श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
पञ्चदशोऽध्यायः

गोचारणं, धेनुकासुरवधः कालियाविषदूषिताम्बूपानान् मृतानां
गवां गोपानां च पुनरुज्जीवनम् -

धेनुकसुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


( मिश्र )
श्रीशुक उवाच -
ततश्च पौगण्डवयः श्रीतौ व्रजे
     बभूवतुस्तौ पशुपालसम्मतौ ।
गाश्चारयन्तौ सखिभिः समं पदैः
     वृन्दावनं पुण्यमतीव चक्रतुः ॥ १ ॥
( इंद्रवज्रा )
श्रीशुकदेव म्हणतात -
झाला सहा वर्ष वयीहि कृष्ण
     चारावया गायिस पात्र झाला ।
वृंदावनाला पदस्पर्श देता
     पावित्र्य देति निज चालताना ॥ १ ॥

ततः च - त्यानंतर - पौगण्डवयःश्रितौ तौ - पौगंड वयाचा आश्रय केलेले ते दोघे - व्रजे पशुपालसंमतौ बभूवतुः - गोकुळात गाई राखण्याजोगे झाले - सखिभिः समं गाः चारयन्तौ - मित्रांसह गाई चारणारे ते - वृंदावनं - वृंदावनाला - पदैः - पावलांनी - अतीव पुण्यं चक्रतुः - अत्यंत पवित्र करते झाले. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - नंतर बलराम आणि श्रीकृष्ण यांनी सहाव्या वर्षात पदार्पण केले. आता ते गाई चरावयास पात्र ठरले. ते मित्रांसह गाई चारीत वृंदावनात जात आणि ते आपल्या चरणांनी अत्यंत पवित्र करीत. (१)


तन्माधवो वेणुमुदीरयन्वृतो
     गोपैर्गृणद्‌भिः स्वयशो बलान्वितः ।
पशून् पुरस्कृत्य पशव्यमाविशद्
     विहर्तुकामः कुसुमाकरं वनम् ॥ २ ॥
गाई पुढे नी हरि मागुती हा
     वंशीस फुंकी बळिच्या सवे नी ।
गोपाळ गाती मुखि कीर्ति त्याची
     वनात जाती हिरव्या तृणासी ॥ २ ॥

तत् (एकदा) - मग एके दिवशी - विहर्तुकामः माधवः - खेळण्याची इच्छा करणारा श्रीकृष्ण - वेणुं उदीरन् - मुरली वाजवीत - स्वयशः गृणद्भिः गौपेः वृतः - आपले यश गाणार्‍या गोपांनी वेष्टिलेला - बलान्वितः - बलरामासह - पशून् पुरस्कृत्य - गाईंना पुढे करून - पशव्यं कुसुमाकरं वनं आविशत् - गाईंना सोईस्कर व फुलांनी युक्त अशा वनात शिरला. ॥२॥
हे वन गुरांच्या चार्‍याने भरलेले व फुलांनी लहडलेले होते. पुढे गाई, त्यांच्या पाठीमागे बासरी वाजवीत श्यामसुंदर, त्यांच्यामागे बलराम आणि त्यापाठोपाठ श्रीकृष्णांच्या यशाचे गायन करणारे गोपाळ असे सर्वजण विहार करण्यासाठी त्या वनात गेले. (२)


तन्मञ्जुघोषालिमृगद्विजाकुलं
     महन्मनःप्रख्यपयःसरस्वता ।
वातेन जुष्टं शतपत्रगन्धिना
     निरीक्ष्य रन्तुं भगवान्मनो दधे ॥ ३ ॥
वनात भुंगे मधूगान गाती
     त्या पुष्पगंधे नित वायु हर्षी ।
सरोवरीचे जल जै महात्मे
     मनात होती नितळे तसेचि ।
ते पाहुनी श्रीहरिच्या मनाला
     संकल्प झाला क्रिडण्या तिथेची ॥ ३ ॥

मञ्जुघोषालिमृगद्विजाकुलं - मंजुळ शब्द करणारे भृंग, हरिण व पक्षी यांनी व्यापिलेले - महन्मनःप्रख्यपयःसरस्वता - साधू पुरुषांच्या मनाप्रमाणे स्वच्छ आहे उदक ज्यातील अशा सरोवरावरून वाहणार्‍या - शतपत्रगन्धिना वातेन - कमळाचा वास ज्यात आहे अशा वायूने - जुष्टं - सेविलेले - तत् (वृंदावनं) निरीक्ष्य - ते वृंदावन पाहून - भगवान् (तत्र) रन्तु मनः दधे - श्रीकृष्ण तेथे रमण्याचा विचार करिता झाला. ॥३॥
तेथे कोठे भ्रमर मधुर जुंजारव करीत होते, कोठे हरिणांचे कळप होते, तर कोठे पक्षी किलबिलाट करीत होते. तसेच कोठे कोठे महात्म्यांच्या हृदयाप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली सरोवरे होती. त्यांतील कमळांच्या सुगंधाने सुवासित झालेला वारा तेथे वाहात होता. ती रमणीयता पाहून भगवंतांनी तेथे विहार करण्याचे ठरविले. (३)


स तत्र तत्रारुणपल्लवश्रिया
     फलप्रसूनोरुभरेण पादयोः ।
स्पृशच्छिखान् वीक्ष्य वनस्पतीन् मुदा
     स्मयन् निवाहाग्रजमादिपूरुषः ॥ ४ ॥
फळा फुलाने झुकल्याही फांद्या
     पदास स्पर्शी नवती हरीच्या ।
बघोनि हासे मनि कृष्ण आणि
     बोले तदा तो बलराम यासी ॥ ४ ॥

सः आदिपुरुषः - तो श्रीकृष्ण - तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी - अरुणपल्लवश्रिया - आरक्तवर्ण पानांच्या कांतीने - फलप्रसूनोरुभरेण - फळे व फुले ह्यांच्या मोठया भाराने - पादयोः स्पृशच्छिखान् - पायांच्या ठिकाणी ज्यांच्या अग्राचा स्पर्श झाला आहे अशा - वनस्पतीन् वीक्ष्य - वनस्पतींना पाहून - मुदा स्मयन् इव - आनंदाने हास्य करीत - अग्रजम् आह - ज्येष्ठ बंधू जो बलराम त्याला म्हणाला. ॥४॥
फुला-फळांच्या भारांनी वाकलेले वृक्ष लालसर पालवी फुटलेल्या फांद्यांनी आपल्या चरणांना स्पर्श करीत आहेत, असे पाहून आनंदाने स्मित हास्य करीत श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले - (४)


श्रीभगवानुवाच -
अहो अमी देववरामरार्चितं
     पादाम्बुजं ते सुमनःफलार्हणम् ।
नमन्त्युपादाय शिखाभिरात्मनः
     तमोऽपहत्यै तरुजन्म यत्कृतम् ॥ ५ ॥
श्री भगवान म्हणाले -
ते देव येती पुजनास नित्य
     हे वृक्ष आले फल पुष्प घेता ।
झुकोनिया ते करिती प्रणाम
     ते भाग्य त्यांचे तम नाश होई ॥ ५ ॥

अहो - अहो - अमी - हे वृक्ष - यत्कृतं तरुजन्म - ज्या पापाने वृक्षयोनीत जन्म दिला - आत्मनः तमोपहत्यै - त्या स्वतःच्या पापाचा नाश करण्यासाठी - शिखाभिः - शेंडयांनी - सुमनःफलार्हणं - पुष्पे व फळे यांची भेट - उपादाय - घेऊन - देववर - हे श्रेष्ठ देवा - अमरार्चितं - देवांनी पूजिलेल्या - ते पादाम्बुजं - तुझ्या चरणकमलाला - नमन्ति - नमस्कार करीत आहेत. ॥५॥
श्रीकृष्ण म्हणाले - "हे देवश्रेष्ठा ! देव ज्यांनी पूजा करतात, त्या चरणकमळांना हे वृक्ष फुले आणि फळे घेऊन आपल्या शेंड्यांनी नमस्कार करीत आहेत. असेही असेल की, ज्या पापामुळे त्यांना वृक्ष जन्म घ्यावा लागला, ते पाप दूर करण्यासाठीच ते असे करीत असावेत. (५)

विवरण :- वृंदावनातील वनात बलराम व कृष्ण गायी-गुरे चरण्यास घेऊन जात. तेथील निसर्गसौंदर्याने ते अतिशय आनंदित होत. वनातील वृक्षांचे वर्णन करताना भगवान कृष्ण बलरामास म्हणतात, 'फळा-फुलांनी भरलेल्या आपल्या फांद्या तुझ्या पायावर वाकवून हे वृक्ष तुला वंदन करीत आहेत. असे करून ज्या अज्ञानाने त्यांना वृक्षजन्म प्राप्त झाला, ते अज्ञान त्यांना नष्ट करायचे आहे.' वास्तविक 'वृक्षाः सत्पुरुषाः इव' तरन्ति इति तरवः' असे वृक्षांचे वर्णन केले जाते. मग त्यांचे अज्ञान कोणते ? वृक्ष सत्पुरुषांप्रमाणे असले तरी ते 'चल' नसतात. एका जागी स्थिर असतात. पांथस्थ अथवा कोणत्याहि व्यक्तीस त्यांचेकडे जावे लागते. हे जडत्व, म्हणजेच अज्ञान असा अर्थ होऊ शकतो. सामान्य मानवाच्या दृष्टीने हे एक झाले. जडत्वामुळे वृक्ष भगवंताच्या सान्निध्यातहि जाऊ शकत नाहीत. परमेश्वराच्या सान्निध्याची इच्छा असूनहि त्यांना त्याचा विरह सहन करावा लागतो. भगवंताशी विरह हे ही एकप्रकारचे अज्ञानच, पापच. म्हणून हे सर्व नाहीसे करण्याकरिता वृक्ष भगवंताच्या पायाशी नम्र होतात. बलराम आणि श्रीकृष्ण वनात आले आणि त्यांच्या आगमनाने अत्यंत आनंदित झालेले मोर, कोकिळा, हरिणी (हरिणी सा हिरण्मयी) हे सर्व पशु पक्षी त्यांचे हर्षभराने आणि निरनिराळ्या प्रकारे पण मनापासून स्वागत करतात. अर्थात हे योग्यच आहे. कारण वन हे त्यांचे घर आहे. (वनौकस) आणि आपल्या घरी आलेल्या अतिथीचे स्वागत करणे हा अतिथीधर्म आहे नाही का ? (५)



( वसंततिलका )
एतेऽलिनस्तव यशोऽखिललोकतीर्थं
     गायन्त आदिपुरुषानुपदं भजन्ते ।
प्रायो अमी मुनिगणा भवदीयमुख्या
     गूढं वनेऽपि न जहत्यनघात्मदैवम् ॥ ६ ॥
( वसंततिलका )
ऐश्वर्य ते लपवुनी असलो इथे मी
     तोही ऋषी नि मुनि भृंगचि होवुनिया ।
गाती सदैव यश जे अपुले जगीचे
     इच्छीति ना क्षणहि एकहि तो त्यजाया ॥ ६ ॥

अनघ - हे निष्पापा - अखिललोकतीर्थं - सर्व लोकाला पवित्र करणारे - तव यशः गायन्तः - तुझे यश गाणारे - एते अलिनः - हे भ्रमर - आदिपुरुषानुपदं भजन्ते - आदिपुरुषाच्या प्रत्येक पावलाला सेवीत आहेत - प्रायः - बहुतकरून - अमी (भ्रमराः) - हे भ्रमर - भवदीयमुख्याः मुनिगणाः - तुझ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ असे ऋषिसमूह - वने अपि - अरण्यातही - गूढं आत्मदैवं न जहति - गुप्तरूपाने राहणार्‍या स्वतःच्या देवतेला सोडीत नाहीत. ॥६॥
हे पुण्यशील आदिपुरुषा ! तू जरी या वृंदावनामध्ये तुझे मूळ रूप झाकून ठेवून राहात असलास, तरी तुझे श्रेष्ठ भक्त मुनिगण तूच आपली इष्टदेवता आहे, हे ओळखून बहुतेक भ्रमरांच्या रूपामध्ये तुझ्या त्रिभुवनपावन यशाचे गायन करीत तुझे भजन करतात. ते आपल्याला कधीही सोडू इच्छित नाहीत. (६)


नृत्यन्त्यमी शिखिन ईड्य मुदा हरिण्यः
     कुर्वन्ति गोप्य इव ते प्रियमीक्षणेन ।
सूक्तैश्च कोकिलगणा गृहमागताय
     धन्या वनौकस इयान्हि सतां निसर्गः ॥ ७ ॥
बंधो तुम्हीच स्तुति ती करण्यास योग्य
     पाहा घरास बघता पदि मोर आले ।
गोपी परी हरिणिही बघतात प्रेमे
     नी पाहतीहि तितक्या नजरेत हर्षे ।
कोकीळ जात कुहु स्वागत ते करीती
     आतिथ्य हे करिति या वनि आपुले की ॥ ७ ॥

ईडय - हे स्तुत्या - अमी शिखिनः - हे मोर - मुदा नृत्यन्ति - आनंदाने नाचत आहेत - हरिण्यः - हरिणी - गोप्यः इव - गोपींप्रमाणे - ईक्षणेन ते प्रियं कुर्वान्ति - अवलोकनाने तुझे प्रिय करीत आहेत - धन्याः वनौकसः कोकिलगणाः - अरण्यात राहणारे भाग्यशाली असे कोकिळांचे समुदाय - गृहं आगताय (ते) - घरी आलेल्या तुझे - इयान् हि सतां निसर्गः - कारण साधूंचा स्वभावच असा असतो. ॥७॥
हे स्तुत्य बंधो ! तू आपल्या घरी आल्याचे गोपिकांप्रमाणे या हरिणी तुझ्याकडे प्रेमळ नजरेने पाहून तुला प्रसन्न करीत आहेत. या कोकिळा मधुर कुहुरवाने आपले स्वागत करीत आहेत ! घरी आलेल्या अतिथींचे स्वागत करणे हा सत्पुरुषांचा स्वभावच असतो. अतिथिधर्म पाळणारे हे वनवासी धन्य होत. (७)


धन्येयमद्य धरणी तृणवीरुधस्त्वत्
     पादस्पृशो द्रुमलताः करजाभिमृष्टाः ।
नद्योऽद्रयः खगमृगाः सदयावलोकैः
     गोप्योऽन्तरेण भुजयोरपि यत्स्पृहा श्रीः ॥ ८ ॥
धन्यो महीहि इथली तृण स्पर्शि पाया
     वृक्षो लतानि झुडुपे पदि धन्य होती ।
दृष्टी दयाभरि तयी पडता कृतार्थ ।
पक्षी नदी नि गिरी गोपिहि धन्य होती ॥ ८ ॥

अद्य - आज - इयं धरणी - ही पृथ्वी - धन्या - कृतकृत्य झाली आहे - त्वत्पादस्पृशः - तुझ्या पायांना स्पर्श करणार्‍या - तृणवीरुधः (धन्याः) - गवत व वेली धन्य होत - करजाभिमृष्टाः द्रुमलताः - नखांनी स्पर्शिलेले वृक्ष व त्यांवरील वेली - नद्यः अद्रयः खगमृगाः - नद्या, पर्वत, पक्षी व पशू - सदयावलोकैः (धन्याः) - दयापूर्ण अवलोकनांनी धन्य झाले आहेत - गोप्यः - गोपी - श्रीः अपि यत्स्पृहा (तेन) भुजयो अन्तरेण - लक्ष्मीसुद्धा ज्याची इच्छा करिते अशा त्या दोन बाहूंमधील वक्षस्थलाने - धन्या - धन्य झाल्या आहेत. ॥८॥
येथील भूमी आज गवत झुडुपांसह तुझ्या चरणांच्या स्पर्शाने धन्य झाली आहे. येथील वृक्ष वेली तुझ्या हस्तांचा स्पर्श झाल्याने स्वतःला धन्य मानीत आहेत. तुझ्या दयार्द्र दृष्टिक्षेपामुळे नद्या, पर्वत, पशु-पक्षी कृतार्थ होत आहेत आणि व्रजातील गोपी लक्ष्मीलाही स्पृहणीय अशा तुझ्या वक्षःस्थळाच्या स्पर्शाने कृत्कृत्य झाल्या आहेत. (८)


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
एवं वृन्दावनं श्रीमत् कृष्णः प्रीतमनाः पशून् ।
रेमे सञ्चारयन् अद्रेः सरिद्रोधःसु सानुगः ॥ ९ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
या परी भगवंताने पाहता वन हर्षले ।
गाई त्या चारता तेथे लीलाही करु लागले ॥ ९ ॥

एवं - याप्रमाणे - श्रीमत्कृष्णः - ऐश्वर्याने शोभणारा श्रीकृष्ण - सानुगः - अनुसरणार्‍या मित्रांसह - अद्रेः सरिद्रोधस्सु - पर्वताजवळच्या नदीच्या तीरावर - पशून् संचारयन् - गाई चारीत - वृंदावनं (प्रति) प्रीतमनाः - वृंदावनावर प्रसन्न आहे चित्त ज्याचे असा - (तत्र) रेमे - तेथे रमता झाला. ॥९॥
श्रीशुकदेव म्हणतात - अशा प्रकारचे सुंदर वृंदावन पाहून श्रीकृष्ण आनंदित झाले. आपल्या सवंगड्यांसह गोवर्धन पर्वतावर व यमुनातीरावर गाईंना चारीत ते रममाण झाले. (९)


क्वचिद् गायति गायत्सु मदान्धालिष्वनुव्रतैः ।
उपगीयमानचरितः पथि सङ्‌कर्षणान्वितः ॥ १० ॥
बाळगोपाळ गाती ते कृष्णाचे गीत गायनी ।
वनमाळी बळी दोघे भृंगाच्या परि गुंजती ॥ १० ॥

अनुव्रतैः उपगीयमानानुचरितः - अनुसरणारे गोप गात आहेत चरित्र ज्याचे असा - स्रग्वी - कंठात माळा धारण करणारा - सङकर्षणान्वितः (सः) - बलरामासह तो श्रीकृष्ण - मदान्धालिषु गायत्सु - पुष्पांतील रसाने धुंद झालेले भ्रमर शब्द करीत असता - क्वचित् गायति - एखादे वेळी गाऊ लागे. ॥१०॥
गोपाळ ज्यांचे चरित्र गात आहेत, असे वनमाला धारण केलेले कृष्ण बलरामासह धुंद भ्रमरांच्या गुण्गुणण्यात आपला स्वर मिळवून मधुर संगीत गात. (१०)


क्वचिच्च कलहंसानां अनुकूजति कूजितम् ।
अभिनृत्यति नृत्यन्तं बर्हिणं हासयन्क्वचित् ॥ ११ ॥
हंसाच्या सह तो कुंजे नाचे मोरांसवे कधी ।
थुइथुई नाचता मोरा वाटावा उपहास तो ॥ ११ ॥

क्वचित् च - आणि एखादे वेळी - कलहंसानां कूजितम् - कलहंस पक्षांच्या शब्दांप्रमाणे - अनुकूजति - शब्द करी - क्वचित् - एखादे वेळी - (मित्राणि) हासयन् - मित्रांना हासवीत - नृत्यन्तं बर्हिणं अभिनृत्यति - नाचणार्‍या मोरापुढे नृत्य करी. ॥११॥
कधी कधी श्रीकृष्ण राजहंसांच्या कूजनाचे अनुकरण करीत तर कधी नाचणार्‍या मोरांपेक्षा अधिक सुंदर नाचून मित्रांना हसवीत. (११)


मेघगम्भीरया वाचा नामभिर्दूरगान् पशून् ।
क्वचिद् आह्वयति प्रीत्या गोगोपालमनोज्ञया ॥ १२ ॥
मेघाच्या सम गंभीर शब्दे हाकी पशूस ही ।
मधूर वाणि ती ऐसी ऐकता भान हारपे ॥ १२ ॥

क्वचित् - एखादे वेळी - गोगोपालमनोज्ञया - गाई व गोप यांना आवडणार्‍या - मेघगम्भीरया वाचा - मेघाप्रमाणे गंभीर अशा वाणीने - प्रीत्या - प्रेमाने - दूरगान् पशून् - दूर गेलेल्या पशूंना - नामभिः आह्वयति - नावांनी हाका मारी. ॥१२॥
कधी मेघाप्रमाणे गंभीर वाणीने दूर गेलेल्या गुरांना त्यांच्या नावाने प्रेमाने बोलवीत. त्यांची ती मधुर हाक गाई आणि गोपालांचे चित्त मोहवी. (१२)


चकोरक्रौञ्चचक्राह्व भारद्वाजांश्च बर्हिणः ।
अनुरौति स्म सत्त्वानां भीतवद् व्याघ्रसिंहयोः ॥ १३ ॥
चकोर क्रौंच चकवा भारद्वाज नि मोर या ।
पक्षांचे बोल तो बोले सिंहनादेच भीववी ॥ १३ ॥

क्वचित् - एखादे वेळी - चकोरक्रौञ्चचक्राह्वभारद्वाजान् बर्हिणः च - चकोर, क्रौंच, चक्रवाक, चंडोल आणि मोर यांप्रमाणे - अनुरौति स्म - शब्द करी - सत्त्वानां (इव) - इतर प्राण्यांप्रमाणे - व्याघ्रसिंहयोः भीतवत् (भवति) - वाघ व सिंह यांना भ्यालासारखा होतो.॥१३॥
कधी चकोर, क्रौंच, चक्रवाक, भारद्वाज आणि मोर या पक्ष्यांचे आवाज काढीत, तर कधी वाघ-सिंहांच्या गर्जनेने घाबरल्यासारखे दाखवीत. (१३)


क्वचित् क्रीडापरिश्रान्तं गोपोत्सङ्‌गोपबर्हणम् ।
स्वयं विश्रमयत्यार्यं पादसंवाहनादिभिः ॥ १४ ॥
खेळुनी थकता राम गोपाच्या पोटि डोइ तो ।
टेकूनी घेइ विश्रांती कृष्ण तो पाय चेपि ही ॥ १४ ॥

क्वचित् - एखादे वेळी - क्रीडापरिश्रान्तं - खेळून दमलेल्या - गोपोत्सङगोपबर्हणम् - गोपाची मांडी हीच आहे उशी ज्याची अशा - आर्यं - ज्येष्ठ भ्राता जो बलराम त्याला - पादसंवाहनादिभिः - पाय चेपणे इत्यादिकांनी - स्वयं विश्रमयति - स्वतः विसावा देत असे. ॥१४॥
कधी कधी बलराम खेळून थकल्यावर एखाद्या गोपाळाच्या मांडीची उशी करून पहुडत, तेव्हा श्रीकृष्ण त्यांचे पाय वगैरे चेपून त्यांचा थकवा दूर करीत. (१४)


नृत्यतो गायतः क्वापि वल्गतो युध्यतो मिथः ।
गृहीतहस्तौ गोपालान् हसन्तौ प्रशशंसतुः ॥ १५ ॥
गोपाळ नाचती गाती हाबुके कुस्ति खेळती ।
वाहवा म्हणती हात करोनी राम कृष्ण ते ॥ १५ ॥

क्व अपि - एखादे प्रसंगी - गृहीतहस्तौ (तौ) - धरले आहेत हात ज्यांनी असे ते बलराम व श्रीकृष्ण - नृत्यतः - नाचणार्‍या - गायतः - गाणार्‍या - वल्गतः - बडबडणार्‍या - मिथः युध्यतः - आपापसांत कुस्ती खेळणार्‍या - गोपालान् - गोपांना - (हसन्तौ) प्रशशंसतुः - हास्यपूर्वक प्रशंसीत असत. ॥१५॥
जेव्हा गोपाळ नाचू-गाऊ लागत, फुशारक्या मारत किंवा एकमेकांशी कुस्ती खेळत, तेव्हा दोघे भाऊ हातात हात घालून उभे राहात आणि हसून "शाबास ! शाबास !" म्हणत. (१५)


क्वचित् पल्लवतल्पेषु नियुद्धश्रमकर्शितः ।
वृक्षमूलाश्रयः शेते गोपोत्सङ्‌गोपबर्हणः ॥ १६ ॥
गोपाळांच्या सवे कृष्ण खेळे कुस्ती कधी थके ।
पानांची सेज लावोनी बाळांची उशिही करी ॥ १६ ॥

क्वचित् - एखाद्या प्रसंगी - नियुद्धश्रमकर्शितः - कुस्तीच्या श्रमाने थकलेला - वृक्षमूलाश्रयः - झाडाच्या मूळाचा केला आहे आश्रय ज्याने असा - गोपोत्सङगोपबर्हणः - गोपाची मांडी आहे उशी ज्याची असा - पल्लवतल्पेषु - पानांच्या शय्येवर - शेते - निजे. ॥१६॥
कधी कधी स्वतः श्रीकृष्णसुद्धा कुस्ती खेळता खेळता थकून जाऊन एखाद्या झाडाखाली कोवळ्या पालवीच्या शय्येवर एखाद्या गोपाळाच्या मांडीवर डोके ठेवून पहुडत. (१६)


पादसंवाहनं चक्रुः केचित्तस्य महात्मनः ।
अपरे हतपाप्मानो व्यजनैः समवीजयन् ॥ १७ ॥
पुण्यवंत कुणी बाळे हरीचे पाय चेपिती ।
रुमाल अथवा पर्णे यांचा पंखा करी कुणी ॥ १७ ॥

केचित् - काही गोप - तस्य महात्मनः - त्या महात्म्या श्रीकृष्णाचे - पादसंवाहनं चक्रुः - पाय चेपण्याचे काम करीत - हतपाप्मानः अपरे - नष्ट झाले आहे पाप ज्यांचे असे दुसरे कित्येक गोप - व्यजनैः समवीजयन् - पंख्यांनी वारा घालीत. ॥१७॥
त्यावेळी काही पुण्यवंत श्रीकृष्णांचे पाय चेपू लागत आणि दुसरे काही पुण्यशील बालक त्यांना पंख्यांनी वारा घालू लागत. (१७)


अन्ये तदनुरूपाणि मनोज्ञानि महात्मनः ।
गायन्ति स्म महाराज स्नेहक्लिन्नधियः शनैः ॥ १८ ॥
कोणाच्या हृदयी दाटे कृष्णाचे प्रेम ते मनी ।
लीला तशाच गाती ते मनाला रुचतील त्या ॥ १८ ॥

महाराज - हे परीक्षित राजा - स्नेहक्लिन्नधियः - प्रेमाने थबथबलेली आहे बुद्धी ज्यांची असे - अन्ये - दुसरे गोप - तदनुरूपाणि महात्मनः मनोज्ञानि (चरितानि) - त्याला साजेशी त्या माहात्म्या कृष्णाची मधुर चरित्रे - शनैः गायन्ति स्म - हळूहळु गात असत. ॥१८॥
हे राजा ! जेव्हा हृदय प्रेमाने उचंबळून येई, तेव्हा काही गोपाळ हलक्या आवाजात श्रीकृष्णांच्या लीलांना अनुरूप अशी मनोहर गीते गाऊ लागत. (१८)


( इंद्रवंशा )
एवं निगूढात्मगतिः स्वमायया
     गोपात्मजत्वं चरितैर्विडम्बयन् ।
रेमे रमालालितपादपल्लवो
     ग्राम्यैः समं ग्राम्यवदीशचेष्टितः ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
मायें हरी तो लपवी रुपाला
     पायासि लक्ष्मी जरि नित्य सेवी ।
तरीहि खेळे जणु ग्राम्य पोर
     ऐश्वर्य त्याचे प्रगटे तयात ॥ १९ ॥

ईशचेष्टितः (सः) - परमेश्वरासारख्या अलौकिक क्रिया करणारा तो श्रीकृष्ण - एवं स्वमायया निगूढात्मगतिः - त्याप्रमाणे आपल्या मायेच्या योगे झाकून टाकिला आहे स्वभाव ज्याने असा - चरितैः गोपात्मजत्वं विडम्बयन् - आचरणांनी गवळ्याच्या पुत्राचे अनुकरण करणारा - रमालालितपादपल्लवः - लक्ष्मीने सेविले आहेत कोमल चरण ज्याचे असा - ग्राम्यैः समं - खेडवळ मुलांसह - ग्राम्यवत् - गावंढळाप्रमाणे - रेमे - क्रीडा करीत असे. ॥१९॥
अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या योगमायेने आपले खरे स्वरूप झाकून ठेवले होते. ते अशा काही लीला करीत की ज्या हुबेहुब गोपबालकांच्या सारख्याच वाटत. स्वतः भगवती लक्ष्मी ज्यांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये संलग्न असे, तेच भगवान या खेड्यातील बालकांबरोबर ग्रामीण खेळ खेळत असत. परंतुउ कित्येक वेळा त्यांची ईश्वरी लीलासुद्धा प्रगट होत असे. (१९)


( अनुष्टुप् )
श्रीदामा नाम गोपालो रामकेशवयोः सखा ।
सुबलस्तोककृष्णाद्या गोपाः प्रेम्णेदमब्रुवन् ॥ २० ॥
( अनुष्टुप् )
श्रीदामा पुत्र तो होता तयांचा गोप जो सुहृद् ।
एकदा सुबलो नी तो स्तोककृष्णा सवे तसे ।
सकाळी बाळ गोपाळ वदले बळि कृष्णला ॥ २० ॥

श्रीदामा नाम गोपालः - श्रीदामा या नावाचा एक गोपाल - रामकेशवयोः सखा (आसित्) - बलराम व श्रीकृष्ण ह्यांचा मित्र होता - सुबलस्तोककृष्णाद्याः - सुबल, स्तोककृष्ण इत्यादि - गोपाः - गोप - प्रेम्णा इदम् अब्रुवन् - प्रेमाने याप्रमाणे म्हणाले. ॥२०॥
राम कृष्णांचा श्रीदामा नावाचा एक मित्र, सुबल, स्तोककृष्ण इत्यादि गोपाळ त्यांना प्रेमाने म्हणाले. (२०)


राम राम महाबाहो कृष्ण दुष्टनिबर्हण ।
इतोऽविदूरे सुमहद् वनं तालालिसङ्‌कुलम् ॥ २१ ॥
सदैव सुख ते देता बलराम तुम्ही अम्हा ।
कृष्ण तो मारितो दुष्टा येथुनी जवळी वन ।
बहूत श्रेष्ठ ते आहे ताडांनी भरले असे ॥ २१ ॥

राम - हे बलरामा - महाबाहो राम - मोठे आहेत बाहू ज्याचे अशा हे बलरामा - दुष्टनिबर्हण कृष्ण - हे दुष्टांचा नाश करणार्‍या कृष्णा - इतः अविदूरे - येथून जवळच - तालालिसंकुलं - ताडाचे वृक्ष व भ्रमरांचे थवे ह्यांनी व्याप्त - सुमहत् वनं (अस्ति) - असे एक मोठे अरण्य आहे. ॥२१॥
हे पराक्रमी बलरामा ! हे दुष्टांचा नाश करणार्‍या कृष्णा ! येथून थोड्याच अंतरावर ताडवृक्षांनी भरलेले एक मोठे वन आहे. (२१)


फलानि तत्र भूरीणि पतन्ति पतितानि च ।
सन्ति किन्त्ववरुद्धानि धेनुकेन दुरात्मना ॥ २२ ॥
पडती ताड ते पक्व परी धेनुक दैत्य तो ।
राहतो दुष्ट नी तेथे रोधितो फळ खावया ॥ २२ ॥

तत्र - त्या अरण्यात - भूरीणि फलानि - पुष्कळ फळे - पतन्ति पतितानि च सन्ति - पडतात व पडलेलीही असतील - किन्तु - परंतु - दुरात्मना धेनुकेन - दुष्टबुद्धीच्या धेनुकाने - अवरुद्धानि (सन्ति) - रोधून ठेविली आहेत. ॥२२॥
तेथे ताडाची पुष्कळ फळे खाली पडतात आणि पडलेलीही आहेत. परंतु धेनुक नावाचा दुष्ट दैत्य ती घेऊ देत नाही. (२२)


सोऽतिवीर्योऽसुरो राम हे कृष्ण खररूपधृक् ।
आत्मतुल्यबलैरन्यैः ज्!जातिभिर्बहुभिर्वृतः ॥ २३ ॥
बंधुंनो गाढवा ऐशा रुपाने दैत्य राहतो ।
बलिष्ठ बहु हा दैत्य अन्य दैत्यहि रूपि त्या ॥ २३ ॥

हे रामकृष्ण - हे बलरामा, हे कृष्णा - खररूपधृक् - गाढवाचे रूप धारण करणारा - अतिवीर्यः सः असुरः - मोठा पराक्रमी असा तो असुर - आत्मतुल्यबलैः अन्यैः - आपल्यासारख्या बलाढय अशा दुसर्‍या - बहुभिः ज्ञातिभिः वृतः (अस्ति) - पुष्कळशा भाऊबंदांनी वेष्टिलेला असा आहे. ॥२३॥
हे रामा ! हे कृष्णा ! तो बलाढ्य दैत्य तेथे गाढवाच्या रूपात येऊन राहतो. त्याच्याबरोबर आणखीही पुष्कळसे त्याच्यासारखेच बलवान दैत्य त्याच रूपात तेथे राहतात. (२३)


तस्मात् कृतनराहाराद् भीतैर्नृभिरमित्रहन् ।
न सेव्यते पशुगणैः पक्षिसङ्‌घैर्विवर्जितम् ॥ २४ ॥
कितेक माणसे यांनी खावोनी टाकिली पहा ।
म्हणोनी माणसे पक्षी पशू तेथे न राहती ॥ २४ ॥

अमित्रहन् - हे शत्रुनाशका श्रीकृष्णा - कृतनराहारात् तस्मात् भीतैः - केले आहे मनुष्यांचे भक्षण ज्याने अशा त्याला भ्यालेल्या - नृभिः - मनुष्यांकडून - पशुगणैः पक्षिसंघैः च - पशुसमुदायांकडून व पक्षिकुलांकडून - विवर्जितं तत् - ओसाड असे ते अरण्य - न सेव्यते - सेविले जात नाही. ॥२४॥
शत्रूचा नाश करणार्‍या हे कृष्णा ! माणसांना खाणार्‍या त्या दैत्याच्या भितीने माणसे, इतकेच काय, पशु-पक्षीसुद्धा त्या जंगलात यात नाहीत. (२४)


विद्यन्तेऽभुक्तपूर्वाणि फलानि सुरभीणि च ।
एष वै सुरभिर्गन्धो विषूचीनोऽवगृह्यते ॥ २५ ॥
गंधीत फळ ते तेथे परी ना सेविले अम्ही ।
पहा ना ध्यान देवोनी गंध हा येतसे कसा ॥ २५ ॥

फलानि - फळे - अभुक्तपूर्वाणि सुरभीणि - पूर्वी केव्हाही न सेविलेली व सुगंधी अशी - विद्यन्ते - आहेत - वै विषूचीनः सुरभिः एषः गन्धाः - खरोखर सर्वत्र पसरलेला हा मनोहर सुवास - अवगृह्यते - सेविला जात आहे. ॥२५॥
त्याची फळे सुगंधित आहेत, परंतु आम्ही कधी ती खाल्ली नाहीत. चारी दिशांना पसरलेला त्यांचा सुगंध ध्यानात येतो. (२५)


प्रयच्छ तानि नः कृष्ण गन्धलोभित चेतसाम् ।
वाञ्छास्ति महती राम गम्यतां यदि रोचते ॥ २६ ॥
गंधाने मोहिले चित्त अवश्य खाउ द्या अम्हा ।
इच्छितो फळ ते आम्ही रुचेल तो चला तिथे ॥ २६ ॥

कृष्ण - हे कृष्णा - गन्धलोभितचेतसां नः - सुगंधाने लुब्ध झाली आहेत अन्तःकरणे ज्यांची अशा आम्हाला - तानि - ती फळे - प्रयच्छ - दे - राम - हे बलरामा - नः महती वाञ्छा अस्ति - आम्हाला फळे खाण्याची फारच इच्छा आहे - यदि रोचते गम्यतां - जर आमचे म्हणणे तुम्हाला आवडत असेल तर चला. ॥२६॥
हे श्रीकृष्णा ! त्यांच्या सुगंधाने आमचे मन मोहित झाले आहे. आणि ती मिळावीत, अशी फार इच्छा आहे. बलराम दादा ! आपली इच्छा असेल तर जाऊ या. (२६)


एवं सुहृद्वचः श्रुत्वा सुहृत् प्रियचिकीर्षया ।
प्रहस्य जग्मतुर्गोपैः वृतौ तालवनं प्रभू ॥ २७ ॥
ऐकता बळि नी कृष्ण प्रसन्न हासले तसे ।
ताडवनात ते दोघे गेले त्यांच्या सवे पहा ॥ २७ ॥

एवं सुहृद्वचः श्रुत्वा - याप्रमाणे मित्रांची भाषण ऐकून - सुहृत्प्रियचिकीर्षया - मित्रांचे प्रिय करण्याच्या इच्छेने - गोपैः वृतौ प्रभू - गोपांनी वेष्टिलेले ते समर्थ रामकृष्ण - प्रहस्य जग्मतुः - हसून जाण्यास निघाले. ॥२७॥
आपल्या मित्रंचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम, दोघेही हसले आणि त्यांची इच्छा पुरविण्यासाठी त्यांच्याबरोबर तालवनाकडे गेले. (२७)


बलः प्रविश्य बाहुभ्यां तालान् सम्परिकम्पयन् ।
फलानि पातयामास मतङ्‌गज इवौजसा ॥ २८ ॥
वनात बळि तो ताड हलवी कवटाळुनी ।
पाडिले फळ ही खूप हत्तीचे पिल्लु जैं करी ॥ २८ ॥

बलः - बलराम - ओजसा मतंगजःइव - बळाने माजलेल्या हत्तीसारखा - प्रविश्य - वनात शिरून - बाहुभ्यां तालान् संपरिकम्पयन् - दोन बाहूंनी ताडवृक्षांना गदगद हलवीत - फलानि पातयामास - फळे पाडिता झाला. ॥२८॥
त्या वनात जाऊन बलरामांनी हातांनी ती ताडाची झाडे हत्तीप्रमाणे जोराने हलवून फळे खाली पाडली. (२८)


फलानां पततां शब्दं निशम्यासुररासभः ।
अभ्यधावत् क्षितितलं सनगं परिकम्पयन् ॥ २९ ॥
गाढवे रुपि दैत्याने ऐकता शब्द ते तसे ।
पर्वतां पृथिवीलाही कंपिता धावला तिथे ॥ २९ ॥

असुररासभः - गाढवाचा वेष घेतलेला असुर - पततां फलानां शब्दं निशम्य - पडणार्‍या फळांचा शब्द ऐकून - सनगं क्षितितलं परिकम्पयन् - पर्वतांसह पृथ्वीला कापवीत - अभ्यधावत् - धावत आला. ॥२९॥
गाढवरूपी दैत्याने जेव्हा फळे पडल्याचा आवाज ऐकला, तेव्हा तो पर्वतांसह पृथ्वीचा थरकाप उडवीत तेथे धावत आला. (२९)


समेत्य तरसा प्रत्यग् द्वाभ्यां पद्‍भ्यां बलं बली ।
निहत्योरसि काशब्दं मुञ्चन् पर्यसरत् खलः ॥ ३० ॥
बलवान् दैत्य तो येता पाठचे पाय झाडुनी ।
छातीसी बळिच्या लाथा मारिता भुंकला पहा ॥ ३० ॥

खलः बली - दुष्ट व बलिष्ठ दैत्य - तरसा - वेगाने - समेत्य - येऊन - प्रत्यक् द्वाभ्याम् पद्भयां - मागच्या दोन तंगडयांनी - बलं उरसि निहत्य - बलरामाच्या उरावर प्रहार करून - काशब्दं मुञ्चन् - कुत्सित शब्द करीत - पर्यसरत् - सभोवार फिरू लागला. ॥३०॥
तो बलवान दुष्ट आवेशाने बलरामांसमोर आला आणि त्याने मागच्या पायांनी त्यांच्या छातीवर लाथा मारून खिंकाळत तेथून तो बाजूला सरकला. (३०)


पुनरासाद्य संरब्ध उपक्रोष्टा पराक् स्थितः ।
चरणौ अपरौ राजन् बलाय प्राक्षिपद् रुषा ॥ ३१ ॥
पुन्हाही पातला दैत्य क्रोधाने पाठ दावुनी ।
भुंकता मारिला लाथा बळीच्या अंगि त्या बळे ॥ ३१ ॥

राजन् - हे राजा - उपक्रोष्टा - गाढव - पुनः आसाद्य - पुनः येऊन - पराक् स्थितः - पाठ करून उभा राहिला - रुषा संरब्धः - रागाने क्षुब्ध होऊन - अपरौ चरणौ बलाय प्राक्षिपत् - मागील पाय बलरामावर झाडिता झाला ॥३१॥
राजन् ! तो गाढव क्रोधाने पुन्हा खिंकाळत बलरामांच्याजवळ आला आणि त्यांच्याकडे पाठ करून पुन्हा वेगाने त्याने आपल्या मागच्या पायांनी त्यांच्यावर लाथा झाडल्या. (३१)


स तं गृहीत्वा प्रपदोः भ्रामयित्वैकपाणिना ।
चिक्षेप तृणराजाग्रे भ्रामणत्यक्त जीवितम् ॥ ३२ ॥
बळीने एक हाताने धरिले पाय दोन ते ।
आकाशी फेकिला ताडी मेला दैत्य गधा तदा ॥ ३२ ॥

सः - तो बलराम - एकपाणिना प्रपदोः गृहीत्वा - एका हाताने दोन पाय धरून - भ्रामयित्वा - गरगर फिरवून - भ्रामणत्यक्तजीवितं तं - गरगर फिरविल्यामुळे ज्याचे प्राण निघून गेले आहेत अशा त्याला - तृणराजाग्रे - ताडाच्या झाडाच्या शिखरावर - चिक्षेप - फेकिता झाला ॥३२॥
बलरामांनी एकाच हातात त्याचे दोन्ही पाय धरले आणि त्याला अकाशात गरगर फिरवीत एका ताडाच्या झाडावर आपटले. फिरवीत असतानाच त्या गाढवाचे प्राण निघून गेले होते. (३२)


तेनाहतो महातालो वेपमानो बृहच्छिराः ।
पार्श्वस्थं कम्पयन् भग्नः स चान्यं सोऽपि चापरम् ॥ ३३ ॥
महान ताड वृक्षांना लागला मार हा असा ।
तडाड पडता तेणे कैक ताडहि मोडले ॥ ३३ ॥

तेन आहतः - त्याने ताडिलेला - बृहच्छिराः महातालः - मोठ्या विस्ताराचा तो मोठा ताडवृक्ष - वेपमानः - कापत - पार्श्वस्थं कम्पयन् भग्नः - जवळच्या वृक्षालाहि कापवीत मोडून पडला - सः च अन्यं (कंपयन् भग्नः) - तो वृक्ष दुसर्‍या वृक्षाला कापवीत मोडून पडला - सः अपि च अपरं - तो दुसरा वृक्षही तिसर्‍या वृक्षाला कापवीत पडता झाला ॥३३॥
त्याच्या आपटण्याने ज्याचा वरील भाग अतिशय विस्तृत होता असा तो महान ताडवृक्ष स्वतः कडकडाट करीत तुटून पडलाच, पण पडताना दुसर्‍या एका वृक्षालासुद्धा त्याने पाडले. दुसर्‍याने तिसर्‍याला, तिसर्‍याने चौथ्याला असे करीत पुष्कळसे ताडवृक्ष मोडून पडले. (३३)


बलस्य लीलयोत्सृष्ट खरदेहहताहताः ।
तालाश्चकम्पिरे सर्वे महावातेरिता इव ॥ ३४ ॥
बळीचे खेळणे जैसे परी सर्वचि ताड ते ।
हालले जणु वार्‍याने जोराचा फटका दिला ॥ ३४ ॥

बलस्य - बलरामाच्या - लीलया - लीलेने - उत्सृष्टखरदेहहताहताः - फेकिलेल्या गाढवाच्या शरीराने ताडिलेल्या ताडाने ताडिले गेलेले - सर्वे तालाः - सर्व ताडवृक्ष - महावातेरिताः इव - मोठ्या वादळाने हलविल्याप्रमाणे - चकम्पिरे - कापू लागले ॥३४॥
बलरामांनी लीलेने फेकून दिलेल्या गाढवाच्या शरेराच्या आघाताने तेथील सगळे ताडवृक्ष सोसाट्याच्या वार्‍याने हलावे तसे गदगदा हलले. (३४)


नैतच्चित्रं भगवति ह्यनन्ते जगदीश्वरे ।
ओतप्रोतमिदं यस्मिन् तन्तुष्वङ्‌ग यथा पटः ॥ ३५ ॥
भगवान् बलरामो तो स्वयंचि जगदीश्वर ।
त्याच्यात जग हे सारे वसले सूत वस्त्रि जै ॥ ३५ ॥

अङ्ग - हे राजा - जगदीश्वरे भगवति अनन्ते - त्रैलोक्याच्या व षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा बलरामाच्या ठिकाणी - एतत् - हे कृत्य - चित्रं नहि - आश्चर्यकारक नाही - यथा तन्तुषु पटः - जसे सुतांमध्ये वस्त्र - तथा - तसे - यस्मिन् इदं ओतप्रोतं (अस्ति) - ज्या ठिकाणी हे सर्व जग विणलेले आहे ॥३५॥
हे राजा ! जगदीश्वर अनंत भगवानांच्या बाबतीत यात आश्चर्य ते काय ! कारण वस्त्रामध्ये दोरे असावेत, त्याप्रमाणे हे सारे जग त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहे. (३५)

विवरण :- बलरामाने धेनुकासुरास गरगर फिरवून आपटून ठार केले. तो खाली पडल्यानंतर त्याच्या धक्क्याने जवळचे दोन-तीन तालवृक्ष उन्मळून पडले. (साध्या, सामान्य वेली नाही.) यावरून त्याच्या अजस्त्र देहाची कल्पना येते. पण अशा प्रचंड देहधारी राक्षसास ठार मारणे हे भगवंताच्या दृष्टीने अगदीच किरकोळ काम. कारण जो उभ्या-आडव्या धाग्यांनी विणलेल्या वस्त्राप्रमाणे असणारे महाप्रचंड विश्व आपल्या डोक्यावर लीलया धारण करतो, त्याला धेनुकासुरास मारणे अगदीच सोपे. (बलराम शेषावतार मानला जातो. त्या शेषाच्या डोक्यावर सर्व जगाचे ओझे आहे अशी कल्पना.) (३५)



ततः कृष्णं च रामं च ज्ञातयो धेनुकस्य ये ।
क्रोष्टारोऽभ्यद्रवन् सर्वे संरब्धा हतबान्धवाः ॥ ३६ ॥
धेनुकासुरबंधू ते सर्वच्या सर्व क्रोधले ।
गाढवे सगळी आली तुटोनी पडली द्वया ॥ ३६ ॥

ततः - नंतर - संरब्धाः हतबान्धवाः - रागावलेले व ज्यांचे बंधु मारले गेले आहेत असे - ये धेनुकस्य ज्ञातयः - जे धेनुकासुराचे भाऊबंद - (ते) सर्वेक्रोष्ट्रारः - ते सर्व गाढव - कृष्णं च रामं च - कृष्ण व राम ह्यांवर - अभ्यद्रवन् - चाल करून आले ॥३६॥
त्यावेळी धेनुकासुराचे बांधव गाढव, आपला नातलग मारला गेल्याचे पाहून क्रोधाने राम-कृष्णांवर आवेशाने तुटून पडले. (३६)


तान् तान् आपततः कृष्णो रामश्च नृप लीलया ।
गृहीतपश्चात् चरणान् प्राहिणोत्तृणराजसु ॥ ३७ ॥
जो जो येईल त्यालाही कृष्ण नी बलरामने ।
पायांना पकडोनीया ताडांशी मारले असे ॥ ३७ ॥

नृप - हे राजा - कृष्णः रामः च - कृष्ण व बलराम - आपततः तान् तान् - अंगावर चालून येणार्‍या त्या त्या असुरांना - लीलया गृहीतपश्चाश्चरणान् - सहजरीतीने धरिले आहेत मागील पाय ज्यांचे अशा रीतीने - तृणराजसु प्राहिणोत् - ताडाच्या वृक्षांवर फेकिते झाले ॥३७॥
राजन् ! त्यांच्यापैकी जे जे कोणी जवळ आले, त्यांना बलराम आणि श्रीकृष्णांनी अगदी सहजगत्या मागचे पाय पकडून ताडवृक्षांवर आपटले. (३७)


फलप्रकरसङ्‌कीर्णं दैत्यदेहैर्गतासुभिः ।
रराज भूः सतालाग्रैः घर्घनैरिव नभस्तलम् ॥ ३८ ॥
फळांनी झाकली भूमी प्रेतांनी ताड झाकले ।
आकाशा ढग जै झाकी शोभा ती भासली तशी ॥ ३८ ॥

फलप्रकरसंकीर्णा - फळांच्या राशींनी व्याप्त झालेली - भूः - पृथ्वी - घनैःनभस्तलम् इव - मेघांनी आच्छादिलेल्या आकाशाप्रमाणे - सतालाग्रैः गतासुभिः दैत्यदेहैः - ताडाच्या शिखरांसह मरून पडलेल्या दैत्यांच्या देहांनी - रराज - शोभली ॥३८॥
त्यावेळी तेथे जमिनीवर चहूकडे पसरलेली ताडाची फळे, तुटून पडलेले वृक्ष व दैत्यांची प्रेते यांनी जमीन आच्छादली गेली. ढगांमुळे आकाश झाकोळून जावे तसे. (३८)


तयोस्तत् सुमहत् कर्म निशम्य विबुधादयः ।
मुमुचुः पुष्पवर्षाणि चक्रुर्वाद्यानि तुष्टुवुः ॥ ३९ ॥
कृष्ण नी बलरामाची लीला पाहूनि देवता ।
वाहती पुष्प नी गाती स्तुती नी वाद्य वाजले ॥ ३९ ॥

विबुधादयः - देव आदिकरून मंडळी - तयोः तत् सुमहत् कर्म निशम्य - त्यांचे ते अत्यंत मोठे कृत्य ऐकून - पुष्पवर्षाणि मुमुचुः - फुलांची वृष्टि करते झाले - वाद्यानि चक्रुः - वाद्ये वाजविते झाले - तुष्टुवुः - स्तुती करिते झाले ॥३९॥
त्यांचा हा महान पराक्रम पाहून देव त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वाद्ये वाजवून स्तुति करू लागले. (३९)


अथ तालफलान्यादन् मनुष्या गतसाध्वसाः ।
तृणं च पशवश्चेरुः हतधेनुककानने ॥ ४० ॥
मारिता धेनुकासूरा निर्भयी लोक जाहले ।
वनात फळ ते खाती गायी ही चरल्या पहा ॥ ४० ॥

अथ - नंतर - गतसाध्वसाः मनुष्याः - निर्भय झालेले लोक - तालफलानि आदन् - ताडाची फळे खाते झाले - पशवः च - आणि गाई - हतधेनुककानने - नष्ट केला आहे धेनुकासुर ज्यातून अशा त्या अरण्यात - तृणं चेरुः - गवत खात फिरु लागल्या ॥४०॥
ज्या दिवशी धेनुकासुर मेला, त्या दिवसापासून लोक निर्भय होऊन त्या वनातील ताडफळे खाऊ लागले आणि जनावरे स्वच्छंदपणे चरू लागली. (४०)


कृष्णः कमलपत्राक्षः पुण्यश्रवणकीर्तनः ।
स्तूयमानोऽनुगैर्गोपैः साग्रजो व्रजमाव्रजत् ॥ ४१ ॥
भगवान् पंकजाक्षोनी बल जो वज्रि पातला ।
स्तुती गोपाळ ते गाती पवित्र कीर्तनीय जी ॥ ४१ ॥

कमलपत्राक्षः - कमळाच्या पानांप्रमाणे डोळे आहेत ज्याचे असा - पुण्यश्रवणकीर्तनः - पुण्यकारक आहे श्रवण व कीर्तन ज्याचे असा - अनुगैः गोपैः स्तूयमानः - अनुचर अशा गोपांनी स्तविलेला - कृष्णः - श्रीकृष्ण - साग्रजः - ज्येष्ठ भाऊ जो बलराम त्यासह - व्रजम् आविशत् - गोकुळात शिरला ॥४१॥
त्यानंतर ज्यांचे श्रवण-कीर्तन पुण्यकारक आहे, असे कमलदलाप्रमाणे डोळे असलेले श्रीकृष्ण ज्येष्ठ बंधू बलरामांसह व्रजामध्ये आले. त्यावेळी त्यांचे साथीदार त्यांच्याबरोबर त्यांची स्तुती करीत निघाले होते. (४१)


( वसंततिलका )
तं गोरजश्छुरितकुन्तलबद्धबर्ह
     वन्यप्रसूनरुचिरेक्षणचारुहासम् ।
वेणुं क्वणन्तमनुगैरुपगीतकीर्तिं
     गोप्यो दिदृक्षितदृशोऽभ्यगमन् समेताः ॥ ४२ ॥
( वसंततिलका )
श्रीकृष्णकेश मळले रजि गोखुरांच्या
     तो मोरपंख मुकुटी अन हास्य मोही ।
तो वाजवी मुरलि नी स्तुति गाति गोप
     ऐकोनि गोपि जमल्या बघण्यास कृष्णा ॥ ४२ ॥

दिदृक्षितदृशः गौप्यः - ज्यांच्या दृष्टी कृष्णदर्शनाविषयी उत्कंठित झाल्या आहेत अशा गोपी - समेताः - एकत्र जमून - गोरजश्छुरितकुंतलबद्धबर्हवन्यप्रसून - गाईच्या पायधुळीने रंगलेल्या केसात खोविलेली जी मोरांची पिसे व रानफुले - रुचिरेक्षणचारुहासम् - त्यामुळे शोभत आहेत सुंदर नेत्र व मनोहर हास्य ज्याचे असा - वेणुं क्वणन्तं - मुरली वाजविणारा - अनुगैः अनुगीतकीर्तिं - अनुचर अशा गोपांनी गाईली आहे कीर्ति ज्याची अशा - तं अभ्यगमन् - त्या श्रीकृष्णाला सामोर्‍या आल्या ॥४२॥
त्यावेळी श्रीकृष्णांच्या कुरळ्या केसांवर गाईंच्या खुरांनी उडालेली धूळ पसरली होती, मस्तकावर मोरपंखांचा मुगुट होता आणि केसांमध्ये जंगली रानफुले घातलेली होती. त्यांचे पाहणे आकर्षक असून चेहर्‍यावर मनोहर स्मितहास्य होते. ते बासरी वाजवीत होते आणि त्यांचे सवंगडी त्यांची कीर्ति गात होते. बासरीचा आवाज ऐकूत गोपी एकाच वेळी घरांतून बाहेर आल्या. केव्हापासून त्यांचे डोळे श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. (४२)


पीत्वा मुकुन्दमुखसारघमक्षिभृङ्‌गैः
     तापं जहुर्विरहजं व्रजयोषितोऽह्नि ।
तत्सत्कृतिं समधिगम्य विवेश गोष्ठं
     सव्रीडहासविनयं यदपाङ्‌गमोक्षम् ॥ ४३ ॥
नेत्रो रुपी भ्रमर तेचि मुखारविंदी
     पीवूनिया रस नि ते मग तृप्त झाले ।
स्वीकारुनीहि हरि तो तिरक्याच दृष्टी
     ते लाजणे विनय ते व्रजि पातला की ॥ ४३ ॥

व्रजयोषितः - गोकुळातील स्त्रिया - अक्षिभृङ्गैः - नेत्ररूपी भ्रमरांनी - मुकुन्दमुखसारघं पीत्वा - श्रीकृष्णाच्या मुखकमळातील पुष्परस पिऊन - अह्रि विरहजं तापं जहुः - दिवसा श्रीकृष्णविरहामुळे झालेला ताप दूर करित्या झाल्या - सव्रीडहासविनयं - लज्जायुक्त मंद हास्य व नम्रपणा ज्यात आहे - यदपाङगमोक्षं तत्सकृतिं - असे जे गोपींचे कटाक्षदर्शन तद्रूप सत्काराला - समधिगम्य - मिळवून - कृष्णः - कृष्ण - गोष्ठं विवेश - गोठयात शिरला. ॥४३॥
गोपींनी, नेत्ररूप भ्रमरांनी भगवंतांच्या मुखरविंदाच्या मधाचे पान करून दिवसभराच्या विरहाची आग शांत केली; आणि भगवंतांनी सुद्धा त्यांचे लज्जायुक्त हास्य आणि विनययुक्त नेत्रकटाक्षांनी केलेला सत्कार स्वीकारून व्रजामध्ये प्रवेश केला. (४३)


( अनुष्टुप् )
तयोर्यशोदारोहिण्यौ पुत्रयोः पुत्रवत्सले ।
यथाकामं यथाकालं व्यधत्तां परमाशिषः ॥ ४४ ॥
( अनुष्टुप् )
वात्सल्य हृदयी दाटे यशोदा रोहिणीचिया ।
येताच राम श्यामो तैं यथोपचार तृप्तिले ॥ ४४ ॥

पुत्रवत्सले यशोदारोहिण्यौ - पुत्रांवर प्रेम करणार्‍या यशोदा व रोहिणी - यथाकामं यथाकालं - इच्छेनुसार व कालानुरूप - तयोः पुत्रयोः - बलराम व श्रीकृष्ण ह्या दोन पुत्रांना - परमाशिषः व्यधत्तां - उत्तम आशीर्वाद देत्या झाल्या. ॥४४॥
त्यावेळी प्रेमळ यशोदा आणि रोहिणी यांनी त्यांना त्यावेळी देण्याजोग्या वस्तू हव्या तेवढ्या दिल्या. (४४)


गताध्वानश्रमौ तत्र मज्जनोन्मर्दनादिभिः ।
नीवीं वसित्वा रुचिरां दिव्यस्रग् गन्धमण्डितौ ॥ ४५ ॥
उटणे तेल लावोनी स्नान ते घातले असे ।
थकवा दूर तो झाला ल्यालेही वस्त्र ते पुन्हा ।
घातल्या दिव्य त्या माळा अंगी चंदन लाविले ॥ ४५ ॥

तत्र - तेथे - मज्जनोन्मर्दनादिभिः - स्नान व अंग चोळणे इत्यादि क्रियांनी - गताध्वानश्रमौ - ज्यांचे मार्गातील श्रम नाहीसे झाले आहेत असे ते दोघे - रुचिरां नीवीं वसित्वा - सुंदर वस्त्रे नेसवून - दिव्यस्रग्गन्धमण्डि तौ (कृतौ) - ताज्या फुलांच्या माळा व सुगंधी द्रव्ये ह्यांनी शोभिवंत केले. ॥४५॥
नंतर तेल-उटणे लावून त्यांना स्नान घातले. त्यामुळे त्यांचा दिवसभरातील हिंडण्या-फिरण्याने आलेला शीण नाहीसा झाला. नंतर त्यांना सुंदर कपडे घालून, गंध लावून सुगंधी फुलांच्या माळा घातल्या. (४५)


जनन्युपहृतं प्राश्य स्वाद्वन्नं उपलालितौ ।
संविश्य वरशय्यायां सुखं सुषुपतुर्व्रजे ॥ ४६ ॥
बधुंनी मग ते केले स्वादिष्ट भोजनो पहा ।
माता झोपविती बाळां करोनी लाड सर्वही ॥ ४६ ॥

व्रजे - गोकुळात - जनन्यपहृतं - मातांनी आणिलेले - स्वाद्वन्नं प्राश्य - मधुर अन्न सेवन करून - उपलालितौ (तौ) - खेळविले गेलेले ते दोघे राम व कृष्ण - वरशय्यायां - उत्तम बिछान्यावर - संविश्य - पडून - सुखं सुषुपतुः - सुखाने झोप घेते झाले. ॥४६॥
त्यानंतर दोघेही मातांनी वाढलेले स्वादिष्ट अन्न जेवले. त्यापाठोपाठ लडिवाळपणे त्यांना थोपटून आईंनी सुंदर अंथरुणावर झोपविले. तेव्हा ते आरामात झोपी गेले. (४६)


एवं स भगवान् कृष्णो वृन्दावनचरः क्वचित् ।
ययौ राममृते राजन् कालिन्दीं सखिभिर्वृतः ॥ ४७ ॥
एकदा कृष्ण गोपांच्या सह तो यमुना तटीं ।
पातला करिता लीला नव्हता बल तेधवा ॥ ४७ ॥

एवं - याप्रमाणे - वृन्दावनचरः - याप्रमाणे वृंदावनात हिंडणारा - सः भगवान् कृष्णः - तो षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - क्वचित् - एके दिवशी - रामम् ऋते - रामाशिवाय - सखिभिः वृतः - आपले मित्र जे गोप त्यांनी वेष्टिलेला असा - कालिन्दिं ययौ - यमुनेच्या काठी गेला. ॥४७॥
हे राजा ! अशा प्रकारे वृंदावनात राहात असता एके दिवशी श्रीकृष्ण बलरामाखेरीज इतर मित्रांना बरोबर घेऊन यमुनेवर गेले. (४७)


अथ गावश्च गोपाश्च निदाघातपपीडिताः ।
दुष्टं जलं पपुस्तस्याः तृष्णार्ता विषदूषितम् ॥ ४८ ॥
ग्रीष्माच्या घाम घामाने गाई गोपाळ त्रासले ।
तृष्णेने शोषले कंठ विषारी जळ ते पिले ॥ ४८ ॥

अथ - नंतर - निदाघातपपीडितः - उन्हाळ्यातील उन्हाने पीडिलेल्या - गावः च गोपाः च - गाई व गोप - तृषार्ताः - तहानेने व्याकुळ होऊन - तस्याः विषदूषितं - त्या यमुनेचे विषाने वाईट झालेले - जुष्टं जलं - पाणी पिते झाले. ॥४८॥
त्यावेळी उन्हाळ्यातील उन्हाने गाई आणि गोपाल तहानेने व्याकुळ झाल्यामुळे यमुना नदीचे विषारी पाणी प्याले. (४८)


विषाम्भस्तदुपस्पृश्य दैवोपहतचेतसः ।
निपेतुर्व्यसवः सर्वे सलिलान्ते कुरूद्वह ॥ ४९ ॥
दैवाने वश ते झाले यमुना जळ पीउनी ।
प्राणहीन असे झाले पडले यमुना तिरी ॥ ४९ ॥

कुरुद्वह - हे परीक्षित राजा - दैवोपहतचेतसः - दुर्दैवाने ज्यांची बुद्धी गांगरून गेली आहे असे - सर्वे - ते सर्व गोप व गाई - तत् विषाम्भः उपस्पृश्य - ते विषाने दूषित झालेले उदक पिऊन - सलिलान्ते व्यसवः निपेतुः - पाण्याच्या समीप मरून पडले. ॥४९॥
परीक्षिता ! दैववशात लक्षात न आल्यामुळे ते विषारी पाणी पिताच सर्व गाई आणि गोपाळ निश्चेष्ट होऊन यमुनेचा काठीच पडले. (४९)


वीक्ष्य तान्वै तथा भूतान् कृष्णो योगेश्वरेश्वरः ।
ईक्षयामृतवर्षिण्या स्वनाथान् समजीवयत् ॥ ५० ॥
कृष्णाने वेणुनादाने तसे अमृतदृष्टिने ।
दिधले प्राण ते त्यांना त्यांचा एकचि स्वामि हा ॥ ५० ॥

योगेश्वरेश्वरः कृष्णः - मोठमोठया योग्यांचाही अधिपती असा श्रीकृष्ण - तथाभूतान् वै तान् वीक्ष्य - तशा रीतीने खरोखर मृत झालेल्या त्यांना पाहून - अमृतवर्षिण्या ईक्षया - अमृताचा वर्षाव करणार्‍या दृष्टीने - स्वनाथान् - आपणच ज्याचे रक्षक आहोत - समजीवयत् - अशा त्यांना जिवंत करिता झाला. ॥५०॥
त्यांना त्या अवस्थेत पाहून योगेश्वरांचेसुद्धा ईश्वर असणार्‍या श्रीकृष्णांनी आपल्या अमृतवर्षाव करणार्‍या दृष्टीने त्यांना जिवंत केले. कारण त्यांचे रक्षणकर्ते श्रीकृष्णच होते ना ! (५०)


ते सम्प्रतीतस्मृतयः समुत्थाय जलान्तिकात् ।
आसन् सुविस्मिताः सर्वे वीक्षमाणाः परस्परम् ॥ ५१ ॥
चैतन्य पातता देही सारेचि उठले पुन्हा ।
एकमेकांकडे सारे आश्चर्ये बघु लागले ॥ ५१ ॥

संप्रतीतस्मृतयः ते सर्वे - तत्काळ आली आहे स्मृति ज्यांना असे ते सर्व - जलान्तिकात् समुत्थाय - पाण्याच्या तीरावर उठून - सुविस्मिताः - अत्यंत आश्चर्यचकित झालेले असे - परस्परं वीक्षमाणाः आसन् - एकमेकांकडे पाहत राहिले. ॥५१॥
तेव्हा शुद्धीवर आल्यावर ते सर्वजण पाण्याजवळच उठून उभे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. (५१)


अन्वमंसत तद् राजन् गोविन्दानुग्रहेक्षितम् ।
पीत्वा विषं परेतस्य पुनरुत्थानमात्मनः ॥ ५२ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
राजा अंती तया झाला मरणाचाचि बोध तो ।
कृपेने पाहता कृष्णे सर्वांना जगवीयले ॥ ५२ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

राजन् - हे परीक्षित राजा - ननु - खरोखर - विषं पीत्वा परेतस्य आत्मनः - विष पिऊन मृत झालेल्या आपले - तत् पुनःउत्थानं - ते पुनः उठणे - गोविन्दानुग्रहेक्षितं - श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीचे फळ - अमंसत - मानिते झाले. ॥५२॥
राजा ! विषारी पाणी प्यालामुळे मरूनही श्रीकृष्णांच्या कृपादृष्टीनेच आपला पुनर्जन्म झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (५२)


अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP