|
श्रीमद् भागवत पुराण
व्रतसंतुष्टस्य भगवतो अदित्यै वरदानम्, भगवंतांचे प्रगट होऊन अदितीला वर देणे - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) इत्युक्ता सादिती राजन् स्वभर्त्रा कश्यपेन वै । अन्वतिष्ठद् व्रतमिदं द्वादशाहं अतन्द्रिता ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्) परीक्षिता ! पति देवाचा घेवोनी उपदेश हा । मोठ्या सावध चित्ताने अदिती व्रत साधिते ॥ १ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - स्वभर्त्रा कश्यपेन - आपला पति जो कश्यप त्याने - इति उक्ता सा अदितिः - ह्याप्रमाणे उपदेशिलेली ती अदिती - द्वादशाहं - बारा दिवस - अतन्द्रिताः - दक्ष अशी - इदं व्रतम् वै अन्वतिष्ठत् - या पयोव्रताचे उत्तमरीतीने अनुष्ठान करिती झाली. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - राजा, आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे अदितीने मोठ्या तत्परतेने बारा दिवसांपर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले. (१)
चिन्तयन्ति एकया बुद्ध्या महापुरुषमीश्वरम् ।
प्रगृह्येन्द्रियदुष्टाश्वान् मनसा बुद्धिसारथिः ॥ २ ॥
बुद्धी ही सारथी केली मनाचा तो लगाम नी । थोपिले इंद्रिये अश्व निष्ठेने चिंतिला हरी ॥ २ ॥
एकया बुद्धया - एकाग्र बुद्धीने - महापुरुषम् ईश्वरं चिन्तयन्ती - पुरुषोत्तम परमेश्वराचे चिंतन करणारी -बुद्धिसारथिः - बुद्धि आहे मार्गदर्शक जिची अशा तिने - मनसा इन्द्रियदुष्टाश्वान् प्रगृह्य - मनाच्या योगे इंद्रियरूपी दुष्ट घोडयांना आवरून - ॥२॥
बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरूप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली. (२)
मनश्चैकाग्रया बुद्ध्या भगवति अखिलात्मनि ।
वासुदेवे समाधाय चचार ह पयोव्रतम् ॥ ३ ॥
तिने एकाग्र बुद्धिने सर्वात्मा वासुदेवि त्या । लाविले आपुले चित्त पयोव्रत करोनिया ॥ ३ ॥
एकाग्रया बुद्धया - एकाग्र केलेल्या बुद्धीने - अखिलात्मनि भगवति - सर्वांचा आत्मा अशा षड्गुणैश्वर्यसंपन्न - वासुदेवे मनः समाधाय - परमेश्वराच्या ठिकाणी मन लावून - च - आणि - पयोव्रतं ह चचार - पयोव्रत खरोखर करिती झाली. ॥३॥
तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्णरूपाने जोडून पयोव्रताचे अनुष्ठान केले. (३)
तस्याः प्रादुरभूत् तात भगवान् आदिपुरुषः ।
पीतवासाश्चतुर्बाहुः शंखचक्रगदाधरः ॥ ४ ॥
तदा प्रगटतो झाला भगवान् पुरुषोत्तम । शंख चक्र गदा हाती चतुर्भुज पितांबर ॥ ४ ॥
तात - बा परीक्षित राजा - पीतवासाः - पीतांबर परिधान केलेला, चार हातात - चतुर्बाहुः शङ्खचक्रगदाधरः - चार हातात शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणारा - भगवान् आदिपुरुषः - षड्गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वर - तस्याः (पुरः) प्रादुरभूत् - तिच्या समोर उभा राहिला. ॥४॥ -
तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्यासमोर प्रगट झाले. परीक्षिता, त्यांनी पीतांबर परिधान केला होता. त्यांना चार हात होते आणि हातात शंख, चक्र, गदा घेतली होती. (४)
तं नेत्रगोचरं वीक्ष्य सहसोत्थाय सादरम् ।
ननाम भुवि कायेन दण्डवत् प्रीतिविह्वला ॥ ५ ॥
नेत्राने पाहिला विष्णु अदिती आदरे उभी । राहता प्रेम विव्हले दंडवत् विष्णू वंदिला ॥ ५ ॥
तं नेत्रगोचरं वीक्ष्य - तो परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहे असे पाहून - प्रीतीविह्वला - प्रेमाने विव्हल झालेली ती आदिती - सहसा उत्थाय - एकाएकी उठून - सादरं कायेन दंडवत् भुवि ननाम - शरीराने पृथ्वीवर आदरपूर्वक नमस्कार घालती झाली. ॥५॥
भगवंतांना अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून अदिती विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेमविह्वल होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले. (५)
सोत्थाय बद्धाञ्जलिरीडितुं स्थिता
नोत्सेह आनन्दजलाकुलेक्षणा । बभूव तूष्णीं पुलकाकुलाकृतिः तद् दर्शनात्युत्सवगात्रवेपथुः ॥ ६ ॥
(इंद्रवज्रा) उठोनि जोडी कर नी स्तुती ही करावया यत्न केला परी ती । हर्षाश्रुने ना शकली वदाया हर्षेचि अंगा सुटलाहि कंप ॥ ६ ॥
उत्थाय बद्धाञ्जलिः ईडितुं स्थिता - उठून व हात जोडून स्तुति करावयास लागलेली - सा आनन्दजलाकुलेक्षणा - आनन्दाश्रूंनी जिचे डोळे भरून आले आहेत, - पुलकाकुलाकृतिः - जिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत - तद्दर्शनात्युत्सवगात्रवेपथुः - व भगवंत दर्शनाने होणार्या आनंदाने जिच्या शरीराला कंप सुटला आहे - (ईडितुं) न उत्सेहे - अशी ती अदिती भगवंताची स्तुति करण्यास समर्थ झाली नाही - तूष्णीं बभूव - स्तब्ध राहिली. ॥६॥
नंतर उठून, हात जोडून भगवंतांची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु डोळ्यांमध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली होती. तिच्याच्याने बोलवेना. तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते. दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचे अंग कापू लागले, त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली. (६)
प्रीत्या शनैर्गद्गदया गिरा हरिं
तुष्टाव सा देव्यदितिः कुरूद्वह । उद्वीक्षती सा पिबतीव चक्षुषा रमापतिं यज्ञपतिं जगत्पतिम् ॥ ७ ॥
ती प्रेमनेत्रे कमलापतीला यज्ञेश्वराला बघता अशी की । पीयील वाटे बघता अदीती सद्गदे धीर धरोनि बोले ॥ ७ ॥
कुरूद्वह - हे कुरूकुलश्रेष्ठा परीक्षिता - सा - ती - चक्षुषा रमापतिं यज्ञपतिं - नेत्राने लक्ष्मीपति व यज्ञमूर्ति अशा - जगत्पतिं पिबती इव - परमेश्वराला जणू काय पीतच आहे अशी - उद्वीक्षती (आसीत्) - त्याच्याकडे सारखी बघत राहिली - सा देवी अदितिः - ती अदिति देवी - प्रीत्या शनैः गद्गद्या गिरा - प्रेमाने हळूहळू अडखळणार्या वाणीने - हरिं तुष्टाव - परमेश्वराची स्तुति करिती झाली. ॥७॥
परीक्षिता, आपल्या प्रेमपूर्ण नेत्रांनी देवी अदिती, लक्ष्मीपती, विश्वपती, यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहात होती. अंतर मोठ्या प्रेमाने, गदगद वाणीने हळूहळू ती भगवंतांची स्तुती करू लागली. (७)
अदितिरुवाच -
यज्ञेश यज्ञपुरुषाच्युत तीर्थपाद तीर्थश्रवः श्रवणमंगलनामधेय । आपन्नलोकवृजिनोपशमोदयाद्य शं नः कृधीश भगवन् असि दीननाथः ॥ ८ ॥
अदिति म्हणाली - (वसंततिलका) यज्ञेश यज्ञपुरुषाच्युत तीर्थपादा घेता पदाश्रय तुझा तरतात लोक । संकीर्तने तुझिहि तारिति ती जनांना नष्टोनि जाय विपदा शरणार्थियांच्या । दीनासि स्वामि भगवान् तुचि एकला रे कल्याण तेचि करणे अमुचे हरी रे ॥ ८ ॥
यज्ञेश यज्ञपुरुष अच्युत - हे यज्ञपते, हे यज्ञपुरुषा, हे अच्युता, - तीर्थपाद तीर्थश्रवः - हे पवित्रचरणकमला, हे पवित्रकीर्ते, - श्रवणमङगलनामधेय - हे कर्णाला गोड लागणार्या चांगल्या नावाच्या परमेश्वरा - आपन्नलोकवृजिनोपशमोदय - पीडित लोकांच्या पापाचे क्षालन करण्याकरिताच उदय पावणार्या - आद्य ईश भगवन् - हे अनादि व सर्वैश्वर्यसंपन्न परमेश्वरा - (त्वं) दीननाथः असि - तू दीनांचा रक्षक आहेस - नः शं कृघि - आमचे कल्याण कर. ॥८॥
अदिती म्हणाली - आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञ सुद्धा आपणच आहात. हे अच्युता, आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरून जातात. आपल्या यशकीर्तनाचे श्रवणसुद्धा संसार तरून नेणारे आहे. आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते. हे आदिपुरुषा, जो आपल्याला शरण येतो, त्याची सर्व संकटे आपण दूर करता. भगवन, आपण दीनांचे स्वामी आहात. आपण आमचे कल्याण करावे. (८)
विश्वाय विश्वभवनस्थितिसंयमाय
स्वैरं गृहीतपुरुशक्तिगुणाय भूम्ने । स्वस्थाय शश्वदुपबृंहितपूर्णबोध व्यापादितात्मतमसे हरये नमस्ते ॥ ९ ॥
विश्वास तू उबविसी अन पोषिसीही तू कारणीहि प्रलया तव रूप सर्व । छंदेचि तू गुण नि शक्ति रूपात येशी अज्ञान ते मिटविसी तुजला नमस्ते ॥ ९ ॥
विश्वाय - सर्वस्वरूपी - विश्वभवनस्थितिसंयमाय - जगाची उत्पत्ति, स्थिती व संहार करणार्या - स्वैरं - स्वच्छंदाने - गृहीतपुरुशक्तिगुणाय - मायेच्या अनेक गुणांना स्वीकारणार्या - भूम्ने - सर्वव्यापी - शश्वत् उपबृंहितपूर्णबोध - नित्य वृद्धिंगत होणार्या पूर्ण ज्ञानाने नाहिसे केले आहे - व्यापादितात्मतमसे - आत्म्याचे अज्ञान ज्याने अशा - स्वस्थाय हरये ते नमः - शांतचित्ताच्या तुला नमस्कार असो. ॥९॥
आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात. अनंत असूनसुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता. आपण नेहमी आपल्या स्वरूपातच स्थित असता. नित्य निरंतर वाढणार्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत राहता. भगवन, मी आपल्याला नमस्कार करते. (९)
आयुः परं वपुरभीष्टमतुल्यलक्ष्मीः
द्योभूरसाः सकलयोगगुणास्त्रिवर्गः । ज्ञानं च केवलमनन्त भवन्ति तुष्टात् त्वत्तो नृणां किमु सपत्नजयादिराशीः ॥ १० ॥
ब्रह्म्या समान तनु आयु नि दिव्य तेज सारेचि इष्ट धन नी पृथिवी नि स्वर्ग । सिद्धीही सर्व मिळली तुझिया कृपेने शत्रूशि तो विजय हे किरकोळ कर्म ॥ १० ॥
अनन्त - हे अनन्ता - तुष्टात् त्वत्तः - संतुष्ट झालेल्या तुझ्यापासून - नृणां - मनुष्यांना - परम् आयुः - ब्रह्मदेवाप्रमाणे दीर्घ आयुष्य - अभीष्टं वपुः - मनाजोगे शरीर - अतुल्यलक्ष्मीः - अपरंपार संपत्ति - द्यौर्भूरसाः - स्वर्ग, भूमि व रसातळ - सकलयोगगुणाः - सर्वयोगसिद्धी - त्रिवर्गः - धर्म, अर्थ व काम - केवलं ज्ञानं च - व शुद्ध ब्रह्मज्ञान - (एतानि) भवन्ति - ही प्राप्त होतात - सपत्नजयादिः आशीः किमु - शत्रूंवरील विजयादिकांची मग काय गोष्ट. ॥१०॥
हे अनंता, आपण जेव्हा प्रसन्न होता, तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य, त्यांच्याचसारखे दिव्य शरीर, प्रत्येक इच्छित वस्तू, पुष्कळ धन, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ. योगाच्या सर्व सिद्धी, धर्म, अर्थ, कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञानसुद्धा प्राप्त होते. असे असता शत्रूंवर विजय मिळविणे यासारख्या ज्या लहानसहान कामना आहेत, त्यासंबंधी काय सांगावे ? (१०)
श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) अदित्यैवं स्तुतो राजन् भगवान् पुष्करेक्षणः । क्षेत्रज्ञः सर्वभूतानां इति होवाच भारत ॥ ११ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्) अदितिने स्तुती गाता भगवान् कमलाक्ष तो । जाणिता जाहला सर्व वासुदेव प्रभू तदा ॥ ११ ॥
राजन् भारत - हे राजा परीक्षिता - अदित्या एवं स्तुतः - अदितीने ह्याप्रमाणे स्तविलेला - पुष्करेक्षणः - कमळाप्रमाणे नेत्र असलेला - सर्वभूतानां क्षेत्रज्ञः भगवान् - सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा आत्माच असा श्रीविष्णु - इति ह उवाच - याप्रमाणे खरोखर म्हणाला. ॥११॥
श्रीशुक म्हणतात - राजन, अदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंतांची स्तुती केली; तेव्हा सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले - (११)
श्रीभगवानुवाच -
देवमातर्भवत्या मे विज्ञातं चिरकांक्षितम् । यत् सपत्नैः हृतश्रीणां च्यावितानां स्वधामतः ॥ १२ ॥
श्री भगवान् म्हणाले - देवमाता ! तुझी इच्छा जाणिले मी तुझ्या मुलां । संपत्ती ती हिरावोनी दैत्ये नागविले असे ॥ १२ ॥
देवमातः - हे अदिते - सपत्नैः हृतश्रीणां - शत्रूंनी ज्यांची संपत्ति हरण केली आहे अशा - स्वधामतः च्यावितानां पुत्राणां - स्वस्थानापासून भ्रष्ट केलेल्या पुत्रांचे - यत् भवत्याः चिरकाङ्क्षितं - जे तुझे फार दिवसापासूनचे इच्छित - (तत्) मे विज्ञातं - ते मला समजले आहे. ॥१२॥
श्रीभगवान म्हणाले - हे देवजननी, तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो. शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती ह्सकावून घेतली आहे. त्यांना त्यांच्या ठिकाणातूनही हाकलून लावले आहे. (१२)
तान्विनिर्जित्य समरे दुर्मदान् असुरर्षभान् ।
प्रतिलब्धजयश्रीभिः पुत्रैः इच्छसि उपासितुम् ॥ १३ ॥
इच्छिसी तरि ते पुत्र बळीला जिंकितील नी । घेतील वैभवे सारी तरी तू मज पूजिणे ॥ १३ ॥
समरे - युद्धात - दुर्मदान् तान् असुरर्षभान् विनिर्जित्य - उन्मत्त अशा त्या मोठमोठया दैत्यांना जिंकून - प्रतिलब्धजयश्रीभिः पुत्रैः - विजयश्री प्राप्त झालेल्या पुत्रांकडून - उपासितुं - सेवा केली जाण्यास - इच्छसि - तू इच्छितेस. ॥१३॥
तुझी अशी इच्छा आहे की, आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मत्त आणि बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावे. (१३)
इन्द्रज्येष्ठैः स्वतनयैः हतानां युधि विद्विषाम् ।
स्त्रियो रुदन्तीरासाद्य द्रष्टुमिच्छसि दुःखिताः ॥ १४ ॥
इच्छिसी तरि तो इंद्र शत्रु मारील सर्व ते । दुःखि पत्न्या रडताना त्यांच्या तू बघशी की ॥ १४ ॥
इन्द्रज्येष्ठैः स्वतनयैः युधि आसाद्य - इंद्रप्रमुख आपल्या पुत्रांनी युद्धात गाठल्यामुळे - हतानां विद्विषां दुःखिताः रुदन्तीः स्त्रियः - मारिलेल्या शत्रूंच्या दुःखाने रडणार्या स्त्रियांना - द्रष्टुम् इच्छसि - पाहाण्यास इच्छितेस. ॥१४॥
तुझी अशीसुद्धा इच्छा आहे की, तुझे इंद्रादि पुत्र जेव्हा शत्रूला युद्धात मारतील, तेव्हा तू त्यांच्या रडणार्या पत्न्यांना आपल्या डोळ्यांनी पहावे. (१४)
आत्मजान् सुसमृद्धान् त्व प्रत्याहृतयशःश्रियः ।
नाकपृष्ठं अधिष्ठाय क्रीडतो द्रष्टुमिच्छसि ॥ १५ ॥
अदिती धनसंपन्न इच्छिसी पुत्र सर्व ते । कीर्ति ऐश्वर्य लाभेले स्वर्गारूढहि होति ते ॥ १५ ॥
त्वं - तू - प्रत्याहृतयशःश्रियः - परत मिळविली आहे कीर्ति व संपत्ति ज्यांनी अशा - सुसमृद्धान् - मोठया उत्कर्षाने युक्त अशा - नाकपृष्ठं अधिष्ठाय क्रीडतः आत्मजान् - स्वर्गात राहून खेळणार्या पुत्रांना - द्रष्टुम् इच्छसि - पाहाण्यास इच्छितेस. ॥१५॥
अदिती, तुला असेही वाटते की, तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत. त्यांची कीर्ती आणि ऐश्वर्य त्यांना प्राप्त व्हावे. तसेच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा. (१५)
प्रायोऽधुना तेऽसुरयूथनाथा
अपारणीया इति देवि मे मतिः । यत्तेऽनुकूलेश्वरविप्रगुप्ता न विक्रमस्तत्र सुखं ददाति ॥ १६ ॥
(इंद्रवज्रा) परंतु देवी असुरो अताची न हारती त्यां द्विज ईश साह्य । केली तयांशी जरि ती लढाई न त्यात लाभे सुख ते मुळिही ॥ १६ ॥
देवि - हे अदिति - प्रायः अधुना - बहुत करून हल्ली - ते असुरयूथनाथाः अपारणीयाः (सन्ति) - ते दैत्यसेनाधिपति जिंकिले जाण्यास फारच कठीण आहेत - इति मे मतिः - असे माझे मत आहे - यत् - कारण - ते अनुकूलेश्वरविप्रगुप्ताः (सन्ति) - ते दैत्य अनुकूल सामर्थ्यवान अशा ब्राह्मणांनी रक्षिलेले आहेत - तत्र (केवलः) विक्रमः सुखं न ददाति - त्या बाबतीत केवळ पराक्रम सुख देत नाही. ॥१६॥
परंतु देवी, त्या असुर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही, असे मल निश्चितपणे वाटत आहे. कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या त्यांना अनुकूल आहेत. यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही. (१६)
अथाप्युपायो मम देवि चिन्त्यः
सन्तोषितस्य व्रतचर्यया ते । ममार्चनं नार्हति गन्तुमन्यथा श्रद्धानुरूपं फलहेतुकत्वात् ॥ १७ ॥
देवी व्रताने तुज मी प्रसन्न म्हणोनि कांही करितो उपाय । पूजा न जाते कधि व्यर्थ माझी श्रद्धानुसारे फळ लाभते की ॥ १७ ॥
देवि - हे अदिति - अथापि - तरीसुद्धा - ते व्रतचर्यया संतोषितस्य मम - तुझ्या व्रताचरणाने संतुष्ट झालेल्या मला - उपायः चिन्त्यः - उपाय शोधून काढला पाहिजे - मम अर्चनं - माझे पूजन - श्रद्धानुरूपं फलहेतुकत्वात् - श्रद्धेनुरूप फल देण्यास कारणीभूत असल्यामुळे - अन्यथा गन्तुं न अर्हति - फुकट जाण्यास योग्य नाही. ॥१७॥
तरीसुद्धा हे देवी, तुझ्या या व्रताचे अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे, म्हणून मला यासंबंधी काही ना काही विचार करावाच लागेल. कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही. श्रद्धेनुसार तिचे फळ अवश्य मिळते. (१७)
त्वयार्चितश्चाहमपत्यगुप्तये
पयोव्रतेनानुगुणं समीडितः । स्वांशेन पुत्रत्वमुपेत्य ते सुतान् गोप्तास्मि मारीचतपस्यधिष्ठितः ॥ १८ ॥
रक्षार्थ पुत्रां विधि जाणुनी तू पयोव्रताने मज पूजिले तू । मी अंश रूपे उदरी तुझ्याच जन्मोनि रक्षा करितो तयांची ॥ १८ ॥
त्वया - तू - अपत्यगुप्तये पयोव्रतेन अर्चितः - पुत्रांच्या रक्षणार्थ पयोव्रतनामक व्रताने पूजिलेला - च - आणि - अनुगुणं समेधितः - गुणानुरूप संतोषविलेला - अहं - मी - स्वांशेन ते पुत्रत्वम् उपेत्य - स्वतःच्या अंशाने तुझ्या पुत्रपणाला प्राप्त होऊन - मारीचतपसि अधिष्ठितः - कश्यपमुनीच्या तपश्चर्येच्या आधाराने राहिलेला - सुतान् गोप्तास्मि - पुत्रांचे रक्षण करीन. ॥१८॥
आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधिपूर्वक पयोव्रताने माझी पूजा आणि स्तुती केली आहेस. म्हणून मी अंशरूपाने कश्यपाच्या तपश्चर्येत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानांचे रक्षण करीन. (१८)
(अनुष्टुप्)
उपधाव पतिं भद्रे प्रजापतिं अकल्मषम् । मां च भावयती पत्यौ एवं रूपमवस्थितम् ॥ १९ ॥
(अनुष्टुप्) कल्याणी ! ममरूपात पतीला स्थित पाहणे । निष्पाप पतिची सेवा करावी पाहुनी तसे ॥ १९ ॥
भद्रे - हे कल्याणि - पत्यौ एवंरूपं अवस्थितं - पतीच्या ठिकाणी अशा स्वरूपानेच - मां च भावयति - राहिलेल्या माझी कल्पना करून - अकल्मषं प्रजापतिं पतिम् उपधाव - निष्पाप असा जो पति कश्यपप्रजापति त्याची सेवा कर. ॥१९॥
कल्याणी, तू तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला याच रूपात पहा आणि पुण्यशील प्रजापतींची सेवा कर. (१९)
नैतत् परस्मा आख्येयं पृष्टयापि कथञ्चन ।
सर्वं संपद्यते देवि देवगुह्यं सुसंवृतम् ॥ २० ॥
पहा देवी असो गुप्त पुसले तरि ना वदो । रहस्य देवतांचे हे फळ ते सिद्ध होतसे ॥ २० ॥
देवि - हे अदिते - पृष्टया अपि (त्वया) - विचारिली गेलेल्याहि तुजकडून - कथंचन एतत् परस्मै न आख्येयम् - कोणत्याही कारणास्तव हे दुसर्याला सांगितले जाऊ नये - देवगुह्यं सर्वं सुसंवृतं संपद्यते - देवांचे रहस्य नीट गुप्त ठेवले असता सिद्धीस जाते. ॥२०॥
देवी, कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसर्या कोणाला सांगू नकोस. देवांचे रहस्य जितके गुप्त राहील, तितके ते अधिक सफल होते. (२०)
श्रीशुक उवाच -
एतावदुक्त्वा भगवान् तत्रैवान्तरधीयत । अदितिर्दुर्लभं लब्ध्वा हरेर्जन्मात्मनि प्रभोः ॥ २१ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - एवढे बोलता विष्णू तिथेच गुप्त जाहले । येईल गर्भि भगवान् अदिती धन्य जाहली ॥ २१ ॥
भगवान् - श्रीविष्णु - एतावत् उक्त्वा - इतके सांगून - तत्रैव अंतरधीयत - तेथेच गुप्त झाला - अदितिः आत्मनि प्रभोः हरेः - अदिती आपल्या उदरी समर्थ विष्णूच्या - दुर्लभं जन्म लब्ध्वा - दुर्लभ जन्माला मिळवून - परया भक्त्या - मोठया भक्तीने - कृतकृत्यवत् पतिं वै उपाधावत् - कृतार्थ झाल्याप्रमाणे पतीची सेवा करिती झाली. ॥२१॥
श्रीशुक म्हणतात - एवढे बोलून भगवान तेथेच अंतर्धान पावले. स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत, ही दुर्मिळ गोष्ट जाणून कृत्यकृत्य झाल्यासारखे तिला वाटले. (२१)
उपाधावत् पतिं भक्त्या परया कृतकृत्यवत् ।
स वै समाधियोगेन कश्यपस्तदबुध्यत ॥ २२ ॥ प्रविष्टं आत्मनि हरेः अंशं हि अवितथेक्षणः । सोऽदित्यां वीर्यमाधत्त तपसा चिरसम्भृतम् । समाहितमना राजन् दारुण्यग्निं यथानिलः ॥ २३ ॥
लागली पतिच्या सेवीं कश्यपे जाणिले तसे । आपुल्या शरिरामाजी अंशाने हरि पातला ॥ २२ ॥ वायू काष्ठासि अग्नीला स्थापितो तैचि कश्यपे । चिरसंचित वीर्याला दिती पोटात स्थापिले ॥ २३ ॥
तत् - नंतर - अवितथेक्षणः सः कश्यपः - सत्यदृष्टीने पाहाणारा तो कश्यप - आत्मनि प्रविष्टं हरेः अंशं हि - आपल्या ठिकाणी परमेश्वराचा अंश शिरला आहे असे - समाधियोगेन अबुध्यत - समाधीच्या योगे जाणता झाला. ॥२२॥ राजन् - हे राजा - सः समाहितमनाः - तो स्वस्थ अंतःकरणाने - यथा अनिलः दारुणि अग्निं (तथा) - जसा वायु लाकडातील अग्नीला तसा - तपसा चिरसंभृतं वीर्यम् - तपश्चर्येने पुष्कळ स्तंभित केलेले वीर्य - अदित्यां आघत्त - अदितीच्या ठिकाणी स्थापिता झाला. ॥२३॥
मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली. दिव्यदृष्टी कश्यपांनी समाधियोगाने जाणले की, भगवंतांचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे. वायू जसा लाकडे एकमेकांवर घासून त्यात अग्नी स्थापन करतो, त्याचप्रमाणे कश्यपांनी एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चर्येच्या द्वारा दीर्घ काळपर्यंत साठविलेले तेज अदितीमध्ये स्थापन केले. (२२-२३)
अदितेर्धिष्ठितं गर्भं भगवन्तं सनातनम् ।
हिरण्यगर्भो विज्ञाय समीडे गुह्यनामभिः ॥ २४ ॥
ब्रह्म्यासी कळले सर्व अदितीगर्भि विष्णु तो । म्हणोनी पातला तेथे गुह्यनामे स्तवीयले ॥ २४ ॥
हिरण्यगर्भः - ब्रह्मदेव - सनातनं - अनादि - भगवन्तं - ईश्वराला - अदितेः गर्भं धिष्ठितं - अदितीच्या गर्भात शिरलेला - विज्ञाय - जाणून - गुह्यनामभिः समीडे - गुप्त नावांनी स्तुति करिता झाला. ॥२४॥
जेव्हा ब्रह्मदेवांनी हे जाणले की, अदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत, तेव्हा ते भगवंतांच्या रहस्यमय नावांनी त्यांची स्तुती करू लागले. (२४)
श्रीब्रह्मोवाच -
जयोरुगाय भगवन् उरुक्रम नमोऽस्तु ते । नमो ब्रह्मण्यदेवाय त्रिगुणाय नमो नमः ॥ २५ ॥
ब्रह्मदेव म्हणाले - कीर्ति आश्रय तू देवा जय् जय्कार तुझा प्रभो । नमो ब्रह्मण्य देवाला त्रिगुणासी नमो नमो ॥ २५ ॥
उरुगाय भगवन् जय - अनेक लोकांनी गायिलेल्या हे ईश्वरा, तुझा जयजयकार असो - उरुक्रम ते नमः अस्तु - हे त्रिविक्रमा भगवंता, तुला नमस्कार असो - त्रिगुणाय - सत्त्वादि तीन गुणांनी युक्त - नमोनमः - अशा श्रीविष्णूला नमस्कार असो. ॥२५॥
ब्रह्मदेव म्हणाले - हे समस्त कीर्तीचे आश्रय असणार्या भगवंता, आपला विजय असो. अनंत शक्तींच्या अधिष्ठाना, आपल्या चरणांना नमस्कार असो. ब्रह्मण्यदेवा, त्रिगुणांच्या नियामका, आपल्या चरणांना माझा नमस्कार असो. (२५)
नमस्ते पृश्निगर्भाय वेदगर्भाय वेधसे ।
त्रिनाभाय त्रिपृष्ठाय शिपिविष्टाय विष्णवे ॥ २६ ॥
पृश्निच्या पोटि जन्मोनी वेदांना तूच रक्षिसी । प्रभो तू ईश सर्वांचा तुझ्या नाभीत लोक हे ॥ तिन्ही लोकांहुनी श्रेष्ठ वैकुंठधामि नांदसी ॥ २६ ॥
पृश्निगर्भाय - पृथ्वीच्या गर्भात राहिलेल्या, - वेदगर्भाय वेधसे - वेद ज्याच्या गर्भी आहेत अशा, - त्रिनाभाय - प्रकाशमान, ज्याच्या नाभिस्थानी तिन्ही लोक राहतात, - त्रिपृष्ठाय - अशा त्रैलोक्याच्या वर राहणार्या, - शिपिविष्टाय - पशुरूपी जीवांमध्ये अन्तर्यामिरूपाने राहिलेल्या - ते विष्णवे नमः - व्यापक अशा तुला नमस्कार असो. ॥२६॥
पृष्नीच्या पुत्ररूपाने उत्पन्न होणार्या, वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठविणार्या प्रभो, आपण्च सर्वांचे निर्माते आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत. तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे. जीवांच्या अंतःकरणात आपण नेहमी विराजमान असता. अशा सर्वव्यापक विष्णूंना मी नमस्कार करतो. (२६)
त्वमादिरन्तो भुवनस्य मध्यं
अनन्तशक्तिं पुरुषं यमाहुः । कालो भवानाक्षिपतीश विश्वं स्रोतो यथान्तः पतितं गभीरम् ॥ २७ ॥
(इंद्रवज्रा) तू आदि अंती अन मध्य विश्वी तेणेचि वेदो तव रूप गाती । प्रवाह नेई तृणपर्ण जैसे कालो तसा तू जग वाहवीसी ॥ २७ ॥
त्वं भुवनस्य आदिः (असि) - तू जगाचा आदि आहेस - मध्यं अन्तः च (असि) - मध्य व शेवटहि तूच आहेस - यम् अनन्तशक्तिं पुरुषम् आहुः - ज्याला अनन्तशक्तियुक्त पुरुष म्हणतात - ईश - हे ईश्वरा - यथा गंभीरं स्रोतः - जसा उदकाचा गंभीर प्रवाह - अन्तः पतितं (पदार्थं तथा) - आत पडलेल्या पदार्थांना ओढितो तसा - कालः भवान् विश्वं आक्षिपति - कालस्वरूपी तू जगाला आकर्षितोस. ॥२७॥
प्रभो, आपणच संसाराचे आदि अंत आणि मध्य आहात. म्हणूनच वेद अनंतशक्ती पुरुषाच्या रूपात आपले वर्णन करतात. जसा पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तू वाहून नेतो, त्याचप्रमाणे आपणसुद्धा कालरूपाने हे विश्व स्वतःबरोबर वाहून नेता. (२७)
त्वं वै प्रजानां स्थिरजंगमानां
प्रजापतीनामसि सम्भविष्णुः । दिवौकसां देव दिवश्च्युतानां परायणं नौरिव मज्जतोऽप्सु ॥ २८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे वामनप्रादुर्भावे सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
तू कारणी त्या जिवनी प्रजेच्या प्रजापतींच्या जननास तैसा । देवाधिदेवा जळि नाव तारी तैसाच तू आश्रय देवतांचा ॥ २८ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ सतरावा अध्याय हा ॥ ८ ॥ १७ ॥ हरिःॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
देव - हे ईश्वरा - त्वं - तू - स्थिरजङगमानां - स्थावर व जंगम लोकांचा - प्रजानां प्रजापतीनां (च) संभविष्णुः वै असि - व प्रजापतीचा उत्पादक असा खरोखर आहेस - अप्सु मज्जतः नौ इव - उदकात बुडणार्या नौकेप्रमाणे - दिवः च्युतानां - स्वर्गातून भ्रष्ट झालेल्या - दिवौकसां परायणं (असि) - देवांना श्रेष्ठ आश्रय देणारा आहेस. ॥२८॥
आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींनासुद्धा उत्पन्न करणारे आहात. देवाधिदेवा, जसा पाण्यात बुडणार्याला नावेचाच आश्रय असतो, त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवतांना केवळ आपलाच आधार आहे. (२८)
स्कंध आठवा - अध्याय सतरावा समाप्त |