|
श्रीमद् भागवत पुराण अन्नयाञ्चामिषेण यज्ञपत्नीषु अनुग्रहः - यज्ञपत्न्यांवर कृपा - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीगोप ऊचुः -
( अनुष्टुप् ) राम राम महाबाहो कृष्ण दुष्टनिबर्हण । एषा वै बाधते क्षुत् नः तच्छान्तिं कर्तुमर्हथः ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) बालगोपाल म्हणाले - कृष्णा रे बलरामा रे नित्य दुष्टांसि मारिता । भूक दुष्ट सतावे ही शमवा ती तुम्ही द्वय ॥ १ ॥
राम राम - अरे रामा, हे बलरामा - दुष्टनिबर्हण महावीर्य कृष्ण - अरे दुष्टांचा नाश करणार्या महापराक्रमी कृष्णा - एषा क्षुधा - ही भूक - नः वै बाधते - आम्हाला खरोखर त्रास देत आहे - तच्छांतिं कर्तुं अर्हथ - त्या भुकेची शांति करण्यास तुम्ही समर्थ आहा. ॥१॥
गोपाळ म्हणाले - हे पराक्रमी बलरामा ! हे दुष्टनाशना श्यामसुंदरा ! आम्हांला खूप भूक लागली आहे. ती शमविण्यासाठी काही उपाय करा. (१)
श्रीशुक उवाच -
इति विज्ञापितो गोपैः भगवान् देवकीसुतः । भक्ताया विप्रभार्यायाः प्रसीदन् इदमब्रवीत् ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात - प्रार्थना ऐकता कृष्ण मथुरावासि भक्त ज्या । द्विजपत्न्यास तो बोध करण्या वदला असे ॥ २ ॥
इति गोपैः विज्ञापितः - याप्रमाणे गोपांनी प्रार्थिलेला - भगवान् देवकीसुतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न देवकीपुत्र श्रीकृष्ण - भक्तायाः - आपल्या भक्त - विप्रभार्यायाः - अशा ब्राह्मण स्त्रियांवर - प्रसीदन् - प्रसाद करण्याकरिता - इदं अब्रवीत् - असे म्हणाला. ॥२॥
श्रीशुकदेव म्हणतात - गोपाळांनी जेव्हा देवकीनंदन भगवंतांना अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी मथुरेतील आपल्या भक्त ब्राह्मण पत्नींवर कृपा करण्यासाठी म्हटले. (२)
प्रयात देवयजनं ब्राह्मणा ब्रह्मवादिनः ।
सत्रं आङ्गिरसं नाम ह्यासते स्वर्गकाम्यया ॥ ३ ॥
मित्रांनो ब्रह्मवादी ते स्वर्गाचा हेतु घेउनी । येथुनी जवळी यज्ञ अंगिरस् करिती पहा । जावे त्या यज्ञशाळेत तुम्ही सर्वचि येथुनी ॥ ३ ॥
यत्र - ज्याठिकाणी - ब्रह्मवादिनः ब्राह्मणाः - ब्रह्माचे प्रतिपादन करणारे ब्राह्मण - स्वर्गकाम्यया - स्वर्गाच्या इच्छेने - आंगिरसं नाम - आंगिरस नावाचा - सत्रं आसते - यज्ञ करीत आहेत. ॥३॥
येथून जवळच वेदवेत्ते ब्राह्मण स्वर्गाच्या इच्छेने आंगिरस नावाचा यज्ञ करीत आहेत. तुम्ही त्यांच्या यज्ञशाळेत जा. (३)
तत्र गत्वौदनं गोपा याचतास्मद् विसर्जिताः ।
कीर्तयन्तो भगवत आर्यस्य मम चाभिधाम् ॥ ४ ॥
माझे नी बलरामाचे सांगोनी नाम त्या स्थळी । भोजना कांहिसा भात आणावा मागुनी इथे ॥ ४ ॥
गोपाः - हे गोपांनो - तत्र गत्वा - तेथे जाऊन - भगवतः आर्यस्य - भगवान बलरामाचे - च मम - आणि माझे - अभिधां कीर्तयंतः - नाव सांगून - अस्मद्विसर्जिताः - आम्ही पाठविलेले असे - ओदनं याचत - अन्न मागा. ॥४॥
गोपाळांनो ! माझ्या सांगण्यावरून तुम्ही तेथे जाऊन माझे थोरले भाऊ भगवान बलराम आणि माझे नाव सांगून अन्न मागून आणा. (४)
इत्यादिष्टा भगवता गत्वा याचन्त ते तथा ।
कृताञ्जलिपुटा विप्रान् दण्डवत् पतिता भुवि ॥ ५ ॥
हरी आज्ञापिता गोप यज्ञशाळेत पोचले । दंडवत् नमुनी विप्रां तयां अन्नहि याचिले ॥ ५ ॥
इति भगवता आदिष्टाः ते - याप्रमाणे कृष्णाने आज्ञापिलेले ते गोप - तथा गत्वा - त्याप्रमाणे जाऊन - भुवि दंडवत् पतिताः - भूमीवर साष्टांग नमस्कार केलेले असे - कृतांजलिपुटाः - हात जोडणारे होत्साते - विप्रान् (अन्नं) अयाचंत - ब्राह्मणांपाशी अन्न मागते झाले. ॥५॥
जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा दिली, तेव्हा ते त्या ब्राह्मणांच्या यज्ञशाळेत गेले आणि त्यांनी अन्न मागितले. अगोदर त्यांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि मग ते हात जोडून म्हणाले, (५)
हे भूमिदेवाः श्रृणुत कृष्णस्यादेशकारिणः ।
प्राप्ताञ्जानीत भद्रं वो गोपान् नो रामचोदितान् ॥ ६ ॥
भूदेवा भद्र हो सारे व्रजीचे गोप हो अम्ही । कृष्ण नी बलरामाच्या आज्ञेने पातलो इथे ॥ ६ ॥
हे भूमिदेवाः - हे ब्राह्मण हो - शृणुत - ऐका - नः गोपान् - आम्ही जे गोप त्यांना - कृष्णस्य आदेशकारिणः - कृष्णाची आज्ञा मानणारे - रामचोदितान् - बलरामाने पाठविलेले - प्राप्तान् जानीत - आलेले समजा - वः भद्रं (अस्तु) - तुमचे कल्याण असो. ॥६॥
हे ब्राह्मणांनो ! आपले कल्याण असो. आम्ही व्रजातील गवळी आहोत. भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांच्या आज्ञेने आम्ही आपल्याकडे आलो आहोत. आपण आमचे म्हणणे ऐकावे. (६)
( मिश्र )
गाश्चारयतौ अविदूर ओदनं रामाच्युतौ वो लषतो बुभुक्षितौ । तयोर्द्विजा ओदनमर्थिनोर्यदि श्रद्धा च वो यच्छत धर्मवित्तमाः ॥ ७ ॥
( इंद्रवज्रा ) कृष्णो नि रामो चरवीत गाई समीप तेथे बसले पहा की । क्षुधा तयांना गमली कदाची द्या अन्न श्रद्धा असल्यास आम्हा ॥ ७ ॥
धर्मवित्तमाः द्विजाः - हे धर्म जाणणार्यांमध्ये श्रेष्ठ अशा ब्राह्मणांनो - अविदूरे गाः चारयंतौ - जवळच गाई चारीत असलेले - बुभुक्षितौ च - आणि अतिशय भुकेलेले - रामाच्युतौ - बलराम व कृष्ण - वः ओदनं लषतः - तुमच्यापासून अन्नाची इच्छा करीत आहेत - यदि वः (तयोः) - जर तुमचा त्याच्यावर - श्रद्धा (स्यात्) - विश्वास असेल तर - तयोः अर्थिनोः - त्या अन्न मागणार्या रामकृष्णांना - ओदनं यच्छत - अन्न द्या. ॥७॥
बलराम आणि श्रीकृष्ण गाई चारीत येथे आले असून ते येथून जवळच आले आहेत. त्यांना भूक लागली असून आपणाकडून त्यांना अन्न पाहिजे आहे. ब्राह्मणांनो ! आपण धर्म जाणणारे आहात. आपल्याला मनापासून वाटत असेल तर भोजन करू इच्छिणार्या त्यांना अन्न द्यावे. (७)
( अनुष्टुप् )
दीक्षायाः पशुसंस्थायाः सौत्रामण्याश्च सत्तमाः । अन्यत्र दीक्षितस्यापि नान्नमश्नन् हि दुष्यति ॥ ८ ॥
( अनुष्टुप् ) दीक्षीत पशुमांसाते सौत्रामणि न भक्षिती । दीक्षीत अन्य यज्ञीचे अन्न ते भक्षिती पहा ॥ ८ ॥
सत्तमाः - हे श्रेष्ठ ब्राह्मण हो - दीक्षायाः पशुसंस्थायाः - दीक्षा, पशुवध आणि - सौत्रामण्याः च - सौत्रामणी याग यांच्याहून - अन्यत्र - इतर काळी - दीक्षितस्य अपि - दीक्षा घेतलेल्या पुरुषापासूनही - अन्नम् अश्नन् - अन्न खाणारा - नहि दुष्यति - खरोखर दोषास पात्र होत नाही. ॥८॥
सज्जनांनो ! ज्या यज्ञात पशुबली दिला जातो, त्यामध्ये आणि सौत्रायणी यज्ञामध्ये यजमानाच्या घरचे अन्न खाता कामा नये. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही यज्ञाच्या यजमानाचे अन्न खाण्याने दोष लागत नाही. (८)
विवरण :- गोपांनी आपण सर्वजण क्षुधित असल्याचे कृष्णाला सांगितले. तेव्हा जवळच सुरू असलेल्या आंगिरस अनुष्ठानाचे ठिकाणी जाऊन तेथील ब्राह्मणांना आपले नाव सांगून त्यांच्याकडे अन्न मागा, असे कृष्णाने त्यांना सांगितले. त्याप्रमाणे गोप ब्राह्मणांकडे गेले. अन्न देण्यास ब्राह्मणांना कोणती अडचण येईल, हे जाणून तिचे आधीच निराकरण करताना गोप म्हणाले, आपणांस वाटेल, आम्ही (ब्राह्मण) दीक्षित, (ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी ज्योतिष्टोमासारखे यज्ञ केले आहेत असे) म्हणून आमचे अन्न निषिद्ध. तुम्हांस (कृष्ण-बलरामादि गोपांना) ते कसे चालेल ? (दीक्षितान्नं न भोक्तव्यम् ।) पण ज्या यज्ञात पशू व सुरा यांचा संबंध नाही, त्या यज्ञातील अन्न भक्षण करणे शास्त्रानुसार निषिद्ध नाही. तेव्हा निःशंक होऊन अन्न द्या; आम्ही ते निश्चितच भक्षण करू. (८)
इति ते भगवद् याच्ञां शृण्वन्तोऽपि न शुश्रुवुः ।
क्षुद्राशा भूरिकर्माणो बालिशा वृद्धमानिनः ॥ ९ ॥
न विप्र लक्षिले यांना तुच्छ स्वर्गास इच्छिती । ज्ञानाने द्विज ते सान मानिती परि वृद्ध ते ॥ ९ ॥
इति - याप्रमाणे - भगवद्याञ्चां - भगवान श्रीकृष्णाची मागणी - श्रृण्वंतः अपि - ऐकत असताहि - क्षुद्राशाः - स्वर्गादि क्षुद्र आहेत अशा ज्यांच्या - भूरिकर्माणः - व मोठी आहेत कर्मे ज्यांची असे - वृद्धमानिनः - स्वतःला मोठे मानणारे - बालिशाः ते - ते पोरकट वृत्तीचे ब्राह्मण - न शुश्रुवुः - न ऐकिते झाले. ॥९॥
अशी ही भगवंतांची विनंती ऐकूनही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तुच्छ फळाच्या अपेक्षेने मोठमोठ्या कर्मांत अडकलेले ते ब्राह्मण अज्ञानी असूनही स्वतःला ज्ञानवृद्ध मानीत होते. (९)
देशः कालः पृथग् द्रव्यं मंत्रतंत्रर्त्विजोऽग्नयः ।
देवता यजमानश्च क्रतुर्धर्मश्च यन्मयः ॥ १० ॥
देह कालीय सामग्री तप नी यज्ञ साधनी । ऋत्वीत अग्नीरूपात एकची भगवान् असे ॥ १० ॥
देशः कालः पृथग्द्रव्यं - देश, काल, निरनिराळी द्रव्ये - मंत्रतंत्रर्त्विजः अग्नयः - मंत्र, तंत्र, ऋत्विज व अग्नि - देवता यजमानः च - देवता व यजमान - ऋतुः धर्मः च - तसेच यज्ञ आणि धर्म - यन्मयः (अस्ति) - ज्या परमेश्वराचे स्वरूप होय. ॥१०॥
देश, काल, अनेक द्रव्ये, मंत्र, ऋत्विज, अग्नी, देवता, यजमान, यज्ञ आणि धर्म ही सर्व रूपे वास्तविक भगवंतांचेच आहेत. (१०)
विवरण :- गोपांनी ब्राह्मणांना अन्न देण्याची विनंती केली पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. ते ब्राह्मण कसे होते याचे वर्णन व त्यांना वापरलेली सर्व विशेषणे अत्यंत समर्पक आहेत. ज्यासाठी ते यज्ञ करीत होते, ते त्यांचे 'स्वर्गप्राप्ती' हे उद्दिष्ट अत्यंत क्षुद्र होते; कारण ते स्थायी नाही. (क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।) जन्म-मरणाचा त्यांचा फेरा चुकला नसता. शिवाय यासाठी त्यांना खूपच कर्म करावे लागत होते. (तप-यज्ञ-अनेक सिद्धी प्राप्त करणे इ.) म्हणजे छोटया आणि अस्थायी गोष्टीसाठी कष्ट मात्र बरेचसे करणे. त्यापेक्षा 'नामसंकीर्तन साधन पै सोपे' हे लक्षात घेऊन जरी त्यांनी केवळ मनापासून आणि फक्त नामस्मरणच केले असते, तरी त्यांना परमेश्वर दर्शन होऊन चिरस्थायी आनंद देणारी मुक्ति मिळाली असती. हे न कळण्याइतके ते बालिश म्हणजेच वृद्ध असूनहि अपरिपक्व बुद्धीचे, बालबुद्धी होते. (न तेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिरः ।) जरी ते स्वतःला वृद्ध मानीत होते, (वृद्धमानिनः) तरी जगन्नियंत्या श्रीकृष्णाला सामान्य शरीरधारी मानण्याइतपतच त्यांच्या बुद्धीची झेप होती. यज्ञासाठी शिजविलेला भात (पुरोडाश) हा या सामान्य गोपांना कसा द्यायचा ? हा त्यांना पडलेला प्रश्न. पण सर्वांभूती परमात्मा हे त्या अज्ञ ब्राह्मणांना समजले नाही. तुमच्याकडून नैवेद्य घेण्यासाठी परमेश्वर कसा, केव्हा आणि कोणत्या रूपात येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे 'जे जे भेटले भूत, ते जाणिजे भगवंत' असा विशाल दृष्टिकोन निदान भक्ताचा तरी असावा. (९-१०)
तं ब्रह्म परमं साक्षाद् भगवन्तं अधोक्षजम् ।
मनुष्यदृष्ट्या दुष्प्रज्ञा मर्त्यात्मानो न मेनिरे ॥ ११ ॥
बाळगोपाळद्वारे तो खावया भात मागता । मूर्खांनी पाहता देह तयां सन्मानिले नसे ॥ ११ ॥
तं - त्या - साक्षात् परमं ब्रह्म - साक्षात श्रेष्ठ ब्रह्मस्वरूपी - अधोक्षजं भगवंतं - व इंद्रियांचा साक्षीभूत अशा परमेश्वराला - मर्त्यात्मानः दुष्प्रज्ञाः - मनुष्य स्वभावाचे दोषयुक्त बुद्धीचे लोक - मनुष्यदृष्टया - मनुष्य आहे या दृष्टीमुळे - न मेनिरे - मानते झाले नाहीत. ॥११॥
तेच इंद्रियातीत साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण होते. परंतु शरीराला आत्मा मानणार्या त्या मूर्खांना भगवंत हे एक साधारण मनुष्य वाटल्यामुळे ते कळले नाही. (११)
न ते यदोमिति प्रोचुः न नेति च परन्तप ।
गोपा निराशाः प्रत्येत्य तथोचुः कृष्णरामयोः ॥ १२ ॥
हो ना कांही नसे शब्द रुष्टले सर्व बाळ ते । पातले परतोनीया कृष्णासी बोलले तसे ॥ १२ ॥
परंतप - हे शत्रुतापना राजा - यत् - जेव्हा - ते - ते ब्राह्मण - ओम् इति - होय असे - न प्रोचुः - बोलले नाहीत - च न इति - व नाही असेही - न (प्रोचुः) - बोलले नाहीत - निराशाः गोपाः - निराश झालेले ते गोप - प्रत्येत्य - परत येऊन - कृष्णरामयोः - बलराम व श्रीकृष्ण यांना - तथा ऊचुः - तसे सांगते झाले. ॥१२॥
परीक्षिता ! ते ब्राह्मण जेव्हा ’होय’ किंवा ’नाही’ काहीच बोलले नाहीत, तेव्हा गोपाळ निराश होऊन परतले आणि ती सर्व कहाणी त्यांनी राम-कृष्णांना सांगितली. (१२)
तदुपाकर्ण्य भगवान् प्रहस्य जगदीश्वरः ।
व्याजहार पुनर्गोपान् दर्शयँलौकिकीं गतिम् ॥ १३ ॥
ऐकता हासला कृष्ण वदला जगदीश्वर । प्रयत्ने फळ ते लाभे निराश नच व्हा कधी ॥ १३ ॥
जगदीश्वरः भगवान् - जगाचा स्वामी षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - तत् उपाकर्ण्य - ते ऐकून - प्रहस्य - हसून - लौकिकीं गतिं दर्शयन् - जगातील व्यवहाराचे स्वरूप दाखवीत - पुनः गोपान् व्याजहार - पुनः गोपांना म्हणाला. ॥१३॥
ती ऐकून सर्व जगताचे स्वामी भगवान हसून गोपाळांना लोकव्यवहार समजावीत म्हणाले. (१३)
विवरण :- ब्राह्मणांकडून काहीच उत्तर न मिळाल्याने निराश गोप कृष्णाकडे परत आले. सर्व ऐकून कृष्णाने फक्त हास्य केले. (जे घडले, ते अपेक्षितच होते, या अर्थी) त्याने गोपांना 'व्यवहारातील पद्धत' स्वीकारण्याचा सल्ला दिला. (म्हणजे एके ठिकाणी मिळाले नाही, तर दुसरीकडे याचना करा. याचकाला मान-अपमान थोडाच असतो ? 'तृणादपि लघुः तूलः, तूला दपि च याचकः ।' याचक तर कापसाहूनहि हलका. इच्छित गोष्ट मिळेपर्यंत तो तर दारोदार हिंडत राहतो.) तेव्हा ब्राह्मणांनी दिले नाही, ब्राह्मणींकडे जा, असा श्रीकृष्णाने सल्ला दिला. (१३)
मां ज्ञापयत पत्नीभ्यः ससङ्कर्षणमागतम् ।
दास्यन्ति काममन्नं वः स्निग्धा मय्युषिता धिया ॥ १४ ॥
या वेळी द्विजपत्न्यांना जावोनी बोलणे तसे । पातले राम नी कृष्ण ऐकता खूप अन्न त्या । देतील करिती प्रीती द्विजपत्न्या अम्हावरी ॥ १४ ॥
ससंकर्षणम् - संकर्षणासह - आगतं मां - मी आलो आहे असे - (ब्राह्मणानां) पत्नीभ्यः ज्ञापयत - त्या ब्राह्मणांच्या स्त्रियांना कळवा - धिया मयि उषिताः - अंतःकरणाने माझ्या ठिकाणी राहणार्या - स्निग्धाः (ताः) - अशा त्या प्रेमळ स्त्रिया - वः - तुम्हाला - कामम् अन्नं दास्यंति - पुष्कळ अन्न देतील. ॥१४॥
आता तुम्ही त्यांच्या पत्न्यांकडे जा आणि त्यांना सांगा की, राम-कृष्ण येथे आले आहेत. तुम्हांला जेवढे पाहिजे तेवढे अन्न त्या तुम्हांला देतील. कारण माझ्यावर त्यांचे फार प्रेम असून त्यांचे मन नेहमी माझ्याकडेच लागलेले असते. (१४)
विवरण :- 'मय्युषिता धिया' हे ब्राह्मण पत्नींचे वर्णन करणारे शब्द. यामुळे त्यांच्या पुढील वर्तनाचीहि संगती लागते. या सर्वजणी केवळ शरीरानेच आपल्या घरी, आपल्या प्रपंचात रहातात, मात्र त्यांचे मन, बुद्धी माझ्याठायीच रममाण आहे, असे कृष्ण म्हणतो. परमेश्वराला आपल्या खर्या भक्ताची ओळख कशी असते, याचे हे उदाहरण. (यज्ञ करणारे ब्राह्मण खरे भक्त नाहीत; तर माझ्याठायी बुद्धीने, चित्ताने रममाण होणार्या ब्राह्मणीच खर्या भक्त असा बोलण्याचा आशय.) (१४)
गत्वाथ पत्नीशालायां दृष्ट्वासीनाः स्वलङ्कृताः ।
नत्वा द्विजसतीर्गोपाः प्रश्रिता इदमब्रुवन् ॥ १५ ॥
पत्निशाळेत गेले ते सजोनी बसल्या द्विजा । प्रणामोनी तयां नम्र वदले गोपबाळ हे ॥ १५ ॥
अथ गत्वा - तेथे जाऊन - गोपाः - ते गोप - पत्नीशालायां - स्त्रियांच्या भागात - स्वलंकृताः - अलंकारांनी सुशोभित झालेल्या - आसीनाः - बसलेल्या अशा - द्विजसतीः दृष्टवा - ब्राह्मण स्त्रियांना पाहून - प्रश्रिताः (ताः) नत्वा - नम्रपणे त्यांना नमस्कार करून - इदं अब्रुवन् - असे म्हणाले. ॥१५॥
या वेळी गोपाल पत्नीशाळेत गेले. तेथील ब्राह्मणांच्या पत्न्या सुंदर वस्त्रे आणि दागिन्यांनी नटून थटून बसलेल्या पाहून त्यांना प्रणाम करून ते अतिशय नम्रतेने म्हणाले, (१५)
नमो वो विप्रपत्नीभ्यो निबोधत वचांसि नः ।
इतोऽविदूरे चरता कृष्णेनेहेषिता वयम् ॥ १६ ॥
विप्रपत्न्यां ! नमस्कार कृपया बोल ऐकणे । भगवान् कृष्ण ते आले तयांनी धाडिले अम्हा ॥ १६ ॥
विप्रपत्नीभ्यः - तुम्हां ब्राह्मण स्त्रियांना - वः नमः - आमचा नमस्कार असो - नः वचांसि निबोधत - आमची भाषणे ऐका - इतः अविदूरे - येथून जवळच - चरता कृष्णेन - फिरत असलेल्या कृष्णाकडून - वयं इह प्रेषिताः - आम्ही येथे पाठविले आहोत. ॥१६॥
आपणा विप्र पत्नींना आम्ही नमस्कार करीत आहोत. आपण आमचे म्हणणे ऐका. येथून जवळच श्रीकृष्ण आलेले असून त्यांनीच आम्हांला तुमच्याकडे पाठविले आहे. (१६)
गाश्चारयन् स गोपालैः सरामो दूरमागतः ।
बुभुक्षितस्य तस्यान्नं सानुगस्य प्रदीयताम् ॥ १७ ॥
बालगोपाळ रामोनी कृष्णही गायि चारिता । पातले दूर ते येथे भुकेले, अन्न द्या तयां ॥ १७ ॥
सरामः सः - बलरामासह तो कृष्ण - गोपालैः गाः चारयन् - गोपाळांसह गाई चारीत - दूरं आगतः - दूरवर आला आहे - सानुगस्य बुभुक्षितस्य तस्य - सवंगडयासह भुकेलेल्या त्याला - अन्नं प्रदीयतां - तुम्ही अन्न द्यावे. ॥१७॥
ते गोपाळ आणि बलरामांसह गाई चारीत इकडे पुष्कळ लांब आले आहेत. त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना भूक लागली आहे. आपण त्यांच्यासाठी अन्न द्या. (१७)
श्रुत्वाच्युतं उपायातं नित्यं तद्दर्शनोत्सुकाः ।
तत्कथाक्षिप्तमनसो बभूवुर्जातसम्भ्रमाः ॥ १८ ॥
कृष्णाची मुरली त्यांनी पूर्वी ऐकोनि तृप्तल्या । उतावीळ अशा झाल्या कृष्णाच्या दर्शने तदा ॥ १८ ॥
नित्यं तद्दर्शनोत्सुकाः - निरंतर त्या श्रीकृष्णाच्या दर्शनाविषयी उत्सुक - (ताः) विप्रपत्न्याः - अशा त्या स्त्रिया - तत्कथाक्षिप्तमनसः - त्या श्रीकृष्णाच्या गोष्टींनी भरून गेले आहे मन ज्यांचे अशा - उपायांतं अच्युतं श्रुत्वा - कृष्ण जवळ आला आहे असे ऐकून - जातसंभ्रमाः बभूवुः - झाली आहे धांदल ज्यांची अशा झाल्या. ॥१८॥
त्या ब्राह्मणपत्न्या पुष्कळ दिवसांपासून भगवंतांच्या लीला ऐकत होत्या. त्यामुळे त्यांचे मन त्यांच्याकडे आकर्षिले गेले होते. श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी त्या नेहमीच उत्सुक असत. श्रीकृष्ण आल्याची वार्ता ऐकताच त्या उतावीळ झाल्या. (१८)
चतुर्विधं बहुगुणं अन्नमादाय भाजनैः ।
अभिसस्रुः प्रियं सर्वाः समुद्रमिव निम्नगाः ॥ १९ ॥
भक्ष्य भोज्य तसे लेह्य चोष्य स्वादिष्ट अन्न ते । घेतले पात्रि नी सार्या निघाल्या पति रोधिता ॥ १९ ॥
चतुर्विधम् - चार प्रकारचे - बहुगुणम् - पुष्कळ प्रमाणात - अन्नं - अन्न - भाजनैः आदाय - भांडयांनी घेऊन - सर्वाः (ताः) - त्या सर्व विप्रस्त्रिया - प्रियं (कृष्णं) - आवडत्या कृष्णाकडे - निम्नगाः समुद्रम् इव - नद्या जशा समुद्राकडे तशा - अभिसस्रुः - गेल्या. ॥१९॥
त्यांनी भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य असे चारही प्रकारचे अत्यंत स्वादिष्ट अन्न भांड्यांत भरून घेतले आणि जशा नद्या समुद्राकडे जातात, तशा (१९)
निषिध्यमानाः पतिभिः भ्रातृभिर्बन्धुभिः सुतैः ।
भगवति उत्तमश्लोके दीर्घश्रुत धृताशयाः ॥ २० ॥
नद्या त्या सागरी लागी मिळण्या धावती तशा । हरिचा ऐकुनी वेणू हृदयो दान त्या दिले ॥ २० ॥
पतिभिः भ्रातृभिः - पतींनी, भावांनी - बंधुभिः सुतैः - इष्टमित्रांनी व मुलांनी - निषिद्ध्यमानाः - नको म्हणून सांगितलेल्या - उत्तमश्लोके - पुण्यकारक आहे कीर्ति ज्याची - भगवति - अशा भगवंताच्या ठिकाणी - दीर्घश्रुत - पुष्कळ काळ श्रीकृष्णाचे गुण ऐकल्यामुळे - धृताशयाः - त्याच्या ठिकाणी लागले आहे मन ज्यांचे अशा. ॥२०॥
बंधू, बांधव, पती, पुत्र नको नको म्हणत असतानाही, त्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णांकडे जाण्यासाठी निघाल्या. कारण फार दिवसांपासून पवित्रकीर्ति भगवंतांविषयी बरेच काही ऐकून ऐकून त्यांचे मन त्यांच्या ठिकाणी जडले होते. (२०)
विवरण :- गोप ब्राह्मण पत्नींकडे अन्न मागण्यासाठी आले. तेव्हा ज्याची रात्रंदिवस भक्ती करतो आहोत, चिंतन करत आहोत, तो कृष्ण आपल्या इतक्या जवळ आहे, इतकेच नाही तर आपणांकडून त्याला अन्न हवे आहे, हे ऐकून त्या बिचार्या सामान्य गृहिणी गोंधळल्या नसत्या तरच नवल ! पण नंतर मात्र सावध होऊन त्यांनी अन्नासह कृष्णाकडे धाव घेतली. त्यांचे सर्व नातेवाईक अडवत होते, तरीही ! योग्यच आहे. समुद्राकडे वेगाने धाव घेणार्या सरितेला कोण अडविणार ? आणि ती थांबणारहि असते थोडीच ? सागराशी एकरूप होणे हेच तर तिच्या जीविताचे उद्दिष्ट ! दीर्घश्रुतधृताशयाः - यावरून ब्राह्मणींनी कृष्णाला आधी प्रत्यक्ष पाहिले नसावे असे दिसते. पण त्याच्याबद्दलच्या कथा ऐकून ऐकून त्याच्यावर त्यांची उत्कट भक्ती जडली असावी. नाहीतरी आपण परमेश्वर, स्वर्ग हे प्रत्यक्ष डोळ्यांनी कुठे पाहतो ? पण ते डोळ्याला दिसावे अशी आपली तीव्र इच्छा असतेच. म्हणूनच, असे ऐकून ऐकून एखाद्याबद्दल प्रेम, भक्ती निर्माण होते. ती विषयदृक्, शरीरी नसते. ते प्रेम, ती भक्ती श्रेष्ठ असते, निर्लेप असते. (१८-२०)
यमुनोपवनेऽशोक नवपल्लवमण्डिते ।
विचरन्तं वृतं गोपैः साग्रजं ददृशुः स्त्रियः ॥ २१ ॥
जाताचि पाहती विप्रा कृष्ण तो गोप नी बळी । ययात मिसळोनीया अशोकवनि हिंडता ॥ २१ ॥
स्त्रियः - त्या स्त्रिया - अशोकनवपल्लवमंडिते - अशोक वृक्षाच्या कोवळ्या पानांनी शोभिवंत झालेल्या - यमुनोपवने - यमुनेच्या काठावरील कुरणात - गोपैः वृतं - गोपांनी वेष्टिलेल्या - साग्रजं विचरंतं - बलरामासह फिरत असलेल्या श्रीकृष्णाला - ददृशुः - पाहत्या झाल्या. ॥२१॥
ब्राह्मणपत्नींनी यमुनेच्या तटाकी कोवळ्या पानांनी सुशोभित अशा अशोकवनामध्ये गोपालांनी वेढलेले, बलरामांच्यासह श्रीकृष्ण इकडे तिकडे फिरताना पाहिले. (२१)
( वसंततिलका )
श्यामं हिरण्यपरिधिं वनमाल्यबर्ह धातुप्रवालनटवेषमनव्रतांसे । विन्यस्तहस्तमितरेण धुनानमब्जं कर्णोत्पलालक कपोलमुखाब्जहासम् ॥ २२ ॥
( वसंततिलका ) त्या सावळ्या तनुशि पीत सुशोभि वस्त्र डोईस मोर पिस नी वनमाळ कंठी । रंगेत चित्र तनुशी शिरिं पत्र गुच्छ वाटे नटोचि सजला हरि तै दिसे हा । स्कंधी सख्याशी कर एकचि टेकिला नी । दूज्या करासि कमळा फिरवीत होता । कानास कुंडलहि ते कमळा परी जे हास्ये मुखास करितो कमळापरी तो ॥ २२ ॥
श्यामं - श्यामवर्णाच्या - हिरण्यपरिधिं - सुवर्णाप्रमाणे पिवळे आहे नेसलेले वस्त्र ज्यांचे अशा - वनमाल्य - अरण्यातील फुले, - बर्हधातुप्रवाल - मोरांची पिसे, काव आदिकरून रंग व अंकुर यांनी - नटवेषं - नटासारखा वेष झाला आहे ज्याचा अशा - अनुव्रतांसे विन्यस्तहस्तं - मित्रांच्या खांद्यावर ठेविला आहे हात ज्याने अशा - इतरेण अब्जं धुनानं - दुसर्या हाताने कमळ फिरविणार्या - कर्णोत्पलालक - कानात कमळे आहेत ज्याच्या - कपोलमुखाब्जहासं - व गालांवर केसांचे झुबके, मुखकमळावर हास्य असलेल्या. ॥२२॥
त्यांच्या सावळ्या शरीरावर सोनेरी पीतांबर फडफडत होता. गळ्यामध्ये वनमाला होती. कोवळ्या पालवीचे गुच्छ शरीरावर धारण करून त्यांनी एखाद्या नटासारखा वेष केला होता. एक हात आपल्या मित्राच्या खांद्यावर ठेवून दुसर्या हाताने ते कमळ फिरवीत होते. कानांवर कमल ठेवले होते, कुरळे केस गालावर भुरभुरत होते आणि मंद हास्यामुळे मुखकमळ विशेष शोभत होते. (२२)
प्रायःश्रुतप्रियतमोदयकर्णपूरैः
यस्मिन् निमग्नमनसः तं अथाक्षिरंध्रैः । अन्तः प्रवेश्य सुचिरं परिरभ्य तापं प्राज्ञं यथाभिमतयो विजहुर्नरेन्द्र ॥ २३ ॥
त्या ऐकुनी गुण हरीप्रिय उत्तमाचे होत्या नि आज बघता रमल्याच रंगी । आलिंगिती मनिच नी बहु शांत होती झोपेत दुःख विसरे अभिमानि जैसा ॥ २३ ॥
प्रायः - पुष्कळ वेळा - श्रुतप्रिय - ऐकलेल्या अत्यंत आवडत्या अशा कृष्णाच्या - तमोदयकर्णपूरैः - उत्कर्षाच्या कथा हीच कर्णभूषणे त्यांच्या योगाने - यस्मिन् - ज्याच्या ठिकाणी - निमग्नमनसः - बुडून गेले आहे चित्त ज्यांचे अशा त्या स्त्रिया - तं अन्तः प्रवेश्य - त्या श्रीकृष्णाला अंतःकरणात नेऊन - नरेंद्र - हे परीक्षित राजा - यथा अभिमतयः - जशा अहंकारादि वृत्ति सुषुप्तीत - प्राज्ञं सुचिरं परिरभ्य - जागृत असणार्या जीवाला चिरकाल मिठी मारून - तल्लीनाः भवंति तथा - तल्लीन होतात त्याप्रमाणे - तापं विजहुः - तापत्रयाला सोडत्या झाल्या. ॥२३॥
परीक्षिता ! आतापर्यंत आपल्या प्रियतमाचे गुण कानांनी ऐकून ऐकून त्यांनी आपल्या मनाला त्यांच्याच प्रेमरंगाने रंगविले होते. आता डोळ्यांच्या मार्गाने त्यांना आत घेऊन जाऊन पुष्कळ वेळपर्यंत त्या मनोमन त्यांना आलिंगन देत होत्या आणि अशाप्रकारे त्यांनी आपल्या हृद्यातील ताप शांत केला. जसे, सुषुप्ती अवस्थेमध्ये मन तिच्या अभिमानी प्राज्ञात लीन होऊन शांत होते. (२३)
( अनुष्टुप् )
तास्तथा त्यक्तसर्वाशाः प्राप्ता आत्मदिदृक्षया । विज्ञायाखिलदृग्द्रष्टा प्राह प्रहसिताननः ॥ २४ ॥
( अनुष्टुप् ) हरिने जाणले चित्ती आप्त सर्व त्यजोनिया । दर्शना पातल्या विप्रा मुखी आनंद सांडतो ॥ २४ ॥
तथा - त्याप्रमाणे - आत्मदिदृक्षया - पाहण्याच्या इच्छेने - त्यक्तसर्वाशाः - सोडिल्या आहेत सर्व आशा ज्यांनी अशा - ताः - त्या स्त्रिया - प्राप्ताः विज्ञाय - आलेल्या जाणून - अखिलदृक् दृष्टा - सर्वांकडे ज्याची दृष्टि आहे असा सर्वसाक्षी कृष्ण - प्रहसिताननः प्राह - हास्यमुख होत्साता बोलता झाला. ॥२४॥
सर्वांच्या बुद्धीचे साक्षी असणार्या भगवंतांनी ब्राह्मणपत्न्या सर्व विषयांची आशा सोडून फक्त आपल्या दर्शनासाठी आल्या आहेत, हे जाणून हसत हसत ते त्यांना म्हणाले, (२४)
विवरण :- वास्तविक सामान्य संसारी स्त्रियांना आपला पति, मुलेबाळे, घरदार यापुढे सर्व जग तुच्छ असते. पण या ब्राह्मण स्त्रिया श्रीकृष्णदर्शनास इतक्या अधीर, व्याकुळ होत्या की त्यांना इतर सर्व गोष्टी फिक्या वाटू लागल्या. केवळ कृष्ण दर्शन हेच त्यांच्या जीविताचे साध्य होते आणि हे केवळ तो परमात्माच जाणू शकत होता. (२४)
स्वागतं वो महाभागा आस्यतां करवाम किम् ।
यन्नो दिदृक्षया प्राप्ता उपपन्नमिदं हि वः ॥ २५ ॥
सुस्वागतम् असो देवी बसा सेवा कशी करू । दर्शना इच्छिता तुम्ही योग्य ते हृदयप्रियां ॥ २५ ॥
महाभागाः - हे भाग्यशाली स्त्रियांनो - वः स्वागतं - तुमचे स्वागत असो - आस्यतां - बसावे - किं करवाम् - आम्ही काय करावे - यत् - ज्याअर्थी आम्ही - नः दिदृक्षया - मला पाहण्याच्या इच्छेने - (यूयम्) प्राप्ताः - तुम्ही आलेल्या आहा - (तत्) इदम् हि वः - त्याअर्थी तुमचे हे करणे - उपपन्नम् (अस्ति) - योग्यच आहे. ॥२५॥
देवींनो ! तुमचे स्वागत असो ! या, बसा ! आम्ही तुमच्यासाठी काय करावे ? आपण आमच्या दर्शनाच्या इच्छेने इथे आला आहात, हे तुम्हांसारख्या भक्तांच्या दृष्टीने योग्यच आहे. (२५)
नन्वद्धा मयि कुर्वन्ति कुशलाः स्वार्थदर्शिनः ।
अहैतुक्यव्यवहितां भक्तिमात्मप्रिये यथा ॥ २६ ॥
न संदेह जगी संत प्रियाते प्रेम अर्पिती । न लाज द्वैत नी हेतू तयात नसतो मुळी ॥ २६ ॥
ननु - खरोखर - स्वार्थदर्शनाः - आपला पुरुषार्थ पाहणारे - कुशलाः (पुरुषाः) - विवेकी पुरुष - आत्मप्रिये - सर्वांच्या अंतर्यामी व सर्वांना आवडता अशा - मयि - माझ्या ठिकाणी - यथा (वत्) - योग्य रीतीने - अहैतुक्यव्यवहितां भक्तिं - फलाची कल्पना जीत नाही अशी अखंड भक्ति - अद्धा कुर्वंति - प्रत्यक्ष करितात. ॥२६॥
आपले खरे हित पाहणारे बुद्धिमान लोक आपल्या प्रियतमाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमात कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा आडपडदा नसतो, यात संशय नाही. (२६)
विवरण :- या ब्राह्मणींची माझ्यावर भक्ती कशी आहे, याचे वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःच्या हिताचा विवेकाने विचार करणारे लोक (ज्यांना 'कुशल' म्हणतात, कुशलाः स्वार्थदर्शनाः ।) जसे स्वतःवर प्रेम करतात, तसे माझ्यावर करतात. (या कुशल विवेकी लोकांप्रमाणे तुम्हीही माझ्यावर प्रेम करता असा भाव.) (२६)
प्राणबुद्धिमनःस्वात्म दारापत्यधनादयः ।
यत्सम्पर्कात् प्रिया आसन् ततः को न्वपरः प्रियः ॥ २७ ॥
प्राण देह मनो बुद्धी स्त्री पुत्र स्वजनो धन । न लागती तयां प्रीय मी आत्मा प्रीय श्रेष्ठची ॥ २७ ॥
प्राणबुद्धिमनःस्वात्म - प्राण, बुद्धि, मन, इष्टमित्र, आत्मा, - दारापत्यधनादयः - स्त्री, पुत्र, धन इत्यादि - यत्संपर्कात् प्रियाः आसन् - ज्याच्या संबंधामुळे प्रिय होतात - ततः अपरः कः - त्याहून दुसरा कोणता पदार्थ - नु प्रियः (अस्ति) - खरोखर प्रिय असणार. ॥२७॥
प्राण, बुद्धी, मन, शरीर, स्वजन, स्त्री, अपत्य, धन इत्यादि सर्व वस्तू ज्याच्या सान्निध्यामुळे प्रिय वाटतात, त्या आत्मस्वरूप माझ्यापेक्षा अधिक प्रिय कोण असणार ? (२७)
तद् यात देवयजनं पतयो वो द्विजातयः ।
स्वसत्रं पारयिष्यन्ति युष्माभिर्गृहमेधिनः ॥ २८ ॥
योग्य ते तुमचे येणे प्रेमाला अभिनंदितो । दर्शना जाहले जावे करावा यज्ञ पूर्ण तो ॥ २८ ॥
तत् - तरी - देवयजनं यात् - यज्ञशाळेत जा - गृहमेधिनः - गृहस्थाश्रमी - वः पतयः द्विजातयः - असे तुमचे पती जे ब्राह्मण ते - युष्माभिः - तुमच्या योगाने - स्वसत्रं पारयिष्यंति - आपला यज्ञ समाप्त करतील. ॥२८॥
आता तुम्ही आपल्या यज्ञशाळेत परत जा. तुमचे पती ब्राह्मण गृहस्थ आहेत. ते तुमच्यामुळेच यज्ञ पूर्ण करू शकतील. (२८)
श्रीपत्न्य ऊचुः ।
( वसंततिलका ) मैवं विभोऽर्हति भवान्गदितुं नृशंसं सत्यं कुरुष्व निगमं तव पादमूलम् । प्राप्ता वयं तुलसिदाम पदावसृष्टं केशैर्निवोढुमतिलङ्घ्य समस्तबन्धून् ॥ २९ ॥
( वसंततिलका ) द्विजपत्न्या म्हणाल्या - कृष्णा अतीव निष्टुर बोल सारे जो पावतो हरिसि तो भवि ना पुन्हा ये । ती वेदवाणि तुझिची करि सत्य आज केसासही तुलसि माळ तुझीच ल्यालो ॥ २९ ॥
विभो - हे प्रभो - भवान् - तू - एवं नृशंसं गदितुं - याप्रमाणे कठोर भाषण करण्यास - मा अर्हसि - योग्य नाहीस - (स्वं) निगमं सत्यं कुरुष्व - आपली प्रतिज्ञा खरी कर - वयं समस्तबंधून् अतिलंघ्य - आम्ही सर्व बांधवांना सोडून - (तव) पदा - तुझ्या चरणांनी - अवसृष्टं तुलसिदाम - स्पर्श केलेली तुळशीची माळ - केशैः निवोढुं - केसांनी धारण करण्याकरिता - (अत्र) प्राप्ता - येथे आलेल्या आहो. ॥२९॥
ब्राह्मणपत्न्या म्हणाल्या, "हे प्रभो ! आपण असे कठोर बोलू नये. आपल्याला प्राप्त झालेल्याला पुन्हा संसारात यावे लागत नाही, ही वेदवाणी आपण सत्य करा. आम्ही आपल्या नातलगांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आपल्या चरणापाशी यासाठी आलो आहोत की, आपल्या चरणांवरून पडलेली तुलसीमाला आपल्या केसांमध्ये धारण करावी. (२९)
गृह्णन्ति नो न पतयः पितरौ सुता वा
न भ्रातृबन्धुसुहृदः कुत एव चान्ये । तस्माद् भवत्प्रपदयोः पतितात्मनां नो नान्या भवेद् गतिररिन्दम तद् विधेहि ॥ ३० ॥
स्वीकार नाच करिती पति पुत्र आता तो अन्य काय म्हणती अपुल्या अम्हाला । आम्हा न आज उरला मुळि आश्रयो तो तेंव्हा दुज्या शरणि ना हरि धाडणे रे ॥ ३० ॥
पतयः पितरौ सुताः - आमचे पति, आईबाप व मुले - नः एव गृह्णन्ति - आम्हाला घरात घेणार नाहीत - वा - तसेच - भ्रातृबंधुसुहृदः - भाऊ, इष्टमित्र, बांधव - (न गृह्णन्ति) - हेही घेणार नाहीत - च अन्ये कुतः एव - मग दुसरे कोठून घेणार - तस्मात् - म्हणून - अरिंदम - हे शत्रूंचे दमन करणार्या कृष्णा - भवत्प्रपदयोः - तुझ्या पायांवर पडला आहे - पतितात्मनां नः - देह ज्यांचा अशा आम्हाला - अन्य गतिः - दुसरा मार्ग - न भवेत् - राहिला नाही - (यथा) तत् विधेहि - जे योग्य वाटेल तसे कर. ॥३०॥
हे शत्रुदमना ! आमचे पति-पुत्र, माता-पिता, भाऊबंद किंवा हितचिंतकसुद्धा आता आमचा स्वीकार करणार नाहीत, तर मग दुसर्यांची काय कथा ? म्हणून आता आपल्या चरणांना शरण आलेल्या आम्हांला दुसर्या कोणालाही शरण जावे लागणार नाही, असे करा." (३०)
विवरण :- ब्राह्मण स्त्रिया कृष्णाकडे आल्या होत्या; ते आपला संसार, घरे-दारे कृष्णार्पण करूनच; परत न जाण्यासाठी. (आणि आता आपल्याला घरात प्रवेश नाही, हे समजूनच. अर्थात याचे त्यांना दुःख नव्हतेही) पण मग कृष्णाचे 'परत घरी जा' हे शब्द कसे त्यांना अत्यंत कठोर वाटले. आता परत जाणे म्हणजे सर्वनाशच. मग 'न मे भक्तः प्रणश्यति' या कृष्णाच्या ब्रीदाचे काय ? निदान ते राखण्यासाठी तरी आम्हाला परत पाठवू नको, तुझ्या चरणांखेरीज आता आम्हाला सर्व काही तुच्छ आहे, असे त्यांना म्हणायचे आहे. (२९-३०)
श्रीभगवानुवाच -
पतयो नाभ्यसूयेरन् पितृभ्रातृसुतादयः । लोकाश्च वो मयोपेता देवा अप्यनुमन्वते ॥ ३१ ॥
( अनुष्टुप् ) श्रीभगवान् म्हणाले - देविंनो पति नी पुत्र पिता माता कुणीहि ते । न त्याग करिती तुम्हा जगी सन्मान होय तो । केले मुक्त तुम्हा मी तो आकाशी देव डौलती ॥ ३१ ॥
पतयः पितृभ्रातृसुतादयः - पती, आईबाप, मुलगे वगैरे - लोकाः च - आणि इतर जन - न (वः) अभ्यसूयेरन् - तुमचा तिरस्कार करणार नाहीत - मया उपेताः - मी आज्ञा दिलेले - देवाः अपि अनुमन्वते - देवसुद्धा तुमचा मान राखतील. ॥३१॥
श्री भगवान म्हणाले, "देवींनो, तुमचे पति-पुत्र, माता-पिता, भाऊबंद किंवा इतर लोक, कोणीच तुमचा तिरस्कार करणार नाहीत. कारण तुम्ही माझ्याशी युक्त झाला आहात. पहा ! हे देवही माझ्या म्हणण्याला अनुमोदन देत आहेत. (३१)
( अनुष्टुप् )
न प्रीतयेऽनुरागाय ह्यङ्गसङ्गो नृणामिह । तन्मनो मयि युञ्जाना अचिरान् मामवाप्स्यथ ॥ ३२ ॥
अंग संग तसा माझा न ती प्रीती जगी मला । मला ते अर्पिणे चित्त तेणे मी पावतो तुम्हा ॥ ३२ ॥
इह - या लोकी - नृणां अङगसङगः - मनुष्यांचा परस्पर होणारा शरीरसंबंध - प्रीतये अनुरागाय (च) - खर्या सुखाला किंवा खर्या प्रेमाला न हि (भवति) - कारण होत नाही - तत् मयि - त्याकरिता माझे ठिकाणी - मनः युञ्जानाः - चित्त ठेवणार्या अशा तुम्ही - अचिरात् मां अवाप्स्यथ - लवकरच माझ्या ठिकाणी प्राप्त व्हाल. ॥३२॥
देवींनो ! या संसारामध्ये माझ्या शरीराचा सहवास हाच काही माझ्या प्रेमाला किंवा अनुरागाला कारण ठरत नाही; म्हणून तुम्ही जा. आपले मन माझे ठिकाणी लावा. तुम्हांला लवकरच माझी प्राप्ती होईल." (३२)
विवरण :- ब्राह्मणी मनातूनच कृष्णाची भक्ती करीत होत्या. त्यांची ती भक्ती कृष्णाने कधीच जाणली होती. त्यामुळे तुमच्या या 'परोक्ष' भक्तीनेच संतुष्ट होऊन मी तुम्हाला मोक्ष देईन, अशी कृष्णाने त्यांना खात्री दिली. आणि आपापल्या पतींकडे जाण्यास सांगितले. (३२)
श्रीशुक उवाच -
इत्युक्ता द्विजपत्न्यस्ता यज्ञवाटं पुनर्गताः । ते चानसूयवः स्वाभिः स्त्रीभिः सत्रमपारयन् ॥ ३३ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ऐकता द्विजपत्न्या त्या यज्ञशाळेसि पातल्या । द्विजांनी द्वेषिले नाही मिळोनी यज्ञ साधिला ॥ ३३ ॥
इति (कृष्णेन) उक्ताः - याप्रमाणे कृष्णाने सांगितल्या गेलेल्या - ताः मुनिपत्न्यः - त्या ऋषिपत्न्या - पुनः यज्ञवाटं गताः - पुनः यज्ञशाळेत गेल्या - च ते - आणि ते ब्राह्मणहि - अनसूयवः (ब्राह्मणाः) - त्यांचा तिरस्कार न करणारे होत्साते - स्वाभिः स्त्रीभिः - आपआपल्या स्त्रियांसह - सत्रं अपारयन् - यज्ञ समाप्त करिते झाले. ॥३३॥
श्रीशुकदेव म्हणतात - असे सांगितल्यावर त्या ब्राह्मणपत्न्या यज्ञशाळेत गेल्या. त्या ब्राह्मणांनी आपल्या पत्न्यांकडे दोषदृष्टीने न पाहता त्यांच्यासह आपला यज्ञ पुरा केला. (३३)
विवरण :- यज्ञादि क्रिया करताना यजमानाजवळ त्याही पत्नी असणे आवश्यक असते. (सीता त्यागानंतर रामाने अश्वमेध यज्ञ केला असता सीतेची सोन्याची प्रतिकृती करून यज्ञस्थानी आपल्या जवळ ठेवली होती, असा भवभूतीच्या 'उत्तररामचरित' या नाटकात उल्लेख आहे.) त्यामुळे ब्राह्मणपत्नी परत गेल्यानंतर त्यांच्या पतींनी त्यांचा स्वीकार करून त्यांच्यासह यज्ञाचे कार्य पूर्ण केले. (३३)
तत्रैका विधृता भर्त्रा भगवन्तं यथाश्रुतम् ।
हृदोपगुह्य विजहौ देहं कर्मानुबन्धनम् ॥ ३४ ॥
जयांनी रोधिले विप्रे हरीशी चित्त लाविता । कर्माचा त्यागिला देह मिळाल्या शुद्ध सत्वि त्या ॥ ३४ ॥
तत्र एका - त्या यज्ञशाळेत एक स्त्री - भर्त्रा विधृता - पतीने धरून ठेविलेली - भगवंतं - परमेश्वराचे स्वरूप - यथाश्रुतं - जसे ऐकिले होते त्याप्रमाणे त्याला - हृदा उपगुह्य - मनाने आलिंगन देऊन - कर्मानुबंधनं - कर्मानुरूप प्राप्त झालेल्या - देहं जहौ - देहाला सोडिती झाली. ॥३४॥
त्या स्त्रियांपैकी एकीला आधीच तिच्या पतीने कोंडून ठेवले. तेव्हा तिने पुष्कळ दिवसांपासून ऐकलेल्या भगवंतांच्या स्वरूपाचे ध्यान करून त्यांना मनोमन आलिंगन देऊन कर्मामुळे बनलेले शरीर सोडले. (३४)
भगवानपि गोविन्दः तेनैवान्नेन गोपकान् ।
चतुर्विधेनाशयित्वा स्वयं च बुभुजे प्रभुः ॥ ३५ ॥
इकडे हरिने अन्न स्वादिष्ट सेविले असे । चतुर्विध असे सारे स्त्रियांनी आणिले तसे ॥ ३५ ॥
भगवान् प्रभुः गोविंदः अपि - षड्गुणैश्वर्यसंपन्न समर्थ कृष्णही - तेन चतुर्विधेन - त्या चार प्रकारच्या - अन्नेन एव - अन्नानेच - गोपकान् अशयित्वा - गोपांना जेवू घालून - स्वयं च बुभुजे - स्वतःहि जेविता झाला. ॥३५॥
इकडे भगवान श्रीकृष्णांनी, त्या चार प्रकारच्या अन्नाचे गोपालांना भोजन दिले आणि नंतर स्वतः भोजन केले. (३५)
एवं लीलानरवपुः नृलोकमनुशीलयन् ।
रेमे गोगोपगोपीनां रमयन्रूपवाक्कृतैः ॥ ३६ ॥
या परी भगवान् कृष्ण कर्मे रूपे नि वाणिने । गाई गोपाळ गोपिंना मोदिता मोदला स्वयें ॥ ३६ ॥
एवं - याप्रमाणे - लीलानरवपुः - लीलेने मनुष्यरूप धारण करणारा श्रीकृष्ण - नृलोकं अनुशीलयन् - मनुष्यांप्रमाणे आपले वर्तन ठेवणारा - रूपवाक्कृतैः - रूपाने, वाणीने, व कृतीने - गोगोपगोपींना रमयन् - गाई, गोप व गोपी ह्यांना रमवीत - रेमे - क्रीडा करिता झाला. ॥३६॥
अशाप्रकारे लीलामनुष्य भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यासारख्या लीला केल्या आणि आपले रूप, वाणी व कर्मांनी गाई, गोपाल आणि गोपींना आनंद देत ते स्वतःही आनंदित झाले. (३६)
अथानुस्मृत्य विप्रास्ते अन्वतप्यन् कृतागसः ।
यद् विश्वेश्वरयोर्याच्ञां अहन्म नृविडम्बयोः ॥ ३७ ॥
अनुताप द्विजां झाला कळता कृष्ण हा हरी । राम कृष्ण मनुष्याच्या रूपाने करिती लिला ॥ ३७ ॥
अथ - नंतर - ते विप्राः - ते ब्राह्मण - यत् - ज्याअर्थी - नृविडंबयोः - मनुष्याचे अनुकरण करणार्या - विश्वेश्वरयोः - व विश्वाचे स्वामी अशा - याञ्चाम् - बलरामकृष्णांच्या याचनेला - अहन्म - आम्ही हाणून पाडिले - (तत्) कृतागसः (वयं) अनुस्मृत्य - त्याअर्थी आम्ही अपराधी आहो असे स्मरण करून - अन्वतप्यन् - पश्चात्ताप पावते झाले. ॥३७॥
इकडे ब्राह्मणांना जेव्हा माहीत झाले की, श्रीकृष्ण तर स्वतः भगवान आहेत, तेव्हा त्यांना अतिशय पश्चात्ताप झाला. ते विचार करू लागले की, जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आम्ही फार मोठा अपराध केला आहे. ते तर, मनुष्यासारखी लीला करीत असूनही परमेश्वरच आहेत. (३७)
दृष्ट्वा स्त्रीणां भगवति कृष्णे भक्तिमलौकिकीम् ।
आत्मानं च तया हीनं अनुतप्ता व्यगर्हयन् ॥ ३८ ॥
पत्न्यांच्या हृदयी कृष्ण स्वतास रिक्त पाहता । स्वताला निंदिती तेंव्हा पश्चातापेचि ते द्विज ॥ ३८ ॥
भगवति कृष्णे - षड्गुणैश्वर्यसंपन्न कृष्णाच्या ठिकाणी - स्त्रीणां अलौकिकीं भक्तिं दृष्टवा - स्त्रियांची अलौकिक भक्ति पाहून - अनुतप्ताः - पश्चात्ताप पावलेले ते ब्राह्मण - आत्मानं च तया हीनं - आणि त्या भक्तिने रहित अशा स्वतःला पाहून - व्यगर्हयन् - स्वतःची निंदा करिते झाले. ॥३८॥
आपल्या पत्नींची भगवंतांविषयी अलौकिक भक्ती असून आपण मात्र त्याबाबत अगदी कोरडे आहोत, हे लक्षात येऊन ते पश्चात्ताप होऊन स्वतःचीच निंदा करू लागले. (३८)
धिग्जन्म नः त्रिवृत् विद्यां धिग् व्रतं धिग् बहुज्ञताम् ।
धिक्कुलं धिक् क्रियादाक्ष्यं विमुखा ये त्वधोक्षजे ॥ ३९ ॥
वदले हाय हो आम्ही कृष्णा विन्मूख राहिलो । कुल मंत्र तशी विद्या तप नी व्रत सर्व धिक् । धिक्कार बहु ज्ञानाचा गेले व्यर्थचि कर्म ते ॥ ३९ ॥
तेषां ये (वयम्) तु - त्यामध्ये जे आम्ही ते तर - अधोक्षजे विमुखाः (स्मः) - परमेश्वराच्या ठिकाणी पराङ्मुख आहो - नः त्रिवृत् जन्म धिक् - त्या आमचा तिहेरी जन्म व्यर्थ होय - (नः) व्रतं धिक् - आमच्या ब्रह्मचर्याला धिक्कार असो - बहुज्ञतां धिक् - सर्वज्ञत्वाला धिक्कार असो - कुलं धिक् - कुळाला धिक्कार असो - क्रियादाक्ष्यं (अपि) धिक् - व आमच्या कार्यकुशलतेलाही धिक्कार असो. ॥३९॥
ते म्हणू लागले, "अरेरे ! आम्ही भगवान श्रीकृष्णांना विन्मुख झालो, म्हणून आमचा जन्म, गायत्री मंत्र, वेदाध्ययन, बहुश्रुतपणा, उच्च घराणे, कर्मकांडात नैपुण्य या सर्वांचा धिक्कार असो ! धिक्कार असो !" (३९)
विवरण :- आपण कृष्णाला ओळखले नाही, त्याचा अव्हेर केला, या गोष्टीचा ब्राह्मणांना सतत पश्चात्ताप होत होता. ते सतत स्वतःला दोष देऊ लागले. स्वतःची निंदा करू लागले. 'आमचा धिक्कार असो, आम्ही तीन तीन वेळा जन्म घेऊनहि (त्रिगुणित जन्म- शौक्ल, सावित्र, दैक्ष) फुकट, ब्रह्मचर्य व्रत फुकट, यज्ञकर्म फुकट, त्याचे अनुष्ठान सामर्थ्य फुकट एकूण या सर्व गोष्टी करूनहि त्याचा फायदा काहीच नाही. आम्ही कृष्णाचा अह्वेर केला, तेव्हा आमचा जन्मच फुकट. आमच्या अडाणी बायकांनी केवळ आपल्या उत्कट भक्तीने जे साध्य केले, ते आम्हा विद्वान म्हणविणार्याना कळले नाही. (३७-३९)
नूनं भगवतो माया योगिनामपि मोहिनी ।
यस् वयं गुरवो नृणां स्वार्थे मुह्यामहे द्विजाः ॥ ४० ॥
मायेत योगिही गुंते ब्राह्मणो गुरु माणसा । तरी तो परमार्थाला स्वार्थालाही मुके पहा ॥ ४० ॥
यत् - ज्याअर्थी - नृणां गुरवः - मनुष्यांचे गुरु असे - वयं द्विजाः - आम्ही ब्राह्मण - स्वार्थे मुह्यामहे - स्वार्थाच्या विषयात मोहित होतो - भगवतः माया - परमेश्वराची माया - नूनं योगिनांअपि - खरोखर योगी लोकांना सुद्धा - मोहिनी - मोहित करणारी आहे. ॥४०॥
भगवंतांची माया योगी लोकांनाही मोहित करते, हेच खरे. म्हणूनच तर आम्ही मनुष्यांचे गुरु ब्राह्मण असून आमचा खरा स्वार्थ आम्हांला कळला नाही. (४०)
अहो पश्यत नारीणां अपि कृष्णे जगद्गुरौ ।
दुरन्तभावं योऽविध्यन् मृत्युपाशान् गृहाभिधान् ॥ ४१ ॥
आश्चर्य केवढे आहे स्त्रिया या असुनी पहा । कृष्णाचे साधिले प्रेम भवाचे फास तोडिल्या ॥ ४१ ॥
अहो - अहो - (तस्मिन्) जगद्गुरौ कृष्णै - त्या जगद्गुरु श्रीकृष्णाच्या ठिकाणी - नीराणां अपि - स्त्रियांची सुद्धा - दुरंतभावं पश्यत - अद्वितीय भक्ति पहा - यः - जी - गृहाभिधान् मृत्यूपाशान् - संसाररूपी मृत्यूच्या पाशांना - अविध्यत् - तोडती झाली. ॥४१॥
अहो पहा ना ! या स्त्रिया असूनही जगद्गुरू श्रीकृष्णांबद्दलच्या अगाध प्रेमाने प्रपंच नावाचा मृत्यूचा पाशसुद्धा यांनी तोडून टाकला. (४१)
विवरण :- ब्राह्मण स्त्रियांनी आपल्या अत्यधिक भक्तिभावाने 'घरदार' नावाचे मृत्यूचे पाश तोडले, असे ब्राह्मण म्हणतात. वास्तविक मृत्यूचे पाश कोणी आणि केव्हाही तोडू शकत नाही. मग तो कितीही बलवान, बुद्धिमान किंवा श्रीमान् असो, कोणालाहि मृत्यूला शरण जावेच लागते. या पाशांची उपमा घरा-दाराला म्हणजेच प्रापंचिक बंधनांना, मोह-मायेला दिली आहे. ज्याप्रमाणे मृत्यूचे पाश गळ्याभोवती आवळले की, मृत्यू अटळ त्याप्रमाणे मुले-बाळे, घरदार, ऐहिक बंधने यांच्या माया-पाशातून सुटणे कठीण. पण ब्राह्मणस्त्रियांच्या कृष्णभक्तीने या सर्व माया-पाशावर मात केली. हे सर्व पाश तोडून त्या कृष्णमय झाल्या. (४१)
नासां द्विजातिसंस्कारो न निवासो गुरावपि ।
न तपो नात्ममीमांसा न शौचं न क्रियाः शुभाः ॥ ४२ ॥
व्रतबंध नसे त्यांचा राहिल्या ना गुरूकुली । न तपो ज्ञान आत्म्याचे कुकर्म न पवित्रता ॥ ४२ ॥
आसां द्विजातिसंस्कारःन - ह्या स्त्रियांचा उपनयनादि संस्कार झालेला नाही - गुरौ निवासः अपि न - गुरूचे घरी राहणे देखील झालेले नाही - (आसां) तपः न - ह्यांनी तपश्चर्या केली नाही - आत्ममीमांसा न - ह्यांनी आत्मा व अनात्मा यांचा विचार केलेला नाही - (आसां) न शौचं - यांना पवित्रता नाही - शुभाः क्रियाः न - शुभकारक संध्योपासनादि क्रियाहि ह्यांनी केल्या नाहीत. ॥४२॥
यांचे उपनयन झाले नाही की यांनी गुरुकुलामध्ये निवास केला नाही. तपश्चर्या केली नाही की, आत्म्यासंबंधी काही विचार केला नाही. यांच्यामध्ये तशी पवित्रताही नाही किंवा यांनी कोणतीही सत्कर्मे केलेली नाहीत. (४२)
तथापि ह्युत्तमःश्लोके कृष्णे योगेश्वरेश्वरे ।
भक्तिर्दृढा न चास्माकं संस्कारादिमतामपि ॥ ४३ ॥
तरी योगेश्वरा पायी पयांचे दृढ प्रेम ते । करोनी सर्व संस्कार पदाचा लाभ ना अम्हा ॥ ४३ ॥
अथ अपि हि - असे असूनही खरोखर - उत्तमश्लोके - ज्याची कीर्ति पुण्यकारक आहे - योगेश्वरे कृष्णे - अशा श्रेष्ठ योगी जनांचा अधिपति जो कृष्ण त्याच्या ठिकाणी - (आसाम्) दृढा भक्तिः (अस्ति) - ह्या स्त्रियांची निश्चल भक्ति आहे - च - आणि - संस्कारादिमतां अपि - व संस्कारादिक झालेल्या अशा - अस्माकं न - आमचीही नाही. ॥४३॥
तरीसुद्धा योगेश्वरांचे ईश्वर, पुण्यकीर्ति भगवान श्रीकृष्णांच्या चरणी यांची दृढ भक्ती आहे; आणि आम्ही संस्कार वगैरेंनी संपन्न आहोत, तरीसुद्धा भगवंतांवर आमचे प्रेम नाही. (४३)
ननु स्वार्थविमूढानां प्रमत्तानां गृहेहया ।
अहो नः स्मारयामास गोपवाक्यैः सतां गतिः ॥ ४४ ॥
माजलो काम-धंद्याने हिताला मुकलो अम्ही । हरिने बाळगोपाळांद्वारे स्मरण ते दिले ॥ ४४ ॥
अहो - अहो - ननु गृहेहया - खरोखर गृहासक्त असल्यामुळे - स्वार्थविमूढानां - स्वार्थाविषयी अविचारी अशा - प्रमत्तानां नः - उन्मत्त झालेल्या आम्हाला - गोपवाक्यैः - गोपांच्या भाषणांच्या द्वारा - सतां गतिः - सज्जनांचा आश्रय असा कृष्ण - (आत्मस्वरूपं) - आत्मस्वरूपाची - स्मारयामास - आठवण करून देता झाला. ॥४४॥
गृहस्थीच्या कामांत गुंतून आत्मकल्याणाला पारख्या झालेल्या आम्हांला गोपाळांकरवी भगवंतांनी आपली आठवण करून दिली. केवढी ही त्यांची कृपा ! (४४)
अन्यथा पूर्णकामस्य कैवल्याद्यशिषां पतेः ।
ईशितव्यैः किमस्माभिः ईशस्यैतद् विडम्बनम् ॥ ४५ ॥
पूर्णकाम असा कृष्ण मोक्षही देउ तो शके । अन्याचे न्यून त्या काय कृपाकाजार्थ मागतो ॥ ४५ ॥
अन्यथा पूर्णकामस्य - नाही तर निरिच्छ अशा - कैवल्याद्याशिषांपतेः - मोक्षादिक वैभव देण्याविषयी समर्थ - ईशस्य - अशा परमेश्वराला - ईशितव्यैः अस्माभिः - ऐश्वर्येच्छु अशा आमच्याशी - एतत् विडम्बनं किम् - हे अन्नाची याचना करण्याचे क्षुल्लक काम कशाला हवे होते. ॥४५॥
भगवान स्वतः पूर्णकाम असून भक्तांच्या मोक्षापर्यंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत. आमच्यावर अहैतुकी कृपा करण्याखेरीज आमच्यासारख्या क्षुद्र जीवांच्या बाबतीत त्यांचे दुसरे काय प्रयोजन असणार ? म्हणून त्यांनी याच उद्देशाने केलेली ही लीलाच म्हणावी लागेल ! (४५)
हित्वान्यान् भजते यं श्रीः पादस्पर्शाशया सकृत् ।
स्वात्मदोषापवर्गेण तद्याच्ञा जनमोहिनी ॥ ४६ ॥
चांचल्य त्यजिता लक्ष्मी पदी सेवेत नित्य ज्या । मागतो खावया अन्न त्या विना हे घडे कसे ॥ ४६ ॥
असकृत् - वारंवार परमेश्वराच्या - पादस्पर्शाशया श्रीः - चरणस्पर्शाची इच्छा करणारी लक्ष्मी - अन्यान् हित्वा - दुसर्यांना टाकून - यं भजते - ज्याची सेवा करते - आत्मदोषापवर्गेण तद्याञ्चा - त्याने चांचल्य व गर्व सोडून केलेली याचना - जनविमोहिनी - लोकांना मोहात पाडणारी होय. ॥४६॥
स्वतः लक्ष्मी इतर देवांना सोडून आणि आपल्या चंचलता, गर्व इत्यादि दोषांचा त्याग करून ज्यांच्या चरणकमळांच्या निरंतर स्पर्शाच्या लोभाने सेवा करीत असते, तेच प्रभु दुसर्याकडे अन्नाची याचना करतात, हे लोकांना भुलविणेच नव्हे काय ? (४६)
विवरण :- स्वतःला दोष देत ब्राह्मण पुढे म्हणतात की, आम्ही किती हो अज्ञानी ! जो जगाचा ईश्वर, जगन्नियंता तो आमच्याकडे अन्नाची मागणी करतो, यामागे त्याचा निश्चितच काहीतरी हेतू असावा, त्यायोगे त्याला आम्हाला काहीतरी धडा द्यायचा असावा; हे आम्हा मूढ बुद्धी असणार्यांच्या ध्यानी आले नाही. सर्व जग जिच्या कृपेची इच्छा करते, ती लक्ष्मी इतर सर्वांचा त्याग करून, आपला जन्मजात चंचलपणा सोडून भगवंताच्या चरणाशी स्थिर होते, ती उगीच का ? त्याचे मोठेपण आम्हाला कळले नाही, हे आमचे दुर्दैव ! कोणत्याहि प्रकारचे ज्ञानाचे संस्कार न झालेल्या आमच्या अज्ञ पत्नींना जे कळले; ते मूर्ख अहंकाराने पोकळ कर्मकांडात अडकलेल्या आम्हा तथाकथित विद्वांनाना कळले नाही. (४५-४६)
देशः कालः पृथग्द्रव्यं मंत्रतंत्रर्त्विजोऽग्नयः ।
देवता यजमानश्च क्रतुर्धर्मश्च यन्मयः ॥ ४७ ॥
देशकाल नि सामग्री कर्म तंत्र नि ते तप । ऋत्वीज देवता यज्ञ सर्व ती भगवान् रुपे ॥ ४७ ॥
देशः कालः पृथक् द्रव्यं - देश, काल, प्रत्येक वस्तु - मंत्रतंत्रर्त्विजः अग्नयः - मंत्र, तंत्र, ऋत्विज, अग्नि - देवता यजमानः च - देवता आणि यजमान - क्रतुः धर्मः च - तसेच यज्ञ व धर्म - यन्मयः - ज्या परमेश्वराचे स्वरूप आहे. ॥४७॥
देश, काल, वेगवेगळी द्रव्ये, मंत्र, अनुष्ठानाची पद्धत, ऋत्विज, अग्नि, देव, यजमान, यज्ञ आणि धर्म हे सर्व काही भगवंताचेच स्वरूप आहे. (४७)
स एष भगवान् साक्षाद् विष्णुर्योगेश्वरेश्वरः ।
जातो यदुष्वित्याश्रृण्म ह्यपि मूढा न विद्महे ॥ ४८ ॥
योगेश्वर स्वयं विष्णु यदुवंशात जन्मला । आम्ही ते ऐकुनी होतो आम्ही मूढे न जाणिले ॥ ४८ ॥
सः एषः - तो हा - साक्षात् भगवान् - प्रत्यक्ष षड्गुणैश्वर्यसंपन्न - योगेश्वरेश्वरः विष्णुः - योगेश्वरांमध्येहि श्रेष्ठ असा विष्णु - यदुषुः जातः (अस्ति) - यदुकुलांत उत्पन्न झाला आहे - इति अशृण्म - असे आम्ही ऐकिले - (तथा) अपि हि मूढाः (वयं) - तरीदेखील खरोखर मूर्ख असे आम्ही - (तं) न विद्महे - त्याला जाणत नाही. ॥४८॥
तेच योगेश्वरांचेसुद्धा ईश्वर साक्षात भगवान विष्णू स्वतः श्रीकृष्णांच्या रूपाने यदुवंशामध्ये अवतीर्ण झाले आहेत, ही गोष्ट आम्ही ऐकली होती. परंतु आम्ही मूर्खांनी मात्र त्यांना ओळखले नाही. (४८)
अहो वयं धन्यतमा येषां नस्तादृशीः स्त्रियः ।
भक्त्या यासां मतिर्जाता अस्माकं निश्चला हरौ ॥ ४९ ॥
तरी धन्य असू आम्ही पत्न्या आमुचिया अशा । कृष्णाशी आमुची बुद्धी त्यांच्या प्रेमेचि लागली ॥ ४९ ॥
अहो - अहो - वयं धन्यतमाः (स्मः) - आम्ही अत्यंत धन्य आहोत - येषां नः - ज्या आमच्या - तादृशीः स्त्रियः (सन्ति) - तशा स्त्रिया आहेत - यासां भक्त्या - ज्यांच्या भक्तीने - हरौ - परमेश्वराच्या ठिकाणी - अस्माकं निश्चला मतिः जाता - आमची अढळ भक्ति उत्पन्न झाली ॥४९॥
आमचे भाग्य खरेच थोर म्हणून आम्हांला अशा पत्न्या मिळाल्या. त्यांच्या भक्तीमुळे भगवान श्रीकृष्णांविषयी आमचीही भक्ती निश्चल झाली. (४९)
नमस्तुभ्यं भगवते कृष्णायाकुण्ठमेधसे ।
यन्मायामोहितधियो भ्रमामः कर्मवर्त्मसु ॥ ५० ॥
अनंतैश्वर्य स्वामी तू तुझ्या मायेत मोहिलो । गुंतलो कर्म गुंत्यात तुजला प्रणिपात हा ॥ ५० ॥
यन्मायामोहितधियः - ज्याच्या मायेने मोहित झाली आहे बुद्धि ज्यांची असे आम्ही - कर्मवर्त्मसु भ्रमामः - कर्ममार्गात भ्रमण करीत आहो - (तस्मै) अकुंठमेधसे भगवते - अकुंठित आहे बुद्धि ज्याची अशा त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न - तुभ्यं कृष्णाय नमः - कृष्णस्वरुपी तुला नमस्कार असो ॥५०॥
नित्यज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्ण ! आपल्याला नमस्कार असो. आपल्याच मायेने आमची बुद्धी मोहित होऊन आम्ही कर्मांच्या व्यापामध्ये भटकत आहोत. (५०)
स वै न आद्यः पुरुषः स्वमायामोहितात्मनाम् ।
अविज्ञतानुभावानां क्षन्तुमर्हत्यतिक्रमम् ॥ ५१ ॥
पुरुषोत्तम तो कृष्णो क्षमा तोचि अम्हा करो । मायेने मोहिता बुद्धी प्रभाव नच जाणिला ॥ ५१ ॥
सः आद्यः पुरुषः - तो आदिपुरुष कृष्ण - स्वमाया मोहितात्मनां - आपल्या मायेने मोहित झाले आहे चित्त ज्यांचे अशा - अविज्ञातानुभावानां नः - व स्वानुभव समजला नाही ज्यांना अशा आमच्या - अतिक्रमं क्षंतुं अर्हति - अपराधाबद्दल क्षमा करण्यास समर्थ आहे ॥५१॥
आमच्या या अपराधाची क्षमा करोत. कारण आमची बुद्धी त्यांच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांचा प्रभाव जाणू शकली नाही. (५१)
विवरण :- ब्राह्मणांना कृतकर्माचा पश्चात्ताप झाला. निदान आता तरी कृष्णाचे दर्शन घेऊन पावन व्हावे, असे त्यांना वाटले. पण नुसती इच्छा असून भागत नाही; तर ती गोष्ट नशीबात असावी लागते, हेही तितकेच खरे. शिवाय, ती व्हावी, अशी खुद्द परमेश्वराचीही इच्छा असावी लागते. (त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पानहि हलत नाही, असे म्हणतात याचा इथे प्रत्यय येतो.) नंतर त्यांना वाटले हे सर्व कंसाला कळले तर काय होईल ? खुद्द राजाची अवकृपा होऊन कसे चालेल ? (कारण कृष्ण व कंस या दोघांतील शत्रुत्व उघड होते.) शिवाय एवढे मोठे विद्वान ब्राह्मण असून सामान्य गवळ्याच्या दर्शनाला आपण होऊन कसे जायचे, असा पोकळ अभिमानहि आड आला असावा. (तो केव्हा डोके वर काढेल हे सांगता येत नाही.) शेवटी भक्तीवर भीतीने मात केली. परब्रह्म सगुण साकार होऊन दारी आले, तरी ब्राह्मणांचे कमनशीबच आडवे आले. वरचढ ठरले. दैवाने दिले, कर्माने नेले, असाही काहीसा प्रकार झाला आणि ब्राह्मण कृष्णदर्शनाला अंतरले. (५१)
इति स्वाघमनुस्मृत्य कृष्णे ते कृतहेलनाः ।
दिदृक्षवोऽप्यच्युतयोः कंसाद्भीता न चाचलन् ॥ ५२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ब्राह्मणे द्वेषिला कृष्ण पश्चाताप तयां अता । इच्छिती दर्शना त्याच्या न गेले कंसभीतिने ॥ ५२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेविसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
इति स्वाघं अनुस्मृत्य - याप्रमाणे आपले दुष्कृत स्मरुन - कृष्णे कृतहेलनाः ते - कृष्णाची निर्भर्त्सना केलेले ते विप्र - अच्युतयोः - रामकृष्णांना - दिदक्षवः अपि - पहाण्याची इच्छा करणारे असताहि - कंसात् भीताः - कंसाला भिऊन - न च अचलन् - गेले नाहीत ॥५२॥
श्रीकृष्णांचा तिरस्कार केल्यामुळे आपला अपराध आठवून त्यांना श्रीकृष्ण-बलरामांच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली. परंतु कंसाच्या भीतीने ते त्यांच्या दर्शनाला गेले नाहीत. (५२)
अध्याय तेविसावा समाप्त |