|
श्रीमद् भागवत पुराण भगवतो मोहिनीरूपं दृष्ट्वा महादेवस्य मोहः - मोहिनीरुपाने महादेवांना मोहिनी - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीबादरायणिरुवाच -
(अनुष्टुप्) वृषध्वजो निशम्येदं योषिद् रूपेण दानवान् । मोहयित्वा सुरगणान् हरिः सोममपाययत् ॥ १ ॥ वृषमारुह्य गिरिशः सर्वभूतगणैर्वृतः । सह देव्या ययौ द्रष्टुं यत्रास्ते मधुसूदनः ॥ २ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्) मोहिनी रुप घेवोनी हरिने दैत्य मोहिले । अमृतो पाजिले देवां शंकरे ऐकिले तदा ॥ १ ॥ सतीच्या सह ते नंदीवरती बैसले तसे । घेतले गण ते सर्व पातले क्षीरसागरी ॥ २ ॥
हरिः - विष्णु - योषिद्रूपेण - स्त्रीरूपाने - दानवान् - दैत्यांना - मोहयित्वा - मोहित करून - सुरगणान् - देवसमुदायांना - सोमं - अमृत - अपाययत् - पाजिता झाला. - इदं - हे - निशम्य - ऐकून - वृषध्वजः - बैल आहे चिन्ह ज्याचे असा - गिरिशः - शंकर - वृषं आरुह्य - बैलावर बसून - सर्वभूतगणैः - सर्व भूतगणांनी - वृतः - वेष्टिलेला - देव्यासह - पार्वतीसह - मधुसूदनः - श्रीविष्णु - यत्र - जेथे - आस्ते - राहतो - तत् रूपं - ते मोहिनीरूप - द्रष्टुं - पाहण्याकरिता - आययौ - आला. ॥१-२॥
श्रीशुकदेव म्हणतात - श्रीहरींनी स्त्रीचे रूप धारण करून असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजले. हे ऐकून शंकर पार्वतीसह नंदीवर बसून, समस्त भूतगणांना बरोबर घेऊन, जेथे भगवान मधुसूदन होते, तेथे त्यांच्या दर्शनासाठी गेले. (१-२)
सभाजितो भगवता सादरं सोमया भवः ।
सूपविष्ट उवाचेदं प्रतिपूज्य स्मयन्हरिम् ॥ ३ ॥
हरिने प्रेमभावाने पूजिले गौरि-शंकरा । सन्माने शिव बैसोनी हासोनी बोलले तदा ॥ ३ ॥
भगवता - श्रीविष्णुने - सादरं - सत्कारपूर्वक - उमया - उमेसहित - सभाजितः - पूजिलेला - सः भवः - तो शंकर - सूपविष्टः - स्वस्थपणाने बसलेला असा - स्मयन् - मंद हास्य करीत - हरिं - श्रीविष्णूला - प्रतिपूज्य - प्रशंसून - इदं - हे - उवाच - म्हणाला. ॥३॥
भगवान श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने गौरी-शंकरांचे स्वागत केले. तेसुद्धा स्वस्थपणे बसून भगवंतांचा सन्मान करीत स्मितहास्यपूर्वक म्हणाले. (३)
श्रीमहादेव उवाच -
देवदेव जगद्व्यापिन् जगदीश जगन्मय । सर्वेषामपि भावानां त्वमात्मा हेतुरीश्वरः ॥ ४ ॥
महादेवजी म्हणाले - देवदेवा जगद्व्यापा जगदीशा जगन्मया । सर्वेशा आत्मरुपा तू मूळ कारण तूचि की ॥ ४ ॥
देवदेव - हे देवांच्या देवा - जगद्व्यापिन् - जगाला व्यापून राहणार्या - जगदीश - त्रैलोक्याधिपते - जगन्मय - हे जगत्स्वरूपा ईश्वरा - त्वं - तू - सर्वेषाम् अपि - संपूर्णही - भावानां - पदार्थांचा - आत्मा - चालक - हेतुः - उत्पादक - ईश्वरः - स्वामी. ॥४॥
महादेव म्हणाले - देवाधिदेवा, आपण विश्वव्यापी, जगदीशरव तसेच जगत्स्वरूप आहात. सर्व चराचर पदार्थांचे मूळ कारण, ईश्वर आणि आत्मासुद्धा आपणच आहात. (४)
आद्यन्तौ अस्य यन्मध्यं इदं अन्यदहं बहिः ।
यतोऽव्ययस्य नैतानि तत्सत्यं ब्रह्म चिद्भवान् ॥ ५ ॥
आदी मध्ये नि अंती तू तुला आदी न अंत ही । सत्य चिन्मय तू ब्रह्म भेद तो तुजला नसे ॥ ५ ॥
अस्य - ह्या जगाचे - आद्यन्तौ - आदि व अंत - मध्यं - मध्य - यतः - ज्यापासून - अव्ययस्य - अविनाशी अशा ज्या तुला - एतानि - आदि, मध्य व अंत ही - न (सन्ति) - नाहीत - यत् - जे - इदं - हे - बहिः - बाहेरचे भोग्यरूप - अन्यत् - दुसरे भोक्तृरूप - अहं - अहंकाररूप - तत् - ते - सत्यं - सत्यस्वरूप - चित् - चैतन्यरूप - ब्रह्म - ब्रह्म - भवान् - तू ॥५॥
या जगताचे आदी अंत आणि मध्य ज्याच्यापासून होतात, परंतु ज्या अविनाशी स्वरूपाला आदी मध्य आणि अंत नाहीत, ज्याच्यामध्ये द्रष्टा-दृश्य, भोक्ता-भोग्य असे भेद नाहीत, ते सत्य, चिन्मात्र ब्रह्म आपणच आहात. (५)
तवैव चरणाम्भोजं श्रेयस्कामा निराशिषः ।
विसृज्योभयतः संगं मुनयः समुपासते ॥ ६ ॥
आसक्ती त्यागुनी सर्व इह नी परलोकिची । महात्मे चरणा ध्याती कल्याणहेतु साधिण्या ॥ ६ ॥
श्रेयस्कामाः - कल्याणाची इच्छा करणारे - निराशिषः - निरिच्छ - मुनयः - ऋषि - उभयतः - इहपरलोकींच्या उपभोगावरील - सङगं - आसक्तीला - विसृज्य - सोडून - तव एव - तुझ्याच - चरणांभोजं - चरणकमलाची - समुपासते - चांगली उपासना करितात. ॥६॥
कल्याण इच्छिणारे महात्मे हा लोक आणि परलोक अशा दोहोंची आसक्ती सोडून तसेच कामनांचा त्याग करून आपल्या चरणकमलांचीच आराधना करतात. (६)
त्वं ब्रह्म पूर्णममृतं विगुणं विशोकं
आनन्दमात्रमविकारमनन्यदन्यत् । विश्वस्य हेतुरुदयस्थितिसंयमानां आत्मेश्वरश्च तदपेक्षतयानपेक्षः ॥ ७ ॥
(वसंततिलका) तू ब्रह्मपूर्णचि सुधा विगुणी विशोक आनंदरूप नच ते तुजवीण कांही । नाही तुलाचि मुळि स्पर्श गुणातितो तू हेतू जगासि अससी फलस्वामि तूची । ही गोष्ट जड जिवां समजावयाला ना ती मुळीच तुजला कसली अपेक्षा ॥ ७ ॥
त्वं - तू - पूर्णं - पूर्ण - अमृतं - सुखरूप - अविकारं - विकाररहित - विगुणं - निर्गुण - विशोकं - शोकरहित - आनन्दमात्रं - केवळ आनन्दरूपी - अनन्यत् - ज्या व्यतिरिक्त जगात काही नाही असा - अन्यत् - सर्वांव्यतिरिक्त - ब्रह्म - ब्रह्मरूप - विश्वस्य - जगाची - उदयस्थितिसंयमानां - उत्पत्ति, स्थिती व संहार ह्यांना - हेतुः - कारणीभूत - च - आणि - तदपेक्षया - त्या जीवाच्या अपेक्षेमुळे - आत्मेश्वरः - जीवात्म्यांचा स्वामी - (स्वयं) अनपेक्षः - स्वतः कशाचीही अपेक्षा न करणारा. ॥७॥
आपण अमृतस्वरूप, सर्व प्राकृत गुणांपासून रहित, शोकाच्या सावलीपासूनसुद्धा दूर, स्वतः परिपूर्ण ब्रह्म आहात. आपण केवळ आनंदस्वरूप व निर्विकार आहात. आपल्यापासून वेगळे असे काही नाही, परंतु आपण सर्वांपासून वेगळे आहात. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे परम कारण आहात. आपण सर्व जीवांच्या शुभाशुभ कर्मांचे फळ देणाते आहात. परंतु ही गोष्टसुद्धा जीवांच्या अपेक्षेनुसारच सांगितली जाते. वास्तविक आपण सर्व अपेक्षारहित आहात. (७)
एकस्त्वमेव सदसद् द्वयमद्वयं च
स्वर्णं कृताकृतमिवेह न वस्तुभेदः । अज्ञानतस्त्वयि जनैर्विहितो विकल्पो । यस्माद् गुणव्यतिकरो निरुपाधिकस्य ॥ ८ ॥
अद्वैत द्वैतरुप तू तुचि एकमात्र आभूषणे नि कनको नच भिन्न जैसे । ना जाणिताच तुजला करितात भेद नाही उपाधि तुजला गुणरूप तूची ॥ ८ ॥
त्वं - तू - एक एव - एकटाच - सत् - सद्रूप - असत् - असद्रूप - द्वयं - द्वैतरूपी - च - आणि - अद्वयं - अद्वैतरूपी - इह - येथे - कृताकृतं - कार्यरूपातील व मूळ रूपातील - स्वर्णम् इव - सुवर्णाप्रमाणे - वस्तुभेदः - मूळ तत्त्वांत भेद - न (अस्ति) - नाही - जनैः - लोकांनी - अज्ञानतः - अज्ञानाने - त्वयि - तुझ्याठिकाणी - विकल्पः - भेदभाव - विहितः - कल्पिला आहे - यस्मात् - कारण - निरुपाधिकस्य - उपाधिरहित अशा - गुणव्यतिकरः (अस्ति) - गुणसंबंधामुळेच भासणारी आहे. ॥८॥
स्वामी, जसे अलंकाररूपाने असणारे सोने आणि मूळ सोने यांमध्ये काही अंतर नाही, तसेच कार्य आणि कारण, द्वैत आणि अद्वैत, जे काही आहे ते सर्व एकमात्र आपणच आहात. आपल्या खर्या स्वरूपाला लोकांनी न जाणल्याकारणाने आपल्यामध्ये नाना प्रकारचे भेदभाव आणि विकल्पांची त्यांनी कल्पना करून ठेवली आहे. यामुळेच आपल्यामध्ये कोणतीही उपाधी नसताता गुणांमुळे भेद आहे, असे वाटते. (८)
त्वां ब्रह्म केचिदवयन्त्युत धर्ममेके
एके परं सदसतोः पुरुषं परेशम् । अन्येऽवयन्ति नवशक्तियुतं परं त्वां केचिन्महापुरुषमव्ययमात्मतन्त्रम् ॥ ९ ॥
ते ब्रह्म कोणि वदती अन कोणि धर्म कोणी पुरूष म्हणती प्रकृती कुणी ते । योगादि शक्ति वदती कुणि ते तुला रे ते पूर्वजोचि वदती अविनाश तू तो ॥ ९ ॥
केचित् - कित्येक लोक - त्वां - तुला - ब्रह्म - ब्रह्म असे - अवयन्ति - समजतात - उत - त्याचप्रमाणे - एके - काही लोक - धर्मं - धर्म असे - एके - दुसरे कोणी - सदसतोः परं - सताहून व असताहून पलीकडे असणारा - परेशं - परमेश्वर समर्थ असा - पुरुषं - सर्वांच्या हृदयात वास्तव्य करणारा. ॥९॥
प्रभो, काहीजण आपल्याला ब्रह्म समजतात, तर दुसरे कोणी धर्म म्हणून आपले वर्णन करतात. तसेच कोणी आपल्याला प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडे असणारे परमेश्वर मानतात, तर काही विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, प्रह्वी, सत्या, ईशाना आणि अनुग्रहा - या नऊ शक्तींनी युक्त परमपुरुष मानतात, तर दुसरे काहीजण स्वतंत्र, अविनाशी, महापुरुष मानतात. (९)
नाहं परायुरृषयो न मरीचिमुख्या
जानन्ति यद्विरचितं खलु सत्त्वसर्गाः । यन्मायया मुषितचेतस ईश दैत्य मर्त्यादयः किमुत शश्वदभद्रवृत्ताः ॥ १० ॥
ब्रह्मा नि मीनि मरिची इतरे मुनींना सृष्टी तुझी न कळते मग काय रूप । मायेत जे वशि असे असुरो नि अन्य रुपा तुझ्या मग कसे समजोनि घेती ॥ १० ॥
अन्ये - दुसरे - त्वां - तुला - नवशक्तियुतं - नऊ शक्तींनी युक्त असा - परं (पुरुषं) - श्रेष्ठ पुरुष - केचित् - कोणी - अव्ययं - अविनाशी - आत्मतन्त्रं - स्वतंत्र - महापुरुषं - पुरुषोत्तम असे - अवयन्ति - मानितात - ईश - हे परमेश्वरा - अहं - मी - परायुः - पुष्कळ आयुष्य असणारा ब्रह्मदेव - मरीचिमुख्याः - मरीचिप्रमुख - ऋषयः - ऋषि - सत्त्वसर्गाः - सत्त्वगुणापासून उत्पन्न झालेले असून - यन्मायया - ज्याच्या मायेने - मुषितचेतसः - चोरिली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - यद्विरचितं - ज्याने रचिलेल्या सृष्टिला - खलु - खरोखर - न जानन्ति - जाणत नाहीत - उत - मग - शश्वत् - नेहमी - अभद्रवृत्ताः - पापकर्म करणारे - दैत्यमर्त्यादयः - दैत्य व मानव - किम् (जानन्ति) - कसे जाणणार ? ॥१०॥
प्रभो, मी, ब्रह्मदेव आणि मरीची इत्यादी ऋषी - जे सत्त्वगुणी सृष्टीतील आहेत, तेसुद्धा आपण बनविलेल्या सृष्टीचे रहस्य जाणत नाहीत, तर ज्यांचे चित्त मायेने मोहित आहे, असे नेहमी रजोगुणी व तमोगुणी कर्मे करणारे असुर आणि मनुष्य ते रहस्य काय जाणणार ? (१०)
स त्वं समीहितमदः स्थितिजन्मनाशं
भूतेहितं च जगतो भवबन्धमोक्षौ । वायुर्यथा विशति खं च चराचराख्यं सर्वं तदात्मकतयावगमोऽवरुन्त्से ॥ ११ ॥
तू सर्व व्यापि अन ज्ञानस्वरूप तूची वायू परीच वससी सगळ्यात तू तो । जन्मस्थिती नि लय कर्म नि बंध मोक्ष सर्वास तू समजसी प्रभु एकटा तू ॥ ११ ॥
यथा - ज्याप्रमाणे - वायुः - वायु - चराचराख्यं - स्थावरजंगमात्मक सृष्टीत - च - आणि - खं - आकाशात - विशति - प्रवेश करितो - अवगमः - ज्ञानरूपी - सः - तो - त्वं - तू - समीहितं - स्वतः रचिलेले - अदः - हे जग - जगतः - जगाचे - स्थितिजन्मनाशं - रक्षण, उत्पादन व नाश - भूतेहितं - प्राण्यांचे इच्छित - च - आणि - भवबन्धमोक्षौ - संसारबंधन व मोक्ष हे दोन्ही - सर्वं - सर्व काही - तदात्मकतया - ईश्वरमय असल्यामुळे - अवरुंत्से - व्यापितोस. ॥११॥
प्रभो ! आपण सर्वात्मक आणि ज्ञानस्वरूप आहात. म्हणून वायूप्रमाणे आकाशात अदृश्य राहूनसुद्धा आपण सर्व चराचर जगतामध्ये नेहमी विद्यमान असता. तसेच त्यांची कार्ये, स्थिती, जन्म, नाश, प्राण्यांचे कर्म तसेच संसाराचे बंध-मोक्ष हे सर्व जाणता. (११)
(अनुष्टुप्)
अवतारा मया दृष्टा रममाणस्य ते गुणैः । सोऽहं तद् द्रष्टुमिच्छामि यत्ते योषिद् वपुर्धृतम् ॥ १२ ॥
(अनुष्टुप्) प्रभो तू गुण घेवोनी लीला तैशा करावया । अनेक रूप तू घेशी मी त्या रूपासि वंदितो ॥ आता ते मोहिनी रूप देवा मी पाहु इच्छितो ॥ १२ ॥
मया - मी - गुणैः - गुणांनी - रममाणस्य - रममाण होणार्या - ते - तुझे - अवताराः - अवतार - दृष्टाः - पाहिले आहेत - सः - तो - अहं - मी - ते - तुझ्याकडून - यत् - जे - योषिद्वपुः - स्त्री शरीर - धृतं - धरिले गेले - तत् - ते - द्रष्टुं - पाहाण्यास - इच्छामि - इच्छितो. ॥१२॥
आपण गुणांचा स्वीकार करून लीला करण्यासाठी पुष्कळसे अवतार घेता, ते मी पाहिले आहेतच. आता मी आपण घेतलेला स्त्रीरूप अवतार पाहू इच्छितो. (१२)
येन सम्मोहिता दैत्याः पायिताश्चामृतं सुराः ।
तद् दिदृक्षव आयाताः परं कौतूहलं हि नः ॥ १३ ॥
जेणे तू मोहिले दैत्या देवांना अमृतो दिले । आम्ही सर्व तशा रूपा पाहण्या पातलो इथे ॥ औत्सुक्य मनि ते थोर मोहिनी रूप पाहण्या ॥ १३ ॥
येन - ज्या रूपाने - दैत्याः - दैत्य - संमोहिताः - मोहित केले गेले - च - आणि - सुराः - देव - अमृतं - अमृत - पायिताः - पाजिले गेले - तत् दिदृक्षवः - ते पाहण्याची इच्छा करणारे - आयाताः - आलो आहो - हि - कारण - नः - आम्हांला - परं - फारच - कौतुहलं (अस्ति) - कौतुक वाटत आहे. ॥१३॥
ज्याच्याद्वारे दैत्यांना मोहित करून आपण देवतांना अमृत पाजले, ते रूप पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हांला ते पाहण्याची उत्कंठा आहे. (१३)
श्रीशुक उवाच -
एवं अभ्यर्थितो विष्णुः भगवान् शूलपाणिना । प्रहस्य भावगम्भीरं गिरिशं प्रत्यभाषत ॥ १४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - शंकरे भगवंताला करिता प्रार्थना अशी । गंभीर हरि होवोनी हासोनी बोलले हरा ॥ १४ ॥
शूलपाणिना - शंकराने - एवं - याप्रमाणे - अभ्यर्थितः - प्रार्थिलेला - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - विष्णुः - विष्णु - भावगंभीरं - गूढ विचार मनात येऊन गंभीरपणाने - प्रहस्य - हसून - गिरिशं - शंकराला - प्रत्यभाषत - म्हणाला. ॥१४॥
श्रीशुक म्हणतात - जेव्हा शंकरांनी भगवान विष्णूंना अशी प्रार्थना केली, तेव्हा ते गूढपणे हसून शंकरांना म्हणाले. (१४)
श्रीभगवानुवाच -
कौतूहलाय दैत्यानां योषिद्वेषो मया कृतः । पश्यता सुरकार्याणि गते पीयूषभाजने ॥ १५ ॥
श्री विष्णुभगवान् म्हणाले - अमृत कलशो दैत्या हाताला लागला तदा । कराया देवताकार्य मी ते स्त्रीरूप घेतले ॥ १५ ॥
पीयूषभाजने (शत्रुहस्ते) गते - शत्रूंच्या हाती अमृतकलश लागला असता - सुरकार्याणि - देवकार्य - पश्यता - करणार्या - मया - माझ्याकडून - दैत्यानां - दैत्यांना - कौतुहलाय - आश्चर्य वाटण्याकरिता - योषिद्वेषः - स्त्रीवेष - कृतः - धारण केला. ॥१५॥
श्रीभगवान म्हणाले - ज्यावेळी अमृतकलश दैत्यांच्या हाती गेला होता, तेव्हा देवतांचे काम करण्यासाठी आणि दैत्यांचे मन मोहविण्यासाठी मी ते स्त्रीरूप धारण केले होते. (१५)
तत्तेऽहं दर्शयिष्यामि दिदृक्षोः सुरसत्तम ।
कामिनां बहु मन्तव्यं संकल्पप्रभवोदयम् ॥ १६ ॥
इच्छिता पाहणे रूपा अवश्य दाखवीन मी । परी ते कामपुरुषा आवडे कामचेतिण्या ॥ १६ ॥
सुरसत्तम - हे देवश्रेष्ठा - अहं - मी - कामिनां - कामुक पुरुषांना - बहुमन्तव्यं - फारच आवडणारे - संकल्पप्रभवोदयं - कामोत्पादक - तत् - ते स्त्रीरूप - दिदृक्षोः - पाहण्याची इच्छा करणार्या - ते - तुला - दर्शयिष्यामि - दाखवितो. ॥१६॥
हे महादेवा, आपण ते पाहू इच्छिता म्हणून मी आपल्याला ते रूप दाखवीन. परंतु ते रूप कामी पुरुषांना विशेष आवडणारे असून कामभावना उत्तेजित करणारे आहे. (१६)
श्रीशुक उवाच -
इति ब्रुवाणो भगवान् तत्रैवान्तरधीयत । सर्वतश्चारयन् चक्षुः भव आस्ते सहोमया ॥ १७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - भगवंत असे शब्द बोलोनी गुप्त जाहले । सतीच्या सह ते सांब चौफेर पाहु लागले ॥ १७ ॥
इति - याप्रमाणे - ब्रुवाणः - बोलणारा - भगवान् - विष्णु - तत्र एव - तेथेच - अन्तरधीयत - गुप्त झाला - सर्वतः - सभोवार - चक्षुः - डोळे - चारयन् - फिरविणारा - भवः - शंकर - उमयासह - पार्वतीसह - आस्ते - होता. ॥१७॥
श्रीशुक म्हणतात - असे बोलता बोलताच भगवान तेथेच अंतर्धान पावले आणि भगवान शंकर पार्वतीसह चोहोकडे पाहात तेथेच बसून राहिले. (१७)
ततो ददर्शोपवने वरस्त्रियं
विचित्रपुष्पारुणपल्लवद्रुमे । विक्रीडतीं कन्दुकलीलया लसद् दुकूलपर्यस्तनितम्बमेखलाम् ॥ १८ ॥
(इंद्रवज्रा) उद्यान तेथे दिसले द्वयांना रंगीत पुष्पे नवतीहि वृक्षा । कोणी तरूणी तइ चेंडु झेली सुरेख वस्त्रो अन कर्धनी ही ॥ १८ ॥
ततः - नंतर - विचित्रपुष्पारुणपल्लवद्रुमे - चित्रविचित्र फुले आणि तांबूस पाने यांनी युक्त असे वृक्ष ज्यामध्ये आहेत अशा - उपवने - बागेत - कन्दुकलीलया - चेंडूचा खेळ - विक्रीडतीं - खेळणार्या - लसद्दुकूलपर्यस्तनितम्बमेखला - तेजस्वी रेशमी वस्त्राने वेष्टिलेल्या कंबरेवर जिने कमरपटटा धारण केला आहे अशा - वरस्त्रियं - सुंदर स्त्रीला - ददर्श - पाहता झाला. ॥१८॥
इतक्यात त्यांना एक उपवन दिसले, त्यामध्ये रंगीबेरंगी फुले आणि लालसर पालवी असलेले वृक्ष होते. त्या उपवनात एक सुंदर स्त्री चेंडू जमिनीवर आपटून खेळत होती. तिने रेशमी पैठणी परिधान केलेली असून तिच्यावर कमरपट्टा शोभत होता. (१८)
आवर्तनोद्वर्तनकम्पितस्तन
प्रकृष्टहारोरुभरैः पदे पदे । प्रभज्यमानामिव मध्यतश्चलउ पदप्रवालं नयतीं ततस्ततः ॥ १९ ॥
झेलुन घेता तइ कंदुकाला तो हार तैसे स्तनही हलून । वाटे नितंबो लचकेल काय ती चालताना ठुमके तशीच ॥ १९ ॥
पदेपदे - प्रत्येक पावलाला - आवर्तनोद्वर्तनकम्पितस्तनप्रकृष्टहारोरुभरैः - वाकणे व उभे राहणे ह्यायोगे कंपयुक्त झालेल्या स्तनांनी व मोठया हारांच्या भारांनी - मध्यतः - कटिभागात - प्रभज्यमानां इव - मोडल्याप्रमाणे दिसणार्या - ततः ततः - त्या त्या ठिकाणाहून - चलत्पदप्रवालं - चंचल असे कोवळ्या पानासारखे पाऊल - नयन्तीं - उचलणार्या - ॥१९॥
चेंडू जमिनीवर आपटून आणि नंतर उडी मारून पकडल्यामुळे तिचे स्तन आणि त्यावरील हार हालत होते. त्यावेळी वाटत होते की, जणू त्यांच्या भाराने मोडू शकणारी बारीक कंबर प्रत्येक पावलागणिक सावरीत ती आपली पालवीसारखी तांबूस सुकुमार पावले टाकीत आहे. (१९)
दिक्षु भ्रमत्कन्दुकचापलैर्भृशं
प्रोद्विग्नतारायतलोललोचनाम् । स्वकर्णविभ्राजितकुण्डलोल्लसत् कपोलनीलालकमण्डिताननाम् ॥ २० ॥
पडे जधी चेंडु हि सावरी तो बघे तदा चंचल पापण्यांनी । ती कुंडले नी कुरुळेहि केस मुखा नि गाला विभवीत तैसे ॥ २० ॥
दिक्षु - दाही दिशांमध्ये - भ्रमत्कंदुकचापलैः - फिरणार्या चेंडूच्या चपलतेमुळे - भृशं - अत्यंत - प्रोद्विग्नतारायतलोललोचनां - कावर्या-बावर्या बाहुल्या झाल्यामुळे चंचल झाले आहेत दीर्घ नेत्र जिचे अशा - स्वकर्णविभ्राजितकुंडलोल्लसत्कपोलनीलालकमण्डीताननां - आपल्या कानावर शोभणार्या कुंडलांनी अधिक सुशोभित झालेले गाल व काळेभोर केस यांच्यायोगे शोभणारे आहे मुख जिचे अशा ॥२०॥
उसळणारा चेंडू जेव्हा इकडे तिकडे पडत असे, तेव्हा ती झेप घेऊन तो अडवीत असे. त्यामुळे तिचे भिरभिरणारे आकर्ण नेत्र थोडेसे त्रासल्यासारखे होत असत. कानातील कुंडलांचे तेज तिच्या गालांवर झगमगत होते आणि काळे भर केस त्यांच्यावर भुरभुरत होते. त्यामुळे तिचा चेहरा अधिकच शोभत होता. (२०)
श्लथद् दुकूलं कबरीं च विच्युतां
सन्नह्यतीं वामकरेण वल्गुना । विनिघ्नतीमन्यकरेण कन्दुकं विमोहयन्तीं जगदात्ममायया ॥ २१ ॥
वस्त्रो कधी ते ढळता तशीच वेणी सुटे तै तशि सावरी ती । ती सव्य हाता उचली जधी तै माये जगाते जणु मोहवी की ॥ २१ ॥
श्लथद्दुकूलं - शिथिल अशा रेशमी वस्त्राला - च - आणि - विच्युतां - सुटून गेलेल्या - कबरीं - वेणीला - वल्गुना - सुंदर - वामकरेण - डाव्या हाताने - सन्नह्यतीं - बांधणार्या - अन्यकरेण - दुसर्या हाताने - कन्दुकं - चेंडूला - विनिघ्नतीं - ताडन करणार्या - आत्ममायया - स्वतःच्या मायेने - जगत् - जगाला - विमोहयन्तीं - मोहित करणार्या अशा. ॥२१॥
जेव्हा तिची पैठणी ढळत असे आणि वेणीतील केस सुटत असत, तेव्हा सुकुमार अशा डाव्या हाताने ती ते सावरीत असे आणि उजव्या हाताने चेंडू जमिनीवर आपटीत असे. अशा रीतीने सर्व जगाला आपल्या लीलेने भुलवीत असे. (२१)
तां वीक्ष्य देव इति कन्दुकलीलयेषद्
व्रीडास्फुटस्मितविसृष्टकटाक्षमुष्टः । स्त्रीप्रेक्षणप्रतिसमीक्षणविह्वलात्मा नात्मानमन्तिक उमां स्वगणांश्च वेद ॥ २२ ॥
ती खेळता चेंडुहि पाहिले यां लाजोनि थोडे तिरक्याच नेत्रे । नी श्रीहराचा सुटलाच ताबा न भान त्यांना सति नी गणांचा ॥ २२ ॥
देवः - शंकर - तां स्त्रियं - त्या स्त्रीला - वीक्ष्य - पाहून - इति - याप्रमाणे - कंदुकलीलया - चेंडूच्या खेळण्याने - ईषद्व्रीडास्फुटस्मितविसृष्टकटाक्षमुष्टः - किंचित लज्जेमुळे अस्पष्ट हास्यासह सोडिलेल्या कटाक्षाने चोरिला गेलेला - स्त्रीप्रेक्षणप्रतिसमीक्षणविह्वलात्मा - स्त्रीच्या अवलोकनाने ज्याचे चित्त फारच विव्हळ झाले आहे असा - आत्मानं - स्वतःला - अंतिके - जवळ असणार्या - उमां - पार्वतीला - च - आणि - स्वगणान् - आपल्या शैवगणांना - न वेद - जाणता झाला नाही. ॥२२॥
चेंडूने खेळता खेळता तिने शंकरांकडे बघितले. अशा तिला पाहताच शिव स्वतःला विसरले. ते मोहिनीकडे निरखून पाहता पाहता तिच्या कटाक्षांनी इतके बेभान झाले की, त्यांना स्वतःची शुद्ध राहिली नाही. मग जवळ बसलेल्या पार्वतीचे आणि गणांचे तरी भान कोठून असणार ? (२२)
तस्याः कराग्रात्स तु कन्दुको यदा
गतो विदूरं तमनुव्रजत्स्त्रियाः । वासः ससूत्रं लघु मारुतोऽहरद् भवस्य देवस्य किलानुपश्यतः ॥ २३ ॥
नी एकदा चेंडु सुटोनि जाता ती मोहिनी पाठिशि ही पळाली । आलाहि वायू अन वस्त्र तैसे तै कर्धनीच्या सहची उडाले ॥ २३ ॥
तस्याः - तिच्या - कराग्रात् - हातातून - सः - तो - कंदुकः - चेंडू - तु - तर - यदा - जेव्हा - विदूरं - लांब - गतः - जाऊन पडला - तं - त्या चेंडूच्या - अनुव्रजस्त्रियाः - मागून जाणार्या स्त्रीचे - ससूत्रं - कंबरपटटयासह - लघु वासः - पातळ झिरझिरीत वस्त्र - मारुतः - वायु - भवस्य देवस्य अनुपश्यतः - शंकरदेव पाहात असता - किल - खरोखर - अहरत् - हरण करिता झाला. ॥२३॥
एकदा मोहिनीच्या हातातून चेंडू उसळी मारून थोडासा लांब गेला. तीसुद्धा त्याच्या पाठीमागे धावली. त्यावेळी शंकर पाहात असतानाच वार्याने तिची सळसळणारी साडी कमरपट्ट्यासह वर उडाली. (२३)
(अनुष्टुप्)
एवं तां रुचिरापाङ्गीं दर्शनीयां मनोरमाम् । दृष्ट्वा तस्यां मनश्चक्रे विषज्जन्त्यां भवः किल ॥ २४ ॥
(अनुष्टुप्) अंग प्रत्यंग रुचिरा मोहिनी ती मनोरमा । खिळता दृष्टि प्रत्यांगी रमे मन तिथेच की ॥ आकृष्ट हर ते झाले त्यांना ती भासली तशी ॥ २४ ॥
भवः - शंकर - एवं - याप्रमाणे - रुचिरापाङ्गीं - सुंदर कटाक्ष फेकणार्या - दर्शनीयां - पाहण्यास योग्य अशा - मनोरमां - मनोहर - तां - त्या स्त्रीला - दृष्ट्वा - पाहून - विषज्जन्त्यां तस्यां - आकुंचित केलेल्या दृष्टीने आसक्ती दाखविणार्या त्या स्त्रीच्या ठिकाणी - किल - खरोखर - मनः - मन - चक्रे - ठेविता झाला. ॥२४॥
मोहिनीचे अंग प्रत्यंग अत्यंत सुंदर आणि नयनमनोहर होते. जेथे दृष्टी पडेल, तेथे मन गुंतत असे. मोहिनीसुद्धा आपल्यावर आसक्त आहे, असे वाटून शंकर तिच्याकडे अत्यंत आकर्षित झाले. (२४)
तयापहृतविज्ञानः तत्कृतस्मरविह्वलः ।
भवान्या अपि पश्यन्त्या गतह्रीस्तत्पदं ययौ ॥ २५ ॥
हिराविले विवेकाते हराच्या मोहिनी हिने । कामातुरचि होवोनी लज्जाही सोडिली हरे ॥ समक्ष सतिच्या गेले तिच्या मागे तदा शिवो ॥ २५ ॥
तया - तिने - अपहृतविज्ञानः - ज्याची विचारशक्ती हरण केली आहे असा - तत्कृतस्मरविह्वलः - उत्पन्न केलेल्या कामवासनेमुळे विव्हळ झालेला - गतह्लीः (भूत्वा) - निर्लज्ज होऊन - भवान्याः पश्यंत्याः अपि - पार्वती पाहात असताही - तत्पदं - तिच्याजवळ - ययौ - गेला. ॥२५॥
तिने त्यांचा विवेक हिरावून घेतला. तिच्या हावभावांनी ते कामातुर झाले आणि पार्वतीसमोर असतानाच लज्जा सोडून ते तिच्या पाठोपाठ गेले (२५)
सा तं आयान्तमालोक्य विवस्त्रा व्रीडिता भृशम् ।
निलीयमाना वृक्षेषु हसन्ती नान्वतिष्ठत ॥ २६ ॥
मोहिनी वस्त्रहीना ती लाजली शिव पाहता । एकेक वृक्ष सोडोनी लपता पळली पुढे ॥ २६ ॥
तं - त्या शंकराला - आयान्तं - येताना - आलोक्य - पाहून - भृशं - अत्यंत - व्रीडिता - लाजलेली - विवस्त्रा - नग्न - सा - ती स्त्री - वृक्षेषु - वृक्षांच्या आड - निलीयमाना - लपणारी - हसंती - हास्य करीत - अन्वतिष्ठत - उभी राहिली नाही. ॥२६॥
शंकर आपल्याकडे येत असलेले पाहून वस्त्र ढळलेली ती अत्यंत लज्जित झाली. ती एका झाडाआडून दुसर्या झाडाआड जाऊन लपत होती आणि हसत होती. परंतु एके ठिकाणी थांबत नसे. (२६)
तां अन्वगच्छद् भगवान् भवः प्रमुषितेन्द्रियः ।
कामस्य च वशं नीतः करेणुमिव यूथपः ॥ २७ ॥
शिवाचा सुटता ताबा झाले कामवशो तसे । हत्तिणी पाठि जै हत्ती धावले शिवही तसे ॥ २७ ॥
च - त्यानंतर - कामस्य - मदनाच्या - वशं - नियंत्रणात - नीतः - नेलेला - प्रमुषितेन्द्रियः - ज्याची इंद्रिये चोरली गेली आहेत असा - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - भवः - शंकर - यूथपः - हत्तीच्या कळपाचा नायक - करेणुम् इव - हत्तिणीकडे जातो तसा - तां अन्वगच्छत् - तिच्या मागोमाग गेला. ॥२७॥
भगवान शंकरांचे मन त्यांच्या अधीन राहिले नाही. ते कामवश झाले. म्हणून हत्ती हत्तिणीच्या पाठीमागे धावत जातो, त्याप्रमाणे तिच्या मागे मागे ते धावू लागले. (२७)
सोऽनुव्रज्यातिवेगेन गृहीत्वानिच्छतीं स्त्रियम् ।
केशबन्ध उपानीय बाहुभ्यां परिषस्वजे ॥ २८ ॥
वेगाने धावले मागे वेणी ती धरिली तिची । नसे इच्छातिची तैही धरिली हृदयास ती ॥ २८ ॥
सः - तो शंकर - अतिवेगेन - मोठया वेगाने - अनुव्रज्य - मागोमाग जाऊन - अनिच्छतीं - निष्काम अशा - स्त्रियं - त्या स्त्रीच्या - केशबंधे - वेणीला - गृहीत्वा - धरून - उपानीय - आणून - बाहुभ्यां - दोन भुजांनी - परिषस्वजे - आलिंगन देता झाला. ॥२७-२८॥
वेगाने धावत जाऊन त्यांनी तिचा पाठलाग केला व तिची वेणी पकडली आणि तिची इच्छा नसतानाही तिला बाहुपाशात पकडले. (२८)
सोपगूढा भगवता करिणा करिणी यथा ।
इतस्ततः प्रसर्पन्ती विप्रकीर्णशिरोरुहा ॥ २९ ॥
हत्तीण धरि जै हत्ती शिव आलिंगि तै तिला । धड्पडे सुटण्यासी ती तदा केशीहि पांगले ॥ २९ ॥
इतस्ततः - इकडेतिकडे - प्रसर्पन्ती - पळण्यासाठी धडपड करणारी - विप्रकीर्णशिरोरुहा - जिचे केस विस्कळित झाले आहेत अशी - सा - ती स्त्री - यथा - ज्याप्रमाणे - करिणा - हत्तीने - करिणी - हत्तीण - भगवता - शंकराकडून - उपगूढः - आलिंगिली गेली. ॥२९॥
हत्ती हत्तिणीला आलिंगन देतो, तसे भगवान शंकरांनी तिला आलिंगन दिले. इकडे तिकडे सरकून निसटण्याचा तिने प्रयत्न केला, तेव्हा तिचे केस विस्कटले. (२९)
आत्मानं मोचयित्वाङ्ग सुरर्षभभुजान्तरात् ।
प्राद्रवत्सा पृथुश्रोणी माया देवविनिर्मिता ॥ ३० ॥
सुंदरी भगवंताने मायेने निर्मिली असे । सुटली मिठि सोडोनी पळाली गतिने पुढे ॥ ३० ॥
अङग - हे परीक्षित राजा - पृथुश्रोणी - विशाल कटीची - देवविनिर्मिता - ईश्वराने निर्मिलेली - सा - ती - माया - मायिक स्त्री - सुरर्षभभुजान्तरात् - देवश्रेष्ठ शंकराच्या बाहूंच्या कचाटयांतून - आत्मानं - स्वतःला - मोचयित्वा - सोडवून घेऊन - प्राद्रवत् - पळाली. ॥३०॥
हे राजा, वास्तविक ती सुंदरी म्हणजे भगवंतांनी रचलेली मायाच होती. म्हणून तिने शंकरांच्या बाहुपाशातून स्वतःला सोडविले आणि ती वेगाने पळून गेली. (३०)
तस्यासौ पदवीं रुद्रो विष्णोरद्भुतकर्मणः ।
प्रत्यपद्यत कामेन वैरिणेव विनिर्जितः ॥ ३१ ॥
मोहिनी वेशधारी त्या विष्णुच्या पाठिशी हरो । धावता वाटले ऐसे विजयी कामदेव तो ॥ ३१ ॥
असौ - हा - रुद्रः - शंकर - वैरिणा कामेन - शत्रु अशा मदनाने - विनिर्जितः इव - जिंकिल्याप्रमाणे जणु - तस्य - त्या - अद्भुतकर्मणः - आश्चर्यजनक कृत्य करणार्या - विष्णोः - स्त्रीरूपी विष्णुच्या - पदवीं - मागोमाग - प्रत्यपद्यत - धावत सुटला. ॥३१॥
शंकरसुद्धा त्या अद्भुत कृत्य करणार्या भगवान विष्णूंच्या मागे मागे शत्रू असणार्या कामाने जिंकल्याप्रमाणे धावू लागले. (३१)
तस्यानुधावतो रेतः चस्कन्दामोघरेतसः ।
शुष्मिणो यूथपस्येव वासितामनुधावतः ॥ ३२ ॥
कामूक हत्तिणी मागे धावे हत्ती मदे जसा । धावला शिव तो तैसा अमोघ वीर्य ही तरी ॥ सांडले जाग जागीच मोहात मोहिनीचिया ॥ ३२ ॥
वासितां - ऋतूमती धेनूच्या - अनुधावतः - मागोमाग धावणार्या - यूथपस्य - कळपांचा नायक अशा - शुष्मिणः - पोळ सोडलेल्या बैलाच्या - इव - प्रमाणे - (तां स्त्रियं) अनुधावतः - त्या स्त्रीच्या मागोमाग धावत असता - अमोघरेतसः - ज्याचे वीर्य फुकट जावयाचे नाही अशा - तस्य - त्या शंकराचे - रेतः - वीर्य - चस्कंद - खाली पडले. ॥३२॥
कामुक हत्तिणीच्या मागे धावणार्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते मोहिनीच्या मागे मागे धावत होते. ते अमोघवीर्य असूनही तिच्या मागे धावताना त्यांचे स्खलन झाले. (३२)
यत्र यत्रापतन् मह्यां रेतस्तस्य महात्मनः ।
तानि रूप्यस्य हेम्नश्च क्षेत्राण्यासन् महीपते ॥ ३३ ॥
भगवान् शंकराचे ते ज्या ज्या जागेसि वीर्य ते । सांडले तेथ तेथे त्या सुवर्णखाणि जाहल्या ॥ ३३ ॥
महीपते - हे परीक्षित राजा - मह्यां - जमिनीवर - यत्र यत्र - ज्या ज्या ठिकाणी - महात्मनः तस्य - थोर मनाच्या त्या शंकराचे - रेतः - वीर्य - अपतत् - पडले - तानि - ती स्थाने - रूपस्य - चांदीच्या - च - आणि - हेम्नः - सोन्याच्या - क्षेत्राणि - खाणी - आसन् - झाल्या. ॥३३॥
हे राजा, भगवान शंकरांचे वीर्य पृथ्वीवर जेथे जेथे पडले तेथे तेथे सोन्या-चांदीच्या खाणी तयार झाल्या. (३३)
सरित्सरःसु शैलेषु वनेषु उपवनेषु च ।
यत्र क्व चासन् ऋषयः तत्र सन्निहितो हरः ॥ ३४ ॥
परीक्षिता ! नद्या बागा वन पर्वत आश्रमो । जिथे ऋषी निवासी तै मोहिनी-हर धावले ॥ ३४ ॥
सरित्सरस्सु - नद्या व सरोवरे या ठिकाणी - शैलेषु - पर्वतांच्या ठिकाणी - वनेषु - अरण्यांच्या ठिकाणी - च - आणि - उपवनेषु - बागबगीच्यात - यत्र - ज्या - क्वच - कोठेही - ऋषयः - ऋषि - आसन् - होते - तत्र - तेथे - हरः - शंकर - संनिहितः - गेला. ॥३४॥
नद्या, सरोवरे, पर्वत, वने उपवने, तसेच जेथे जेथे ऋषी निवास करीत होते तेथे तेथे मोहिनीच्या पाठोपाठ शंकर गेले. (३४)
स्कन्ने रेतसि सोऽपश्यत् आत्मानं देवमायया ।
जडीकृतं नृपश्रेष्ठ सन्न्यवर्तत कश्मलात् ॥ ३५ ॥
वीर्यपात तसा होता शंकरा स्मृति जाहली । ठकलो भगवन्माये स्मरोनी दुःखि जाहले ॥ ३५ ॥
नृपश्रेष्ठ - हे राजश्रेष्ठा - रेतसि स्कन्ने - वीर्य गळले असता - सः - तो शंकर - कश्मलात् - मोहापासून - संन्यवर्तत - माघारा फिरला - आत्मानं - स्वतःला - देवमायया - भगवंताच्या मायेने - जडीकृतं - वेडा बनविला असे - अपश्यत् - पाहाता झाला. ॥३५॥
हे परीक्षिता, वीर्यपात झाल्यानंतर भगवंतांच्या मायेने आपल्याला ठकविल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतःला त्या लाजिरवाण्या प्रसंगातून सावरले. (३५)
अथ अवगतमाहात्म्य आत्मनो जगदात्मनः ।
अपरिज्ञेयवीर्यस्य न मेने तदु हाद्भुतम् ॥ ३६ ॥
सर्वात्मा भगवन्माया आश्चर्य शंकरास ना । अमोघ हरिची शक्ती जाणिली पार ना तिला ॥ ३६ ॥
अथ - नंतर - जगदात्मनः - जगाचा अंतर्यामी अशा - अपरिज्ञेयवीर्यस्य - ज्याचा पराक्रम जाणणे फारच कठीण आहे अशा - आत्मनः - परमेश्वराचे - अवगतमाहात्म्यः - जाणिले आहे माहात्म्य ज्याने असा - तत् - ते कर्म - उह - खरोखर - अद्भुतं - आश्चर्य करण्यासारखे - न मेने - मानिता झाला नाही. ॥३६॥
यानंतर आत्मस्वरूप सर्वात्मा भगवंतांचा हा महिमा जाणून त्यांना विशेष असे आश्चर्य वाटले नाही. कारण भगवंतांच्या शक्तींचा अंत कोणाला लागणार आहे ? (३६)
तमविक्लवमव्रीडं आलक्ष्य मधुसूदनः ।
उवाच परमप्रीतो बिभ्रत् स्वां पौरुषीं तनुम् ॥ ३७ ॥
पाहिले भगवंताने हरा लज्जा न खेदही । पुरुषी देह धारोनी प्रसन्न बोलले हरी ॥ ३७ ॥
तं - त्या शंकराला - अविक्लबं - न गोंधळलेला - अव्रीडं - लज्जारहित असा - आलक्ष्य - पाहून - परमप्रीतः - अत्यंत प्रसन्न झालेला - मधुसूदनः - श्रीविष्णू - स्वां - स्वतःच्या - पौरुषीं - पुरुषरूपी - तनुं - शरीराला - बिभ्रत् - धारण करून - उवाच - म्हणाला. ॥३७॥
भगवंतांनी पाहिले की, भगवान शंकरांना या गोष्टीचा खेद किंवा लज्जा वाटली नाही, तेव्हा ते पुरुषशरीर धारण करून पुन्हा प्रगट झाले आणि मोठ्या प्रसन्नतेने त्यांना म्हणाले. (३७)
श्रीभगवानुवाच -
दिष्ट्या त्वं विबुधश्रेष्ठ स्वां निष्ठां आत्मना स्थितः । यन्मे स्त्रीरूपया स्वैरं मोहितोऽप्यङ्ग मायया ॥ ३८ ॥
श्री भगवान् म्हणाले - महादेवा तुम्ही माझे माया स्त्री रूप पाहुनी । स्वयं निष्ठ असे झाले हर्षाची गोष्ट ही असे ॥ ३८ ॥
अङगविबुधश्रेष्ठ - हे देवश्रेष्ठा शंकरा - मे - माझ्या - स्त्रीरूपया - स्त्रीरूपी - मायया - मायेने - स्वैरं - यथेष्ठ - मोहितः अपि - मोहित झालेलाही - त्वं - तू - आत्मनः - स्वतःच्या योगे - स्वां - स्वतःच्या - निष्ठां - मूळस्थितीस - आस्थितः - प्राप्त झालास - (इति) यत् - हे जे घडले - (तत्) दिष्टया (एव) - ते मोठया सुदैवानेच होय. ॥३८॥
भगवान म्हणाले - हे देवाधिदेवा, माझ्या स्त्रीरूपी मायेने पूर्णपणे मोहित होऊन सुद्धा आपण आपल्या मूल रूपात राहिलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. (३८)
को नु मेऽतितरेन्मायां विषक्तस्त्वदृते पुमान् ।
तान् तान् विसृजतीं भावान् दुस्तरामकृतात्मभिः ॥ ३९ ॥
माझी ही बघता माया विषयी नच तो सुटे । मायेत फसता कोण स्वयं मुक्तहि जाहला ? ॥ ३९ ॥
अकृतात्मभिः - अशुद्ध अंतःकरणाच्या लोकांना - दुस्तरां - तरून जाण्यास कठीण अशा - तान् तान् - त्या त्या - भावान् - पदार्थांना - विसृजतीं - निर्मिणार्या - मे मायां - माझ्या मायेला - त्वत् ऋते - तुझ्याशिवाय - कः नु - कोणता बरे - विषक्तः पुमान् - विषयासक्त पुरुष - अतितरेत् - तरून जाईल. ॥३९॥
माझ्या मायेला अंत नाही. ती अशा काही गोष्टी करते की, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली नाहीत, तो तिच्यात गुंतला की कोणत्याही प्रकारे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. आपणच याला अपवाद आहात. (३९)
सेयं गुणमयी माया न त्वां अभिभविष्यति ।
मया समेता कालेन कालरूपेण भागशः ॥ ४० ॥
सर्वांना मोहवी माया तुम्हासी परि ती नच । काळाचा स्वामि तो मीच माझ्या इच्छेत ते गुण ॥ ४० ॥
कालेन - सृष्टयादिकांना निमित्तभूत अशा - मया - माझ्याकडून - कालरूपेण - कालस्वरूपाने - भागशः - भागाभागांनी - समेता - एकत्र आणिली गेलेली - सा - ती - इयं - ही - गुणमयी - त्रिगुणात्मिका - माया - माया - त्वां - तुला - न अभिभविष्यति - जिंकणार नाही. ॥४०॥
ती ही माझी गुणमय माया आपल्याला कधीही मोहित करणार नाही. कारण सृष्टीसाठी योग्यवेळी तिला कार्यरत करणारा काल मीच आहे, म्हणून माझी इच्छा असल्याखेरीज ती रजोगुण इत्यादींची उत्पत्ती करून शकत नाही. (४०)
श्रीशुक उवाच -
एवं भगवता राजन् श्रीवत्सांकेन सत्कृतः । आमंत्र्य तं परिक्रम्य सगणः स्वालयं ययौ ॥ ४१ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - भगवंते असे राजा शिवां सत्कारिले तदा । परीक्रमा करोनीया शिव कैलासि पातले ॥ ४१ ॥
राजन् - हे राजा - श्रीवत्साङ्केन - श्रीवत्सलांछन धारण करणार्या - भगवता - श्रीविष्णुने - एवं - याप्रमाणे - सत्कृतः - सत्कारलेला शंकर - तं - त्या विष्णूला - आमंत्र्य - विचारून - परिक्रम्य - प्रदक्षिणा घालून - सगणः - आपल्या गणांसह - स्वालयं - आपल्या स्थानाला - ययौ - गेला. ॥४१॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचा गौरव केला. तेव्हा त्यांचा निरोप घेऊन व त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेले. (४१)
आत्मांशभूतां तां मायां भवानीं भगवान् भवः ।
शंसतां ऋषिमुख्यानां प्रीत्याचष्टाथ भारत ॥ ४२ ॥
भक्तशिरोमणी राजा प्रेमाने त्या शिवे तिथे । सती समक्ष ऋषिच्या सभेत सर्व वर्णिले ॥ ४२ ॥
भारत - हे भरतकुलोत्पन्न राजा - अथ - नंतर - भगवान् - सर्वगुणसंपन्न - भवः - शंकर - ऋषिमुख्यानां शंसतां - मोठमोठे ऋषि प्रशंसा करीत असता - आत्मांशभूतां - स्वतःच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या - तां - त्या - मायां - मायेला उद्देशून - भवानीं - पार्वतीला - प्रीत्या - प्रेमाने - आचष्ट - म्हणाला. ॥४२॥
हे राजा, भगवान शंकरांनी स्तुती करणार्या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णूरूपाच्या अंशभूत मायेविषयी असे सांगितले. (४२)
अयि व्यपश्यस्त्वमजस्य मायां
परस्य पुंसः परदेवतायाः । अहं कलानां ऋषभो विमुह्ये ययावशोऽन्ये किमुतास्वतंत्राः ॥ ४३ ॥
महादेवजी म्हणाले - (इंद्रवज्रा) माया हरीची कशि गे सती ती विद्या कलेचा जरि स्वामि मी तो । झालो तया पाहुनि मी वशीत तो अन्य जीवा पुसणेचि नाही ॥ ४३ ॥
परदेवतायाः - श्रेष्ठ देवता अशा - अजस्य - जन्मरहित - परस्य - श्रेष्ठ - पुंसः - परमेश्वराची - मायां - माया - त्वं - तू - व्यपश्यः अपि - पाहिलीस काय ? - वशः - स्वतंत्र - कलानां - कलांचा - ऋषभः - अधिपती - अहं - मी - यथा - ज्या मायेने - विमुह्ये - मोहीत झालो - किम् उत अस्वतंत्राः अन्ये - मग परतंत्र असे जे दुसरे त्यांची काय कथा ? ॥४३॥
देवी, परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया तू पाहिलीस ना ? मी सर्व कलांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे हरलो, मग परतंत्र असणार्या सामान्य जीवांची काय कथा ? (४३)
यं मां अपृच्छस्त्वमुपेत्य योगात्
समासहस्रान्त उपारतं वै । स एष साक्षात्पुरुषः पुराणो न यत्र कालो विशते न वेदः ॥ ४४ ॥
हजार वर्षे करिता तपाला विचारिले तू भजता कुणाला । साक्षात् हरी तो श्रुति गाति त्यासी अनंत रुपो गुण त्या भजे मी ॥ ४४ ॥
त्वं - तू - समासहस्रान्ते - हजार वर्षांच्या शेवटी - योगात् - योगामुळे - उपारतं - निद्रा घेणार्या - मां - मला - उपेत्य - प्राप्त होऊन - यं - ज्याविषयी - वै - खरोखर - अपृच्छः - विचारिलेस - सः - तो - एषः - हा - साक्षात् - प्रत्यक्ष - पुराणः - प्राचीन - पुरुषः (अस्ति) - पुरुष होय - यत्र - जेथे - कालः - काळ - न - नाही - वेदः - वेद - न विशते - प्रवेश करीत नाहीत. ॥४४॥
जेव्हा मी एक हजार वर्षांच्या समाधीनंतर जागृत झालो होतो, तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारले होतेस की, मी कोणाची उपासना करीत होतो ? ते हेच साक्षात सनातन पुरुष आहेत. कालाचे सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद यांचे वर्णन करू शकत नाहीत. (४४)
श्रीशुक उवाच -
इति तेऽभिहितस्तात विक्रमः शारंगधन्वनः । सिन्धोर्निर्मथने येन धृतः पृष्ठे महाचलः ॥ ४५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्) ऐश्वर्यपूर्ण या लीला हरिच्या रे परीक्षिता । वदलो तुजला पूर्ण कूर्मावतारि ही कथा ॥ ४५ ॥
तात - बा परीक्षित राजा - ते - तुला - इति - याप्रमाणे - शार्ङगधन्वनः - शार्ङग धनुष्य धारण करणार्या परमेश्वराचा - विक्रमः - पराक्रम - अभिहितः - सांगितला - येन - ज्याने - सिंधोःनिर्मथने - समुद्राच्या मंथन काळी - पृष्ठे - पाठीवर - महाचलः - मोठा पर्वत - धृतः - धरिला. ॥४५॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - प्रिय परीक्षिता, ज्यांनी समुद्र मंथनाच्यावेळी आपल्या पाठीवर मंदराचल धारण केला, त्या भगवंतांचा पराक्रम मी तुला सांगितला. (४५)
एतन्मुहुः कीर्तयतोऽनुश्रृण्वतो
न रिष्यते जातु समुद्यमः क्वचित् । यदुत्तमश्लोकगुणानुवर्णनं समस्तसंसारपरिश्रमापहम् ॥ ४६ ॥
(इंद्रवज्रा) या कीर्तनाला नित ऐकिल्याने उद्योग ना तो कधि निष्फळो हो । पवित्र कीर्ती हरिच्या लिला या श्रमा नि कष्टा मिटवीति नित्य ॥ ४६ ॥
एतत् - हे चरित्र - मुहुः - वारंवार - कीर्तयतः - कथन करणार्या - अनुशृण्वतः - श्रवण करणार्या - समुद्यमः - सदुद्योग - जातु - कधीही - क्वचित् - कोठेही - न रिष्यते - भंग पावत नाही - यत् - कारण - उत्तमश्लोकगुणानुवर्णनं - भगवंताच्या गुणांचे वर्णन - समस्तसंसारपरिश्रमापहं - संपूर्ण संसारजन्य श्रमांचे निरसन करणारे आहे. ॥४६॥
जो मनुष्य वारंवार या कथेचे कीर्तन आणि श्रवण करतो, त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाहीत. कारण पवित्रकीर्ति भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन संसारातील सर्व क्लेश नष्ट करणारे आहे. (४६)
असद् अविषयमङ्घ्रिं भावगम्यं प्रपन्नान्
अमृतममरवर्यानाशयत् सिन्धुमथ्यम् । कपटयुवतिवेषो मोहयन् यः सुरारीन् तमहमुपसृतानां कामपूरं नतोऽस्मि ॥ ४७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे शंकरमोहनं द्वादशोध्याऽयः ॥ १२ ॥
(मालिनी) असद् विषयभोगी त्याज ना श्रीहरी तो युत चित भजता तो पावतो भक्तप्रीया । म्हणवुनि धरि माया वेष नी देवतांना भजति पद तयांना पाजिले अमृताते । शरण चरणि जाता कामना पूर्ण होती चरणकमल त्याचे वंदितो मी प्रभूचे ॥ ४७ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ बारावा अध्याय हा ॥ ८ ॥ १२ ॥ हरिःॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
यः - जो विष्णू - कपटयुवतिवेषः - कपटाने स्त्रीवेष घेतलेला - सुरारीन् मोहयन् - देवांच्या शत्रूंना मोहित करीत - असदविषयं - असत् पदार्थाला अगोचर अशा - भावगम्यं - भक्तीने मिळणार्या - अंघ्रिं - चरणांना - प्रपन्नान् - शरण आलेल्या - अमरवर्यान् - श्रेष्ठ देवांना - सिंधुमथ्यं - समुद्रमंथन करून काढिलेले - अमृतं - अमृत - आशयत् - पाजिता झाला - तं - त्या - उपसृतानां - शरण आलेल्यांच्या - कामपूरं - इच्छा पूर्ण करणार्या - अहं - मी - नतः - नम्र - अस्मि - आहे. ॥४७॥
अभक्तांना भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. भक्तिभावयुक्त पुरुषांनाच ते प्राप्त होतात. म्हणूनच त्यांनी स्त्रीचे मायामय रूप धारण करून दैत्यांना मोहित केले आणि आपल्या चरणांना शरण असलेल्या देवांना समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचे पान करविले. जो कोणी त्यांच्या चरणकमलांना शरण जाईल, त्याच्या सर्व कामना ते पूर्ण करतात. त्या प्रभूंच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो. (४७)
स्कंध आठवा - अध्याय बारावा समाप्त |