श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
अष्टमोऽध्यायः

गर्ग आगमनं, जातककथनपूर्वकं यशोदारोहिणीसुतयोः
नामकरणसंस्कारः, मृद्‌भक्षणव्याजेन यशोदायै
विश्वरूपप्रकटीकरणंच -

नामकरण - संस्कार आणि बाललीला -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


( अनुष्टुप् )
श्रीशुक उवाच -
गर्गः पुरोहितो राजन् यदूनां सुमहातपाः ।
व्रजं जगाम नन्दस्य वसुदेव प्रचोदितः ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्री शुकदेव सांगतात -
गर्ग पुरोहित होते यदुवंशास श्रेष्ठ ते ।
प्रेरिता वसुदेवाने पातले गोकुळी पहा ॥ १ ॥

राजन् - हे राजा - यदूनां पुरोहितः - यादवांचा पुरोहित - सुमहातपाः गर्गः - अत्यंत मोठा तपस्वी गर्ग मुनी - वसुदेवप्रचोदितः - वसुदेवाच्या सूचनेवरून - नंदस्य व्रजं जगाम - नंदाच्या गोकुळात गेला ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता ! यदूंचे कुलपुरोहित महातपस्वी श्रीगर्गाचार्य वसुदेवांच्या सांगण्यावरून नंदांच्या गोकुळात आले. (१)

विवरण :- वसुदेवाने गर्गाचार्यांना नंदाकडे पाठविले, असे अध्यायाचे प्रारंभीच शुकाचार्य सांगतात. येथे का ? असा प्रश्न निश्चितच पडेल. जरी नंदाकडे कृष्ण सुखरूप होता, तरी भविष्यवाणी ऐकल्यापासून कंस निश्चितच बेचैन असणार आणि आपल्या शत्रूला शोधून काढल्याशिवाय रहाणार नाही, याची वसुदेवास खात्री होती. गर्गाचार्य हे यादवांचे कुलगुरू, त्यांच्या हातूनच कृष्णाचा नामकरण संस्कार होऊन त्यांचे आशीर्वाद कृष्णाला मिळावे ही अर्थातच वसुदेवाची, एका पित्याची इच्छा असणे साहजिकच. संकटाच्या सावलीत असणार्‍या पुत्राबद्दल वाटणारी काळजी व वात्सल्यभावच येथे दिसून येतो. (१)



तं दृष्ट्वा परमप्रीतः प्रत्युत्थाय कृताञ्जलिः ।
आनर्चाधोक्षजधिया प्रणिपातपुरःसरम् ॥ २ ॥
तयांना पाहता झाले प्रसन्न नंदतात ते ।
भगवान् मानिले विप्रा जोडोनी कर पूजिले ॥ २ ॥

तं दृष्ट्वा - त्याला पाहून - परमप्रीतः (नंदः) - अत्यंत आनंदित झालेला तो नंद - प्रत्युत्थाय कृताञ्जलिः - उठून जोडिले आहेत हात ज्याने असा - अधोक्षजधिया - हा विष्णुच होय अशा बुद्धीने - प्रणिपातपुरःसरं - नमस्कारपूर्वक - (तं) आनर्च - त्याला पूजिता झाला. ॥२॥
त्यांना पाहून नंदांना अतिशय आनंद झाला. ते हात जोडून उठून उभे राहिले. नंतर त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भगवत्स्वरूप मानून त्यांनी त्यांची पूजा केली. (२)


सूपविष्टं कृतातिथ्यं गिरा सूनृतया मुनिम् ।
नन्दयित्वाब्रवीद् ब्रह्मन् पूर्णस्य करवाम किम् ॥ ३ ॥
आतिथ्य सर्व ते केले गर्गांचे विधिपूर्वक ।
वदले तृप्त हो तुम्ही सेवा काय करू तुम्हा ? ॥ ३ ॥

सूपविष्टं - उत्तमप्रकारे बसलेल्या - कृतातिथ्यं - व ज्याचा अतिथिसत्कार केला आहे - मुनिं - अशा त्या मुनीला - सूनृतया गिरा - आपल्या मधुर वाणीने - नंदयित्वा - आनंदित करून - (नंदः) अब्रवीत् - नंद म्हणाला - ब्रह्मन् - हे ब्रह्मनिष्ठ मुने - पूर्णस्य (ते) - नित्य तृप्त अशा तुझे - किं करवाम - कोणते काम आम्ही करावे. ॥३॥
आदरातिथ्यानंतर जेव्हा गर्गाचार्य आरामात बसले, तेव्हा नंदांनी अत्यंत मधुर शब्दात त्यांचे अभिनंदन करून म्हटले - "भगवन ! आपण तर स्वतः पूर्णकाम आहात. तरीसुद्धा, मी आपली काय सेवा करू ? (३)

विवरण :- गर्गाचार्यांना प्रत्यक्ष परमएश्वरच मानून नंदाने त्यांना प्रणिपात केला. (अधोक्षजधिया) एक तर 'अतिथिदेवोभव' ही भारतीय परंपरा आणि गर्गाचार्य हे श्रेष्ठ मुनी, ज्ञानी गुरू त्यामुळे परमेश्वरच ही ही भावना. 'पूर्णस्य करवाम किम्' गर्गाचार्य हे ज्ञानी, कृतकृत्य, परिपूर्ण, पूर्णकाम (निरिच्छ) त्यामुळे नंदासारख्या सामान्य संसारी माणसाकडून त्यांच्या काय अपेक्षा असणार ? त्या पूर्ण करणारे आम्ही कोण ? (वृथा वृष्टिः समुद्रषु, वृथा तृप्तस्य भोजनम् ) तरीही गर्गाचार्यासारख्या मुनिवर्याची पायधूळ सामान्यांच्या घराला लागली, हेच आमचे महद्‌भाग्य, असा नंदाचा बोलण्याचा भाव. (२-३)



महद्विचलनं नॄणां गृहिणां दीनचेतसाम् ।
निःश्रेयसाय भगवन् कल्पते नान्यथा क्वचित् ॥ ४ ॥
गृहस्थांच्या घरी संत येता कल्याण होतसे ।
प्रपंची गुंतलो आम्ही आश्रमी नच पातलो ।
कल्याणार्थ तुम्ही येता सदैव आमुच्या घरी ॥ ४ ॥

भगवन् - हे भाग्यशाली मुने - महद्विचलनं - थोरांची हालचाल - दीनचेतसां - ज्यांची अंतःकरणे दुबळी आहेत - गृहिणां नृणां - अशा गृहस्थाश्रमी लोकांच्या - निःश्रेयसाय कल्पते - कल्याणाकरिता असते - अन्यथा क्वचित् न - विनाकारण कधीही नसते. ॥४॥
आपल्यासारख्या महात्म्यांचे आमच्यासारख्या सामान्य गृहस्थांच्या घरी येणे हे आमच्याच परम कल्याणासाठी होय. एरव्ही आपले येणे कठीणच. (४)

विवरण :- नंद पुढे म्हणतो, वास्तविक आम्हीच आपल्या दर्शनास येणे योग्य, पण आम्हाला या संसाराच्या रगाडयातून सुटका कोठे ? तेव्हा आपणासारख्या ज्ञानी माणसांच्या येण्याने आमचे कल्याणच होईल. (४)



ज्योतिषामयनं साक्षाद् यत्तज्ज्ञानं अतीन्द्रियम् ।
प्रणीतं भवता येन पुमान्वेद परावरम् ॥ ५ ॥
भविष्य भूतकाळाचे जाणिता सर्व ते प्रभू ! ।
भविष्यशास्त्र ते तुम्ही प्रत्यक्ष रचिले असे ॥ ५ ॥

यत् ज्योतिषां अयनं - जे आकाशस्थ तेजोगोलांच्या गतीचे शास्त्र - तत् अतींद्रियं ज्ञानं - ते इंद्रियांच्या पलीकडील ज्ञान - भवता साक्षात् प्रणीतं - तुम्हांकडून असे प्रत्यक्ष रचिले गेले - येन - ज्याच्या योगाने - पुमान् परावरं वेद - पुरुष मागे केलेली कर्मे व पुढे मिळणारी फले जाणतो. ॥५॥
प्रभो ! जी गोष्ट साधारणपणे इंद्रियांनी जाणण्याच्या पलीकडील आहे, तीसुद्धा माणसाला ज्योतिष शास्त्राच्याद्वारे प्रत्यक्ष जाणता येते. आपण त्याच ज्योतिषशास्त्राची रचना केली आहे. (५)


त्वं हि ब्रह्मविदां श्रेष्ठः संस्कारान् कर्तुमर्हसि ।
बालयोरनयोर्नॄणां जन्मना ब्राह्मणो गुरुः ॥ ६ ॥
ब्रह्मवेत्ते तुम्ही थोर दोन या बाळकांचिये ।
करावे नामसंस्कार द्विज ते गुरु अर्भका ॥ ६ ॥

ब्रह्मविदां श्रेष्ठः त्वं - ब्रह्मवेत्यांमध्ये श्रेष्ठ तू - अनयोः बालयोः - ह्या दोन्ही मुलांचे - संस्कारान् - नामकरणादि संस्कार - कर्तुं अर्हसि - करण्याला योग्य आहेस - हि ब्राह्मणः जन्मना - कारण ब्राह्मण हा जन्मतः - नृणां गुरुः - सर्व मनुष्यांचा गुरु होय. ॥६॥
आपण ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात; म्हणून माझ्या या दोन्ही मुलांचे नामकरणादी संस्कार आपणच करावेत. कारण ब्राह्मण जन्मानेच मनुष्यमात्राचा गुरू असतो. (६)

विवरण :- गर्गाचार्य ज्योतिषाचे ज्ञानी असल्याने आपल्या मुलांचे भविष्यकथन त्यांनी करावे, अशी नंदाची साहजिकच इच्छा असणार. परंतु ते त्याचे कुलगुरू नव्हते. पण म्हणून काय झाले ? ब्राह्मण हे जन्मतःच (सर्वांचेच) गुरू असतात. त्यामुळे नंदाचेहि ते गुरूच. त्यांनी भविष्यकथन करावे, अशी नंदाची इच्छा आणि युक्तिवादहि, पुराणात अनेक ठिकाणी भाषेचे सौष्ठव दिसून येते. सुभाषितवजा विधाने दिसतात. त्यापैकी हे एक. (६)



श्रीगर्ग उवाच -
यदूनां अहमाचार्यः ख्यातश्च भुवि सर्वतः ।
सुतं मया संस्कृतं ते मन्यते देवकीसुतम् ॥ ७ ॥
गर्गाचार्य म्हणाले -
नंदजी यदुवंशाचा विख्यातगुरु मी असे ।
संस्कार करिता पुत्रां तरी सर्वांस ते केळे ।
पुत्र हा देवकीचा नी ते आज योग्यही नसे ॥ ७ ॥

अहं यदूनां आचार्यः (इति) - मी यादवांचा उपाध्याय म्हणून - भुवि सर्वदा ख्यातः (अस्मि) - पृथ्वीवर सर्वत्र प्रसिद्ध आहे - (अतः) मया संस्कृतं - यास्तव माझ्याकडून संस्कार झालेल्या - ते सुतं - तुझ्या पुत्राला - (कंसः) देवकीसुतं मन्यते - कंस देवकीचा मुलगा मानील ॥७॥
गर्गाचार्य म्हणाले - मी सगळीकडे यदुवंशीयांचा पुरोहित म्हणून प्रसिद्ध आहे. मी जर तुझ्या पुत्राचे संस्कार केले, तर लोकांना वाटेल की, हा देवकीचा पुत्र आहे. (७)


कंसः पापमतिः सख्यं तव चानकदुन्दुभेः ।
देवक्या अष्टमो गर्भो न स्त्री भवितुमर्हति ॥ ८ ॥
इति सञ्चिन्तयन् श्रुत्वा देवक्या दारिकावचः ।
अपि हन्ता आगताशङ्‌कः तर्हि तन्नोऽनयो भवेत् ॥ ९ ॥
वसुदेव तुम्हा मित्र कंसाची बुद्धि पापि ती ।
कंसाने देवकीकन्ये कडोनी ऐकिले असे ।
वाढतो शत्रु तो बाळ अन्यत्र, कंस जाणितो ॥ ८ ॥
संस्कार करिता याचे कळता बाळ तो वधी ।
अन्याय पाप हे तैसे घडेल मजला पहा ॥ ९ ॥

कंसः पापमतिः (अस्ति) - कंस दुष्टबुद्धीचा आहे - तव (च) आनकदुंदुभेः - आणि तुझे तर वसुदेवाशी - सख्यं अस्ति - सख्य आहे - देवक्याः अष्टमः गर्भः - देवकीचा आठवा गर्भ - स्त्री भवितुम् न अर्हति - मुलगी असणे शक्य नाही ॥८॥
इति - असे - देवक्याः दारिकावचः श्रुत्वा - देवकीच्या मुलीचे भाषण ऐकून - संचिंतयन् (कंसः) - विचार करणारा कंस - आगताशंकः - संशय येऊन - अपि (कुमारं) हंता (चेत्) - जर कदाचित मुलाला मारील - तर्हि तत् नः अनयः भवेत् - तर तो आमचा दोष होईल ॥९॥
कंस दुष्ट बुद्धीचा आहे. वसुदेवाबरोबर तुझी घनिष्ठ मैत्री आहे. देवकीच्या कन्येकडून जेव्हापासून त्याने ऐकले आहे की, त्याला मारणारा दुसरीकडे कोठेतरी जन्मला आहे, तेव्हापासून तो असाच विचार करीत आहे की, देवकीच्या आठव्या गर्भापासून कन्येचा जन्म झाला नसला पाहिजे. जर मी तुझ्या पुत्राचा संस्कार केला, तर तो हा बालक वसुदेवाचा पुत्र समजून त्याला मारील. तो आपल्याकडून मोठाच अन्याय होईल. (८-९)


श्रीनन्द उवाच -
अलक्षितोऽस्मिन् रहसि मामकैरपि गोव्रजे ।
कुरु द्विजातिसंस्कारं स्वस्तिवाचनपूर्वकम् ॥ १० ॥
नंदबाबा म्हणाले -
गुरो ! एकांति गोशाली स्वस्तिवाचन ते करा ।
बाळाचे नाव ते ठेवा सोयरेहि न जाणती ॥ १० ॥

मामकैः अपि - माझ्या मंडीळीकडूनहि - अलक्षितः (त्वं) - न पाहिला गेलेला असा तू - अस्मिन् गोव्रजे - ह्या गाईच्या गोठ्यात - रहसि - गुप्तपणे - स्वस्तिवाचनपूर्वकं - पुण्याहवाचनपूर्वक - द्विजाति संस्कारं कुरु - द्विजांना युक्त असे संस्कार कर ॥१०॥
नंद म्हणाले, आपण गुपचूपपणे या एकांत गोशाळेमध्ये स्वस्तिवाचन करून या बालकाचा द्विजातीला योग्य असा नामसंस्कार करावा. इतरांची गोष्ट कशाला, माझ्या लोकांनाही ही गोष्ट समजणार नाही हे मी पाहीन. (१०)


श्रीशुक उवाच -
एवं संप्रार्थितो विप्रः स्वचिकीर्षितमेव तत् ।
चकार नामकरणं गूढो रहसि बालयोः ॥ ११ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
इच्छा होतीच गर्गाची नंदेही प्रार्थिले तसे ।
एकांती गुप्तरूपात नामसंस्कार जाहले ॥ ११ ॥

एवं संप्रार्थितः - ह्याप्रमाणे प्रार्थना केलेला - (सः) गूढः विप्रः - तो खोलबुद्धीचा गर्ग मुनी - स्वचिकीर्षितं एव - आपण करू इच्छिलेले असेच - तत् बालयोः नामकरणं - त्या दोघा मुलांचे नामकरण - रहिस चकार - एकांती करिता झाला ॥११॥
श्रीशुकदेव म्हणतात - संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे, असे गर्गाचार्यांना वाटत होतेच. नंदांनी जेव्हा त्यांना अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी एकांतात बसून गुप्तपणे दोन्ही बालकांचा नामकरण संस्कार केला. (११)


श्रीगर्ग उवाच -
अयं हि रोहिणीपुत्रो रमयन् सुहृदो गुणैः ।
आख्यास्यते राम इति बलाधिक्याद् बलं विदुः ।
यदूनामपृथग्भावात् सङ्‌कर्षणमुशन्त्युत ॥ १२ ॥
रोहिणीचा रोहिणेय राम हा रमवी मना ।
बलाधिक्ये बली नाम संकर्षण् भेद हा मिटी ॥ १२ ॥

अयं हि रोहिणीपुत्रः - हा तर रोहिणीचा मुलगा - गुणैः सुहृदः रमयन् - आपल्या गुणांनी मित्रांना रमविणारा - रामः इति आख्यास्यते - राम ह्या नावाने प्रसिद्ध होईल - बलाधिक्यात् (एनं) - बलाच्या विपुलपणावरून याला - बलं (अपि) (लोकाः) विदुः - बल असेहि लोक जाणतील - उत यदूनां - आणि यादवांच्या - अपृथग्भावात् संकर्षणं उशंति - एकीकरणावरून संकर्षण म्हणतील. ॥१२॥
गर्गाचार्य म्हणाले - हा रोहिणीचा मुलगा आपल्या मित्रांना आपल्या गुणांनी आनंदित करील, म्हणून याचे नाव ’राम’ असे राहील. याच्या शक्तीला काही सीमा नाही, म्हणून लोक याला ’बल’ असे म्हणतील. हा यादव आणि तुमच्यामध्ये काही भेदभाव ठेवणार नाही म्हणून याचे एक नाव ’संकर्षण’ असेही असेल. (१२)


आसन् वर्णास्त्रयो ह्यस्य गृह्णतोऽनुयुगं तनूः ।
शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतां गतः ॥ १३ ॥
दुसरा सावळा वर्णी म्हणोनि कृष्ण बोलणे ।
श्वेत पीत तसा रक्त युगात रंग पालटी ॥ १३ ॥

अनुयुगं तनूः गृह्णतः - प्रत्येक युगांत अवतार घेणार्‍या - अस्य (द्वितीयस्य पुत्रस्य) - ह्या दुसर्‍या मुलाचे - शुक्लः रक्तः तथा पीतः (इति) - पांढरा, तांबडा व पिवळा - त्रयः वर्णाः आसन् - असे तीन वर्ण होऊन गेले - (सः) इदानीं कृष्णतां गतः - तो सांप्रत कृष्णवर्णाला गेला आहे. ॥१३॥
आणि हा जो सावळ्या वर्णाचा आहे, हा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो. मागील युगांमध्ये त्याने अनुक्रमे पांढरा, तांबडा आणि पिवळा असे तीन वेगवेगळे रंग स्वीकारले होते. यावेळी त्याचा कृष्णवर्ण आहे, म्हणून याचे नाव ’कृष्ण’ असेल. (१३)


प्रागयं वसुदेवस्य क्वचित् जातस्तवात्मजः ।
वासुदेव इति श्रीमान् अभिज्ञाः संप्रचक्षते ॥ १४ ॥
पुत्र हा वसुदेवाचा रहस्य जाणिती असे ।
वासुदेव अशा नामे म्हणतील कुणी कुणी ॥ १४ ॥

अयं तव श्रीमान् आत्मजः प्राक् - हा सर्वगुणसंपन्न असा तुझा पुत्र - क्वचित् - पूर्वी कधी तरी - वसुदेवस्य जातः - वसुदेवाच्या पोटी जन्मला होता - अतः - म्हणून - अभिज्ञाः - तज्ञ पुरुष - (तं) वासुदेवः इति संप्रचक्षते - त्याला वासुदेव असे म्हणतील. ॥१४॥
नंद महोदय ! हा तुझा पुत्र पूर्वी कधी वसुदेवांचा पुत्र होता, म्हणून हे रहस्य जाणणारे लोक याला ’श्रीमान वासुदेव’ असेही म्हणतील. (१४)

विवरण :- गर्गाचार्यांना मानवी स्वभावाचे ज्ञान आणि मानवी भावना जपण्याचे भान जरूर होते. कृष्ण वसुदेवाचा मुलगा आहे, हे वास्तव त्यांना निश्चितच माहीत असणार परंतु ते नंदास माहीत नव्हते. म्हणून वसुदेवाचा पुत्र तो वासुदेव, असे कृष्णाचे नाव त्यांनी ठेवले. पण नंदास वाईट वाटू नये म्हणून पूर्वजन्मात तो वसुदेवाचा मुलगा होता म्हणून 'वासुदेव' असे ते म्हणतात. (१३-१४)



बहूनि सन्ति नामानि रूपाणि च सुतस्य ते ।
गुणकर्मानुरूपाणि तान्यहं वेद नो जनाः ॥ १५ ॥
जेवढे गुण ते याचे तेवढे नाम याजला ।
जाणतो सर्व ते मीच सर्वांना नच ते कळे ॥ १५ ॥

ते सुतस्य - तुझ्या पुत्राची - गुणकर्मानुरूपाणि - गुण व लीला यांना अनुरूप - बहूनि नामानि रूपाणि च सन्ति - अशी अनेक नावे व रूपे आहेत - तानि अहं नो वेद - ती मी जाणत नाही - जनाः (अपि न विदुः) - व लोकही जाणत नाहीत. ॥१५॥
तुझ्या पुत्राची पुष्कळ नावे आणि रूपेसुद्धा आहेत. जितके गुण आणि जितकी कर्मे, त्या सर्वांना अनुसरून वेगवेगळी नावे आहेत. ती मी जाणतो, सर्वसामान्य लोक जाणत नाहीत. (१५)


एष वः श्रेय आधास्यद् गोपगोकुल-नन्दनः ।
अनेन सर्वदुर्गाणि यूयं अञ्जस्तरिष्यथ ॥ १६ ॥
करील तुमचे भद्र मोदील गोप गायिसी ।
संकटी सहजी मात याच्या साह्येचि होतसे ॥ १६ ॥

एषः गोपगोकुलनंदनः - हा गोपांना व गोकुलाला आनंद देणारा - वः श्रेयः आधास्यत् - असा तुमचे कल्याण करील - यूयं अनेन सर्वदुर्गाणि - तुम्ही ह्याच्या योगाने सर्व संकटे - अंजः तरिष्यथ - अनायासे तरून जाल. ॥१६॥
हा तुम्हा लोकांचे परम कल्याण करील. सर्व गोप आणि गाईंना हा अतिशय आनंदित करील. याच्या साहाय्याने तुम्ही मोठमोठ्या संकटांतून अगदी सहज पार पडाल. (१६)


पुरानेन व्रजपते साधवो दस्युपीडिताः ।
अराजके रक्ष्यमाणा जिग्युर्दस्यून् समेधिताः ॥ १७ ॥
पूर्वयुगी व्रजराजा ! राजा न राहिला कुणी ।
माजले चोर नी डाकू धुमाकूळहि मांडिला ।
सज्जनी रक्षिले याने दुष्टांना मारिले यये ॥ १७ ॥

व्रजपते - हे गोकुळपालका नंदा - पुरा अराजके - पूर्वी राजा नसताना - दस्युपीडिताः साधवः - चोरांनी पीडिलेले सज्जन - अनेन रक्ष्यमाणाः - ह्याने रक्षण केलेले - समेधिताः (च) - आणि बलवृद्धि केलेले - दस्यून् जिग्युः - चोरांना जिंकिते झाले. ॥१७॥
हे व्रजराज ! पूर्वी एकदा पृथ्वीवर राजा नव्हता, तेव्हा डाकूंची पीडा दिलेल्या सज्जनांचे ह्यानेच रक्षण केले आणि याच्याकडूनच बळ प्राप्त करून त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळविला होता. (१७)


य एतस्मिन् महाभागाः प्रीतिं कुर्वन्ति मानवाः ।
नारयोऽभिभवन्त्येतान् विष्णुपक्षानिवासुराः ॥ १८ ॥
सावळ्या सुंदरो पुत्रा प्रेमिती भाग्यवंत ते ।
विष्णुशी निर्भयो देव तसे ते निर्भयो पहा ॥ १८ ॥

ये महाभागाः मानवाः - जे महाभाग्यशाली मनुष्य - एतस्मिन् प्रीतिं कुर्वंति - ह्याच्या ठिकाणी प्रेम करतील - एतान् - त्यांना - असुराः विष्णुपक्षान् इव - जसे दैत्य विष्णुपक्षीयांना त्याप्रमाणे - अरयः न अभिभवन्ति - शत्रू पराभूत करू शकणार नाहीत. ॥१८॥
जे भाग्यवान मनुष्य याच्यावर प्रेम करतात, त्यांचा शत्रू पराभव करू शकत नाहीत. जसे विष्णूंच्या छत्रछायेखाली राहणार्‍या देवांना असुर जिंकू शकत नाहीत. (१८)

विवरण :- गर्गाचार्य कृष्णाची अनेक नावे ठेवतात. तो सर्वांना आनंद देणारा, पीडितांचे दुःख दूर करणारा होईल, सज्जनांचे रक्षण करेल, असेही भविष्य वर्तवितात. (परित्राणाय साधूनां संभवामि युगे युगे ।) इथे 'वेन' व 'पृथू' या पिता-पुत्रांचा उल्लेख आला आहे. 'वेन' या सूर्यवंशीय राजाने आपल्या राज्यात पूजा व यज्ञ करण्यास बंदी केली, म्हणून ऋषींनी त्यास मंतरलेल्या दर्भाने ठार केले. त्याचा मुलगा 'पृथू' याने पृथ्वीला गाय कल्पून अनेक रत्ने व औषधी काढल्या. त्याने पृथ्वीला आपली मुलगी मानले. म्हणून पृथूवरून 'पृथ्वी' हे नाव पडले. (१७-१८)



तस्मात् नन्दात्मजोऽयं ते नारायणसमो गुणैः ।
श्रिया कीर्त्यानुभावेन गोपायस्व समाहितः ॥ १९ ॥
वैभवे गुण सौंदर्ये साक्षात् नारायणो जसा ।
राहोनी सावधानीने रक्षावे याजला तुम्ही ॥ १९ ॥

नंदः - हे नंदा - अयं ते आत्मजः - हा तुझा मुलगा - गुणैः श्रिया - गुणांनी, ऐश्वर्यांनी, - कीर्त्या अनुभावेन (च) - कीर्तीने व पराक्रमाने - नारायणसमः (अस्ति) - नारायणासारखा आहे - तस्मात् समाहितः - त्याकरिता सावध राहून - (एनं) गोपायस्व - तू याचे रक्षण कर. ॥१९॥
नंद महोदय ! गुण, संपत्ती, सौंदर्य, कीर्ति आणि प्रभाव यांमध्ये तुझा हा मुलगा भगवान नारायणांसारखाच आहे. तू अत्यंत सावधपणे याचे रक्षण कर. (१९)

विवरण :- कृष्ण परमात्मा हा भगवान विष्णूचा अवतार आहे, हे जरी गर्गाचार्यांनी ओळखले असले तरी नंद त्याला आपलाच मुलगा मानत होता. (गर्गाचार्य त्याचे वर्णन करताना नारायणाप्रमाणे गुणवान असे म्हणतात.) हा बालकृष्ण कोणाप्रमाणे गुणवान ? नारायणाप्रमाणे. म्हणजेच 'परंतु यासम हा.' याच्याशी दुसर्‍या कोणाचीच तुलना होऊ शकत नाही हा भाव. (१९)



श्रीशुक उवाच -
इत्यात्मानं समादिश्य गर्गे च स्वगृहं गते ।
नन्दः प्रमुदितो मेने आत्मानं पूर्णमाशिषाम् ॥ २० ॥
गर्ग ते नंदबाबांना बोधिता पातले घरी ।
आनंद जाहला नंदा धन्य ते मानिती स्वये ॥ २० ॥

इति च आत्मानं - आणि आपल्याला असे सांगून - समादिश्य स्वगृहे गते गर्गे - गर्ग मुनी आपल्या घरी गेला असता - प्रमुदितः नंदः - मोठा आनंदित झालेला नंद - आत्मानं आशिषां - स्वतःला त्या आशीर्वादाने - पूर्णं मेने - कृतकृत्य मानिता झाला. ॥२०॥
अशा प्रकारे नंदाला समजावून सांगून गर्गाचार्य आपल्या आश्रमाकडे परत गेले. त्यांचे म्हणणे ऐकून नंदाला अतिशय आनंद झाला. त्याला वाटले की, आपल्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण झाल्या. (२०)


कालेन व्रजताल्पेन गोकुले रामकेशवौ ।
जानुभ्यां सह पाणिभ्यां रिङ्‌गमाणौ विजह्रतुः ॥ २१ ॥
गुडघ्या वरती दोघे रांगती अंगणी तसे ।
राम-श्याम असे दोघे गोकुळी रांगु लागले ॥ २१ ॥

कल्पेन व्रजता कालेन - थोडा काळ गेला असता - सहपाणिभ्यां जानुभ्यां - हातांसह गुडघ्यांनी - रिंगमाणौ रामकेशवौ - रांगणारे बलराम व कृष्ण - गोकुले विजह्लतुः - गोकुळात खेळू लागले. ॥२१॥
परीक्षिता ! थोड्याच दिवसांत गोकुळात रामकृष्ण हात व गुडघे टेकून रांगू लागले. (२१)


( वसंततिलका )
तावङ्‌घ्रियुग्ममनुकृष्य सरीसृपन्तौ
     घोषप्रघोषरुचिरं व्रजकर्दमेषु ।
तन्नादहृष्टमनसावनुसृत्य लोकं
     मुग्धप्रभीतवदुपेयतुरन्ति मात्रोः ॥ २२ ॥
( वसंततिलका )
हे सान बंधु पद ठेवुनि चालताना
     दोघेहि हर्षति जधी ध्वनि सांखळ्यां हो ।
अज्ञात व्यक्ति धरुनी तयि पाठी जाती
     नी जाणता भिउनी ते पदरात येती ॥ २२ ॥

अङ्‌घ्रियुग्मं अनुकृष्य - दोन्ही पाय एकामागून एक ओढीत - व्रजकर्दमेषु - गोकुळातील चिखलामध्ये - घोषप्रघोषरुचिरं - कंबरेतील घागर्‍यांच्या ध्वनीमुळे मनोहर वाटणार्‍या - सरीसृपन्तौ - वेगाने रांगत जाणारे - तन्नादहृष्टमनसौ तौ - त्या घागर्‍यांच्या नादाने आनंदित झालेले दोघे - लोकं अनुसृत्य - लोकांच्या मागून जाऊन - मुग्धप्रभीतवत् - बावरल्यासारखे व भ्याल्यासारखे होऊन - मात्रोः अंति उपेयतुः - मातांजवळ येत असत. ॥२२॥
ते दोघे भाऊ रांगत रांगत गोकुळातील धुळीतून चालत असत. त्यावेळी त्यांच्या पायातील घुंगरू रुणझुण वाजत असत. त्या कर्णमधुर आवाजाने आनंदित होऊन नकळत एकाद्या अनोळखी माणसाच्या मागे जात. नंतर जेव्हा पाहात हा दुसराच कोणीतरी आहे, तेव्हा ते थांबत आणि भ्यालासारखे आपल्या मातांकडे परत येत. (२२)

विवरण :- 'व्रजकर्दम' असा उल्लेख (गोकुळातील चिखल) शिवाय त्यामध्ये गायीचे शेण-मूत्र (गोमय-गोमूत्र) मिसळलेले. या सर्वातून बलराम व कृष्ण आनंदाने रांगत जातात. भगवंताने पृथ्वीवर-जमिनीवर जन्म घेतला आणि ते सामान्याहून सामान्य बालक झाले. मातीचे तर त्यांना विलक्षण प्रेम. खेळण्याची साधनेहि सामान्यच. अंगाला माती फासून घेण्यात विलक्षण आनंद. या सर्वांमुळे तर ते सामान्यांचे सवंगडी बनले. ते दोघेहि आपल्याच कमरेस बांधलेल्या घुंगराच्या आवाजाने घाबरून जाऊन मातेला मिठी मारत. व्यास महर्षींना 'बालमानसशास्त्र' किती सुंदर प्रकारे अवगत होते ! निष्पाप बालकृष्णाच्या लीला ते हुबेहुब वाचकांपुढे उभ्या करतात. (हिंदी कवि सूरदास यांनीही असेच बालकृष्णाच्या लीलांचे हृद वर्णन केले आहे. (किलकत कान्ह घुटरुवनि आवत ।) (कविकुलगुरू कालिदासहि म्हणतो, शुभ्र कळ्याप्रमाणे असणारे छोटे छोटे दात, उगीचच हसणारे बाळाचे ते गोजिरवाणे मुख, त्याच्या अंगाला चिकटलेली माती आणि त्या मातीने अंग मलिन झालेले ते आईबाप धन्य !) (२२)



तन्मातरौ निजसुतौ घृणया स्नुवन्त्यौ
     पङ्‌काङ्‌गरागरुचिरौ उपगृह्य दोर्भ्याम् ।
दत्त्वा स्तनं प्रपिबतोः स्म मुखं निरीक्ष्य
     मुग्धस्मिताल्पदशनं ययतुः प्रमोदम् ॥ २३ ॥
ते खेळती चिखलि नी भरवीत अंग
     तेणे अधीक दिसती मग बाळ छान ।
येताचि खेळुनि तदा स्तन देत माता
     पाहिनि दात इवले मनि हर्ष होई ॥ २३ ॥

घृणया स्नुवंत्यौ - प्रेमाने पान्हा फुटलेल्या - तन्मातरौ - त्यांच्या माता - पंकाङ्गरागरुचिरौ - चिखलरूपी उटीने सुंदर दिसणार्‍या - निजसुतौ - आपल्या मुलांना - दोर्भ्यां उपगुह्य - बाहूंनी आलिंगन देऊन - स्तनं दत्वा - त्यांच्या मुखात स्तन देऊन - प्रपिबतोः (तयो) - ते दोघे पीत असता - मुग्धस्मिताल्पदशनं - ज्यात मनोहर हास्य व कोवळे दात आहेत - मुखं निरीक्ष्य - असे त्यांचे मुख पाहून - प्रमोदं ययतुः स्म - अत्यंत आनंदित होत असत. ॥२३॥
त्यांना पाहून मातांचा स्नेह दाटून येत असे. त्यांच्या स्तनांतून दुधाच्या धारा वाहू लागत. त्यावेळी माता त्यांना दोन्ही हातांनी हृदयाशी कवटाळीत आणि स्तनपान देत. जेव्हा ते दूध पिऊ लागत आणि अधून मधून आपल्या मातांकडे पाहात, तेव्हा त्यांचे ते मंद मंद हास्य, कुंदकळ्यांसारखे दात आणि भाबडा चेहरा पाहून त्या आनंद समुद्रात डुंबू लागत. (२३)


यर्ह्यङ्‌गनादर्शनीय-कुमारलीलौ ।
     अन्तर्व्रजे तदबलाः प्रगृहीतपुच्छैः ।
वत्सैरितस्तत उभावनुकृष्यमाणौ
     प्रेक्षन्त्य उज्झितगृहा जहृषुर्हसन्त्यः ॥ २४ ॥
गोपि न ज्या बघितल्या असल्याहि लीला
     ते वत्स पुच्छ धरुनी रखडोनि जाती ।
सोडोनि काम बघती मग गोपि सार्‍या
     हांसोनि पोट धरिती मनि हर्ष होय ॥ २४ ॥

यर्हि (तौ) - जेव्हा ते दोघे - अंगनादर्शनीय - स्त्रियांनी पाहण्यास योग्य - कुमारलीलौ (जातौ) - अशी बालक्रीडा करणारे झाले - प्रगृहीतपुच्छैः वत्सैः - वासरांच्या शेपट्या धरून ठेवल्यामुळे - इतस्ततः अनुकृष्यमाणौ - इकडे तिकडे ओढिल्या जाणार्‍या - उभौ प्रेक्षंत्यः - त्या दोघांना पाहणार्‍या - अंतव्रज तदबलाः - गोकुळातील त्या गोपस्त्रिया - उज्झितगृहाः - ज्यांनी घरांतील काम टाकिले आहे अशा - हसंत्यः जहृषुः - हसत व आनंदित होत. ॥२४॥
जेव्हा ते दोघे आणखी थोडे मोठे झाले, तेव्हा गोकुळात अशा काही बाललीला करू लागले की, त्या गोपी पाहातच राहात. कधी कधी ते वासरांचे शेपूट धरून ठेवीत आणि वासरे भिऊन इकडे तिकडे पळू लागली की, ते दोघेही त्यांच्याकडून ओढले जात. गोपी आपल्या घरातील कामधंदा सोडून जेव्हा हे सगळे पाहत असत, तेव्हा हसून हसून त्यांची मुरकुंडी वळत असे आणि त्या आनंदात मग्न होत असत. (२४)


शृङ्‌ग्यग्निदंष्ट्र्यसिजल द्विजकण्टकेभ्यः
     क्रीडापरावतिचलौ स्वसुतौ निषेद्धुम् ।
गृह्याणि कर्तुमपि यत्र न तज्जनन्यौ
     शेकात आपतुरलं मनसोऽनवस्थाम् ॥ २५ ॥
दोघेहि चंचळ बहू अन खेळ खेळो
     बांधोनि नेत्र करि घेउनि शस्त्र ऐसे ।
कुत्रे नि मोर बघण्या पळतात मागे
     खड्ड्यात जै उतरती तयि माय त्रस्त ॥ २५ ॥

तज्जनन्यौ - त्यांच्या माता - यत्र - जेव्हा - अतिचलौ क्रीडापरौ स्वसुतौ - अतिचपळ व खेळकर अशा आपल्या मुलांना - शृंग्यग्निदंष्ट्र्‍यसिजलद्विजकंटकेभ्यः निषेद्धुं - शिंगांची जनावरे, दाढांची जनावरे, अग्नी, तरवारीसारखी शस्त्रे, पाणी, पक्षी व काटे यापासून राखण्यासाठी - गृह्याणि कर्तुं अपि न शेकाते - गृहकृत्येही करू शकत नसत - अलं मनसः अनवस्थां - पूर्णरीतीने मनाची धांदल झाली आहे - आपतुः - अशा स्थितीस प्राप्त झाल्या. ॥२५॥
कन्हैय्या आणि बलराम दोघेही अतिशय चंचल आणि फारच खोडकर होते. ते कधी हरीण, गायींसारख्या शिंगे असणार्‍या जनावरांकडे पळत जात तर कधी धगधगणार्‍या आगीजवळ जात. कधी दाताने चावणार्‍या प्राण्यांजवळ जात तर कधी तलवारी उचलून घेत. कधी पाण्याकडे जात, कधी पक्ष्यांजवळ जात, तर कधी काट्या-कुट्यांत जात. त्यांच्या माता त्यांना त्यापासून अडवू पाहात, पण त्यांचे काही चालत नसे. अशा स्थितीत त्या घरातील कामसुद्धा धड करू शकत नव्हत्या. अशा द्विधा मनःस्थितीत त्या फारच वेचैन राहात. (२५)


( अनुष्टुप् )
कालेनाल्पेन राजर्षे रामः कृष्णश्च गोकुले ।
अघृष्टजानुभिः पद्‌भिः विचक्रमतुरञ्जसा ॥ २६ ॥
( अनुष्टुप् )
राम-कृष्ण असे दोघे सोडोनी रांगणे पुन्हा ।
चालले गोकुळी सार्‍या घरा दारात सर्वही ॥ २६ ॥

राजर्षे - हे परीक्षित राजा - अल्पेन कालेन - थोडयाच दिवसांनी - गोकुले रामःकृष्णः च - गोकुळात राम व कृष्ण - अघृष्टजानुभिः - ज्यांचे गुडघे घासले जात नाहीत - पद्‌भिः अंजसा विचक्रमतुः - अशा पायांनी सहज चालू लागले. ॥२६॥
हे राजर्षे ! थोड्याच दिवसात रांगणे संपवून राम-कृष्ण सहजपणे गोकुळात हिंडू-फिरू लागले. (२६)

विवरण :- निष्पाप बालकांच्या लीला पाहणे म्हणजे गृहसौख्याची परमावधी. इथे तर भगवान कृष्णांच्या बाललीला ! त्या पाहताना नंद-यशोदा, रोहिणी, सर्व गोपगोपी यांचे भान हरपले नाही तरच नवल ! मात्र त्यावेळी भान हरपून गेल्याने इकडे दैनंदिन गृहकृत्ये तशीच पडून रहात. त्यांची फिकीर कोणाला ? या स्वर्गीय आनंदापुढे बाकी सर्व गोष्टी तुच्छ होत्या. (आजहि ऑफिसमधून परत आलेल्या आईवडिलांना अगदी पाळणाघरातले आपले मूल पाहिले की दिवसभरच्या श्रमांचा विसर पडतो. ही वात्सल्यभावना कमी-अधिक प्रमाणात सार्वकालिक आहे.) (२५-२६)



ततस्तु भगवान् कृष्णो वयस्यैर्व्रजबालकैः ।
सहरामो व्रजस्त्रीणां चिक्रीडे जनयन् मुदम् ॥ २७ ॥
असे श्री भगवान् कृष्ण बाळ गोपाळ घेउनी ।
बळीच्या सह ते जाती ब्रजी खेळ करावया ।
खेळता करिती तृप्त गोपिंना मनि बाळ हे ॥ २७ ॥

ततः तु सहरामः भगवान कृष्णः - मग तर बळरामासह भगवान कृष्ण - वयस्यैः व्रजबालकैः - सवंगडी अशा गोकुळांतील मुलांसह - व्रजस्त्रीणां मुदं जनयन् - गोकुळातील स्त्रियांना आनंद उत्पन्न करीत - चिक्रीडे - खेळत असे. ॥२७॥
आता भगवान कृष्ण आणि बलराम आपल्याच वयाच्या गवळ्यांच्या मुलांना बरोबर घेऊन खेळण्यासाठी बाहेर पडत आणि व्रजातील गोपींना आनंदित करीत निरनिराळे खेळ खेळत. (२७)


कृष्णस्य गोप्यो रुचिरं वीक्ष्य कौमारचापलम् ।
श्रृण्वन्त्याः किल तन्मातुः इति होचुः समागताः ॥ २८ ॥
अतीव चंचलो बाळ गोपिंना आवडे बहू ।
जमल्या एकदा सार्‍या मातेला सांगु लागल्या ॥ २८ ॥

कृष्णस्य रुचिरं - कृष्णाचा सुंदर असा - कौ‌मारचापलं वीक्ष्य - लहानपणाचा चपलपणा पाहून - गोप्यः - गोपी - समागताः - एकत्र जमून - तन्मातुः शृण्वत्याः - त्याची माता यशोदा ऐकत असता - इति ह किल ऊचुः - खरोखर याप्रमाणे बोलत असत. ॥२८॥
त्यांच्या लहानपणाच्या मनोहर खोड्या पाहून त्या यशोदेच्या घरी येऊन तिला सांगू लागत. (२८)


( मंदाक्रांता )
वत्सान् मुञ्चन् क्वचिदसमये क्रोशसञ्जातहासः
     स्तेयं स्वाद्वत्त्यथ दधिपयः कल्पितैः स्तेययोगैः ।
मर्कान् भोक्ष्यन् विभजति स चेन्नात्ति भाण्डं भिन्नत्ति
     द्रव्यालाभे सगृहकुपितो यात्युपक्रोश्य तोकान् ॥ २९ ॥
( मंदाक्रांता )
वत्से सोडी नटखट हरी क्रोधता हासतो हा ।
चोरीमध्ये अतीव चतुरो गोरसा भक्षितो नी ॥
माठां फोडी अन नवनीतो वाटितो माकडांना ।
बाळांना हा रडवि पळतो ना मिळे जेथ कांही ॥ २९ ॥

क्वचित् असमये - कधी भलत्याच वेळी - वत्सान् मुंचन् - वासरे सोडणारा - क्रोशसंजातहासः सः - रागे भरले असता हसणारा असा तो - स्तेयं स्वादु दधि पयः अत्ति - चोरून मिळविलेले दही व दूध खातो - अथ कल्पितैः स्तेययोगैः - नंतर अनेक प्रकारच्या चोरीच्या युक्त्यांनी - भोक्षन् - खाऊ पाहणारा - मर्कान् विभजति - माकडांना वाटतो - सः न अत्ति चेत् - माकड जर खात नाहीसे झाले तर - भांडं भिनत्ति - भांडे फोडून टाकतो - द्रव्यालाभे - काही पदार्थ सापडले नाहीत तर - सः - तो - गृहकुपितः - घरावर रागावून - तोकान् उपक्रोश्य याति - लहान मुलांना रडवून जातो. ॥२९॥
अग यशोदे ! हा तुझा कान्हा अतिशय खोडकर झाला आहे. गाईची धार काढण्याची वेळ झालेली नसतानासुद्धा हा वासरांना सोडतो आणि आम्ही रागावलो की, खो खो करून हसू लागतो. हा चोरीच्या निरनिराळ्या युक्त्या योजून आमचे गोड गोड दही-दूध चोरून खातो. त्याने स्वतः खाल्ले तर गोष्ट वेगळी; परंतु तो वानरांना घालतो आणि जेव्हा पोट भरल्यामुळे ते खाऊ शकत नाहीत तेव्हा आमचे माठ फोडून टाकतो. त्याला घरात जर एकादी वस्तू मिळाली नाही, तर तो घरातल्या लोकांवर रागावतो आणि आमच्या मुलांना रडवून पळून जातो. (२९)


( इंद्रवंशा )
हस्ताग्राह्ये रचयति विधिं पीठकोलूखलाद्यैः
     छिद्रं ह्यन्तर्निहितवयुनः शिक्यभाण्डेषु तद्वित् ।
ध्वान्तागारे धृतमणिगणं स्वाङ्‌गमर्थप्रदीपं
     काले गोप्यो यर्हि गृहकृत्येषु सुव्यग्रचित्ताः ॥ ३० ॥
शिंक्यासाठी रचि उतरंडी नि हि योजी उपाय ।
कधी ठेवी उखळ वरती स्कंधि मित्रहि तैसा ॥
कोण्या भांडी कळत सगळे फोडितो रिक्त ऐसे ।
गळा रत्‍ने बघत सगळे त्याच तेजात रात्री ॥
अंधारीही लपुनी ऐशा ठेविले फोडी माठ ।
अंगी त्याच्या अतिव असल तेज नी चातुरीही ॥
कोणी कोठे वसत घरि ते शोधितो काम घेता ।
नी त्या वेळी करि करितसे चोरि त्या गोरसाची ॥ ३० ॥

यर्हि काले गोप्यः गृहकृत्येषु - ज्यावेळी गोपी घरकामात - सुव्यग्रचित्ताः आसन् - अत्यंत गढून गेलेल्या असतात - अंतर्निहितवयुनः - घरात ठेविलेल्या वस्तूंचे ज्ञान आहे ज्याला असा - तद्वित् (कृष्णः) - चोरीच्या युक्त्या जाणणारा कृष्ण - हस्ताग्राह्ये (द्रव्ये) - हातांनी घेण्यासारखे पदार्थ नसल्यास - पीठकोलूखलाद्यैः - पाट, उखळी इत्यादिकांनी - विधिं रचयति - मांडणी करितो - शिक्यभांडेषु छिद्रं (करोति) - शिंक्यावरील भांडयांना भोक पाडतो - ध्वांतागारे - काळोख असलेल्या घरात - धृतमणिगणं - ज्यावर रत्‍नसमुदाय धारण केले आहेत - स्वांगं - अशा आपल्या शरीरालाच - अर्थप्रदीप्तं (रचयति) - पदार्थ दाखविणारा दिवा करितो. ॥३०॥
जेव्हा आम्ही दूध-दही शिंक्यावर ठेवतो आणि याचे हात तिथपर्यंत पोहोचत नाहीत, तेव्हा हा वेगवेगळ्या युक्त्या योजतो. कुठे दोन-चार चौरंग एकावर एक ठेवतो. कुठे उखळावर चढतो, तर कधी उखळावर चौरंग ठेवतो. एवढे करूनही जेव्हा काम भागत नाही, तेव्हा हा त्या भांड्यांना छिद्र पाडतो. कोणत्या शिंक्यावर कोणत्या भांड्यांत काय ठेवले आहे, याची त्याला पूर्ण माहिती असते. जेव्हा आम्ही या वस्तू अंधारात लपवून ठेवतो, तेव्हा तू याला जे पुष्कळे रत्‍नांचे अलंकार घातले आहेस, त्यांच्या प्रकाशातच हा सर्व काही पाहतो. जेव्हा गोपी घरकामामध्ये व्यग्र असतात, तेव्हा हा हे सारे करतो. (३०)


( मिश्र )
एवं धार्ष्ट्यान्युशति कुरुते मेहनादीनि वास्तौ
     स्तेयोपायैर्विरचितकृतिः सुप्रतीको यथास्ते ।
इत्थं स्त्रीभिः सभयनयन श्रीमुखालोकिनीभिः
     व्याख्यातार्था प्रहसितमुखी न ह्युपालब्धुमैच्छत् ॥ ३१ ॥
धारिष्ट्याने वदत मग तो चोर आम्हीच जैसे ।
संमार्जीले जरि घर तसे मूततो हा तिथे की ॥
ोरीच्या तो कितिक करि हा युक्ति राही निवांत ।
पाषाणाचा जणुचि पुतळा साधुबोवा असा हा ॥
ऐशा गोपी वदत असता भीतिने कृष्ण पाही ।
बघे माता कवतुक करी क्रोधणे दूर राही ॥ ३१ ॥

उशति वास्तौ - स्वच्छ केलेल्या घरात - मेहनादीनि - मूत्रपुरुषोत्सर्गादि - धाष्टर्यानि कुरुते - दांडगेपणाची कृत्ये करितो - एवं स्तेयोपायैः - याप्रमाणे चोरीच्या उपायांनी - विरचितकृतिः - केली आहेत कामे ज्याने असा - त्वत्समीपे - तुझ्याजवळ मात्र - यथा सुप्रतीकः आस्ते - साधुसारखा असतो - इत्थं सभयनयन - याप्रमाणे श्रीकृष्णाचे बावरलेल्या नेत्रामुळे - श्रीमुखालोकिनीभिः - शोभायुक्त झालेले मुख पाहणार्‍या - स्त्रीभिः - जिला इतर स्त्रियांनी - व्याख्यातार्था - गार्‍हाणी सांगितली आहेत - प्रहसितमुखी (अभवत्) - अशी ती यशोदा हसत असे - (कृष्णं तु) उपालब्धुं - परंतु कृष्णाला रागे भरण्याची - न ऐच्छत् - इच्छा करीत नसे. ॥३१॥
एवढे करूनही आपण त्या गावचेच नसल्याचे भासवतो. काही वेळा घरामध्ये लघवी वगैरेही करतो. निरनिराळ्या उपायांनी चोर्‍या करूनही पुतळ्यासारखा कसा स्तब्ध उभा आहे पाहा !" श्रीकृष्णाच्या भ्यालेल्या सुंदर मुखकमलाकडे पाहात गोपी याप्रमाणे यशोदेकडे तक्रारी सांगत असत. यशोदा मात्र त्याच्याकडे पाहून केवळ हसत असे. त्याला रागवण्याचे गोष्ट तिच्या मनातसुद्धा येत नसे. (३१)


( अनुष्टुप् )
एकदा क्रीडमानास्ते रामाद्या गोपदारकाः ।
कृष्णो मृदं भक्षितवान् इति मात्रे न्यवेदयन् ॥ ३२ ॥
( अनुष्टुप् )
एकदा क्रीडला कृष्ण राम गोपादिकां सवे ।
वदता पातली बाळे कृष्णाने माति भक्षिली ॥ ३२ ॥

एकदा क्रीडमानाः - एके दिवशी खेळत असलेले - ते रामाद्याः गोपदारकाः - ते बळरामादि गोपांचे मुलगे - कृष्णः मृदं भक्षितवान् - कृष्णाने माती खाल्ली - इति मात्रे न्यवेदयन् - असे त्याच्या आईला सांगते झाले. ॥३२॥
एके दिवशी बलराम वगैरे गवळ्यांची मुले श्रीकृष्णांबरोबर खेळत होती. त्यांनी यशोदेला सांगितले, "आई ! कन्हैयाने माती खाल्ली आहे." (३२)


सा गृहीत्वा करे कृष्णं उपालभ्य हितैषिणी ।
यशोदा भयसंभ्रान्त प्रेक्षणाक्षमभाषत ॥ ३३ ॥
हितैषी यशोदा हात कृष्णाचे ते धरी तदा ।
मारल्या परि हा भीयी माता दाटोनि बोलली ॥ ३३ ॥

हितैषिणी सा यशोदा - कल्याणाची इच्छा करणारी ती यशोदा - कृष्णं करे गृहीत्वा - कृष्णाचा हात धरून - उपालभ्य - रागे भरून - भयसंभ्रांतप्रेक्षणाक्षं - भीतीने ज्याची दृष्टि कावरीबावरी झाली आहे - अभाषत - अशा त्याला म्हणाली. ॥३३॥
मुलाचे हित इच्छिणार्‍या यशोदेने श्रीकृष्णाचा हात पकडला. त्यावेळी श्रीकृष्णाचे डोळे भितीने गंगरले होते. यशोदेने रागावून विचारले, (३३)


कस्मान् मृदमदान्तात्मन् भवान् भक्षितवान् रहः ।
वदन्ति तावका ह्येते कुमारास्तेऽग्रजोऽप्ययम् ॥ ३४ ॥
खट्याळधीट तू झाला माती चोरोनि खासि का ?
खेळिये बोलती सर्व बळीही साक्ष देतसे ॥ ३४ ॥

अदान्तात्मन् - हे चपलगात्राच्या श्रीकृष्णा - भवान् रहः कस्मात् मृदं भक्षितवान् - तू एकीकडे माती का खाल्लीस - एते तावकाः कुमाराः वदंति - हे तुझे बरोबरीचे मुलगे सांगतात - अयं हि ते अग्रजः अपि (वदति) - शिवाय हा तुझा वडील भाऊहि सांगतो. ॥३४॥
काय रे खोडसाळा ! तू कोणाला नकळत माती का खाल्लीस ? पहा तुझ्या बरोबरीची मुले काय म्हणतात ते ! तुझा बलरामदादा सुद्धा तेच सांगतो. (३४)


नाहं भक्षितवान् अंब सर्वे मिथ्याभिशंसिनः ।
यदि सत्यगिरस्तर्हि समक्षं पश्य मे मुखम् ॥ ३५ ॥
भगवान् कृष्ण म्हणाले -
बोलती सर्व हे खोटे माती मी नच भक्षिली ।
तयंचे वाटते सत्य तरी हे मुख पाहणे ॥ ३५ ॥

अंब अहं (मृदं) न भक्षितवान् - हे माते, मी माती खाल्ली नाही - सर्वे मिथ्याभिशंसिनः (सन्ति) - सर्वजण खोटे बोलणारे आहेत - यदि (ते) सत्यगिरः (सन्ति) - जर ते खरे सांगणारे असतील - तर्हि समक्षं मे मुखं पश्य - तर प्रत्यक्ष माझे तोंड पहा. ॥३५॥
श्रीकृष्ण म्हणाले - " आई ! मी माती खाल्ली नाही. हे सर्वजण खोटे बोलत आहेत. तुला जर यांचेच म्हणणे खरे वाटत असेल, तर तू आपल्या डोळ्यांनीच माझ्या तोंडात पाहा!" (३५)


यद्येवं तर्हि व्यादेही इत्युक्तः स भगवान् हरिः ।
व्यादत्ताव्याहतैश्वर्यः क्रीडामनुजबालकः ॥ ३६ ॥
ठीक रे ! वदली माता उघडी मुख हे तुझे ।
अनंतैश्वर्य श्रीकृष्ण लीलार्थ बाळ जाहला ॥ ३६ ॥

यदि एवं तर्हि व्यादेहि - जर असे आहे तर आ कर - इति उक्तः सः - याप्रमाणे यशोदेने सांगितलेला तो - अव्याहतैश्वर्यः - अकुंठित ऐश्वर्यवान - क्रीडामनुजबालकः - व लीलेसाठी लहान मनुष्यरूप धारण केलेला - भवान् हरिः व्यादत्त - भगवान श्रीकृष्ण आ करिता झाला. ॥३६॥
यशोदा म्हणाली, "ठीक आहे. असे जर आहे, तर तोंड उघड पाहू !" मातेने असे म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी आपले तोंड उघडले. अनंत ऐश्वर्यसंपन्न असे ते केवळ लीला करण्यासाठीच मनुष्यबालक बनले होते. (३६)


सा तत्र ददृशे विश्वं जगत् स्थास्नु च खं दिशः ।
साद्रि-द्वीपाब्धि-भूगोलं सवाय्वग्नीन्दुतारकम् ॥ ३७ ॥
तोंडात पाहता माता दिशा द्वीप गिरी धरा ।
वायू विद्यूत अग्नी नी चंद्रमा तारकां सह ॥ ३७ ॥

सा तत्र - ती यशोदा त्या मुखात - जगत् स्थास्नु विश्वं - जंगम व स्थावर असे विश्व - खं दिशः - आकाश, दाहीदिशा, - साद्रिद्वीपाब्धिभूगोलं - पर्वत, द्वीपे, समुद्र यांसह भूगोल - सवाय्वग्नींदुतारकं - वायु, अग्नि व चंद्र आणि नक्षत्रे यांसह - ॥३७॥
त्यांच्या मुखामध्ये चराचर विश्व, आकाश, दिशा, डोंगर, द्वीप आणि समुद्रांसहित सर्व पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्र आणि तार्‍यांसह संपूर्ण ज्योतिमंडल, (३७)


ज्योतिश्चक्रं जलं तेजो नभस्वान् वियदेव च ।
वैकारिकाणीन्द्रियाणि मनो मात्रा गुणास्त्रयः ॥ ३८ ॥
आकाश मंडलो ज्योती जल तेज नि देवता ।
गुण नी पंच तन्मात्र दिसले मुखि तेधवा ॥ ३८ ॥

ज्योतिश्चक्रं जलं तेजः - ज्योतिर्मंडल, जल, तेज - नभस्वान् वियत् - वायु, आकाश, - वैकारिकाणि इंद्रियाणि - विकार उत्पन्न करणारी इंद्रिये, - मनः मात्राः - मन, सूक्ष्मभूते, - त्रयः गुणाःददृशे - आणि तीन गुण पाहती झाली. ॥३८॥
पाणी, तेज, पवन, आकाश, वैकारिक अहंकाराचे कार्य असणारी इंद्रिये, पंचतन्मात्रा, तीन गुण, (३८)


( मिश्र - ११ अक्षरी)
एतद्विचित्रं सहजीवकाल
     स्वभावकर्माशयलिङ्‌गभेदम् ।
सूनोस्तनौ वीक्ष्य विदारितास्ये
     व्रजं सहात्मानमवाप शङ्‌काम् ॥ ३९ ॥
( इंद्रवज्रा )
तसे विचित्रे सह जीव काल
     स्वभाव कर्मो मन लिंग भेद ।
ही सृष्टी नी ते व्रज ही तयात
     व्रजात माता अन कृष्ण पाही ॥ ३९ ॥

तत् जीवकालस्वभाव - हे जीव, काल, स्वभाव, - कर्माशयलिंगभेदं - कर्म व अंतःकरण अशाप्रकारच्या स्थावरजंगम शरीरांच्या - विचित्रं - निरनिराळ्या भेदांनी भरलेले विचित्र जग - सहात्मानं व्रजं (च) - आणि स्वतःसुद्धा गोकुळ - सूनोः विदारितास्ये - ज्याचे मुख उघडले आहे अशा मुलाच्या - तनौ वीक्ष्य - अशा शरीरात एकत्र पाहून - शंकां अवाप - भीतीप्रत प्राप्त झाली. ॥३९॥
जीव, काल, स्वभाव, कर्म, वासना, शरीर इत्यादि विभिन्न रूपात दिसणारे हे विश्व आणि स्वतःसह सारे गोकुळ श्रीकृष्णांच्या उघडलेल्या लहानशा मुखात पाहून यशोदा साशंक झाली. (३९)


किं स्वप्न एतदुत देवमाया
     किं वा मदीयो बत बुद्धिमोहः ।
अथो अमुष्यैव ममार्भकस्य
     यः कश्चनौत्पत्तिक आत्मयोगः ॥ ४० ॥
हे स्वप्न का त्या हरिचीच माया
     कां बुद्धिसी तो भ्रम होय माझ्या ।
कां जन्मता बाळचि योगि आहे
     मनीं यशोदा त‌इ चिंति ऐसे ॥ ४० ॥

किं एतत् - हे आहे तरी काय ? - स्वप्नः उत देवमाया - हे स्वप्न आहे की देवाची माया आहे - किंवा मदीयः बुद्धिमाहः बत - किंवा माझ्या बुद्धीला खरोखर मोह पडला आहे ? - अथो - अथवा - अमुष्य मम अर्भकस्य एव - ह्या माझ्या मुलाचेच - यः कश्चन - काहीतरी विलक्षण असे - औत्पत्तिकः आत्मयोगः - स्वतःचे जन्मसिद्ध ऐश्वर्य आहे ? ॥४०॥
ती विचार करू लागली, ’हे स्वप्न आहे की भगवंतांची माया ? माझ्या बुद्धीत तर काही भ्रम निर्माण झाला नाही ना ? का माझ्या या मुलातच जन्मतः काही योगसिद्धी आहे ? (४०)


( मिश्र - १२ अक्षरी)
अथो यथावन्न वितर्कगोचरं
     चेतोमनःकर्मवचोभिरञ्जसा ।
यदाश्रयं येन यतः प्रतीयते
     सुदुर्विभाव्यं प्रणतास्मि तत्पदम् ॥ ४१ ॥
मना नि चित्ता अन वाणि कर्मा
     अंदाज ना ये विषयास ज्याचा ।
हे विश्व ज्याच्या वरि आश्रयो नी
     अचिंत्यरूपी प्रभुला नमी मी ॥ ४१ ॥

अथो - आता - चेतोमनःकर्मवचोभिः - ज्ञानशक्ति, विचारशक्ति, कृती व वाणी ह्यांनी - अंजसा यथावत् - सहजरीत्या ज्याविषयी - न वितर्कगोचरं - यथार्थ तर्काने ज्ञान होणे शक्य नाही अशा - (इदं जगत्) यदाश्रयं - हे जग ज्याच्या आधाराने आहे - येन यतः प्रतीयते - व ज्यामुळे भासमान होते - तत् सुदुर्विभाव्यं - त्या ध्यान करण्यास अत्यंत कठीण अशा - पदं प्रणता अस्मि - पदाला मी नमस्कार करिते. ॥४१॥
जे चित्त, मन, कर्म आणि वाणीच्याद्वारा पूर्णपणे व सुलभतेने अनुमानाचा विषय असू शकत नाही, ते हे सर्व विश्व ज्याच्या आश्रयाने आहे आणि ज्याच्या सत्तेनेच याची प्रचीती येते, ज्याचे स्वरूप सर्वथैव अचिंत्य आहे, त्या परमपदाला मी नमस्कार करते. (४१)


अहं ममासौ पतिरेष मे सुतो
     व्रजेश्वरस्याखिलवित्तपा सती ।
गोप्यश्च गोपाः सहगोधनाश्च मे
     यन्माययेत्थं कुमतिः स मे गतिः ॥ ४२ ॥
ही मी पती हा अन पुत्र हा नी
     मी स्वामिनी या व्रजराजयाची ।
हे गोप गोपी अन गाइ माझ्या
     मायापसारे मन गुंतले हे ।
तो आश्रयो श्रीहरि एकलाची
     त्याच्या पदा मी शरणार्थ आले ॥ ४२ ॥

अहं व्रजेश्वरस्य - मी गोकुळाधिपतीच्या - अखिलवित्तपा सती - सर्व द्रव्याचे रक्षण करणारी त्याची धर्मपत्‍नी असून - असौ मम पतिः - हा माझा पति - एष मे सुतः - हा माझा मुलगा - सहगोधनाः गोप्यः गोपाः च मे - सर्व गोधनांसह गोपी व गोप माझे आहेत - इत्थं कुमतिः - अशी दुष्ट बुद्धि - यन्मायया (अभवत्) - ज्याच्या मायेने उत्पन्न झाली आहे - सः मे गतिः (अस्ति) - तो परमेश्वरच माझा आश्रय होय.॥४२॥
ही मी आहे आणि हे माझे पती आहेत, तसेच हा माझा मुलगा आहे, त्याचबरोबर मी व्रजराजाच्या सर्व संपत्तीची स्वामिनी, धर्मपत्‍नी आहे, या गोपी, गोप आणि गोधन माझे आहे - अशा प्रकारची माझी कुबुद्धी ही ज्यांची आश्रय आहेत, त्यांनाच मी शरण आहे." (४२)


( अनुष्टुप् )
इत्थं विदित तत्त्वायां गोपिकायां स ईश्वरः ।
वैष्णवीं व्यतनोन्मायां पुत्रस्नेहमयीं विभुः ॥ ४३ ॥
( अनुष्टुप् )
कृष्णाचे तत्व हे ऐसे यशोदा चित्ति जाणिता ।
आपुली वैष्णवी माया स्वतात मिटवी हरि ॥ ४३ ॥

सः ईश्वरः विभुः - तो सर्वसमर्थ सर्वव्यापक परमेश्वर - इत्थं विदिततत्त्वायां - याप्रमाणे तत्त्वज्ञान प्राप्त झालेल्या - गोपिकायां - यशोदेच्या ठिकाणी - पुत्रस्नेहमयीं - पुत्रप्रेमरूपी - वैष्णवीं मायां - वैष्णवी मायेला - व्यतनोत् - पसरिता झाला. ॥४३॥
अशा प्रकारे जेव्हा यशोदेला ईश्वरी तत्त्वाचे ज्ञान झाले, तेवढ्यात सर्वशक्तिमान प्रभूंनी आपल्या पुत्रस्नेहरूप वैष्णवी योगमायेचा तिच्या हृदयात संचार केला. (४३)


सद्यो नष्टस्मृतिर्गोपी साऽऽरोप्यारोहमात्मजम् ।
प्रवृद्धस्नेहकलिल हृदयासीद् यथा पुरा ॥ ४४ ॥
यशोदा विसरे सर्व पोटी कृष्णास घेतले ।
पहिल्या परि तो आला प्रेमधी उसळोनिया ॥ ४४ ॥

सद्यः नष्टस्मृतिः - जिचे तत्त्वज्ञानाचे स्मरण तत्काल नष्ट झाले आहे - सा गोपी - अशी ती यशोदा - आत्मजं आरोहं आरोप्य - मुलाला मांडीवर घेऊन - यथा पुरा (तथैव) प्रवृद्ध - पूर्वीप्रमाणे अतिशय वाढलेल्या - स्नेहकलिलहृदया आसीत् - प्रीतीमुळे जिचे हृदय भरून गेले आहे अशी झाली. ॥४४॥
यशोदा ती घटना ताबडतोब विसरली. तिने आपल्या लाडक्याला उचलून मांडीवर घेतले. तिच्या हृदयाला पूर्वीप्रमाणेच प्रेमाचा पान्हा फुटला. (४४)


त्रय्या चोपनिषद्‌भिश्च साङ्‌ख्ययोगैश्च सात्वतैः ।
उपगीयमान माहात्म्यं हरिं सामन्यतात्मजम् ॥ ४५ ॥
वेदोपनिषदे सांख्ये योगाने कीर्तने जया ।
न तृप्ति होतसे भक्ता यशोदा पुत्र मानि त्या ॥ ४५ ॥

सा - ती - त्रय्या उपनिषद्‌भिः - तीन वेद, उपनिषदे, - सांख्ययोगैः सात्वतैः च - सांख्यशास्त्र व भक्तिमार्गी पुरुष यांनी - उपगीयमानमाहात्म्यं हरिं - गाईले जात आहे माहात्म्य ज्याचे अशा त्या परमेश्वराला - आत्मजं अमन्यत् - आपला मुलगा असे मानू लागली. ॥४५॥
सर्व वेद, उपनिषदे, सांख्य, योग आणि भक्तजन ज्यांच्या महात्म्याचे गीत गातात त्या श्रीहरींना ती आपला पुत्र मानू लागली. (४५)

विवरण :- कृष्णाच्या उघडलेल्या मुखात यशोदेला विश्वरूप दर्शन झाले. प्रथम ते सत्य की स्वप्न असाच भ्रम तिला पडला. पण नंतर भ्रमनिरास झाल्यावर त्या दर्शनाने मात्र ती सामान्य गोपी राहिली नाही. कृष्णाचे खरे स्वरूप, त्याचे देवत्व तिला कळले. आजपर्यंत आपण सांसारिक मोह-मायेत गुंतलो होतो, आता मात्र ती माया नष्ट होऊन पारमार्थिकाचे ज्ञान व्हावे अशी इच्छा तिला झाली. (भगवत् गीतेच्या शेवटी अर्जुनहि 'नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा । अशा स्थितीला गेला होता.) पण असे होऊन कसे चालले असते ? यशोदेला जर निवृत्तिउपाय समजला असता, ती मुक्त झाली असती, तर ती 'यशोदामैय्या' राहिली नसती. कृष्णाचे खरे स्वरूप तिला समजल्यावर तिने त्याला मांडीवर न घेता देव्हार्‍यात ठेऊन त्याची पूजा केली असती. त्यांच्यात एकप्रकारचे अंतर निर्माण झाले असते. जे वसुदेव-देवकी यांना कृष्णाचे खरे स्वरूप कळल्यावर त्यांच्यात निर्माण झाले. त्यांना कळले की त्यांनी 'भगवंताला' जन्म दिला आहे. म्हणून ते त्याला मिठीत घेऊ शकले नाहीत. उलट नंद-यशोदेने कृष्णाला, त्यांच्या स्वतःच्या मुलाला जन्म दिला होता. म्हणून ते त्याला मायेने मिठीत घेऊ शकले. ही माया, हेच वात्सल्य कृष्णाला हवे होते. म्हणून त्याने यशोदेला झालेले ज्ञान नष्ट करून तिच्यावर पुत्रस्नेहाची माया पसरविली आणि तिला पूर्ववत् आपली यशोदामैय्या केले. आणि ज्याचा महिमा वेद, उपनिषदे, सांख्य, योग हेही पूर्णपणे जाणू शकत नाहीत, तो कृष्ण परमात्मा यशोदेचे स्तनपान करू लागला. (४३-४५)



श्रीराजोवाच -
नन्दः किमकरोद् ब्रह्मन् श्रेय एवं महोदयम् ।
यशोदा च महाभागा पपौ यस्याः स्तनं हरिः ॥ ४६ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
भगवन् ! नंदबाबाने कोणते तप साधिले ।
यशोदे साधिले काय ज्या पुण्ये स्तनिला हरी ॥ ४६ ॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्य - नंदः एवं - नंदाने - महोदयं श्रेयः - मोठे फल देणारे - किं अकरोत् - असे कोणते पुण्य केले होते ? - हरिः यस्या स्तनं पपौ - आणि परमेश्वराने जिचे स्तनपान केले - (सा) महाभागा - त्या भाग्यशाली - यशोदा च (किम् श्रेयः अकरोत्) - यशोदेनेही कोणते पुण्य केले होते ? ॥४६॥
राजाने विचारले - ब्रह्मर्षे ! नंदाने असे कोणते फार मोठे पुण्य केले होते ? तसेच भाग्यवती यशोदेनेसुद्धा अशी कोणती तपश्चर्या केली होती की, जिच्यामुळे स्वतः श्रीहरींनी तिचे स्तनपान केले. (४६)


पितरौ नान्वविन्देतां कृष्णोदारार्भकेहितम् ।
गायन्त्यद्यापि कवयो यल्लोकशमलापहम् ॥ ४७ ॥
कृष्णलीला अती श्रेष्ठ श्रेष्ठत्व लपवोनिया ।
खेळता बाळ गोपाळीं ऐकता ताप शांत हो ॥
त्रिकालज्ञहि गाती ज्या न भाग्य पाहणे सुखा ।
देवकी वसुदेवो ते माय-बाप असोनिया ।
लुटिती यशदा नंद याचे कारण काय ते ॥ ४७ ॥

पितरौ - खरे आईबाप - कृष्णोदारदारार्भकेहितं - कृष्णाच्या उत्तम बाललीला - न अन्वविंदेतां - पाहू शकले नाहीत - यत् लोकमलापहं - जी लोकांच्या पापाचे निरसन करणारी लीला - कवयः अद्यापि गायंति - ज्ञानी पुरुष अजूनही गातात. ॥४७॥
भगवान श्रीकृष्णांनी ज्या बाललीला केल्या, त्या इतक्या पवित्र आहेत की, त्यांचे श्रवण कीर्तन करणार्‍या लोकांचेसुद्धा सर्व पाप-ताप नाहीसे होतात. त्रिकालदर्शी ज्ञानी पुरुष आजसुद्धा त्यांचे गायन करीत असतात. त्यांच्या जन्मदात्यांनाही त्या पाहायला मिळाल्या नाहीत. (आणि नंद यशोदा मात्र त्यांचे सुख लुटीत आहेत, याचे कारण काय ?) (४७)

विवरण :- यानंतर परीक्षिताला पडलेला प्रश्न, नंद-यशोदेने असे कोणते पुण्य केले, की वसुदेव-देवकीलाहि दुर्लभ असे भाग्य त्यांना लाभले ? कृष्णाचा सहवास, त्याच्या बाललीला पाहण्याचे भाग्य मिळाले. इथे परीक्षिताला नंद-यशोदेला मिळालेल्या 'फळाचे' 'साधन' समजून घ्यायचे आहे, हा प्रश्न सामान्यानाच पडणारा. पण परमेश्वर प्राप्तीसाठी 'साधन-वस्तू' उपयोगी नाही. अंतःकरणात भक्तिभाव उसळून आला पाहिजे. सागराला भरती आल्याप्रमाणे. हा भक्तिभाव नंद-यशोदेच्या हृदयात होता; म्हणून कृष्ण परमात्मा त्यांचा 'आत्मज' (आत्मनि जातः । स्वतःपासून जन्माला आलेला) नसूनहि त्यांचा बालक बनला. 'देव भक्तिचा भुकेला' 'देव भावाचा भुकेला' हेच खरे तत्त्व इथे आहे. (४६-४७)



श्रीशुक उवाच -
द्रोणो वसूनां प्रवरो धरया भार्यया सह ।
करिष्यमाण आदेशान् ब्रह्मणस्तमुवाच ह ॥ ४८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
वसु श्रेष्ठ असे होते नंद हे पूर्व जन्मिचे ।
नाम द्रोण असे त्यांचे पत्‍नीचे नाव ते धरा ।
ब्रह्म्याची मानुनी आज्ञा वदले त्यास हे असे ॥ ४८ ॥

वसूनां प्रवरः द्रोणः - अष्टवसूंमध्ये श्रेष्ठ असा द्रोण - धरया भार्यया सह - धरा नावाच्या पत्‍नीसह - ब्रह्मणः आदेशान् - ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे - करिष्यमाणः - पालन करीत असता - तं उवाच ह - ब्रह्मदेवाला म्हणाला. ॥४८॥
श्रीशुकदेव म्हणाले - नंद पूर्वी एक श्रेष्ठ वसू होते. त्यांचे नाव द्रोण होते आणि त्यांच्या पत्‍नीचे नाव धरा होते. त्यांनी ब्रह्मदेवांच्या आदेशांचे पालन करण्याच्या इच्छेने त्यांना म्हटले - (४८)


जातयोर्नौ महादेवे भुवि विश्वेश्वरे हरौ ।
भक्तिः स्यात्परमा लोके ययाञ्जो दुर्गतिं तरेत् ॥ ४९ ॥
धरेसी जन्मता आम्ही अनन्य कृष्णभक्ति ती ।
लाभो नित्य अम्हा तैशी तेणे तो भव स्वल्प हो ॥ ४९ ॥

भुवि लोके जातयोः नौ - भूलोकात उत्पन्न झालेल्या आम्हाला - महादेवे विश्वेश्वरे _ देवाधिदेव जगदीश्वर - हरौ - अशा श्रीहरीच्या ठिकाणी - परमा भक्तिः स्यात् - श्रेष्ठ भक्ति प्राप्त व्हावी - यया (नरः) अंजःदुर्गतीं तरेत् - ज्यामुळे मनुष्य सहज दुर्गतीला तरून जातो. ॥४९॥
भगवन ! आम्ही जेव्हा पृथ्वीवर जन्म घेऊ, तेव्हा जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचेवर आमची अनन्य भक्ती निर्माण होवो; जिच्या योगाने संसारातील लोक सहजपणे दुर्गतीला पार करून जातात. (४९)


अस्त्वित्युक्तः स भगवान् व्रजे द्रोणो महायशाः ।
जज्ञे नन्द इति ख्यातो यशोदा सा धराभवत् ॥ ५० ॥
तथास्तु ! वदले ब्रह्मा व्रजीं नंदचि द्रोण ते ।
यशोदा ती धरा पूर्वी तयांची हीच पत्‍नी की ॥ ५० ॥

(तथा) अस्तु इति (ब्रह्मणा) उक्तः - तसेच असो असे ब्रह्मदेवाने सांगितलेला - सः महाशयाः भगवान् द्रोणः - तो महाकीर्तिमान ऐश्वर्यसंपन्न वसु द्रोण - व्रजे नंदः इति ख्यातः जज्ञे - गोकुळात नंद ह्या नावाने जन्मास आला - सा धरा यशोदा अभवत् - ती धरा यशोदा झाली. ॥५०॥
ब्रह्मदेव म्हणाले, "ठीक आहे." तेच परम यशस्वी द्रोण व्रजामध्ये नंद नावाने जन्मले आणि तीच धरा यशोदा झाली. (५०)


ततो भक्तिर्भगवति पुत्रीभूते जनार्दने ।
दम्पत्योर्नितरामासीत् गोपगोपीषु भारत ॥ ५१ ॥
भवचक्रा मधोनीया या जन्मी सोडवावयां ।
कृष्णपुत्र तयां झाला यशोदा नंदजीस की ।
गोपी गोपादि सर्वांचे जडले प्रेम त्यास तै ॥ ५१ ॥

भारत - हे परीक्षित राजा - ततः - म्हणून - पुत्रीभूते जनार्दने भगवति - पुत्र झालेल्या जनार्दन भगवंताच्या ठिकाणी - गोपगोपीषु - गोप व गोपींमध्ये - तयोः दंपत्योः भक्तिः नितरां आसीत् - ह्या पतिपत्‍नीची अत्यंत प्रीती होती. ॥५१॥
परीक्षिता ! भगवान आता त्यांचे पुत्र झाले आणि सर्व गोप-गोपींच्यापेक्षा नंद आणि यशोदा यांचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम जडले. (५१)


कृष्णो ब्रह्मण आदेशं सत्यं कर्तुं व्रजे विभुः ।
सहरामो वसंश्चक्रे तेषां प्रीतिं स्वलीलया ॥ ५२ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ब्रह्म्याचे बोल ते सत्य कराया कृष्ण नी बल ।
करिती गोकुळी लीला सर्वांना मोद जाहला ॥ ५२ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

विभुः कृष्णः - सर्वसमर्थ कृष्ण - सहरामः - बळरामासह - ब्रह्मणः आदेशं सत्यं कर्तुं - ब्रह्मदेवाचा वर खरा करण्याकरिता - व्रजे वसन् - गोकुळात वास करीत - स्वलीलया तेषां प्रीतिं चक्रे - आपल्या लीलेने त्यांना संतोष देता झाला. ॥५२॥
ब्रह्मदेवांचे वचन सत्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण बलराम यांचेसह व्रजामध्ये राहून त्यांना आपल्या बाललीलांनी आनंदित करू लागले. (५२)


अध्याय आठवा समाप्त

GO TOP