|
श्रीमद् भागवत पुराण
जिघांसोः कंसस्य हस्तात् उन्मुक्ताया देव्या भगवद् कंसाच्या हातून सुटून योगमायेचे आकाशात जाऊन भविष्यकथन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) बहिरन्तःपुरद्वारः सर्वाः पूर्ववदावृताः । ततो बालध्वनिं श्रुत्वा गृहपालाः समुत्थिताः ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्री शुकदेव सांगतात - आपोआपची ती द्वारे जाहली बंद तेधवा । शिशूचे रडणे येता उठले द्वारपाल ते ॥ १ ॥
बहिः अन्तः - बाहेरील व आतील - सर्वाः पुरद्वारः - सगळी नगराची द्वारे - पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे - आवृताः - झाकली गेली - ततः - मग - बालध्वनिम् श्रुत्वा - मुलाचा शब्द ऐकून - गृहपालाः - कारागृहाचे रक्षक - समुत्थिताः - उठले. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! जेव्हा वसुदेव परत आले, तेव्हा नगराच्या बाहेरील आणि आतील सर्व दरवाजे आपोआप पहिल्याप्रमाणे बंद झाले. यानंतर बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून द्वारपाल उठले. (१)
ते तु तूर्णं उपव्रज्य देवक्या गर्भजन्म तत् ।
आचख्युः भोजराजाय यदुद्विग्नः प्रतीक्षते ॥ २ ॥
त्वरीत भोजराजाच्या पासी जावोनी बोलले । प्रसूती देवकी झाली कंस तो चर्कला मनी ॥ २ ॥
ते तु - ते तर - तूर्णम् उपव्रज्य - त्वरेने जवळ जाऊन - देवक्याः तत् (अष्टमं) गर्भजन्म - देवकीच्या त्या आठव्या गर्भाचा जन्म - भोजराजाय आचख्युः - भोजराज कंसाला सांगते झाले - यत् - कारण - सः - तो - उद्विग्नः (सन्) - उद्विग्न होत्साता - प्रतीक्षते - वाट पाहत होता. ॥२॥
ते ताबडतोव कंसाकडे गेले आणि देवकीला मूल झाल्याचे त्यांनी सांगितले. भयभीत कंस याच गोष्टीची वाट पहात होता. (२)
स तल्पात् तूर्णमुत्थाय कालोऽयमिति विह्वलः ।
सूतीगृहं अगात् तूर्णं प्रस्खलन् मुक्तमूर्धजः ॥ ३ ॥
दूतांचे बोल ऐकोनी सूतिकारागृहि चालला । जन्मला काळ माझा हा स्मरता पडता उठे ॥ ३ ॥
सः - तो - तल्पात् तूर्णम् उत्थाय - शयनावरून झटकन उठून - अयम् कालः इति (मत्वा) - हा आपला काळ होय असे समजून - विह्वलः (भूत्वा) - विव्हळ होऊन - मुक्तमूर्धजः - मोकळे आहेत केश ज्याचे असा - प्रस्खलन् - धडपड करीत - तूर्णम् सूतीगृहम् अगात् - तत्काळ बाळंतिणीच्या खोलीशी गेला.॥३॥
ते ऐकताच तो ताबडतोब पलंगावरून उठून लगबगीने सूतिकागृहाकडे गेला. हा आपल्या काळाचाच जन्म आहे, असे समजून तो व्याकूळ झाला होता आणि यामुळे केस विस्कटलेल्या अवस्थेतच तो अडखळत चालला होता. (३)
तं आह भ्रातरं देवी कृपणा करुणं सती ।
स्नुषेयं तव कल्याण स्त्रियं मा हन्तुमर्हसि ॥ ४ ॥
तेथे जाताच करुणा दुःखाने देवकी वदे । हितैषी बंधु तू माझा स्त्रीहत्त्या नच हो करू । सुनेच्या परि ती आहे कंसा भाची तुझी पहा ॥ ४ ॥
तम् भ्रातरम् - त्या भावाला - सती कृपणा देवी - साध्वी अशी ती दीन देवकी - करुणम् आह - दीनवाणीने म्हणाली - हे कल्याण - हे भाग्यशाली बंधो - इयम् तव स्नुषा (स्यात्) - ही तुझी सून होईल - स्त्रियं हन्तुं मा अर्हसि - स्त्रीला मारण्यास तू योग्य नाहीस. ॥४॥
तेथे येताच सती देवकी दीनवाणी होऊन रडत रडत त्या आपल्या भावाला म्हणाली, "हे माझे हित चिंतिणार्या बंधो ! ही कन्या तुला सुनेप्रमाणे आहे. शिवाय स्त्रीला मारणे मुळीच योग्य नाही. (४)
विवरण :- गोकुळात बालकृष्णाला सुखरूप पोचविल्यानंतरच योगमायेच्या आगमनाची बातमी कंसाला समजली. तो धावतच आला. पुढे काय होणार याची पूर्ण कल्पना देवकीला आली आणि त्या बालिकेला जीवदान देण्यासाठी ती कंसाची करुणा भाकू लागली. वास्तविक ही मुलगी यशोदेची आहे, हे देवकीला माहीत होते; तरीही ती त्या मुलीच्या प्राणांची भीक कंसाकडे मागत होती. त्या मुलीमुळेच आपल्या मुलाचे रक्षण झाले, म्हणून तिला वाचवावे अशी परतफेडीची भावना तिथे नव्हती; तर ती याचना एका मातेची होती; मोठया मनाच्या सहृदय मातृत्वाची होती. ही मातृत्व भावना सर्व प्राणीमात्रात, अगदी पशूतही दिसून येते. शिवाय मुलीला चुपचाप कंसाच्या स्वाधीन केले असते, तर त्यालाही ते अस्वाभाविक वाटून शंका आलीच असती. (४)
बहवो हिंसिता भ्रातः शिशवः पावकोपमाः ।
त्वया दैवनिसृष्टेन पुत्रिकैका प्रदीयताम् ॥ ५ ॥
बंधो ! प्रारब्ध माझे तू तेजस्वी पुत्र मारिले । राहिली मुलगी ही तो द्यावी मजला पहा ॥ ५ ॥
भ्रातः - हे बंधो - (मे) बहवः पावकोपमाः शिशवः - माझे पुष्कळ अग्नीसारखे तेजस्वी बालक - दैवनिसृष्टेन त्वया - दैवाने प्रेरिलेल्या त्वा - हिंसिताः - मारिले - एका पुत्रिका (मे) प्रदीयताम् - एक मुलगी मला द्यावी. ॥५॥
हे बंधो ! तू माझ्या पुष्कळ अग्नीसमान तेजस्वी बालकांना दैववशात मारले आहेसच. निदान आता ही कन्या तरी मला दे. (५)
नन्वहं ते ह्यवरजा दीना हतसुता प्रभो ।
दातुमर्हसि मन्दाया अङ्गेमां चरमां प्रजाम् ॥ ६ ॥
बहीण मी तव सान दीन मी पुत्रमृत्युने । प्रियबंधो समर्थो तू कन्या अंतिम दे मला ॥ ६ ॥
प्रभो - हे समर्थ कंसा - हि - खरोखर - अहं - मी - ते - तुझी - हतसुता दीना अवरजा - मारिले आहेत पुत्र जीचे अशी दीन धाकटी बहीण - ननु - नाही काय - अंग - हे बंधो - मन्दायाः मे - मंदभागी अशा मला - इमाम् चरमां प्रजाम् - हे शेवटचे अपत्य - दातुम् अर्हसि - तू द्यावयास योग्य् आहेस. ॥६॥
हे राजा, माझी अनेक मुले मारल्यामुळे दुःखी झालेली मी तुझी बिचारी धाकटी बहीण आहे. म्हणून हे बंधो ! मला अभागिनीला हे शेवटचे मूल तरी दे." (६)
श्रीशुक उवाच -
उपगुह्य आत्मजां एवं रुदत्या दीन अदीनवत् । याचितस्तां विनिर्भर्त्स्य हस्ताद् आचिच्छिदे खलः ॥ ७ ॥
श्रीशुकदेव सांगतात - लपवी पोटि कन्येला देवकी रडता वदे । परी त्या दुष्ट कंसाने बळेचि पुत्रि ओढिली ॥ ७ ॥
आत्मजां उपगुह्य - आपल्या मुलीला उराशी धरून - एवं दीनदीनवत् रुदत्या (तया) - याप्रमाणे अति दीनवाणीने रडणार्या तिने - याचितः खलः - प्रार्थिलेला तो दुष्ट कंस - तां विनिर्भर्त्स्य - तिची निर्भर्त्सना करून - (कन्यकां) हस्तात् आचिच्छिदे - मुलीला हातांतून हिसकाविता झाला. ॥७॥
श्रीशुकदेव म्हणतात - मुलीला कवटाळून देवकीने अत्यंत दीनपणे रडत रडत अशी याचना केली. परंतु दुष्ट कंसाने तिला अपशब्द बोलून तिच्या हातातून ती मुलगी हिसकावून घेतली. (७)
तां गृहीत्वा चरणयोः जातमात्रां स्वसुः सुताम् ।
अपोथयत् शिलापृष्ठे स्वार्थोन्मूलितसौहृदः ॥ ८ ॥
बाळ भाच्ची तदा कंसे पायाला धरुनी पहा । गर्गरा फिरवोनीया आपटाया बघे तदा ॥ ८ ॥
तां जातमात्रां स्वसुः सुताम् - त्या नुकत्याच जन्मलेल्या बहिणीच्या मुलीला - चरणयोः गृहीत्वा - पायाशी धरून - स्वार्थोन्मूलितसौहृदः (कंसः) - स्वार्थाने नष्ट झाले आहे प्रेम ज्याचे असा कंस - शिलापृष्ठे अपोथयत् - शिळेच्या पाठीवर आपटता झाला. ॥८॥
आपल्या त्या नवजात भाचीचे पाय पकडून तिला जोराने एका खडकावर आपटले. त्याच्या हृदयातील प्रेमाला जणू स्वार्थाने मुळासकट उपटून टाकले होते. (८)
सा तद्हस्तात् समुत्पत्य सद्यो देव्यंबरं गता ।
अदृश्यतानुजा विष्णोः सायुधाष्टमहाभुजा ॥ ९ ॥
कृष्णाची भगिनी साधी-सुधी ना देवता तशी । हातची सुटली गेली नभी अष्टभुजा पहा ॥ ९ ॥
सा देवी - ती तेजस्वी कन्या - तद्धस्तात् समुत्पत्य - त्याच्या हातातून निसटून - सद्यःअंबरं गता - तत्काळ आकाशात गेली - (सा) विष्णोः अनुजा - ती विष्णूची धाकटी बहीण - सायुधा अष्टमहाभुजा अदृश्यत - सशस्त्र आणि आठ आहेत मोठे बाहु जिला अशी दिसली. ॥९॥
परंतु श्रीकृष्णाची ती धाकटी बहीण त्याच्या हातातून निसटून ताबडतोब आकाशात गेली आणि तीच, आपल्या आठ हातात शस्त्रास्त्रे घेतलेली मोठी देवी झालेली त्याला दिसली. (९)
दिव्यस्रग् अंबरालेप रत्नाभरणभूषिता ।
धनुःशूलेषुचर्मासि शंखचक्रगदाधरा ॥ १० ॥
दिव्यमालांबरोधारी अलंकार नि शस्त्र ते । चक्र शूळ त्रिशू खड्ग शंख ढाल गदा धनू ॥ १० ॥
दिव्यस्रगंबरालेपरत्नाभरणभूषिता - स्वर्गीय फुलांच्या माळा, वस्त्रे, उटया, रत्ने, भूषणे यांनी अलंकारिलेली - धनुःशूलेषुचर्मासिशंखचक्रगदाधरा - धनुष्य, शूल, बाण, ढाल, तलवार, शंख, चक्र आणि गदा धारण करणारी. ॥१०॥
ती दिव्य माळा, वस्त्रे, चंदन आणि रत्नमय अलंकारांनी विभूषित होती. तिच्या हातामध्ये धनुष्य, त्रिशूळ, बाण, ढाल, तलवार, शंख चक्र आणि गदा ही आठ आयुधे होती. (१०)
सिद्धचारणगन्धर्वैः अप्सरःकिन्नरोरगैः ।
उपाहृतोरुबलिभिः स्तूयमानेदमब्रवीत् ॥ ११ ॥
दिद्ध चारण गंधर्व अप्सरा नाग किन्नर । स्तविती वस्तु अर्पोनी देवी कंसास बोलली ॥ ११ ॥
उपाहृतोरुबलिभिः - आणिले आहेत पुष्कळ भेटीचे पदार्थ ज्यांनी अशा - सिद्धचारणगंधर्वैः - सिद्ध, चारण आणि गंधर्व यांनी - अप्सरःकिन्नरोरगैः - अप्सरा, किन्नर व सर्प यांनी - स्तूयमाना (सा) - स्तविली जाणारी ती - इदम् अब्रवीत् - असे बोलली. ॥११॥
सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा, किन्नर आणि नाग तिची स्तुती करीत होते. देवी कंसाला म्हणाली, (११)
किं मया हतया मन्द जातः खलु तवान्तकृत् ।
यत्र क्वं वा पूर्वशत्रुः मा हिंसीः कृपणान्वृथा ॥ १२ ॥
मूर्खा रे ! मज मारोनी मिळेल काय ते तुला । अन्यत्र वाढतो शत्रू न मारी बाळ अन्य ते ॥ १२ ॥
मन्द - हे मंदबुद्धे - मया हतया किम् - मी ठार झाल्याने काय होणार - तव अन्तकृत् - तुझा नाश करणारा - पूर्वशत्रुः - पूर्वजन्मीचा वैरी - यत्र क्व वा खलु जातः - कोठेतरी खरोखर जन्मला आहे - कृपणान् (शिशून्) - निरपराधी बालकांना - वृथा मा हिंसीः - निष्कारण मारू नकोस. ॥१२॥
अरे मूर्खा ! मला मारून तुला काय मिळणार आहे ? तुझ्या मागील जन्मातील शत्रू तुला मारण्यासाठी दुसर्या ठिकाणी कोठेतरी जन्माला आला आहे. आता तू निर्दोष बालकांची विनाकारण हत्या करू नकोस. (१२)
विवरण :- कंसाच्या हातून सुटून आकाशात जाणारी योगमाया ‘तुझा पूर्वशत्रू कोठेतरी आहे, (यत्र क्वचित् वा) असे कंसाला बजावते. ‘क्व - किंवा - क्वचित्’ नक्की कोठे याचा स्पष्ट उल्लेख नाही.’ ‘हिचा आठवा गर्भ तुला ठार मारेल’ (अष्टमः गर्भः) असे पूर्वीही देवांनी त्याला सांगितले होतेच. म्हणजे मुलगा की मुलगी हे गुलदस्त्यातच होते. फारच चातुर्याने शब्द वापरले होते. तेच तंत्र आता योगमायेचेहि. शत्रू प्रकट झाला. कुठे ? माहीत नाही. मृत्य़ूच्या कल्पनेने आधीच धास्तावलेला कंस या संदिग्ध गोलगोल शब्दांनी नक्कीच चक्रावून गेला असेल. (१२)
इति प्रभाष्य तं देवी माया भगवती भुवि ।
बहुनामनिकेतेषु बहुनामा बभूव ह ॥ १३ ॥
कंसाला वदुनी ऐसे माया अदृश्य जाहली । पृथ्वीशी अन्य नावाने प्रसिद्ध पावली पहा ॥ १३ ॥
इति तं प्रभाष्य - याप्रमाणे त्याला सांगून - (सा) देवी भगवती माया - ती तेजस्वी भाग्यशाली आदिमाया - भुवि - पृथ्वीवर - बहुनामनिकेतेषु - पुष्कळ नावांच्या ठिकाणी - बहुनामा बभूव ह - पुष्कळ नावांची खरोखर झाली. ॥१३॥
असे म्हणून भगवती योगमाया तेथून अंतर्धान पावली आणि पृथ्वीवरील अनेक ठिकाणी निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध झाली. (१३)
तया अभिहितं आकर्ण्य कंसः परमविस्मितः ।
देवकीं वसुदेवं च विमुच्य प्रश्रितोऽब्रवीत् ॥ १४ ॥
देवीचे बोल ऐकोनी कंसा आश्चर्य वाटले । देवकी वसुदेवाला वदे मुक्त करोनिया ॥ १४ ॥
तया अभिहितम् आकर्ण्य - तिने बोललेले शब्द ऐकून - कंसः परमविस्मितः (बभूव) - कंस अगदी आश्चर्यचकित झाला - देवकीं वसुदेवं च विमुच्य - आणि देवकीला व वसुदेवाला बंधमुक्त करून - प्रश्रितः - नम्र असा - अब्रवीत् - बोलला. ॥१४॥
देवीचे हे म्हणणे ऐकून कंसाला अतिशय आश्चर्य वाटले. त्याने त्याचवेळी देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून मुक्त केले आणि नम्रतेने तो त्यांना म्हणाला. (१४)
अहो भगिन्यहो भाम मया वां बत पाप्मना ।
पुरुषाद इवापत्यं बहवो हिंसिताः सुताः ॥ १५ ॥
भगिनी ! प्रिय भावोजी पापी मी राक्षसा परी । मारिले तुमचे पुत्र खेद हा वाटतो मला ॥ १५ ॥
अहो भगिनी - हे बहिणी - हे भाम - हे भगिनीपते - मया पाप्मना - म्या पाप्याने - पुरुषादः अपत्यम् इव - राक्षस आपले मूल जसे तसे - वांबहवः सुताः बत हिंसिताः - तुमचे पुष्कळ पुत्र खरोखर मारिले. ॥१५॥
अग ताई ! अहो भावोजी ! अरेरे ! मी अत्यंत पापी आहे. ज्याप्रमाणे राक्षस आपल्याच मुलांना मारून टाकतो, त्याचप्रमाणे मी तुमची बरीच मुले मारून टाकली. (१५)
स त्वहं त्यक्तकारुण्यः त्यक्तज्ञातिसुहृत् खलः ।
कान् लोकान् वै गमिष्यामि ब्रह्महेव मृतः श्वसन् ॥ १६ ॥
प्रेमाचा लेशही नाही एवढा दुष्ट मी पहा । हितैषी तोडिले सर्व नरको भोगणे मला ॥ १६ ॥
सः अहं तु - तो मी तर - त्यक्तकारुण्यः - ज्याने दया सोडिली आहे - त्यक्तजातिसुहृत् खलः - ज्याने ज्ञातिबांधव इष्टमित्र टाकिले आहेत असा दुष्ट - श्वसन् मृतः - जिवंत असून मेल्यासारखा - ब्रह्महा इव - ब्रह्मघातक्याप्रमाणे - कान् वै लोकान् गमिष्यामि - कोणत्या लोकी खरोखर जाणार. ॥१६॥
मी इतका दुष्ट आहे की, माझ्यामध्ये करुणेचा लवलेशही नाही. मी माझ्या बांधवांचा आणि मित्रांचाही त्याग केला आहे. आता मला कोणत्या नरकात जावे लागेल बरे ! मी तर ब्रह्मघातकी माणसाप्रमाणे जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. (१६)
दैवं अपि अनृतं वक्ति न मर्त्या एव केवलम् ।
यद् विश्रंभाद् अहं पापः स्वसुर्निहतवान् शिशून् ॥ १७ ॥
माणसे बोलती खोटे तसे देवहि बोलती । विश्वासुनि तयां शब्दी हाय ! मी पुत्र मारिले ॥ १७ ॥
दैवं अपि अनृतं वक्ति - देवतासुद्धा खोटे बोलतात - केवलं मर्त्या एव न (वदन्ति) - केवळ मनुष्य बोलतात असे नाही - यद्विश्रंभात् - ज्याच्यावरील विश्वासामुळे - पापःअहं - पापी मी - स्वसुः शिशून् निहतवान् - बहिणीच्या मुलांना मारिता झालो. ॥१७॥
फक्त माणसेच खोटे बोलतात असे नाही, तर विधाताही खोटे बोलतो. त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी पाप्याने बहिणीची मुले मारली. (१७)
मा शोचतं महाभागौ आत्मजान् स्वकृतंभुजः ।
जन्तवो न सदैकत्र दैवाधीनास्तदाऽऽसते ॥ १८ ॥
तुम्ही दोघे महात्मेची पुत्रांचा शोक ना करा । तयांचे कर्म ते होते न टळे दैव ते कुणा ॥ १८ ॥
महाभागौ - हे उदारबुद्धीच्या वसुदेवा व देवकी - स्वकृतंभुजः आत्मजान् मा शोचतं - आपल्या कर्माची फळे भोगणार्या आपल्या मुलांविषयी शोक करू नका - दैवाधीनाः जंतवः सदा न (आसते) - दैवाधीन असे प्राणी नेहमी राहणारे नाहीत - तद् (हि) एकत्र (न) आसते - आणि त्यातूनही एके ठिकाणी राहत नाहीत. ॥१८॥
तुम्ही दोघेही महात्मे आहात. आपल्या पुत्रांसाठी शोक करू नका. त्यांना त्यांच्या कर्माचेच फळ मिळाले. सर्व प्राणी प्रारब्धाच्या अधीन आहेत. म्हणूनच ते सर्वकाळ एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. (१८)
भुवि भौमानि भूतानि यथा यान्ति अपयान्ति च ।
नायमात्मा तथैतेषु विपर्येति यथैव भूः ॥ १९ ॥
मातीची बनती भांडी फुटता मातिची पुन्हा । तसे हे शरिराचे की आत्म्यासी सुखदुःख ना ॥ १९ ॥
यथा - ज्याप्रमाणे - भौमानि भूतानि - पृथ्वीपासून होणारे पदार्थ - (भुवः) यांति भुवि च अपयांति - पृथ्वीपासून होतात आणि पृथ्वीतच लय पावतात - यथा (एव) भूः न विपर्येति - ज्याप्रमाणे पृथ्वी अगदी भिन्न होत नाही - तथा एव एतेषु (भूतेषु उत्पद्यमानेषु लीयमानेषु च) - त्याचप्रमाणे ही शरीरे उत्पन्न होत असता व नष्ट होत असता - अयं आत्मा न विपर्येति - हा आत्मा विकृत होत नाही. ॥१९॥
जशा मातीच्या वस्तू तयार होतात आणि मातीत मिसळतात, परंतु मातीमध्ये काही बदल होत नाही. त्याचप्रमाणे शरीरांचे उत्पन्न होणे, नाहीसे होणे, हे चालूच असते. परंतु आत्म्यावर याचा काही प्रभाव पडत नाही. (१९)
यथानेवंविदो भेदो यत आत्मविपर्ययः ।
देहयोगवियोगौ च संसृतिर्न निवर्तते ॥ २० ॥
शरीरा मानिती आत्मा ती बुद्धी उलटी पहा । सरेना भव त्या भेदे अज्ञाने सुख ना मिळे ॥ २० ॥
यथा (वत्) - ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे - अनेवंविदः - हे न समजणार्याची - आत्मविपर्ययः (भवति) - आत्म्याच्या बाबतीत उलटी समजूत होते - यतः भेदः - ज्या समजुतीमुळे भेदबुद्धी होते - देहयोगवियोगौ - आणि म्हणून पुत्रकलत्रादि शरीराचे संयोग व वियोग - संसृतिः च न निवर्तते - आणि संसार ही नष्ट होत नाहीत. ॥२०॥
जे लोक हे तत्त्व जाणत नाहीत, ते या शरीरालाच आत्मा समजतात. यामुळेच पुत्रादि देहांशी संयोग व वियोग होतो, तेव्हा सुख-दुःखरूपी संसारातून सुटका होत नाही. (२०)
तस्माद्भद्रे स्वतनयान् मया व्यापादितानपि ।
मानुशोच यतः सर्वः स्वकृतं विन्दतेऽवशः ॥ २१ ॥
तुझे मी मारिले पुत्र तरी तू शोक ना करी । कर्माला भोगणे होते सर्व प्राण्यासि ते तसे ॥ २१ ॥
भद्रे - हे भाग्यशाली देवकी - यतः - कारण - अवशः सर्वः - पराधीन असा प्रत्येक प्राणी - स्वकृतं विंदते - आपल्या कर्माची फळे भोगितो - तस्मात् मया व्यापादितान् अपि - यास्तव मी मारिलेल्याही - स्वतनयान् मा अनुशोच - आपल्या मुलांविषयी शोक करू नकोस. ॥२१॥
म्हणून हे ताई ! मी जरी तुझ्या पुत्रांना मारले असले तरी तू त्यांच्यासाठी शोक करू नकोस; कारण सर्व प्राण्यांना पराधीनपणे आपापल्या कर्मांचे फळ भोगावेच लागते. (२१)
यावद्धतोऽस्मि हन्तास्मीति आत्मानं मन्यतेऽस्वदृक् ।
तावत् तद् अभिमान्यज्ञो बाध्यबाधकतामियात् ॥ २२ ॥
आपुले रूप नेणोनी वदती मारितो मरो । अज्ञाने भाव हा होतो दुःख देतो नि भोगितो ॥ २२ ॥
यावत् - जोपर्यंत - अस्वदृक् - आत्मस्वरूप न जाणणारा - तदभिमानी - देहाचा अभिमान बाळगणारा - आत्मानं हतः अस्मि हंता अस्मि इति मन्यते - मी मारिला गेलो किंवा मी मारणारा आहे असे मी मानितो - तावत् अज्ञः (सः) - तोपर्यंत अज्ञानी असा तो - बाध्यबाधकतां इयात् - बाध्य आणि बाधक या संबंधाला प्राप्त होतो. ॥२२॥
आपले स्वरूप न जाणल्यामुळे जोपर्यंत जीव असे मानतो की ’आपण मरणारा आहे किंवा मारणारा आहे’ तो पर्यंत शरीराच्या जन्म-मृत्यूचा अभिमान धरणारा हा अज्ञानी जीव पीडा देणारा वा पीडा भोगणारा होतो. (२२)
विवरण :- ‘मी तुमची मुलं मारली, क्षमा करा,’ अशा शब्दात जरी कंसाने क्षमायाचनेचा मानभावीपणा केला, तरी यामध्ये माझा काही दोष नाही; जे झाले, ते त्यांच्या नशीबातच होते, मी फक्त निमित्तमात्र, असा कांगावाही त्याने केला होता. (मी नाही मारले, माझ्या हाताने मारले - असा भाव.) मात्र जाता जाता त्याने एक सनातन सत्यही सांगितले. (अर्थात त्याला अनुकूल असे) ती मुले जन्मल्यानंतर लगेच मेली, तशाप्रकारचा मृत्यू त्यांच्या नशिबातच होता, पूर्वजन्मातील कृत्यानुसारच त्यांना तशी गती मिळाली, शिवाय हे सर्व जन्मणे-नष्ट होणे मरणे-मारणे असा विचार करणे म्हणजेच घोर अज्ञान, अशा विचारांनी अज्ञानी जीव संसाराच्या फेर्यात अडकतात, फिरत रहातात, दुःखी होतात. जन्म-मृत्यू वगैरे काही नसते. माती कधी नष्ट होते कां ? तिच्यापासून निर्माण होणारे घट नष्ट होतात. तसेच परमात्म्याचे, तो नष्ट होत नाही, निर्माणही होत नाही. तो चिरंजीव, शरीर नाशवंत. तेव्हा उगीच शोक करू नका. (आणि मलाहि दोष देऊ नका - हे महत्त्वाचे) अशा शब्दात त्याने आपल्या कृत्याचे समर्थन केले. जाता जाता हे देवहि खोटे बोलतात बरं का असाही टोमणेवजा शेरा त्याने मारला. कंसाच्या या वागण्या-बोलण्यास ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ ही म्हण लागू पडते. ‘जन्म-मृत्यू वगैरे काही खरे नाही, फक्त अज्ञान,’ किंवा ‘देवकीच्या मुलांचा मृत्यू म्हणजे त्यांच्या गतजन्मीच्या कृत्याचे फळ’ असे म्हणणार्या कंसाची देवकीच्या गर्भापासून मृत्यू असे ऐकल्यावर पाचावर धारण का बसावी ? (१५-२२)
क्षमध्वं मम दौरात्म्यं साधवो दीनवत्सलाः ।
इत्युक्त्वाश्रुमुखः पादौ श्यालः स्वस्रोः अथाग्रहीत् ॥ २३ ॥
दुष्टतेला क्षमा व्हावी संत दीनांसि रक्षिती । वदता पडला पाया कंस तो रडला असे ॥ २३ ॥
दीनवत्सलाः साधवः - अहो दीनावर दया करणारे सज्जन हो - मम दौरात्म्यं क्षमध्वं - माझ्या दुष्टपणाची क्षमा करा - इति उक्त्वा - असे म्हणून - अथ - मग - अश्रुमुखः (सः) श्यालः - मुखावर अश्रु गळत आहेत ज्याच्या असा तो वसुदेवाचा मेहुणा - स्वस्रोः पादौ अग्रहीत् - बहिण व मेहुणा ह्या दोघांचे पाय धरिता झाला. ॥२३॥
माझ्या या दुष्टतेला तुम्ही दोघांनी क्षमा करावी; कारण तुम्ही सज्जन आहात. असे म्हणून कंसाने देवकी-वसुदेवांचे पाय धरले. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. (२३)
मोचयामास निगडात् विश्रब्धः कन्यकागिरा ।
देवकीं वसुदेवं च दर्शयन् आत्मसौहृदम् ॥ २४ ॥
योगमायेवरी कंसे विश्वास ठेवुनी तदा । सोडिले पति पत्नीला प्रेमही दावु लागला ॥ २४ ॥
कन्यकागिरा विश्रब्धः - कन्यारूपी योगमायेच्या भाषणाने विश्वास उत्पन्न झालेला कंस - देवकीं वसुदेवं च आत्मसौहृदं दर्शयन् - देवकी आणि वसुदेव ह्यांना आपले प्रेम दाखवीत - निगडात् मोचयामास - शृंखलांपासून मुक्त करिता झाला. ॥२४॥
यानंतर त्याने योगमायेच्या वचनावर विश्वास ठेवून स्वतःच्या सौजन्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून सोडून दिले. (२४)
भ्रातुः समनुतप्तस्य क्षान्त्वा रोषं च देवकी ।
व्यसृजत् वसुदेवश्च प्रहस्य तमुवाच ह ॥ २५ ॥
देवकी पाहुनी बंधु क्षमाचि बोलली असे । दुःख ते विसरोनीया बोलले वसुदेवजी ॥ २५ ॥
च - आणि - क्षान्तरोषा देवकी - जिचा राग शांत झाला आहे अशी देवकी - समनुतप्तस्य भ्रातुः - पश्चात्ताप प्राप्त झालेल्या भाऊ कंसाला - व्यसृजत् - जाऊ देती झाली - वसुदेवः च प्रहस्य तं उवाच ह - आणि वसुदेव स्मित हास्य करून त्याला म्हणाला. ॥२५॥
कंसाला पश्चात्ताप झालेला पाहून देवकीने त्याला क्षमा केली. तिचा राग मावळला. त्याचवेळी वसुदेव हसून त्याला म्हणाले, (२५)
एवमेतन्महाभाग यथा वदसि देहिनाम् ।
अज्ञानप्रभवाहंधीः स्वपरेति भिदा यतः ॥ २६ ॥
कंसजी ! बोलता सत्य जीव हा तनु मी म्हणे । म्हणोनी आपुले आणि दुजाचा भेद होतसे ॥ २६ ॥
महाभाग यथा वदसि एवं एतत् - हे भाग्यशाली पुरुषा, तू जसे म्हणतोस तसे हे आहे - यतः स्वपरेतिभिदा भवति - जिच्यामुळे मी व दुसरा अशी भेदबुद्धी होते - (सा) देहिनां अहंधीः अज्ञानप्रभवा - ती प्राण्यांची अहंकारबुद्धी अज्ञानापासून उत्पन्न होते. ॥२६॥
हे कंसा ! तू म्हणतोस ते खरे आहे. अज्ञानामुळेच जीव शरीर इत्यादिंना ’मी’ असे समजतो. यामुळेच आप-परभाव निर्माण होतो. (२६)
विवरण :- वसुदेव-देवकीची मुले मारल्याबद्दलचा कंसाला झालेला पश्चात्ताप हा वरवरचा होता, हे उघड आहे. मात्र त्या दोघांनी त्याला मनापासून क्षमा केली. (क्षमाशस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति ?) आणि त्याचे सांत्वनहि केले. वसुदेव म्हणतो, हा सर्व अज्ञानाचा खेळ. मनुष्य षड्रिपुंच्या जाळ्यात अडकतो, हे माझे हे माझे अशी कोती भावना त्याच्या मनात निर्माण होते, भेदभाव निर्माण होतो, सृष्टीत कलह होतो, परिणामी मनुष्य दुःखी होतो. या भावनेच्या पलीकडे गेल्यावर म्हणजेच आत्मा-परमात्मा यांचे ज्ञान झाले की तो दुःखातून मुक्त होईल. (ज्ञानात् मोक्षः) झाल्या गोष्टीबद्दल तू दुःख करू नको. जे झाले, त्यात तुझा दोष नसून योग्य ज्ञानाच्या अभावी हे झाले, असा वसुदेवाचा बोलण्याचा भाव. (२५-२६)
शोकहर्षभयद्वेष लोभमोहमदान्विताः ।
मिथो घ्नन्तं न पश्यन्ति भावैर्भावं पृथग्दृशः ॥ २७ ॥
शोक हर्ष भयो द्वेष लोभ मोह मदांध ते । भेद तो मानिता होती स्वामी प्रेरक ना कळे ॥ २७ ॥
शोकहर्षभयद्वेषलोभमोहमदान्विताः - शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मोह व गर्व यांनी युक्त - पृथक्दृशः - व भेदबुद्धीने पाहणारे लोक - (निमित्तभूतैः) भावैः - निमित्तमात्र होणार्या काही देहाकडून - (भावान्) मिथः घ्नंतः - इतर देहांचा परस्पर नाश करविणार्या - भावं न पश्यंति - परमेश्वररूप वस्तूला पाहत नाहीत. ॥२७॥
आणि अशी भेददृष्टी झाल्यानेच शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मोह आणि मदाने लोक आंधळे होतात. आणि सर्वांना प्रेरणा देणारे भगवंतच एका वस्तूने दुसर्या वस्तूचा परस्पर नाश करीत आहेत, याचे त्यांना भान राहात नाही. (२७)
श्रीशुक उवाच -
कंस एवं प्रसन्नाभ्यां विशुद्धं प्रतिभाषितः । देवकी वसुदेवाभ्यां अनुज्ञातो आविशत् गृहम् ॥ २८ ॥
श्रीशुकदेव सांगतात - देवकी वसुदेवो ते बोलता मोकळे असे । संमती घेउनी कंस महाली पातला पुन्हा ॥ २८ ॥
प्रसन्नाभ्यां देवकीवसुदेवाभ्यां - संतुष्ट झालेल्या देवकी व वसुदेव यांच्याकडून - एवं विशुद्धं प्रतिभाषितः - याप्रमाणे निष्कपटपणाचे उत्तर दिले गेलेला - अनुज्ञातः कंसः गृहं अविशत् - व त्यांनी आज्ञा दिलेला कंस घरी गेला. ॥२८॥
श्रीशुकदेव म्हणतात - अशा प्रकारे जेव्हा प्रसन्न होऊन निष्कपट भावाने वसुदेव आणि देवकी कंसाशी बोलले, तेव्हा त्यांची अनुमती घेऊन तो आपल्या महालाकडे निघून गेला. (२८)
तस्यां रात्र्यां व्यतीतायां कंस आहूय मंत्रिणः ।
तेभ्य आचष्ट तत् सर्वं यदुक्तं योगनिद्रया ॥ २९ ॥
संपली रात्र ती आणि कंसाने मंत्री सर्व ते । बोलावोनी तया सांगे योगमायाप्रसंग तो ॥ २९ ॥
तस्यां रात्र्यां व्यतीतायां - ती रात्र निघून गेल्यावर - मंत्रिणः आहूय - प्रधानांना बोलावून - कंसः - कंस - योगनिद्रया यत् उक्तं - योगमायेने जे सांगितले होते - तत् सर्वं तेभ्यः आचष्ट - ते सर्व त्यांना निवेदन करिता झाला. ॥२९॥
ती रात्र उलटून गेल्यावर कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि योगमायेने जे सांगितले होते, ते सर्व कथन केले. (२९)
आकर्ण्य भर्तुर्गदितं तं ऊचुः देवशत्रवः ।
देवान् प्रति कृतामर्षा दैतेया नातिकोविदाः ॥ ३० ॥
न तज्ञ मंत्री ते कोणी देवशत्रु स्वभाव तो । चिडले देवतांशी ते कंसासी बोलले असे ॥ ३० ॥
(ततः) देवशत्रवः नातिकोविदाः दैतेयाः - तेव्हा ते देवांचे शत्रू व अदूरदर्शी दैत्य - भर्तुः गदितं आकर्ण्य - आपल्या धन्याचे भाषण ऐकून - देवान् प्रति कृतामर्षाः तं ऊचुः - देवांविषयी आलेला आहे राग ज्यांना असे त्या कंसाला म्हणाले. ॥३०॥
कंसाचे मंत्री फारसे शहाणे नव्हते. दैत्य असल्यामुळे स्वभावतःच ते देवांचा द्वेष करीत होते. आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकल्यावर ते देवशत्रू कंसाला म्हणाले. (३०)
एवं चेत्तर्हि भोजेन्द्र पुरग्राम व्रजादिषु ।
अनिर्दशान् निर्दशांश्च हनिष्यामोऽद्य वै शिशून् ॥ ३१ ॥
भोजराजा ! अशी गोष्ट असता सर्व बालके । दशदिनाहुनी सान थोर ही सर्व मारु की ॥ ३१ ॥
भोजेंद्र एवं चेत् तर्हि - हे भोजराजा असे जर आहे तर - अद्य पुरग्रामव्रजादिषु - आज नगरे, गावे व गोकुळे आदिकरून सर्व ठिकाणी असलेल्या - अनिर्दशान् निदर्शान् च शिशून् - दहा दिवसांच्या आतील व दहा दिवसानंतरच्या सर्व मुलांना - वै हनिष्यामः - आपण खरोखरच मारून टाकू या. ॥३१॥
"भोजराज ! असे असेल तर आम्ही आजच शहरे, गावे, गवळ्यांच्या वस्त्या इत्यादि ठीकाणी जेवढी लहान मुले असतील, मग ती दहा दिवसांच्या आतील किंवा बाहेरची असोत, सर्वांना आजच मारून टाकतो." (३१)
विवरण :- राजवाडयात परत आल्यावर कंसाने आपल्या सर्व मंत्र्यांना सल्ला-मसलतीसाठी बोलाविले. त्या मंत्र्यांचे वर्णन ‘नातिकोविदाः’ असे केले आहे. (नातिकोविदाः - फारसे शहाणे नसलेले) आणि नंतर त्यानी जे वक्तव्य केले, त्यावरूनहि त्यांच्या बुद्धीची झेप दिसून येते. ‘कंसाचा शत्रू (कृष्ण) शोधून काढण्यास आपण मथुरेतील नुकतीच जन्मलेली सर्व मुले ठार करू’ हा सल्ला कितीसे शहाणपण दाखविणारा ? कंस म्हणजे ‘आधीच मर्कट - तशातचि मद्य प्याला’ या अवस्थेतील. तो राजा म्हणून प्रजेच्या पालकत्वाची त्याला आठवण करून द्यावयाचे सोडून निष्पाप बालके मारण्याची आज्ञा मागणारे हे मंत्री किती शहाणे म्हणायचे ? राज्यशकटाचे प्रधान अंग असणारे मंत्रीगण सारासार विवेक असणारे आणि दूरदृष्टीचे हवेत हेच खरे ! (३०-३१)
किं उद्यमैः करिष्यन्ति देवाः समरभीरवः ।
नित्यं उद्विग्नमनसो ज्याघोषैर्धनुषस्तव ॥ ३२ ॥
देव ते भिरु युद्धासी करिती काय ते बघू । टणत्कार धनुष्याचा ऐकता पळतील की ॥ ३२ ॥
तव धनुषः ज्याघोषैः - तुझ्या धनुष्याच्या दोरीच्या शब्दांनी - नित्यं उद्विग्नमनसः - ज्यांची मने नित्य भेदरून गेलेली असतात - समरभीरवः देवाः - व युद्धाच्या कामात अगदी भित्रे असे देव - उद्यमैः (अस्माकम्) किं करिष्यंति - प्रयत्न करून आपले काय करणार. ॥३२॥
रणांगणाला भिणारे देवगण युद्धाची तयारी करूनही काय करणार आहेत ? ते तर आपल्या धनुष्याचा टणत्कार ऐकूनच नेहमी घाबरलेले असतात. (३२)
अस्यतस्ते शरव्रातैः हन्यमानाः समन्ततः ।
जिजीविषव उत्सृज्य पलायनपरा ययुः ॥ ३३ ॥
युद्धात घाव घावासी लागता जखमी तसे । पलायनपरायेण चौदिशां पळतील ते ॥ ३३ ॥
अस्यतः ते शरव्रातैः - तुझ्या सोडिलेल्या बाणांच्या वर्षावांनी - समंततः हन्यमानाः - चोहोकडून ताडले गेलेले देव - जिजीविषवः (रणं) उत्सृज्य - जगण्याची इच्छा करणारे युद्ध सोडून - पलायनपराः ययुः - पळून जाण्याविषयी उद्युक्त झाले. ॥३३॥
जेव्हा आपण त्यांच्यावर बाणवर्षाव करून त्यांना घायाळ करता, तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी युद्धभूमी सोडून देव पळू लागतात. (३३)
केचित् प्राञ्जलयो दीना न्यस्तशस्त्रा दिवौकसः ।
मुक्तकच्छशिखाः केचिद् भीताः स्म इति वादिनः ॥ ३४ ॥
देवता शत्र ठेवोनी प्राणाची भीक मागती । काष्टे शिखाहि सोडोनी शरणी रक्ष बोलती ॥ ३४ ॥
केचित् दिवौकसः न्यस्तशस्त्राः - कित्येक देव हातांतील शस्त्रे टाकून - दीनाः प्राञ्जलयः तिष्ठन्ति - दीनपणे हात जोडून उभे राहतात - केचित् मुक्तकच्छशिखाः - कित्येक शिखा व कासोटे सुटलेले असे - भीताः स्म इति वादिनः (भवन्ति) - आम्ही भ्यालो आहो असे म्हणतात. ॥३४॥
काही देव तर आपली शस्त्रास्त्रे जमिनीवर टाकून हात जोडून दीनपणा प्रगट करू लागतात. तर काही जण शेंड्या सोडून कासोटे फेडून आपल्याला शरण येतात आणि म्हणतात की, आम्ही भयभीत झालो आहोत, आमचे रक्षण करा." (३४)
न त्वं विस्मृतशस्त्रास्त्रान् विरथान् भयसंवृतान् ।
हंस्यन्यासक्तविमुखान् भग्नचापानयुध्यतः ॥ ३५ ॥
शस्त्र अस्त्रा विणा कोणी भित्रा वा पाठ दावि त्यां । न मारी कोणिही दैत्य तेणे देव बळावती ॥ ३५ ॥
त्वं - तू - विस्मृतशस्त्रास्त्रान् विरथान् - तू शस्त्रास्त्रे विसरून आलेल्या व ज्यांना रथ नाहीत अशा - भयसंवृतान् - भयभीत झालेल्या - अन्यासक्तविमुखान् - व दुसर्यांशी युद्ध करीत असल्यामुळे तुझ्यासमोर नसलेल्या - भग्नचापान् अयुद्ध्यतः शत्रून् - धनुष्य मोडलेल्या व युद्ध करीत नसलेल्या शत्रूंना - न हंसि - मारीत नाहीस. ॥३५॥
जे शत्रू शस्त्रास्त्रप्रयोग विसरले आहेत, ज्यांचे रथ मोडून पडले आहेत, जे भयभीत झाले आहेत, जे लोक युद्ध सोडून विमनस्क स्थितीत आहेत, ज्यांची आयुधे मोडली आहेत किंवा ज्यांनी युद्धाकडे पाठ फिरविली आहे, अशांना आपण मारीत नाही. (३५)
किं क्षेमशूरैर्विबुधैः असंयुगविकत्थनैः ।
रहोजुषा किं हरिणा शंभुना वा वनौकसा । किं इंद्रेणाल्पवीर्येण ब्रह्मणा वा तपस्यता ॥ ३६ ॥
रणा बाहेर ते वीर विष्णु शंकर इंद्र तो । करील काय ते पाहू भ्रह्माही आपुल्या पुढे ॥ ३६ ॥
क्षेमशूरैः - निर्भय देशात शूर म्हणविणार्या - असंयुगविकत्थनैः - व युद्धाशिवाय इतर ठिकाणी प्रौढी मिरविणार्या - विबुधैः किं - देवांकडून आमचे काय होणार - रहोजुषा हरिणा वनौकसा - एकांत सेवणार्या विष्णूच्याने किंवा अरण्यात राहणार्या - शंभुना वा किं - शंकराच्याने आमचे काय होणार - अल्पवीर्येण इंद्रेण - अल्पशक्तीच्या इंद्राकडून - तपस्यता ब्रह्मणा वा (अस्माकं किं भविष्यति) - किंवा तपश्चर्या करणार्या ब्रह्मदेवाकडून आमचे काय होणार आहे. ॥३६॥
जिथे भांडण तंटा नसेल तेथेच देवांचे शौर्य. रणभूमीच्या बाहेरच ते फुशारकी मारतात. ते, तसेच एकांतवासात राहणारा विष्णू, वनवासी शंकर, अल्प सामर्थ्य असणारा इंद्र आणि तपस्वी ब्रह्मदेव यांच्यापासून आपल्याला काय भय असणार आहे ? (३६)
तथापि देवाः सापत्न्यान् नोपेक्ष्या इति मन्महे ।
ततः तन्मूलखनने नियुंक्ष्वास्मान् अनुव्रतान् ॥ ३७ ॥
उपेक्षा तरि ही त्यांची न करा आमुच्या मते । मूळ ते उकरायाला सोपवा आमुच्या वरी ॥ ३७ ॥
तथापि सापत्न्यात् देवाः - तरीही त्यांच्याविषयीच्या वैरामुळे देव - न उपेक्ष्याः इति मन्महे - उपेक्षा करण्यास योग्य नाहीत असे आम्हाला वाटते - ततः अनुव्रतान् अस्मान् - म्हणून आज्ञाधारी अशा आम्हाला - तन्मूलखनने नियुंक्ष्व - त्यांची पाळेमुळे खणून काढण्याच्या कामी योज. ॥३७॥
आमचे मत असे आहे की, असे असले तरी देवांची उपेक्षा करता कामा नये; कारण ते आपले शत्रू आहेत. म्हणून त्यांचे मूळच उखडून टाकण्यासाठी आपण आमच्यासारख्या विश्वासपात्र सेवकांची नेमणूक करावी. (३७)
( वंशस्थ )
यथामयोंऽगे समुपेक्षितो नृभिः न शक्यते रूढपदश्चिकित्सितुम् । यथेन्द्रियग्राम उपेक्षितस्तथा रिपुर्महान् बद्धबलो न चाल्यते ॥ ३८ ॥
( इंद्रवज्रा ) दुर्लक्ष होता चढतोचि रोग असाध्य होतो जरि तो हि सान । तसाचि शत्रू बळवे म्हणोनी दुर्लक्ष त्याचे नच ते करावे ॥ ३८ ॥
यथा नृभिः समुपेक्षितः - ज्याप्रमाणे मनुष्यांनी सर्वस्वी हयगय केलेला - (अतएव) अंगे रूढपदः आमयः - व म्हणूनच शरीरात रोविलेला आहे पाय ज्याने असा रोग - चिकित्सितुं न शक्यते - उपाययोजना करण्यास शक्य होत नाही - यथा उपेक्षितः इंद्रियग्रामः - ज्याप्रमाणे उपेक्षा केलेला इंद्रियांचा समूह - तथा (उपेक्षितः सन्) - त्याप्रमाणे उपेक्षा केल्यामुळे - बद्धबलः महान् रिपुः न चाल्यते - सैन्य जमवून बलिष्ठ झालेला शत्रू जिंकिला जात नाही. ॥३८॥
जेव्हा शरीरात रोग उत्पन्न होतो आणि त्याची उपेक्षा केल्यामुळे आपले मूळ घट्ट धरतो आणि मग असाध्य होतो, किंवा इंद्रियांची उपेक्षा केल्यावर त्यांचे नियंत्रण करणे कठीण होते, त्याप्रमाणे जर शत्रूची आधी उपेक्षा केली तर मग तो आपले सामर्थ्य वाढवितो आणि मग त्याचा प्रभाव करणे अवघड होऊन बसते. (३८)
( अनुष्टुप् )
मूलं हि विष्णुः देवानां यत्र धर्मः सनातनः । तस्य च ब्रह्मगोविप्राः तपो यज्ञाः सदक्षिणाः ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् ) मूळ तो विष्णु देवांचा राही धर्मी सनातनी । तप वेद द्विजो गायी यज्ञाची दक्षिणा तिथे ॥ ३९ ॥
विष्णुः हि - विष्णु खरोखर - देवानां मूलं (अस्ति) - देवांचा मूळ आधार होय - यत्र - ज्याठिकाणी - सनातनः धर्मः (अस्ति) - त्रिकालाबाधित धर्म असतो - तस्य च धर्मस्य मूलं - आणि त्या धर्माचे मूळ कारण - ब्रह्मगोविप्राः - वेद, गाई, व ब्राह्मण - सदक्षिणाः यज्ञाः (सन्ति) - दक्षिणायुक्त यज्ञ होत. ॥३९॥
देवांचा आधार विष्णू आहे आणि जिथे सनातन धर्म आहे, तिथे तो राहतो. वेद, गाय, ब्राह्मण, तपश्चर्या आणि ज्यामध्ये दक्षिणा दिली जाते ते यज्ञ; ही सनातन धर्माची मुळे होत. (३९)
तस्मात्सर्वात्मना राजन् ब्राह्मणान् ब्रह्मवादिनः ।
तपस्विनो यज्ञशीलान् गाश्च हन्मो हविर्दुघाः ॥ ४० ॥
म्हणोनी भोजराजारे आम्ही ब्राह्मण नी तपी । याज्ञीक गायि त्या सर्व मारोनी टाकितो पहा ॥ ४० ॥
तस्मात् - म्हणून - राजन् - हे राजा कंसा - ब्रह्मवादिनः ब्राह्मणान् - वेदपठण करणार्या ब्राह्मणांना - तपस्विनः - तप करणार्यांना - यज्ञशीलान् - यज्ञ हेच आहे व्रत ज्यांचे अशांना - हविर्दुधाः गाः च - यज्ञाला लागणारे दूध देणार्या गाई सुद्धा - वयं सर्वात्मना हन्मः - आपण सर्व प्रयत्न करून मारू या. ॥४०॥
म्हणून हे भोजराज ! वेदवेत्ते ब्राह्मण, तपस्वी, याज्ञिक आणि यज्ञासाठी तूप इत्यादि हविर्द्रव्य देणार्या गाईंचा आम्ही संपूर्ण निःपात करू. (४०)
विप्रा गावश्च वेदाश्च तपः सत्यं दमः शमः ।
श्रद्धा दया तितिक्षा च क्रतवश्च हरेस्तनूः ॥ ४१ ॥
तपस्या वेद गो सत्य दमनो निग्रहो दया । तितिक्षा यज्ञ नी श्रद्धा विष्णूचे हे शरीर की ॥ ४१ ॥
विप्राः - ब्राह्मण - गावः च - आणि गाई - वेदाः च - आणि वेद - तपः सत्यं दमः शमः - तपश्चर्या, सत्य भाषण, इंद्रियदमन, शांति, - श्रद्धा दया तितिक्षा च - श्रद्धा, दया व सहनशीलपणा - क्रतवः च - आणि यज्ञ आदिकरून कर्मे - हरेः तनूः (सन्ति) - श्रीहरीची स्वरूपे होत. ॥४१॥
ब्राह्मण, गाई, वेद, तपश्चर्या, सत्य, इंद्रियदमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, सहनशीलता आणि यज्ञ ही विष्णूची शरीरे आहेत. (४१)
विवरण :- तामसी गुणाच्या आधिपत्याखाली असलेल्या कंसाच्या मंत्र्यांनी देवांचा निःपात करण्याची अनुज्ञा त्याच्याकडे मागितली. कंसाची खुशामत करून देवांची यथेच्छ टिंगल-टवाळी केली. त्यांच्या दृष्टीने त्यांचे मुख्य शत्रू दोन - विष्णू व शंकर. सर्व देवांचा अधिपती विष्णू. त्याला मारले की सर्व देव शरण येतील. (झाड तोडल्यावर फांद्या आपोआपच खाली येतील. त्याप्रमाणे) त्याला कसे मारायचे? ज्या ब्रह्मवादी, तपस्वी, साधू, गाय, यांसारख्या सात्त्विक वृत्तीच्या लोकांमध्ये विष्णूचे वास्तव्य असते. त्याना मारायचे याचाच अर्थ सर्व उत्तम व सात्त्विक गोष्टीमध्ये भगवंताचे अस्तित्व. (उत्तमात मी सर्वोत्तम असे पुढे भगवान कृष्णाने गीतेत सांगितलेच आहे.) सर्व सात्त्विक गोष्टींचा - ऋषि-मुनींचा नाश म्हणजे भगवंताचा नाश असे साधे-सोपे-सरळ गणित. मनुष्याची जशी वृत्ती तशी कृती. असुरी वृत्तीच्या डोळ्यात सात्त्विक वृत्ती खुपणारच आणि ती नाहीशी करायला तो पुढे सरसावणारच. तामसी वृत्तीच्या असुराना हिंसेशिवाय आनंद कोठून? मात्र ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः’ या तत्त्वानुसार भगवान विष्णूना मारण्याची योजना करुन त्या मंत्र्यानी आणि कंसानेही आत्मघातालाच निमंत्रण दिले, हे निश्चित. (स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति ।) (३३-४१)
स हि सर्वसुराध्यक्षो ह्यसुरद्विड् गुहाशयः ।
तन्मूला देवताः सर्वाः सेश्वराः सचतुर्मुखाः । अयं वै तद्वधोपायो यद्ऋषीणां विहिंसनम् ॥ ४२ ॥
स्वामी तो सर्व देवांचा असुरां मुख्य शत्रु तो । गुंफेत लपुनी राही शिव ब्रह्म्यासि तो मुळ । ऋषी ते मारता सर्व आपैस तोहि की मरे ॥ ४२ ॥
सः हि - तो श्रीहरी खरोखर - सर्वसुराध्यक्षः - सर्व देवांचा प्रमुख - हि असुर द्विड् - खरोखर असुरांचा द्वेष करणारा - गुहाशयः (अस्ति) - गुहेत राहणारा आहे - सेश्वराः सचतुर्मुखाः सर्वाः देवताः - शंकर व ब्रह्मदेव यासह सर्व देव - तन्मूलाः (सन्ति) - तो हरी आहे आधार ज्यांचा असे आहेत - अयं वै तद्वधोपायः (अस्ति) - हा खरोखर त्यांच्या नाशाचा उपाय आहे - यत् - जे - ऋषीणां विहिंसनम् - ऋषींना सर्वस्वी नष्ट करणे. ॥४२॥
तो विष्णूच सर्व देवांचा स्वामी आणि असुरांचा द्वेष करणारा आहे. परंतु तो कुठेतरी गुहेत लपून राहतो. महादेव, ब्रह्मदेव आणि सर्व देवतांचे मूळ तोच आहे. सर्व ऋषींना मारून टाकणे, हाच त्याला मारण्याचा उपाय आहे. (४२)
श्रीशुक उवाच -
एवं दुर्मंत्रिभिः कंसः सह सम्मन्त्र्य दुर्मतिः । ब्रह्महिंसां हितं मेने कालपाशावृतोऽसुरः ॥ ४३ ॥
श्रीशुकदेव सांगतात - आधीच नासकी बुद्धी मंत्रीही त्यात हे असे । सर्वांची राय ती झाली ब्राह्मणा मारणे तसे ॥ ४३ ॥
एवं दुर्मंत्रिभिः सह संमन्त्र्य - याप्रमाणे दुष्ट मंत्र्यांशी विचार करून - कालपाशावृतः - कालाच्या पाशांनी वेष्ठिलेला - असुरः दुर्मतिः कंसः - असा तो असुर दुष्टबुद्धीचा कंस - ब्रह्महिंसां हितं मेने - ब्राह्मणांचा वध हितकारक मानिता झाला. ॥४३॥
श्रीशुकदेव म्हणतात - अशा रीतीने दुष्ट मंत्र्यांशी सल्ला - मसलत करून काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांनाच मारणे योग्य ठरवले. (४३)
सन्दिश्य साधुलोकस्य कदने कदनप्रियान् ।
कामरूपधरान् दिक्षु दानवान् गृहमाविशत् ॥ ४४ ॥
हिंसाप्रेमी अशा दैत्या संतहिंसेसि धाडिले । इच्छेनुसार ती रूपे घेता कार्यास लागले ॥ ४४ ॥
साधुलोकस्य कदने - साधु लोकांचा नाश करण्याच्या कामी - कदनप्रियान् - नाश करणे ज्यांना प्रिय आहे अशा - कामरूपधरान् दानवान् - व इच्छेस येईल ते रूप धारण करणार्या दानवांना - दिक्षु संदिश्य - निरनिराळ्या दिशांमध्ये आज्ञा देऊन पाठविल्यावर - गृहम् आविशत् - आपल्या घरात गेला. ॥४४॥
त्याने इच्छेनुसार रूप धारण करणार्या हिंसाप्रेमी राक्षसांना सर्वत्र जाऊन संतपुरुषांची हिंसा करण्याची आज्ञा केली व आपल्या महालात प्रवेश केला. (४४)
ते वै रजःप्रकृतयः तमसा मूढचेतसः ।
सतां विद्वेषमाचेरुः आरात् आगतमृत्यवः ॥ ४५ ॥
रजो प्रकृति ती त्यांची तमाने मूढ जाहले । माथ्यासी मृत्यु तो त्यांचा संतद्वेषार्थ चालले ॥ ४५ ॥
रजःप्रकृतयः ते - रजोगुणाने युक्त आहे स्वभाव ज्यांचा असे ते दानव - तमसा मूढचेतसः - तमोगुणाने मोहून गेले आहे अंतःकरण ज्यांचे असे - आरात् आगतमृत्यवः - जवळ आला आहे मृत्यू ज्यांच्या असे - सतां विद्वेषं आचेरुः - साधूंचा द्वेष करिते झाले. ॥४५॥
त्या असुरांचा स्वभाव रजोगुणी होता. तमोगुणामुळे त्यांचे चित्त, विवेक करू शकत नव्हते. मृत्यू त्यांच्या डोक्यावर नाचत होता; म्हणूनच त्यांनी संतांचा द्वेष केला. (४५)
आयुः श्रियं यशो धर्मं लोकानाशिष एव च ।
हन्ति श्रेयांसि सर्वाणि पुंसो महदतिक्रमः ॥ ४६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
आयू श्री यश नी धर्म भोग कल्याण सर्व ते । नष्टती सर्वच्या सर्व करिता संतद्वेष तो ॥ ४६ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
महदतिक्रमः - मोठयांचा अपमान - पुंसः - पुरुषाच्या - आयुः श्रियं यशः धर्मम् - आयुष्याला, संपत्तीला, कीर्तीला, धर्माला - लोकान् - स्वर्गादि लोकांना - आशिषः एव - उपभोग्य वस्तूंनाही - सर्वाणि श्रेयांसि च - आणि सर्व हितांना - हंति - नष्ट करितो. ॥४६॥
जे लोक संचाचा अनादर करतात, त्यांचे ते कुकर्म, त्यांचे आयुष्य, लक्ष्मी, कीर्ति, धर्म, इह-परलोक, आशा-आकांक्षा आणि संपूर्ण कल्याण नष्ट करते. (४६)
अध्याय चवथा समाप्त |