श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
द्वादशोऽध्यायः

अघासुरवधः -

अघासुराचा उद्धार -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


( मिश्र )
श्रीशुक उवाच -
क्वचिद्वनाशाय मनो दधद् व्रजात्
     प्रातः समुत्थाय वयस्यवत्सपान् ।
प्रबोधयन् श्रृंगरवेण चारुणा
     विनिर्गतो वत्सपुरःसरो हरिः ॥ १ ॥
( इंद्रवज्रा )
श्रीशुकदेव म्हणतात -
वनात जाण्या उठला हरी तो
     घेवोनि हाती स्वयती शिदोरी ।
फुंकोनि शिंगा कळवी सख्यांना
     वत्सास घेता वनि चालते व्हा ॥ १ ॥

क्वचित् - एकदा - वनाशाय मनः दधत् - वनभोजनाकडे मन लाविणारा - हरिः - श्रीकृष्ण - प्रातः समुत्थाय - सकाळी उठून - चारुणा शृंगरवेण - शिंगाच्या मनोहर ध्वनीने - वयस्यवत्सपान् - बरोबरीच्या वासरे राखणार्‍या गोपालांना - प्रबोधयन् - जागे करीत - वत्सपुरः सरः - वासरांना पुढे करून - व्रजात् विनिर्गतः - गौळवाडयातून बाहेर पडला. ॥१॥

श्रीशुकाचार्य म्हणतात - एके दिवशी नंदनंदनाने वनातच भोजन करण्याच्या विचाराने सकाळी उठून तुतारीच्या मधुर आवाजाने बरोबरीच्या गवळ्यांच्या मुलांना जागविले आणि वासरांना पुढे करून तो व्रजमंडलातून बाहेर पडला. (१)


( इंद्रवंशा )
तेनैव साकं पृथुकाः सहस्रशः
     स्निग्धाः सुशिग्वेत्रविषाणवेणवः ।
स्वान् स्वान् सहस्रो परिसङ्‌ख्ययान्वितान्
     वत्सान् पुरस्कृत्य विनिर्ययुर्मुदा ॥ २ ॥
श्रीकृष्ण प्रेमी कितीएक बाळे
     शिंके छडी बासुरि घेवुनीया ।
हाकीत आले आपुल्याहि वत्सा
     घरातुनी ते मनि मोद झाला ॥ २ ॥

स्निग्धाः - प्रेमळ - सुशिग्वेत्र - चांगली शिंकी, वेताच्या काठया, - विषाणवेणवः - शिंगे व वेणुवाद्ये ही ज्यांच्याजवळ आहेत असे - सहस्त्रशः पृथुकाः - गोपांचे हजारो बालक - तेन एव साकं - त्याच श्रीकृष्णाबरोबर - सहस्त्रोपरिसंख्यया अन्वितान् - हजारांपेक्षा अधिक संख्येने युक्त अशा - स्वान् स्वान् वत्सान् - आपापल्या वासरांना - पुरस्कृत्य - पुढे करून - मुदा विनिर्ययुः - आनंदाने निघाले. ॥२॥

त्याच्याबरोबर त्याच्यावर प्रेम करणारी हजारो मुले सुंदर शिंकी, वेताच्या काठ्या, तुतार्‍या आणि बासर्‍या घेऊन तसेच आपली हजारो वासरे बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने घरातून बाहेर पडली. (२)


( अनुष्टुप् )
कृष्णवत्सैः असङ्‌ख्यातैः यूथीकृत्य स्ववत्सकान् ।
चारयन्तोऽर्भलीलाभिः विजह्रुः तत्र तत्र ह ॥ ३ ॥
( अनुष्टुप् )
हजारो वत्सिं कृष्णाच्या आपुले वत्स मेळिले ।
खेळती जाग जागी ते बाळक्रीडा तशा पहा ॥ ३ ॥

असंख्यातैः कृष्णवत्सैः - अगणित अशा श्रीकृष्णाच्या वासरांसह - स्ववत्सकान् यूथीकृत्य - आपल्या वासरांना कळपात घालून - चारयन्तः - चरवीत - तत्र तत्र ह - त्या त्या ठिकाणी खरोखर - अर्भलीलाभिः विजह्रुः - मुलांच्या खेळांनी खेळू लागले. ॥३॥

श्रीकृष्णाच्या असंख्य वासरांत आपापली वासरे मिसळून त्यांना चारीत ठिकठिकाणी बाललीला करीत ते चालू लागले. (३)


फलप्रबालस्तवक सुमनःपिच्छधातुभिः ।
काचगुञ्जामणिस्वर्ण-भूषिता अप्यभूषयन् ॥ ४ ॥
जर कांचा तशा गुंजा सोन्याचे दागिने तसे ।
पिवळे हिरवे लाल पानांचे खोविती तुरे ।
मोरपंख तसे गेरु धारोनी सजती पहा ॥ ४ ॥

फलप्रवालस्तबक - कवंडलादि फळे, पोवळ्यांचे घोस, - सुमनःपिच्छधातुभिः - पुष्पे व मोरांची पिसे आणि काव आदिकरून धातू यांनी - काचगुञ्जामणि - आणि काच, गुंजा, मणी - स्वर्णभूषिताः अपि - व सुवर्ण यांनी अलंकृत झाले असताहि - (आत्मनः) अभूषयन् - स्वतःला भूषविते झाले. ॥४॥

त्या मुलांची जरी काचा, गुंजा, रत्‍ने आणि सोन्याचे दागिने आंगावर घातले होते, तरीसुद्धा त्यांनी वृंदावनातील फळे, पालवी, रंगी-बेरंगी फुले, मोरपंख तसेच गेरूसारख्या रंगीत मातीनेही स्वतःला सजविले होते. (४)


मुष्णन्तोऽन्योन्य शिक्यादीन् न्ज्ञातानाराच्च चिक्षिपुः ।
तत्रत्याश्च पुनर्दूरात् हसन्तश्च पुनर्ददुः ॥ ५ ॥
शिंके नी बासुरी कोणी ठेविती लपवोनिया ।
कळता पहिल्याला तो दुजाच्या वस्तू फेकितो ॥ ५ ॥

अन्योन्यशिक्यादीन् - एकमेकांची शिंकी इत्यादि वस्तू - मुष्णन्तः - चोरणारे - ज्ञातान् (तान्) - ओळखलेल्या त्या वस्तूंना - आरात् च चिक्षिपुः - दूर फेकून देत - तत्रत्याःच - आणि तेथे असलेले - पुनःदूरात् (चिक्षिपुः) - पुन्हा दूर फेकीत - हसन्तः च - आणि हसत - पुनः ददुः - पुनः ती शिंकी आणून देत. ॥५॥

कोणी एखाद्याचे शिंके चोरून घेई, तर कोणी कोणाची काठी किंवा बासरी ! जेव्हा त्याच्या मालकाला हे कळे, तेव्हा ते घेणारा दुसर्‍याकडे लांब फेकीत असे, दुसरा तिसर्‍याकडे आणि तिसरा आणखी लांब चौथ्याकडे. नंतर ते हसत हसत ज्याचे त्याला देत. (५)


यदि दूरं गतः कृष्णो वनशोभेक्षणाय तम् ।
अहं पूर्वं अहं पूर्वं इति संस्पृश्य रेमिरे ॥ ६ ॥
पाहण्या वनशोभा ती जाता श्रीकृष्ण दूर तो ।
तयाला शिवण्यासाठी स्पर्धाही करिती पहा ॥ ६ ॥

यदि - जर - कृष्णः - श्रीकृष्ण - वनशोभेक्षणाय - वनशोभा पाहण्याकरिता - दूरं गतः - दूर गेला - अहं पूर्वं अहं पूर्वं इति - मी अगोदर मी अगोदर असे म्हणून - तं संस्पृश्य - त्याला स्पर्श करून - रेमिरे - खेळू लागले. ॥६॥

श्रीकृष्ण जरा वनाची शोभा पहात थोडा जरी पुढे निघून गेला तर "अगोदर मी त्याला शिवणार ! अगोदर मी शिवणार !" असे म्हणत सर्वजण त्याच्याकडे पळत जात आणि त्याला शिवून आनंदमग्न होऊन जात. (६)


केचिद् वेणून् वादयन्तो ध्मान्तः शृङ्‌गाणि केचन ।
केचिद् भृंङ्‌गैः प्रगायन्तः कूजन्तः कोकिलैः परे ॥ ७ ॥
बासुरी वाजवी कोणी कोणी शिंगासि फुंकितो ।
कोणी भुंग्यासवे गाती कोकील रव कोणि ते ॥ ७ ॥

केचित् वेणून् वादयन्तः - कित्येक वेणुवाद्ये वाजवीत - केचन - काहीजण - श्रृङगाणि ध्मान्तः - शिंगे फुंकीत - केचित् - कोणी - भृङगैःप्रगायन्तः - भुंग्यांबरोबर गायन करीत - परे - दुसरे कोणी - कोकिलैः कूजन्तः - कोकिळासारखे शब्द करीत. ॥७॥

कोणी बासरी वाजवीत, तर कोणी शिंगे फुंकीत, कोणी कोणी भ्रामरांच्याबरोबर गुणगुणत तर कोणी कोकिळांच्यासारखे "कुहु-कुहु" करीत. (७)


विच्छायाभिः प्रधावन्तो गच्छन्तः साधुहंसकैः ।
बकैः उपविशन्तश्च नृत्यन्तश्च कलापिभिः ॥ ८ ॥
आकाशी उडता पक्षी सावली बघता कुणी ।
तिच्याशी धावती कोणी हंसाची चाल चालती ॥ ८ ॥

विच्छायाभिः प्रधावन्तः - पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावणारे - हंसकैः साधु गच्छन्तः - हंसांबरोबर चांगल्या रीतीने चालणारे - बकैः च उपविशन्तः - आणि बगळ्यांबरोबर बसणारे - कलापिभिः च नृत्यन्तः - आणि मोरांबरोबर नाचणारे असे. ॥८॥

काही मुले आकाशात उडणार्‍या पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावत, तर काहीजण हंसांच्या बरोबर त्यांच्यासारख्या सुंदर गतीने चालत. काहीजण बगळ्यांच्या जवळ त्यांच्यासारखेच डोळे मिटत बसत, तर काहीजण मोरांना नाचताना पाहून त्यांच्याचसारखे नाचत. (८)


विकर्षन्तः कीशबालान् आरोहन्तश्च तैर्द्रुमान् ।
विकुर्वन्तश्च तैः साकं प्लवन्तश्च पलाशिषु ॥ ९ ॥
शेपटी माकडाची ती धरिती मारिती उड्या ।
चढती फांदी फांदीशी वाकुल्या दाविती कुणी ॥ ९ ॥

कीशवालान् - वानरांच्या शेपटयांना - विकर्षन्तः - ओढणारे - तैः च द्रुमान् आरोहन्तः - आणि त्या वानरांच्या शेपटया धरून वृक्षावर चढणारे - विकुर्वन्तः च - आणि चेष्टा करणारे - च - आणि - तैः साकं - त्या वानरांबरोबर - पलाशिषु प्लवन्तः - वृक्षांवर उडया मारणारे असे. ॥९॥

काहीजण वानरांचे शेपूट धरून ओढीत तर दुसरे त्यांच्याबरोबरीने झाडांवर चढत. काहीजण त्यांच्यासारख्या माकडचेष्टा करीत तर दुसरे काही त्यांच्या बरोबरीने एका डहाळीवरून दुसर्‍या डहाळीवर उड्या मारीत. (९)


साकं भेकैर्विलङ्‌घन्तः सरित् प्रस्रवसम्प्लुताः ।
विहसन्तः प्रतिच्छायाः शपन्तश्च प्रतिस्वनान् ॥ १० ॥
नदीत खेळती कोणी प्रतिबिंबास हासती ।
वाकुल्या दाविती येता आपुल्या ध्वनिशी पुन्हा ॥ १० ॥

भेकैः साकं विलङघयन्तः - बेडकांच्या बरोबर उडया मारणारे - सरित्प्रस्रवसंप्लुताः - नदीच्या प्रवाहात बुडी मारुन - प्रचिच्छायाः विहसन्तः - प्रतिबिंबांना हसणारे - प्रतिस्वनान् शपन्तः - आणि प्रतिध्वनीवर ओरडणारे असे. ॥१०॥

काही मुले नदीच्या प्रवाहात बेडकांबरोबर पोहोत त्यांना मागे टाकून पुढे जात, कोणी पाण्यात आपली प्रतिबिंबे पाहून त्यांना हसत; तर काहीजण आपल्याच आवाजाच्या प्रतिध्वनीला नावे ठेवत. (१०)


( इंद्रवज्रा )
इत्थं सतां ब्रह्मसुखानुभूत्या
     दास्यं गतानां परदैवतेन ।
मायाश्रितानां नरदारकेण
     साकं विजह्रुः कृतपुण्यपुञ्जाः ॥ ११ ॥
( इंद्रवज्रा )
संतांसि ती ब्रह्म सुखानुभूती
     जे दास्य घेती हरिच्या पदासी ।
ऐश्वर्यशाली करिता लिला या
     गोपात खेळे बहुपुण्य आत्मा ॥ ११ ॥

कृतपुण्यपुञ्जाः - पुष्कळ पुण्य मिळविलेले गोपबालक - इत्थं - याप्रमाणे - सतां ब्रह्मसुखानुभूत्या - साधूंच्या ब्रह्मविषयक सुखानुभवाने - दास्यं गतानां - सेवा करणार्‍या भक्तांचे - परदैवतेन - श्रेष्ठ दैवतच अशा - मायाश्रितानां (दृष्टया) - अज्ञानाचा आश्रय केलेल्याच्या दृष्टीने नरदारकेण - मनुष्य बालक अशा - (कृष्णेन) साकं - कृष्णासह - विजह्लुः - खेळते झाले. ॥११॥

श्रीकृष्ण ज्ञानी संतांच्यासाठी ब्रह्मानंदाचा मूर्तिमंत अनुभव आहेत, दास्य करणार्‍या भक्तांचे ते आराध्यदैवत आहेत, आणि मायेने मोहित झालेल्या लोकांच्या दृष्टीने मनुष्य-बालक आहेत. त्याच भगवंतांच्याबरोबर ते पुण्यात्मे बालक खेळत होते. (११)


( मिश्र )
यत्पादपांसुः बहुजन्मकृच्छ्रतो
     धृतात्मभिः योगिभिरप्यलभ्यः ।
स एव यद्‌दृग्विषयः स्वयं स्थितः
     किं वर्ण्यते दिष्टमतो व्रजौकसाम् ॥ १२ ॥
अनंतजन्मी जयि पुण्य केले
     त्यांनाच लाभे हरिपादधूळ ।
ते ब्रह्म खेळे नयना समोर
     ते भाग्य वर्णी अशि कोण वाणी ॥ १२ ॥

यत्पादपांसुः - ज्या कृष्णाची चरणधूळ - बहुजन्मकृच्छ्रतःधृतात्मभिः - अनेक जन्मांतील कष्टाने इंद्रिये जिंकिली आहेत ज्यांनी - योगिभिः - अशा योग्यांनाही - अगम्यः (अस्ति) - मिळविता न येणारी आहे - सःएव - तोच - स्वयं - स्वतः - यदृग्विषयः - ज्यांच्या दृष्टीचा विषय - स्थितः - झाला - अतः - याहून - व्रजौकसां - गोकुळवासी जनांचे - दिष्टं - सुदैव - किं वर्ण्यते - काय वर्णावे. ॥१२॥

पुष्कळ जन्म श्रम करून जितेंद्रिय योग्यांनाही ज्यांच्या चरणकमलांची धूळ मिळणेही शक्य नाही, तेच भगवान व्रजवासी गवळ्यांना आपणहून दर्शन देत आहेत, त्यांच्या भाग्याचा महिमा काय वर्णावा ? (१२)

विवरण :- श्रीकृष्णाच्या बाललीला वर्णन करीत असता व्यास महर्षी त्या परमात्म्याचे मूळ रूप नजरेआड होऊ देत नाहीत. इथे 'सतां' आणि 'मायाश्चितानां' या दोन परस्परभिन्न अर्थाचे शब्द त्यांनी वापरले आहेत. सत् = संत, साधू, विद्वान आणि मायाश्चित = कृष्णाला मानव मानणारे. म्हणजेच गोप. इंद्रियनिग्रह, तप, अनुष्ठान, समाधी यानीसुद्धा तत्त्ववेत्या विद्वानाना भगवंताची चरणरज प्राप्त होऊ शकत नाही. पण तोच परमात्मा सामान्य संसारी गोपबालकांशी सवंगडी बनून खेळत होता. यापैकी कोणाचा पुण्यसंचय अधिक ? अर्थातच तत्त्ववेत्त्यांचा. त्यांनाच तो सहजप्राप्य हवा. पण त्याच्यावर भाबडे प्रेम आणि भक्ति करणार्‍या गोपांनाच त्याची प्राप्ती झाली होती. परमेश्वर प्राप्तीसाठी कठोर तप अनुष्ठान यापेक्षा भाबडी भक्तीच अधिक प्रबळ आणि मोलाची ठरते, हे महर्षींना सुचवायचे आहे. (११-१२)



अथ अघनामाभ्यपतन् महासुरः
     तेषां सुखक्रीडनवीक्षणाक्षमः ।
नित्यं यदन्तर्निजजीवितेप्सुभिः
     पीतामृतैः अप्यमरैः प्रतीक्ष्यते ॥ १३ ॥
अघासुरो या समयास आला
     त्याला न साहे सुखी खेळ ऐसा ।
भयान ऐसा भयभीत देव
     मृत्यूस याच्या नित चिंतिती ते ॥ १३ ॥

अथ - नंतर - तेषां सुखक्रीडनवीक्षणाक्षमः - ज्याला त्यांचे आनंदाचे खेळ पहावले नाहीत असा - अघनामा महासुरः अभ्यपतत् - अघ नावाचा मोठा दैत्य जवळ आला - पीतामृतैः - प्याले आहे अमृत ज्यांनी अशा - निजजीवितेप्सुभिः - आपल्या जीविताची इच्छा करणार्‍या - अमरैः अपि - देवांकडूनही - यदन्तः - ज्या दैत्याच्या नाशाची वाट - नित्यं प्रतीक्ष्यते - नित्य पाहिली जाते. ॥१३॥

एवढ्यात अघासुर नावाचा महान दैत्य येऊन थडकला. त्याला त्या मुलांची चाललेली सुखमय क्रीडा पाहवली नाही. तो इतका भयंकर होता की, अमृतपान करून अमर झालेल्या देवतासुद्धा आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या मृत्यूची वाट पहात. होते. (१३)

विवरण :- गोपबालकांच्या निष्पाप बाललीला चालूच होत्या; पण त्यांचा आनंद असुरांना कसा मिळणार ? चालत्या गाडीला खीळ घालण्यातच त्यांना आनंद ! कृष्णाला ठार मारण्यास आता अघासुराचे आगमन झाले. हा असुर कसा ? किती बलवान ? अमृतपान करून अमर झालेल्या देवांनाहि धडकी भरविणारा. असुराची शक्ती यावरून कळते. मात्र हे देव केवळ अमृतप्राशनानेच अमर होत नाहीत. तर ते जीवन सफल करण्यास भगवंताच्या क्रीडांचेहि स्मरण करतात. 'मथुराधिपतेरखिलं मधुरम् ।' कृष्णाचे सर्वच काही मधुर, अगदी क्रीडासुद्धा ! (१३)



दृष्ट्वार्भकान् कृष्णमुखान् अघासुरः ।
     कंसानुशिष्टः स बकीबकानुजः ।
अयं तु मे सोदरनाशकृत्तयोरः
     द्वयोर्ममैनं सबलं हनिष्ये ॥ १४ ॥
हा बंधु सानो बक राक्षसाचा
     धाडीयले यासहि दुष्ट कंसे ।
मनात चिंती अरि बंधुचा हा
     गोपासवे या अजि मारितो मी ॥ १४ ॥

कंसानुशिष्टः - कंसाने आज्ञा दिलेला - बकीबकानुजः - पूतना व बकासुर ह्यांचा कनिष्ठ बंधू - सः अद्यासुरः - तो अघासुर - कृष्णमुखान् अर्भकान् दृष्ट्वा - श्रीकृष्ण आदिकरून बालकांना पाहून - अयं तु - हा श्रीकृष्ण तर - मे सोदरनाशकृत् - माझ्या बंधूचा व भगिनीचा नाश करणारा होय - मम तयोः द्वयोः - माझ्या त्या दोघा बंधुभगिनींच्या स्थानी - एवं सबलं एनं हनिष्ये - ह्या श्रीकृष्णाला मी बळरामासह मारीन. ॥१४॥

अघासुर हा पूतना आणि बकासुराचा लहान भाऊ असून कंसाने त्याला पाठविले होते. श्रीकृष्ण इत्यादि मुलांना पाहून तो विचार करू लागला की, ’माझ्या सख्ख्या भावाला आणि बहिणीला मारणारा हाच होय. म्हणून आज मी याला बलरामासह मारून टाकीन. (१४)


एते यदा मत्सुहृदोस्तिलापः
     कृतास्तदा नष्टसमा व्रजौकसः ।
प्राणे गते वर्ष्मसु का नु चिन्ता
     प्रजासवः प्राणभृतो हि ये ते ॥ १५ ॥
मारुनि यांना भगिनीनि बंधू
     तर्पोनिया मी करितोच तृप्त ।
संतान हा तो जिव माणसाचा
     याच्या वधाने मरतील गोप ॥ १५ ॥

यदा - ज्यावेळी - एते - हे गवळ्याचे मुलगे - मत्सुहृदोः - हे माझ्या दोघा मित्रांचे - तिलापः कृताः (भवन्ति) - तिलोदकाच्या ठिकाणी केले जातील - तदा - त्यावेळी - व्रजौकसः - गोकुळातील लोक - नष्टसमाः (भविष्यन्ति) - नाश पावल्यासारखे होतील - प्राण गते - प्राण गेला असता - वर्ष्मसु - देहाविषयी - का अनुचिन्ता - कसली काळजी - हि - कारण - ये - जे - प्राणभृतः - प्राणधारी पुरुष - ते - ते - प्रजासवः (सन्ति) - प्रजाच आहेत प्राण ज्यांचे असे आहेत. ॥१५॥

हे जर मरून माझ्या भाऊ-बहिणीसाठी तिलांजली बनले, तर बाकी व्रजवासी आपोआप मेल्यासारखेच होतील. कारण संतान हेच प्राण्यांचे प्राण होत. जर प्राणच राहिले नाहीत, तर शरीराची काळजी कशाला ?’ (१५)

विवरण :- आपला मोठा भाऊ बकासुर आणि बहीण पूतना यांच्या वधाचा सूड अघासुराला उगवायचा होता. बलराम व कृष्ण आणि सर्व गोप यांना मारणे यासाठी पुरेसे होते. मग इतर व्रजवासीयांना मारण्यात काहीच अर्थ नव्हता. राम-कृष्ण आणि गोपबालके हेच त्यांना प्राणप्रिय होते. तेच नष्ट झाले की उरले काय ? उरलेले व्रजवासी जिवंत असूनहि मेल्यासारखेच. असुर असूनहि राम-कृष्णाची महती अघासुराला कळली हे विशेष. (१५)



( वंशस्था )
इति व्यवस्याजगरं बृहद् वपुः
     स योजनायाम महाद्रिपीवरम् ।
धृत्वाद्‍भुतं व्यात्तगुहाननं तदा
     पथि व्यशेत ग्रसनाशया खलः ॥ १६ ॥
झाला तदा आजगरोचि दैत्य
     मार्गात आला गिरी थोर जैसा ।
सर्वांस आला गिळण्या पहा हा
     गुहे परी तो पसरोनी तोंड ॥ १६ ॥

तदा - त्यावेळी - खलः सः - दुष्ट असा तो अघासुर - इति व्यवस्यन् - याप्रमाणे निश्चय करून - योजनायाममहाद्रिपीवरम् - चार कोस लांब व मोठ्या पर्वताप्रमाणे पुष्ट असे - अद्‌भुतं - आश्चर्यजनक - व्यात्तगुहाननं - पसरले आहे गुहेसारखे मुख ज्याने असे - बृहत् अजगरं वपुः - मोठे अजगर शरीर - धृत्वा - धारण करून - ग्रसनाशया - गिळण्याच्या इच्छेने - पथि व्यशेत - रस्त्यावर पडून राहिला ॥१६॥

असा निश्चय करून त्या दुष्ट दैत्याने प्रचंड अजगराचे रूप धारण करून तो रस्त्यावर पडून राहिला. त्याचे ते शरीर एक योजन लांब व मोठ्या पर्वताप्रमाणे प्रचंड होते. ते अत्यंत अद्‌भुत होते. सर्व बालकांना गिळून टाकावे, या इच्छेने त्याने गुहेप्रमाणे आपले अवाढव्य तोंड उघडून ठेवले होते. (१६)


( मिश्र )
धराधरोष्ठो जलदोत्तरोष्ठो
     दर्याननान्तो गिरिशृङ्‌गदंष्ट्रः ।
ध्वान्तान्तरास्यो वितताध्वजिह्वः
     परुषानिलश्वासदवेक्षणोष्णः ॥ १७ ॥
तो खालचा ओठ धरेस आणी
     ढगास टेके वरचाही ओठ ।
दाढा जशा पर्वत रांग होती
     जिव्हा तयाची सडके प्रमाणे ।
मुखात अंधार दाटोनी आला
     श्वासात वारा नयनात अग्नि ॥ १७ ॥

धराधरोष्ठः - ज्याचा खालचा ओठ पृथ्वीला चिकटला आहे असा - जलदोत्तरोष्ठः - ज्याचा वरचा ओठ मेघाला जाऊन भिडला आहे असा - दर्याननान्तः - ज्याच्या तोंडाच्या आतील भाग गुहेप्रमाणे विशाल आहे असा - गिरिश्रृङ्गदंष्ट्र - पर्वताच्या शिखराप्रमाणे ज्याच्या दाढा आहेत असा - ध्वान्तान्तरास्यः - अंधकाराप्रमाणे ज्याच्या मुखातील भाग आहे असा - वितताध्वजिह्वः - रस्त्याप्रमाणे लांब आहे जिव्हा ज्याची असा - परुषानिल - सोसाट्याच्या वायूप्रमाणे ज्याचे - श्वासदवेक्षणोष्णः - श्वासोच्छ्वास आहेत व दावानलाप्रमाणे नेत्र आहेत असा - आसीत् - होता ॥१७॥

त्याचा खालचा जबडा जमिनीला आणि वर्चा ओठ आभाळाला टेकला होता. त्याचे जबडे गुहांप्रमाणे होते आणि दाढा पर्वतशिखराप्रमाणे वाटत होत्या. तोंडात घोर अंधकार होता. लांबलचक जीभ सडकेप्रमाणे दिसत होती. श्वास तुफानाप्रमाणे आणि डोळे दावाग्नीप्रमाणे धगधगत होते. (१७)


( अनुष्टुप् )
दृष्ट्वा तं तादृशं सर्वे मत्वा वृन्दावनश्रियम् ।
व्यात्ताजगरतुण्डेन ह्युत्प्रेक्षन्ते स्म लीलया ॥ १८ ॥
( अनुष्टुप् )
अघासुरास पाहोनी बाळांना मौज वाटली ।
वृंदावनी अशी मौज अज्‌गरा सारखी गमे ॥ १८ ॥

सर्वे - सर्व बालक - तादृशं तं दृष्ट्वा - तशा त्या अघासुराला पाहून - वृन्दावनश्रियं मत्वा - वृंदावनाची ही शोभाच आहे असे मानून - लीलया - गमतीने - व्यात्ताजगरतुण्डेन - पसरलेल्या अजगराच्या मुखाशी - उत्प्रेक्षन्ते स्म - कल्पना बसवू लागले ॥१८॥

अघासुराचे असे रूप पाहून मुलांना वाटले की, हा सुद्धा वृंदावनाचाच एखादा देखावा असावा. ते गमतीने कल्पना करू लागले की, हे अजगराचे उघडलेले तोंड तर नसेल ! (१८)


अहो मित्राणि गदत सत्त्वकूटं पुरः स्थितम् ।
अस्मत्सङ्‌ग्रसनव्यात्त व्यालतुण्डायते न वा ॥ १९ ॥
वदती कोणि मित्रांनो सांगा हा जीव भास ना ?
जणू हा गिळण्या आला अजगरी मुख कां न हे ? ॥ १९ ॥

अहो मित्राणि - अहो मित्रहो - गदत - सांगा - पुरःस्थितं सत्त्वकूटं - पुढे उभा असणारा हा मोठा प्राणी - अस्मत्संग्रसन - आम्हाला गिळण्यासाठी - व्यात्तव्यालतुण्डायते न वा - मुख पसरिले आहे असा अजगर तर नाही ना ॥१९॥

कोणी म्हणू लागला, ’मित्रांनो ! सांगा पाहू ! हा जो आमच्यासमोर एकाद्या जीवाप्रमाणे बसला आहे, तो आम्हांला गिळून टाकण्यासाही अजगराच्या उघडलेल्या तोंडाप्रमाणे दिसत नाही का ?’ (१९)


सत्यमर्ककरारक्तं उत्तराहनुवद्‍घनम् ।
अधराहनुवद् रोधः तत् प्रतिच्छाययारुणम् ॥ २० ॥
दुसरा वदतो कोणी ढग हा चमके तसा ।
सूर्याच्या किरणे भासे लाल ओठ जसे यया ॥ २० ॥

सत्यं - खरोखर - उत्तराहनुवत् - वरच्या ओठाप्रमाणे असलेला - अर्ककरारक्तं घनं - सूर्यकिरणांनी तांबडा झालेला मेघ - अधराहनुवत् - खालच्या ओठाप्रमाणे असलेला - तत्प्रतिच्छायया - त्या मेघाच्या पडच्छायेने - अरुणं रोधः - तांबडा झालेला तटप्रदेश ॥२०॥

दुसरा म्हणाला. ’सूर्याची किरणे पडल्याने खरोखरच हे जे लाल झालेले ढग दिसत आहेत, ते असे वाटत आहेत की, तो याचा वरचा ओठ आहे; आणि त्याच आभाळाच्या सावलीने ही जी जमीन लाल दिसत आहे, तो त्याचा खालचा ओठ आहे.’ (२०)


प्रतिस्पर्धेते सृक्किभ्यां सव्यासव्ये नगोदरे ।
तुंगशृंगालयोऽप्येताः तद् दंष्ट्राभिश्च पश्यत ॥ २१ ॥
तिसरा वदला कोणी टेकड्या बघ या कशा ।
अज्‌गरी दात ते जैसे स्वच्छ दाढा कशा पहा ॥ २१ ॥

सव्यासव्ये - उजवी व डावी अशा दोन - नगोदरे - पर्वताच्या गुहा - सृक्किभ्यां - ओष्ठप्रताशी - च - आणि - एताः तुग्ङश्रृग्ङालयः अपि - ही उंच उंच शिखरांची स्थाने सुद्धा - तद्दंष्ट्राभिः - त्याच्या दाढांशी - प्रतिस्पर्धेते - जणू स्पर्धा करीत आहेत - पश्यत - पहा ॥२१॥

तिसरा म्हणाला, "होय ! खरेच आहे ! पहा ना ! या डाव्या-उजव्या बाजूच्या गुहा अजगराच्या जबड्यांसारख्या नाहीत काय. आणि ही उंच उंच शिखरे तर त्याच्या दाढाच वाटतात." (२१)


आस्तृतायाम मार्गोऽयं रसनां प्रतिगर्जति ।
एषां अन्तर्गतं ध्वान्तं एतदप्यन्तः आननम् ॥ २२ ॥
संस्कृत संहितेला अनुसरून समानार्थी श्लोक नाही ॥ २२ ॥

अयं आस्तृतायाममार्गः - हा पसरलेला लांबलचक रस्ता - रसनांप्रतिगर्जति - जिभेशी स्पर्धा करण्याची गर्जना करीत आहे - एषां - ह्या शिखरांच्या - अन्तर्गतं - आतील - एतत् ध्वान्तं - हा अंधकार - अपि अन्तराननम् - जणू त्याच्या मुखाच्या आतील भागच आहे ॥२२॥

चौथा म्हणाला, "अरे मित्रा ! ही लांब-रुंद सडक तर नेमकी अजगराच्या जिभेसारखी वाटते आणि या पर्वत शिखरांच्यामधील अंधकार तर त्याच्या तोंडातील आतल्या भागावरही मात करीत आहे." (२२)


दावोष्णखरवातोऽयं श्वासवद्‍भाति पश्यत ।
तद् दग्धसत्त्वदुर्गन्धोऽपि अन्तरामिषगन्धवत् ॥ २३ ॥
अन्य तो वदला कोणी जंगला आग लागली ।
उष्ण ते वाहती वारे अज्‌गरी श्वास तो जणू
दुर्गंध येइही जैसा कुजके मास आत जैं ॥ २३ ॥

अयं दावोष्णखरवातः - हा वणव्यासारखा उष्ण व रुक्ष वायू - श्वासवत् (अस्ति) - श्वासोच्छवासाप्रमाणे आहे - तद्दग्धसत्त्वदुर्गंन्धः अपि - त्या दावाग्नीने जळून गेलेल्य प्राण्यांचा दुर्गंधहि - अन्तरामीषगन्धवत् - तोंडातील मांसाच्या वासाप्रमाणे - भाति - भासत आहे - पश्यत - पहा ॥२३॥

आणखी एकाने म्हटले, "पहा ! पहा ! या जंगलाला आग लागल्यामुळे ही गरम, जळजळीत हवा येऊ लागली आहे. ती म्हणजे या अजगराचा श्वासच वाटतो. आणि त्या आगीने जळालेल्या प्राण्यांची दुर्गंधी तर अशी वाटत आहे, की जणू काही अजगराच्या पोटात मेलेल्या जीवांच्या मासाचीच ती दुर्गंधी आहे." (२३)


( मिश्र )
अस्मान्किमत्र ग्रसिता निविष्टा-
     नयं तथा चेद् बकवद् विनङ्‌क्ष्यति ।
क्षणादनेनेति बकार्युशन्मुखं
     वीक्ष्योद्धसन्तः करताडनैर्ययुः ॥ २४ ॥
( इंद्रवज्रा )
खाईल कां हा घुसताच आत
     बकासुराच्या परि नष्ट होई ।
याला न सोडी जित कृष्ण आता
     हासोनी कृष्णा मग आत गेले ॥ २४ ॥

अयं - हा - अत्र निविष्टान् अस्मान् - येथे बसलेल्या आम्हांला - किम् ग्रसिता - काय गिळून टाकील - तथा चेत् - तसे झाले तर - अनेन - ह्या कृष्णाकडून - क्षणात् - क्षणामध्ये - बकवत् - बकासुराप्रमाणे - विनङ्‍क्ष्यति - नाश पावेल - इति - असे म्हणत - बकार्युशन्मुखं वीक्ष्य - बकासुराला मारणार्‍या श्रीकृष्णाच्या सुंदर मुखाकडे पाहून - उद्धसन्तः (ते) - मोठ्याने हंसणारे ते बालक - करताडनैः - टाळ्या वाजवीत - ययुः - निघून गेले ॥२४॥

मग त्यांच्यापैकी एकजण म्हणाला - "आम्ही जर याच्या तोंडात शिरलो, तर हा आम्हांला गिळून टाकील काय ? अरे ! हा काय गिळून टाकणार ? जर याने तशी आगळीक केली, तर मग हा एका क्षणात कृष्णाकडून बकसासुरा प्रमाणे मारला जाईल. असे म्हणत ती मुले बकासुरालाला मारणार्‍या श्रीकृष्णांचे सुंदर मुख पाहात पाहात टाळ्या पिटीत मोठ्याने हसत हसतच अघासुराच्या तोंडात घुसली. (२४)

विवरण :- कुणाच्याहि छातीत धडकी भरून बोबडी वळावी, असे अजगराचे ते प्रचंड धूड ! पण ते पाहून गोप बालकांना उलट गंमत वाटली आणि त्याच्या पोटात शिरावे वाटले. कारण ? काही विपरीत घडलेच, तर रक्षण करायला पाठीशी कृष्ण आहेच हा दृढ विश्वास ! हा 'अंध' विश्वास नसून दृढ भक्तीही होती. (२४)



इत्थं मिथोऽतथ्यं अतज्ज्ञभाषितं
     श्रुत्वा विचिन्त्येत्यमृषा मृषायते ।
रक्षो विदित्वाखिल-भूतहृत्स्थितः
     स्वानां निरोद्धुं भगवान् मनो दधे ॥ २५ ॥
अज्ञानि बाळे वदता असे हे
     खर्‍याहि सर्पा वदतात खोटे ।
हे जाणि कृष्णो जिव सर्व आत्मा
     रक्षावयाला करितो विचार ॥ २५ ॥

इत्थं - याप्रमाणे - मिथः (संभूतं) - एकमेकांत चाललेले - अतथ्यं - निरर्थक - अतज्ज्ञभाषितं - श्रीकृष्णाला न जाणणार्‍या गोपबालकांचे भाषण - श्रुत्वा - ऐकून - (तत्) रक्षः विदित्वा - तो राक्षसच आहे असे जाणून - (तत्) अमृषा मृषायते - तो खरोखरच फसवीत आहे - इति विचिन्त्य - असा विचार करुन - अखिलभूतह्रत्स्थितः - सर्व प्राण्यांच्या ह्रदयांत असलेला - भगवान् - श्रीकृष्ण - स्वानां निरोद्धुं - आपल्या संवगड्यांना अडविण्यास - मनः दधे - मनात निश्चय करिता झाला ॥२५॥

त्या अज्ञानी मुलांनी आपापसात केलेली भ्रामक वक्तव्ये ऐकून भगवान श्रीकृष्णांनी विचार केला की, "अरे, यांना हा खरा अजगरसुद्धा खोटा वाटतो." सर्व प्राण्यांच्या हृदयात निवास करणार्‍या त्यांनी, तो राक्षस आहे, हे ओळखून आपल्या मित्रांना त्याच्या तोंडात जाण्यापासून अडविण्याचे ठरविले. (२५)


तावत् प्रविष्टास्तु असुरोदरान्तरं
     परं न गीर्णाः शिशवः सवत्साः ।
प्रतीक्षमाणेन बकारिवेशनं
     हतस्वकान्तस्मरणेन रक्षसा ॥ २६ ॥
मनीं विचारा करि श्रीहरि हा
     तेंव्हाचि गेले मुखि सर्व बाळे ।
अघासुराने नच त्यां गिळीले
     तो वाट पाही कधि कृष्ण येतो ॥ २६ ॥

तावत् - इतक्यात - सवत्साः शिशवः - वासरासह गोपबालक - असुरोदरान्तरं प्रविष्टाः - राक्षसाच्या पोटात शिरले - परंतु - परंतु - बकारिवेशनं - बकासुराला मारणारा जो श्रीकृष्ण त्याच्या प्रवेशाची - प्रतीक्षमाणेन - वाट पहाणार्‍या - हतस्वकान्तस्मरणेन - नष्ट झालेल्या स्वकीयांच्या मरणाचे स्मरण करणार्‍या - रक्षसा - अघासुराकडून - न गीर्णाः - गिळिले गेले नव्हते ॥२६॥

तेवढ्यात सारी मुले वासरांसह त्या असुराच्या पोटात घुसली. परंतु अघासुराने त्यांना गिळले नाही. कारण आपल्या भाऊ-बहिणीच्या वधाची आठवण होऊन, त्यांना मारणारा श्रीकृष्ण केव्हा मुखात येईल, याचीच अघासुर वाट पाहात होता. (२६)


तान् वीक्ष्य कृष्णः सकलाभयप्रदो
     ह्यनन्यनाथान् स्वकरादवच्युतान् ।
दीनांश्च मृत्योर्जठराग्निघासान्
     घृणार्दितो दिष्टकृतेन विस्मितः ॥ २७ ॥
जगास रक्षी हरि एकला तो
     त्राता ययां एकला मीचि जाणे ।
जे दूर गेले मज पासुनीया
     रे रे तया ग्रासिले नागराजे ॥ २७ ॥

सकलाभयप्रदः - सर्वांना अभय देणारा - कृष्णः - श्रीकृष्ण - हि - खरोखर - अनन्यनाथान् - दुसरा कोणीहि ज्यांचा रक्षक नाही अशा - स्वकरात् अवच्युतान् - आपल्या हातातून निसटलेल्या - च - आणि - दीनान् - दीन झालेल्या - मृत्योः - अघासुररुपी मृत्यूच्या - जठराग्निघासान् - जठराग्नीमध्ये पडलेले घासच अशा - तान् - त्या गोपबालकांना - वीक्ष्य - पाहून - घृणार्दितः - दयेमुळे पीडित झालेला - दिष्टकृतेन - दैवानेच ह्या गोष्टी घडवून आणिल्या - विस्मितः - असे म्हणून आश्चर्यचकित झाला ॥२७॥

सर्वांना अभय देणार्‍या श्रीकृष्णांनी, पाहिले की, ज्यांचे रक्षण करणारे केवळ आपणच, ती बिचारी मुले आपल्या हातातून निसटून मृत्युरूप अघासुराच्या जठराग्नीचे भक्ष्य बनली. तेव्हा दैवाच्या या विचित्र लीलेचा त्यांना विस्मय वाटला आणि त्यांचे हृदय दयेने द्रवले. (२७)


कृत्यं किमत्रास्य खलस्य जीवनं
     न वा अमीषां च सतां विहिंसनम् ।
द्वयं कथं स्यादिति संविचिन्त्य तत्
     ज्ञात्वाविशत् तुण्डमशेषदृग्घरिः ॥ २८ ॥
उपाय योजी मनि कृष्ण ऐसा
     या राक्षसाते वधिणेचि योग्य ।
नी बाळ सारे जिव वाचवोत
     नी निश्चये तो मुखि त्याच गेला ॥ २८ ॥

अत्र किम् कृत्यम् - या प्रसंगी काय करावे - अस्य खलस्य जीवनं न (भवति) - ह्या दुष्ट अघासुराचे आयुष्य नष्ट होईल - अमीषां सतां - आणि ह्या सज्जन अशा गोपबालकांचा खरोखर - विहिंसनं च वै (न भवति) - विनाश होणार नाही - द्वयं कथं स्यात् - ह्या दोन्ही गोष्टी कशा घडतील - इति संविचिन्त्य - असा विचार करून - तत् ज्ञात्वा - ते जाणून - अशेषदृक् हरिः - सर्व पहाणारा श्रीकृष्ण - (तस्य) तुण्डे अविशत् - त्या अजगाराच्या तोंडात शिरला ॥२८॥

ते विचार करू लागले, ’आता काय करावे ? ज्यामुळे या दुष्टाचा मृत्यू तर व्हावा आणि या भाबड्या मुलांची हत्यासुद्धा होऊ नये. ही दोन्ही कामे कशी होऊ शकतील ?" सर्व काही प्रत्यक्ष पाहणार्‍या श्रीहरींनी काय करायचे ते ठरवून ते स्वतः त्याच्या मुखात शिरले. (२८)


( अनुष्टुप् )
तदा घनच्छदा देवा भयाद् हाहेति चुक्रुशुः ।
जहृषुर्ये च कंसाद्याः कौणपास्त्वघबान्धवाः ॥ २९ ॥
( अनुष्टुप् )
ढगात लपुनी देवे दुःख उद्‌गार काढिले ।
राक्षसे पाहता त्यांना आनंद चित्ति मानिला ॥ २९ ॥

तदा - त्यावेळी - घनच्छदाः देवाः - मेघ आहेत आच्छादन ज्यांचे असे देव - भयात् - भीतीने - हा हा इति - अरे घात झाला असा - चुक्रुशुः - आक्रोश करू लागले - च - आणि - ये - जे - अघबान्धवः कौणपाः - अघासुराचे बंधु असे राक्षस - कंसाद्याः तु - आणि कंसादि - (ते) जहृषुः - ते आनंदित झाले ॥२९॥

त्या वेळी ढगांआड लपलेल्या देवता भितीने "हाय ! हाय !" म्हणू लागल्या आणि अघासुराचे हितैषी कंस वगैरे राक्षस आनंदित झाले. (२९)


तच्छ्रुत्वा भगवान् कृष्णस्तु अव्ययः सार्भवत्सकम् ।
चूर्णीचिकीर्षोरात्मानं तरसा ववृधे गले ॥ ३० ॥
अघासुर मनी इच्छी सर्वां चावावया मुखीं ।
परी कृष्ण तनु केली स्फूर्तीने बहु थोर ती ॥ ३० ॥

भगवान् अव्ययः कृष्णः तु - भगवान अविनाशी श्रीकृष्ण तर - तत् श्रुत्वा - ते ऐकून - सार्भवत्सकं - गोपबालकांसह वासरांचे - चूर्णीचिकीर्षोः (तस्य) - चूर्ण करण्याची इच्छा करणार्‍या अघासुराच्या - गले - गळ्यात - तरसा आत्मानं ववृधे - वेगाने शरीर वाढविता झाला ॥३०॥

अघासुर, वासरे आणि मुले यांच्यासह श्रीकृष्णांना आपल्या दाढांनी चावून त्यांचे पीठ करू इच्छित होता, परंतु त्याचवेळी अविनाशी श्रीकृष्णांनी, देवतांचा हाहाकार ऐकून अत्यंत वेगाने आपले शारीर त्याच्या गळ्यात नेऊन खूप फुगविले. (३०)


( मिश्र )
ततोऽतिकायस्य निरुद्धमार्गिणो
     ह्युद्‍गीर्णदृष्टेः भ्रमतस्त्वितस्ततः ।
पूर्णोऽन्तरंगे पवनो निरुद्धो
     मूर्धन् विनिष्पाट्य विनिर्गतो बहिः ॥ ३१ ॥
( इंद्रवज्रा )
केली तनू ती अतिथोर कृष्णे
     दैत्यागळी तो मग दाटला नी ।
बाहेर आले बुबुळे तयाची
     श्वासास रोधोनी मरोनि गेला ॥ ३१ ॥

ततः - नंतर - अतिकायस्य - मोठे आहे शरीर ज्याचे अशा - निरुद्धमार्गिणः - ज्याचा श्वासोच्छावासाचा मार्ग रोधून गेला आहे अशा - उदीर्णदृष्टेः - ज्याचे डोळे बाहेर आले आहेत अशा - इतस्ततः भ्रमतः - इकडेतिकडे फिरणार्‍या - अन्तरङ्गे - हृदयात - पूर्णः निरुध्दः पवनः तु - पूर्णपणे भरून राहिलेला व अडविलेला प्राणवायू तर - मूर्धन् विनिष्पाट्य - मस्तक फोडून - बहिः हि विनिर्गतः - खरोखर बाहेर पडला ॥३१॥

यानंतर भगवंतांच्या शरीरामुळे, त्या महाकाय अजगराच्या गळ्याचा श्वासमार्ग बंद झाला. बुबुळे उलटी झाली. तो व्याकूळ होऊन इकडेतिकडे वळवळू लागला. शेवटी आतल्या आत रोखला गेलेला श्वास ब्रह्मरंध्र फोडून बाहेर पडला. (३१)


तेनैव सर्वेषु बहिर्गतेषु
     प्राणेषु वत्सान् सुहृदः परेतान् ।
दृष्ट्या स्वयोत्थाप्य तदन्वितः पुनः
     वक्त्रान् मुकुन्दो भगवान् विनिर्ययौ ॥ ३२ ॥
प्राणा सवे ते उलटोनि अंग
     बाहेर आले तनु फाटुनीया ।
सुधाकृपेने हरि पाहि बाळ
     जीवीत आले सगळे तदा ते ॥ ३२ ॥

भगवान् मुकुन्दः - भगवान श्रीकृष्ण - तेन एव - त्यामुळेच - सर्वेषु प्राणेषु बहिर्नतेषु - सर्व प्राण बाहेर निघून गेले असता - परेतान् सुहृदः वत्सान् (च) - मृत झालेल्या मित्रांना व वासरांना - स्वया (अमृतमय्या) दृष्टया उत्थाप्य - आपल्या अमृतदृष्टीने उठवून - तदन्वितः - त्यासह - पुनः वक्रात् विनिर्ययौ - पुनः तोंडातून बाहेर निघाला ॥३२॥

त्याच मार्गाने त्याची सर्व इंद्रियेसुद्धा शरीरातून बाहेर पडली. त्याच वेळी भगवन मुकुंदांनी आपल्या अमृतदृष्टीने मेलेली वासरे व मित्र यांना जिवंत केले आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन ते अघासुराच्या मुखातून निघून बाहेर आले. (३२)


पीनाहिभोगोत्थितमद्‍भुतं महत्
     ज्योतिः स्वधाम्ना ज्वलयद् दिशो दश ।
प्रतीक्ष्य खेऽवस्थितमीशनिर्गमं
     विवेश तस्मिन् मिषतां दिवौकसाम् ॥ ३३ ॥
त्या स्थूल प्रेती निघली नी ज्योत
     प्रकाश झाला सगळ्या दिशांना ।
आकाशि झाली क्षण स्थीर कांही
     याची हरीशी मग लीन झाली ॥ ३३ ॥

पीनाहिभोगोत्थितं - पुष्ट अशा अजगराच्या शरीरापासून निघालेले - अद्‌भुतं - आश्चर्यजनक - महत् - मोठे - स्वधान्मा दश दिशः ज्वलयत् - आपल्या तेजाने दाही दिशा प्रकाशित करणारे - खे अवस्थितं - आकाशात दृग्गोचार होणारे - ईशनिर्गमं - परमेश्वराकडे जाण्यास निघालेले - ज्योतिः - तेज - (तं) प्रतीक्ष्य - त्याला पाहून - दिवौकसां मिषतां - देव पहात असताना - तस्मिन् विवेश - त्या श्रीकृष्णामध्ये प्रविष्ट झाले ॥३३॥

त्या अजगराच्या स्थूल शरीरातून एक अद्‌भुत अशी मोठी ज्योत बाहेर पडली. त्यावेळी त्या ज्योतीच्या प्रकाशाने दाही दिशा झगमगल्या. ती थोडावेळ आकाशात स्थिर होऊन भगवंतांच्या बाहेर येणाची वाट पाहू लागली. जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा ती ज्योत सर्व देवतांच्या देखत त्यांच्यामध्ये मिसळून गेली. (३३)


ततोऽतिहृष्टाः स्वकृतोऽकृतार्हणं
     पुष्पैः सुगा अप्सरसश्च नर्तनैः ।
गीतैः सुरा वाद्यधराश्च वाद्यकैः
     स्तवैश्च विप्रा जयनिःस्वनैर्गणाः ॥ ३४ ॥
त्या देवतांनी सुमवृष्टी केली
     त्या अप्सरा नाचुनि गान झाले ।
विद्याधरांनी मग वाद्य केले
     नी ब्राह्मणांनी स्तुतीगान केले ॥ ३४ ॥

ततः - नंतर - अतिह्रष्टाः - अत्यंत आनंदित झालेले - सुराः - देव - पुष्पैः - फुलांनी - च - आणि - अप्सरसः - अप्सरा - नर्तनैः - नृत्यांनी - च - आणि - सुर्गाः - गायनकुशल गवई - गीतैः - गायनांनी - च - आणि - वाद्यधराः - वाद्ये वाजविणारे - वाद्यकैः - वाद्यांनी - च - आणि - विप्राः - ब्राह्मण - स्तवैः - स्तोत्रांनी - गणाः - लोकांचे थवे - जयनिस्वनैः - जयजयकारांच्या ध्वनींनी - स्वकृतः - आपले कार्य करणार्‍या - अर्हणं अकृत - श्रीकृष्णाचे पूजन करिते झाले ॥३४॥

त्यावेळी देवतांनी फुलांचा वर्षाव करून, अप्सरांनी नृत्य करून, गंधर्वांनी गाऊन, वादकांनी वाद्ये वाजवून, ब्राह्मणांनी स्तुतिपाठ म्हणून आणि पार्षदांनी जयजयकार करून अतिशय आनंदाने भगवान श्रीकृष्णांचे पूजन केले. कारण त्यांनी अघासुराला मारून त्या सर्वांवर मोठे उपकार केले होते. (३४)


तदद्‍भुतस्तोत्रसुवाद्यगीतिका
     जयादिनैकोत्सव मङ्‌गलस्वनान् ।
श्रुत्वा स्वधाम्नोऽन्त्यज आगतोऽचिराद्
     दृष्ट्वा महीशस्य जगाम विस्मयम् ॥ ३५ ॥
अद्‌भूत स्तूती अन गान वाद्ये
     जयोत्सवाचा ध्वनि सत्यलोकी ।
जाताचि ब्रह्मा त्वरि पातला नी
     कृष्णास पाही नवलाव मानी ॥ ३५ ॥

अजः - ब्रह्मदेव - तदद्‌भुतस्तोत्रसु - ती आश्चर्योत्पादक स्तोत्रे, - वाद्यगीतिकाजयादि - ती सुस्वर वाद्ये, ती गाणी, ते जयजयकार, - नैकोत्सव - इत्यादिकांचे अनेक प्रकारचे उत्सवाप्रीत्यर्थ - मङ्गलस्वनान् - निघालेले मंगल ध्वनी - स्वधान्मः - आपले स्थान जो सत्यलोक त्याच्या - अन्ति श्रुत्वा - समीपभागी श्रवण करून - अचिरात् आगतः - त्वरेने आला - ईशस्य महि दृष्ट्वा - श्रीकृष्णाचे माहात्म्य पाहून - विस्मयं जगाम - आश्चर्यचकित झाला ॥३५॥

ते अद्‌भुत स्तुतिपाठ, सुंदर वाद्ये, मंगलमय गीते, जयजयकार इद्यादि आनंदोत्सवाचे अनेक मंगल ध्वनी ब्रह्मलोकी जाऊन पोहोचले. ते ऐकून ब्रह्मदेव ताबडतोब तेथे आले आणि श्रीकृष्णांचा हा महिमा पाहून चकित झाले. (३५)


( अनुष्टुप् )
राजन् आजगरं चर्म शुष्कं वृन्दावनेऽद्‍भुतम् ।
व्रजौकसां बहुतिथं बभूवाक्रीडगह्वरम् ॥ ३६ ॥
( अनुष्टुप् )
राजा रे ! सर्पचर्मी ते सुकले व्रजवासिया ।
कितेक दिन ते होते गुंफाचि खेळण्या जशी ॥ ३६ ॥

राजन् - हे परिक्षित राजा - वृंदावने - वृंदावनामध्ये - अद्‌भुतं - आश्चर्यजनक - शुष्कं अजगरं चर्म - सुकलेले अजगराचे कातडे - बहुतिथं - पुष्कळ दिवसपर्यंत - व्रजौकसां - गोकुळवासी लोकांचे - आक्रीडगह्वरं - खेळण्याची गुहा - बभूव - झाले ॥३६॥

परीक्षिता ! जेव्हा अजगराचे ते अद्‌भुत कातडे वृंदावनात सुकून गेले, तेव्हा ते व्रजवासियांसाठी पुष्कळ दिवसपर्यंत खेळण्याची एक अद्‍भुत गुहा बनून राहिले होते. (३६)


एतत्कौमारजं कर्म हरेरात्माहिमोक्षणम् ।
मृत्योः पौगण्डके बाला दृष्ट्वोचुर्विस्मिता व्रजे ॥ ३७ ॥
अघसुरासि हा मोक्ष बाळांना वाचवीयले ।
पाचव्या वर्षिची लीला सहाव्या वर्षि गोप ते ।
कौतुके सांगती सर्व मातेसी आपल्या तसे ॥ ३७ ॥

मृत्योः आत्माहिमोक्षणं - मृत्यूपासून आपली व अजगराची झालेली सुटका - एतत् - हे - हरेः - श्रीकृष्णाचे - कौ‍मारजं कर्म दृष्ट्वा - कुमारावस्थेतील कृत्य पाहून - विस्मिताः बालाः - आश्चर्यचकित झालेले बालक - (तस्य) पौगण्डके (अपि) - त्याच्या पौगंडावस्थेतही - (तत्) व्रजे ऊचुः - ते गोकुळात सांगते झाले ॥३७॥

भगवंतांनी हे जे आपल्याला मृत्यूरूप अजगराच्या मुखातून वाचविले होते आणि अघासुराला संसार बंधनातून सोडविले होते, ती लीला भगवंतांनी आपल्या कुमार अवस्थेत म्हणजेच वयाच्या पाचव्या वर्षीच केली होती. परंतु पौगंड अवस्थेत म्हणजे सहाव्या वर्षी त्यांनी आश्चर्यचकित होऊन व्रजामध्ये येऊन ती नुकतीच घडल्याचे सांगितले. (३७)


( मिश्र )
नैतद् विचित्रं मनुजार्भमायिनः
     परावराणां परमस्य वेधसः ।
अघोऽपि यत्स्पर्शनधौतपातकः
     प्रापात्मसाम्यं त्वसतां सुदुर्लभम् ॥ ३८ ॥
( इंद्रवज्रा )
तो पापमूर्ती अघदैत्य होता
     स्पर्शेचि त्याला तरि मोक्ष लाभे ।
आश्चर्य नाही मुळि कांहि यात
     तो एकमेवो रचितोहि सृष्टी ॥ ३८ ॥

मनुजार्भमायिनः - मायेच्या योगे मनुष्ययोनीत बालस्वरूप धारण करणार्‍या - परावराणां परमस्य - लहानमोठ्या प्राण्यांमध्ये श्रेष्ठ अशा - वेधसः - परमेश्वराचे - एतत् - हे कृत्य - विचित्रं न - आश्चर्यजनक नव्हे - अघः अपि - अघासुरसुद्धा - यत्स्पर्शनधौतपातकः - ज्याच्या संपर्काने नष्ट झाले आहे पाप ज्यांचे असा - असतां सुदुर्लभं - दुर्जनांना मिळण्यास अत्यंत कठीण असे - आत्मसात्म्यं - स्वस्वरुप - प्राप - मिळविता झाला ॥३८॥

अघासुर मूर्तिमंत अघ (पाप)च होता. भगवंताच्या केवळ स्पर्शाने त्याची सर्व पापे धुतली गेली आणि त्याला पापी लोकांना कधीही प्राप्त न होणारी सारूप्यमुक्तीची प्राप्ती झाली. परंतु ही आश्चर्याची गोष्ट नाही; कारण माणसाच्या बालकासारखी लीला रचणारे हे तेच परमपुरुष परमात्मा आहेत, जे व्यक्त-अव्यक्त आणि कार्यकारणरूप अशा सर्व विश्वाचे एकमात्र विधाता आहेत. (३८)


( वंशस्था )
सकृद्यदङ्‌गप्रतिमान्तराहिता
     मनोमयी भागवतीं ददौ गतिम् ।
स एव नित्यात्मसुखानुभूत्यभि
     व्युदस्तमायोऽन्तर्गतो हि किं पुनः ॥ ३९ ॥
कोण्याही अंगे भिनता मनासी
     तो मोक्ष देतो तपिया न जैसा ।
निजात्मनंदा नच मोह स्पर्शी
     तो राहि तेथे गतिशी न शंका ॥ ३९ ॥

हि - कारण - मनोमयी यदङ्गप्रतिमा - ज्याच्या मूर्तीची मनःकल्पित प्रतिकृति - सकृत् अन्तराहिता - एकवार अंतःकरणात स्थापित केली असता - भागवतीं गति ददौ - भगवद्‌भक्तांना प्राप्त होणारी गति देते - नित्यात्मसुखानुभूति - नेहमी घेतलेल्या आत्मसुखाच्या अनुभवाने - अभिव्युदस्तमायः - ज्याने माया नष्ट केली आहे असा - सः एव - तोच - अन्तर्गतः - शरीरात शिरला असता - भागवतीं गतिं दद्यात् - वैष्णवांना मिळणारी गति देईल - इति किं पुनः - हे काय पुनः सांगावयास पाहिजे ॥३९॥

ज्यांच्या कोणत्याही एका अंगाची भावनिर्मित प्रतिमा जर ध्यानाच्या द्वारा एकदा जरी हृदयामध्ये स्थिर केली, तरी तीच केवळ भक्तांना मिळणारी मुक्ती प्रदान करते. तर मग आत्मानंदाच्या नित्य अनुभवाने ज्यांनी मायेचा निरास केला, तेच अंतरंगात शिरल्यामुळे अघासुराला सद्‌गती मिळाली, यात काय आश्चर्य ! (३९)

विवरण :- श्रीकृष्णास मारण्यासाठी आलेल्या पूतनेप्रमाणेच अघासुराचाहि मृत्यूनंतर उद्धार झाला. हा विरोधाभास कसा ? भक्ताला खडतर तप, कठोर इंद्रियनिग्रह, प्रपंच त्याग इ. प्रकारांनी शेवटी कधीतरी प्रत्यक्ष परमेश्वर दर्शन होते, तोपर्यंत त्याच्या मूर्तीची स्थापना हृदयातच करावी लागते. म्हणजेच मानसपूजेने त्याची प्राप्ती होण्याची शक्यता. पण इथे प्रत्यक्ष परमेश्वरच अघासुराच्या अजगर धारण केलेल्या शरीरात घुसला होता. काही क्षण त्त्यांचे ऐक्य झाले होते. त्या काही क्षणांच्या स्पर्शानेच अघासुराचे सर्व पाप धुवून गेले आणि त्याचा उद्धार झाला. कृष्णचरित्राचे हेच वैशिष्टय. त्याची वाईट चिंतणार्‍यांचाहि तो उद्धार करतो. कारण त्या निमित्तानेही का होईना, ते त्याचे सतत स्मरण करतात. परमात्मा पापाला शिक्षा करतो, पण पाप करणार्‍याला नाही. हेच इथे दिसून येते. (३८-३९)



श्रीसूत उवाच -
( इंद्रवज्रा )
इत्थं द्विजा यादवदेवदत्तः
     श्रुत्वा स्वरातुश्चरितं विचित्रम् ।
पप्रच्छ भूयोऽपि तदेव पुण्यं
     वैयासकिं यन्निगृहीतचेताः ॥ ४० ॥
सूत सांगतात -
असे द्विजांनो ! यदुवंशराये
     परीक्षिताला जिवदान केले ।
जेंव्हा तयाने अन रक्षकांनी
     हे ऐकता तो पुसतोचि प्रश्न ॥ ४० ॥

द्विजाः - हे शौनकादि ऋषि हो - यादवदेवदेत्तः - परीक्षित राजा - इत्थं - याप्रमाणे - स्वरातुः - श्रीकृष्णाचे - विचित्रं चरितं श्रुत्वा - आश्चर्यजनक कथानक ऐकून - यन्निगृहीतचेताः - ज्याचे ज्याचे अन्तःकरण आकृष्ट झाले आहे असा - तत् एव पुण्यं (चरितं) - तेच पुण्यकारक कथानक - भूयः अपि - पुनरपि - वैयासकिं पप्रच्छ - शुकाचार्याला विचारिता झाला ॥४०॥

सूत म्हणतात - शौनकादि ऋषींनो ! श्रीकृष्णांनी ज्याला जीवदान दिले होते, त्या आपल्या रक्षणकर्त्याचे हे अद्‌भुत चरित्र ऐकले तेव्हा त्याने पुन्हा श्रीशुकांना त्यांच्याच पवित्र लीलांसंबंधी प्रश्न विचारला. कारण त्यांच्या लीलांनी परीक्षिताचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेतले होते. (४०)

विवरण :- परीक्षिताला इथे 'यादव देवदत्त' असे विशेषण वापरले आहे. महाभारत युद्धाशी इथे संबंध आहे. युद्ध-प्रसंगी परीक्षिताच्या मातेच्या गर्भवती उत्तरेच्या उदरावर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले होते. पण स्वतः श्रीकृष्णाने उत्तरेच्या गर्भाचे रक्षण केले. गर्भावस्थेतील परीक्षिताचा झालेला (कृष्णाचे हातून) तो पुनर्जन्मच. म्हणून 'यादव-देवदत्त', कृष्णाने दिलेला. असे परीक्षितास म्हटले गेले आहे. (४०)



श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
ब्रह्मन् कालान्तरकृतं तत्कालीनं कथं भवेत् ।
यत्कौमारे हरिकृतं जगुः पौगण्डकेऽर्भकाः ॥ ४१ ॥
( अनुष्टुप् )
राजा परीक्षिताने विचारले -
पाचव्या वर्षिची लीला सहाव्या वर्षि बाळ ते ।
सांगता भूतकाळीचे वर्तमान कसे असे ॥ ४१ ॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्य - यत् कौ‍मारे हरिकृतं - जे कौ‍मारावस्थेत श्रीकृष्णाने केले - अर्भकाः - गोपबालक - पोगण्डे अपि जगुः - पौगंडावस्थेत सुद्धा वर्णिते झाले - (इति) कालान्तरकृतं - असे हे दुसर्‍या काळात केलेले - तत्कालीनं कथं भवेत् - त्याचकाळी घडलेले असे कसे झाले ॥४१॥

परीक्षिताने विचारले - मुनिवर्य ! आपण म्हणालात की, भगवंतानी केलेली पाचव्या वर्षातील लीला मुलांनी व्रजामध्ये सहाव्या वर्षी नुकतीच घडल्याप्रमाणे सांगितली. भूतकाळी केलेली लीला वर्तमानकाळाप्रमाणे त्यांनी कशी काय सांगितली ? (४१)

विवरण :- जे कृत्य कृष्णाने कौ‍मारावस्थेत केले, ते नंतर गोपबालकांनी 'पौगंडावस्थेत' केले. असे का सांगितले असावे (सदतिसाव्या श्लोकात गोपबालकांनी तसा उल्लेख केला आहे.) असा परीक्षिताचा प्रश्न. कारण ते कृत्य कृष्णाने पाचवे वर्षी म्हणजे कौ‌मारावस्थेत केले होते. सहाव्या वर्षानंतरच्या अवस्थेला 'पौगंडावस्था' म्हणतात. (कौ‌मारं पञ्चमाद्वान्तं पौगण्डं दशमावधि) (४१)



तद् ब्रूहि मे महायोगिन् परं कौतूहलं गुरो ।
नूनमेतद्धरेरेव माया भवति नान्यथा ॥ ४२ ॥
महायोगी गुरूदेवा आश्चर्य वाटते मनी ।
विचित्र घटना त्याच्या माया ही घडली कशी ॥ ४२ ॥

महायोगिन् गुरो - हे महायोगी शुकाचार्या - तत् कौतूहलं मे ब्रूहि - ते कौतुकास्पद कथानक मला सांगा - नूनं - खरोखर - एतत् - हे - हरेः माया एव - श्रीकृष्णाची मायाच होय - अन्यथा न भवति - एरवी अशी गोष्ट घडणार नाही ॥४२॥

महायोगी गुरुदेव ! हे जाणून घेण्याचे मला मोठेच कुतुहल वाटत आहे. आपण कृपा करून सांगावे. ही देखील त्या श्रीकृष्णांचीच माया असावी. कारण याखेरीज असे होऊ शकत नाही. (४२)


वयं धन्यतमा लोके गुरोऽपि क्षत्रबन्धवः ।
यत् पिबामो मुहुस्त्वत्तः पुण्यं कृष्णकथामृतम् ॥ ४३ ॥
द्विजसेवा चुके मी तो क्षत्रीय नाममात्रची ।
पहा भाग्य असे मोठे मी कथामृत प्राशितो ॥ ४३ ॥

गुरो - हे शुकाचार्या - वयं - आम्ही - क्षतबन्धवः अपि - दोषयुक्त क्षत्रिय असूनहि - लोके धन्यतमाः (स्मः) - ह्या भूलोकी अत्यंत धन्य आहो - यतः - कारण - मुहुः - वारंवार - त्वन्तः - तुझ्याकडून - पुण्यं - पुण्यकारक - कृष्णकथामृतं - श्रीकृष्णाचे कथामृत - पिबामः - पीत आहो ॥४३॥

गुरुदेव ! मी नाममात्र क्षत्रिय असूनही आमचे भाग्य एवढे मोठे की, आम्ही आपल्याकडून परम पवित्र श्रीकृष्णलीलामृताचे वारंवार पान करीत आहोत. (४३)


श्रीसूत उवाच -
( इंद्रवंशा )
इत्थं स्म पृष्टः स तु बादरायणिः
     तत्स्मारितानन्तहृताखिलेन्द्रियः ।
कृच्छ्रात् पुनर्लब्धबहिर्दृशिः शनैः
     प्रत्याह तं भागवतोत्तमोत्तम ॥ ४४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( इंद्रवज्रा )
सूत सांगतात -
शुकांसि ऐसा करिताच प्रश्न
     लागे समाधी स्मरता हरीला ।
कष्टेचि त्यांना मग बोध झाला
     परीक्षितासी मग बोलले ते ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

भागवतोत्तमोत्तम - हे भागवतश्रेष्ठा शौनका - इत्थं पृष्टः - याप्रमाणे विचारलेला - सः बादरायणिः तु - तो व्यासपुत्र शुकाचार्य तर - तत्स्मारितान् - त्या परीक्षिताने आठवण करून दिलेल्या - अन्तह्रताखिलेंद्रियः - भगवंताने हरण केली आहेत सर्व इंद्रिये ज्याची असा - कृच्छरात् - मोठ्या कष्टाने - पुनर्लब्धबहिदृशिः - पुनः ज्याला बाह्यदृष्टी मिळाली आहे असा - शनैः - हळू हळू - तं प्रति आह स्म - त्या परीक्षित राजाला सांगता झाला ॥४४॥

सूत म्हणतात - भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ शौनका ! परीक्षिताने जेव्हा असे विचारले, तेव्हा श्रीशुकांना भगवंतांची ती लीला आठवली; त्यामुळे त्यांची सर्व इंद्रिये व अंतःकरण भगवंतांच्या लीलेने स्वतःकडे खेचले. थोड्या वेळाने हळू-हळू मोठ्या कष्टाने पुन्हा भानावर आल्यावर ते परीक्षिताला सांगू लागले. (४४)


अध्याय बारावा समाप्त

GO TOP