श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
षष्ठोऽध्यायः

पूतनावधः -

पूतना उद्धार -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


( अनुष्टुप् )
श्रीशुक उवाच -
नन्दः पथि वचः शौरेः न मृषेति विचिन्तयन् ।
हरिं जगाम शरणं उत्पातागमशङ्‌‍कितः ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्री शुकदेव सांगतात -
चिंतिती मनि ते नंद गोकूळ वाट चालता ।
वसुदेव न ते खोटे रक्षील हरि तो अम्हा ॥ १ ॥

नंदः - नंद - पथि - वाटेत - शौरेः वचः न मृषा - वसुदेवाचे वचन खोटे नाही - इति विचिंतयन् - असे मनात म्हणत - उत्पातागमशंकितः - संकट येईल की काय अशी शंका वाटून - हरिं शरणं जगाम - परमेश्वराला शरण गेला. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे नाही; म्हणून संकट येईल, या भितीने ते मनोमन भगवंतांना शरण गेले. (१)


कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी ।
शिशूंश्चचार निघ्नन्ती पुरग्रामव्रजादिषु ॥ २ ॥
कंसाची घेउनी आज्ञा राक्षसी घोर पूतना ।
मारीत चालली बाळे ग्राम पूरात वस्तिशी ॥ २ ॥

कंसेन प्रहिता - कंसाने पाठविलेली - बालघातिनी - बालकांचा संहार करणारी, - घोरा पूतना राक्षसी - भयंकर अशी पूतना नावाची राक्षसी - शिशून् निघ्नंती - बालकांचा वध करीत - पुरग्रामव्रजादिषु - नगरे, गावे व गोकुळे इत्यादि ठिकाणी - चचार - संचार करिती झाली. ॥२॥
पूतना नावाची एक अत्यंत क्रूर राक्षसी होती. ल्हान मुलांना मारणे एवढे एकच तिचे काम होते. कंसाच्या आज्ञेवरून ती नगरे, गावे आणि गवळ्यांच्या वस्त्यांमधून लहान मुले मारण्यासाठी फिरत असे. (२)


न यत्र श्रवणादीनि रक्षोघ्नानि स्वकर्मसु ।
कुर्वन्ति सात्वतां भर्तुः यातुधान्यश्च तत्र हि ॥ ३ ॥
जिथे ना हरिचे गान ना चाले हरिकीर्तन ।
तिथेचि राक्षसीयांचे चालते बळ ते बहू ॥ ३ ॥

यत्र - जेथे - स्वकर्मसु - आपली इतर कर्मे चालली असता - रक्षोघ्नानि सात्त्वतां - राक्षसांचा नाश करणारी - भर्तुः (नाम) श्रवणादीनि - अशी भक्तरक्षक श्रीकृष्णाची नाम श्रवणादि कृत्ये - न कुर्वंति - करीत नाहीत - तत्र च हि - तेथेच खरोखर - यातुधान्यः (प्रभवन्ति) - राक्षसिणींचा प्रभाव चालतो. ॥३॥
जेथील लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये राक्षसांची भिती घालविणार्‍या भक्तवत्सल भगवंतांचे स्मरण करीत नाहीत, तेथेच राक्षसांचे फावते. (३)


सा खेचर्येकदोत्पत्य पूतना नन्दगोकुलम् ।
योषित्वा माययाऽऽत्मानं प्राविशत् कामचारिणी ॥ ४ ॥
आकाश गमनी होती पूतना रूप पालटी ।
सुंदरी जाहली तीच पातली गोकुळी पहा ॥ ४ ॥

सा खेचरी - ती आकाशात फिरणारी - कामचारिणी पूतना - व इच्छेस येईल तिकडे संचार करणारी पूतना - एकदा नंदगोकुलं उपेत्य - एके दिवशी नंदाच्या गोकुळाजवळ येऊन - मायया आत्मानं योषित्वा - मायेने स्वतःला सभ्य स्त्री बनवून - प्राविशत् - प्रवेश करिती झाली. ॥४॥
आकाशमार्गाने जाऊ शकणारी ती पूतना इच्छेनुसार रूप धारण करीत होती. एके दिवशी नंदांच्या गोकुळाजवळ येऊन मायेने स्वतःला एक सुंदर तरुणी बनवून ती गोकुळात शिरली. (४)


तां केशबन्ध व्यतिषक्तमल्लिकां
( मिश्र )
     बृहन्नितंब स्तनकृच्छ्रमध्यमाम् ।
सुवाससं कल्पितकर्णभूषण
     त्विषोल्लसत् कुन्तलमण्डिताननाम् ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा )
वेणीत ल्याली अति छान पुष्पे
     वस्त्रे झुब्याने अति शोभली की ।
नितंब मोठे कमरेत सान ।
     उभार वक्षो मन मोहवी ती ॥ ५ ॥

केशबंधव्यतिषक्तमल्लिकां - वेणीमध्ये गुंफिली आहेत मोगरीची फुले जिने अशा - बृहन्नितंब - विशाल असा कटिप्रदेश - स्तनकृच्छ्ररध्यमां - व स्तन यांमुळे जिचा मह्द्यभाग पीडित झाला आहे अशा - सुवाससम् - सुंदर वस्त्र नेसलेल्या - कंपितकर्णभूषणत्विषा - हलणार्‍या कुंडलांच्या कांतीने चकचकणार्‍या केसांमुळे - उल्लसत्कुंतलमंडिताननां - सुशोभित आहे मुख जिचे अशा ॥५॥
तिने अंबाड्यावर मोगर्‍याची वेणी माळली होती. सुंदर वस्त्रे परिधान केली होती. जेव्हा तिची कर्णफुले हालत असत, तेव्हा त्यांच्या चमकण्याने तोंडावर आलेले तिचे कुरळे केस शोभिवंत दिसत होते. तिचे नितंब आणि स्तन उभार होते, तर कंबर बारीक होती. (५)


वल्गुस्मितापाङ्‌‍ग विसर्गवीक्षितैः
     मनो हरन्तीं वनितां व्रजौकसाम् ।
अमंसताम्भोजकरेण रूपिणीं
     गोप्यः श्रियं द्रष्टुमिवागतां पतिम् ॥ ६ ॥
हासोनि नेत्रे बघताच घेई
     चोरून चित्ता तयि गोप यांचे ।
करात घेता कमळा तियेने
     ही लक्ष्मि आली वदल्या स्त्रिया तै ॥ ६ ॥

वल्गुस्मितापांगविसर्गवीक्षितैः - सुंदर हास्ययुक्त कटाक्षांचे फेकणे ज्यांत चालले आहे अशा पाहण्याने - व्रजौकसां मनः हरंतीं - गोकुळातील लोकांचे मन हरण करणार्‍या - तां वनितां - त्या स्त्रीला - गोप्यः - गोपी - अंभोजकरेण (उपलक्षितां) पतिं द्रष्टुं - कमलाने युक्त अशा हाताने शोभणार्‍या व पतीला - आगतां रूपिणीं श्रियं इव अमंसत - पाहण्याकरिता आलेल्या साक्षात् लक्ष्मीप्रमाणे मानत्या झाल्या. ॥६॥
आपले मधुर हास्य आणि कटाक्षांनी ती व्रजवासियांचे चित्त वेधून घेत होती. हातात कमळ घेऊन येणार्‍या त्या रूपवती रमणीला पाहून गोपींना वाटले की, जणू स्वतः लक्ष्मीच आपल्या पतीचे दर्शन घेण्यासाठी आली आहे. (६)

विवरण :- मायावी पूतनेने आपले मूळ राक्षसी रूप टाकून अत्यंत मोहक असे रूप धारण केले होते. अर्थात इष्टरूपपरिग्रहा यावरूनच ते समजून येते. तर्‍हेतर्‍हेचे अलंकार ल्याल्यामुळे अन् साजशृंगार केल्याने ती जणू साक्षात् लक्ष्मीच दिसत होती. मग ती गोकुळात का आली, याचे खूप मनोरंजक कारण दिले आहे. लक्ष्मीचा पति विष्णू, विष्णूचा अवतार कृष्ण. कृष्णाच्या रूपात गोकुळात असलेल्या विष्णूलाच जणू ती भेटायला आली होती, असा भाव. (६)



बालग्रहस्तत्र विचिन्वती शिशून्
     यदृच्छया नन्दगृहेऽसदन्तकम् ।
बालं प्रतिच्छन्ननिजोरुतेजसं
     ददर्श तल्पेऽग्निमिवाहितं भसि ॥ ७ ॥
ही बाळकांना सुसरीच जैशी
     धुंडीत गेली घर नंद यांचे ।
हा बाळकृष्णो निजलाच होता
     राखेत विस्तू दिसतो तसाची ॥ ७ ॥

बालग्रहः (सा) - मुलांना पीडा देणारे पिशाच अशी पूतना - तत्र शिशून् विचिन्वती - त्या गोकुळात मुलांचा शोध करीत - यदृच्छया नंदगृहे (आगता) - सहज त्या नंदाच्या घरी आली - असदंतकं - दुष्टांचा काळ अशा - प्रतिच्छन्ननिजोरुतेजसं बालं - ज्याने स्वतःचे भव्य तेज झाकिलेले आहे अशा त्या बालकृष्णाला - भसि आहितं अग्निं इव - भस्मात झाकून ठेविलेल्या अग्नीप्रमाणे - तल्पे ददर्श - अंथरूणावर पाहती झाली. ॥७॥
बालग्रहासारखी ती इकडे तिकडे लहान मुलांना शोधीत सहजपणे नंदांच्या घरात शिरली. तेथे दुष्टांचे काळ बालक श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेले तिने पाहिले. परंतु राखेच्या ढिगात लपलेला अग्नी असतो, त्याचप्रमाणे त्यावेळी त्यांनी आपले प्रचंड तेज लपवून ठेवले होते. (७)


विबुध्य तां बालक मारिकाग्रहं
     चराचरात्मा स निमीलितेक्षणः ।
अनन्तमारोपयदङ्‌कमन्तकं
     यथोरगं सुप्तमबुद्धिरज्जुधीः ॥ ८ ॥
चराचराचा हरिप्राण आहे
     जाणोनी स्त्रीही करि बंद नेत्र ।
भ्रमात सापा कुणि दोर पाही
     तसेचि कृष्णा पुतनाहि घेई ॥ ८ ॥

चराचरात्मा (कृष्णः) - स्थावर जंगमात्मक सर्व जगाचा अंतर्यामी असा श्रीकृष्ण - तां बालकमारिकाग्रहं विबुध्य - त्या पूतनेला बालके मारणारे पिशाच जाणून - निमीलितेक्षणः आस - मिटलेले आहेत डोळे ज्याने असा राहिला - यथा अबुद्धिरज्जुधीः - जसा अज्ञानामुळे दोरी आहे असे समजून - सुप्तं उरगं (गृः‌ह्‌णाति) - मनुष्य निजलेल्या सापाला उचलितो त्याप्रमाणे - (आत्मनः) अंतकं अनंतं - आपला काळच अशा श्रीकृष्णाला - अंकं आरोपयत् - मांडीवर घेती झाली. ॥८॥
चराचराचा आत्मा असणार्‍या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे, हे जाणून आपले डोळे बंद केले. जसे एखाद्याने नकळत, झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावे, त्याचप्रमाणे आपल्या काळरूप श्रीकृष्णांना पूतनेने उचलून मांडीवर घेतले. (८)


तां तीक्ष्णचित्तामतिवामचेष्टितां
     वीक्ष्यान्तरा कोषपरिच्छदासिवत् ।
वरस्त्रियं तत्प्रभया च धर्षिते
     निरीक्ष्यमाणे जननी ह्यतिष्ठताम् ॥ ९ ॥
जै सुंदरो म्यानि शस्त्रो असे ते
     तशीच होती पुतना पहा की ।
कोणी न रोधी रुप पाहता हे
     ती रोहिणीही बघुनीच राही ॥ ९ ॥

कोशपरिच्छदासिवत् तीक्ष्णचित्तां - म्यानात घातलेल्या तलवारीप्रमाणे कठोर अंतःकरणाच्या - (बाह्यतः) च अतिवामचेष्टितां - आणि बाह्यतः फार प्रेमळ आहे वर्तन जिचे अशा - तां वरस्त्रियं अंतरा (आगतां) वीक्ष्य - त्या प्रौढ स्त्रीला घरात आलेली पाहून - तत्प्रभया धर्षिते - तिच्या तेजाने दिपून गेलेल्या - जननी - माता यशोदा व रोहिणी - निरीक्षमाणे हि अतिष्ठतां - टकमक पाहतच उभ्या राहिल्या. ॥९॥
मखमली म्यानात लपविलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे पूतनेचे हृदय क्रूर होते. परंतु वरवर मात्र ती अत्यंत मधुर व्यवहार करीत होती. रोहिणीने आणि यशोदेने तिला पाहिले, पण तिच्या सौंदर्यप्रभावाने हतप्रभ होऊन स्तब्धपणे त्या तिला पाहातच राहिल्या. (९)

विवरण:- वरून कितीही लक्ष्मीचा आव आणला तरी ती पूतना शेवटी एक राक्षसीच होती. कदाचित् अशा अभद्र स्त्रीचे दर्शनहि नको, म्हणूनच बालकृष्णाने आपले डोळे मिटून घेतले असतील. लहान मुले दिवसातील बराच काळ निद्राधीन असतात, त्यामुळे बालकृष्ण झोपला आहे, असे पूतनेलाहि वाटणे योग्य आहे. तिने कृष्णाला निर्धास्तपणे उचलून मांडीवर घेतले, पण आपण साक्षात् मृत्यूलाच मांडीवर घेत आहोत, हे तिला कळले नाही. दोरी समजून निद्रिस्त साप अज्ञानी मनुष्य उचलून घेतो आणि डिवचलेला साप त्याला डसतो, त्याप्रमाणे कृष्णाला जवळ घेऊन जणू पूतनेने आपले मरणच ओढवून घेतले. (८-९)



तस्मिन् स्तनं दुर्जरवीर्यमुल्बणं ।
     घोराङ्‌कमादाय शिशोर्ददावथ ।
गाढं कराभ्यां भगवान् प्रपीड्य तत्
     प्राणैः समं रोषसमन्वितोऽपिबत् ॥ १० ॥
स्तनास होता अतिवीषलेप
     दिले तिने ते हरिच्या मुखात ।
दोन्ही कराने हरि दाबि क्रोधे
     दुधासवे प्राणहि शोषि तेंव्हा ॥ १० ॥

घोरा (सा) - दुष्ट अशी ती पूतना - तस्मिन् (क्षणे) - ताबडतोब - (तं बालं) अंकं आदाय - त्या लहान मुलाला मांडीवर घेऊन - दुर्जरवीर्यं उल्बणं स्तनं - ज्यात जिरावयास कठीण असे भयंकर विष आहे - शिशोः ददौ - असा स्तन बालकाला देती झाली - अथ भगवान् रोषसमन्वितः - नंतर श्रीकृष्ण रागावून - (तं) कराभ्यां गाढं प्रपीडय - तो स्तन दोन्ही हातांनी घट्ट आवळून - तत्प्राणैःसमं (तत्) अपिबत् - तिच्या प्राणांसह ते विष पिता झाला. ॥१०॥
इकडे तिने त्या बालकाला भयंकर मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात आपला स्तन दिला. त्या स्तनाला अतिशय भयंकर आणि कोणत्याही प्रकारे न पचू शकणारे विष लावलेले होते. तेव्हा भगवंतांनी रागाने दोन्ही हातांनी तिचा स्तन जोरात दाबून तिच्या प्राणांसह तिचे दूध प्राशन केले. (१०)

विवरण :- इथे अशी शंका येईल की, एक परकी बाई निर्धास्तपणे वाडयात येते; बालकृष्णाला उचलून मांडीवर घेते, मग तेव्हा यशोदा-रोहिणी काय करत होत्या ? त्यांना शंका आली नाही का ? इथे ही तर कृष्णाची लीला ! पूतनेचे मायावी रूप पाहून जणू त्या दोघींची मति गुंग झाली ! इतकेच काय तर तिचा तो सर्व आविर्भाव पाहून कृष्णाची आई कोण ? आपण ? की ही स्त्री ? अशीही त्यांना क्षणभर भूल पडली. असे जर झाले नसते, तर पूतनारूपी पाप कसे नष्ट झाले असते ? (१०)


सा मुञ्च मुञ्चालमिति प्रभाषिणी
     निष्पीड्य मानाखिलजीवमर्मणि ।
विवृत्य नेत्रे चरणौ भुजौ मुहुः
     प्रस्विन्नगात्रा क्षिपती रुरोद ह ॥ ११ ॥
सोडी वदे ती पुतना रडोनी
     ते आपटोनी कर पाय भूसी ।
डोळे तिचे ते उलटोनि आले
     शरीर सारे भिजलेचि घामे ॥ ११ ॥

अखिलजीवमर्मणि निष्पीडयमाना - सर्व शरीराच्या कोमल भागात अत्यंत पीडा पावलेली - मुंच मुंच अलं इति प्रभाषिणी - सोड सोड पुरे असे ओरडून बोलणारी - प्रस्विन्नगात्रा - घामाने डवरले आहे अंग जिचे अशी - चरणौ भुजौ मुहुः क्षिपती सा - हात पाय वारंवार आपटणारी ती पूतना - नेत्रे विवृत्य रुरोद ह - डोळे फाडून अतिशय रडू लागली. ॥११॥
तिची सर्व मर्मस्थाने खिळखिळी झाली. "अरे सोड ! सोड ! पुरे कर !" असे ओरडत वारंवार आपले हात-पाय आपटीत ती रडू लागली. तिने डोळे फिरवले आणि तिचे शरीर घामाने थबथबले. (११)


तस्याः स्वनेनातिगभीररंहसा
     साद्रिर्मही द्यौश्च चचाल सग्रहा ।
रसा दिशश्च प्रतिनेदिरे जनाः
     पेतुः क्षितौ वज्रनिपात शङ्‌कया ॥ १२ ॥
चित्कार मोठा करिता तियेने
     पहाड पृथ्वी ग्रह कंपले नी ।
आवाज मोठा घुमला दिशांना
     गोकुळि झाला जणु वज्रपात ॥ १२ ॥

तस्याः अतिगंभीररंहसा स्वनेन - तिच्या त्या अत्यंत गंभीर वेगाच्या ओरडण्याच्या वेगाने - साद्रिः मही - पर्वतांसह पृथ्वी - सग्रहा द्यौः च - आणि ग्रहांसह स्वर्ग - चचाल - थरथरू लागला - रसा दिशः च - रसातल व दाही दिशा - प्रतिनेदिरे - प्रतिध्वनी काढू लागल्या - जनाः वज्रनिपातशंकया - लोक वज्रपात झाला की काय अशा भीतीने - क्षितौ पेतुः - पृथ्वीवर पडले. ॥१२॥
तिच्या महाभयंकर आक्रोशाने डोंगरांसह पृथ्वी आणि ग्रहांसह अंतरिक्ष डगमगू लागले. सातही पाताळे आणि दिशा दुमदुमून गेल्या. विजा कोसळतात की काय या शंकेने पुष्कळसे लोक जमिनीवर कोसळले. (१२)


निशाचरीत्थं व्यथितस्तना व्यसुः
     व्यादाय केशांश्चरणौ भुजावपि ।
प्रसार्य गोष्ठे निजरूपमास्थिता
     वज्राहतो वृत्र इवापतन्नृप ॥ १३ ॥
पीडीत झाली अति पूतना ती
     त्या राक्षसीची तनु थोर झाली ।
ते प्राण गेले तनु सोडुनीया
     फाटोनि गेले मुख ओरडोनी ।
ती हात पाया पसरोनि तेथे
     इतस्त केशे पडली धरेसी ।
वज्रे जसा वृत्र मरोनि गेला
     बाहेर येता पडली अशी ही ॥ १३ ॥

हे नृप - हे राजा - इत्थं व्यथितस्तना - याप्रमाणे जिच्या स्तनांना पीडा झाली आहे - निशाचरी - अशी ती राक्षसी - व्यसुः (भूत्वा) - गतप्राण होऊन - निजरूपम् आस्थिता - आपले खरे स्वरूप धारण केलेली - व्यादाय - तोंड वासून - केशान् चरणौ भुजौ अपि प्रसार्य - केश व हातपायसुद्धा पसरून - गोष्ठे - गोकुळात - वज्राहतः वृत्र इव अपतत् - वज्राने ताडिलेल्या वृत्रासुराप्रमाणे पडली. ॥१३॥
परीक्षिता ! अशा प्रकारे पूतनेच्या स्तनांमध्ये इतक्या वेदना झाल्या की, ती गतप्राण झाली. ती मूळ रूपाने प्रगट झाली, केस विस्कटले. इंद्राच्या वज्राने घायाळ होऊन वृत्रासुर जसा पडला होता, तशीच ती सुद्धा बाहेर गोठ्यात हातपाय पसरून पडली. (१३)


( अनुष्टुप् )
पतमानोऽपि तद्देह त्रिगव्यूत्यन्तरद्रुमान् ।
चूर्णयामास राजेन्द्र महदासीत् तदद्‍भुतम् ॥ १४ ॥
( अनुष्टुप् )
राक्षसी पडली तेंव्हा सहा कोसामधील त्या ।
वृक्षांचा चुरडा झाला अद्‌भूत घडले पहा ॥ १४ ॥

राजेंद्र - हे राजश्रेष्ठा - पतमानः अपि तद्देहः - पडणारा असा तिचा देह - त्रिगव्युत्यंतरद्रुमान् चूर्णयामास - सहा कोसातील वृक्षांना चूर्ण करिता झाला - तत् महत् अद्‌भुतं आसीत् - ते कृत्य मोठे आश्चर्यकारक झाले. ॥१४॥
राजेंद्रा ! पूतनेच्या शरीराने खाली पडता पडता सुद्धा सहा कोस अंतरातील झाडे उन्मळून पाडली. ही तर मोठीच अद्‌भुत घटना घडली. (१४)

विवरण :- सुवर्णसुंदरीचे मायावी रूप धारण केलेल्या पूतनेचे कपट बालकृष्णाने ओळखले आणि स्तनपानाच्या मिषाने तिचे प्राण हरण केले. मात्र मरताना पूतनेने आपले मूळ राक्षसी रूप धारण केले. जणू वज्रपात झाल्याप्रमाणे ती धाडकन् जमिनीवर निष्प्राण होऊन पडली. गोकुळवासीही इतस्ततः धावू लागले. प्रजापती त्वष्टू याचा पुत्र विश्वरूप यास इंद्राने ठार केले. त्याला (इंद्राला) ठार मारण्यास त्वष्टूने अग्नीपासून वृत्रासुरास प्राप्त केले. त्या वृत्राचा वध इंद्राने प्रख्यात अस्त्र जे वज्र त्याने केला. असुरांच्या नाशासाठी बनविलेले हे वज्र दधीची ऋषींच्या हाडांचेपासून बनविलेले होते. ते अत्यंत कठीण होते, इतके की आकाशातून पडले तरी अभंग राहते असे मानले जाते. (१३-१४)



ईषामात्रोग्रदंष्ट्रास्यं गिरिकन्दर नासिकम् ।
गण्डशैलस्तनं रौद्रं प्रकीर्णारुणमूर्धजम् ॥ १५ ॥
प्रचंड देह तो होता विक्राळ दात तीक्ष्ण ते ।
गुंफेसमान ते नाक स्तन ते पर्वता परी ॥ १५ ॥

ईषामात्रोग्रदंष्ट्रास्यं - ज्याच्या मुखात नांगराच्या दांडयाएवढया तीक्ष्ण दाढा आहेत - गिरिकंदरनासिकं - व पर्वताच्या गुहे‌एवढया आहेत नाकपुडया ज्याच्या असे - गंडशैलस्तनं - ज्याचे स्तन पर्वतावरून गडगडत आलेल्या शिळेप्रमाणे आहेत - प्रकीर्णारुणमूर्धजं - व अस्ताव्यस्त झाले आहेत तांबूस वर्णाचे केस ज्याचे असे - ॥१५॥
पूतनेचे शरीर अत्यंत भयानक होते. तिचे तोंड नांगराच्या फाळाप्रमाणे तीक्ष्ण आणि भयंकर दाढा असलेले होते. तिच्या नाकपुड्या डोंगरातील गुहेप्रमाणे खोल होत्या आणि स्तन पहाडावरून निखळलेल्या कड्यांप्रमाणे होते. लाल लाल केस चारी बाजूंना विस्कटून पसरले होते. (१५)

विवरण :- पूतनेचा अक्राळ-विक्राळ, प्रचंड देह खाली पडताना त्याखाली जवळच्या वस्तूंचा चुराडा होणार हे निश्चित. पण तो देह किती प्रचंड होता ? आसपासच्या सहा कोसातील झाडे त्याखाली सापडून त्यांचा चुराडा व्हावा, एवढा. (इथे 'त्रिगण्यूति' असा शब्द वापरला आहे, सहा कोस. 'गण्यूति' हे अंतर मोजण्याचे वेदिक परिमाण, गाईना हाकारताना जिथपर्यंत आवाज पोचेल इतके; म्हणजेच साधारण एक कोस. हे सर्व प्राचीन काळातील आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 'कोस' हे ही परिमाण जुन्या काळातील. साधारण २॥ कि.मी. = १ कोस.) परंतु विशेष म्हणजे फक्त झाडेच चिरडली. जवळपासची गाई-वासरे सुखरूप राहिली. कारण ते 'गोकुळ' होते. हाही कृष्णलीलेचाच एक भाग. अशुभाचा नाश, सज्जनांचे रक्षण यासाठी तर त्याचा अवतार झाला होता. (अर्थात झाडे अशुभ नव्हती त्यांच्यावरच परिणाम झाला एवढाच अर्थ.) (१५)



अन्धकूपगभीराक्षं पुलिनारोह भीषणम् ।
बद्धसेतुभुजोर्वङ्‌घ्रि शून्यतोय ह्रदोदरम् ॥ १६ ॥
अंधार कूप जै नेत्र नितंब ते कड्यापरी ।
भुजा मांड्या पुला ऐशा तळेचि पोट शुष्क जै ॥ १६ ॥

अंधकूपगभीराक्षं - ज्याचे डोळे अंधार्‍या विहीरीप्रमाणे खोल आहेत - पुलिनारोहभीषणं - व वाळवंटाप्रमाणे विस्तीर्ण अशा ढुंगणामुळे भयंकर असे - बद्धसेतुभुजोर्वंघ्रि - ज्यावर हात, मांडया आणि पाय पुलाप्रमाणे बांधले आहेत असे - शून्यतोयह्लदोदरं - व ज्याचे पोट निःशेष पाणी झालेल्या डोहाप्रमाणे आहे असे - ॥१६॥
डोळे अंधार्‍या विहीरीप्रमाणे खोल, नितंब नदीच्या उंच किनार्‍याप्रमाणे भयंकर, हात, जांघा आणि पाय नदीच्या पुलांप्रमाणे वाटत होते. तसेच पोट, पाणी नसलेल्या डोहाप्रमाणे दिसत होते. (१६)


सन्तत्रसुः स्म तद्वीक्ष्य गोपा गोप्यः कलेवरम् ।
पूर्वं तु तन्निःस्वनित भिन्नहृत्कर्ण मस्तकाः ॥ १७ ॥
मोठाले गोप गोपीही पाहोनी चर्कले मनी ।
कर्कशो ध्वनि ऐकोनी बधीर जाहले जसे ॥ १७ ॥

तत् रौद्रं कलेवरं वीक्ष्य - ते भयंकर शरीर बघून - गोपाः गोप्यः (च) - गोप आणि गोपी - संतत्रसुः स्म - घाबरल्या - पूर्वं तु - प्रथम तर - तन्निस्वनित - तिच्या शब्दाने - भिन्नहृत्कर्णमस्तकाः (आसन्) - ज्यांची हृदये, कान व मस्तके फुटून गेली आहेत अशा झाल्या. ॥१७॥
पूतनेचे ते शरीर पाहून गवळी आणि गोपी भयभीत झाले. तिची भयंकर किंकाळी ऐकून त्यांचे हृदय, कान आणि डोके अगोदरच फुटल्यासारखे झाले होते. (१७)


बालं च तस्या उरसि क्रीडन्तं अकुतोभयम् ।
गोप्यस्तूर्णं समभ्येत्य जगृहुर्जातसंभ्रमाः ॥ १८ ॥
गोपिंनी पाहिला कृष्ण खेळे वक्षासि निर्भय ।
घाबर्‍या हो‌उनी गेल्या कृष्णाला घेतले असे ॥ १८ ॥

तस्याः च उरसि क्रीडंतं - आणि तिच्या उरावर खेळणार्‍या - अकुतोभयं बालं (दृष्ट्‌वा) - व ज्याला कोठूनही भीति नाही अशा बालकाला पाहून - गोप्यः - गोपी - जातसंभ्रमाः - झाली आहे धांदल ज्यांची अशा - तूर्णम् समभ्येत्य (तं) जगृहुः - लगबगीने जवळ येऊन त्याला उचलत्या झाल्या. ॥१८॥
जेव्हा गोपींनी पाहिले की, बाल श्रीकृष्ण निर्भयपणे तिच्या छातीवर खेळत आहेत, तेव्हा अत्यंत घाबरून लगबगीने तेथे जाऊन त्यांनी श्रीकृष्णांना उचलून घेतले. (१८)


यशोदा रोहिणीभ्यां ताः समं बालस्य सर्वतः ।
रक्षां विदधिरे सम्यक् गोपुच्छभ्रमणादिभिः ॥ १९ ॥
यशोदा रोहिणी गोपी गायीची शेपटी तदा ।
तै ओवाळुनिया कृष्णा तयांनी दृष्ट काढिली ॥ १९ ॥

यशोदा रोहिणीभ्यां समं - यशोदा व रोहिणी यांच्यासह - ताः - त्या - गोपुच्छभ्रमणादिभिः - अंगावरून गाईची शेपटी फिरविणे इत्यादि - सर्वतः बालस्य रक्षां - सर्वप्रकारचे मुलाच्या रक्षणाचे उपाय - सम्यक् विदधिरे - नीटरीतीने करित्या झाल्या. ॥१९॥
यानंतर यशोदा आणि रोहिणीसह गोपींनी गाईचे शेपूट अंगावरून फिरविणे इत्यादि उपायांनी त्या बाळाचे सर्वप्रकारे (दुष्ट शक्तींपासून) रक्षण केले. (१९)


गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गोरजसार्भकम् ।
रक्षां चक्रुश्च शकृता द्वादशाङ्‌गेषु नामभिः ॥ २० ॥
गोमुत्रे स्नानिले कृष्णा गोरजा अंगि लाविले ।
बाह्यांगा शेण लावोनी केशवो नाम जापिले ॥ २० ॥

गोमूत्रेण अर्भकं स्नापयित्वा - गोमूत्राने त्या बालकाला स्नान घालून - पुनः गोरजसा - आणखी गाईच्या पायधुळीने, - शकृता (द्वादशभिः) नामभिः च - शेणाने व बारा नावांनी - द्वादशांगेषु रक्षां चक्रुः - बारा अंगांच्या ठिकाणी रक्षाबंधन करित्या झाल्या. ॥२०॥
त्यांनी प्रथम त्याला गोमूत्राने स्नान घातले. नंतर सर्व अंगाला गायीच्या अंगावरील धूळ लावली आणि त्यानंतर बाराही अंगांना भगवंताच्या नामांनी शेण लावून पीडा शमन केले. (२०)


गोप्यः संस्पृष्टसलिला अङ्‌गेषु करयोः पृथक् ।
न्यस्यात्मन्यथ बालस्य बीजन्यासमकुर्वत ॥ २१ ॥
आचम्य गोपिने केले अजादि मंत्र बोलल्या ।
अंगन्यास करोनीया बाळास न्यास तो दिला ॥ २१ ॥

संस्पृष्टसलिलाः गोप्यः - स्पर्शिले आहे उदक ज्यांनी अशा गोपी - आत्मनि - आपल्या अंगावर - अंगेषु करयोः न्यस्य - निरनिराळ्या अवयवांच्या हातांनी न्यास करून - अथ - नंतर - बालस्य पृथक् - बालकाच्या अंगाला वेगवेगळे - बीजन्यासं अकुर्वत - बीजन्यास करित्या झाल्या. ॥२१॥
त्यानंतर गोपींनी आचमन करून अंगन्यास आणि करन्यास केले. तसेच बालकाच्या अंगावर बीजन्यास केले. (२१)


( वसंततिलका )
अव्यादजोऽङ्‌घ्रि मणिमांस्तव जान्वथोरू
     यज्ञोऽच्युतः कटितटं जठरं हयास्यः ।
हृत्केशवस्त्वदुर ईश इनस्तु कण्ठं
     विष्णुर्भुजं मुखमुरुक्रम ईश्वरः कम् ॥ २२ ॥
( वसंततिलका )
त्या म्हणू लागल्या -
पायास रक्षु हरि नी गुडघ्या मणीमान्
     मांड्यास रक्षु यज नी कमराऽच्युतो तो ।
हैग्रीव पोट नि तसा हृदि केशवो तो
     वक्षास ईश रविकंठ करास विष्णू ।
उरूक्रमो करु तुझी मुखराखणी तो
     रक्षो शिरास तुज ईश्वर बाळका रे ॥ २२ ॥

अजः अङ्‌घ्रिं अव्यात् - अज तुझ्या पायाचे रक्षण करो - अणिमान् तव जानु - अणिमान तुझ्या गुडघ्याचे - अथ - तसेच - यज्ञः ऊरू - यज्ञ मांडयांचे - अच्युतः कटितटं - अच्युत कटिप्रदेशाचे - हयास्यः जठरं - हयग्रीव उदराचे - केशवः हृत् - केशव अंतःकरणाचे - ईशः त्वदुरः - ईश तुझ्या वक्षस्थलाचे - इनः तु कंठं - सूर्य तर तुझ्या कंठाचे - विष्णुः भुजं - विष्णु भुजांचे - उरुक्रमः मुखं - त्रिविक्रम मुखाचे - ईश्वरः कं (अव्यात्) - आणि ईश्वर तुझ्या मस्तकाचे रक्षण करो. ॥२२॥
गोपी म्हणू लागल्या - "अजन्मा भगवान तुझ्या पायांचे, मणिमान गुडघ्यांचे, यज्ञपुरुष मांड्यांचे, अच्युत कमरेचे, हयग्रीव पोटाचे, केशव हृदयाचे, ईश वक्षस्थळाचे, सूर्य कंठाचे, विष्णू हातांचे, उरुक्रम तोंडाचे आणि ईश्वर मस्तकाचे रक्षण करोत. (२२)


चक्र्यग्रतः सहगदो हरिरस्तु पश्चात् ।
     त्वत्पार्श्वयोर्धनुरसी मधुहाजनश्च ।
कोणेषु शङ्‌ख उरुगाय उपर्युपेन्द्रः
     तार्क्ष्यः क्षितौ हलधरः पुरुषः समन्तात् ॥ २३ ॥
तो चक्रधारि असुदे पुढती सदैव
     मागे गदाधर मधूसुदनो कुसेसी ।
चारी दिशास उरुगाय वरी उपेंद्र
     पृथ्वीस तो हलधरो तुज रक्षु सारे ॥ २३ ॥

चक्री हरिः अग्रतः - चक्र धारण करणारा हरी अग्रभागी असो - सहगदः पश्चात् - गदाधारी परमेश्वर पृष्ठभागी असो - धनुरसी मधुहा च - धनुष्य धारण करणारा मधुसूदन व तलवार घेणारा - अजनः त्वत्पार्श्वयोः - जन्मरहित परमेश्वर हे तुझ्या दोन्ही बाजूंकडे असोत - उरुगायः शंखः कोणेषु - ज्याची लीला सर्व लोक गातात असा शंखमूर्ती देव चारी कोपर्‍यांना असो - उपरि उपेंद्रः - वरच्या भागास उपेंद्र असो - तार्क्ष्यः क्षितौ - गरुड अधोभागी असो - हलधरः पुरुषः समंतात् - हातात नांगर धरणारा पुराणपुरुष तुझ्या सभोवती असो. ॥२३॥
तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे राहोत, गदाधारी श्रीहरी पाठीमागे, धनुष्य आणि खड्ग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन दोघे दोन बाजूंना, शंखधारी उरुगाय चारी कोपर्‍यांमधे, उपेंद्र वर, गरुड पृथ्वीवर आणि भगवान परमपुरुष तुझ्या सर्व बाजूंनी रक्षणासाठी राहोत. (२३)


( अनुष्टुप् )
इन्द्रियाणि हृषीकेशः प्राणान्नारायणोऽवतु ।
श्वेतद्वीपपतिश्चित्तं मनो योगेश्वरोऽवतु ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
इंद्रियांसी हृषीकेश प्राणा नारायणो तसा ।
श्वेतद्वीपपती चित्ता योगेश्वर मनास तो ॥ २४ ॥

हृषीकेशः इंद्रियाणि (अवतु) - हृषीकेश इंद्रियांचे रक्षण करो - नारायणः प्राणान् अवतु - नारायण प्राणांचे रक्षण करो - श्वेतद्वीपपतिः चित्तं - श्वेतद्वीपाचा स्वामी चित्ताचे - योगेश्वरः (च) मनः अवतु - आणि योगेश्वर मनाचे रक्षण करो. ॥२४॥
हृषीकेश इंद्रियांचे आणि नारायण प्राणांचे रक्षण करोत. श्वेतद्वीपाचे अधिपती चित्ताचे आणि योगेश्वर मनाचे रक्षण करोत. (२४)


पृश्निगर्भस्तु ते बुद्धिं आत्मानं भगवान्परः ।
क्रीडन्तं पातु गोविन्दः शयानं पातु माधवः ॥ २५ ॥
बुद्धिसी पृश्निगर्भो नी अहंती भगवान् हरी ।
खेळता रक्षु गोविंद झोपता माधवो तसा ॥ २५ ॥

पृश्र्निगर्भः ते बुद्धिं - पृश्र्नीच्या उदरी उत्पन्न झालेला ईश्वर तुझ्या बुद्धीचे - परः भगवान् आत्मानं - श्रेष्ठ असा भगवान आत्म्याचे - गोविंदःक्रीडंतं (त्वां) पातु - गोविंद खेळत असताना तुझे रक्षण करो - माधवः शयानं (त्वां) पातु - माधव निजलेल्या अशा तुझे रक्षण करो.॥२५॥
पृष्निगर्भ तुझ्या बुद्धीचे आणि परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचे रक्षण करोत. खेळताना गोविंद रक्षण करोत. निद्रेच्या वेळी माधव रक्षण करोत. (२५)


व्रजन्तमव्याद् वैकुण्ठ आसीनं त्वां श्रियः पतिः ।
भुञ्जानं यज्ञभुक् पातु सर्वग्रहभयङ्‌करः ॥ २६ ॥
वैकुंठ चालताना तो रक्षो श्रीपति बैसता ।
यज्ञ भोक्ता हरी रक्षो जेविता बाळका तुला ॥ २६ ॥

वैकुंठः व्रजंतं - तू चालत असताना वैकुंठ रक्षण करो - श्रियः पतिः आसीनं त्वां अव्यात् - लक्ष्मीपति तू बसलेला असताना तुझे रक्षण करो - सर्वग्रहभयंकरः - सर्व ग्रहांना भय उत्पन्न करणारा - यज्ञभुक् भुंजानं पातु - यज्ञभोक्ता तुझे जेवत असताना रक्षण करो. ॥२६॥
चालताना वैकुंठ आणि बसलेल्यावेळी श्रीपती तुझे रक्षण करोत. सर्व ग्रहांना भयभीत करणारे यज्ञभोक्ते भगवान भोजनाचे वेळी तुझे रक्षण करोत. (२६)


डाकिन्यो यातुधान्यश्च कुष्माण्डा येऽर्भकग्रहाः ।
भूतप्रेत पिशाचाश्च यक्षरक्षो विनायकाः ॥ २७ ॥
डाकिनी राक्षसी भूत कुष्मांड नि पिशाच ते ।
बालग्रह प्रेत यक्षो राक्षसरे नि विनायको ॥ २७ ॥

ये अर्भकग्रहाः - जे बालकांना पीडा देणारे - डाकिन्यः यातुधान्यः कूष्मांडाः - डाकिनी, यातुधानी, कूष्मांड - भूतप्रेतपिशाचाद्याः - भूत, प्रेत, पिशाच आदिकरून - यक्षरक्षोविनायकाः - यक्ष, राक्षस विनायक - सन्ति - आहेत. ॥२७॥
डाकिनी, राक्षसी, कूष्मांडा इत्यादि बालग्रह, भूत, प्रेत, पिशाच्च, यक्ष, राक्षस आणि विनायक, (२७)


कोटरा रेवती ज्येष्ठा पूतना मातृकादयः ।
उन्मादा ये ह्यपस्मारा देह प्राणेन्द्रियद्रुहः ॥ २८ ॥
कोटरा रेवती ज्येष्ठा पूतना मातृकादि त्या ।
उन्मादनि अपस्मार स्वप्नीचे भय ते महान् ॥ २८ ॥

ये - जे - कोटरारेवती - कोटरा, रेवती, - ज्येष्ठापूतना मातृकादयः - ज्येष्ठा, पूतना व मातृका आदिकरून - उन्मादाः - उन्माद आणि - देहप्राणेंद्रियद्रुहः - देह, प्राण व इंद्रिये यांचा द्रोह - अपस्माराः (च) - करणारे अपस्मार रोग. ॥२८॥
कोटरा, रेवती, ज्येष्ठा, पूतना, मातृका इत्यादि, शरीर, प्राण तसेच इंद्रियांचा नाश करणारे उन्माद, अपस्मार इत्यादि रोग, (२८)


स्वप्नदृष्टा महोत्पाता वृद्धा बालग्रहाश्च ये ।
सर्वे नश्यन्तु ते विष्णोः नामग्रहणभीरवः ॥ २९ ॥
वृद्धग्रहादि हे सारे, विष्णुचे नाम पावन ।
घेताचि नष्ट होवोत भिवोनी सत्वरी तसे ॥ २९ ॥

स्वप्नदृष्टाः महोत्पाताः - स्वप्नांत दिसलेले मोठाले उत्पात - ये च वृद्धबालग्रहाः - आणि जे वृद्धांना व बालांना पीडा देणारे ग्रह - विष्णोः नामग्रहणभीरवः (सन्ति) - विष्णूच्या नामग्रहणाला भिणारे असे आहेत - ते सर्वे नश्यंतु - ते सर्व नष्ट होवोत. ॥२९॥
स्वप्नात पाहिलेले महान उत्पात, वृद्धग्रह आणि बालग्रह इत्यादि सर्व अनिष्ट घटक, भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केल्याने भयभीत होऊन नष्ट होऊन जावोत. (२९)


श्रीशुक उवाच -
इति प्रणयबद्धाभिः गोपीभिः कृतरक्षणम् ।
पाययित्वा स्तनं माता संन्यवेशयदात्मजम् ॥ ३० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
गोपिंनी प्रेमबांधोनी कृष्णाला रक्षिले असे ।
मातेने स्तन पाजोनी पाळनीं बाळ टाकिला ॥ ३० ॥

प्रणयबद्धाभिः गोपीभिः - कृष्णावर दृढ प्रेम असणार्‍या गोपींनी - इति कृतरक्षणं आत्मजं - याप्रमाणे रक्षण केलेल्या आपल्या पुत्राला - स्तनं पाययित्वा - स्तनपान करवून - माता संन्यवेशयत् - यशोदा माता निजविती झाली. ॥३०॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - अशा प्रकारे प्रेम करणार्‍या गोपींनी रक्षामंत्र म्हटल्यावर यशोदेने आपल्या मुलाला दूध पाजून पाळण्यात निजविले. (३०)

विवरण :- पूतनेचा प्रचंड देह खाली पडल्यानंतर झालेल्या या अघटिताने गोपी भांबावल्या. पण नंतर लगेचच त्या भानावर आल्यानंतर आधी त्याना कृष्णाच्या सुरक्षेची काळजी वाटून त्यानी इकडे तिकडे पाहिले. तर तो कृष्ण परमात्मा तिच्या अपवित्र वक्षःस्थळावर क्रीडा करताना त्यांना दिसला. त्यानी त्याला लगेच उचलून शुद्ध करण्यास सुरवात केली. इथे त्यानी शुद्धी करणासाठी ज्या वस्तू वापरल्या त्या सर्व गायीच्या, गायीशी संबंधित. एकतर गोमूत्र शरीरासाठी हितकर आहे हे आता तर संशोधनानेच सिद्ध झाले आहे. गोमय, शेणींची राख, याही गोष्टी आरोग्यवर्धकच. गोपी तर गोकुळातल्याच, त्याना गायीचे महत्त्व कळणार नाही तर कोणाला ? थोडेसे भावनिक दृष्टीने पाहिले तरी गायीच्या शरीरात परमेश्वराचे वास्तव्य असते, असे मानले जाते. हिंदूंची ती 'गोमाता' बालकृष्णाचे रक्षण ती निश्चितच करणार ही गोपींची दृढ श्रद्धा. गोपींनी बालकृष्णाच्या एक-एक अवयवाचे रक्षण करण्यासाठी विष्णूच्या अनेक नावांचा वापर केला. (इथे शिरो मे राघवः पातु ------------ पातु रामोऽखिलं वपुः । या रामरक्षेतील श्लोकाची आठवण होते.) बिचार्‍या गोपी, कृष्णाचे रक्षण करणे, त्याच्यावर प्रेम करणे एवढेच त्यांना माहित. त्यांना काय माहित की कृष्णाचे रक्षण करायला त्या त्याच भगवंताची कृष्ण परमात्म्याचीच स्तुती करीत आहेत, आळवणी करीत आहेत जणू ज्योतिने तेजाची आरती ! (१६-३०)



तावन्नन्दादयो गोपा मथुराया व्रजं गताः ।
विलोक्य पूतनादेहं बभूवुः अतिविस्मिताः ॥ ३१ ॥
या वेळी नंद गोपादी पातले गोकुळी पहा ।
पूतनाप्रेत ते मोठे पाहता नवलावले ॥ ३१ ॥

तावत् - इतक्यात - मथुरायाः व्रजं (आ) गताः - मथुरेहून गोकुळात आलेले - नंदादयः गोपाः - नंदादिक गोप - पूतना देहं विलोक्य - पूतनेचा देह बघून - अतिविस्मिताः बभूवुः - अत्यंत आश्चर्यचकित झाले. ॥३१॥
त्याचवेळी नंद वगैरे गोप मथुरेहून गोकुळात पोहोचले. तेव्हा पूतनेचे ते भयंकर शरीर पाहून ते चकित झाले. (३१)


नूनं बतर्षिः सञ्जातो योगेशो वा समास सः ।
स एव दृष्टो ह्युत्पातो यद् आहानकदुन्दुभिः ॥ ३२ ॥
आश्चर्य ! वदले सारे ऋषी ते वसुदेवजी ।
योगेश्वर कुणी पूर्वी घडते वदती जसे ॥ ३२ ॥

नूनं बत सः - खरोखर वसुदेव हा कोणी - ऋषिः संजातः - एक ऋषीच उत्पन्न झाला आहे - वा योगेशः समास - किंवा उत्तम महाज्ञानी योगी असावा - यत् हि आनकदुंदुभिः आह - कारण जे वसुदेव म्हणाला - सः एव उत्पातः दृष्टः - तोच उत्पात आम्ही पाहिला. ॥३२॥
ते म्हणू लागले, वसुदेवाच्या रूपात निश्चितच कोण्या ऋषीने जन्म घेतला असेल. किंवा हेही शक्य आहे की, वसुदेव पूर्वजन्मीचे कोणी योगेश्वर असतील. कारण ते जसे म्हणाले होते, तसेच संकट येथे दिसून आले. (३२)


कलेवरं परशुभिः छित्त्वा तत्ते व्रजौकसः ।
दूरे क्षिप्त्वावयवशो न्यदहन् काष्ठवेष्टितम् ॥ ३३ ॥
गोकूलवासियांनी त्या प्रेताचे त्या कुर्‍हाडिने ।
खांडोळी करुनी दूर जाळिले काष्ठ टाकुनी ॥ ३३ ॥

(ततः) ते व्रजौकसः - नंतर ते गोकुळवासी जन - तत् कलेवरं परशुभिः छित्त्वा - ते शरीर कुर्‍हाडीने तोडून - अवयवशः दूरे क्षिप्त्वा - एक एक अवयव दूर नेऊन - काष्ठधिष्ठितं (कृत्वा) न्यदहन् - काष्ठांवर चढवून दहन करिते झाले. ॥३३॥
तोपर्यंत व्रजवासींनी कुर्‍हाडींनी पूतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि लांब नेऊन एकेक अवयव चितेवर ठेवून जाळून टाकले. (३३)

विवरण :- पूतनेचे अरिष्ट टळले. नंदाने गोकुळात प्रवेश केल्यावर त्याला सर्व हकीकत समजली आणि वसुदेवाच्या द्रष्टेपणाची खात्री पटली. तो महात्मा ऋषी असल्याशिवाय त्याला अदृष्टाचे ज्ञान होणार नाही, हे समजून नंद वसुदेवाच्या मोठेपणाने भारावून गेला. (३३)



दह्यमानस्य देहस्य धूमश्चागुरुसौरभः ।
उत्थितः कृष्णनिर्भुक्त सपद्याहतपाप्मनः ॥ ३४ ॥
जाळिता धूर तो आला सुगंधी दहनातुनी ।
कृष्णाने प्राशिता दूध पाप ते मिटल्या मुळे ॥ ३४ ॥

कृष्णनिर्भुक्तसपद्याहतपाप्मनः - कृष्णाने स्तनपान केल्यामुळे तत्काळ पापनष्ट झालेल्या - दह्यमानस्य देहस्य धूमः - जळत असलेल्या त्या देहाचा धूर - अगुरुसौरभः उत्थितः - चंदनाप्रमाणे सुवासिक असा उठला. ॥३४॥
कृष्णाने दूध प्याल्यामुळे ज्याची सर्व पापे तत्काळ नष्ट झाली, असा तो तिचा देह जळत असता, त्यातून धुपासारखा सुगंधी धूर निघू लागला. (३४)


पूतना लोकबालघ्नी राक्षसी रुधिराशना ।
जिघांसयापि हरये स्तनं दत्त्वाप सद्‍गतिम् ॥ ३५ ॥
पूतना राक्षसी थोर शिशुंचे रक्त पीयि ती ।
स्तनिले मारिण्या कृष्णा तरी सद्‌गति पावली ॥ ३५ ॥

लोकबालघ्नी - लोकांची मुले मारणारी - रुधिराशना राक्षसी पूतना - व रक्त पिणारी ती राक्षसी पूतना - जिघांसया अपि हरये - मारण्याच्या इच्छेनेही श्रीकृष्णाला - स्तनं दत्वा - स्तनपान देऊन - सद्‌गतिं आप - उत्तम गति मिळविती झाली. ॥३५॥
पूतना एक राक्षसी होती. लोकांच्या लहान मुलांना मारणे आणि त्यांचे रक्त पिणे हेच तिचे काम होते. श्रीकृष्णांनासुद्धा तिने मारून टाकण्याच्या इच्छेनेच स्तनपान करविले होते. तरीसुद्धा तिला सद्‌गती मिळाली. (३५)

विवरण :- गोपांनी पूतनेच्या शरीरास अग्नी दिला, तो का दिला ? प्रश्न पडणे साहजिक आहे. वास्तविक तिचे तुकडे-तुकडे करून कोल्ह्या-कुत्र्यांसमोर टाकायला हवे होते. कारण पूतना म्हणजेच अविद्या, मोह, (पूतानपि-पवित्रानपि नयति इति पूतना।) सज्जनांचा नाश करणारी. तिचे मायावी रूप उघड झाल्यावर तिला ठार करून तुकडे केले तरी ती जिवंत होऊ शकेल, (मायेने, राक्षसीला अशक्य काय ?) अशीही भीती कदाचित गोकुळवासीयांना वाटली असावी. तेव्हा तिला जाळून राखच करणे योग्य, असे त्यांनी ठरविले तर चूक नाही. मात्र तिच्या देहाच्या धुरातून सुगंध येत होता. विषभरल्या स्तनाच्या धुरातून सुगंध हे कसे शक्य ? पण पूतनेचा वध करणारा कृष्ण परमात्मा होता; क्षमाशील कृष्ण. “मरणान्तानि वैराणि” हे सूत्र आचरणात आणणारा महात्मा. विष भरले का होईना, तिच्या स्तनातील दूध परमात्म्याने प्राशन केले होते आणि केवळ तेवढयाच स्पर्शाने तिचा उद्धार होऊन तिला सद्‌गती मिळाली. (सध्या प्रत्येक गोष्टीकडे विशेषतः पुराणातील कथांकडे विशेष चिकित्सक दृष्टीने पाहून त्यावर संशोधन करून वेगळेच निष्कर्ष काढण्याची प्रथा आहे. त्यानुसार पूतना हे तत्कालीन अशा एका बालरोगाचे नाव असावे. डांग्या खोकला, गोवर, देवी, कांजिण्या अशा प्रकारचे भयानक साथीचे रोग पूर्वी मुलांचे बळी घेत, हे रोग म्हणजे जणु असुरच. या रोगरूपी असुरांचा नाश करून कृष्णाने गोकुळवासीयांचे रक्षण केले. सहाव्या अध्यायातील पहिल्या २-३ श्लोकात पूतना राक्षसी ही गावागावात हिंडून बालकांचा वध करीत संचार करू लागली असा उल्लेख आहे, त्यावरून या बालघातिनी रोगाची लागण खेडयाखेडयात होऊ लागली असावी, असेही मत काही संशोधक व्यक्त करतात. कृष्णाने या रोगांना नाहीसे केले असावे.) (३४-३५)



किं पुनः श्रद्धया भक्त्या कृष्णाय परमात्मने ।
यच्छन्प्रियतमं किं नु रक्तास्तन्मातरो यथा ॥ ३६ ॥
तेंव्हा त्या परब्रह्माला अर्पिता प्रियवस्तु त्या ।
न संशय तया लाभे गती पावन थोर ती ॥ ३६ ॥

किं पुनः - मग काय - श्रद्धया - श्रद्धेने - भक्त्या - भक्तीने - कृष्णाय परमात्मने - श्रीकृष्ण परमात्म्याला - प्रियतमं यच्छन् - अति प्रिय वस्तु देणारा - न आप्नोति नु - मिळविणार नाही काय - यथा तन्मातरः - जशा त्याच्या माता - तथा रक्तः - तसा त्याच्यावर अनुरक्त झालेला - (सद्‌गतिं न आप्नोति) किम् - सद्‌गति मिळविणार नाही काय. ॥३६॥
तर मग जे लोक परमात्मा श्रीकृष्णांना श्रद्धा आणि भक्तीने मातेप्रमाणे प्रेमपूर्वक अतिशय प्रिय असणारी वस्तू समर्पित करतात, त्यांच्यासंबंधे काय बोलावे ? (३६)


पद्‍भ्यां भक्तहृदिस्थाभ्यां वन्द्याभ्यां लोकवन्दितैः ।
अङ्‌गं यस्याः समाक्रम्य भगवान् अपिबत् स्तनम् ॥ ३७ ॥
शिव ब्रह्मादिते वंद्य तयां वंद्यहि विष्णु हा ।
भक्तांच्या जीविचा ठेवा तेणे ही मारिली असे ॥ ३७ ॥

लोकवंदितैः वंद्याभ्यां - लोकांना परममान्य अशा - भक्तहृदिस्थभ्यां - सत्पुरुषांना वंद्य व भक्तांच्या हृदयात राहणार्‍या - पद्‌भ्‌यां - अशा आपल्या चरणकमलांनी - यस्या अंगं समाक्रम्य - जिच्या शरीरावर आक्रमण करून - भगवान् स्तनं अपिबत् - भगवान स्तन पिता झाला. ॥३७॥
सर्वांना वंदनीय आणि भक्तांच्या हृदयातील ठेवा असणार्‍या चरणांनी पूतनेचे शरीर दाबून, भगवंतांनी तिचे स्तनपान केले होते. (३७)


यातुधान्यपि सा स्वर्गं अवाप जननीगतिम् ।
कृष्णभुक्तस्तनक्षीराः किमु गावोऽनुमातरः ॥ ३८ ॥
राक्षसी असुनी तीते मातेची गती लाभली ।
प्रेमाने मातृ गायींचे पिला दूध न पूसणे ॥ ३८ ॥

सा यातुधानी अपि - ती राक्षसीही - जननींगतिं - मातेला प्राप्त होणार्‍या - स्वर्गं अवाप - स्वर्गरूप गतीला मिळविती झाली - किं उ कृष्णभुक्तस्तनक्षीराः - मग ज्यांच्या स्तनांतील दुग्ध कृष्णाने प्याले आहे - गावः मातरः नु - अशा गाई व माता ह्या खरोखर का न मिळवितील. ॥३८॥
जरी ती राक्षसी होती, तरीसुद्धा मातेला मिळणारी स्वर्गगती तिला मिळाली. तर मग ज्यांच्या स्तनांचे दूध भगवंत (ब्रह्मदेवाने वासरे व गोपबालक यांना लपवून ठेवले त्यावेळी) प्रेमाने प्याले, त्या गाई आणि मातांची गोष्ट काय सांगावी ? (३८)


पयांसि यासामपिबत् पुत्रस्नेहस्नुतान्यलम् ।
भगवान् देवकीपुत्रः कैवल्याद्यखिलप्रदः ॥ ३९ ॥
कैवल्यादि अशा मुक्ती देतो देवकीनंदन ।
गोकुळी गायि गोपिंचे पिला दूध झर्‍यापरी ॥ ३९ ॥

कैवल्याद्यखिलप्रदः - मोक्ष आदिकरून सर्व काही देऊ शकणारा - देवकीपुत्रः भगवान् - देवकीचा मुलगा श्रीकृष्ण - पुत्र स्नेहस्नुतानि - पुत्राच्या प्रेमाने पाझरणारी - यासां पयांसि अलं अपिबत् - अशी ज्यांची दुधे पोटभर पिता झाला. ॥३९॥
पुत्रप्रेमाने आपणहून पाझरणारे ज्यांचे दूध भगवंत भरपूर प्याले, त्यांना भगवान देवकीनंदनांनी मोक्षापर्यंत सर्व काही दिले. (३९)


तासामविरतं कृष्णे कुर्वतीनां सुतेक्षणम् ।
न पुनः कल्पते राजन् संसारोऽज्ञानसंभवः ॥ ४० ॥
पुत्ररूपात कृष्णाला गायी गोपिंनि पाहिले ।
न भवो पुढती त्यांना भव अज्ञानियांपरी ॥ ४० ॥

कृष्णे अविरतं सुतेक्षणं - कृष्णाच्या ठिकाणी हा आपला पुत्र आहे - कुर्वंतीनां तासां - अशी नित्य दृष्टि ठेवणार्‍या यांना - राजन् - हे राजा - अज्ञानसंभवः - पुनः अज्ञानापासून उत्पन्न होणारा - संसारः न कल्पते - संसार घडणार नाही. ॥४०॥
राजन् ! ज्या गोपी व गाई नित्य भगवान श्रीकृष्णांना आपल्या पुत्राच्या रूपातच पाहात होत्या, त्या अज्ञानजनित संसारचक्रात कधीही अडकू शकत नाहीत. (४०)

विवरण :- कृष्णाला विषारी दूध पाजूनहि पूतनेला सद्‌गति मिळाली. मग ज्यांनी त्याला आपले अमृततुल्य दूध दिले, त्या गायी, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारे नंद यशोदा, सर्व गोपी, याना याहूनहि श्रेष्ठ अशी कोणती गती मिळावी ? स्वर्गप्राप्ती ? तेथील आणखी उच्चस्थान ? की मोक्ष ? परंतु वेगळा विचार केल्यानंतर असेही वाटते की, यावेळी हे सर्व लोक असे म्हणतील, हे कृष्ण परमात्म्या, आम्हाला फक्त तुझा आणि केवळ तुझाच सहवास हवा, प्रेम हवे, तुझ्या भक्तीमध्ये आम्ही निरंतर रममाण व्हावे. हाच आमचा स्वर्ग, हाच आमचा मोक्ष ! (सायुज्यता, समीपता, सरूपता ही नावे कदाचित त्याना माहित नसतील परंतु कृष्णाशी एकरूप होणे हाच त्यांचा सर्वोच्च आनंद होता.) (४०)



कटधूमस्य सौरभ्यं अवघ्राय व्रजौकसः ।
किमिदं कुत एवेति वदन्तो व्रजमाययुः ॥ ४१ ॥
सुगंधी धूर हा कैसा नंदाला वाटला तदा ।
जेंव्हा ते गोकुळी आले अन्य गोपासवे तिथे ॥ ४१ ॥

कटधूमस्य - प्रेत दहनापासून - सौरभ्यं अवघ्राय - निघालेला सुगंधित सुवास घेऊन - किम् इदं कुतः एव - हे काय व कोठून आले - इति वदंतः व्रजौकसः - असे बोलत गोकुळातील लोक. ॥४१॥
नंद वगैरे गोपांना जेव्हा चितेच्या धुराचा सुगंध येऊ लागला, तेव्हा, ’हे काय आहे ? हा सुगंध कोठून येत आहे ?’ असे म्हणत ते व्रजामध्ये पोहोचले. (४१)


ते तत्र वर्णितं गोपैः पूतना गमनादिकम् ।
श्रुत्वा तन्निधनं स्वस्ति शिशोश्चासन् सुविस्मिताः ॥ ४२ ॥
गोपिंनी कथिले सारे पूतनाघटना अशी ।
कृष्णाचे क्षेम ऐकोनी आश्चर्य वाटले मनीं ॥ ४२ ॥

तत्र गोपैः वर्णितं - तेथे गोपांनी वर्णन केलेले - पूतनागमनादिकं तन्निधनं - पूतनेचे येणे, तिचे मरण - शिशोः च स्वस्ति श्रुत्वा - व बालकाचा सुखरूपपणा इत्यादि ऐकून - सुविस्मिताः आसन् - अत्यंत आश्चर्यचकित झाले. ॥४२॥
तिथे गोपांनी त्यांना पूतनेच्या येण्यापासून ते मरेपर्यंत सर्व वृत्तांत सांगितला. पूतनेचा मृत्यू आणि श्रीकृष्णाचे सुखरूप असणे, हे ऐकून ते लोक अतिशय विस्मयचकित झाले. (४२)


नन्दः स्वपुत्रमादाय प्रेत्यागतमुदारधीः ।
मूर्ध्न्युपाघ्राय परमां मुदं लेभे कुरूद्वह ॥ ४३ ॥
उदार नंदबाबांनी बाळा पोटासि घेतले ।
सुंगिले शीर ही त्याचे आनंद चित्ति दाटला ॥ ४३ ॥

कुरूद्वह - हे कुरुकुलभूषणा राजा - उदारधीःनंदः - उदार अंतःकरणाचा नंद - प्रेत्य (इव) आगतं - मरूनच जणु काय पुनः आलेल्या - स्वपुत्रं आदाय - आपल्या पुत्राला घेऊन - मूर्ध्नि उपाघ्राय - मस्तकाला हुंगून - परमां मुदं लेभे - मोठया आनंदाला प्राप्त झाला. ॥४३॥
परीक्षिता ! मृत्यूच्या तावडीतून सुटून आलेल्या आपल्या मुलाला, उदार नंदांनी उचलून घेतले आणि वारंवार त्याचे मस्तक हुंगून ते अतिशय आनंदित झाले. (४३)


य एतत्पूतनामोक्षं कृष्णस्यार्भकमद्‍भुतम् ।
श्रृणुयात् श्रद्धया मर्त्यो गोविन्दे लभते रतिम् ॥ ४४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
अद्‌भुत बाळलीला ही पूतना मोक्ष हा असा ।
श्रद्धेने ऐकतो त्याला कृष्णाचे प्रेम लाभते ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

यः मर्त्यः - जो मनुष्य - एतत् कृष्णस्य - हे कृष्णाचे बाललीलेतील - अद्भुतं आर्भकं पूतनामोक्षं - पूतनामोक्षात्मक चमत्कारिक आख्यान - श्रद्धया श्रृणुयात् - श्रद्धेने ऐकेल - (सः) गोविंदे रतिं लभते - तो परमेश्वराच्या ठिकाणी प्रेम प्राप्त करून घेईल. ॥४४॥
हा ’पूतना-मोक्ष’ भगवान श्रीकृषणाची अद्‌भुत बाललीला आहे. जो मनुष्य श्रद्धेने याचे श्रवण करतो, त्याला भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम वाटू लागते. (४४)


अध्याय सहावा समाप्त

GO TOP