श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
विंशोऽध्यायः

बलिकर्तृकं पदत्रयमितभूमिदानं भगवतो विराड्‌रूपग्रहणं च -

भगवान वामनांच्या विराट रूपाने दोनच पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापणे -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
बलिरेवं गृहपतिः कुलाचार्येण भाषितः ।
तूष्णीं भूत्वा क्षणं राजन् उवाचावहितो गुरुम् ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्)
राजन् ! कुलगुरु शुक्रे वदता क्षण शांत तो ।
राहिला बळि आदर्श गुरूसी नम्र बोलला ॥ १ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - एवं कुलाचार्येण भाषितः - याप्रमाणे कुलोपाध्याय शुक्राचार्याने उपदेशिलेला, - अवहितः गृहपतिः बलिः - लक्ष देऊन ऐकणारा गृहस्थाश्रमी बलिराजा - क्षणं तूष्णीं भूत्वा - क्षणभर स्तब्ध होऊन - गुरुं - शुक्राचार्याला - उवाच - म्हणाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - राजन, कुलगुरू शुक्राचार्य जेव्हा असे म्हणाले, तेव्हा आदर्श गृहस्थ, राजा बली एक क्षणभर गप्प राहून विनयाने आणि शांतपणे शुक्राचार्यांना म्हणाला - (१)


श्रीबलिरुवाच -
सत्यं भगवता प्रोक्तं धर्मोऽयं गृहमेधिनाम् ।
अर्थं कामं यशो वृत्तिं यो न बाधेत कर्हिचित् ॥ २ ॥
राजा बळी म्हणाला -
भगवन् बोलले सत्य धर्म तो आमुचा तसा ।
धर्म अर्थ यशो आणि निर्वाहा बाध तो नको ॥ २ ॥

यः - जो - कर्हिचित् - कधीही - अर्थं कामं यशः वृत्तिं - अर्थ, काम, कीर्ति व उपजीविका ह्यांना - न बाधेत - बाध आणणार नाही - अयं गृहमेधिनां धर्मः (अस्ति) - हा गृहस्थाश्रमी पुरुषांचा धर्म होय - (इति) भगवता सत्यं प्रोक्तं - असे जे आपण सांगितले ते खरे आहे. ॥२॥
बली म्हणाला - भगवन, आपले म्हणणे खरे आहे. गृहस्थाश्रमात राहणार्‍यांना तोच धर्म आहे की, ज्यामुळे अर्थ, काम, यश, आणि उपजीविकेच्या बाबतीत कधीही कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. २


स चाहं वित्तलोभेन प्रत्याचक्षे कथं द्विजम् ।
प्रतिश्रुत्य ददामीति प्राह्रादिः कितवो यथा ॥ ३ ॥
गुरुजी ! परि मी आहे प्रल्हादपौत्र नी तसा ।
प्रतिज्ञा नच ती मोडी द्विजाला ठकवू कसा ॥ ३ ॥

सः च प्राह्लादिः अहं - आणि तो प्रल्हादाच्या वंशात उत्पन्न झालेला मी - यथा कितवः - कपटी पुरुषाप्रमाणे - द्विजं ददामि इति प्रतिश्रुत्य - ब्राह्मणाला देतो म्हणून कबूल करून - वित्तलोभेन कथं प्रत्याचक्षे - द्रव्याच्या लोभाने उलट कसे बोलू . ॥३॥
परंतु गुरुदेव, मी प्रह्लादांचा नातू आहे. आणि एकवेळ देण्याची प्रतिज्ञा करून बसलो आहे. म्हणून आता मी धनाच्या लोभाने एखाद्या ठकाप्रमाणे "मी तुला देणार नाही" असे या ब्राह्मणाला कसे सांगू ? (३)


न ह्यसत्यात्परोऽधर्म इति होवाच भूरियम् ।
सर्वं सोढुमलं मन्ये ऋतेऽलीकपरं नरम् ॥ ४ ॥
पृथिवी वदते ऐसे असत्यचि अधर्म तो ।
न साही सगळा भार अर्धा भारचि साहिते ॥ ४ ॥

इयं भूः - ही पृथ्वी - असत्यात् परः अधर्मः न हि - खोटे बोलण्यापलिकडे दुसरा अधर्म नाही - अलीकपरं नरं ऋते - खोटे बोलणारा मनुष्य वगळता - सर्वं ओढूं अलं मन्ये - सर्व सहन करणे मला शक्य आहे असे मानिते - इति ह उवाच - असे खरोखर म्हणाली. ॥४॥
या पृथ्वीने म्हटले आहे की, "असत्याहून मोठा असा कोणताच अधर्म नाही. सर्व काही सहन करण्यास मी समर्थ आहे. परंतु खोटे बोलणार्‍या मनुष्याचा भार माझ्याच्याने सहन होणार नाही." (४)


नाहं बिभेमि निरयान् नाधन्यादसुखार्णवात् ।
न स्थानच्यवनान् मृत्योः यथा विप्रप्रलम्भनात् ॥ ५ ॥
दारिद्र्या नरका दुःखा राज्यनाशा नि मृत्युला ।
न भीतो मी परी विप्रा वंचिण्या भीतसे बहू ॥ ५ ॥

अहं यथा विप्रप्रलंभनात् बिभेमि - मी जसा ब्राह्मणाला फसविण्याच्या क्रियेला भितो - (तथा) निरयात् न - तसा नरकाला भीत नाही - असुखार्णवात् अधन्यात् न - दुःखाचा सागर अशा दारिद्र्याला भीत नाही - स्थानच्यवनात् - स्थानापासून भ्रष्ट होण्याला भीत नाही - मृत्योः न - मृत्यूला भीत नाही. ॥५॥
ब्राह्मणांना फसविण्याच्या बाबतीत मी जेवढा घाबरतो, तेवढा नरकाला, दारिद्र्याला, दुःखाच्या समुद्राला, राज्याच्या नाश होण्याला आणि मृत्यूलाही घाबरत नाही. (५)


यद् यद्धास्यति लोकेऽस्मिन् संपरेतं धनादिकम् ।
तस्य त्यागे निमित्तं किं विप्रस्तुष्येन्न तेन चेत् ॥ ६ ॥
मरता सगळ्या वस्तू येथेचि सोडणे असे ।
न तुष्टति द्विज धने तदा अर्थ धनात ना ॥ ६ ॥

अस्मिन् लोके - ह्या लोकी - यत् यत् धनादिकं - जो जो द्रव्यादिक पदार्थ - संपरेतं हास्यति - मेलेल्याला टाकणार - तेन विप्रः न तुष्येत् चेत् - त्या पदार्थाने जर ब्राह्मण संतुष्ट होणार नाही - (तर्हि) तस्य त्यागे निमित्तं किम् - तर त्या टाकण्याचे कारण काय. ॥६॥
मेल्यानंतर या संसारातील धन इत्यादी ज्या ज्या वस्तू आपली साथ सोडतात, त्यांच्याद्वारा दान इत्यादी देःऊ जर ब्राह्मणांना सुद्धा संतुष्ट करता आले नाही, तर त्या त्यागापासून काय फायदा ? (६)


श्रेयः कुर्वन्ति भूतानां साधवो दुस्त्यजासुभिः ।
दध्यङ्‌गशिबिप्रभृतयः को विकल्पो धरादिषु ॥ ७ ॥
दधिची शिबि आदींनी दुस्त्यज्य प्राण देउनी ।
रक्षिले हित प्राण्यांचे येरांचा हेतु काय तो ॥ ७ ॥

दध्यङ्‌शिबिप्रभृतयः - दधीचि ऋषि, शिबिराजा इत्यादि - साधवः - साधु पुरुष - दुस्त्यजासुभिः भूतानां श्रेयः कुर्वन्ति - टाकण्यास कठीण अशा प्राणांनी प्राण्यांचे कल्याण करितात - धरादिषु (तु) कः विकल्पः - मग पृथ्वी इत्यादिकांविषयी विचार कसला. ॥७॥
दधीची, शिबी आदी महापुरुषांनी सोडण्यास कठीण अशा प्राणांचे दान करून सुद्धा प्राण्यांचे भले केले आहे. तर मग जमिनीसारखी वस्तू देण्यासाठी विचार करण्याची काय आवश्यकता आहे ? (७)


यैरियं बुभुजे ब्रह्मन् दैत्येन्द्रैरनिवर्तिभिः ।
तेषां कालोऽग्रसीत् लोकान् न यशोऽधिगतं भुवि ॥ ८ ॥
द्विजा ! दैत्यांनि या पूर्व युगात पृथ्वि भोगिली ।
काळाने ग्रासिले सर्वा मागे कीर्ती पहा कशी ॥ ८ ॥

ब्रह्मन् - हे शुक्राचार्या - यैः (युद्धे) अनिवर्तिभिः - युद्धात माघार न घेणार्‍या - दैत्येन्द्रैः इयं बुभुजे - ज्या दैत्याधिपतींनी ह्या पृथ्वीचा उपभोग घेतला - तेषां लोकान् कालः अग्रसीत् - त्यांना प्राप्त झालेले लोक काळाने गिळून टाकिले - भूवि अधिगतं यशः तु न - परंतु पृथ्वीवर मिळविलेले यश गिळून टाकिले नाही. ॥८॥
हे ब्रह्मन, यापूर्वी ज्या दैत्यराजांनी या पृथ्वीचा उपभोग घेतला, त्यांचा इहलोक-परलोक तर काळाने खाऊन टाकला; परंतु त्यांचे पृथ्वीवरील यश नाही खाल्ले. (८)


सुलभा युधि विप्रर्षे हिइ, अनिवृत्तास्तनुत्यजः ।
न तथा तीर्थ आयाते श्रद्धया ये धनत्यजः ॥ ९ ॥
गुरुदेव ! जगी कैक युद्धात प्राण अर्पिती ।
सत्पात्रा धन दे श्रद्धे ऐसे दुर्लभ या जगी ॥ ९ ॥

विप्रर्षे - हे ब्राह्मणश्रेष्ठा - युधि अनिवृत्ताः तनुत्यजः सुलभाः हि - युद्धात माघार न घेता देह टाकणारे खरोखर पुष्कळ आहेत - तीर्थे आयाते - सत्पात्र ब्राह्मण आला असता - ये श्रद्धया धनत्यजः (ते) तथा न - श्रद्धेने द्रव्यत्याग करणारे तसे नाहीत. ॥९॥
गुरुदेव, युद्धात पाठ न दाखविता आपले प्राण देणारे लोक जगात पुष्कळ आहेत; परंतु जे सत्पात्र व्यक्तींना श्रद्धेने दान करतात, असे लोक मात्र दुर्लभ आहेत. (९)


मनस्विनः कारुणिकस्य शोभनं
     यदर्थिकामोपनयेन दुर्गतिः ।
कुतः पुनर्ब्रह्मविदां भवादृशां
     ततो वटोरस्य ददामि वाञ्छितम् ॥ १० ॥
(इंद्रवज्रा)
उदारभावे हिन नी अपात्रा
    देताहि भिक्षा गति हीन लोभे ।
ती दुर्गतीही तयि भूषणो की
    जो ब्रह्मवेत्ता तुमच्या परीच ।
लाभेल हानी मग काय बोलो
    तै मी यया दानचि देउ इच्छी ॥ १० ॥

यत् अर्थिकामोपनयेन दुर्गतिः (भवति) - जी याचकांची इच्छा पूर्ण केल्यामुळे निर्धन स्थिति येते - तत् - ती गोष्ट - मनस्विनः कारुणिकस्य - उदार व दयाळू पुरुषाला - शोभनं (अस्ति) - शुभावह होय - भवादृशां ब्रह्मविदां - तुमच्यासारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषांची - (कामोपनयनेन) कुतः पुनः - इच्छा पूर्ण केल्याने येणारे दारिद्र्य चांगले, हे काय पुनः सांगावयास पाहिजे - ततः अस्य बटोः वाञ्छितम् ददामि - म्हणून ह्या बटूने इच्छिलेले मी देतो. ॥१०॥
जर एखादा उदार आणि करुणाशील पुरुष सामान्य याचकाची इच्छा पूर्ण केल्याने दुर्गतीला जात असेल, तर ती दुर्गतीसुद्धा त्याच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. तर मग यांच्यासारख्या ब्रह्मवेत्त्या पुरुषांना दान केल्याने दुःख प्राप्त झाले तर त्यात काय बिघडले ? म्हणून मी या ब्रह्मचार्‍याची इच्छा अवश्य पूर्ण करीन. (१०)


यजन्ति यज्ञं क्रतुभिर्यमादृता
     भवन्त आम्नायविधानकोविदाः ।
स एव विष्णुर्वरदोऽस्तु वा परो
     दास्याम्यमुष्मै क्षितिमीप्सितां मुने ॥ ११ ॥
या यज्ञयागे भजता तुम्ही ज्या
    तो रुप घेता जरि येथ आला ।
आला असोवा दुसराहि कोणी
    इच्छील तैशी पृथिवीहि देतो ॥ ११ ॥

मुने - हे शुक्राचार्य - आम्नायविधानकोविदाः (भवन्तः) - वेदविधीमध्ये निष्णात असे आपण - यज्ञक्रतुभिः यं यजन्ति - यज्ञांनी व क्रतूंनी ज्याचे पूजन करिता - सः एव विष्णुः - तोच विष्णु - वरदः अस्तु - वर देणारा असो - वा परः (अस्तु) - किंवा शत्रु असो - अमुष्मै इप्सितां क्षितिं दास्यामि - ह्याला इच्छित भूमि मी देईन. ॥११॥
हे महर्षे, वेदविधान जाणणारे आपल्यासारखे लोक मोठ्या आदराने यज्ञयागांनी ज्यांची आराधना करतात, ते वरदानी विष्णूच या रूपाने असोत किंवा दुसरे कोणी असोत मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जमीन दान करीन. (११)


(अनुष्टुप्)
यद्यपि असौ अधर्मेण मां बध्नीयाद् अनागसम् ।
तथाप्येनं न हिंसिष्ये भीतं ब्रह्मतनुं रिपुम् ॥ १२ ॥
(अनुष्टुप्‌)
अपराधा विना याने अधर्मे बांधिले तरी ।
अनिष्ट न करी याचे जरी शत्रू असेल हा ॥
जरी तो द्विजवेषाने पातला भिउनी इथे ॥ १२ ॥

यत् अपि असौ - जरीही हा - अधर्मेण अनागसं मां बध्नीयात् - अधर्माने निरपराधी अशा मला बांधून टाकील - तथापि एनं भीतं ब्रह्मतनुं - तरी सुद्धा ह्याला भिऊन ब्रह्मशरीर धारण केलेल्या - रिपुं न हिंसिष्ये - शत्रूला मी मारणार नाही. ॥१२॥
माझा अपराध नसतानाही यांनी अधर्माने जरी मला बंधनात टाकले, तरीसुद्धा मी यांना विरोध करणार नाही. कारण माझे शत्रू असूनही भयभीत होऊन यांनी ब्राह्मणाचे शरीर धारण केले आहे. (१२)


एष वा उत्तमश्लोको न जिहासति यद् यशः ।
हत्वा मैनां हरेद् युद्धे शयीत निहतो मया ॥ १३ ॥
यशपवित्र हा विष्णु असता येश घेइ हा ।
युद्धे घेईल हा भूमी अन्या मृत्यू शरे मम ॥ १३ ॥

एषः उत्तमश्लोकः - हा श्रेष्ठकीर्ति प्रभु - यत् यशः न जिहासति - जर कीर्ति घालवू इच्छित नसेल - (तर्हि) युद्धे मा हत्वा एनां हरेत् - तर युद्धात मला मारून हिला हरण करील - वा मया निहतः शयीत - किंवा मी मारला असता शयन करील. ॥१३॥
जर हे पवित्रकीर्ती भगवान विष्णूच असतील, तर यश मिळविल्याखेरीज राहणार नाहीत. युद्धात मला मारूनसुद्धा ते पृथ्वी हिरावून घेतील आणि हे जर दुसरे कोणी असतील, तर युद्धात माझ्याकडून मारले जातील. (१३)


श्रीशुक उवाच -
एवं अश्रद्धितं शिष्यं अनादेशकरं गुरुः ।
शशाप दैवप्रहितः सत्यसन्धं मनस्विनम् ॥ १४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
आचार्ये पाहिला शिष्य अश्रद्ध आपुल्या वरी ।
दैवाच्या प्रेरणे त्यांनी शापिला सत्यही बळी ॥ १४ ॥

दैवप्रहितः गुरुः - दैवाने प्रेरिलेला गुरु शुक्राचार्य - एवं अश्रद्धितं - ह्याप्रमाणे विश्वास न ठेवणार्‍या, - अनादेशकरं - आज्ञा न पाळणार्‍या - सत्यसन्धं मनस्विनं शिष्यं - व आपली प्रतिज्ञा खरी करणार्‍या थोर मनाच्या शिष्याला - शशाप - शाप देता झाला. ॥१४॥
श्रीशुक म्हणतात - शुक्राचार्यांनी दैवाच्या प्रेरणेने सत्यप्रतिज्ञ आणि उदार परंतु शद्धारहित व आज्ञेचे उल्लंघन करणार्‍या शिष्याला शाप दिला. (१४)


दृढं पण्डितमान्यज्ञः स्तब्धोऽस्यस्मद् उपेक्षया ।
मच्छासनातिगो यस्त्वं अचिराद्‍भ्रश्यसे श्रियः ॥ १५ ॥
(शुक्राचार्य म्हणाले)
मूर्खा ! अज्ञचि तू होसी परि पंडित मानिसी ।
मलाही तू उपेक्षोनी गर्व हा धरिसी असा ॥
आज्ञा तू मोडिसी तेंव्हा हरेल लक्षुमी तुझी ॥ १५ ॥

यः त्वं - जो तू - दृढं पण्डितमानी - आपण विद्वान आहो असा बळकट अभिमान बाळगणारा - अज्ञः स्तब्धः यच्छासनातिगः असि - मूर्ख व माझी आज्ञा मोडणारा आहेस - अस्मदुपेक्षया - आमची उपेक्षा केल्यामुळे - अचिरात् क्षियः भ्रश्यसे - लवकरच ऐश्वर्यापासून भ्रष्ट होशील. ॥१५॥
मूर्खा ! तू स्वतःला मोठा पंडित समजतोस ! गर्विष्ठ अशा तू माझी उपेक्षा करून माझ्या आज्ञेचे उल्लंघन केले आहेस. म्हणून लवकरच तुझे ऐश्वर्य नाहीसे होईल. (१५)


एवं शप्तः स्वगुरुणा सत्यान्न चलितो महान् ।
वामनाय ददौ एनां अर्चित्वोदकपूर्वकम् ॥ १६ ॥
महात्मा बळि तो राजा शापे ना ढळला मुळी ।
भगवान् वामना त्याने पूजिले विधिपूर्वक ॥
पाणी सोडोनि त्रिपदे भूमि संकल्पिली तये ॥ १६ ॥

स्वगुरुणा एवं शप्तः - आपल्या गुरुने याप्रमाणे शाप दिलेला - महान् (सः) - महात्मा तो बलिराजा - सत्यात् न चलितः - सत्यापासून चळला नाही - वामनाय अर्चित्वा - वामनाची पूजा करून - उदकपूर्वम् एनां ददौ - जलदानपूर्वक भूमी देता झाला. ॥१६॥
आपल्या गुरूंनी असा शाप दिल्यानंतरसुद्धा महात्मा बली सत्यापासून ढळला नाही. त्याने वामनांची पूजा करून हातात पाणी घेऊन भूमी देण्याचे ठरविले. (१६)


विन्ध्यावलिस्तदागत्य पत्‍नी जालकमालिनी ।
आनिन्ये कलशं हैमं अवनेजन्यपां भृतम् ॥ १७ ॥
विंध्यावली बळीपत्‍नी मोत्यांचे हार लेवुनी ।
पातली घट घेवोनी सोन्याचा पद ते धुण्या ॥ १७ ॥

तदा जालकमालिनी - त्यावेळी मोत्यांच्या जाळीची माळ धारण करणारी - विंध्यावलिः पत्नी - विंध्यावलिनामक पत्नी - आगत्य हैमं अवनेजन्यपांभृतं कलशं - येऊन पाय धुण्याच्या पाण्यांनी भरलेला सुवर्णाचा कलश - आनिन्ये - आणिती झाली. ॥१७॥
त्याचवेळी मोत्यांचे हार घातलेली बलीची पत्‍नी विंध्यावली तेथे आली. तिने चरणप्रक्षालन करण्यासाठी पाण्याने भरलेला सोन्याचा कलश आणला. (१७)


यजमानः स्वयं तस्य श्रीमत्पादयुगं मुदा ।
अवनिज्यावहन्मूर्ध्नि तदपो विश्वपावनीः ॥ १८ ॥
अतीव सुंदरो पाय बळीने धुतले तसे ।
विश्वपावन त्या तीर्था बळीने शिरि घेतले ॥ १८ ॥

यजमानः - यजमान बलिराजा - मुदा - आनंदाने - स्वयं तस्य श्रीमत् पादयुगं अवनिज्य - स्वतः त्याचे शोभायमान दोन्ही पाय धुऊन - विश्वपावनीः तदपः - जगाला पवित्र करणारे ते उदक - मूर्ध्नि अवहत् - मस्तकावर धारण करिता झाला. ॥१८॥
बलीने मोठ्या आनंदाने स्वतः ते अतिसुंदर चरणयुगल धुतले आणि विश्वाला पावन करणारे ते जल आपल्या मस्तकावर धारण केले. (१८)


तदासुरेन्द्रं दिवि देवतागणा
     गन्धर्वविद्याधरसिद्धचारणाः ।
तत्कर्म सर्वेऽपि गृणन्त आर्जवं
     प्रसूनवर्षैर्ववृषुर्मुदान्विताः ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
आकाशि तेंव्हा स्थित देवता नी
    गंधर्व सिद्धे अन चारणांनी ।
प्रशंसिले दान बघून दैत्या
    वरूनि केली मग पुष्पवृष्टी ॥ १९ ॥

तदा दिवि - त्यावेळी आकाशात - मुदान्विताः देवतागणाः - आनंदित देवतांचे समूह, - गंधर्वविद्याधरसिद्धचारणाः सर्वे अपि - गंधर्व, विद्याधर, सिद्ध व चारण हे सर्वही - तत्कर्म आर्जवं गृणन्तः - त्याचे कृत्य व सरळपणा प्रशंसिणारे - असुरेन्द्रं प्रसूनवर्षैः ववृषुः - दैत्यपति बलिराजावर पुष्पवृष्टि करिते झाले. ॥१९॥
त्यावेळी आकाशातून देव, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण असे सर्वजण राजा बलीचे हे अलौकिक कार्य आणि सरलता यांची प्रशंसा करीत मोठ्या आनंदाने त्यांच्यावर दिव्य फुलांचा वर्षाव करू लागले. (१९)


नेदुर्मुहुर्दुन्दुभयः सहस्रशो
     गन्धर्वकिम्पूरुषकिन्नरा जगुः ।
मनस्विनानेन कृतं सुदुष्करं
     विद्वानदाद्यद्रिपवे जगत्त्रयम् ॥ २० ॥
नी दुदुंभी त्या झडल्या हजारो
    गंधर्व किंपूरूष गायले नी ।
उदार धन्यो बळिने पहा की
    शत्रूस केलेहि त्रिलोक दान ॥ २० ॥

सहस्रशः दुंदुभयः मुदुः नेदुः - हजारो दुंदुभि वारंवार वाजू लागल्या - गंधर्वकिंपुरुषकिन्नराः जगुः - गंधर्व, किंपुरुष व किन्नर गाऊ लागले - यत् विद्वान् (बलिः) - ज्ञानी बलिराजा - रिपवे जगत्त्रयं अदात् - जो शत्रूला त्रैलोक्य देता झाला - (तत्) मनस्विना - ते ह्या थोर पुरुषाने - अमेन सुदुष्करं कृतं - अत्यंत दुष्कर कृत्य केले. ॥२०॥
एकाच वेळी हजारो दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गंधर्व, किंपुरुष आणि किन्नर गाऊ लागले. या दानशूर बलीने जाणून बुजून शत्रूला तिन्ही लोकांचे दान दिले, हे केवढे कठीण काम केले बरे ! (२०)


तद्वामनं रूपमवर्धताद्‍भुतं
     हरेरनन्तस्य गुणत्रयात्मकम् ।
भूः खं दिशो द्यौर्विवराः पयोधयः
     तिर्यङ्‌नृदेवा ऋषयो यदासत ॥ २१ ॥
अद्‌भूत झाली घटना तदा की
    तो वामनो वाढुचि लागला नी ।
आकाश भूमी पशु पक्षि देव
    मनुष्य सारे लपले तयात ॥ २१ ॥

अनन्तस्य हरेः - ज्याच्या शक्तीचा अंत नाही अशा श्रीविष्णूचे - गुणत्रयात्मकं - तीन गुणांनी युक्त असे - अद्भुतं वामनं तत् रूपं - आश्चर्यजनक ते वामनस्वरूप - अवर्धत - वाढू लागले - यत् - ज्यात - भूः खं दिशः - पृथ्वी, आकाश, दिशा, - द्यौः विवराः पयोधयः - स्वर्ग, पाताळे व समुद्र - (च) तिर्यङ्‌नृदेवाः ऋषयः - आणि पशु, मनुष्य, देव व ऋषि - आसत - होते. ॥२१॥
त्यावेळी एक मोठी अद्‌भुत घटना घडली. अनंत भगवंतांचे ते त्रिगुणात्मक वामनरूप मोठे होऊ लागले. ते एवढे मोठे झाले की, पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशु, पक्षी, मनुष्य, देव आणि ऋषी सगळे त्या रूपात सामावून गेले. (२१)


काये बलिस्तस्य महाविभूतेः
     सहर्त्विगाचार्यसदस्य एतत् ।
ददर्श विश्वं त्रिगुणं गुणात्मके
     भूतेन्द्रियार्थाशयजीवयुक्तम् ॥ २२ ॥
ऋत्वीज आचार्य सदस्य आणि
    राजा बळीने हरि पाहिला तो ।
समस्त ऐश्वर्यचि स्वामि एक
    समस्त जीवांसह तो अनंत ॥ २२ ॥

सहर्त्विगाचार्यसदस्यः बलिः - ऋत्विज, आचार्य व सभासद ह्यांसह बलिराजा - महाविभूतेः तस्य गुणात्मके काये - मोठया ऐश्वर्यसंपन्न अशा त्याच्या त्रिगुणात्मक शरीरात - त्रिगुणं - तीन गुणांनी - भूतेन्द्रियार्थाशयजीवयुक्तं - व पंचमहाभूते, इंद्रिय, विषय, मन, बुद्धि व जीव ह्यांनी युक्त - एतत् विश्वं - असे हे विराटस्वरूपी जग - ददर्श - पाहता झाला. ॥२२॥
बलीने ऋत्विज, आचार्य आणि सदस्यांसह, त्या समस्त ऐश्वर्यांचे एकमात्र स्वामी असलेल्या भगवंतांच्या त्रिगुणात्मक शरीरामध्ये पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांचे विषय, अंतःकरण आणि जीवांसह हे संपूर्ण त्रिगुणमय जग पाहिले. (२२)


रसामचष्टाङ्‌घ्रितलेऽथ पादयोः
     महीं महीध्रान्पुरुषस्य जंघयोः ।
पतत्त्रिणो जानुनि विश्वमूर्तेः
     ऊर्वोर्गणं मारुतमिन्द्रसेनः ॥ २३ ॥
रसातलो त्या चरणाहि खाली
    पायासि पृथ्वी गिरि पिंढर्‍यांसी ।
पक्षी तयाच्या गुडघ्यावरी नी
    मरुद्‌गणो मांडिसि सर्व होती ॥ २३ ॥

इन्द्रसेनः - इंद्राच्या सैन्याप्रमाणे ज्याचे सैन्य आहे असा बलिराजा - विश्वमूर्तेः पुरुषस्य अंघ्रितले रसां - विराटस्वरूपी परमेश्वराच्या तळपायावर रसातळ - अथ पादयोः महीं - त्याचप्रमाणे दोन पायांच्या ठिकाणी पृथ्वी - जङघयोः महीध्रान् - पोटर्‍यांवर पर्वत - जानुनि पतत्त्रिणः - गुडघ्यांवर पक्षी - ऊर्वोः मारुतं गणं अचष्ट - मांडयांवर वायुसंघ पाहता झाला. ॥२३॥
इंद्रासारखी सेना असलेल्या बलीने विश्वरूप भगवंतांच्या चरणतलामध्ये रसातल, चरणांमध्ये पृथ्वी, पिंडर्‍यांमध्ये पर्वत, गुडघ्यांमध्ये पक्षी, जांघांमध्ये मरुद्‌गण, (२३)


सन्ध्यां विभोर्वाससि गुह्य ऐक्षत्
     प्रजापतीन्जघने आत्ममुख्यान् ।
नाभ्यां नभः कुक्षिषु सप्तसिन्धून्
     उरुक्रमस्योरसि चर्क्षमालाम् ॥ २४ ॥
वस्त्रासि संध्या अन गुह्य स्थानी
    प्रजापती दैत्यहि जांघस्थानी ।
नाभीत आकाश समुद्र काखीं
    नक्षत्र सारेचि वक्षस्थलासी ॥ २४ ॥

उरुक्रमस्य विभोः वाससि संध्या - महापराक्रमी विष्णूच्या वस्राच्या ठिकाणी संध्या - गुह्ये प्रजापतीन् - गुह्यस्थानाच्या ठिकाणी प्रजापतींना - जघने आत्ममुख्यान् - जघनभागी आपणा आहो प्रमुख ज्यामध्ये असे दैत्यसंघ - नाभ्यां नभः - नाभिस्थानी आकाश - कुक्षिषु सप्त सिंधून् - उदरामध्ये सात समुद्र - उरसि च - आणि वक्षस्थलाच्या ठिकाणी - क्रक्षमालां ऐक्षत् - नक्षत्रपंक्ती पाहता झाला. ॥२४॥
वस्त्रांमध्ये संध्या, गुह्यस्थानामध्ये प्रजापती, नितंबामध्ये आपल्यासह सर्व असुरगण, नाभीमध्ये आकाश, उदरस्थानी सात समुद्र आणि वक्षःस्थळामध्ये नक्षत्रांचा समूह, (२४)


हृद्यंग धर्मं स्तनयोर्मुरारेः
     ऋतं च सत्यं च मनस्यथेन्दुम् ।
श्रियं च वक्षस्यरविन्दहस्तां
     कण्ठे च सामानि समस्तरेफान् ॥ २५ ॥
इन्द्रप्रधानानमरान्भुजेषु
     तत्कर्णयोः ककुभो द्यौश्च मूर्ध्नि ।
केशेषु मेघान्छ्वसनं नासिकायां
     अक्ष्णोश्च सूर्यं वदने च वह्निम् ॥ २६ ॥
नी पाहिले की हृदयात धर्म
    ऋत स्तनी नी वचनात सत्य ।
वक्षस्थलासी घटलक्षुमी नी
    मनात चंद्रो अन कंठि साम ॥ २५ ॥
बाहूत इंद्रो अन देवता त्या
    कानीं दिशा नी शिरि स्वर्ग त्याच्या ।
केसात मेघो अन वायु नाकीं
    नेत्रात सूर्यो मुखि अग्नि त्याच्या ॥ २६ ॥

अङग - हे राजा - मुरारेः हृधि धर्मं - श्रीविष्णूच्या हृदयामध्ये धर्म - स्तनयोः च ऋतं सत्यं च - आणि स्तनांच्या ठिकाणी ऋत आणि सत्य - अथ मनसि च इन्दुं - त्याचप्रमाणे मनाच्या ठायी चंद्र - वक्षसि च - व वक्षस्थलाच्या ठिकाणी - अरविन्दहस्तां श्रियं - कमळ धारण करणारी लक्ष्मी - कण्ठे च सामानि - आणि कंठावर सामे - समस्तरेफान् च - आणि सगळे शब्द - भुजेषु च इंद्रप्रधानान् अमरान् - आणि भुजांच्या ठिकाणी इंद्रादि देव - तत्कर्णयोः ककुभः - त्याच्या कानांवर दिशा - मूर्ध्नि च द्यौः - व मस्तकी स्वर्ग - केशेषु च मेघान् - आणि केसांच्या ठिकाणी मेघ - नासिकायां श्वसनं - नाकांमध्ये वायू - अक्ष्णोः सूर्यं - नेत्रांच्या ठिकाणी सूर्य - वदने च वह्निं - आणि मुखांमध्ये अग्नि. ॥२५-२६॥
हृदयामध्ये धर्म, स्तनांमध्ये मधुर आणि सत्यवचन, मनामध्ये चंद्र, वक्षःस्थळावर हातात कमळे घेतलेली लक्ष्मी, कंठामध्ये सामवेद आणि संपूर्ण शब्दसमूह, बाहूंमध्ये इंद्रादि समस्त देवगण, कानांमध्ये दिशा, मस्तकामध्ये स्वर्ग, केसांमध्ये मेघमाला, नाकामध्ये वायू, डोळ्यांत सूर्य आणि मुखामध्ये अग्नी, (२५-२६)


वाण्यां च छन्दांसि रसे जलेशं
     भ्रुवोर्निषेधं च विधिं च पक्ष्मसु ।
अहश्च रात्रिं च परस्य पुंसो
     मन्युं ललाटेऽधर एव लोभम् ॥ २७ ॥
वाणीत वेदो रसनी वरुणो
    विधी निषेधो भुवईत तैसे ।
नी पापण्यांशी दिनरात्र त्याच्या
    ललाटि क्रोधो अधरोष्टि लोभ ॥ २७ ॥

परस्य पुंसः वाण्यां छंदांसि - श्रेष्ठ परमेश्वराच्या वाणीचे ठिकाणी वेद - रसे च जलेशं - आणि जिव्हेवर वरुण - भ्रुवोः विधिं निषेधं च - भ्रुकुटीच्या ठिकाणी विधि व निषेध - पक्ष्मसु अहः रात्रिं च - पापण्यांच्या ठिकाणी दिवस व रात्र - ललाटे मन्युं - ललाटाचे ठिकाणी क्रोध - अधरे एव लोभं - अधरोष्ठावरच लोभ. ॥२७॥
वाणीमध्ये वेद, जिभेमध्ये वरुण, भुवयांमध्ये विधी आणि निषेध, पापण्यांमध्ये दिवस आणि रात्र, कपाळावर क्रोध, खालच्या ओठामध्ये लोभ, (२७)


स्पर्शे च कामं नृप रेतसाम्भः
     पृष्ठे त्वधर्मं क्रमणेषु यज्ञम् ।
छायासु मृत्युं हसिते च मायां
     तनूरुहेष्वोषधिजातयश्च ॥ २८ ॥
स्पर्शात कामो जल वीर्यस्थानी
    चालीत यज्ञो नि अधर्म पृष्ठी ।
छायेत मृत्यू हरिच्या पहा तो
    हास्यात माया नि लवेत वल्ली ॥ २८ ॥

नृप - हे राजा - स्पर्शे कामं - स्पर्शाच्या ठिकाणी काम - रेतसः अंभः - रेताच्या ठिकाणी उदक - पृष्ठे अधर्मं - पाठीवर अधर्म - क्रमणेषु यज्ञं - पावलाच्या ठिकाणी यज्ञ - छायासु मृत्युं - छायेचे ठिकाणी मृत्यू - हसिते मायां - हास्याच्या ठिकाणी माया - तनूरुहेषु च ओषधिजातयः - आणि केसांच्या ठिकाणी औषधिसमूह. ॥२८॥
स्पर्शामध्ये काम, वीर्यामध्ये पाणी, पाठीमध्ये अधर्म, पदन्यासामध्ये यज्ञ, सावलीत मृत्यू, हास्यामध्ये माया, शरीराच्या रोमांमध्ये सर्व प्रकारच्या औषधी, (२८)


नदीश्च नाडीषु शिला नखेषु
     बुद्धावजं देवगणान् ऋषींश्च ।
प्राणेषु गात्रे स्थिरजंगमानि
     सर्वाणि भूतानि ददर्श वीरः ॥ २९ ॥
नाडीं सरीता नखि त्या शिळा नी
    बुद्धीत ब्रह्मादि ऋषी गणो ते ।
वीरो बळीने भगवंत ऐसा
    चराचरी इंद्रियि पाहिला तो ॥ २९ ॥

वीरः - पराक्रमी बलिराजा - नाडीषु नदीः - नाडींच्या ठिकाणी नद्या - नखेषु शिलाः - नखांच्या ठिकाणी पाषाण - बुद्धौ अजं - बुद्धीत ब्रह्मदेवाला - प्राणेषु देवगणान् ऋषीन् - प्राणांच्या ठिकाणी देवसमुदाय व ऋषि - गात्रे स्थिरजङगमानि सर्वानि - शरीरात स्थावरजंगम सर्व प्राणी - ददर्श - पाहता झाला. ॥२९॥
नाड्यांमध्ये नद्या, नखांमध्ये शिळा आणि बुद्धीमध्ये ब्रह्मदेवादी देव तसेच ऋषिगण पाहिले. अशा रीतीने वीर बलीने भगवंतांच्या इंद्रिये आणि शरीरामध्ये सर्व चराचर वस्तुजात पाहिले. (२९)


सर्वात्मनीदं भुवनं निरीक्ष्य
     सर्वेऽसुराः कश्मलमापुरंग ।
सुदर्शनं चक्रमसह्यतेजो
     धनुश्च शार्ङ्‌ग स्तनयित्‍नुघोषम् ॥ ३० ॥
पर्जन्यघोषो जलजः पाञ्चजन्यः
     कौमोदकी विष्णुगदा तरस्विनी ।
विद्याधरोऽसिः शतचन्द्रयुक्तः
     तूणोत्तमावक्षयसायकौ च ॥ ३१ ॥
सर्वात्म ऐसा हरि वामनो तो
    पाहोनि झाले भयभीत दैत्य ।
तेंव्हाचि आले हरिच्या करासी
    सुदर्शनो ते अति तेज दिव्य ॥ ३० ॥
शारंग्‌धनू जै गरजे ढगोची
    शंखो तसाची करि पांचजन्य ।
गदा तशी वेगवान् कौ‌मुदी ती
    चंद्रापरी ती शत चिन्ह ढाल ॥ ३१ ॥

अंग - हे राजा - सर्वे असुराः - सर्व दैत्य - सर्वात्मनि - विश्वरूपी परमेश्वराच्या - इदं भुवनं निरीक्ष्य - ठिकाणी हे जग पाहून - कश्मलम् आपुः - मूर्छित झाले - असह्यतेजः सुदर्शनं चक्रं - असह्य तेजाचे सुदर्शन चक्र - स्तनयित्नुघोषं शार्ङगं धनुः - मेघाप्रमाणे गर्जना करणारे शार्ङग धनुष्य - पर्जन्यघोषः पाश्चजन्यः - पावसाप्रमाणे गर्जना करणारा पांचजन्य शंख - तरस्विनी - वेगाने धावत जाणारी - कौ‌मोदकी विष्णुगदा - कौ‌मोदकी नावाची विष्णूची गदा - शतचंद्रयुक्तः - शंभर चांदक्यासह - विद्याधरः असि - विद्याधर नावाची तरवार - अध्ययसायकौ - ज्यांतील बाण कधीही नाहीसे होत नाहीत - तूणोत्तमौ - असे दोन उत्तम भाते. ॥३०-३१॥
परीक्षिता, सर्वात्मा भगवंतांमध्ये हे संपूर्ण जग पाहून सर्व दैत्य भयभीत झाले. त्याच वेळी भगवंतांच्या जवळ असह्य तेज असलेले सुदर्शन चक्र, गर्जना करणार्‍या मेघाप्रमाणे भयंकर टणत्कार करणारे शार्ङ्‌गधनुष्य, ढगाप्रमाणे गंभीर शब्द करणारा पांचजन्य शंख, भगवंतांची अत्यंत वेगवान अशी कौमोदकी गदा, चंद्राकार शंभर चिह्ने असलेली ढाल आणि विद्याधर नावाची तलवार, अक्षय बाणांनी भरलेले दोन भाते - (३०-३१)


सुनन्दमुख्या उपतस्थुरीशं
     पार्षदमुख्याः सहलोकपालाः ।
स्फुरत्किरीटाङ्‌गदमीनकुण्डलः
     श्रीवत्सरत्‍नोत्तममेखलाम्बरैः ॥ ३२ ॥
मधुव्रतस्रग्वनमालयावृतो
     रराज राजन्भगवानुरुक्रमः ।
क्षितिं पदैकेन बलेर्विचक्रमे
     नभः शरीरेण दिशश्च बाहुभिः ॥ ३३ ॥
विद्याधरो नामक खड्‌ग हाती
    अक्षेय भातीं द्वय तीर ज्यात ।
येता तदा पार्षद शोभला तो
    किरीट डोई अन कुंडले ही ।
ते बाजुबंदो भुजि शोभले नी
    श्रीवत्सचिन्हो हृदयास त्याच्या ।
गळ्यात शोभे तयि कौस्तुभो नी
    ते वस्त्र शोभे अन मेखळाही ॥ ३२ ॥
पाची प्रकारे फुलमाळ कंठी
    गुंजारती तेथचि भृंग नित्य ।
एका पदाने जग व्यापिले नी
    आकाश देहे नि दिशा करांनी ॥ ३३ ॥

सहलोकपालाः सुनंदमुख्याः च पार्षदमुख्याः - लोकपालांसह सुनंदप्रमुख मुख्य पार्षद - ईशं उपतस्थुः - ईश्वराची स्तुति करू लागले - राजन् - हे राजा - स्फुरत्किरीटांगद - चकाकणारी आहेत मुकुट, बाहुभूषणे - मीनकुण्डलः - व मत्स्याकार कुंडले समान - मधुस्रग्वनमालया वृतः - व भ्रमरांचीच माळ जीमध्ये झाली आहे अशा वनमालेने झाकलेला - भगवान् - परमेश्वर - श्रीवत्सरत्नोत्तममेखलाम्बरः - श्रीवत्स, कौस्तुभमणि, कमरपटटा आणि वस्र यांनी युक्त - रराज - शोभला - उरुक्रमः - पराक्रमी श्रीविष्णु - एकेन पदा - एका पावलाने - बलेः क्षितिः - बलिराजाचे राज्य अशी पृथ्वी - शरीरेण नभः - शरीराने आकाश - बाहुभिः च दिशः - व बाहूंनी दिशा - विचक्रमे - व्यापिता झाला. ॥३२-३३॥
त्याचप्रमाणे लोकपालांसहित सुनंद इत्यादी पार्षद भगवंतांजवळ उपस्थित झाले. त्यावेळी भगवंत अत्यंत शोभायमान दिसत होते. मस्तकावर चकाकणारा मुगुट, बाहूंमध्ये बाजूबंद, कानांमध्ये मकराकार कुंडले, वक्षस्थळावर श्रीवत्स चिह्न, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, कमरेला रत्‍नजडित कमरपट्यासह पीतांबर शोभून दिसत होता. भ्रमर गुंजारव करीत असलेली वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यांनी आपल्या एका पायाने बलीची सगळी पृथ्वी व्यापली, शरीराने आकाश आणि भुजांनी दिशा व्यापल्या. (३२-३३)


पदं द्वितीयं क्रमतस्त्रिविष्टपं
     न वै तृतीयाय तदीयमण्वपि ।
उरुक्रमस्याङ्‌घ्रिरुपर्युपर्यथो
     महर्जनाभ्यां तपसः परं गतः ॥ ३४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे विश्वरूपदर्शनं नाम विंशोऽध्यायः ॥ २० ॥
दुज्या पदे झाकियालाहि स्वर्ग
    न वस्तु राही बळिपाशि कांही ।
ठेवावयाला तिसरा पदो तो
    ब्रह्मांड झाके द्वय पावलात ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ विसावा अध्याय हा ॥ ८ ॥ २० ॥ हरिःॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

द्वितीयं पदं क्रमतः - दुसरे पाऊल टाकणार्‍या - (तस्य) त्रिविष्टपं (व्याप्तं) - त्याने स्वर्ग व्यापिला - तृतीयाय - आणि तिसर्‍या - तदीयं अणु अपि न वै (अवशिष्टम्) - पावलासाठी ज्याचे बिंदुमात्रहि उरले नाही - अथो - त्यानंतर - उरुक्रमस्य अङ्‌घ्रिः - पराक्रमी वामनाचा पाय - उपरि उपरि - वरती वरती - महर्जनाभ्यां - महर्लोक, जनलोक - तपसः च परंगतः - व तपोलोक ह्यांच्या पलीकडे असणार्‍या सत्यलोकापर्यंत गेला. ॥३४॥
दुसर्‍या पावलाने त्यांनी स्वर्गालाही व्यापले. तिसरे पाऊन ठेवण्यासाठी बलीची थोडीशी कोणतीही वस्तू शिल्लक राहिली नाही. भगवंतांचे ते दुसरे पाऊल सुद्धा वरवर जात महर्लोक, जनलोक आणि तपोलिकाच्याही वर सत्यलोकात जाऊन पोहोचले. (३४)


स्कंध आठवा - अध्याय विसावा समाप्त

GO TOP