच्या मुठींनी - अस्पृश्यनेत्रबन्धाद्यैः - लपंडावासारख्या डोळे झाकण्याच्या इत्यादि खेळांनी - क्वचित् - काही वेळ - मृगखगेहया - पशुपक्ष्यांसारख्या चेष्टा करून. ॥१४॥
कधी एक दुसर्‍यावर बेल, जायफळे किंवा आवळे हातात घेऊन फेकित. कधी लपंडाव खेळत. कधी एकमेकांना शिवण्यासाठी पुष्कळ लांबपर्यंत पळत जात, तर कधी पशुपक्ष्यांच्या नकला करीत. (१४)


क्वचिच्च दर्दुरप्लावैः विविधैरुपहासकैः ।
कदाचित् स्पन्दोलिकया कर्हिचित् नृपचेष्टया ॥ १५ ॥
बेडका परि ते ड्राँव ध्वनि करुनि हासती ।
झोके ही बांधिती कोणी मनोरा करिती कुणी ॥ १५ ॥

क्वचित् - थोडा वेळ - उपहासकैः - हास्य करण्याजोग्या - विविधैः दर्दुरप्लावैः - अनेक प्रकारच्या बेडकांसारख्या उडया मारण्यांनी - च - आणि - कदाचित् - काही काळ - स्पन्दोलिकया - झोपाळ्यावर बसून झोके घेण्याने - कर्हिचित् नृपचेष्टया - काही वेळ राजासारख्या चेष्टा करून. ॥१५॥
कधी बेडकांप्रमाणे उड्या मारीत चालत, तर कधी वाकुल्या दाखवून एकमेकांची थट्टा करीत. कधी झाडावर दोराचा झोका तयार करून झोके घेत तर कधी राजाचा खेळ खेळत. (१५)


एवं तौ लोकसिद्धाभिः क्रीडाभिश्चेरतुर्वने ।
नद्यद्रिद्रोणिकुञ्जेषु काननेषु सरःसु च ॥ १६ ॥
लोकलीला अशा सार्‍या करिती राम कृष्ण ते ।
तटी घाटी वनीं आणि जळात क्रीडती पहा ॥ १६ ॥

एवं - याप्रमाणे - वने - अरण्यात - नद्यद्रिद्रोणिकुञ्जेषु - नद्या, पर्वत, गुहा व वेलींच्या जाळ्या ह्याठिकाणी - काननेषु - निबिड अरण्यामध्ये - च सरस्सु - आणि तळ्यात - तौ - ते दोघे बलराम व श्रीकृष्ण - लोकसिद्धाभिः क्रीडाभिः - लोकांमध्ये प्रसिद्ध अशा खेळांनी - चेरतुः - संचार करिते झाले. ॥१६॥
अशा रीतीने सामान्यपणे मुले जे खेळ खेळतात, तसलेच खेळ ते वृंदावनातील नदी, पर्वत, दर्‍या, कुंज, वन, सरोवर वगैरे ठिकाणी खेळत. (१६)


पशूंश्चारयतोर्गोपैः तद् वने रामकृष्णयोः ।
गोपरूपी प्रलम्बोऽगाद् असुरस्तज्जिहीर्षया ॥ १७ ॥
बाळगोपाळ घेवोनी एकदा रामकृष्ण ते ।
वनात गाइ चाराया जाताइच्छी प्रलंब तो ।
कृष्ण अन् बलरामास हराया सिद्ध राक्षस ॥ १७ ॥

तद्वने - त्या अरण्यात - रामकृष्णयोः - बलराम व श्रीकृष्ण - गोपैः पशून् चारयतोः - गोपांसह गाई चरवीत असता - तज्जिहीर्षया - त्या दोघांना चोरून नेण्याच्या इच्छेने - प्रलम्बः असुरः - प्रलंब नावाचा असुर - गोपरूपी - गोपासारखे रूप घेऊन - अगात् - आला. ॥१७॥
एके दिवशी जेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण गोपाळांसह त्या वनामध्ये गुरे चारीत होते, तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना पळवून नेण्यासाठी गवळ्याच्या वेषामध्ये एक प्रलंब नावाचा असुर आला. (१७)


तं विद्वानपि दाशार्हो भगवान् सर्वदर्शनः ।
अन्वमोदत तत्सख्यं वधं तस्य विचिन्तयन् ॥ ॥
सर्वज्ञ कृष्ण ते जाणी घेतला मित्र मानुनी ।
मनात युक्ति तो बांधी असूरा मारण्या हरी ॥ १८ ॥

सर्वदर्शनः भगवान् दाशार्हः - सर्वज्ञ व सर्वैश्वर्यसंपन्न यदुकुलोत्पन्न श्रीकृष्ण - तत् विद्वान् अपि - ते जाणूनही - तस्य वधं विचिन्तयन् - त्याला मारण्याचा विचार करीत - तत्सख्यं अन्वमोदत - त्याच्याशी मैत्री करण्यास संमति देता झाला. ॥१८॥
भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्याने त्यांनी त्याला ओळखले. तरीही त्यांनी त्याची मैत्री मान्य केली, कारण त्यांना त्याला मारायचे होते. (१८)


तत्रोपाहूय गोपालान् कृष्णः प्राह विहारवित् ।
हे गोपा विहरिष्यामो द्वन्द्वीभूय यथायथम् ॥ १९ ॥
सगळ्या खेळितां माजी कृष्ण आचार्य तो जसा ।
पाडूया गट ते सांगे आनंदे खेळ खेळुया ॥ १९ ॥

विहारवित् कृष्णः - खेळण्याच्या कामात निष्णात असा श्रीकृष्ण - तत्र गोपालान् उपाहूय - त्याठिकाणी गोपाळांना बोलावून - आह - म्हणाला - हे गोपाः - गोप हो - यथायथं द्वंद्वीभूय विहरिष्यामः - योग्य रीतीने जोडया करून खेळू या. ॥१९॥
क्रीडा प्रकारात तज्ञ असणार्‍या श्रीकृष्णांनी गोपाळांना जवळ बोलावून म्हटले, "मित्रांनो ! आज आपण यथायोग्य रीतीने दोन गट करून खेळू." (१९)


तत्र चक्रुः परिवृढौ गोपा रामजनार्दनौ ।
कृष्णसङ्‌घट्टिनः केचित् आसन् रामस्य चापरे ॥ २० ॥
रामाचा गट तो एक कृष्णाचा गट एक तो ।
गटात अन्य ती बाळे सर्वची पातले पहा ॥ २० ॥

तत्र - त्या खेळात - गोपाः - गोप - रामजनार्दनौ - बलराम व श्रीकृष्ण यांना - परिवृढौ - म्होरके - चक्रुः - करते झाले - केचित् कृष्णसंघटटिनः - कित्येक कृष्णाच्या बाजूचे - अपरे च रामस्य आसन् - आणि दुसरे रामाच्या पक्षाचे झाले. ॥२०॥
गोपाळांनी त्या खेळासाठी बलराम आणि श्रीकृष्णांना नायक बनविले. काहीजण श्रीकृष्णाचे तर काहीजण बलरामाचे साथीदार झाले. (२०)


आचेरुर्विविधाः क्रीडा वाह्यवाहकलक्षणाः ।
यत्रारोहन्ति जेतारो वहन्ति च पराजिताः ॥ २१ ॥
खेळता अन्य ते खेळ कुर्‌घोडी खेळ चालला ।
जिंकणारा बसे पाठीं वाही ओझे पराजित ॥ २१ ॥

यत्र - ज्या खेळात - जेतारः आरोहन्ति - जिंकणारे गडी खांद्यावर बसतात - पराजिताः च वहन्ति - आणि हरलेले गडी त्यांना वाहून नेतात - ताः विविधाः - तशा अनेक प्रकारच्या - वाह्यवाहकलक्षणाः क्रीडाः - एकाने दुसर्‍याला खांद्यावर वाहून नेणे हे आहे स्वरूप ज्यांचे अशा क्रीडा - आचेरुः - करिते झाले. ॥२१॥
नंतर ते वाहून नेण्याच्या प्रकाराचे पुष्कळ खेळ खेळले. यामध्ये विजेता गट हरणार्‍यांच्या पाठीवर बसत असे व हरणारा त्यांना वाहून नेत असे. (२१)


वहन्तो वाह्यमानाश्च चारयन्तश्च गोधनम् ।
भाण्डीरकं नाम वटं जग्मुः कृष्णपुरोगमाः ॥ २२ ॥
चारिता खेळता ऐसे पोचले कृष्ण गोप ते ।
भांडीर वटवृखाच्या जवळी बाळ सर्व ते ॥ २२ ॥

वहन्तः - वाहून नेणारे - च वाह्यमानाः - आणि वाहिले जाणारे - च गोधनं चारयन्तः - आणि गाईंनाही चरविणारे - कृष्णपुरोगमाः ते - श्रीकृष्ण आहे पुढारी ज्यांचा असे ते गोप - भाण्डीरकं नाम वटं जग्मुः - भांडीरक नावाच्या वडाजवळ गेले. ॥२२॥
अशा प्रकारे वाहणारे व वाहिले जाणारे असे दोन्ही गट श्रीकृष्णांच्या नेतृत्वाखाली गोधनाला चारीर भांडीरक नावाच्या वडाच्या झाडाजवळ जाऊन पोहोचले. (२२)


रामसङ्‌घट्टिनो यर्हि श्रीदामवृषभादयः ।
क्रीडायां जयिनस्तान् तान् ऊहुः कृष्णादयो नृप ॥ २३ ॥
खेळता बलरामाच्या गटाने बाजि मारिली ।
कृष्णादी सर्व ते त्यांना पाठीसी वाहु लागले ॥ २३ ॥

नृप - हे राजा - यर्हि - जेव्हा - रामसंघट्टिनः श्रीदामवृषभादयः - रामाच्या पक्षातील श्रीदाम, वृषभ इत्यादि गोप - क्रीडायां जयिनः - खेळण्यात विजयी झाले - तर्हि - तेव्हा - कृष्णादयः - श्रीकृष्णादि गोप - तान् तान् - त्या त्या रामपक्षीय गोपाळांना - ऊहुः - वाहून नेते झाले. ॥२३॥
परीक्षिता ! एकदा बलरामाच्या गटातील श्रीदामा, वृषभ इत्यादि मुलांनी खेळामध्ये बाजी मारली, तेव्हा श्रीकृष्ण वगैरे त्यांना आपल्या पाठीवर बसवून वाहून नेऊ लागले. (२३)


उवाह कृष्णो भगवान् श्रीदामानं पराजितः ।
वृषभं भद्रसेनस्तु प्रलम्बो रोहिणीसुतम् ॥ २४ ॥
श्रीदामा कृष्णपाठीसी वृषभो भद्रसेनला ।
प्रलंबे बलरामाला पाठीसी घेतले पहा ॥ २४ ॥

पराजितः भगवान् कृष्णः - हरलेला भगवान श्रीकृष्ण - श्रीदामानम् उवाह - श्रीदामा नावाच्या गोपाळाला वाहून नेता झाला - भद्रसेनः तु वृषभं - आणि भद्रसेन वृषभ नामक गोपाळाला - प्रलम्बः रोहिणीसुतम् (उवाह) - व प्रलंबासुर बलरामाला वाहून नेता झाला.॥२४॥
हरलेल्या श्रीकृष्णांनी श्रीदाम्याला आपल्या पाठीवर बसवून घेतले, भद्रसेनाने वृषभाला आणि प्रलंबाने बलरामांना ! (२४)

विवरण :- राम-कृष्ण गोपांसह वनात खेळत असता 'प्रलंब' नावाचा असुर गोप बनून त्यात सामील झाला. श्रीकृष्णाने त्यास अंतर्ज्ञानाने ओळखले, पण तसे दर्शविले नाही. खेळताना जो गट हरेल, त्यातील सवंगडयांनी जिंकलेल्या गटातील सवंगडयांना 'भांडरिका' नावाच्या वटवृक्षापर्यंत पाठीवरून वाहून न्यायचे. असा तो खेळ. प्रलंब कृष्णाच्या गटात मुद्दामच सामील झाला; या विचाराने की जर रामाच्या गटात सामील होऊन कृष्णाकडून पराभूत झाला, तर कृष्णाला वाहून नेणे अशक्य झाले असते. (कारण कृष्णाच्या बळाची कल्पना त्याला होती.) म्हणून (बलरामाच्या बळाची कल्पना नसल्याने) डाव हरल्यानंतर त्याने बलरामास वाहून नेण्याचे ठरविले. (अज्ञानात सुख म्हणतात, ते हेच. अर्थात बलराम ही चीज काय आहे, हे प्रत्ययाला आल्यानंतर त्याची गाळण उडालीच.) (२४)



अविषह्यं मन्यमानः कृष्णं दानवपुङ्‌गवः ।
वहन् द्रुततरं प्रागाद् अवरोहणतः परम् ॥ २५ ॥
प्रलंबे दानवीवंशी चिंतितो संधि ही बरी ।
घेता पाठीस रामाला पळाला कोठच्या कुठे ॥ २५ ॥

दानवपुङगवः - प्रलम्बासुर - कृष्णं अविषह्यं मन्यमानः - कृष्णाचे तेज असह्य आहे असे मानून - द्रुततरं वहन् - जलदीने वाहून - अवरोहणतः परं प्रागात् - वाहून नेण्याच्या मर्यादेच्या पलीकडे गेला. ॥२५॥
दानवश्रेष्ठ प्रलंबाने श्रीकृष्णाला हरवणे कठीण आहे हे ओळखून तो त्यांच्याच गटात गेला. तो बलरामांना पाठीवर घेऊन वेगाने पळत सुटला व ठरलेल्या ठिकाणाच्याही पुढे निघून गेला. (२५)


( प्रभावती )
तमुद्वहन् धरणिधरेन्द्रगौरवं
     महासुरो विगतरयो निजं वपुः ।
स आस्थितः पुरटपरिच्छदो बभौ
     तडिद् द्युमान् उडुपतिवाडिवाम्बुदः ॥ २६ ॥
( गति )
बळीहि तो जड असे वहावया
     प्रलंब तो अतिदुरी न नेवू शके ।
काळे कभिन्न रुप नि स्वर्ण दागिने
     पाठीसि गौर बळिहि तै शशी ढगीं ॥ २६ ॥

निजं वपुः आस्थितः - स्वतःचे मूळचे शरीर स्वीकारलेला - पुरटपरिच्छदः - सुवर्णाचे आहेत अलंकार ज्याचे असा - धरणिधरेन्द्रगौरवं तं - हिमालय पर्वताप्रमाणे जड अशा बलरामाला - उद्वहन् विगतरयः - वाहून नेत असता वेगरहित झालेला - सः महासुरः - तो मोठा प्रलम्बासुर - उडुपतिवाट् - चंद्राला धारण करणार्‍या - तडित् द्युमान् अम्बुदः इव - विजेसहित असलेल्या मेघाप्रमाणे - बभौ - शोभला. ॥२६॥
एखाद्या मोठ्या पर्वताइतक्या वजनदार बलरामांना घेऊन जाता जाता प्रलंबासुराचे चालणे थांबले; त्याने आपले खरे दैत्यरूप धारण केले. त्याच्या काळ्या शरीरावर सोन्याचे दागिने चमकत होते. गौरवर्ण बलरामांना पाठीवर घेतल्यामुळे तो असा दिसत होता की, जणू वीजयुक्त काळ्या ढगाने चंद्राला धारण केले आहे. (२६)


निरीक्ष्य तद्वपुरलमम्बरे चरत् ।
     प्रदीप्तदृग् भ्रुकुटितटोग्र दंष्ट्रकम् ।
ज्वलच्छिखं कटक किरीटकुण्डल
     त्विषाद्‍भुतं हलधर ईषदत्रसत् ॥ २७ ॥
बघे भयान कचहि पांगले तसे
     करी पदात वलयि कर्णिं कुंडले ।
बघोनि दैत्य नभग हा बळी मनी
     क्वचितचि अविचलो नि शांत हो ॥ २७ ॥

हलधरः - बलराम - अम्बरे अलं चरत् - आकाशात मोठ्या वेगाने हिंडणारे - भ्रुकुटितटोग्रदंष्ट्रकम् - ज्याच्या भुवया वर चढलेल्या असून ज्याच्या दाढा भयंकर आहेत असे - प्रदीप्तदृक् - झळझळीत आहेत डोळे ज्याचे असे - ज्वलच्छिखं - अग्नीप्रमाणे आहेत केस ज्याचे असे - कटककिरीटकुण्डलत्विषा अद्‍भुतं - कडी, मुकुट, कुंडले ह्याच्या कांतीने आश्चर्यजनक असे - तद्वपुः निरीक्ष्य - त्या प्रलम्बासुराचे शरीर अवलोकन करून - ईषत् अत्रसत् - थोडासा त्रस्त झाला ॥२७॥
त्याचे डोळे धगधगत होते. भयंकर दाढा भुवयांना जाऊन भिडल्या होत्या. त्याचे केस आगीच्या ज्वाळेसारखे दिसत होते. त्याच्या हातापायातील कडी, मुगुट आणि कुंडले यांच्या चमकण्याने तो अधिक भयानक वाटत होता. त्याला आकाशात जात असलेला पाहून बलराम थोडेसे घाबरले. (२७)


अथागतस्मृतिरभयो रिपुं बलो
     विहाय सार्थमिव हरन्तमात्मनः ।
रुषाहनच्छिरसि दृढेन मुष्टिना
     सुराधिपो गिरिमिव वज्ररंहसा ॥ २८ ॥
जसा धनास हा मतसिहि चोरितो पळे
     तसाचि हा मतसिहि चोरिता पळे ।
वज्रास जैं शतमख मारि ज्यापरी
     तसाचि जा बळि शिरि मारि मुष्टिने ॥ २८ ॥

अथ - नंतर - आगतस्मृतिः - आले आहे स्मरण ज्याला असा - अभयः - निर्भय - बलः - बलराम - आत्मनः सार्थं - आपले सोबती जे गोप त्यांना सोडून - विहाय हरन्तं - दुसरीकडे हरण करून नेणार्‍या - रिपुं - शत्रु अशा प्रलम्बासुराला - सुराधिपः वज्ररंहसा गिरिं इव - इंद्र वज्राच्या वेगाने जसा पर्वताला तसा - दृढेन मुष्टिना - बळकट मुठीने - रुषा शिरसि अहनत् - रागाने मस्तकावर ताडिता झाला ॥२८॥
परंतु दुसर्‍याच क्षणी त्यांना आपल्या स्वरूपाची जाणीव झाली आणि त्यांची भिती पळाली. धन चोरणार्‍या चोराप्रमाणे आपल्याला चोरून घेऊन आकाशमार्गाने जाणार्‍या त्या शत्रूच्या डोक्यावर, इंद्राने पर्वतावर वज्राची प्रहार करावा, तसा बलरामांनी क्रोधाने एक ठोसा जोरात लगावला. (२८)


स आहतः सपदि विशीर्णमस्तको
     मुखाद् वमन् रुधिरमपस्मृतोऽसुरः ।
महारवं व्यसुरपतत् सत्समीरयन्
गिरिर्यथा मघवत आयुधाहतः ॥ २९ ॥
शिरास हा बळि करि मार मुष्टिचा
     चुराच हो शिरहि सवेचि रक्त ये ।
मुखातुनी रुधिर पडे नि शुद्ध ती
     गमे न तो मरुनि धरेस पडे की ॥ २९ ॥

आहतः सपदि - ताडिल्यामुळे तत्काळ छिन्नभिन्न झाले आहे - विशीर्णमस्तकः - मस्तक ज्याचे असा - मुखात् रुधिरं वमन् - तोंडातून रक्त ओकणारा - अपस्मृतः - स्मरण नष्ट झालेला - सः असुरः - तो प्रलम्बासुर - महारवं समीरयन् - मोठी गर्जना करीत - यथा मघवतः आयुधाहतः गिरिः (तथा) - ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने ताडिलेला पर्वत त्याप्रमाणे - व्यसुः अपतत् - गतप्राण होऊन पडला ॥२९॥
ठोसा लागताच त्याचे मस्तक फुटले. तो तोंडातून रक्त ओकू लागला, त्याची शुद्ध हरपू लागली आणि इंद्राने वज्राने फोडलेल्या पर्वताप्रमाणे मोठ्याने आवाज करीत तो तत्काळ प्राण जाऊन जमिनीवर पडला. (२९)


( अनुष्टुप् )
दृष्ट्वा प्रलम्बं निहतं बलेन बलशालिना ।
गोपाः सुविस्मिता आसन् साधु साध्विति वादिनः ॥ ३० ॥
( अनुष्टुप् )
पाहिला बाळगोपाळे प्रलंबासुरचा वध ।
आश्चर्ये वदले सारे वाहवा बल वाहवा ॥ ३० ॥

प्रलम्बं बलशालिना - प्रलंबासुराला बलवान अशा - बलेन निहतं दृष्ट्वा - बलरामाने मारिलेला पाहून - सुविस्मिताः गोपाः - आश्चर्यचकित झालेले गोप - साधु साधु इति वादिनः आसन् - ‘ठीक, चांगले झाले’ असे बोलू लागले ॥३०॥
बलवान बलरामांनी प्रलंबासुराला मारलेले पाहून गोपाळांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. ते वारंवार "वाहवा ! वाहवा !" म्हणू लागले. (३०)


आशिषोऽभिगृणन्तस्तं प्रशशंसुस्तदर्हणम् ।
प्रेत्यागतं इवालिङ्‌ग्य प्रेमविह्वलचेतसः ॥ ३१ ॥
भेटले सर्व ते प्रेमे कामना शुभ बोलती ।
प्रसंशा करिती सारे बळीराम तसा बळी ॥ ३१ ॥

तदर्हणं तं - आशिर्वादाला योग्य अशा त्या बलरामाला - आशिषः अभिगृणन्तः - आशिर्वाद देत - प्रेमविह्वलचेतसः (गोपाः) - प्रेमाने विव्हळ झाली आहेत अन्तःकरणे ज्यांची असे ते गोप - प्रेत्य आगतं इव - जणू मरून परत आलेल्या - आलिंग्य - त्याला आलिंगन देऊन - प्रशशंसुः - स्तुती करिते झाले ॥३१॥
गोपाळांची मने प्रेमाने भरून आली. ते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करू लागले. आणि मरणाच्या दारातून जणू परत आलेल्या त्यांना मिठ्या मारून स्तुतीला पात्र असणार्‍या त्यांची प्रशंसा करू लागले. (३१)


पापे प्रलम्बे निहते देवाः परमनिर्वृताः ।
अभ्यवर्षन् बलं माल्यैः शशंसुः साधु साध्विति ॥ ३२ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे अष्टदशोऽध्यायः ॥ १८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
पापी प्रलंब तो मूर्त मरता देव तुष्टले ।
रामाला वाहिली पुष्पे वाहवा धन्य बोलती ॥ ३२ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

पापे प्रलम्बे निहते - पापी प्रलम्बासुर मारिला असता - परमानिर्वृताः देवाः - अत्यंत सुखी झालेले देव - माल्यैः बलं अभ्यवर्षन् - फुलांनी बलरामावर वृष्टि करिते झाले - साधु साधु इति शशंसुः - चांगले, चांगले असे म्हणून प्रशंसा करू लागले ॥३२॥
दुष्ट प्रलंबासुर मेल्यामुळे देवांना अत्यंत आनंद झाला. ते बलरामांवर पुष्पवर्षाव करून त्यांची "शाबास ! वाहवा !" म्हणून प्रशंसा करू लागले. (३२)


अध्याय अठरावा समाप्त

GO TOP