श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
तृतीयोऽध्यायः

श्रीकृष्णप्रादुर्भावः वसुदेवदेवकीकृता भगवतः स्तुतिः,
भगवद् आदेशेन कंसभीतस्य वसुदेवस्य गोकुलं
प्रति स्वपुत्रनयनं ततो यशोदेवसुताया आनयनं च -

भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
अथ सर्वगुणोपेतः कालः परमशोभनः ।
यर्हि एव अजनजन्मर्क्षं शान्तर्क्ष-ग्रहतारकम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्री शुकदेव सांगतात -
आता शुभगुणी वेळ आली नक्षत्र रोहिणी ।
आकाशी ग्रह नक्षत्र तारे सौम्यचि ते पहा ॥ १ ॥

अथ - मग काही दिवसांनी - सर्वगुणोपेतः परमशोभनः - सर्व उत्तम लक्षणांनी युक्त व अत्यंत शुभ असा - (भगवतः जन्मः) कालः - भगवंताच्या जन्माचा समय - प्राप्तः - प्राप्त झाला - यर्हि एव - ज्यावेळी - अजनजन्मर्क्षं - ब्रह्मदेव आहे देवता ज्याची असे रोहिणी नक्षत्र - शान्तर्क्षग्रहतारकम् - शांत आहेत नक्षत्रे, चंद्र आदिकरून ग्रह आणि तारका ज्यांत असे. ॥१॥
नंतर जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली, तेव्हा रोहिणी नक्षत्र होते, आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह आणि तारे उच्चस्थितीत होते, त्यावेळी भगवान् प्रगट झाले. (१)


दिशः प्रसेदुर्गगनं निर्मलोडुगणोदयम् ।
मही मंगलभूयिष्ठ पुरग्राम-व्रजाकरा ॥ २ ॥
दिशा प्रसन्न नी सर्व तारांगणही स्वच्छते ।
धरेची नगरे गावे खाने मंगल जाहले ॥ २ ॥

दिशः प्रसेदुः - दिशा प्रसन्न झाल्या - गगनं - आकाश - निर्मलोडुगणोदयम् - पवित्र नक्षत्रांचा उदय आहे ज्यात असे - मही - पृथ्वी - मंगल भूयिष्ठपुरग्रामव्रजाकरा - शुभ चिन्हे आणि रत्‍नादिकांच्या खाणींनी युक्त अशी नगरे, गावे, गौळवाडे. ॥२॥
त्यावेळी दिशा प्रसन्न होत्या. आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते. पृथ्वीवरील शहरे, गावे, गवळीवाडे आणि खाणी अत्यंत मंगलमय झाल्या होत्या. (२)


नद्यः प्रसन्नसलिला ह्रदा जलरुहश्रियः ।
द्विजालिकुल सन्नाद स्तबका वनराजयः ॥ ३ ॥
नद्यांचे जल ते स्वच्छ रात्री ही कंज डुल्लती ।
फुली लगडले वृक्ष गाती पक्षी नि भृंगही ॥ ३ ॥

नद्यः - नद्या - प्रसन्नसलिलाः (बभूवुः) - स्वच्छ आहे पाणी ज्यांचे अशा झाल्या - ह्लदाः - डोह - जलरुहश्रियः (आसन्) - कमळांची शोभा ज्यांत असे झाले - वनराजयः - रानातील वृक्षांच्या रांगा - द्विजालिकुलसंनादस्तबकाः (बभूवुः) - पक्षी आणि भुंगे यांच्या थव्यांच्या मधुर ध्वनीने युक्त झुबके आहेत ज्यांत अशा झाल्या. ॥३॥
नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते, सरोवरांमध्ये कमळे उमलली होती, वनांतील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहडल्या होत्या, त्यावर पक्षी किलबिल करीत होते, तर कुठे भ्रमर गुणगुणत होते. (३)


ववौ वायुः सुखस्पर्शः पुण्यगन्धवहः शुचिः ।
अग्नयश्च द्विजातीनां शान्तास्तत्र समिन्धत ॥ ४ ॥
पवित्र शीतलो वायू मंद गंधीत मोद ते ।
द्विजांची अग्निहोत्रे ती आपोआपचि पेटली ॥ ४ ॥

सुखस्पर्शः - आनंददायक आहे स्पर्श ज्याचा असा - पुण्यगंधवहः - मंगल असा सुवास वाहून नेणारा - शुचिः वायुः - पवित्र वायु - ववौ - वाहू लागला - तत्र - त्याठिकाणी - द्विजातीनाम् अग्नयः - ब्राह्मणाचे अग्नि - शान्ताः समिन्धन्त - शांतपणे प्रज्वलित झाले. ॥४॥
पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुखी करीत वाहात होता. ब्राह्मणांच्या अग्निहोत्रांचे कधीही न विझणारे अग्नी कंसाच्या अत्याचारांनी विझले होते, ते यावेळी प्रज्वलित झाले. (४)


मनांस्यासन् प्रसन्नानि साधूनां असुरद्रुहाम् ।
जायमानेऽजने तस्मिन् नेदुर्दुन्दुभयो दिवि ॥ ५ ॥
असुरे पीडिले साधू ते चित्ती हर्ष पावले ।
येताचि जन्मवेळा ती दुंदुभी स्वर्गि वाजल्या ॥ ५ ॥

असुरद्रुहाम् साधूनां मनांसि - असुरांचा द्वेष करणार्‍या सज्जनांची मने - प्रसन्नानि आसन् - प्रसन्न झाली - तस्मिन् अजने जायमाने - तो जन्मरहित असा भगवान जन्मास येत असता - दिवि - स्वर्गलोकात - दुंदुभयः नेदुः - दुंदुभी वाजू लागल्या. ॥५॥
असुरांचा नाश इच्छिणार्‍या सज्जनांची मने एकदम प्रसन्न झाली. अजन्मा जन्माला येण्याची वेळ आली, तेव्हा स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. (५)


जगुः किन्नरगन्धर्वाः तुष्टुवुः सिद्धचारणाः ।
विद्याधर्यश्च ननृतुः अप्सरोभिः समं तदा ॥ ६ ॥
गंधर्वे किन्नरे सिद्धे मांगल्यस्तुति गायिली ।
फेरात अप्सरांच्याही विद्याधारिणि नाचल्या ॥ ६ ॥

किन्नरगंधर्वाः जगुः - किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले - सिद्धचारणाः तुष्टुवुः - सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले - विद्याधर्यः च - आणि विद्याधरांच्या स्त्रिया - तदा - त्यावेळी - अप्सरोभिः समं - अप्सरांसह - ननृतुः - नाचत्या झाल्या. ॥६॥
किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले आणि विद्याधरांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नाचू लागल्या. (६)


मुमुचुर्मुनयो देवाः सुमनांसि मुदान्विताः ।
मन्दं मन्दं जलधरा जगर्जुः अनुसागरम् ॥ ७ ॥
पुष्पवर्षाव केला तो आनंदे ऋषि दैवती ।
समुद्रातटि ते मेघ निवांत गर्जु लागले ॥ ७ ॥

मुदान्विताः - आनंदित झालेले - मुनयः देवाः (च) - ऋषी आणि देव - सुमनांसि मुमुचुः - फुले उधळते झाले - जलधराः - मेघ - अनुसागरम् - समुद्राला अनुसरून - मन्दं मन्दं जगर्जुः - संथपणे गर्जना करू लागले. ॥७॥
देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले. पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करू लागले. (७)


निशीथे तम उद्‍भूते जायमाने जनार्दने ।
देवक्यां देवरूपिण्यां विष्णुः सर्वगुहाशयः ।
आविरासीद् यथा प्राच्यां दिशि इन्दुरिव पुष्कलः ॥ ८ ॥
अवतार निशीवेळ चौदिशां तम दाटला ।
सोडवी जन्ममृत्यू ते त्याचीच जन्मवेळ ही ।
जीवांचा जीव तो विष्णु देवरूपिणि देवकी ।
गर्भात जन्मला कृष्ण उदेला पूर्णचंद्र जै ॥ ८ ॥

तम‌उद्‌भूते निशीथे जनार्दने जायमाने - काळोखाने व्यापिलेला रात्रीचा समय लोकांना भयंकर असा होत असता - देवरूपिण्यां देवक्यां - देवस्वरूपी देवकीच्या पोटी - सर्वगुहाशयः विष्णुः - सर्व भूतांच्या अंतर्यामी वास करणारा विष्णु - यथा(वत्) - योग्य स्वरूपाने - आविरासीत् - प्रकट झाला - प्राच्यां दिशि - पूर्व दिशेमध्ये - पुष्कलः इन्दुः इव - पूर्ण चंद्र जसा तसा. ॥८॥
जनार्दनांच्या अवताराची वेळ होती मध्यरात्र ! सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरले होते. त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय व्हावा, तसे प्रकट झाले. (८)


( वंशस्था )
तमद्‍भुतं बालकमम्बुजेक्षणं
     चतुर्भुजं शंखगदार्युदायुधम् ।
श्रीवत्सलक्ष्मं गलशोभि कौस्तुभं
     पीताम्बरं सान्द्रपयोदसौभगम् ॥ ९ ॥
( इंद्रवज्रा )
अद्‌भुत बाळा वसुदेव पाही
     विशाल नेत्रे जणु पद्मची ते ।
हाती गदा शंख नि पद्म चक्र
     श्रीचिन्ह स्वर्णी अतिचांग रेखा ॥ ९ ॥

तं - त्या - अंबुजेक्षणम् - कमलाप्रमाणे नेत्र आहेत ज्याचे अशा - चतुर्भुजम् - चार हातांच्या - शंखगदार्युदायुधम् - शंख, गदा, चक्र आणि कमळ ही आयुधे आहेत ज्यांची अशा - श्रीवत्सलक्ष्मम् - श्रीवत्स हे चिन्ह आहे ज्याच्या अंगावर अशा - गलशोभि कौस्तुभम् - गळ्यात शोभत आहे कौस्तुभमणी ज्याच्या अशा - पीतांबरम् - पिवळे आहे वस्त्र ज्याचे अशा - सान्द्रपयोदसौभगम् - पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे आहे सुंदर वर्ण ज्याचा अशा - अद्‌भुत बालकं - अवर्णनीय बालकाला. ॥९॥
वसुदेवांनी पाहिले की, त्यांच्यासमोर एक अद्‌भुत बालक आहे. त्याचे नेत्र कमलाप्रमाणे असून त्याला चार हात आहेत. त्याने हातांमध्ये शंख, गदा आणि चक्र ही उत्कृष्ट आयुधे घेतली आहेत. वक्षःस्थळावर श्रीवत्सचिह्न असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे. पावसाळ्यातील मेघांप्रमाणे सुंदर श्यामल शरीरावर मनोहर पीतांबर झळकत आहे. (९)


महार्हवैदूर्यकिरीटकुण्डल
     त्विषा परिष्वक्त सहस्रकुन्तलम् ।
उद्दाम काञ्च्यङ्‍गद कङ्कणादिभिः
     विरोचमानं वसुदेव ऐक्षत ॥ १० ॥
गळ्यात शोभा तशि कौस्तुभाची ।
     पीतांबराने बहु श्याम शोभे ।
वैडुर्य टोपीं कुरुळेच केस
     सूर्या परी ते चमकून आले ।
ती बाजुबंदो अन कंकणे ती
     अपूर्व शोभे तनु बाळकाची ॥ १० ॥

महार्हवैदूर्यकिरीटकुंडलत्विषा - अत्यंत मूल्यवान वैदूर्यमण्यांनी खचित अशा किरीटांच्या व कुंडलांच्या - परिष्वक्तसहस्रकुंतलम् - तेजाने चकाकत आहेत हजारो केस ज्यांचे असे - उद्दामकाञ्च्यगदकंकणादिभिः विरोचमानं - फार मोठा कमरपट्टा, बाहुभूषणे, कंकणे इत्यादि अलंकारांनी शोभणारे असे - वसुदेवः ऐक्षत - वसुदेव पाहता झाला. ॥१०॥
मौल्यवान असे वैडूर्यमणी जडवलेला किरीट आणि कुंडले यांच्या तेजाने दाट कुरळे केस चमकत आहेत. चमकणारा कमरपट्टा, दंडावर बाजूबंद आणि मनगटांमध्ये कंकणे यांनी तो विशेष शोभून दिसत होता. (१०)


स विस्मयोत्फुल्ल विलोचनो हरिं
     सुतं विलोक्यानकदुन्दुभिस्तदा ।
कृष्णावतारोत्सव संभ्रमोऽस्पृशन्
     मुदा द्विजेभ्योऽयुतमाप्लुतो गवाम् ॥ ११ ॥
जै तो पिताश्री हरि बाळ पाही
     आश्चर्य नेत्री अन मोद दाटे ।
श्रीकृष्ण जन्मोत्सवि श्रीपिता तो
     सहस्र गायी द्विजदान इच्छी ॥ ११ ॥

तदा - त्यावेळी - सविस्मयोत्फुल्लविलोचनः आनकदुंदुभिः - आश्चर्याने पूर्ण विकसित झाले आहेत डोळे ज्याचे असा वसुदेव - हरिं सुतं विलोक्य - श्रीहरीला आपला पुत्र पाहून - कृष्णावतारोत्सवसंभ्रमः - श्रीकृष्णाच्या जन्माविषयी आनंद करण्यासाठी गडबड झाली आहे ज्याची असा - मुदा आप्लुतः - आनंदाने भरलेला असा - द्विजेभ्यः - ब्राह्मणांना - गवां अयुतं अस्पृशत् - दहा हजार गाई देता झाला. ॥११॥
पुत्राच्या रूपाने स्वतः भगवंतच आले आहेत, असे पाहताच वसुदेवांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. श्रीकृष्णांचा अवतार झाला, या अत्यानंदाच्या भरात त्यांनी त्याचवेळी ब्राह्मणांना दहा हजार गाई दान देण्याचा संकल्प केला. (११)


अथैनमस्तौदवधार्य पूरुषं
     परं नताङ्‌गः कृतधीः कृताञ्जलिः ।
स्वरोचिषा भारत सूतिकागृहं
     विरोचयन्तं गतभीः प्रभाववित् ॥ १२ ॥
श्रीकृष्णकांती सुतिका घरात
     ती दाटता ते स्थिर बुद्धि केली ।
पिता कराला जुळवोनि डोके
     झुकूनि बोले स्तुति बाळकाची ॥ १२ ॥

अथ - मग - भारत - हे परीक्षित राजा - एनम् - ह्या कृष्णाला - परं पुरुषं अवधार्य - श्रेष्ठ असा आदिपुरुष समजून - कृतधीः (वसुदेवः) - शुद्धबुद्धीचा वसुदेव - नतांगः - लवविले आहे मस्तक ज्याने असा - कृताञ्जलिः - केली आहे ओंजळ ज्याने असा - (कृष्णस्य) प्रभाववित् - कृष्णाचा पराक्रम जाणणारा - गतभीः (भूत्वा) - निर्भय होऊन - सूतिकागृहं विरोचयन्तं - सूतिकागृहाला प्रकाशित करणार्‍या - तं कृष्णं - त्या कृष्णाला - अस्तौत् - स्तविता झाला. ॥१२॥
परीक्षिता ! भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने जन्मगृहात झगमगाट करीत होते. वसुदेवांना भगवंतांचा प्रभाव माहीत असल्याने त्यांची सर्व भिती नाहीशी झाली. आपली बुद्धी स्थिर करून त्यांनी परमपुरुष भगवंतांच्या चरणांवर आपले मस्तक नमविले आणि हात जोडून ते त्यांची स्तुती करू लागले. (१२)


श्रीवसुदेव उवाच -
( अनुष्टुप् )
विदितोऽसि भवान् साक्षात् पुरुषः प्रकृतेः परः ।
केवलानुभवानन्द स्वरूपः सर्वबुद्धिदृक् ॥ १३ ॥
( अनुष्टुप् )
श्रीवसुदेव म्हणतात -
जाणितो तुजला साक्षात् पुरुषा प्रकृती परा ।
केवलानुभवानंद स्वरुपा बुद्धि जाणिते ॥ १३ ॥

विदितः असि - ओळखिलेला आहेस - भवान् - तू - साक्षात् - प्रत्यक्ष - केवलानंदस्वरूपः - केवळ आनंद हेच ज्याचे स्वरूप आहे असा - सर्वबुद्धिदृक् - सर्वांच्या बुद्धीचा साक्षी असा - प्रकृतेः परः पुरुषः - मायेच्या पलीकडील पुरुष. ॥१३॥
वसुदेव म्हणाले, आपण प्रकृतीच्या पलीकडे असे साक्षात पुरुषोत्तम आहात, हे मी जाणले. आपण केवलस्वरूप अनुभवगम्य व आनंदस्वरूप आहात. आपण सर्व बुद्धींचे एकमेव साक्षी आहात. (१३)


स एव स्वप्रकृत्येदं सृष्ट्वाग्रे त्रिगुणात्मकम् ।
तदनु त्वं ह्यप्रविष्टः प्रविष्ट इव भाव्यसे ॥ १४ ॥
सर्गपूर्व गुणे सृष्टी निर्मिसी स्वय प्रकृती ।
प्रवीष्ट नसता तीत प्रविष्ट गमतोस की ॥ १४ ॥

सः त्वं एव - तो तूच - स्वप्रकृत्या - आपल्या मायेने - अग्रे - प्रथम - इदं त्रिगुणात्मकं - हे त्रिगुणात्मक विश्व - सृष्टवा - उत्पन्न करून - अनु - नंतर - तत् - त्यात - अप्रविष्टः - न शिरलेला - प्रविष्टः इव - शिरल्यासारखा - भाव्यसे - मानिला जातोस. ॥१४॥
आपणच सर्वाच्या सुरुवातीला आपल्या मायेपासून या त्रिगुणात्मक जगाची निर्मिती करता. नंतर त्यात आपण पहिल्यापासूनच असूनही नव्याने प्रविष्ट झालात असे वाटते. (१४)


यथा इमे अविकृता भावाः तथा ते विकृतैः सह ।
नानावीर्याः पृथग्भूता विराजं जनयन्ति हि ॥ १५ ॥
प्रकृती विकृती भावे शकि राही स्वतंत्र ती ।
सोळा विकार बांधोनी निर्मिसी सृष्टि जेधवा ॥ १५ ॥

यथा - जसे - इमे अविष्कृताः भावाः - हे विकाररहित असे महत्तत्त्व आदि करून पदार्थ - तथा - त्याप्रमाणे - ते - महत्तत्त्वादि पदार्थ - हि - खरोखर - नानावीर्याः (अपि) - अनेकप्रकारच्या शक्तींनी युक्त असताहि - पृथग्भूताः (सन्तः) - वेगवेगळे असताना - विकृतैः सह (मिलित्वा) - इंद्रियादि कार्याशी मिळून - विराजं जनयंति - विराटस्वरूप म्हणजे ब्रह्मांड उत्पन्न करतात. ॥१५॥
जोपर्यंत महत्तत्त्व इत्यादि कारणतत्त्वे वेगवेगळी असतात तोपर्यंत त्यांची शक्तीसुद्धा वेगवेगळी असते. पण जेव्हा ती इंद्रिये इत्यादि सोळा विकारांशी एकरूप होतात तेव्हा या ब्रह्मांडाची रचना करतात आणि याची उत्पत्ती करून यांत ती प्रविष्ट झाली आहेत असे वाटते. (१५)


सन्निपत्य समुत्पाद्य दृश्यन्तेऽनुगता इव ।
प्रागेव विद्यमानत्वात् न तेषां इह संभवः ॥ १६ ॥
भाससी त्याच रूपात परी तू नव्हशी तसा ।
वस्तू त्या जन्मण्या पूर्वी तुझा अंश तयात तो ॥ १६ ॥

सन्निपत्य - एकत्र होऊन - समुत्पाद्य - सृष्टि उत्पन्न केल्यावर - अनुगताः इव दृश्यन्ते - आंत शिरल्यासारखे दिसतात - प्राक् एव - पूर्वीच - विद्यमानत्वात् - अस्तित्वात असल्यामुळे - तेषां - त्यांची - इह - त्या उत्पन्न केलेल्या पदार्थांत - संभवः न - उत्पत्ति होत नाही. ॥१६॥
परंतु ती कोणत्याही पदार्थात प्रवेश करीत नाहीत. कारण त्यांच्यापासून तयार झालेली जी जी वस्तू आहे, तीमध्ये ती अगोदर पासूनच असतात. त्यामुळे त्यांची उत्पत्ती संभवत नाही. (१६)


( मिश्र )
एवं भवान् बुद्ध्यनुमेयलक्षणैः
     ग्राह्यैर्गुणैः सन्नपि तद्‍गुणाग्रहः ।
अनावृतत्वाद् बहिरन्तरं न ते
     सर्वस्य सर्वात्मन आत्मवस्तुनः ॥ १७ ॥
( इंद्रवज्रा )
बुद्धी कडोनी गुण लक्ष्यिणे ती
     इंद्रीय द्वारे विषयास जाणो ।
तयात होता तरि ही कळेना
     तू अंतरात्मा तुज अंग नाही ॥ १७ ॥

एवं - याप्रमाणे - भवान् - तू - बुद्ध्यनुमेयलक्षणैः - बुद्धीने अनुमान करण्यासारखे स्वरूप आहे ज्यांचे - ग्राह्यैः गुणैः सन् अपि - अशा इंद्रियांना घेण्यासारख्या विषयांसह अस्तित्वात असताहि - तद्‌गुणाग्रहः (अस्ति) - त्या विषयांसह ज्याला घेता येत नाही असा आहेस - अनावृत्तत्वात् - अमर्यादित असल्यामुळे - सर्वस्य - विश्वरूपी अशा - सर्वात्मनः - सर्वव्यापी अशा - आत्मवस्तुनः ते - सर्वांचा अंतर्यामी व सर्वांचे सत्यस्वरूप अशा तुला - बहिः अंतरं न (अस्ति) - बाहेरचे व आंतले असा भेद नाही. ॥१७॥
त्याचप्रमाणे बुद्धीने फक्त गुणांच्या लक्षणांचेच अनुमान केले जाते आणि इंद्रियांच्या द्वारा फक्त गुणमय विषयांचेच ग्रहण होते. आपण जरी त्यामध्ये असता, तरीसुद्धा त्या गुणांच्या ग्रहणाने आपले ग्रहण होत नाही. कारण आपण सर्व काही आहात, सर्वंचे अंतर्यामी आणि आत्मस्वरूप आहात. गुणांचे आवरण आपल्याला झाकून टाकू शकत नाही. म्हणून आपण बाहेर नाहीत की आत नाहीत. तर मग आपण कशामध्ये प्रवेश कराल ? (१७)


य आत्मनो दृश्यगुणेषु सन्निति
     व्यवस्यते स्व-व्यतिरेकतोऽबुधः ।
विनानुवादं न च तन्मनीषितं
     सम्यग् यतस्त्यक्तमुपाददत् पुमान् ॥ १८ ॥
तुझ्या विना सत्यहि अज्ञ राही
     ना वाग्विलासा विण सिद्ध कांही ।
मनातली ती नच वस्तु सिद्ध ।
     बाधीत जे ते नच सत्य होते ॥ १८ ॥

यः - जो - आत्मनः दृश्यगुणेषु - आत्म्याच्या पाहता येणार्‍या त्याच्या देहादि विषयांच्या ठिकाणी - स्वव्यतिरेकतः - आत्म्याहून वेगळेपणाने - सन् इति व्यवस्यते - अस्तित्वात असणारा असा निश्चय करितो - (सः) पुमान् - तो पुरुष - त्यक्तंउपाददत् (सन्) - असत्य म्हणून टाकलेले मत स्वीकारणारा असल्यामुळे - अबुधः (अस्ति) - अज्ञानी होय - यत् - कारण - तन्मनीषितम् - त्याच्या मनातील निश्चय - अनुवादं विना - योग्य स्पष्टीकरणाच्या अभावी - सम्यक् न (अस्ति) - उचित ठरत नाही. ॥१८॥
जो आपल्या या दृश्य गुणांना आपल्यापासून वेगळे समजून सत्य आहे असे मानतो, तो अज्ञानी होय; कारण विचार केल्यावर हे दृश्य पदार्थ वाग्विलासाखेरीज दुसरे काहीहे नाही हे सिद्ध होते. विचारांतून ज्या वस्तूचे अस्तित्व सिद्ध होत नाही, परंतु जी बाधित होते, तिला खरे समजणारा मनुष्य बुद्धिमान कसा असू शकेल ? (१८)


त्वत्तोऽस्य जन्मस्थिति संयमान् विभो
     वदन्ति अनीहात् अगुणाद् अविक्रियात् ।
त्वयीश्वरे ब्रह्मणि नो विरुध्यते
     त्वद् आश्रयत्वाद् उपचर्यते गुणैः ॥ १९ ॥
गुणक्रियांच्या विरहीत तू तो
     तरीहि सृष्टि तव हेत होते ।
विसंगती ही नच कांहि तूते
     सर्वागुणांचा तुचि आश्रयो की ॥ १९ ॥

(हे) विभो - हे सर्वव्यापका - अनीहात् अगुणात् अविक्रियात् - निरिच्छ, निर्गुण व निष्क्रिय अशा - त्वत्तः - तुझ्यापासून - अस्य (विश्वस्य) - ह्या विश्वाची - जन्मस्थितिसंयमान् - उत्पत्ति, स्थिति व लय ही - वदन्ति - म्हणतात - त्वयि ईश्वरे ब्रह्मणि - तू जो सर्वसमर्थ ब्रह्मःस्वरूप त्यात - नो विरुध्यते - विरोधी ठरत नाही - गुणैः त्वदाश्रयत्वात् - सत्त्वादि गुणांनी तुझा आश्रय केल्यामुळे - उपचर्यते - जुळते. ॥१९॥
हे प्रभो ! आपण स्वतः सर्व क्रिया, गुण आणि विकारांपासून अलिप्त असून या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय आपल्यापासूनच होतात, असे म्हणतात. ही गोष्ट सर्वसत्ताधीश परब्रह्म अशा आपल्याशी विसंगत नाही. कारण तिन्ही गुणांचे आश्रय आपण आहात. म्हणून त्या गुणांचे कार्य इत्यादींचा आपल्यावरच आरोप केला जातो. (१९)


स त्वं त्रिलोकस्थितये स्वमायया
     बिभर्षि शुक्लं खलु वर्णमात्मनः ।
सर्गाय रक्तं रजसोपबृंहितं
     कृष्णं च वर्णं तमसा जनात्यये ॥ २० ॥
त्रैलोक्यरक्षा करिसी हरी तू
     माया गुणे शुक्ल वर्णासि घेता ।
उत्पत्ति साठी रज वर्ण लाल
     संहारण्या कृष्ण वर्णासि घेसी ॥ २० ॥

सः त्वं - तो तू - स्वमायया - आपल्या मायाशक्तीने - त्रिलोकस्थितय - त्रैलोक्याच्या रक्षणासाठी - आत्मनः शुक्लं वर्णम् - आपला सत्त्वगुणमय शुभ्र वर्ण - खलु - खरोखर - बिभर्षि - धारण करितोस - सर्गाय - उत्पत्तीसाठी - रजसा उपबृंहितं - रजोगुणाने व्याप्त असा - रक्तं (वर्णं बिभर्षि) - रक्तवर्ण धारण करितोस - च - आणि - जनात्यये - लोकांच्या नाशाच्या प्रसंगी - तमसा (उपबृहितं) - तमोगुणाने व्याप्त असा - कृष्णं बिभर्षि वर्णं - कृष्णवर्ण धारण करितोस. ॥२०॥
आपणच तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या मायेने सत्त्वमय शुक्लवर्ण (पोषणकारी विष्णुरूप) धारण करता, उत्पत्तीसाठी रजःप्रधान रक्तवर्ण (सृजनकारी ब्रह्मारूप) आणि प्रलयाच्या वेळी तमोगुणप्रधान कृष्णवर्ण (संहारकारी रुद्ररूप) यांचा स्वीकार करता. (२०)


त्वमस्य लोकस्य विभो रिरक्षिषुः
     गृहेऽवतीर्णोऽसि ममाखिलेश्वर ।
राजन्य संज्ञासुरकोटि यूथपैः
     निर्व्यूह्यमाना निहनिष्यसे चमूः ॥ २१ ॥
स्वामी तसा सर्व शक्तीस तूची
     रक्षावया सृष्टिच जन्मलासी ।
कोट्यावधी राक्षस भूप झाले
     सेनापती ते असुनी मुळात ॥ २१ ॥

विभो - हे सर्वव्यापका - अखिलेश्वर - हे सर्वांच्या नियन्त्या - रिरक्षिषुः - या जगाचे रक्षण करणार्‍याची इच्छा करणारा - मम गृहे - माझ्या घरी - अवतीर्णः असि - अवतरला आहेस - राजन्यसंज्ञासुरकोटियूथपैः - क्षत्रिय नाव धारण करणार्‍या असुरांच्या कोटयवधी सेनापतींकडून - निर्व्यूह्यमानाः चमूः - इकडून तिकडे नेली जाणारी सैन्ये - निहनिष्यसे - तू ठार करशील. ॥२१॥
प्रभो ! आपण सर्व शक्तिमान आणि सर्वांचे स्वामी आहात. या जगाच्या रक्षणासाठीच आपण माझ्या घरी अवतार घेतला आहे. आजकाल कोटी कोटी असुर सेनापतींनी स्वतः राजे होऊन आपल्या अधिपत्याखाली मोठमोठ्या सेना तयार केल्या आहेत. आपण त्या सर्वांचा संहार कराल. (२१)


अयं त्वसभ्यस्तव जन्म नौ गृहे
     श्रुत्वाग्रजांस्ते न्यवधीत् सुरेश्वर ।
स तेऽवतारं पुरुषैः समर्पितं
     श्रुत्वाधुनैव अभिसरत्युदायुधः ॥ २२ ॥
देवाधिदेवा अति दुष्ट कंस
     मारीयले ते तव बंधु सर्व ।
तवावतारो कळता तयाला
     येईल आता करि खड्ग घेता ॥ २२ ॥

सुरेश्वर - हे देवांच्या देवा - अयं तु असभ्यः - हा दांडगा कंस - तव जन्म - तुझा जन्म - नो गृहे - आमच्या घरी - (भविता इति) श्रुत्वा - होणार असे ऐकून - ते अग्रजान् - तुझ्या पूर्वी झालेल्या भावांना - न्यवधीत् - मारिता झाला - सः - तो - ते अवतारम् - तुझा अवतार - पुरुषैः समर्पितम् श्रुत्वा - सेवकांनी सांगितलेला ऐकून - अधुना एव - आताच - उदायुधः - उचलले आहे आयुध ज्याने असा - अभिसरति - धावत येईल. ॥२२॥
हे देवाधिदेवा ! दुष्ट कंसाने तुमचा अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भितीने तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकले. आता त्याचे दूत, तुमच्या अवताराची बातमी त्याला सांगतील आणि तो आत्ताच्या आता हातात शस्त्र घेऊन धावत येईल. (२२)


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
अथैनं आत्मजं वीक्ष्य महापुरुष लक्षणम् ।
देवकी तं उपाधावत् कंसाद् भीता सुचिस्मिता ॥ २३ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
देवकी पाहता पुत्र सर्व लक्षणयुक्त तो ।
कंसाचे भय ते वाटे हरीची स्तुति गायिली ॥ २३ ॥

अथ - मग - एनम् आत्मजं - या आपल्या पुत्राला - महापुरुषलक्षणं वीक्ष्य - परमेश्वराच्या चिन्हांनी युक्त असे पाहून - कंसात् भीता देवकी - कंसामुळे घाबरून गेलेली देवकी - शुचिस्मिता (सती) - पवित्र हास्य आहे जिच्या मुखावर अशी होऊन - तम् उपाधावत् - त्याला स्तविती झाली. ॥२३॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! इकडे देवकीने पाहिले की, आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणे आहेत. सुरुवातीला तिला कंसाची थोडीशी भिती वाटली. परंतु नंतर अत्यंत पवित्र हास्य करीत ती स्तुती करू लागली. (२३)


श्रीदेवक्युवाच -
( शालिनी )
रूपं यत् तत् प्राहुरव्यक्तमाद्यं
     ब्रह्म ज्योतिर्निर्गुणं निर्विकारम् ।
सत्तामात्रं निर्विशेषं निरीहं
     स त्वं साक्षात् विष्णुरध्यात्मदीपः ॥ २४ ॥
( शालिनी )
देवकी म्हणाली -
देवे केले वर्णनाते तुझ्या की
     ब्रह्मज्योती शुद्ध सत्वो रुपाचे ।
सत्ताधीशा निष्क्रिया गूण सत्वा
     तू तो साक्षात् विष्णु अध्यात्मदीप ॥ २४ ॥

यत् - जे - तत् रूपं - ते प्रसिद्ध स्वरूप - अव्यक्तम् - अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे प्रतीतीस न येणारे - आद्यम् - सर्वांचे आदिकरण - निर्गुणम् - गुणरहित - निर्विकारम् - विकाररहित - सत्तामात्रं - केवळ अस्तित्व हेच ज्याचे लक्षण आहे असे - निर्विशेषं - ज्यामध्ये भेद नाही असे - निरीहम् - निरिच्छ असे - ब्रह्मज्योति - ब्रह्मस्वरूप तेज म्हणून - वेदाः प्राहुः - वेद सांगतात - सः - तो - अध्यात्मदीपः - अध्यात्मज्ञानाचा प्रकाशक असा - साक्षात् विष्णुः (एव) - प्रत्यक्ष विष्णूच - त्वम् (असि) - तू आहेस. ॥२४॥
देवकी म्हणाली प्रभो ! वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि सर्वांचे कारण संबोधले आहे, जे ब्रह्म, ज्योतिःस्वरूप असून समस्त गुण आणि विकार यांनी रहित आहे, जे अनिर्वचनीय, निष्क्रिय व फक्त विशुद्ध सत्तेच्या रूपात आहे ते, बुद्धी इत्यादींचे प्रकाशकरूप म्हणजेच विष्णू, आपण स्वतः आहात. (२४)


नष्टे लोके द्विपरार्धावसाने
     महाभूतेषु आदिभूतं गतेषु ।
व्यक्ते अव्यक्तं कालवेगेन याते
     भवान् एकः शिष्यते शेषसंज्ञः ॥ २५ ॥
नष्टो लोको द्वीपरार्धात जेंव्हा
     श्रेष्ठोभूते लीन होती तुझ्यात ।
तेंव्हा तुची शेष राही म्हणोनी
     शेषो ऐसे नामहि श्रेष्ठ झाले ॥ २५ ॥

द्विपरार्धावसाने - दोन परार्धाच्या शेवटी - लोके नष्टे - सृष्टि नाहीशी झाली असता - महाभूतेषु आदिभूतं गतेषु - पंचमहाभूते आपल्या सूक्ष्म स्वरूपात लय पावली असता - कालवेगेनः - कालाच्या गतीने - व्यक्ते याते - व्यक्त भूते अव्यक्त प्रकृतीत लीन झाली असता - अशेषसंज्ञः - अशेष नावाचा - एकः भवान् - एकटा तू - शिष्यते - मागे राहतोस. ॥२५॥
ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य - दोन परार्ध वर्षे - समाप्त झाल्यावर सर्व लोक नष्ट होतात, पंचमहाभूते प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात, कालशक्तीच्या प्रभावाने दृश्य विश्व अदृश्य होते, त्यावेळी एकमेव आपणच शेष (शिल्लक) राहता. म्हणून आपले नाव "शेष’ असेही आहे. (२५)


योऽयं कालस्तस्य तेऽव्यक्तबन्धो
     चेष्टां आहुः चेष्टते येन विश्वम् ।
निमेषादिः वत्सरान्तो महीयान्
     तं त्वेशानं क्षेमधाम प्रपद्ये ॥ २६ ॥
या सृष्टीचा साह्य तू एकमात्र
     क्षणो-वर्षो सर्व काळात तूची ।
ली सार्य़ा जीवसृष्टीत तूची
     क्षोमोधामा शक्तिमंता नमस्ते ॥ २६ ॥

अव्यक्तबंधो - हे मायेच्या चालका - यः अयं कालः (अस्ति) - जो हा काल म्हणून आहे - येन विश्वं चेष्टते - ज्याच्या योगाने विश्व चालते - (सः) निमेषादिः वत्सरान्तः - तो निमेषापासून संवत्सरापर्यंत - महीयान् - मोठा असा - तस्य ते - त्या तुझी - चेष्टां आहुः - लीला म्हणतात - तं त्वा - त्या तुला - ईशानम् - ईश्वराला - क्षेमधाम (इति) - कल्याणाचे माहेरघर म्हणून - प्रपद्ये - मी शरण आहे. ॥२६॥
हे प्रकृतीचे सहाय्यक प्रभो ! निमिषापासून वर्षापर्यंत अनेक भागांत विभागलेला असा जो हा महान काल आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व कार्यरत होत आहे, ती आपली एक लीला आहे. आपण सर्वशक्तिमान आणि कल्याणाचे आश्रय आहात. मी आपणास शरण आले आहे. (३६)


मर्त्यो मृत्युव्यालभीतः पलायन्
     लोकान् सर्वान् निर्भयं नाध्यगच्छत् ।
त्वत्पादाब्जं प्राप्य यदृच्छयाद्य
     स्वस्थः शेते मृत्युरस्मादपैति ॥ २७ ॥
हा तो जीवो कालव्यालेचि भीतो
     त्या भीतीने राहतो फीरतो तो ।
भाग्यानेही आज केली कृपा तू
     झोपी गेले मृत्यु तोही पळाला ॥ २७ ॥

मृत्यूव्यालभीतः - मृत्यूरूप सर्पाला भ्यालेला - मर्त्यः - मनुष्य - सर्वान् लोकान् - सर्व लोकांमध्ये - पलायन् - पळत असता - निर्भयं न अध्यगच्छत् - निर्भय स्थानाला प्राप्त होत नाही - आद्य - हे आदिपुरुषा - यदृच्छया - दैवगतीने - त्वत्पादाब्जं प्राप्य - तुझ्या चरणकमलाशी आल्यावर - स्वस्थः शेते - स्वस्थपणे झोप घेतो - मृत्युः अस्मात् बिभेति - मृत्यू याला भितो. ॥२७॥
प्रभो ! हा जीव मृत्युरूप कराल सर्पापासून भयभीत होऊन अनेक लोकांमध्ये भटकत आहे. परंतु याला कोठेही निर्भय स्थान मिळू शकले नाही. आज मोठ्या भाग्याने हा आपल्या चरणारविंदांना शरण आल्यामुळे स्वस्थ होऊन सुखाने झोप घेत आहे. त्यामुळे मृत्यूसुद्धा याला घाबरून पळून गेला आहे. (२७)


स त्वं घोरात् उग्रसेनात्मजात् नः
     त्राहि त्रस्तान् भृत्यवित्रासहासि ।
रूपं चेदं पौरुषं ध्यानधिष्ण्यं
     मा प्रत्यक्षं मांसदृशां कृषीष्ठाः ॥ २८ ॥
कंसे भक्ता त्रासिले की बहूत
     रक्षी भक्ता ध्यान रूपा पुरूषा ।
दिव्यो तेजा देहगर्व्या समोर
     ऐसे ना तू रूप दावी समक्ष ॥ २८ ॥

सः त्वम् - तो तू - घोरात् उग्रसेनात्मजात् - भयंकर अशा उग्रसेनपुत्र कंसापासून - त्रस्तान् - त्रास पावलेल्या आम्हाला - त्राहि - राख - भृत्यवित्रासहा असि - सेवकांचे संकट नष्ट करणारा आहेस - च - आणि - इदं ध्यानधिष्ण्यं पौरुषं रूपं - हे ध्यानाने पाहण्याचे स्थान असे परब्रह्मस्वरूप - मांसदृशाम् - मांसाचे डोळे आहेत ज्यांना अशांना - प्रत्यक्षं मा कृषीष्ठाः - साक्षात करू नकोस. ॥२८॥
प्रभो ! आपण भक्तांचे भय हरण करणारे आहात; म्हणून भ्यालेल्या आमचे दुष्ट कंसापासून रक्षण करावे. आपले हे चतुर्भुज दिव्यरूप ध्यानाची गोष्ट आहे. भौतिक शरीरावरच दृष्टी ठेवणार्‍या माणसांसमोर हे प्रगट करू नका. (२८)


( अनुष्टुप् )
जन्म ते मय्यसौ पापो मा विद्यात् मधुसूदन ।
समुद्विजे भवद्धेतोः कंसाद् अहमधीरधीः ॥ २९ ॥
( अनुष्टुप् )
न व्हावे माहिती कंसा माझ्याने जन्म हा तुझा ।
तुटेल हृदयो माझे तुझ्या रक्षार्थ श्रीहरी ॥ २९ ॥

मधुसूदन - हे मधुसूदना - असौ पापः - हा पापी कंस - मयि ते जन्म - माझ्या ठिकाणी तुझा जन्म - मा विद्यात् - असे न जाणो - भवद्धेतो - तुझ्यासाठी - अधीरधीः अहम् - भित्र्या बुद्धीची मी - कंसात् समुद्विजे - कंसाला फार भिते. ॥२९॥
हे मधुसूदना ! तुझा जन्म झाला, ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये. माझे धैर्य खचू लागले आहे. तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरत आहे, (२९)


उपसंहर विश्वात्मन् अदो रूपं अलौकिकम् ।
शंखचक्रगदापद्म श्रिया जुष्टं चतुर्भुजम् ॥ ३० ॥
अलौकिक तुझे रूप शंख चक्रादि आयुधे ।
चतुर्भुज असे रूप लपवी कमलाकरा ॥ ३० ॥

विश्वात्मन् - हे विश्वाच्या अंतर्यामी ईश्वरा - शंखचक्रगदापद्मश्रिया जुष्टुम् - शंख, चक्र, गदा आणि कमल यांच्या शोभेने युक्त असे - अदः अलौकिकं चतुर्भुजं रूपम् - हे असामान्य असे चार हातांचे रूप - उपसंहर - आवरून घे. ॥३०॥
हे विश्वात्मन् ! आपले हे शंख, चक्र, गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आवरा. (३०)


( मिश्र )
विश्वं यदेतत् स्वतनौ निशान्ते
     यथावकाशं पुरुषः परो भवान् ।
बिभर्ति सोऽयं मम गर्भगो अभूद्
     अहो नृलोकस्य विडंबनं हि तत् ॥ ३१ ॥
( इंद्रवज्रा )
हे विश्वसारे लिन घेसि आत
     आकाश राही तनु आत जैसे ।
गर्भात आला पुरुषोत्तमा तू
     अद्‌भूतलीला सगळ्या तुझ्या या ॥ ३१ ॥

यत् एतत् विश्वं - जे हे जगत - परः पुरुषः भवान् - श्रेष्ठ पुरुष असा तू - निशान्ते - प्रलयरूप रात्रीच्या शेवटी - यथावकाशम् - जितका त्याचा व्याप आहे तितके - स्वतनौ बिभर्ति - आपल्या शरीरात धारण करितोस - मम गर्भगः अभूत् - माझ्या गर्भात आलेला असा झालास - अहो - अहो - तत् हि - ते खरोखर - नृलोकस्य विडंबनम् (भवेत्) - मनुष्य लोकाची केवळ थट्टा होईल.॥३१॥
जसे एकादा मनुष्य आपल्या शरीरातील छिद्ररूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो, त्याचप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण या संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता. तेच परम पुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात, ही आपली अद्‌भुत मनुष्य-लीलाच नाही का ? (३१)


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
त्वमेव पूर्वसर्गेऽभूः पृश्निः स्वायंभुवे सति ।
तदायं सुतपा नाम प्रजापतिः अकल्मषः ॥ ३२ ॥
( अनुष्टुप् )
श्री भगवान् म्हणाले -
पूर्वसर्गात तुम्ही ते पृश्नी नी सुतपा असे ।
पूर्व जन्मता ते होते सुतपा तै प्रजापती ॥ ३२ ॥

सति - हे साध्वी देवकी - त्वम् एव - तूच - स्वायंभुवे - स्वायंभुव मन्वंतरात - पूर्वे सर्गे - पूर्वीच्या अवतारात - पृश्निः अभूः - पृश्नि नावाची माझी माता होतीस - तदा - त्यावेळी - अयं - हा वसुदेव - सुतपाः नाम - सुतपा नावाचा - अकल्मषः प्रजापतिः (आसीत्) - निष्पाप असा प्रजापती होता.॥३२॥
श्री भगवान् म्हणाले - हे माते ! स्वायंभुव मन्वंतरामध्ये पूर्वजन्मी तू पृश्नी आणि हा वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. (३२)


युवां वै ब्रह्मणाऽऽदिष्टौ प्रजासर्गे यदा ततः ।
सन्नियम्येन्द्रियग्रामं तेपाथे परमं तपः ॥ ३३ ॥
आज्ञापिता तुम्हा ब्रह्मे प्रजा निर्मियण्या तुम्ही ।
इंद्रिये रोधुनी तेंव्हा उत्कृष्ट तप साधिले ॥ ३३ ॥

यदा - ज्यावेळी - वै - खरोखर - युवाम् - तुम्ही - ब्रह्मणा प्रजासंगे आदिष्टौ - ब्रह्मदेवाकडून प्रजोत्पत्ती करण्यास सांगितले गेला - ततः - तेव्हा - इंद्रियग्रामं सन्नियम्य - इंद्रियांच्या समूहाचे नियमन करून - परमं तपः तेपाथे - मोठे तप केले. ॥३३॥
जेव्हा ब्रह्मदेवांनी तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा तुम्ही दोघांनी इंद्रियनिग्रह करून तीव्र तपश्चर्या केली. (३३)


वर्षवाता-तप-हिम घर्मकालगुणाननु ।
सहमानौ श्वासरोध विनिर्धूत-मनोमलौ ॥ ३४ ॥
द्वयांनी वायु वर्षा नी घाम थंडी नि उष्णता ।
इत्यादी त्रास साहोनी योगाने धुतले मन ॥ ३४ ॥

वर्षवातातपहिमधर्मकाल गुणान् - पाऊस, वारा, ऊन, थंडी, उष्णता या ऋतूंच्या भेदांना - अनु - नित्य - सहमानौ - सहन करीत - श्वासरोधविनिर्धूतमनोमलौ - ज्यांनी प्राणाचा अवरोध करून मनाचा मळ धुवून टाकिला आहे, अशी तुम्ही दोघे ; ॥३४॥
तुम्ही पाऊस, वारा, ऊन, थंडी, उन्हाळा इत्यादि त्या त्या काळाचे गुणधर्म सहन केले आणि प्राणायामाने आपल्या मनाचे दोष धुऊन टाकले. (३४)


शीर्णपर्णा-निलाहारौ उपशान्तेन चेतसा ।
मत्तः कामान् अभीप्सन्तौ मद् आराधनमीहतुः ॥ ३५ ॥
भक्षोनी वाळली पाने हवा पीऊनि राहिले ।
शांतचित्त करोनीया इष्ट्यर्थ पूजिले मला ॥ ३५ ॥

शीर्णपर्णानिलाहारौ - गळलेली पाने व वायु हाच आहे आहार ज्याचा अशी - मत्तः कामान् अभीप्सन्तौ - माझ्य़ापासून वर इच्छिणारी - उपशांतेन चेतसा - अगदी शांत अंतःकरणाने - मदाराधनं ईहतुः- माझे आराधन करण्यास इच्छिते झाला.॥३५॥
तुम्ही दोघे कधी वाळलेली पाने खाऊन तर कधी वारा पिऊनच राहिलात. माझ्याकडून इष्ट वस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझी आराधना केलीत. (३५)


एवं वां तप्यतोस्तीव्रं तपः परमदुष्करम् ।
दिव्यवर्षसहस्राणि द्वादशेयुः मदात्मनोः ॥ ३६ ॥
माझ्यात चित्त लावोनी घोर ते तप साधिता ।
लोटले देवतांचे तै हजार वर्षही पहा ॥ ३६ ॥

एवं - याप्रमाणे - परमदुष्करं तीव्रं तपः तप्यतोः - अत्यंत कठीण व दारुण तप करणार्‍या - मदात्मनोः वाम् - मत्स्वरूपी झालेल्या तुमची - द्वादश दिव्यवर्षसहस्राणि - देवांची बारा हजार वर्षे - ईयुः - गेली. ॥३६॥
माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करून असे अतिशय कठीण आणि घोर तप करता करता देवांची बारा हजार वर्षे निघून गेली. (३६)


तदा वां परितुष्टोऽहं अमुना वपुषानघे ।
तपसा श्रद्धया नित्यं भक्त्या च हृदि भावितः ॥ ३७ ॥
तेंव्हा प्रसन्न झालो मी तुम्हा दोघासि देवि गे ।
तपे श्रद्धे नि भक्तीने अखंड भजले मला ॥ ३७ ॥

तदा - त्यावेळी - अनघे - हे निष्पाप देवकी - तपसा श्रद्धया भक्त्या च - तप, निष्ठा आणि भक्ति यांनी - हृदि भावितः - हृदयात ध्यायिलेला - अहम् - मी - वां परितुष्टः - तुमच्यावर संतुष्ट झालो - अमुना वपुषा - या शरीराने. ॥३७॥
हे पुण्यमयी देवी ! त्यावेळी मी तुम्हा दोघांवर प्रसन्न झालो; कारण तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्येने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य माझेच चिंतन केले होते. (३७)


प्रादुरासं वरदराड् युवयोः कामदित्सया ।
व्रियतां वर इत्युक्ते मादृशो वां वृतः सुतः ॥ ३८ ॥
वरदाणी तदा मी तै या रूपे ठाकता पुढे ।
पुत्र हो आमुच्या पोटी तुम्ही तो वदले असे ॥ ३८ ॥

वरदराट् - वर देणार्‍यांमध्ये श्रेष्ठ असा - प्रादुरासम् - प्रकट झालो - युवयोः कामदित्सया - तुमची कामना पूर्ण करण्याच्या इच्छेने - वरः व्रियताम् इति (मया) उक्ते - वर मागा असे मी म्हटले असता - मादृशः सुतः - माझ्यासारखा पुत्र - वाम् वृतः - तुमच्याकडून मागितला गेला. ॥३८॥
त्या वेळी तुम्हा दोघांची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी वर देणार्‍यांचा राजा असा मी याच रूपाने तुमच्यासमोर प्रगट झालो होतो आणि ’वर मागा’ म्हणताच तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितलात. (३८)


अजुष्टग्राम्यविषयौ अनपत्यौ च दम्पती ।
न वव्राथेऽपवर्गं मे मोहितौ देवमायया ॥ ३९ ॥
संबंध नव्हता तेंव्हा दोघांचा विषयी तसा ।
संतान नव्हते तेणे मोहे मोक्ष न घेतला ॥ ३९ ॥

च - आणि - अजुष्टग्राम्यविषयौ - सेविलेले नाहीत हलके विषय ज्यांनी अशी - अनपत्यौ दंपती - अपत्यरहित अशी तुम्ही पतिपत्‍नी - देवमायया मोहितौ - देवाच्या मायेने मोहिलेली अशी - मे - माझ्यापासून - अपवर्गं - मोक्ष - न वव्राथे - मागितला नाही. ॥३९॥
त्यावेळेपर्यंत विषयभोगांशी तुमचा काहीही संबंध आला नव्हता. तुम्हांला संततीही नव्हती. म्हणून माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही माझ्याकडून मोक्ष मागितला नाही. (३९)


गते मयि युवां लब्ध्वा वरं मत्सदृशं सुतम् ।
ग्राम्यान् भोगान् अभुञ्जाथां युवां प्राप्तमनोरथौ ॥ ४० ॥
देताचि वर तो तैसा तेथुनी गुप्त जाहलो ।
लाभता वर इच्छीत विषयीं लागले तुम्ही ॥ ४० ॥

मयि गते - मी निघून गेल्यावर - मत्सदृशं सुतं वरं लब्ध्वा - माझ्यासारखा पुत्र हाच वर मिळवून - युवाम् - तुम्ही दोघे - ग्राम्यान् भोगान् अभुञ्जाथाम् - क्षुद्र भोग भोगिता झाला - युवाम् - तुम्ही दोघे - प्राप्तमनोरथौ - पूर्ण झाली आहे मनीषा ज्यांची अशी - आस्ताम् - झाला. ॥४०॥
माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हांला प्राप्त झाला आणि मी तेथून निघून गेलो. आता आपले मनोरथ सफल झाले असे समजून तुम्ही विषयांचा भोग घेणे सुरू केले. (४०)


अदृष्ट्वान्यतमं लोके शीलौदार्यगुणैः समम् ।
अहं सुतो वामभवं पृश्निगर्भ इति श्रुतः ॥ ४१ ॥
गुणी तो दुसरा जीव माझ्या सम न कोणि तो ।
म्हणोनी पृश्निच्या पोटी पृश्निगर्भचि जाहले ॥ ४१ ॥

लोके - या लोकी - शीलौदार्यगुणैः - शील व औदार्य इत्यादि गुणांनी - (मया) समम् - माझ्याप्रमाणे - अन्यतमं अदृष्ट्‌वा - दुसरा कोणी न दिसल्यामुळे - अहम् (एव) - मीच - पृश्निगर्भः इति श्रुतः - पृश्निगर्भ नावाने प्रसिद्ध असा - वां सुतः - तुमचा पुत्र - अभवम् - झालो. ॥४१॥
या जगात स्वभाव, औदार्य तसेच अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो आणि त्यावेळी मी ’पृष्निगर्भ’ या नावाने प्रख्यात झालो. (४१)


तयोर्वां पुनरेवाहं अदित्यामास कश्यपात् ।
उपेन्द्र इति विख्यातो वामनत्वाच्च वामनः ॥ ४२ ॥
तुम्ही त्या पुढच्या जन्मी अदिती कश्यपो मुनी ।
तदा उपेंद्र मी झालो बटूची रूप वामन ॥ ४२ ॥

तयोः वाम् - त्याच तुमच्याठायी - पुनः एव - पुनः देखील - अहम् - मी - कश्यपात् - कश्यपापासून - अदित्यां - अदितीच्या पोटी - उपेन्द्रः इति विख्यातः - उपेन्द्र या नावाने प्रसिद्ध लहान असल्यामुळे वामन या नावाने प्रसिद्ध असलेला - वामनत्वात् च वामनः इति (ख्यातः) - आणि आकारानी लहान असल्यामुळे वामन या नावाने प्रसिद्ध असा - (पुत्रः) आस - पुत्र झालो. ॥४२॥
नंतर पुढील जन्मामध्ये तू अदिती झालीस आणि वसुदेव कश्यप झाले. त्या वेळीसुद्धा मी तुमचा पुत्र झालो. माझे नाव उपेंद्र होते. शरीर ठेंगू असल्यामुळे मला वामनसुद्धा म्हणत. (४२)


तृतीयेऽस्मिन् भवेऽहं वै तेनैव वपुषाथ वाम् ।
जातो भूयस्तयोरेव सत्यं मे व्याहृतं सति ॥ ४३ ॥
तिसर्‍या जन्मी या रूपे तुमचा पुत्र जाहलो ।
माझी सदैव होते ती वाणी सत्य अशी पहा ॥ ४३ ॥

अथ - आता - अस्मिन् तृतीये भवे - या तिसर्‍या जन्मी - अहं वै - मी खरोखर - तेन एव वपुषा - त्याच शरीराने - तयोः एव वाम् - त्याच तुम्हा दोघांच्या ठायी - भूयः जातः (अस्मि) - पुनः जन्मलो आहे - (हे) सति - हे साध्वी देवकी - (इति) मे व्याहृतं सत्यं - याप्रमाणे माझे वचन सत्य झाले आहे॥४३॥
हे माते ! तुमच्या या तिसर्‍या जन्मातसुद्धा मी त्याच रूपाने पुन्हा तुमचा पुत्र झालो. माझे वचन नेहमी सत्य असते. (तीन वेळा का ? श्रीकृष्णांनी म्हणजेच वर देतेवेळी भगवंतांनी विचार केला की, ’माझ्यासारखा पुत्र होईल’ असा मी वर दिला खरा; पण माझ्यासारखा दुसरा कोणी नसल्यामुळे मी माझे वचन सत्य करू शकत नाही. अशावेळी मागितलेल्या वस्तूच्या तिप्पट वस्तू दिली असता असत्याचा दोष लागत नाही. तेव्हा आपण स्वतःच तीन वेळा त्यांचा पुत्र व्हावे, म्हाणजे आपले वचन सत्य होईल.) (४३)


एतद् वां दर्शितं रूपं प्राग्जन्म स्मरणाय मे ।
नान्यथा मद्‍भवं ज्ञानं मर्त्यलिङ्गेन जायते ॥ ४४ ॥
द्यावया पूर्व स्मृतीते रूप मी दाविले असे ।
मनुष्य शरीरे माझे स्वरूप नकळे कुणा ॥ ४४ ॥

एतत् मे रूपम् - हे माझे रूप - प्राग्जन्मस्मरणाय - पूर्वीच्या जन्माच्या स्मरणासाठी - वाम् दर्शितम् - तुम्हाला दाखविले - अन्यथा - एरवी - मद्‌भवं ज्ञानं - माझ्या संबंधाचे ज्ञान - मर्त्यलिंगेन न जायते - मनुष्य शरीराने होत नाही. ॥४४॥
मी तुम्हाला माझे हे रूप यासाठी दाखविले की, तुम्हांला माझ्या पूर्वीच्या अवतारांचे स्मरण व्हावे. मी जर असे केले नसते, तर केवळ मनुष्य शरीरावरून माझा अवतार ओळखू शकला नसता. (४४)


युवां मां पुत्रभावेन ब्रह्मभावेन चासकृत् ।
चिन्तयन्तौ कृतस्नेहौ यास्येथे मद्‍गतिं पराम् ॥ ४५ ॥
पुत्र नी ब्रह्म हा भाव नित्य माझ्यात ठेविणे ।
वात्सल्य चिंतना द्वारे लाभेल मोक्ष तो तुम्हा ॥ ४५ ॥

युवां - तुम्ही दोघे - पुत्रभावेन ब्रह्मभावेन च - पुत्र या नात्याने तसेच परब्रह्मस्वरूपाने - मां असकृत् चिंतयन्तौ - ,मला नित्य चिंतणारी अशी - मयि कृतस्नेहौ - माझ्यावर प्रेम केले आहे ज्यांनी अशी - परां मद्‌गतिं यास्येथे - श्रेष्ठ अशा माझ्या स्थानाला याल. ॥४५॥
तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब्रह्मभाव नेहमी ठेवावा. अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हांला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल. (४५)


श्रीशुक उवाच -
इत्युक्त्वासीत् हरिः तूष्णीं भगवान् आत्ममायया ।
पित्रोः संपश्यतोः सद्यो बभूव प्राकृतः शिशुः ॥ ४६ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
बोलता भगवान् ऐसे राहिले गप्प ते पुन्हा ।
समक्ष माय बापाच्या शिशूरूपहि जाहले ॥ ४६ ॥

इति उक्त्वा - असे बोलून - भगवान् हरिः - भगवान श्रीहरी - तूष्णीम् आसीत् - स्वस्थ राहिला - च - आणि - पित्रोः संपश्यतोः - आईबाप पाहत असता - आत्ममायया - आपल्या मायेने - सद्यः - तत्काल - प्राकृतः शिशुः बभूव - सामान्य लहान मूल झाला. ॥४६॥
श्रीशुकदेव म्हणतात - एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि माता-पिता त्यांच्याकडे पहात असतानाच त्यांनी आपल्या योगमायेने ताबडतोब एका सामान्य बालकाचे रूप धारण केले. (४६)


( मिश्र )
ततश्च शौरिः भगवत्प्रचोदितः
     सुतं समादाय स सूतिकागृहात् ।
यदा बहिर्गन्तुमियेष तर्ह्यजा
     या योगमायाजनि नन्दजायया ॥ ४७ ॥
( इंद्रवज्रा )
तदा पित्याने हरिप्रेरणेने
     इच्छीयले त्या सुतिका घराच्या ।
बाहेर बाळा उचलोनि नेण्या
     नी त्याच वेळी अवतारली ती ।
माया यशोदा उदरात जी की
     या श्रीहरीच्या परिची विदेही ॥ ४७ ॥

ततः च - आणि मगच - भगवत्प्रचोदितः सः शौरिः - भगवंताने प्रेरिलेला तो वसुदेव - सुतं समादाय - मुलाला घेऊन - सूतिकागृहात् - बाळंतिणीच्या खोलीतून - यदा बहिः गन्तुम् इयेष - जेव्हा बाहेर जाउ लागला - तर्हि - त्यावेळी - या अजा योगमाया - जी जन्मरहित अशी योगमाया - नन्दजायया अजनि - नन्दभार्येच्या द्वारा जन्मास आली. ॥४७॥
तेव्हा वसुदेवांनी भगवंताच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन सूतिकागृहाच्या बाहेर निघावे, असे ठरविले. त्याचवेळी नंदपत्‍नी यशोदेपासून जन्मरहित योगमाया प्रगट झाली. (४७)


तया हृतप्रत्यय सर्ववृत्तिषु
     द्वाःस्थेषु पौरेष्वपि शायितेष्वथ ।
द्वारस्तु सर्वाः पिहिता दुरत्यया
     बृहत् कपाटायस कीलश्रृंखलैः ॥ ४८ ॥
त्या योगमाये मग सर्व लोक
     निद्रीत झाले अन बंदिशाळा- ।
द्वारे तसे ती उघडोनि आली
     जशा तसे ती कुलुपे असोनी ॥ ४८ ॥

तया - तिने - हृतप्रत्ययसर्ववृत्तिषु - हरण केले आहे ज्ञान व सर्व इंद्रियांचे व्यापार ज्यांचे - द्वाःस्थेषु - असे द्वारपाल झाले असता - अथ पौरेषु अपि शायितेषु - व त्यानंतर नागरिक लोक सुद्धा निजविले असता - बृहत्कपाटायसकीलशृंखलैः - मोठया लोखंडाचे खिळे आणि साखळदंड यामुळे - दुरत्ययाः - उघडण्यास दुर्घट अशीच - सर्वाः पिहिताः द्वारः तु - सगळी बंद केलेली द्वारे तर. ॥४८॥
त्याच योगमायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या. त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले. कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते. त्यांना मोठमोठ्या फळ्या, लोखंडाच्या साखळ्या आणि कुलपे लावलेली होती. त्यामुळे बाहेर जाणे अतिशय अवघड होते. (४८)


ताः कृष्णवाहे वसुदेव आगते
     स्वयं व्यवर्यन्त यथा तमो रवेः ।
ववर्ष पर्जन्य उपांशुगर्जितः
     शेषोऽन्वगाद् वारि निवारयन् फणैः ॥ ४९ ॥
कृष्णास घेवोनि पिता निघाले
     तो द्वार आले उघडोनि सर्व ।
गर्जूनि आले ढग ते नभात
     त्या पावसी छत्रहि शेष झाला ॥ ४९ ॥

ताः - ती - कृष्णवाहे वसुदेवे आगते - कृष्णाला घेऊन जाणारा वसुदेव जवळ आला असता - यथा रवेः तमः (निवर्तते) - जसा सूर्योदयापासून काळोख परावृत्त होतो - स्वयं व्यवर्यन्त - स्वतःच उघडली - उपांशुगर्जितः पर्जन्यः - हळू हळू गर्जणारा पाऊस - ववर्ष - वृष्टि करिता झाला - शेषः - शेष - फणैः वारि निवारयन् - आपल्या फणांनी पाण्याचे निवारण करीत - अन्वगात् - मागोमाग चालला. ॥४९॥
परंतु वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाजांजवळ पोहोचले, तसे ते सर्व दरवाजे आपोआप उघडले. सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे. त्यावेळी ढग हळू हळू गर्जना करीत वर्षाव करीत होते, म्हणून शेष आपल्या फणांनी पाऊस अडवीत भगवंतांच्या पाठोपाठ चालू लागला. (४९)


मघोनि वर्षत्यसकृत् यमानुजा
     गंभीर तोयौघ जवोर्मि फेनिला ।
भयानकावर्त शताकुला नदी
     मार्गं ददौ सिन्धुरिव श्रियः पतेः ॥ ५० ॥
त्या पावसाने यमुना जळाला
     फेसे तरंगे बहु पूर आला ।
ते भोवरे आणि भयान लाटा
     फाकून गेल्या हरि जाय तेंव्हा ॥ ५० ॥

मघोनि असकृत् वर्षति - इंद्र सारखा वर्षाव करीत असता - गंभीरतोयौघजवोर्मिफेनिला - खोल पाण्याच्या ओघाच्या वेगाने उठणार्‍या लाटांनी फेसाळलेली - भयानकावर्तशताकुला - भयंकर अशा शेकडो भोवर्‍यांनी गजबजलेली - यमानुजा नदी - यमाची धाकटी बहीण अशी यमुना नदी - सिन्धुः इव - समुद्राप्रमाणे - श्रियः पतेः - लक्ष्मीचा पती अशा श्रीकृष्णाला - मार्गं ददौ - वाट देती झाली. ॥५०॥
त्या दिवसात वारंवार पाऊस पडत होता, त्यामुळे यमुनेचे पाणी वाढले होते. तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झाला होता. पाण्याच्या लाटांमुळे त्यावर फेसच फेस दिसत होता. शेकडो भयानक भोवरे निर्माण झाले होते. तरीही ज्याप्रमाणे सीतापती श्रीरामांना समुद्राने वाट करून दिली होती, त्याचप्रमाणे यमुना नदीने भगवंतांना वाट करून दिली. (५०)


नन्दव्रजं शौरिरुपेत्य तत्र तान्
     गोपान् प्रसुप्तान् उपलभ्य निद्रया ।
सुतं यशोदाशयने निधाय तत्
     सुतां उपादाय पुनर्गृहान् अगात् ॥ ५१ ॥
गेले द्वयो ते जधि गोकुळात
     निद्रीत होते त‍इ सर्व लोक ।
पुत्रा यशोदाकुशि ठेविले नी
     पुत्रीस घेता मग ते निघाले ।
ती पुत्री माया मग दावि लीला
     बंदिस्त झाली मग सर्व दारे ॥ ५१ ॥

नन्दव्रजं उपेत्य - नंदाच्या गोकुळात आल्यावर - शौरिः - वसुदेव - तत्र - तेथे - तान् गोपालान् - त्या गवळ्यांना - निद्रया प्रसुप्तान् उपलभ्य - झोपेने सुस्त झालेले पाहून - सुतं यशोदाशयने निधाय - पुत्राला यशोदेच्या शय्येवर ठेवून - तत्सुताम् उपादाय - तिच्या कन्येला घेऊन - पुनः गृहान् अगात् - पुन्हा घरी आला. ॥५१॥
नंदांच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहिले की, सगळे गोप गाढ झोपी गेले आहेत. त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंथरुणावर झोपविले आणि त्यांच्या कन्येला घेऊन ते कारागृहात परत आहे. (५१)


( अनुष्टुप् )
देवक्याः शयने न्यस्य वसुदेवोऽथ दारिकाम् ।
प्रतिमुच्य पदोर्लोहं आस्ते पूर्ववदावृतः ॥ ५२ ॥
( अनुष्टुप् )
बंदिशाळेत येताची पुत्री ती देवकी पुढे ।
ठेविता पडल्या बेड्या पहिल्यापरि त्या जशा ॥ ५२ ॥

अथ - मग - वसुदेवः - वसुदेव - दारिकां देवक्याः शयने न्यस्य - मुलीला देवकीच्या शयनावर ठेवून - पदोः लोहं प्रतिमुच्य - पायांत शृंखला अडकवून - पूर्ववत् आवृतः आस्ते - पूर्वीप्रमाणे अडकलेला राहिला. ॥५२॥
कारागृहात आल्यावर वसुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंथरुणावर झोपविले आणि आपल्या पायात बेड्या अडकवून ते पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले. (५२)


यशोदा नन्दपत्‍नी च जातं परमबुध्यत ।
न तल्लिङ्गं परिश्रान्ता निद्रयापगतस्मृतिः ॥ ५३ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
दशमस्कन्धे पूर्वार्धे कृष्णजन्मनि तृतीयोध्याऽयः ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
अचेत योगमायेने यशोदा नच जाणि की ।
पुत्र वा पुत्रि ती झाली नंदालाही तसेचि ते ॥ ५३ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

च - आणि - नन्दपत्‍नी यशोदा - नंदाची पत्‍नी यशोदा - परं जातं अबुध्यत - केवळ मूल झाले एवढे जाणती झाली - परिश्रान्ता - थकलेली - निद्रया अपगतस्मृतिः - निद्रेमुळे नाहीशी झाली आहे स्मृती जिची अशी - तल्लिंगं न (अबुद्‌ध्‌यत) - त्या मुलाची जात जाणती झाली नाही.॥५३॥
तिकडे नंदपत्‍नी यशोदेला मूल झालाचे समजले. परंतु दमल्यामुले व योगमायेने मोहित झाल्यामुळे ते मूल पुत्र की कन्या हे समजले नाही. (५३)


अध्याय तिसरा समाप्त

GO TOP