|
श्रीमद् भागवत पुराण बलेः पराजयः, दैत्यानां विनाशः, नारदोक्त्या युद्धसमाप्तिः, शुक्रद्वारा बलेः संजीवनं च - देवासुर-संग्रामाची समाप्ती - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
अथो सुराः प्रत्युपलब्धचेतसः परस्य पुंसः परयानुकंपया । जघ्नुर्भृशं शक्रसमीरणादयः तान् तान् रणे यैरभिसंहताः पुरा ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (इंद्रवज्रा) कृपे हरीच्या भय दूर झाले चैतन्य आले नव देवतांत । पुनश्च बाहूनिही दैत्य शत्रू नी पूर्ण शक्त्ये लढु लागलेही ॥ १ ॥
अथो - नंतर - शक्रसमीरणादयः - इंद्र, वायु आदिकरून - सुराः - देव - परस्य पुंसः परया अनुकम्पया - श्रेष्ठ ईश्वराच्या अत्यंत कृपेने - प्रत्युपलब्धचेतसः - ज्यांची अंतःकरणे परत ठिकाणावर आली आहेत असे - पुरा - पूर्वी - रणे - युद्धात - यैः - ज्यांच्याकडून - अभिसंहताः - मारिले गेले - तान् तान् - त्यांना त्यांना - भृशं - अत्यंत - जघ्नुः - मारिते झाले. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली. अगोदर इंद्र, वायू इत्यादि देवगण रणभूमीमध्ये ज्या ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते, त्यांच्यावरच ते आता पूर्ण ताकदीनिशी प्रहार करू लागले. (१)
(अनुष्टुप्)
वैरोचनाय संरब्धो भगवान् पाकशासनः । उदयच्छद् यदा वज्रं प्रजा हा हेति चुक्रुशुः ॥ २ ॥
(अनुष्टुप्) ऐश्वर्यशालि इंद्राने बळीसी लढता तदा । क्रोधाने घेतले वज्र हाहाक्कारचि जाहला ॥ २ ॥
संरब्धः - खवळलेला - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - पाकशासनः - इंद्र - यदा - जेव्हा - वैरोचनाय - बलिराजावर - वज्रं - वज्र - उदयच्छत् - उचलिता झाला - प्रजाः - प्रजा - हाहा इति - हा हा असा - चुक्रुशुः - आक्रोश करू लागल्या. ॥२॥
ऐश्वर्यशाली इंद्राने बलीशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले, तेव्हा सगळ्या प्रजेत हाहाकार माजला. (२)
वज्रपाणिस्तमाहेदं तिरस्कृत्य पुरःस्थितम् ।
मनस्विनं सुसंपन्नं विचरन्तं महामृधे ॥ ३ ॥
बळी शस्त्रास्त्र योजोनी फिरता युद्धभूमिशी । सवज्र पातता इंद्र तेंव्हा तुच्छोनि बोलला ॥ ३ ॥
वज्रपाणिः - इंद्र - महामृधे - महायुद्धात - पुरः स्थितं - पुढे उभा असलेल्या - मनस्विनं - थोर मनाच्या - सुसंपन्नं - सर्व संपत्तीने युक्त - विचरंतं - संचार करणार्या - तं - त्या बलिराजाचा - तिरस्कृत्य - तिरस्कार करून - इदं - हे - आह - बोलला. ॥३॥
युद्धासाठी सज्ज होऊन मानी बली युद्धभूमीवर संचार करीत होता. तो आपल्या समोर आलेला पाहून इंद्राने त्याचा तिरस्कार करीत म्हटले. (३)
नटवन्मूढ मायाभिः मायेशान्नो जिगीषसि ।
जित्वा बालान्निबद्धाक्षान् नटो हरति तद्धनम् ॥ ४ ॥
मूर्खा ! नेत्रास बांधोनी मुलांना जादुगार तो । फसवी, विजया तैसा इच्छिशी मनि काय तू ? ॥ ४ ॥
मूढ - हे मूर्खा - नटवत् - नाटक्याप्रमाणे - मायाभिः - मायांनी - मायेशान् - मायेचे अधिपति अशा - नः - आम्हांला - जिगीषसि - जिंकिण्यास इच्छितोस काय - नटः - सोंगाडया पुरुष - बद्धाक्षान् - डोळे बांधलेल्या - बालान् - लहान मुलांना - जित्वा - जिंकून - तद्धनं - त्यांच्या द्रव्याला - हरति - हरण करितो. ॥४॥
मूर्खा, ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हातचलाखीने त्यांचे धन लुटून नेतो, त्याचप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजय मिळवू इच्छितोस. (४)
आरुरुक्षन्ति मायाभिः उत्सिसृप्सन्ति ये दिवम् ।
तान्दस्यून् विधुनोम्यज्ञान् पूर्वस्माच्च पदादधः ॥ ५ ॥
मायेने भोगिता स्वर्ग धाक त्या वरचा असे । उच्च मूर्खासि आधीच खाली ओढोनि काढितो ॥ ५ ॥
ये - जे - मायाभिः - कपटांनी - दिवं - स्वर्गावर - आरुरुक्षन्ति - चढू इच्छितात - च - आणि - उत्सिसृप्सन्ति - उल्लंघिण्याची इच्छा करितात - तान् - त्या - अज्ञान् - मूर्ख - पूर्वस्मात् - पूर्वीच्या - पदात् - स्थानापासून - अधः - खाली - विधुनोमि - ढकलितो. ॥५॥
जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात, इतकेच नव्हे तर त्याच्यावरील लोकांवरही अधिराज्य गाजवू इच्छितात, त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावरूनसुद्धा खाली ढकलून देतो. (५)
सोऽहं दुर्मायिनस्तेऽद्य वज्रेण शतपर्वणा ।
शिरो हरिष्ये मन्दात्मन् घटस्व ज्ञातिभिः सह ॥ ६ ॥
मूढा ! ही योजिसी माया आज मी धारदार या । सहस्त्रधार वज्राने तुझे शीरचि छेदितो ॥ भाई बंधू सवे जे जे करणे शक्य ते करी ॥ ६ ॥
मंदात्मन् - हे मंदबुद्धे - सः - तो - अहं - मी - अद्य - आज - शतपर्वणा - शंभर गाठीच्या - वज्रेण - वज्राने - दुर्मायिनः ते - अत्यंत कपटी अशा तुझे - शिरः - मस्तक - हरिष्ये - हरण करीन - ज्ञातिभिः सह - ज्ञातीसह - घटस्व - रक्षणाचा उद्योग कर. ॥६॥
अरे मतिमंदा, आज मी शंभर पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझे मस्तक धडापासून वेगळे करतो. तू तुझ्या बांधवांसह सज्ज हो. (६)
श्रीबलिरुवाच ।
संग्रामे वर्तमानानां कालचोदितकर्मणाम् । कीर्तिर्जयोऽजयो मृत्युः सर्वेषां स्युरनुक्रमात् ॥ ७ ॥
बळी म्हणाला - करिती कर्म जे शुद्ध कालाच्या प्रेरणे मुळे । यशापयश वा मृत्यू या पैकी मिळते तया ॥ ७ ॥
सङ्ग्रामे - युद्धभूमीवर - वर्तमानानां - असणार्या - कालचोदितकर्मणां - कालाने प्रेरिली आहेत कर्मे ज्यांची अशा - सर्वेषां - सर्वांना - कीर्तिः - कीर्ति - जयः - विजय - अजयः - पराजय - मृत्यूः - मृत्यु - अनुक्रमात् - अनुक्रमाने - स्युः - प्राप्त होतात. ॥७॥
बली म्हणाला - जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात, त्या सर्वांनाच जयपराजय, यशापयश किंवा मृत्यू क्रमाने प्राप्त होतोच. (७)
तदिदं कालरशनं जनाः पश्यन्ति सूरयः ।
न हृष्यन्ति न शोचन्ति तत्र यूयमपण्डिताः ॥ ८ ॥
ज्ञानी काळास जाणोनी हर्ष शोका न मानिती । अशा या तत्वज्ञानाते अनभिज्ञ तुम्ही असा ॥ ८ ॥
सूरयः - विद्वान - जनाः - लोक - तत् - त्या - इदं - ह्या - कालरशनं - कालरूपी पाशाला - पश्यन्ति - पाहतात - न हृष्यन्ति - आनंदित होत नाहीत - न शोचन्ति - शोक करीत नाहीत - तत्र - त्या बाबतीत - यूयं - तुम्ही - अपण्डिताः - अज्ञानी आहा. ॥८॥
म्हणूनच ज्ञानी लोक जगाला कालाच्या अधीन समजून विजय मिळाल्यावर आनंदोत्सव करीत नाहीत किंवा पराजयाने खचून जात नाहीत. हे तुम्हाला माहीत दिसत नाही ! (८)
न वयं मन्यमानानां आत्मानं तत्र साधनम् ।
गिरो वः साधुशोच्यानां गृह्णीमो मर्मताडनाः ॥ ९ ॥
कर्ता कारण ते तुम्ही मानिता, संत निंदिती । मर्मभेदी तुझे बोल न आम्हा स्पर्शिती मुळी ॥ ९ ॥
वयं - आम्ही - तत्र - त्या जयापजयादिकांच्या बाबतीत - आत्मानं - स्वतःलाच - साधनं - कारणीभूत - मन्यमानानां - मानणार्या - साधुशोच्यानां - ज्यांच्याबद्दल साधूंना फार वाईट वाटते अशा - वः - तुमचे - मर्मताडनाः - मर्मभेदक असे - गिरः - शब्द - न गृह्णीमः - स्वीकारीत नाही. ॥९॥
या सर्वांचे कारण स्वतःला श्रेष्ठ मानणार्या व म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणार्या तुमच्या मर्मभेदी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. (९)
श्रीशुक उवाच -
इत्याक्षिप्य विभुं वीरो नाराचैर्वीरमर्दनः । आकर्णपूर्णैरहनग् आक्षेपैराह तं पुनः ॥ १० ॥
श्री शुकदेवजी सांगतात - या परी बोलता बोल ऐकोनी इंद्र थांबता । बळीने शेकडो बाण तयाच्या वरि सोडिले ॥ १० ॥
वीरमर्दनः - वीरांना मारणारा - वीरः - पराक्रमी बलि - इति - याप्रमाणे - विभुं - इंद्राला - आक्षिप्य - निंदून - आक्षेपैः - निंदाजनक शब्दांनी - आहतं - ताडिलेल्या - पुनः - पुनः - आकर्णपूर्णैः - कानापर्यंत ओढून सोडिलेल्या - नाराचैः - बाणांनी - अहनत् - ताडिता झाला. ॥१०॥
श्रीशुकदेव म्हणतात - वीरविजयी बलीने इंद्राला अशा प्रकारले फटकारले. त्यामुळे तो थोडासा वरमला. तेव्हा बलीने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे बाण सोडले. (१०)
एवं निराकृतो देवो वैरिणा तथ्यवादिना ।
नामृष्यत् तदधिक्षेपं तोत्राहत इव द्विपः ॥ ११ ॥
सत्यवादी असे शत्रू बोलता मर्म भेदुनी । अंकूश लागता हत्ती तसा तो चिडला असे ॥ ११ ॥
तथ्यवादिना - सत्यभाषी - वैरिणा - शत्रूने - एवं - याप्रमाणे - निराकृतः - निर्भर्त्सना केलेला - देवः - इंद्र - तोत्राहतः द्विपः इव - अंकुशाने टोचिलेल्या हत्तीप्रमाणे - तदधिक्षेपं - त्याच्या निंदाजनक शब्दाला - न अमृष्यत् - सहन करिता झाला नाही. ॥११॥
सत्यवादी, देवशत्रू बलीने अशा प्रकारे इंद्राचा अत्यंत तिरस्कार केला. त्यामुळे इंद्र अंकुश टोचलेल्या हत्तीप्रमाणे आणखीच चिडला. तो पाणउतारा त्याला सहन झाला नाही. (११)
प्राहरत् कुलिशं तस्मा अमोघं परमर्दनः ।
सयानो न्यपतद् भूमौ छिन्नपक्ष इवाचलः ॥ १२ ॥
वज्रप्रहार इंद्राने जोराने घातला असे । विमाना मधुनी तेंव्हा पृथ्विशी पडला बळी ॥ १२ ॥
परमर्दनः - शत्रुनाशक इंद्र - तस्मै - त्या बलिराजाकडे - अमोघं - फुकट न जाणारे - कुलिशं - वज्र - प्राहरत् - फेकिता झाला - छिन्नपक्षः अचलः इव - पंख तुटलेल्या पर्वताप्रमाणे - सयानः - वाहनासहित - भूमौ - पृथ्वीवर - न्यपतत् - पडला. ॥१२॥
शत्रुंजय इंद्राने बलीवर आपल्या अमोघ वज्राचा प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन बली पंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे आपल्या वाहनासह जमिनीवर कोसळला. (१२)
सखायं पतितं दृष्ट्वा जम्भो बलिसखः सुहृत् ।
अभ्ययात् सौहृदं सख्युः हतस्यापि समाचरन् ॥ १३ ॥
सुहृद्मित्र बळीचा तो जंभ हा पातला तिथे । बळी तो पडला खाली इंद्रासी जंभ तो लढे ॥ १३ ॥
बलिसखः - बलिराजाचा सहाय्यक - सुहृत् - मित्र - जंभः - जंभासुर - सखायं - मित्राला - पतितं - पडलेला - दृष्ट्वा - पाहून - हतस्य अपि - पडलेल्याही - सख्युः - मित्राचे - सौहृदं - मित्रकार्य - समाचरन् - आचरण करीत - अभ्ययात् - चाल करून गेला. ॥१३॥
बलीचा हितचिंतक आणि घनिष्ट मित्र जंभासुर, आपला मित्र खाली पडलेला पाहून त्याला मारणार्याचा बदला घेण्यासाठी इंद्रावर चालून गेला. (१३)
स सिंहवाह आसाद्य गदां उद्यम्य रंहसा ।
जत्रावताडयत् शक्रं गजं च सुमहाबलः ॥ १४ ॥
सिंहावरी बसोनीया वेगाने पातला तिथे । गदा ती मारिली तेणे इंद्राच्या त्या खुब्यावरी ॥ ऐरावतासही तेणे प्रहार मारिला असे ॥ १४ ॥
सुमहाबलः - अत्यंत बलिष्ठ - सिंहवाहः - सिंहावर बसलेला - सः - तो जंभासुर - गदां - गदा - उद्यम्य - उचलून - रंहसा - वेगाने - आसाद्य - जवळ जाऊन - शक्रं - इंद्राला - गजं च - आणि ऐरावताला - जत्रौ - मानेवर - अताडयत् - ताडिता झाला. ॥१४॥
सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला. त्याचबरोबर त्या महाबलीने ऐरावतावरसुद्धा गदेचा तडाखा दिला. (१४)
गदाप्रहारव्यथितो भृशं विह्वलितो गजः ।
जानुभ्यां धरणीं स्पृष्ट्वा कश्मलं परमं ययौ ॥ १५ ॥
गदेचा लागता घाव पीडला गज तो बहू । गुडघे टेकिले आणि मूर्च्छीत जाहला पुन्हा ॥ १५ ॥
गदाप्रहारव्यथितः - गदेच्या प्रहाराने पीडिलेला - भृशं - अत्यंत - विह्वलितः - विव्हळ झालेला - गजः - हत्ती - जानुभ्यां - गुडघ्यांनी - धरणीं - जमिनीला - स्पृष्ट्वा - स्पर्श करून - परमं - मोठी - कश्मलं - मूर्च्छा - ययौ - पावला. ॥१५॥
गदेच्या माराने ऐरावताला भोवळ आली. त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि तो पूर्ण मूर्च्छित होऊन पडला. (१५)
ततो रथो मातलिना हरिभिर्दशशतैर्वृतः ।
आनीतो द्विपमुत्सृज्य रथं आरुरुहे विभुः ॥ १६ ॥
मातली सारथी तेंव्हा हजार अश्व जोडुनी । पातला रथ घेवोनी इंद्र तैं स्वार जाहला ॥ १६ ॥
ततः - नंतर - मातलिना - मातालिनामक सारथ्याकडून - दशशतैः हरिभिः - हजार घोडयांनी - वृतः - वेष्टिलेला - रथः - रथ - आनीतः - आणिला गेला - विभुः - इंद्र - द्विपं - गजाला - उत्सृज्य - सोडून - रथं - रथावर - आरुरुहे - चढला. ॥१६॥
त्याचवेळी इंद्राचा सारथी मातली एक हजार घोडे जुंपलेला रथ घेऊन आला. तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला. (१६)
तस्य तत्पूजयन् कर्म यन्तुर्दानवसत्तमः ।
शूलेन ज्वलता तं तु स्मयमानोऽहनन्मृधे ॥ १७ ॥
जंभा न त्या प्रशंसोनी हासला आणि तो करी । त्रिशूळ घेउनी वेगे फेकिला मातली वरी ॥ १७ ॥
तस्य यंतुः - त्या सारथ्याचे - तत् - ते - कर्म - कर्म - पूजयन् - प्रशंसिणारा - दानवसत्तमः - श्रेष्ठदैत्य जंभासुर - स्मयमानः - आश्चर्य करीत - मृधे - युद्धभूमीवर - ज्वलता शूलेन - पेटणार्या शूळाने - तं तु - त्या इंद्राला तर - अहनत् - ताडिता झाला. ॥१७॥
दानवश्रेष्ठ जंभाने रणभूमीवर मातलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मितहास्य करीत जळजळीत त्रिशूळ त्याच्यावर फेकला. (१७)
सेहे रुजं सुदुर्मर्षां सत्त्वमालंब्य मातलिः ।
इन्द्रो जम्भस्य संक्रुद्धो वज्रेणापाहरच्छिरः ॥ १८ ॥
मातल्ये धैर्य जोडोनी असह्य घाव सोसला । क्रोधात इंद्र तो येता जंभाचे शिर कापिले ॥ १८ ॥
मातलिः - इंद्राचा सारथी - सत्त्वं - धैर्य - अवलम्ब्य - धरून - सुदुर्मषां - असह्य अशा - रुजं - पीडेला - सेहे - सहन करिता झाला - इंद्रः - इंद्र - संक्रुद्धः (सन्) - अत्यंत रागावून - वज्रेण - वज्राने - जंभस्य - जंभाचे - शिरः - मस्तक - अपाहरत् - तोडिता झाला. ॥१८॥
मातलीने मोठ्या धर्याने ते असह्य कष्ट सहन केले. तेव्हा इंद्राने चिडून वज्राने जंभाचे मस्तक उडविले. (१८)
जम्भं श्रुत्वा हतं तस्य ज्ञातयो नारदादृषेः ।
नमुचिश्च बलः पाकः तत्रापेतुस्त्वरान्विताः ॥ १९ ॥
जंभाचा नमुची बंधू देवर्षि त्यास बोलले । ऐकता बंधुची वार्ता रणात तोहि पातला ॥ १९ ॥
नमुचिः - नमुचि - बलः - बल - च - आणि - पाकः - पाक - तस्य - त्या जंभाचे - ज्ञातयः - संबंधी - नारदात् ऋषेः - नारद ऋषीपासून - जंभं - जंभ - हतं - मेला असे - श्रुत्वा - ऐकून - त्वरान्विताः - त्वरेने - तत्र - तेथे - आपेतुः - आले. ॥१९॥
देवर्षी नारदाकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमुची, बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोहोचले. (१९)
वचोभिः परुषैः इन्द्र मर्दयन्तोऽस्य मर्मसु ।
शरैरवाकिरन् मेघा धाराभिरिव पर्वतम् ॥ २० ॥
मर्मभेदी अशा शब्दे इंद्राला बहु बोलला । शरांची वृष्टि ती केली इंद्रासी नमुच्ये तदा ॥ २० ॥
परुषैः - कठोर - वचोभिः - भाषणांनी - इंद्रं - इंद्राला - अर्दयन्तः - पीडा देणारे - मेघाः धाराभिः पर्वतम् इव - मेघ (पावसाच्या) धारांनी जसे पर्वताला तसे - अस्य - ह्याच्या - मर्मसु - मर्मांवर - शरैः - बाणांनी - अवाकिरन् - वृष्टि करिते झाले. ॥२०॥
आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात, त्याप्रमाणेच त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. (२०)
हरीन् दशशतान्याजौ हर्यश्वस्य बलः शरैः ।
तावद्भुः अर्दयामास युगपत् लघुहस्तवान् ॥ २१ ॥
बळाने हस्तकौशल्ये हजार तिर सोडुनी । घायाळ हय ते केले सर्वच्या सर्व जे रथा ॥ २१ ॥
लघुहस्तवान् - कुशल हाताने युद्ध करणारा - बलः - बलदैत्य - आजौ - युद्धात - हर्यश्वस्य - इंद्राच्या - दशशतानि हरीन् - हजार घोडयांना - तावद्भिः - तितक्याच - शरैः - बाणांनी - युगपत् - एकदम - अर्दयामास - घायाळ करिता झाला. ॥२१॥
बलाने हातचलाखीने एकदम एक हजार बाण सोडले आणि इंद्राच्या एक हजार घोड्यांना घायाळ केले. (२१)
शताभ्यां मातलिं पाको रथं सावयवं पृथक् ।
सकृत्सन्धानमोक्षेण तदद्भुतं अभूद् रणे ॥ २२ ॥
मातलीसी शत बाण रथाला शतही तसे । असे हे दोनशे बाण पाकाने वर्षिले तदा ॥ २२ ॥
पाकः - पाकदैत्य - सकृत्संधानमोक्षेण - एकदमच जोडून सोडलेल्या - शताभ्यां (बाणैः) - दोनशे बाणांनी - मातलिं - इंद्राच्या सारथ्याला - च - आणि - सावयवं रथं - चाक, आसादि अवयवांसह रथ - पृथक् - वेगवेगळा - अर्दयामास - ताडिता झाला - रणे - युद्धभूमीवर - तत् - ते कृत्य - अद्भुतं - आश्चर्यजनक - अभूत् - झाले. ॥२२॥
पाकाने शंभर बाण मातलीवर टाकले आणि शंभर बाणाने रथाचा एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला. युद्धभूमीवर ही एक अद्भुत घटना घडली. (२२)
नमुचिः पञ्चदशभिः स्वर्णपुंखैर्महेषुभिः ।
आहत्य व्यनदत्संख्ये सतोय इव तोयदः ॥ २३ ॥
गर्जला नमुचि जैसे पाण्याचे ढग गर्जती । पंधरा सोडिले बाण तेणे इंद्रावरी तसे ॥ २३ ॥
सतोयः - जलाने भरलेल्या - तोयदः इव - मेघाप्रमाणे - संख्ये - युद्धांत - नमुचिः - नमुचि दैत्य - पञ्चदशभिः स्वर्णपुङ्खैः - पंधरा सुवर्णाच्या मुठी बसविलेले - महेषुभिः - मोठमोठया बाणांनी - आहत्य - ताडित करून - व्यनदत् - मोठयाने ओरडला. ॥२३॥
नमुचीने, सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला. (२३)
सर्वतः शरकूटेन शक्रं सरथसारथिम् ।
छादयामासुरसुराः प्रावृट्सूर्यमिवांबुदाः ॥ २४ ॥
झाकतो पावसाळ्यात ढगांनी सूर्य जै नभीं । तसेच इंद्र नी त्याचा सारथी शरि झाकिला ॥ २४ ॥
अंबुदाः - मेघ - प्रावृट्सूर्यम् इव - वर्षाऋतूतील सूर्याला जसे तसे - असुराः - दैत्य - सर्वतः - चोहोकडून - शरकूटेन - बाणसमूहाने - सरथसारथिं - रथ व सारथि यांसह - शक्रं - इंद्राला - छादयामा - आच्छादून टाकिते झाले. ॥२४॥
जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात, त्याचप्रमाणे असुरांनी बाणांचा वर्षाव करून, इंद्र, त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झाकून टाकले. (२४)
अलक्षयन्तस्तमतीव विह्वला
विचुक्रुशुर्देवगणाः सहानुगाः । अनायकाः शत्रुबलेन निर्जिता वणिक्पथा भिन्ननवो यथार्णवे ॥ २५ ॥
(इंद्रवज्रा) दिसे न इंद्रो तयि देवतांना अतिव झाले विव्हलो मनात । ते हारले युद्धिनि ना तयांचा सेनापती तो पुढती कुठेही । जहाज जैसे सुटता समुद्रीं व्यापारि होती बहु दुःखि चित्ती ॥ २५ ॥
तं - त्या इंद्राला - अलक्षयन्तः - न पाहाणारे - अतीवविह्वलाः - अत्यंत विव्हळ झालेले - अनायकाः - अनाथ असे - शत्रुबलेन - शत्रुसैन्याने - निर्जिताः - जिंकिलेले - सहानुगाः - अनुचरांसह - देवगणाः - देवसमुदाय - यथा - ज्याप्रमाणे - अर्णवे - समुद्रात - भिन्ननवः - नौका फुटून गेलेले - वणिक्पथाः - व्यापारी - विचुक्रुशुः - आक्रोश करू लागले. ॥२५॥
इंद्र कुठेच दिसत नाही, हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले. तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केले. सेनापती नसल्यामुळे, समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापार्याची जशी अवस्था होते, तशी त्यांची झाली. (२५)
ततस्तुराषाडिषुबद्धपञ्जराद्
विनिर्गतः साश्वरथध्वजाग्रणीः । बभौ दिशः खं पृथिवीं च रोचयन् स्वतेजसा सूर्य इव क्षपात्यये ॥ २६ ॥
परंतु जाता क्षण कांहि तेंव्हा ध्वजाश्व तैसे रथ सारथ्याच्या । सवेचि आला वर इंद्र जैसा तो पिंजरा शत्रुतिरा मधोनी ॥ २६ ॥
ततः - नंतर - तुराषाट् - इंद्र - इषुबन्धपञ्जरात् - बाणाने तयार केलेल्या पिंजर्यांतून - साश्वरथध्वजाग्रणीः - घोडे, रथ, ध्वज व सारथी यांसह - विनिर्गतः - बाहेर निघाला - क्षपात्यये - रात्र संपल्यानंतर - सूर्यः इव - सूर्य जसा तसा - स्वतेजसा - आपल्या तेजाने - दिशः - सर्व दिशांना - खं - आकाशाला - च - आणि - पृथिवीं - पृथ्वीला - रोचयन् - प्रकाशित करणारा - बभौ - शोभला. ॥२६॥
परंतु थोढ्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे, रथ, ध्वज आणि सारथ्यासह इंद्र बाहेर आला. तेव्हा प्रातःकाळी सूर्य आपल्या किरणांनी दिशा, आकाश, आणि पृथ्वी उजळून शोभतो, त्याप्रमाणे इंद्र शोभू लागला. (२६)
(अनुष्टुप्)
निरीक्ष्य पृतनां देवः परैरभ्यर्दितां रणे । उदयच्छद् रिपुं हन्तुं वज्रं वज्रधरो रुषा ॥ २७ ॥
(अनुष्टुप्) इंद्राने पाहिले की त्या शत्रूने दळ चेंदिले । क्रोधाने वज्र घेवोनी शत्रूच्यावरि धावला ॥ २७ ॥
वज्रधरः - इंद्र - देवः - देव - रणे - युद्धात - पृतनां - सेना - परैः - शत्रूंनी - अभ्यर्दितां - पीडिली असे - निरीक्ष्य - पाहून - रुषा - रागाने - रिपुं - शत्रूला - हन्तुं - मारण्याकरिता - वज्रं - वज्र - उदयच्छत् - उचलिता झाला. ॥२७॥
रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले. (२७)
स तेनैवाष्टधारेण शिरसी बलपाकयोः ।
ज्ञातीनां पश्यतां राजन् जहार जनयन्भयम् ॥ २८ ॥
अष्टधारा अशा वज्रे सर्वांना धाक देउनी । पाक बल ययांचे तो इंद्राने शीर कापिले ॥ २८ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - सः - तो इंद्र - पश्यतां ज्ञातीनां - पाहणार्या आप्तेष्टांना - भयं - भीती - जनयन् - दाखवीत - अष्टधारेण तेन एव - आठ धारांच्या त्या वज्रानेच - बलपाकयोः - बल व पाक या दोन दैत्यांची - शिरसी - मस्तके - जहार - हरण करिता झाला. ॥२८॥
परीक्षिता, त्या आठ धारा असलेया तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधवांना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक यांची मस्तके उडविली. (२८)
नमुचिस्तद्वधं दृष्ट्वा शोकामर्षरुषान्वितः ।
जिघांसुरिन्द्रं नृपते चकार परमोद्यमम् ॥ २९ ॥
बंधुमृत्यु बघोनीया मनुची दुःखि जाहला । क्रोधाने जीव तोडोनी इंद्राच्या वधि पातला ॥ २९ ॥
नृपते - हे परीक्षित राजा - तद्वधं - त्या दोघांचा नाश - दृष्ट्वा - पाहून - शोकामर्षरुषा - शोक, त्वेष व क्रोध ह्यांनी - अन्वितः - युक्त - नमुचिः - नमुचि दैत्य - इंद्रं - इंद्राला - जिघांसुः - मारण्याची इच्छा करणारा - परमोद्यमं - मोठा उद्योग - चकार - करिता झाला. ॥२९॥
परीक्षिता, आपले भाऊ मेलेले पाहून नमुचीला अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर असह्य क्रोध आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करू लागला. (२९)
अश्मसारमयं शूलं घण्टावद् हेमभूषणम् ।
प्रगृह्याभ्यद्रवत् क्रुद्धो हतोऽसीति वितर्जयन् । प्राहिणोद् देवराजाय निनदन् मृगराडिव ॥ ३० ॥
न वाचसी पहा इंद्रा वदता त्रिशुळास तो । इंद्राशी फेकिता झाला नादले भूषणे तदा ॥ ३० ॥
क्रुद्धः - रागावलेला - सः - तो नमुचि दैत्य - अश्मसारमयं - पोलादी - घण्टावत् - घंटा लावलेला - हेमभूषणं - सोन्याने मढविलेला - शूलं - शूळ - प्रगृह्य - घेऊन - हतः असि - मेलास - इति - असे - वितर्जयन् - निर्भत्सनापूर्वक म्हणत - अभ्यद्रवत् - धावला - मृगराट् इव - सिंहाप्रमाणे - निनदन् - गर्जना करीत - देवराजाय - इंद्राच्या अंगावर - प्राहिणोत् - फेकता झाला. ॥३०॥
इंद्रा, आता तू वाचत नाहीस ! अशी आरोळी ठोकीत सोन्याच्या घंटा असलेला एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागारागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूल त्याने इंद्रावर फेकला. (३०)
तदापतद् गगनतले महाजवं
विचिच्छिदे हरिरिषुभिः सहस्रधा । तं आहनन् नृप कुलिशेन कन्धरे रुषान्वितस्त्रिदशपतिः शिरो हरन् ॥ ३१ ॥
(गति) नि पाहि इंद्र त्रिशूळ ये वधावयाला करात वज्र धरुनी इंद्र त्याजचे । करोनि खंड त्रिशूळ तो वधावया नमूचिच्याहि वरि वज्र घातले ॥ ३१ ॥
नृप - हे परीक्षित राजा - त्रिदशपतिः - देवांचा राजा - हरिः - इंद्र - रुषा - क्रोधाने - अन्वितः - युक्त झालेला - गगनतले - आकाशात - आपतत् - येणार्या - महाजवं - मोठया वेगवान - तत् - त्या शूळाला - सहस्रधा - हजार प्रकारांनी - इषुभिः - बाणांनी - विचिच्छिदे - तोडिता झाला - शिरः - मस्तक - हरन् - तोडणारा असा - कुलिशेन - वज्राने - तं - त्या नमुचि दैत्याला - कंधरे - मानेवर - आहनत् - प्रहार करिता झाला. ॥३१॥
परीक्षिता, तो त्रिशूल अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहून इंद्राने बाणांनी आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडविण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला. (३१)
न तस्य हि त्वचमपि वज्र ऊर्जितो
बिभेद यः सुरपतिनौजसेरितः । तदद्भुतं परमतिवीर्यवृत्रभित् तिरस्कृतो नमुचिशिरोधरत्वचा ॥ ३२ ॥
न वज्रे कातडि मुळिच कापली समस्तचि नविनचि हे बघोत की । वृत्रासुरा सहजवधी नमूचिते न ते शिवी मुळिचहि हे घडे कसे ॥ ३२ ॥
सुरपतिना - इंद्राने - ओजसा - जोराने - यः - जे - ऊर्जितः - बलाढय - वज्रः - वज्र - ईरितः - फेकिले - सः - ते - तस्य - त्या नमुचि दैत्याच्या - त्वचम् अपि - कातडीलासुद्धा - न विभेदः - तोडू शकले नाही - तत् - ते - परम् - अत्यंत - अद्भुतं (आसित्) - आश्चर्य होय - हि - कारण - अतिवीर्यवृत्रभित् - अत्यंत पराक्रमी अशा वृत्रासुराला मारणारे - नमुचि शिरोघरत्वचा - नमुचि दैत्याच्या मानेच्या कातडीने - तिरस्कृतः - धिःकारिले. ॥३२॥
इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्रप्रहार केला होता, तरीसुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवर खरचटलेसुद्धा नाही. ज्या वज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते, त्या वज्राला मनुचीच्या गळ्याच्या त्वचेने तुच्छ लेखावे, ही मोठीच आश्चर्यकारक घटना घडली. (३२)
(अनुष्टुप्)
तस्माद् इन्द्रोऽबिभेच्छत्रोः वज्रः प्रतिहतो यतः । किमिदं दैवयोगेन भूतं लोकविमोहनम् ॥ ३३ ॥
(अनुष्टुप्) वज्र ना स्पर्शिते त्याला बघोनी इंद्रही भिला । आश्चर्य जगता होय दैवयोग असा कसा ॥ ३३ ॥
यतः - ज्याअर्थी - वज्रः - वज्र - प्रतिहतः - कुंठित झाले - तस्मात् - त्याअर्थी - इंद्रः - इंद्र - शत्रोः - शत्रूला - अबिभेत् - भ्याला - लोकविमोहनं - लोकाला मोहित करणारे - इदं - हे - दैवयोगेन - दैवयोगाने - किं भूतं - काय घडले. ॥३३॥
वज्र नमुचीवर काहीच परिणाम करू शकले नाही, हे पाहून इंद्र त्याला घाबरला. तो विचार करू लागला की, "सर्व जगाला न कळणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का ? (३३)
येन मे पूर्वमद्रीणां पक्षच्छेदः प्रजात्यये ।
कृतो निविशतां भारैः पतत्त्रैः पततां भुवि ॥ ३४ ॥
पूर्वयूगी गिरी पंखे उडती फिरती सदा । याचि वज्रे तयांची मी पंख ते कापिली पहा ॥ ३४ ॥
मे - मी - पूर्वं - पूर्वी - प्रजात्यये - प्रजांचा नाश होऊ लागला असता - येन - ज्या वज्राने - पतत्रैः - पंखांनी - पततां - उडणार्या - भारैः - जडपणामुळे - भुवि - पृथ्वीवर - निविशतां - बसणार्या - अद्रीणां - पर्वतांच्या - पक्षच्छेदः - पक्षांचा नाश - कृतः - केला. ॥३४॥
पूर्वी जेव्हा हे पर्वत पंखांनी उडत होते आणि हिंडण्याफिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत असत, तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या पर्वतांचे पंख तोडून टाकले होते. (३४)
तपःसारमयं त्वाष्ट्रं वृत्रो येन विपाटितः ।
अन्ये चापि बलोपेताः सर्वास्त्रैरक्षतत्वचः ॥ ३५ ॥
त्वष्टाच्या त्या तपानेच तो वृत्रासुर जन्मला । वज्रे या मारिला तोही असे श्रेष्ठचि शस्त्र हे ॥ ३५ ॥
येन - ज्या वज्राने - सारमयं - अत्यंत कठीण - त्वाष्ट्रं - त्वष्टयाचे - तपः - तपच की काय असा - वृत्रः - वृत्रासुर - विपाटितः - फाडून टाकिला - च - आणि - बलोपेताः - बलिष्ठ असे - सर्वास्रैः - दुसर्या सर्व अस्रांनी - अक्षतत्वचः - ज्यांची कातडी फाटली नाही असे - अन्ये अपि - दुसरे सुद्धा. ॥३५॥
त्वष्ट्याच्या तपश्चर्येचे सार वृत्रासुररूपाने प्रगट झाले होते. त्यालासुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने खरचटतही नसे, अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला पाठविले होते. (३५)
सोऽयं प्रतिहतो वज्रो मया मुक्तोऽसुरेऽल्पके ।
नाहं तदाददे दण्डं ब्रह्मतेजोऽप्यकारणम् ॥ ३६ ॥
न मारी तुच्छ दैत्याला ब्रह्मतेज जरी यया । आता मी नच स्पर्शी या निकामी जाहले असे ॥ ३६ ॥
सः - ते - अयं - हे - अल्पके - क्षुद्र - असुरे - दैत्यावर - मया - मी - मुक्तः - सोडिलेले - वज्रः - वज्र - प्रतिहतः - कुंठित झाले - अहं - मी - ब्रह्मतेजः अपि - ब्राह्मणाचे तेज अशाही - अकारणं - निरुपयोगी झालेल्या - दंडं - दंडाप्रमाणे - तत् - त्या वज्राला - न आददे - घेणार नाही. ॥३६॥
तेच हे वज्र मी आज या तुच्छ असुरावरही टाकले असता व्यर्थ गेले. म्हणून मी आता ते घेणार नाही. ब्रह्मतेजापासून हे बनले असले, तरी ते आज निरुपयोगी झाले आहे. (३६)
इति शक्रं विषीदन्तं आह वाक् अशरीरिणी ।
नायं शुष्कैरथो नार्द्रैः वधमर्हति दानवः ॥ ३७ ॥
विषादे वदता इंद्र आकाशवाणि जाहली । ओल्या नी वाळल्या शस्त्रे न हा दैत्य मरे कधी ॥ ३७ ॥
इति - याप्रमाणे - विषीदन्तं - खेद करणार्या - शक्रं - इंद्राला - अशरीरिणी वाक् - आकाशवाणी - आह - म्हणाली - अयं - हा - दानवः - नमुचि दैत्य - शुष्कैः - सुकलेल्या पदार्थांनी - वधं - मारण्याला - न अर्हति - योग्य नाही - अथो - त्याचप्रमाणे - आर्द्रैः - ओल्या पदार्थांनी - न (हन्येत्) - मरणार नाही. ॥३७॥
अशा प्रकारे इंद्राला खिन्न झालेला पाहून आकाशवाणी झाली की, "हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही. (३७)
मयास्मै यद् वरो दत्तो मृत्युर्नैवार्द्रशुष्कयोः ।
अतोऽन्यश्चिन्तनीयस्ते उपायो मघवन् रिपोः ॥ ३८ ॥
दिधला वर मी तैसा म्हणोनी नच हा मरे । इंद्रा तू मारण्या यासी उपाय अन्य शोधणे ॥ ३८ ॥
यत् - ज्याअर्थी - मया - माझ्याकडून - अस्मै - ह्या नमुचि दैत्याला - आर्द्रशुष्कयोः - ओल्या व सुकलेल्या पदार्थाने - मृत्यूः - मृत्यू - न एव (भवेत्) - येणारच नाही - इति - असा - वरः - वर - दत्तः - दिला गेला आहे - अतः - त्याअर्थी - मघवन् - हे इंद्रा - ते - तुझ्या - रिपोः - शत्रूच्या - वघे - नाशाविषयी - अन्यः - दुसरा - उपायः - उपाय - चिन्तनीयः - शोधून काढिला पाहिजे. ॥३८॥
याला मी वर दिला आहे की, सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही. म्हणून इंद्रा, या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ." (३८)
तां दैवीं गिरमाकर्ण्य मघवान् सुसमाहितः ।
ध्यायन् प्गेनमथापश्यद् उपायं उभयात्मकम् ॥ ३९ ॥
ऐकता वाणि ही ऐशी विचार करु लागला । न ओला शुष्क ना ऐसा समुद्रफेस तो असे ॥ ३९ ॥
तां - त्या - दैवीं - आकाशापासून निघालेल्या - गिरं - वाणीला - आकर्ण्य - ऐकून - सुसमाहितः - सावध झालेला - मघवान् - इंद्र - ध्यायन् - विचार करीत - अथ - नंतर - उभयात्मकं - ओला व कोरडा दोन्ही मिळून असणारा - फेनं - फेस - उपायं - उपाय - अपश्यन् - पाहता झाला. ॥३९॥
ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला. तेव्हा त्याला सुचले की, समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही नाही आणि ओलाही नाही. (३९)
न शुष्केण न चार्द्रेण जहार नमुचेः शिरः ।
तं तुष्टुवुर्मुनिगणा माल्यैश्चावाकिरन् विभुम् ॥ ४० ॥
समुद्रफेस फेकोनी इंद्राने नमुची शिरां । कापिता ऋषि देवांनी स्तुती-सुमन वाहिले ॥ ४० ॥
न शुष्केण न च आर्द्रेण - कोरडा नाही आणि ओला नाही अशा - नमुचेः - नमुचीचे - शिरः - मस्तक - जहार - हरण करिता झाला - मुनिगणाः - ऋषिसमुदाय - तं - त्या - विभुं - इंद्राला - तुष्टुवुः - स्तविते झाले - च - आणि - माल्यैः - फुलांनी - अवाकिरन् - वर्षाव करिते झाले. ॥४०॥
म्हणून इंद्राने ना सुकलेला, ना ओला अशा समुद्राच्या फेसाने नमुचीचे मस्तक उडविले. त्यावेळी मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून ताची स्तुती केली. (४०)
गन्धर्वमुख्यौ जगतुः विश्वावसुपरावसू ।
देवदुन्दुभयो नेदुः नर्तक्यो ननृतुर्मुदा ॥ ४१ ॥
गायले मुख्य गंधर्व विश्वावसु परावसू । दुंदुभी वाजल्या आणि मोदे नर्तकि नाचल्या ॥ ४१ ॥
गन्धर्वमुख्यौ - गंधर्वश्रेष्ठ - विश्वावसुपरावसू - विश्वावसु व परावसू - जगतुः - गाऊ लागले - देवदुन्दुभयः - देवांच्या दुंदुभि - नेदुः - वाजू लागल्या - नर्तक्यः - नाचणार्या स्त्रिया - मुदा - आनंदाने - ननृतुः - नाचू लागल्या. ॥४१॥
गंधर्वांतील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले, देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. (४१)
अन्येऽप्येवं प्रतिद्वन्द्वान् वाय्वग्निवरुणादयः ।
सूदयामासुः अस्त्रौघैः मृगान् केसरिणो यथा ॥ ४२ ॥
वरुण अग्नि नी वायू भिडू गाठोनि युक्तिने । वधिले सिंह तो जैसा हरिणा मारितो तसे ॥ ४२ ॥
एवं - याप्रमाणे - अन्ये अपि - दुसरेही - वाय्वग्निवरुणादयः - वायु, अग्नी, वरुण आदिकरून - यथा - जसे - केसरिणः - सिंह - मृगान् - हरिणांना - अस्रौघैः - अस्रांच्या समूहांनी - प्रतिद्वन्द्वान् - शत्रूंना - सूदयामासुः - मारिते झाले. ॥४२॥
वायू, अग्नी, वरुणादी दुसर्या देवांनीसुद्धा सिंह हरिणांना मारतात, तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले. (४२)
ब्रह्मणा प्रेषितो देवान् देवर्षिर्नारदो नृप ।
वारयामास विबुधान् दृष्ट्वा दानवसंक्षयम् ॥ ४३ ॥
परीक्षिता ! तये वेळी ब्रह्म्याने पाहिले असे । दैत्य ते संपती सर्व नारदा बोलले तसे ॥ तयांचा टाकुनी शब्द देवता रोधिल्या तदा ॥ ४३ ॥
नृप - हे परीक्षित राजा - ब्रह्मणा - ब्रह्मदेवाने - देवान् - देवांकडे - प्रेषितः - पाठविलेला - देवर्षिः - देवर्षि - नारदः - नारद - दानवसंक्षयं - दैत्यांच्या नाशाला - दृष्ट्वा - अवलोकन करून - विबुधान् - देवांना - वारयामास - निवारिता झाला. ॥४३॥
परीक्षिता, इकडे ब्रह्मदेवांनी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवांकडे पाठविले आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त केले. (४३)
श्रीनारद उवाच -
भवद्भिः अमृतं प्राप्तं नारायणभुजाश्रयैः । श्रिया समेधिताः सर्व उपारमत विग्रहात् ॥ ४४ ॥
नारदजी म्हणाले - हरिच्या आश्रयाने तो तुम्ही अमृत प्राशिले । लक्ष्मीजीच्या कृपेने ती वृद्धी सर्वचि मेळिली । म्हणोनी लढणे थांबा देवतांनो अता तुम्ही ॥ ४४ ॥
नारायणभुजाश्रयैः - भगवंताच्या बाहूंचा आश्रय करणार्या - भवद्भिः - तुम्ही - अमृतं - अमृत - प्राप्तं - मिळविले - श्रिया - ऐश्वर्याने - समेधिताः - वाढलेले - सर्वे - तुम्ही सर्व - विग्रहात् - युद्धापासून - उपारमत - विराम पावा. ॥४४॥
नारद म्हणाले - देवांनो, भगवंतांच्या कृपेमुळे तुम्हांला अमृत मिळाले आणि तुम्ही वैभवसंपन्नही झालात. म्हणून आता लढाई बंद करा. (४४)
श्रीशुक उवाच -
संयम्य मन्युसंरम्भं मानयन्तो मुनेर्वचः । उपगीयमानानुचरैः ययुः सर्वे त्रिविष्टपम् ॥ ४५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - नारदी बोध हा सर्व देवांनी मानिला असे । स्वर्गी निघोनि ते गेले यशोगानहि जाहले ॥ ४५ ॥
मन्युसंरम्भं - क्रोधावेशाला - संयम्य - आवरून धरून - मुनेः - नारदमुनींचे - वचः - भाषण - मानयन्तः - मानणार्या - अनुचरैः - सेवकांनी - उपगीयमानाः - वर्णिलेले - सर्वे - सर्व देव - त्रिविष्टपं - स्वर्गाला - ययुः - जाते झाले. ॥४५॥
श्रीशुक म्हणतात - देवांनी त्यांचे म्हणणे मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले. त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गान करीत होते. (४५)
येऽवशिष्टा रणे तस्मिन् नारदानुमतेन ते ।
बलिं विपन्नमादाय अस्तं गिरिमुपागमन् ॥ ४६ ॥
वज्राचा घाव लागोनी मेलेला बळि घेउनी । वाचले दैत्य ते सारे नारदांना विचारुनी ॥ अस्तांचल गिरीच्या त्या यात्रेसी निघले तदा ॥ ४६ ॥
तस्मिन् - त्या - रणे - युद्धात - ये - जे - अवशिष्टाः - उरले - ते - ते दैत्य - नारदानुमतेन - नारदाच्या सांगण्यावरून - विपन्नं - संकटात असलेल्या - बलिं - बलिराजाला - आदाय - घेऊन - अस्तं - पश्चिमेकडील - गिरिं - पर्वतावर - उपागमन् - गेले. ॥४६॥
युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्ताचलाकडे गेले. (४६)
तत्राविनष्टावयवान् विद्यमानशिरोधरान् ।
उशना जीवयामास संजीवन्या स्वविद्यया ॥ ४७ ॥
शुक्राचार्ये तिथे विद्या संजीवनिच योजुनी । न शीर कापता मेले त्या सर्वां जीव तो दिला ॥ ४७ ॥
तत्र - तेथे - उशना - शुक्राचार्य - अविनष्टावयवान् - ज्याचे अवयव नष्ट झालेले नव्हते अशा - विद्यमानशिरोधरान् - ज्यांची मस्तके शाबूत होती अशा दैत्यांना - संजीविन्या - संजीविनिनामक - स्वविद्यया - आपल्या विद्येने - जीवयामास - जिवंत करिता झाला. ॥४७॥
तेथे शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान इत्यादी अवयव न तुटलेल्यांना जिवंत केले. (४७)
बलिश्चोशनसा स्पृष्टः प्रत्यापन्नेन्द्रियस्मृतिः ।
पराजितोऽपि नाखिद्यल्त् लोकतत्त्वविचक्षणः ॥ ४८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे देवासुरसंग्रामे एकादशोऽध्याऽयः ॥ ११ ॥
स्पर्शिता शुक्र-आचार्ये झाला चेतन तो बळी । स्मरले सर्व ते त्याला न खेद ज्ञानि तो असे ॥ ४८ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ अकरावा अध्याय हा ॥ ८ ॥ ११ ॥ हरिःॐतत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
च - आणि - उशनसा - शुक्राचार्याने - स्पृष्टः - स्पर्शिल्यामुळे - प्रत्यापन्नेन्द्रियस्मृतिः - इंद्रियांना तरतरी येऊन ज्याला पूर्वीचे स्मरण झाले आहे असा - बलिः - बलिराजा - पराजितः अपि - पराजय पावला होता तरीही - लोकतत्त्वविचक्षणः - लोकस्थिती उत्तम जाणणारा असा असल्यामुळे - न अखिद्यत् - खिन्न झाला नाही. ॥४८॥
शुक्राचार्यांनी स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली. जगाचे तत्त्व जाणणार्या बलीला पराजित होऊनसुद्धा खेद झाला नाही. (४८)
स्कंध आठवा - अध्याय अकरावा समाप्त |