|
श्रीमद् भागवत पुराण श्रीकृष्णस्य उलूखले बन्धनम् - श्रीकृष्णाला उखळाला बांधणे - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
( अनुष्टुप् )
श्रीशुक उवाच - एकदा गृहदासीषु यशोदा नन्दगेहिनी । कर्मान्तरनियुक्तासु निर्ममन्थ स्वयं दधि ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्री शुकदेव सांगतात - एकदा नंदराणी ती दासींना काम देउनी । स्वये ती लागली कामा मंथाया ताक नी दही ॥ १ ॥
एकदा - एके दिवशी - गृहदासीषु - घरातील सर्व दासींना - कर्मान्तरनियुक्तासु (सत्सु) - दुसर्या कामावर नेमले असता - नन्दगेहिनी यशोदा - नंदाची पत्नी यशोदा - स्वयं (एव) - स्वतःच - दधि निर्ममन्थ - दही घुसळीत होती. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - एकदा नंदराणी यशोदा घरच्या दासींना दुसर्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती. (१)
यानि यानीह गीतानि तद्बालचरितानि च ।
दधिनिर्मन्थने काले स्मरन्ती तान्यगायत ॥ २ ॥
तुम्हा मी कृष्णलीला ज्या बोललो सर्व त्या मनीं । माता ती आठवोनीया मंथिता गातही असे ॥ २ ॥
दधिनिर्मन्थने च काले - आणि दही घुसळताना - यानि यानि तद्बालचरितानि - जी जी त्या श्रीकृष्णाची बाळपणीची कृत्ये - इह गीतानि (आसन्) - गोकुळात गायिली जात असत - तानि स्मरन्ती - ती आठवून - अगायत - गात होती. ॥२॥
आतापर्यंत भगवंतांच्या ज्या ज्या बाललीलांचे वर्णन केले, त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचे गायनही करीत असे. (२)
( मंदाक्रांता )
क्षौमं वासः पृथुकटितटे बिभ्रती सूत्रनद्धं । पुत्रस्नेहस्नुतकुचयुगं जातकम्पं च सुभ्रूः । रज्ज्वाकर्षश्रमभुजचलत् कङ्कणौ कुण्डले च स्विन्नं वक्त्रं कबरविगलन् मालती निर्ममन्थ ॥ ३ ॥
( मंदाक्रांता ) बांधोनीया स्थुलकटितटा वस्त्र ते रेशमाचे । पुत्रस्नेहे कुचहि भरले कंपती मंथिता तै ॥ मंथोनीया करहि थकले हालती कुंडले नी । वेणीचीही पडति कुसुमे भूवया चांग तैशा ॥ ३ ॥
पृथुकटितटे - विशाल कमरेवर - सूत्रनद्धं क्षौमं वासः - नाडीने बांधलेले रेशमी वस्त्र - जातकम्पं - आणि ज्यांना कंप उत्पन्न झाला आहे, - च पुत्रस्नेह - व पुत्रस्नेहामुळे - स्नुतकुचयुगम् - ज्यांना पान्हा फुटला आहे असे दोन स्तन - रज्ज्वाकर्षश्रमभुज - रवीची दोरी ओढण्याचे श्रम होत आहेत अशा - चलत्कङकणौ - हातांतील हलणारी दोन कंकणे - कुण्डले च - व (कानांतील) दोन कुंडले - स्विन्नं च वक्रं बिभ्रती - आणि घामाने भिजलेले मुख धारण करणारी - कबरविगलन्मालती - जिच्या भुवया सुंदर आहेत व जिच्या वेणीतून चमेलीची फुले गळत आहेत - (सा) सुभ्रूः - अशी ती यशोदा - निर्ममन्थ - घुसळीत होती. ॥३॥
यशोदा जेव्हा दही घुसळत होती, तेव्हा स्थूल कमरेवर ती रेशमी वस्त्र नेसली होती आणि त्यावर तिने सुती कमरपट्टा धारण केला होता. पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध पाझरत होते आणि ते हलत होते. रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शिणले होते. हातातील बांगड्या आणि कानातील कर्णफुले हलत होती. चेहर्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते. वेणीत घातलेली मोगर्याचे फुले गळून पडत होती. (३)
( अनुष्टुप् )
तां स्तन्यकाम आसाद्य मथ्नन्तीं जननीं हरिः । गृहीत्वा दधिमन्थानं न्यषेधत्प्रीतिमावहन् ॥ ४ ॥
( अनुष्टुप् ) तेंव्हा तिथे आला इच्छोनी स्तनपान ते । रवीच धरिली तेणे माता प्रेमात डुंबली ॥ ४ ॥
स्तन्यकामः हरिः - स्तनपान करण्याची इच्छा करणारा श्रीकृष्ण - मथ्नतीं जननीं आसाद्य - मंथन करीत असणार्या आईला गाठून - दधिमन्थानं (च) गृहीत्वा - आणि दही घुसळण्याची रवी धरून - प्रीतिं आवहन् - प्रेम आणीत - तां न्यषेधयत् - तिला थांबविता झाला. ॥४॥
श्रीकृष्ण त्याचेवळी स्तनपान करण्यासाठी दही घुसळीत असलेल्या आईजवळ आला. तिच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणीत त्याने रवी पकडली आणि आईचे दही घुसळणे थांबवले. (४)
( मिश्र )
तमङ्कमारूढमपाययत् स्तनं स्नेहस्नुतं सस्मितमीक्षती मुखम् । अतृप्तमुत्सृज्य जवेन सा ययौ उत्सिच्यमाने पयसि त्वधिश्रिते ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा ) कडेवरी कृष्ण बसोनि ऐसा मातृस्तनी दूधनि प्रेम दाटे । तृप्तोनि माता मुख पाहि त्याचे आडीवरी दूध उतोनि गेले । ठेवोनि कृष्णा मग माय जायी धावोनि दूध स्थिरावयाला ॥ ५ ॥
अंकं आरूढं च - आणि तो मांडीवर बसला असता - सा (तस्य) सस्मितं मुखं ईक्षती - ती त्याचे हसरे मुख पाहत - तं - त्याला - स्नेहस्नुतं स्तनं अपाययत् - पान्हा फुटलेला स्तन पाजिती झाली - अधिश्रिते पयसि - परंतु चुलीवर ठेविलेले दूध - उत्सिच्यमाने तु - उतास येऊ लागले असता - (तं) अतृप्तं एव उत्सृज्य - त्याला तसाच असंतुष्ट सोडून - जवेन ययौ - लगबगीने निघून गेली. ॥५॥
यशोदेने श्रीकृष्णाला मांडीवर घेतले व स्तनातून पाझरणारे दूध ती त्याला पाजू लागली आणि त्याचे मंद हास्ययुक्त मुख न्याहाळू लागली. इतक्यात चुलीवर ठेवलेले दूध उतू जाऊ लागल्याने यशोदेने त्याचे पिणे संपण्याआधीच त्याला खाली ठेवून गडबडीने दूध उतरविण्यासाठी ती निघून गेली. (५)
सञ्जातकोपः स्फुरितारुणाधरं
सन्दश्य दद्भिर्दधिमन्थभाजनम् । भित्त्वा मृषाश्रुर्दृषदश्मना रहो जघास हैयङ्गवमन्तरं गतः ॥ ६ ॥
क्रोधोनि कृष्णो मग लाल झाला फोडोनि टाकी दहिमाठ तेंव्हा । घरात गेला रुसुनी तसाची शिळेचि लोणी रडताहि भक्षी ॥ ६ ॥
संजातकोपः (सः) - ज्याला राग आला आहे असा तो श्रीकृष्ण - स्फुरितारुणाधरं - कापणारे तांबडे ओठ - दद्भिः संदश्य - दातांनी चावून - दषदश्मना च - आणि वरवंटयाने - दधिमन्थभाजनं भित्वा - दही घुसळण्याचे भांडे फोडून - मृषाश्रुः (सन्) - डोळ्यांत खोटी आसवे आणून - अन्तरं गतः - घरात गेला - रहः (च) - आणि एकांतात - हैयङगवं जघास - लोणी खाऊ लागला. ॥६॥
यामुळे श्रीकृष्णाला राग आला. थरथरणारे लालचुटुक ओठ दातांनी चावीत त्याने जवळच पडलेल्या दगडाने दह्याचे मडके फोडून टाकले, डोळ्यात खोटे अश्रू आणले आणि माजघरात जाऊन कोणाला नकळत तो लोणी खाऊ लागला. (६)
उत्तार्य गोपी सुशृतं पयः पुनः
प्रविश्य संदृश्य च दध्यमत्रकम् । भग्नं विलोक्य स्वसुतस्य कर्म तज्जहास तं चापि न तत्र पश्यती ॥ ७ ॥
माता दुधाते उतरोनि आली पाही दह्याचे फुटलेचि माथ । मनात जाणी करणी हरीची नी हासली ती बहु तै यशोदा ॥ ७ ॥
पयः सुशृतं - दूध चांगले तापल्यावर - (सत्) उत्तार्य - खाली उतरून - पुनः (तत्र) प्रविश्य - पुनः तेथे येऊन - दध्यमत्रकं च - आणि दह्याचे भांडे - भग्नं विलोक्य - फुटलेले पाहून - तं च अपि तत्र - आणि त्यालाही तेथे - न पश्यंती (सा) गोपी - न पाहणारी ती यशोदा - स्वसुतस्य (एव) - आपल्या पुत्राचेच - तत् कर्म (इति) संदृश्य - ते कृत्य असे जाणून - जहास - हसली. ॥७॥
उतू जाणारे दूध खाली उतरवून यशोदा पुन्हा त्या खोलीत आली. तेथे पाहिले तर दह्याचे मडके फुटलेले. ही आपल्या लाडक्याचीच करामत आहे, हे तिने ओळखले. त्याचबरोबर तोही तेथे नाही, हे पाहून तिला हसू आवरेना. (७)
उलूखलाङ्घ्रेरुपरि व्यवस्थितं
मर्काय कामं ददतं शिचि स्थितम् । हैयङ्गवं चौर्यविशङ्कितेक्षणं निरीक्ष्य पश्चात् सुतमागमच्छनैः ॥ ८ ॥
धुंडोनि माता हरीसी बघे तो शिंक्यासि झोंबे उखळावरी तो । नी माकडाच्या परि खाय लोणी भिऊनि चित्ती न बघोत कोणी ॥ ८ ॥
पुत्रम् - मुलाला - उलूखलाङ्घ्रेः - पालथ्या उखळीवर - उपरि व्यवस्थितं - उभा राहिलेला - शिचिस्थिं हैयङगवं - शिंक्यावरील लोणी - मर्काय कामं ददतम् - माकडाला मोकळेपणाने देत असलेला - चौर्यकर्म - चोरीच्या कृत्यामुळे - विशङ्कितेक्षणम् - ज्याचे डोळे कावरेबावरे झाले आहेत असा - वीक्ष्य - पाहून - शनैः पश्चात् अगमत् - हळूच पाठीमागून गेली. ॥८॥
इकडे तिकडे शोधल्यावर समजले की, एका पालथ्या उखळावर श्रीकृष्ण उभा आहे आणि शिंक्यावरचे लोणी वानरांना घालीत आहे. शिवाय आपली चोरी उघडकीला येईल, याच्या भितीने चारी बाजूंना पाहात आहे. हे पाहून यशोदा पाठीमागून येऊन हळूच त्याच्याजवळ जाऊन पोहोचली. (८)
विवरण :- उतू जाणारे दूध चुलीवरून उतरण्यासाठी यशोदा कृष्णाला मांडीवरून खाली ठेऊन धावत गेली. पण रागावलेल्या कृष्णाने ताकाचे भांडेच फोडून टाकले. एकूण, व्हायचे ते नुकसान झालेच. सामान्यांची साध्या-साध्या गोष्टीत असणारी आसक्ती इथे दिसून येते. मग कृष्णाने ते लोणी माकडांना खायला घातले. (कदाचित मांजरे किंवा सवंगडीही असावेत.) पूर्वावतारातील (रामावतारातील) आपल्या सेवकांवर कृष्ण परमात्मा अजूनहि तितकेच प्रेम करत असावा. (७-८)
तां आत्तयष्टिं प्रसमीक्ष्य सत्वरः
ततोऽवरुह्यापससार भीतवत् । गोप्यन्वधावन्न यमाप योगिनां क्षमं प्रवेष्टुं तपसेरितं मनः ॥ ९ ॥
येताचि माता छडि घेउनिया पळोनि गेला बघताचि कृष्ण । योगी जया मेळण्या नित्य ध्याती त्यासी यशोदा धरण्यास धावे ॥ ९ ॥
आत्तयष्टिं तां प्रसमीक्ष्य - काठी घेतलेल्या तिला पाहून - सत्वरः ततः अवरुह्य - लगबगीने तेथून खाली उतरून - भीतवत् अपससार - भ्याल्यासारखा पळून गेला - (सा) गोपी - ती यशोदा - तपसा ईरितं - तपश्चर्येने प्रेरिलेले - योगिनां मनः यं - - प्रवेष्टुं न क्षमम् - प्रवेश करण्यास समर्थ होत नाही - (तं) अन्वधावत् - त्या श्रीकृष्णाच्या मागून धावली - (परं) न आप - परंतु पकडती झाली नाही. ॥९॥
श्रीकृष्णाने जेव्हा पाहिले की, आई हातात छडी घेऊन आपल्याकडेच येत आहे, तेव्हा उखळावरून त्याने खाली उडी मारली आणि घाबरल्यासारखे दाखवून तो पळाला. योगी तपस्येने शुद्ध झालेल्या मनानेसुद्धा ज्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत किंवा ज्याला प्राप्त करू शकत नाहीत, त्याला पकडण्यासाठी यशोदा त्याच्यामागे धावली. (९)
विवरण :- 'यतः वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ।'(तै.ति.) ज्या कृष्ण परमात्म्याच्या मनात योग्यांनाहि सहजी प्रवेश नाही, त्याच्या मागे यशोदा धावू लागली. भक्तीचा हा महिमा ! भक्ताच्या प्रेमाने परमेश्वर किती सामान्याहून सामान्य होतो याचे हे उदाहरण ! (९)
अन्वञ्चमाना जननी बृहच्चलत्
श्रोणीभराक्रान्तगतिः सुमध्यमा । जवेन विस्रंसितकेशबन्धन च्युतप्रसूनानुगतिः परामृशत् ॥ १० ॥
धावोनि जाता हलले नितंब ते थोर त्याने थकलीच माता । सुटोनि वेणी गळलीही पुष्पे तरीहि मातें धरिलाच कृष्ण ॥ १० ॥
अन्वञ्चमाना - मागून धावणारी - बृहच्चलच्छ्रोणी - हालणार्या विशाल कमरेच्या - भराक्रांतगतिः - भारामुळे, जिचे चालणे दबले आहे अशी - जवेन विस्रंसित - धावण्याच्या वेगामुळे विसकटलेल्या - केशबंधनच्युत - वेणीतून गळलेली फुले - प्रसूनानुगतिः - जिच्या मागोमाग पडत आहेत अशी - (सा) सुमध्यमा जननी - ती सुंदर यशोदा माता - तं परामृशत् - त्याला पकडती झाली. ॥१०॥
अशाप्रकारे जेव्हा यशोदा श्रीकृष्णाच्या मागे धावू लागली, तेव्हा थोड्याच वेळात स्थूल व हलणार्या नितंबांच्यामुळे तिची चाल मंदावली. जोराने धावण्यामुळे वेणी ढिली होऊन तीत माळलेली फुले खाली पडू लागली. अखेर कसेबसे तिने त्याला पकडले. (१०)
कृतागसं तं प्ररुदन्तमक्षिणी
कर्षन्तमञ्जन्मषिणी स्वपाणिना । उद्वीक्षमाणं भयविह्वलेक्षणं हस्ते गृहीत्वा भिषयन्त्यवागुरत् ॥ ११ ॥
धरोनि हाता मग रागवे ती मुद्रा तयाची गमली विचित्र । भीती तशी नी अपराधियाची रडे न थांबे तइ हुंदके दे । ते काजळी नेत्रहि चोळल्याने मुखासि काळे दिसले विचित्र । चंबूच झाले जणु ओठ त्याचे व्याकूळला हा दिसतो असा की ॥ ११ ॥
कृतागसं - केला आहे अपराध ज्याने अशा - प्ररुदंतं - रडणार्या - अञ्जन्मषिणी अक्षिणी - काजळ घातलेले डोळे - स्वपाणिना कषन्तम् - आपल्या हाताने चोळणार्या - उद्वीक्षमाणं - वर पाहणार्या - भयविह्वलेक्षणम् - भीतीने ज्याची मुद्रा कावरीबावरी झाली आहे अशा - तं - त्या श्रीकृष्णाला - हस्ते गृहीत्वा - हाताने धरून - भीषयन्ती - धाक दाखवीत - अवागुरत - रागावली. ॥११॥
श्रीकृष्णाचा हात पकडून ती त्याला रागावू लागली. त्यावेळी हातून चूक घडल्यामुळे रडत रडत तो हाताने डोळे चोळीत होता. डोळ्यांतून काजळ वाहून तोंडावर आले होते. नजर वर केली, तर ती भितीने बावरलेली दिसत होती. (११)
विवरण :- कृष्णाच्या मागे धावणार्या यशोदेचे आणि रडणार्या कृष्णाचे वर्णन अतिशय यथार्थ केले आहे, ज्याच्या एका दृष्टिक्षेपात संपूर्ण विश्व बदलण्याचे सामर्थ्य त्याची दृष्टी भयविव्हल होणे, हा जरी विरोधाभास असला तरी तो खूपच मनोज्ञ आहे. (१०-११)
( अनुष्टुप् )
त्यक्त्वा यष्टिं सुतं भीतं विज्ञायार्भकवत्सला । इयेष किल तं बद्धुं दाम्नातद्वीर्यकोविदा ॥ १२ ॥
भिलेला दिसता लल्ला वात्सल्य मनि दाटले । फेकोनी छडि ती माता बांधाया चिंतिते मनीं । बाळऐश्वर्य ते थोर यशोदा नच जाणि की ॥ १२ ॥
अर्भकवत्सला - मुलावर अत्यंत प्रेम करणारी, - (किन्तु) अतद्वीर्यकोविदा (सा) - परंतु त्याचा पराक्रम न जाणणारी ती यशोदा - सुतं भीतं (इति) विज्ञाय - मुलगा भ्याला असे जाणून - यष्टिं त्यक्त्वा - काठी टाकून - तं किल - खरोखरच त्याला - दाम्ना बद्धुं इयेष - दाव्याने बांधावयास गेली. ॥१२॥
बाळ फार घाबरला आहे, असे पाहून तिच्या हृदयात माया दाटून आली. तिने छडी फेकून दिली. पण असा विचार केला की, याला जरब बसविणासाठी दोरीने बांधले पाहिजे. खरे पाहू जाता यशोदेला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. (१२)
विवरण :- जो नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, त्याला बांधून घालण्याची कल्पनाच खूप गमतीची, आणि अशा चिरमुक्तास बांधून घालण्यासाठी दोरी तरी कोठून आणायची ? जणू यशोदा अनादि अनंतासच वेसण घालू पहात होती. ज्या कृष्ण परमात्म्याच्या भक्तीने मनुष्य जन्ममरण्याच्या फेर्यातून भवबंधनातून मुक्त होतो, त्यानेच यशोदेकडून स्वतःस बांधून घेतले. जशी आई बालकाच्या चालीने चालते, त्याच्याशी बोबडे बोल बोलते, बाळासाठी सगळे, तीच इथे भगवंताची लीला, मातेसाठी भक्तांसाठी मुक्तात्मा बद्ध झाला. जणू तो म्हणतो, 'अहं भक्तपराधीनः ह्यस्वतंत्रः ।' 'मी भक्तांच्या ताब्यात आहे, स्वतंत्र नाही.' मुक्तात्म्याला बांधून घालण्यात यशोदेचे अज्ञान दिसून येते. पण अज्ञानातच सुख असते हे ही खरेच. कृष्णाने जर सामान्य बालकाप्रमाणे बाल-लीला केल्या नसत्या, तर यशोदेला हा आपलाच मुलगा आहे ना ? अशीही शंका आली असती. त्यांच्यातील वात्सल्याचे नाते लोप पावले असते, आणि स्वतः भगवंतासच असा दुरावा नको होता. (१२)
न चान्तर्न बहिर्यस्य न पूर्वं नापि चापरम् ।
पूर्वापरं बहिश्चान्तः जगतो यो जगच्च यः ॥ १३ ॥ तं मत्वात्मजमव्यक्तं मर्त्यलिङ्गमधोक्षजम् । गोपिकोलूखले दाम्ना बबन्ध प्राकृतं यथा ॥ १४ ॥
ज्याच्या बाहेर ना काही ज्याच्या आतहि ना दिसे । आदी ना अंतही ज्याला जगाचा रूप तो स्वयम् ॥ १३ ॥ परा अव्यक्त हा ऐसा मनुष्यकार ही असा । पुत्र हा मानिता बांधी दोराने उखळास मा ॥ १४ ॥
यस्य अन्तः न बहिः - ज्याला आत नाही, बाहेर नाही, - न पूर्वं न अपरं अपि च न - अलीकडे नाही व पलीकडे नाही - यः जगतः पूर्वापरं - जो जगाच्या बाहेर अलीकडे, - अन्तः बहिः च (अस्ति) - पलीकडे व आतबाहेरही आहे - यःच (एतत्) जगत् (अस्ति) - आणि जो म्हणजेच हे जग आहे - तं मर्त्यलिङ्गम् अव्यक्तं - त्या मनुष्यरूप धारण करणार्या अव्यक्तरूपी - अधोक्षजं आत्मजं मत्वा - इंद्रियातीत अशा श्रीकृष्णाला आपला मुलगा मानून - गोपिका - यशोदा - यथा प्राकृतम् - सामान्य मनुष्याप्रमाणे - उलूखले दाम्ना बबन्ध - उखळाशी दाव्याने बांधती झाली. ॥१३-१४॥
ज्याला बाहेर नाही की आत नाही, आदी नाही की अंत नाही, जो जगाच्या आदि-अंती, आत-बाहेर असून जगद्रूपातही आहे, जो सर्व इंद्रियांच्या पलीकडे असून अव्यक्त आहे, त्याच भगवंताने मनुष्यरूप घेतल्याने त्याला पुत्र समजून, एखाद्या साधारण बालकाला बांधावे, तसे यशोदा त्याला दोरीने उखळाला बांधू लागली. (१३-१४)
तद्दाम बध्यमानस्य स्वार्भकस्य कृतागसः ।
द्व्यङ्गुलोनमभूत्तेन सन्दधेऽन्यच्च गोपिका ॥ १५ ॥
दोराने बांधिता याला अपुरा दोन बोट तो । दुसरा आणुनी दोर दोराला जोडिला असे ॥ १५ ॥
कृतागसः - ज्याने अपराध केला आहे - बध्यमानस्य स्वार्भकस्य - व जो बांधला जात आहे अशा आपल्या मुलाला - तत् दाम - ते दावे - द्व्यङ्गुलोनम् अभवत् - दोन अंगुळे कमी झाले - गोपिका - यशोदा - तेन च अन्यत् संदधे - त्याला दुसरे दावे जोडिती झाली. ॥१५॥
जेव्हा यशोदा त्या खोडकर मुलाला दोरीने बांधू लागली, तेव्हा ती दोरी दोन बोटे कमी पडली. तेव्हा तिने दुसरी दोरी त्या दोरीला बांधली. (१५)
यदाऽऽसीत् तदपि न्यूनं तेनान्यदपि सन्दधे ।
तदपि द्व्यङ्गुलं न्यूनं यद् यद् आदत्त बन्धनम् ॥ १६ ॥
दुजाही अपुरा होता तिसरा जोडिला तिने । कित्येक जोडिले दोर दो बोट अपुरेच की ॥ १६ ॥
यदा तत् अपि न्यूनं आसीत् - जेव्हा तेही कमी झाले - तेन अन्यत् अपि संदधे - त्याला आणखीही एक जोडिती झाली - यत् यत् बन्धनं आदत्त - जे जे दावे घेई - तत् द्व्यङ्गुलं न्यूनं (अभवत्) - ते ते दोन अंगुळे कमी पडे. ॥१६॥
जेव्हा तीसुद्धा कमी पडू लागली, तेव्हा तिने आणखी एक तिला जोडली. अशाप्रकारे जी जी दोरी आणून ती जोडत असे, ती ती पुन्हा दोन बोटे कमीच पडत असे. (१६)
एवं स्वगेहदामानि यशोदा सन्दधत्यपि ।
गोपीनां सुस्मयन्तीनां स्मयन्ती विस्मिताभवत् ॥ १७ ॥
यशोदा बांधिते सर्व घरचे दोर धुंडुनी । तरीही भगवान् कृष्णा बांधण्या अपुरेच की ॥ १७ ॥
एवं स्वगेहदामानि - याप्रमाणे आपल्या घरातील सर्व दावे - संदधती यशोदा अपि - जोडीत असता ती यशोदाही - सुस्मयन्तीनां गोपीनाम् - गोपी हसत असता - स्मयन्ती विस्मिता अभवत् - स्वतः हसत आश्चर्यचकित झाली. ॥१७॥
यशोदेने घरातील सर्व दोर्या जोडल्या तरीसुद्धा त्या कमीच पडल्या. हे पाहून गोपी हसू लागल्या. त्यामुळे तिलाही हसू आले आणि आश्चर्यही वाटले. (१७)
स्वमातुः स्विन्नगात्राया विस्रस्तकबरस्रजः ।
दृष्ट्वा परिश्रमं कृष्णः कृपयाऽऽसीत् स्वबन्धने ॥ १८ ॥
मातेची पाहिली कृष्णे त्रेधा ही जाहली अशी । पाही तो सुटली वेणी स्वयें बंधनि गुंतला ॥ १८ ॥
स्विन्नगात्रायाः - जिचे शरीर घामाने ओले झाले आहे - विस्रस्तकबरस्रजः - व जिच्या वेणीतील गजरा अस्ताव्यस्त झाला आहे - स्वमातुः - अशा आपल्या मातेचा - (तं) परिश्रमं दृष्ट्वा - तो मोठा खटाटोप पाहून - कृष्णः - कृष्ण - कृपया स्वबन्धनं आसीत् - कृपेने आपण होऊनच आपले बंधन करिता झाला. ॥१८॥
श्रीकृष्णांनी पाहिले की, आईचे शरीर घामाने ओले चिंब झाले आहे, वेणी सैल होऊन फुलांची वेणी गळून पडली आहे. तेव्हा तिची करुणा येऊन त्याने स्वतःच स्वतःला बांधून घेतले. (१८)
एवं सन्दर्शिता ह्यङ्ग हरिणा भृत्यवश्यता ।
स्ववशेनापि कृष्णेन यस्येदं सेश्वरं वशे ॥ १९ ॥
स्वतंत्र भगवान् कृष्ण ब्रह्मा इंद्रादि वश्य त्यां । तरीही बांधला गेला दाविण्या भक्तिबंधन ॥ १९ ॥
अङग - हे परीक्षित राजा - एवम् - अशा रीतीने - इदं सेश्वरं (जगत्) - ईश्वरासह हे सर्व जग - यस्य वशे (तिष्ठति) - ज्याच्या आधीन आहे - (तेन) स्ववशेन - त्या स्वतंत्र अशा - श्रीकृष्णेन हरिणा अपि - श्रीकृष्णरूपी श्रीहरीने सुद्धा - भृत्यवश्यता - आपण भक्तांच्या स्वाधीन आहोत - संदर्शिता - असे दाखविले. ॥१९॥
परीक्षिता ! श्रीकृष्ण पूर्ण स्वतंत्र असून ब्रह्मदेव इद्यादिंसह हे संपूर्ण विश्व त्यांच्या अधीन आहे. तरीसुद्धा अशा प्रकारे बांधले जाऊन त्यांनी आपण भक्तांच्या अधीन असल्याचे दर्शविले. (१९)
नेमं विरिञ्चो न भवो न श्रीरप्यङ्गसंश्रया ।
प्रसादं लेभिरे गोपी यत् तत्प्राप विमुक्तिदात् ॥ २० ॥
मुक्तिदाता मुकुंदाचे गोपींनी प्रेम मेळिले । ब्रह्मा शिव तशी लक्ष्मी यांना जे नच लाभले ॥ २० ॥
गोपी - यशोदा - विमुक्तिदात् - मुक्ति देणार्या परमेश्वरापासून - यं इमं प्रसादं प्रापं - हा जो प्रसाद मिळविती झाली - तं (प्रसादं) - तो प्रसाद - विरिञ्चःन भवः - ब्रह्मदेव नाही, शंकर नाही - अङ्गसंश्रया - व परमेश्वराच्या शरीराचा आश्रय करणारी - श्रीः अपि न (प्राप) - लक्ष्मीसुद्धा मिळविती झाली नाही. ॥२०॥
गोपी यशोदेने मुक्तिदात्या मुकुंदांकडून जो कृपाप्रसाद प्राप्त करून घेतला, तो ब्रह्मदेव, शंकर आणि वक्षःस्थळावर असलेली लक्ष्मी यांनासुद्धा प्राप्त झाला नाही. (२०)
नायं सुखापो भगवान् देहिनां गोपिकासुतः ।
ज्ञानिनां चात्मभूतानां यथा भक्तिमतां इह ॥ २१ ॥
अनन्य भक्तिने लाभे गोपिकानंदनो हरी । कर्मकांडी तपस्व्यांना ज्ञान्यांना जे न लाभले ॥ २१ ॥
अयं भगवान् गोपिकासुतः - हा यशोदेचा पुत्र भगवान श्रीकृष्ण - यथा इह आत्मभूतानां - जसा ह्या लोकी ह्याच्या स्वरूपी लीन होणार्या - भक्तिमतां सुखापः (अस्ति) - भक्तिमान लोकांना अनायासाने प्राप्त होणारा आहे - तथा - तसा - देहिनांज्ञानिनां - देहाचा अभिमान बाळगणार्यांना व ज्ञानी लोकांनाही - च न - प्राप्त होत नाही. ॥२१॥
हे गोपिकानंदन अनन्य भक्तांना जितले सुलभ आहेत, तितके देहाभिमानी कर्मकांडी किंवा स्वरूपभूत झालेले ज्ञानी यांनासुद्धा नाहीत. (२१)
विवरण :- भक्त आणि परमेश्वर यांमधील नाते म्हणजे अवर्णनीय, ते एक अजब रसायन. भक्ताला परमेश्वर दर्शनाची आत्यंतिक ओढ असते. मग त्यासाठी निकष कोणता लावला जातो ? जप, तप, ज्ञान, वैराग्य ? पण आपले साधेभोळे संत तर म्हणतात, 'योगियां दुर्लभ तो म्या देखिला साजणी ! म्हणजेच जो अगदी मनापासून आत्यंतिक उत्कटतेने परम श्रद्धेने आणि निःसंग होऊन परमेश्वराला शरण जातो, त्यालाच परमेश्वर सहज सुलभतेने प्राप्त होतो. जे विष्णु भगवान तपस्वी, ज्ञानी, विरागी, अगदी ब्रह्मा, शंकर इतकेच काय प्रत्यक्ष लक्ष्मीलाहि दुर्लभ, ते साध्या-भोळ्या पण सच्च्या भक्तांना दर्शन देतात, केवढे त्यांचे भाग्य ! अगाध भक्तीचा महिमा ! आणि म्हणूनच नंद-यशोदेच्या अंगणी सानुले परब्रह्म सगुण रूपात अवतरले. त्यांच्या नकळत. (२०-२१)
कृष्णस्तु गृहकृत्येषु व्यग्रायां मातरि प्रभुः ।
अद्राक्षीत् अर्जुनौ पूर्वं गुह्यकौ धनदात्मजौ ॥ २२ ॥
बांधोनि घरकामाला माता जाताचि कृष्णने । यमलार्जुन वृक्षांना मुक्त्यर्थ मनि चिंतिले ॥ २२ ॥
प्रभुः कृष्णः तु - समर्थ असा श्रीकृष्ण तर - मातरि गृहकृत्येषु - माता यशोदा गृहकृत्यात - व्यग्रायाम् - गढून गेली असता - पूर्वं धनदात्मजौ - पूर्वी कुबेराचे पुत्र असलेले दोन यक्ष - गुह्यकौ अर्जुनौ - सांप्रत अर्जुननामक दोन वृक्ष - (भूतौ) अद्राक्षीत् - झालेले पाहता झाला.॥२२॥
यानंतर आई घरातील काम करण्यात व्यग्र झाली असता उखळाला बांधलेल्या कृष्णाने, जे अगोदर कुबेराचे पुत्र यक्ष होते, ते दोन अर्जुनवृक्ष पाहिले. (२२)
पुरा नारदशापेन वृक्षतां प्रापितौ मदात् ।
नलकूवरमणिग्रीवौ इति ख्यातौ श्रियान्वितौ ॥ २३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे नवमोऽध्यायः ॥ ९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
कुबेराचे मणिग्रीव नलकूबर पुत्र हे । रूपवान् गर्वि ही तैसे उद्धटा परि वागले । नारदे शापिता वृक्ष यमलार्जुन जाहले ॥ २३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
पुरा - पूर्वी - श्रिया अन्वितौ - संपत्तीने युक्त असलेले - नलकूबरमणिग्रीवौ - नलकूबर आणि मणिग्रीव - इति ख्यातौ - या नावांनी प्रसिद्ध असलेले ते दोघे - मदात् - गर्वामुळे - नारदशापेन - नारदाच्या शापाने - वृक्षतां प्रापितौ - वृक्षाच्या जन्मास घातले गेले होते. ॥२३॥
नलकूबर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावे होती. त्यांच्याजवळ विपुल ऐश्वर्य होते. त्यांना झालेला गर्व पाहूनच देवर्षी नारदांनी त्यांना शाप देऊन वृक्ष केले होते. (२३)
अध्याय नववा समाप्त |