श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
त्रयोदशोऽध्यायः

सबालवत्सवृन्दे ब्रह्मणापहृते श्रीकृष्णस्य
तत्तद्‌रूपेणाब्दं यथापूर्वं विहरणं ब्रह्मणो मोहभंगश्च -

ब्रह्मदेवांचा मोह आणि त्याचा निरास -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


( अनुष्टुप् )
श्रीशुक उवाच -
साधु पृष्टं महाभाग त्वया भागवतोत्तम ।
यन्नूतनयसीशस्य श्रृण्वन्नपि कथां मुहुः ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव म्हणतात -
भाग्यवंत तुम्ही राजे ! भक्तां माजी शिरोमणी ।
ऐकता पुसता प्रेमे नवीन रस आणिता ॥ १ ॥

महाभाग - हे भाग्यवंता - भागवतोत्तम - भक्तांमध्ये श्रेष्ठ अशा परीक्षित राजा - त्वया साधु पृष्टं - तू फार चांगले विचारिलेस - यत् - कारण - मुहुः - वारंवार - ईशस्य कथां शृण्वन् अपि - श्रीकृष्णाची कथा ऐकत असताहि - (तां) नूतनयसि - तू ती नव्यासारखा करितोस ॥१॥

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! तू फार भाग्यवान आहेत. भगवंतांच्या भक्तांमध्ये तुझे स्थान श्रेष्ठ आहे. म्हणून तर तू इतका सुंदर प्रश्न विचारलास. तुला वारंवार भगवंतांच्या कथा ऐकावयास मिळतातच. तरीसुद्धा तू त्यांच्यासंबंधी प्रश्न विचारून त्यांत आणखी नाविन्य आणतोस. (१)

विवरण :- कृष्णाने अघासुराला पाचव्या वर्षी मारले, म्हणजे ती कौ‌मारावस्था; मग तिला पौगंडावस्था का म्हटले ? हा परीक्षिताचा प्रश्न. यावर शुक म्हणतात, तू प्रश्न विचारतोस हे उत्तम, यावरून तुझी कृष्णकथा श्रवणाबद्दलची उत्सुकता आणि आवड दिसून येते. (श्रोता भवति वा न वा ।) ही कथा जितक्या वेळा ऐकतोस तितक्या वेळी तिचे नवे नवे रूप तुझ्या प्रत्ययास येते, हा त्या कृष्णकथेचा महिमा आहे; (क्षणे क्षणे यन्नवतांम् उपेति, तदेव रूपं रमणीयतायाः ।) आणि तुझ्यासारखा श्रोता मिळाला, हे ही उत्तमच आणि प्रशंसनीय आहे. (१)



( मिश्र )
सतामयं सारभृतां निसर्गो
     यदर्थवाणी श्रुतिचेतसामपि ।
प्रतिक्षणं नव्यवदच्युतस्य यत्
     स्त्रिया विटानामिव साधु वार्ता ॥ २ ॥
( इंद्रवज्रा )
ती संतवाणी हृदयो नि कर्ण
     गाण्यास लीला अन त्या स्मराया ।
ऐकावयाला नित तत्परो की
     जै लंपटाला विषयात हर्ष ॥ २ ॥

यदर्थवाणी श्रुतिचेतसाम् - परमेश्वराप्रीत्यर्थ लाविलेली आहेत वाणी, कान व मन ज्यांनी अशा - सारभृतां - सार घेणार्‍या - सताम् - साधूंचा - अपि - सुध्दा - अयं निसर्गः - हा स्वभाव - यत् - की - विटानां स्त्रियाः (वार्ताः) इव - जारांना स्त्रियांच्या गोष्टीप्रमाणे - अच्युतस्य वार्ता - भगवंताची कथा - प्रतिक्षणं - क्षणोक्षणी - नव्यवत् साधु (भवति) - नव्या प्रमाणे चांगली वाटते ॥२॥

जीवनाचे सार जाणणार्‍या संतांची वाणी, कान आणि हृदय भगवंतांच्या लीलेची गान, श्रवण आणि चिंतन करीत असते. त्यांचा हा स्वभावच असतो की, त्यांना प्रतिक्षणी भगवंतांच्या अपूर्व लीला नव्याप्रमाणे वाटतात. ज्याप्रमाणे स्त्रीलंपट पुरुषांना स्त्रियांसंबंधीच्या गोष्टी आवडतात. (२)


( अनुष्टुप् )
श्रृणुष्वावहितो राजन् अपि गुह्यं वदामि ते ।
ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत ॥ ३ ॥
( अनुष्टुप् )
रहस्यमयि या लीला तरी लक्षूनि ऐकणे ।
दयाळू गुरु तो शिष्या गुप्तज्ञानहि बोधिती ॥ ३ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - गुह्यम् अपि - गुप्त आहे तरीसुद्धा - ते वदामि - तुला सांगतो - अवहितः (भूत्वा) शृणुष्व - शांतपणाने ऐक - उत - कारण - गुरवः - गुरु - स्निग्धस्य शिष्यस्य - प्रिय अशा शिष्याला - गुह्यम् अपि ब्रूयुः - गुप्त असले तरी सांगतात ॥३॥

राजा ! तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. भगवंतांची ही लीला रहस्यमय असूनसुद्धा मी तुला ती ऐकवितो; कारण गुरुजन प्रिय शिष्याला गुप्त गोष्टीसुद्धा सांगत असतात. (३)


तथा अघवदनान्मृत्यो रक्षित्वा वत्सपालकान् ।
सरित्पुलिनमानीय भगवान् इदमब्रवीत् ॥ ४ ॥
मृत्यू अघासुरातून कृष्णाने बाळ रक्षिले ।
आणिले वाळवंटी नी वदले कृष्ण त्याजला ॥ ४ ॥

तथा - त्याप्रमाणे - भगवान् - श्रीकृष्ण - मृत्योः अघवदनात् - अघासुराच्या मुखातून - वत्सपालकान् रक्षित्वा - वासरे राखणार्‍या गवळ्यांचे रक्षण करून - सरित्पुलिनम् आनीय - यमुनानदीच्या वाळवंटात आणून - इदम् अब्रवीत् - असे म्हणाला ॥४॥

भगवान श्रीकृष्णांनी वासरांना व मुलांचा मृत्यूरूप अघासुराच्या जबड्यातून वाचविले आणि त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून ते म्हणाले. (४)


( वंशस्था )
अहोऽतिरम्यं पुलिनं वयस्याः
     स्वकेलिसम्पन् मृदुलाच्छबालुकम् ।
स्फुटत्सरोगन्ध हृतालिपत्रिक
     ध्वनिप्रतिध्वानलसद् द्रुमाकुलम् ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा )
पहा प्रियांनो अति रम्य वाळू
     खेळावया सर्वचि युक्त आहे ।
पहा जळाशी कमळे फुलोनी
     पक्षीही गाती तरु शोभले हे ॥ ५ ॥

अहो वयस्याः - अहो मित्र हो - स्वकेलिसंपत् - आपल्या खेळाचे वैभव असे - मृदुलाच्छवालुकम् - मऊ व स्वच्छ आहे वाळू ज्यात असे - स्फुटत्सरो (ज) गन्धहृतालिपत्रक - फुलणार्‍या कमळांच्या सुगंधाने ओढून आणिलेल्या - ध्वनिप्रतिध्वानलसत् - भ्रमरांच्या व पक्ष्यांच्या शब्दांच्या ध्वनीने शोभणारे - द्रुमाकुलम् - वृक्षांनी गजबजलेले - पुलिनं - वाळवंट - अतिरम्यं - फार रमणीय आहे ॥५॥

मित्रांनो ! यमुनेचे हे वाळवंट अत्यंत रमणीय आहे. पहा ना ! इथली वाळू मऊ आणि स्वच्छ आहे. आम्हांला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री येथे विद्यमान आहे. पहा ! एकीकडे रंगी-बेरंगी कमळे उमलली आहेत आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालेले भ्रमर गुंजारव करीत आहेत; तर दुसरीकडे पक्षी मधुर किलबिलाट करीत आहेत. त्यांच्या प्रतिध्वनीने सुशोभित झालेले वृक्ष या स्थानाची शोभा वाढवीत आहेत. (५)


( अनुष्टुप् )
अत्र भोक्तव्यमस्माभिः दिवारूढं क्षुधार्दिताः ।
वत्साः समीपेऽपः पीत्वा चरन्तु शनकैस्तृणम् ॥ ६ ॥
( अनुष्टुप् )
जेवणे करुया आता वेळ तो बहु जाहला ।
भूकही लागली खूप वासुरे तृण सेविती ॥ ६ ॥

अत्र - येथे - अस्मामिः भोक्तव्यं - आपण भोजन करावे - दिवा रूढं - दिवस पुष्कळ वर आला - (वयं) क्षुधार्दिताः - आपण भुकेने पीडिलेले आहो - वत्साः - वासरे - अपः पीत्वा - पाणी पीऊन - समीपे - जवळच - शनकैः - हळुहळू - तृणं चरन्तु - गवत खात फिरोत ॥६॥

आता आपण भोजन करू. कारण दिवस बराच वर आला आहे आणि आपण भुकेने व्याकूळ झालो आहोत. वासरे पाणी पिऊन जवळपास सावकाश चारा खात राहतील. (६)


तथेति पाययित्वार्भा वत्सानारुध्य शाद्वले ।
मुक्त्वा शिक्यानि बुभुजुः समं भगवता मुदा ॥ ७ ॥
वदले ठीक गोपाळ वासुरे जळ पाजुनी ।
चराया सोडिले आणि आनंदे शिंकि सोडिली ॥ ७ ॥

तथेति - बरे आहे असे म्हणून - अर्भाः - ती मुले - वत्सान् पाययित्वा - वासरांना पाणी पाजून - शाद्वले अरुध्यं - हिरव्या गवतावर चरण्याकरिता सोडून - शिक्यानि मुक्त्वा - शिंकी सोडून - भगवता समं - श्रीकृष्णासह - मुदा - आनंदाने - बुभुजुः - भोजन करते झाले ॥७॥

ठीक आहे. असे म्हणून मुलांनी वासरांना थांबवून पाणी पाजून हिरव्यागार गवतावर सोडून दिले आणि आपापल्या शिदोर्‍या उघडून भगवंतांच्याबरोबर मोठ्या आनंदाने ते जेवू लागले. (७)


( मिश्र )
कृष्णस्य विष्वक् पुरुराजिमण्डलैः
     अभ्याननाः फुल्लदृशो व्रजार्भकाः ।
सहोपविष्टा विपिने विरेजुः
     छदा यथाम्भोरुहकर्णिकायाः ॥ ८ ॥
( इंद्रवज्रा )
मध्यात बैसे मग कृष्णजी तो
     नी मंडलैसे भवतीहि गोप ।
श्रीकृष्णजीला बघतीचि प्रेमे
     त्या कर्णिकेच्या जणु पाकळ्याची ॥ ८ ॥

विपिने - अरण्यात - कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - विष्वक् - सभोवार - पुरुराजिमंडलैः (आसीनाः) - मोठ्या मंडलाकार ओळींनी बसलेले - (श्रीकृष्णं) अभ्याननाः - श्रीकृष्णाकडे ज्यांची मुखे झाली आहेत असे - फुल्लदृशः - प्रफुल्लित आहेत दृष्टि ज्यांच्या असे - व्रजार्भकाः - गोकुळातील बालक - सह उपविष्टाः - जवळ जवळ बसलेले असे - यथा - ज्याप्रमाणे - अंभोरुहकर्णिकायाः छदाः - कमळातील गाभ्यातील पाकळ्या त्याप्रमाणे - विरेजुः - शोभले ॥८॥

गवळ्यांच्या मुलांनी श्रीकृष्णाच्या चारी बाजूंनी पुष्कळ्शा गोलाकार पंक्ती बनविल्या आणि ते श्रीकृष्णांकडे तोंडे करून बसले. यावेळी सर्वांच्या डोळ्यांतून आनंद ओसंडत होता. कमळाच्या गड्ड्याच्या चारी बाजूंनी त्याच्या पाकळ्या शोभून दिसाव्या, तसे ते सारे कृष्णाभोवती शोभून दिसत होते. (८)


( अनुष्टुप् )
केचित् पुष्पैर्दलैः केचित् पल्लवैः अङ्‌कुरैः फलैः ।
शिग्भिः त्वग्भिः दृषद्‌भिश्च बुभुजुः कृतभाजनाः ॥ ९ ॥
( अनुष्टुप् )
कोणी फुले नि पानांचे फळनी सालिचे कुणी ।
दगडी पात्र ते कोणी करोनी जेवु लागले ॥ ९ ॥

केचित् - कित्येक - पुष्पैः - फुलांच्या योगाने - केचित् - कित्येक - दलैः पल्लवैः अङ्कुरैः फलैः - पाने, पालवी, वृक्षांकुर, फळे ह्यांच्या योगाने - शिग्भिः त्वग्भिः दृषद्भिः च - शिंकी, वृक्षांच्या साली व पाषाण यांच्या योगाने - कृतभाजनाः - केली आहेत, भोजनपात्रे ज्यांनी असे - बुभुजुः - भोजन करिते झाले ॥९॥

कोणी फुले, कोणी जून पाने, कुणी कोवळी पाने, अंकूर, फळे, शिंकी, साली, दगड यांची पात्रे तयार करून ते भोजन करू लागले. (९)


सर्वे मिथो दर्शयन्तः स्वस्वभोज्यरुचिं पृथक् ।
हसन्तो हासयन्तश्च अभ्यवजह्रुः सहेश्वराः ॥ १० ॥
कृष्ण नी बाळ गोपाळ बोलती रुचि ज्या परी ।
हासती तोंड फाडोनी मजेने जेवु लागले ॥ १० ॥

सहेश्वराः सर्वे - श्रीकृष्णासह सर्व गोपबालक - पृथक् - निरनिराळ्या रीतीने - स्वस्वभ्योज्यरुचिं - आपापल्या भोजनाची चव - मिथः दर्शयन्तः - एकमेकांना दाखवीत - हसन्तः - हसत - च हासयन्तः - आणि हासवीत - अभ्यवजह्रुः - भोजन करिते झाले ॥१०॥

भगवान श्रीकृष्ण आणि बाल-गोपाल असे सर्वजण एकमेकांना आपापल्या पदार्थांची वेगवेगळी चव दाखवत, एकमेकांना हसत हसवत भोजन करू लागले. (१०)


( मंदाक्रांता )
बिभ्रद् वेणुं जठरपटयोः श्रृङ्‌गवेत्रे च कक्षे ।
     वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यङ्‌गुलीषु ।
तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिः स्वैः
     स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभुग् बालकेलिः ॥ ११ ॥
( मंदाक्रांता )
कान्हा खोवी कमरपटिसी वेणु ती दृश्यभागी ।
शिंगा होते बगलि धरिले पात्र डाव्या करात ॥
दही भातो घृत चटणीया लोणची त्यात होती ।
मुलांमाजी बसुनि हसतो बोलतो तो विनोदे ॥
भोक्ता यज्ञीं जरिहि असला जेवितो बाललीले ।
स्वर्गामाजी नवल गमले पाहता देवतांना ॥ ११ ॥

जठरपटयोः - पोट व त्याभोवती गुंडाळलेले वस्त्र यांमध्ये - वेणुं - मुरली - वामे कक्षे - डाव्या काखेत - शृङगवेत्रे - शिंग व वेताची काठी - पाणौ च - आणि तळहातावर - मसृणकवलं - दहीभाताचा घास - अङ्‌गुलीषु - बोटात - तत्फलानि - त्या शिदोरीतील फळे - बिभ्रत् - धारण करणारा - बालकेलिः यज्ञभुक् - बालक्रीडा करणारा यज्ञभोक्ता श्रीकृष्ण - मध्ये तिष्ठन् - सर्व मुलांच्यामध्ये राहून - स्वपरिसुहृदः - आपल्या सभोवार बसलेल्या मित्रांना - स्वैः नर्मभिः - स्वतःच्या थटटेच्या भाषणांनी - हासयन् - हासवीत - स्वर्गे लोके मिषती - स्वर्गातील देव पहात असता - बभुजे - भोजन करिता झाला. ॥११॥

त्यावेळी श्रीकृष्णांनी मुरली कमरेच्या शेल्यात खोचली होती. शिंग आणि वेताची काठी डाव्या बगलेत धरली होती. सुंदर हातात दहीभाताचा घास होता. बोटांमध्ये जेवताना खाण्याची फळे धरली होती. आणि ते सर्वांच्या मध्ये बसून आपल्या विनोदपूर्ण बोलण्याने आपल्या सवंगड्यांना हसवीत होते. जे सर्व यज्ञांचे भोक्ते तेच आज मुलांसमवेत बाल लीला करीत भोजन करीत होते आणि स्वर्गातील देव त्यांची ही लीला पहात होते. (११)


( अनुष्टुप् )
भारतैवं वत्सपेषु भुञ्जानेष्वच्युतात्मसु ।
वत्सास्त्वन्तर्वने दूरं विविशुस्तृणलोभिताः ॥ १२ ॥
( अनुष्टुप् )
नृपारे ! जेविता ऐसे कृष्णलीलात बाळ ते ।
वासरे दूर ती गेली जंगली तृणलालसे ॥ १२ ॥

भारत - हे परीक्षित राजा - अच्युतात्मसु - श्रीकृष्णरूप बनलेले, - वत्सपेषु - वासरे राखणारे गोपबालक - एवं भुञ्जानेषु - याप्रमाणे भोजन करीत असता - तृणलोभिताः वत्साः तु - गवत खाण्यास लुब्ध झालेली वासरे तर - अत्नर्वने दूरं विविशुः - अरण्यामध्ये पुष्कळ दूर गेली. ॥१२॥

हे भारता अशा प्रकारे बाल गोपाल भगवंतांशी तन्मय होऊन जेवत असता त्यांची वासरे हिरव्यागार गवताच्या लोभाने जंगलात लांब निघून गेली. (१२)


तान् दृष्ट्वा भयसंत्रस्न् ऊचे कृष्णोऽस्य भीभयम् ।
मित्राण्याशान्मा विरमत् इहानेष्ये वत्सकानहम् ॥ ॥
बाळांच्या ध्यानि ते येता जाहले भयभीत ते ।
मित्रांनो नच हो थांबा निवांत जेवणे तुम्ही ।
वदे कृष्ण पहा मीच वासुरे वळवीतसे ॥ १३ ॥

कृष्णः - श्रीकृष्ण - भीभयं - भयोत्पादक गोष्टींची भीति - अस्य - टाकून - भयसन्त्रस्नान् तान् दृष्ट्वा - भयाने पीडिलेल्या त्या गोपबालकांना पाहून - ऊचे - बोलला - मित्राणी - अहो मित्र हो - आशात् मा विरमत - भोजनापासून परावृत्त होऊ नका - अहम् - मी - इह - येथे - वत्सकान् आनेष्ये - वासरांना आणीन. ॥१३॥

गोपालांचे जेव्हा तिकडे लक्ष गेले, तेव्हा ते घाबरले. त्यावेळी विश्वातील भयाला भिवविणारे श्रीकृष्ण म्हणाले, "मित्रांनो ! तुम्ही जेवण भांबवू नका. मी वासरांना येथे घेऊन येतो." (१३)


इत्युक्त्वाद्रिदरीकुञ्ज गह्वरेष्वात्मवत्सकान् ।
विचिन्वन् भगवान् कृष्णः सपाणिकवलो ययौ ॥ १४ ॥
भाताचा घेवुनी काला कृष्णजी धावला तसा ।
गिरी गुंफा वनीं सार्‍या वत्सांना धुंडु लागला ॥ १४ ॥

पाणिकवलः - हातात आहे घास ज्याच्या असा - सः भगवान् कृष्णः - तो भगवान श्रीकृष्ण - इति उक्त्वा - असे बोलून - अद्रिदरीकुञ्जगह्वरेषु - पर्वत, दर्‍या, कडे, वेलींच्या जाळ्या व गुहा ह्या ठिकाणी - आत्मवत्सकान् - आपल्या वासरांना - विचिन्वन् - शोधीत - ययौ - गेला. ॥१४॥

भगवंत श्रीकृष्ण एवढे बोलून हातात घास घेऊनच पहाड, दर्‍या, कुंज, गुहा इत्यादि ठिकाणी आपल्या वासरांना शोधत निघाले. (१४)


( शार्दूलविक्रीडित )
अम्भोजन्मजनिस्तदन्तरगतो मायार्भकस्येशितुः ।
     द्रष्टुं मञ्जु महित्वमन्यदपि तद्वत्सानितो वत्सपान् ।
नीत्वान्यत्र कुरूद्वहान्तरदधात् खेऽवस्थितो यः पुरा ।
     दृष्ट्वाघासुरमोक्षणं प्रभवतः प्राप्तः परं विस्मयम् ॥ १५ ॥
( शार्दूलविक्रीडित )
ब्रह्मा तो नभमंडळी स्थित असे पाही अघामृत्यु तो ।
आश्चर्ये बघतो मनात स्मरतो पाहू हरीच्या लिला ॥
चोरी वत्स तसेचि गोपी हलवी नेवोनि हो गुप्त तो ।
अज्ञाने करि हे घडे कमळिच्या पुत्रें भ्रमी कार्य हे ॥ १५ ॥

कुरूद्वह - हे परीक्षित राजा - यः - जो - स्वे अवस्थितः - स्वर्गात राहणारा - पुरा - पूर्वी - अघासुरमोक्षणं दृष्टवा - अघासुरापासून गोपबालकांची केलेली सोडवणूक पाहून - परं विस्मयं प्राप्तः - अत्यंत आश्चर्याने थक्क झालेला - अम्भोजन्मजनिः - ब्रह्मदेव - तदन्तरगतः - ती संधि मिळालेला असा - मायार्भकस्य प्रभवतः ईशितुः - मायेने बालरूप घेतलेल्या सामर्थ्यवान श्रीकृष्णाचे - अन्यत् अपि - आणखीही - मंजुमहित्वं द्रष्टुं - सुंदर माहात्म्य पाहण्यासाठी - तद्वत्सान् - त्यांच्या वासरांना - च वत्सपान् - आणि वासरे राखणार्‍या गोपबालकांना - इतः अन्यत्र नीत्वा - येथून दुसरीकडे नेऊन - अन्तरधात् - गुप्त झाला. ॥१५॥

परीक्षिता ! ब्रह्मदेव आधीच येऊन आकाशात राहिले होते. प्रभूंच्या प्रभावाने अघासुराचा झालेला मोक्ष पाहून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. लीलेने मनुष्य-बालक झालेल्या भगवंतांचा आणखी एकादा मनोहर महिमा पहावा, असा विचार करून त्यांनी अगोदर वासरांना आणि श्रीकृष्ण निघून गेल्यावर गोपालांना दुसरीकडे नेऊन ठेवले आणि स्वतः अंतर्धान पावले. (१५)


( अनुष्टुप् )
ततो वत्सान् अदृष्ट्वैत्य पुलिनेऽपि च वत्सपान् ।
उभौ अपि वने कृष्णो विचिकाय समन्ततः ॥ १६ ॥
( अनुष्टुप् )
वासुरे दिसली नाही कृष्ण वाळूसि पातला ।
मुलेही नव्हती तेथे शोधी कृष्ण जिथे तिथे ॥ १६ ॥

ततः - नंतर - कृष्णः - श्रीकृष्ण - वत्सान् अदृष्टवा - वासरांना न पाहिल्यामुळे - एत्य - परत येऊन - पुलिने - वाळवंटावर - वत्सपान् अपि च - वत्सरक्षक गोपबालकांनाही - उभौ अपि - वासरे व गोपबालक ह्या दोघांनाही - वने - अरण्यात - समंततः विचिकाय - सभोवार शोधिता झाला. ॥१६॥

वासरे न सापडल्याने ते यमुनेच्या वाळवंटात परत आले. येऊन पाहिले तर गोपालसुद्धा नाहीत. तेव्हा त्यांनी वनात चारी बाजूला जाऊन त्यांना शोधले. (१६)


क्वाप्यदृष्ट्वान्तर्विपिने वत्सान् पालांश्च विश्ववित् ।
सर्वं विधिकृतं कृष्णः सहसावजगाम ह ॥ १७ ॥
परंतु बाळ गोपाळ सान वत्स तयांचिये ।
दिसले नच ते तेंव्हा ओळखी कुष्ण तो मनीं ।
ब्रह्माची जाणितो विश्वा त्याचेचि कृत्य हे असे ॥ १७ ॥

विश्वजित् कृष्णः - जगज्जेता श्रीकृष्ण - वत्सान् पालान् च - वासरे व त्यांचे रक्षक ह्यांना - अन्तर्विपिने - अरण्यात - क्व अपि - कोठेही - अदृष्टवा - न पाहून - सर्वं विधिकृतं - हे सर्व ब्रह्मदेवाचे कृत्य - (इति) सहसा अवजगाम ह - असे एकाएकी जाणता झाला. ॥१७॥

सर्वज्ञ श्रीकृष्णांना जेव्हा त्या वनात गोपाल आणि वासरे कोठेच दिसली नाहीत, तेव्हा त्यांनी लगेच ताडले की, ही ब्रह्मदेवाची करणी आहे. (१७)


ततः कृष्णो मुदं कर्तुं तन्मातॄणां च कस्य च ।
उभयायितमात्मानं चक्रे विश्वकृदीश्वरः ॥ १८ ॥
गोपमाता नि ब्रह्म्याला आनंद द्यावया तसे ।
धरले वत्सरूपे ती बाळेही तोचि जाहला ॥ १८ ॥

ततः - नंतर - विश्वकृत् ईश्वरः कृष्णः - जगाचा उत्पादक असा सर्वैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - तन्मातृणां च कस्य च - गोपबालकांच्या मातांना व ब्रह्मदेवाला - मुदं कर्तुम् - आनंद देण्यासाठी - आत्मानं - स्वतःला - उभयायितं - वासरे व गोपबालक या दोघांचे रूप घेतले आहे ज्याने असा - चक्रे - करिता झाला. ॥१८॥

तेव्हा श्रीकृष्णांनी, वासरे आणि गोपालांच्या मातांना तसेच ब्रह्मदेवालासुद्धा आनंदित करण्यासाठी स्वतः वासरे आणि गोपाल अशी दोन्ही रूपे घेतली. यात त्यांना अशक्य ते काय ? कारण तेच संपूर्ण विश्वाचे कर्ते ईश्वर आहेत ना ! (१८)

विवरण :- ब्रह्मदेवाने गंमत म्हणून गोपबालके व गाईगुरांना अदृश्य केले. कृष्णाने त्यांना त्या पहिल्याच रूपात परत आणले असते, तर ब्रह्मदेवाला वाईट वाटले असते व तसे आणले नसते, तर त्यांच्या माता-पित्यांना वाईट वाटले असते. त्या दोघांनाहि वाईट वाटू नये म्हणून त्याने तशीच दुसरी बालके व गाई-वासरे निर्माण करण्याचे ठरविले. (१८)



( शार्दूलविक्रीडित )
यावद् वत्सपवत्सकाल्पकवपुः
     र्यावत् कराङ्‌घ्र्यादिकं ।
यावद् यष्टिविषाणवेणुदलशिग्
     यावद् विभूषाम्बरम् ।
यावत् शीलगुणाभिधाकृतिवयो
     यावद् विहारादिकं ।
सर्वं विष्णुमयं गिरोऽङ्‌गवदजः
     सर्वस्वरूपो बभौ ॥ १९ ॥
( शार्दूलविक्रीडित )
होती गोपमुले नि वत्स तशिची घेई हरी रूप तै ।
वंश्या शिंगि नि शिंकि वस्त्र तशिची काठ्या करीही तशा ।
जैसे भाव गुणादि रूप सगळे झाला तसाची हरी ।
विश्वोरूप तसाचि विष्णु हरिही ती देववाणी खरी ॥ १९ ॥

सर्वस्वरूपः अजः - सर्व विश्व आहे रूप ज्याचे असा श्रीकृष्ण - यावद्वत्सप - ज्या प्रमाणात वासरे राखणारे गोपबालक - वत्सकाल्पकवपुः - व वासरे ह्यांची शरीरे होती त्या प्रमाणात लहान शरीर - यावत् - जितक्या प्रमाणात - कराङ्‌घ्र्‌यादिकं - त्यांचे हात, पाय होते त्या प्रमाणात ते आहेत ज्याला असे - यावद्यष्टिविषाण - जशा त्यांच्या काठया, शिंगे, - वेणुदलशिक् - मुरल्या, पाने, शिंकी होती तशी धारण करणारे - यावद्विभूषाम्बरं - ज्याप्रकारचे त्यांचे अलंकार व वस्त्रे होती त्याप्रकारची धारण करणारे - यावच्छीलगुण - जशी त्यांची स्वभाव, गुण, नाव, - अभिधाकृतिवयः - आकृति व वयोवस्था होती तशी आहे ज्याला असे - यावद्विहारादिकं - जसे त्यांचे क्रीडादि व्यवहार होते तसे असणारे - सर्वं विष्णुमयम् (इति) गिरः - सर्व जग विष्णूचे स्वरूप आहे या श्रुतिवचनाला - अङगवत् (कुर्वन) - सार्थ करीत - बभौ - शोभला. ॥१९॥

ती बालके आणि वासरे संख्येने जितकी होती, जेवढी लहान त्यांची शरीरे होती, त्यांचे हात-पाय जसजसे होते, त्यांच्याजवळ जितक्या आणि जशा छड्या, शिंगे, बासर्‍या, पाने आणि शिंकी होती, जसे आणि जितके वस्त्रालंकार होते, त्यांचे स्वभाव, गुण, नावे, रूपे आणि वय जसजसे होते, ज्याप्रकारे ते खाणे-पिणे इत्यादि व्यवहार करीत, अगदी नेमके तसेच आणि तितक्याच रूपांमध्ये सर्वस्वरूप अजन्मा भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यावेळी "हे संपूर्ण जग विष्णुरूप आहे" ही वेदवाणी सार्थ झाली. (१९)


( अनुष्टुप् )
स्वयमात्मात्मगोवत्सान प्रतिवार्यात्मवत्सपैः ।
क्रीडन् आत्मविहारैश्च सर्वात्मा प्राविशद् व्रजम् ॥ २० ॥
( अनुष्टुप् )
वासुरे गोपही झाला सर्वात्मा भगवान स्वता ।
आत्मरूप असे वत्स बाळेही आत्मरूप ते ।
घेरता जमले सारे सवत्स व्रजि पातले ॥ २० ॥

सर्वात्मा आत्मा - आत्मरूपाने सर्वत्र व्यापून राहणारा श्रीकृष्ण - स्वयं - स्वतः - आत्मवत्सपैः - आत्मरूपी गोपबालकांकडून - आत्मगोवत्सान् प्रतिवार्य - आत्मरूपी वासरांना परत वळवून - आत्मविहारैः च क्रीडन् - आणि आत्मरूपी खेळ खेळत - व्रजं प्राविशत् - गोकुळात शिरला. ॥२०॥

सर्वात्मा भगवान स्वतःच वासरे आणि गोपाल झाले. आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळांनी वेढून आपल्याबरोबर आपणच अनेक प्रकारचे खेळ खेळत त्यांनी व्रजामध्ये प्रवेश केला. (२०)

विवरण :- श्रीकृष्णाने सर्व बालकात जीव ओतला होता. त्यामुळे ते जणू त्याचेच अंश बनले होते. त्यामुळे सर्व जगच विष्णुमय ही उक्ती सिद्ध झाली. (सर्वं विष्णुमयं जगत् ।) अशाप्रकारे कर्ताहि तोच होता व त्याने केलेले कार्यहि तोच होता. (१९-२०)



तत्तद् वत्सान् पृथङ्‌नीत्वा तत्तद्‍गोष्ठे निवेश्य सः ।
तत्तद् आत्माभवद् राजन् तत्तत्सद्म प्रविष्टवान् ॥ २१ ॥
विभक्त जाहले सर्व वासुरे बाळ ज्यांचि ते ।
गोठ्यात घुसले सर्व ज्याच्या त्याच्या घरात ते ॥ २१ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - सः - तो श्रीकृष्ण - तत्तदात्मा अभवत् - तसतसली गोपबालकांची स्वरूपे धारण करिता झाला - तत्तद्वत्सान् - त्यांच्या त्यांच्या वासरांना - तत्तद्‌गोष्ठे - त्या त्या गोठयात - पृथक् नीत्वा - निरनिराळी नेऊन - निवेश्य च - आणि स्थापित करून - तत् तत् सद्म - त्या त्या घरी - प्रविष्टवान् - राहता झाला. ॥२१॥

राजा ! ज्या गोपाळांची जी वासरे होती, त्यांना त्याच गोपाळांच्या रूपाने स्वतंत्रपणे घेऊन जाऊन त्यांच्या त्यांच्या गोठ्यांत बांधले आणि ते त्या त्या बालकांच्या रूपाने त्यांच्या त्यांच्या घरात गेले. (२१)


( मिश्र )
तन्मातरो वेणुरवत्वरोत्थिता
     उत्थाप्य दोर्भिः परिरभ्य निर्भरम् ।
स्नेहस्नुतस्तन्यपयःसुधासवं
     मत्वा परं ब्रह्म सुतानपाययन् ॥ २२ ॥
( इंद्रवज्रा )
तो बासुरीचा ध्वनी ऐकताची
     माता तदा धावुनि पातल्या नी ।
घेवोनि कृष्णा समजोनि पुत्र
     नी धुंद दुग्धा स्तनि पाजिले की ॥ २२ ॥

वेणुरवत्वरोत्थिताः - मुरलीच्या नादाने त्वरेने उठलेल्या - तन्मातरः - त्या गोपबालकांच्या माता - सुतान् उत्थाप्य - मुलांना वर उचलून घेऊन - दोर्भिः निर्भरम् परिरभ्य - बाहूंनी गाढ आलिंगन देऊन - परं ब्रह्म मत्वा - हेच परब्रह्म आहे असे मानून - स्नेहस्नुतस्तन्यपयः - प्रेमामुळे बाहेर गळणारे जे स्तनांतील दुग्ध हेच कोणी - सुधा सवं - अमृत असे अमृतरूपी आसव - अपाययन् - पाजित्या झाल्या. ॥२२॥

बासरीची तान ऐकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या. गोपाळ बनलेल्या प्ररब्रह्म श्रीकृष्णांना त्यांनी आपली मुले समजून, हातांनी उचलून घेऊन हृदयाशी घट्ट धरले. आणि प्रेमामुळे स्तनातून पाझरणारे अमृतासारखे दूध त्या त्यांना पाजू लागल्या. (२२)


ततो नृपोन्मर्दनमज्जलेपन
     अलङ्‌कार रक्षा तिलकाशनादिभिः ।
संलालितः स्वाचरितैः प्रहर्षयन्
     सायं गतो यामयमेन माधवः ॥ २३ ॥
ऐसाचि नित्यो वनि जाय कृष्ण
     नी बाळगोपाळ बनोनि येई ।
माता तयाला सजवीत नित्य
     गालासि दृष्टी टिपकाहि देती ॥ २३ ॥

नृप - हे परीक्षित राजा - ततः - नंतर - माधवः - श्रीकृष्ण - उन्मर्दनमज्जलेपनालंकार - तैलाभ्यंगस्नान, चंदनादि उटी, अलंकार, - रक्षातिलकाशनादिभिः - अंगारादि रक्षाविधि, गंधादि तिलक व भोजन इत्यादिकांनी - संलालितः - लालन केलेला - स्वाचरितैः प्रहर्षयन् - आपल्या लीलांनी आनंद देणारा - यामयमेन - प्रहरांच्या नियमाप्रमाणे - सायंगतः - संध्याकाळी प्राप्त झाला. ॥२३॥

परीक्षिता ! अशा प्रकारे दररोज संध्याकाळच्या वेळी श्रीकुष्ण त्या गोपाळांच्या रूपांत वनांतून परत येत आणि आपल्या बालसुलभ लीलांनी मातांना आनंदित करीत. त्या माता त्यांना उटणे लावीत, न्हाऊ घालीत, चंदनाचा लेप लावीत आणि चांगल्या वस्त्रांनी तसेच अलंकारांनी सजवीत. नजर लागू नये म्हणून काजळाची तीट लावीत आणि जेवू घालीत. अशा रीतीने त्यांचे लालन-पालन करीत. (२३)


गावस्ततो गोष्ठमुपेत्य सत्वरं
     हुङ्‌कारघोषैः परिहूतसङ्‌गतान् ।
स्वकान् स्वकान् वत्सतरानपाययन्
     मुहुर्लिहन्त्यः स्रवदौधसं पयः ॥ २४ ॥
त्या गौळणींच्या परि सर्व गाई
     चरोनि येता वनि वत्स घेती ।
चाटोनि त्यांना स्तनपान देती
     पान्हा स्तनीचा झरताच राही ॥ २४ ॥

ततः - नंतर - गावः - गाई - सत्वरं गोष्ठं उपेत्य - लवकर गोठयात येऊन - हुंकारघौषैः - हंबरण्याच्या नादांनी - परिहूतसङगतान् - बोलाविल्यामुळे जवळ आलेल्या - स्वकान् स्वकान् - आपापल्या - वत्सतरान् - लहान वासरांना - मुहुः लिहन्त्यः - वारंवार चाटणार्‍या अशा - स्रवत् औधसं पयः - पान्हा फुटलेल्या ओटीतील दूध - अपाययन् - पाजित्या झाल्या. ॥२४॥

गाईसुद्धा धावत धावत गोठ्यांत येत आणि त्यांचे हंबरणे ऐकून त्यांची वासरेही धावत त्यांच्याकडे जात. तेव्हा त्या वारंवार त्यांना जिभेने चाटून प्रेमामुळे सडांतून पाझरणारे दूध त्यांना पाजीत. (२४)


( अनुष्टुप् )
गोगोपीनां मातृतास्मिन् सर्वा स्नेहर्धिकां विना ।
पुरोवदास्वपि हरेः तोकता मायया विना ॥ २५ ॥
( अनुष्टुप् )
मातृभाव जसा होता शुद्ध गो गोपिंचा तसा ।
रमला कृष्ण पुत्रैसा परी ना मोहला कुठे ॥ २५ ॥

गोगोपीनां - गाई व गोपस्त्रिया यांचे - अस्मिन् - वत्स व गोपबालक ह्यांचे वेष घेणार्‍या श्रीकृष्णाच्या ठिकाणी - स्नेहर्धिकां विना - प्रेमाचा विशेष वगळून - पुरोवत् - पूर्वीप्रमाणे - सर्वा मातृता - सगळे मातृसंबंधी प्रेम - आसु अपि - ह्या गाई व गोपस्त्रिया ह्यांच्या ठिकाणीही - हरेः तोकता - श्रीकृष्णाचे बालपण - मायया विना - मायेला वगळून. ॥२५॥

या गाई आणि गौळणींचा आईपणा त्यांच्या ठिकाणी पहिल्याप्रमाणेच होता. मात्र त्यांचे प्रेम पहिल्या पुत्रांपेक्षा या नव्या पुत्रांवर जास्त होते. तसेच भगवानसुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्रांप्रमाणेच त्यांच्याशी वागत. परंतु भगवंतांचे ठिकाणी मात्र त्या मुलांसारखा मोहाचा भाव नव्हता. (२५)


व्रजौकसां स्वतोकेषु स्नेहवल्ल्याब्दमन्वहम् ।
शनैर्निःसीम ववृधे यथा कृष्णे त्वपूर्ववत् ॥ २६ ॥
ज्ञानैश्वर्य विना प्रेम शुद्धची मातृभाव तो ।
गाई नी गोपिका देती कृष्णाच्या परि बालका ॥ २६ ॥

व्रजौकसां - गोकुळवासी लोकांची - यथा कृष्णे तथा - जशी श्रीकृष्णावर तशी - स्वतोकेषु अपि - आपापल्या बालकांवरहि - स्नेहवल्ली - प्रेमाची वेल - आ अब्दं - एक वर्षपर्यंत - अन्वहम् - प्रतिदिवशी - शनैः - हळूहळू - निःसीम - अमर्याद - अपूर्ववत् - पूर्वी केव्हाही नव्हती अशी - ववृधे - वाढली. ॥२६॥

आपापल्या मुलांबद्दलचे व्रजवासियांचे प्रेम वर्षभरात दिवसेंदिवस हळू-हळू वाढतच गेले. एवढेच नव्हे तर, श्रीकृष्णांबद्दल त्यांना जसे असीम प्रेम वाटत होते, तसेच त्यांना आपल्या या बालकांबद्दलही पूर्वीपेक्षा जास्त प्रेम वाटू लागले. (२६)


इत्थं आत्माऽऽत्मनाऽऽत्मानं वत्सपालमिषेण सः ।
पालयन् वत्सपो वर्षं चिक्रीडे वनगोष्ठयोः ॥ २७ ॥
या परी क्रीडला कृष्ण सर्वात्मा भगवान् हरी ।
गोपाळ वासरां रूपे गोठीं गेहात वर्ष ते ॥ २७ ॥

आत्मा वत्सपः सः - सर्वव्यापी वत्सरक्षक श्रीकृष्ण - आत्मना - स्वतः - वत्सपालमिषेण - वत्सरक्षक गोपबालकांच्या रूपाने - इत्थं आत्मानं पालयन् - याप्रमाणे वासरांची रूपे घेणार्‍या स्वतःला राखीत - वनगोष्ठयोः - अरण्यात व गोकुळात - वर्षं चिक्रीडे - एक वर्षपर्यंत क्रीडा करिता झाला. ॥२७॥

अशा प्रकारे सर्वात्मा श्रीकृष्ण स्वतः गोपाळ असून शिवाय वासरे आणि इतर गोपाळ बनून स्वतःच स्वतःचे पालन करीत एक वर्षपर्यंत वनांत आणि गौळवाड्यांत क्रीडा करीत राहिले. (२७)


एकदा चारयन् वत्सान् सरामो वनमाविशत् ।
पञ्चषासु त्रियामासु हायनापूरणीष्वजः ॥ २८ ॥
पाच - सात दिनो पूर्व वर्ष ते संपण्या पुरे ।
बळीच्या सह श्रीकृष्ण गेला वत्सास चारण्या ॥ २८ ॥

एकदा - एके दिवशी - सरामः अजः - बलरामासह श्रीकृष्ण - हायनीपूरणीषु पञ्चषासु त्रियामासु - वर्ष पुरे होण्यास पाच सहा रात्रीच उरल्या असताना - वत्सान् चारयन् - वासरे चरवीत - वनम् आविशत् - अरण्यांत शिरला. ॥२८॥

जेव्हा एक वर्ष पूर्ण होणास पाच-सहा दिवस शिल्लक होते, तेव्हा एके दिवशी श्रीकृष्ण बलरामांसह वासरे चारीत वनात गेले. (२८)


ततो विदूराच्चरतो गावो वत्सानुपव्रजम् ।
गोवर्धनाद्रिशिरसि चरन्त्यो ददृशुस्तृणम् ॥ २९ ॥
गोवर्धनास माथ्याशी चरता गाई पाहती ।
दुरूनी आपुली वत्स व्रजात चरता तदा ॥ २९ ॥

ततः - नंतर - गोवर्धनाद्रिशिरसि - गोवर्धन पर्वताच्या शिखरावर - तृणं चरन्त्यः गावः - गवत खात फिरणार्‍या गाई - उपव्रजं चरतः वत्सान् - गोकुळाच्या शेजारी चरणार्‍या वासरांना - विदूरात् ददृशुः - दुरून पाहत्या झाल्या. ॥२९॥

त्यावेळी गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर गाई चरत होत्या. तेथून त्यांनी व्रजाजवळच खूप लांब गवत खात असलेल्या आपल्या वासरांना पाहिले. (२९)


( मिश्र )
दृष्ट्वाथ तत्स्नेहवशोऽस्मृतात्मा
     स गोव्रजोऽत्यात्मप दुर्गमार्गः ।
द्विपात्ककुद्‍ग्रीव उदास्यपुच्छो
     अगाद्धुङ्‌कृतैरास्रुपया जवेन ॥ ३० ॥
( इंद्रवज्रा )
वात्सल्य आले उमटोनी चित्ती
     न मानिती गोपहि आवरीता ।
हंबारुनी त्या पळत्याची गेल्या
     संकोच मानीं उचलोनि पुच्छ ।
बेगात गेल्या पळत्या जशा की
     दोन्हीच पायी पळती गमावे ॥ ३० ॥

अथ - मग - (तान्) दृष्टवा - वासरांना पाहून - वत्सस्नेहवशः - त्या वासरांवरील प्रेमाच्या स्वाधीन झालेला - अस्मृतात्मा - स्वतःविषयी देहभान न उरलेला - अत्यात्मपदुर्गमार्गः - रक्षकांना न जुमानता क्लिष्ट मार्गाचा अवलंब केलेला - सः गोव्रजः - तो गाईंचा कळप - द्विपात् - मनुष्याप्रमाणे दोन पायांवर धावून - ककुद्‌ग्रीवः - वशिंडाकडे ज्यांची मान वळली आहे असा - उदास्यपुच्छः - वर केली आहे शेपटी ज्याने असा - आस्नुपायाः - ज्याच्या स्तनांतून जिकडून तिकडून दूध गळत आहे असा - हुंकृतैः - हंबरडा फोडून - जवेन - मोठया वेगाने - अगात् - प्राप्त झाला. ॥३०॥

वासरांना पाहताच गाईंचे वात्सल्य उफाळून आले. त्यांचे भान हरपले आणि गुराख्यांच्या अडविणाची पर्वा न करता ज्या वाटेने जाणे कठीण होते, त्या वाटेनेही हंबरत जणू दोनच पाय असल्यासारख्या अतिशय वेगाने पळत सुटल्या. त्यावेळी त्यांच्या सडांतून दुधाच्या धारा वाहात होत्या. माना वशिंडाकडे वळवून व शेपट्या आणि तोंडे वर करून त्या धावू लागल्या. (३०)


( अनुष्टुप् )
समेत्य गावोऽधो वत्सान् वत्सवत्योऽप्यपाययन् ।
गिलन्त्य इव चाङ्‌गानि लिहन्त्यः स्वौधसं पयः ॥ ३१ ॥
( अनुष्टुप् )
नवीन जाहले वत्स तेही त्यांच्यांत पातले ।
स्नेहाने पाजिता गाई अंग चाटोनिया तदा ॥ ३१ ॥

च - आणि - वत्सवत्यः अपि गावः - नवी वासरे असलेल्याही गाई - (गोवर्धनस्य) अधः समेत्य - गोवर्धन पर्वताच्या खाली एकत्र जमून - अङगानि गिलन्त्यः इव - जणू वासरांची अंगे गिळीतच आहेत की काय अशा - वत्सान् लिहन्त्यः - वासरांना चाटीत - स्वौधसं फ्यः - आपल्या कासेतील दूध - अपाययन् - पाजित्या झाल्या. ॥३१॥

ज्या गाईंना आणखी वासरे झाली होती, त्या सुद्धा गोवर्धनाच्या पायथ्याशी आपल्या अगोदरच्या वासरांकडे धावत आल्या आणि त्यांना ममतेने आपोआप वाहणारे दूध पाजू लागल्या. त्यावेळी त्या आपल्या वासरांचे एक एक अंग असे कौतुकाने चाटीत होत्या की, जणू आता त्या त्यांना गिळून टाकतात की काय ! (३१)


गोपाः तद् रोधनायास मौघ्यलज्जोरुमन्युना ।
दुर्गाध्वकृच्छ्रतोऽभ्येत्य गोवत्सैर्ददृशुः सुतान् ॥ ३२ ॥
गोपिंनी रोधिता त्यांना रोधले नच ते मुळी ।
लाजल्या क्रोधल्या गोपी तेथे पुत्रांस पाहती ॥ ३२ ॥

गोपाः - गोप - तद्रोधनायासमौघ्य - त्या गाईना आवरण्याच्या श्रमांच्या निरर्थकपणामुळे - लज्जोरुमन्युना - वाटलेल्या लाजेने वाढलेल्या क्रोधाने - दुर्गाध्वकृच्छतः - क्लिष्ट मार्ग मोठया कष्टाने ओलांडून - अभ्येत्य - जवळ येऊन - गोवत्सैः (सहितान्) - वासरांसह असणार्‍या - सुतान् ददृशुः - पुत्रांना पाहते झाले. ॥३२॥

गोपांनी त्यांना अडविण्याचा पुष्कळ प्रयत्‍न केला, पण ते सर्व प्रयत्‍न व्यर्थ गेले. आपल्या अयशस्वी होण्याची त्यांना थोडी लाज वाटली आणि गायींचा अतिशय राग आला. जेव्हा ते अतिशय कष्टाने त्या दुर्गम वाटेने त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांनी वासरांसमवेत मुलांनाही पाहिले. (३२)


( मिश्र )
तदीक्षणोत्प्रेमरसाप्लुताशया
     जातानुरागा गतमन्यवोऽर्भकान् ।
उदुह्य दोर्भिः परिरभ्य मूर्धनि
     घ्राणैरवापुः परमां मुदं ते ॥ ३३ ॥
( इंद्रवज्रा )
मनात दाटे प्रभुप्रेम त्यांच्या
     पळोनि गेला मग क्रोध दूर ।
घेवोनि पुत्रा धरिती उराशी
     हुंगोनि डोकी बहु मोद घेती ॥ ३३ ॥

तदीक्षणोत् - त्या पुत्रांच्या दर्शनाने वाढलेल्या - प्रेमरसाप्लुताशयाः - प्रेमरूपी रसात बुडाली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - जातानुरागाः - उत्पन्न झाले आहे प्रेम ज्यांना असे - गतमन्यवः - गेला आहे राग ज्यांचा असे - ते - ते गोप - अर्भकान् उदुह्य - मुलांना उचलून घेऊन - दोर्भिः परिरभ्य - बाहूंनी आलिंगन देऊन - मूर्धनि घ्राणैः - मस्तकाच्या वास घेण्याने - परमां मुदं आपुः - अत्यंत आनंदाला प्राप्त झाले. ॥३३॥

आपल्या मुलांना पाहताच त्यांचे हृदय प्रेमरसाने उचंबळून आले. प्रेमाचा पूर येताच क्रोध न जाणो कुठच्या कुठे पळून गेला. त्यांना आपापल्या मुलांना उचलून घेऊन हृदयाशी कवटाळले आणि त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण करून ते अत्यंत आनंदित झाले. (३३)


( अनुष्टुप् )
ततः प्रवयसो गोपाः तोकाश्लेषसुनिर्वृताः ।
कृच्छ्रात् शनैरपगताः तदनुस्मृत्युदश्रवः ॥ ३४ ॥
( अनुष्टुप् )
वृद्ध गोपासही मोद बाळां घेताच जाहला ।
बाळांना ठेविता दूर प्रेमाश्रू नेत्रि पातले ॥ ३४ ॥

ततः - नंतर - प्रवयसः - वृद्ध - स्तोकाश्लेषसुनिर्वृताः - पुत्रांच्या आलिंगनाने सुखी झालेले - तदनुस्मृत्युदश्रवः - त्या पुत्रांच्या वारंवार स्मरणाने ज्यांच्या नेत्रातून अश्रू पडत आहेत असे - गोपाः - गोप - शनैः - हळूहळू - कृच्छ्‌रात् - कष्टाने - अपगताः - दूर गेले. ॥३४॥

आपल्या मुलांना आलिंगन दिल्याने वृद्ध गोपांना अतिशय आनंद झाला. नंतर मोठ्या कष्टाने त्यांना सोडून तेथून ते ह्ळू- हळू निघून गेले. गेल्यानंतरसुद्धा त्यांची आठवण होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहात राहिले. (३४)


व्रजस्य रामः प्रेमर्धेः वीक्ष्यौत्कण्ठ्यमनुक्षणम् ।
मुक्तस्तनेष्वपत्येषु अहेतुविद् अचिन्तयत् ॥ ३५ ॥
पाहिले बलरामाने व्रजात गोप गाइ नी ।
गोपिका आपुल्या पुत्रा त्यजोनी प्रेम मेळिती ।
विचार करिता चित्ती न कळे मुळि कारण ॥ ३५ ॥

रामः - बलराम - मुक्तस्तनेषु - सोडिले आहे स्तनांतील दूध पिणे ज्यांनी - अपत्येषु - अशा जाणत्या वासरांच्या कळपाचे वाढलेले प्रेम - च - आणि - अनुक्षणं औत्कण्ठयं - क्षणोक्षणीचे औत्सुक्य - वीक्ष्य - पाहून - अहेतुवित् अपि - कारण माहीत नव्हते तरी - अचिन्तयत् - विचार करू लागला. ॥३५॥

ज्यांनी आईचे दूध पिणे सोडले होते, त्या बालकांवरसुद्धा गाई आणि गौळणींचे क्षणोक्षणी वाढणारे प्रेम आणि उत्कंठा पाहून बलराम विचारात पडले. कारण त्यांना त्याचे कारण माहित नव्हते. (३५)


किमेतद् अद्‍भुतमिव वासुदेवेऽखिलात्मनि ।
व्रजस्य सात्मनस्तोकेषु अपूर्वं प्रेम वर्धते ॥ ३६ ॥
सर्वात्मा कृष्णदेवाचे माझ्याशी गोप बालका ।
आहे स्नेह तसा आहे वासुरां प्रेम हा करी ॥ ३६ ॥

अखिलात्मनि = सर्वत्र आत्मरूपाने पाहणार्‍या - वासुदेवे इव - श्रीकृष्णाच्या ठिकाणी जसे तसे - सात्मनः व्रजस्य - माझ्यासह ह्या गोकुळवासी जनांचे - तोकेषु - गोपबालकांच्या ठिकाणी - अद्भुतं अपूर्वं प्रेम - आश्चर्यजनक व विलक्षण प्रेम - वर्धते - वाढत आहे - किम् एतत् (स्यात्) - हे का असावे. ॥३६॥

हे काय आश्चर्य आहे ! व्रजवासींचे आणि माझे सर्वात्मा श्रीकृष्णांवर जसे विलक्षण प्रेम आहे, तसेच ही बालके आणि वासरे यांच्यावरही वाढत चालले आहे ! (३६)


केयं वा कुत आयाता दैवी वा नार्युतासुरी ।
प्रायो मायास्तु मे भर्तुः नान्या मेऽपि विमोहिनी ॥ ३७ ॥
माया ही कोठुनी आली देवता दानवीय कां ।
माणुसी कशि ही होय प्रभूची शक्ति ही खरी ॥ ३७ ॥

का इयं (माया) - ही कोणती माया - कुतः आयाता - कोठून आली - दैवी वा नारी उत आसुरी - देवांची किंवा मनुष्यांची किंवा असुरांची - मे अपि विमोहिनी - मला सुद्धा मोहित करणारी - माया - माया - प्रायः - बहुतकरून - मे भर्तुः - माझ्या स्वामीची अर्थात श्रीकृष्णाची - अस्तु - असावी - अन्या न - दुसर्‍याची नव्हे. ॥३७॥

ही कोणती माया आहे ? कुठून आली ? ही एकाद्या देवतेची, मनुष्याची की असुराची आहे ? नाही. हे शक्य नाही. कारण ही तर माझ्या प्रभूचीच माया आहे. कारण मला मोहित करू शकेल असे अन्य कोणाच्याही मायेमध्ये सामर्थ्य नाही. (३७)

विवरण :- गोवर्धन पर्वतावर गायी चरत असता जवळच्याच वनात आपली वासरे चरत असलेली त्यांना दिसली. तेव्हा त्यांना अनावर असा पान्हा फुटला. धावत जाऊन त्या गायींनी वासरांना चाटायला सुरवात केली. वासरांबरोबरच पूर्वीची गोपबालकेहि होती. त्या सर्वांबद्दलच गोप-गोपींना विलक्षण प्रेम वाटू लागले. अगदी बलरामालाहि. याचे बलरामास आश्चर्य वाटले. न पाहिलेल्या वासरांबद्दल, बालकांबद्दल आत्यंतिक प्रेम आणि तेहि सतत वृद्धिंगत होणारे ! याचे कारण काय ? का ही कृष्णाची माया असावी ? या विचारांनी बलराम गोंधळून गेला. (३६-३७)



इति सञ्चिन्त्य दाशार्हो वत्सान् सवयसानपि ।
सर्वानाचष्ट वैकुण्ठं चक्षुषा वयुनेन सः ॥ ३८ ॥
बळीने ज्ञान दृष्टीने पाहता वासरे तसे ।
गोपाळ सर्व ते कृष्ण दिसले कृष्ण रूपची ॥ ३८ ॥

सः दाशार्हः - तो बलराम - इति संचिन्त्य - असा विचार करून - सर्वान् सवयसान् वत्सान् अपि - बरोबरीच्या सर्व बालकांना व वासरांना सुद्धा - वयुनेन चक्षुषा - ज्ञानदृष्टीने - वैकुण्ठम् - श्रीकृष्णरूपाने - आचष्ट - पाहता झाला. ॥३८॥

असा विचार करून बलरामांनी ज्ञानदृष्टीने पाहिले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ही सर्व वासरे आणि गोपाल म्हणजे श्रीकृष्णच आहेत. (३८)


नैते सुरेशा ऋषयो न चैते
( मिश्र )
     त्वमेव भासीश भिदाश्रयेऽपि ।
सर्वं पृथक्त्वं निगमात् कथं वदे-
     त्युक्तेन वृत्तं प्रभुणा बलोऽवैत् ॥ ३९ ॥
( इंद्रवज्रा )
हे गोप बाळे बछडे नि देव
     ऋषी न कोणी तव रूप सारे ।
कृपा करोनी मज सांग कृष्णा
     तुझीच रूपे दिसती अनंत ।
ब्रह्माजिचे कृत्य तदा हरीने
     बळीस सारे कथिले पहा ते ॥ ३९ ॥

ईश - हे परमेश्वरा - एते - ही वासरे - ऋषयः - ऋषींचे अंश - न - नव्हेत - च - आणि - एते - हे गोपबालक - सुरेशः - देवांचे अंश - न - नव्हेत - भिदाश्रये अपि - भेदाचा आश्रय केलेल्या सर्वांत सुद्धा - त्वम् एव - तूच - भासि - भासतोस - सर्वं कथं (भूतं) - हे सर्व कसे झाले - पृथक् त्वं वद - उघड करून तू सांग - इति उक्तेन प्रभुणा - असे विचारलेल्या श्रीकृष्णाने - निगमात् (उक्तं) वृत्तं - संक्षेपाने सांगितलेले वृत्त - बलः अवैत् - बलराम जाणता झाला. ॥३९॥

तेव्हा ते श्रीकृष्णांना म्हणाले - "भगवन् ! हे गोपाळ देव नाहीत आणि वासरे ऋषी नाहीत. या वेगवेगळ्या रूपांचा आश्रय घेऊनसुद्धा आपण एकटेच या रूपांमध्ये दिसत आहात. आपण एकटेच अशा प्रकारे वेगवेगळेपणाने का दिसत आहात, ते थोडक्यात स्पष्ट करून सांगा." तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाची किमया सांगितली आणि बलरामांनी ती जाणली. (३९)

विवरण :- अंतर्ज्ञानाने बलरामाला कळले की, गोवत्स म्हणजे ऋषी. व गोपबालके हे देवाचे अंश. परंतु त्या सर्वांमध्येहि कृष्ण आहेच. मग ते वेगळेहि आहेत आणि एकहि आहेत. हे कसे ? हा बलरामाला पडलेला प्रश्न. (३९)



( अनुष्टुप् )
तावदेत्यात्मभूरात्म-मानेन त्रुट्यनेहसा ।
पुरोवदाब्दं क्रीडन्तं ददृशे सकलं हरिम् ॥ ४० ॥
( अनुष्टुप् )
ब्रह्माजी ब्रह्मलोकीचा व्रजात पातला असे ।
समयी त्रुटी ती झाली पाही सर्व जसे तसे ।
कृष्ण नी बाळ वत्सांना क्रीडता पहिल्या परी ॥ ४० ॥

तावत् - तितक्यात - आत्मभूः - ब्रह्मदेव - आत्ममानेन - आपल्या कालमानाप्रमाणे - त्रुटयनेहसा - एक चुटकी वाजविण्यास जेवढा वेळ लागतो तेवढया वेळाने - एत्य - येऊन - पुरोवत् अब्दं क्रीडन्तं - पूर्वीप्रमाणेच एक वर्षापर्यंत क्रीडा करणार्‍या - सकलं हरिम् - सर्व गोपबालक व वासरे ह्यांसह श्रीकृष्णाला - ददृशे - पाहता झाला. ॥४०॥

तोपर्यंत ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून व्रजामध्ये परत आले. त्यांच्या कालमानाने आतापर्यंत फक्त एक त्रुटी (तीक्ष्ण सुईने कमळाच्या पानाला छेद देण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा) इतका काळच झाला होता. त्यांनी पाहिले की, भगवान श्रीकृष्ण, गोपाल आणि वासरांच्याबरोबर एक वर्षापूर्वी प्रमाणेच क्रीडा करीत आहेत. (४०)


यावन्तो गोकुले बालाः सवत्साः सर्व एव हि ।
मायाशये शयाना मे नाद्यापि पुनरुत्थिताः ॥ ४१ ॥
गोकुळी जेवढी बाळे तेवढी झोपवीच मी ।
जागृत दिसती येथे कसे हे घडले असे ॥ ४१ ॥

गोकुले - गोकुळात - यावन्तः - जितकी - सवत्साः बालाः - वासरांसह मुले - सर्वे एव हि - सर्वच जण - मे मायाशये शयानाः (सन्ति) - माझ्या मायाजाळात झोपलेले आहेत - अद्य अपि उत्थिताः न - अजून उठले नाहीत. ॥४१॥

ते विचार करू लागले, "गोकुळात जितके गोपाळ आणि वासरे होती ते तर माझ्या मायारूपी शय्येवर झोपलेले असून अजून उठलेले नाहीत." (४१)

विवरण :- ब्रह्मदेवाने गोपबालकांना आपल्या मायाशक्तीने एक वर्षभर झोपवून ठेवले होते. तो ब्रह्मदेवाचा त्रुटीएवढा काल होता. (त्रुटि = एक क्षणाचा एक चतुर्थांश भाग) पण मानवाचा तो एक वर्षाचा कालावधी होता. त्यानंतर ती बालके रामकृष्णांसह खेळताना त्यास दिसून आली. (४१)



इत एतेऽत्र कुत्रत्या मन्माया मोहितेतरे ।
तावन्त एव तत्राब्दं क्रीडन्तो विष्णुना समम् ॥ ४२ ॥
मोहीत जेवढे केले तेवढे दिसती कसे ।
सर्व हे कृष्णजी साठी कसे खेळति वर्ष हे ॥ ४२ ॥

अत्र - येथे - इतः - याहून - मन्मायामोहितेतरे - माझ्या मायेने मोहित झालेले नाहीत असे - तत्र - त्या गोकुळात - विष्णुना समं - श्रीकृष्णासह - तावन्तः एव - तितकेच - अब्दं क्रीडन्तः - एक वर्षपर्यंत खेळणारे - एते - हे गोपबालक - कुत्रत्याः (सन्ति) - कोठून आलेले असावे ॥४२॥

तर मग माझ्या मायेने मोहित झालेल्या गोपाळ आणि वासरांव्यतिरिक्त, हे तितकेच दुसरे बालक आणि वासरे, हे एक वर्षापासून भगवंतांच्या बरोबर खेळत आहेत, ते कुठून आले ? (४२)


एवमेतेषु भेदेषु चिरं ध्यात्वा स आत्मभूः ।
सत्याः के कतरे नेति ज्ञातुं नेष्टे कथञ्चन ॥ ४३ ॥
ब्रह्माजी ज्ञानदृष्टीने पाहती परि ना कळे ।
खरे खोटे ययीं भेद न जाणी ध्यान लावुनी ॥ ४३ ॥

एवं - याप्रमाणे - एतेषु भेदेषु - हे दोन प्रकारचे भिन्न वत्स दिसत असता - सः आत्मभूः - तो ब्रह्मदेव - के सत्याः - कोणते खरे - कतरे न - कोणते खरे नाहीत - इति चिरं ध्यात्वा - असा पुष्कळ काल विचार करूनहि - कथंचन ज्ञातुं न ईष्टे - कशाहि रीतीने जाणण्यास समर्थ झाला नाही ॥४३॥

ब्रह्मदेवांनी पुष्कळ वेळपर्यंत विचार करूनही या दोहोपैकी कोणते खरे आणि कोणते कृत्रिम हे ते मुळीच जाणू शकले नाहीत. (४३)


एवं सम्मोहयन् विष्णुं विमोहं विश्वमोहनम् ।
स्वयैव माययाजोऽपि स्वयमेव विमोहितः ॥ ४४ ॥
कृष्णाने मोहिले माये माया ना स्पर्शिते तया ।
कृष्णाला मोहवायाते पाही ब्रह्मचि मोहिले ॥ ४४ ॥

एवं - याप्रमाणे - विमोहं - स्वतः मोहरहित असून - विश्वमोहनं - जगाला मोहित करणार्‍या - विष्णुं - श्रीकृष्णाला - स्वयं मायया एव संमोहयन् - आपल्या मायेनेच मोहित करू पाहणारा - अजः अपि - ब्रह्मदेव सुद्धा - स्वयम् एव विमोहितः - स्वतःच मोहित झाला ॥४४॥

स्वतः मोहापासून दूर राहून विश्वाला मोहित करणार्‍या श्रीकृष्णांना, ब्रह्मदेव आपल्या मायेने मोहित करण्यास निघाले होते. परंतु ते स्वतःच आपल्याच मायेने मोहित झाले. (४४)


तम्यां तमोवन्नैहारं खद्योतार्चिरिवाहनि ।
महतीतरमायैश्यं निहन्त्यात्मनि युञ्जतः ॥ ४५ ॥
उजेडी काजवा तैसी अंधारी घळ ना दिसे ।
संतांना मोहिता क्षुद्र स्वताचे तेज नाशिती ॥ ४५ ॥

तम्यां - काळोख्या रात्री - नैहारं तमोवत् - धुक्यापासून होणार्‍या अंधकाराप्रमाणे - अहनि - दिवसा - खद्योतार्चिः इव - काजव्याच्या प्रकाशाप्रमाणे - महति युञ्जतः - महापुरुषाचे ठिकाणी उपयोजिणार्‍याची - इतरमाया - साधारण माया - आत्मनि - स्वतःच्या ठिकाणी असणार्‍या - ऐश्यं - सामर्थ्याला - निहन्ति - नष्ट करित्ये ॥४५॥

ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात धुक्याच्या अंधाराचा आणि दिवसाच्या प्रकाशात काजव्याच्या प्रकाशाचा मागमूसही लागत नाही, त्याचप्रमाणे जेव्हा क्षुद्र पुरुष महापुरुषांवर आपल्या मायेचा प्रयोग क्रतात, तेव्हा ते त्यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत. उलट त्या क्षुद्रांचाच प्रभाव ते नाहीसा करून टाकतात. (४५)

विवरण :- ब्रह्मदेवाने झोपवून ठेवलेली गोपबालके भगवान विष्णूचे अंश होते. पर्यायाने ब्रह्मदेवाने विष्णूवर आपल्या मायेचा प्रभाव टाकला होता. वास्तविक इथे विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण, मोहात पडावयास हवा होता. (बालकांमधील फरक ओळखणे इ. बाबतीत) पण झाले उलटेच. ब्रह्मदेवालाच समोरील गोप आणि आपण मायावित केलेले गोप यातील फरक ओळखता आला नाही. माया निर्माण करणारा स्वतःच गोंधळून गेला. (४५)



तावत्सर्वे वत्सपालाः पश्यतोऽजस्य तत्क्षणात् ।
व्यदृश्यन्त घनश्यामाः पीतकौशेयवाससः ॥ ४६ ॥
विचार करिता ब्रह्म्या दिसती कृष्णरूप ते ।
शंख चक्र गदा पद्‌म शिरीं मुकुट कुंडले ॥ ४६ ॥

ताक्त् - तितक्यात - पश्यतः अजस्य - पहाणार्‍या ब्रह्मदेवाला - सर्वे वत्सपालाः - सर्व वत्सरक्षक गोपबालक - तत्क्षणात् - एकाएकी - घनश्यामाः - मेघाप्रमाणे कृष्णकांतीचे - पीतकौशेयवाससः - पिवळे रेशमी वस्त्र धारण करणारे असे - व्यदृश्यन्त - दिसले ॥४६॥

तेवढ्यात ब्रह्मदेवांना समोरच, सर्व गोपाळ आणि वासरे श्रीकृष्णांच्या रूपात दिसू लागले. ते सर्वजण ढगांप्रमाणे श्यामवर्ण, पीतांबरधारी, (४६)


चतुर्भुजाः शङ्‌खचक्र गदाराजीवपाणयः ।
किरीटिनः कुण्डलिनो हारिणो वनमालिनः ॥ ४७ ॥
कंथात वनमाला नी नेसले पीतवस्त्र ते ।
श्यामवर्ण असे सारे भुजा चार तशा तयां ॥ ४७ ॥

चतुर्भुजाः - चार हातांचे - शङ्खचक्रगदाराजीवपाणयः - शंख, चक्र, गदा व कमळ ज्यांच्या हातात आहे असे - किरीटिनः - किरीट घातलेले - कुण्डलिनः - कानात कुंडले असलेले - हारिणः - गळ्यात हार घातलेले - वनमालिनः - गळ्यात वनमाळा घातलेले ॥४७॥

शंख, चक्र, गदा आणि पद्म यांनी युक्त असे चार हात असलेले, मस्तकांवर मुगुट, कानांमध्ये कुंडले, कंठामध्ये मोत्यांचे हार व वनमाळा धारणे केलेले दिसत होते. (४७)


श्रीवत्साङ्‌गददोरत्‍न कम्बुकङ्‌कणपाणयः ।
नूपुरैः कटकैर्भाताः कटिसूत्राङ्‌गुलीयकैः ॥ ४८ ॥
श्रीवत्स चिन्ह वक्षासी भुजासीं बाजुबंद ते ।
जडीत शंख आकार कंकणे करि शोभली ॥ ४८ ॥

श्रीवत्सांगददोरत्नकम्बु - श्रीवत्सलांछन बाहुभुषणे, गळ्यांत अनेक रत्ने, - कंकणपाणयः - व मनगटात ज्यांच्या कंकणे आहेत असे - नूपुरैः - पैजणांनी - कटकैः - कड्यांनी - कटिसूत्रांगुलीयकैः - कडेदोरे व अंगठ्या यांनी - भाताः - शोभणारे ॥४८॥

त्यांच्या वक्षःस्थळावर श्रीवत्स चिन्हे, बाहूमध्ये बाजूबंद, मनगटांमध्ये शंखाकार रत्‍नजडित कडी, पायांमध्ये नूपूरे आणि कडी, कमरेला करदोटे व बोटांमध्ये आंगठ्या झगमगत होत्या. (४८)


आङ्‌घ्रिमस्तकमापूर्णाः तुलसीनवदामभिः ।
कोमलैः सर्वगात्रेषु भूरिपुण्यवदर्पितैः ॥ ४९ ॥
कोवळा सर्व अंगाशी तुळशीमाळ ही गळां ।
भाग्यवंत अशा भक्ते घातली जी तयां गळां ॥ ४९ ॥

सर्वगात्रेषु - सर्व अवयवांच्या ठिकाणी - भूरिपुण्यवदर्पितैः - पुष्कळ पुण्य संपादन केलेल्या पुरुषांनी अर्पिलेल्या - कोमलैः - कोमल - तुलसीनवदामभिः - तुळशीच्या नव्या माळांनी - आंघ्रिमस्तकं - ज्यांचे पायापासून मस्तकापर्यंतचे - आपूर्णाः - सर्व शरीर भरून गेले आहे असे ॥४९॥

त्यांनी पायापासून मस्तकापर्यंत सर्वांगावर, अत्यंत पुण्यवान भक्तांनी वाहिलेल्या कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा धारण केल्या होत्या. (४९)


चन्द्रिकाविशदस्मेरैः सारुणापाङ्‌गवीक्षितैः ।
स्वकार्थानामिव रजः सत्त्वाभ्यां स्रष्टृपालकाः ॥ ५० ॥
कटाक्षदृष्टि ती मोही चांदणीहास्य फाकले ।
भासले रज सत्त्वाने भक्तांना तोषवी बहू ॥ ५० ॥

चंद्रिकाविशदस्मेरैः - चांदण्याप्रमाणे शुभ्र मंद हास्यांनी - सारुणापाङ्गवीक्षतैः - आरक्तवर्ण कटाक्षाने युक्त अशा अवलोकनांनी - स्वकार्थानां (पूरणाय) - आपल्या भक्तांचे मनोरथ पुरविण्याकरिता - रजः सत्वाभ्यां - रजोगुण व सत्त्वगुण यांनी - (अवतीर्णाः) - युक्त होऊन अवतरलेल्या - स्त्रष्टुपालकाः - सृष्ट्युत्पत्ति व सृष्टिरक्षण करणार्‍या - इव (द्योतमानाः) - परमेश्वराप्रमाणे शोभणारे ॥५०॥

त्यांचे हास्य चांदण्याप्रमाणे उज्ज्वल होते आणि लालसर नेत्रांच्या कटाक्षांनी ते पाहात होते. असे वाटत होते की, जणू काही या दोहोंच्याद्वारा सत्त्वगुण आणि रजोगुणाचा स्वीकार करून भक्तजनांच्या मनांत इच्छा निर्माण करून त्या ते पूर्ण करीत आहेत. (५०)


आत्मादिस्तम्बपर्यन्तैः मूर्तिमद्‌भिः चराचरैः ।
नृत्यगीताद्यनेकार्हैः पृथक् पृथक् उपासिताः ॥ ५१ ॥
दुसरा ब्रह्मजी तेथे चराचर तृणांकुरे ।
गाती नी नाचती सर्व कृष्णां पुजाहि अर्पिती ॥ ५१ ॥

नृत्यगीताद्यनेकार्हैः - नृत्य, गायन इत्यादि अनेक गोष्टी करण्यास योग्य अशा - आत्मादिस्तम्बपर्यन्तैः - परमेश्वरापासून तो तृणादिकापर्यंतच्या - मूर्तिमद्भिः चराचरैः - मूर्तिमंत स्थावर जंगम प्राण्यांनी - पृथक् पृथक् - निरनिराळ्या रीतीने - उपासिताः - सेविलेले ॥५१॥

स्वतःपासून ते गवताच्या काडीपर्यंत सर्व चराचर जीव मूर्तिमंत होऊन नाचत-गात अनेक प्रकारच्या पूजासामग्रीने भगवंतांच्या त्या वेगवेगळ्या सर्व रूपांचीच उपासना करीत आहेत. (५१)


अणिमाद्यैर्महिमभिः अजाद्याभिर्विभूतिभिः ।
चतुर्विंशतिभिस्तत्त्वैः परीता महदादिभिः ॥ ५२ ॥
अणिमा गरिमा सिद्धी माया विद्या विभूती नी ।
चोवीस ते महत्तत्वे कृष्णाने घेरिले असे ॥ ५२ ॥

अणिमाद्यैः महिमभिः - अणिमादि अष्टैश्वर्यांनी - अजाद्याभिः विभूतिभिः - ब्रह्मादि विभूतींनी - महदादिभिः - महतत्त्वादिक - चतुर्विंशतिभिः तत्त्वैः - चोवीस तत्त्वांनी - परीताः - वेढिलेले. ॥५२॥

अणिमा, महिमा इत्यादि सिद्धी, माया, विद्या इत्यादि विभूती आणि महत्तत्त्व इत्यादि चोवीस तत्त्वे यांनी त्यांना चारी बाजूंनी वेढले आहे. (५२)


कालस्वभावसंस्कार कामकर्मगुणादिभिः ।
स्वमहिध्वस्तमहिभिः मूर्तिमद्‌भिः उपासिताः ॥ ५३ ॥
काल संस्कार इच्छा नी कर्म नी फळ मूर्तिमान् ।
हरिसी सेविती नित्य अस्तित्व संपवोनिया ॥ ५३ ॥

स्वमहिध्वस्त महिभिः - भगवंताच्या माहात्म्याने ज्याचे महत्व नष्ट झाले आहे अशा - मूर्तिमद्भिः - मूर्तिमंत - कालस्वभावसंस्कार - काल, स्वभाव, संस्कार, - कामकर्मगुणादिभिः - कामना, कर्मे व गुण इत्यादिकांनी - उपासिताः - सेविलेले. ॥५३॥

काल, स्वभाव, संस्कार, कामना, कर्म, विषय इत्यादि सर्व मूर्तिमंत होऊन भगवंतांच्या प्रत्येक रूपाची उपासना करीत आहेत. भगवंतांच्या समोर ती सर्व तत्त्वे आपले अस्तित्व गमावून बसली होती. (५३)


सत्यज्ञानानन्तानन्द मात्रैकरसमूर्तयः ।
अस्पृष्टभूरिमाहात्म्या अपि ह्युपनिषद्‌दृशाम् ॥ ५४ ॥
सीमीत नच हा काळां त्रिकालऽबाधि सत्य हा ।
अनंतो तेज मोदो हा वेदही गाउ ना शके ॥ ५४ ॥

सत्यज्ञानानन्तानंद - सत्य, ज्ञान, अनंत व आनंद - मात्रैकरसमूर्तयः - ह्यांनीच केवळ ज्यांच्या रसरूपी मूर्ती बनल्या आहेत असे - उपनिदृशाम् अपि - आत्मज्ञानी लोकांच्या दृष्टींनाही खरोखर - अस्पृष्टभूरिमाहात्म्याः हि - कळलेले नाही मोठे माहात्म्य ज्यांचे असे दिसले. ॥५४॥

ते सर्व सत्य, ज्ञान, अनंत, आनंदस्वरूप आहेत, एकरस आहेत. तसेच तत्त्वज्ञान्यांची सुद्धा दृष्टी त्यांच्या अनंत महिम्याला स्पर्शही करू शकत नाही. (५४)


एवं सकृद् ददर्शाजः परब्रह्मात्मनोऽखिलान् ।
यस्य भासा सर्वमिदं विभाति सचराचरम् ॥ ५५ ॥
परमात्मा परब्रह्म श्रीकृष्णरूप सर्व ते ।
ब्रह्म्याने पाहिले सर्व व्यापला जो चराचरी ॥ ५५ ॥

अजः - ब्रह्मदेव - एवं - याप्रमाणे - अखिलान् - सर्वांना - परब्रह्मात्मनः - परमेश्वररूपी - सकृत् ददर्श - एकदाच पाहता झाला - यस्य - ज्या परमेश्वराच्या - भासा - तेजाने - सचराचरं इदं सर्वं - स्थावरजंगमात्मक हे संपूर्ण जग - विभाति - प्रकाशते. ॥५५॥

अशाप्रकारे ब्रह्मदेवांनी एकाच वेळी पाहिले की, ज्यांच्या प्रकाशाने हे सर्व चराचर जग प्रकाशित होत आहे, त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच ही रूपे आहेत. (५५)


ततोऽतिकुतुकोद्‌वृत्त स्तिमितैकादशेन्द्रियः ।
तद्धाम्नाभूदजस्तूष्णीं पूर्देव्यन्तीव पुत्रिका ॥ ५६ ॥
आश्चर्य जाहले ब्रह्म्या इंद्रियीं क्षुब्ध स्तब्धला ।
मौनी निस्तेज ही झाला स्तब्धची राहिला उभा ॥ ५६ ॥

ततः - नंतर - अनिकुतुकोद्वत्य - अत्यंत कौतुकाने द्रुष्टि वळवून - स्तिमितैकादशेन्द्रियः अजः - ज्याची अकरा इंद्रिये स्तब्ध झाली आहेत असा ब्रह्मदेव - तद्धाम्ना - त्याच्या तेजाने - पूर्देव्यन्ति पुत्रिका इव - ग्रामदेवतेपुढे असणार्‍या पुतळीप्रमाणे - तूष्णीं अभूत् - स्तब्ध झाला. ॥५६॥

हे अत्यंत आश्चर्यमय दृश्य पाहून ब्रह्मदेव चकित झाले. त्यांची अकराही इंद्रिये भान विसरली. भगवंतांच्या तेजापुढे ते मौन झाले. जणू काही व्रजाच्या देवतेजवळ एखादी बाहुली उभी असावी. (५६)


( शिखरिणी )
इतीरेशेऽतर्क्ये निजमहिमनि स्वप्रमितिके ।
     परत्राजातोऽतन् निरसनमुखब्रह्मकमितौ ।
अनीशेऽपि द्रष्टुं किमिदमिति वा मुह्यति सति
     चछादाजो ज्ञात्वा सपदि परमोऽजाजवनिकाम् ॥ ५७ ॥
( शिखरिणी )
हरिची ही ऐसी महति नच माया शिवितसे ।
न हो वर्णो त्याला श्रुतिहि वदती ब्रह्म न असे ।
न तो ब्रह्मा जाणी सकल असुनी ज्ञानहि तया ।
तशी माया लोपी हरिच बघता स्तब्धहि तया ॥ ५७ ॥

अतर्क्ये - ज्याविषयी तर्क करिता येत नाही असा - निजमहिमनि - अलौकिक माहात्म्य असणारा - स्वप्रमितिके - ज्याच्याजवळ स्वयंप्रकाश सुख आहे असा - अजातः - जन्मरहित - परत्र - मायेच्या पलीकडे असणारा - अतन्निरसनमुखब्रह्मकमितौ - ब्रह्ममुखाने अध्यात्मज्ञानाच्या योगेच ज्ञान होणारे आहे असा - इरेशे - वाक्पति ब्रह्मदेव - इति मुह्यति सति - अशा रीतीने मोहित झाला असता - वा - किंवा - इदं किम् इति - हे काय आहे असे म्हणून - द्रष्टुम् अपि अनीशे (सति) - पाहण्यासही असमर्थ झाला असता - परमः अजः - श्रेष्ठ श्रीकृष्ण - सपदि - तत्काळ - (तत्) ज्ञात्वा - ते जाणून - अजाजवनिकां - मायेच्या पडद्याला - चछाद - दूर करिता झाला. ॥५७॥

ज्यांचे स्वरूप जाणणे तर्काच्या पलिकडे आहे, ज्यांचा महिमा असाधारण आहे, जे स्वयंप्रकाश, आनंदस्वरूप आणि मायेच्या पलीकडील आहेत, वेदांत सुद्धा ज्यांचे साक्षात् वर्णन करण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांच्यापेक्षा वेगळ्याचा निषेध करून आनंदस्वरूप ब्रह्माचे तो काहीसे दिग्दर्शन करतो, त्या भगवंतांच्या दिव्य स्वरूप पाहून सरस्वतीपती ब्रह्मदेव हे काय आहे, हे न कळल्याने दिङ्‌मूढ झाले व त्यांच्या रूपांना पाहाण्यासही असमर्थ ठरले. हे जाणून श्रीकृष्णांनी लगेच आपल्या मायेचा पडदा हटविला. (५७)

विवरण :- सर्व बालके आणि वासरे ब्रह्मदेवाला हुबेहुब कृष्णाप्रमाणे दिसू लागली. तो अत्यंत आश्चर्यचकित झाला. त्याची सर्व (एकादश) इंद्रिये निस्तब्ध झाली. (पाच कर्मेंद्रिये, वाक्, पाणि, पाद, पायू, उपस्थ) + पाच ज्ञानेंद्रिये, (कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक आणि मन = अकरा इंद्रिये) गोकुळातील एखाद्या देवीसमोरील पुतळ्याप्रमाणे (बाहुलीप्रमाणे) तो निश्चल उभा राहिला. (५७)



( अनुष्टुप् )
ततोऽर्वाक्प्रतिलब्धाक्षः कः परेतवदुत्थितः ।
कृच्छ्राद् उन्मील्य वै दृष्टीः आचष्टेदं सहात्मना ॥ ५८ ॥
( अनुष्टुप् )
सचेत जाहला ब्रह्मा उघडी नेत्र तेधवा ।
स्वदेह पाहिला तेंव्हा शकला पाहु विश्व हे ॥ ५८ ॥

ततः - नंतर - अर्वाक्प्रतिलब्धाक्षः - बाह्यदृष्टीने अवलोकन करणारा - परेतवत् उत्थितः - मेलेला मनुष्य उठावा त्याप्रमाणे उठलेला - कः - ब्रह्मदेव - कृच्छ्‌रात् दृष्टिः उन्मील्य - कष्टाने डोळे उघडून - आत्मना सह - स्वतःसह - इदं - हे - आचष्ट वै - खरोखर पाहता झाला. ॥५८॥

यामुळे ब्रह्मदेवांना बाह्यज्ञान झाले. ते जणू मरून पुन्हा जिवंत झाले. त्यांनी कसेबसे डोळे उघडले. तेव्हा कुठे त्यांना आपले शरीर आणि हे जग दिसू लागले. (५८)


सपद्येवाभितः पश्यन् दिशोऽपश्यत् पुरःस्थितम् ।
वृन्दावनं जनाजीव्य द्रुमाकीर्णं समाप्रियम् ॥ ५९ ॥
चौफेर पाहता ब्रह्मा दिसले व्रज तेधवा ।
डौरले वृक्ष तैं पर्णे फळ पुष्पहि दाटले ॥ ५९ ॥

सपदि एव - तत्काळच - दिशः अभितः पश्यन् - दिशांच्या सभोवार पाहून - पुरः स्थितं - पुढे असलेल्या - जनाजीव्यद्रुमाकीर्णं - लोकांच्या उपजीविकेचे साधनभूत जे वृक्ष त्यांनी वेष्टिलेल्या - समाप्रियम् - सभोवार पसरलेल्या आहेत प्रिय वस्तु जेथे अशा - वृंदावनं - वृंदावनाला - अपश्यत् - पाहता झाला. ॥५९॥

नंतर जेव्हा ते चहूकडे पाहू लागले, तेव्हा त्यांना आधी दिशा आणि नंतर लगेच समोर असलेले, सर्वांना सारखेच प्रिय व जीवांना जीवन देणार्‍या वनराईने व्यापलेले वृंदावन दिसू लागले. (५९)


यत्र नैसर्गदुर्वैराः सहासन् नृमृगादयः ।
मित्राणीवाजितावास द्रुतरुट्तर्षकादिकम् ॥ ६० ॥
वृंदावन लिलाभूमी तृष्णा क्रोध तिथे नसे ।
दुस्त्यज वैर सांडोनी जीव प्रेमेचि राहती ॥ ६० ॥

यत्र - जेथे - नैसर्गदुर्वैराः - स्वभावतःच वैर करणारे - नृमृगादयः - मनुष्य, मृग इत्यादिक - मित्राणि इव - मित्रांप्रमाणे - सह - एकत्र - आसन् - होते - अजितावास - श्रीकृष्णाच्या सहवासाने - द्रुतरुट्तर्षकादिकम् - पळून गेले आहेत रोग तृषा इत्यादि विकार ज्यांतून असे ॥६०॥

तेथे श्रीकृष्णाचा वास असल्यामुळे, क्रोध, लोभ इत्यादि दोष तेथून पळून गेले आहेत आणि तेथे स्वभावतःच परस्परांविषयी हाडवैर असणारी माणसे आणि पशुपक्षीसुद्धा मित्रांप्रमाणे मिळून मिसळून राहात आहेत. (६०)


( वसंततिलका )
तत्रोद्वहत्पशुपवंशशिशुत्वनाट्यं
     ब्रह्माद्वयं परमनन्त-मगाधबोधम् ।
वत्सान् सखीनिव पुरा परितो विचिन्वद्
     एकं सपाणिकवलं परमेष्ठ्यचष्ट ॥ ६१ ॥
( वसंततिलका )
वृंदावनास बघता हरि गोप झाला
     हा कृष्ण एक असुनी तरि कैक झाला ।
धुंडी तरीहि बछडे दहि भात खाता
     लीला अगाध असली नकळे तयाला ॥ ६१ ॥

परमेष्ठी - ब्रह्मदेव - पुरा इव - पूर्वीप्रमाणे - तत्र - तेथे - पशुपवंशशिशुत्वनाट्यं उदवहत् - गोपवंशात बालरूपाने सोंग घेणार्‍या - अद्वयं - एक - परम् - श्रेष्ठ - अनन्तं - अन्तरहित - अगाधबोधं - अपरिमित ज्ञानसंपन्न - वत्सान् (च) सखीन् - वासरांना व सोबत्यांना - परितः विचिन्वन् - जिकडेतिकडे शोधणार्‍या - एकं - मुख्य - सपाणिकवलं - हातात आहे घास ज्याच्या अशा - ब्रह्म - ब्रह्मरुपी श्रीकृष्णाला - अचष्ट - पहाता झाला ॥६१॥

वृंदावन पाहतांना ब्रह्मदेवांना दिसले की, अद्वितीय परब्रह्म, गोपवंशातील बालकाप्रमाणे अभिनय करीत आहे. एक असूनही त्यांना मित्र आहेत, अनंत असूनही ते इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यांचे ज्ञान अगाध असूनही ते हातात घास घेऊन एकटेच पूर्वीप्रमाणेच आपल्या मित्रांना आणि वासरांना शोधीत आहेत. (६१)

विवरण :- पूर्वस्थितीला आलेल्या ब्रह्मदेवाला पूर्वीप्रमाणे समोर वृंदावन दिसले. त्याला हेही कळून चुकले की, श्रीकृष्णाच्या वास्तव्याने तेथील वातावरण अत्यंत पवित्र झाले आहे. वाघ- हरिण, उंदीर-मांजर यांसारख्या आपसात जन्मजात हाडवैर असणार्‍या प्राण्यांनी वैर सोडले असून ते आपापसात मित्राप्रमाणे वागत आहेत. राग-लोभ-क्रोध अशासारख्या षड्‌रिपूंना तेथे थारा नाही. पवित्र व्यक्तींचे वास्तव्य जवळच्या व्यक्तीवर काय परिणाम करू शकते, याचा हा वस्तुपाठच. (६१)



दृष्ट्वा त्वरेण निजधोरणतोऽवतीर्य
     पृथ्व्यां वपुः कनकदण्डमिवाभिपात्य ।
स्पृष्ट्वा चतुर्मुकुट कोटिभिरङ्‌घ्रियुग्मं
     नत्वा मुदश्रुसुजलैः अकृताभिषेकम् ॥ ६२ ॥
हंसावरी बसुनिया पळताच ब्रह्मा
     आला धरेसि पडला जणु स्वर्णदंड ।
चारी मुकुट हरिच्या पदि ठेवुनीया
     मोदाश्रुने हरिपदा अभिषेक केला ॥ ६२ ॥

दृष्ट्वा - पाहून - निज धोरणतः - आपल्या वाहनावरून - त्वरेण - लवकर - अवतीर्य - उतरून - वपुः - शरीर - कनकदण्डम् इव - सोन्याच्या काठीप्रमाणे - पृथ्व्यां आनिपात्य - जमिनीवर पाडून - चतुर्मुकुटकोटीभिः - चार मुकुटांच्या टोकांनी - अङ्घ्रियुग्मं स्पृष्टवा - दोन चरणांना स्पर्श करून - नत्वा - नमस्कार करून - मुदश्रुसुजलैः - आनंदाश्रूंच्या उदकांनी - अभिषेकं अकृत - अभिषेक करिता झाला ॥६२॥

भगवंतांना पाहाताच ब्रह्मदेवांनी आपल्या वाहनावरून घाईघाईने उतरून सोन्याप्रमाणे चमकणार्‍या आपल्या शरीराने जमिनीवर दंडवत घातले. त्यांनी आपल्या चारही मुकुटांच्या अग्रभागाने भगवंतांच्या चरणकमलांना स्पर्श करून नमस्कार केला आणि पवित्र आनंदाश्रूंनी त्यांना न्हाऊ घातले. (६२)


( अनुष्टुप् )
उत्थायोत्थाय कृष्णस्य चिरस्य पादयोः पतन् ।
आस्ते महित्वं प्राग्दृष्टं स्मृत्वा स्मृत्वा पुनः पुनः ॥ ६३ ॥
( अनुष्टुप् )
उठतो स्मरतो लीला पडतो पायि तो पुन्हा ।
वारंवार किती वेळा पदासी पडला असा ॥ ६३ ॥

प्राग्दृष्टं महित्त्वं - पूर्वी पाहिलेले माहात्म्य - पुनःपुनः - वारंवार - स्मृत्वा स्मृत्वा - स्मरून स्मरून - उत्थाय उत्थाय - पुनःपुनः उठून - चिरस्य - पुष्कळकाळपर्यंत - कृष्णस्य पादयोः - श्रीकृष्णाच्या पायावर - पतन् आस्ते - पडून रहाता झाला ॥६३॥

श्रीकृष्णांच्या नुकत्याच पाहिलेल्या महिम्याचे वारंवार स्मरण करीत ते त्यांच्या चरणांवर लोटांगण घालीत आणि पुन्हा पुन्हा उठून लोटांगण घालीत. अशाप्रकारे पुष्कळ वेळपर्यंत ते भगवंतांच्या चरणांवरच पडून राहिले. (६३)


( वंशस्था )
शनैरथोत्थाय विमृज्य लोचने
     मुकुन्दमुद्वीक्ष्य विनम्रकन्धरः ।
कृताञ्जलिः प्रश्रयवान्समाहितः
     सवेपथुर्गद्‍गदयैलतेलया ॥ ६४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( इंद्रवज्रा )
ब्रह्मा हळुने उठताचि नेत्रा
     पुसोनि पाही तरि हात जोडी ।
कांपेहि देहे तरि हात जोडी
     कंपीत शब्दे स्तुति गायिली ही ॥ ६४ ॥

अथ - नंतर - शनैः उत्थाय - हळूच उठून - लोचने विमृज्य - डोळे स्वच्छ करून - मुकुंदं उद्वीक्ष्य - श्रीकृष्णाकडे पाहून - कृताञ्जलिः - हात जोडून - प्रश्रयवान् - नम्र होऊन - समाहितः - समाधान पावलेला - सवेपथुः - कापतकापत - गद्‍गदया इलया - गद्‍गद अशा वाणीने - ऐलत - स्तुति करु लागला ॥६४॥

नंतर हळू हळू ते उठले आणि त्यांनी डोळ्यांतील अश्रू पुसले. भगवंतांना पाहून ते नतमस्तक झाले. ते थरथर कापू लागले. नंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि एकाग्रतेने, सद्‌गदित वाणीने ते भगवंतांची स्तुती करू लागले. (६४)


अध्याय तेरावा समाप्त

GO TOP