श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
त्रयोदशोऽध्यायः

भविष्यन्मन्वन्तर सप्तकवर्णनम् -

आगामी सात मन्वंतरांचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
मनुर्विवस्वतः पुत्रः श्राद्धदेव इति श्रुतः ।
सप्तमो वर्तमानो यः तद् अपत्यानि मे श्रृणु ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता ! विवस्वान्‌चा श्राद्धदेवचि पुत्र तो ।
वैवस्वत्‌ सातवा आहे मनू सध्या विराजमान्‌ ॥ १ ॥

श्राद्धदेवः इति श्रुतः - श्राद्धदेव या नावाने प्रसिद्ध असलेला - विवस्वतः पुत्रः - सूर्याचा मुलगा - सप्तमः मनुः (अस्ति) - सातवा मनु होय - यः वर्तमानः (अस्ति) - जो चालू आहे - तदपत्यानि मे शृणु - त्याची संतति माझ्यापासून ऐका. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वन्तराचा सातवा मनू होय. त्याच्या मुलांविषयी ऐक. (१)


इक्ष्वाकुर्नभगश्चैव धृष्टः शर्यातिरेव च ।
नरिष्यन्तोऽथ नाभागः सप्तमो दिष्ट उच्यते ॥ २ ॥
करूषश्च पृषध्रश्च दशमो वसुमान्स्मृतः ।
मनोर्वैवस्वतस्यैते दशपुत्राः परन्तप ॥ ३ ॥
संतान सांगतो त्याचे ऐकणे लक्षपूर्वक ।
वैवस्वता दहा पुत्र इक्ष्वाकू नभगो तसे ॥ २ ॥
धृष्ट-शर्याति करुषो नाभागो नरिष्यन्त नी ।
पृषध्र दिष्ट वसुमान्‌ दहा नावे अशी तयां ॥ ३ ॥

इक्ष्वाकुः नभगः च एव धृष्टः - इक्ष्वाकु, आणि तसाच नभग, धृष्ट - शर्यातिः च एव नरिष्यन्तः नाभागः - आणि तसाच शर्याति, नरिष्यंत, आणि नाभाग - सप्तमः (च) दिष्टः उच्यते - आणि सातवा दिष्ट नावाने प्रसिद्ध आहे. ॥२॥ परतंप - हे शत्रुतापना परीक्षित राजा - करुषः च पृषध्रः च - करुष आणि पृषध्र आणि - दशमः वसुमान् स्मृतः - दहावा वसुमान वर्णिला आहे - वैवस्वतस्य मनोः - सूर्यपुत्र श्राद्धदेव मनूचे - एते दश पुत्राः (सन्ति) - हे दहा पुत्र होत ॥३॥
हे राजा, वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू, नभग, धृष्ट, शर्याती, नरिष्यंत नाभाग, दिष्ट, करूष, पृषध्र आणि वसुमान हे दहा पुत्र होत. (२-३)


आदित्या वसवो रुद्रा विश्वेदेवा मरुद्‍गणाः ।
अश्विनावृभवो राजन् इंद्रस्तेषां पुरंदरः ॥ ४ ॥
आदित्य नि वसू रुद्रो विश्वेदेव मरुद्‌गणो ।
आश्विनीकुमरो ऋभू प्रमूख देवता अशा ॥
ययांचा इंद्र तो आहे पुरंदरचि नाम त्या ॥ ४ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - आदित्याः वसवः रुद्राः - आदित्य, वसु, रुद्र, - विश्वेदेवाः मरुद्‌गणाः अश्विनौ ऋभवः - विश्वेदेव, मरुत्, अश्विनीकुमार व ऋभु - पुरंदरः तेषां इन्द्रः - पुरंदर हा देवांचा अधिपति होय. ॥४॥
राजा, या मन्वन्तरात आदित्य, वसू, रुद्र, विश्वेदेव, मरुद्‌गण, अश्विनीकुमार आणि ऋभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे. (४)


कश्यपोऽत्रिर्वसिष्ठश्च विश्वामित्रोऽथ गौतमः ।
जमदग्निर्भरद्वाज इति सप्तर्षयः स्मृताः ॥ ५ ॥
वसिष्ठ कश्यपो अत्री विश्वामित्र नि गौतमो ।
भरद्वाज जमदाग्नी नामे सप्तर्षि शोभती ॥ ५ ॥

कश्यपः अत्रिः वसिष्ठः - कश्यप, अत्रि, वसिष्ठ, - विश्वामित्रः अथ गौतमः जमदाग्निः भरद्वाजः - विश्वामित्र, त्याचप्रमाणे जमदग्नि आणि भरद्वाज - इति सप्त ऋषयः स्मृताः - असे सात ऋषि सांगितले आहेत. ॥५॥
कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज हे सप्तर्षी आहेत. (५)


अत्रापि भगवत् जन्म कश्यपाद् अदितेरभूत् ।
आदित्यानामवरजो विष्णुर्वामनरूपधृक् ॥ ६ ॥
याही मन्वंतरामध्ये अदिती पोटि कश्यपी ।
वीर्यात अंशरुपाने भगवान्‌ जन्मले हरी ॥
आदित्त्या धाकटा बंधू वामनो नाम त्याजला ॥ ६ ॥

अत्र अपि - ह्या मन्वंतरात सुद्धा - कश्यपात् अदितेः - कश्यपपासून अदितीच्या ठिकाणी - भगवज्जन्म अभूत् - भगवंताचा जन्म झाला - विष्णुः - विष्णु - आदित्यानां अवरजः - आदितिपुत्र अशा देवांचा धाकटा भाऊ - वामनरूपधृक् - बटुरूप घेणारा. ॥६॥
या मन्वन्तरामध्ये सुद्धा कश्यपापासून अदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने, भगवान विष्णूंनी अवतार घेतला. (६)


संक्षेपतो मयोक्तानि सप्तमन्वन्तराणि ते ।
भविष्याण्यथ वक्ष्यामि विष्णोः शक्त्यान्वितानि च ॥ ७ ॥
संक्षेपे मी असे राजा बोललो सातही मनू ।
भगवत्‌शक्तिने सात होतील मनवंतरे ॥
भविष्यातील ते सात वर्णितो सर्व ते असे ॥ ७ ॥

मया - मी - ते - तुला - सप्त मन्वन्तराणि - सात मन्वंतरे - संक्षेपतः उक्तानि - थोडक्यात सांगितली - अथच - तशीच आणखी - विष्णोःशक्त्या अन्वितानि - विष्णुच्या शक्तीने युक्त अशी - भविष्याणि - पुढे होणारी - वक्ष्यामि - सांगतो. ॥७॥
अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मन्वन्तरांचे वर्णन ऐकविले. आता भगवंतांच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणार्‍या सात मन्वन्तरांचे वर्णन करतो. (७)


विवस्वतश्च द्वे जाये विश्वकर्मसुते उभे ।
संज्ञा छाया च राजेन्द्र ये प्राग् अभिहिते तव ॥ ८ ॥
संक्षेपे वदलो मी तो संज्ञा छाया अशा द्वय ।
विवस्वान्‌पत्‍नि त्या दोघी कोणी वदति तीन त्या ॥ ८ ॥

राजेंद्र - हे राजा - च - आणि - संज्ञा छाया च - संज्ञा व छाया - उभे विश्वकर्मसुते - दोन्ही विश्वकर्म्याच्या मुली - विवस्वतः द्वे जाये (आस्ताम्) - सूर्याच्या दोन पत्न्या होत्या - ये - ज्या - तव - तुला - प्राक् अभिहिते - पूर्वी सांगितल्या. ॥८॥
परीक्षिता मी तुला यापूर्वीच (सहाव्या स्कंधामध्ये) सांगितले होते की, संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या दोन पत्‍न्या होत्या. (८)


तृतीयां वडवामेके तासां संज्ञासुतास्त्रयः ।
यमो यमी श्राद्धदेवः छायायाश्च सुतान् श्रृणु ॥ ९ ॥
सावर्णिस्तपती कन्या भार्या संवरणस्य या ।
शनैश्चरस्तृतीयोऽभूद् अश्विनौ वडवात्मजौ ॥ १० ॥
परी ते मजला वाटे तिसरी वडवा नसे ।
संज्ञेचे नाम वडवा असावे रवि पासुनी ॥
श्राद्धदेव यम यामी तिला संतान जाहले ।
शनी सावर्णि तपती छायासंतान हे तिन्ही ॥ ९ ॥
संवरणास पत्‍नी ती जाहली तपती पुढे ।
संज्ञा ती वडवा रूपे सूर्यासी भाळली असे ॥
अश्विनीकुमरो दोघे पुत्र हे जाहले तिला ॥ १० ॥

एके - कोणी - तृतीयां वडवां (वदन्ति) - तिसरी वडवा नावाची स्त्री सांगतात - तासां संज्ञासुताः यमः यमी च - त्यापैकी संज्ञेची मुले यम, यमी व - श्राद्धदेवः (इति) त्रयः - श्राद्धदेव अशी होती - छायायाः सुतान् शृणु - छायेची मुले ऐक. ॥९॥ सावर्णिः - सावर्णि नावाचा पुत्र - तपती कन्या - तपती नावाची कन्या - या संवरणस्य भार्या (अभवत्) - जी संवरणाची पत्नी झाली - तृतीयः शनैश्चरः - तिसरा शनैश्चर - अभूत् - झाला - वडवात्मजौ अश्विनौ - वडवेचे मुलगे अश्विनीकुमार होत. ॥१०॥
काही लोक म्हणतात की, त्यांची वडवा नावाची तिसरी पत्‍नी होती. त्यांच्यापैकी संज्ञेपासून, यम, यमी आणि श्राद्धदेव अशी तीन संताने झाली. छायेला सुद्धा सावर्णी, शनैश्चर आणि तपती नावाची कन्या, अशी तीन संताने झाली. तपती संवरणाची पत्‍नी झाली. वडवेचे पुत्र अश्विनीकुमार झाले. (९-१०)


अष्टमेऽन्तर आयाते सावर्णिर्भविता मनुः ।
निर्मोकविरजस्काद्याः सावर्णितनया नृप ॥ ११ ॥
होईल मनु सावर्णी आठव्या मनवंतरी ।
विरजस्क नि निर्मोक इत्यादी पुत्र त्याजला ॥ ११ ॥

नृप - हे राजा - अष्टमे अन्तरे आयाते - आठवे मन्वंतर आले असता - सावर्णिः मनुः भविता - सावर्णि मनु होईल - निर्मोकविरजस्काद्याः - निर्मोक, विरजस्क इत्यादि - सावर्णितनयाः (भवितारः) - सावर्णीचे मुलगे होतील. ॥११॥
आठव्या मन्वंन्तरात सावर्णी मनू होईल. निर्मोक, विरजस्क इत्यादी त्याचे पुत्र होतील. (११)


तत्र देवाः सुतपसो विरजा अमृतप्रभाः ।
तेषां विरोचनसुतो बलिरिन्द्रो भविष्यति ॥ १२ ॥
परीक्षिता तये वेळी सुतपा विरजा तसे ।
अमृत प्रभ नावाचे होतील देवता गण ॥
बळी विरोचनोपुत्र इंद्र होईल तेधवा ॥ १२ ॥

तत्र - त्या मन्वंतरात - सुतपसः विरजाः अमृतप्रभाः देवाः (भवितारः) - सुतपस, विरजस् व अमृतप्रभ हे देव होतील - विरोचनसुतः बलिः - विरोचनाचा पुत्र बलिराजा - तेषां इंद्रः - त्यांचा अधिपति - भविष्यति - होईल. ॥१२॥
त्यावेळी सुतपा, विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगण होतील. विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल. (१२)


दत्त्वेमां याचमानाय विष्णवे यः पदत्रयम् ।
राद्धं इंद्रपदं हित्वा ततः सिद्धिं अवाप्स्यति ॥ १३ ॥
योऽसौ भगवता बद्धः प्रीतेन सुतले पुनः ।
निवेशितोऽधिके स्वर्गाद् अधुनास्ते स्वराडिव ॥ १४ ॥
विष्णूने वामनो होता त्रिपाद भूमि मागता ।
त्रिलोक वामना सर्व बळीने दिधला तदा ॥
वामने बळि तो केला बद्ध त्या सुतला मधे ।
परी स्वर्गाहुनी श्रेष्ठ सुतलो लोक तो असे ॥ १३ ॥
विराजे बळि तो तेथे इंद्राहुनि विशेष की ।
पुढे तो इंद्र होवोनी तेही त्यागील की पद ॥
सिद्धी परम तो घेई भोग ते तुच्छ मानुनी ॥ १४ ॥

यः - जो बलिराजा - पदत्रयं याचमानाय विष्णवे - तीन पावले भूमी मागणार्‍या विष्णुला - इमां दत्वा - ही पृथ्वी देऊन - राद्धं इंद्रपदं हित्वा - समृद्ध असे इंद्रपद सोडून - ततः सिद्धिं अवाप्स्यति - नंतर सिद्धीला पावेल. ॥१३॥ यः असौ - जो हा बलिराजा - भगवता बद्धः - भगवंताने बद्ध केलेला - पुनः - पुनः - प्रीतेन तेन - संतुष्ट झालेल्या त्या भगवंताकडून - स्वर्गात् अधिके सुतले - स्वर्गाहूनहि अधिक महत्त्वाच्या सुतल प्रदेशामध्ये - निवेशितः - स्थापिला गेलेला - अधुना - सांप्रत - स्वराट् इव - स्वर्गाच्या राजाप्रमाणे - आस्ते - राहतो. ॥१४॥
तीन पावले भूमी मागणार्‍या वामनांना याने त्रैलोक्य दिले. ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते, त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राज्य दिले. यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे. यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचा सुद्धा त्याग करून परम सिद्धी प्राप्त करून घेईल. (१३-१४)


गालवो दीप्तिमान् रामो द्रोणपुत्रः कृपस्तथा ।
ऋष्यश्रृंगः पितास्माकं भगवान् बादरायणः ॥ १५ ॥
इमे सप्तर्षयस्तत्र भविष्यन्ति स्वयोगतः ।
इदानीं आसते राजन् स्वे स्वे आश्रममण्डले ॥ १६ ॥
दीप्तिमान्‌ गालवो आणि अश्वत्थामा तसेच ते ।
कृपा परशुरामो नी ऋष्यशृंग नि व्यासजी ॥ १५ ॥
सप्तर्षी आठव्या होती मन्वंतरि तदा असे ।
आश्रमीं स्थित ते सर्व योगाचे बळ योजुनी ॥ १६ ॥

गालवः दीप्तिमान् रामः - गालव, दीप्तीमान्, परशुराम, - द्रोणपुत्रः कृपः तथा ऋष्यशृंगः (च) - अश्वत्थामा, कृपाचार्य त्याचप्रमाणे ऋष्यशृंग आणि - अस्मांक पिता भगवान् बादरायणः - आमचा पिता सर्वगुणसंपन्न व्यास - इमे सप्तऋषयः - हे सात ऋषि - तत्र भविष्यन्ति - त्या मन्वतरांत होतील - राजन् - हे राजा - इदानीं - हल्ली - स्वे स्वे आश्रममंडले - आपापल्या आश्रमांत - स्वयोगतः - स्वतःच्या योगसामर्थ्याने - आसते - राहतात. ॥१५-१६॥
गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यश्रृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मन्वन्तरात सप्तर्षी होतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रममंडलात राहात आहेत. (१५-१६)


देवगुह्यात्सरस्वत्यां सार्वभौम इति प्रभुः ।
स्थानं पुरन्दराद् हृत्वा बलये दास्यतीश्वरः ॥ १७ ॥
देव गुह्यास ती पत्‍नी विष्णुगर्भ सरस्वती ।
सार्वभौ‌म अशा नामे तदा जन्मास येउनी ॥
इंद्र पुरंदरो याचा स्वर्ग तो बळिशीच दे ॥ १७ ॥

देवगुह्यात् - देवगुह्यनामक पुरुषापासून - सरस्वत्यां - सरस्वतीच्या पोटी - सार्वभौ‌म इति - सार्वभौ‌म नावाचा - प्रभुः ईश्वरः - समर्थ परमेश्वर - पुरन्दरात् स्थानं हृत्वा - इंद्रापासून इंद्रपद हिरावून घेऊन - बलये दास्यति - बलिराजाला देईल. ॥१७॥
देवगुह्याची पत्‍नी सरस्वतीपासून सार्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून बलीला देतील. (१७)


नवमो दक्षसावर्णिः मनुर्वरुणसम्भवः ।
भूतकेतुर्दीप्तकेतुः इत्याद्यास्तत्सुता नृप ॥ १८ ॥
नववा दशसावर्णी मनू वरुणपुत्र तो ।
होतील पुत्र ते त्याला भूतकेतू नि दीप्त हे ॥ १८ ॥

नृप - हे राजा - वरुणसंभवः दक्षसावर्णि - वरुणाचा पुत्र दक्षसावर्णि - नवमः मनुः (भविष्यति) - नववा मनु होईल. - भूतकेतुः दीप्तकेतुः इत्याद्याः - भूतकेतु, दीप्तकेतु इत्यादि - तत्सुताः (भविष्यंति) - त्याचे मुलगे होतील. ॥१८॥
हे राजा, वरुणाचा पुत्र दक्षसावर्णी नववा मनू होईल. भूतकेतू, दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील. (१८)


पारा मरीचिगर्भाद्या देवा इन्द्रोऽद्‍भुतः स्मृतः ।
द्युतिमत् प्रमुखास्तत्र भविष्यन्ति ऋषयस्ततः ॥ १९ ॥
पार नी मरिची गर्भ आदी ते देवता गण ।
अद्‌भूत नावचा इंद्र द्युतिमानादि ते ऋषी ॥ १९ ॥

पाराः मरीचिगर्भाद्याः देवाः - पार, मरीचिगर्भ देव होतील - अद्भुतः इंद्रः स्मृतः - अद्भुतनामक पुरुष इंद्र सांगितला आहे - ततः - नंतर - तत्र - त्या मन्वंतरात - द्युतिमत्प्रमुखाः ऋषयः - द्युतिमत् आदिकरून सप्तऋषि - भविष्यन्ति - होतील. ॥१९॥
पार, मरीचिगर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्‌भुत नावाचा इंद्र असेल. त्या मन्वन्तरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील. (१९)


आयुष्मतोऽम्बुधारायां ऋषभो भगवत्कला ।
भविता येन संराद्धां त्रिलोकीं भोक्ष्यतेऽद्‍भुतः ॥ २० ॥
अंबुधारा आयुष्मान्‌ची हिच्या गर्भात तो हरि ।
ऋषभो अवतारेल कलावतार तो असे ॥
अद्‌भूत नावच्या इंद्रा देईल सर्व भोग हा ॥ २० ॥

आयुष्मतः अंबुधारायां - आयुष्मानाच्या अंबुधारानामक पत्नीच्या ठिकाणी - भगवत्कला ऋषभः भविता - ऋषभनामक भगवंताचा अंशावतार होईल - येन - ज्या ऋषभाने - संराद्धां त्रिलोकीं - मिळवून दिलेल्या त्रैलोक्याला - अद्भुतः - अद्भुतनामक इंद्र - भोक्ष्यते - उपभोगील. ॥२०॥
आयुष्मानाची पत्‍नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल. अद्‌भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल. (२०)


दशमो ब्रह्मसावर्णिः उपश्लोकसुतो मनुः ।
तत्सुता भूरिषेणाद्या हविष्मत्प्रमुखा द्विजाः ॥ २१ ॥
हविष्मान्सुकृतः सत्यो जयो मूर्तिस्तदा द्विजाः ।
सुवासनविरुद्धाद्या देवाः शम्भुः सुरेश्वरः ॥ २२ ॥
ब्रह्म सावर्णि तो पुत्र उपश्लोकासि होइल ।
दहावा मनु तो होय संपन्न सद्‌गुणी असा ॥ २१ ॥
भूरिषेणादि त्या पुत्र हविष्मान्‌ सत्य सुकृती ।
जय मूर्त्यादि सप्तर्षी विरुद्ध नि सुवासनो ॥
इत्यादी देवता होती शंभू नामक इंद्र तो ॥ २२ ॥

उपश्लोकसुतः महान् ब्रह्मसावर्णिः - उपश्लोकाचा मुलगा महात्मा ब्रह्मसावर्णि - दशमः (मनुः) - दहावा मनु - भूरिषेणाद्याः तत्सुताः - भूरिषेणादि त्याचे मुलगे - हविष्मत्प्रमुखाः द्विजाः - हविष्मान् आदिकरून सप्तर्षि होतील. ॥२१॥ तदा - त्यावेळी - हविष्मान् सुकृतिः सत्यः - हविष्मान्, सुकृति, सत्य, - जयः मूर्तिः (इति) द्विजाः - जय व मूर्ति असे ते ऋषि असतील - सुवासनविरुद्धाद्याः देवाः - सुवासन, विरुद्ध इत्यादि देव होतील - शंभुःसुरेश्वरः (भविष्यति) - शंभु हा इंद्र होईल. ॥२२॥
उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावर्णी दहावा मनू होईल. त्याच्या ठिकाणी सर्व सद्‌गुण असतील. भूरिषेण इत्यादी त्याचे पुत्र असतील आणि हविष्मान, सुकृती, सत्य, जय, मूर्ती इत्यादी सप्तर्षी होईल. सुवासन, विरुद्ध इत्यादी देवांचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल. (२१-२२)


विष्वक्सेनो विषूच्यां तु शम्भोः सख्यं करिष्यति ।
जातः स्वांशेन भगवान् गृहे विश्वसृजो विभुः ॥ २३ ॥
विश्वसृजपत्‍नि विषुची हिच्या गर्भात तो हरी ।
विष्वक्‌सेन अशा नामे अंशावतार घेइल ॥
शंभूइंद्राशि तो मैत्री साधेल हितकारणी ॥ २३ ॥

भगवान् - सर्वगुणसंपन्न - विभुः - समर्थ - विष्वक्सेनः - परमेश्वर - तु - तर - विश्वसृजः - विश्वसृजाच्या - गृहे - घरी - विषूच्यां - विषूचीच्या ठिकाणी - स्वांशेन जातः - आपल्या अंशाने उत्पन्न झालेला असा - शंभोः सख्यं करिष्यति - शंभुनामक इंद्राशी मैत्री करील. ॥२३॥
विश्वसृजाची पत्‍नी विषूचीपासून भगवान विष्वकसेनाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील. (२३)


मनुर्वै धर्मसावर्णिः एकादशम आत्मवान् ।
अनागतास्तत्सुताश्च सत्यधर्मादयो दश ॥ २४ ॥
पुढती धर्मसावर्णी संयमी मनु होइल ।
दहा ते सत्यधर्मादी पुत्र होतील त्यास की ॥ २४ ॥

आत्मवान् - ज्ञानी - धर्मसावर्णिः - धर्मसावर्णि - एकादशमः - अकरावा - मनुः - मनु - वै (अस्ति) - खरोखर होय - अनागताः - अनागत संज्ञक - च - आणि - सत्यधर्मादयः - सत्यधर्म आदिकरून - दश तत्सुताः (भविष्यन्ति) - दहा त्याचे मुलगे होतील ॥२४॥
अत्यंत संयमी असे धर्मसावर्णी अकरावे मनू होतील. सत्य, धर्म इत्यादी त्यांचे दहा पुत्र होतील. (२४)


विहंगमाः कामगमा निर्वाणरुचयः सुराः ।
इन्द्रश्च वैधृतस्तेषां ऋषयश्चारुणादयः ॥ २५ ॥
विहंगमो कामगमो निर्वाणरुचि आदि ते ।
देवतागण होती तै सप्तर्षी अरुणादिको ॥
वैधृत नावचा इंद्र होईल पुढती असा ॥ २५ ॥

विहंगमाः कामगमाः निर्वाणरुचयः सुराः - विहंगम, कामगम व निर्वाणरुचि हे देव - च - आणि - वैधृतः तेषां इंद्रः (भविता) - वैधृत त्यांचा इंद्र होईल - अरुणादयः ऋषयः - अरुण आदिकरून ऋषि होतील. ॥२५॥
विहंगम, कामगम, निर्वाणरुची इत्यादी देवांचे गण होतील. अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैधृत नावाचा इंद्र होईल. (२५)


आर्यकस्य सुतस्तत्र धर्मसेतुरिति स्मृतः ।
वैधृतायां हरेरंशः त्रिलोकीं धारयिष्यति ॥ २६ ॥
वैधृता आर्यका पत्‍नी गर्भात धर्म सेतु हा ।
जन्मता अंशरूपाने हरि रक्षील विश्व हे ॥ २६ ॥

तत्र - त्या मन्वंतरात - धर्मसेतुः इति स्मृतः - धर्मसेतु नावाने ओळखला जाणारा - आर्यकस्य सुतः - आर्यकाचा पुत्र - वैधृतायां - वैधृता स्त्रीच्या ठिकाणी - हरेः अंशः - विष्णुचा अंशावतार म्हणून उत्पन्न होऊन - त्रिलोकीं धारयिष्यति - त्रैलोक्याचे रक्षण करील. ॥२६॥
आर्यकाची पत्‍नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रैलोक्याचे रक्षण करतील. (२६)


भविता रुद्रसावर्णी राजन् स्वादशमो मनुः ।
देववान् उपदेवश्च देवश्रेष्ठादयः सुताः ॥ २७ ॥
बारावा रुद्रसावर्णी मनू होईल पुत्र त्यां ।
देववान्‌ उपदेवो नी देव श्रेष्ठादि ते असे ॥ २७ ॥

राजन् - हे राजा - रुद्रसावर्णिः द्वादशमः मनुः - रुद्रसावर्णि बारावा मनु - भविता - होईल - देववान् उपदेवः - देववान्, उपदेव आणि - देवश्रेष्ठादयः च सुताः - देवश्रेष्ठ इत्यादि त्याचे पुत्र होतील. ॥२७॥
परीक्षिता, रुद्रसावर्णी बारावा मनू होईल. देववान, उपदेव देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील. (२७)


ऋतधामा च तत्रेन्द्रो देवाश्च हरितादयः ।
ऋषयश्च तपोमूर्तिः तपस्व्याग्नीध्रकादयः ॥ २८ ॥
ऋतधामा तदा इंद्र हरितादीहि देवता ।
आग्नीध्रक तपोमूर्ती तपस्वादि असे ऋषी ॥ २८ ॥

च - आणि - तत्र - त्या मन्वंतरात - हरितादयः - हरित आदिकरून - देवाः - देव - च - आणि - ऋतधामा इंद्रः - ऋतधामा इंद्र - च - आणि - तपोमूर्तिः तपस्वी - तपोमूर्ति तपस्वी तसेच - आग्नीध्रकादयः च ऋषयः - आग्नीध्रक आदिकरून ऋषि होतील. ॥२८॥
त्या मन्वन्तरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील. तपोमूर्ती, तपस्वी, अग्नीध्रक इत्यादी सप्तर्षी होतील. (२८)


स्वधामाख्यो हरेरंशः साधयिष्यति तन्मनोः ।
अन्तरं सत्यसहसः सुनृतायाः सुतो विभुः ॥ २९ ॥
सत्यसहास पत्‍नी जी सूनृता गर्भि तो हरी ।
स्वधाम नाम घेवोनी रक्षील मनवंतरा ॥ २९ ॥

स्वधामाख्यः - स्वधाम नावाचा - हरेः अंशः - भगवंताचा अंश - विभुः - समर्थ - सत्यसहसः - सत्यसहसाच्या - सूनृतायाः सुतः (भूत्वा) - सुनृता स्त्रीचा पुत्र होऊन - तत् मनोः अन्तरं - त्या मन्वंतराला - साधयिष्यति - रक्षील. ॥२९॥
सत्यसहीची पत्‍नी सूनृतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान या मन्वन्तराचे पालन करतील. (२९)


मनुस्त्रयोदशो भाव्यो देवसावर्णिरात्मवान् ।
चित्रसेनविचित्राद्या देवसावर्णिदेहजाः ॥ ३० ॥
देवसावर्णि तेरावा जितेंद्रिय पुढे मनू ।
चित्र सेन विचित्रादी पुत्र होतील त्याजला ॥ ३० ॥

आत्मवान् - ज्ञानी - देवसावर्णिः - देवसावर्णि - त्रयोदशः मनुः - तेरावा मनु - भाव्यः - होईल - चित्रसेनविचित्राद्याः देवसावर्णिदेहजाः - चित्रसेन, विचित्र आदिकरून देवसावर्णिचे मुलगे होतील. ॥३०॥
परम जितेंद्रिय देवसावर्णी तेरावा मनू होईल. चित्रसेन, विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील. (३०)


देवाः सुकर्मसुत्राम संज्ञा इन्द्रो दिवस्पतिः ।
निर्मोकतत्त्वदर्शाद्या भविष्यन्ति ऋषयस्तदा ॥ ३१ ॥
सुत्रामो नी सुकर्मादी देवतागण तेधवा ।
दिवस्पति तदा इंद्र सप्तर्षी तत्व दर्श ते ॥ ३१ ॥

सुकर्मसुत्रामसंज्ञाः देवाः - सुकर्म, सुत्राम आदिकरून देव - दिवस्पतिः इंद्रः - दिवस्पति हा इंद्र - तदा - त्यावेळी - निर्मोकतत्त्वदर्शाद्याः ऋषयः भविष्यन्ति - निर्मोक, तत्त्वदर्श इत्यादि सप्तर्षि होतील. ॥३१॥
सुकर्म, सुत्राम नावाचे देवगण होतील. तसेच इंद्राचे नाव दिवस्पती असेल. त्यावेळी निर्मोक, तत्त्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील. (३१)


देवहोत्रस्य तनय उपहर्ता दिवस्पतेः ।
योगेश्वरो हरेरंशो बृहत्यां संभविष्यति ॥ ३२ ॥
देवहोत्रासिजी पत्‍नी बृहती गर्भि तो हरी ।
योगेश्वर अशा नामे इंद्रासी साह्य तो करी ॥ ३२ ॥

योगेश्वरः - योगेश्वरनामक - हरेः अंशः - भगवंताचा अंश - देवहोत्रस्य तनयः - देवहोत्राचा पुत्र - दिवस्पतेः उपहर्ता - दिवस्पतीला इंद्राचे आधिपत्य मिळवून देणारा - बृहत्यां - बृहतीच्या पोटी - संभविष्यति - जन्मास येईल. ॥३२॥
देवहोत्राची पत्‍नी बृहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवस्पतीला इंद्रपद देतील. (३२)


मनुर्वा इन्द्रसावर्णिः चतुर्दशम एष्यति ।
उरुगम्भीरबुधाद्या इन्द्रसावर्णिवीर्यजाः ॥ ३३ ॥
चौदावा मनु तो होय इंद्र सावर्णि नावचा ।
उरु बुध्यादि ते पुत्र होतील त्याजला तसे ॥ ३३ ॥

वा - आणि त्याचप्रमाणे - इंद्रसावर्णिः - इंद्रसावर्णि - चतुर्दशमः मनुः - चौदावा मनु - एष्यति - होईल - उरुगंभीरबुद्‌ध्याद्याः - उरु, गंभीरबुद्धि इत्यादि - इंद्रसावर्णिवीर्यजाः - इंद्रसावर्णीचे पुत्र होतील. ॥३३॥
इंद्रसावर्णी चौदावा मनू होईल. उरु, गंभीर, बुद्धी इत्यादी त्याचे पुत्र होतील. (३३)


पवित्राश्चाक्षुषा देवाः शुचिरिन्द्रो भविष्यति ।
अग्निर्बाहुः शुचिः शुद्धो मागधाद्यास्तपस्विनः ॥ ३४ ॥
पवित्रो चाक्षुषो देव शुचि हा इंद्र तेधवा ।
अग्नि बाहू शुची शुद्ध मागधो सात ते ऋषी ॥ ३४ ॥

पवित्राः चाक्षुसाः देवाः - पवित्र व चाक्षुष नावाचे देव होतील - शुचिः इंद्रः भविष्यति - शुचि इंद्र होईल - अग्निः बाहुः शुचिः - अग्नि, बाहु, शुचि, - शुद्धः मागधाद्याः तपस्विनः - शुद्ध, मागध इत्यादि ऋषि होतील. ॥३४॥
त्यावेळी पवित्र, चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल. अग्नी, बाहू, शुची, शुद्ध, मागध इत्यादी सप्तर्षी होतील. (३४)


सत्रायणस्य तनयो बृहद्‍भानुस्तदा हरिः ।
वितानायां महाराज क्रियातन्तून्वितायिता ॥ ३५ ॥
सत्रायणास पत्‍नी जी विताना गर्भि तो हरी ।
बृहद्‌भानू अशा नामे घेईल अवतार तो ।
विस्तार कर्मकांडाचा करील हरि तेधवा ॥ ३५ ॥

महाराज - हे राजा - तदा - त्या मन्वंतरात - हरिः - विष्णु - सत्रायणस्य वितानायां - सत्रायणाच्या वितानानामक पत्नीच्या पोटी - तनयः बृहद्भानुः - पुत्ररूपाने बृहद्भानु नावाचा अवतार घेऊन - क्रियातन्तून् वितायिता - कर्मकांडातील यज्ञांचा विस्तार करील. ॥३५॥
त्यावेळी सत्रायणाची पत्‍नी वितानापासून बृहद्‌भानूच्या रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील. (३५)


राजन् चतुर्दशैतानि त्रिकालानुगतानि ते ।
प्रोक्तान्येभिर्मितः कल्पो युगसाहस्रपर्ययः ॥ ३६ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे मन्वन्तरानुवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
मन्वंतर असे चौदा घडती तिन्हि काळिही ।
चतुर्युग सहस्त्रे ती कल्पाची मानिली अशी ॥ ३६ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ तेरावा अध्याय हा ॥ ८ ॥ १३ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

राजन् - हे राजा - त्रिकालानुगतानि - तिन्ही काळात होणारी - चतुर्दश एतानि - ही चौदा मन्वंतरे - ते प्रोक्तानि - तुला सांगितली - एभिः मितः - ह्या चौदा मनूंनी योजिलेला - युगसाहस्रपर्ययः कल्पः (अस्ति) - जो हजार युगांचा काल तोच कल्प होय. ॥३६॥
परीक्षिता, ही चौदा मन्वन्तरे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात. यांच्याच द्वारे एक सहस्र चतुर्युगाच्या कल्पाच्या समयाची गणना केली जाते. (३६)


स्कंध आठवा - अध्याय तेरावा समाप्त

GO TOP