|
श्रीमद् भागवत पुराण यमलार्जुनोद्धारः - यमलार्जुनांचा उद्धार - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
( अनुष्टुप् )
श्रीराजोवाच - कथ्यतां भगवन् एतत् तयोः शापस्य कारणम् । यत्तद्विगर्हितं कर्म येन वा देवर्षेस्तमः ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) राजा परिक्षिताने विचारले - भगवन् ! कृपया सांगा त्या दोघा शाप का मिळे । घडले निंद्य ते काय देवर्षी क्रोधले असे ॥ १ ॥
भगवन् - हे शुकाचार्य - तयोः - त्या दोघा यक्षांच्या - शापस्य कारणं - शापाचे कारण असे - यत् एतत् विगर्हितं कर्म - जे हे निंद्य कर्म - येन वा - आणि ज्यामुळे - देवर्षेः तमः (जातम्) - नारदऋषीला क्रोध आला - तत् कथ्यतां - ते सांगावे. ॥१॥
राजाने विचारले - भगवन ! आपण मला हे सांगा की, नलकूबर आणि मणिग्रीव यांना शाप का मिळाला ? त्यांनी असे कोणते निंद्यकर्म केले होते की, ज्यामुळे देवर्षींनाही क्रोध आला होता ? (१)
विवरण :- नारदासारख्या भक्तश्रेष्ठास राग येऊन त्यानी कुबेरपुत्रांना शाप देण्याचे कारण काय ? हा राजाचा प्रश्न. इथे 'नारदासारखा' आणि 'भक्तश्रेष्ठा' हे शब्द महत्त्वाचे, कारण राग-लोभ इ. भावना सामान्यांना, भक्त हा समदृष्टी, भावनांवर ताबा असणारा. मग अशा या श्रेष्ठ भक्ताला राग येण्याचे कारणही तितकेच भयंकर असले पाहिजे. नारदमुनी तर 'कळ' लावण्यात पटाईत. आजच्या भाषेत बोलायचे तर 'नारायण-नारायण' करीत सर्वांच्या फिरक्या घेणारे. पण त्यांनाही राग आला. म्हणजे या दोघांचा अपराधही तसाच अक्षम्य असला पाहिजे; तो कोणता ? हा प्रश्न. (१)
श्रीशुक उवाच -
रुद्रस्यानुचरौ भूत्वा सुदृप्तौ धनदात्मजौ । कैलासोपवने रम्ये मन्दाकिन्यां मदोत्कटौ ॥ २ ॥ वारुणीं मदिरां पीत्वा मदाघूर्णितलोचनौ । स्त्रीजनैः अनुगायद्भिः चेरतुः पुष्पिते वने ॥ ३ ॥
श्रीशुकदेव सांगतात - कुबेराचे असे पुत्र रुद्रानुचर जाहले । घमेंड जाहली त्यांना दारूने मत्त जाहले ॥ २ ॥ जाहले नेत्र ते लाल कितेक ललनांसह । रमले गीत गाण्यात क्रीडती वाटिकेमधे ॥ ३ ॥
रुद्रस्य - शंकराचे - अनुचरौ भूत्वा - सेवक झाल्यामुळे - सुदृप्तौ - अत्यंत गर्विष्ठ - मदोत्कटौ - व उन्मत्तपणाने पूर्ण भरलेले - धनदात्मजौ - ते कुबेराचे मुलगे - मन्दाकिन्याम् - गंगेच्या काठी - रम्ये कैलासोपवने - रमणीय अशा कैलासपर्वतावरील उपवनात - वारुणीं मदिरां पीत्वा - वारूणी नावाचे मद्य पिऊन - मदाघूर्णितलोचनौ (भूत्वा) - धुंदीने फिरत आहेत डोळे ज्यांचे असे होऊन - अनुगायद्भिः स्त्रीजनैः - गायन करणार्या स्त्रियांसह - पुष्पिते वने - फुलांनी बहरलेल्या उद्यानात - चेरतुः - हिंडते झाले. ॥२-३॥
श्रीशुकाचार्य म्हणाले - नलकूबर आणि मणिग्रीव हे दोघे कुबेराचे पुत्र होते. ते रुद्राचे गण असूनही त्यांचा गर्व वाढतच गेला. एके दिवशी ते दोघेजण मंदाकिनी नदीच्या तटावर कैलास पर्वताच्या रमणीय उपवनामध्ये वारुणी मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले होते. नशेमुळे त्यांचे डोळे भिरभिरत होते. पुष्कळ स्त्रिया त्यांच्याबरोबर गाणे-बाजावणे करीत होत्या आणि ते फुलांनी लहडलेल्या वनामध्ये त्यांच्याबरोबर विहार करीत होते. (२-३)
अन्तः प्रविश्य गङ्गायां अंभोजवनराजिनि ।
चिक्रीडतुर्युवतिभिः गजौ इव करेणुभिः ॥ ४ ॥
गंगेच्या पात्रि ते पूर्ण कमळे खुलली तदा । जळात हत्तिच्या ऐसे स्त्रियांशी क्रीडले बहू ॥ ४ ॥
तौ धनदात्मजौ - ते कुबेराचे दोघे मुलगे - युवतीभिः - स्त्रियांसह - अंभोजवनराजिनि - कमलांच्या समूहांनी शोभणार्या - गंगायां अंतः प्रविश्य - गंगेमध्ये प्रवेश करून - करेणुभिः गजौ इव - जसे हत्तिणींसह दोन हत्ती - चिक्रीडतुः - तसे क्रीडा करिते झाले. ॥४॥
त्यावेळी कमळांच्या ताटव्यांनी शोभणार्या गंगेमध्ये स्त्रियांसह शिरून, हत्तिणींसह हत्ती जसे जलक्रीडा करतात, त्याप्रमाणेच ते जलक्रीडा करू लागले. (४)
यदृच्छया च देवर्षिः भगवांस्तत्र कौरव ।
अपश्यन्नारदो देवौ क्षीबाणौ समबुध्यत ॥ ५ ॥
प्रारब्धे त्याच वाटेने देवर्षी पातले पहा । तयांनी यक्षपुत्रांना पाहिले माजले असे ॥ ५ ॥
कौरव - हे परीक्षित राजा - च - आणि - देवर्षिः भगवान् नारदः - देवर्षि ऐश्वर्यसंपन्न नारद - यदृच्छया तत्र (आगतः) - सहजगत्या तेथे आला असता - देवौ अपश्यत् - त्या दोघा गुह्यकांना पाहता झाला - (तौ च) क्षीबाणौ - आणि त्यांना मद्याने धुंद झालेले - समबुध्यत - असे ओळखिता झाला. ॥५॥
परीक्षिता ! कर्मधर्मसंयोगाने देवर्षी नारदांनी त्यांना पाहून ते उन्मत्त झाले आहेत, हे जाणले. (५)
तं दृष्ट्वा व्रीडिता देव्यो विवस्त्राः शापशङ्किताः ।
वासांसि पर्यधुः शीघ्रं विवस्त्रौ नैव गुह्यकौ ॥ ६ ॥
देवर्षी पाहता नेत्री लाजल्या नग्न अप्सरा । त्वरीत कपडे केले परी दोघे न लाजले ॥ ६ ॥
तं दृष्ट्वा - त्याला पाहून - व्रीडिताः - लज्जित झालेल्या - विवस्त्राः देव्यः - वस्त्रहीन अशा त्या स्त्रिया - शापशंकिताः - शापाची भीती वाटून - शीघ्रं वासांसि पर्यधुः - लगबगीने वस्त्रे नेसत्या झाल्या - विवस्त्रौ गुह्यकौ (तु) - पण नग्न असे ते दोघे गुह्यक - न एव वाससी पर्यधाताम् - वस्त्रे नेसते झाले नाहीत. ॥६॥
नारदांना पाहून विवस्त्र अप्सरा लाजला. शापाच्या भितीने त्यांनी ताबडतोब कपडे परिधान केले. परंतु त्या नग्न यक्षांनी मात्र नाही. (६)
तौ दृष्ट्वा मदिरामत्तौ श्रीमदान्धौ सुरात्मजौ ।
तयोरनुग्रहार्थाय शापं दास्यन् इदं जगौ ॥ ७ ॥
देवतापुत्र हे दोघे श्रीमदे धुंद जाहले । माजले मदिरापाने नारदे शाप हा दिला ॥ ७ ॥
तौ मदिरामत्तौ - ते दोघे मदिरेने उन्मत्त झालेले - श्रीमदांधौ - व संपत्तीच्या गर्वाने अंध झालेले - सुरात्मजौ दृष्ट्वा - कुबेराचे पुत्र पाहून - तयोः अनुग्रहार्थाय - त्यांच्यावर कृपा करण्यासाठी - शापं दास्यन् - शाप द्यावा म्हणून - इदं जगौ - हे उद्गार काढिता झाला. ॥७॥
जेव्हा देवर्षी नारदांनी पाहिले की, ते देवपुत्र असूनसुद्धा ऐश्वर्यमदाने आंधळे आणि मदिरापान करून उन्मत्त झाले आहेत; तेव्हा नारदांनी त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांना शाप देत म्हटले. (७)
श्रीनारद उवाच -
न ह्यन्यो जुषतो जोष्यान् बुद्धिभ्रंशो रजोगुणः । श्रीमदादाभिजात्यादिः यत्र स्त्री द्यूतमासवः ॥ ८ ॥
श्रीनारद म्हणाले - भोगोनि विषयो त्यांची धनाने बुद्धि नष्टते । हिंसा नी कुळ गर्वो तो एवढी नच भ्रंशक । श्रीमदे मदिरा स्त्रीया द्यूत दुर्गूण लागती ॥ ८ ॥
जोष्यान् - योग्य विषयांचा - जुषतः (पुंसः) - भोग घेणार्या पुरुषाला - श्रीमदात् अन्यः - संपत्तीच्या गर्वाहून इतर - आभिजात्यादिः - उत्तम कुलात जन्म इत्यादि - रजोगुणः - रजोगुणांचा विकार - (तादृशः) बुद्धिभ्रंशः - तितकासा बुद्धिभ्रंश करणारा - न हि (अस्ति) - खरोखर नाही - यत्र (श्रीमदे) - ज्या संपत्तीच्या गर्वात - स्त्री द्युतम् आसवः (सन्ति) - स्त्री, द्यूत आणि मद्य ही असतात. ॥८॥
नारद म्हणाले - जे लोक विषयांचे सेवन करतात, त्यांच्या बुद्धीला बिघडविणारा महत्त्वाचा दोष म्हणजे संपत्तीची नशा, रजोगुणी कर्मे आणि कुलीनता इत्यादिंचा अभिमानसुद्धा त्यापेक्षा अधिक बुद्धिभ्रंश करणारा नाही. कारण संपत्तीच्या पाठोपाठ स्त्री, जुगार आणि मद्य ही असतातच. (८)
विवरण :- वास्तविक कुलीनता, विद्या, तप या गोष्टी गर्व करण्यासारख्या नाहीत. त्याने अंगी नम्रताच येते. त्याचबरोबर धनाचा उन्माद, स्त्रीसंग, (परस्त्री), दारू, जुगार इ. व्यसनांनी बुद्धी भ्रष्ट होते आणि मग विनाश हा ठरलेलाच. (बुद्धिनाशात् प्रणश्यति ।) एकातून दुसरी आपत्ती निर्माण होते. अमाप धनाचा लोभ, त्यातून कामवासना, परस्त्रीचा मोह, मग जुगारासारखी अन्यायाने धन मिळविण्याची साधने, मदोन्मत्तता, सुरापान, हिंसा, परपीडा, नरकाकडे जाण्याचे एक-एक दार उघडण्यास काय वेळ ? या सर्व उन्मादांमध्ये इतक्या विनाशकारी गोष्टी दडल्या आहेत, म्हणून तो सर्वात वाईट. (८)
हन्यन्ते पशवो यत्र निर्दयैः अजितात्मभिः ।
मन्यमानैरिमं देहः अजरामृत्यु नश्वरम् ॥ ९ ॥
श्रीमदे अंध होवोनी नाशवान् तनु सत्य ती । मानिती करिती हत्त्या पशू पक्ष्यांचिही तशी ॥ ९ ॥
यत्र (श्रीमदे) - ज्या संपत्तीच्या धुंदीत - इमं नश्वरं देहं - ह्या नश्वर देहाला - अजरामृत्यूं मन्यमानैः - जरामृत्यूरहित मानणार्या अशा - निर्दयैः अजितात्मभिः - क्रूर व इंद्रिये ज्याच्या स्वाधीन नाहीत अशा पुरुषांकडून - पशवः हन्यन्ते - पशु मारिले जातात. ॥९॥
श्रीमदाने अंध होऊन इंद्रियांचे गुलाम झालेले क्रूर पुरुष आपल्या नाशवान शरीराला अजरामर समजून आपल्याच सारख्या देहधारी पशूंची हत्या करतात. (९)
देवसंज्ञितमप्यन्ते कृमिविड् भस्मसंज्ञितम् ।
भूतध्रुक् तत्कृते स्वार्थं किं वेद निरयो यतः ॥ १० ॥
भूदेव नर देवो नी देवही मानवी तनू । शेवटी नासते आणि जाळिता राख ढीगची । तयाचे साठि ते लोक द्रोहे नर्कात पावती ॥ १० ॥
देवसंज्ञितं अपि (शरीरं) - भूदेव, नरदेव इत्यादि नावे असलेले शरीर सुद्धा - अंते कृमिविड्भस्मसंज्ञितं (भवति) - शेवटी कृमी, विष्ठा, भस्म अशी नावे मिळणारे होते - तत्कृते - त्यासाठी - भूतध्रुक् - प्राण्य़ांचा द्रोह करणारा - किं स्वार्थं वेद - पुरुष काय स्वार्थ जाणतो - यतः निरयः (प्राप्यते) - ज्या भूतदेहापासून नरक प्राप्त होतो. ॥१०॥
ज्या शरीराला ’भूदेव’, ’नरदेव’, ’देव’ इत्यादि नावांनी संबोधिले जाते, त्याची शेवटी काय अवस्था होते ? त्यात कीडे पडतात, पशुपक्ष्यांनी खाऊन त्याची विष्ठा बनते किंवा ते जळून राखेचा ढीग होते. त्याच शरीरासाठी प्राण्यांशी द्रोह करण्यामध्ये मनुष्याला कोणता स्वार्थ वाटतो ? असे केल्याने शेवटी नरकाचीच प्राप्ती व्हायची. (१०)
विवरण :- काम, क्रोध, लोभ इ. षड्रिपूंवर नियंत्रण मिळविण्याचे सर्वात मोठे साधन म्हणजे मनाचा निग्रह, संयम. तो जर नसेल, तर वरील आठव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अवस्था होते. या सर्व अनर्थाचे मूळ म्हणजे धन, पैसा. त्याने डोळ्यावर अज्ञानाचे, मोहाचे पटल येते आणि हा देह नश्वर आहे, याची जाणीव शिल्लक न रहाता त्याच्या सुखासाठी, तृप्तीसाठी अनेक वाईट मार्गांचा अवलंब केला जातो. कालांतराने देह नष्ट झाल्यावर त्याचे दहन व्हावे लागते, नाहीतर त्याची दुरवस्था होते. म्हणूनच जो देह इतका अनित्य, नश्वर आहे त्याच्या सुखासाठी इतका खटाटोप का ? (९-१०)
देहः किमन्नदातुः स्वं निषेक्तुर्मातुरेव च ।
मातुः पितुर्वा बलिनः क्रेतुरग्नेः शुनोऽपि वा ॥ ११ ॥
पिता माता अजोबा कां बली व्यापरिचा तसा । अग्निचा प्राणि कुत्र्याचा कोण मालक या तना ? ॥ ११ ॥
अयं देहः किं - हा देह काय - अन्नदातुः स्वं (अस्ति) - अन्नदात्याच्या स्वामित्वाचा आहे - निषेक्तुः मातुः - बापाच्या, आईच्या - मातुः पितुः - अथवा आईच्या बापाच्या स्वामित्वाचा आहे - बलिनः क्रेतुः - किंवा एखाद्या दांडग्या पुरुषाच्या, विकत घेणार्याच्या, - अग्नेः शुनः अपि वा (स्वं स्यात्) - अग्नीच्या किंवा कुत्र्याच्याही स्वामित्वाचा असेल. ॥११॥
हे शरीर कोणाची संपत्ती आहे ते सांगा तर खरे ! अन्न देऊन पालन-पोषण करणार्याची आहे की गर्भाधान करणार्या पित्याची ? हे शरीर त्याला नऊ महिने पोटात बाळगणार्या मातेचे आहे की तिच्याही आईवडिलांचे ? जो बलवान पुरुष बळजवरीने याच्याकडून काम करवून घेतो त्याचे, की पैसे देऊन खरेदी करणार्याचे. हे जाळणार्या आगीचे आहे की त्याला खाऊ इच्छिणार्या कोल्ह्या-कुत्र्यांचे ? (११)
एवं साधारणं देहं अव्यक्त प्रभवाप्ययम् ।
को विद्वान् आत्मसात्कृत्वा हन्ति जन्तूनृतेऽसतः ॥ १२ ॥
साधी वस्तू तनू होय जन्मते मिटते अशी । मूर्खांशिवाय ते कोण सत्य मानोनि त्रासितीं ॥ १२ ॥
असतः (पुंसः) - मूर्ख मनुष्याशिवाय - ऋते कः विद्वान् - कोणता विद्वान मनुष्य - एवं अव्यक्तप्रभव्याप्ययं - अशा रीतीने ज्याची उत्पत्ति व नाश ज्याची न दिसणारी आहेत - साधारणं देहं आत्मसात् कृत्वा - अशा सामान्य देहाला आत्मा असे मानून - जंतून् हंति - प्राण्यांना मारील. ॥१२॥
हे शरीर प्रकृतीपासून उत्पन्न होऊन तीमध्येच सामावून जाणारी एक सामान्य वस्तू आहे. अशा स्थितीत मूर्खाशिवाय दुसरा कोण बुद्धिमान मनुष्य याला आपला आत्मा मानून त्याच्यासाठी दुसर्यांचे प्राण घेईल ? (१२)
असतः श्रीमदान्धस्य दारिद्र्यं परमञ्जनम् ।
आत्मौपम्येन भूतानि दरिद्रः परमीक्षते ॥ १३ ॥
धनांध दुष्ट जे ऐसे त्यांना दारिद्र्य अंजन । दरिद्र्यां कळते सर्व माझ्या ऐसा दुजा जिवो ॥ १३ ॥
असतः श्रीमदांधस्य (पुंसः) - दुष्ट व संपत्तीच्या मदाने अंध झालेल्या मनुष्याला - दारिद्र्यंद्र्यं परं अंजनं (भवति) - दारिद्र्य हेच उत्तम अंजन होय - दारिद्रः आत्मौपम्येन - दरिद्री मनुष्य आपल्या सारखीच - भूतानि परं ईक्षते - सर्व प्राण्यांची स्थिति आहे असे पाहतो. ॥१३॥
जो उन्मत्त श्रीमदाने आंधळा झालेला आहे, त्याला दृष्टी येण्यासाठी दारिद्र्य हेच सर्वांत प्रभावी अंजन आहे. कारण दरिद्री मनुष्यच इतरांना आपल्यासारखे मानतो. (१३)
विवरण :- संपत्तीच्या मदाने डोळ्यावर उन्मादाचा पडदा येतो. त्या व्यक्तीला अंधत्व येते. हे अंधत्व दूर करण्याचा उपाय ? दारिद्रय ! जवळच्या सर्व संपत्तीचा नाश होणे ! उपाय थोडा विचित्र वाटतो, पण आहे मात्र जालीम. एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्यातील सुखदुःखाची कल्पना येत नाही. दरिद्री मनुष्यास दारिद्रयामुळे अनेक दुःखांचा सामना करावा लागतो. अनेक व्यथा - नव्हे - मरणयातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तो सहिष्णू बनतो, इतरांच्या सुखदुःखांची त्याला कल्पना येते. (घायल की गत घायल जाने ।) संपत्तीच्या मदाने अंध झालेल्यांना दरिद्री लोक दिसतही नाहीत. त्यांच्या सुखदुःखांबद्दल ते अत्यंत बेफिकीर असतात. मात्र दारिद्र्याचे चटके बसल्याने हे दुःख इतरांना भोगावे लागू नये अशी दरिद्री व्यक्तीची (उदार) बुद्धी असते. म्हणूनच सर्वांभूती प्रेम, सहानुभूती निर्माण होण्यास धनांध व्यक्तीच्या डोळ्यात दारिद्रयाचे अंजन घातले तर डोळे खर्या अर्थाने उघडतील आणि वास्तवाचे त्याला भान येईल. (एक दरिद्री आपल्याला दारिद्रयामुळे सिद्धी प्राप्त झाली आहे, असे गमतीने म्हणतो. या सिद्धीमुळे तो सर्व जग पाहू शकतो, पण त्याला मात्र कोणीही बघू शकत नाही. 'भो दारिद्रय, नमस्तुभ्यं सिद्धोऽहं त्वत्प्रसादतः । पश्याम्यहं जगत्सर्वं न मां पश्यति कश्चन ।)' (१३)
यथा कण्टकविद्धाङ्गो जन्तोर्नेच्छति तां व्यथाम् ।
जीवसाम्यं गतो लिङ्गैः न तथाविद्धकण्टकः ॥ १४ ॥
जयाला टोचला काटा दुज्यां तो नच टोचवी । न जाणी टोचते कैसे दुसर्यां तोच टोचवी ॥ १४ ॥
कंटकविद्धांगः - काटयांनी ज्याचे अंग भेदून गेले आहे असा - लिंगैः - आपल्या उदाहरणांनी - जीवसाम्यं गतः - सर्व जीवांना अशीच दुःखे होत असतील असे मानणारा मनुष्य - यथा जंतोः तां व्यथां न इच्छति - ज्याप्रमाणे प्राण्याला तसे दुःख व्हावे असे इच्छित नाही - तथा अविद्धकंटकः - त्याप्रमाणे ज्याच्या अंगाला काटे बोचलेले नाहीत - न (इच्छति) - असा मनुष्य इच्छित नाही. ॥१४॥
च्या शरीराला एकदा काटा टोचलेला असतो, तो कोणत्याही प्राण्याला असा काटा टोचू नये, असे मानतो. कारण आपल्याला झालेल्या पीडेवरून दुसर्या जीवालासुद्धा असेच दुःख होते, हे त्याला कळते. परंतु ज्याला कधी काटा टोचलाच नाही, तो त्या दुःखाची काय कल्पना करणार ? (१४)
दरिद्रो निरहंस्तम्भो मुक्तः सर्वमदैरिह ।
कृच्छ्रं यदृच्छयाऽऽप्नोति तद्धि तस्य परं तपः ॥ १५ ॥
गरीबा नसतो गर्व मद तो स्पर्शिना तयां । कष्ट जे पडती त्याला तपस्या थोर ती असे ॥ १५ ॥
इह निरहंस्तंभः - जगात अहंकाररहित - सर्वमदैः मुक्तः दरिद्रः - व सर्व गर्वापासून सुटलेला असा दरिद्री पुरुष - यदृच्छया कृच्छ् प्राप्नोति - आपोआप कष्टाला प्राप्त होतो - तत् हि तस्य परं तपः - खरोखर ती त्याची श्रेष्ठ तपश्चर्या होय. ॥१५॥
दरिद्र्याला गर्व असत नाही. सर्व प्रकारच्या मदांपासून तो दूर असतो. उलट दैवशात त्याला जो त्रास सोसावा लागतो, तीच त्याच्यासाठी मोठी तपश्चर्या असते. (१५)
विवरण :- अज्ञान, लोभ, अहंकार, कामेच्छा हे सर्व तपःसाधनेमधील अडथळे. या सर्व अडथळ्यांपासून दरिद्री दूरच असतो. जरी त्याला धनाची इच्छा असली तरी लालसा, लोभ नसतो. अधिकाधिक धन मिळविण्याची हाव नसते. त्यासाठी केल्या जाणार्या हिंसेपासून तो दूर असतो. अधिक धनाचा लोभ नाही, त्यामुळे अहंकार नाही, परस्त्रीचा लोभ नाही. आपल्या नशीबी दारिद्रय आले, ही परमेश्वराचीच इच्छा, ती प्रमाण अशी त्याची शांत व समाधानी वृत्ती असते. उलट या दारिद्रयाच्या यातना इतरांना भोगाव्या लागू नयेत, अशी त्याची उदार वृत्ती असते. स्वार्थ, आत्मतुष्टता यापसून मुक्त असणारा हा दरिद्री 'सर्वेऽत्र सुखिनः सन्तु ।' अशी इच्छा करतो. हे सर्व गुण एका तपस्व्यासच शोभून दिसतात. म्हणजेच दरिद्री जणू तपच करीत असतो. (१५)
नित्यं क्षुत्क्षामदेहस्य दरिद्रस्यान्नकाङ्क्षिणः ।
इन्द्रियाणि अनुशुष्यन्ति हिंसापि विनिवर्तते ॥ १६ ॥
रोजी रोटी जयांची ते भूक दुर्बल ते कृश । अधीक भोग ना घेती त्रास हिंसा असेचिना ॥ १६ ॥
नित्यं अन्नकांक्षिणः - सदोदित अन्नाची इच्छा करणार्या - क्षुत्क्षामदेहस्य दरिद्रस्य - व क्षुधेने क्षीण देह झालेल्या दरिद्र्याची - इंद्रियाणि अनुशुष्यंति - इंद्रिये शुष्क होतात - हिंसा अपि विनिवर्तते - हिंसाबुद्धिसुद्धा नष्ट होते. ॥१६॥
ज्याला रोजच्या भोजनाची मारामार असते, भुकेने ज्याचे शरीर दुबळे झालेले असते, त्या दद्रिद्री माणसाची इंद्रियेसुद्धा अशक्त झालेली असतात. आणि त्यामुळे भोगांसाठी तो दुसर्या प्राण्यांना दुःख देत नाही. अशा रीतीने तो हिंसेपासून परावृत्त होतो. (१६)
दरिद्रस्यैव युज्यन्ते साधवः समदर्शिनः ।
सद्भिः क्षिणोति तं तर्षं तत आराद्विशुद्ध्यति ॥ १७ ॥
समदर्शी असे संत दरिद्या भेट स्वल्प हो । संतांच्या संगतीमध्ये तृप्ती शुद्धीहि लाभते ॥ १७ ॥
समदर्शिनः साधवः - समदर्शी सज्जन - दरिद्रस्य एव युज्यंते - दरिद्री पुरुषाचीच मैत्री करितात - (सः) सद्भिः - दरिद्री सज्जनांच्या समागमाने - तं तर्षं क्षीणोति - त्या विषयेच्छा क्षीण करितो - ततः आरात् विशुध्यति - नंतर लवकर पवित्र होतो. ॥१७॥
साधुपुरुष जरी समदर्शी असले तरीसुद्धा त्यांचा सहवास दरिद्री माणसांना सुलभ आहे. कारण त्याचे भोग तर अगोदरच सुटलेले असतात. आता संतांच्या संगतीने त्याची लालसासुद्धा नाहीशी होते आणि लवकरच त्याचे अंतःकरण शुद्ध होते. (१७)
साधूनां समचित्तानां मुकुन्द चरणैषिणाम् ।
उपेक्ष्यैः किं धनस्तम्भैः असद्भिः असदाश्रयैः ॥ १८ ॥
समदर्शी हरीकीर्ती गाण्या उत्सुक ते सदा । दुर्गुणी ते तसे द्रव्य तयला ते उपेक्षिती ॥ १८ ॥
मुकुंदचरणैषिणां - परमेश्वराच्या चरणकमलाची इच्छा करणार्या सर्वांवर - समचित्तानां साधूनां - समानदृष्टि ठेवणार्या साधूंना - उपेक्ष्यैः - ज्यांची उपेक्षा करणेच योग्य अशा, - धनस्तंभैः - धनाने गर्विष्ठ झालेल्या, - असदाश्रयैः - व दुष्ट लोकांना आश्रय देणार्या - असद्भिः किं कर्तव्यम् - दुष्ट पुरुषांशी काय प्रयोजन ? ॥१८॥
ज्या महात्म्यांच्या चित्तांमध्ये सर्वांबद्दल समभाव आहे. जे फक्त भगवंतांच्या चरणात लीन असतात, त्यांना, दुर्गुणाची खाण असणार्या आणि धनाच्या मदाने उन्मत्त झालेल्या दुष्टांशी काय कर्तव्य आहे ? त्यांची उपेक्षा करणेच योग्य. (१८)
तदहं मत्तयोर्माध्व्या वारुण्या श्रीमदान्धयोः ।
तमोमदं हरिष्यामि स्त्रैणयोः अजितात्मनोः ॥ १९ ॥
श्रीमदांध ते दोघे दारूने माजले असे । विषयी लंपटो त्यांचे अज्ञान करिते चुरा ॥ १९ ॥
तत् - यास्तव - अहं - मी - वारुण्या माध्व्या मत्तयोः - वारुणीमदिरेने मत्त झालेल्या - श्रीमदांधयोः - लक्ष्मीच्या गर्वाने अंध झालेल्या, - स्त्रैणयोः अजितात्मनोः - स्त्रीवश व ज्यांनी आपले मन जिंकिले नाही अशा दोघांचा - तमोमदं हरिष्यामि - अज्ञानरूपी मद नाहीसा करतो. ॥१९॥
हे दोन्ही यक्ष वारुणी मदिरेचे पान करून उन्मत्त आणि धनाच्या मदाने आंधळे झाले आहेत. इंद्रियांचे गुलाम असणार्या या स्त्री-लंपटांचा अज्ञानजनित मद आपण नाहीसा करवा. (१९)
यदिमौ लोकपालस्य पुत्रौ भूत्वा तमःप्लुतौ ।
न विवाससमात्मानं विजानीतः सुदुर्मदौ ॥ २० ॥
पहा अनर्थ हा मोठा पुत्र हे लोकपालचे । नागडे जाहलो याचे भानही यांजला नसे ॥ २० ॥
यत् - ज्याअर्थी - इमौ लोकपालस्य पुत्रौ भूत्वा - हे दोघे कुबेराचे मुलगे असता - सुदुर्मदौ तमःप्लुतौः आत्मानं - अत्यंत उन्मत्त व अज्ञात पूर्णपणे बुडून गेलेले असे - विवाससं न विजानीतः - आपण नग्न आहो हेही जाणत नाहीत. ॥२०॥
हे लोकपाल कुबेराचे पुत्र असूनही मदोन्मत्त होऊन अज्ञानात बुडालेले आहेत. आपण विवस्त्र आहोत याचेही त्यांना भान नाही. (२०)
अतोऽर्हतः स्थावरतां स्यातां नैवं यथा पुनः ।
स्मृतिः स्यात् मत्प्रसादेन तत्रापि मदनुग्रहात् ॥ २१ ॥
म्हणोनी वृक्षयोनीते यांजला जन्म योग्य तो । न तेणे गर्व तो राही हरीला स्मरतील हे ॥ २१ ॥
अतः - त्याअर्थी - (तौ) स्थावरतां अर्हतः - ते दोघे वृक्षपणालाच योग्य आहेत - यथा पुनः - जेणेकरून पुनः - एवं न स्याताम् - असे उन्मत्त होणार नाहीत - तत्र अपि मत्प्रसादेन - त्या जन्मात सुद्धा माझ्या प्रसादाने - मदनुग्रहात् - व माझ्या कृपेने त्यांना आठवण राहील. ॥२१॥
म्हणून हे दोघेजण आता वृक्ष होण्याच्याच योग्यतेचे आहेत. तसे झाले तर यांना पुन्हा असा अभिमान निर्माण होणार नाही. तेथेसुद्धा माझ्या कृपेने यांना भगवंतांची स्मृती राहील (२१)
विवरण :- कुबेर हा देवांचा खजिनदार. स्वतःही अमाप संपत्तीचा मालक, पण देवांचा खजिनदार असल्याने त्याची काही कर्तव्येही होती. तो लोकपाल, अर्थातच लोकांचा पालनकर्ता. त्यांचा सेवकही होता. वंशपरंपरेने त्याचे धन आणि त्याची कर्तव्येही त्याच्या मुलांकडे आली. पण मुले फक्त धनी बनली, कर्तव्याचा त्यांना विसर पडला. मदांध होऊन व्यसनांच्या आहारी ते गेले. त्यासाठी त्यांना शिक्षा मिळणे आवश्यक होते. नारदासारख्या देवर्षीसमोर स्वतःच्या वस्त्रांचेही भान ते विसरले. म्हणून त्यांना अर्जुनवृक्ष बनण्याचा शाप नारदांनी दिला. इथे त्या दोघांना (नलकूबर व मणिग्रीव) यांना वृक्षयोनिका मिळाली, याचे कारण फार मनोज्ञ आहे. वृक्षाला ना आच्छादन, ना वस्त्र. तरीही तो रात्रंदिवस उन्हापावसात लोकांच्यासाठी उभा असतो. (वृक्षाः सत्पुरुषाः इव ।) त्याची पाने, फळे, फुले, सर्व काही इतरांसाठी असते. त्यांचे हे दातृत्व धनांध कुबेरपुत्रांच्या ध्यानी आणून देण्याची अपेक्षा नारद मुनींना होती. म्हणून त्या पुत्रांना वृक्षयोनी मिळाली असावी. आणि विशेष म्हणजे वृक्ष झाल्यानंतरहि त्यांना पूर्वजन्मीची आठवण रहावी, अशीही व्यवस्था नारदमुनीनी केली हे आणखी विशेष. आपल्या हातून घडलेल्या पापाचे प्रायश्चित्त आपण भोगत आहोत, यापुढे आपल्या हातून असे घडता कामा नये, याची जाणीव पूर्वजन्मातील स्मरणाने त्यांना पदोपदी होत होती. (२०-२१)
वासुदेवस्य सान्निध्यं लब्ध्वा दिव्यशरच्छते ।
वृत्ते स्वर्लोकतां भूयो लब्धभक्ती भविष्यतः ॥ २२ ॥
देवांच्या शतवर्षाने कृष्णसंपर्क होय तो । भगवत्पदप्रेमाने येतील परतोनिया ॥ २२ ॥
दिव्यशरच्छते वृत्ते (च) - आणि देवांची शंभर वर्षे झाली असता - वासुदेवस्य सांनिध्यं - परमेश्वराची समीपता - भूयः स्वर्लोकतां (च) लब्ध्वा - व पुनः स्वर्ग ही मिळवून - लब्धभक्ति भविष्यंतः - ईश्वरावर भक्ति करणारे असे होतील. ॥२२॥
अणि माझ्या अनुग्रहामुळे देवांची शंभर वर्षे झाल्यानंतर यांना श्रीकृष्णांचे सान्निध्य लाभेल. मग पुन्हा भगवंतांच्या चरणांविषयी प्रेम उत्पन्न होऊन हे आपल्या लोकी निघून जातील. (२२)
श्रीशुक उवाच -
एवमुक्त्वा स देवर्षिः गतो नारायणाश्रमम् । नलकूवरमणिग्रीवौ आसतुः यमलार्जुनौ ॥ २३ ॥
श्रीशुकदेव सांगतात - यमलार्जुन या नामे दोघे वृक्षचि जाहले । शापिता नारदो गेले नरनारायणाश्रमी ॥ २३ ॥
सः देवर्षिः - तो नारद ऋषी - एवं उक्त्वा - असे बोलून - नारायणाश्रमं गतः - नारायणाश्रमाला निघून गेला - नलकूबरमणिग्रीवौ - नलकूबर व मणिग्रीव हे दोघे जुळे - यमलार्जुनौ (भूत्वा) आसतुः - अर्जुनवृक्ष होऊन राहिले. ॥२३॥
श्रीशुकदेव म्हणतात - असे म्हणून देवर्षी नारद नारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले. नलकूबर आणि मणिग्रीव हे दोघे एकाच वेळी अर्जुनवृक्ष होऊन यमलार्जुन नावाने प्रसिद्ध झाले. (२३)
ऋषेर्भागवत मुख्यस्य सत्यं कर्तुं वचो हरिः ।
जगाम शनकैस्तत्र यत्रास्तां यमलार्जुनौ ॥ २४ ॥
प्रीय नारद भक्ताचे बोल सत्य करावया । बांधिल्या उखळा ओढी कृष्ण वृक्षांसी पातला ॥ २४ ॥
हरिः - श्रीकृष्ण - भागवतमुख्यस्य ऋषेः - भागवतश्रेष्ठ नारदऋषींचे - वचः सत्यं कर्तुं - भाषण खरे करण्याकरिता - यत्र यमलार्जुनौ आस्तां - ज्याठिकाणी जुळे अर्जुन वृक्ष होते - तत्र शनकैः जगाम - तेथे हळूहळू गेला. ॥२४॥
आपल्या परम भक्त देवर्षी नारदांचे वचन सत्य करण्यासाठी श्रीकृष्ण हळू हळू उखळ ओढीत जेथे यमलार्जुन वृक्ष होते, तिकडे जाऊ लागले. (२४)
देवर्षिर्मे प्रियतमो यदिमौ धनदात्मजौ ।
तत्तथा साधयिष्यामि यद्गीतं तन्महात्मना ॥ २५ ॥
कुबेर भक्तची माझा त्याचे हे पुत्रची द्वय । महात्मा वदले तैसे पूर्णरूप करीन मी ॥ २५ ॥
यत् मे देवर्षिः - ज्याअर्थी मला नारदऋषि - प्रियतमः (अस्ति) - अत्यंत प्रिय आहे - तत् - त्याअर्थी - तन्महात्मना यत् गीतं - त्या महात्म्याने जे म्हटले - तथा - त्याप्रमाणे - इमौ (यमलार्जुनौ पुनः) - ह्या दोन अर्जुनवृक्षांना पुनः - धनदात्मजौ साधयिष्यामि - कुबेराचे मुलगे करून देईन. ॥२५॥
भगवंतांनी विचार केला की, "देवर्षी नारद मला अत्यंत प्रिय आहेत आणि हे दोघेजणसुद्धा माझा भक्त कुबेर याचे पुत्र आहेत. म्हणून महात्मा नारद जे म्हणाले, ते मी तसेच सत्य करीन." (२५)
इत्यन्तरेणार्जुनयोः कृष्णस्तु यमयोर्ययौ ।
आत्मनिर्वेशमात्रेण तिर्यग्गतं उलूखलम् ॥ २६ ॥
विचार करता क्रुष्ण दोन्ही वृक्षात त्या घुसे । निघाला पुढती तेंव्हा उखळी आडके तिथे ॥ २६ ॥
इति (मत्वा) कृष्णः - असे म्हणून श्रीकृष्ण - यमयोः अर्जुनयोः अंतरेण ययौ - त्या अर्जुनवृक्षांच्या मधून गेला - आत्मनिर्वेशमात्रेण - परमात्म्याच्या आत शिरण्यानेच - उलूखलं तिर्यक् गतं - केवळ उखळी आडवी पडली. ॥२६॥
असा विचार करून श्रीकृष्ण दोन्ही वृक्षांच्या मधून निघाले. ते तेथून बाहेर पडले. परंतु उखळ मात्र तिरपे होऊन अडकून बसले. (२६)
( वसंततिलका )
बालेन निष्कर्षयतान्वगुलूखलं तद् दामोदरेण तरसोत्कलिताङ्घ्रिबन्धौ । निष्पेततुः परमविक्रमितातिवेप स्कन्धप्रवालविटपौ कृतचण्डशब्दौ ॥ २७ ॥
( वसंततिलका ) दामोदरासि कसिले कमरेस दोरे पाठीस ते उखळ श्रीहरि ओढिताच । झाडे समूळ पडली उखडोनि खाली ताऽडाऽतडाड ध्वनि ये बळ अल्प देता ॥ २७ ॥
तत् अन्वक् उलूखलं - ती मागून येणारी उखळी - निष्कर्षयता दामोदरेण बालेन - ओढणार्या व पोटाला दाव्याने बांधलेल्या कृष्णाने - तरसा उत्कलितांघ्रिबंधौ - जोराने उपटली आहेत बुंध्याची मुळे ज्यांची असे - परमविक्रमितातिवेपस्कंधप्रवालविटपौ (तौ) - जोराने ओढल्यामुळे अर्जुनवृक्षांच्या खांद्या, पाने व सगळा विस्तार कापत आहे असे - कृतचंडशब्दौ निष्पेततुः - केला आहे प्रचंड शब्द ज्यांनी असे खाली पडले.॥२७॥
कमरेला दोरी बांधलेल्या त्या मुलाने आपल्या पाठीशी असलेल्या उखळाला जोराने ओढले मात्र, तोच झाडांची सर्व मुळे उखडली गेली. सर्व बलविक्रमाचे केंद्र ते भगवान त्यांचा थोडासा धक्का लागताच झाडांच्या फांद्या, खोडे, डहाळ्या आणि पाने यांचा थरकाप होऊन दोन्ही वृक्ष जोराने कडकडाट करीत जमिनीवर कोसळले. (२७)
तत्र श्रिया परमया ककुभः स्फुरन्तौ
सिद्धावुपेत्य कुजयोरिव जातवेदाः । कृष्णं प्रणम्य शिरसाखिललोकनाथं बद्धाञ्जली विरजसाविदमूचतुः स्म ॥ २८ ॥
अग्नी समान निघले पुरुषो द्वयो तै सौंदर्य तेजिं भरल्या दशही दिशा त्या । ठेवोनि पायि शिर ते नमितात कृष्णा जोडोनि हात करिती स्तुतिही तयाची ॥ २८ ॥
तत्र कुजयोः - त्यावेळी त्या वृक्षांच्या पोटातून - जातवेदाः इव - अग्नीप्रमाणे - परमया श्रिया ककुभः स्फुरन्तौ - श्रेष्ठ कान्तीने दशदिशा प्रकाशित करणारे - विरजसौ सिद्धौ उपेत्य - गर्वरहित असे दोन सिद्ध पुरुष जवळ येऊन - बद्धांजली - जोडिले आहेत हात ज्यांनी असे - अखिल लोकनाथं कृष्णं - सकललोकाधिपती श्रीकृष्णाला - शिरसा प्रणम्य - मस्तकाने नमस्कार करून - इदं ऊचतुः स्म - हे बोलते झाले. ॥२८॥
त्या दोन्ही वृक्षांमधून अग्नीप्रमाणे तेजस्वी असे दोन सिद्ध पुरुष बाहेर पडले. त्यांच्या चमकणार्या कांतीने दिशा उजळून निघाल्या. त्यांनी सर्व लोकांचे स्वामी भगवान श्रीकृष्णांच्या जवळ येऊन, त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला आणि हात जोडून शुद्ध हृदयाने ते त्यांची स्तुती करू लागले. (२८)
( अनुष्टुप् )
कृष्ण कृष्ण महायोगिन् त्वमाद्यः पुरुषः परः । व्यक्ताव्यक्तमिदं विश्वं रूपं ते ब्राह्मणा विदुः ॥ २९ ॥
( अनुष्टुप् ) कृष्ण कृष्ण महायोगी तू आद्य पुरुषो परा । व्यक्ताव्यक्त असे विश्व रूप ते द्विज सांगती ॥ २९ ॥
कृष्ण कृष्ण महायोगिन् - हे कृष्णा, हे कृष्णा हे महायोगिन - त्वं आद्यः परः पुरुषः (असि) - तू सर्व जगाचे आदिकारण असा श्रेष्ठ पुरुष आहेस - ब्राह्मणाः - ब्रह्मज्ञानी पुरुष - इदं व्यक्ताव्यक्तं विश्वं - हे स्थूल व सूक्ष्म पदार्थांनी भरलेले सर्व जग - ते रूपं विदुः - तुझे स्वरूप आहे असे जाणतात. ॥२९॥
ते म्हणाले, "हे महायोगेश्वर श्रीकृष्ण ! आपण प्रकृतीच्या पलीकडील पुरुषोत्तम आहात. हे व्यक्त आणि अव्यक्त संपूर्ण विश्व आपलेच रूप आहे, असे वेदवेत्ते जाणतात. (२९)
विवरण :- नलकूबर आणि मणिग्रीव शापाचा अवधी संपून वृक्षयोनीतून मनुष्य योनीत आले, त्यांनी कृष्णाला साष्टांग नमस्कार घातला व ते त्याची स्तुति करू लागले. त्यावेळी ते म्हणतात, 'तू सर्वांचे नियमन करून त्यांना आकर्षित करतोस.' नियमन आणि आकर्षण या थोडयाशा विरोधी गोष्टी. नियमनात स्वामित्वाचा भाव असतो. त्यामुळे आकर्षण निर्माण होईलच असे नाही. पण श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्टयच असे की तो सर्वांना एखाद्या चुंबकाप्रमाणे आपल्याकडे आकर्षित करून घेतो. आणखीही स्तुती करताना कुबेरपुत्र पुढम्हणतात, 'हे परमपुरूषा, तू सर्वव्यापक आहेस. तुला केवळ वेदान्तीच जाणू शकतात. जरी तू सगुण-साकार असलास तरी सामान्यांना तुझे ज्ञान होणे कठीण. तू ब्रह्मा, विष्णू, महेशही आहेस. आणि कृष्ण नावाचा साक्षात् नारायणावतारही आहेस. त्यामुळे तू अव्यक्त परमात्मा असूनहि भक्तांसमोर साक्षात् उभा आहेस. तरीही तुझी पूर्ण उपासना केल्यानंतर तुझ्याबद्दलचे पूर्ण ज्ञान झाल्यानंतरच भक्तांना तू मोक्ष देतोस. (२८-२९)
त्वमेकः सर्वभूतानां देहास्वात्मेन्द्रियेश्वरः ।
त्वमेव कालो भगवान् विष्णुरव्यय ईश्वरः ॥ ३० ॥
तू एक सर्वभूतांच्या देहप्राणासि स्वामि तू । तू काल भगवान् विष्णू अव्ययो आणि ईश्वर ॥ ३० ॥
त्वं एकः - तू एकटा - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांची - देहास्वात्मेंद्रियेश्वरः (असि) - शरीरे, प्राण, मने व इंद्रिये ह्यांचा चालक आहे - त्वं एव कालः - तूच कालस्वरूपी आहेस - त्वं भगवान् विष्णुः - तूच षड्गुणैश्वर्यसंपन्न असा सर्व जगाला व्यापणारा - अव्ययः ईश्वरः - अविनाशी ईश्वर आहेस. ॥३०॥
आपणच सर्व प्राण्यांचे शरीर, प्राण, अंतःकरण आणि इंद्रियांचे स्वामी आहात. आपणच सर्वशक्तिमान काल, सर्वव्यापक, तसेच अविनाशी ईश्वर आहात. (३०)
त्वं महान् प्रकृतिः सूक्ष्मा रजःसत्त्वतमोमयी ।
त्वमेव पुरुषोऽध्यक्षः सर्वक्षेत्रविकारवित् ॥ ३१ ॥
तू महान् प्रकृती सूक्ष्मो रज सत्व तमोमयी । कर्म धर्म तशी सत्ता जाणता साक्षि ईश तू ॥ ३१ ॥
त्वंत्त महान् (असि) - तूच महतत्त्व आहेस - (त्वम्) रजःसत्त्वतमोमयी - तूच सत्त्व, रज व तम हे गुण आहेत स्वरूप जिचे - सूक्ष्मा प्रकृतिः - अशी अव्यक्त प्रकृति आहेस - त्वं एव अध्यक्षः - तूच अंतर्यामी असा - सर्वक्षेत्र विकारवित् - सर्व शरीरातील इंद्रियांचे विकार जाणणारा - (पुराणः) पुरुषः (असि) - पुराणपुरुष आहेस.॥३१॥
आपणच महत्तत्त्व आणि सत्त्वगुण, रजोगुण व तमोगुणरूप सूक्ष्म प्रकृती आहात. आपणच समस्त स्थूल आणि सूक्ष्म शरीरांची कर्मे, भाव, धर्म आणि सत्तेला जाणणारे सर्वांचे साक्षी परमात्मा आहात. (३१)
गृह्यमाणैस्त्वमग्राह्यो विकारैः प्राकृतैर्गुणैः ।
को न्विहार्हति विज्ञातुं प्राक्सिद्धं गुणसंवृतः ॥ ३२ ॥
प्रकृति गुण आदिंना कधी तू आकळेचि ना । अज्ञानी कोण हे जाणी तूं तो सर्व पुरातनो ॥ ३२ ॥
त्वं - तू - प्राकृतैः गुणैः - प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या - गृह्यमाणैः विकारैः (सह) - इंद्रियांकडून घेतल्या जाणार्या पदार्थांच्या समागमे - अग्राह्यः (असि) - घेतला जाण्यास अशक्य आहेस - गुणसंवृतःकः नु - देह, इंद्रिये इत्यादि गुणांनी वेष्टिलेला कोणता जीव खरोखर - प्राक्सिद्धं त्वां - पूर्वीपासून सिद्ध असलेल्या तुला - विज्ञातुं अर्हति - जाणण्य़ाला समर्थ आहे - ॥३२॥
वृत्तींनी ग्रहण केल्या जाणार्या प्रकृतीचे गुण आणि विकारांचे द्वारा आपले ज्ञान होऊ शकत नाही. स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या आवरणाने झाकला गेलेला कोणता मनुष्य त्यांच्याही आधीपासून असलेल्या आपल्याला जाणू शकेल ? (३२)
तस्मै तुभ्यं भगवते वासुदेवाय वेधसे ।
आत्मद्योतगुणैश्छन्न महिम्ने ब्रह्मणे नमः ॥ ३३ ॥
विश्वाचा स्वामी तू आम्ही वासुदेवा प्रणामितो । गुणीं गुणा मिळविसी परब्रह्मा नमो तुला ॥ ३३ ॥
तस्मै भगवते - त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न, - वासुदेवाय वेधसे - सर्व प्राण्यांच्या शरीरात वास करणार्या सृष्टिकर्त्या अशा - आत्मद्योतगुणैः - स्वतःपासून प्रकाशित होणार्या - छन्नमहिम्ने - गुणांनी ज्यांचे माहात्म्य आच्छादित झाले आहे अशा - ब्रह्मणे तुभ्यं नमः - ब्रह्मस्वरूपी तुला नमस्कार असो. ॥३३॥
सर्व प्रपंचाच्या निर्मात्या त्या तुम्हा भगवान वासुदेवांना आम्ही नमस्कार करीत आहोत. हे प्रभो ! आपल्या द्वारा प्रकाशित होणार्या गुणांनीच ज्यांनी आपले माहात्म्य लपवून ठेवले आहे, त्या परब्रह्मस्वरूपाला आम्ही नमस्कार करीत आहोत. (३३)
यस्यावतारा ज्ञायन्ते शरीरेष्वशरीरिणः ।
तैस्तैरतुल्यातिशयैः वीर्यैर्देहिष्वसङ्गतैः ॥ ३४ ॥
तुला प्राकृत ना देह तरी शूरत्व दाविसी । अशक्य जन सामान्या तेंव्हा हे कळते असे ॥ ३४ ॥
अशरीरिणः - वास्तविक शरीररहित - यस्य तव - अशा ज्या तुझ्या - मत्स्यकूर्मादिषु शरीरेषु - मत्स्यकूर्मादि शरीरांच्या ठिकाणी - देहिषु असंगतैः - सामान्य प्राण्यांत न दिसणार्या - तैः तैः अतुल्यातिशयैः - त्या त्या अतुल्य आहे मोठेपणा ज्यांचा - वीर्यैः - अशा पराक्रमांच्या योगाने - अवताराः ज्ञायन्ते - ते तुझे अवतार होत असे जाणिले जातात. ॥३४॥
आपण प्राकृत शरीरहित आहात; तरीसुद्धा जेव्हा आपण असे असामान्य पराक्रम प्रगट करीत असता की जे शरीर धारण करणार्यांना अशक्य आहेत. आणि त्यांच्यामुळेच त्या शरीरांमध्ये आपला अवतार आहे, हे लक्षात येते. (३४)
स भवान् सर्वलोकस्य भवाय विभवाय च ।
अवतीर्णोंऽशभागेन साम्प्रतं पतिराशिषाम् ॥ ३५ ॥
समस्त लोककल्याणा तुम्ही तो अवतारला । समस्त शक्ति घेवोनी इच्छा या पुरवीतसा ॥ ३५ ॥
आशिषां पतिः - सर्व उपभोगांच्या साधनांचा स्वामी - सः भगवान् - असा तो परमेश्वर - सर्वलोकस्य भवाय - सर्व लोकांच्या उत्कर्षाकरिता - विभवाय च - आणि मोक्षाकरिता - सांप्रतं - सध्या - अंशभागेन अवतीर्णः - अंशरूपाने अवतरलेला आहे. ॥३५॥
प्रभो ! तेच सर्व अभिलाषा पूर्ण करणारे आपण, सर्व लोकांचे लौकिक आणि अलौकिक कल्याण करण्यासाठी यावेळी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी अवतीर्ण झाला आहात. (३५)
नमः परमकल्याण नमः परममङ्गल ।
वासुदेवाय शान्ताय यदूनां पतये नमः ॥ ३६ ॥
नमो परमकल्याणा नमो परम मंगला । वासुदेवाय शांताय यदूकृष्णा नमो नमः ॥ ३६ ॥
परमकल्याण (तुभ्यं) नमः - हे अतिशय कल्याणकारका, तुला नमस्कार असो - परममंगल तुभ्यं नमः - हे अत्यंत मंगलकारका, तुला नमस्कार असो - वासुदेवाय शांताय - हे वसुदेवपुत्रा, गंभीरपुरुषा, - यदूनां पतये नमः - यादवाधीश्वरा तुला नमस्कार असो. ॥३६॥
हे परम कल्याणस्वरूप ! हे परममंगलस्वरूप ! आपणास नमस्कार असो ! शांत, सर्वांच्या हृदयात वास करणार्या यदुवंशाधिपती श्रीकृष्णांना नमस्कार असो. (३६)
अनुजानीहि नौ भूमन् तवानुचरकिङ्करौ ।
दर्शनं नौ भगवत ऋषेरासीदनुग्रहात् ॥ ३७ ॥
दासानुदास हो आम्ही अनंता हे स्विकारणे । कृपा नी नारदे केली म्हणोनी पावलो पदीं ॥ ३७ ॥
भूमन् - हे विश्वव्यापका - तव अनुचरकिंकरौ - तुझ्या दासांचे दास - नौ (गन्तुं) अनुजानीहि - अशा आम्हांला जाण्यास आज्ञा दे - नौ - आम्हाला - ऋषेःअनुग्रहात् - नारदऋषीच्या अनुग्रहाने - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा - तव दर्शनं आसीत् - तुझे दर्शन झाले.॥३७॥
हे अनंता ! आम्ही आपल्या दासांचे दास आहोत. देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळेच आम्हांला आपले दर्शन झाले. आपण आम्हांला जाण्याची अनुमती द्यावी. (३७)
( वसंततिलका )
वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायां हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः । स्मृत्यां शिरस्तव निवासजगत्प्रणामे दृष्टिः सतां दर्शनेऽस्तु भवत्तनूनाम् ॥ ३८ ॥
( वसंततिलका ) वाणी गुनास कथिण्या श्रवणो कथेत सेवेत हात मन ते रमते रुपात । हे विश्व सर्व सदनो तुझिये, नि संत प्रत्यक्ष देह असती नमितो तयांही ॥ ३८ ॥
नः वाणी - आमच्या वाणी - तव गुणानुकथने (स्ताम्) - तुझ्या गुणांचे कथन करण्याविषयी तत्पर असोत - श्रवणौ कथायां (स्ताम्) - कान तुझ्या कथा श्रवणांत तत्पर असोत - हस्तौ कर्मसु (स्ताम्) - हात तुझ्या सेवेत तत्पर असोत - मनः तव पादयोः (स्मृत्यां अस्तु) - मन तुझ्या चरणांच्या स्मरणात दंग असो - शिरः तव निवासजगत् - मस्तक तुझे वसतिस्थान असे जे जग - प्रणामे (अस्तु) - त्याला वंदन करण्यात तत्पर असो - दृष्टिः सतां भवत्तनूनां - डोळे सत्पुरुषाचे व तुझ्या अवतारमूर्तीचे - च दर्शनं (अस्तु) - दर्शन करण्याविषयी उत्कंठित असोत. ॥३८॥
हे प्रभो ! आमची वाणी आपल्या गुणांचे वर्णन करीत राहो. आमचे कान आपल्या कथा ऐकण्याकडे लागून राहोत. आमचे हात आपल्या सेवेत आणि मन आपल्या चरणकमलांचे स्मरण करण्यात रममाण होवो ! आमचे मस्तक आपले निवासस्थान अशा जगासमोर नम्र राहो आणि आमचे नेत्र आपले प्रत्यक्ष शरीर अशा संतांचे दर्शन घेत राहोत." (३८)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इत्थं सङ्कीर्तितस्ताभ्यां भगवान् गोकुलेश्वरः । दाम्ना चोलूखले बद्धः प्रहसन्नाह गुह्यकौ ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - सौंदर्य निधि माधुर्य भगवान् गोकुळेश्वर । उखळा बद्ध तो तैसा हांसोनी वदला असे ॥ ३९ ॥
ताभ्यां इत्थं संकीर्तितः - त्या दोघांनी याप्रमाणे स्तविलेला - दाम्नाउलूखले बद्धः - दाव्याने उखळाशी बांधलेला - गोकुलेश्वरः भगवान् - गोकुळाधिपति श्रीकृष्ण - प्रहसन् गुह्यकौ आह - हसत हसत गुह्यकांना म्हणाला. ॥३९॥
श्रीशुकदेव म्हणतात - त्यांनी गोकुळेश्वर श्रीकृष्णांची अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर दोरीने उखळाला बांधलेले भगवान हसत हसत त्यांना म्हणाले. (३९)
श्रीभगवानुवाच -
ज्ञातं मम पुरैवैतद् ऋषिणा करुणात्मना । यत् श्रीमदान्धयोर्वाग्भिः विभ्रंशोऽनुग्रहः कृतः ॥ ४० ॥
श्रीभगवान् म्हणाले - श्रीमदे अंध हे दोघे जाणी मी पूर्वि पासुनी । नारदे प्रेमळे शापे कृपा केली पहा अशी ॥ ४० ॥
मम - मला - पुरा एव - पूर्वीच - एतत् ज्ञातम् - हे कळले होते - यत् - की - करुणात्मना ऋषिणा - दयाळू मनाच्या नारद ऋषीने - श्रीमदान्धयोः (युवयोः) - संपत्तीच्या गर्वाने अंध झालेल्या तुम्हां दोघावर - वाग्भिः - शापरूपी शब्दांनी - विभ्रंशः अनुग्रहःकृतः - ऐश्वर्यभ्रष्टता हीच कृपा केली. ॥४०॥
श्रीभगवान म्हणाले - "तुम्ही मदाने आंधळे झाला होतात. अगोदरपासूनच मला हे माहीत होते की, परम कारुणिक देवर्षी नारदांनी शाप देऊन तुमचे ऐश्वर्य नष्ट केले आणि हीच तुमच्यावर कृपा केली. (४०)
साधूनां समचित्तानां सुतरां मत्कृतात्मनाम् ।
दर्शनान्नो भवेद्बन्धः पुंसोऽक्ष्णोः सवितुर्यथा ॥ ४१ ॥
जयांनी समबुद्धीने मला हृदय अर्पिले । तयांचे दर्शने बंध तुटती रवि जैं तमा ॥ ४१ ॥
समचित्तानां - ज्यांचे मन सदा सारख्या स्थितीत असते - सुतरां मत्कृतात्मनां - व माझ्या ठिकाणी ज्यांचे मन गढून गेले आहे - साधूनां दर्शनात् - अशा सत्पुरुषांच्या दर्शनाने - पुंसः बंधः नो भवेत् - प्राण्यांचे संसाररूपी बंधन नष्ट होते - यथा - जसे - सवितुः दर्शनात् - सूर्याच्या दर्शनाने - अक्ष्णोः (बंधनं न भवति तथा) - डोळ्यांवरील बंधन नष्ट होते तसे. ॥४१॥
जे समदर्शी आहेत आणि ज्यांचे हृदय पूर्णपणे मला समर्पित आहे, त्या साधुपुरुषांच्या दर्शनाने संसारबंधन नाहीसे होते. जसा सूर्यदर्शनाने अंधार नाहीसा होतो. (४१)
तद्गच्छतं मत्परमौ नलकूबर सादनम् ।
सञ्जातो मयि भावो वां ईप्सितः परमोऽभवः ॥ ४२ ॥
म्हणोनी तू मणिग्रीव आणि तू नलकूबरा । तुम्हाशी लाभली भक्ती आता जावे घरास की ॥ ४२ ॥
नलकूबर वां इप्सितः - अहो नलकूबर तुमच्या इच्छेप्रमाणे - परमः अभवः भावः - तुमची संसारबंधने सुटणारी अशी श्रेष्ठ भक्ति - मयि संजातः - माझ्या ठिकाणी जडली आहे - तत् (युवाम्) मत्परमौ - तरी तुम्ही माझ्याठिकाणी - (सन्तौ) सादनं गच्छतं - पूर्णपणे चित्त देऊन आपल्या स्थानी जा. ॥४२॥
म्हणून नलकूबरा आणि मणिग्रीवा ! तुम्ही माझेच अनन्यचिंतन करीत आपापल्या घरी जा. जी तुमच्यासाठी कल्याणकारी आहे, त्या, तुम्हांला इष्ट असलेल्या व संसारचक्रातून सोडविणार्या अनन्य भक्तीची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे." (४२)
विवरण :- मूळ मनुष्य रूप प्राप्त झालेल्या कुबेरपुत्रांना भगवान म्हणतात, तुम्हाला नारदाने शाप देऊन तुम्हांवर फार मोठा अनुग्रह केला, इथे शाप आणि अनुग्रह या दोनहि गोष्टी परस्पर विरोधी आहेत. शाप दिलेल्या व्यक्तीवर कृपा केली जात नाही, पण इथे लक्ष्मीच्या मदाने अंध झालेल्या कुबेरपुत्रांचे डोळे शाप मिळाल्यानेच उघडले. लक्ष्मीच्या मदाने अंध झालेल्यांच्या लक्ष्मीचा नाश होणे हा त्यांना शुद्धीवर आणण्याचा उपाय आहे, हे पूर्वी आलेच आहे. कुबेरपुत्रांना शाप मिळाला नसता तर ते असेच मदांध होऊन व्यसनांच्या आहारी जात जात शेवटी कायमचे विनाशाच्या गर्तेत पडले असते. त्यांची त्यातून कधीच सुटका झाली नसती. पण शापामुळे ते वृक्ष बनले स्मृति जागृत राहिल्याने त्यांना वास्तवाचे भान आले. आपली चूक कळून आली आणि कृष्णाने त्यांचा उद्धार केला. कृष्णाचे हातून उद्धार होणे यापेक्षा दुसरा अनुग्रह कोणता ? (४१-४२)
श्रीशुक उवाच -
इत्युक्तौ तौ परिक्रम्य प्रणम्य च पुनः पुनः । बद्धोलूखलमामन्त्र्य जग्मतुर्दिशमुत्तराम् ॥ ४३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे दशमोऽध्यायः ॥ १० ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीशुकदेव सांगतात - वदता भगवान् ऐसे केली त्यांनी परिक्रमा । पुनः पुन्हा प्रणामोनी निघाले उत्तरेकडे ॥ ४३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
इति उक्तौ तौ - याप्रमाणे बोलले गेलेले ते दोघे - बद्धोलूखलं (कृष्णं) - उखळाशी बांधलेल्या त्या कृष्णाला - पुनः पुनः परिक्रम्य प्रणम्य च - वारंवार प्रदक्षिणा व प्रणाम करून - आमंत्र्य (च) - आणि त्याची आज्ञा घेऊन - उत्तरां दिशं जग्मतुः - उत्तर दिशेला निघून गेले. ॥४३॥
श्रीशुकदेव म्हणतात - भगवान असे म्हणाले, तेव्हा त्या दोघांनी त्यांना प्रदक्षिणा घातली आणि वारंवार नमस्कार केला. यानंतर उखळाला बांधलेल्या त्यांची आज्ञा घेऊन ते उत्तर देशेला निघून गेले. (४३)
अध्याय दहावा समाप्त |