|
श्रीमद् भागवत पुराण ब्रह्मणा कृता भगवतः स्तुतिर्वत्सवत्सपालानयनंच - ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
( वसंततिलका )
श्रीब्रह्मोवाच - नौमीड्य तेऽभ्रवपुषे तडिदम्बराय गुञ्जावतंसपरिपिच्छलसन्मुखाय । वन्यस्रजे कवलवेत्रविषाणवेणु लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपाङ्गजाय ॥ १ ॥
( वसंततिलका ) श्रीब्रह्मदेव म्हणतात - तू एकला प्रभू स्तुतेय तुला नमस्ते ही श्यामला तनु तुझी झळके हि वस्त्र । घुंगूर माळ मकराकृति कुंडले ती डोईस ते खवियले अन मोरपंख । वक्षास ही रुळतसे वनमाळ ऐशी वाटी दह्यासहित ही करि घेतलेली । शिंगी नि वेत कमरासचि बासुरीही ही कोवळी पद तुझे अन गोप वेष ॥ १ ॥
ईडय - हे स्तुति करण्यास योग्य अशा श्रीकृष्णा - अभ्रवपुषे - मेघाप्रमाणे श्याम आहे शरीर ज्याचे अशा - तडिदम्बराय - विजेप्रमाणे तेजस्वी आहे वस्त्र ज्याचे अशा - गुंजावतंसपरिपिच्छिलसन्मुखाय - गुंजांचे तुरे व मोराची पिसे यांमुळे शोभत आहे मुख ज्याचे अशा - वन्यस्रजे - वनमाळा धारण करणार्या - कवलवेत्रविषाणवेणुलक्ष्मश्रिये - हातातील घास, वेताची काठी, शिंग, मुरली या चिन्हांनी शोभणार्या - मृदुपदे - कोमल आहेत पाय ज्याचे अशा - पशुपाङगजाय - गवळ्याचा पुत्र अशा - ते - तुला - नौमि - मी नमस्कार करितो. ॥१॥
ब्रह्मदेव म्हणाले - प्रभो ! केवळ आपणच स्तुती करण्यास योग्य आहात. आपले हे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल आहे; त्यावर विजेप्रमाणे झगमगणारा पीतांबर शोघून दिसत आहे, गुंजांची कर्णभूषणे आणि मोरपंखांचा मुगुट यामुळे आपले मुख सुंदर दिसत आहे. आपल्या वक्षःस्थळावर वनमाला रुळत आहे, हातामध्ये घास, बगलेत वेताची काठी आणि शिंग व कमरेला खोचलेली बासरी सुरेख दिसत आहे. गोपालबालक असणार्या आपले चरण सुकुमार आहेत. मी आपल्याला नमस्कार करीत आहे. (१)
विवरण :- आपण स्वतःच निर्माण केलेल्या मायाजालात ब्रह्मदेव अडकून पडले. समोर दिसणारी सर्व गोपबालके कृष्णस्वरूप दिसल्याने ते भांबावून गेले आणि आपली चूक त्यांना उमगली. त्यांनी कृष्ण परमात्म्याची स्तुति करावयास प्रारंभ केला. ते म्हणतात - (१)
अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य
स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोऽपि । नेशे महि त्ववसितुं मनसाऽऽन्तरेण साक्षात्तवैव किमुतात्मसुखानुभूतेः ॥ २ ॥
श्रीविग्रहो करितसे मनमेतु पूर्ण । हे चिन्मयी रुप तुझे मज बोधिते नी । अप्राकृत तव रुपो नच आकळे की एकाग्र ध्याउनि तुझे नकळेचि कोडे ॥ २ ॥
देव - हे श्रीकृष्णा - आन्तरेण मनसा - अंतर्मुख अशा मनाने - मदनुग्रहस्य - माझ्यावर कृपा करणार्या - स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य - स्वतःच्या इच्छेने धारण केलेल्या पण पंचमहाभूतांनी युक्त नसलेल्या अशा - अस्य (ते) वपुषः तु - या तुझ्या शरीराचे देखील - महि अव सितुम् - महात्म्य जाणण्यास - कः अपि - कोणीही - न ईशे - समर्थ होत नाही - साक्षात् - प्रत्यक्ष - आत्मसुखानुभूतेः तव एव - आत्मसुखाचा अनुभव घेण्यार्या अशा तुझेच - (मह्यवसितत्वे) किमुत (वक्तव्यम्) - माहात्म्य जाणण्याविषयी काय सांगावे. ॥२॥
हे देवा ! भक्तांच्या इच्छेनुसार धारण केले जाणारे हे स्वरूप मला अनुगृहीत करण्यासाठीच आपण प्रगट केले आहे. हे पांचभौतिक नाही. तरीही याचा महिमा कोणीही जाणू शकत नाही. तर मग साक्षात आत्मानंदानुभव स्वरूप अशा आपला महिमा कोणी चित्त एकाग्र करूनसुद्धा कसा जाणू शकेल. (२)
विवरण :- तू आमच्यासमोर सगुण-साकार रूपात उभा असूनहि आम्ही तुझा महिमा जाणू शकत नाही, निर्गुण-निराकार अशा तुझ्या रूपाचे वर्णन आम्ही कसे करावे ? वास्तविक परमात्म्याचे खरे रूप तेच. पण केवळ भक्तासाठी तो सगुण-साकार होतो. (शरीर धारण करतो.) त्याची माया कळत नाही. मग सर्व चराचरात भरलेल्या निर्गुण रूपाचा महिमा कसा कळावा ? (२)
ज्ञाने प्रयासमुदपास्य नमन्त एव ।
जीवन्ति सन्मुखरितां भवदीयवार्ताम् । स्थाने स्थिताः श्रुतिगतां तनुवाङ्मनोभिः । ये प्रायशोऽजित जितोऽप्यसि तैस्त्रिलोक्याम् ॥ ३ ॥
ज्ञानी प्रयत्न करुनी स्थिरबुद्धि होती संतांसि सेवुनि तुझे करितात गान । नाही तुझ्या विण तयां मुळि काम कांही ते मेळिती तुज हरी जरि वैभवो ना ॥ ३ ॥
ज्ञाने प्रयासं उदपास्य - ज्ञानाविषयींचे श्रम सोडून - स्थाने स्थिताः - एका जागी बसलेले - ये - जे - सन्मुखरितां भवदीयवार्ताम् - सज्जनांनी गायिलेली तुझी कथा - श्रुतिगतां (कृत्वा) - श्रवण करून - तनुवाङ्मनोभिः (त्वां) - शरीराने, वाणीने व मनाने तुला - नमन्तः एव जीवन्ति - नमस्कार करूनच आपले जीवित सफल करितात - तैः - त्यांनी - त्रैलोक्याम् - तिन्ही लोकांमध्ये - अजितः (त्वम्) अपि - अजिंक्य असलेला तू सुद्धा - प्रायशः जितः असि - बहुतेक जिंकल्यासारखाच आहेस. ॥३॥
प्रभो ! जे लोक ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न न करता केवळ आपापल्या ठिकाणीच राहून, संतांनी वर्णिलेल्या आपल्या कथांचे, शरीराने, वाणीने आणि मनाने विनम्रपणे सेवन करतात, किंबहुना तेच आपले जीवन मानतात, त्यांनी त्रैलोक्यात अजिंक्य अशा आपल्याला बहुधा जिंकल्यासारखेच असते. (३)
विवरण :- ज्ञान मिळणे सहज-सोपे नाही. त्यासाठी अनेक प्रयत्न, सतत अभ्यासाची आवश्यकता असते. अशा तर्हेने ज्ञान मिळवूनहि तुझी प्राप्ती होईलच, असेही नाही. पण श्रद्धेने तुझ्या कथा श्रवण करणारे मात्र तुला आपलेसे करू शकतात. तू अजिंक्य असूनहि तुला ते जिंकू शकतात, केवळ श्रद्धेच्या, भक्तीच्या बळावर. (३)
( इंद्रवंशा )
श्रेयःसृतिं भक्तिमुदस्य ते विभो । क्लिश्यन्ति ये केवलबोधलब्धये । तेषामसौ क्लेशल एव शिष्यते । नान्यद् यथा स्थूलतुषावघातिनाम् ॥ ४ ॥
( इंद्रवज्रा ) भक्ती तुझी भद्र मुळात स्त्रोत ते ज्ञानि कष्टे बहु दुःख घेती । क्लेशोचि क्लेशो उरतो तळाशी तांदूळ भूसा कुटता न लाभे ॥ ४ ॥
विभो - हे श्रीकृष्णा - ये - जे - श्रेयःस्नुतिम् - कल्याणांचा झरा अशी - ते भक्तिं उदस्य - तुझी भक्ती टाकून - केवलबोधलब्धये (एव) क्लिश्यन्ति - फक्त ज्ञानप्राप्तीसाठी त्रास सोसतात - तेषाम् - त्यांचा - असौ - तो त्रास - यथा स्थूलतुषावघातिनाम् (तथा) - जाडया तुसाचे कांडण करणार्या लोकांचा प्रयास जसा तसा - क्लेशलः एव शिष्यते - दुःखरूपानेच शिल्लक राहतो - न अन्यत् - दुसरे काही नाही. ॥४॥
हे भगवन् ! कल्याणाचा उगम असणारी आपली भक्ती सोडून जे लोक केवळ ज्ञानप्राप्तीसाठी श्रम करतात, त्यांना फक्त क्लेशच क्लेश हाती लागतात, अन्य काही नाही. जसे भुसा कुटणार्यांना फक्त श्रमच होतात, तांदूळ मिळत नाहीत. (४)
पुरेह भूमन् बहवोऽपि योगिनः
त्वदर्पितेहा निजकर्मलब्धया । विबुध्य भक्त्यैव कथोपनीतया प्रपेदिरेऽञ्जोऽच्युत ते गतिं पराम् ॥ ५ ॥
अनंत ! अच्युत ! जगात थोर झालेहि योगी नच त्या कळला । लौकिक कर्मा तुज अर्पिती जे ते ज्ञान भक्ती पद मेळवीती ॥ ५ ॥
भूमन् अच्युत - हे विराटपुरुषा श्रीकृष्णा - पुरा - पूर्वी - इह - ह्या लोकी - त्वदर्पितेहाः - तुला अर्पिल्या आहेत इच्छा ज्यांनी असे - बहवः योगिनः अपि - पुष्कळ योगीसुद्धा - निजकर्मलब्धया - स्वतःच्या कर्मांनी मिळालेल्या - कथोपनीतया - कथांनी जवळ आणिलेल्या - भक्त्या एव - भक्तीच्याच योगाने - विबुध्य - ज्ञानप्राप्त करून - अञ्जः - तत्काळ - ते परां गतिम् - तुझ्या श्रेष्ठ अशा गतीला - प्रपेदिरे - प्राप्त झाले. ॥५॥
हे अच्युता ! हे अनंता ! या लोकी पूर्वीसुद्धा पुष्कळ योगी होऊन गेले. जेव्हा त्यांनी आपली सर्व कर्मे आपल्याला समर्पित केली, तेव्हा त्या कर्मांनी व आपल्या कथाश्रवणाने त्यांना आपली भक्ती प्राप्त झाली. त्या भक्तीनेच आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन त्यांनी सहजपणे आपल्या परमपदाची प्राप्ती करून घेतली. (५)
विवरण :- योगीजनांनाहि ज्ञानापेक्षा श्रद्धापूर्वक परमेश्वर कथा श्रवणाचा महिमा पटला आणि त्यांनी श्रद्धापूर्वक कथा श्रवणास प्रारंभ केला. (५)
तथापि भूमन् महिमागुणस्य ते
विबोद्धुमर्हत्यमलान्तरात्मभिः । अविक्रियात् स्वानुभवादरूपतो ह्यनन्यबोध्यात्मतया न चान्यथा ॥ ६ ॥
निर्गूणरूपो जरि ते कठीण ते शुद्ध चित्ता कळते विशेष । न ज्ञेय आत्मा घट पाट जैसा न सांगता ये परि ज्योत तैसा ॥ ६ ॥
तथापि - तरी सुद्धा - भूमन् - हे विराटपुरुषा - अगुणस्य ते महिमा - ज्याच्या ठिकाणी गुण मुळीच नाहीत अशा तुझे माहात्म्य - अमलान्तरात्मभिः (भक्तैः) - निर्मळ आहे अंतःकरण ज्यांचे अशा भक्तांकडून - अविक्रियात् - ज्यामध्ये विकार नाहीत अशा - अरूपतः - ज्याला रूप नाही अशा - स्वानुभवात् - स्वतःच्या अनुभवाने - अनन्यबोध्यात्मतया हि - खरोखर एकाच रीतीने आहे ज्ञान ज्याचे अशा स्वरूपाने - विबोद्धुं अर्हति - जाणण्यास योग्य आहे - न च अन्यथा - दुसर्या कोणत्याही प्रकारे नाही. ॥६॥
हे अनंता ! आपल्या निर्गुण स्वरूपाचा महिमा शुद्ध अंतःकरण असलेलेच जाणू शकतात. विशेष आकाराचा व रूपाचा त्याग करून आत्माकार अंतःकरण झाल्यावर स्वयंप्रकाशरूपाने तो जाणता येतो. एर्हवी नाही. (६)
विवरण :- इथे 'व्यापक' अशा विशेषणाचा वापर केला आहे. परमात्मा सर्व विश्वाला व्यापून राहिला आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्याचे अस्तित्व आहे. परंतु इंद्रियांच्या आहारी गेलेल्यांना त्याचे अस्तित्व समजता येत नाही. (६)
( मिश्र )
गुणात्मनस्तेऽपि गुणान् विमातुं हितावतीर्णस्य क ईशिरेऽस्य । कालेन यैर्वा विमिताः सुकल्पैः भूपांशवः खे मिहिका द्युभासः ॥ ७ ॥
आकाशबिंदू कण हे धरेचे न मोजता ये तव रूप तैसे । तारावया लोकचि रूप घेसी न जाणता ये महिमा तुझी ही ॥ ७ ॥
(जगतः) हितावतीर्णस्य - जगाच्या कल्याणासाठी अवतरलेल्या - अस्य गुणात्मनः ते अपि - ह्या गुणांनी युक्त अशा तुझे तरी - गुणान् विमातुम् - गुण मोजण्यास - के ईशिरे - कोण समर्थ आहेत - यैः - ज्यांनी - सुकल्पैः - मोठमोठया युक्त्यांनी - कालेन - पुष्कळ काळाने - भूपांसवः - पृथ्वीचे कण - खे मीहिकाः - आकाशातील हिमकण - वा - किंवा - द्युभासः - सूर्याचे किरण - विमिता - मोजिले. ॥७॥
ज्या सामर्थ्यवान पुरुषांनी पुष्कळ काळ परिश्रम करून पृथ्वीचे परमाणू, आकाशातील हिमकण व चमकणारी नक्षत्रे यांचीसुद्धा गणती केली असेल, त्यांच्यापैकीसुद्धा असा कोण असू शकेल की, जो जगाच्या कल्याणासाठीच अवतीर्ण झालेल्या सगुण स्वरूपाच्या आपल्या गुणांची गणती करू शकेल ? (७)
विवरण :- विश्वाच्या पालनासाठी तू अनंत गुण प्रकट करतोस, त्याची तुलना करणे केवळ अशक्य. विद्वान लोक अनेक जन्मात अंतरिक्षातील हिमकण, सूर्य-चंद्र, परमाणू, पृथ्वीवरील रजःकण यांची तुलना करू शकतात. पण तुझ्या गुणांची नाही. (७)
तत्तेऽनुकम्पां सुसमीक्षमाणो
भुञ्जान एवात्मकृतं विपाकम् । हृद्वाग्वपुर्भिर्विदधन्नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे स दायभाक् ॥ ८ ॥
कृपे तुझ्या जो समचित्त राही नी प्रेम भावे चरणास येई । पदाधिकारी तवपाशि हो तो जैं वारसाला मिळतेचि वित्त ॥ ८ ॥
तत् - म्हणून - यः - जो - ते अनुकम्पाम् सुसमीक्षमाणः - तुझ्या दयेची वाट पाहणारा - आत्मकृतं विपाकं भुञ्जानः एव - आपण केलेल्या कर्माचे फळ भोगीत असताच - हद्वाग्वपुर्भिः - मनाने, वाणीने व शरीराने - ते नमः विदधन् - तुला नमस्कार करीत - जीवेत - आयुष्यक्रम चालवितो - सः - तो - मुक्तिपदे - मोक्षस्थानाविषयी - दायभाक् - वाटेकरी. ॥८॥
म्हणून जो मनुष्य अत्यंत उत्सुकतेने आपल्या कृपेची वाट पहात प्रारब्धानुसार प्राप्त होईल, ते सुख किंवा दुःख भोगतो, तसेच कायावाचामनाने स्वतःला आपल्याला समर्पित करून जीवन व्यतीत करतो, तोच मनुष्य आपल्या मोक्षपदाचा अधिकारी होतो. (८)
विवरण :- कर्म करूनहि त्यामध्ये आसक्ती न ठेवणारा पुरुष तुझी भक्ती करून मुक्तीचा अधिकारी होऊ शकतो. (भगवंतानी महाभारत युद्धाचे वेळी भांबावलेल्या अर्जुनाला निष्काम कर्मयोगाचाच उपदेश केला होता.) (८)
पश्येश मेऽनार्यमनन्त आद्ये
परात्मनि त्वय्यपि मायिमायिनि । मायां वितत्येक्षितुमात्मवैभवं ह्यहं कियानैच्छमिवार्चिरग्नौ ॥ ९ ॥
कुटील माझ्या परि थोर तेही मायीं तुझ्या चक्रिचि गुंगलेलो । प्रभो न गण्यो तुजपाशि मी तो अग्नी कुठे नी ठिणगी कुठे ती ॥ ९ ॥
ईश - हे ईश्वरा - मे (एतत्) अनार्य पश्य - माझा हा क्षुद्रपणा पहा - हि - कारण - कियान् अहम् - कितीतरी अल्प असा मी - अर्चिः अग्नौ इव - ज्वाळा ज्याप्रमाणे अग्नीवर त्याप्रमाणे - अनन्ते - ज्याला अंत नाही अशा - आद्ये - सर्वांच्या आधी असणार्या अशा - परमात्मनि - श्रेष्ठ आत्मा अशा - मायिमायिनी - कपटी लोकांनाही मोहित करणार्या अशा - त्वयि अपि - तुझ्यावर देखील - मायां वितत्य - कपट पसरून - आत्मवैभवम् - आपले सामर्थ्य - ईक्षितुं ऐच्छम् - पाहण्याची इच्छा करिता झालो. ॥९॥
प्रभो ! माझा नीचपणा तर पहा ! आपण अनंत आदिपुरुष परमात्मा आहात आणि मोठमोठे मायावीसुद्धा आपल्या मायेच्या चक्रामध्ये आहेत. असे असूनही मी आपल्यावर आपली माया पसरून माझे ऐश्वर्य दाखविण्याची इच्छा प्रदर्शित केली. प्रभो ! मी आपल्यासमोर केवढा ? अग्नीसमोर ठिणगीची काय गणती ? (९)
विवरण :-(आपण केलेल्या कृत्याबद्दल ब्रह्मदेवाला पश्चात्ताप होतो. क्षमा-याचना करीत तो पुढे म्हणतो -) मायेच्या अधीन जाणार्यांना सतत मोह निर्माण होतो हे ठीक. पण तुझे खरे स्वरूप माझ्या ध्यानी आले नाही. निर्मोही, निर्लेप अशा तुझ्यावर माया पसरविण्याचा मोठया गर्वाने मी प्रयत्न केला. मी स्वतःलाच ब्रह्म समजलो ही माझी मोठीच चूक झाली. (९)
( वंशस्था )
अतः क्षमस्वाच्युत मे रजोभुवो ह्यजानतस्त्वत् पृथगीशमानिनः । अजावलेपान्धतमोऽन्धचक्षुष एषोऽनुकम्प्यो मयि नाथवानिति ॥ १० ॥
रजोगुणाने मम जन्म झाला न जाणितो तव रूप सत्य । मानीतसे मी मजलाचि स्वामी कृपा करोनी मजला क्षमावे ॥ १० ॥
अतः - म्हणून - अच्युत - हे श्रीकृष्णा - रजोभुवः - रजोगुणापासून उत्पन्न झालेल्या - त्वदजानतः - तुला न जाणणार्या - पृथगीशमानिनः - स्वतंत्र राजेपणाचा अभिमान बाळगणार्या - अजा वलेपान्धतमोऽन्धचक्षुषः - जन्मरहित असल्याविषयींच्या गर्वांच्या धुंदीने आंधळे झाले आहेत नेत्र ज्याचे अशा - मे - मला - क्षमस्व - क्षमा कर - हि - कारण - मयि (एव रक्षितरि सति) - मी रक्षण करणारा असलो तरच - एषः नाथवान् (भवति) इति विचिन्त्य - हा सनाथ होणार आहे असा विचार करून - भवता - तुझ्याकडून - अहं अनुकम्प्यः (अस्मि) - मी दया केला जाण्यास योग्य आहे. ॥१०॥
हे भगवन ! रजोगुणापासून उत्पन्न झाल्यामुळे मी आपल्याला ओळखले नाही. म्हणूनच मी स्वतःला आपल्यापासून वेगळा असा जगाचा स्वामी समजत होतो. मी अजन्मा जगत्कर्ता आहे, या मायाकृत मोहाच्या घनदाट अंधाराने अंध होऊ लागलो होतो. म्हणून आपण मला आपला समजून क्षमा करावी. (१०)
( वसंततिलका )
क्वाहं तमोमहदहंखचराग्निवार्भू । संवेष्टिताण्डघटसप्तवितस्तिकायः । क्वेदृग्विधाविगणिताण्डपराणुचर्या । वाताध्वरोमविवरस्य च ते महित्वम् ॥ ११ ॥
( वसंततिलका ) ब्रह्मांड हे मम असे तनु स्वामि कृष्णा नी कैक ते मज परी तव रोमि विश्व । रेणू जसे उडत ते बहु अग्निमध्ये मी औट हात तनुच्या तवरूप कोठे ॥ ११ ॥
तमोमहदहंखचराग्निवार्भू - प्रकृति, महतत्त्व, अहंकार, आकाश, वायू, तेज, उदक व पृथ्वी - संवेष्टिताण्ड - यांनी वेढिलेल्या ब्रह्मांडरूपी - घटसप्तवितस्तिकायः - घटाच्या ठिकाणी आहे सात वितींचा देह ज्याचा असा - अहं क्व - मी कोठे - च - आणि - ईदृग्विधाऽविगणिताण्ड - अशाप्रकारची अनंत ब्रह्मांडे हेच जे कोणी - पराणुचर्यावाताध्वरोमविवरस्य - परमाणू त्यांच्या आतबाहेर येण्याजाण्याच्या खिडक्याच जणु आहेत केसांनी छिद्रे ज्यांच्या अशा - ते - तुझे - महित्वम् - माहात्म्य कोठे. ॥११॥
प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, आकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वीरूप आवरणाने घेरलेले हे ब्रह्मांड हेच माझे अवघे सात वितींचे शरीर कोणीकडे आणि जसे झरोक्यातून येणार्या सूर्याच्या किरणांमध्ये असंख्य धुळीचे कण उडतांना दिसतात, त्याप्रमाणे ज्यांच्या एकेका रोमातून अशी अगणित ब्रह्मांडे निर्माण होतात, त्या आपला महिमा कोणीकडे ! (११)
( मिश्र )
उत्क्षेपणं गर्भगतस्य पादयोः किं कल्पते मातुरधोक्षजागसे । किमस्तिनास्तिव्यपदेशभूषितं तवास्ति कुक्षेः कियदप्यनन्तः ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा ) पोटात गर्भो जरि पाय झाडी तरीहि माता अपराध साही । असे नसे त्या जरि वस्तु तैशा ते सर्व कुक्षी नच का तुझ्या या ॥ १२ ॥
अधोक्षज - हे श्रीकृष्णा - मातुः गर्भगतस्य (बालकस्य) - मातेच्या गर्भात असलेल्या बालकाचे - पादयोः उत्क्षेपणं - पायांचे वर उचलणे - आगसे कल्पते किम् - अपराध म्हणून समजले जाते काय - अस्तिनास्तिव्यपदेशभूषितम् (इदं विश्वं) - आहे व नाही या शब्दांनी भूषविलेले हे सर्व विश्व - तव कुक्षेः अनन्तः - तुझ्या कुशीच्या बाहेर - कियत् अपि अस्ति किम् - काहीतरी आहे काय. ॥१२॥
हे परमात्मन ! बाळ जेव्हा मातेच्या पोटात असते तेव्हा लाथा मारते; परंतु तो मातेचा अपराध ठरतो काय ? ’आहे’ आणि ’नाही’ या शब्दांनी सांगितली जाणारी अशी कोणती वस्तू आहे की जी आपल्या उदरात नाही ? (१२)
जगत्त्रयान्तोदधिसम्प्लवोदे
नारायणस्योदरनाभिनालात् । विनिर्गतोऽजस्त्विति वाङ् न वै मृषा किं त्वीश्वर त्वन्न विनिर्गतोऽस्मि ॥ १३ ॥
जगत्रयाचा जधि लोप होतो त्या नाभ पद्मी मम जन्म होतो । हे सर्व श्रूती वदतात ऐसे ते सत्य मिथ्या वदणे मला जे ॥ १३ ॥
ईश्वर - हे श्रीकृष्णा - अजः तु - ब्रह्मदेव तर - जगत्त्रयान्तोदधिसंप्लवोदे - त्रैलोक्याच्या प्रलयकाळी एकत्र झालेल्या समुद्राच्या उदकामध्ये - नारायणस्य - भगवंताच्या - उदरनाभिनालात् - जठरातील नाभिस्थानाच्या कमळापासून - विनिर्गतः - निघाला - इति वाक् - ही वाणी - मृषा न वै - खोटी नव्हे - किंतु - पण - ईश्वरत्वं - ईश्वरत्वाला - न विनिर्गतः अस्मि - प्राप्त झालो नाही. ॥१३॥
वेद म्हणतात की, ज्यावेळी तिन्ही लोक प्रलयकालीन पाण्यामध्ये लीन झालेले होते, त्यावेळी त्या पाण्यात असलेल्या श्रीनारायणांच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. त्यांचे हे म्हणणे मुळीच असत्य नाही. तर मग प्रभो ! आपणच सांगा, मी आपला पुत्र नाही काय ? (१३)
विवरण :- लहान बाळ जसे आधी मातेच्या पोटात असते, तसाच मीही तुझ्यापासूनच निर्माण झाल्याने तुझे बालक आहे. त्यामुळे पितृभावाने तू या बालकावर दया कर. (१२-१३)
नारायणस्त्वं न हि सर्वदेहिनां
आत्मास्यधीशाखिललोकसाक्षी । नारायणोऽङ्गं नरभूजलायनात् तच्चापि सत्यं न तवैव माया ॥ १४ ॥
नारायणो हे तव नाम सत्य तू सर्व आत्मा अन ईश्वरो ही । तू साक्षि तैसा जलि राहसी नी माया तुझी ही जरि अंश सर्व ॥ १४ ॥
त्वं - तू - नारायणः - नारायण - सर्वदेहिनाम् आत्मा - सर्व जीवांचा आत्मा - न हि असि - नाहीस काय - अधीशः - सर्वांचा स्वामी - अखिललोकसाक्षी - सर्व लोकांना प्रत्यक्ष पाहणारा - न हि असि - नाहीस काय - नरभूजलायनात् - नरापासून झालेले जे उदक ते आश्रयस्थान असल्यामुळे - नारायणः - नारायण - (तव एव) अंङगं - तुझीच मूर्ति होय - किन्तु तत् (अपि) सत्यं न - पण तेही खरे नव्हे - (तत्) तव माया एव - ती तुझी मायाच होय. ॥१४॥
ज्यांच्यापासून माझा जन्म झाला, ते नारायण आपणच नव्हे का ? आपणच नारायण. कारण सर्व जीवांचे आत्मा म्हणून आपण नारायण. (नार=जीवसमूह आणि अयन=आश्रय) आहात. आपण सर्व जीवांचे अधीश्वर म्हणूनही नारायण (नार=जल आणि अयन=प्रवर्तक) आहात. सर्व लोकांचे साक्षी म्हणूनसुद्धा नारायण (नार=जीवसमूह आणि अयन=जाणणारे) आहात. नरापासून उत्पन्न होणार्या पाण्यात निवास करीत असल्या कारणाने ज्यांना नारायण (नार=जल आणि अयन=मोवासस्थान) म्हटले जाते, तेसुद्धा आपले एक अंशच आहेत. ते अंशरूपाने दिसणेसुद्धा सत्य नाही, तर आपली मायाच आहे. (१४)
विवरण :- विष्णूला 'नारायण' का म्हणतात ? 'नरात् जातं यज्जलं तद् अयनात् - नारायणः ।' क्षीराब्धीमध्ये विष्णूचे वास्तव्य असल्याने तो नारायण. (आपो नारा इति प्रोक्ताः ।) आप = नारा. ( १४)
( इंद्रवज्रा )
तच्चेज्जलस्थं तव सज्जगद्वपुः किं मे न दृष्टं भगवंस्तदैव । किं वा सुदृष्टं हृदि मे तदैव किं नो सपद्येव पुनर्व्यदर्शि ॥ १५ ॥
जळात होते जरि ते विराट कां मी न पाही जरि होय सत्य । धुंडी तया मी शतवर्ष तेथे तपात भासे मग कान होसी ॥ १५ ॥
भगवन् - हे श्रीकृष्णा - तव - तुझे - जगद्वपुः - जगताला आश्रयभूत असे शरीर - जलस्थं - पाण्यात राहणारे आहे - (इति) सत् चेत् (तर्हि) - हे जर खरे असेल तर - तदा एव - त्याचवेळी - मे किं न दृष्टं - माझ्या दृष्टीस का पडले नाही - वा - अथवा - तदा एव - तप केल्यानंतरच - हृदि - हृदयात - मे किम् सुदृष्टं - मला चांगल्या रीतीने कसे दिसले - पुनः सपदि - पुनः तत्काळ - किं नो व्यदर्शि - का बरे दिसत नाहीसे झाले. ॥१५॥
भगवन ! जर आपले ते नारायणस्वरूप झरे व पाण्यातच असते, तर त्याचवेळी मला कसे दिसले नसते ? आणि मी तपश्चर्या केली, त्याचवेळी माझ्या हृदयात त्याचे दर्शन कसे झाले ? आणि काही क्षणातच ते पुन्हा अंतर्धान कसे पावले ? (१५)
विवरण :- विष्णूच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. त्याबद्दल तो म्हणतो, त्या कमळाच्या देठातून त्याचा आश्रय करून मी तुझा शोध घेण्याचा शेकडो वर्षे प्रयत्न केला. पण तो सफल झाला नाही, पण भक्तीपूर्वक तप केल्यानंतर तुझा शोध लागला. यावरून भगवान विष्णू भक्तालाच दर्शन देतात, हे समजले. (१५)
अत्रैव मायाधमनावतारे
ह्यस्य प्रपञ्चस्य बहिः स्फुटस्य । कृत्स्नस्य चान्तर्जठरे जनन्या मायात्वमेव प्रकटीकृतं ते ॥ १६ ॥
ते पूर्व सोडी अवतारि याही पोटात विश्वा तुचि दावितोसी । पाहोनि होतो नवलाव माते हे सिद्ध की विश्व तुझीच माया ॥ १६ ॥
च - आणि - मायाधमन - हे मायाचालका श्रीकृष्णा - ते अत्र एव अवतारे - तुझ्या ह्याच अवतारामध्ये - बहिः स्फुटस्य - बाहेर स्पष्ट दिसणार्या - अस्य प्रपञ्चस्य - या संपूर्ण संसाराच्या - अन्तर्जठरे जनन्याः (दर्शनेन) - आपल्या पोटात मातेला दाखविण्याने - मायात्वमेव - मायावीपणाच - प्रकटीकृतं हि - खरोखर प्रकट केलेला आहे. ॥१६॥
हे मायेचा नाश करणार्या प्रभो ! आता याच अवतारात आपण हे बाहेर दिसणारे सारे जग आपल्या पोटातच मातेला दाखविले. यावरून हे संपूर्ण विश्व आपली माया आहे, हेच सिद्ध होते. (१६)
विवरण :- अर्जुनाला सांगितलेल्या भगवत् गीतेमध्ये विश्वरूप दर्शनाचा अध्याय आहे. बालकृष्णाने आपले मुख उघडून यशोदेला विश्वरूप दर्शन दाखविले. अणू-रेणूसह अत्यंत सूक्ष्म आणि महाप्रचंड अशा सर्व वस्तूंचे दर्शन त्यात तिला झाले आणि ती विलक्षण भांबावून गेली. (१६)
( अनुष्टुप् )
यस्य कुक्षाविदं सर्वं सात्मं भाति यथा तथा । तत्त्वय्यपीह तत् सर्वं किमिदं मायया विना ॥ १७ ॥
( अनुष्टुप् ) जेंव्हा तुझ्या सवे विश्व पोटात दिसते तसे । विना माया असे कैसे लीला सारी तुझी असे ॥ १७ ॥
यस्य तव कुक्षौ - ज्या तुझ्या उदरात - सात्मं इदं सर्वं - तुझ्यासह हे सर्व जग - यथा भाति - जसे दिसते - तथा - तसे - तत् इदं सर्वं इह अपि - ते हे सर्व येथेही - भाति - दिसते. ॥१७॥
जर आपल्यासह हे संपूर्ण विश्व जसे बाहेर दिसते, तसेच आपल्या उदरातसुद्धा दिसले, तर हे सर्व मायेविनाच घडले काय ? (१७)
( शार्दूलविक्रीडित )
अद्यैव त्वदृतेऽस्य किं मम न ते मायात्वमादर्शितम् । एकोऽसि प्रथमं ततो व्रजसुहृद् वत्साः समस्ता अपि । तावन्तोऽसि चतुर्भुजास्तदखिलैः साकं मयोपासिताः । तावन्त्येव जगन्त्यभूस्तदमितं ब्रह्माद्वयं शिष्यते ॥ १८ ॥
( शार्दूलविक्रीडीत ) पूर्वीचे जरि सोडले तरि अजी तू दाविला खेळ तो कृष्णा तू जरि एकचि असुनिया बाळे नि वत्से तुची । चारी हात तुझ्या परी करितसे सेवा तुझी सृष्टि ती ब्रह्मांडा धरिशी विभक्त रुपनी ते शेष ब्रह्मो उरे ॥ १८ ॥
त्वदृते - तुझ्याशिवाय करून - अस्य मायात्वं - ह्या जगाचे मायावीपण - ते - तू - मम - मला - अद्यैव - आजच - न आदर्शितम् किम् - दाखविले नाहीस काय - प्रथमं - पूर्वी - एकः असि - एकटाच होतास - ततः - नंतर - समस्ताः अपि - सर्वही - व्रजसुहलद्वत्साः - गोकुळातील मित्र व वासरे - अभूः - तू झालास - तावन्तः - तितक्याप्रकारे - तत् - तो - मया साकं - माझ्यासह - अखिलैः उपासिताः - सर्वांनी उपासिलेल्या - चतुर्भुजाः - चार हातांच्या मूर्ति झालास - तावन्ति एव - तितकीच - जगन्ति - जगते - त्वं अभूः - तू झालास - तत् - म्हणून - अमितं अद्वयं ब्रह्म - अनंत व द्वैतरहित असे ब्रह्म - शिष्यते - राहते. ॥१८॥
आज आपण माझ्यासमोर आपल्या व्यतिरिक्त या विश्वाला आपल्या मायेचा खेळ दाखविला नाही काय ? प्रथम आपण एकटेच होतात. नंतर सर्व गोपाळ, वासरे, काठ्या, शिंकीसुद्धा आपणच झालात. त्यानंतर ती सर्व रूपे चतुर्भुज झाली आणि माझ्यासह सर्व तत्त्वे त्यांची सेवा करू लागली. निरनिराळ्या तितक्याच ब्रह्मांडांचे रूप आपण धारण केले होते. परंतु आता मात्र आपणच अपरिमित अद्वितीय ब्रह्मरूपाने राहिला आहात. (१८)
( उपेंद्रवज्रा )
अजानतां त्वत्पदवीमनात्मन् यात्माऽऽत्मना भासि वितत्य मायाम् । सृष्टाविवाहं जगतो विधान इव त्वमेषोऽन्त इव त्रिनेत्रः ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा ) अज्ञानि ते ना कधि रूप जाणो त्यांना जिवांच्या परि भासतोसी । हे निर्मिता तू मम रूप घेसी पाळावया विष्णु नि लीनि रुद्र ॥ १९ ॥
त्वत्पदवीम् अजानतां - तुझ्या स्थानाला न जाणणार्यांना - आत्मा एवं - सर्वव्यापी असा तू - आत्मना - स्वतंत्रपणे - अनात्मनि - प्रकृतिच्या ठिकाणी - मायां वितत्य - माया पसरून - भासि - भासतोस - सृष्टौ अहम् इव भासि - सृष्टि उत्पन्न करण्याच्या काळी मी जो ब्रह्मदेव त्याप्रमाणे भासतोस - जगतः विधाने त्वम् एव - जगाच्या रक्षणकाळी हा तू विष्णुस्वरूपी भासतोस - अन्ते त्रिनेत्रः इव (भासि) - जगाच्या नाशाच्या वेळी शंकराप्रमाणे. ॥१९॥
अजाणतेपणामुळे जे लोक आपल्या स्वरूपाला जाणत नाहीत, त्यांना आपण प्रकृतीमध्ये असलेल्या जीवाच्या रूपाने भासता. आणि त्यांच्यावर आपल्या मायेचा पडदा टाकून सृष्टिनिर्मितीच्या वेळी माझ्या (ब्रह्मा) रूपाने, पालन करतेवेळी आपल्या (विष्णू) रूपाने आणि संहाराच्या वेळी रुद्राच्या रूपाने प्रतीत होता. (१९)
विवरण :- मूळ तू एकात्मच आहेस. मत्स्यादि अवतार आदि तुझी निरनिराळी रूपे आहेत. (मत्स्य, कूर्म, वराह - इ. दहा अवतार म्हणजे एक विष्णूच.) सृष्टीची उत्पत्ति, स्थिती आणि लय हे सर्व तू एकटाच करू शकतोस. तुला भिन्नत्व रूपाने पाहणारेच केवळ अज्ञानी आहेत. (१९)
( मिश्र )
सुरेष्वृषिष्वीश तथैव नृष्वपि तिर्यक्षु यादःस्वपि तेऽजनस्य । जन्मासतां दुर्मदनिग्रहाय प्रभो विधातः सदनुग्रहाय च ॥ २० ॥
स्वामी विधात्या तुज जन्म नाही तरी ऋषी नी पशु पक्षि देव । योनीत घेसी अवतार कैक नी रक्षिसी संत नि दैत्य मारी ॥ २० ॥
ईश प्रभो - हे समर्था देवा - विधातः - हे स्रुष्टिकर्त्या - सुरेषु ऋषिषु तथा एव नृषु अपि - देव, ऋषि तसेच मनुष्ये ह्यांच्या ठिकाणीही - यादःसु अपि - जलचरांच्या ठिकाणी सुद्धा - अजनस्य ते जन्म - जन्मरहित अशा तुझा जन्म - असतां दुर्मदनिग्रहाय - दुर्जनाचा उन्माद घालविण्याकरिता - च सदनुग्रहाय - आणि साधूंवर अनुग्रह करण्याकरिता. ॥२०॥
हे विश्वनिर्मात्या प्रभो ! अजन्मा असूनही आपण देवता, ऋषी, मनुष्य, पशु-पक्षी, जलचर इत्यादि योनींमध्ये अवतार ग्रहण करता, तो दुष्ट पुरुषांची घमेंड नाहीशी करण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी. (२०)
को वेत्ति भूमन् भगवन् परात्मन्
योगेश्वरोतीर्भवत-स्त्रिलोक्याम् । क्व वा कथं वा कति वा कदेति विस्तारयन् क्रीडसि योगमायाम् ॥ २१ ॥
योगेश्वरा तू परमात्म रूपी त्या योगमाये करिशी लिला या । कोठे कधी नी करिशी किती त्या न कोणि जाणी त्रयलोकि त्याते ॥ २१ ॥
भूमन् योगेश्वर परात्मन् भगवन् - हे सर्वव्यापी श्रेष्ठा परमात्म्या श्रीकृष्णा - कथं भवतः ऊतिः - कशा तुझ्या लीला - क्व - कोठे - वा - अथवा - कति - कितीप्रकारच्या - वा - अथवा - कदा (भूताः) - कोणत्या वेळी झाल्या - इति - असे - कः वेत्ति - कोण जाणतो - त्रिलोक्याम् - त्रैलोक्यामध्ये - योगमायां विस्तारयन् क्रीडसि - योगमायेचा पसारा मांडून तू खेळतोस. ॥२१॥
भगवन ! आपण अनंत, परमात्मा आणि योगेश्वर आहात. ज्यावेळी आपण आपल्या योगमायेचा विस्तार करून लीला करू लागता, त्यावेळी त्रैलोक्यात असा कोण आहे की जो आपली लीला कोठे, कशासाठी, केव्हा आणि किती असते, हे जाणू शकेल ? (२१)
( वसंततिलका )
तस्मादिदं जगदशेषमसत्स्वरूपं स्वप्नाभमस्तधिषणं पुरुदुःखदुःखम् । त्वय्येव नित्यसुखबोधतनावनन्ते मायात उद्यदपि यत् सदिवावभाति ॥ २२ ॥
( वसंततिलका ) स्वप्ना समान भ्रम विश्वचि सर्व आहे अज्ञान रूप सगळे भरलेचि दुःख आनंदकंद हरि तू अन ज्ञान रूपी माये तुलाचि गमते भ्रम सर्व सत्य ॥ २२ ॥
तस्मात् - म्हणून - असत्स्वरूपं - मिथ्यारूपाने भासणारे - स्वप्नाभम् - स्वप्नाप्रमाणे अनुभवाला येणारे - अस्तधिषणं - नष्ट झाली आहे वृद्धि ज्यांत असे - पुरुदुःखदुःखम् - पुष्कळ दुःखाने भरलेले - इदं अशेषं जगत् - हे सर्व जग - नित्यसुखबोधतनौ - नित्य आनंद व ज्ञान हेच आहे स्वरूप ज्याचे अशा - अनन्ते - अंतरहित - त्वयि एव - तुझ्याठिकाणीच - मायातः - मायेपासून - उद्यत् अपि - उत्पन्न झालेले असताहि - सत् इव अवभाति - जणू खरे असे भासते. ॥२२॥
म्हणून हे संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे असत्य, अज्ञानरूप आणि दुःखच दुःख देणारे आहे. सच्चिदानंदस्वरूप व अनंत अशा आपल्यामध्ये मायेने उत्पन्न आणि विलीन झाल्यानंतरही आपल्या सत्तेने ते खरे आहे, असे वाटते. (२२)
( मिश्र )
एकस्त्वमात्मा पुरुषः पुराणः सत्यः स्वयंज्योतिरनन्त आद्यः । नित्योऽक्षरोऽजस्रसुखो निरञ्जनः पूर्णाद्वयो मुक्त उपाधितोऽमृतः ॥ २३ ॥
( इंद्रवज्रा ) प्रभो खरा तू जगि एकलाची पुराण आत्मा गुणहीन तूची । हा देश कालोहि परप्रकाशी स्वयंप्रकाशी तुचि एकला की । तू नित्य आनंद विशुद्ध तैसा तू पूर्ण मुक्तो रुप अमृतीही ॥ २३ ॥
त्वं - तू - एकः - अद्वितीय - आत्मा - सर्वव्यापी - पुरुषः - शरीरात राहणारा - पुराणः - सर्वांच्या आधीपासून असणारा - सत्यः - सत्यस्वरूप - स्वयंज्योतिः - स्वयंप्रकाश - अनन्तः - अन्तरहित - आद्यः - श्रेष्ठ - नित्यः - नित्य - अक्षरः - अविनाशी - अजस्रमुखः - हजारो मुखांचा - निरञ्जनः - निष्कलंक - पूर्णः - परिपूर्ण - अद्वयः - द्वंद्वरहित - उपाधितः मुक्तः - त्रिगुणोपाधीपासून मुक्त - अमृतः - मोक्षरूप. ॥२३॥
प्रभो ! आपणच एकमेव सत्य आहात; कारण आपण सर्वांचे आत्मा आहात. आपण अविनाशी असल्या कारणाने नित्य आहात. आपला आनंद कधीही खंडित होणारा नाही. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. आपण पूर्ण, एक व सर्व उपाधींपासून मुक्त असून अमृतस्वरूप आहात. (२३)
( इंद्रवंशा )
एवंविधं त्वां सकलात्मनामपि स्वात्मानमात्मात्मतया विचक्षते । गुर्वर्कलब्धोपनिषत् सुचक्षुषा ये ते तरन्तीव भवानृताम्बुधिम् ॥ २४ ॥
जिवांसि रूपो तव रूप सार्या तू ज्ञान सूर्यो दिसतोसि ज्ञान्या । तरूनि जाती मग ते भवात खोट्यास पाहो अति दृष्टि खोटी ॥ २४ ॥
ये - जे - गुर्वर्कलब्धोपनिषत्सुचक्षुषा - गुरुरूपी सूर्यापासून मिळालेल्या उपनिषद्रूपी ज्ञानाच्या दृष्टीने - सकलात्मनाम् अपि - सर्व जीवांच्याही - स्वात्मानं एवंविधं त्वाम् - अंतर्यामीस्वरूपी अशा प्रकारच्या तुला - आत्मात्मतया - अंतर्यामीस्वरूपाने - विचक्षते - पाहतात - ते - ते लोक - भवानृताम्बुधिं - संसाररूपी मिथ्या समुद्राला - तरन्ति इव - जणू तरलेच म्हणून समजावे. ॥२४॥
आपले हे असे स्वरूप सर्व जीवांचेसुद्धा स्वतःचे खरे स्वरूप आहे. जे गुरुरूप सूर्यापासून तत्त्वज्ञानरूप दिव्य दृष्टी प्राप्त करून घेऊन त्यापासून आपल्याला स्वतःच्या रूपात पाहतात ते, या असत्य संसारसागराला जणू पार करून जातात. (२४)
आत्मानमेवात्मतयाविजानतां
तेनैव जातं निखिलं प्रपञ्चितम् । ज्ञानेन भूयोऽपि च तत्प्रलीयते रज्ज्वामहेर्भोगभवाभवौ यथा ॥ २५ ॥
न जाणितो जो परमात्मरूपा तयांस होतो भ्रम या भवाचा । ज्ञानेचि नाशे भ्रम त्या जिवांचा रज्जूच भासे नच सर्प राही ॥ २५ ॥
आत्मानम् एव - आत्म्यालाच - आत्मतया - आत्मस्वरूपाने - अविजानतां - न ओळखणार्यांचे - तेन एव जातं - त्यापासूनच झालेले - प्रपञ्चितं निखिलं तत् - पसरलेले सर्व जगत - ज्ञानेन च - ज्ञानानेच - भूयः अपि - पुनः हि - यथा रज्जवां अहेः भोगभवाभवौ (तथा) - जसे दोरीच्या ठिकाणी सर्पशरीराचा भ्रम व त्याचा निरास त्याप्रमाणे - प्रलीयते - नष्ट होते. ॥२५॥
जे लोक परमात्माच आपला आत्मा आहे असे जाणत नाहीत, त्यांना त्यांच्या त्या अज्ञानामुळेच या नामरूपात्मक अखिल प्रपंचाचा भ्रम होतो. परंतु ज्ञान होताच त्याचा आत्यंतिक लय होतो. जसे दोरीच्या ठिकाणी भ्रमामुळे साप आहे असे वाटते आणि भ्रम निरास होताच साप नाहीसा होतो. (२५)
विवरण :- परमात्म्याचे ज्ञान न झाल्याने अज्ञानाने प्रपंचाविषयी आसक्ती निर्माण होते. परंतु गुरूरूपी सूर्याच्या प्रकाशाने अज्ञान नाहीसे झाले की, सर्व मोह नाहीसा होतो. नंतर खरी ज्ञानप्राप्ती होते. अंधारात पडलेल्या दोरीला साप समजले तर काही काळच भीती निर्माण होते. पण प्रकाशाने खर्या दोरीचे ज्ञान झाल्यानंतर अज्ञान आणि त्यातून आलेली भीती या दोहोंचाहि नाश होतो. असे ज्ञान झालेले लोकच भवसागर तरून जातात. (२४-२५)
( मिश्र )
अज्ञानसंज्ञौ भवबन्धमोक्षौ द्वौ नाम नान्यौ स्त ऋतज्ञभावात् । अजस्रचित्यात्मनि केवले परे विचार्यमाणे तरणाविवाहनी ॥ २६ ॥
अज्ञान दोन्ही भवबंध मोक्ष ते ज्ञान सत्यो नच भिन्न रूपा । सूर्या न रात्रो दिन तो हि नाही अखंड आत्मा नच बंध मोक्ष ॥ २६ ॥
भवबन्धमोक्षौ - संसारसंबन्ध व त्यापासून सुटका - द्वौ नाम - या दोन गोष्टी तर - अज्ञानसंज्ञौ (स्तः) - अज्ञान हे नाव आहे ज्यांना अशा होत - ऋतज्ञभावात् अन्तौ न (स्तः) - नित्यज्ञानरूपाहून निराळ्या अशा काही नव्हेत - केवले परे विचार्यमाणे - शुद्ध व श्रेष्ठ अशा वस्तूचा विचार केला असता - अजस्त्र चित्यात्मनि - अखंड अशा ज्ञानस्वरूपामध्ये - तरणौ अहनी इव - सूर्याच्या ठिकाणी दिवस रात्री प्रमाणे ॥२६॥
संसारासंबंधी बंधन आणि त्यापासून मुक्तता ही दोन्ही नावे अज्ञानामुळेच कल्पिलेली आहेत. वास्तविक अज्ञानाचीच ही दोन नावे आहेत. सत्य आणि ज्ञानस्वरूप अशा परमात्म्याशिवाय यांना वेगळे अस्तित्व नाही. जसे सूर्याच्या ठिकाणी दिवस आणि रात्र असा भेद नाही, त्याचप्रमाणे विचार केला असता अखंड चित्स्वरूप केवळ शुद्ध आत्मतत्त्वामध्ये बंधन नाही की मोक्ष नाही. (२६)
विवरण :- सूर्य नाही म्हणून रात्र होते, जर चोवीस तास सूर्य असता तर अंधार, रात्र अशी परिस्थीतीच निर्माण झाली नसती. तसेच बंधन आणि मोक्ष हे दोन शब्द. ते अज्ञानामधून निर्माण झाले. परमात्मा मुक्त, त्याला बंधन नाही. तो एकच आहे. (२६)
( अनुष्टुप् )
त्वामात्मानं परं मत्वा परमात्मानमेव च । आत्मा पुनर्बहिर्मृग्य अहोऽज्ञजनताज्ञता ॥ २७ ॥
( अनुष्टुप् ) आत्मा तू असुनी लोक दुजाचि पाहती तुला । अज्ञानी धुंडिती आत्मा जगात वेगळा पहा ॥ २७ ॥
त्वां - तुला - पर आत्मानं - श्रेष्ठ आत्मा असे - च - आणि - परमात्मानम् एव - परमात्मा असेहि - मत्वा - मानून - पुनः आत्मा बहिः मृग्यः - फिरुन आत्म्याला बाहेर सर्वत्र शोधण्यास लागावे - अहो - कितीहो - अज्ञजनताज्ञता - अज्ञानी लोकांचे हे अज्ञान आहे ॥२७॥
आपण स्वतःचा आत्मा असून लोक आपल्याला परका मानतात, आणि शरीर इत्यादि जे परके आहेत, त्यांना आत्मा समजतात; शिवाय आपल्याला दुसरीकडे शोधू लागतात. पहा ना ! अज्ञानी जीवांचे हे केवढे अज्ञान ! (२७)
( मिश्र )
अन्तर्भवेऽनन्त भवन्तमेव ह्यतत्त्यजन्तो मृगयन्ति सन्तः । असन्तमप्यन्त्यहिमन्तरेण सन्तं गुणं तं किमु यन्ति सन्तः ॥ २८ ॥
( इंद्रवज्रा ) सर्वां हृदेयी वसशी अनंता न तू जिथे ते त्यजितात संत । नी आत रूपा तुज शोधिताची कळोनि दोरी मग भीत कोण ॥ २८ ॥
अनन्त - हे श्रीकृष्णा - अतत् - तत् शब्दाने वाच्य जे ब्रह्म त्याहून वेगळ्या शरीराला - त्यजन्तः सन्तः - सोडणारे साधु - भवन्तं - तुला - अन्तर्भवे एव - शरीरामध्येच - मृगयन्ति हि - खरोखरच शोधितात - असन्तम् अपि अहिं अन्तरेण - नसणार्याहि सर्पाला निषेधिल्याशिवाय - सन्तः - सत्पुरुष - अन्ति (एव) सन्तं तं गुणं - जवळच सत्यस्वरूपाने असणार्या त्या दोरीला - यन्ति किम् उ - जाणतात काय ॥२८॥
हे अनंता ! ज्ञानी लोक आपल्या व्यतिरिक्त जे काही प्रतीत होते, त्याचा त्याग करीत स्वतःच्या शरीरातच आपला शोध घेतात; कारण जरी दोरीमध्ये साप नसला, तरीसुद्धा जाणवणारा तो साप खोटा आहे असा निश्चय केल्याशिवाय, विचारी मनुष्य खर्या दोरीला कसे जाणू शकेल ? (२८)
अथापि ते देव पदाम्बुजद्वय
प्रसादलेशानुगृहीत एव हि । जानाति तत्त्वं भगवन् महिम्नो न चान्य एकोऽपि चिरं विचिन्वन् ॥ २९ ॥
नष्टेची सृष्टी मग अज्ञ भाव श्रेष्ठत्व ऐसे तवरूप ज्ञान । तुझ्या कृपेचा कण लाभता हो वैराग्य ज्ञानीं नच शक्ति ऐशी ॥ २९ ॥
देव - हे श्रीकृष्णा - अथ अपि - तरीसुद्धा - ते - तुझ्या - पदाम्बुजद्वय - दोन चरणकमलांच्या अल्पशाही - प्रसादलेशानुगृहीतः एव हि - प्रसादाने ज्याच्यावर अनुग्रह केला आहे असा भगवद्भक्तच खरोखर - भगवन्महिन्मः - भगवतांच्या माहात्म्याचे - तत्त्वं - तत्त्व - जानाति - जाणतो - चिरं विचिन्वन् अन्यः अपि - पुष्कळ शोधणारा दुसरा एकही - एव नच - जाणत नाही ॥२९॥
हे भगवंता ! आपल्या चरणकमलांचा थोडासाही कृपाप्रसाद मिळालेला मनुष्यच आपल्या महिम्याचे रहस्य जाणू शकतो. दुसरा कोणीही पुष्कळ काळपर्यंत ते शोधत राहिला, तरी जाणू शकत नाही. (२९)
विवरण :- (अठ्ठाविसाव्या श्लोकात जरी 'ज्ञानात् मुक्तिः' असा भाव असला तरी परमेश्वराच्या कृपाप्रसादाशिवाय त्याचा महिमा कळत नाही.) कृपाप्रसादाचा अगदी 'लेश' म्हणजेच थोडासाहि कृपाप्रसाद भक्ताच्या दृष्टीने फार मोलाचा असतो. ज्ञानापेक्षाहि भक्तीच श्रेष्ठ असे ब्रह्मदेवाला आग्रहाने सांगायचे आहे. (२९)
तदस्तु मे नाथ स भूरिभागो
भवेऽत्र वान्यत्र तु वा तिरश्चाम् । येनाहमेकोऽपि भवज्जनानां भूत्वा निषेवे तव पादपल्लवम् ॥ ३० ॥
म्हणोनि कृष्णा कुठल्याहि जन्मी ते भाग्य लाभो मजला असे की । तुझ्याच दासातिल दास व्हावा नी पायसेवा तव मी करीन ॥ ३० ॥
नाथ - श्रीकृष्णा - तत् - यास्तव - अत्र भवेत् - ह्या ब्रह्मजन्मामध्ये - वा - किंवा - वा तु - किंबहुना - तिरश्वाम् भवे - पश्वादि योनीमध्ये - सः भूरिभागः - ते मोठे भाग्य - मे अस्तु - मला प्राप्त होवो - येन - ज्यामुळे - अहं - मी - भवज्जनानां एक अपि भूत्वा - तुझ्या भक्तांपैकी कोणी तरी एक होऊन - तव पादपल्लवं निषेवे - तुझ्या चरणपल्लवाचे सेवन करीन ॥३०॥
म्हणून हे नाथ ! मला या जन्मामध्ये किंवा कोणत्याही पशु-पक्षी इत्यादिंच्या जन्मामध्येसुद्धा असे सौभाग्य प्राप्त होवो की मी आपल्या दासांपैकी एखादा दास होऊन आपल्या चरणकमलांची सेवा करावी. (३०)
विवरण :- इथे ब्रह्मदेव स्वतःला पूर्णपणे समर्पित करून भगवंताला शरण जातो. अगदी सामान्य पक्षाचेहि रूप घेऊन भगवंताची सेवा करण्याची त्याची इच्छा आहे. (३०)
अहोऽतिधन्या व्रजगोरमण्यः
स्तन्यामृतं पीतमतीव ते मुदा । यासां विभो वत्सतरात्मजात्मना यत्तृप्तयेऽद्यापि न चालमध्वराः ॥ ३१ ॥
मोठ्याहि यज्ञीं नच तृप्तलासी परी व्रजीं बालक वत्स होता । झडाडुनी तू स्तनपान केले त्या धन्य माता अन सार्थ जीणे ॥ ३१ ॥
अहो - अहो - व्रजगोरमण्यः अति धन्याः - गोकुळातील गाई व गोपी फारच दैवशाली - यासां स्तन्यामृतं - ज्यांच्या स्तनांतील दुग्धरूपी अमृत - वत्सतरात्मजात्मना ते - वासरे व गोपबालक ह्यांची रूपे घेणार्या तुझ्याकडून - अतीव मुदा पीतम् - मोठया आनंदाने प्याले गेले - अध्वराः - यज्ञ - अद्य अपि - अजूनही - यत्तृप्तये - ज्या तुझ्या तृप्तीसाठी - न च अलं (आसन्) - मुळीच समर्थ झाले नाहीत. ॥३१॥
हे प्रभो ! आजपर्यंत जगात केलेले मोठमोठे यज्ञ आपल्याला तृप्त करू शकले नाहीत. (म्हणूनच की काय) आपण वासरे आणि बालक होऊन व्रजातील गायी आणि गौळणींचे दूधरूप अमृत मोठ्या आवडीने प्यालात. खरेच, त्यांचे केवढे हे भाग्य ! (३१)
विवरण :- गोपींनी प्रेमाने पाजलेले गायीचे दूध यज्ञातील शास्त्रोक्त हवनापेक्षा भगवंताला अधिक आवडते. भाबडी भक्ती परमेश्वराला किती प्रिय हे इथे दिसून येते. (३१)
( अनुष्टुप् )
अहो भाग्यमहो भाग्यं नन्दगोपव्रजौकसाम् । यन्मित्रं परमानन्दं पूर्णं ब्रह्म सनातनम् ॥ ३२ ॥
( अनुष्टुप् ) नंदादि व्रजवासींचे अहो धन्यचि भाग्य ते । प्रत्यक्ष ब्रह्म तै नांदे होवोनी सोयरे सुहृद् ॥ ३२ ॥
अहो भाग्यं - केवढे हो हे भाग्य - अहो नंदगोपव्रजौकसां भाग्यं - अहो नंद, गोपाळ व गोकुळात राहणारे इतर लोक ह्यांचे केवढे भाग्य - परमानंदं - श्रेष्ठ आनंदमय - पूर्णं सनातनं ब्रह्म - पूर्ण त्रिकालाबाधित असे ब्रह्म - यन्मित्रं (अस्ति) - ज्यांचा मित्र आहे. ॥३२॥
अहो ! नंद इत्यादि व्रजवासी गोप धन्य होत. केवढे त्यांचे भाग्य ! कारण परमानंदस्वरूप सनातन पूर्ण ब्रह्म असे आपण त्यांचे संबंधी आहात. (३२)
( वसंततिलका )
एषां तु भाग्यमहिमाच्युत तावदास्ताम् । एकादशैव हि वयं बत भूरिभागाः । एतद्धृषीकचषकैरसकृत् पिबामः शर्वादयोऽङ्घ्र्युदजमध्वमृतासवं ते ॥ ३३ ॥
( वसंततिलका ) सौभाग्य याजपरि दैवत आम्हि जे की अक्राहि इंद्रियि वसोनि पितोत भक्ती । ते तृप्तती तदिच दैवत तृप्त होती तो काय भाग्य पुसणे मग त्या व्रजींचे ॥ ३३ ॥
अच्युत - हे श्रीकृष्णा - एषां तु - ह्या गोकुळवासी जनांच्या तर - भाग्यमहिमा - भाग्याचे माहात्म्य - तावत् आस्तां - क्षणभर राहो - शर्वादयः वयं एकादश एव - शंकरादि आम्ही अकरा सुद्धा - बत भूरिभागाः - खरोखर मोठेच भाग्यवान आहोत - हि - कारण - ह्रषीकचषकैः - इंद्रियरूपी भांड्यांनी - एतत् - हे - ते - तुझ्या - अङ्घ्र्युदजमध्वमृतासवं - चरणकमलांचा मकरन्द हेच कोणी मद उत्पन्न करणारे अमृत - असकृत् - वारंवार - पिबामः - पितो ॥३३॥
हे अच्युता ! या व्रजवासियांच्या भाग्याचा महिमा लांबच राहो. मन इत्यादि अकरा इंद्रियांच्या देवतांच्या रूपाने राहणारे महादेवादि आम्हीसुद्धा अतिशय भाग्यवान आहोत; कारण या व्रजवासियांच्या मन इत्यादि इंद्रियांचे पेले करून आम्ही आपल्या चरणकमलांच्या अमृतापेक्षाही गोड, मदिरेपेक्षाही मादक, मधुर अशा मकरंदाचे वारंवार पान करीत आहोत. (३३)
विवरण :- पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धि, अहंकार अशा १३ इंद्रियांचे प्रत्येकी एक असे स्वामी. (इंद्र - हात, सूर्य - डोळा, वायु - त्वचा, ब्रह्मा - हृदय इ.) ते भगवंताच्या चरणकमळातील मधाचे सेवन करून धन्य होतात. ब्रह्मदेव म्हणतात, प्रत्येक अवयवाचा एक स्वामी तुझ्या एकच गुणाचा आस्वाद घेतो. पण गोप-गोपी मात्र आपल्या सर्व शरीराचे पात्र करून तुझ्य़ा सर्व गुणांचा आस्वाद घेतात, म्हणून ते आमच्याहि पेक्षा धन्य होत. (गोकुळवासी आपल्या काया-वाचा-मनाने तुझी भक्ती करतात. म्हणून ते देवांपेक्षाहि भाग्यवान.) (३३)
तद्भूरिभाग्यमिह जन्म किमप्यटव्यां ।
यद्गोकुलेऽपि कतमाङ्घ्रिरजोऽभिषेकम् । यज्जीवितं तु निखिलं भगवान् मुकुन्दः त्वद्यापि यत्पदरजः श्रुतिमृग्यमेव ॥ ३४ ॥
व्रजी विशेष करुनी मज गोकुळात व्हावाचि जन्म म्हणिजे धुळ घेइ अंगी । तेथील प्रेमजिव त्यां जिवनोचि तू जो धुंडिति श्रुति सगळ्या धुळ ती कधीची ॥ ३४ ॥
तत् - यास्तव - इह अटव्यां - या वृंदावन नामक अरण्यात - यत् किम् अपि जन्म - जो कोणताहि जन्म मिळेल तो - भूरिभाग्यम् - मोठ्या भाग्याचा होय - गोकुले अपि - विशेषतः गोकुळातील - कतमाङ्घ्रिजोऽभिषेकं (जन्म) - कोणाच्याहि चरणाच्या धुळीचे माखण ज्यात आहे असा जन्म - निखिलं यज्जीवितं तु - ज्या गोकुळवासीयांचे सर्व जीवितच - भगवान् मुकुन्दः - भगवान श्रीकृष्ण होय - यत्पदरजः - ज्याच्या पायाची धूळ - अद्य अपि तु - अजूनसुद्धा - श्रुतिमृग्यम् एव - वेदांकडूनहि शोधिलीच जात आहे ॥३४॥
प्रभो ! या व्रजभूमीतील कोणत्याही वनामध्ये आणि विशेषेकरून गोकुळामध्ये कोणत्याही योनीमध्ये आमचा जन्म सिद्ध होवो, ती आमच्यासाठी मोठी भाग्याचीच गोष्ट ठरेल. कारण इथे जन्म झाल्यावर आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी भक्ताच्या चरणांची धूळ आमच्यावर पडेलच की, जी वेदसुद्धा अनादि कालापासून आजपर्यंत धुंडीतच आहेत. कारण या व्रजवासियांचे संपूर्ण जीवनच आपण आहात. (३४)
विवरण :- तुझे चरणरज वेदांना दिसतही नाहीत, प्राप्ती होणे तर दूरच. मात्र गोकुळवासी कृष्णमयच झाले आहेत. आपल्या निःसंग भक्तीने त्यांनी तुला आपले करून घेतले आहे. आता मला गोकुळामध्ये जन्म घेण्याची इच्छा आहे. ज्यामुळे गोकुळवासीयांची चरण रज माझ्यावर पडून मी धन्य होईन. (वास्तविक जन्म-मृत्यूच्या फेर्यातून सुटका आणि मोक्षप्राप्ती ही साधकाची अपेक्षा. पण इथे ब्रह्मदेवाला पुन्हा जन्म आणि तोही गोकुळात व्हावा ही अपेक्षा. त्यामुळे कृष्णाची चरणरज प्राप्त झाली असती. अशाच प्रकारचा उपदेश एका हिंदी कवीने केला आहे. 'मालमुलुख हरि देत है - हरिजन हरिही देत ॥ (म्हणून) हरिसे तू जनि हेत कर हरिजनसे हेत ।) (३४)
( शार्दूलविक्रीडित )
एषां घोषनिवासिनामुत भवान् किं देव रातेति नः चेतो विश्वफलात् फलं त्वदपरं कुत्राप्ययन्मुह्यति । सद्वेषादिव पूतनापि सकुला त्वामेव देवापिता यद्धामार्थसुहृत् प्रियात्मतनय प्राणाशयास्त्वत्कृते ॥ ३५ ॥
( शार्दुलविक्रीडित ) गोकूळी जन जे तयास फळ ते तू कोणते देसि जे नाही श्रेष्ठचि याहुनी म्हणवुनी चित्तासि मी मोहिलो । ते रूपो अपुले जरी पुतन ती नी राक्षसे मेळिले यांनी तो तुजला जिवोचि दिधला त्यां काय तू देशि की ॥ ३५ ॥
उत - अथवा - देव - हे श्रीकृष्णा - भवान् - तू - घोषनिवासिनाम् एषाम् - गोकुळात रहाणार्या ह्यांना - कुत्र अपि - कोठेही - विश्वफलात् त्वत् अपरं - सर्वफलरुपी तुझ्याहून दुसरे - किं फलं राता - काय फळ देणार - इति अयत् नः चेतः - अशा रीतीने विचार करीत बसणारे आमचे अंतःकरण - मुह्यति - मोह पावते - देव - हे श्रीकृष्णा - पूतना अपि - पूतनासुद्धा - सकुला - कुळासह - सद्वेषात् इव - साधूचा वेष घेतल्यामुळेच - त्त्वाम् एव आपिता - तुलाच प्राप्त झाली - यद्धामार्थसुहृत्प्रियात्मतनयप्राणाशयाः - ज्यांचे स्थान, पदार्थ, मित्र, प्रियवस्तु, आत्मा, पुत्र, प्राण व इच्छा ही - त्वत्कृते - तुझ्यासाठी ॥३५॥
हे देवा ! या व्रजवासियांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात आपण संपूर्ण फलस्वरूप अशा आपल्यापेक्षा अधिक कोणते फळ कोठून द्याल, याचा विचार करून माझे चित्त गोंधळात पडले आहे. आपण त्यांना आपले स्वरूप देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ म्हणाल, तर तेही शक्य नाही. कारण आपले स्वरूप तर त्या पूतनेनेसुद्धा भक्त असल्याचा केवळ बहाणा करून आपल्या आप्तांसह प्राप्त करून घेतले. आणि येथे तर यांनी आपले घर, धन, स्वजन, प्रिय, शरीर, पुत्र, प्राण, मन इत्यादि सर्वकाही आपल्यालाच समर्पित केले आहे. (३५)
विवरण :- तुझ्यावर आत्यंतिक प्रेम करून गोकुळवासीयांनी तुला अगदी आपले करून ठेवले आहे. तुला आपला ऋणी केले आहे. त्यातून तू कसा मुक्त होणार ? त्यांना मोक्ष देऊन त्यातून तू उतराई होऊ शकत नाहीस; कारण एक तर त्यांना मोक्षप्राप्तीची अभिलाषाही नाही आणि तुला ठार मारायला आलेल्या पूतनेसारख्या असुरांनाहि तो तू दिलास. (ब्रह्मदेवाला असेही सुचवायचे आहे की गोकुळवासीयांना तुझ्या प्रेमापुढे, सहवासापुढे योग्यांनाहि दुर्लभ असा मोक्ष फिका वाटतो, आणि अशा भक्तांच्या ऋणातच कायम रहायला तुलाहि अधिक आवडते.) (३५)
( अनुष्टुप् )
तावद् रागादयः स्तेनाः तावत् कारागृहं गृहम् । तावन्मोहोऽङ्घ्रिनिगडो यावत् कृष्ण न ते जनाः ॥ ३६ ॥
( अनुष्टुप् ) सच्चिदानंद श्यामा रे लुटिती राग द्वेष ते । बांधिती मोह पाशाने हो जीव पूर्ण तो तसा ॥ ३६ ॥
कृष्ण - हे श्रीकृष्णा - यावत् जनः ते (भक्ताः) न (भवन्ति) - जोपर्यंत लोक तुझे भक्त होत नाहीत - तावत् (एव) रागादयः स्तेनाः (भवन्ति) - तोपर्यंतच प्रेमादि विकार शत्रू होतात - तावत् (एव) गृहं कारागृहम् (भवति) - तोपर्यंतच घर हे तुरुंग होते - तावत् (एव) - तोपर्यंतच - मोहः - मोह - अङ्घ्रिनिगडः (भवति) - पायाला बंधनकारक होतो ॥३६॥
हे श्रीकृष्णा ! जोपर्यंत जीव तुमचा होत नाही, तोपर्यंत राग द्वेषादि चोर राहतात, घर तुरुंग बनते आणि मोह पायातील बेडीप्रमाणे जखडून ठेवतो. (३६)
विवरण :- जोपर्यंत मनुष्याला भौतिक गोष्टींबद्दल आकर्षण, लोभ, माया ही भावना असते, तोपर्यंतच तिच्या सुरक्षेविषयी चिंता असते. पण त्या वस्तूंबद्दलची मायाच नष्ट झाली की मग चिंता कसली ? आता केवळ परमेश्वर भक्तीची ओढ, त्याच्या प्राप्तीची इच्छा. मात्र इथे ही गोष्ट आनंददायीच ठरण्याची शक्यता. (३६)
प्रपञ्चं निष्प्रपञ्चोऽपि विडम्बयसि भूतले ।
प्रपन्नजनतानन्द सन्दोहं प्रथितुं प्रभो ॥ ३७ ॥
विश्वाच्या गुंतड्यातून सर्वथा तू अलिप्तची । अपार मोदिशी भक्तां लीलाविस्तार साधिसी ॥ ३७ ॥
प्रभो - हे श्रीकृष्णा - निष्प्रपञ्चः (त्वं) अपि - प्रपंचरहित असा तू सुद्धा - भूतले - पृथ्वीवर - प्रपन्नजनतानन्दसंदोहं प्रथितुं - शरण आलेल्या लोकांच्या मोठ्या आनंदाला वाढविण्यासाठी - प्रपञ्चं - प्रपंचाला - विडम्बयसि - अनुसरतोस ॥३७॥
हे प्रभो ! आपण प्रपंचरहित असूनसुद्धा शरणागत भक्तांना आनंद देण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेऊन प्रपंचाला अनुसरून वागता. (३७)
जानन्त एव जानन्तु किं बहूक्त्या न मे प्रभो ।
मनसो वपुषो वाचो वैभवं तव गोचरः ॥ ३८ ॥
काय बोलू बहू स्वामी महिमा कळली जयां । जाणती जाणिले त्यांनी मी तो त्यां असमर्थची ॥ ३८ ॥
प्रभो - हे श्रीकृष्णा - जानन्तः एव जानन्तु - ज्ञानी पुरुषच जाणोत - बहूक्त्या किम् - फार सांगण्याची काय गरज आहे - तव वैभवं - तुझे माहात्म्य - मे - माझ्या - मनसः वपुषः वाचः - मनाचा, शरीराचा व वाणीचा - न गोचरः (भवति) - विषय होत नाही ॥३८॥
हे प्रभो ! फार काय सांगावे ! जे लोक आपला महिमा जाणणारे असतील, ते खुशाल जाणोत. माझे मन, वाणी आणि शरीर तर आपला महिमा जाणण्यास सर्वथैव असमर्थ आहे. (३८)
अनुजानीहि मां कृष्ण सर्वं त्वं वेत्सि सर्वदृक् ।
त्वमेव जगतां नाथो जगद् एतत् तवार्पितम् ॥ ३९ ॥
सच्चिदानंद श्रीकृष्णा सर्वांचा साक्षिभूत तू । तुझ्यात स्थित हे विश्व जाण्या आज्ञा असो मला ॥ ३९ ॥
कृष्ण - हे कृष्णा - मां अनुजानीहि - मला आज्ञा दे - सर्वदृक् - सर्वत्र अवलोकन करणारा - त्वं - तू - सर्वं वेत्सि - सर्व जाणतोस - त्वम् एव - तूच - जगतां नाथः - त्रैलोक्याचा अधिपती आहेस - एतत् जगत् - हे जग - तव अर्पितम् - तुला अर्पिले आहे ॥३९॥
हे श्रीकृष्णा ! आपण सर्वांचे साक्षी आहात; आपण सर्वकाही जाणताच ! आपणच सर्व जगाचे स्वामी आहात. हे संपूर्ण विश्व आपल्यामध्येच राहिलेले आहे. आता मला अनुज्ञा द्यावी. (३९)
( वसंततिलका )
श्रीकृष्ण वृष्णिकुलपुष्करजोषदायिन् क्ष्मानिर्जरद्विजपशूदधिवृद्धिकारिन् । उद्धर्मशार्वरहर क्षितिराक्षसध्रुग् आकल्पमार्कमर्हन् भगवन् नमस्ते ॥ ४० ॥
( वसंततिलका ) प्राणा मनास वशिसी वचने नि रूपे तू सूर्य ते यदुकुलोत्पल फुल्लवाया । देवा द्विजो नि पशुचा अभिचंद्र तूची पाखंड घोर तम त्यासि शशी नि सूर्य । सर्वांसि वंद्य हरि तू वधितोसि दैत्या कल्पो नि कल्प तुजला मम हा प्रणाम ॥ ४० ॥
वृष्णिकुलपुष्करजोषदायिन् - यादवकुलरूपी कमळाला पुष्टि देणार्या - क्ष्मानिर्जरद्विजपशूदधिवृद्धिकारिन् - पृथ्वी, देव, ब्राह्मण, पशु हाच कोणी समुद्र त्याला भरती आणणार्या - उद्धर्मशार्वरहर - धर्मबाह्य वर्तन करणारे जे पाखंडी लोक तोच कोणी अंधकार त्याला दूर करणार्या - क्षितिराक्षसध्रुक् - पृथ्वीवरील राक्षसांशी द्रोह करणार्या - अर्कं अर्हन् - सूर्यापासून सर्वांना पूज्य अशा - भगवन् श्रीकृष्ण - हे षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्णा - ते आकल्पं नमः - तुला कल्पांतापर्यंत नमस्कार असो. ॥४०॥
हे भगवन श्रीकृष्ण ! आपण यदुवंशरूपी कमळाला विकसित करणारे सूर्य आहात. तसेच पृथ्वी, देव, ब्राह्मण आणि पशुरूप समुद्राची अभिवृद्धी करणारे चंद्र आहात. आपण पाखंडी लोकांचा धर्मरूप अंधकार नष्ट करणारे आहात. पृथ्वीवर राहणार्या राक्षसांना नष्ट करणारे आपण सूर्यादिकांनासुद्धा पूजनीय आहात. भगवन ! माझे कल्पांतापर्यंत आपल्याला नमस्कार असोत. (४०)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इत्यभिष्टूय भूमानं त्रिः परिक्रम्य पादयोः । नत्वाभीष्टं जगद्धाता स्वधाम प्रत्यपद्यत ॥ ४१ ॥
( अनुष्टुप ) श्रीशुकदेव सांगतात - विधाता स्तुति गावोनी करोनी त्या परीक्रमा । वंदुनी कृष्णपायाते गेला तो सत्यलोकि ही ॥ ४१ ॥
जगद्धाता - जगाला उत्पन्न करणारा ब्रह्मदेव - इति भूमानं अभिष्टूय - याप्रमाणे सर्वव्यापी श्रीकृष्णाची स्तुती करून - त्रिः परिक्रम्य - तीन प्रदक्षिणा घालून - पादयोः नत्वा - पाया पडून - अभीष्टं स्वधाम - इष्ट अशा स्वतःच्या स्थानाला - प्रत्यपद्यत - प्राप्त झाला. ॥४१॥
श्रीशुकदेव म्हणतात - जग निर्माण करणार्या ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली. यानंतर तीन वेळा प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना प्रणाम केला आणि नंतर ते आपल्या इष्ट स्थानी गेले. (४१)
ततोऽनुज्ञाप्य भगवान् स्वभुवं प्रागवस्थितान् ।
वत्सान् पुलिनमानिन्ये यथापूर्वसखं स्वकम् ॥ ४२ ॥
आधीच ब्रह्मजी यांनी पोचिले गोप वत्स ते । कृष्णो ब्रह्म्या निरोपोनी पातला पुळणीत त्या ॥ ४२ ॥
ततः - नंतर - भगवान् - श्रीकृष्ण - स्वभुवं अनुज्ञाप्य - ब्रह्मदेवाला अनुज्ञा देऊन - प्रागवस्थितान् वत्सान् - पूर्वीप्रमाणे राहिलेल्या वासरांना - यथापूर्वसखं स्वकं पुलिनं - पूर्वीप्रमाणे सर्व मित्र आहेत ज्यात अशा स्वतःच्या वाळवंटावर - आनिन्ये - आणिता झाला. ॥४२॥
भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना निरोप दिला आणि पूर्वीच्या जागी असलेल्या वासरांना घेऊन ते जिथे त्यांनी आपल्या मित्रांना सोडले होते, त्या आपल्या वाळवंटात आले. (४२)
एकस्मिन्नपि यातेऽब्दे प्राणेशं चान्तराऽऽत्मनः ।
कृष्णमायाहता राजन् क्षणार्धं मेनिरेऽर्भकाः ॥ ४३ ॥
परीक्षित् वर्ष ते गेले प्राणवल्लभ सोडुनी । परी क्षण तया वाटे माया श्रीहरिची अशी ॥ ४३ ॥
राजन् - हे राजा - कृष्णमायाहताः अर्भकाः - श्रीकृष्णाच्या मायेने मोहित झालेले गोपबालक - आत्मनः प्राणेशं अन्तरा - आपल्या प्राणांचा अधिपति श्रीकृष्ण जवळ नसताना - एकस्मिन् अब्दे याते अपि - एक वर्ष गेले असताहि - क्षणार्धं मेनिरे - अर्धा क्षण मानिते झाले. ॥४३॥
परीक्षिता ! आपले जीवनसर्वस्व असणार्या श्रीकृष्णांच्या वियोगामध्ये जरी एक वर्ष निघून गेले होते, तरीसुद्धा त्या मुलांना ती वेळ अर्ध्या क्षणासारखीच वाटली. कारण ते भगवंतांच्या मायेने मोहित झाले होते ना ! (४३)
विवरण :- मायेने मोहित झालेल्या गोपबालकांना तर पूर्वीचे सर्व विस्मरण झाले. एक वर्षाचा कालावधी जणू त्यांच्या आयुष्यातून नाहीसा झाला. पुसून गेला. अर्थात मायेचा मोह पडला की ही अवस्था येतेच. मग तो कोणीही असो. अगदी ब्रह्मदेवही ! (४३)
किं किं न विस्मरन्तीह मायामोहितचेतसः ।
यन्मोहितं जगत्सर्वं अभीक्ष्णं विस्मृतात्मकम् ॥ ४४ ॥
आचार्य वदती शास्त्रे परी जीवास तो भ्रम । माया श्रीहरीची मोठी कोणाला भ्रम ना पडे ? ॥ ४४ ॥
इह - ह्या लोकी - मायामोहितचेतसः - मायेने मोहिली आहेत अंतःकरणे ज्यांची असे लोक - किं किं न विस्मरन्ति - काय काय विसरत नाहीत - यन्मोहितं सर्वं जगत् - ज्याच्या मायेने मोहित झालेले सर्व जग - अभीक्ष्णं विस्मृतात्मकं - वारंवार स्वतःला विसरून जाण्याच्या स्वभावाचे आहे. ॥४४॥
जगातील सर्व जीव त्याच मायेने मोहित झाल्यामुळेच वारंवार आपल्याच आत्म्याला विसरतात. मायेने चित्त मोहित झालेले जीव येथे काय काय म्हणून विसरत नाहीत बरे ! (४४)
ऊचुश्च सुहृदः कृष्णं स्वागतं तेऽतिरंहसा ।
नैकोऽप्यभोजि कवल एहीतः साधु भुज्यताम् ॥ ४५ ॥
कृष्णाला पाहता सर्व वदले बंधु ये असा । आम्ही ना घेतला घास आनंदे जेव येथ तू ॥ ४५ ॥
सुहृदः - मित्र - कृष्णं ऊचुः - कृष्णाला म्हणाले - अतिरंहसा ते स्वागतं - फारच वेगाने तुझे येणे झाले - (अस्माभिः) एकः अपि कवलः न अभोजि - आम्ही एकही घास खाल्ला नाही - एहि - ये - इतः साधु भुज्यताम् - येथे आपण चांगले भोजन करूया. ॥४५॥
श्रीकृष्णांना पाहताच अतिशय उतावळेपणाने ते मित्र म्हणाले - "बंधो ! ये. तुझे स्वागत असो ! आम्ही तुझ्याशिवाय एक घाससुद्धा खाल्ला नाही. आता आनंदाने जेवू या." (४५)
ततो हसन् हृषीकेशोऽभ्यवहृत्य सहार्भकैः ।
दर्शयंश्चर्माजगरं न्यवर्तत वनाद् व्रजम् ॥ ४६ ॥
हासता बाळ गोपाळीं कृष्णाने भोज घेतले । ते अघासुर सांगाडा पाहता व्रजिं पातले ॥ ४६ ॥
ततः - नंतर - हृषीकेशः - श्रीकृष्ण - हसन् - हसून - अर्भकैः सह अभ्यवहृत्य - मुलांसह भोजन करून - आजगरं चर्म दर्शयन् - अजगराचे कातडे दाखवीत - वनात् व्रजं न्यवर्तत - अरण्यातून गोकुळाकडे परत फिरला. ॥४६॥
तेव्हा हसत हसत भगवंतांनी त्या मुलांबरोबर जेवण केले आणि त्यांना अजगराचे कातडे दाखवून ते वनातून व्रजाकडे परत आले. (४६)
( वसंततिलका )
बर्हप्रसून नवधातुविचित्रिताङ्गः प्रोद्दामवेणुदलशृङ्गरवोत्सवाढ्यः । वत्सान् गृणन्ननुगगीत पवित्रकीर्तिः गोपीदृगुत्सवदृशिः प्रविवेश गोष्ठम् ॥ ४७ ॥
( वसंततिलका ) ते मोरपीस हरिच्या मुकुटास होते केसात पुष्प अतिवो रुळतीच छान । त्या श्यामदेहि हरिच्या बहु चित्ररेखा बासूरि पर्ण अन् शिंगि तशीच फुंकी । पाठीसि बाळ सगळे हरि कीर्ति गाती वत्सास हाक कुणि त्या कुरवाळतात । गोपी द्वयास बघता हरि मुग्ध झाल्या गोठ्यात कृष्ण मग तो अपुल्याहि आला ॥ ४७ ॥
बर्हप्रसूननवधातुविचित्रिताङगः - मोरांची पिसे, फुले, ताजे खनिज रंग ह्यांनी चित्रविचित्र दिसणारे आहे शरीर ज्याचे असा - प्रोद्दामवेणुदलशृङगरवोत्सवाढयः - मोठा शब्द करणार्या वेताच्या काठया, शिंगे ह्यांच्या ध्वनीमुळे आनंदाने भरून गेलेला - अनुगगीत पवित्रकीर्तिः - अनुचरांनी गायिली आहे पवित्र कीर्ति ज्याची असा - गोपीदृगुत्सवदृशिः - गोपींच्या नेत्रांना आनंद देणारी आहे दृष्टी ज्यांची असा - श्रीकृष्णः - श्रीकृष्ण - वत्सान् गृणन् - वासरांना घेऊन - गोष्ठं प्रविवेश - गोकुळात शिरला. ॥४७॥
श्रीकृष्णांच्या मस्तकावर मोरपिसांचा मुगुट असून गळ्यात फुलांच्या माळा होत्या. रंगीत धातूंनी शरीरावर चित्रे काढली होती. ते उच्च स्वराने बासरी, पाने आणि शिंगे वाजवत आनंदोत्सव साजरा करीत होते. गोपाळ त्यांच्या पाठोपाठ चालत त्यांची लोकपावन कीर्ति गात होते. मधून मधून वासरांना हाकारीत त्यांनी व्रजात प्रवेश केला. त्यांना पाहताच गोपींच्या डोळ्यांत आनंद मावेना. (४७)
( अनुष्टुप् )
अद्यानेन महाव्यालो यशोदानन्दसूनुना । हतोऽविता वयं चास्माद् इति बाला व्रजे जगुः ॥ ४८ ॥
( अनुष्टुप् ) व्रजात पातता बाळे मातांना वदु लागले । अज्गरा मारिले कृष्णे आम्हाला रक्षिले असे ॥ ४८ ॥
अद्य - आज - अनेन यशोदानंदसूनुना - हा यशोदेला आनंद देणारा पुत्र जो श्रीकृष्ण त्याने - महाव्यालः हतः - मोठा अजगर मारिला - च वयं अस्मात् अविताः - आणि आम्हाला त्यापासून वाचविले - इति बालाः व्रजे जगुः - असे गोपबालक गोकुळात सांगते झाले. ॥४८॥
त्याच दिवशी मुलांनी व्रजामध्ये जाऊन सांगितले की, "आज या यशोदा-नंद-नंदनाने भयंकर मोठा अजगर मारून त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवले." (४८)
श्रीराजोवाच -
ब्रह्मन् परोद्भवे कृष्णे इयान्प्रेमा कथं भवेत् । योऽभूतपूर्वस्तोकेषु स्वोद्भवेष्वपि कथ्यताम् ॥ ४९ ॥
राजा परीक्षिताने विचारले - दुसर्या कुळिचा कृष्ण असोनी प्रेम एवढे । करिती गोप गोपी त्यां सांगा कारण काय ते ॥ ४९ ॥
ब्रह्मन् - हे मुने - परोद्भवे कृष्णे - दुसर्यापासून झालेल्या कृष्णाच्या ठिकाणी - गोपीनां - गोपींचे - इयान् प्रेमा - एवढे प्रेम - कथं भवेत् - कसे जडले - यः - जे - स्वोद्भवेषु अपि तोकेषु - आपल्या स्वतःच्याही मुलांवर - अभूतपूर्वः - पूर्वी कधी नव्हते - तत् कथ्यतां - ते सांगा. ॥४९॥
परीक्षित म्हणाला - ब्रह्मन् ! श्रीकृष्ण स्वतःचा पुत्र नसून इतर गोपगोपींचे त्याच्यावर इतके र्पेम कसे होते ? इतके प्रेम तर त्यांचे स्वतःच्या मुलांवरही नव्हते. याचे कारण काय, ते सांगावे. (४९)
श्रीशुक उवाच -
सर्वेषामपि भूतानां नृप स्वात्मैव वल्लभः । इतरेऽपत्यवित्ताद्याः तद्वल्लभतयैव हि ॥ ५० ॥
श्रीशुकदेव म्हणतात - जगीच्या सर्व जीवांना आत्मा तो आवडे बहू । पुत्र धन ययाहूनी आत्मा तो आवडे बहू ॥ ५० ॥
नृप - हे राजा - सर्वेषां अपि भूतानाम् - सर्वच प्राण्यांना - स्वात्मा एव वल्लभः (अस्ति) - आपला आत्माच प्रिय असतो - तद्वल्लभतया एव - त्या आत्म्याच्या आवडीमुळेच - अपत्यवित्ताद्याः इतरे - पुत्र, द्रव्य इत्यादि दुसर्या गोष्टी - हि (प्रियाः भवन्ति) - खरोखर प्रिय होतात. ॥५०॥
श्रीशुकदेव म्हणतात - राजन ! जगातील सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात. पुत्र, धन, इत्यादिंवर जे प्रेम असते, ते त्या वस्तू आत्म्याला प्रिय वाटतात म्हणून. (५०)
विवरण :- ५० - आपल्या स्वतःच्या मुलांपेक्षाहि गोकुळवासीयांना कृष्णाबद्दल इतके प्रेम का ? परीक्षिताच्या या प्रश्नाचे शुकाचार्य उत्तर देतात - स्वतःच्या देहापेक्षा त्यातील आत्म्यावरच मनुष्याचे प्रेम असते. त्याच्या प्राप्तीचे सुखप्राप्तीचे साधन म्हणून कुटुंबावर मनुष्याचे प्रेम असते. बृहदारण्यकमध्ये याज्ञवल्क्य ऋषी आपली पत्नी मैत्रेयीला असेच सांगतात, 'न वा अरे जायायै कामायै जाया प्रिया भवति । आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति ॥' प्रत्येक जीवात्म्यामध्ये श्रीकृष्णाचे अस्तित्व असते. ते वेगवेगळे दिसतात, परंतु आत्मा सर्वांमध्ये एकच असतो. अशा आत्म्यांचाहि आत्मा म्हणजे श्रीकृष्ण. म्हणून त्यावर अधिक प्रेम. (५०)
तद् राजेन्द्र यथा स्नेहः स्वस्वकात्मनि देहिनाम् ।
न तथा ममतालम्बि पुत्रवित्तगृहादिषु ॥ ५१ ॥
जेवढा आवडे प्राण प्राण्यांना रे परीक्षिता । तेवढे ते धन पुत्र प्रीय ना असती तया ॥ ५१ ॥
राजेंद्र - हे परीक्षित राजा - यथा - ज्याप्रमाणे - देहिनाम् - प्राण्यांचे - स्वस्वकात्मनि - आपापल्या शरीरावर - स्नेहः (अस्ति) - प्रेम असते - तथा तत् - तसे ते - ममतालम्बिपुत्रवित्तगृहादिषु न - आपलेपणावर अवलंबून राहणार्या पुत्र, द्रव्य, गृह इत्यादिकांच्या ठिकाणी नसते. ॥५१॥
हे राजेंद्रा ! म्हणूनच सर्व प्राण्यांचे आपल्या आत्म्यावर जितके प्रेम असते, तितके आपले म्हटल्या जाणार्या पुत्र, धन, घर इत्यादिंवरही असत नाही. (५१)
देहात्मवादिनां पुंसां अपि राजन्यसत्तम ।
यथा देहः प्रियतमः तथा न ह्यनु ये च तम् ॥ ५२ ॥
नृपेंद्रा देह हा आत्मा मानिती तेहि ते तसे । देहाच्याहुनि त्या पुत्रां धनाला प्रेम नार्पिती ॥ ५२ ॥
राजन्यसत्तम - हे क्षत्रियश्रेष्ठा राजा - देहात्मवादिनां पुंसां अपि - देह हाच आत्मा असे म्हणणार्या पुरुषांना सुद्धा - देहः - देह - यथा प्रियतमः - जसा अधिक प्रिय वाटतो - तथा - तसा - तम् अनु ये (भवन्ति) - देहाच्या मागाहून जे होतात - (तेषां) पुत्रादिनां नहि - त्यांना पुत्रादिकांविषयी वाटत नाही. ॥५२॥
हे नृपश्रेष्ठा ! जे लोक देहालाच आत्मा मानतात, ते सुद्धा आपल्या शरीरावर जेवढे प्रेम करतात, तेवढे शरीराशी संबंधित असणार्यांवर करीत नाहीत. (५२)
देहोऽपि ममताभाक् चेत् तर्ह्यसौ नात्मवत् प्रियः ।
यज्जीर्यत्यपि देहेऽस्मिन् जीविताशा बलीयसी ॥ ५३ ॥
विचारे कळते तेंव्हा शरीर मी न तो असे । माझे शरीर ते आहे तेंव्हा न प्रेम तो धरी । म्हणोनी जगतो जीर्ण शरीर जाहले तरी ॥ ५३ ॥
असौ देहः अपि - हा देह सुद्धा - ममताभाक् चेत् - जरी आपलेपणाचा भागीदार असला - तर्हि - तरी - आत्मवत्प्रियः न - आत्म्याइतका प्रिय नाही - यत् - कारण - अस्मिन् देहे जीर्यति अपि - हा देह जीर्ण होत असताहि - जीविताशा बलीयसी - जगण्याची आशा फारच बलवान असते. ॥५३॥
जेव्हा विचारांती असे समजते की, "हे शरीर म्हणजे मी नाही, हे शरीर माझे आहे" तेव्हा या शरीरावरसुद्धा आत्म्याइतके प्रेम राहात नाही. म्हणूनच तर देह आसन्नमरण झाल्यावरसुद्धा जगण्याची आशा प्रबळ असतेच. (तात्पर्य, देह जाणार, हे निश्चित झाल्यावरही तो राहावा, असे वाटते ते आत्म्यासाठीच.) (५३)
तस्मात् प्रियतमः स्वात्मा सर्वेषामपि देहिनाम् ।
तदर्थमेव सकलं जगद् एतत् चराचरम् ॥ ५४ ॥
येणे ते सिद्ध होते की सर्व प्राण्यास प्राण तो । प्रीय तो जगती सार्या प्रेम तो लवितो तया ॥ ५४ ॥
तस्मात् - म्हणून - सर्वेषाम् अपि देहिनाम् स्वात्मा - सर्वही प्राण्यांना आपापला आत्मा - प्रियतमः - फारच प्रिय असतो - एतत् - हे - चराचरं सकलं जगत् - स्थावरजंगमात्मक सर्व जग - तदर्थम् एव - त्या आत्म्यासाठीच होय. ॥५४॥
यवरून हे सिद्ध होते की, सर्व प्राणी आपल्या आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात आणि त्याच्यासाठीच या सर्व चराचर जगावरसुद्धा प्रेम करतात. (५४)
कृष्णमेनमवेहि त्वं आत्मानं अखिलात्मनाम् ।
जगद्धिताय सोऽप्यत्र देहीवाभाति मायया ॥ ५५ ॥
प्राणाचा प्राण हा कृष्ण समजा तुम्हि हे असे । जगकल्याण साधाया मायेने देह धारितो ॥ ५५ ॥
सः अपि - तो श्रीकृष्ण सुद्धा - अत्र - ह्या लोकी - जगद्धिताय - जगाच्या कल्याणाकरिता - मायया - मायेने - देही इव आभाति - देह धारण केल्यासारखा भासतो - एनं कृष्णं - त्या श्रीकृष्णाला - अखिलात्मनां आत्मानं - सर्वांच्या आत्म्यांचा आत्मा - (इति) त्वं अवेहि - असे तू जाण. ॥५५॥
या श्रीकृष्णांनाच तू सर्व आत्म्यांचा आत्मा समज. जगाच्या कल्याणासाठीच मायेचा आश्रय घेऊन ते येथे देह धारण करणार्यासारखे वाटतात. (५५)
वस्तुतो जानतामत्र कृष्णं स्थास्नु चरिष्णु च ।
भगवद् रूपमखिलं नान्यद् वस्त्विह किञ्चन ॥ ५६ ॥
जयाला कळले रूप चराचर पदार्थ ते । ब्रह्म नारायणो कृष्ण तयांना जाहले पहा ॥ ५६ ॥
अत्र - ह्या लोकी - वस्तुतः - वास्तविकरीतीने - कृष्णं - श्रीकृष्णाला - स्थास्नु चरिष्णु च अखिलं - स्थावर व जंगम सर्व असे - भगवद्रूपं - भगवत्स्वरूप असे - जानतां - जाणणार्या - तेषां इह अन्यत् किंचन वस्तु न - त्यांना ह्या लोकी दुसरी काहीही वस्तु नसते. ॥५६॥
जे लोक श्रीकृष्णांचे खरे स्वरूप जाणतात, त्यांच्या दृष्टीने या जगामध्ये जे चराचर पदार्थ आहेत, ते सर्व श्रीकृष्णस्वरूपच आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नाही. (५६)
सर्वेषामपि वस्तूनां भावार्थो भवति स्थितः ।
तस्यापि भगवान्कृष्णः किं अतद्वस्तु रूप्यताम् ॥ ५७ ॥
अंतीम रूप सार्याचे कारणी स्थित राहते । कृष्णाच्या वीण ते कांही सांगा काय जगी असे ॥ ५७ ॥
सर्वेषाम् अपि वस्तूनां - सर्वही वस्तूंचा - भावार्थः - परमार्थ - स्थितः - कारणरूपी - भवति - असतो - तस्य अपि (भावार्थः) - त्या कारणाचेही परम कारण - भगवान् कृष्णः (अस्ति) - भगवान श्रीकृष्ण होय - अतद्वस्तु किम् - कृष्ण नाही अशी वस्तु कोणती - (तत्) रूप्यताम् - ते सांग. ॥५७॥
सर्व वस्तू आपल्या कारणातच राहात असतात. त्या कारणाचे सुद्धा परम कारण भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आता सांग, कोणत्या वस्तूला श्रीकृष्णांपेक्षा वेगळी म्हणावे ? (५७)
( मिश्र )
समाश्रिता ये पदपल्लवप्लवं महत्पदं पुण्ययशो मुरारेः । भवाम्बुधिर्वत्सपदं परं पदं पदं पदं यद् विपदां न तेषाम् ॥ ५८ ॥
( इंद्रवज्रा ) पुण्यो मुरारी पदपत्र नौका ज्या लाभलीं त्यां भव भेय नाही । त्यांना मिळाले पद थोर जाणा न दुःख त्यांना भवि राहुनीया ॥ ५८ ॥
ये - जे - मुरारेः - श्रीकृष्णाच्या - पुण्ययशः महत्पदं पदपल्लवप्लवं - पवित्र आहे कीर्ति ज्याची अशा मोठे स्थान देणार्या चरणपल्लवरूपी नौकेचा - समाश्रिताः - आश्रय करितात - तेषां - त्यांना - भवाम्बुधिः - संसारसमुद्र - वत्सपदं (भवति) - वासरांच्या पायाने केलेल्या डबक्याप्रमाणे असतो - (तेषां) परं पदं (भवति) - त्यांना श्रेष्ठ पदाची प्राप्ती होते - यत् पदं - जे स्थान - विपदां पदं न (अस्ति) - विपत्तीचे स्थान नव्हे. ॥५८॥
सत्पुरुषांचे सर्वस्व असणार्या पुण्यकीर्ति मुरारींच्या पदपल्लवरूपी नौकेचा ज्यांनी आश्रय घेतला, त्यांच्या दृष्टीने हा भवसागर, वासराच्या खुराने पडलेल्या खड्ड्यातील पाण्याएवढाच आहे. त्यांना परमपदाची प्राप्ती खात्रीने होते आणि संकटांचे निवासस्थान अशा या संसारात यावे लागत नाही. (५८)
( अनुष्टुप् )
एतत्ते सर्वमाख्यातं यत् पृष्टोऽहमिह त्वया । यत् कौमारे हरिकृतं पौगण्डे परिकीर्तितम् ॥ ५९ ॥
( अनुष्टुप् ) पाचव्या वर्षिची लीला सहाव्या वर्षि ते कसे । मातांना सांगती बाळे वदलो सर्व हे असे ॥ ५९ ॥
इह - येथे - त्वया - तुझ्याकडून - यत् - जे - अहं - मी - पृष्टः - विचारला गेलो - (तत्) एतत् - ते हे - यत् - जे - कौमारे - कुमारावस्थेत - हरिकृतं - श्रीकृष्णाने केले - तत् (गोपबालकैः) पौगण्डे परिकीर्तितम् - ते गोपबालकांनी त्याच्या पौगंडावस्थेत सांगितले. ॥५९॥
तू मला विचारले होतेस की, भगवंतांनी पाचव्या वर्षी केलेली लीला, बालगोपालांनी सहाव्या वर्षी कशी सांगितली ? त्याचे हे सर्व रहस्य मी तुला सांगितले. (५९)
( मिश्र )
एतत्सुहृद्भिश्चरितं मुरारेः अघार्दनं शाद्वलजेमनं च । व्यक्तेतरद् रूपमजोर्वभिष्टवं शृण्वन् गृणन्नेति नरोऽखिलार्थान् ॥ ६० ॥
( इंद्रवज्रा ) गोपाळ बाळे अन कृष्ण क्रीडा अघासुरो मृत्यु नि भोजनाते । अप्राकृतो वत्स नि ब्रह्मस्तोत्र ऐके तया लाभति पूरुषार्थ ॥ ६० ॥
एतत् - हे - सुहृद्भिः - मित्रांसह - चरितं - अनुष्ठिलेले - मुरारेः - श्रीकृष्णाचे - अघार्दनं - अघासुरमर्दन - च शाद्वलजेमनं - व हिरव्या गवतावरील भोजन - व्यक्तेतरत् रूपं - अव्यक्त रूप - अजोर्वभीष्टवं - ब्रह्मदेवाने केलेली मोठी स्तुति - श्रृण्वन् - ऐकणारा - गृणन् (वा) नरः - किंवा गाणारा मनुष्य - अखिलार्थान् एति - सर्व पुरुषार्थांना प्राप्त होतो. ॥६०॥
भगवान श्रीकृष्णांनी बाल-गोपालांबरोबर केलेला वनविहार, अघासुराचा वध, हिरवळीवरचे जेवण, वासरे व गोपालांचे अलौकिक चिद्विलासरूप आणि ब्रह्मदेवांनी केलेली ही श्रेष्ठ स्तुती - हे सर्व जो मनुष्य ऐकतो आणि कथन करतो, त्याला सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते. (६०)
( अनुष्टुप् )
एवं विहारैः कौमारैः कौमारं जहतुर्व्रजे । निलायनैः सेतुबन्धैः मर्कटोत्प्लवनादिभिः ॥ ६१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( अनुष्टुप् ) परीक्षित् ! बळि श्रीकृष्णे नेत्रपल्लव खेळ ते । माकडा सम त्या लीला व्रजींच त्यागिल्या पहा ॥ ६१ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
एवं - याप्रमाणे - व्रजे - गोकुळात - निलायनैः सेतुबन्धैः - लपंडावांनी, पूल बांधण्यांनी - (च) मर्कटोत्प्लवनादिभिः कौमारैः क्रीडाभिः - आणि माकडासारख्या उडया इत्यादि बालपणास योग्य अशा खेळांनी - (रामकृष्णौ) कौमारम् जहतुः - बलराम व श्रीकृष्ण बालवय घालविते झाले. ॥६१॥
अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी कुमार अवस्थेला अनुरूप असे लपंडाव, सेतुबंधन, वानरांप्रमाणे उढ्या मारणे इत्यादि अनेक खेळ खेळत आपली कुमार अवस्था व्रजामध्येच संपविली. (६१)
अध्याय चवदावा समाप्त |