|
श्रीमद् भागवत पुराण देवासुरसंग्रामः, तत्र दैत्यमायानिर्माणं, हरेः प्राकट्यं मायानिरासश्च - देवासुर-संग्राम - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) इति दानवदैतेया नाविन्दन् अमृतं नृप । युक्ताः कर्मणि यत्ताश्च वासुदेवपरांमुखाः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्) जरी सावध राहोनी दैत्यांनी कष्ट घेउनी । मंथनी घेतला भाग परी त्या श्रीहरीस तै । विन्मूख राहिले तेणे अमृत लाभले नसे ॥ १ ॥
नृप - हे राजा - इति - याप्रमाणे - कर्मणि युक्ताः - कार्यामध्ये लागलेले - यत्ताः - दक्ष - च - आणि - (किन्तु) वासुदेवपराङ्मुखाः - पण परमेश्वराची भक्ती न करणारे - दानवदैतेयाः - दानव व दैत्य - अमृतं - अमृत - न अविंदन् - मिळविते झाले नाहीत. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, जरी दैत्यदानवांनी मोठ्या हुषारीने समुद्रमंथनासाठी प्रयत्न केले होते, तरीसुद्धा भगवंतांशी विन्मुख असल्याकारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही. (१)
साधयित्वामृतं राजन् पाययित्वा स्वकान्सुरान् ।
पश्यतां सर्वभूतानां ययौ गरुडवाहनः ॥ २ ॥
राजा ! श्रीहरीने केले समुद्र मंथनो तसे । स्वजनो देवता यांना अमृत पाजुनी स्वये । गरूडी बसता गेले निघुनी निज धामि ते ॥ २ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - गरुडवाहनः - गरुड आहे वाहन ज्याचे असा श्रीविष्णु - अमृतं - अमृत - साधयित्वा - मिळवून - स्वकान् - आपले भक्त अशा - सुरान् - देवांना - पाययित्वा - पाजून - सर्वभूतानां पश्यतां - सर्व प्राणी पाहात असता - ययौ - गेला. ॥२॥
हे राजन, भगवंतांनी समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले. नंतर सर्वांच्या देखतच ते गरुडावर स्वार होऊन तेथून निघून गेले. (२)
सपत्नानां परामृद्धिं दृष्ट्वा ते दितिनन्दनाः ।
अमृष्यमाणा उत्पेतुः देवान् प्रत्युद्यतायुधाः ॥ ३ ॥
दैत्यांनी पाहिले जेंव्हा शत्रू सफल जाहले । न साहोनि करीं शस्त्र घेता युद्धास पातले ॥ ३ ॥
सपत्नानां - शत्रू अशा देवाची - परां ऋद्धिं - अत्यंत समृद्धि - दृष्ट्वा - पाहून - अमृष्यमाणः - सहन न करणारे - ते - ते - दितिनन्दनाः - दैत्य - देवानां प्रति - देवांना उद्देशून - उद्यतायुधाः - हातात शस्त्रास्त्रे धारण केलेले - उत्पेतुः - वर उठले. ॥३॥
आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब शस्त्रास्त्रांनिशी देवांवर हल्ला चढवला. (३)
ततः सुरगणाः सर्वे सुधया पीतयैधिताः ।
प्रतिसंयुयुधुः शस्त्रैः नारायणपदाश्रयाः ॥ ४ ॥
इकडे देवतांनी तो अमृत प्राशुनी बळा । वर्धिले, हरिचा त्यांना आश्रयो लाभला असे । शस्त्रास्त्रें सज्ज होवोनी तेही युद्धार्थ पातले ॥ ४ ॥
ततः - नंतर - नारायणपदाश्रयाः - भगवंताच्या चरणांचा आश्रय आहे ज्यांना असे - पीतया सुधया - प्यालेल्या अमृताने - एधिताः - वृद्धी पावलेले - सर्वे - सर्व - सुरगणाः - देवगण - शस्त्रैः - शस्त्रांनी - (दैत्यान्) प्रतिसंयुयुधुः - दैत्यांबरोबर लढू लागले. ॥४॥
इकडे सर्व देवांनी एक तर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती. शिवाय त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. त्यामुळे तेसुद्धा शस्त्रांनी सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले. (४)
तत्र दैवासुरो नाम रणः परमदारुणः ।
रोधस्युदन्वतो राजन् तुमुलो रोमहर्षणः ॥ ५ ॥
तदा देवासुरो नामे संग्राम थोर जाहला । क्षीराब्धी तटि तो ऐसा रोमांचकारिही बहू ॥ ५ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - तत्र - त्या - उदन्वतः - समुद्राच्या - रोधसि - किनार्यावर - नाम - खरोखर - दैवासुरः - देव व दैत्य यामधील - परमदारुणः - फारच घनघोर - रोमहर्षणः - अंगावर शहारे उठविणारे - तुमुलः - तुंबळ - रणः - युद्ध. ॥५॥
राजा, क्षीरसागराच्या किनार्यावर मोठाच रोमांचकारी आणि भयंकर संग्राम झाला. हाच देवासुरसंग्राम होय. (५)
तत्रान्योन्यं सपत्नास्ते संरब्धमनसो रणे ।
समासाद्यासिभिर्बाणैः निजघ्नुर्विविधायुधैः ॥ ६ ॥
दोन्हीही एकमेकांना प्रबळ जाहले बहू । समोर खड्ग शस्त्रांनी जखमा करु लागले ॥ ६ ॥
तत्र - त्या - रणे - युद्धात - संरब्धमनसः - खवळून गेली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - ते - ते - सपत्नाः - शत्रु - अन्योन्यं - एकमेकांना - समासाद्य - गाठून - असिभिः - तरवारींनी - बाणैः - बाणांनी - विविधायुधैः च - आणि दुसर्या अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी - निजघ्रुः - प्रहार करिते झाले. ॥६॥
तेथे दोघेही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी, बाण आणि इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले. (६)
शंखतूर्यमृदंगानां भेरीडमरिणां महान् ।
हस्त्यश्वरथपत्तीनां नदतां निस्वनोऽभवत् ॥ ७ ॥
त्या वेळी शंख भेर्या नी मृदंग वाजु लागले । हत्ती किंचाळले मोठे रथांचा घर्घराटही । घोडे खिंकाळले सेनीं मोठा कल्लोळ जाहला ॥ ७ ॥
शङ्खतूर्यमृदङ्गानां - शंख, तुतार्या, व मृदंग ह्यांचा - भेरीडमरिणां - नौबद व डमरू ह्यांचा - नदतां हस्त्यश्वरथपत्तीनां (च) - आणि गर्जना करणार्या हत्ती, घोडे, रथ व पायदळ यांचा - महान् निःस्वनः - मोठा गोंगाट - अभवत् - झाला. ॥७॥
त्यावेळी शंख, तुतार्या, मृदंग, नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले. तसेच हत्तींचे चीत्कार, घोड्यांची खिंकाळणी, रथांचे खटखडाट आणि पायदळाच्या ओरडण्याने तेथे मोठाच हलकल्लोळ माजला. (७)
रथिनो रथिभिस्तत्र पत्तिभिः सह पत्तयः ।
हया हयैरिभाश्चेभैः समसज्जन्त संयुगे ॥ ८ ॥
रथ पायदळी घोडे हत्तीदळ परस्परा । भिडले एकमेकांना लढाई जाहली सुरू ॥ ८ ॥
रथिनः - रथी - रथिभिः - रथींबरोबर - पत्तयः - पायदळ - पत्तिभिः सह - पायदळांबरोबर - हयाः - घोडेस्वार - हयैः - घोडेस्वारांबरोबर - च - आणि - इभाः - हत्तीस्वार - इभैः - हत्तीस्वारांबरोबर - तत्र संयुगे - त्या युद्धांत - समसज्जंत - एकमेकांशी लगट करिते झाले. ॥८॥
रणभूमीवर रथींबरोबर रथी, पायदळाबरोबर पायदळ, घोडेस्वारांबरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढू लागले. (८)
उष्ट्रैः केचिदिभैः केचिद् अपरे युयुधुः खरैः ।
केचिद्गौरमृगैः ऋक्षैः द्वीपिभिर्हरिभिर्भटाः ॥ ९ ॥
गाढवे उंट नी सिंह व्याघ्र गौरमृगावरी । बसोनी कुणि ते वीर पातले लढण्यास की ॥ ९ ॥
केचित् - कित्येक - उष्ट्रैः - उंटांनी - केचित् - कित्येक - भटाः - योद्धे - गौरमृगैः - गौरमृगांनी - ऋक्षैः - अस्वलांनी - द्वीपिभिः - वाघांनी - हरिभिः - सिंहांनी - युयुधुः - युद्ध करू लागले. ॥९॥
त्यांपैकी काही वीर उंटांवर, हत्तींवर आणि गाढवांवर बसून लढत होते; तर काहीजण गौरमृग, अस्वल, वाघ आणि सिंहांवर बसून लढत होते. (९)
गृध्रैः कंकैर्बकैरन्ये श्येनभासैस्तिमिंगिलैः ।
शरभैर्महिषैः खड्गैः गोवृषैर्गवयारुणैः ॥ ॥
ससाने बगळे कंक गिधाडा वरती कुणी । मासे नी माकडे रेडे गेंड्यांच्या वरती कुणी । बैसोनी वीर ते कोणी लढाया पातले तिथे ॥ १० ॥
अन्ये - दुसरे - गृधैः - गिधाडांनी - कंकैः - कंकांनी - बकैः - बकांनी - श्येनभासैः - ससाणे व भास यांनी - तिमिङगलैः - तिमिंगिल नावाच्या जलचरांनी - शरभैः - शंरभांनी - महिषैः - महिषांनी - खङगैः - गेंडयांनी - गोवृषैः - मोठमोठया बैलांनी - गवयारुणैः - गवे व अरुण नावाचे रानटी पशु ह्यांनी - युयुधुः - लढले. ॥१०॥
काही सैनिक गिधाडे, कावळे, बगळे, ससाणे आणि कोंबडे यांच्यावर बसले होते; तर पुष्कळसे तिमिंगल मासे, चित्ते, रेडे, गेंडे, गौरेडे, गवे आणि रानडुकरांवर स्वार झाले होते. (१०)
शिवाभिराखुभिः केचित् कृकलासैः शशैर्नरैः ।
बस्तैरेके कृष्णसारैः हंसैरन्ये च सूकरैः ॥ ११ ॥
सायाळ मुंगुसे आणि उंदरे कृष्णमृगही । बकरे माणसे हंस वराह वाहने कुणा ॥ ११ ॥
केचित् - कित्येक - शिवाभिः - कोल्ह्यांनी - आखुभिः - उंदरांनी - कृकलासैः - सरडयांनी - शशैः - सशांनी - नरैः - मनुष्यांनी - एके - कित्येक - बस्तैः - बोकडांनी - अन्ये - दुसरे - कृष्णसारैः - काळविटांनी - हंसैः - हंसांनी - च - आणि - सूकरैः - डुकरांनी. ॥११॥
काहीजण तर कोल्हा, उंदीर, सरडे, ससे, मनुष्ये, बकर्या, काळवीट, हंस आणि डुकरांवर चढून बसले होते. (११)
अन्ये जलस्थलखगैः सत्त्वैर्विकृतविग्रहैः ।
सेनयोरुभयो राजन् विविशुस्तेऽग्रतोऽग्रतः ॥ १२ ॥
जल स्थळ नि आकाशी वीर ते देव दानवी । भिडले एकमेकांसी घुसोनी मारु लागले ॥ १२ ॥
अन्ये - दुसरे - स्थलजलखगैः - पाण्यात, जमिनीवर व आकाशात संचार करणार्या प्राण्यांनी - विकृतविग्रहैः सत्त्वैः - भयंकर शरीराच्या प्राण्यांनी - राजन् - हे राजा - ते - ते - उभयोः - दोन्ही - सेनयोः - सैन्यांच्या - अग्रतः अग्रतः - पुढे पुढे - विविशुः - शिरले. ॥१२॥
हे राजा, अशा प्रकारे पाण्यात, जमिनीवर आणि आकाशात राहणार्या तसेच भयंकर दिसणार्या प्राण्यांवर चढून काही दैत्य दोन्ही सैन्यांमध्ये पुढे पुढे घुसले. (१२)
चित्रध्वजपटै राजन् आतपत्रैः सितामलैः ।
महाधनैर्वज्रदण्डैः व्यजनैर्बार्हचामरैः ॥ १३ ॥ वातोद्धूतोत्तरोष्णीषैः अर्चिर्भिर्वर्मभूषणैः । स्फुरद्भिः विशदैः शस्त्रैः सुतरां सूर्यरश्मिभिः ॥ १४ ॥ देवदानववीराणां ध्वजिन्यौ पाण्डुनन्दन । रेजतुर्वीरमालाभिः यादसामिव सागरौ ॥ १५ ॥
पताका रंगि बेरंगी श्वेतछत्र कितेक ते । पंखे नी चवर्या ज्यांना रत्नांकितचि दंड ते ॥ १३ ॥ दुपट्टे फड्कले तैसे पगडी कलगी तुरे । कवचो भूषणे शस्त्रे दिव्य ते शोभले तदा ॥ १४ ॥ वीरांच्या भिडल्या रांगा देव नी दानवी तशा । महासागर जै दोन्ही एकमेकास भेटले ॥ १५ ॥
राजन् - हे राजा - चित्रध्वजपटैः - चित्रविचित्र पताकांच्या वस्त्रांनी - सितामलैः आतपत्रैः महाधनैः वज्रदंडैः व्यजनैः - पांढर्या स्वच्छ छत्रांनी व अत्यंत मौल्यवान हिर्यांचे दांडे असलेल्या पंख्यांनी - बार्हचामरैः - मोरांच्या पिसांच्या चवर्यांनी - वातोद्धूतोत्तरोष्णीषैः - वार्यांनी उडणारी उपरणी व मुकुट यांनी - अर्चिभिः वर्मभूषणैः - तेजःपुंज कवच व अलंकार यांनी - सूर्यरश्मिभिः - सूर्यकिरणांनी - सुतरां स्फुरद्भिः विशदैः शस्त्रैः - अत्यंत चकचकणार्या निर्मळ शस्त्रांनी - पाण्डुनन्दन - हे पांडुपुत्रा परीक्षिता - सागरौ - दोन समुद्र - यादसाम् (मालाभिः) इव - जलचरांच्या थव्यांनी शोभावे तशा - देवदानववीराणां - पराक्रमी देव व दैत्य यांच्या - ध्वजिन्यौ - दोन सेना - वीरमालाभिः - पराक्रमी पुरुषांच्या रांगांनी - रेजतुः - शोभल्या. ॥१३-१५॥
राजा त्यावेळी रंगीबेरंगी ध्वज, शुभ्र छत्रे, रत्नजडित दंड असलेले बहुमूल्य पंखे, मोरपंख, चवर्य़ा आणि वार्याने उडणारे दुपट्टे, पगड्या, चमकणारी कवचे, अलंकार, सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्रे तसेच वीरांच्या रांगा यांमुळे देव आणि असुरांच्या सेना जलचरांनी सागर शोभावे, अशा शोभत होत्या. (१३-१५)
वैरोचनो बलिः संख्यै सोऽसुराणां चमूपतिः ।
यानं वैहायसं नाम कामगं मयनिर्मितम् ॥ १६ ॥
वैहायस विमानात विरोचनसुतो बळी । बैसला इच्छिता नेई हवे तेथेहि यान ते ॥ १६ ॥
प्रभो - हे परीक्षित राजा - असुराणां - दैत्यांचा - चमूपतिः - सेनापती - वैरोचनः - विरोचनाचा मुलगा - सः - तो - बलिः - बलि - संख्ये - युद्धामध्ये - वैहायसं नाम - ‘वैहायस’ नावाच्या आकाशात उडणार्या - कामगं - इच्छेप्रमाणे चालणार्या - मयनिर्मितं - मयासुराने निर्मिलेल्या - यानं - वाहनात - आस्थितः - बसला. ॥१६॥
परीक्षिता, रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचनपुत्र बळिराज मय दानवाने तयार केलेल्या वैहायस नावाच्या इच्छा असेल तेथे जाणार्या विमानावर आरूढ झाला. (१६)
सर्वसांग्रामिकोपेतं सर्वाश्चर्यमयं प्रभो ।
अप्रतर्क्यं अनिर्देश्यं दृश्यमानमदर्शनम् ॥ १७ ॥
परीक्षिता ! तया मध्ये युद्ध सामग्रि सज्जची । दिसे नी न दिसे केंव्हा अंदाज नच येतसे ॥ १७ ॥
सर्वसाङ्ग्रामिकोपेतं - सर्व प्रकारच्या युद्धसामुग्रीने भरलेल्या - सर्वाश्चर्यमयं - सर्व आश्चर्यकारक वस्तूंनी युक्त अशा - अप्रतर्क्यं - कल्पनातीत - अनिर्देश्यं - अमुकच ठिकाणी आहे असे दाखविता येणार नाही अशा - दृश्यमानं - क्षणात दृष्टिगोचर होणार्या - अदर्शनं - क्षणात न दिसणार्या ॥१७॥
युद्धाची सर्व सामग्री त्यात होती. परीक्षिता, ते इतके आश्चर्यकारक होते की ते कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे. ते कोठे आहे याचे अनुमानसुद्धा करता येत नव्हते, तर त्याविषयी सांगणे कसे शक्य आहे ? (१७)
आस्थितस्तद् विमानाग्र्यं सर्वानीकाधिपैर्वृतः ।
बालव्यजनछत्राग्र्यै रेजे चन्द्र इवोदये ॥ १८ ॥
श्रेष्ठ ऐशा विमानात बळीराजा विराजला । श्रेष्ठ सेनापती त्याच्या भोवती ठाकले उभे । उदीत चंद्रमा जैशी तसा राजा सुशोभला ॥ १८ ॥
तत् - त्या - विमानाग्र्यं - श्रेष्ठ विमानात - आस्थितः - बसलेला - सर्वानीकाधिपैः वृतः - सर्व सेनाधिपतींनी वेष्टिलेला - वालव्यजनछत्राग्र्यैः - चवर्या, पंखे, व मोठमोठी छत्रे यांच्या योगाने - उदये चंद्रः इव - उदयकाळी चंद्र जसा तसा - रेजे - शोभला. ॥१८॥
त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतींसह वसला होता. त्याच्याजवळ ढाळलेली चामरे आणि श्रेष्ठ छत्र यांमुळे तो उदयाचलावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. (१८)
तस्यासन् सर्वतो यानैः यूथानां पतयोऽसुराः ।
नमुचिः शम्बरो बाणो विप्रचित्तिरयोमुखः ॥ १९ ॥ द्विमूर्धा कालनाभोऽथ प्रहेतिर्हेतिरिल्वलः । शकुनिर्भूतसंतापो वज्रदंष्ट्रो विरोचनः ॥ २० ॥ हयग्रीवः शंकुशिराः कपिलो मेघदुन्दुभिः । तारकश्चक्रदृक् शुम्भो निशुम्भो जम्भ उत्कलः ॥ २१ ॥ अरिष्टोऽरिष्टनेमिश्च मयश्च त्रिपुराधिपः । अन्ये पौलोमकालेया निवातकवचादयः ॥ २२ ॥
गटांचे स्वामि ते कैक नमुची शंबरादिक । विप्रचित्ती नि तो बाण शंबरो नि अयोमुख ॥ १९ ॥ द्वीमूर्धा कालनाभो नी प्रहेती हेति इल्वलो । शकुनी भूतसंतापो वज्र दंष्ट्र विरोचन ॥ २० ॥ हयग्रीव शंकुशिरा कपिलो मेघ दुदुंभी । चक्राक्षो तारको शुंभ निशुंभो जंभ उत्कलो ॥ २१ ॥ अरिष्टनेमि अरिष्टो त्रिपुराधिपती मय । कालेय पौलमो तैसा नि वात-कवचादिक ॥ २२ ॥
तस्य - त्या बलिराजाचे - यूथानां - सैन्यांचे - पतयः - अधिपती - असुराः - दैत्य - यानैः - आपल्या वाहनांवर बसून - सर्वतः - सभोवार - आसन् - सिद्ध होते - नमुचिः - नमुचि - शंबरः - शंबर - बाणः - बाण - विप्रचित्तिः - विप्रचित्ति - अयोमुखः - अयोमुख - द्विमूर्धा - द्विमूर्धा - कालनाभः - कालनाभ - अथ - त्याचप्रमाणे - प्रहेतिः - प्रहेति - हेतिः - हेति - इल्वलः - इल्वल - शकुनिः - शकुनि - भूतसंतापः - भूतसंताप - वज्रदंष्ट्रः - वज्रदंष्ट्र - विरोचनः - विरोचन - हयग्रीवः - हयग्रीव - शंकुशिराः - श्ंकुशिरा - कपिलः - कपिल - मेघदुंदुभिः - मेघदुंदुभि - तारकः - तारक - चक्रदृक् - चक्रदृक् - शुंभः - शुंभ - निशुंभः - निशुंभ - जंभः - जंभ - उत्कलः - उत्कल - अरिष्टः - अरिष्ट - च - आणि - अरिष्टनेमिः - अरिष्टनेमि - च - आणि - त्रिपुराधिपः मयः - तीन नगरांचा स्वामी मय - अन्ये - दुसरे - पौलोमकालेयाः - पौलोम व कालेय या नावाचे - निवातकवचादयः - निवातकवच आदिकरून - ॥१९-२२॥
त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमुची, शंबर, बाण, विप्रचित्ती, अयोमुख, द्विमूर्धा, कालनाभ, प्रहेती, हेती, इल्वल, शकुनी, भूतसंताप, वज्रदंष्ट्र, विरोचन, हयग्रीव, शंकुशिरा, कपिल, मेघदुंदुभी, तारक चक्राक्ष, शुंभ, निशुंभ, जंभ, उत्कल, अरिष्ट, अरिष्टनेमी, त्रिपुराधिपती मय, पौलोम, कालेय आणि निवातकवच वगैरे सेनाविभागप्रमुख होते. (१९-२२)
अलब्धभागाः सोमस्य केवलं क्लेशभागिनः ।
सर्व एते रणमुखे बहुशो निर्जितामराः ॥ २३ ॥
मंथनी सगळे होते परी अमृत ना तयां । देवता हरवील्या त्या जयांनी युद्धि कैक त्या ॥ २३ ॥
सोमस्य अलब्धभागाः - अमृताचा भाग ज्यांना मिळाला नाही असे - केवलं - फक्त - क्लेशभागिनः - श्रमाचे भागीदार झालेले - सर्वे - सर्व - एते - हे - बहुशः - बहुतेक - रणमुखे - युद्धाच्या अग्रभागी - निर्जितामराः - जिंकिले आहेत देव ज्यांनी असे - ॥२३॥
हे सर्वजण समुद्रमंथन करण्यात सामील झाले होते. परंतु त्यांना अमृतातील हिस्सा मिळाला नाही. फक्त क्लेशच हाती लागले. या सर्व असुरांनी एकदा नव्हे अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केले होते. (२३)
सिंहनादान् विमुञ्चन्तः शंखान् दध्मुर्महारवान् ।
दृष्ट्वा सपत्नानुत्सिक्तान् बलभित् कुपितो भृशम् ॥ २४ ॥
सिंहनाद करोनीया दैत्यांनी शंख फुंकिले । उत्साहे पातले सर्व उन्माद क्रोधही तसा ॥ २४ ॥
सिंहनादान् विमुञ्चन्तः - सिंहनाद करणारे - महारवान् शंखान् - मोठा शब्द करणारे शंख - दध्मुः - वाजविते झाले - बलभित् - इंद्र - सपत्नान् उत्सिक्तान् दृष्ट्वा - शत्रु उच्छृंखल झालेले पाहून - भृशं - अत्यंत - कुपितः - रागावला. ॥२४॥
म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपालले कर्कश आवाजाने शंख वाजवू लागले. जेव्हा आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला. (२४)
ऐरावतं दिक्करिणं आरूढः शुशुभे स्वराट् ।
यथा स्रवत्प्रस्रवणं उदयाद्रिमहर्पतिः ॥ २५ ॥
ऐरावतावरी इंद्र बैसला सूर्याची जसा । उदयांचलि तेजाने, मंद तो गालि हासला ॥ २५ ॥
यथा - ज्याप्रमाणे - स्रवत्प्रस्रवणं उदयाद्रिं (आरूढः) - ज्याच्यापासून अनेक झरे पाझरत आहेत अशा उदयाचल पर्वतावर उगवलेला - अहर्पतिः - सूर्य - ऐरावतं - ऐरावतनामक - दिक्करिणं - दिग्गजावर - आरूढः - बसलेला - स्वराट् - स्वर्गाधिपति इंद्र - शुशुभे - शोभला. ॥२५॥
तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरूढ झाला. तेव्हा अनेक झर्यांनी शोभणार्या उदयाचलावर आरूढ झालेल्या सूर्यासारखा वाटत होता. (२५)
तस्यासन्सर्वतो देवा नानावाहध्वजायुधाः ।
लोकपालाः सहगणैः वाय्वग्निवरुणादयः ॥ २६ ॥
देवता वाहनारुढ ध्वज आयूध घेउनी । इंद्राच्या भोवती आले वायू अग्नी वरूणही ॥ २६ ॥
नानावाहध्वजायुधाः - अनेक प्रकारची वाहने, पताका व शस्त्रास्त्रे ज्यांच्याजवळ आहेत असे - लोकपालाः - लोकपाल - वाय्वग्निवरुणादयः - वायु, अग्नि, वरूण इत्यादि - देवाः - देव - गणैः सह - आपापल्या गणांसह - तस्य - त्या इंद्राच्या - सर्वतः - सभोवार - आसन् - होते. ॥२६॥
इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाहने, ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगण तसेच आपापल्या गणांसह वायू, अग्नी, वरुण इत्यादी लोकपाल येऊन उभे ठाकले. (२६)
तेऽन्योन्यं अभिसंसृत्य क्षिपन्तो मर्मभिर्मिथः ।
आह्वयन्तो विशन्तोऽग्रे युयुधुर्द्वन्द्वयोधिनः ॥ २७ ॥
एकासी एक बाजूला गाठोनी लढु लागले । नावें ओरडुनी कोणी धिक्कारूनि हि बोलती ॥ २७ ॥
ते - ते - अन्योन्यं - परस्परांना - अभिसंसृत्य - गाठून - मर्मभिः - मर्मभेदक शब्दांनी - मिथः - एकमेकांना - क्षिपन्तः - निंदिणारे - आह्वयन्तः - एकमेकांला युद्धाकरिता बोलावणारे - अग्रे - पुढे पुढे - विशन्तः - घुसणारे - द्वन्द्वयोधिनः - जोडीजोडीने युद्ध करणारे - युयुधुः - लढू लागले. ॥२७॥
दोन्ही सैन्ये एकमेकांच्या समोर उभी राहिली. दोघा दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले. कोणी पुढे जात होता तर कोणी नावे घेऊन ललकारत होता. कोणी कोणी मर्मभेदी शब्दांनी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करीत होता. (२७)
युयोध बलिरिन्द्रेण तारकेण गुहोऽस्यत ।
वरुणो हेतिनायुध्यन् मित्रो राजन् प्रहेतिना ॥ २८ ॥
इंद्र तो बळिसी तैसे कार्तिको तारकासुरा । वरुणो हेतिसी तैसा प्रहेतीसीच मित्र तो ॥ २८ ॥
बलिः - बलिराजा - इंद्रेण - इंद्राबरोबर - युयोध - लढू लागला - गुहः - कार्तिकस्वामी - तारकेण - तारकासुराबरोबर - अस्यत - आयुधे फेकून लढला - राजन् - हे परीक्षित राजा - वरुणः - वरुण - हेतिना - हेतिनामक दैत्याबरोबर - मित्रः - मित्र - प्रहेतिना - प्रहेतिनामक दैत्याबरोबर - अयुध्यत् - लढला. ॥२८॥
बली इंद्राशी, कार्तिकस्वामी तारकासुराशी, वरुण हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले. (२८)
यमस्तु कालनाभेन विश्वकर्मा मयेन वै ।
शम्बरो युयुधे त्वष्ट्रा सवित्रा तु विरोचनः ॥ २९ ॥
यम तो कालनाभासि विश्वकर्मा मयाशि नी । त्वष्टा तो शंबरासूरा सविता हा विरोचना ॥ २९ ॥
यमः तु - यम तर - कालनाभेन - कालनाभाबरोबर - वै - खरोखर - विश्वकर्मा - विश्वकर्मा - मयेन - मयाबरोबर - शंबरः - शंबर - त्वष्ट्रा - त्वष्टयाबरोबर - विरोचनः तु - विरोचन तर - सवित्रा - सवित्याबरोबर - युयुधे - लढला. ॥२९॥
यमराज कालनाभाशी, विश्वकर्मा मयाशी, शंबरासुर त्वष्ट्याशी आणि सविता विरोचनाशी लढू लागले. (२९)
अपराजितेन नमुचिः अश्विनौ वृषपर्वणा ।
सूर्यो बलिसुतैर्देवो बाणज्येष्ठैः शतेन च ॥ ३० ॥
अपराजितासि नमुची वृषपर्वासि अश्विनो । बाणादी बळिचे पुत्र शत त्या भिडला रवी ॥ ३० ॥
नमुचिः - नमुचि - अपराजितेन - अपराजिताबरोबर - अश्विनौ - अश्विनीकुमार - वृषपर्वणा - वृषपर्व्याबरोबर - च - आणि - सूर्यः देवः - सूर्यदेव - शतेन - शंभर - बाणज्येष्ठैः - ज्यात बाण वडील आहे अशा - बलिसुतैः - बलिपुत्रांसह. ॥३०॥
नमुची अपराजिताशी, अश्विनीकुमार वृषपर्व्याशी तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी शंभर पुत्रांशी युद्ध करू लागले. (३०)
राहुणा च तथा सोमः पुलोम्ना युयुधेऽनिलः ।
निशुम्भशुम्भयोर्देवी भद्रकाली तरस्विनी ॥ ३१ ॥
राहूशी लढला चंद्र पुलोमायास वायु तो । भद्रकाली निशुंबासी-शुंबासी लढु लागली ॥ ३१ ॥
तथा - त्याप्रमाणे - सोमः - चंद्र - राहुणा - राहूबरोबर - अनिलः - अग्नि - पुलोम्ना - पुलोम्याबरोबर - च - आणि - तरस्विनी - वेगवती - भद्रकाली देवी - भद्रकाली देवी - शुंभनिशुंभयोः - शुंभ व निशुंभ ह्यांच्यासह - युयुधे - लढली. ॥३१॥
राहूबरोबर चंद्राचे आणि पुलोमाबरोबर वायूचे युद्ध झाले. भद्रकाशी देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली. (३१)
वृषाकपिस्तु जम्भेन महिषेण विभावसुः ।
इल्वलः सह वातापिः ब्रह्मपुत्रैररिन्दम ॥ ३२ ॥
जंभासुरास हर नी अग्नि तो महिषासुरा । वातापी-इल्वलो यांना मरिच्ये गाठिले असे ॥ ३२ ॥
अरिंदम - हे शत्रुदमना परीक्षित राजा - वृषाकपिः तु - वृषाकपि तर - जंभेन - जंभाबरोबर - विभावसुः - अग्नि - महिषेण - महिषाबरोबर - सहवातापिः इल्वलः - वातापिसहित इल्वल - ब्रह्मपुत्रैः - ब्रह्मदेवाच्या पुत्रांसह. ॥३२॥
परीक्षिता, जंभासुराशी महादेवांची, महिषासुराशी अग्निदेवाची आणि वातापी तसेच इल्वलाशी ब्रह्मदेवांच्या पुत्रांची लढाई जुंपली. (३२)
कामदेवेन दुर्मर्ष उत्कलो मातृभिः सह ।
बृहस्पतिश्च उशनसा नरकेण शनैश्चरः ॥ ३३ ॥
दुर्मर्षासी कामदेवे उत्कला मातृदैवते । शुक्र-बृहस्पति जोडी शनी नी नरकासुरो ॥ ३३ ॥
दुर्मषः - दुर्मष - कामदेवेन - कामदेवाबरोबर - उत्कलः - उत्कल - मातृभिः सह - मातृदेवतांसह - बृहस्पतीः - बृहस्पती - उशनसा - शुक्राचार्याबरोबर - च - आणि - शनैश्चरः - शनैश्चर - नरकेण - नरकाबरोबर. ॥३३॥
दुर्मर्षाची कामदेवाशी, उत्कलाची मातृगणांशी, शुक्राचार्याची बृहस्पतीशी आणि नरकासुराची शनैश्चराशी लढाई होऊ लागली. (३३)
मरुतो निवातकवचैः कालेयैर्वसवोऽमराः ।
विश्वेदेवास्तु पौलोमै रुद्राः क्रोधवशैः सह ॥ ३४ ॥
निवातकवचाला ते मरुद्गण तसे पहा । विश्वदेवो लढाया ते पौलोमा पुढती तसे । क्रोधवशा सवे रुद्र संग्रामा लागले तदा ॥ ३४ ॥
मरुतः - मरुत - निवातकवचैः - निवातकवचांसह - वसवः - वसु - अमराः - देव - कालेयैः - कालेयांबरोबर - विश्वेदेवाः - विश्वेदेव - पौलोमैः - पौलोमांसह - रुद्राः - रुद्र - क्रोधवशैः सह - क्रोधवशांसह. ॥३४॥
निवातकवचांच्या बरोबर मरुद्गणांचा, कालेयांबरोबर वसुगणांचा पौलोमाबरोबर विश्वेदेवांचा तसेच क्रोधवशांबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला. (३४)
त एवमाजावसुराः सुरेन्द्रा
द्वन्द्वेन संहत्य च युध्यमानाः । अन्योन्यमासाद्य निजघ्नुरोजसा जिगीषवस्तीक्ष्ण शरासितोमरैः ॥ ३५ ॥
(इंद्रवज्रा) असे सुरासूर परस्परात यशास इच्छोनि लढ्यात आले । नि बाण खड्गे क्षति पोचवीत परोपरीने लढु लागले की ॥ ३५ ॥
एवं - याप्रमाणे - आजौ - युद्धात - द्वंद्वेन - द्वंद्वयुद्धात - संहत्य - एकत्र गाठून - युद्ध्यमानाः - लढणारे - ते - ते - असुराः - दैत्य - च - आणि - सुरेन्द्राः - मोठे देव - ओजसा - शक्तीने - जिगीशवः - जिंकण्याची इच्छा करणारे - अन्योन्यं - एकमेकांवर - आसाद्य - चाल करून - तीक्ष्णशरासितोमरैः - तीक्ष्ण बाण, तरवार व तोमरे यांनी - निजघ्रुः - प्रहार करिते झाले. ॥३५॥
अशा प्रकारे असुर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि सामूहिक आक्रमणाने एकमेकांबरोबर येऊन विजय मिळविण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले. (३५)
भुशुण्डिभिश्चक्रगदर्ष्टिपट्टिशैः
शक्त्युल्मुकैः प्रासपरश्वधैरपि । निस्त्रिंशभल्लैः परिघैः समुद्गरैः सभिन्दिपालैश्च शिरांसि चिच्छिदुः ॥ ३६ ॥
तोफा गदा पट्टिश प्राश भाले उल्मूक फर्शा तलवार बाण । नी भिंदिपाले परिघे करून छेदोनि गेले शिर कैक वीर ॥ ३६ ॥
भुशुंडिभिः - भुशुंडिंनी - चक्रगदर्ष्टिपटटिशैः - चक्र, गदा, ऋष्टि व पटटिश यांनी - शक्त्युल्मुकैः - शक्ति व कोलत्या यांनी - प्रासपरश्वधैः अपि - भाले व कुर्हाडी यांनी सुद्धा - निस्त्रिंशभल्लैः - खङग व बाण यांनी - च - आणि - समुद्गरेः सभिंदिपालैः परिधैः - हातोडे, गोफणी, भिंदिपाल व काटेरी सोटे यांनी - शिरांसि - मस्तके - चिच्छिदुः - तोडिते झाले. ॥३६॥
गोफणी, चक्रे, गदा, दुधारी तलवारी, पट्टे. शक्ति, कोलिते, भाले, परशू, तलवारी, मुद्गल, आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले. (३६)
गजास्तुर~घ्गाः सरथाः पदातयः
सारोहवाहा विविधा विखण्डिताः । निकृत्तबाहूरु शिरोधराङ्घ्रयझ् छिन्नध्वजेष्वासतनुत्रभूषणाः ॥ ३७ ॥
अश्वो गजो नी रथ वाहने ती विच्छिन्न सेना तइ काळ झाळी । जांघा भुजा मान नि पाय कैका तुटोनि गेले कवच ध्वजो ही ॥ ३७ ॥
गजाः - हत्ती - तुरंगाः - घोडे - सरथाः - रथांसह - पदातयः - पायदळ - विविधाः - अनेकप्रकारचे - सारोहवाहाः - स्वारांसह घोडे - निकृत्तबाहूशिरोधराङ्घ्रयः - ज्यांचे दंड, मांडया, मस्तके व पाय तुटून गेले आहेत असे - छिन्नध्वजेष्वासतनुत्रभूषणाः - पताका, धनुष्ये, चिलखते व अलंकार ज्यांचे छिन्नभिन्न झाले आहेत असे - विखण्डिताः (अभवन्) - खंडित झाले. ॥३७॥
त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती, घोढे, रह इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्न-भिन्न होऊ लागली. कोणाचे हात, कोणाच्या मांड्या, कोणाची मान आणि कोणाचे पाय तुटून पडले, तर काहीजणांच्या ध्वजा, धनुष्ये, कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले. (३७)
तेषां पदाघातरथांगचूर्णिता-
दायोधनादुल्बण उत्थितस्तदा । रेणुर्दिशः खं द्युमणिं च छादयन् न्यवर्ततासृक्स्रुतिभिः परिप्लुतात् ॥ ३८ ॥
हत्ती नि वीरे पद आपटीता तसे रथाने भुमि छिन्न झाली । धुळीत गेला रवि झाकुनी तो दाही दिशांना धुळ-धूळ झाली । कांही क्षणांनी मग रक्तपाते पृथ्वी भिजोनी धुळ शांत झाली ॥ ३८ ॥
तदा - त्यावेळी - तेषां - त्यांच्या - पदाघातरथांगचूर्णितात् - पादताडनांनी व रथांच्या चाकांनी चूर्ण होऊन गेलेल्या - आयोधनात् - युद्धभूमीपासून - उत्थितः - उडालेली - उल्बणः - भयंकर - रेणुः - धूळ - दिशः - दिशांना - खं - आकाशाला - च - आणि - द्युमर्णि - सूर्याला - छादयन् - आच्छादून टाकणारी - असृक्स्रुतिभिः - रक्तप्रवाहांनी - परिप्लुतात् (खात्) - भिजलेल्या आकाशातून - न्यवर्तत - परत खाली पडली. ॥३८॥
त्यांच्या पायांची आदळआपट आणि रथांच्या चाकांच्या घर्षणाने जमिनीवर खड्डे पडले. त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली होती की, तिने दिशा, आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले. परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही. (३८)
शिरोभिरुद्धूतकिरीटकुण्डलैः
संरम्भदृग्भिः परिदष्टदच्छदैः । महाभुजैः साभरणैः सहायुधैः सा प्रास्तृता भूः करभोरुभिर्बभौ ॥ ३९ ॥
पुन्हा शिरांचा रणि ढीग झाला ती क्रोधमुद्रा मुकुटे तशीच । ते शस्त्र तैसे तुटल्या करात ऐशी भुमी भीषण ती जहाली ॥ ३९ ॥
सा - ती - भूः - पृथ्वी - उध्दूतकिरीटकुंडलैः - उडालेली आहेत मुकुटकुंडले जेथून अशा - सरंभदृग्भिः - ज्यातील डोळे वटारल्यासारखे आहेत अशा - परिदष्टदच्छदैः - ज्यातील ओठ चावले गेले आहेत अशा - शिरोभिः - मस्तकांनी - साभरणैः - अलंकारासह - सहायुधैः - आयुधांसह - महाभुजैः - मोठमोठया बाहूंनी - करभोरुभिः - हत्तिशुंडेसारख्या मांडयांनी - प्रास्तृता - अंथरलेली अशी - बभौ - शोभली. ॥३९॥
त्यानंतर लढाईचे मैदान, तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेले. कुणाचे मुगुट आणि कुंडले गळून पडली होती तर कोणाच्या डोळ्यांतून क्रोध प्रगट होत होता. काहीजणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते. पुष्कळांचे अलंकार आणि शास्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळांच्या मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती. (३९)
(अनुष्टुप्)
कबन्धास्तत्र चोत्पेतुः पतितस्वशिरोऽक्षिभिः । उद्यतायुधदोर्दण्डैः आधावन्तो भटान् मृधे ॥ ४० ॥
(अनुष्टुप्) कांहीची तुटकी डोकी पाहता धड वेगळे । हातात शस्त्र घेवोनी शत्रूंच्या वरि धावले ॥ ४० ॥
च - आणि - तत्र - त्या - मृधे - युद्धात - पतितस्वशिरोऽक्षिभिः - आपल्या तुटून पडलेल्या मस्तकांच्या नेत्रांनी - कबंधाः - धडे - उद्यतायुधदोर्दण्डैः (युक्ताः) - उगारलेली आहेत आयुधे ज्यांनी अशा बाहूंनी युक्त अशी - भटान् - योध्द्यांच्या अंगावर - आधावन्तः - धावत - उत्पेतुः - चाल करून गेली. ॥४०॥
तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपल्या हातात हत्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली. (४०)
बलिर्महेन्द्रं दशभिः त्रिभिरैरावतं शरैः ।
चतुर्भिश्चतुरो वाहान् एकेनारोहमार्च्छयत् ॥ ४१ ॥
बळीराये दहा बाण इंद्राच्या वरि नी त्रय । ऐरावता वरी चार रक्षकांवरि सोडिले । महावता वरी एक आठरा सोडिले असे ॥ ४१ ॥
बलिः - बलिराजा - दशभिः - दहा बाणांनी - महेन्द्रं - इंद्राला - त्रिभिः - तीन - शरैः - बाणांनी - ऐरावतं - ऐरावताला - चतुर्भिः - चारांनी - चतुरः वाहान् - चार घोडयांना - एकेन - एका बाणाने - आरोहं - महाताला - आर्च्छयत् - प्रहार करिता झाला. ॥४१॥
राजा बलीने दहा इंद्रावर, तीन ऐरावत हत्तीवर, चार हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि एक माहुतावर असे बाण सोडले. (४१)
स तान् आपततः शक्रः तावद्भिः शीघ्रविक्रमः ।
चिच्छेद निशितैर्भल्लैः असम्प्राप्तान् हसन्निव ॥ ४२ ॥
इंद्राने पाहिले हे तो घायाळ करु पाहती । भल्लतीरे तये सारे तोडिले वरच्यावरी ॥ ४२ ॥
शीघ्रविक्रमः - त्वरेने युद्ध करणारा - सः - तो - शक्रः - इंद्र - हसन् इव - हंसत हंसत - आपततः - अंगावर येणार्या - तान् - त्या बाणांना - असंप्राप्तान् एव - जवळ येण्याच्या आधीच - तावद्भिः - तितक्या - निशितैः - तीक्ष्ण - भल्लैः - बाणांनी - चिच्छेद - तोडिता झाला. ॥४२॥
पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोहोचण्यापूर्वी भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणांनी हसत-हसत तोडून टाकले. (४२)
तस्य कर्मोत्तमं वीक्ष्य दुर्मर्षः शक्तिमाददे ।
तां ज्वलन्तीं महोल्काभां हस्तस्थामच्छिनद्धरिः ॥ ४३ ॥
इंद्राची स्फूर्ति पाहोनी चिडला बळि तो बहू । उल्केपरी दुजी शक्ती योजिता नष्टली तशी ॥ ४३ ॥
तस्य - त्याचे - उत्तमं - श्रेष्ठ - कर्म - कृत्य - वीक्ष्य - पाहून - दुर्मर्षः - रागावलेला बलिराजा - शक्तिं - शक्तिनामक आयुध - आददे - घेता झाला - हरिः - इंद्र - ज्वलंतीं - तेजःपुंज - महोल्काभां - धगधगीत - हस्तस्थां - हातात असणार्या - तां - त्या शक्तीला - अच्छिनत् - तोडिता झाला. ॥४३॥
इंद्राचा हा प्रशंसनीय पराक्रम पाहून राजा बलीने आणखी चिडून आगीच्या लोळासारखी प्रज्वलित शक्ती हातात घेतली. परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली. (४३)
ततः शूलं ततः प्रासं ततस्तोमरमृष्टयः ।
यद् यद् शस्त्रं समादद्यात् सर्वं तदच्छिनद् विभुः ॥ ४४ ॥
क्रमाने शूळ नी प्रास तोमरा शक्ति स्थापुनी । धरिता करि ते तेही इंद्राने सर्व तोडिले ॥ ४४ ॥
ततः - नंतर - शूलं - शूळ - ततः - नंतर - प्रासं - भाला - ततः - त्यानंतर - तोमरं - तोमर - च - आणि - ऋष्टयः - दुधारी तलवारी - यत् यत् - जे जे - शस्त्रं - शस्त्र - बलिः समादद्यात् - बलीने घेतले - तत् - ते - सर्वं - सर्व - विभुः - इंद्र - अच्छिनत् - तोडिता झाला. ॥४४॥
यानंतर बलीने एकापाठोपाठ एक शूल, भाला, तोमर, आणि शक्ती यातात घेतली. परंतु जे जे शत्र हातात घेई, त्याचे इंद्र तुकडे तुकडे करून टाकी. (४४)
ससर्जाथासुरीं मायां अन्तर्धानगतोऽसुरः ।
ततः प्रादुरभूच्छैलः सुरानीकोपरि प्रभो ॥ ४५ ॥
इंद्राचा पाहुनी वेग जाहला गुप्त तो बळी । निर्मिली असुरी सृष्टी गिरी देवांचिया वरी ॥ ४५ ॥
अथ - नंतर - असुरः - बलिराजा - अन्तर्धानं गतः - गुप्त झालेला असा - आसुरी मायां - दैत्यांच्या मायेला - ससर्ज - सोडिता झाला - ततः - नंतर - प्रभो - हे परीक्षित राजा - सुरानीकोपरि - देवसैन्यांच्या डोक्यावर - शैलः - पर्वत - प्रादुरभूत् - उत्पन्न झाला. ॥४५॥
परीक्षिता, यानंतर बलीने गुप्त होऊन आसुरी मायेने देवांच्या सेनेवर एक पर्वत निर्माण केला. (४५)
ततो निपेतुस्तरवो दह्यमाना दवाग्निना ।
शिलाः सटंकशिखराः चूर्णयन्त्यो द्विषद्बलम् ॥ ४६ ॥
दावाग्नी परि ते तप्त वृक्ष पाषाण त्यातुनी । पडता देवतांचा तो चेंदाचि करु लागले ॥ ४६ ॥
ततः - नंतर - दवाग्निना - वणव्याने - दह्यमानाः - जळणारे - तरवः - वृक्ष - च - आणि - द्विषद्वलं - शत्रुसैन्याला - चूर्णयन्त्यः - चुरडून टाकणारे - सटंकशिखराः - टाकीसारख्या तीक्ष्ण टोकांचे - शिलाः - दगड - निपेतुः - पडले. ॥४६॥
त्या पर्वतावरून वणव्याने जळणारे वृक्ष आणि करवतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शिळा खाली पडू लागल्या, त्यामुळे देवतांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला. (४६)
महोरगाः समुत्पेतुः दन्दशूकाः सवृश्चिकाः ।
सिंहव्याघ्रवराहाश्च मर्दयन्तो महागजान् ॥ ४७ ॥
थोर सर्प तसे विंचू अंगासी दंशु लागले । डुकरे सिंह वाघादी हत्तींना फाडु लागले ॥ ४७ ॥
महोरगाः - मोठमोठे सर्प - सवृश्चिकाः - विंचवांसह - दंदशूकाः - नाग - च - आणि - महागजान् - मोठमोठया हत्तींना - मर्दयन्तः - मारणारे - सिंहव्याघ्रवराहाः - सिंह, वाघ व डुक्कर - समुत्पेतुः - उडया टाकू लागले. ॥४७॥
त्यानंतर मोठमोठे विषारी साप, विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले. सिंह, वाघ आणि रानडुकरे देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले. (४७)
यातुधान्यश्च शतशः शूलहस्ता विवाससः ।
छिन्धि भिन्धीति वादिन्यः तथा रक्षोगणाः प्रभो ॥ ४८ ॥
परीक्षिता ! करीं शूळ कापा-मारा असे मुखे । बोलता नागडे कैक आले राक्षस राक्षसी ॥ ४८ ॥
प्रभो - हे परीक्षित राजा - शूलहस्ताः - हातात शूळ घेतलेल्या - च - आणि - विवाससः - नग्न - छिन्धि - तोडा - भिन्धि - फोडा - इति - याप्रमाणे - वादिन्यः - बोलणार्या - शतशः - शेकडो - यातुधान्यः - राक्षसिणी - तथा - त्याचप्रमाणे - रक्षोगणाः - राक्षससमूह. ॥४८॥
परीक्षिता, हातामध्ये शूळ घेऊन "मारा, तोडा" असे ओरडत शेकडो नागड्या-उघड्या राक्षसिणी आणि राक्षससुद्धा तेथे प्रगट झाले. (४८)
ततो महाघना व्योम्नि गम्भीरपरुषस्वनाः ।
अंगारान् मुमुचुर्वातैः आहताः स्तनयित्नवः ॥ ४९ ॥
आकाशी घन ते आले टकरी गर्जले बहू । कडाडल्या विजा तैशा तमात वृष्टि जाहली ॥ ४९ ॥
ततः - नंतर - व्योम्नि - आकाशात - गंभीरपुरुषस्वनाः - गंभीर व कठोर शब्द करणारे - महाघनाः - मोठमोठे मेघ - वातैः - वायूंनी - आहताः - ताडिलेले असे - स्तनयित्नवः - गर्जना करून - अंगारान् - निखारे - मुमुचुः - खाली टाकिते झाले. ॥४९॥
काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या. त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोठ्याने गर्जना करणे होणे सुरू झाले. विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ सुरू होऊन ढतून निखारे खाली पडू लागले. (४९)
सृष्टो दैत्येन सुमहान् वह्निः श्वसनसारथिः ।
सांवर्तक इवात्युग्रो विबुध ध्वजिनीमधाक् ॥ ५० ॥
अग्निची वृष्टि ही केली बळीने ती भयानक । क्षणात सुटला वारा पेटले देवसैन्य ते ॥ ५० ॥
दैत्येन - दैत्याने - सृष्टः - उत्पन्न केलेला - श्वसनसारथिः - वायू हा सारथि ज्याचा असा - सांवर्तकः इव - प्रलयकालीनच जणू असा - अत्युग्रः - भयंकर - वह्निः - अग्नि - विबुधध्वजनीं - देवसैन्याला - अधाक् - जाळिता झाला. ॥५०॥
दैत्यराज बळीने प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली. त्या अग्नीने वार्याच्या सहाय्याने देवसेना जाळावयास सुरुवात केली. (५०)
ततः समुद्र उद्वेलः सर्वतः प्रत्यदृश्यत ।
प्रचण्डवातैरुद्धूत तरंगावर्तभीषणः ॥ ५१ ॥
वादळी सागरीलाटा चौदिशीं उठल्या पुन्हा । जणू समुद्र उल्लंघी सीमा नी वेढितो असा ॥ ५१ ॥
ततः - नंतर - सर्वतः - चारी बाजूंनी - उद्वेलः - मर्यादा सोडून उसळलेला - समुद्रः - समुद्र - प्रचण्डवातैः उध्दूत तरङगावर्तभीषणः - प्रचंड वार्यांनी उठविलेल्या लाटांमुळे उत्पन्न झालेल्या भोवर्यांनी भयंकर - प्रत्यदृश्यत - दिसला. ॥५१॥
थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोवरे निर्माण झालेले समुद्र किनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले. (५१)
एवं दैत्यैर्महामायैः अलक्ष्यगतिभीषणैः ।
सृज्यमानासु मायासु विषेदुः सुरसैनिकाः ॥ ५२ ॥
भयानक अशी दैत्ये लपोनी सृष्टि निर्मिली । न दिसे शत्रु तो गुप्त देवता दुःखि जाहल्या ॥ ५२ ॥
एवं - याप्रमाणे - महामायैः - मोठया मायावी अशा - अलक्ष्यगतिभीषणैः - ज्यांच्या गति दिसत नसल्यामुळे भयंकर आहेत अशा - दैत्यैः - दैत्यांकडून - मायासु सृज्यमानासु - माया उत्पन्न केल्या जात असता - सुरसैनिकाः - देवसैन्य - विषेदुः - खिन्न झाले. ॥५२॥
अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असुरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या, तेव्हा देवांचे सैनिक घाबरून गेले. (५२)
न तत्प्रतिविधिं यत्र विदुरिन्द्रादयो नृप ।
ध्यातः प्रादुरभूत् तत्र भगवान् विश्वभावनः ॥ ५३ ॥
प्रतिकारा तदा इंद्रे विचारा योजिले परी । उपाय खुंटला तेंव्हा स्मरिले हरिला तये । तात्काल हरि तो साक्षात् समोर राहिला असे ॥ ५३ ॥
नृप - हे राजा - यत्र - ज्यावेळी - इंद्रादयः - इंद्रादि देव - तत्प्रतिविधिं - त्याच्या प्रतिकाराला - न विदुः - जाणते झाले नाहीत - तत्र - त्यावेळी - विश्वभावनः - जगाला उत्पन्न करणारा - भगवान् - परमेश्वर - ध्यातः - ध्यायिलेला असा - प्रादुरभूत् - प्रगट झाला. ॥५३॥
परीक्षिता, जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही, तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचे ध्यान केले आणि तत्क्षणी ते प्रगट झाले. (५३)
ततः सुपर्णांसकृतांघ्रिपल्लवः
पिशंगवासा नवकञ्जलोचनः । अदृश्यताष्टायुधबाहुरुल्लसत् श्रीकौस्तुभानर्घ्यकिरीटकुण्डलः ॥ ५४ ॥
(इंद्रवज्रा) ते श्रेष्ठ सौंदर्य असेचि होते ठेवी गरूडी पदपंकजाते । शस्त्रे करी नी कटि पीतवस्त्र कौस्तूभकंठी शिरि तो किरीट । ती कुंडले शोभलि कर्णभागी देवे असा हा हरि पाहिला की ॥ ५४ ॥
ततः - नंतर - सुपर्णांसकृताङ्घ्रिपल्लवः - गरुडाच्या खांद्यावर ठेविले आहेत चरणकमल असा - पिशंगवासाः - पिंगट वस्त्र धारण करणारा - नवकञ्जलोचनः - नवीन कमळाप्रमाणे डोळे असलेला - अष्टायुधबाहुः - आठ हातात आठ आयुधे धारण करणारा - उल्लसच्छ्रीकौस्तुभानर्ध्यकिरीटकुण्डलः - ज्याच्यावर लक्ष्मी, कौस्तुभमणि व अमोल किरीटकुंडले शोभत आहेत असा - अदृश्यत - दिसला. ॥५४॥
त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. त्याज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. त्यांनी पीतांबर परिधान केला होता. त्यांच्या आठ हातात आठ आयुधे, छातीवर लक्ष्मी आणि कौस्तुभ मणी, मस्तकावर अमूल्य मुगुट तसेच कानांमध्ये कुंडले झगमगत होती. देवांना त्यांचे असे रूप दिसले. (५४)
तस्मिन्प्रविष्टेऽसुरकूटकर्मजा
माया विनेशुर्महिना महीयसः । स्वप्नो यथा हि प्रतिबोध आगते हरिस्मृतिः सर्वविपद्विमोक्षणम् ॥ ५५ ॥
त्याच्या प्रवेशे कपटी अशी ती लोपूनि गेली मग सर्व माया । जै स्वप्न दृश्ये ठरती असत्य तशा विपत्ती हरि नष्टितो तो ॥ ५५ ॥
यथा - ज्याप्रमाणे - प्रतिबोधे आगते - जागेपण प्राप्त झाले असता - स्वप्नः - स्वप्न - हि - त्याप्रमाणेच - तस्मिन् प्रविष्टे - तो विष्णु प्रविष्ट झाला असता - महीयसः - थोर पुरुषाच्या - महिना - माहात्म्याने - असुरकूटकर्मजाः - दैत्यांच्या कपटी कर्मापासून उद्भवणार्या - मायाः - माया - विनेशु - नष्ट झाल्या - हरिस्मृतिः - हरिस्मरण - सर्वविपद्धिमोक्षणम् (अस्ति) - संपूर्ण विपत्तींचा नाश करणारे आहे. ॥५५॥
जसे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नातील वस्तू नाहीशा होतात, त्याचप्रमाणे परमात्मा प्रगट होताच त्यांच्या प्रभावाने असुरांच्या कपटपूर्ण माया नाहीशा झाल्या. भगवंतांचे स्मरण सर्व संकटांपासून मुक्त करते, हे योग्यच आहे. (५५)
दृष्ट्वा मृधे गरुडवाहमिभारिवाह
आविध्य शूलमहिनोदथ कालनेमिः । तल्लीलया गरुडमूर्ध्नि पतद्गृहीत्वा तेनाहनन्नृप सवाहमरिं त्र्यधीशः ॥ ५६ ॥
(वसंततिलका) तो काल नेमि बघता हरि युद्ध क्षेत्री अंबारिसीच बसुनी त्रिशुळास फेकी । तो लागणार गरुडा हरिने धरीला श्री विष्णुने वधियला त्रिशुळेचि दैत्य ॥ ५६ ॥
अथ - नंतर - मृधे - युद्धात - इभारिवाहः - हत्तीचा शत्रू जो सिंह त्यावर बसणारा - कालनेमिः - कालनेमि - गरुडवाहं - विष्णूला - दृष्ट्वा - पाहून - शूलं आविध्य - शूळ घेऊन - अहिनोत् - फेकिता झाला - नृप - हे राजा - त्र्यधीशः - भगवान विष्णु - गरुडमूर्घ्रि - गरुडाच्या मस्तकावर - पतत् - पडणारा - तत् - तो शूळ - लीलया - सहज - गृहीत्वा तेन - घेऊन त्या शूलाने - सवाहं - वाहनासह - अरिं - शत्रूला - अहनत् - मारिता झाला. ॥५६॥
हे राजा, यानंतर सिंहावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुडवाहन भगवंतांना आलेले पाहिले, तेव्हा त्याने अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूळ फेकला. तो गरुड्याच्या डोक्यावर आपटणार होता. तेव्हढ्यात भगवंतांनी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशूलाने वाहनासह कालनेमीला मारले. (५६)
माली सुमाल्यतिबलौ युधि पेततुर्यत्
चक्रेण कृत्तशिरसावथ माल्यवांस्तम् । आहत्य तिग्मगदयाहनदण्डजेन्द्रं तावत् शिरोऽच्छिनदरेर्नदतोऽरिणाऽऽद्यः ॥ ५७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे देवासुरसंग्रामे दशमोऽध्यायः ॥ १० ॥
माली-सुमालि अति ते बळि दैत्य होते युद्धात चक्रिं वधिले हरिने तयांना । तो माल्यवान करि घेवुनि ती गदा नी मारीयली गरुडजी वरती तयाने । तो गर्जुनी करित ना करितो प्रहार चक्रेचि श्रीहरि तया वधुनीहि ठेला ॥ ५७ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ दहावा अध्याय हा ॥ ८ ॥ १० ॥ हरिःॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
अतिबलौ - अत्यंत बलिष्ट - माली - माली - च - आणि - सुमाली - सुमाली - युधि - युद्धात - यच्चक्रेण - ज्याच्या चक्राने - कृत्तशिरसौ - मस्तके तुटलेले असे - पेततुः - पडले - अथ - नंतर - माल्यवान् - माल्यवान - तम् - त्याला - आहत्य - प्रहार करून - तिग्मगदया - तीक्ष्ण गदेने - अंडजेन्द्रं - गरुडाला - अहनत् - ताडिता झाला - तावत् - तितक्याच अवधीत - आद्यः - पुराणपुरुष ईश्वर - अरिणा - चक्राने - नदतः - गर्जना करणार्या - अरेः - शत्रूचे - शिरःअच्छिनत् - मस्तक तोडिता झाला. ॥५७॥
माली आणि सुमाली या दोन बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतांनी आपल्या चक्राने उडविली. त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला. परंतु त्याचक्षणी गर्जना करणार्या त्याचे मस्तक भगवंतांनी चक्राने तोडले. (५७)
स्कंध आठवा - अध्याय दहावा समाप्त |