श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
चतुर्दशोऽध्यायः

मन्वादीनां पृथक् पृथक् कर्मनिरूपणम् -

मनू इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच -
(अनुष्टुप्)
मन्वन्तरेषु भगवन् यथा मन्वादयस्त्विमे ।
यस्मिन्कर्मणि ये येन नियुक्ताः तद् वदस्व मे ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारिले -
(अनुष्टुप्‌)
मन्वंतरात भगवान्‌ मनू सप्तर्षि आदि ते ।
कोणते साधिती कार्य कृपया सांगणे मला ॥ १ ॥

भगवन् - हे शुक्राचार्य - मन्वन्तरेषु तु - आता मन्वंतरामध्ये - ये इमे मन्वादयः सन्ति - जे हे मनु आदिकरून आहेत - ते - ते - यथा यस्मिन् कर्मणि येन नियुक्ताः - जसे ज्या कामात ज्याने योजिले - तत् मे वदस्व - ते मला सांगा. ॥१॥
राजाने म्हटले - भगवन, हे मनू इत्यादी आपापल्या मन्वन्तरांमध्ये कोणाकडून नियुक्त होऊन कोणकोणती कामे करतात, ते मला सांगा. (१)


श्रीऋषिरुवाच -
मनवो मनुपुत्राश्च मुनयश्च महीपते ।
इन्द्राः सुरगणाश्चैव सर्वे पुरुषशासनाः ॥ २ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
मनुपुत्र मनू आणि सप्तर्षी आदि देवता ।
इंद्रादी सगळ्यांना तो नियुक्त करितो हरि ॥ २ ॥

महीपते - हे राजा - मनवः - मनु - मनुपुत्राः - मनूंचे पुत्र - मुनयः च इंद्राः च सुरगणाः च एव - आणि ऋषि आणि इंद्र आणि देवसमूह सुद्धा - सर्वे पुरुषशासनाः (सन्ति) - सर्व परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागणारे आहेत. ॥२॥
श्रीशुक म्हणाले - परीक्षिता ! मनू, मनुपुत्र, सप्तर्षी, इंद्र आणि देव हे सर्व भगवंतांच्या आज्ञेत आहेत. (२)


यज्ञादयो याः कथिताः पौरुष्यस्तनवो नृप ।
मन्वादयो जगद् यात्रां नयन्त्याभिः प्रचोदिताः ॥ ३ ॥
यज्ञादीपुरुषो यांच्या शरिरा वर्णिले असे ।
मनू तो प्रेरणेने त्यां विश्वसंचालना करी ॥ ३ ॥

नृप - हे राजा - यज्ञादयः याः पौरुष्याः तनवः कथिताः - यज्ञ आदि करून जे परमेश्वराचे अवतार सांगितले - आभिः प्रचोदिताः मन्वादयः - त्या अवतार मूर्तींनी आज्ञा दिलेले मनु आदिकरून - जगद्यात्रां नयन्ति - जगाच्या व्यवहाराला चालवितात. ॥३॥
राजन, भगवंतांच्या ज्या यज्ञपुरुष इत्यादी अवतारांचे मी वर्णन केले, त्यांच्याच प्रेरणेने मनू इत्याची विश्वाचे व्यवहार चालवतात. (३)


चतुर्युगान्ते कालेन ग्रस्तान् श्रुतिगणान्यथा ।
तपसा ऋषयोऽपश्यन् यतो धर्मः सनातनः ॥ ४ ॥
अंती चतुर्युगाच्या ते उलट्या समयास त्या ।
नष्टती श्रुति त्या सर्व सप्तर्षी तप योजुनी ॥
साक्षात्‌कार तयां होतो श्रुति धर्मास रक्षिते ॥ ४ ॥

ऋषयः - ऋषि - तपसा - तपश्चर्येने - चतुर्युगान्ते - चार युगांच्या शेवटी - कालेन ग्रस्तान् श्रुतिगणान् - काळाने गिळून टाकलेल्या वेदसमूहांना - यथा (वत्) अपश्यन् - जसेच्या तसे पाहाते झाले - यतः सनातनः धर्मः (भूतः) - ज्यांपासून वैदिक धर्म उत्पन्न झाला. ॥४॥
चारी युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गिळून टाकतो, तेव्हा ऋषी आपल्या तपश्चर्येच्या बळावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात. त्यांच्यामुळेच सनातन धर्माचे रक्षण होते. (४)


ततो धर्मं चतुष्पादं मनवो हरिणोदिताः ।
युक्ताः सञ्चारयन्ति अद्धा स्वे स्वे काले महीं नृप ॥ ५ ॥
चारीही समया मध्ये मनू सावध राहुनी ।
भगवत्‌ प्रेरणेने तै धर्मानुष्ठान जागवी ॥ ५ ॥

नृप - हे राजा - ततः - नंतर - हरिणा उदिताः मनवः - भगवंताने आज्ञा दिलेले मनु - युक्ताः - योगयुक्त असे - स्वे स्वे काले - आपापल्या योग्य काळी - अद्धा - योग्यरीतीने - चतुष्पादं धर्मं संचारयन्ति - पृथ्वीवर चारही चरणांनी युक्त असा धर्म स्थापित करतील. ॥५॥
राजन, भगवंतांच्या प्रेरणेने आपापल्या मन्वन्तरात अतिशय दक्षतेने सर्व मनू पृथ्वीवर चारी चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करतात. (५)


पालयन्ति प्रजापाला यावदन्तं विभागशः ।
यज्ञभागभुजो देवा ये च तत्र अन्विताश्च तैः ॥ ६ ॥
पृथ्विचे करुनी भाग व्यवस्थे राज्य पाहती ।
पंचयज्ञ अशा कर्मे यज्ञाने भाग देतिही ॥ ६ ॥

प्रजापालाः च - आणि लोकपाल - ये च यज्ञभागभुजः देवाः - आणि जे यज्ञांत हविर्भाग सेवणारे देव - तत्र तैः अन्विताः - त्याठिकाणी त्यासह - विभागशः - विभाग सोडून - यावदन्तं पालयन्ति - शेवट होईपर्यंत पालन करितात. ॥६॥
संपूर्ण मन्वन्तरांमध्ये मनुपुत्र देशकालानुसार प्रजापालन करतात. पंचमहायज्ञांत ज्यांचा संबंध आहे, त्यांच्याबरोबर देव त्या त्या मन्वंतरांमध्ये यज्ञभागाचा स्वीकार करतात. (६)


इन्द्रो भगवता दत्तां त्रैलोक्यश्रियमूर्जिताम् ।
भुञ्जानः पाति लोकान् त्रीन् कामं लोके प्रवर्षति ॥ ७ ॥
संपत्ती अतुलो भोगी रक्षितो इंद्र तो प्रजा ।
यथेष्ट पावसाचाही तयास अधिकार तो ॥ ७ ॥

इंद्रः - इंद्र - भगवता दत्ता - भगवंताने दिलेल्या - ऊर्जितां त्रैलोक्यश्रियं - बलयुक्त अशा त्रैलोक्याच्या ऐश्वर्याला - भुञ्जानः - सेवणारा - लोके कामं प्रवर्षति - जगावर अत्यंत पाऊस पाडतो - च - आणि - त्रीन् लोकान् पाति - त्रैलोक्याचे रक्षण करितो. ॥७॥
इंद्र, भगवनांनी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपभोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पाडतो. (७)


ज्ञानं चानुयुगं ब्रूते हरिः सिद्धस्वरूपधृक् ।
ऋषिरूपधरः कर्म योगं योगेशरूपधृक् ॥ ८ ॥
सनकादिक सिद्धांच्या रूपाने ज्ञान दे हरी ।
याज्ञवल्क्यादि ऋषिच्या रूपाने कर्म बोधितो ॥
दत्तात्रयादि योग्यांच्या रुपाने योग सांगतो ।
युगी युग अशा रूपे भगवान्‌ नित्य बोधितो ॥ ८ ॥

अनुयुगं - प्रत्येक युगात - हरिः - परमेश्वर - सिद्धस्वरूपधृक् - सिद्धांचे स्वरूप घेऊन - ज्ञानं - ज्ञानाला - ऋषिरूपधरः कर्म - ऋषींचे रूप घेऊन कर्माला - च - आणि - योगेशरूपधृक् योगं - योगेश्वराचे रूप घेऊन योगाला - ब्रूते - कथन करितो. ॥८॥
भगवंत युगा-युगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा, ऋषींचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांचे रूपाने योगाचा उपदेश करतात. (८)


सर्गं प्रजेशरूपेण दस्यून् हन्यात् स्वराड्वपुः ।
कालरूपेण सर्वेषां अभावाय पृथग्गुणः ॥ ९ ॥
मरिच्यादि प्रजापतीरूपानें सृष्टि निर्मितो ।
सम्राट हो‌उनी रक्षी कालरूपेचि मारितो ॥ ९ ॥

पृथग्गुणः - निरनिराळे गुण धारण करणारा परमेश्वर - प्रजेशरूपेण सर्गं (करोति) - प्रजापतींची रूपे घेऊन सृष्टि उत्पन्न करितो - स्वराङ्‌वपुः दस्यून् हन्यात् - इंद्रादि राजांची शरीरे धारण करून शत्रूंना मारितो - कालरूपेण - कालस्वरूप घेऊन - सर्वेषाम् अभावाय (भवति) - सर्वांच्या संहाराला कारण होतो. ॥९॥
ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात, राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात आणि वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा काळरूपाने सर्वांचा संहार करतात. (९)


स्तूयमानो जनैरेभिः मायया नामरूपया ।
विमोहितात्मभिर्नाना दर्शनैर्न च दृश्यते ॥ १० ॥
नाम रुपादि मायेने प्राण्यांची बुद्धि ती भ्रमे ।
दार्शनीक गुणा गाती परी ते जाणती न त्यां ॥ १० ॥

नामरूपया मायया - नामरूपात्मक मायेने - विमोहितात्मभिः ऐभिः जनैः - मोहित झालेल्या ह्या लोकांनी - नानादर्शनैः स्तूयमानः अपि - अनेक शास्त्रांनी स्तविला जाणाराही - (सः) न च दृश्यते - तो ईश्वर दिसतच नाही. ॥१०॥
नाम-रूपाच्या मायेने प्राण्य़ांची बुद्धी मूढ झाल्यामुळे ते अनेक शास्त्रांच्या द्वारा भगवंतांचा महिमा गातात; परंतु त्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत. (१०)


एतत्कल्पविकल्पस्य प्रमाणं परिकीर्तितम् ।
यत्र मन्वन्तराण्याहुः चतुर्दश पुराविदः ॥ ११ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां अष्टमस्कन्धे चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
असे कल्प विकल्पाचे प्रमाण वदलो नृपा ।
असे मन्वंतरे चौदा कल्पी ज्ञातेच सांगती ॥ ११ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ चौदावा अध्याय हा ॥ ८ ॥ १४ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

एतत् कल्पविकल्पस्य प्रमाणं परिकीर्तितं - हे कल्परचनेचे प्रमाण सांगितले - यत्र - ज्यात - पुराविदः - प्राचीन विद्या जाणणारे पुरुष - चतुर्दश मन्वन्तराणि आहुः - चौदा मन्वन्तरे सांगते झाले. ॥११॥
मी तुला हा महाकल्प आणि अवांतर कल्पांचा कालावधी सांगितला. इतिहास जाणणार्‍या विद्वानांनी प्रत्येक अवांतर कल्पामध्ये चौदा मन्वंतरे सांगितली आहेत. (११)


स्कंध आठवा - अध्याय चवदावा समाप्त

GO TOP