श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
षोडशोऽध्यायः

कश्यपस्य देवमात्रेऽदित्यै पयोव्रतोपदेशः -

कश्यपांकडून अदितीला पयोव्रताचा उपदेश -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
एवं पुत्रेषु नष्टेषु देवमातादितिस्तदा ।
हृते त्रिविष्टपे दैत्यैः पर्यतप्यद् अनाथवत् ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता ! असे दैत्ये स्वर्ग तो घेतला बळे ।
देवमाता अदीती ती पोरकी दुःखि जाहली ॥ १ ॥

एवं पुत्रेषु नष्टेषु - याप्रमाणे पुत्र नाहीसे झाले असता - दैत्यैः त्रिविष्टपे हृते - दैत्यांनी स्वर्गाचे राज्य हरण केले असता - तदा - त्यावेळी - देवमाता अदितिः - देवांची माता अदिती - अनाथवत् पर्यतप्यत् - दीनाप्रमाणे खिन्न झाली. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - जेव्हा देव लपून बसले आणि दैत्यांनी स्वर्ग हिरावून घेतला, त्यावेळी देवमाता अदिती अनाथ असल्याप्रमाणे शोक करू लागली. (१)


एकदा कश्यपस्तस्या आश्रमं भगवान् अगात् ।
निरुत्सवं निरानन्दं समाधेर्विरतश्चिरात् ॥ २ ॥
एकदा कैक वर्षांनी कश्यपो तप संपता ।
अदितीआश्रमा जाता न शांति सुख ही तिथे ॥ २ ॥

एकदा - एके दिवशी - चिरात् समाधेः विरतः - दीर्घ काळाच्या समाधीपासून थांबलेला - भगवान् कश्यपः - भगवान कश्यप - निरुत्सवं निरानन्दं तस्याः आश्रमम् अगात् - उत्सव व आनंद यांनी रहित अशा त्या अदितीच्या आश्रमाला आला. ॥२॥
पुष्कळ दिवसांनंतर एकदा जेव्हा भगवान कश्यप मुनींनी समाधी सोडली, तेव्हा ते अदितीच्या आश्रमात गेले. त्यांना असे दिसले की, तेथे कोणत्याही प्रकारचा उत्साह नाही की आनंद नाही. (२)


स पत्‍नीं दीनवदनां कृतासनपरिग्रहः ।
सभाजितो यथान्यायं इदमाह कुरूद्वह ॥ ३ ॥
आसनी बसता विप्र पूजी ती अदिती तयां ।
कश्यपो पाहिली पत्‍नी म्लानता चेहर्‍यावरी ॥ ३ ॥

कुरुद्वह - हे कुरुश्रेष्ठा - कृतासनपरिग्रहः - केला आहे आसनाचा स्वीकार ज्याने असा - यथान्यायं सभाजितः - योग्य रीतीने पूजिलेला - सः - तो कश्यप - दीनवदनां पत्नीम् इदं आह - दीनमुख पत्नीला हे म्हणाला. ॥३॥
परीक्षिता, जेव्हा ते तेथे जाऊन आसनावर बसले, तेव्हा अदितीने विधिपूर्वक त्यांचा सत्कार केला. त्यावेळी तिच्या चेहर्‍यावरील उदासीनता पाहून पत्‍नीला ते म्हणाले. (३)


अप्यभद्रं न विप्राणां भद्रे लोकेऽधुनाऽऽगतम् ।
न धर्मस्य न लोकस्य मृत्योश्छन्दानुवर्तिनः ॥ ४ ॥
कल्याणी ! सुखि ना ? विप्र धर्म तो सुखरूप ना ?
काळाच्या मुख्यिच्या लोका न ना कांही अमंगल ॥ ४ ॥

भद्रे - हे कल्याणि - अधुना लोके - सांप्रत ह्या लोकी - विप्राणां अभद्रं न अपि आगतम् - ब्राह्मणांवर काही संकट तर आले नाही ना ? - धर्मस्य (अभद्रं) न (अपि) - धर्मावर संकट आले नाही ना ? - मृत्योः छंदानुवर्तिनः लोकस्य - मृत्यूच्या इच्छेनुरूप वागणार्‍या लोकांवर - (अभद्रं) न अपि - काही संकट आलेले नाही ना ? ॥४॥
कल्याणी, या वेळी जगात ब्राह्मणांवर काही संकट तर आलेले नाही ना ? धर्म बुडाला नाही ना ? स्वच्छंद वागणार्‍या मृत्यूचे लोकांना भय नाही ना ? (४)


अपि वाकुशलं किञ्चिद्‍गृहेषु गृहमेधिनि ।
धर्मस्यार्थस्य कामस्य यत्र योगो ह्ययोगिनाम् ॥ ५ ॥
गृहस्थाश्रम हा थोर योगाचे फळ लाभते ।
पुरुषार्थात त्यांच्या त्या न ना विघ्न मुळी जिवां ॥ ५ ॥

गृहमेधिनि - हे गृहस्थाश्रमी स्त्रिये - यत्र हि अयोगिनां योगः (भवति) - ज्यात योगसाधन न करणार्‍यांनाही योगफल प्राप्त होते - तेषु गृहेषु - त्या घरांमध्ये - धर्मस्य अर्थस्य कामस्य - धर्म, अर्थ, व काम यांच्यावर - किञ्चित् अकुशलम् (आगतम्) अपि वा - काही संकट आले की काय ? ॥५॥
प्रिये, जे लोक योगसाधना करू शकत नाहीत, त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ देणारा आहे. त्या गृहस्थाश्रींच्या धर्म, अर्थ आणि काम यांच्या सेवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न तर नाही ना ? (५)


अपि वा अतिथयोऽभ्येत्य कुटुंबासक्तया त्वया ।
गृहादपूजिता याताः प्रत्युत्थानेन वा क्वचित् ॥ ६ ॥
व्यग्र कां तू कुटुंबात विन्मूख अतिथीस त्या ।
सत्कार नच का शक्य म्हणोनी दीन तू अशी ॥ ६ ॥

क्वचित् वा - अथवा एखादे वेळी - अतिथयः अभ्येत्य - अतिथी येऊन - कुटुम्बासक्तया त्वया - गृहकार्यात गुंतलेल्या अशा तुझ्याकडून - प्रत्युत्थानेन अपूजिताः - सत्कारादिकाने न पूजिलेले असे - गृहात् याताः अपि वा - घरातून निघून गेले की काय ? ॥६॥
किंवा तू कुटुंवाच्या भरणपोषणात व्यग्र असताना अतिथी आले असतील आणि तू त्यांचा सन्मान न करताच ते परत गेले असतील. उभे राहूनही त्यांचा तू सत्कार केला नसशील, म्हणून तर तू उदास नाहीस ना ? (६)


गृहेषु येष्वतिथयो नार्चिताः सलिलैरपि ।
यदि निर्यान्ति ते नूनं फेरुराजगृहोपमाः ॥ ७ ॥
ज्या घरी आतिथी येता सत्कार नच त्या जले ।
गृध्राचे घरटे जाणा पाणी द्यावे अवश्यची ॥ ७ ॥

येषु गृहेषु - ज्या घरात - अतिथयः सलिलैः अपि - अतिथि उदकांनी - न अर्चिताः यदि निर्यान्ति - न पूजिलेले असे जर निघून जातील - (तर्हि) ते नूनं - तर ती घरे खरोखर - फेरुराजगृहोपमाः (स्युः) - मोठया कोल्ह्यांच्या विवरांसारखी होत. ॥७॥
आलेल्या अथिथीचा ज्या घरात साधे पाणी देऊनसुद्धा सत्कार केला जात नाही आणि ते तसेच परत जातात, ती घरे निश्चितच कोल्ह्यांच्या गुहांप्रमाणे आहेत. (७)


अप्यग्नयस्तु वेलायां न हुता हविषा सति ।
त्वयोद्विग्नधिया भद्रे प्रोषिते मयि कर्हिचित् ॥ ८ ॥
प्रिये ! शक्य असेही ही की मी जाता कष्टि जाहली ।
वेळेला हवने ना का जाहली तुज हातुनी ॥ ८ ॥

सति भद्रे - हे कल्याणि साध्वी - मयि प्रोषिते - मी प्रवासाला गेलो असता - उद्विग्नधिया त्वया - उदासीन आहे चित्त जिचे अशा तुझ्याकडून - वेलायां कर्हिचित् - होमाची वेळ झाली असता एखाद्या प्रसंगी - अग्नयः - अग्नी - हविषा न हुताः तु - हविर्भागाने पूजावयाचे राहिले नाहीत ना ? ॥८॥
प्रिये, माझ्या परगावी जाण्याने कधी तुझे चित्त उद्विग्न झाले असेल, म्हणून तू वेळेवर हविष्याने अग्नीमध्ये हवन केले नाहीस का ? (८)


यत्पूजया कामदुघान् याति लोकान् गृहान्वितः ।
ब्राह्मणोऽग्निश्च वै विष्णोः सर्वदेवात्मनो मुखम् ॥ ९ ॥
द्विजाग्नी हरिचे तोंड गृहस्थपुरुषो पहा ।
करिती तृप्त दोघांना कामना सिद्ध पावती ॥ ९ ॥

गृहान्वितः - गृहस्थाश्रमी पुरुष - यत्पूजया - ज्यांचे पूजन केल्यामुळे - कामदुघान् लोकान् याति - सर्व कामना पूर्ण करणार्‍या लोकांप्रत जातो - ब्राह्मणः अग्निः च - असा ब्राह्मण आणि अग्नि - सर्वदेवात्मनः विष्णोः मुखं वै (अस्ति) - सर्व देवतात्मक विष्णूचे खरोखर मुख होत. ॥९॥
ब्राह्मण आणि अग्नी हे सर्व देवमय भगवंतांचे मुख आहेत, गृहस्थाने जर हा दोन्हींचे पूजन केले, तर सर्व कामना पूर्ण करणार्‍या लोकांची त्याला प्राप्ती होते. (९)


अपि सर्वे कुशलिनः तव पुत्रा मनस्विनि ।
लक्षयेऽस्वस्थमात्मानं भवत्या लक्षणैरहम् ॥ १० ॥
प्रिये ! प्रसन्न तू नित्य लक्षणे परि आज ते ।
अस्वस्थ दिससी चित्ती मुले ते सुखरुप ना ? ॥ १० ॥

मनस्विनी - हे मनोनिग्रही स्त्रिये - अपि सर्वे तव पुत्राः कुशलिनः (सन्ति) - तुझे सर्व पुत्र खुशाल आहेत ना ? - अहं लक्षणैः भवत्या आत्मानं - मी खुणांवरून तुझे अंतःकरण - अस्वस्थं लक्षये - अस्वस्थ आहे असा तर्क करितो. ॥१०॥
हे मानिनी, तुम्हा बर्‍याचशा लक्षणांवरून मला वाटते की तुझे चित्त अस्वस्थ आहे. तुझी सर्व मुले तर खुशाल आहेत ना ? (१०)


अदितिरुवाच -
भद्रं द्विजगवां ब्रह्मन् धर्मस्यास्य जनस्य च ।
त्रिवर्गस्य परं क्षेत्रं गृहमेधिन् गृहा इमे ॥ ११ ॥
अदिती म्हणाली -
ब्रह्मणा ! द्विज गो धर्म दासी मी सुखरूप की ।
धर्मार्थ काम साधाया स्वामी हा गृह‌आश्रमो ॥ ११ ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञानी कश्यपा - द्विजगवां धर्मस्य - ब्राह्मण, गाई, धर्म आणि - अस्य जनस्य च भद्रं (अस्ति) - हे सर्व लोक ह्यांचे कल्याण आहे - गृहमेधिन् - हे गृहस्थाश्रमी मुने - इमे गृहाः त्रिवर्गस्य परं क्षेत्रं (अस्ति) - हे घर, धर्म, अर्थ व काम यांचे मुख्य ठिकाण होय. ॥११॥
अदिती म्हणाली - हे गृहस्थाश्रमी ब्रह्मन ! ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. हा गृहस्थाश्रमच धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्तीस्थान आहे. (११)


अग्नयोऽतिथयो भृत्या भिक्षवो ये च लिप्सवः ।
सर्वं भगवतो ब्रह्मन् अनुध्यानान्न रिष्यति ॥ १२ ॥
प्रभो नित्य तुम्हा ध्याता कल्याण इच्छुनी मनीं ।
अतिथी भिक्षु नी अग्नी याचका ना दुखाविले ॥ १२ ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञानी ऋषे - अग्नयः अतिथयः भृत्याः - अग्नि, अतिथि, सेवक आणि - ये च लिप्सवः भिक्षवः - काही मिळण्याची इच्छा करणारे याचक - (इति) सर्वं - ह्या सर्वांना - भगवतः अनुध्यानात् - ईश्वराच्या नित्य चिंतनामुळे - न रिष्यति - उणे पडत नाही. ॥१२॥
हे ब्रह्मन, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे अग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांड केलेली नाही. (१२)


को नु मे भगवन् कामो न सम्पद्येत मानसः ।
यस्या भवान् प्रजाध्यक्ष एवं धर्मान् प्रभाषते ॥ १३ ॥
भगवन्‌ ! आपुल्या ऐसे बोधितात प्रजापती ।
मग त्या कामना कैशा पुर्‍यां हो न कधी बरे ? ॥ १३ ॥

भगवन् - हे सर्वैश्वर्यसंपन्न ऋषे - प्रजाध्यक्षः भवान् - प्रजापति असे आपण - यस्याः एव धर्मान् प्रभाषते - जिला अशा रीतीने धर्म सांगत असता - (तस्याः) मे कः नु - त्या माझी कोणती बरे - मानसः कामः न संपद्येत - अंतःकरणातील इच्छा पूर्ण होणार नाही ? ॥१३॥
हे भगवन, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात, तेव्हा माझ्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होणार नाही ? (१३)


तवैव मारीच मनःशरीरजाः
     प्रजा इमाः सत्त्वरजस्तमोजुषः ।
समो भवान् तास्वसुरादिषु प्रभो
     तथापि भक्तं भजते महेश्वरः ॥ १४ ॥
(इंद्रवज्रा)
समस्त आहे तवची प्रजा ही
    गुणी कुणी ती अन मानसी ही ।
देवासुरो हा नच भेद तुम्हा
    तो लाडितोही हरि भक्त त्यांना ॥ १४ ॥

मारीच - हे मरीचिपुत्रा - सत्त्वरजस्तमोजुषः - सत्त्वगुण, रजोगुण व तमोगुण - इमाः प्रजाः - यांचे सेवन करणार्‍या या प्रजा - तव एव मनःशरीरजाः (सन्ति) - तुझ्याच मनापासून व शरीरापासून जन्मल्या आहेत - प्रभो - हे समर्थ मुने - भवान् तासु असुरादिषु समः (अस्ति) - आपण त्या दैत्यादिकांच्या ठिकाणी समबुद्धि ठेवणारे आहा - तथापि महेश्वरः भक्तं भजते - तथापि परमेश्वरही भक्तांचा पक्ष स्वीकारितो. ॥१४॥
हे मरीचिपुत्र ! सत्त्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने, तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे. भगवन, आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता. तथापि स्वतः परमेश्वरसुद्धा आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करतात. (१४)


(अनुष्टुप्)
तस्मादीश भजन्त्या मे श्रेयश्चिन्तय सुव्रत ।
हृतश्रियो हृतस्थानान् सपत्‍नैः पाहि नः प्रभो ॥ १५ ॥
(अनुष्टुप्‌)
आपुली दासि मी स्वामी विचारे हित साधणे ।
शत्रूने स्थान संपत्ती हरिली रक्षिता तिला ॥ १५ ॥

तस्मात् - त्याकरिता - ईश - हे समर्थ कश्यपा - सुव्रत प्रभो - हे व्रताचरणशील समर्थ मुने - भजन्त्याः मे श्रेयः चिन्तय - सेवा करणार्‍या माझ्या कल्याणाचा उपाय योज - सपत्नैः हृतश्रियः - शत्रूंनी ज्यांची संपत्ती व - हृतस्थानान् नः पाहि - स्थान हिरावून घेतली आहेत अशा आमचे रक्षण करा. ॥१५॥
म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभो, आपलीच सेवा करणार्‍या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा. ज्यांची संपत्ती आणि राहण्याचे ठिकाणसुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे, अशा आमचे आपण रक्षण करावे. (१५)


परैर्विवासिता साहं मग्ना व्यसनसागरे ।
ऐश्वर्यं श्रीर्यशः स्थानं हृतानि प्रबलैर्मम ॥ १६ ॥
दैत्य ऐश्वर्य संपत्ती पद येश हिराविले ।
काढिलेही घरातून दुःखसागरि मी बुडे ॥ १६ ॥

परैः विवासिता सा अहं - शत्रूंनी घालवून दिलेली ती मी - व्यसनसागरे मग्ना (अस्मि) - दुःखसमुद्रात बुडुन गेले आहे - प्रबलैः (अरिभिः) मम ऐश्वर्यं - बलाढय अशा शत्रूंनी माझे ऐश्वर्य, - श्रीः यशः स्थानं हृतानि (सन्ति) - लक्ष्मी, कीर्ती व ठिकाण ही सर्व हरण केली आहेत. ॥१६॥ -
बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थानसुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढले आहे. त्यामुळे मी सध्या दुःखसागरात बुडाले आहे. (१६)


यथा तानि पुनः साधो प्रपद्येरन् ममात्मजाः ।
तथा विधेहि कल्याणं धिया कल्याणकृत्तम ॥ १७ ॥
हितैषी स्वामि तो तुम्ही हित कोण दुजा करी ।
संकल्पे करणे भद्र पुत्रां वैभव देईजे ॥ १७ ॥

कल्याणकृत्तम साधो - कल्याणकारी पुरुषांत श्रेष्ठ अशा हे साधो कश्यपा - मम आत्मजाः - माझे पुत्र - तानि यथा पुनः प्रपद्येरन् - ज्यायोगे ती राज्यैश्वर्यै पुनः मिळवितील - तथा धिया (निश्चित्य) - तसे आपल्या बुद्धीने निश्चित करून - कल्याण विधेही - त्याचे कल्याण करा. ॥१७॥
आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणून हे माझ्या हितचिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की, माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होतील. (१७)


श्रीशुक उवाच -
एवं अभ्यर्थितोऽदित्या कस्तामाह स्मयन्निव ।
अहो मायाबलं विष्णोः स्नेहबद्धं इदं जगत् ॥ १८ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
अदिती प्रार्थिता ऐसे कश्यपो बोलले तिला ।
आश्चर्य प्रबला माया स्नेहाने विश्व बांधिले ॥ १८ ॥

अदित्या एवम् अभ्यर्थितः - अदितीने याप्रमाणे प्रार्थिलेला - कः स्मयन् इव - प्रजापति कश्यप किंचित हसल्यासारखे करून - ताम् आह - तिला म्हणाला - अहो विष्णोः मायाबलं - कितीही विष्णूच्या मायेचे सामर्थ्य - इदं जगत् स्नेहबद्धं - हे जग प्रेमपाशांनी जखडून टाकिले आहे. ॥१८॥
श्रीशुक म्हणतात - अदितीने जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली, तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंतांच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य ! हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यांनी बांधलेले आहे. (१८)


क्व देहो भौतिकोऽनात्मा क्व चात्मा प्रकृतेः परः ।
कस्य के पतिपुत्राद्या मोह एव हि कारणम् ॥ १९ ॥
कुठे देह कुठे आत्मा कोणाचा पति कोणि ना ।
न पुत्र नच संबंधी मोह हा नाचवी असे ॥ १९ ॥

भौतिकः अनात्मा देहः क्व - पंचमहाभूतांपासून बनलेला जड देह कोणीकडे - च - आणि - प्रकृतेः परः आत्मा क्व - मायेच्या पलीकडे असणारे चैतन्य कोणीकडे - के कस्य पति पुत्राद्याः - कोण कोणाचे पतिपुत्रादिक - हि मोहः एव (सर्वस्य) कारणम् (अस्ति) - खरोखर अज्ञानच सर्वांचे कारण होय. ॥१९॥
कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा ? कुणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही की बांधवही नाही. मोहच मनुष्याला असे भासवीत आहे. (१९)


उपतिष्ठस्व पुरुषं भगवन्तं जनार्दनम् ।
सर्वभूतगुहावासं वासुदेवं जगद्‍गुरुम् ॥ २० ॥
प्रिये संपूर्ण प्राण्यात विराजे भक्तवत्सल ।
भक्तांचे दुःख तो नष्टी तया तू पूजि भक्तिने ॥ २० ॥

पुरुषं भगवन्तं - सर्वांच्या शरीरात राहणार्‍या षड्‌गुणैश्वर्यसंपन्न, - जनार्दनं - लोकांच्या पीडा नष्ट करणार्‍या, - सर्वभूतगुहावासं - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मस्वरूपाने राहणार्‍या, - जगद्‌गुरुं वासुदेवं उपतिष्ठस्व - जगद्‍गुरु, सर्वव्यापी व प्रकाशमान अशा विष्णूची उपासना कर. ॥२०॥
सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणार्‍या भक्तांचे दुःख दूर करणार्‍या, जगद्‌गुरू भगवान वासुदेवांची तू आराधना कर. (२०)


स विधास्यति ते कामान् हरिर्दीनानुकंपनः ।
अमोघा भगवद्‍भक्तिः न इतरेति मतिर्मम ॥ २१ ॥
दीनांचा वत्सलो तोची करी हेतूहि पूर्ण तो ।
निश्चये व्यर्थ ना भक्ती उपाय नच अन्य तो ॥ २१ ॥

दीनानुकम्पनः विष्णुः - दीनांवर दया करणारा तो विष्णु - ते कामान् विघास्यति - तुझ्या इच्छा पूर्ण करील - भगवद्‌भक्तिः अमोघा - श्रीविष्णूची भक्ति व्यर्थ न जाणारी आहे - इतरा न - दुसरी भक्ती तशी नाही - इति मम मतिः - असे माझे मत आहे. ॥२१॥
श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंतांची भक्ति कधी व्यर्थ जात नाही, हे माझे ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही. (२१)


अदितिरुवाच -
केनाहं विधिना ब्रह्मन् उपस्थास्ये जगत्पतिम् ।
यथा मे सत्यसंकल्पो विदध्यात् स मनोरथम् ॥ २२ ॥
अदितीने विचारिले -
भगवन्‌ ! पूजु मी कैशी भगवान्‌ जगदीश्वरा ।
करील पूर्ण जै हेतू सत्यसंकल्प तो प्रभू ॥ २२ ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञानी कश्यपा - अहं केन विधिना जगत्पतिम् उपस्थास्ये - मी कोणत्या प्रकाराने श्रीविष्णूची आराधना करावी - यथा सत्यसंकल्पः सः - ज्यायोगे तो सत्यसंकल्प भगवान - मे मनोरथं विदध्यात् - माझे मनोरथ पूर्ण करील. ॥२२॥
अदितीने विचारले, भगवन, जगदीश्वर भगवंतांची आराधना मी कोणत्या प्रकारे करू की, ज्यामुळे ते सत्यसंकल्प प्रभू माझा मनोरथ पूर्ण करतील. (२२)


आदिश त्वं द्विजश्रेष्ठ विधिं तदुपधावनम् ।
आशु तुष्यति मे देवः सीदन्त्याः सह पुत्रकैः ॥ २३ ॥
पुत्रांच्या सह मी थोर भोगिते दुःख हे असे ।
प्रसन्न शीघ्र तो होय श्रीविष्णुविधि सांगणे ॥ २३ ॥

द्विजश्रेष्ठ - हे ब्राह्मणश्रेष्ठ मुने - देवः - श्रीविष्णु - पुत्रकैः सह सीदन्त्याः - मुलांसह खिन्न होणार्‍या - मे (यथा) आशु तुष्यति - माझ्यावर जेणेकरून लवकर संतुष्ट होईल - (तथा) त्वं तदुपधावनं विधिम् आदिश - असा तू भगवंताला आळवण्याचा प्रकार सांग. ॥२३॥
हे ब्राह्मणश्रेष्ठ, मी माझ्या पुत्रांसह अतिशय दुःखात आहे. ज्यामुळे भगवंत माझ्यावर लवकर प्रसन्न होतील, तो त्यांच्या आराधनेचा विधी मला सांगावा. (२३)


कश्यप उवाच -
एतन्मे भगवान् पृष्टः प्रजाकामस्य पद्मजः ।
यदाह ते प्रवक्ष्यामि व्रतं केशवतोषणम् ॥ २४ ॥
कश्यपजी म्हणाले -
देवी संतान इच्छोनी ब्रह्म्यासी हे विचारिता ।
तेणे प्रसन्न होवोनी बोलले व्रत बोलतो ॥ २४ ॥

प्रजाकामस्य मे - संततीची इच्छा करणार्‍या माझ्याकडून - एतत् पृष्टः भगवान् पद्मजः - हा प्रश्न विचारिलेला सर्वैश्वर्यसंपन्न ब्रह्मदेव - यत् केशवतोषणं व्रतम् आह - जे भगवंताला संतुष्ट करण्याचे व्रत सांगता झाला - (तत्) ते प्रवक्ष्यामि - ते तुला सांगतो. ॥२४॥
कश्यप म्हणाले - संतान असावे असे मला जेव्हा वाटले, तेव्हा मी भगवान ब्रह्मदेवांना हीच गोष्ट विचारली होती. त्यांनी मला भगवंतांना प्रसन्न करणारे जे व्रत सांगितले, तेच मी तुला सांगतो. (२४)


फाल्गुनस्यामले पक्षे द्वादशाहं पयोव्रतम् ।
अर्चयेत् अरविन्दाक्षं भक्त्या परमयान्वितः ॥ २५ ॥
फाल्गून शुक्ल पक्षात दूध पीवूनि राहणे ।
बारादिनी पुजावा तो भगवान्‌ कमलाक्ष की ॥ २५ ॥

फाल्गुनस्य अमले पक्षे - फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षामध्ये - द्वादशाहं - बारा दिवसांपर्यंत - पयोव्रतः - पयोव्रतनामक व्रत पाळून - परमया भक्त्या अन्वितः (भूत्वा) - मोठया भक्तीने युक्त होऊन - अरविंदाक्षम् अर्चयेत् - कमळनेत्र अशा श्रीविष्णूचे पूजन करावे. ॥२५॥
फाल्गुन महिन्याच्या शुक्लपक्षात बारा दिवसपर्यंत फक्त दूध पिऊन रहावे आणि परम भक्तीने भगवान विष्णूंची पूजा करावी. (२५)


सिनीवाल्यां मृदालिप्य स्नायात् क्रोडविदीर्णया ।
यदि लभ्येत वै स्रोतसि एतं मंत्रं उदीरयेत् ॥ २६ ॥
सूकरे खोदिली माती शरीरा उटि लावुनी ।
नदीत करणे स्नान आमावस्याचिये दिनी ॥
स्नानाच्या वेळि हा मंत्र मुखाने म्हणणे असे ॥ २६ ॥

सिनीवाल्यां - अमावस्येच्या दिवशी - यदि वै लभ्येत (तर्हि) - जर खरोखर मिळेल तर - क्रोडदीर्णया मृदा आलिप्य - डुकराने उकरलेल्या मातीचा अंगाला लेप करून - स्रोतसि स्नायात् - नदीप्रवाहात स्नान करावे - एतं मन्त्रम् (च) उदीरयेत् - आणि हा मंत्र म्हणावा. ॥२६॥
मिळू शकल्यास डुकराने खोदलेली माती अमावस्येच्या दिवशी अंगाला लावून नदीमध्ये स्नान करावे. त्यावेळी हा मंत्र म्हणावा. (२६)


त्वं देव्यादिवराहेण रसायाः स्थानमिच्छता ।
उद्‌धृतासि नमस्तुभ्यं पाप्मानं मे प्रणाशय ॥ २७ ॥
हे देवी जीवस्थानार्थ वराहे तुज तारिले ।
प्रणाम तुजला घे हा नष्टि तू मम पाप गे ॥ २७ ॥

देवि - हे पृथ्वी देवि - स्थानं इच्छता आदिवराहेण - स्थानाची इच्छा करणार्‍या वराहावतारी परमेश्वराने - त्वं रसायाः उध्दृता असि - तुला रसातलातून वर काढिले - तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो - मे पाप्मानं प्रणाशय - माझ्या पापांचा तू नाश कर. ॥२७॥
हे देवी, प्राण्यांना निवासासाठी जागा देण्याच्या इच्छेने आदिवराहांनी रसातळातून तुला वर आणले. तुला माझा नमस्कार असो ! तू माझी पापे नष्ट कर. (२७)


निर्वर्तितात्मनियमो देवं अर्चेत् समाहितः ।
अर्चायां स्थण्डिले सूर्ये जले वह्नौ गुरौ अपि ॥ २८ ॥
नित्य नैमित्तिकी पूजा करावी तदनंतर ।
एकाग्रे मूर्ति वेदी नी सूर्यो जल गुरु पुजी ॥ २८ ॥

निर्वर्तितात्मनियमः - उरकले आहे स्नानसंध्यादि नित्य कृत्य ज्याने असा - समाहितः - सावधानचित्त असा - अर्चायां - मूर्तींच्या ठिकाणी - स्थंडिले सूर्ये जले - स्थंडिलाच्या ठिकाणी, तसेच सूर्य, उदक, - वह्नौ गुरौ अपि - अग्नि व गुरु ह्या ठिकाणीही - देवम् अर्चेत् - देवांची पूजा करावी. ॥२८॥
यानंतर आपली नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून एकाग्र चित्ताने मूर्ती, पूजास्थल, सूर्य, जल, अग्नी किंवा गुरू यांच्या ठिकाणी भगवंतांची पूजा करावी. (२८)


नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महीयसे ।
सर्वभूतनिवासाय वासुदेवाय साक्षिणे ॥ २९ ॥
(आणि या प्रकारे स्तुति करावी)
नमस्ते श्री भगवते पुरुषास महीयसे ।
सर्वभूत निवासास वासुदेवास साक्षिला ॥ २९ ॥

भगवते पुरुषाय महीयसे - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न, शरीरात वास्तव्य करणार्‍या, फार मोठया, - सर्वभूतनिवासाय - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने राहणार्‍या - वासुदेवाय साक्षिणे - सर्वव्यापी प्रकाशमान व साक्षीरूपाने असणार्‍या - तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो. ॥२९॥
प्रथम पुढील नऊ मंत्रांनी आवाहन करावे. - हे प्रभो ! आपण सर्वशक्तिमान आणि अंतर्यामी आहात. सर्व प्राणी आपल्यामध्ये आणि आपण सर्व प्राण्यांमध्ये निवास करीत आहात; म्हणूनच आपणास "वासुदेव" म्हणतात. आपण सर्वांचे साक्षी आहात. माझा आपणास नमस्कार असो. (२९)


नमोऽव्यक्ताय सूक्ष्माय प्रधानपुरुषाय च ।
चतुर्विंशद्‍गुणज्ञाय गुणसंख्यानहेतवे ॥ ३० ॥
नमो अव्यक्त सूक्ष्मा तू प्रधान पुरुषो तुची ।
चोवीस गुण संख्येचा सांख्यायन प्रवर्तकु ॥ ३० ॥

अव्यक्ताय सूक्ष्माय - ज्याचे स्वरूप स्पष्ट होणार नाही, - चतुर्विंशगुणज्ञाय - जो सूक्ष्म असून चोवीस तत्त्वे जाणतो, - गुणसङ्ख्यानहेतवे - तत्त्वांची गणती करण्यास - प्रधानपुरुषाय च नमः - कारणीभूत अशा पुरुषोत्तमाला नमस्कार असो. ॥३०॥
आपण अव्यक्त आणि सूक्ष्म आहात. प्रकृती आणि पुरुष आपणच आहात. आपण चोवीस गुणांना जाणणारे आणि सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहात. आपणास माझा नमस्कार असो. (३०)


नमो द्विशीर्ष्णे त्रिपदे चतुःश्रृंगाय तन्तवे ।
सप्तहस्ताय यज्ञाय त्रयीविद्यात्मने नमः ॥ ३१ ॥
द्वीशीर्षा त्रिपदा चार श्रृंगा तुज नमो नमः ।
सप्त हस्तास यज्ञास त्रयिविद्या नमो नमः ॥ ३१ ॥

द्विशीर्ष्णे त्रिपदे चतुःशृंगाय - दोन मस्तके, तीन पाय, चार शिंगे, - तन्तवे सप्तहस्ताय - विस्तृत स्वरूप व सात हात अशी ज्याला आहेत, - त्रयीविद्यात्मने यज्ञाय नमः - त्या वेदत्रयात्मक यज्ञस्वरूपी परमेश्वराला नमस्कार असो. ॥३१॥
ज्याची प्रायणीय आणि उदयनीय ही दोन कर्मे ही मस्तके आहेत, प्रातःकाळ मध्याह्नकाळ आणि सायंकाळ हे ज्याचे तीन पाय आहेत, चार वेद चार शिंगे आहेत, गायत्री इत्यादी सात छंद सात हात आहेत, असे तिन्ही वेदांनी सांगितलेले, फळ देणारे यज्ञ आपण आहात. आपणास माझा नमस्कार असो. (३१)


नमः शिवाय रुद्राय नमः शक्तिधराय च ।
सर्वविद्याधिपतये भूतानां पतये नमः ॥ ३२ ॥
नमो शिवास रुद्रास नमो शक्तिधरा तुला ।
सर्वविद्याधिपतिला भूतस्वामी तुला नमो ॥ ३२ ॥

शिवाय भद्राय नमः - कल्याण करणार्‍या भद्ररूपी भगवंताला नमस्कार असो - शक्त्तिधराय नमः - मायारूप शक्ति धारण करणार्‍या ईश्वराला नमस्कार असो - च - आणि - सर्वविद्याधिपतये - संपूर्ण विद्यांचा स्वामी व - भूतानां पतये नमः - सर्व प्राण्यांचा पालक अशा परमेश्वराला नमस्कार असो. ॥३२॥
आपण शिव, प्रलयकारी रुद्र, सर्वशक्तिसंपन्न, सर्व विद्यांचे अधिपती आणि भूतांचे स्वामी आहात. आपणास माझा नमस्कार असो. (३२)


नमो हिरण्यगर्भाय प्राणाय जगदात्मने ।
योगैश्वर्यशरीराय नमस्ते योगहेतवे ॥ ३३ ॥
नमो हिरण्यगर्भास प्राणास जगदात्मया ।
योगेश्वर्यशरीरास नमस्ते योग हेतु तू ॥ ३३ ॥

हिरण्यगर्भाय - सुवर्णाचे ब्रह्मांड ज्याच्या शरीरात गर्भरूपाने राहात आहे, - जगदात्मने प्राणाय नमः - अशा जगद्‌व्यापक प्राणस्वरूपी भगवंताला नमस्कार असो - योगैश्वर्यशरीराय - योगसंपत्ति हे ज्याचे शरीर व - योगहेतवे ते नमः - योगाला जो साधनीभूत अशा तुला नमस्कार असो. ॥३३॥
आपण सर्वांचे प्राण, या जगताचे स्वरूप, योगाचे कारण, स्वतः योग आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य आहात. हे हिरण्यगर्भा, आपणास माझा नमस्कार असो. (३३)


नमस्ते आदिदेवाय साक्षिभूताय ते नमः ।
नारायणाय ऋषये नराय हरये नमः ॥ ३४ ॥
नमस्ते आदिदेवाला साक्षिभूता नमो नमो ।
नारायणास ऋषये नरास हरिसी नमो ॥ ३४ ॥

आदिदेवाय ते नमः - जगाच्या आधी असलेल्या तुला नमस्कार असो - साक्षिभूताय ते नमः - साक्षिरूपाने असणार्‍या तुला नमस्कार असो - नारायणाय ऋषये - ऋषिकुळात नरनारायण नावाने - नराय हरये नमः - अवतार घेणार्‍या विष्णूला नमस्कार असो. ॥३४॥
आपण आदिदेव आणि सर्वांचे साक्षी आहात. आपणच नर-नारायण ऋषींच्या रूपाने प्रगट झालेले स्वतः श्रीहरी आहात, आपणास माझा नमस्कार. (३४)


नमो मरकतश्याम वपुषेऽधिगतश्रिये ।
केशवाय नमस्तुभ्यं नमस्ते पीतवाससे ॥ ३५ ॥
नमस्ते सावळ्यारुपा संपत्तीरुप देवता ।
पीतवस्त्रा हरी लक्ष्मी सेविते तुज केशवा ॥ ३५ ॥

मरकतश्यामवपुषे - पाचेप्रमाणे श्यामवर्ण शरीराच्या व - अधिगतश्रिये (ते) नमः - लक्ष्मीने युक्त अशा तुला नमस्कार असो - केशवाय तुभ्यं नमः - जलात शयन करणार्‍या तुला नमस्कार असो - पीतवाससे ते नमः - पिवळे वस्त्र धारण करणार्‍या तुला नमस्कार असो. ॥३५॥
आपले शरीर पाचूच्या मण्याप्रमाणे सावळे आहे. आपण लक्ष्मीचा अंगीकार केला आहे. हे पीतांबरधारी केशवा, आपणास माझा नमस्कार. (३५)


त्वं सर्ववरदः पुंसां वरेण्य वरदर्षभ ।
अतस्ते श्रेयसे धीराः पादरेणुं उपासते ॥ ३६ ॥
तू सर्ववरदो ऐसा जीवांना एकटा तुची ।
विवेकी संत ते सारे तुझ्या पायास पूजिती ॥ ३६ ॥

वरेण्य - हे श्रेष्ठा - वरदर्षभः - वर देणार्‍यांत श्रेष्ठ अशा हे विष्णो - त्वं पुंसां सर्ववरदः (असि) - तू पुरुषांना सर्व वर देणारा आहेस - अतः - म्हणून - धीराः श्रेयसे ते पादरेणुम् उपासते - ज्ञानी तुझ्या चरणधूळीची उपासना करितात. ॥३६॥
आपण सर्व वर देणारे आहात, वर देणार्‍यांमध्ये श्रेष्ठ आहात. तसेच जीवमात्राला वरणीय आहात. म्हणून विवेकी पुरुष आपल्या कल्याणासाठी आपल्या चरणरजांची उपासना करतात. (३६)


अन्ववर्तन्त यं देवाः श्रीश्च तत्पादपद्मयोः ।
स्पृहयन्त इवामोदं भगवान् मे प्रसीदताम् ॥ ३७ ॥
पायाचा गंध तो घेण्या देवता लक्षुमी जयां ।
राहती नित्य सेवेत पावो तो भगवान्‌ मला ॥ ३७ ॥

देवाः श्रीः च - देव आणि लक्ष्मी - तत्पादपद्मयोः - त्याच्या चरणकमलांच्या - आमोदं स्पृहयन्तः इव - सुगंधाची इच्छा करणारेच की काय - यम् अन्ववर्तन्त - ज्याची उपासना करतात - (सः) भगवान् मे प्रसीदतां - तो परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होवो. ॥३७॥
ज्यांच्या चरणकमलांचा सुगंध प्राप्त करण्याच्या लालसेने सर्व देव आणि लक्ष्मी ज्यांच्या सेवेमध्ये मग्न असतात, ते भगवंत माझ्यावर प्रसन्न होवोत. (३७)


एतैः मंत्रैः हृर्हृषीकेशं आवाहनपुरस्कृतम् ।
अर्चयेत् श्रद्धया युक्तः पाद्योपस्पर्शनादिभिः ॥ ३८ ॥
आवाहुनी प्रिये ऐसे पाद्य आचमने असे ।
श्रद्धेने मन लावोनी पूजावा ह्रषिकेश तो ॥ ३८ ॥

(पुरुषः) श्रद्धया युक्तः (भूत्वा) - पुरुषाने श्रद्धायुक्त होऊन - एतैः मन्त्रैः आवाहनपुरस्कृतं - ह्या मंत्रांनी आवाहनादिकांनी सत्कारलेल्या - हृषीकेशं - विष्णूला - पाद्योपस्पर्शनादिभिः अर्चयेत् - पाद्य, आचमन इत्यादि षोडशोपचारांनी पूजावे. ॥३८॥
भगवान हृषीकेशांचे या मंत्रांनी आवाहन करून नंतर पाद्य, आचमन इत्यादी समर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करावे. (३८)


अर्चित्वा गन्धमाल्याद्यैः पयसा स्नपयेद् विभुम् ।
वस्त्रोपवीताभरण पाद्योपस्पर्शनैस्ततः ॥ ३९ ॥
गंध मालादि पूजेने दुधाचे स्नान घालणे ।
वस्त्र यज्ञोपवीतो नी भूषणे पाद्य गंध नी ॥
आचम्य आदिने मंत्रे हविणे द्वादशाक्षरें ॥ ३९ ॥

गन्धमाल्याद्यैः विभुं अर्चित्वा - चंदन, फुले इत्यादि पदार्थांनी श्रीविष्णूची पूजा करून - पयसा स्नपयेत् - दुधाने स्नान घालावे - ततः - नंतर - द्वादशाक्षरविद्यया - बारा अक्षरांच्या मंत्राने, - वस्त्रोपवीताभरणपाद्योपस्पर्शनैः - वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार, पाद्य, आचमन, - गन्धधूपादिभिः च - गंध व धूप इत्यादि उपचार समर्पण करून - (विभुं) अर्चेत् - श्रीविष्णूची पूजा करावी. ॥३९॥
गंध, फुले इत्यादींनी पूजा करून भगवंतांना दुधाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, जानवे, अलंकार, पाद्य, आचमन, गंध, धूप इत्यादी अर्पण करून द्वादशाक्षरी मंत्राने भगवंतांची पूजा करावी. (३९)


गन्धधूपादिभिश्चार्चेद् द्वादशाक्षरविद्यया ॥ ३९५ ।
श्रृतं पयसि नैवेद्यं शाल्यन्नं विभवे सति ।
ससर्पिः सगुडं दत्त्वा जुहुयान् मूलविद्यया ॥ ४० ॥
सामर्थ्य असता क्षीर पायसो गूळ तूप ते ।
नैवेद्य ठेविणे तैसा त्या मंत्रे हवने करी ॥ ४० ॥

विभवे सति - सामर्थ्य असता - पयसि घृतं ससर्पिः - दुधात शिजविलेल्या व घृत आणि - सगुडं शाल्यन्नं नैवेद्यं दत्वा - गूळ ह्यांनी युक्त अशा भाताचा नैवेद्य अर्पण करून - मूलविद्यया - द्वादशाक्षरी मूल मंत्रांने - जुहुयात् - हवन करावे. ॥४०॥
ऐपत असेल तर दुधात शिजविलेल्या आणि तूप-गूळ घातलेल्या साळीच्या तांदळांच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचेच द्वादशाक्षर मंत्राने हवन करावे. (४०)


निवेदितं तद्‍भक्ताय दद्याद्‍भुञ्जीत वा स्वयम् ।
दत्त्वाऽऽचमनमर्चित्वा तांबूलं च निवेदयेत् ॥ ४१ ॥
नैवेद्य वाटणे भक्तां अथवा भक्षिणे स्वयें ।
तांबूल अर्पिणे तेंव्हा पूजा आचम्य सारिता ॥ ४१ ॥

निवेदितं तद्‌भक्ताय दद्यात् - भगवंताला अर्पण केलेला नैवेद्य भगवद्‌भक्ताला द्यावा - स्वयं वा भुञ्जीत - किंवा स्वतः खावा - आचमनं दत्वा - आचमन देऊन आणि - अर्चित्वा च तांबूलं निवेदयेत् - पूजा करून तांबूल अर्पण करावा. ॥४१॥
तो नैवेद्य भक्तांना वाटावा किंवा स्वतः खावा. आचमन आणि पूजा झाल्यानंतर तांबूल अर्पण करावा. (४१)


जपेत् अष्टोत्तरशतं स्तुवीत स्तुतिभिः प्रभुम् ।
कृत्वा प्रदक्षिणं भूमौ प्रणमेद् दण्डवन्मुदा ॥ ४२ ॥
एकशे आठ वेळेला जापी मंत्र पुन्हाहि तो ।
स्तुतीने स्तविणे ईशा दंडवत्‌ नमिणे तया ॥ ४२ ॥

(मूलमंत्रं) अष्टोत्तरशतं जपेत् - बाराक्षरी मूळ मंत्राचा १०८ वेळा जप करावा - स्तुतिभिः विभुं स्तुवीत - स्तोत्रांनी विष्णुची स्तुति करावी - प्रदक्षिणं कृत्वा - प्रदक्षिणा घालून - मुदा भूमौ प्रणमेत् - मोठया आनंदाने नमस्कार घालावा. ॥४२॥
द्वादशाक्षर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि स्तोत्रांनी भगवंतांचे स्तवन करावे. प्रदक्षिणा घालावी आणि मोठ्या प्रेमाने जमिनीवर साष्टांग दंडवत घालावा. (४२)


कृत्वा शिरसि तच्छेषां देवं उद्वासयेत् ततः ।
द्व्यवरान् भोजयेद् विप्रान् पायसेन यथोचितम् ॥ ४३ ॥
निर्माल्य शिरि घेवोनी देवता वाटि लाविणे ।
किमान दोन ते विप्र खिरीने जेववी पुन्हा ॥ ४३ ॥

शिरसि तच्छेषां कृत्वा - मस्तकावर भगवंताचा निर्माल्य धारण करून - देवम् उद्वासयेत् - देवतेचे विसर्जन करावे - ततः पायसेनद्‌व्यवरान् विप्रान् - नंतर कमीतकमी दोन ब्राह्मणांना तरी - यथोचितं भोजयेत् - यथायोग्य खिरीचे भोजन घालावे. ॥४३॥
निर्माल्य डोक्याला लावून देवतेचे विसर्जन करावे. नंतर कमीत कमी दोन ब्राह्मणांना योग्य रीतीने खिरीचे भोजन द्यावे. (४३)


भुञ्जीत तैरनुज्ञातः सेष्टः शेषं सभाजितैः ।
ब्रह्मचार्यथ तद् रात्र्यां श्वो भूते प्रथमेऽहनि ॥ ४४ ॥
स्नातः शुचिर्यथोक्तेन विधिना सुसमाहितः ।
पयसा स्नापयित्वार्चेद् यावद् व्रतसमापनम् ॥ ४५ ॥
सन्माने दक्षिणा अर्पी आज्ञेने इष्ट मित्र ते ।
सवे घेवोनि जेवावे ब्रह्मचर्यचि त्या दिनी ॥ ४४ ॥
सकाळी उठुनी व्हावे स्नानानेच पवित्र की ।
पूर्वोक्त व्रत हे ऐसे करावे दिन द्वादश ॥ ४५ ॥

सभाजितैः तैः अनुज्ञातः (सः) - सत्कारिलेल्या त्या ब्राह्मणांनी अनुज्ञा दिलेल्या त्या व्रती पुरुषाने - सेष्टः - इष्टमित्रांसह - शेषं भुञ्जीत - उरलेले अन्न सेवन करावे - अथ - नंतर - तद्रात्र्यां ब्रह्मचारी (सन्) - त्या रात्री ब्रह्मचारी राहून - श्वोभूते प्रथमे अहनि - उजाडल्यावर पहिल्या दिवशी - स्नातः शुचिः सुसमाहितः (भूत्वा) - स्नान केलेला, शुद्ध व स्वस्थचित्त होऊन - यथोक्तेन विधिना पयसा स्नापयित्वा - देवाला पूर्वी सांगितलेल्या विधीने दुधाने स्नान घालून - यावद्‌व्रतसमापनं अर्चेत् - देवपूजनादि सर्व गोष्टी व्रत संपेपर्यंत चालू ठेवाव्या. ॥४४-४५॥
दक्षिणा इत्यादी देऊन त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन इष्टमित्रांसह राहिलेले अन्न स्वतः ग्रहण करावे. त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि दुसर्‍या दिवशी सकाळीच स्नान करून पवित्र व्हावे. नंतर पूर्वीप्रमाणेच एकाग्र चित्ताने भगवंतांची पूजा करावी. अशा प्रकारे व्रत पूर्ण होईपर्यंत दुधाने स्नान घालून दररोज भगवंतांचे पूजन करावे. (४४-४५)


पयोभक्षो व्रतमिदं चरेत् विष्णु अर्चनादृतः ।
पूर्ववत् जुहुयादग्निं ब्राह्मणांश्चापि भोजयेत् ॥ ४६ ॥
पयोव्रती असोनीया भक्तीने हरि पूजिणे ।
हविणे रोज पूर्वोक्त द्विजभोजन ही तसे ॥ ४६ ॥

विष्णवर्चनादृतः - भगवंताच्या पूजेविषयी आदर बाळगणारा - पयोभक्षः (सः) - व दूध भक्षण करणारा होत्साता - इदं व्रतं चरेत् - हे व्रत करावे - पूर्ववत् अग्निं जुहुयात् - पूर्वीप्रमाणे अग्नीमध्ये हवन करावे - च - आणि - ब्राह्मणान् अपि भोजयेत् - ब्राह्मणांनाही भोजन घालावे. ॥४६॥
भगवंतांच्या पूजेमध्ये आदरबुद्धी ठेवून केवळ दूध पिऊन हे व्रत केले पाहिजे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दररोज हवन आणि ब्राह्मणभोजन हेही केले पाहिजे. (४६)


एवं तु अहः अहः कुर्याद् द्वादशाहं पयोव्रतम् ।
हरेः आराधनं होमं अर्हणं द्विजतर्पणम् ॥ ४७ ॥
बारादिन पुढे व्हावे पयोव्रत करोनिया ।
हरी तो पूजिणे होम द्विजांची भोजने तशी ॥ ४७ ॥

एवं तु - याप्रमाणे तर - पयोव्रतः - हे पयोव्रत स्वीकारून - द्वादशाहं अहरहः - मनुष्याने बारा दिवसपर्यंत प्रतिदिवशी - हरेः आराधनं कुर्यात् - श्रीविष्णूचे आराधन करावे - (च) होमं अर्हणं द्विजतर्पणं (कुर्यात्) - आणि होम, पूजन आणि ब्राह्मणभोजन ही करावी. ॥४७॥
अशा प्रकारे पयोव्रती राहून बारा दिवसपर्यंत दररोज भगवंतांची आराधना, होम आणि पूजा करावी. तसेच ब्राह्मणभोजन घालावे. (४७)


प्रतिपत्-दिनं आरभ्य यावत् शुक्लत्रयोदशीम् ।
ब्रह्मचर्यमधःस्वप्नं स्नानं त्रिषवणं चरेत् ॥ ४८ ॥
फाल्गून शुद्ध एकास धरोनी ती त्रयोदयी ।
रहावे ब्रह्मचर्यात पृथिवीवरि झोपणे ॥
त्रिकाल करणे स्नान व्रत हे करणे असे ॥ ४८ ॥

प्रतिपद्दिनम् आरभ्य - प्रतिपदेला प्रारंभ करून - यावत् शुक्लत्रयोदशी (भवेत्) - शुक्लपक्षातील त्रयोदशी येईपर्यंत - ब्रह्मचर्यम् अघःस्वप्नं - ब्रह्मचर्य पाळावे, खाली जमिनीवर निजावे - त्रिषवणं स्नानं च चरेत् - व तिन्ही वेळा स्नान करावे. ॥४८॥ -
फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. जमिनीवर झोपावे आणि दिवसातून तीन वेळा स्नान करावे. (४८)


वर्जयेत् असद् आलापं भोगान् उच्चावचान् तथा ।
अहिंस्रः सर्वभूतानां वासुदेवपरायणः ॥ ४९ ॥
खोटे पापी न बोलावे पाप्यासी नच बोलणे ।
भोग ते सर्वची त्यागी प्राण्यांना त्रास तो नको ।
सदैव भगवंताच्या ध्यानात मन लाविणे ॥ ४९ ॥

सर्वभूतानाम् अहिंस्रः - कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणारा - वासुदेवपरायणः च (भूत्वा) - आणि भगवंताची अनन्य भक्ती करणारा होऊन - असदालापं तथा - वाईट भाषणे तसेच - उच्चावचान् भोगान् वर्जयेत् - लहानमोठे विषयभोग टाळावे. ॥४९॥
खोटे बोलू नये. लहान मोठ्या सर्व भोगांचा त्याग करावा. कोणत्याही प्राण्याला कशाही प्रकारे त्रास देऊ नये. भगवंतांच्या आराधनेतच एकाग्र असावे. (४९)


त्रयोदश्यां अथो विष्णोः स्नपनं पञ्चकैर्विभोः ।
कारयेत् शास्त्रदृष्टेन विधिना विधिकोविदैः ॥ ५० ॥
त्रयोदशीदिनी व्हावा शास्त्रवत्‌ अभिषेक तो ।
पंच‌अमृत स्नानाने विष्णुला मंत्रपूर्वक ॥ ५० ॥

अथो - नंतर - त्रयोदश्यां - त्रयोदशीच्या दिवशी - विधिकोविदैः - शास्त्रविधी जाणणार्‍यांकडून - शास्त्रदृष्टेन विधिना - शास्त्रांत सांगितलेल्या प्रकाराचे - पञ्चकैः - पंचामृतांनी - विभोः विष्णोः स्नपनं कारयेत् - विश्वव्यापक विष्णुला स्नान घालावे. ॥५०॥
त्रयोदशीच्या दिवशी विधी जाणणार्‍या ब्राह्मणांच्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने भगवान विष्णूंना पंचामृतस्नान घालावे. (५०)


पूजां च महतीं कुर्यात् वित्त शाठ्य विवर्जितः ।
चरुं निरूप्य पयसि शिपिविष्टाय विष्णवे ॥ ५१ ॥
धन संकोच त्यागोनी त्या दिनी खीर ती करा ।
तांदूळ दूध घालोनी करावे विष्णुअर्पण ॥ ५१ ॥

वित्तशाठ्यविवर्जितः - द्रव्याविषयी फसवणूक न करिता - महतीं पूजां कुर्यात् - महापूजा करावी - च - आणि - शिपिविष्टाय विष्णवे - जीवांतर्गत विष्णूला उद्देशून - पयसि चरुं निरूप्य - दुधात भात सिद्ध करून - ॥५१॥
त्या दिवशी धनाची काटकसर न करता फार मोठ्या थाटामाटात भगवंतांची पूजा करावी. दुधाची खीर भगवान विष्णूंना अर्पण करावी.(५१)


श्रृतेन तेन पुरुषं यजेत सुसमाहितः ।
नैवेद्यं चातिगुणवद् दद्यात् पुरुषतुष्टिदम् ॥ ५२ ॥
एकाग्रचित्ति ती सिद्धी तसेचि भगवान्‌ भजा ।
नैवेद्य त्यास स्वादिष्ट प्रसन्नार्थचि अर्पिणे ॥ ५२ ॥

सुसमाहितः - स्वस्थ चित्ताने - श्रृतेन तेन - शिजविलेल्या त्या - पुरुषं यजेत - परमेश्वराचे यजन करावे - च - आणि - अतिगुणवत् - पुष्कळ पदार्थांनी युक्त असा - पुरुषतुष्टिदं नैवेद्यं दद्यात् - परमेश्वराला संतुष्ट करणारा नैवेद्य समर्पण करावा. ॥५२॥
अत्यंत एकाग्र चित्ताने, त्या खिरीचा भगवंतांना नैवेद्य दाखवावा आणि त्यांना प्रसन्न करणारा अतिशय स्वादिष्ट नैवेद्य अर्पण करावा. (५२)


आचार्यं ज्ञानसम्पन्नं वस्त्राभरणधेनुभिः ।
तोषयेत् ऋत्विजश्चैव तद् विद्धि आराधनं हरेः ॥ ५३ ॥
ज्ञान संपन्न आचार्या ब्राह्मणा वस्त्र अर्पिणे ।
गायी आभूषणे द्यावी ही खरी भगवत्‌पुजा ॥ ५३ ॥

ज्ञानसम्पन्नम् आचार्यं - ज्ञानी आचार्याला - (तथा) च - त्याप्रमाणे - ऋत्विजः - ऋत्विजांना - वस्त्राभरण धेनुभिः तोषयेत् - वस्त्रे, अलंकार व गाई देऊन संतोषवावे - तत् हरेः आराधनं विद्धि - ते श्रीविष्णूचे आराधन समज. ॥५३॥
नंतर ज्ञानसंपन्न आचार्य आणि ऋत्विजांना वस्त्रे, अलंकार, गाई इत्यादी दान करून संतुष्ट करावे. हीसुद्धा भगवंतांचीच आराधना होय. (५३)


भोजयेत् तान्गुणवता सदन्नेन शुचिस्मिते ।
अन्यांश्च ब्राह्मणान् शक्त्या ये च तत्र समागताः ॥ ५४ ॥
शुद्ध सात्विक नी युक्त भोजने त्याजलाहि दे ।
दुसर्‍या अतिथी विप्रा जेववी शक्ति ज्या परी ॥ ५४ ॥

शुचिस्मिते - शुद्ध मंदहास्य करणार्‍या हे स्त्रिये - च - आणि - तत्र ये समागताः तान् - तेथे जे कोणी आले असतील त्यांना - च - आणि - अन्यान् ब्राह्मणान् - दुसर्‍या ब्राह्मणांना शक्तीनुसार - सदन्नेन शक्त्या गुणवता भोजयेत् - गुणसंपन्न उत्तम अन्नाचे भोजन घालावे. ॥५४॥
प्रिये, आचार्य आणि इतर ब्राह्मणांना तसेच इतर अतिथींना उत्तम पक्वान्नांचे भोजन द्यावे. (५४)


दक्षिणां गुरवे दद्याद् ऋत्विग्भ्यश्च यथार्हतः ।
अन्नाद्येन अश्वपाकांश्च प्रीणयेत् समुपागतान् ॥ ५५ ॥
भुक्तवत्सु च सर्वेषु दीनान्ध कृपणादिषु ।
विष्णोस्तत् प्रीणनं विद्वान् भुञ्जीत सह बन्धुभिः ॥ ५६ ॥
द्विजासी दक्षिणा द्यावी चांडाळ दीन अंध ते ।
येता अन्नेचि तृप्तावे यथाशक्ति तसे करी ॥ ५५ ॥
सत्कारीं सगळ्यांच्या त्या भगवान्‌ तोष मानतो ।
भावुकीच्या सवे तेंव्हा भोजना स्वय बैसणे ॥ ५६ ॥

गुरवे ऋत्विग्भ्यः च - गुरु आणि ऋत्विज यांना - यथार्हतः दक्षिणां दद्यात् - योग्यतेप्रमाणे दक्षिणा द्यावी - च - आणि - अन्नाद्येन समुपागतान् - अन्नादि देऊन आलेल्या - आश्वपाकान् प्रीणयेत् - चांडाळापर्यंत सर्व प्राण्यांना तृप्त करावे. ॥५५॥ च - आणि - सर्वेषु दीनान्धकृपणेषु भुक्तवत्सु - सर्व दीन, आंधळे व कृपण ह्यांनी भोजन केले असता - च - आणि - तत् विष्णोः प्रीणनं विद्वान् - तेच अन्नदान भगवंताला संतुष्ट करिते असे जाणून - बंधुभिः सह भुञ्जीत - बांधवांसह भोजन करावे. ॥५६॥
आचार्य आणि ऋत्विजांना यथायोग्य दक्षिणा द्यावी. तसेच अंत्यजादी कोणी आल्यास त्याला किंवा दीन-दुबळे, आंधळे-पांगळे यांना अन्न-वस्त्र देऊन संतुष्ट करावे. सर्वजण तृप्त झाले असता भगवान विष्णू तृप्त झाले, असे समजावे. नंतर आपल्या आप्तेष्टांसह स्वतः भोजन करावे. (५५-५६)


नृत्यवादित्रगीतैश्च स्तुतिभिः स्वस्तिवाचकैः ।
कारयेत् तत्कथाभिश्च पूजां भगवतोऽन्वहम् ॥ ५७ ॥
तेरादिनी तदा व्हावे नृत्य गायन वादनो ।
स्तुती नी स्वस्तिवाक्य नी पूजने कीर्तने तशी ॥ ५७ ॥

अन्वहं च - व प्रतिदिवशी - नृत्यवादित्रगीतैः - नाचणे, वादन व गायन यांनी - स्तुतिभिः - स्तुतींनी - स्वस्तिवाचकैः - आणि मंगलकारक शुभ मंत्रांनी - तत्कथाभिः च - आणि भगवंताच्या कथांनी - भगवतः पूजां कारयेत् - परमेश्वराची पूजा करावी. ॥५७॥
प्रतिपदेपासून त्रयोदशीपर्यंत दररोज नृत्य, गायन, वादन, स्तुती, स्तोत्रे आणि भगवत्कथा यांच्यायोगे भगवंतांचे पूजन करावे. (५७)


एतत् पयोव्रतं नाम पुरुषाराधनं परम् ।
पितामहेनाभिहितं मया ते समुदाहृतम् ॥ ५८ ॥
प्रिये ! ही भगवंताची श्रेष्ठ आराधना असे ।
पयोव्रत असे ब्रह्म्ये वदले बोलिलो तुला ॥ ५८ ॥

एतत् पयोव्रतं नाम - खरोखर हे पयोव्रत - परं पुरुषाराधनं (अस्ति) - परमेश्वराचे आराधन करण्याचे उत्तम साधन होय - पितामहेन अभिहितं - ब्रह्मदेवाने सांगितलेले - मया ते समुदाहृतं - मी तुला सांगितले. ॥५८॥
ही भगवंनांची श्रेष्ठ आराधना आहे. हिचे नाव "पयोव्रत" असे आहे. ब्रह्मदेवांनी मला जे सांगितले होते, तसेच मी तुला सांगितले. (५८)


त्वं चानेन महाभागे सम्यक् चीर्णेन केशवम् ।
आत्मना शुद्धभावेन नियतात्मा भजाव्ययम् ॥ ५९ ॥
देवी भाग्यवती हो तू इंद्रिया वश तू करी ।
शुद्ध भाव करोनीया अनुष्ठान करी असे ॥
भगवान्‌ अविनाशी तो आराधावा यये परी ॥ ५९ ॥

महाभागे - हे महाभाग्यशाली स्त्रिये - त्वं च - तू सुद्धा - नियतात्मा (भूत्वा) - इंद्रियनिग्रह करून - शुद्धभावेन आत्मना - शुद्ध आहेत विचार ज्यातील अशा अंतःकरणाने - सम्यक् चीर्णेन अनेन (व्रतेन) - उत्तम रीतीने केलेल्या ह्या व्रताने - अव्ययं केशवं भज - अविनाशी अशा श्रीविष्णूची सेवा कर. ॥५९॥
हे भाग्यवती, आपली इंद्रिये ताब्यात ठेवून, शुद्ध भावयुक्त चित्ताने या व्रताचे चांगल्या प्रकारे अनुष्ठान कर, आणि याद्वारा अविनाशी भगवंतांची आराधना कर. (५९)


अयं वै सर्वयज्ञाख्यः सर्वव्रतमिति स्मृतम् ।
तपःसारं इदं भद्रे दानं च ईश्वरतर्पणम् ॥ ६० ॥
भद्रे व्रते हरी तुष्टे नाम या सर्व यज्ञ ही ।
सर्वव्रत असे सार दान नी तप याचिये ॥ ६० ॥

भद्रे - हे कल्याणकारिणी स्त्रिये - अयं वै सर्वयज्ञाख्यः (अस्ति) - हा यज्ञ खरोखर सर्वयज्ञ या नावाने प्रसिद्ध आहे - (इदम् व्रतम्) सर्वव्रतम् इति स्मृतं - हे व्रत सर्वव्रत म्हणून म्हटले आहे - इदं तपः सारं (अस्ति) - हे व्रत तपाचे सार आहे - च - आणि - (इदम्) ईश्वरतर्पणम् दानं - हे ईश्वराला संतुष्ट करणारे दान आहे. ॥६०॥
कल्याणी, हे व्रत भगवंतांना संतुष्ट करणारे आहे; म्हणून याचे नाव ’सर्वयज्ञ’ आणि ’सर्वव्रत’ असे आहे. हे सर्व तपांचे सार आणि मुख्य दान आहे. (६०)


ते एव नियमाः साक्षात् ते एव च यमोत्तमाः ।
तपो दानं व्रतं यज्ञो येन तुष्यति अधोक्षजः ॥ ६१ ॥
पावतो भगवान्‌ येणे नियमो यम हे खरे ।
तपस्या धन नी यज्ञ व्रत हे वास्तवी असे ॥ ६१ ॥

येन साक्षात् अधोक्षजः तुष्यति - जेणे करून प्रत्यक्ष परमेश्वर संतुष्ट होतो - ते एव नियमाः (सन्ति) - तेच नियम होत - च - आणि - ते एव यमोत्तमाः (सन्ति) - तेच श्रेष्ठ यम होत. ॥६१॥
ज्यामुळे भगवंत प्रसन्न होतात, तेच खरे नियम होत. तेच उत्तम यम आहेत. तेच वास्तविक तपश्चर्या, दान, व्रत आणि यज्ञ होत. (६१)


तस्मात् एतद्व्रतं भद्रे प्रयता श्रद्धयाचर ।
भगवान् परितुष्टस्ते वरानाशु विधास्यति ॥ ६२ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे अदिति पयोव्रतकथनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
म्हणोनी संयमो भावे देवी हे व्रत आचरी ।
पावेल शीघ्र तो ईश पूर्ण होतील कामना ॥ ६२ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ सोळावा अध्याय हा॥ ८ ॥ १६ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

तस्मात् - या कारणास्तव - भद्रे - हे कल्याणि - (त्वं) प्रयता (भूत्वा) - तू शुद्ध होऊन - श्रद्धया - श्रद्धेने - एतत् व्रतम् आचर - हे व्रत कर - (येन) परितुष्टः भगवान् - जेणे करून संतुष्ट झालेला ईश्वर - आशु - लवकर - ते वरान् विधास्यति - तुला वर देईल. ॥६२॥
म्हणून हे देवी, संयम आणि श्रद्धेने तू या व्रताचे अनुष्ठा कर. भगवंत लवकरच तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. (६२)


स्कंध आठवा - अध्याय सोळावा समाप्त

GO TOP