श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
एकविंशोऽध्यायः

बलिबंधनं भगवतो वचनं च -

बलीचे बंधन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
सत्यं समीक्ष्याब्जभवो नखेन्दुभिः
     हतस्वधामद्युतिरावृतोऽभ्यगात् ।
मरीचिमिश्रा ऋषयो बृहद्व्रताः
     सनन्दनाद्या नरदेव योगिनः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
त्या सत्यलोकी हरिपादपद्म
    पोहोचता तै नखतेज दिव्य ।
पाहोनि ब्रह्मा बुडला प्रकाशी
    सर्वेचि केले हरि स्वागतो तै ॥ १ ॥

नरदेव - हे राजा - नखेन्दुभिः हतस्वधामद्युतिः - नखरूपी चंद्रांनी नष्ट झाली आहे स्वतःच्या स्थानाची कांती ज्याच्या असा - (स्वगणेन) आवृतः - आपल्या गणांनी वेष्टिलेला - अब्जभवः - ब्रह्मदेव - सत्यं (वामनचरणेन स्पृष्टं) समीक्ष्य - विष्णूचा सत्यलोकाला चरण लागला असे पाहून तेथे आला - मरीचिमिश्राः ऋषयः - मरीचिप्रमुख ऋषि - बृहद्‌व्रताः - मोठमोठी व्रते आचरणारे नैतिक ब्रह्मचारी - सनन्दनाद्याः योगिनः - सनंदनादिक योगी - अभ्यगुः - आले. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या चरणांच्या नखचंद्राच्या कांतीने सत्यलोकाचे तेज फिके पडलेले पाहून, त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव, मरीची इत्यादी ऋषी, सनंदन इत्यादी नैष्ठिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंतांच्या चरणकमलाला सामोरे आले. (१)


वेदोपवेदा नियमान्विता यमाः
     तर्केतिहासाङ्‌गपुराणसंहिताः ।
ये चापरे योगसमीरदीपित
     ज्ञानाग्निना रन्धितकर्मकल्मषाः ॥ २ ॥
वेदोपवेदो नियमो यमो नी
    वेदांग तर्को इतिहास सर्व ।
योगाग्नि वायू मधुनी जयांनी
    जाळोनि कर्मे ययि लोकि आले ।
ते मूर्तिमान्‌ होवुनिया पदासी
    येवोनि केली मग वंदना की ॥ २ ॥

वेदोपवेदाः - वेद व उपवेद - नियमान्विताः यमाः - नियमाने युक्त यम - तर्केतिहासांगपुराणसंहिताः - तर्क, इतिहास, वेदांगे, पुराणे व संहिता - ये च अपरे - आणि जे दुसरे - योगसमीरदीपितज्ञानाग्निना - योगरूपी वायूने प्रज्वलित झालेल्या ज्ञानरूप अग्नीने - रन्धितकर्मकल्मषाः (सन्ति) - जळून गेले आहेत कर्मफलरूपी मळ ज्यांचे असे आहेत - ते - ते - यत्स्मरणानुभावतः - ज्याच्या स्मरणाच्या प्रभावाने - अकर्मकं स्वायंभुवं धाम गताः - कर्माने न मिळणार्‍या ब्रह्मलोकाला पोचलेले असे - (तं) ववन्दिरे - त्या भगवंताला नमन करिते झाले. ॥२॥
वेद, उपवेद, नियम, यम, तर्क, इतिहास, वेदांगे आणि पुराणसंहिता तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्ममळ भस्म करून टाकला, ते महात्मे, याच चरणकमलांच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणार्‍या सत्यलोकात पोहोचले होते ते, अशा सर्वांनी भगवंतांच्या चरणांना वंदन केले. (२)


ववन्दिरे यत्स्मरणानुभावतः
     स्वायम्भुवं धाम गता अकर्मकम् ॥ २५ ।
अथाङ्‌घ्रये प्रोन्नमिताय विष्णोः
     उपाहरत्पद्मभवोऽर्हणोदकम् ।
समर्च्य भक्त्याभ्यगृणाच्छुचिश्रवा
     यन्नाभिपङ्‌केरुहसम्भवः स्वयम् ॥ ३ ॥
ब्रह्माजिचीही बहु कीर्ति थोर
    ते जन्मले श्रीहरिनाभिस्थानी ।
त्या विश्वरूपा पुजिले तयांनी
    नी गायिली ही स्तुति श्रीहरीची ॥ ३ ॥

अथ शुचिश्रवाः पद्मभवः - नंतर निर्मळ कीर्तीचा ब्रह्मदेव - स्वयं यन्नाभिपङकेरुहसंभवः (अस्ति) - स्वतः ज्याच्या नाभिकमळापासून उत्पन्न झाला आहे - तस्य विष्णोः प्रोन्नमिताय अङघ्रे - त्या विष्णूच्या वर उचलिलेल्या पायाला - अर्हणोदकम् उपाहरत् - पाद्योदक अर्पिता झाला - समर्च्य भक्त्या अभ्यगृणात् - पूजा करून स्तविता झाला. ॥३॥
भगवंतांच्या नाभीकमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्रकीर्ती ब्रह्मदेवांनी स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणांचे अर्घ्यपाद्यादिकांनी पूजन केले आणि भक्तिभावाने त्यांची स्तुती केली. (३)


धातुः कमण्डलुजलं तदुरुक्रमस्य
     पादावनेजनपवित्रतया नरेन्द्र ।
स्वर्धुन्यभून्नभसि सा पतती निमार्ष्टि
     लोकत्रयं भगवतो विशदेव कीर्तिः ॥ ४ ॥
(वसंततिलका)
पाणी कमंडलु मधील धुवोनि पाया
    झाले पवित्र गगनी निघुनी तिथोनी ।
आले धरेसि पुढती नृप ! तीच गंगा
आली पवित्र करिता, हरिचीच कीर्ती ॥ ४ ॥

नरेन्द्र - हे राजा - धातुः तत् कमण्डलुजलं - ब्रह्मदेवाच्या कमंडलूंतील ते उदक - उरुक्रमस्य पादावनेजनपवित्रतया - विष्णूचे पाय धुवून पवित्र झाल्यामुळे - स्वर्धुनी अभूत् - स्वर्गीची नदी गंगा झाले - भगवतः विशदा कीर्तिः इव - परमेश्वराच्या शुद्ध कीर्तीप्रमाणे - सा नभसि पतती - ती आकाशात पडणारी - लोकत्रयं निमार्ष्टि - त्रैलोक्याला पवित्र करते. ॥४॥
परीक्षिता, ब्रह्मदेवांच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगारूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते. ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तिमती उज्ज्वल कीर्तीच होय. (४)


(अनुष्टुप्)
ब्रह्मादयो लोकनाथाः स्वनाथाय समादृताः ।
सानुगा बलिमाजह्रुः संक्षिप्तात्मविभूतये ॥ ५ ॥
(अनुष्टुप्‌)
कांही विभूति सारोनी भगवान्‌ सान जाहले ।
तदा इंद्रदिके त्यांना अनेक भेटि अर्पिल्या ॥ ५ ॥

सानुगाः ब्रह्मादयः लोकनाथाः - अनुचरांसह ब्रह्मदेव आदिकरून लोकपाल - समादृताः - आदरपूर्वक - संक्षिप्तात्मविभूतये - ज्याने आपले विस्तृत स्वरूप आवरिले आहे - स्वनाथाय - अशा आपल्या स्वामीला - बलिम् आजह्नुः - पूजा करिते झाले. ॥५॥
जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले, तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केला. (५)


तोयैः समर्हणैः स्रग्भिः दिव्यगन्धानुलेपनैः ।
धूपैर्दीपैः सुरभिभिः लाजाक्षतफलाङ्‌कुरैः ॥ ६ ॥
तयांनी जल माला नी गंध नी अंगराग तो ।
सुगंधी धूप दीपो नी अक्षता फळ अंकुरो ॥ ६ ॥

समर्हणैः तोयैः - पूजेला उपयोगी अशा पाण्यानी, - स्नग्भिः दिव्यगन्धानुलेपनैः - माळांनी, दिव्य गंधांच्या उट्यांनी, - सुरभिभिः धूपैः दीपैः - सुगंधी धूप व दीप यांनी - लाजाक्षतफलाङ्कुरैः - व लाह्या, अक्षता, फळे व दूर्वांकूर यांनी - ॥६॥
त्या लोकांनी पाणी, भेटवस्तू, पुष्पमाला, दिव्य सुगंधयुक्त उटी, सुगंधित धूप, दीप, लाह्या, अक्षता, फळे, अंकुर, (६)


स्तवनैर्जयशब्दैश्च तद्वीर्यमहिमांकितैः ।
नृत्यवादित्रगीतैश्च शंखदुन्दुभिनिःस्वनैः ॥ ७ ॥
अर्पिली हरिसी आणि स्तोत्र जय्‌ घोष नृत्य नी ।
वाद्ये गान तसे शंख भेरी शब्द नि नादले ॥ ७ ॥

स्तवनैः - स्तुतींनी - तद्वीर्यमहिमाङकितैः - आणि त्याच्या पराक्रमाने व माहात्म्याने युक्त - जयशब्दैः च - अशा जयजयकारांनी - नृत्यवादित्रगीतः च - आणि नर्तन, वाद्ये व गायन यांनी - शङ्खदुन्दुभिनिस्वनैः च - आणि शंख, दुन्दुभि यांच्या शब्दांनी. ॥७॥
भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे, जयजयकार, नृत्य, वाद्ये, गाणी, शंखनाद आणि दुंदुभीच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले. (७)


जाम्बवान् ऋक्षराजस्तु भेरीशब्दैर्मनोजवः ।
विजयं दिक्षु सर्वासु महोत्सवमघोषयत् ॥ ८ ॥
जांबवान्‌ ऋक्षराजाने पळते जाउनी दहा ।
दिशांना मंगलो वाद्ये भेरीही वाजवीयल्या ॥ ८ ॥

मनोजवः - मनाप्रमाणे वेगवान असा - जाम्बवान् ऋक्षराजः तु - जाम्बवाननामक अस्वलांचा राजा तर - भेरीशब्दैः - दुंदुभीच्या शब्दांनी - सर्वासु दिक्षु - सर्व दिशांमध्ये - महोत्सवं - मोठया आनंदाने युक्त सर्व दिशांचे ठिकाणी - विजयं अघोषयत् - विजयघोष करिता झाला. ॥८॥
त्यावेळी ऋक्षराज जांबवनाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजवून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली. (८)


महीं सर्वां हृतां दृष्ट्वा त्रिपदव्याजयाच्ञया ।
ऊचुः स्वभर्तुरसुरा दीक्षितस्यात्यमर्षिताः ॥ ९ ॥
दैत्यांनी पाहिले येणे वहवा करुनी अशी ।
हिराविली धरा सर्व स्वामी यज्ञात दीक्षित ॥
बोलू न शकतो कांही तेंव्हा हे क्रोधि बोलले ॥ ९ ॥

दीक्षितस्य - यज्ञदीक्षा घेतलेल्या - स्वभर्तुः सर्वां महीं - आपल्या बलिराजाची सर्व पृथ्वी - त्रिपदव्याजयाञ्चया - तीन पावलांच्या मिषाने मागून - हृतां दृष्ट्‌वा - हरण केलेली पाहून - अत्यमर्षिताः असुराः ऊचुः - फारच रागावलेले असुर म्हणाले. ॥९॥
दैत्यांनी पाहिले की, तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणार्‍या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच बळकावली. त्यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले. (९)


न वा अयं ब्रह्मबन्धुः विष्णुर्मायाविनां वरः ।
द्विजरूपप्रतिच्छन्नो देवकार्यं चिकीर्षति ॥ १० ॥
अरे हा तो नव्हे विप्र मायावी विष्णु ते असे ।
द्विजाचे सोंग घेवोनी देवांचे कार्य साधितो ॥ १० ॥

अयं ब्रह्मबन्धुः न वा (अस्ति) - हा नीच ब्राह्मण तर नव्हे - मायाविनां वरः विष्णुः - कपटी लोकांमध्ये श्रेष्ठ असा विष्णु - द्विजरूपप्रतिच्छन्नः - गुप्त रीतीने ब्राह्मणवेष घेतलेला असा - देवकार्यं चिकीर्षति - देवांचे कार्य करण्यास इच्छितो. ॥१०॥
अरे हा सामान्य ब्राह्मण नाही. हा सर्वांत श्रेष्ठ मायावी असा विष्णू आहे. ब्राह्मणाच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो. (१०)


अनेन याचमानेन शत्रुणा वटुरूपिणा ।
सर्वस्वं नो हृतं भर्तुः न्यस्तदण्डस्य बर्हिषि ॥ ११ ॥
यज्ञ दीक्षित स्वामी ना दंड याला करु शके ।
बटुवेश धरोनीया याचके सर्व घेतले ॥ ११

अनेन याचमानेन बटुरूपिणा शत्रुणा - ह्या याचना करणार्‍या बटुरूपी शत्रूने - बर्हिषि न्यस्त - यज्ञ चालू असल्यामुळे - दण्डस्य नः भर्तुः - शासनकृत्य ज्याने सोडून दिले आहे अशा आमच्या स्वामीचे - सर्वस्वं हृतं - सर्वस्व हरण केले. ॥११॥
जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञदीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले, तेव्हा या शत्रूने ब्रह्मचार्‍याचा वेष धारण करून अगोदर विनंती आणि नंतर मात्र आमचे सर्वस्व हिरावून घेतले. (११)


सत्यव्रतस्य सततं दीक्षितस्य विशेषतः ।
नानृतं भाषितुं शक्यं ब्रह्मण्यस्य दयावतः ॥ १२ ॥
सत्यनिष्ठ असा स्वामी सदैव यज्ञिही तसा ।
द्विजभक्त दयाळू तो खोटे ना बोलु ते शके ॥ १२ ॥

सततं सत्यव्रतस्य - नेहमी खर्‍या मार्गाने चालणार्‍या - विशेषतः दीक्षितस्य - विशेषतः यज्ञदीक्षा घेतलेल्या, - ब्रह्मण्यस्य दयावतः (अस्य) - ब्राह्मणांचे कल्याण करणार्‍या व दयाळू अशा या बलिराजाला - अनृतं भाषितुं न शक्यं - असत्य भाषण करणे शक्य नाही. ॥१२॥
आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत. शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत. तसेच ते ब्राह्मणभक्त असून दयाळू आहेत. म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाहीत. (१२)


तस्मादस्य वधो धर्मो भर्तुः शुश्रूषणं च नः ।
इत्यायुधानि जगृहुः बलेरनुचरासुराः ॥ १३ ॥
या वेळी आमुचा धर्म विष्णुला ठार मारिणे ।
स्वामीची खरि ही सेवा मानिली दैत्यसैनिके ॥
घेतले शस्त्रही हाती लढाया सज्ज जाहले ॥ १३ ॥

तस्मात् - म्हणून - अस्य वधः - ह्याला ठार मारणे - नः भर्तुः शुश्रूषणं च धर्मः - व आमच्या स्वामीची सेवा करणे हा आमचा धर्म होय - इति बलेः अनुलचराः असुराः - असे म्हणून बलिराजाचे सेवक दैत्य - आयुधानि जगृहुः - आयुधे घेते झाले. ॥१३॥
अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे, हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे. असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपापली शस्त्रे उचलली. (१३)


ते सर्वे वामनं हन्तुं शूलपट्टिशपाणयः ।
अनिच्छन्तो बले राजन् प्राद्रवन् जातमन्यवः ॥ १४ ॥
नसोनी बळिची आज्ञा सर्व ते क्रोधि हो‌उनी ।
पट्‌टीश शुळ घेवोनी वधाया धावले तसे ॥ १४ ॥

राजन् - हे राजा - शूल पटटिशपाणयः - हातात शूळ व पटटे घेतलेले - ते सर्वे जातमन्यवः - ते सर्व दैत्य क्रुद्ध होऊन - बलेः अनिच्छतः - बलिराजाची इच्छा नसतानाही - वामनं हन्तुं प्राद्रवन् - वामनाला मारण्याकरिता धावले. ॥१४॥
परीक्षिता, बलीची इच्छा नसतानासुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशूल, पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. (१४)


तान् अभिद्रवतो दृष्ट्वा दितिजानीकपान् नृप ।
प्रहस्यानुचरा विष्णोः प्रत्यषेधन्नुदायुधाः ॥ १५ ॥
परीक्षिता तये वेळी पार्षदे पाहिले तदा ।
रोधिले शस्त्र घेवोनी दैत्यांना हासुनी पहा ॥ १५ ॥

नृप - हे राजा - विष्णोः अनुचराः - विष्णूचे सेवक - तान् दितिजानीकपान् - ते दैत्य सैन्यांचे अधिपति - अभिद्रवतः दृष्ट्‍वा - आपल्याकडे धावत येत आहेत असे पाहून - प्रहस्य उदायुधाः - हास्य करून व हातात आयुधे घेऊन - प्रत्यषेधन् - त्यांचा प्रतिबंध करिते झाले. ॥१५॥
परीक्षिता, जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी पाहिले की, दैत्यांचे सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत, तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली शस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरले. (१५)


नन्दः सुनन्दोऽथ जयो विजयः प्रबलो बलः ।
कुमुदः कुमुदाक्षश्च विष्वक्सेनः पतत्त्रिराट् ॥ १६ ॥
नंद सुनंद विजयो जयो प्रबल नी बलो ।
कुमुदो कुमुदाक्षो नी विष्वक्‌सेनो गरुड ही ॥ १६ ॥

नन्दः सुनंदः - नंद, सुनंद, - अथ जयः विजयः - त्याचप्रमाणे जय, विजय, - प्रबलः बलः - प्रबल, बल, - कुमुदः कुमुदाक्षः च - कुमुद, कुमुदाक्ष आणि - विष्वक्सेनः पतत्त्रिराट् - विष्वक्सेन व पक्षिराज गरुड - ॥१६॥
नंद, सुनंद, जय, विजय, प्रबल, बल, कुमुद, कुमुदाक्ष, विष्वक्‌सेन, गरुड, (१६)


जयन्तः श्रुतदेवश्च पुष्पदन्तोऽथ सात्वतः ।
सर्वे नागायुतप्राणाः चमूं ते जघ्नुरासुरीम् ॥ १७ ॥
जयंत श्रुतदेवोनी पुष्पदंतो नि सात्वतो ।
दहाहजार हत्तींच्या सह ते लढु लागले ॥ १७ ॥

जयन्तः च श्रुतदेवः - जयंत आणि श्रुतदेव, - पुष्पदन्तः अथ सात्वतः - पुष्पदंत त्याचप्रमाणे सात्वत - सर्वे ते नागायुतप्राणाः - ते सगळे दहा हजार हत्तींचे बळ असणारे विष्णुसेवक - आसुरीं चमूं जघ्नुः - दैत्यसेनेला मारिते झाले. ॥१७॥
जयंत, श्रुतदेव, पुष्पदंत आणि सात्वत हे दहा दहा हजार हत्तींचे बळ असणारे पार्षद असुरांच्या सेनेचा संहार करू लागले. (१७)


हन्यमानान् स्वकान् दृष्ट्वा पुरुषानुचरैर्बलिः ।
वारयामास संरब्धान् काव्यशापमनुस्मरन् ॥ १८ ॥
बळीने पाहता सर्व क्रोधाने भरला तदा ।
शुक्राने रोधिले त्याला शापाची स्मृति त्या दिली ॥ १८ ॥

पुरुषानुचरैः - विष्णुसेवक - स्वकान् हन्यमानान् दृष्ट्‍वा - आपल्या सैन्यांचा नाश करीत आहे असे पाहून - काव्यशापम् अनुस्मरन् बलिः - शुक्राचार्याच्या शापाचे स्मरण करणारा बलिराजा - संरब्धान् (तान्) वारयामास - खवळलेल्या त्या दैत्याचे निवारण करिता झाला. ॥१८॥
ते पार्षद आपल्या सैनिकांना मारत आहेत आणि तेही संतापलेले आहेत, असे पाहून बलीने शुक्राचार्यांनी दिलेला शाप आठवून त्यांना युद्धापासून परावृत्त केले. (१८)


हे विप्रचित्ते हे राहो हे नेमे श्रूयतां वचः ।
मा युध्यत निवर्तध्वं न नः कालोऽयमर्थकृत् ॥ १९ ॥
वदला विप्रचित्ती रे राहू नेम्यादि राक्षस ।
न लढा वापसी या रे काळ ना अनुकूल हा ॥ १९ ॥

हे विप्रचित्ते हे राहो हे नेमे - हे विप्रचित्ते, हे राहो, हे नेमे - (मम) वचः श्रूयताम् - माझे भाषण ऐका - मा युद्‌ध्यत - युद्ध करू नका - निवर्तध्वं - परत फिरा - अयं कालः - हा काळ - नः अर्थकृत् न - आम्हाला अर्थप्राप्ती करून देणारा नाही. ॥१९॥
त्याने विप्रचित्ती, राहू, नेमी या दैत्यांना संबोधून म्हटले, "माझे म्हणणे ऐका. लढाई करू नका. परत फिरा. आम्हांला ही वेळ अनुकूल नाही. (१९)


यः प्रभुः सर्वभूतानां सुखदुःखोपपत्तये ।
तं नातिवर्तितुं दैत्याः पौरुषैरीश्वरः पुमान् ॥ २० ॥
दैत्यांनो काळ तो आहे सुख दुःखा समर्थची ।
दाबण्या पाहता त्याला सर्वांच्याहून दूर तो ॥ २० ॥

दैत्याः - दैत्य हो - यः सर्वभूतानां - जो काळ सर्व प्राण्यांना - सुखदुःखोपपत्तये प्रभुः - सुखे व दुःखे मिळवून देण्यास समर्थ आहे - तम् अतिवर्तितुं - त्या काळाला उल्लंघिण्यास - पुमान् ईश्वरः न (अस्ति) - पुरुष समर्थ नाही. ॥२०॥
दैत्यांनो, जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो, त्याला आपल्या प्रयत्‍नांनी दाबून टाकणे माणसाच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे. (२०)


यो नो भवाय प्राग् आसीत् अभवाय दिवौकसाम् ।
स एव भगवान् अद्य वर्तते तद्विपर्ययम् ॥ २१ ॥
आधी ती आपुली जत्ती देवांची आज पातली ।
काल शक्तीच ती होय उन्नती नी अधोगती ॥ २१ ॥

प्राक् - पूर्वी - यः नः भवाय (च) - जो आमच्या उत्कर्षाकरिता आणि - दिवौकसां अभवाय आसीत् - देवांच्या नाशाकरिता होता - सः एव भगवान् - तोच भगवान काळ - अद्य तद्विपर्ययं वर्तते - आज त्याच्या उलट स्थितीला प्राप्त झाला आहे. ॥२१॥
जो अगोचर आमची उन्नती आणि देवतांची अवनती याला कारणीभूत झाला होता, तोच भगवान काल आता त्यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारण होत आहे. (२१)


बलेन सचिवैर्बुद्ध्या दुर्गैर्मन्त्रौषधादिभिः ।
सामादिभिरुपायैश्च कालं नात्येति वै जनः ॥ २२ ॥
मंत्री दुर्गो बळ बुद्धी मंत्र नी औषधी तशा ।
उपाये काळ ना थांबे मनुष्या कडुनी कधी ॥ २२ ॥

जनः - लोक - बलेन सचिवैः बुद्‌ध्या - सैन्याने, प्रधानांच्या सहाय्याने व बुद्धीने - दुर्गैः मन्त्रौषधादिभिः - किल्ले, मंत्र, औषधी इत्यादिकांनी - सामादिभिः उपायैः च - व साम, दाम, भेद व दंड ह्या उपायांनी - कालं न वै अत्येति - कालाला खरोखर उल्लंघित नाही. ॥२२॥
बळ, मंत्री, बुद्धी, तटबंदी, मंत्र, औषधी आणि साम इत्यादी उपाय, यांपैकी कशानेही माणूस कालावर विजय मिळवू शकत नाही. (२२)


भवद्‌भिः निर्जिता ह्येते बहुशोऽनुचरा हरेः ।
दैवेनर्द्धैस्त एवाद्य युधि जित्वा नदन्ति नः ॥ २३ ॥
अनुकूल तुम्हा दैव तेंव्हा यांनाचि जिंकिले ।
परी आज नसे तैसे विजये गर्ज ती पहा ॥ २३ ॥

दैवेन ऋद्धैः - दैवाने समृद्ध अशा - भवद्‌भिः - आपणाकडून - एते हरेः - हे विष्णुदूत - अनुचराः बहुशः हि निर्जिताः - पुष्कळप्रकारे जिंकले गेले होते - ते एव अद्य युधि - तेच आज युद्धात - नः जित्वा नदन्ति - आम्हाला जिंकून गर्जना करीत आहेत. ॥२३॥
जेव्हा दैव अनुकूल होते, तेव्हा तुम्ही या देवांना अनेक वेळा जिंकले होते. पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करीत आहेत. (२३)


एतान्वयं विजेष्यामो यदि दैवं प्रसीदति ।
तस्मात्कालं प्रतीक्षध्वं यो नोऽर्थत्वाय कल्पते ॥ २४ ॥
दैवाच्या अनुकुल्याने त्यांना जिंकूत आपण ।
काळाची पाहणे वाट तेंव्हा सिद्धी मिळेल ती ॥ २४ ॥

यदि - जर - दैवं प्रसीदति - दैव प्रसन्न होईल - वयं एतान् विजेष्यामः - आम्ही यांना जिंकू - तस्मात् (अनुकूलं) कालं प्रतीक्षध्वं - ह्याकरिता अनुकूल काळाची वाट पाहा - यः नः - जो काळ आम्हाला - अर्थत्वाय कल्पते - अर्थ मिळवून देण्यास समर्थ होईल. ॥२४॥
दैव अनुकूल झाले, तर आम्ही सुद्धा यांना जिंकू. म्हणून आमच्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळेची वाट पहा." (२४)


श्रीशुक उवाच -
पत्युर्निगदितं श्रुत्वा दैत्यदानवयूथपाः ।
रसां निर्विविशू राजन् विष्णुपार्षद ताडिताः ॥ २५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
बळीचे बोल ऐकोनी दैत्यसेनापती तसे ।
दानवो सर्वही गेले निघोनी त्या रसातळी ॥ २५ ॥

राजन् - हे राजा - विष्णुपार्षदताडिताः - विष्णूच्या सेवकगणांनी ताडिलेले - दैत्यदानवयूथपाः - दैत्यांचे व दानवांचे सेनापति - पत्युः निगदितं श्रुत्वा - बलिराजाचे भाषण ऐकून - रसां विविशुः - पाताळात शिरले. ॥२५॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंतांच्या पार्षदांकडून पराभूत झालेले दानव आणि दैत्यसेनापती रसातळाला निघून गेले. (२५)


अथ तार्क्ष्यसुतो ज्ञात्वा विराट् प्रभुचिकीर्षितम् ।
बबन्ध वारुणैः पाशैः बलिं सूत्येऽहनि क्रतौ ॥ २६ ॥
जाताचि सर्व ते दैत्य गरूडे भगवन्‌मना ।
जाणोनी वरुणोपाशी बांधिले बळिला तदा ॥
दिनी त्या अश्वमेधात सोमपान न जाहले ॥ २६ ॥

अथ क्रतौ - नंतर त्या यज्ञामध्ये - सौत्ये अहनि - सोमरस काढण्याच्या दिवशी - तार्क्ष्यसुतः विराट् - तार्क्ष्यपुत्र पक्षांचा राजा गरुड - प्रभुचिकीर्षितं ज्ञात्वा - श्रीविष्णूच्या मनात काय करावयाचे आहे ते जाणून - वारुणैः पाशैः बलिं बबन्ध - वरुणपाशाने बलिराजाला बांधता झाला. ॥२६॥
गेल्यानंतर भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून पक्षिराज गरुडाने वरुणाच्या पाशांनी बलीला बांधले. त्या दिवशी त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते. (२६)


हाहाकारो महान् आसीत् रोदस्योः सर्वतो दिशम् ।
निगृह्यमाणेऽसुरपतौ विष्णुना प्रभविष्णुना ॥ २७ ॥
शक्तिमान्‌ विष्णुने जेंव्हा बळीला बांधिले तदा ।
हाय हाय दिशा दाही वदले स्वर्ग मृत्युही ॥ २७ ॥

प्रभविष्णुना विष्णुना - महा प्रभावशाली विष्णुने - असुरपतौ गृह्यमाणे - दैत्यपति बलिराजा बांधून टाकीला असता - रोदस्योः सर्वतः दिशं - स्वर्ग व भूमि ह्याठिकाणी दाही दिशांकडे - महान् हाहाकारः आसित् - मोठा हाहाकार झाला. ॥२७॥
जेव्हा सर्वशक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविले, तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशांमध्ये हाहाकार उडाला. (२७)


तं बद्धं वारुणैः पाशैः भगवान् आह वामनः ।
नष्टश्रियं स्थिरप्रज्ञः उदारयशसं नृप ॥ २८ ॥
बळी तो पडता पाशीं संपत्ती नष्ट जाहली ।
तरीही बळिचे येश लोक ते गाउ लागले ॥
परीक्षिता तये वेळी बळीला बोलला हरी ॥ २८ ॥

नृप - हे राजा - भगवान् वामनः - सर्वगुणसंपन्न वामन - वारुणैः पाशैः बद्धं - वरुणपाशांनी बांधलेल्या - नष्टश्रियं - ऐश्वर्यापासून भ्रष्ट झालेल्या, - स्थिरप्रज्ञं - स्थिरबुद्धि - उदारयशसं तं - व मोठया कीर्तिमान त्या बलिराजाला - आह - म्हणाला. ॥२८॥
जरी वरूणाच्या पाशाने बली बांधला गेला होता, जरी त्याची संपत्ती गेली होती, तरीसुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते. परीक्षिता, त्यावेळी भगवान म्हणाले, (२८)


पदानि त्रीणि दत्तानि भूमेर्मह्यं त्वयासुर ।
द्वाभ्यां क्रान्ता मही सर्वा तृतीयं उपकल्पय ॥ २९ ॥
असुरा पाउले तीन दिली तू भूमि ती मला ।
सांग आता कुठे ठेवू तिसर्‍या पावला अता ॥ २९ ॥

असुर - हे दैत्य - त्वया मह्यं - तुझ्याकडून मला - भूमेः त्रीणि पदानि दत्तानि - तीन पावले भूमि दिली गेली - द्वाभ्यां सर्वा मही क्रान्ता - दोन पावलांनी सर्व भूमि व्यापून गेली - तृतीयं उपकल्पय - तिसर्‍या पावलाची सिद्धता कर. ॥२९॥
हे असुरा, तू मला तीन पावले जमीन दिली होतीस. दोन पावलांनी मी सर्व त्रैलोक्य व्यापले, आता तिसरे पाऊन ठेवण्याची व्यवस्था कर. (२९)


यावत्तपत्यसौ गोभिः यावदिन्दुः सहोडुभिः ।
यावद्वर्षति पर्जन्यः तावती भूरियं तव ॥ ३० ॥
सूर्याचे पोचते तेज शशीची किरणे जिथे ।
ढग पृथ्वी असे सर्व होते राज्य तुझे तसे ॥ ३० ॥

असौ (सूर्यः) गोभिः - हा सूर्य आपल्या किरणांनी - यावत् तपति - जेथपर्यंत प्रकाशतो - इंदुः उडुभिः सह यावत् (प्रकाशते) - चंद्र नक्षत्रांसह जेथपर्यंत प्रकाशतो - पर्जन्यः यावत् वर्षति - जेथपर्यंत पाऊस पडतो - तावती इयं तव भूः (अस्ति) - तेथपर्यंतही ही सर्व भूमि तुझी आहे. ॥३०॥
जिथपर्यंत सूर्याची किरणे पोहोचतात, जिथपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोहोचतात, आणि जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करतात, तिथपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या अधिपत्याखाली होती. (३०)


पदैकेन मयाक्रान्तो भूर्लोकः खं दिशस्तनोः ।
स्वर्लोकस्ते द्वितीयेन पश्यतस्ते स्वमात्मना ॥ ३१ ॥
तू तो हे पाहिले की मी एक पायात भू अशी ।
दुज्याने व्यापिला स्वर्ग न कांही राहिले तुझे ॥ ३१ ॥

स्वं (ऐश्वर्य) पश्यतः ते - तू स्वतःचे ऐश्वर्य पाहात असता - मया आत्मना एकेन पदा - माझ्या स्वतःकडून एका पावलाने - भूर्लोकः आक्रान्तः - भूलोक व्यापिला गेला - तनोः खं दिशः च - शरीराने आकाश आणि दिशा - स्वर्लोकः तु द्वितीयेन (आक्रान्तः) - स्वर्ग लोक तर दुसर्‍या पावलाने व्यापिला गेला. ॥३१॥
तुझ्यादेखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक, शरीराने आकाश व दिशा आणि दुसर्‍या पावलाने स्वर्लोक व्यापला आहे. अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे. (३१)


प्रतिश्रुतमदातुस्ते निरये वास इष्यते ।
विश त्वं निरयं तस्माद् गुरुणा चानुमोदितः ॥ ३२ ॥
प्रतिज्ञा न पुरी होता जाशील नरकीं पहा ।
शुक्राची संमती आहे आता नर्कात जाय तू ॥ ३२ ॥

प्रतिश्रुतम् अदातुः ते - कबूल केलेले न देणार्‍या तुला - निरये वासः इष्यते - नरकात राहणेच योग्य आहे - तस्मात् च गुरुणा अनुमोदितः त्वं - आणि म्हणून गुरु शुक्राचार्याने अनुमोदन दिलेला तू निरयं विश - नरकात शिर. ॥३२॥
तू जी प्रतिज्ञा केली होतीस, ती पुरी न केल्याकारणाने आता तुला नरकात जाऊन राहावे लागेल. तुझ्या गुरूची तर या बाबतील संमती आहेच. म्हणून आता तू नरकात प्रवेश कर. (३२)


वृथा मनोरथस्तस्य दूरः स्वर्गः पतत्यधः ।
प्रतिश्रुतस्यादानेन योऽर्थिनं विप्रलंभते ॥ ३३ ॥
याचका दान बोलोनी खोटे वागेल त्याजचे ।
व्यर्थ मनोरथे सर्व स्वर्ग ना मिळतो तुला ॥ ३३ ॥

यः प्रतिश्रुतस्य - जो कबूल केलेले - अदानेन अर्थिनं विप्रलम्भते - न देऊन याचकाला फसवितो - तस्य मनोरथः वृथा (भवति) - त्याची इच्छा व्यर्थ होते - स्वर्गः दूरे (तिष्ठति) - स्वर्ग त्याला फार लांब असतो - (सः) अधः पतति - तो अधोगतीला जातो. ॥३३॥
जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशाप्रकारे त्याला फसवतो, त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात. स्वर्गाची गोष्ट तर दूरच; पण त्याला नरकात पडावे लागते. (३३)


विप्रलब्धो ददामीति त्वयाहं चाढ्यमानिना ।
तद्व्यलीकफलं भुङ्‌क्ष्व निरयं कतिचित्समाः ॥ ३४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे बलिनिग्रहो नाम एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
धनाचा गर्व तो होता महान तुजला तसा ।
खोट्याचे फळ ते भोगी कांही वर्षास नर्क तो ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ एकेविसावा अध्याय हा ॥ ८ ॥ २१ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

आढयमानिना त्वया च - आणि आपण मोठे आहो असा अभिमान बाळगणार्‍या तुझ्याकडून - ददामि इति अहं विप्रलब्धः - देतो अशी प्रतिज्ञा करून मी फसविला गेलो - तद्‌व्यलीकफलं निरयं - त्या खोटया बोलण्याचे फळ असा नरक - कतिचित् समाः भुङ्‌क्ष्व - कित्येक वर्षे भोग. ॥३४॥
मी मोठा संपत्तीमान आहे, या गोष्टीचा तुला फार गर्व होता. तू मला ’देतो’ म्हणून सांगून फसवलेस. असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षेपर्यंत नरकयातना भोग. (३४)


स्कंध आठवा - अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP