श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
द्वाविंशोऽध्यायः

बलिवचनं ब्रह्मणो वचनं भगवकृतं बलेः प्रशसनं तस्मै वरदानं च -

बलीकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचे त्याच्यावर प्रसन्न होणे -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
एवं विप्रकृतो राजन् बलिर्भगवतासुरः ।
भिद्यमानोऽप्यभिन्नात्मा प्रत्याहाविक्लवं वचः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता ! असे देवे तिरस्कार करोनिया ।
दैत्याचे धैर्य सांडाया वदले परि ना तसे ॥
घडता धैर्य देवोनी वदला बळि तेधवा ॥ १ ॥

नरदेव - हे राजा - नखेन्दुभिः हतस्वधामद्युतिः - नखरूपी चंद्रांनी नष्ट झाली आहे स्वतःच्या स्थानाची कांती ज्याच्या असा - (स्वगणेन) आवृतः - आपल्या गणांनी वेष्टिलेला - अब्जभवः - ब्रह्मदेव - सत्यं (वामनचरणेन स्पृष्टं) समीक्ष्य - विष्णूचा सत्यलोकाला चरण लागला असे पाहून तेथे आला - मरीचिमिश्राः ऋषयः - मरीचिप्रमुख ऋषि - बृहद्‌व्रताः - मोठमोठी व्रते आचरणारे नैतिक ब्रह्मचारी - सनन्दनाद्याः योगिनः - सनंदनादिक योगी - अभ्यगुः - आले. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, भगवंतांनी अशा प्रकारे बलीचा अतिशय धिक्कार केला आणि त्याला विचलित करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु तो किंचितही विचलित झाला नाही. मोठ्या धैर्याने तो म्हणाला - (१)


श्रीबलिरुवाच -
यद्युत्तमश्लोक भवान्ममेरितं
     वचो व्यलीकं सुरवर्य मन्यते ।
करोम्यृतं तन्न भवेत्प्रलम्भनं
     पदं तृतीयं कुरु शीर्ष्णि मे निजम् ॥ २ ॥
दैत्यराज बळी म्हणाला -
(इंद्रवज्रा)
देवाधिदेवा तव कीर्ति थोर
    तू मानिसी का मम बोल खोटे ।
न ते घडे मीहि करील सत्य
    ठेवी तिजा पाय शिरावरी या ॥ २ ॥

उत्तमश्लोक सुरवर्य - हे श्रेष्ठकीर्तीच्या देवश्रेष्ठा - भवान् यदि मम ईरितं वचः - आपण जर माझे बोललेले भाषण - व्यलीकं मन्यते - असत्य मानीत असाल - (तर्हि) तत् ऋतं करोमि - तर ते मी खरे करितो - प्रलम्भनं न भवेत् - फसवणे होणार नाही - मे शीर्ष्णि निजं तृतीयं पदं कुरु - माझ्या मस्तकावर आपले तिसरे पाऊल ठेव. ॥२॥
बली म्हणाला - हे पवित्रकीर्ति देवश्रेष्ठा, आपण माझे म्हणणे खोटे समजत असाल तर ते मी खरे करून दाखवितो, म्हणजे आपली फसवणून होणार नाही. आपण आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकार ठेवा. (२)


बिभेमि नाहं निरयात् पदच्युतो
     न पाशबन्धाद्व्यसनाद् दुरत्ययात् ।
नैवार्थकृच्छ्राद्‍भवतो विनिग्रहाद्
     असाधुवादाद्‍भृशमुद्विजे यथा ॥ ३ ॥
नाही मला भीति नर्कात जाणे
    राज्यादिकांचा नच मोह तैसा ।
न मी भितो बंधन दुःख यासी
    मी भीतसे त्या अपकीर्ति बोला ॥ ३ ॥

अहं यथा असाधुवादात् - मी जसा असत्य भाषणापासून - भृशम् उद्विजे - अत्यंत खेद पावतो - (तथा) निरयात् न बिभेमि - तसा नरकाला भीत नाही - पदच्युतः - भ्रष्ट झालेला असूनही - पाशबन्धात् - पाशाच्या बंधनाला - दुरत्ययात् व्यसनात् न (बिभेमि) - किंवा अति कठीण संकटाला मी भीत नाही - अर्थकृच्छ्रात् भवतः - दारिद्र्याला किंवा तुझ्यापासून होणार्‍या - विनिग्रहात् (वा) द न एव (बिभेमि) - बंधनाला सुद्धा मी भीत नाही. ॥३॥
नरकात जाण्याचे किंवा राज्यावरून पदच्युत होण्याचे मला भय नाही. पाशात बांधले जाणे किंवा अतिशय दुःख यालाही मी भीत नाही. दारिद्र्य किंवा आपण दिलेली शिक्षा यालाही मी भीत नाही. जितका मी माझ्या अपकीर्तीला भितो. (३)


(अनुष्टुप्)
पुंसां श्लाघ्यतमं मन्ये दण्डमर्हत्तमार्पितम् ।
यं न माता पिता भ्राता सुहृदश्चादिशन्ति हि ॥ ४ ॥
(अनुष्टुप्‌)
गुरूच्या माध्यमे देसी दंड तो युक्तची असे ।
माता पिता सुहृद कोणी तसा दंड न देत की ॥ ४ ॥

पुंसां अर्हत्तमार्पितं - मी, पुरुषांना परमपूज्य लोकांनी दिलेली - दंडं श्लाघ्यतमं मन्ये - शिक्षा अत्यंत स्तुत्य मानितो - यं माता पिता - जी शिक्षा आई, बाप, - भ्राता सुहृदः च न हि आदिशन्ति - भाऊ व मित्र खरोखर करीत नाहीत. ॥४॥
पूजनीय गुरुजनांनी दिलेला दंड माणसांना अत्यंत उपयोगी आहे. कारण तसा दंड माता, पिता, भाऊ आणि सुहृदसुद्धा मोहामुळे देऊ शकत नाहीत. (४)


त्वं नूनमसुराणां नः परोक्षः परमो गुरुः ।
यो नोऽनेकमदान्धानां विभ्रंशं चक्षुरादिशत् ॥ ५ ॥
जरी तू लपुनी आम्हा असुरा दंड देसि हा ।
अमुचा गुरुची तू तो मदाने माजता अम्ही ॥
हरिसी मद तो सर्व दिव्य दृष्टिहि देसि तू ॥ ५ ॥

त्वं नूनं असुराणां - तू खरोखर दैत्य अशा - नः पारोक्ष्यः परमः गुरुः (असि) - आमचा अप्रत्यक्ष श्रेष्ठ गुरु आहेस - यः अनेकमदान्धानां - जो तू अनेकप्रकारच्या मदांनी आंधळे बनलेल्या - नः विभ्रंशं चक्षुः आदिशत् - आम्हाला ऐश्वर्यभ्रंशरूप दृष्टि देता झालास. ॥५॥
आपण आम्हा असुरांचे निश्चितपणे उच्च प्रकारचे अप्रत्यक्ष परम गुरू आहात. कारण आम्ही जेव्हा धन, कुलीनता, बल इत्यादींच्या मदाने आंधळे होतो, तेव्हा आपण त्या गोष्टी नाहीशा करून आमच्या डोळ्यांत अंजन घालता. (५)


यस्मिन् वैरानुबन्धेन व्यूढेन विबुधेतराः ।
बहवो लेभिरे सिद्धिं यामु हैकान्तयोगिनः ॥ ६ ॥
उपकार तुझे थोर वर्णावे काय वाणिने ।
योग्यांना नच जे लाभे अशी सिद्धि अम्हास तू ॥
वैरात राहुनी देसी उपकार तुझा असा ॥ ६ ॥

बहवः विबुधेतराः - पुष्कळ दैत्य - यस्मिन् रूढेन वैरानुबन्धेन - ज्याविषयी वाढलेल्या वैरसंबंधाने - एकान्तयोगिनः - एकान्तभक्ति करणारे योगी - यां प्राप्नुवन्ति - ज्या सिद्धीला मिळवितात - (तां) उ ह सिद्धिं लेभिरे - त्याच सिद्धीला खरोखर मिळविते झाले. ॥६॥
आत्यंतिक योगसाधना करणारे योगीजन जी सिद्धी प्राप्त करतात, तीच सिद्धी आपल्याशी कट्टर शत्रुत्व करणार्‍या पुष्कळशा असुरांना प्राप्त झालेली आहे. (६)


तेनाहं निगृहीतोऽस्मि भवता भूरिकर्मणा ।
बद्धश्च वारुणैः पाशैः नातिव्रीडे न च व्यथे ॥ ७ ॥
अनंत तुझिया लीला स्वयें तू दंड देसि हा ।
लज्जा व्यथा मला नाही जरी तू बांधिसी असा ॥ ७ ॥

तेन भूरिकर्मणा भवता - त्या मोठे पराक्रम करणार्‍या तुझ्याकडून - अहं निगृहीतः अस्मि - मी बांधला गेलो आहे - वारुणैः पाशैः बद्धः च - आणि वरुणपाशांनी बद्ध झालो आहे - न अतिव्रीडे च न व्यथे - पण मी फारसा लाजत नाही व दुःखही करीत नाही. ॥७॥
अशा ज्यांच्या अनंत लीला आहेत, त्या आपण मला शिक्षा करण्यासाठी वरुणपाशाने बांधले. याबद्दल मला लज्जा वाटत नाही की, कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही. (७)


पितामहो मे भवदीयसम्मतः
     प्रह्राद आविष्कृतसाधुवादः ।
भवद्विपक्षेण विचित्रवैशसं
     संप्रापितस्त्वं परमः स्वपित्रा ॥ ८ ॥
(इंद्रवज्रा)
पितामहाची बहुकीर्ति थोर
    तया पित्याने बहु दुःखिले त्यां ।
तरी तयांची ढळली न भक्ती
    तुलाचि त्यांनी तनु अर्पिली की ॥ ८ ॥

मे पितामहः - माझा आजोबा - आविष्कृतसाधुवादः - ज्याचा चांगुलपणा प्रसिद्ध आहे असा - त्वत्परमः - तुलाच श्रेष्ठ मानणारा - भवद्विपक्षेण स्वपित्रा - तुझा शत्रु व स्वतःचा पिता अशा हिरण्यकश्यपूने - विचित्रवैशसं संप्रापितः - नानाप्रकारच्या यातनांनी छळलेला - प्रह्लादः - प्रल्हाद - भवदीयसंमतः (आसीत्) - तुझ्या भक्तांना मान्य झाला होता. ॥८॥
प्रभो, माझे आजोबा प्रह्लाद यांची कीर्ती सर्व जगात प्रसिद्ध आहे. आपल्या भक्तांमध्ये त्यांना श्रेष्ठ मानले गेले आहे. त्यांचे वडील व तुमचे शत्रू हिरण्यकशिपू याने त्यांना अनेक प्रकारे दुःख दिले. परंतु त्यांनी आपल्यावरच निष्ठा ठेवली. (८)


किमात्मनानेन जहाति योऽन्ततः
     किं रिक्थहारैः स्वजनाख्यदस्युभिः ।
किं जायया संसृतिहेतुभूतया
     मर्त्यस्य गेहैः किमिहायुषो व्ययः ॥ ९ ॥
हा देह सोडी जयि काळ येता
    धनार्थ येती स्वजनो अपार ।
पत्‍नीहि टाकी भवचक्र यात
    यांच्यात आयू नच संपवीणे ॥ ९ ॥

मर्त्यस्य अनेन आत्मना किम् - मनुष्याला ह्या शरीराचा काय उपयोग आहे - यः अन्ततः जहाति - जे शरीर अंतकाळी सोडून जाते - रिक्थहारैः - संपत्ति हरण करणार्‍या - स्वजनाख्यदस्युभिः किम् - नातेवाईक अशा चोरांचा काय उपयोग आहे - संसृतिहेतुभूतया - संसाराला कारणीभूत अशा - जायया किम् - स्त्रीचा काय उपयोग आहे - गेहैः च किम् - आणि घरांशी काय कर्तव्य आहे - इह आयुषः व्ययः (एव भवति) - येथे आयुष्याचा व्यय मात्र होतो. ॥९॥
त्यांनी विचार केला की, हे शरीर घेऊन काय करावयाचे आहे ? हे तर एक ना एक दिवस आपली साथ सोडणारच आहे. धनसंपत्ती घेण्यासाठी ते स्वजन झाले आहेत, त्या चोरांपासून आपला कोणता स्वार्थ साधणार आहे ? पत्‍नीपासून सुद्धा कोणता लाभ ? ती तर जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारीच आहे. मरणार तर आहोतच; मग घराचा मोह कशाला ? या सर्व वस्तूत अडकून पडणे म्हणजे आयुष्याचा नाश करणेच होय. (९)


इत्थं स निश्चित्य पितामहो महान्
     अगाधबोधो भवतः पादपद्मम् ।
ध्रुवं प्रपेदे ह्यकुतोभयं जनाद्
     भीतः स्वपक्षक्षपणस्य सत्तम ॥ १० ॥
निश्चेय ऐसा करुनी मनाचा
    या पद्मपाया शरणार्थ आलो ।
प्रल्हाद ते संत विरक्त थोर
    उदार ज्ञानी अन संतमेरु ॥ १० ॥

इत्थं निश्चित्य - असा निश्चय करून - जनात् भीतः सः महान् - जनसंबंधापासून भ्यालेला तो महात्मा - अगाधबोधः सत्तमः पितामहः - अपरिमित ज्ञानी साधुश्रेष्ठ आजोबा प्रह्लाद - स्वपक्षक्षपणस्य अपि भवतः - आपल्या पक्षाचा क्षय करणार्‍याही तुझ्या - अकुतोभयं ध्रुवं - निर्भय व अविनाशी अशा - पादपद्मं हि प्रपेदे - चरणकमलाचा खरोखर आश्रय करिता झाला. ॥१०॥
असा निश्चय करून माझे आजोबा महाज्ञानी, संतश्रेष्ठ पह्लाद आपल्याच भयरहित आणि अविनाशी चरणकमलांना शरण गेले. खरे तर, आपण अलौकिक दृष्टीने त्यांच्या कुळाचा नाश करणारे शत्रू आहात, हे ते जाणत होते. (१०)


अथाहमप्यात्मरिपोस्तवान्तिकं
     दैवेन नीतः प्रसभं त्याजितश्रीः ।
इदं कृतान्तान्तिकवर्ति जीवितं
     ययाध्रुवं स्तब्धमतिर्न बुध्यते ॥ ११ ॥
त्या दृष्टिने तो तुम्हि शत्रु आम्हा
    दैवेचि नेली मम लक्षुमी नी ।
तुझ्या पदा आणिले याच वेळी
    अनित्य मी हा पडलो भवात ॥ ११ ॥

अथ - नंतर - दैवेन प्रसभं - दैवाने बलात्काराने टाकायला लाविली आहे - त्याजितश्रीः - राज्यसंपत्ति ज्याला असा - अहम् अपि - मी सुद्धा - आत्मरिपोः तव अन्तिकं - स्वतःचा शत्रु अशा तुझ्याजवळ - नीतः - आणिला गेलो आहे - यया - ज्या संपत्तीमुळे - स्तब्धमतिः - ताठरबुद्धीचा मनुष्य - इदं कूतान्तान्तिकवर्ति - ह्या मृत्यूसंनिध असणार्‍या - अध्रुवं जीवितं न बुद्‌ध्यते - क्षणिक जीविताला जाणत नाही. ॥११॥
तसे पाहू गेले असता आपण माझेसुद्धा शत्रूच आहात. तरीसुद्धा दैवाने मला बळजबरीने राज्यलक्ष्मीपासून बाजूला सारून आपल्याजवळ आणले आहे. कारण लक्ष्मीमुळेच जीवाची बुद्धी जड होते आणि आपले अनित्य जीवन मृत्यूच्या सापळ्यात सापडलेले आहे, हे त्याला समजत नाही. (२-११)


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
तस्येत्थं भाषमाणस्य प्रह्रादो भगवत्प्रियः ।
आजगाम कुरुश्रेष्ठ राकापतिरिवोत्थितः ॥ १२ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता ! बळी ऐसे बोलतो त्याच या क्षणी ।
उदये चंद्रमा जैसी तसे प्रल्हाद पातले ॥ १२ ॥

कुरुश्रेष्ठ - हे परीक्षित राजा - तस्य इत्थं भाषमाणस्य - तो ह्याप्रमाणे भाषण करीत असता - भगवत्प्रियः प्रह्लादः - प्रमेश्वराचा आवडता भक्त प्रल्हाद - उत्थितः राकापतिः इव - उगवलेला पूर्णिमेचा चंद्रच जणू काय असा - आजगाम - आला. ॥१२॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, बली असे बोलत असतानाच चंद्रोदय झाल्याप्रमाणे भगवंतांचे प्रिय भक्त प्रह्लाद तेथे येऊन पोहोचले. (१२)


तमिन्द्रसेनः स्वपितामहं श्रिया
     विराजमानं नलिनायतेक्षणम् ।
प्रांशुं पिशंगांबरमञ्जनत्विषं
     प्रलंबबाहुं शुभगर्षभमैक्षत ॥ १३ ॥
(इंद्रवज्रा)
पितामहे श्रीहरि पाहिला नी
    पद्माक्ष बाहू बहुरुंद तैशा ।
तो सुंदरो श्यामला देह उंच
    तनूवरी लेवूनि पीतवस्त्र ॥ १३ ॥

इन्द्रसेनः - बलिराजा - श्रिया विराजमानं - लक्ष्मीने शोभणार्‍या - नलिनायतेक्षणं - कमळाप्रमाणे विशाल नेत्राच्या, - प्रांशुं पिशंगांबरं प्रलम्बबाहुं - उंच, पिंगट वस्त्र धारण केलेल्या, - अंजनत्विषं सुभगं - आजानुबाहु कज्जलाप्रमाणे कांतीच्या, भाग्यशाली अशा - तं स्वपितामहं - त्या आपल्या आजोबाला - समैक्षत - पाहता झाला. ॥१३॥
बलीने पाहिले की, आपले आजोबा कांतिमान आहेत. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आकर्ण आणि हात लांबसडक आहेत. ते सुंदर आणि उंच आहेत. तसेच श्यामवर्ण शरीरावर त्यांनी पीतांबर धारण केला आहे. (१३)


तस्मै बलिर्वारुणपाशयन्त्रितः
     समर्हणं नोपजहार पूर्ववत् ।
ननाम मूर्ध्नाश्रुविलोललोचनः
     सव्रीडनीचीनमुखो बभूव ह ॥ १४ ॥
वरुणपाशीं बळि तैहि होता
    बळी न तेणे शकला पुजू त्यां ।
नेत्रात अश्रू उसळोनि आले
    नी फक्त माथेचि तया नमीले ॥ १४ ॥

वारुणपाशयन्त्रितः बलिः - वरुणपाशाने बांधलेला बलिराजा - तस्मै - त्या प्रल्हादाला - समर्हणं पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे पूजोपचार - न उपजहार - अर्पण करू शकला नाही - मूर्न्धा ननाम - मस्तकाने नमन करिता झाला - अश्रुविलोललोचनः - पाण्यानी भरून आले आहेत डोळे ज्याचे असा - सव्रीडनीचीनमुखः बभूव ह - व लज्जेने खाली मुख केलेला असा खरोखर झाला. ॥१४॥
बली यावेळी वरुणपाशामध्ये बांधलेला होता; म्हणून प्रह्लाद आल्यानंतर तो अगोदर जशी पूजा करीत असे, तशी पूजा करू शकला नाही, म्हणून त्याचे डोळे आसवांनी भरले. लाजून त्याने मान खाली घातली. केवळ मस्तक लववून त्याने तांना नमस्कार केला. (१४)


स तत्र हासीनमुदीक्ष्य सत्पतिं
     हरिं सुनन्दाद्यनुगैरुपासितम् ।
उपेत्य भूमौ शिरसा महामना
     ननाम मूर्ध्ना पुलकाश्रुविक्लवः ॥ १५ ॥
प्रल्हादजीने हरि पाहिला तै
    सेवेत होते तयि पार्षदेही ।
प्रेमे तनू ती पुलकीत झाली
    साष्टांग त्यांनी नमिला हरी तो ॥ १५ ॥

महामनाः सः - थोर मनाचा तो प्रल्हाद - तत्र आसीनं - तेथे असलेल्या - सुनन्दनंदाद्यनुगैः उपासितं - सुनंद, नंद इत्यादि पार्षदगणांनी सेविलेल्या - सत्पतिं उदीक्ष्य - भगवंताला पाहून - शिरसा उपेत्य - मस्तक नम्र करून - भूमौ मूर्न्धा ननाम - भूमीवर मस्तकाने नमस्कार घालिता झाला - पुलकाश्रुविह्‌वलः (बभूव) ह - रोमांच व अश्रु ह्यांनी युक्त होऊन विव्हळ झाला. ॥१५॥
प्रह्लादांनी पाहिले की, भक्तवत्सल भगवान तिथेच उभे आहेत आणि सुनंद, नंद इत्यादी पार्षद त्यांची सेवा करीत आहेत. प्रह्लादाचे शरीर प्रेमातिशयाने पुलकित झाले, डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आनंदपूर्ण हृदयाने, मस्तक लाववून, ते आपल्या स्वामीजवळ गेले आणि जमिनीवर डोके टेकवून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. (१५)


श्रीप्रह्राद उवाच -
त्वयैव दत्तं पदमैन्द्रमूर्जितं
     हृतं तदेवाद्य तथैव शोभनम् ।
मन्ये महानस्य कृतो ह्यनुग्रहो
     विभ्रंशितो यच्छ्रिय आत्ममोहनात् ॥ १६ ॥
प्रल्हादजी म्हणाले -
प्रभो ! तुम्ही जे दिधले ययाला
    हिराविलेही तुम्हि तेचि सर्व ।
देणे नि नेणे तव ठीक आहे
    ही ही कृपाची तव थोर आहे ॥ १६ ॥

त्वया एव ऊर्जितं ऐन्द्रं पदं दत्तं - तूच योग्य असे इंद्रपद दिलेस - तत् एव अद्य तथा एव हृतं - हेच आज त्याचप्रमाणे तू हरण केलेस - इति शोभनं (अभवत्) - हे ठीकच झाले - यत् (अयं) - जो हा बलिराजा - श्रियः आत्ममोहनात् - आत्म्याला मोहित करणार्‍या ऐश्वर्यापासून - विभ्रंशितः - भ्रष्ट केला गेला - (सः) अस्य महान् अनुग्रहः कृतः - तो त्याच्यावर मोठा अनुग्रहच केला गेला - (इति) मन्ये - असे मी मानितो. ॥१६॥
प्रह्लाद म्हणाले - प्रभो, बलीला हे ऐश्वर्यपूर्ण इंद्रपद आपणच दिले होते आणि आज आपणच ते काढून घेतले, हेच चांगले झाले. ही आपण याच्यावर फार मोठी कृपा केलीत, असेच मला वाटते. आत्म्याला मोहित करणार्‍या राज्यलक्ष्मीला आपण याच्यापासून दूर केलेत. (१६)


यया हि विद्वानपि मुह्यते यतः
     तत् को विचष्टे गतिमात्मनो यथा ।
तस्मै नमस्ते जगदीश्वराय वै
     नारायणायाखिललोकसाक्षिणे ॥ १७ ॥
ज्ञात्यांहि होतो मद संपत्तीचा
    ती राहिल्यानेच न तू कळे त्या ।
तुला नमस्ते जगदीश्वरा रे
    नारायणारे तुचि लोक साक्षी ॥ १७ ॥

यया - ज्या संपत्तीमुळे - यतः अपि विद्वान् मुह्यतेहि - इंद्रिय निग्रह केलेल्याहि विद्वानाला खरोखर मोह पडतो - तत् - त्या संपत्तीमध्ये - आत्मनः गतिं - आत्म्याचे वास्तविक स्वरूप - यथा (वत्) कः वै विचष्टे - कोणता पुरुष खरोखर पाहू शकेल - तस्मै जगदीश्वराय - त्या जगत्पती - अखिललोकसाक्षिणे - व सर्व लोकांमध्ये साक्षिरूपाने - नारायणाय ते नमः - राहणार्‍या नारायण अशा तुला नमस्कार असो. ॥१७॥
लक्ष्मीच्या मदाने विद्वान पुरुषसुद्धा मोहित होतात. ती असेपर्यंत आपल्या खर्‍या स्वरूपाला चांगल्या तर्‍हेने कोण जाणू शकेल ? सर्व जगाचे ईश्वर आणि सर्वांचे साक्षी अशा आपणाला - श्रीनारायणदेवांना मी नमस्कार करतो. (१७)


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
तस्यानुश्रृवतो राजन् प्रह्रादस्य कृताञ्जलेः ।
हिरण्यगर्भो भगवान् उवाच मधुसूदनम् ॥ १८ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता ! तये वेळी अंजुली जोडुनी उभे ।
होते प्रल्हाद तेथे नी ब्रह्म्याने बोलु इच्छिले ॥ १८ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - तस्य कृताञ्जलेः - तो हात जोडलेला - प्रह्लादस्य अनुशृण्वतः - प्रल्हाद श्रवण करीत असता - भगवान् हिरण्यगर्भः - भगवान ब्रह्मदेव - मधुसूदनम् उवाच - श्रीविष्णूला म्हणाला. ॥१८॥
श्रीशुक म्हणतात - राजा प्रह्लाद हात जोडून उभे होते. त्यांच्या देखतच ब्रह्मदेव भगवानांना काही सांगू इच्छित होते. (१८)


बद्धं वीक्ष्य पतिं साध्वी तत्पत्‍नी भयविह्वला ।
प्राञ्जलिः प्रणतोपेन्द्रं बभाषेऽवांमुखी नृप ॥ १९ ॥
परंतू त्याच वेळेला पातली बळिपत्‍नि ती ।
साध्वी विंध्यावली तेंव्हा भये नमुनि बोलली ॥ १९ ॥

नृप - हे परीक्षित राजा - साध्वी तत्पत्नी - त्या बलिराजाची पतिव्रता स्त्री - पतिं बद्धं वीक्ष्य - पतीला बांधलेला पाहून - भयविह्‌वला अवाङ्‌मुखी - भीतीने विव्हळ झालेली खाली मुख करून - प्रञ्जलिः प्रणता च - हात जोडून व नम्र होऊन - उपेन्द्रं बभाषे - विष्णुला म्हणाली. ॥१९॥
हे राजा, इतक्यात बलीच्या साध्वी पत्‍नी विंध्यावलीने आपल्या पतीला बांधलेले पाहून, भयभीत होऊन, भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि हात जोडून जमिनीकडे पाहात ती भगवंतांना म्हणाली - (१९)


श्रीविन्ध्यावलिरुवाच -
क्रीडार्थमात्मन इदं त्रिजगत्कृतं ते
     स्वाम्यं तु तत्र कुधियोऽपर ईश कुर्युः ।
कर्तुः प्रभोस्तव किमस्यत आवहन्ति
     त्यक्तह्रियस्त्वदवरोपितकर्तृवादाः ॥ २० ॥
विंध्यावली म्हणाली -
(वसंततिलका)
    क्रीडार्थ तू रचियली ययि सृष्टि सर्व
मानी कुबुद्धि तिज त्यापरि स्वामि मीच
    कर्ता तसाचि भरता तुचि मारणारा
माझे म्हणोत कुणि ते तुज काय अर्पो ॥ २० ॥

ईश - हे विष्णो - ते आत्मनः क्रीडार्थं - तू स्वतःच्या क्रीडेकरिता - इदं त्रिजगत् कृतं - हे त्रैलोक्य निर्माण केले आहेस - तत्र तु अपरे - पण त्यात दुसरे - कुधियः वाम्यं कुर्युः - अप्रबुद्ध लोक आपले स्वामित्व मानितात - त्यक्तह्लियः - टाकिली आहे लाज ज्यांनी असे - त्वदवरोपितकर्तृवादाः - ज्यांच्या कर्तेपणाचा अभिमान तुझ्याकडून ताडला गेला आहे असे - कर्तुः अस्यतः च प्रभोः - उत्पत्ति व संहार करण्यास समर्थ अशा तुला - तव किम् आवहन्ति - काय अर्पण करितील. ॥२०॥
विंध्यावली म्हणाली - प्रभो, आपण स्वतःच्या क्रीडेसाठी हे त्रैलोक्य निर्माण केले. जे लोक निर्बुद्ध आहेत, तेच स्वतःला याचा स्वामी मानतात. आपणच याचे उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असूनही तुमच्यामुळेच स्वतःला कर्ता मानणारे निर्लज्ज लोक आपल्याला काय समर्पण करणार ? (असत्यापासून वाचण्यासाठी तिसरे पाऊन ठेवण्याकरता तुमच्याच मालकीचे स्वतःचे मस्तक देतो, हे बलीच म्हणणे निर्लज्जपणाचे आहे.) (२०)


श्रीब्रह्मोवाच -
(अनुष्टुप्)
भूतभावन भूतेश देवदेव जगन्मय ।
मुञ्चैनं हृतसर्वस्वं नायमर्हति निग्रहम् ॥ २१ ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
प्रभो ! देवाधिदेवो तू जीवांचे स्वामि हो तुम्ही ।
सर्वस्व घेतले याचे न हा दंडासि पात्र की ॥ २१ ॥

भूतभावन भूतेश - जगाची उत्पत्ति करणार्‍या व प्राण्याचे रक्षण करणार्‍या - देवदेव जनन्मय - देवाधिदेवा जगत्स्वरूपी हे परमेश्वरा - हृतसर्वस्वं एनं मुञ्च - सर्वस्व हरण केलेल्या ह्या बलिराजाला सोडून दे - अयं निग्रहं न अर्हति - हा बन्धनाला योग्य नाही. ॥२१॥
ब्रह्मदेव म्हणाले - समस्त प्राण्यांना जीवन देणारे, त्यांचे स्वामी आणि जगत्स्वरूप देवाधिदेवा, आता आपण याला सोडून द्यावे. आपण याचे सर्वस्व हरण केले आहे. म्हणून आता ह्याला बांधणे योग्य नाही. (२१)


कृत्स्ना तेऽनेन दत्ता भूर्लोकाः कर्मार्जिताश्च ये ।
निवेदितं च सर्वस्वं आत्माविक्लवया धिया ॥ २२ ॥
येणे सर्व भुमी तैसा पुण्य‌अर्जित स्वर्ग तो ।
आत्माही अर्पिला तेंव्हा न धैर्य ढळले मुळी ॥ २२ ॥

अनेन ते कृत्स्रा भूः दत्ता - ह्याने तुला संपूर्ण पृथ्वी दिली - कर्मार्जिताः च - आणि पुण्यकर्मांनी संपादिलेले - ये लोकाः (ते दत्ताः) - जे लोक तेही दिले - अविक्लवया धिया - न डगमगणार्‍या बुद्धीने - सर्वस्वं (निवेदितं) - सर्वस्व अर्पण केले - आत्मा च (निवेदितः) - आणि शरीरही दिले. ॥२२॥
याने आपली सगळी भूमी आणि पुण्यकर्माने मिळविलेले स्वर्ग इत्यादी लोक, आपले सर्वस्व तसेच आत्मासुद्धा आपल्याला समर्पित केला आहे. शिवाय, असे करतेवेळी याची बुद्धी स्थिर राहिली. (२२)


यत्पादयोरशठधीः सलिलं प्रदाय
     दूर्वाङ्‌कुरैरपि विधाय सतीं सपर्याम् ।
अप्युत्तमां गतिमसौ भजते त्रिलोकीं
     दाश्वानविक्लवमनाः कथमार्तिमृच्छेत् ॥ २३ ॥
(वसंततिलका)
या पायि सत्यहृदये जल अर्पिल्याने
    दुर्वांकुरेहि पुजिता गति श्रेष्ठ लाभे ।
धैर्ये प्रसन्न बळिने दिधले त्रिलोक
    तेंव्हा तयास कसले मग दुःख लाभे ॥ २३ ॥

अशठधीः - निष्कपटबुद्धीचा पुरुष - यत्पादयोः सलिलम् अपि प्रदाय - ज्याच्या चरणांना उदकही अर्पण करून - दूर्वांङ्कुरैः अपि - दुर्वांकुरांनीसुद्धा - सतीं सपर्यां विधाय - चांगल्या प्रकारची पूजा करून - उत्तमां गतिं अपि भजते - श्रेष्ठ गतीला मिळवितो - (तस्मै) त्रिलोकीं दाश्वान् - त्या तुज परमेश्वराला त्रैलोक्य देऊन - अविक्लवमनाः - ज्याचे मन विव्हळत नाही असा - असौ - हा बलिराजा - कथं आर्तिं ऋच्छेत् - कसा पीडित होण्यास योग्य होईल. ॥२३॥
प्रभो, जो मनुष्य कृपणता सोडून शुद्ध अंतःकरणाने आपल्या चरणांना पाण्याने अर्घ्य देतो आणि फक्त दूर्वादलानेसुद्धा आपली खरीखरी पूजा करतो, त्यालासुद्धा उत्तम गती प्राप्त होते. असे असता बलीने तर मोठ्या प्रसन्नतेने, धर्याने आणि स्थिरतापूर्वक आपल्याला तिन्ही लोकांचे दान केले आहे. मग ह्याला दुःख का व्हावे ? (२३)


श्रीभगवानुवाच -
(अनुष्टुप्)
ब्रह्मन् यमनुगृह्णामि तद्विशो विधुनोम्यहम् ।
यन्मदः पुरुषः स्तब्धो लोकं मां चावमन्यते ॥ २४ ॥
श्री भगवान्‌ म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
ब्रह्माजी ! मी जया पावे त्याचे धन हिरावितो ।
धनाने माजतो प्राणी तेंव्हा तो मज ना भजे ॥ २४ ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा - अहं यम् अनुगृह्‌णामि - मी ज्यावर अनुग्रह करितो - तद्विशः विधुनोमि - ज्याची संपत्ती मी नष्ट करितो - यन्मदः स्तब्धः पुरुषः - ज्या संपत्तीच्या मदाने युक्त असा गर्विष्ठ पुरुष - लोकं माम् च अवमन्यते - लोकाला व मला अवमानितो. ॥२४॥
श्रीभगवान म्हणाले - ब्रह्मदेवा, मी ज्याच्यावर कृपा करतो, त्याचे धन हिरावून घेतो, कारण मनुष्य जेव्हा धनाच्या मदाने उन्मत्त होतो, तेव्हा तो माझा आणि लोकांचा तिरस्कार करू लागतो. (२४)


यदा कदाचित् जीवात्मा संसरन्निजकर्मभिः ।
नानायोनिष्वनीशोऽयं पौरुषीं गतिमाव्रजेत् ॥ २५ ॥
आपुल्या कर्मि गुंतोनी भवात जीव तो फिरे ।
माझी कृपा घडे तेंव्हा मनुष्यदेह लाभतो ॥ २५ ॥

अयं अनीशः जीवात्मा - हा परतंत्र असा जीवात्मा - निजकर्मभिः - आपल्या कर्मांनी - नानायोनिषु संसरन् - अनेक योनींमध्ये जन्म घेत - यदा कदाचित् - एखादे वेळी कदाचित - पौरुषीं गतिं आव्रजेत् - मनुष्यजन्माला पावतो. ॥२५॥
आपल्या कर्मांमुळे पराधीन होऊन हा जीव अनेक योनींमध्ये भटकत राहतो आणि जेव्हा कधीतरी मनुष्यशरीर प्राप्त करतो, (२५)


जन्मकर्मवयोरूप विद्यैश्वर्यधनादिभिः ।
यद्यस्य न भवेत् स्तंभः तत्रायं मदनुग्रहः ॥ २६ ॥
कूळ कर्म अवस्था नी रूप विद्या नि ते धनो ।
ऐश्वर्य आदिचा गर्व न ज्याला ती कृपा मम ॥ २६ ॥

अस्य जन्मकर्म - ह्या मनुष्याला जन्म, कर्म, - वयोरूपविद्यैश्वर्यधनादिभिः - वय, स्वरूप, विद्या, ऐश्वर्य व धन इत्यादिकांनी - स्तम्भः यदि न भवेत् - जर गर्व होणार नाही - तत्र अयं मदनुग्रहः - तर ही माझी कृपाच होय. ॥२६॥
त्यावेळी जर कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य, धन इत्यादी कारणांनी त्याला गर्व झाला नाही, तर त्याच्यावर माझी मोठीच कृपा झाली आहे, असे समजावे. (२६)


मानस्तम्भनिमित्तानां जन्मादीनां समन्ततः ।
सर्वश्रेयःप्रतीपानां हन्त मुह्येन्न मत्परः ॥ २७ ॥
कुळादिंच्याचि गर्वाने कल्याण त्यजितो जिव ।
माझे भक्त परी ऐशा मोही ना गुंतती कधी ॥ २७ ॥

मत्परः - माझीच भक्ती करणारा पुरुष - मानस्तम्भनिमित्तानां - गर्व व ताठा ह्याला कारणीभूत अशा - समन्ततः - सर्वतोपरी - सर्वश्रेयःप्रतीपानां - सर्व कल्याणांना प्रतिकूल अशा - जन्मादीनां - जन्मादिकांच्यामुळे - हन्त न मुह्येत् - खरोखर मोह पावणार नाही. ॥२७॥
सर्व प्रकारच्या कल्याणाच्या विरोधी असणार्‍या मला जे शरण येतात, ते कुलीनता इत्यादी पुष्कळशा अभिमान आणि ताठा उत्पन्न करणार्‍या कारणांमुळे मोहित होत नाहीत. (२७)


एष दानवदैत्यानामग्रनीः कीर्तिवर्धनः ।
अजैषीदजयां मायां सीदन्नपि न मुह्यति ॥ २८ ॥
दैत्य दानव वंशाचा बळी मेरूचि कीर्तिमान्‌ ।
माया ती जिंकिली येणे दुःखातहि न लोभ या ॥ २८ ॥

दानवदैत्यानां अग्रणीः - दानव व दैत्य ह्यांचा नायक - कीर्तिवर्धनः एषः - व कीर्तीला वाढविणारा हा बलिराजा - अजयां मायाम् अजैषीत् - अजिंक्य मायेला जिंकिता झाला - सीदन् अपि न मुह्यति - संकटे आली असतांहि मोह पावला नाही. ॥२८॥
हा बली दानव आणि दैत्य अशा दोन्ही वंशांमध्ये अग्रगण्य आणि त्यांची कीर्ती वाढविणारा आहे. जिला जिंकणे अतिशय कठीण आहे, त्या मायेवर याने विजय मिळविला आहे. तू पाहातच आहेस की, एवढे दुःख भोगूनसुद्धा हा खचला नाही. (२८)


क्षीणरिक्थश्च्युतः स्थानात्क्षिप्तो बद्धश्च शत्रुभिः ।
ज्ञातिभिश्च परित्यक्तो यातनामनुयापितः ॥ २९ ॥
धन ते मी हिरावोनी घेतले राज्य सर्वही ।
आक्षेप घेतले कैक शत्रुत्वे बांधिले असे ॥ २९ ॥

क्षीणरिक्थः - द्रव्य नष्ट झालेला असा हा - स्थानात् च्युतः - स्वस्थानापासून च्युत झाला - शत्रुभिः क्षिप्तः बद्धः च - शत्रूंनी खाली घालून बांधिला - ज्ञातिभि परित्यक्तः - ज्ञातींनी सोडिला - यातनां अनुयापितः - आणि यातना भोगावयाला लाविला. ॥२९॥
याचे धन हिरावून घेतले, शत्रूंनी बांधले, बांधव सोडून निघून गेले, इतके याला कष्ट भोगावे लागले. (२९)


गुरुणा भर्त्सितः शप्तो जहौ सत्यं न सुव्रतः ।
छलैरुक्तो मया धर्मो नायं त्यजति सत्यवाक् ॥ ३० ॥
गुरुंनी दिधला शाप परी हा तो दृढव्रती ।
छळोनी बोललो यासी तरी ना धर्म त्यागि हा ॥ ३० ॥

गुरुणा भर्त्सितः शप्तः च - गुरु शुक्राचार्याने निंदिलेला व शापिलेला - सुव्रतः अयं - खरे व्रत पाळणारा हा बलिराजा - सत्यं न जहौ - सत्याला सोडिता झाला नाही - मया छलैः धर्मः उक्तः - मी कपटांनी धर्म सांगितला - सत्यवाक् अयं - सत्य बोलणारा हा बलिराजा - (तं धर्मं) न त्यजति - धर्माला टाकीत नाही. ॥३०॥
एवढेच काय, गुरुदेवांनी निर्भर्त्सना करून शापसुद्धा दिला. शिवाय मी याला उपहासाने बोललो. पण या दृढव्रत सत्यवादीने सत्याला अनुसरून आपला धर्म सोडला नाही. (३०)


एष मे प्रापितः स्थानं दुष्प्रापं अमरैरपि ।
सावर्णेरन्तरस्यायं भवितेन्द्रो मदाश्रयः ॥ ३१ ॥
असे मी स्थान या देई दुर्लभो देवतांस जे ।
मन्वंतरात सावर्णी इंद्र हाचि असेल की ॥ ३१ ॥

एषः मे अमरैः अपि - हा बलिराजा माझ्याकडून देवांनाही दुर्लभ अशा - दुष्प्रापं स्थानं प्रापितः - स्थानाला पोचविला गेला आहे - मदाश्रयः अयं - माझा आश्रय करणारा हा बलिराजा - सावर्णेः अन्तरस्य इंद्रः भविता - सावर्णि मन्वन्तरामध्ये इंद्र होईल. ॥३१॥
म्हणून मोठमोठ्या देवतांनासुद्धा महत्प्रयासाने जे स्थान प्राप्त होत नाही, ते स्थान मी त्याला दिले आहे. सावर्णी मन्वन्तरामध्ये हा माझा परम भक्त इंद्र होईल. (३१)


तावत् सुतलमध्यास्तां विश्वकर्मविनिर्मितम् ।
यदाधयो व्याधयश्च क्लमस्तन्द्रा पराभवः ।
नोपसर्गा निवसतां सम्भवन्ति ममेक्षया ॥ ३२ ॥
सुतला विश्वकर्माने निर्मिले तेथ राहि हा ।
जेथील लोक ते सर्व कृपा माझीच सेविती ॥
तिथे व्याधी न थकवा शत्रु विघ्ने न आणिती ॥ ३२ ॥

तावत् विश्वकर्मविनिर्मितं - तोपर्यंत हा बलिराजा विश्वकर्म्याने निर्मिलेल्या - सुतलं अध्यास्ताम् - सुतलामध्ये राहो - यत् निवसतां - जेथे राहणार्‍यांना - मम ईक्षया - माझ्या कृपावलोकनाने - आधयः व्याधयः न (संभवन्ति) - मानसिक चिंता व शारीरिक रोग होत नाहीत - क्लमः तन्द्रा पराभवः - आणि ग्लानि, आळस, पराजय - उपसर्गः च न संभवन्ति - व पीडा होत नाहीत. ॥३२॥
तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनविलेल्या सुतल लोकामध्ये राहील. तेथे राहणार्‍या लोकांना माझ्या कृपादृष्टीमुखे शारीरिक किंवा मानसिक रोग, थकवा, ग्लानी, शत्रूकडून पराभव आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नांशी सामना करावा लागत नाही. (३२)


इन्द्रसेन महाराज याहि भो भद्रमस्तु ते ।
सुतलं स्वर्गिभिः प्रार्थ्यं ज्ञातिभिः परिवारितः ॥ ३३ ॥
(बळीला संबोधून म्हणतात)
इंद्रसेना महाराजा सर्व कल्याण हो तुझे ।
तेथ जा गोतवाळ्याने स्वर्गीचे सुख भोग तू ॥ ३३ ॥

भो इंद्रसेन महाराज - हे महाराजा बले - ते भद्रं अस्तु - तुझे कल्याण असो - ज्ञातिभिः परिवारितः (त्वं) - बांधवांनी वेष्टिलेला तू - स्वर्गिभिः प्रार्थ्यं - देवांनी प्रार्थना करण्याजोग्या - सुतलं याहि - अशा सुतलाला जा. ॥३३॥
महाराज इंद्रसेन, तुझे कल्याण असो. आता तू आपल्या बांधवांसह, स्वर्गातील देवतासुद्धा ज्याची इच्छा करतात, त्या सुतल लोकात जा. (३३)


न त्वां अभिभविष्यन्ति लोकेशाः किमुतापरे ।
त्वत् शासनातिगान् दैत्यान् चक्रं मे सूदयिष्यति ॥ ३४ ॥
कधी न शकती जिंकू लोकपालही ते तुला ।
न दैत्य मानिती त्यांचे चक्रे मी तुकडे करी ॥ ३४ ॥

लोकेशाः त्वां न अभिभविष्यन्ति - लोकपाल तुझा पराजय करू शकणार नाहीत - अपरे किम् उत - मग दुसरे कसा करतील - मे चक्रं - माझे सुदर्शनचक्र - त्वच्छासनान्तिगान् दैत्यान् - तुझी आज्ञा मोडणार्‍या दैत्यांना - सूदयिष्यति - मारून टाकील. ॥३४॥
मोठमोठे लोकपाल सुद्धा आता तुला पराजित करू शकनार नाहीत. मग इतरांची काय कथा ! जे दैत्य तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करतील, त्यांचा माझे चक्र नाश करील. (३४)


रक्षिष्ये सर्वतोऽहं त्वां सानुगं सपरिच्छदम् ।
सदा सन्निहितं वीर तत्र मां द्रक्ष्यते भवान् ॥ ३५ ॥
तुझी नी तव भक्तांची तशी सामग्रि जी तुझी ।
रक्षील स्वयेची मी नी राही नित्य तुझ्या सवे ॥ ३५ ॥

अहं त्वां सानुगं - तुला सेवकांसह - सपरिच्छदं सर्वतः रक्षिष्ये - व परिवारांसह मी सर्वप्रकारे राखीन - वीर - हे पराक्रमी बलिराजा - तत्र भवान् मां सदा - तेथे तू मला नेहमी - सन्निहितं द्रक्ष्यते - जवळ असलेला पाहशील. ॥३५॥
तुझे, तुझ्या अनुयायांचे आणि तुझ्या भोगसामग्रीचे सुद्धा मी सर्व प्रकारच्या विघ्नांपासून रक्षण करीन. वीर बली, तू मला तिथे नेहमीच आपल्याजवळ असल्याचे पाहशील. (३५)


तत्र दानवदैत्यानां संगात् ते भाव आसुरः ।
दृष्ट्वा मदनुभावं वै सद्यः कुण्ठो विनंक्ष्यति ॥ ३६ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां वामनप्रादुर्भवे
बलिवामनसंवादे संहितायां अष्टमस्कन्धे द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥
दैत्य दानव यांचा जो तुला संसर्गदोष तो ।
तात्काळ नष्ट हा झाला प्रभाव ममची पहा ॥ ३६ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ बाविसावाअध्याय हा॥ ८ ॥ २२ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

तत्र - तेथे - मदनुभावं दृष्ट्‌वा - माझा प्रभाव पाहून - दानवदैत्यानां - दानव व दैत्य ह्यांच्या - सङगात् (जातः) - संगतीमुळे उत्पन्न झालेला - ते आसुरः भावः - तुझा आसुरी स्वभाव - सद्यः कुण्ठः - तत्काळ कुंठित होऊन - विनंक्ष्यति वै - खरोखर नाश पावेल. ॥३६॥
दानव आणि दैत्यांच्या संसर्गाने तुझा जो काही आसुरभाव असेल, तो माझ्या प्रभावाने ताबडतोब दबून नाहीसा होईल. (३६)


स्कंध आठवा - अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP