|
श्रीमद् भागवत पुराण
भगवतो वामनस्य प्रादुर्भावः, मुनिभिर्देवैरुपनीतस्य भगवान वामनांचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
इत्थं विरिञ्चस्तुतकर्मवीर्यः प्रादुर्बभूवामृतभूरदित्याम् । चतुर्भुजः शंखगदाब्जचक्रः पिशंगवासा नलिनायतेक्षणः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (इंद्रवज्रा) ब्रह्म्ये स्तवीले हरिकीर्ति वीर्या ना जन्म ऐसा हरि त्याऽदितीच्या । तो चक्रधारी प्रगटे समोर पद्माक्ष पीतांबर शोभला तो ॥ १ ॥
इत्थं - याप्रमाणे - विरिञ् व्रस्तुतकर्मवीर्यः - ब्रह्मदेवाने स्तविले आहे कर्म व पराक्रम ज्याचा असा - अमृतभूः - जन्ममरणरहित - चतुर्भुजः - चार हातांचा - शंखगदाब्जचक्रः - शंख, गदा, कमळ व चक्र धारण करणारा - पिशङगवासाः - पिंगट वस्त्र नेसणारा - नलिनायतेक्षणः - कमळाप्रमाणे विशाल नेत्रांचा - हरिः अदित्यां प्रादुर्बभूव - श्रीविष्णु अदितीच्या ठिकाणी प्रगट झाला. - ॥१॥
श्रीशुक म्हणतात - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंतांच्या शक्ती आणि लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्ममृत्युरहित पीतांबरधारी भगवान अदितीच्या समोर प्रगट झाले. त्यांनी चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले होते. कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्ण नेत्र होते. (१)
श्यामावदातो झषराजकुण्डल
त्विषोल्लसच्छ्रीवदनाम्बुजः पुमान् । श्रीवत्सवक्षा बलयाङ्गदोल्लसत् किरीटकाञ्चीगुणचारुनूपुरः ॥ २ ॥
तो श्यामवर्णी, मुख शोभले ते ती कुंडलेही विभवीत गाला । श्रीवत्सचिन्हांकित कंकणे ती किरीट डोई नुपुरे पदास ॥ २ ॥
श्यामावदातः - निर्मळ श्यामवर्णाचा - झषराजकुण्डलत्विषा उल्लसच्छ्रीवदनांम्बुजः - मकराकार कुंडलांच्या कांतीने शोभत आहे सुंदर मुखकमळ ज्याचे असा - पुमान् श्रीवत्सवक्षाः - श्रीवत्सलांछन धारण करणारा पुरुषरूपी - वलयाङगदोल्लसत्किरीटकाञ्चीगुणचारुनूपुरः - कडी, पोंच्या, शोभायमान मुकुट, कंबरपटटा आणि पैंजण ह्यांनी शोभणारा -॥२॥
श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखीनच झळकत होती. वक्षःस्थळावर श्रीवत्सचिह्न, हातांमध्ये कडी, कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नूपुर झगमगत होते. (२)
मधुव्रातव्रतविघुष्टया स्वया
विराजितः श्रीवनमालया हरिः । प्रजापतेर्वेश्मतमः स्वरोचिषा विनाशयन् कण्ठनिविष्टकौस्तुभः ॥ ३ ॥
गळ्यात होता वनमाला ल्याला नी गुंजती भृंग तिथे सदाच । कंठात ल्याला मणि कौस्तुभो तो तेथील अंधार मिटोनि गेला ॥ ३ ॥
मधुव्रतव्रातविघुष्टया स्वया श्रवनमालया विराजितः - भ्रमरसमूह जेथे गुंजारव करितात अशा आपल्या शोभायमान वनमालेने शोभणारा - कंठनिविष्टकौस्तुभः - कौस्तुभमणि कंठामध्ये धारण केला आहे ज्याने असा - स्वरोचिषा प्रजापतेः वेश्यतमः विनाशयन् - आपल्या कांतीने कश्यपप्रजापतीच्या घरातील अंधकार नष्ट करणारा - ॥३॥
आपल्या मायेने भगवंत विराजमान झाले होते. तिच्या चारी बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कश्यच्या घरचा अंधकार नष्ट केला. (३)
दिशः प्रसेदुः सलिलाशयास्तदा
प्रजाः प्रहृष्टा ऋतवो गुणान्विताः । द्यौरन्तरीक्षं क्षितिरग्निजिह्वा गावो द्विजाः संजहृषुर्नगाश्च ॥ ४ ॥
दिशा तदा त्या उजळोनि गेल्या नद्या तळ्यांचे जळ स्वच्छ झाले । प्रजापतीच्या मनि हर्ष झाला गो विप्र सृष्टी सहि मोद झाला ॥ ४ ॥
तदा - त्यावेळी - दिशः सलिलाशयाः प्रसेदुः - दिशा व सरोवरे स्वच्छ झाली - प्रजाः प्रहृष्टाः (अभवन्) - लोक आनंदित झाले - ऋतवः गुणान्विताः (अभवन्) - सर्व ऋतू सकलगुणसंपन्न झाले - द्यौः अन्तरिक्षं क्षितिः अग्निजिह्वाः गावः द्विजाः च नगाः संजहृषुः - स्वर्ग, आकाश, पृथ्वी, देव, गाई, ब्राह्मण आणि पर्वत आनंदित झाले. ॥४॥
त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले. प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला. सर्व ऋतू एकाच वेळी आपापले गुण प्रगट करू लागले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गाई, ब्राह्मण आणि पर्वत या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला. (४)
(अनुष्टुप्)
श्रोणायां श्रवणद्वादश्यां मुहूर्तेऽभिजिति प्रभुः । सर्वे नक्षत्रताराद्याः चक्रुस्तत् जन्म दक्षिणम् ॥ ५ ॥
(अनुष्टुप्) द्वादशी भाद्रपद् शुद्ध नक्षत्र श्रवणो तसे । मुहूर्त अभिजित् वेळी जन्मले वामनो हरी ॥ ५ ॥
श्रोणायां श्रवणद्वादश्यां - भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्रयुक्त द्वादशीच्या दिवशी - अभिजिति मुहूर्ते - अभिजिति मुहुर्तावर - प्रभुः - ईश्वर - सर्वे नक्षत्रताराद्याः - संपूर्ण नक्षत्रे व चांदण्या आदि करून - तज्जन्म दक्षिणं चक्रुः - त्याचा जन्म अत्यंत शुभ करते झाले. ॥५॥
ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला, त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशी तिथी होती. अभिजित मुहूर्त होता. सर्व नक्षत्रे आणि तारे भगवंवांचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करीत होते. (५)
द्वादश्यां सवितातिष्ठन् मध्यन्दिनगतो नृप ।
विजयानाम सा प्रोक्ता यस्यां जन्म विदुर्हरेः ॥ ६ ॥
विजया द्वादशी ऐसी तेंव्हा पासूनि जाहली । माध्यान्ही सूर्य तो होता आकाशी स्थितची तदा ॥ ६ ॥
यस्यां द्वादश्यां - ज्या द्वादशीच्या दिवशी - हरेः जन्म - भगवंताचा जन्म - अहनि विदुः - दिवसा झाला असे लोक जाणतात - तदा सविता मध्यन्दिनगतः अतिष्ठत् - त्या वेळी सुर्य दिवसाच्या मध्यभागावर आला होता - सा विजया नाम प्रोक्ता - त्या द्वादशीला विजयादशमी असे म्हणतात. ॥६॥
परीक्षिता, ज्या स्थितीला भगवंतांचा जन्म झाला होता, तिला "विजयाद्वादशी" असे म्हणतात. त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता. (६)
शंखदुन्दुभयो नेदुः मृदंगपणवानकाः ।
चित्रवादित्रतूर्याणां निर्घोषस्तुमुलोऽभवत् ॥ ७ ॥
तदा मृदंग नी शंख डफ भेरीहि वाजल्या । विवीध वाजली वाद्ये तुतारिध्वनि जाहला ॥ ७ ॥
शङगदुन्दुभयः मृदङगपणवानकाः नेदुः - शंख, दुंदुभि, मृदंग, पणव आणि आनक ही वाद्ये वाजू लागली - चित्रवादित्रतूर्याणाः तुमुलः निर्धोषः अभवत् - चित्रविचित्र वाद्ये, नगारे यांचा मोठा शब्द सुरू झाला. ॥७॥
शंख, ढोल, मृदंग, डफ, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. या निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुतार्यांचा मोठा आवाज सर्वत्र दुमदुमला. (७)
प्रीताश्चाप्सरसोऽनृत्यन् गन्धर्वप्रवरा जगुः ।
तुष्टुवुर्मुनयो देवा मनवः पितरोऽग्नयः ॥ ८ ॥
नाचल्या अप्सरा हर्षे गंधर्वे गीत गायिले । देवता मुनि नी अग्नी स्तुति ते करु लागले ॥ ८ ॥
प्रीताः अप्सरसः नृत्यन्, गंधर्वप्रवराः जगुः - संतुष्ट झालेल्या अप्सरा नाचू लागल्या, श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले - देवाः मनवः पितरः अग्नयः - देव, मनु, पितर व अग्नि - मुनयः तुष्टुवुः - ऋषि स्तुती करू लागले - ॥८॥
अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले. मुनी, देवता, मनू, पितर आणि अग्नी स्तुती करू लागले. (८)
सिद्धविद्याधरगणाः सकिंपुरुषकिन्नराः ।
चारणा यक्षरक्षांसि सुपर्णा भुजगोत्तमाः ॥ ९ ॥
सिद्ध विद्याधरो तैसे किंपुरुष नि किन्नरो । चारणो राक्षसो यक्ष पक्षी नी नागदेवता ॥ ९ ॥
सकिंपुरुषकिन्नराः सिद्धविद्याधरगणाः - किंपुरुष व किन्नर ह्यांसह सिद्ध व विद्याधर यांचे समूह - चारणाः यक्षरक्षांसि सुपर्णाः भुजगोत्तमाः - चारण, यक्ष, राक्षस गरुड व मोठमोठे साप - विबुधानुगाः - देवांचे सेवक - ॥९॥
सिद्ध, विद्याधर, किंपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, पक्षी, प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी (९)
गायन्तोऽतिप्रशंसन्तो नृत्यन्तो विबुधानुगाः ।
अदित्या आश्रमपदं कुसुमैः समवाकिरन् ॥ १० ॥
नाचुनी गाउनी सारे प्रशंसा करु लागले । अदिती आश्रमा त्यांनी फुलांनी झाकिले तदा ॥ १० ॥
गायन्तः अतिप्रशंसन्तः नृत्यन्तः - नाचत, गात व स्तुति करीत - अदित्याः आश्रमपदं कुसुमैः समवाकिरन् - अदितीच्या आश्रमावर पुष्पांचा वर्षाव करू लागले. ॥१०॥
नाचू गाऊ लागले. तसेच खूप स्तुती करू लागले. त्याचबरोबर त्यांनी अदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला. (१०)
दृष्ट्वादितिस्तं निजगर्भसम्भवं
परं पुमांसं मुदमाप विस्मिता । गृहीतदेहं निजयोगमायया प्रजापतिश्चाह जयेति विस्मितः ॥ ११ ॥
(इंद्रवज्रा) आश्चर्य झाले अदितीस तेंव्हा पाही जधी पुत्र पुरूष विष्णू । नी कश्यपाही मनि हर्ष तैसा होताचि जय्जय् ध्वनि बोलले ते ॥ ११ ॥
अदितिः - अदिति - तं परं पुमांसं - त्या श्रेष्ठ परमेश्वराला - निजयोगमायया गृहीतदेहं - आपल्या योगमायेच्या योगे देह धारण केलेला - निजगर्भसंभवं - आपल्या उदरी उत्पन्न झालेला असे - दृष्ट्वा - पाहून - विस्मिता मुदम् आप - आश्चर्याने युक्त होऊन आनंदित झाली - च - आणि - प्रजापतिः विस्मितः - कश्यपप्रजापतीही आश्चर्यचकित झालेला असा - ‘जय’ इति आह - ‘तुझा विजय असो’ असे म्हणाला. ॥११॥
जेव्हा अदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले, तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदित झाली. प्रजापती कश्यपांनीसुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून, आश्चर्यचकित होऊन त्यांचा जयजयकार केला. (११)
यत् तद् वपुर्भाति विभूषणायुधैः
अव्यक्तचिद्व्यक्तमधारयद् हरिः । बभूव तेनैव स वामनो वटुः संपश्यतोर्दिव्यगतिर्यथा नटः ॥ १२ ॥
अव्यक्त चिद्रूप असोनि देवो आभूषणांच्या सह जन्मला नी । त्या पाहता पाहता त्याच वेळी झाला हरी वामन ब्रह्मचारी ॥ १२ ॥
तत् - तेव्हा - अव्यक्तचित् हरिः - ज्याचे चैतन्यस्वरूप न दिसणारे आहे असा श्रीविष्णु - भातिविभूषणायुधैः व्यक्तं - तेज, अलंकार, व आयुधे ह्यांनी व्यक्त होणारे - यत् वपुः अधारयत् - जे शरीर धरिता झाला - तेन एव - त्याच्या योगेच - यथा नटः - जसा नाटकी पुरुष - संपश्यतोः (तयोः) - आईबापांच्या समक्ष - वामनः बटुः बभूव - ठेंगु ब्रह्मचारी असा बनला. ॥१२॥
भगवान स्वतः अव्यक्त आणि चित्स्वरूप आहेत. त्यांनी जे अलंकारांनी आणि आयुधांनी युक्त शरीर ग्रहण केले होते, त्या शरीराने, कश्यप आणि अदितींच्या समोरच जसा नट आपला वेष बदलतो, त्याप्रमाणे, बटुवेषधारी ब्रह्मचार्याचे रूप धारण केले. भगवंतांची लीला अगाध आहे. (१२)
(अनुष्टुप्)
तं वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः । कर्माणि कारयामासुः पुरस्कृत्य प्रजापतिम् ॥ १३ ॥
(अनुष्टुप्) मुनीही हर्षले सर्व पाहता वामनो बटु । पित्याच्या पुढती त्यांनी केले जातक कर्मही ॥ १३ ॥
तं बटुं वामनं दृष्ट्वा - त्या ब्रह्मचारी वामनमूर्तीला पाहून - मोदमानाः महर्षयः प्रजापतिं पुरस्कृत्य - आनंदित झालेले मोठमोठे ऋषि प्रजापतीला पुढे करून - कर्माणि कारयामासुः - जातकर्मादि संस्कार करविते झाले. ॥१३॥
त्या वामन ब्रह्मचार्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला. त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादि संस्कार करविले. (१३)
तस्योपनीयमानस्य सावित्रीं सविताब्रवीत् ।
बृहस्पतिर्ब्रह्मसूत्रं मेखलां कश्यपोऽददात् ॥ १४ ॥
तयाच्या व्रतबंधात स्वयें श्रीसविता यये । बोधिला मंत्र गायत्री बृहस्पत्येचि जानवे ॥ १४ ॥
तस्य उपनीयमानस्य - त्याचा मौंजीबन्धन संस्कार चालू असता - सविता सावित्रीम् अब्रवीत् - सूर्य गायत्रीमंत्राचा उपदेश करिता झाला - बृहस्पतिः ब्रह्मसूत्रं अददात् - बृहस्पति यज्ञोपवित देता झाला - कश्यपः मेखलाम् (अददात्) - कश्यप मेखला देता झाला. ॥१४॥
जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार होऊ लागला, तेव्हा स्वतः सूर्याने त्यांना गायत्रीचा उपदेश केला,. देवगुरू बृहस्पतींनी यज्ञोपवीत आणि कश्यपांनी मेखला दिली. (१४)
ददौ कृष्णाजिनं भूमिः दण्डं सोमो वनस्पतिः ।
कौपीनाच्छादनं माता द्यौश्छत्रं जगतः पतेः ॥ १५ ॥
पृथिव्ये मृगचर्मोनी चंद्राने दंड तो दिला । मातेने कौपिनो वस्त्र आकाशे छत्र ते दिले ॥ १५ ॥
भूमिः जगतः पतेः कृष्णाजिनं (ददौ) - पृथ्वी जगन्नाथ अशा वामनाला काळविटाचे कातडे देती झाली - वनस्पतिः सोमः दण्डं (ददौ) - औषधीचा राजा सोम दंड देता झाला - माता कौपीनाच्छादनं (ददौ) - आदिती लंगोटी देती झाली - द्यौः छत्रं (ददौ) - स्वर्गदेवतेने छत्री दिली. ॥१५॥
पृथ्वीने कृष्णाजिन, वनाचा स्वामी चंद्राने दंड, माता अदितीने कौपीन व कटिवस्त्र आणि आकाशाने छत्र दिले. (१५)
कमण्डलुं वेदगर्भः कुशान् सप्तर्षयो ददुः ।
अक्षमालां महाराज सरस्वति अव्ययात्मनः ॥ १६ ॥
कमंडलू वेदगर्भे कुश सप्तर्षिनी दिले । अक्षमाला महाराजा ! सरस्वति हिने दिली ॥ १६ ॥
महाराज - हे परीक्षित राजा - देवगर्भः - ब्रह्मदेव - अव्ययात्मनः कमण्डलुं (ददौ) - अविनाशी अशा त्या वामनाला कमंडलु देता झाला - सप्तर्षयः कुशान् ददुः - सप्तर्षि दर्भ देते झाले - सरस्वती अक्षमालां (ददौ) - सरस्वती रुद्राक्षांची माळ देती झाली. ॥१६॥
महाराज, अविनाशी प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू, सप्तर्षींनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्षमाळ अर्पण केली. (१६)
तस्मा इत्युपनीताय यक्षराट् पात्रिकामदात् ।
भिक्षां भगवती साक्षात् उमा अदात् अम्बिका सती ॥ १७ ॥
भिक्षापात्र कुबेराने भिक्षावळ उमे स्वयें । यापरी वामनो यांचा जाहला व्रतबंध तो ॥ १७ ॥
इति उपनीताय तस्मै - ह्याप्रमाणे मौञ्जीबंधन संस्कार केलेल्या त्याला - यक्षराट् पात्रिकां अदात् - कुबेर भिक्षापात्र देता झाला - साक्षात् भगवती अंबिका उमा सती भिक्षाम् अदात् - प्रत्यक्ष सर्वैश्वर्यसंपन्न अंबिका साध्वी पार्वती भिक्षा घालिती झाली. ॥१७॥
अशा रीतीने जेव्हा वामनांचा उपनयन संस्कार झाला, तेव्हा यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षेचे पात्र दिले आणि सती, जगज्जननी, साक्षात भगवती पार्वतीदेवींनी भिक्षा घातली. (१७)
स ब्रह्मवर्चसेनैवं सभां संभावितो वटुः ।
ब्रह्मर्षिगणसञ्जुष्टां अत्यरोचत मारिषः ॥ १८ ॥
लोकांनी बटुचा ऐसा केला सन्मान तेधवा । ब्रह्मतेजा मुळे देव अत्यंत शोभले तदा ॥ १८ ॥
एवं संभावितः सः मारिषः बटुः - याप्रमाणे सत्कारिलेला तो श्रेष्ठ ब्रह्मचारी वामन - ब्रह्मवर्चसेन ब्रह्मर्षिगणसंजुष्टां सभां अत्यरोचत - ब्रह्मतेजाच्या योगे ब्रह्मर्षिसंघांनी सेविलेल्या त्या सभेमध्ये अधिक शोभला. ॥१८॥
अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटुवेशधारी भगवंतांचा सन्मान केला, तेव्हा ते ब्रह्मर्षींनी भरलेल्या सभेत आपल्या ब्रह्मतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागले. (१८)
समिद्धं आहितं वह्निं कृत्वा परिसमूहनम् ।
परिस्तीर्य समभ्यर्च्य समिद्भिः अजुहोद् द्विजः ॥ १९ ॥
कुशाने अग्निसी त्यांनी केले परिसमूहन । पूजिले परिस्तरणे समिधा अर्पिल्या तशा ॥ १९ ॥
द्विजः - ब्रह्मचारी वामन - आहितं समिद्धं वह्निं परिसमूहनं कृत्वा - स्थापिलेल्या व प्रज्वलित केलेल्या अग्नीला परिसमूहन करून - परिस्तीर्य समभ्यर्च्य - परिस्तरणे घालून व पूजून - समिद्भिः अजुहोत् - समिधांचा होम करिता झाला. ॥१९॥
यानंतर भगवंतांनी, स्थापना करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशांनी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली व समिधांनी हवन केले. (१९)
श्रुत्वाश्वमेधैर्यजमानमूर्जितं
बलिं भृगूणां उपकल्पितैस्ततः । जगाम तत्राखिलसारसम्भृतो भारेण गां सन्नमयन्पदे पदे ॥ २० ॥
(इंद्रवज्रा) ऐश्वर्य संपन्न असा बळी तो करीत आहे शत अश्वमेध । ऐकोनि यात्रेस बटू निघाला पदा पदाला झुकली धरा ही ॥ २० ॥
भृगूणाम् उपकल्पितैः अश्वमेधैः यजमानं बलिं ऊर्जितं श्रुत्वा - भृगू ऋषींनी चालविलेल्या अश्वमेध यज्ञांनी ईश्वरपूजन करणारा बलिराजा सामर्थ्यवान झालेला ऐकून - अखिल सारसंभृतः - सकल शक्तीने पूर्ण भरलेला - भारेण पदेपदे गां सन्नमयन् - आपल्या भाराने पावलोपावली पृथ्वीला नमवीत - तत्र जगाम - तेथे गेला. ॥२०॥
त्याचवेळी कीर्तिमान बली भृगूंच्या आदेशानुसार पुष्कळसे अश्वमेध यज्ञ करीत आहे, असे ऐकून सर्व शक्तींनी युक्त भगवान चालताना आपल्या भाराने पावला पावलाला पृथ्वीला नमवीत बलीच्या यज्ञमंडपाकडे गेले. (२०)
तं नर्मदायास्तट उत्तरे बलेः
य ऋत्विजस्ते भृगुकच्छसंज्ञके । प्रवर्तयन्तो भृगवः क्रतूत्तमं व्यचक्षतारादुदितं यथा रविम् ॥ २१ ॥
त्या नर्मदेशी भृगुकच्छस्थानी आरंभिला जो भृगुवंशियांनी । त्यांनी पहाता बटु वामनाला भासे जसा सूर्यचि तो उदेला ॥ २१ ॥
नर्मदाया उत्तरे तटे - नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर - भृगूकच्छसंज्ञके (क्षेत्रे) - भृगुकच्छनामक क्षेत्रांत - क्रतूत्तमं प्रवर्तयन्तः - उत्तम यज्ञाला चालविणारे - ये बलेः ऋत्विजः भृगवः - जे बलीचे ऋत्विज भृगु - ते तं - ते त्या वामनाला - यथा आरात् उदितं रविं (तथा) व्यचक्षत - जवळच उगवलेल्या सूर्याप्रमाणे पाहते झाले. ॥२१॥
नर्मदा नदीच्या उत्तर तटावर ’भृगुकच्छ’ नावचे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तेथेच भृगुवंशी ऋत्विज बलीच्या श्रेष्ठ यज्ञाचे अनुष्ठान करीत होते. त्या लोकांनी लांबूनच भगवंतांना पाहिले, तेव्हा त्यांना जणू साक्षात सूर्यच उगवला, असे वाटले. (२१)
ते ऋत्विजो यजमानः सदस्या
हतत्विषो वामनतेजसा नृप । सूर्यः किलायात्युत वा विभावसुः सनत्कुमारोऽथ दिदृक्षया क्रतोः ॥ २२ ॥
सदस्य विप्रो यजमान सर्व निस्तेज झाले बटु पाहता हा । हा यज्ञ पाह्या जणु सूर्य आला कां पातला हाचि सनत्कुमार ॥ २२ ॥
नृप - हे राजा - यजमानः सऋत्विजः सदस्याः (च) - यजमान बलि, ऋषि व ऋत्विजांसह सभासद - वामनतेजसा हतत्विषः - वामनाच्या कांतीने निस्तेज झालेले - क्रतोः दिदृक्षया - यज्ञ पाहण्याच्या इच्छेने - सूर्यः किल आयाति - खरोखर सूर्य येत आहे - उत वा विभावसुः (आयाति) - अथवा अग्नी येत आहे - अथवा सनत्कुमारः (आयाति) - किंवा सनत्कुमार येत आहे - इति अतर्कयन् - असा तर्क करू लागले. ॥२२॥
परीक्षिता, वामनांच्या तेजाने ऋत्विज, यजमान आणि सभासद असे सगळेच निस्तेज झाले. ते विचार करू लागले की, यज्ञ पाहण्यासाठी सूर्य, अग्नी किंवा सनत्कुमार तर येत नाहीत ना ? (२२)
इत्थं सशिष्येषु भृगुष्वनेकधा
वितर्क्यमाणो भगवान् स वामनः । छत्रं सदण्डं सजलं कमण्डलुं विवेश बिभ्रद् हयमेधवाटम् ॥ २३ ॥
शुक्रे नि शिष्ये मनि कल्पना या करोनि ते आपसि बोलले नी । कमंडलू दंड नि छत्रधारी त्या वामने तेथ प्रवेश केला ॥ २३ ॥
सशिष्येषु भृगुषु - शिष्यांसह भृगुंमध्ये - इत्थं अनेकधा वितर्क्यमाणः - ह्याप्रमाणे पुष्कळ प्रकाराने तर्क केला जाणारा - छत्रं सदण्डं सजलं कमण्डलुं बिभ्रत् - छत्री व दण्ड ह्यांसह पाण्याने भरलेला कमंडलू धारण करणारा - सः भगवान् वामनः - तो षड्गुणैश्वर्यसंपन्न वामन - हयमेधवाटं विवेश - अश्वमेध यज्ञाच्या मंडपात शिरला. ॥२३॥
शिष्यांसह भृगू याप्रकारे अनेक कल्पना करीत होते, त्याचवेळी हातामध्ये छत्र, दंड आणि पाण्याने भरलेला कमंडलू घेतलेल्या भगवान वामनांनी अश्वमेध यज्ञाच्या मंडपात प्रवेश केला. (२३)
(अनुष्टुप्)
मौञ्ज्या मेखलया वीतं उपवीताजिनोत्तरम् । जटिलं वामनं विप्रं मायामाणवकं हरिम् ॥ २४ ॥ प्रविष्टं वीक्ष्य भृगवः सशिष्यास्ते सहाग्निभिः । प्रत्यगृह्णन् समुत्थाय संक्षिप्तास्तस्य तेजसा ॥ २५ ॥
(अनुष्टुप्) कटीसी मेळखा मुंजी यज्ञोपवित ते गळा । बगली मृगचर्मोनी शिखा तैशी शिरावरी ॥ २४ ॥ येता तो मंडपामाजी शिष्य-अग्नी सहीत ते । जाहले निष्प्रभो आणि केले स्वागत वामना ॥ २५ ॥
मौञ्ञ्या मेखलया वीतं - मुञ्ज गवताच्या कडदोर्याने वेष्टिलेल्या - उपवीताजिनोत्तरं - यज्ञोपवीताप्रमाणे धारण केलेले आहे उपवस्त्र ज्याने अशा - जटिलं - जटा धारण करणार्या - मायामाणवकं वामनं विप्रं हरिं - मायेने शिष्याचे सोंग घेतलेल्या ब्राह्मण बटुरूपी श्रीविष्णूला. ॥२४॥ प्रविष्टं वीक्ष्य - यज्ञमंडपात शिरलेला पाहून - तस्य तेजसा संक्षिप्ताः - त्याच्या तेजाने निस्तेज झालेले - सशिष्याः ते भृगवः - शिष्यांसह ते भृगुऋषि - अग्निभिः सह - अग्नीसह - समुत्थाय प्रत्यगुह्यन् - उठून पूजिते झाले. ॥२५॥
त्यांच्या कमरेला मुंजाची मेखला, गळ्यात जानवे, मृगाजिन आणि मस्तकार जटा होत्या. अशाप्रमारे आपल्या मायेने बुटक्या ब्राह्मण ब्रह्मचार्याच्या वेषात भगवंत आलेले पाहताच भृगू आपल्या शिष्यांसह, त्यांच्या तेजाने निष्प्रभ झाले. ते सर्वजण अग्नींसह उठून उभे राहिले आणि त्यांनी वामनांचे स्वागत केले. (२४-२५)
यजमानः प्रमुदितो दर्शनीयं मनोरमम् ।
रूपानुरूपावयवं तस्मा आसनमाहरत् ॥ २६ ॥
गुट गुटीत ते अंग पाहता सर्व हर्षले । बळीही हर्षला तेंव्हा उच्चासन दिले तये ॥ २६ ॥
दर्शनीयं मनोरमं रूपानुरूपावयवं (तं दृष्ट्वा) - पाहण्याजोग्या मनोहर व स्वरूपाला साजेसे अवयव असणार्या त्या वामनाला पाहून - प्रमुदितः यजमानः - आनंदित झालेला यजमान बलि - तस्मै आसनम् आहरत् - त्याला आसन देता झाला. ॥२६॥
भगवंतांच्या लहानशा रूपाला अनुरूप असेच त्यांचे सर्व अवयव लहान लहान, अतिशय मनोहर आणि दर्शनीय होते. त्यांना पाहून बलीला अतिशय आनंद झाला आणि त्याने त्यांना आसन दिले. (२६)
स्वागतेनाभिनन्द्याथ पादौ भगवतो बलिः ।
अवनिज्यार्चयामास मुक्तसंगमनोरमम् ॥ २७ ॥
स्वागते अभिनंदोनी सपाद्य पूजिला हरी । विरक्त योगियालाही पडावा मोह तै असा ॥ २७ ॥
अथ - नंतर - बलिः - बलिराजा - स्वागतेन अभिनन्द्य - स्वागतपूर्वक अभिनंदन करून - भगवतः पादौ अवनिज्य - षड्गुणैश्वर्यसंपन्न वामनाचे पाय धुऊन - मुक्तसङगमनोरमं - सर्वसंगपरित्याग केलेल्या योग्यांच्या मनाला रमविणार्या - (तं) अर्चयामास - त्या वामनाची पूजा करिता झाला. ॥२७॥
नंतर वाणीने त्यांचे स्वागत करून पादप्रक्षालन केले आणि अनासक्त महापुरुषांनासुद्धा अत्यंत मनोहर वाटणार्या त्यांची पूजा केली. (२७)
तत्पादशौचं जनकल्मषापहं
स धर्मविन्मूर्ध्न्यदधात्सुमंगलम् । यद् देवदेवो गिरिशश्चन्द्रमौलिः दधार मूर्ध्ना परया च भक्त्या ॥ २८ ॥
(इंद्रवज्रा) धुता तयाचे पद पापनाशे स्वचंद्र मौळी धरि तीर्थ डोई । ते पाय आले बळिच्या इथे की धारीयले त्या बळिने शिरासी ॥ २८ ॥
धर्मवित् सः - धर्म जाणणारा तो बलिराजा - जनकल्मषापहं सुमङगलं तत्पादशौचं - लोकांच्या पापांचे क्षालन करणार्या व अत्यंत मंगलप्रद अशा त्याच्या चरणतीर्थाला - मूर्ध्नि अदधात् - मस्तकावर धारण करिता झाला - यत् - जे - चन्द्रमौलिः देवदेवः गिरिशः च - मस्तकावर चंद्र धारण करणारा देवाधिदेव शंकरसुद्धा - परया भक्त्या मूर्ध्ना दधार - मोठया भक्तीने मस्तकावर धरिता झाला. ॥२८॥
देवाधिदेव चंद्रमौळी भगवान शंकरांनी जे चरणामृत आपल्या मस्तकावर धारण केले होते, तेच अत्यंत मंगल, लोकांचे पाप-ताप नाहीसे करणारे चरणामृत आज धर्मशील राजाने आपल्या मस्तकावर अत्यंत भक्तिभावाने धारण केले. (२८)
बलिरुवाच -
(अनुष्टुप्) स्वागतं ते नमस्तुभ्यं ब्रह्मन् किं करवाम ते । ब्रह्मर्षीणां तपः साक्षात् मन्ये त्वाऽऽर्य वपुर्धरम् ॥ २९ ॥
राजा बळी म्हणाला - (अनुष्टुप्) सुस्वागतम् द्विजपुत्रा आज्ञापा काय इच्छिता । वाटते ऋषिचे सर्व तपमूर्ति तुम्ही असा ॥ २९ ॥
ब्रह्मन् - हे ब्राह्मणबटो - ते स्वागतं (अस्तु) - तुझे स्वागत असो - तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो - ते किं करवाम - आम्ही तुझे काय काम करावे - आर्य - हे श्रेष्ठ वामना - त्वा - तुला - ब्रह्मर्षीणां साक्षात् वपुर्धरं तपः मन्ये - ब्रह्मर्षीचे प्रत्यक्ष मूर्तिमंत तप मानितो. ॥२९॥
बली म्हणाला - हे ब्राह्मणकुमार, आपले स्वागत असो. आपणांस मी नमस्कार करतो. मी आपली काय सेवा करू ? आर्य, असे वाटते की, आज ब्रह्मर्षींची तपश्चर्याच साकार होऊन माझ्यासमोर आली आहे. (२९)
अद्य नः पितरस्तृप्ता अद्य नः पावितं कुलम् ।
अद्य स्विष्टः क्रतुरयं यद्भवान् आगतो गृहान् ॥ ३० ॥
पितरे तृप्त ते झाले वंश पावन जाहला । तुमच्या येथ येण्याने सफल यज्ञ जाहला ॥ ३० ॥
यत् भवान् गृहान् आगतः - ज्याअर्थी आपण आमच्या घरी आला - अद्य नः पितरः तृप्ताः - आज आमचे पितर तृप्त झाले - अद्य नः कुलं पावितं - आज आमचे कुळ पवित्र झाले - अद्य अयं क्रतुः स्विष्टः - आज हा यज्ञ यथासांग सिद्धीस गेला. ॥३०॥
आज आपण माझ्या घरी आलात, त्यामुळे माझे पितर तृप्त झाले, माझा वंश पवित्र झाला आणि हा यज्ञ सफल झाला. (३०)
अद्याग्नयो मे सुहुता यथाविधि
द्विजात्मज त्वच्चरणावनेजनैः । हतांहसो वार्भिरियं च भूरहो तथा पुनीता तनुभिः पदैस्तव ॥ ३१ ॥
(इंद्रवज्रा) द्विजात्मजा पाय येताचि येथे धुवोनि गेले मम पाप सारे । आम्हास यज्ञोफळ लाभले नी पवित्र झाली भुमि या पदांनी ॥ ३१ ॥
अहो द्विजात्मज - हे ब्राह्मणपुत्रा - अद्य - आज - त्वच्चरणावनेजनैः वार्भिः - तुझे पाय धुण्याच्या पाण्याने - हतांहसः मे अग्नयः - निष्पाप झालेल्या माझे अग्नी - यथाविधि सुहुताः - यथाशास्त्र पूजिले गेले - तथा च - त्याप्रमाणेच - इयं भूः तव तनुभिः पदैः पुनीता - ही पृथ्वी तुझ्या कोमल पायांनी पवित्र झाली. ॥३१॥
हे ब्राह्मणकुमार, आपले पाय धुतलेल्या पाण्याने माझी सर्व पापे धुतली गेली. विधिपूर्वक यज्ञात दिलेल्या आहुतींनी अग्नी तृप्त झाले आणि आपल्या या लहान लहान चरणांच्या स्पर्शाने पृथ्वीही पवित्र झाली. (३१)
यद् यद् वटो वाञ्छसि तत्प्रतीच्छ मे
त्वामर्थिनं विप्रसुतानुतर्कये । गां काञ्चनं गुणवद् धाम मृष्टं तथान्नपेयमुत वा विप्र कन्याम् । ग्रामान् समृद्धान् तुरगान् गजान् वा रथान् तथार्हत्तम सम्प्रतीच्छ ॥ ३२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे बलिवामनसंवादे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
इच्छोनि कांहि जणु पातला तू वाटे अम्हाला तरि मागणे की । सोने गायि नि राजवाडे कन्या द्विजाची वरण्या हवी का ? संपत्ति गावे रथ अश्व हत्ती हवे तसे ते मज माग सर्व ॥ ३२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ अठरावा अध्याय हा ॥ ८ ॥ १८ ॥ हरिःॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
बटो - हे वामना - यत् यत् वाञ्छसि तत् मे प्रतीच्छ - जे जे तुला पाहिजे असेल ते ते माझ्याकडून मागून घे - विप्रसुत - हे ब्राह्मणपुत्रा - त्वाम् अर्थिनम् अनुतर्कये - तू याचक म्हणून आला आहेस असे मला वाटते - अर्हत्तम विप्र - हे पूज्य ब्राह्मणा - गां काञ्चनं गुणवत् धाम तथा मृष्टं अन्नपेयं - गाय, सुवर्ण, सर्व पदार्थांनी भरलेले घर, तसेच मधुर अन्न व पेय - उत कन्यां - किंवा कन्या - वा - किंवा - समृद्धान् ग्रामान् - सर्वैश्वर्यांनी पूर्ण असे गाव - तुरगान् गजान् - घोडे अथवा हत्ती - तथा वा रथान् - त्याप्रमाणे रथ - संप्रतीच्छ - मागून घे. ॥३२॥
हे सर्वपूज्य ब्राह्मणकुमार, असे वाटते की, आपण काही मागण्यासाठी आला आहात. आपल्याला गाय, सोने, सर्व सामग्रीने भरलेले घर, पवित्र अन्न, पाणी किंवा ब्राह्मणकन्या, संपत्तींनी भरलेले गाव, घोडे, हत्ती, रथ, असे जे काही पाहिजे असेल ते सर्व माझ्याकडून मागून घ्या. (३२)
स्कंध आठवा - अध्याय अठरावा समाप्त |