|
श्रीमद् भागवत पुराण
गोकुले भगवतो जातकर्मादि महोत्सवः, गोकुळात भगवंतांचा जन्म-महोत्सव - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
( अनुष्टुप् )
श्रीशुक उवाच - नन्दस्त्वात्मज उत्पन्ने जाताह्लादो महामनाः । आहूय विप्रान् वेदज्ञान् स्नातः शुचिरलंकृतः ॥ १ ॥ वाचयित्वा स्वस्त्ययनं जातकर्मात्मजस्य वै । कारयामास विधिवत् पितृदेवार्चनं तथा ॥ २ ॥
( अनुष्टुप् ) श्री शुकदेव सांगतात - उदार बुद्धिमान होते नंदबाबा परिक्षिता ! । अपार हर्ष त्यां झाला ऐकोनी पुत्र जन्म तो । केले स्नान तयांनी नी ल्याले ते वस्त्र भूषणे ॥ १ ॥ वेदज्ञ द्विज आणोनी स्वस्तिवाचन जाहले । विधीने देवता पित्रे पूजिले जातकर्म ही ॥ २ ॥
महामनाः नंदः तु - उदार अंतःकरणाचा नंद तर - आत्मजे उत्पन्ने - मुलगा झाला असता - जाताह्रादः स्नातः - ज्याला आनंद झाला आहे असा स्नान करुन - शुचिः अलंकृतः - शुद्ध होऊन व अलंकार धारण करून - दैवज्ञान् विप्रान् आहूय - ज्योतिषी ब्राह्मणांना बोलावून - स्वस्त्ययनं वाचयित्वा - त्यांकडून पुण्याहवाचन करवून - वै आत्मजस्य जातकर्म - मुलाचे जातकर्म - तथा पितृदेवार्चनं - तसेच पितर व देवता यांचे पूजन - विधिवत् कारयामास - यथाविधि करविता झाला. ॥१-२॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - उदार नंदमहाराजांना मुलगा झाल्याचे कळताच अतिशय आनंद झाला. त्यांनी स्नान केले आणि पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार परिधान केले. नंतर वेदवेत्त्या ब्राह्मणांना बोलावून पुण्याहवाचन करवून आपल्या पुत्राचा जातकर्म-संस्कार केला. त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधिपूर्वक पूजा केली. (१-२)
विवरण :- आपल्याला पुत्र झाल्याची वार्ता ऐकून नंद अत्यंत आनंदित झाला. त्याने ब्राह्मणांकरवी 'स्वस्त्ययन' आणि 'जातकर्म' केले. वेदांमधील अनेक मंत्रात 'स्वस्ति स्वस्ति' या पदाचा वापर आढळतो (स्वस्ति = कल्याण; अयन = विशिष्ट प्रकारचा यज्ञ.) 'स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः'............. हा श्लोक प्रसिद्ध आहे. 'स्वस्ति शब्द = अविनाशवचनः स्वस्त्ययनः।' (आमचे कल्याण होवो, अमरत्व राहो.) थोडक्यात, नूतन बालकाच्या आगमनाने त्याच्यासह सर्वांचे कल्याण होवो, शुभ होवो, या भावनेतून केला जाणारा यज्ञ. जातकर्म - 'पत्रिका' असाही अर्थ होतो. वडिलांनी मुलाला प्रथम पाहण्यापूर्वी ज्योतिषाकडून त्याची पत्रिका करवून, त्याचे भविष्य समजून घेण्याची पूर्वी पद्धत होती. (यावरून एकच लक्षात येते नूतन बाळाच्या त्यातूनही पुत्राच्या आगमनाने गोकुळात आनंदीआनंद तर झालाच, पण विधियुक्त संस्कार केल्याने पावित्र्याचे वातावरणही निर्माण झाले.) जातकर्म - पित्याच्या वीर्यातून आणि मातेच्या गर्भातून काही दोष बालकात येण्याची शक्यता असते. ते दोष जाण्यासाठी जातकर्म संस्कार केला जातो. याचे वर्णन आयुर्वेदाचार्य चरक व सुश्रुत यानीही केले आहे. सर्व संस्कार करून देवतापूजन व दानधर्म इत्यादि विधी केले जातात. (२)
धेनूनां नियुते प्रादाद् विप्रेभ्यः समलंकृते ।
तिलाद्रीन् सप्त रत्नौघ शातकौंभांबरावृतान् ॥ ३ ॥
सोनेरी वस्त्र झाकोनी तिळाचे सात पर्वते । वस्त्र आभूषणे सज्ज द्वी लक्ष गायि दानिल्या ॥ ३ ॥
समलंकृते धेनूनां नियुते - उत्तम रीतीने अलंकृत केलेल्या दोन लक्ष गाई - रत्नौघशातकौंभांबरावृतान् - अनेक रत्ने, सुवर्ण आणि वस्त्रे यांनी आच्छादिलेल्या - सप्त तिलाद्रीन् (च) - तिळांच्या सात राशी - विप्रेभ्यो प्रादात् - ब्राह्मणांना देता झाला. ॥३॥
त्यांनी ब्राह्मणांना वस्त्रालंकारांनी सुशोभित दोन लाख गाई दान दिला. तसेच रत्ने आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळांचे सात ढीग दान दिले. (३)
कालेन स्नानशौचाभ्यां संस्कारैः तपसेज्यया ।
शुध्यन्ति दानैः सन्तुष्ट्या द्रव्याण्यात्माऽऽत्मविद्यया ॥ ४ ॥
समयो स्नान शौचो नी संस्कारे नि तपे यजे । दाने संतोष द्वव्याने सुद्धी होते तशीच ती । आत्म्याची शुद्धी तै होते आत्मज्ञान करोनिया ॥ ४ ॥
द्रव्याणि कालेन - निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ काही काळाने, - स्नानशौचाभ्यां - काही स्नानाने, काही धुण्याने, - संस्कारैः तपसा - काही संस्काराने, काही तपश्चर्येने, - इज्यया दानैः - काही यज्ञाने, काही दानाने - संतुष्ट्या शुद्ध्यन्ति - व काही संतोषवृत्तीने असे शुद्ध होतात - (तत्र) आत्मा आत्मविद्यया (शुद्ध्यति) - त्यांत जीवात्मा आत्मज्ञानाने शुद्ध होतो. ॥४॥
कालगतीने (नवीन पाणी, अशुद्ध भूमी इ.), स्नानाने (शरीर इ.) तपश्चर्येने (इंद्रिये इ.) संस्कारांनी (गर्भ इ.) यज्ञाने (ब्राह्मण इ.) दानाने (धन, धान्य इ.) आणि संतोषाने (मन इ.) द्रव्ये शुद्ध होतात. आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानाने होते. (४)
विवरण:- नंदाने दानधर्मही भरपूर प्रमाणात केला. दानाने धनशुद्धी होते, ही कल्पना. (ज्या धनाचा विनियोग पुढे त्या बालकासाठी केला जाणार आहे, ते शुद्ध हवे, अशीही त्यामागे भावना असावी.) काही काळाने वस्तू शुद्ध होतात. १० दिवसांनी घर, स्नानाने देह, जातकर्म संस्काराने अपत्य, तप-मंत्राने गृहदेवता, समाधानाने मन, दानाने धन-धान्य इत्यादिची शुद्धी होते. (घरामधे व्यक्ती मृत झाल्यास १० दिवस सुतक व नवीन बाळाचा जन्म झाल्यास १० दिवस सोयर पाळण्याची पद्धत यामुळेच पडली असावी.) (३-४)
सौमंगल्यगिरो विप्राः सूतमागधवन्दिनः ।
गायकाश्च जगुर्नेदुः भेर्यो दुन्दुभयो मुहुः ॥ ५ ॥
द्विजे पौराणिके भाटे ठाकरे स्तुति गायिली । गायके गायिली गाणी भेरी दुंदुभि वाजल्या ॥ ५ ॥
विप्राः सूतमागधबंदिनः - ब्राह्मण, पौराणिक, वंशांचे वर्णन करणारे आणि स्तुतिपाठक - सौमंगल्यगिरः बभूवुः - चांगले मंगलयुक्त भाषण करिते झाले - गायकाः जगुः - गवई गाते झाले - भेर्यः दुंदुभयः च मुहुः नेदुः - आणि भेरी व दुंदुभी वारंवार वाजल्या. ॥५॥
त्यावेळी ब्राह्मण, मंगलमय आशीर्वाद देऊ लागले. पौराणिक, वंशाचे वर्णन करणारे व स्तुतिपाठक स्तुती करू लागले. गायक गाऊ लागले. भेरी आणि दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. (५)
व्रजः सम्मृष्टसंसिक्त द्वाराजिरगृहान्तरः ।
चित्रध्वज पताकास्रक् चैलपल्लवतोरणैः ॥ ६ ॥
गोकुळी सर्व ती दारे अंगणे चौक सर्व ते । झाडिले शिंपिली गंधे पताका शोभल्या पहा । गुढ्या उभारिल्या आणि तोरणे लाविली किती ॥ ६ ॥
व्रजः - गोकुळ - संमृष्टसंसिक्तद्वाराजिरगृहांतरः - झाडलेली व सारविलेली आहेत द्वारे, अंगणे व घरे ज्यांतील असे - चित्रध्वजपताकास्रक्चैल - चित्रविचित्र ध्वज, पताका, माळा, वस्त्रे, - पल्लवतोरणै (भूषितः) च - पल्लव आणि तोरणे यांनी विभूषित असे - बभूव - झाले. ॥६॥
गोकुळातील सर्व घरांची दारे, अंगणे आणि आतील भाग झाडून पुसून घेतले गेले. त्यामध्ये सुगंधीत द्रव्ये शिंपडली गेली. त्यांना ध्वज, पताका, फुलांच्या माळा, रंगी-बेरंगी वस्त्रे आणि झाडांच्या पानांच्या तोरणांनी सजविले गेले. (६)
गावो वृषा वत्सतरा हरिद्रातैलरूषिताः ।
विचित्र धातुबर्हस्रग् वस्त्रकाञ्चनमालिनः ॥ ७ ॥
धेनु वत्स तसे बैल हल्दी तैलेहि लेपिले । गेरू मोरपिसे घंटा पुष्पे नी वस्त्र साजिरे । सोनेरी म्होरक्या यांनी सर्व ते सजवीयले ॥ ७ ॥
गावः वृषाः वत्सतराः - गाई, बैल आणि वासरे - हरिद्रातैलरूषिताः - हळद व तेल यांनी माखलेली - विचित्रधातुबर्हस्रग्वस्त्र - चित्रविचित्र रंगांनी मढविलेली मोराच्या पिसांनी - कांचनमालिनः (बभूवुः) - व सोन्याच्या अलंकारांनी शोभणारी अशी झाली. ॥७॥
गाई, बैल आणि वासरांच्या अंगांना हळद तेलाचा लेप दिला गेला आणि त्यांना गेरूने रंगविले. तसेच मोरपंख, फुलांचे हार, तर्हेतर्हेची सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविले गेले. (७)
महार्हवस्त्राभरण कञ्चुकोष्णीषभूषिताः ।
गोपाः समाययू राजन् नानोपायनपाणयः ॥ ८ ॥
परीक्षित् ! सर्व गोपाळ किमती वस्त्र दागिने । अंगर्खे पगड्या ल्याले भेटी घेवोनि पातले ॥ ८ ॥
राजन् - हे राजा - महार्हवस्त्राभरणकंचुकोष्णीषभूषिताः - अत्यंत मौल्यवान वस्त्रे, अलंकार, अंगरखे व पागोटी यांनी भूषित झालेले - नानोपायनपाणयः - व अनेकप्रकारचे भेटीचे पदार्थ हातांत घेतलेले असे - गोपाः - गवळी - (नंदं) समाययुः - नंदाकडे आले. ॥८॥
राजा ! सर्व गोप बहुमूल्य वस्त्रे, अलंकार, अंगरखे आणि पगड्यांनी नटून थटून हातात नजराणे घेऊन नंदांच्या घरी आले. (८)
गोप्यश्चाकर्ण्य मुदिता यशोदायाः सुतोद्भवम् ।
आत्मानं भूषयां चक्रुः वस्त्राकल्पाञ्जनादिभिः ॥ ९ ॥
गोपी आनंदल्या सार्या ऐकता पुत्रजन्म तो । केला शृंगार त्यांनी तै वस्त्र भूषण काजळे ॥ ९ ॥
यशोदायाः सुतोद्भवं आकर्ण्य - यशोदेच्या मुलाचा जन्म झालेला ऐकून - मुदिताः - आनंदित झालेल्या - गोप्यः च - गोपीही - आत्मानं वस्त्राकल्पांजनादिभिः - स्वतःला वस्त्रे, अलंकार, काजळ इत्यादिकांनी - भूषयांचक्रुः - शोभवित्या झाल्या. ॥९॥
यशोदेला पुत्र झाला हे ऐकून गोपींनासुद्धा अतिशय आनंद झाला. त्यांनी वस्त्रे, अलंकार आणि डोळ्यात काजळ वगैरे घालून त्या नटल्या. (९)
नवकुंकुमकिञ्जल्क मुखपंकजभूतयः ।
बलिभिस्त्वरितं जग्मुः पृथुश्रोण्यश्चलत्कुचाः ॥ १० ॥
मुखीं आनंद ओसंडे कुंकू जै पद्मकेशर । मोठाल्या कमरा त्यांच्या भेटवस्तूसि घेउनी । यशोदागेहि धावोनी येताना स्तन हालती ॥ १० ॥
नवकुंकुमकिंजल्क - ताज्या केशराच्या तंतूंनी - मुखपंकजभूतयः - मुखकमलावर शोभा आली आहे ज्यांच्या अशा, - पृथुश्रोण्यः - ज्यांचा कटिप्रदेश विस्तीर्ण आहे - चलत्कुचाः (ताः गोप्यः) - अशा व हालत आहेत स्तन ज्यांचे अशा त्या गोपी - बलिभिः त्वरितं (यशोदां) जग्मुः - वायनासह त्वरेने यशोदेच्या घरी गेल्या. ॥१०॥
गोपींची मुखकमले नुकत्याच लावलेल्या कुंकूरूपी परागांनी अतिशय सुंदर दिसत होती. मोठमोठ्या नितंब असलेल्या त्या, भेटवस्तू घेऊन लगबगीने यशोदेकडे गेल्या; त्यामुळे त्यांची वक्षःस्थळे हालत होती. (१०)
( वसंततिलका )
गोप्यः सुमृष्टमणिकुण्डल निष्ककण्ठ्यः । चित्राम्बराः पथि शिखाच्युतमाल्यवर्षाः । नन्दालयं सवलया व्रजतीर्विरेजुः व्यालोलकुण्डल पयोधरहारशोभाः ॥ ११ ॥
( वसंततिलका ) कानात कुंडल तसे मणिहार कंठी रंगीत वस्त्र, चलता फुल वेणिची ती । मार्गी गळोनि पडती हलती पयोद त्या नंदजी सदनिची अशि दिव्य शोभा ॥ ११ ॥
नंदालयं व्रजंत्यः गोप्यः - नंदाच्या घरी जाणार्या गोपी - सुमृष्टमणिकुंडलनिष्ककंठयः - ज्यांच्या कंठात स्वच्छ व तेजस्वी रत्नांची कुंडले - चित्रांबराः - व पुतळ्याच्या माळा आहेत अशा - सवलयाः - ज्यांच्या हातात कंकणे आहेत अशा - व्यालोलकुंडल - व हालणार्या कुंडलांनी, - पयोधरहारशोभाः - स्तनांनी व त्यांजवरील मुक्ताहारांनी ज्या अधिकच सुंदर दिसत आहेत - विरेजुः - अशा शोभल्या. ॥११॥
गोपींच्या कानांमध्ये चमकणार्या वस्त्रांची कुंडले झगमगत होती. गळ्यामध्ये सुवर्णाहार चमचम करीत होते. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. त्यांनी वेण्यांमध्ये घातलेली फुले वाटेत ओघळून पडत होती. हातामध्ये बांगड्या चमकत होत्या. लगबगीमुळे त्यांच्या कानांतील कुंडले, वक्षःस्थळे आणि हार हलत होते. अशा प्रकारे नंदांच्या घरी जाताना त्यांची आगळीच शोभा दिसत होती. (११)
( अनुष्टुप् )
ता आशिषः प्रयुञ्जानाः चिरं पाहीति बालके । हरिद्राचूर्णतैलाद्भिः सिञ्चन्त्यो जनमुज्जगुः ॥ १२ ॥
( अनुष्टुप् ) नंदबाबा घरी जाता बाळा पाहोनि बोलले । भगवान् रक्षि तू बाळा ! बाळा तू चिरजीवि हो । हळदी तेल नी पाणी सिंचिता गान जाहले ॥ १२ ॥
बालके चिरं पाहि इति - बालकाला चिरकाल प्रजांचे रक्षण कर - आशिषःप्रयुञ्जानाः ताः - असे आशिर्वाद देणार्या त्या गोपी - जनं हरिद्राचूर्णतैलाद्भिः - लोकांवर हळद, तेल व पाणी - सिंचंत्यः उज्जगुः - शिंपीत मोठयांनी गाणी म्हणू लागल्या. ॥१२॥
त्या बाळाला आशीर्वाद देत होत्या की, "भगवान याचे दीर्घ काळ रक्षण करो." असे म्हणून हळद-तेल-मिश्रित पाणी आजूबाजूच्या लोकांवर शिंपडीत त्या उच्च स्वरात श्रीकृष्णाला उद्देशून गीत गात होत्या. (१२)
अवाद्यन्त विचित्राणि वादित्राणि महोत्सवे ।
कृष्णे विश्वेश्वरेऽनन्ते नंदस्य व्रजमागते ॥ १३ ॥
स्वामी कृष्ण जगाचा या ऐश्वर्य वत्सलो मधू । अनंत सर्व ते त्याचे नंदाच्या घरि जन्मला । उत्सवो जाहला मोठा मांगल्य वाद्य वाजले ॥ १३ ॥
विश्वेश्वरे अनंते कृष्णे - जगाचा अधिपति शेषशायी श्रीकृष्ण - नंदस्य व्रजं आगते - नंदाच्या गोकुळात आला असता - महोत्सवे विचित्राणि - त्या महोत्सवप्रसंगी नानाप्रकारची - वादित्राणि अवाद्यंत - वाद्ये वाजविली गेली. ॥१३॥
सर्व जगताचे स्वामी अनंत भगवान श्रीकृष्ण जेव्हा नंदराजाच्या व्रजामध्ये प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा केला गेला. त्यावेळी निरनिराळी मंगल वाद्ये वाजविण्यात येऊ लागली. (१३)
गोपाः परस्परं हृष्टा दधिक्षीरघृतांबुभिः ।
आसिञ्चन्तो विलिंपन्तो नवनीतैश्च चिक्षिपुः ॥ १४ ॥
आनंदे धुंद होवोनी गोरसा फेकु लागले । दुज्यामुखासि ते लोणी लाविती उत्सवो असा ॥ १४ ॥
हृष्टाः गोपाः - आनंदित झालेले गोप - परस्परं क्षीरघृतांबुभिः आसिंचंतः - एकामेकांवर दूध, तूप व उदक शिंपडीत - नवनीतैः च विलिंपंतः - आणि लोण्याने अंगे माखीत - (परस्परेषु) दधि चिक्षिपुः - एकमेकांवर दही फेकते झाले. ॥१४॥
आनंदाने बेहोष होऊन गोपगण एकमेकांवर दही, दूध, तूप आणि पाणी उडवू लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करू लागले. (१४)
विवरण:- नंद हा गोकुळात सुप्रतिष्ठीत होता. त्याला मुलगा झाला, तोही उतारवयात, त्यामुळे गोकुळात आनंदीआनंद झाला. नंदाच्या घरी आनंद तो सर्व गोकुळात. (हे वर्णन गोकुळातले आजचे नाही.) यावरुन तत्कालीन समाजपरिस्थितीही दिसून येते. सुखदुःखाची भावना सार्वत्रिक कशी होती हे समजते. याउलट आजचे वातवरण, विशेषतः शहरातले. चार भिंतीपलीकडे कोण राहतो याचा पत्ता नसतो. इतकेच नाही तर शेजारच्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला, तर कोणास पत्ता नसतो. जो तो आपल्यातच मग्न असतो. (५-१४)
नन्दो महामनास्तेभ्यो वासोऽलंकारगोधनम् ।
सूतमागधवन्दिभ्यो येऽन्ये विद्योपजीविनः ॥ १५ ॥ तैस्तैः कामैरदीनात्मा यथोचितं अपूजयत् । विष्णोराराधनार्थाय स्वपुत्रस्योदयाय च ॥ १६ ॥
उदार नंदबाबाने गाई नी वस्त्र भूषणे । गोपांना दिधले तैसे भाट ठाकूर आदिना ॥ १५ ॥ सत्कारिले यथोचीत उद्देश एवढाच की । पावावा विष्णु तो बाळ बाळाचे शुभ तेचि हो ॥ १६ ॥
महामनाः नंदः - उदार अंतःकरणाचा नंद - तेभ्यः सूतमागधबंदिभ्यः - त्यांपैकी सूत, मागध व स्तुतिपाठक यांना - ये (च) अन्ये विद्योपजीविनः - व जे दुसरे विद्येवर उपजीविका करणारे - (तेभ्यः) वासोऽलंकारगोधनं (प्रादात्) - त्यांना वस्त्रे, अलंकार व गाई देता झाला. ॥१५॥ अदीनात्मा (नंदः) विष्णोः आराधनार्थाय - उदार अंतःकरणाचा नंद विष्णूच्या आराधनेसाठी - स्वपुत्रस्य च उदयाय - व आपल्या मुलांच्या उत्कर्षासाठी - (अन्यान् अपि) तैः तैः कामैः - इतरांना सुद्धा त्या त्या इष्ट वस्तू देऊन - यथोचितं अपूजयत् - यथायोग्य पूजिता झाला. ॥१६॥
नंद अतिशय उदार होते. त्यांनी गोपांना पुष्कळशी वस्त्रे, अलंकार आणि गाई दिल्या. सूत, मागध, बंदीजन तसेच नृत्य, वाद्य इत्यादि कलांवर उदरनिर्वाह करणार्यांना नंदांनी आनंदाने त्यांनी त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मुलाचे कल्याण व्हावे, असे त्यांना वाटत होते. (१५-१६)
रोहिणी च महाभागा नंदगोपाभिनंदिता ।
व्यचरद् दिव्यवासःस्रक् कण्ठाभरणभूषिता ॥ १७ ॥
अभिनंदुनि नंदासी जाता त्या गोपिका तयां । सत्कारी रोहिणी माता दिव्यालंकार मांडिता ॥ १७ ॥
महाभागा नंदगोपाभिनंदिता रोहिणी च - महाभाग्यशाली व नंदाने सत्कारिलेली रोहिणीही - दिव्यवासस्रग् - उत्तम वस्त्रे, माळा, - कंठाभरणभूषिता - गळ्यातील अलंकार इत्यादिकांनी भूषित होऊन - व्यचरत् - इकडेतिकडे हिंडत होती. ॥१७॥
नंदांनी अभिनंदन केलेली भाग्यवती रोहिणीसुद्धा दिव्य वस्त्रे, हार आणि गळ्यातील वेगवेगळ्या अलंकारांनी नटून थटून वावरत होती. (१७)
तत आरभ्य नंदस्य व्रजः सर्वसमृद्धिमान् ।
हरेर्निवासात्मगुणै रमाक्रीडमभून् नृप ॥ १८ ॥
त्या दिनी नंदबाबाच्या गोकुळी ऋद्धि सिद्धि त्या । विनोदे क्रीडल्या कांकी कृष्ण लक्ष्मी सवेचि त्या ॥ १८ ॥
नृप - हे परीक्षित राजा - ततः आरभ्य - तेव्हापासून - नंदस्य व्रजः - नंदाचे गोकुळ - सर्वसमृद्धिमान् - सर्व समृद्धीने युक्त - हरेः निवासात्मगुणैः - व कृष्णाच्या वास्तव्यामुळे सर्व गुणांनी मंडित असे - रमाक्रीडं (च) अभूत् - लक्ष्मीचे क्रीडाभुवन झाले. ॥१८॥
परीक्षिता ! त्याच दिवसापासून नंदांच्या व्रजामध्ये सर्व प्रकारची समृद्धी आली आणि भगवान् श्रीकृष्णांचा निवास असल्यामुळे तसेच आपल्या स्वाभाविक गुणांमुळे ते लक्ष्मीचे क्रीडास्थान बनले. (१८)
गोपान् गोकुलरक्षायां निरूप्य मथुरां गतः ।
नंदः कंसस्य वार्षिक्यं करं दातुं कुरूद्वह ॥ १९ ॥
गोकूळ रक्षिण्या अन्यां सोपवी नंद एकदा । वार्षीक कर देण्याला मथुरीं पातले स्वयें ॥ १९ ॥
कुरूद्वह - हे कुरुकुलोद्धारका परीक्षित राजा - गोपान् गोकुलरक्षायां निरूप्य - गोपांना गोकुळाची रक्षा करण्याकरिता सांगून - कंसस्य वार्षिक्यं करं दातु - कंसाला वार्षिक कर देण्याकरिता - नंदः मथुरां गतः - नंद मथुरेला गेला. ॥१९॥
परीक्षिता ! काही दिवसांनंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसर्या गोपांवर सोपवून नंद कंसाला वार्षिक कर देण्यासाठी मथुरेला गेले. (१९)
वसुदेव उपश्रुत्य भ्रातरं नंदमागतम् ।
ज्ञात्वा दत्तकरं राज्ञे ययौ तद् अवमोचनम् ॥ २० ॥
कळले वसुदेवांना नंद हे तेथ पातले । इच्छिता भेट ती त्यांची श्रीनंद तेथ पातले ॥ २० ॥
भ्रातरं नंदं आगतं उपश्रुत्य - आपला बंधूच असा नंद आलेला ऐकून - राज्ञे (च) दत्तकरं ज्ञात्वा - आणि राजाला दिला आहे करभार ज्याने असा जाणून - वसुदेवः तदवमोचनं ययौ - वसुदेव नंदाच्या गाडया सोडण्याच्या ठिकाणी गेला. ॥२०॥
आपला मित्र नंद मथुरेमध्ये आला आहे, असे जेव्हा वसुदेवांना समजले, तेव्हा कंसाला कर देऊन आलेल्या नंदाच्या वसतिस्थानाकडे ते गेले. (२०)
विवरण :- राजाला (कंसाला) कर देण्यासाठी नंद मथुरेला आला. त्यावेळी वसुदेव त्याला भेटावयास गेला. त्याला पाहून नंद इतका आनंदित झाला की जणू त्याच्या शरीरात प्राणच आले. (एखाद्या व्यक्तीला म्हणूनच 'प्राणप्रिय' म्हटले जात असावे.) शरीरात जसे प्राणाचे आत्यंतिक महत्त्व, तेच महत्त्व वसुदेवाच्या मैत्रीला नंदाच्या जीवनात होते, आणि याच प्रेमभावनेने आणि विश्वासाने वसुदेवानेही आपल्या पुत्राला नंदाच्या हवाली केले. (२०)
तं दृष्ट्वा सहसोत्थाय देहः प्राणमिवागतम् ।
प्रीतः प्रियतमं दोर्भ्यां सस्वजे प्रेमविह्वलः ॥ २१ ॥
पाहता नंदजी यांना उठले हर्षुनी मनीं । प्रेमाने धरुनी हात हृदया भिडले द्वय ॥ २१ ॥
प्राणं (आगतं दृष्ट्वा) देहः इव - प्राण आलेला पाहून देह जसा तसा - तम् आगतं दृष्ट्वा - त्या वसुदेवाला आलेला पाहून - सहसा उत्थाय - खडबडून उठून - प्रीतः प्रेमविह्वलः (नंदः) - आनंदित झालेला व प्रेमाने भरून गेलेला असा नंद - (तं) दोर्भ्याम् सस्वजे - त्याला बाहूंनी आलिंगन देता झाला. ॥२१॥
वसुदेवांना पाहताच नंद ताबडतोव उठून उभे राहिले. जणूकाही मेलेल्या शरीरात प्राण परत आला आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या प्रियतम वसुदेवांना दोन्ही हात धरून छातीशी कवटाळले. (२१)
पूजितः सुखमासीनः पृष्ट्वा अनामयमादृतः ।
प्रसक्तधीः स्वात्मजयोः इदमाह विशांपते ॥ २२ ॥
श्रेष्ठ सत्कार केला तै नंदाने वसुदेवचा । निवांत बसता दोघे क्षेम ते पुसु लागले ॥ २२ ॥
बिशांपते - हे राजा - पूजितः सुखं आसीनः वसुदेवः - नंदाने पूजिलेला व आसनावर स्वस्थ बसलेला वसुदेव - अनामयं पृष्ट्वा - खुशाली विचारून - आत्मजयोः प्रसक्तधीः - दोन्ही मुलांकडे ज्याचे अंतःकरण लागून राहिले आहे असा - आदृतः इदं आह - आदराने नंदाला असे म्हणाला. ॥२२॥
हे राजा ! नंदांनी वसुदेवांचा मोठा आदर-सत्कार केला. ते आरामात बसले, त्यावेळी वसुदेवांचे चित्त आपल्या पुत्राकडे लागले होते. नंदांना खुशाली विचारून ते म्हणाले. (२२)
दिष्ट्या भ्रातः प्रवयस इदानीमप्रजस्य ते ।
प्रजाशाया निवृत्तस्य प्रजा यत् समपद्यत ॥ २३ ॥
वसुदेव म्हणाले - अवस्था ढळली होती संतान नसता तुम्हा । आशाही नव्हती तैशी आता संतान जाहले ॥ २३ ॥
भ्रातः - हे बंधो - प्रवयसः अप्रजस्य - वृद्ध व संतति नसणार्या - प्रजाशायाः निवृत्तस्य ते - व संतती होण्याच्या आशेपासून मागे वळलेल्या अशा तुला - दिष्टया इदानीं प्रजाः समपद्यत - सुदैवाने सांप्रत संतती झाली आहे. ॥२३॥
(वसुदेव म्हणाले) - "बंधो ! तुझे वय झाले होते आणि आतापर्यंत तुला मूलबाळ झाले नव्हते. एवढेच काय, आता तुला संतान होण्याची आशाही नव्हती. पण तुला आता मुलगा झाला, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. (२३)
विवरण :- संसाराच्या चक्रात फिरणारा सामान्य मानव जसे चक्र फिरेल, तसा फिरत राहतो, दैनंदिन नित्य कर्मात व्यग्र राहतो, तेथे त्याच्या मर्जीला फारसा वाव नसतो, येईल ती परिस्थिती त्याला स्वीकारावी लागते. इथे वसुदेव तर बंदिवान आहे, परवश आहे, त्यामुळे नंदाबद्दल कितीही आत्मीयता असली तरी तो त्याला भेटू शकला नाही. पण ती भेट झाली, हा पुनर्जन्माइतका आनंद. दुखणे विकोपास गेलेला, जगण्याची आशा संपलेला रोगी जर खडखडीत बरा झाला, तर तो त्याचा पुनर्जन्म. इथे दोघेही मित्र दुष्ट कंसाच्या आधिपत्याखाली असूनहि पुन्हा भेटले, हा जणू त्यांचा पुनर्जन्मच ! 'पुनर्भव' याचा अर्थ वेगळाहि घेता येईल. पुत्राचा जन्म हा पित्याचा पुनर्जन्म अशी कल्पना आहे. कारण तो त्याचा अंश. पुत्राशिवाय गति नाही, वंशसातत्य नाही, म्हणून पित्याच्या जीवनात पुत्राचे महत्त्व. अशक्य असूनहि वसुदेव-नंद भेटले. हा पुत्रजन्माचाच आनंद. इथे 'दुर्लभं प्रियदर्शनम्' हा चरण छोटयाशा सुभाषिताप्रमाणे वापरला आहे. 'तू मला फार प्रिय.' 'तुझ्या भेटीने फार आनंद झाला.' इ. लांबलचक वाक्यांपेक्षा प्रिय व्यक्तीच्या पुनर्भेटीचा आनंद मोजक्या शब्दात व्यक्त केला आहे. भाषेचे सौंदर्य इथे दिसून येते. (२३)
दिष्ट्या संसारचक्रेऽस्मिन् वर्तमानः पुनर्भवः ।
उपलब्धो भवानद्य दुर्लभं प्रियदर्शनम् ॥ २४ ॥
भेटीत हर्ष हा झाला स्नेह्यांची भेट दुर्लभ । संसार चक्र हे ऐसे पुनर्जन्मचि मानणे ॥ २४ ॥
अस्मिन् संसारचक्रे वर्तमानः भवान् - ह्या संसारचक्रात पडलेला तू - पुनर्भवः (इव) - पुनर्जन्म झाल्यासारखा - दिष्टया अद्य उपलब्धः (असि) - आज सुदैवाने भेटलास - प्रियदर्शनं (हि) दुर्लभं - कारण प्रिय जनांचे दर्शन फार दुर्मिळ असते. ॥२४॥
आज आपली भेट झाली ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या प्रियजनांची भेट होणे हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. या संसाराचे चक्र असेच आहे. याला तर एक प्रकारचा पुनर्जन्मच समजले पाहिजे. (२४)
विवरण :- सागराचा प्रवाह वेगवान असतो. गवताची पाती, लाकडाच्या ढलप्या, तो कुठल्या कुठे भिरकावून देतो. (एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ) जीवनाचा प्रवाहही असाच वेगवान असतो. दैनंदिन जीवनात व्यापलेल्या व्यक्ती मनात असूनहि इष्ट-मित्रांना भेटू शकत नाहीत. तरीही नंद-वसुदेव एकमेकांस भेटले. हा अपूर्व योग, असेच म्हणावे लागेल. (२४)
नैकत्र प्रियसंवासः सुहृदां चित्रकर्मणाम् ।
ओघेन व्यूह्यमानानां प्लवानां स्रोतसो यथा ॥ २५ ॥
तृण काष्ठ पुरामाजी तसेचि जगती सखे । सोयरे या जगा माजी प्रारब्धे दूर धावती ॥ २५ ॥
यथा स्रोतसः ओघेन व्यूह्यमानानां प्लवानां - ज्याप्रमाणे उदकाच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणार्या काष्ठांचा - (तथा) चित्रकर्मणां - त्याप्रमाणे निरनिराळे व्यासंग करणार्या - सुहृदां प्रियसंवासः एकत्र न - मित्रांचा आवडता असा समागम एकत्र घडून येत नाही. ॥२५॥
जसे नदीच्या प्रवाहात वाहणार्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रारब्ध असणार्या प्रियजनांचेसुद्धा इच्छा असूनही एका ठिकाणी राहाणे संभवत नाही. (२५)
कच्चित् पशव्यं निरुजं भूर्यम्बुतृणवीरुधम् ।
बृहद्वनं तदधुना यत्रास्से त्वं सुहृद्वृतः ॥ २६ ॥
महावनी तुम्ही जेथे राहता स्वजनां सवे । तृण पर्ण तसे पाणी सर्वांना अनुकुल कां? ॥ २६ ॥
यत्र सुहृद्वृतः त्वं आस्से - जेथे इष्ट मित्रांसह तू राहतोस - तत् (स्थानं) भूर्यंबुतृणवीरुधं - ते स्थान, विपुल पाणी, गवत व वेली ज्यात आहे असे, - पशव्यं - अरण्यांतील पशूंना - बृहद्वनं नीरुजं कच्चित् - उपयोगी अशा मोठया कुरणांनी युक्त व रोगरहित असे आहे ना ? ॥२६॥
हल्ली तू आपल्या बांधवांसह आणि स्वजनांसह ज्या महावनात राहतोस, तेथे पाणी, गवत आणि झाडे वेली भरपूर आहेत ना ? ते जनावरांना अनुकूल आणि रोगराईपासून मुक्त आहेत ना ? (२६)
विवरण :- योगमायेने बलरामाची स्थापना रोहिणीच्या (वसुदेवाच्या द्वितीय पत्नीच्या) उदरात केली होती, याचा उल्लेख पूर्वी आला आहेच. त्याची आठवण वसुदेवाला इथे होते. तो गोकुळात आपल्या मातेजवळ सुखरूप असला तरी पितृप्रेमापासून वंचित होतो. (वसुदेव बंदी असल्याने) मात्र तो गोकुळात असल्याने नंदाचे प्रेम त्याला निश्चितच मिळते आहे. वसुदेवाच्या पितृप्रेमाची भरपाई नंदाकडून होत असल्याने मी निश्चिंत आहे असे वसुदेवास सुचवायचे आहे. (२६)
भ्रातर्मम सुतः कच्चित् मात्रा सह भवद्व्रजे ।
तातं भवन्तं मन्वानो भवद्भ्यामुपलालितः ॥ २७ ॥
गोकुळी पुत्र तो माझा रोहिणीपाशि राहतो । यशोदा नी तुम्ही त्याचा सांभाळ करिता अहा । तुम्हा माता पित्या ऐसा मानितो तो कसा असे? ॥ २७ ॥
भ्रातः - हे बंधो - भवन्तं तातं मन्वानः - तुला बाप मानणारा - भवद्भयां उपलालितः - व तुम्ही दोघांनी लालनपालन केलेला - मम सुतः - माझा पुत्र - मात्रा सह भवद्व्रजे (कुशली आस्ते) कच्चित् - आईसह गोकुळात खुशाल आहे ना ? ॥२७॥
बंधो ! माझा मुलगा त्याच्या (रोहिणी) आईबरोबर तुमच्या व्रजामध्ये राहात आहे. त्याचे पालन-पोषण तू आणि यशोदा करीत आहात. म्हणून तो तुम्हांलाच आपले माता-पिता मानीत असेल. तो सुखरूप आहे ना ? (२७)
विवरण :- नंद-वसुदेव यांच्या संभाषणाकडे पाहिले तर असे दिसून येईल की एकमेकांची ख्यालीखुशाली विचारण्याबाबतच्या योग्य त्या शिष्टाचाराचे पालन करूनहि वसुदेव आपल्या पुत्रवियोग दुःखाबद्दल बोलत नाही, आणि नंद पुत्रजन्माच्या आनंदाबद्दल. दोघेही एकमेकांच्या सुखदुःखाबद्दल बोलतात. आणि हेच मोठेपणाचे, सुसंस्कृतपणाचे लक्षण. धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गाचा आनंद आपल्याला केव्हा ? तर आपले इष्ट-मित्रही सुखी असतील तेव्हा. वसुदेवाचा पुत्रवियोग आणि नंदाचा उतारवयातील पुत्रलाभ. एकाचे दुःख अन् दुसर्याचे सुख. पण वसुदेवाच्या दुःखामुळे एवढा मोठा आनंद नंद अनुभवू शकत नाही. (२७)
पुंसस्त्रिवर्गो विहितः सुहृदो ह्यनुभावितः ।
न तेषु क्लिश्यमानेषु त्रिवर्गोऽर्थाय कल्पते ॥ २८ ॥
धर्मार्थकाम या योगे स्वजना सुख देइजे । स्वजना दुःख ते देता अहीत शास्त्र मानते ॥ २८ ॥
सुहृदः हि अनुभावितः - कारण इष्ट मित्रांना दिलेलेच - त्रिवर्गः पुंसः विहितः - धर्म, अर्थ व काम हे तीन पुरुषार्थ पुरुषाला योग्य होत - तेषु क्लिश्यमानेषु - ते इष्टमित्र जर क्लेश पावत असले तर - त्रिवर्गः अर्थाय न कल्पते - ते तीन पुरुषार्थ कार्यसिद्धीला उपयोगी पडत नाहीत. ॥२८॥
ज्यामुळे स्वजनांना सुख मिळते, तोच धर्म, अर्थ आणि काम शास्त्रविहित आहे. ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो, तो धर्म, अर्थ आणि काम हितकारक नाही. (२८)
श्रीनंद उवाच -
अहो ते देवकी पुत्राः कंसेन बहवो हताः । एकावशिष्टावरजा कन्या सापि दिवं गता ॥ २९ ॥
नंदबाबा म्हणाले - बंधो ! त्या देवकीगर्भे जन्मले पुत्र सर्व ते । कंसाने मारिले त्यांना पुत्रीही स्वर्गि धाडिली ॥ २९ ॥
अहो ते बहवः देवकीपुत्राः कंसेन हताः - हे वसुदेवा, तुझे देवकीच्या ठिकाणी झालेले पुष्कळ पुत्र कंसाने मारिले - एका अवरजा कन्या अवशिष्टा - शेवटी एक कन्या राहिली होती - सा अपि दिवं गता - तीही स्वर्गाला गेली. ॥२९॥
नंद म्हणाले - कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले. शेवटी एक मुलगी वाचली होती, तीसुद्धा स्वर्गाकडे गेली. (२९)
विवरण :- देवकीची मुले कंसाने मारलीच, पण छोटीशी मुलगीही त्याने शिल्लक ठेवली नाही. हे अदृष्ट म्हणजेच दैव, पूर्वजन्मीचे पाप-पुण्य. दोघांचेहि, गेलेल्या मुलांचे आणि आईवडिलांचे. हे सर्व दैवाधीन. त्याच्या (परमेश्वराच्या) इच्छेनुसारच सर्व घडते, म्हणूनच मानवाने सुख आणि दुःख या दोनहि अवस्थांकडे समबुद्धीने पहावे. (सुखदुःखे समकृत्वा) सुखदुःख हे अनित्य, दैवश्रेष्ठ हे ज्याला कळले, तो दुःखी होत नाही. मुले गेली, तरी आपल्या आणि त्यांच्याहि दैवात तसे होते असे समजले, म्हणजे मन स्थिर राहिल. असा नंदाच्या बोलण्याचा आशय. त्यामुळे वसुदेवाला थोडासा दिलासा मिळावा ही त्याची रास्त अपेक्षा. (२९)
नूनं ह्यदृष्टनिष्ठोऽयं अदृष्टपरमो जनः ।
अदृष्टमात्मनस्तत्त्वं यो वेद न स मुह्यति ॥ ३० ॥
प्रारब्धे लाभते दुःख भाग्य ते एक आश्रय । कारणा जाणिले ज्याने तो ना मोहीत होतसे ॥ ३० ॥
नूनं अयं जनः - खरोखर हा जनसमुदाय - अदृष्टनिष्ठः - सर्वस्वी दैवावर अवलंबणारा - अदृष्टपरमः (अस्ति) - व दैव हेच परम सुखाचे साधन मानणारा असा आहे - यः आत्मनः तत्त्वं अदृष्टं - जो आत्म्याचे सुख व दुःख प्राप्त होण्याचे दैव हेच कारण आहे - (इति) वेद सः न मुह्यति - असे जाणतो तो मोह पावत नाही. ॥३०॥
प्राण्यांचे सुख-दुःख त्यांच्या भाग्यावरच अवलंबून असते यात काहीही संशय नाही. भाग्य हेच प्राण्याचा एकमेव आश्रय आहे. जीवनाच्या सुख-दुःखाचे कारण भाग्यच आहे. हे जो जाणतो, तो ते प्राप्त झाल्यावर मोहित होत नाही. (३०)
विवरण :- नंदाचे मथुरेतील कर भरण्याचे काम आटोपले, दोघा जीवश्चकण्ठश्च मित्रांच्या दिलखुलास गप्पा झाल्या. आता मात्र वसुदेवाने नंदाला गोकुळास परत जाण्याचा पोक्य सल्ला दिला. कारण 'सन्त्युत्पाताश्च गोकुले' गोकुळात अनर्थ होत आहे. वसुदेव धर्मात्मा असल्याने अदृष्टाची चाहूल कदाचित् त्याला लागली असावी. कृष्णाच्या जनकत्वाबद्दल नंद अनभिज्ञ असला तरी आपला मुलगा त्याच्या घरी आहे हे वसुदेव जाणून होताच. आणि चिडलेला कंस आणि त्याचे सैनिक कृष्णाला शोधण्यास सारे नगर-ग्राम पिंजून काढल्याशिवाय रहाणार नाहीत, याचीही त्याला जाणीव होती. अशावेळी नंद तिथे असणे आवश्यक, असा विचार एका द्रष्टयाच्या आणि प्रेमळ पित्याच्या मनात येणे अगदी साहजिकच नाही का ? (३०)
श्रीवसुदेव उवाच -
करो वै वार्षिको दत्तो राज्ञे दृष्टा वयं च वः । नेह स्थेयं बहुतिथं सन्त्युत्पाताश्च गोकुले ॥ ३१ ॥
श्रीवसुदेव म्हणाले - बंधो तू कर वर्षाचा कंसाला तो दिला असे । न येथे राहणे जास्त घडे उत्पात गोकुळी ॥ ३१ ॥
वः वार्षिकः करः राज्ञे दत्तः - तुम्ही वार्षिक करभार राजाला दिला - वयं च दृष्टाः - आणि आमची भेट घेतली - इह बहुतिथं न स्थेयं - येथे फार दिवस राहू नये - गोकुले च उत्पातः संति - आणि गोकुळात उत्पात होत आहेत. ॥३१॥
वसुदेव म्हणाले - बंधो ! आता तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलास. आपली भेटही झाली. आता तू येथे अधिक दिवस राहू नकोस. कारण आजकाल गोकुळात मोठमोठे अपशकुन होऊ लागले आहेत. (३१)
श्रीशुक उवाच -
इति नंदादयो गोपाः प्रोक्तास्ते शौरिणा ययुः । अनोभिः अनडुद्युक्तैः तं अनुज्ञाप्य गोकुलम् ॥ ३२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीशुकदेव सांगतात - ऐकता बोल हे नंद गोपाळां सह संमती । घेवोनी जुंपिले बैल निघाली गाडि गोकुळा ॥ ३२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
शौरिणा इति प्रोक्ताः ते नंदादयः गोपाः - वसुदेवाने याप्रमाणे सांगितलेले ते नंदादि गोप - तं अनुज्ञाप्य - त्या वसुदेवाची आज्ञा घेऊन - अनडुद्युक्तैः अनोभिः गोकुलं ययुः - बैल जुंपिलेल्या गाडयांतून गोकुळास गेले. ॥३२॥
श्रीशुकदेव म्हणतात - वसुदेव जेव्हा असे म्हणाला, तेव्हा नंदादि गोपांनी त्यांचा निरोप घेतला आणि बैल जोडलेल्या छकड्यांवर स्वार होऊन त्यांनी गोकुळाची वाट धरली. (३२)
अध्याय पाचवा समाप्त |