|
श्रीमद् भागवत पुराण
गोपानां गोकुलं परित्यज्य वृन्दावने गमनं तत्र गोकुळातून वृंदावनात जाणे व वत्सासुर आणि बकासुराचा उद्धार - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
( अनुष्टुप् )
श्रीशुक उवाच - गोपा नन्दादयः श्रुत्वा द्रुमयोः पततो रवम् । तत्राजग्मुः कुरुश्रेष्ठ निर्घातभयशङ्किताः ॥ १ ॥
(अनुष्टुप् ) श्रीशुकदेव म्हणतात - पडले वृक्ष मोडोनी नंद गोपादि ऐकती । वीजची पडली वाटे भितीने पातले तिथे ॥ १ ॥
कुरुश्रेष्ठ - हे परीक्षित राजा- नन्दादयः गोपाः - नंदादि गोप- पततोः द्रुमयोः - पडणार्या दोन वृक्षांचा- रवं श्रुत्वा - शब्द ऐकून- निर्घातभयशङ्किताः (सन्तः) - वज्रपाताच्या भीतीने शंकित होऊन- तत्र - तेथे- आजग्मुः - आले. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता ! वृक्ष पडताना जो प्रचंड आवाज झाला, तो ऐकून नंदादिक गोप वीजच पडली की काय असे वाटून तेथे आले. (१)
भूम्यां निपतितौ तत्र ददृशुर्यमलार्जुनौ ।
बभ्रमुस्तदविज्ञाय लक्ष्यं पतनकारणम् ॥ २ ॥
पाहिले वृक्ष ते ऐसे मोडोनी पडले तदा । बांधिता उखळा ओढी कृष्ण बालक हा तरी ॥ २ ॥
तत्र भूम्यां - त्या जागी- निपतितौ - पडलेल्या जुळ्या - यमलार्जुनौ - अर्जुन वृक्षांना- (ते) ददृशुः - ते पाहते झाले- तत् - त्यावेळी - लक्ष्यं पतनकारणं - दिसण्यासारखे पडण्याचे कारण - अविज्ञाय - न जाणल्यामुळे - बभ्रमुः - गोंधळात पडले. ॥२॥
तेथी गेल्यावर त्या लोकांना, दोन्ही अर्जुनवृक्ष जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. वृक्ष उनळून पडण्याचे कारण जरी कळण्यासारखे होते, तरी ते स्पष्ट न कळल्याने त्यांची बुद्धी चक्रावून गेली. (२)
उलूखलं विकर्षन्तं दाम्ना बद्धं च बालकम् ।
कस्येदं कुत आश्चर्यं उत्पात इति कातराः ॥ ३ ॥
कृष्णाचे काम हे ऐसे तयांनी नच जाणले । विचार करुनी त्यांच्या बुद्धीला नच ते कळे ॥ ३ ॥
उलूखलं विकर्षन्तं - उखळाला ओढणार्या - दाम्ना च बद्धं - आणि दाव्याने बांधलेल्या - बालकं (दृष्ट्वा) - मुलाला पाहून - कस्य इदं कृत्यं - कोणाचे हे कृत्य - (अहो) आश्चर्यम् - काय हो आश्चर्य - कुतः (अयं) - हा अपघात - उत्पातः (संजातः) - कशामुळे घडला - इति (ते) - असे म्हणत ते - कातराः (बभूवुः) - भीतीने व्याकुळ झाले. ॥३॥
तेथे त्यांच्या समोरच दोरीने बांधलेला मुलगा उखळ ओढीत होता. "हे कोणाचे काम आहे, ही आश्चर्यकारक घटना कशी काय घडली ? असा विचार करून ते भयभीत झाले. (३)
बाला ऊचुरनेनेति तिर्यग्गतं उलूखलम् ।
विकर्षता मध्यगेन पुरुषौ अपि अचक्ष्महि ॥ ४ ॥
वदले अन्य ते बाळ कृष्णाचे काम हे असे । ओढिता उखळा येणे पडले वृक्ष हे पहा । आम्ही तो पाहिले दोन निघाले पुरुषो इथे ॥ ४ ॥
तिर्यग्गतं - आडव्या पडलेल्या - उलूखलं विकर्षता - उखळाला ओढणार्या - (वृक्षयोः) मध्यगेन - दोन वृक्षांच्या मधून गेलेल्या - अनेन (एतौ उत्पाटितौ) - ह्या बालकाने हे वृक्ष उपटिले - (वृक्षनिर्गतौ) - आणि वृक्षांतून निघालेले - पुरुषौ अपि अचक्ष्महि - दोन पुरुषहि आम्ही पाहिले - इति बालाः ऊचुः - असे मुले म्हणाली. ॥४॥
तेथे असलेली मुले म्हणाली - "अहो, याचेच हे काम आहे. हा दोन्ही वृक्षांच्या मधून जात होता. उखळ तिरपे झाल्यावर याने जोराने ओढले आणि झाडे उन्मळून पडली. त्यातून बाहेर पडलेले दोन पुरुषसुद्धा आम्ही पाहिले." (४)
न ते तदुक्तं जगृहुः न घटेतेति तस्य तत् ।
बालस्योत्पाटनं तर्वोः केचित् संदिग्धचेतसः ॥ ५ ॥
खरे न वाटे कोणा बाळाला काय शक्य हे । पूर्वलीला स्मरोनीया कोणी जाणिति सत्य हे ॥ ५ ॥
तस्य बालस्य - त्या बाळकृष्णाकडून - तत् तर्वोः उत्पाटनं - ते वृक्ष उपटण्याचे कृत्य - न घटेत - घडणार नाही - इति - असे म्हणून - ते - ते गोप - तदुक्तं न जगृहुः - त्यांची भाषण स्वीकारते झाले नाहीत - केचित् - काही जण - संदिग्धचेतसः (बभूवुः) - संशययुक्त असे झाले. ॥५॥
परंतु गोपांनी मुलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. ते म्हणू लागले - "एवढा लहानसा मुलगा, इतकी मोठी झाडे पाडील हे कधीच शक्य नाही. श्रीकृष्णाच्या अगोदरच्या लीलांची आठवण येऊन कोणाकोणाला ती शक्यताही वाटू लागली. (५)
उलूखलं विकर्षन्तं दाम्ना बद्धं स्वमात्मजम् ।
विलोक्य नन्दः प्रहसद् वदनो विमुमोच ह ॥ ६ ॥
नंदाने पाहिला लल्ला बद्ध हा ओढितो असा । हासले पातले तेथे तयांनी दोर सोडिले ॥ ६ ॥
प्रहसद्वदनः नंदः - हास्यमुख असा नंद - उलूखलं विकर्षन्तं - उखळाला ओढणार्या - दाम्ना बद्धं च - आणि दाव्याने बांधलेल्या - स्वं आत्मजं विलोक्य - आपल्या पुत्राला पाहून - (तं) विमुमोच ह - त्याला सोडिता झाला. ॥६॥
नंदांनी पाहिले की, त्यांच्या दोरीने बांधलेला मुलगा उखळ ओढीत घेऊन चालला आहे. ते हसू लागले आणि त्यांनी लागलीच त्याला सोडवले. (६)
गोपीभिः स्तोभितोऽनृत्यद् भगवान् बालवत् क्वचित् ।
उद्गायति क्वचिन्मुग्धः तद्वशो दारुयन्त्रवत् ॥ ७ ॥
गोपींनी फुगविता तो नाचे बाळ कधी तसा । भोळ्यापरी कधी गायी हरि हा बाहुली जसा ॥ ७ ॥
भगवान् - श्रीकृष्ण - क्वचित् - एखादे वेळी - गोपीभिः स्तोभितः - गोपींकडून तालादिकांनी प्रोत्साहन दिला गेला असता - बालवत् अनृत्यत् - लहान मुलाप्रमाणे नाचे - क्वचित् - एखादे समयी - मुग्धः (भूत्वा) - भोळा होऊन - दारुयन्त्रवत् - लाकडाच्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे - तद्वशः - त्या गोपींच्या कह्यात वागणारा असा - उद्गायति - मोठयाने गात असे. ॥७॥
कधी कधी गोपींनी फूस लावल्यावर भगवान सामान्य बालकाप्रमाणे नाचू लागत. कधी भाबडेपणाने गाऊ लागत. जणू ते त्यांच्या हातातील कठपुतळी झाले होते. (७)
बिभर्ति क्वचिदाज्ञप्तः पीठकोन्मानपादुकम् ।
बाहुक्षेपं च कुरुते स्वानां च प्रीतिमावहन् ॥ ८ ॥
सांगता कधि तो आणी तराजू पाट चप्पला । भक्तांना मोद तो देण्या ठोकी हाबूक तो कधी ॥ ८ ॥
आज्ञप्तः (सन्) - आज्ञापिला असता - क्वचित् - एखादे वेळी - पीठकोन्मानपादुकं बिभर्ति - पाट, मापे व पायतणे घेऊन येई - स्वानां च - आणि स्वकीयांना - प्रीतिं आवहन् - प्रीती उत्पन्न करीत - बाहुक्षेपं कुरुते - हातवारे करीत असे. ॥८॥
कधी त्यांच्या आज्ञेवरून पाट आणीत, तर कधी तराजू आणीत. कधी पादत्राणे आणीत तर कधी आपल्या लोकांना आनंदीत करण्यासाठी दंड थोपटीत. (८)
विवरण :- श्रीकृष्णाने बालोचित अशा अनेक लीला केल्या. लहान मुलाला कौतुकाने गाणे गाण्यास सांगितले जाते; तसे गोपींनी सांगताच लगेच गाऊन दाखविणे, सांगितलेल्या वस्तू मोठया कष्टाने आणून देणे, इत्यादीच्या वर्णनावरून व्यासांचे सूक्ष्म निरीक्षण आणि बालमानसशास्त्राबद्दलचे त्यांचे सखोल ज्ञान दिसून येते. 'क्रोणीहि फलानि' या श्लोकातही अत्यंत समर्पक वर्णन आहे. लहान मुले खेळायच्या, खायच्या वस्तू विकत घेण्याचा आईजवळ हटट करतात. त्या विकत घेताना त्यांचे पैसे आईकडून आणून देताना त्यांच्या उत्साहाला अगदी भरते आलेले असते. किरकोळ वस्तू विकत घेण्याची व्यासांनी वर्णन केलेली पद्धती पूर्वी खेडेगावामध्ये होती. रस्त्यावर विकायला येणार्या या किरकोळ वस्तू पैशांऐवजी घरातील धान्य देऊन विकत घेतल्या जात. फळ विक्रेतीला देण्यासाठी कृष्णाने आपल्या चिमुकल्या ओंजळीतून धान्य आणले. पण ते आणताना धान्याचे कण ओंजळीतून गळून पडले. माळणीने त्याची चिमुकली ओंजळ फळांनी भरून टाकली. अतिशय वास्तव वर्णन. जो परमात्मा दुसर्याला त्याच्या कर्माची फळे देतो, त्यालाच एक सामान्य माळीण फळे देते. अज्ञानातून निर्माण झालेली ही एक गंमत. (७-८)
दर्शयंस्तद्विदां लोक आत्मनो भृत्यवश्यताम् ।
व्रजस्योवाह वै हर्षं भगवान् बालचेष्टितैः ॥ ९ ॥
भगवान् करी ह्या लीला जगास दाखवावया । करिती भक्ति हे नित्य तयांना वश मी असा ॥ ९ ॥
लोके - ह्या लोकांमध्ये - तद्विदां - कृष्णाचे सामर्थ्य जाणणार्या पुरुषांना - आत्मनः भृत्यवश्यतां - स्वतःचे भक्ताधीनत्व - दर्शयन् भगवान् - दाखविणारा श्रीकृष्ण - बालचेष्टितैः - बाललीलांनी - वै - खरोखर - व्रजस्य हर्षं उवाह - गोकुळाला आनंद देता झाला. ॥९॥
भगवान अशा प्रकारे बाललीलांनी व्रजवासियांना आनंदित करीत आणि जगातील जे लोक त्यांना जाणणारे आहेत, त्यांना असे दाखवीत की, आपण आपल्या सेवकांच्या अधीन असतो. (९)
क्रीणीहि भोः फलानीति श्रुत्वा सत्वरमच्युतः ।
फलार्थी धान्यमादाय ययौ सर्वफलप्रदः ॥ १० ॥
फळे घ्या ! वदला कोणी विक्रेता द्वारि येऊनी । सानुल्या करी हा कृष्ण धान्य घेवोनि पातला ॥ १० ॥
सर्वफल प्रदः अच्युतः - सर्वांचे मनोरथ सफल करणारा श्रीकृष्ण - भोः फलानि क्रीणीहि - अहो फळे विकत घ्या - इति श्रुत्वा - असा शब्द ऐकून - फलार्थी - फळे घेण्याची इच्छा करणारा - सत्वरं धान्यं आदाय - तत्काळ धान्य घेऊन - ययौ - गेला. ॥१०॥
एके देवशी एक फळे विकणारी बाई "फळे घ्या फळे" म्हणत आली. हे ऐकताच सर्व फळे देणारा अच्युत फळे खरेदी करण्यासाठी ओंजळीत धान्य घेऊन गेला. (१०)
फलविक्रयिणी तस्य च्युतधान्यकरद्वयम् ।
फलैरपूरयद् रत्नैः फलभाण्डमपूरि च ॥ ११ ॥
सांडले धान्य ते खाली विक्रेता फळ दे बहू । निघता पाहतो पाटीं फळांचे रत्न जाहले ॥ ११ ॥
फलविक्रयिणी - फळे विकणारी बाई - तस्य - त्या श्रीकृष्णाचे - च्युतधान्यकरद्वयं - ज्यातील धान्य पडले आहे असे दोन्ही हात - फलैः अपूरयत् - फळांनी भरती झाली - (तस्याः) च फलभाण्डं - आणि तिची फळांची टोपली - रत्नैः अपूरि - रत्नांनी भरून गेली. ॥११॥
त्याच्या ओंजळीतून धान्य वाटेतच सांडले; पण फळे विकणार्या बाईने मात्र त्याचे दोन्ही हात फळांनी भरून टाकले. इकडे भगवंतांनी तिची फळांची टोपली रत्नांनी भरून टाकली. (११)
सरित्तीरगतं कृष्णं भग्नार्जुनमथाह्वयत् ।
रामं च रोहिणी देवी क्रीडन्तं बालकैर्भृशम् ॥ १२ ॥
एकदा यमुना काठी बलजी कृष्णजी सवे । वाळवंटात खेळाया गेले नी रमले तिथे ॥ १२ ॥
अथ - नंतर - देवी रोहिणी - रोहिणी राणी - सरित्तीरगतं - नदीतीरी गेलेल्या - भग्नार्जुनं कृष्णं - मोडिले आहेत अर्जुनवृक्ष ज्याने अशा श्रीकृष्णाला - बालकैः भृशं - आणि बालकांसह दंग होऊन - क्रीडन्तं रामं च - क्रीडा करणार्या बलरामाला - आह्वयत् - बोलाविती झाली. ॥१२॥
एके दिवशी यमलार्जुन वृक्ष पाडणारा श्रीकृष्ण आणि बलराम मुलांसह खेळत खेळत यमुनेच्या तीरावर गेले आणि खेळातच दंग झाले. तेव्हा रोहिणीदेवीने त्यांना हाका मारल्या. (१२)
नोपेयातां यदाऽऽहूतौ क्रीडासङ्गेन पुत्रकौ ।
यशोदां प्रेषयामास रोहिणी पुत्रवत्सलाम् ॥ १३ ॥
रोहिणी हाक मारी तो न येता बाळ हे द्वय । यशोदा वत्सला हीस रोहिणी पाठवीतसे ॥ १३ ॥
यदा - जेव्हा - पुत्रकौ आहूतौ (अपि) - ते मुलगे बोलविले असताही - क्रीडासङगेन न उपेयातां - खेळण्याच्या नादामुळे आले नाहीत - रोहिणी - रोहिणी - पुत्रवत्सलां - पुत्रांवर प्रेम करणार्या - यशोदां प्रेषयामास - यशोदेला पाठविती झाली. ॥१३॥
परंतु खेळात रमल्यामुळे रोहिणीच्या बोलावण्याने ते आले नाहीत. तेव्हा रोहिणीने मुलाचे लाड करणार्या यशोदेला पाठवले. (१३)
क्रीडन्तं सा सुतं बालैः अतिवेलं सहाग्रजम् ।
यशोदाजोहवीत् कृष्णं पुत्रस्नेहस्नुतस्तनी ॥ १४ ॥
खूप वेळ तसा झाला यशोदा हाक मारिते । वात्सल्ये स्तनिचे दूध दाटोनी पातले पहा ॥ १४ ॥
पुत्रस्नेहस्नुतस्तनी - पुत्रप्रेमाने पान्हा फुटला आहे स्तनांना जिच्या अशी - सा यशोदा - ती यशोदा - बालैः सह - मुलांबरोबर पुष्कळ - अतिवेलं क्रीडन्तम् - वेळपर्यंत खेळत असलेल्या - सुतं कृष्णं - आपला पुत्र जो श्रीकृष्ण त्याला - अग्रजम् (च) - व त्याचा वडील भाऊ जो बलराम त्याला - अजोहवीत् - हाका मारिती झाली. ॥१४॥
श्रीकृष्ण आणि बलराम मुलांबरोबर पुष्कळ वेळ खेळत होते. यशोदेने जाऊन त्यांनी मोठ्याने हाका मारल्या. त्यावेळी पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनांतून दूध झिरपत होते. (१४)
कृष्ण कृष्णारविन्दाक्ष तात एहि स्तनं पिब ।
अलं विहारैः क्षुत्क्षान्तः क्रीडाश्रान्तोऽसि पुत्रक ॥ १५ ॥
मोठ्याने हाक मारी की कन्हैयाऽऽ श्यामसुंदरा । येरेऽऽ ये लाडक्या कृष्णा थकला असशील तू । थांबवी होसि तू रोड भुकेने, पाजिते तुला ॥ १५ ॥
तात कृष्ण - अरे श्रीकृष्णा - अरविन्दाक्ष कृष्ण - हे कमलनेत्रा कृष्णा - पुत्रक - अरे बाळा - विहारैः अलं - खेळणे पुरे कर - क्रीडाश्रान्तः असि - खेळून दमला आहेस - (त्वं) क्षुत्क्षान्तः (असि) - तू भुकेने व्याकुळ झाला असशील - एहि - ये - स्तनं च पिब - आणि स्तनपान कर. ॥१५॥
ए लाडक्या कृष्णा, कमलनयना, बाळा ये, दूध पी. खेळून खेळून दमला असशील. आता खेळ पुरे कर. भुकेने तू कासावीस झाला असशील. (१५)
हे रामागच्छ ताताशु सानुजः कुलनन्दन ।
प्रातरेव कृताहारः तद् भवान् भोक्तुमर्हति ॥ १६ ॥
प्रीयपुत्रा बळीरामा कुळा आनंद देसि तू । आण तू धाकट्या भावा न्याहारी जिरली पहा ॥ १६ ॥
हे तात कुलनन्दन राम - बा कुलाला आनंद देणार्या रामा - सानुजः आशु आगच्छ - आपल्या धाकटया भावासह लवकर ये - (त्वं) प्रातः एव - सकाळीच तेवढे - कृताहारः (असि) - तुझे भोजन झाले आहे - तत् - ह्याकरिता - भवान् भोक्तुम् अर्हति - तू भोजन करण्यास योग्य आहेस. ॥१६॥
बाळ रामा ! कुलनंदना ! ये. लहान भावाला घेऊन लगेच ये. पहा, पुत्रा, आज तू अगदी सकाळीच न्याहारी केली होतीस. आता तू जेवायला चल. (१६)
प्रतीक्षते त्वां दाशार्ह भोक्ष्यमाणो व्रजाधिपः ।
एह्यावयोः प्रियं धेहि स्वगृहान् यात बालकाः ॥ १७ ॥
भोजना बैसले राजे वाट पाहात थांबले । यावे घरास दोघांनी मुलांनो घरी या तुम्ही ॥ १७ ॥
दाशार्ह - हे श्रीकृष्णा - भोक्ष्यमाणः - भोजनास बसणारा - व्रजाधिपः - गोकुळाचा अधिपति नंद - त्वां प्रतीक्ष्यते - तुझी वाट पाहत आहे - एहि - ये - (नः) प्रियं धेहि - आमचे प्रिय कर - बालकाः - मुलांनो - स्वगृहान् यात - आपल्या घरी जा. ॥१७॥
बलरामा ! बाबा भोजनासाठी पानावर बसले आहेत. ते तुमची वाट पहात आहेत. या, आणि आम्हांला आनंद द्या. मुलांनो ! आता तुम्हीही आपापल्या घरी जा. (१७)
धूलिधूसरिताङ्गस्त्वं पुत्र मज्जनमावह ।
जन्मर्क्षमद्य भवतो विप्रेभ्यो देहि गाः शुचिः ॥ १८ ॥
धुळीने माखले अंग त्वरीत न्हावु घालिते । जन्मनक्षत्र ते आज ब्राह्मणा गाई दान द्या ॥ १८ ॥
पुत्र - हे श्रीकृष्णा - धूलिधूसरिताङ्गः त्वं - ज्याचे अवयव धुळींनी मळून गेले आहेत असा तू - मज्जनं आवह - स्नान कर - अद्य भवतः जन्मर्क्षं (अस्ति) - आज तुझे जन्मनक्षत्र आहे - शुचिः (भूत्वा) - शुचिर्भूत होऊन - विप्रेभ्यः गाः देहि - ब्राह्मणांना गाई दे. ॥१८॥
मुलांनो पहा तर खरे, तुमचे अंग कसे धुळीने माखले आहेते ! लवकर स्नान करा. आज तुमचे जन्मनक्षत्र आहे. आंघोळ करून ब्राह्मणांना गोदान करा. (१८)
पश्य पश्य वयस्यांस्ते मातृमृष्टान् स्वलङ्कृतान् ।
त्वं च स्नातः कृताहारो विहरस्व स्वलङ्कृतः ॥ १९ ॥
पहा त्या तुमच्या मित्रां मातांनी न्हाविले असे । घासून पुसुनी अंग दागिने घातले पहा । आता न्हावे तुम्ही आणि लेणे खाणे नि खेळणे ॥ १९ ॥
मातृमृष्टान् - मातांनी स्नान घालून स्वच्छ केलेल्या - स्वलंकृतान् (च) - व अलंकारांनी भूषविलेल्या - ते वयस्यान् पश्य पश्य - तुझ्या सोबत्यांकडे पहा पहा - (तथा) त्वं च - तसाच तू सुद्धा - स्नातः - स्नान केलेला - कृताहारः - भोजन केलेला असा - स्वलंकृतः सन् - अलंकार धारण करून - अनन्तरं विहरस्व - मग खेळ. ॥१९॥
पहा ! पहा ! तुमच्या मित्रांना त्यांच्या आयांनी न्हाऊ-माखू घालून कसे सुंदर सुंदर दागिने घातले आहेत ते. आता तुम्हीसुद्धा न्हाऊन छान छान कपडे घालून, खाऊन, पिऊन मग खेळायला जा. (१९)
विवरण :- यानंतरच्या श्लोकांतहि कृष्णाच्या बाललीलांचे अतिशय हृद्य वर्णन आहे. एखाद्या खेडेगावातील शेतकर्याच्या मुलांनी किंवा गाईगुरे चारणार्या (राखोळी करणार्या) मुलांनी कराव्या अशा त्या सामान्य लीला, पण त्या लीलांतूनहि निर्व्याज, निरागस आनंद लुटण्याची त्यांची वृत्ती इथे दिसून येते. आणि अशा या खेळात जगद्गुरू, त्रिलोकनायक कृष्ण परमात्मा सामील ! गोपींची साधी साधी कामे करणे, मातीत लोळणे, अवजड वस्तू उचलताना त्या उचलत नसल्याचा अभिनय करीत उचलणे, मोठ-मोठे आवाज काढून सवंगडयांना घाबरवणे; खरोखर त्या खेळियाचे हे खेळ पाहणारे ते गोप-गोपी भाग्यवानच ! (मात्र मोबाईल संगणकावर गेम्स खेळणार्या आजच्या पिढीतल्या मुलांना त्यात फारसे तथ्य वाटणार नाही. महागडया खेळांच्या भारी भारी वस्तू, रियँलिटी शोज, त्यामुळे नको इतकी मिळणारी प्रसिद्धी, त्यासाठी असणारी चुरस आणि थँक्यू, साँरी यासारख्या सतत औपचारिक शब्दांचा वापर, मैदानी साधे साधे खेळ यांचा अभाव, हे पाहून ही मुले आपले बालपण हरवून अकाली प्रौढ झाली आहेत की काय असा प्रश्न पडतो.) दरम्यानच्या काळात 'उपनंदासारखे' प्रौढ व विचारी वृद्ध कृष्ण आणि सर्वच गोकुळवासीयांच्या सुरक्षेबद्दल किती जागरूकपणे विचार करीत होते, हे दिसून येते. सर्वच गोकुळवासीयांनी काही काळ गोकुळ सोडून दुसरीकडे वास्तव्यास जावे, हा त्यांचा सल्ला त्यांच्या विचारांची परिपक्वता दाखवितो. शेवटी कंसासारख्या बलाढय राजाशी सामना होता. कृष्णाला शोधून काढण्यासाठी तो जंग जंग पछाडणार हे उघड होते. सामान्य जनता त्याच्या पाशवी शक्तीपुढे किती पुरी पडली असती ? म्हणूनच काही काळ 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डितः' या न्यायाने सर्वांनीच तेथून दूर जाणे सोयीचे होते. (९-१९)
( इंद्रवंशा )
इत्थं यशोदा तमशेषशेखरं मत्वा सुतं स्नेहनिबद्धधीर्नृप । हस्ते गृहीत्वा सहराममच्युतं नीत्वा स्ववाटं कृतवत्यथोदयम् ॥ २० ॥
( इंद्रवज्रा ) माता मने प्राण प्रेमेचि बद्ध धरोनि दोघा द्वय त्या करास । घरास आली मग मांगलीक केले तिने ते करणे जसे जे ॥ २० ॥
नृप - हे राजा - इत्थं - याप्रमाणे - अशेषशेखरं - सर्वांचा मुकुटमणि - तं (कृष्णं) - अशा त्या श्रीकृष्णाला - सुतं मत्वा - पुत्र समजून - स्नेहनिबद्धधीः यशोदा - प्रेमाने बांधले आहे चित्त जिचे अशी यशोदा - सहरामं अच्युतम् - बलरामासह श्रीकृष्णाला - हस्ते गृहीत्वा - हाताने धरून - स्ववाटं नीत्वा - आपल्या ठिकाणावर नेऊन - अथ (तस्य) - मग त्याचे - उदयं कृतवती - स्नान, भोजन इत्यादि मंगल करिती झाली. ॥२०॥
परीक्षिता ! चराचराचे शिरोमणी असलेल्या भगवंतांना प्रेमामुळे ती आपला पुत्र समजत होती. तिने एका हाताने बलरामाला आणि दुसर्या हाताने श्रीकृष्णाला पकडून त्यांना ती आपल्या वाड्यात घेऊन आली. नंतर तिने मुलांना न्हाऊ घालून त्यांचे औक्षण केले. (२०)
( अनुष्टुप् )
गोपवृद्धा महोत्पातान् अनुभूय बृहद्वने । नन्दादयः समागम्य व्रजकार्यं अमन्त्रयन् ॥ २१ ॥
( अनुष्टुप् ) नंदबाबा तसे वृद्ध एकत्र येउनी तदा । उपाय शोधिती तैसा उत्पात गोकुळी घडे ॥ २१ ॥
नंदादयः गोपवृद्धः - नंदादिक वृद्ध गोप - (तस्मिन्) बृहद्वने - त्या घोर अरण्यात - महोत्पातान् - मोठमोठी संकटे - अनुभूय - अनुभवून - समागम्य च - आणि एकत्र जमून - व्रजकार्यं - गोकुळाच्या कार्याविषयी - आमन्त्रयन् - विचार करिते झाले. ॥२१॥
नंदादि वृद्ध गोपांनी महावनामध्ये मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत, असे पाहून सर्वांनी एकत्र येऊन यापुढे काय केले पाहिजे, याविषयी विचारविनिमय सुरू केला. (२१)
तत्र उपनन्दनामाऽऽह गोपो ज्ञानवयोऽधिकः ।
देशकालार्थतत्त्वज्ञः प्रियकृद् रामकृष्णयोः ॥ २२ ॥
उपनंद असा एक वृद्ध नी ज्ञानि गोप जो । प्रसंगा जाणी तो नित्य पुत्ररक्षार्थ बोलला ॥ २२ ॥
तत्र - त्यावेळी - ज्ञानवयोधिकः - ज्ञानाने व वयाने अधिक असा - देशकालार्थ - देशाला व कालाला अनुसरून - तत्वज्ञः - तात्विक अर्थाचे ज्ञान असणारा - रामकृष्णयोः प्रियकृत् - बलराम व श्रीकृष्ण ह्यांचे प्रिय करणारा - उपनन्दनामा गोपः - उपनंद नावाचा गोप - आह - म्हणाला. ॥२२॥
त्यापैकी उपनंद नावाचा वयाने व ज्ञानाने मोठा एक गोप होता व तो देश, काल व परिस्थिती यांचे रहस्य जाणणारा असून राम-कृष्णांचे कल्याण इच्छिणारा होता. तो म्हणाला, (२२)
उत्थातव्यं इतोऽस्माभिः गोकुलस्य हितैषिभिः ।
आयान्ति अत्र महोत्पाता बालानां नाशहेतवः ॥ २३ ॥
उत्पात घडती मोठे मुलांना ते अनिष्ठची । सिद्ध होवोनि सर्वांनी उपाय योजिणे असे ॥ २३ ॥
गोकुलस्य हितैषिभिः - गोकुळाच्या कल्याणाची इच्छा करणार्या - अस्माभिः - आम्ही - इतः उत्थातव्यम् - येथून उठून दुसरीकडे जावे - अत्र - येथे - बालानां नाशहेतवः - बालकांच्या नाशाला कारणीभूत असे - महोत्पाताः आयान्ति - मोठे उत्पात येत आहेत. ॥२३॥
सध्या येथे मोठमोठी संकटे येऊ लागली आहेत. ती मुख्यतः लहान मुलांच्या नाशाला कारणीभूत ठरणारी आहेत. म्हणून, गोकुळ आणि गोकुळवासी यांचे कल्याण इच्छिणार्या आपण इथून दुसरीकडे गेले पाहिजे. (२३)
मुक्तः कथञ्चिद् राक्षस्या बालघ्न्या बालको ह्यसौ ।
हरेरनुग्रहात् नूनं अनश्चोपरि नापतत् ॥ २४ ॥
पहा हा नंदराजाचा लाडला वाचला असे । पूतनाकरणीतून टांग्याच्या खालती तसा ॥ २४ ॥
असौ हि बालकः - कारण हा बालक श्रीकृष्ण - बालघ्न्याः राक्षस्याः - बालकांचा नाश करणार्या पूतना राक्षसीपासून - कथंचित् मुक्तः - मोठ्या कष्टाने सुटला - च - आणि - नूनं हरेः (एव) अनुग्रहात् - खरोखर परमेश्वराच्याच कृपेने - (अस्य) उपरि - ह्या श्रीकृष्णाच्या अंगावर - अनः न अपतत् - गाडा पडला नाही ॥२४॥
पहा ! मुलांना मारणार्या राक्षसीच्या तडाख्यातून हा मुलगा कसाबसा वाचला. त्यानंतर भगवंताच्या कृपेनेच याच्यावर हा मोठा छकडा पडला नाही. (२४)
चक्रवातेन नीतोऽयं दैत्येन विपदं वियत् ।
शिलायां पतितस्तत्र परित्रातः सुरेश्वरैः ॥ २५ ॥
वादळी रूप दैत्याने आकाशी नेउनी पुन्हा । आप्टिले तरि ही याला कुळाला देव रक्षितो ॥ २५ ॥
चक्रवातेन दैत्येन - वावटळीच्या रूपाने आलेल्या दैत्याने - वियत् विपदं नीतः - पक्ष्यांचे उडण्याचे स्थान अशा आकाशात नेलेला - अयं - हा श्रीकृष्ण - शिलायां पतितः - दगडावर पडला - (परंतु) सुरेश्वरैः तत्र परित्रातः - पण देवांकडून त्याठिकाणी रक्षिला गेला ॥२५॥
वादळरूपी दैत्याने याला आकाशात नेऊन घोर संकटातच टाकले होते. तेथून पुन्हा हा दगडावर आपटला, तेव्हासुद्धा देवाने याला वाचवले. (२५)
यन्न म्रियेत द्रुमयोः अन्तरं प्राप्य बालकः ।
असौ अन्यतमो वापि तदप्यच्युतरक्षणम् ॥ २६ ॥
यमलार्जुन ते वृक्ष पडता वाचला असे । भगवान् रक्षितो आम्हा कृपा त्याचीच मानणे ॥ २६ ॥
असौ - हा श्रीकृष्ण - वा - किंवा - अन्यतमः अपि बालकः - दुसरा कोणीही बालक - द्रुमयोः अन्तरं प्राप्य - दोन वृक्षामध्ये सापडून - यत् न म्रियेत - जो मेला नाही - तत् अपि - ते सुद्धा - अच्युतरक्षणम् - परमेश्वराने केलेले रक्षणच होय. ॥२६॥
यमलार्जुनांच्या मध्ये येऊनसुद्धा हा किंवा दुसरे मूल मेले नाही. हे सुद्धा भगवंतांनीच आमचे रक्षण केल्यामुळे. (२६)
यावत् औत्पातिकोऽरिष्टो व्रजं नाभिभवेदितः ।
तावद् बालानुपादाय यास्यामोऽन्यत्र सानुगाः ॥ २७ ॥
येतील संकटे थोर नष्टितीलचि गोकुळा । मुलांना घेउनी सारे जावे दूर कुठे तरी ॥ २७ ॥
यावत् - जोपर्यंत - औत्पातिकः अरिष्टः - उत्पातापासून होणारे संकट - व्रजं न अभिभवेत् - गोकुळावर प्राप्त झाले नाही - तावत् - त्याच्या पूर्वीच - सानुगाः - अनुयायांसह - बालान् उपादाय - बालकांना घेऊन - इतः अन्यत्र यास्यामः - येथून दुसरीकडे जाऊ या. ॥२७॥
म्हणून जोपर्यंत एखादे फार मोठे अनिष्टकारक संकट या व्रजाला नष्ट करीत नाही, तोपर्यंतच आपण आपल्या मुलांना घेऊन सहपरिवार येथून दुसरीकडे निघून जाऊ. (२७)
वनं वृन्दावनं नाम पशव्यं नवकाननम् ।
गोपगोपीगवां सेव्यं पुण्याद्रि तृणवीरुधम् ॥ २८ ॥
वृंदावन असे थोर हिरवे नित्य जे नवे । पवित्र तृण नी वृक्ष गाईंना चांगले तिथे । गोप गोपी नि गाईंना रहाया चांगले पहा ॥ २८ ॥
नवकाननं - ताज्या तृणादि वस्तू ज्यात आहेत असे - पशव्यं - पशूंना हितकारक - गोपगोपीगवां सेव्यं - गोपाल, गोपी व गाई यांनी सेविण्याजोगे - पुण्याद्रितृणवीरुधम् - पवित्र असे पर्वत, गवत व वेली आहेत ज्यामध्ये असे - वृन्दावनं नाम वनम् (अस्ति) - वृंदावन नावाचे एक अरण्य आहे. ॥२८॥
वृंदावन नावाचे एक वन आहे. तेथे पवित्र पर्वत, गवत आणि वनस्पती आहेत. ते आमच्या जनावरांसाठी हितकारक आहे. गोप, गोपी आणि गाईंसाठी ते योग्य स्थान आहे. (२८)
तत्तत्राद्यैव यास्यामः शकटान् युङ्क्त मा चिरम् ।
गोधनान्यग्रतो यान्तु भवतां यदि रोचते ॥ २९ ॥
जर हे रुचते सर्वां जाऊया आजची तिथे । विलंब नच हो याते गाई गाड्या धरा चला ॥ २९ ॥
तत् - त्या कारणास्तव - भवतां यदि रोचते - तुम्हाला जर आवडत असेल - (तर्हि) अद्य एव तत्र यास्यामः - तर आपण आजच तेथे जाऊ या - मा चिरं - उशीर नको - शकटान् युङ्क्त - गाडया जुंपा - अग्रतः गोधनानि यान्तु - पुढे गाई जावोत. ॥२९॥
जर हे म्हणणे तुम्हांला पटत असेल, तर आजच आपण तिकडे जावयास निघू. उशीर करू नका. छकडे जोडा आणि आमची गुरे-वासरे पुढे जाऊ देत. (२१-२९)
तच्छ्रुत्वैकधियो गोपाः साधु साध्विति वादिनः ।
व्रजान् स्वान् स्वान् समायुज्य ययू रूढपरिच्छदाः ॥ ३० ॥
ठीक ! ठीक ! असे सारे वदले ऐकता तसे । सामुग्री रचुनी टांगे निघाले तिकडे वनां ॥ ३० ॥
तत् श्रुत्वा - ते ऐकून - एकधियः - एक आहे निश्चय ज्यांचा असे - साधु साधु - चांगले चांगले - इति वादिनः - असे बोलणारे - गोपाः - गोप - स्वान् स्वान् - आपापल्या - व्रजान् समायुज्य - गाडयांचे समुदाय जुंपून - रुढपरिच्छदाः - त्यावर चढविले आहेत पदार्थ ज्यांनी असे - (वृंदावनं) ययुः - वृंदावनाला गेले. ॥३०॥
उपनंदाचे म्हणणे ऐकून सर्व गोप एकमताने ’छान ! छान !’ म्हणाले. त्यांनी आपल्या गाईंचे कळप एकत्रित केले आणि छकड्यांवर सर्व सामग्री ठेवून ते वृंदावनाकडे निघाले. (३०)
वृद्धान् बालान् स्त्रियो राजन् सर्वोपकरणानि च ।
अनःस्वारोप्य गोपाला यत्ता आत्त-शरासनाः ॥ ३१ ॥
स्त्रिया बाळां नि वृद्धांना टांग्यात बैसवोनिया । चालले पाठिशी गोप जोडोनी धनु-बाण ते ॥ ३१ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - वृद्धान् - म्हातार्या माणसांना - बालान् - लहान मुलांना - स्त्रियः - बायकांना - च सर्वोपकरणानि - आणि सर्व गृहसाहित्यांना - अनस्सु आरोप्य - गाडयांवर चढवून - गोपालाः - गोप - आत्तशरासनाः - घेतली आहेत धनुष्ये ज्यांनी असे - यत्ताः - सज्ज झाले. ॥३१॥
परीक्षिता ! गवळ्यांनी वृद्ध, मुले, स्त्रिया यांना आणि सर्व सामान छकड्यांवर ठेवले आणि स्वतः त्यांच्या पाठोपाठ ते धनुष्यबाण घेऊन अत्यंत सावधानपणे चालू लागले. (३१)
गोधनानि पुरस्कृत्य शृङ्गाण्यापूर्य सर्वतः ।
तूर्यघोषेण महता ययुः सहपुरोहिताः ॥ ३२ ॥
सर्वात पुढती गाई वासरे चालवीयले । तुतार्या शिंग वाद्यांच्या सवे विप्रहि चालले ॥ ३२ ॥
सहपुरोहिताः (ते) - उपाध्यायांसह ते गोप - गोधनानि पुरस्कृत्य - गाईंना पुढे करून - सर्वतः शृंगाणि आपूर्य - जिकडेतिकडे शिंगे वाजवून - महता तूर्यघोषेण - नगार्यांच्या मोठया घोषासह - ययुः - जाऊ लागले. ॥३२॥
गाई-वासरांनी त्यांनी पुढे घातले आणि त्यांच्या पाठोपाठ रणशिंगे आणि तुतार्या जोरजोराने वाजवीत पुरोहितांसह ते चालले. (३२)
गोप्यो रूढरथा नूत्न कुचकुंकुम कान्तयः ।
कृष्णलीला जगुः प्रीत्या निष्ककण्ठ्यः सुवाससः ॥ ३३ ॥
वक्षासी केशरी लेप वस्त्र हार तसे नवे । लेवोनी रथि त्या गोपी कृष्णलीलाचि गायिल्या ॥ ३३ ॥
नूत्न - नवीन अशी जी - कुचकुंकुमकान्तयः - स्तनांना लावलेली केशराची उटी, तीमुळे अतिशय सुंदर अशा - निष्ककण्ठयः - सोन्याचे अलंकार धारण करणार्या - सुवाससः - चांगली वस्त्रे नेसलेल्या - गोप्यः - गोपी - रूढरथाः - रथात बसून - प्रीताः - प्रेमाने - कृष्णलीलाः जगुः - श्रीकृष्णाच्या लीला गाऊ लागल्या. ॥३३॥
वक्षःस्थळांवर ताजी केशराची उटी लावून, सुंदर वस्त्रे परिधान करून, गळ्यामध्ये सोन्याचे दागिने घालून, रथांवर बसलेल्या गोपी आनंदाने श्रीकृष्णांच्या लीला गात चालल्या होत्या. (३३)
तथा यशोदारोहिण्यौ एकं शकटमास्थिते ।
रेजतुः कृष्णरामाभ्यां तत्कथाश्रवणोत्सुके ॥ ३४ ॥
यशोदा रोहिणी याही सजोनी रथि बैसल्या । कृष्ण नी बळीरामचे तोतरे बोल ऐकती ॥ ३४ ॥
तथा - त्याचप्रमाणे - एकं शकटं आस्थिते - एका गाडयात बसलेल्या - तत्कथाश्रवणोत्सुके - रामकृष्णांच्या कथा ऐकण्याविषयी उत्कंठित झालेल्या - यशोदारोहिण्यौ - यशोदा व रोहिणी - कृष्णरामाभ्यां रेजतुः - कृष्ण व बलराम ह्यांसह शोभल्या. ॥३४॥
तसेच यशोदा आणि रोहिणी श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासह एका छकड्यात बसल्या होत्या. त्या आपल्या दोन्ही मुलांचे बोबडे बोल ऐकण्यात गुंग झाल्या होत्या. (३४)
वृन्दावनं सम्प्रविश्य सर्वकालसुखावहम् ।
तत्र चक्रुर्व्रजावासं शकटैः अर्धचन्द्रवत् ॥ ३५ ॥
वृंदावन असे छान सदैव सुखची सुख । अर्धचंद्राकृती टांगे लावोनी गाई रक्षिल्या ॥ ३५ ॥
शकटैः - गाडयांतून - सर्वकालसुखावहं - सतत सुख देणार्या - वृन्दावनं संप्रविश्य - वृंदावनात प्रवेश करून - तत्र - तेथे - अर्धचन्द्रवत् - अर्ध्या चंद्राच्या कोरेप्रमाणे - व्रजावासं चक्रुः - गौळवाडयाची रचना केली. ॥३५॥
सर्वकाळ आनंद देणार्या वृंदावनात गेल्यावर गोपांनी आपले छकडे अर्धचंद्रकार उभे केले आणि गुरांना राहण्यासाठी योग्य जागा तयार केल्या. (३५)
वृन्दावनं गोवर्धनं यमुनापुलिनानि च ।
वीक्ष्यासीत् उत्तमा प्रीती राममाधवयोर्नृप ॥ ३६ ॥
गोवर्धन गिरी तेथे यमुना वाळवंटही । पाहता हर्षला कृष्ण बळीही मोदला तसा ॥ ३६ ॥
नृप - हे परीक्षित राजा - वृंदावनं - वृंदावन नामक अरण्य - गोवर्धनं - गोवर्धन नावाचा पर्वत - यमुनापुलिनानि च - आणि यमुनेची वाळवंटे - वीक्ष्य - पाहून - राममाधवयोः - बलराम व लक्ष्मीपती श्रीकृष्ण यांना - उत्तमा प्रीतिः (अभवत्) - अत्यंत आनंद झाला. ॥३६॥
परीक्षिता ! वृंदावन, गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचे विशाल वाळवंट पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांना खूप आनंद झाला. (३६)
एवं व्रजौकसां प्रीतिं यच्छन्तौ बालचेष्टितैः ।
कलवाक्यैः स्वकालेन वत्सपालौ बभूवतुः ॥ ३७ ॥
वृंदावनात गोकूळापरी हे करिती लिला । बोबडे बोलती बोल वासरे चारु लागले ॥ ३७ ॥
एवं - याप्रमाणे - बालचेष्टितैः - बाललीलांनी - कलवाक्यैः (च) - आणि मधुर भाषणांनी - व्रजौकसां (मनसि) - गौळवाडयात राहणार्या सर्व लोकांच्या मनात - प्रीतिं यच्छन्तौ (तौ) - प्रेम उत्पन्न करणारे ते रामकृष्ण - स्वकालेन - योग्य काळी - वत्सपालौ बभूवतुः - वासरे राखणारे झाले. ॥३७॥
दोघेही राम-कृष्ण आपल्या बाललीलांनी आणि बोबड्या बोलण्याने व्रजवसियांना आनंद देत योग्य वेळी वासरे चारावयास नेऊ लागले. (३७)
अविदूरे व्रजभुवः सह गोपालदारकैः ।
चारयामासतुः वत्सान् नानाक्रीडापरिच्छदौ ॥ ३८ ॥
अन बाळांसवे दोघे सामग्री खूप घेउनी । निघती ते घरातून गोठ्याशी वत्स चारिती ॥ ३८ ॥
नानाक्रीडापरिच्छदौ (तौ) - अनेकप्रकारचे खेळ खेळणारे ते रामकृष्ण - गोपालदारकैः सह - गोपालांच्या मुलांसह - व्रजभुवः अविदूरे - गौळवाडयाच्या जवळच - वत्सान् चारयामासतुः - वासरांना चरवू लागले. ॥३८॥
गवळ्यांच्या मुलांबरोबर खेळण्यासाठी निरनिराळे साहित्य घेऊन ते घराबाहेर पडत आणि व्रजभूमी जवळच वासरांना चारीत. (३८)
क्वचिद् वादयतो वेणुं क्षेपणैः क्षिपतः क्वचित् ।
क्वचित् पादैः किङ्किणीभिः क्वचित् कृत्रिमगोवृषैः ॥ ३९ ॥
कधी वाजविती वेणू कधी ढेकळ फोडिती । पैंजणा ताल ते घेती घेती सोंगहि गाइचे ॥ ३९ ॥
क्वचित् - एखादे वेळी - वेणुं वादयतः - वेणु वाद्य वाजवीत - क्वचित् - कधी कधीच - क्षेपणैः क्षिपतः - गोफणींनी दगड फेकीत - क्वचित् - एखादे प्रसंगी - किङ्किणीभिः पादैः (नृत्यतः) - घुंगुर घातलेल्या पायांनी नाचत - क्वचित् - एखादे वेळी - कृत्रिमगोवृषैः (क्रीडतः) - बैलांची सोंगे घेऊन क्रीडा करीत. ॥३९॥
ते कधी बासरी वाजवीत, तर कधी गोफणीने दगड फेकीत. काही वेळा आपल्या पायातील घुंघरांच्या नादावर नाचत तर कधी गाय-बैलांचे सोंग घेऊन खेळत. (३९)
वृषायमाणौ नर्दन्तौ युयुधाते परस्परम् ।
अनुकृत्य रुतैर्जन्तून् चेरतुः प्राकृतौ यथा ॥ ४० ॥
कधी वळू बनोनीया टकरा करिती द्वय । माकडे सारिका मोरा परी शब्द कधी कधी ॥ ४० ॥
वृषायमाणौ नर्दन्तौ - वृषभाप्रमाणे गर्जना करणारे रामकृष्ण - परस्परं युयुधाते - आपापसांत कुस्ती करीत - रुतैः - शब्दांनी - जन्तून् अनुकृत्य - प्राण्यांचे अनुकरण करून - यथा प्राकृतौ - साधारण पुरुषांप्रमाणे - चेरतुः - संचार करीत. ॥४०॥
कधी वळू बनून हंबरत. आपापसात लढत तर कधी पशु-पक्ष्यांचे आवाज काढून सामान्य मुलांसारखे खेळत. (४०)
कदाचिद् यमुनातीरे वत्सान् चारयतोः स्वकैः ।
वयस्यैः कृष्णबलयोः जिघांसुर्दैत्य आगमत् ॥ ४१ ॥
एकदा यमुना काठी चारिती वासरे तदा । त्यावेळी मारणे हेतू ठेवोनी दैत्य पातला ॥ ४१ ॥
कदाचित् - एके दिवशी - स्वकैः वयस्यैः - आपल्या सोबत्यांसह - यमुनातीरे - यमुनेच्या तीरी - कृष्णबलयोः वत्सान् चारयतोः - कृष्ण व बलराम वासरे चारीत असता - (तौ) जिघांसुः - त्यांना मारण्याची इच्छा करणारा - (कश्चित्) दैत्यःआगमत् - कोणी एक दैत्य प्राप्त झाला. ॥४१॥
एकदा कृष्ण आणि बलराम आपल्या मित्रांबरोबर यमुनातटावर वासरे चारीत असताना त्यांना मारण्यासाठी एक दैत्य आला. (४१)
तं वत्सरूपिणं वीक्ष्य वत्सयूथगतं हरिः ।
दर्शयन् बलदेवाय शनैर्मुग्ध इवासदत् ॥ ४२ ॥
वासरू होउनी आला कृष्णाने जाणिले असे । बलरामा खुणावोनी वत्सात पातले द्वय । सुरेख वासरां मध्ये रमले दाविती तसे ॥ ४२ ॥
हरिः - श्रीकृष्ण - वत्सरूपिणं - वासराचे रूप घेतलेल्या - वत्सयूथगतं - वासरांच्या कळपात शिरलेल्या - तं - त्या वत्सासुराला - बलदेवाय - बलदेवाला - दर्शयन् - दाखवीत - मुग्धः इव - भोळ्याप्रमाणे - शनैः - हळू हळू - तं आसदत् - त्या दैत्याजवळ गेला. ॥४२॥
श्रीकृष्णांनी पाहिले की, हा खोट्या वासराचे रूप घेऊन वासरांच्या कळपात शिरला आहे. त्यांनी बलरामाला दाखविले आणि हळू हळू ते त्याच्यावर भाळल्यासारखे दाखवून त्याच्याजवळ पोहोचले. (४२)
गृहीत्वा अपरपादाभ्यां सहलाङ्गूलमच्युतः ।
भ्रामयित्वा कपित्थाग्रे प्राहिणोद् गतजीवितम् । स कपित्थैर्महाकायः पात्यमानैः पपात ह ॥ ४३ ॥
पाठीचे धरुनी पाय तो वत्सासुर कृष्णने । मारिला फिरवोनिया खैरवृक्षांसि फेकला ॥ ४३ ॥
अच्युतः - श्रीकृष्ण - (तस्य) लाङ्गुलं - त्याची शेपटी - अपरपादाभ्यां सह - मागील दोन पायांसह - गृहीत्वा - धरून - भ्रामयित्वा - गरगर फिरवून - गतजीवितं (तं) - गतप्राण झालेल्या त्या वत्सासुराला - कपित्थाग्रे - कवठाच्या झाडाच्या टोकावर - प्राहिणोत् - फेकिता झाला - सः महाकायः - तो मोठया शरीराचा दैत्य - पात्यमानैः कपित्थैः (सह) - पाडिल्या जाणार्या कवठांसह - पपात ह - खाली पडला. ॥४३॥
श्रीकृष्णांनी शेपटासह त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला आकाशात फिरविले आणि मेल्यानंतर कवठाच्या झाडावर आपटले. त्याचे ते लांब-रुंद दैत्यशरीर कवठाची कित्येक फळे पाडत स्वतः खाली पडले. (४३)
तं वीक्ष्य विस्मिता बालाः शशंसुः साधु साध्विति ।
देवाश्च परिसन्तुष्टा बभूवुः पुष्पवर्षिणः ॥ ४४ ॥
पाहता बाळ गोपांच्या आश्चर्या पार ना उरे । आनंदे वदले वाऽरे ! देवता पुष्प वर्षिती ॥ ४४ ॥
तं वीक्ष्य - त्या दैत्याला पाहून - विस्मिताः बालाः - आश्चर्यचकित झालेले बालक - साधु साधु इति - चांगले चांगले असे म्हणून - शशंसुः - प्रशंसा करू लागले - च - आणि - परिसन्तुष्टाः देवाः - संतुष्ट झालेले देव - पुष्पवर्षिणः बभूवुः - फुलांची वृष्टि करिते झाले. ॥४४॥
हे पाहून मुलांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. "वाः ! वाः !" करून ते कन्हैय्याची प्रशंसा करू लागले. देवसुद्धा आनंदाने पुष्पवर्षाव करू लागले. (४४)
विवरण :- उपनंदाच्या सूचनेप्रमाणे सर्व व्रजवासी 'वृंदावना'मध्ये वास्तव्यास गेले. (गोकुळापासून साधारण ३५-४० मैल दूर असणारे यमुनेच्या तीरावरील गाव. वृंदा=तुळस आणि इतरही वृक्षांनी समृद्ध असणारे आणि सर्वकाळ सुखावह असणारे एक गाव.) अर्थात इथेही कंसाने कृष्णाच्या मागावर पाठविलेले असुर मायावी रूप घेऊन आलेच; पण कृष्णाने त्यांचा निःपात केला. वृंदावनामध्ये गायी-गुरांना घेऊन सवंगडयांसह कृष्ण वनामध्ये जात असे. त्या सर्वांबरोबर मनसोक्त खेळत असे. नंतर ते सर्वजण बरोबर आणलेल्या शिदोर्या सोडून सहभोजनाचा आनंद घेत असत. वास्तविक कृष्ण परमात्मा सर्व जगाचा (विष्णुरूपाने) पालनकर्ता; पण तो सामान्य गुराख्याप्रमाणे रानात गायी-वासरे चारत असे. कृष्ण चरित्रातील परस्परभिन्नत्व दाखविणारी त्याची ही एक भूमिका. त्यामुळेच त्याचे देवत्व उघड न होता इतरांना तो आपला वाटला. ('सहनाववतु सह नौ भुनक्तु' असे तोंडाने म्हणून सहकारावर केवळ पोकळ भाषण करायचे आणि बहुसंख्य जनता दारिद्रय रेषेखालचे जीवन जगत असताहि स्वतः नेत्यांनी मात्र तूप-रोटीचा आस्वाद घ्यावयाचा, हे चित्र आजच्या काळातले ! ही भूमिकाही भिन्नत्व दाखविणारी) (४४)
तौ वत्सपालकौ भूत्वा सर्वलोकैकपालकौ ।
सप्रातराशौ गोवत्सान् चारयन्तौ विचेरतुः ॥ ४५ ॥
लोकरक्षक ते दोघे वत्सरक्षक जाहले । त्वरेचि उठती नित्य वासरां वनि पाळिती ॥ ४५ ॥
सर्वलोकैकपालकौ - सर्व लोकांचे रक्षक असे - तौ - ते रामकृष्ण - वत्सपालकौ (भूत्वा) - वासरांचे पालक होऊन - सप्रातराशौ - सकाळचे खाद्य पदार्थ घेऊन - गोवत्सान् चारयन्तौ - वासरे चरविणारे असे - विचेरतुः - हिंडू लागले. ॥४५॥
जे सर्व लोकांचे एकमेव रक्षक आहेत, तेच आता गुराखी बनले. ते पहाटेच उठून न्याहारीचे पदार्थ घेऊन वासरांना चारीत वनात फिरत असत. (४५)
स्वं स्वं वत्सकुलं सर्वे पाययिष्यन्त एकदा ।
गत्वा जलाशयाभ्याशं पाययित्वा पपुर्जलम् ॥ ४६ ॥
एकदा सर्व गोपाळ तळी वत्सास नेत तैं । वासरा पाजिले पाणी पिले सर्वची ते जल ॥ ४६ ॥
एकदा - एके दिवशी - सर्वे - सर्व बालक - स्वं स्वं वत्सकुलं - आपापल्या वासरांच्या समूहाला - पाययिष्यन्तः - पाणी पाजू इच्छिणारे - जलाशयाभ्याशं गत्वा - पाण्याच्या डोहाजवळ जाऊन - वत्सान् पाययित्वा - वासरांना पाणी पाजून - (स्वयं) च पपुः - स्वतःही पिते झाले. ॥४६॥
एके दिवशी गवळ्यांची मुले आपापल्या वासरांचे कळप घेऊन त्यांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठी घेऊन गेले. त्यांनी अगोदर वासरांना पाणी पाजले आणि नंतर ते स्वतः पाणी प्याले. (४६)
ते तत्र ददृशुर्बाला महासत्त्वमवस्थितम् ।
तत्रसुर्वज्रनिर्भिन्नं गिरेः शृङ्गमिव च्युतम् ॥ ४७ ॥
मुलांनी पाहिला तेथे प्रचंड बसला कुणी । इंद्र वज्रे जणू थोर गिरी कापोनि ठेविला ॥ ४७ ॥
तत्र - तेथे - ते बालाः - ते बालक - वज्रनिर्भिन्नं - वज्राने विदीर्ण झालेले - च्युतं गिरेः शृङगम् इव - पडलेले पर्वताचे शिखरच की काय अशा प्रकारे - अवस्थितं - राहिलेल्या - महासत्त्वं ददृशुः - मोठया प्राण्याला पाहते झाले - तत्रसुः (च) - व भ्याले. ॥४७॥
त्या मुलांनी, तेथे एक प्रचंड प्राणी बसलेला पाहिला.तो जणू काही व्रजाने तुटून पडलेला पर्वताचा तुकडाच वाटत होता. तो बक नावाचा एक मोठा असुर होता. (४७)
स वै बको नाम महानसुरो बकरूपधृक् ।
आगत्य सहसा कृष्णं तीक्ष्णतुण्डोऽग्रसद्बली ॥ ४८ ॥
बकासूर बकाचे ते रूप घेवोनि बैसला । लांब चोंच बळो थोर कृष्णाला गिळले यये ॥ ४८ ॥
सः वै बकरूपधृक् - तो खरोखर बगळ्यांचे रूप धारण करणारा - बली तीक्ष्णतुण्डः - बलिष्ठ व तीक्ष्ण चोचीचा - बकः नाम महान् असुरः - बक नावाचा मोठा दैत्य - सहसा कृष्णं आगत्य - एकाएकी कृष्णाजवळ येऊन - अग्रसत् - गिळून टाकिता झाला. ॥४८॥
तो बक नावाचा एक मोठा असुर होता. त्याने बगळ्याचे रूप घेतले होते. त्याची चोच अत्यंत तीक्षण होती आणि तो अतिशय बलवान होता. त्याने एकदम झेप घेऊन श्रीकृष्णाला गिळून टाकले. (४८)
कृष्णं महाबकग्रस्तं दृष्ट्वा रामादयोऽर्भकाः ।
बभूवुरिन्द्रियाणीव विना प्राणं विचेतसः ॥ ४९ ॥
बळी नी बाळ गोपाळे गिळिता कृष्ण पाहिला । जाता प्राण जसा देह तसे सर्वास जाहले ॥ ४८ ॥
कृष्णं - कृष्णाला - महाबकग्रस्तं दृष्ट्वा - मोठया बगळ्याने गिळलेला पाहून - प्राणं विना इंद्रियाणि इव - प्राणाशिवाय जशी इंद्रिये तसे - रामादयः अर्भकाः - बलरामादि बालक - विचेतसः बभूवुः - निश्चेष्ट झाले. ॥४९॥
जेव्हा बलराम वगैरे मुलांनी बगळ्याने श्रीकृष्णाला गिळून टाकलेले पाहिले, तेव्हा प्राण निघून गेल्यावर इंद्रियांची जशी अवस्था होते, तशी त्यांची अवस्था झाली. (४९)
विवरण :- 'गोपालसूनुं जगद्गुरोः पितरम्' जगाचा निर्माणकर्ता ब्रह्मदेव, त्याचा पिता हा वासुदेव. त्याहून श्रेष्ठ, पण हा मात्र एका गवळ्याचा मुलगा. (परब्रह्म निष्काय तो हा गवलिया घरी) कृष्णाचे असामान्यत्व दाखविणारे आणखी एक रुप. लहान बाळासाठी हाती पाटी धरून आई 'अ-आ-इ-ई' काढते, अगदी तसेच ! (४९)
( मिश्र )
तं तालुमूलं प्रदहन्तमग्निवद् गोपालसूनुं पितरं जगद्गुरोः । चच्छर्द सद्योऽतिरुषाक्षतं बकः तुण्डेन हन्तुं पुनरभ्यपद्यत ॥ ५० ॥
( इंद्रवज्रा ) ब्रह्मापिता या करितो लिला की टाळूत जाता जळु लागली ती । गिळू पहाता तरि हा गिळेना । चोंचीत तोडी तरी हा तुटेना ॥ ५० ॥
बकः - बकासुर - तालुमूलं - ताळूच्या मूळप्रदेशाला - अग्निवत् प्रदहन्तं - अग्नीप्रमाणे जाळून टाकणार्या - जगद्गुरोः पितरं - त्रैलोक्यगुरु जो ब्रह्मदेव त्याचा पिता अशा - अक्षतं - व्रणरहित अशा - तं गोपालसूनुं - त्या नंदपुत्र श्रीकृष्णाला - सद्यः - तत्काळ - चच्छर्द - ओकून टाकिता झाला - सः - तो दैत्य - अतिरुषा - मोठया रागाने - तुण्डेन (तं) हन्तुम् - चोचीने त्या श्रीकृष्णाला मारण्याकरिता - अभ्यपद्यत - जवळ प्राप्त झाला. ॥५०॥
पितामह ब्रह्मचेवाचासुद्धा पिता असलेला तो गोपाल-बालक जेव्हा बगळ्याच्या टाळूखाली पोहोचला, तेव्हा तो आगीप्रमाणे त्याची टाळू जाळू लागला. म्हणून त्या दैत्याने श्रीकृष्णाला शरीरावर कोणत्याही प्रकारे इजा न करता लगेच बाहेर टाकले आणि नंतर अतिशय क्रोधाने आपल्या कठोर चोचीने त्यांना मारण्यासाठी तो त्यांच्यावर तुटून पडला. (५०)
तं आपतन्तं स निगृह्य तुण्डयोः
दोर्भ्यां बकं कंससखं सतां पतिः । पश्यत्सु बालेषु ददार लीलया मुदावहो वीरणवद् दिवौकसाम् ॥ ५१ ॥
का कंसदूतो झपटे परी या कृष्णे तयाचे जबडे धरोनी । कापी जसे डांगर कापणे ते बाळां नि देवां बहुमोद झाला ॥ ५१ ॥
दिवौकसां मुदावहः - देवांना आनंद देणारा - सतां पतिः सः - साधुंचा अधिपति असा तो कृष्ण - आपतन्तं - चाल करुन येणार्या - कंससखं तं बकं - कंसाचा मित्र अशा त्या बकासुराला - दोर्भ्यां - दोन हातांनी - तुण्डयोः निगृह्य - चोचीच्या दोन्ही पाकळ्या धरुन - बालेषु पश्यत्सु - मुले पहात असता - वीरनवत् - गाठ नसलेल्या वीरण नावाच्या गवताप्रमाणे - लीलया ददार - सहज लीलेने फाडीता झाला ॥५१॥
कंसाचा मित्र बकासुर भक्तवत्सल श्रीकृष्णांवर झडप घालणार, इतक्यात दोन्ही हातांनी त्याच्या दोन्ही चोची पकडल्या आणि मुलांच्या देखत गवताची काडी फाडावी तसे त्याला फाडले. यामुळे देवांना आनंद झाला. (५१)
तदा बकारिं सुरलोकवासिनः
समाकिरन् नन्दनमल्लिकादिभिः । समीडिरे चानकशङ्खसंस्तवैः तद्वीक्ष्य गोपालसुता विसिस्मिरे ॥ ५२ ॥
जाई चमेली करी घेउनीया कृष्णावरी अर्पियले तयांनी । नी शंख ढोला ध्वनी जाहला की हे पाहता बालक हर्षले ते ॥ ५२ ॥
तदा - त्या वेळी - सुरलोकवासिनः - स्वर्गवासी देव - नन्दनमल्लिकादिभिः - नंदनवनातील मोगर्यांच्या पुष्पांनी - बकारिं समाकिरन् - बकासुराला मारणार्या श्रीकृष्णावर वर्षाव करिते झाले - च - आणि - आनकशङ्खसंस्तवैः - दुंदुभि व शंख वाजवून केलेल्या स्तोत्रांनी - समीडिरे - स्तविते झाले - गोपालसुताः - गोपांचे पुत्र - तत् वीक्ष्य - ते पाहून - विसिस्मिरे - आश्चर्यचकित झाले ॥५२॥
तेव्हा सर्व देव श्रीकृष्णांबर नंदवनातील मोगरा इत्यादि फुलांचा वर्षाव करू लागले. तसेच नगारे, शंख इत्यादि वाजवून आणि स्तोत्रांनी त्यांना प्रसन्न करू लागले. हे पाहून गवळ्यांची मुले आश्चर्यचकित झाली. (५२)
मुक्तं बकास्याद् उपलभ्य बालका
रामादयः प्राणमिवेन्द्रियो गणः । स्थानागतं तं परिरभ्य निर्वृताः प्रणीय वत्सान् व्रजमेत्य तज्जगुः ॥ ५३ ॥
सर्वांत येता हरि तेधवा तो आनंदले जै तनि प्राण आला । एकेक येता गळि लागले नी घरासि येता वदले हि सारे ॥ ५३ ॥
रामादयः बालकाः - बलरामादि गोपाळ - ऐन्द्रियः गणः प्राणम् इव - इंद्रियसमुदाय जसा प्राणाला तसा - बकास्यात् मुक्तं - बकासुराच्या मुखातून मुक्त झालेल्या - स्थानागतं तं - आपल्या जागी परत आलेल्या त्या श्रीकृष्णाच्या - उपलभ्य - जवळ जाऊन - परिरभ्य (च) - आणि आलिंगन देऊन - निवृत्ताः - सुखी झालेले - वत्सान् प्रणीय - वासरांना एकत्र जमवून - व्रजं एत्य - गौळवाड्यात परत येऊन - तत् (कृष्णचरितं) जगुः - ते श्रीकृष्णाचे चरित्र गाऊ लागले ॥५३॥
श्रीकृष्ण बगळ्याच्या तोंडातून निघून आपल्याकडे आलेले पाहून बलराम वगैरेंना आनंद झाला. जणू प्राणाचा संचार झाल्याने इंद्रियांत चैतन्य यावे. त्यांनी श्रीकृष्णांना मिठ्या मारल्या. नंतर आपापली वासरे वळवून सर्वजण व्रजामध्ये आले आणि तेथे त्यांनी घरच्या लोकांना सर्व घटना सांगितली. (५३)
( अनुष्टुप् )
श्रुत्वा तद् विस्मिता गोपा गोप्यश्चातिप्रियादृताः । प्रेत्य आगतमिवोत्सुक्याद् ऐक्षन्त तृषितेक्षणाः ॥ ५४ ॥
( अनुष्टुप् ) ऐकता विस्मयो झाला गोपी गोपादिकांसिही । मृत्यूला लढुनी कृष्ण आला तो नित्य पाहती ॥ ५४ ॥
तत् श्रुत्वा विस्मिताः - ते ऐकून आश्चर्यचकित झालेले - अतिप्रियादृताः - ज्यांना अत्यंत प्रेमामुळे आदर वाटत आहे असे - तृषितेक्षणाः - ज्यांचे नेत्र पहाण्याविषयी उत्सुक झाले आहेत असे - गोपाः च गोप्यः - गोप व गोपी - प्रेत्य आगतम् इव (तं) - मरुन जणू परत आलेल्या त्या श्रीकृष्णाला - औत्सुक्यात् ऐक्षन्त - उत्कंठेने पहात्या झाल्या ॥५४॥
ते ऐकून गोपी-गोप आश्चर्यचकित झाले. कन्हैया जणू मृत्यूच्या जबड्यातूनच परत आला, असे वाटून अतिशय उत्सुकता, प्रेम आणि आदराने ते श्रीकृष्णांना अतृप्त नेत्रांनी निरखून पाहू लागले. (५४)
अहो बतास्य बालस्य बहवो मृत्यवोऽभवन् ।
अप्यासीद् विप्रियं तेषां कृतं पूर्वं यतो भयम् ॥ ५५ ॥
वदती हाय हायो ते लोटे हा मृत्यु पासुनी । अनिष्ठ करण्या येता दुष्टां दुःखचि लाभले ॥ ५५ ॥
बत - अरेरे - अहो - अहो - अस्य बालस्य - ह्या कृष्णाला - बहवः मृत्यवः अभवन् - पुष्कळ मृत्यू उपस्थित झाले - यतः भयं आसीत् - ज्यांच्यापासून भय प्राप्त झाले - तेषां - त्यांचे - पूर्वं - पूर्वी - अनेन अपि विप्रियं कृतम् आसीत् - कृष्णानेहि काही वाकडे केले असेल ॥५५॥
ते आपापसात म्हणू लागले - "पहा ना ! या बालकाला किती वेळा मृत्युमुखात जावे लागले ! परंतु ज्यांनी याचे अनिष्ट करण्याचे इच्छिले, त्यांचेच अनिष्ट झाले; कारण त्यांनी पहिल्यापासूनच दुसर्यांचे वाईट केले होते. (५५)
अथापि अभिभवन्त्येनं नैव ते घोरदर्शनाः ।
जिघांसयैनमासाद्य नश्यन्त्यग्नौ पतङ्गवत् ॥ ५६ ॥
एवढे जाहले तोही असूरभय यास ना । पतंग विझवी ज्योत न विझे जळती स्वयें ॥ ५६ ॥
अथ अपि - तरीसुद्धा - घोरदर्शनाः ते - भयंकर स्वरूपाचे ते दैत्य - एनं न एव अभिभवन्ति - ह्या श्रीकृष्णाचा पराभवही करण्यास समर्थ होत नाहीत - जिघांसया - मारण्याच्या इच्छेने - एनं आसाद्य - ह्या श्रीकृष्णाचा पराभवही करण्यास समर्थ होत नाहीत - जिघांसया - मारणाच्या इच्छेने - एनं आसाद्य - ह्या श्रीकृष्णाजवळ येऊन - अग्नौ पतङ्गवत् - अग्नीवर येणार्या पतंगाप्रमाणे - (स्वयं एव) नश्यन्ति - स्वतःच नाश पावतात ॥५६॥
एवढे सगळे होऊनही ते भयंकर असुर याचे काहीच वाकडे करू शकले नाहीत. याला मारण्याच्या उद्देशाने येतात, परंतु ज्योतीवर झडप घालणार्या पतंगाप्रमाणे स्वतःच नष्ट होतात. (५६)
अहो ब्रह्मविदां वाचो नासत्याः सन्ति कर्हिचित् ।
गर्गो यदाह भगवान् अन्वभावि तथैव तत् ॥ ५७ ॥
ब्रह्मवेत्ता महात्म्यांचे असत्य नचहो कधी । भविष्य गर्ग विप्रांचे तंतोतंतचि होतसे ॥ ५७ ॥
अहो - अहो - ब्रह्मविदां वाचः - ब्रह्मज्ञान्यांची वचने - कर्हिचित् - कधीहि - असत्याः नः सन्ति - खोटी होत नाहीत - यत् - जे - भगवान् गर्गः - भगवान गर्ग मुनी - आह - म्हणाला - तत् - ते - तथा एव - तसेच - अस्माभिः अन्वभावि - आम्ही अनुभविले ॥५७॥
ब्रह्मवेत्त्या महात्म्यांची वचने खोटी होत नाहीत, हेच खरे ! पहा ना ! महात्म्या गर्गाचार्यांनी जे सांगितले होते, ते सर्व तंतोतंत खरे ठरले." (५७)
इति नन्दादयो गोपाः कृष्णरामकथां मुदा ।
कुर्वन्तो रममाणाश्च नाविन्दन् भववेदनाम् ॥ ५८ ॥
आनंदे नंदबाबा नी गोपी गोपादि हर्षुनी । बोलती बल कृष्णाचे जणू कांहीच ना घडे ॥ ५८ ॥
इति - याप्रमाणे - मुदा - आनंदाने - कृष्णराम कथां कुर्वन्तः - श्रीकृष्ण व बलराम ह्यांच्या गोष्टी बोलणारे - रममाणाः च - आणि त्यात रमून जाणारे - नंदादयः गोपाः - नंदादि गोप - भववेदनां - संसार पीडा - अविन्दन् - जाणते झाले नाहीत ॥५८॥
अशा प्रकारे नंद इत्यादि गोपगण मोठ्या आनंदाने राम-कृष्णांसंबंधी गोष्टी करीत. ते त्यात इतके तन्मय होऊन जात की, त्यांना संसारातील दुःखांचा विसर पडे. (५८)
एवं विहारैः कौमारैः कौमारं जहतुर्व्रजे ।
निलायनैः सेतुबन्धैः मर्कटोत्प्लवनादिभिः ॥ ५९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
आंधळी खेळ नी सेतू कधी ते माकडा परी । विचित्र खेळती लीला बालोचित व्रजीं द्वय ॥ ५९ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
एवं - याप्रमाणे - तौ - ते बलराम व श्रीकृष्ण - (तस्मिन्) व्रजे - त्या वृंदावनातील गौळवाड्यात - निलायनैः सेतुबन्धैः मर्कटोत्प्लवनादिभिः च - लपून बसणे, पूल बांधणे व वानरांसारख्या उड्या मारणे इत्यादि - कौमारैः विहारैः - लहानपणाच्या क्रीडांनी - कौमारं जहतुः - लहानपण घालविते झाले ॥५९॥
अशाप्रकारे कृष्ण आणि बलराम गवळ्यांच्या मुलांबरोबर कधी लपंडाव खेळत, कधी पूल बांधीत तर कधी वानरांप्रमाणे उड्या मारीत. अशाप्रकारे बालोचित खेळ खेळून त्या दोघांनी व्रजामध्ये आपली बाल्यावस्था व्यतीत केली. (५९)
अध्याय अकरावा समाप्त |