श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
नवमोऽध्यायः

देवानां अमृतपानं दैत्यवंचनं, राहुशिरश्छेदश्च -

मोहिनीरूपी भगवंतांकडून अमृताचे वाटप -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
तेऽन्योन्यतोऽसुराः पात्रं हरन्तस्त्यक्तसौहृदाः ।
क्षिपन्तो दस्युधर्माण आयान्तीं ददृशुः स्त्रियम् ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
त्यागिता बंधुभावाते असूर निंदु लागले ।
डाकूंच्या परि तो कुंभ हिरावू लागले तदा ।
सुंदरी पाहिली त्यांनी येताना आपुल्याकडे ॥ १ ॥

त्यक्तसौहृदाः - सोडिली आहे मैत्री ज्यांनी असे - अन्योन्यतः - एमकेकांपासून - पात्रं - अमृतकलश - हरन्तः - हरण करणारे - क्षिपन्तः - शिव्यागाळी करणारे - दस्युधर्माणः - चोरांसारखे वागणारे - ते - ते - असुराः - दैत्य - आयान्ति - येणार्‍या - स्त्रियं - स्त्रीला - ददृशुः - पाहाते झाले. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - आपापसातील प्रेम टाकून असुर एकमेकांची निंदा करीत डाकूंप्रमाणे एकमेकांच्या हातातून अमृतकलश हिसकावून घेत होते. एवढ्यात त्यांना एक स्त्री येत असलेली दिसली. (१)


अहो रूपमहो धाम अहो अस्या नवं वयः ।
इति ते तां अभिद्रुत्य पप्रच्छुर्जातहृच्छयाः ॥ २ ॥
अद्‌भूत रूप नी ऐसे सुडौल नव यौवन ।
पाहता काम मोहाने भांडणे त्यागुनी तिच्या ।
पुढती धाव घेवोनी पुसते जाहले तिला ॥ २ ॥

अहो - किती हो सुंदर - रूपं - स्वरूप - अहो - कितीहो विलक्षण - धाम - तेज - अहो - कितीहो आश्चर्यजनक - अस्याः - हिचे - नवं - तरुण - वयः - वय - इति - असे - ते - ते दैत्य - तां - तिच्याजवळ - अभिद्रुत्य - धावत जाऊन - जातहृच्छयाः - ज्यांच्या हृदयांत मदनाचा संचार झाला आहे असे - पप्रच्छुः - विचारिते झाले. ॥२॥
ते विचार करू लागले, "किती अनुपम सौंदर्य हे । किती हे तेज । काय हे हिचे नवतारुण्य !" असे मनात म्हणत ते तिच्याकडे पळत गेले. काममोहित होऊन त्यांनी तिला विचारले, (२)


का त्वं कञ्जपलाशाक्षि कुतो वा किं चिकीर्षसि ।
कस्यासि वद वामोरु मथ्नतीव मनांसि नः ॥ ३ ॥
कोण तू पंकजाक्षे नी कोठुनी पातली इथे ।
पाहता चळले चित्त सुंदरी काय इच्छिसी ॥ ३ ॥

कञ्जपलाशाक्षि - कमलपत्राप्रमाणे नेत्र असणार्‍या हे स्त्रिये - त्वं - तू - का - कोण - कुतः (आयाता) - कोठून आलीस - वा - अथवा - किं चिकीर्षसि - काय करू इच्छितेस - वामोरु - हे सुंदरी - नः - आमच्या - मनांसि - अंतःकरणांचे - मथ्नन्ति इव - जणु मंथन करणारी अशी - कस्य (पत्नी) - कोणत्या पुरुषाची स्त्री - असि - आहेस - वद - सांग. ॥३॥
हे कमलनयने, तू कोण आहेस ? कोठून आलीस ? काय करू इच्छितेस ? हे सुंदरी, तू कोणाची कन्या आहेस ? तुला पाहून आमच्या मनात खळबळ उडाली आहे. (३)


न वयं त्वामरैर्दैत्यैः सिद्धगन्धर्वचारणैः ।
नास्पृष्टपूर्वां जानीमो लोकेशैश्च कुतो नृभिः ॥ ४ ॥
वाटते देवता दैत्ये गंधर्वे सिद्ध चारणे ।
न स्पर्श तुजला केला मनुष्य शिवती कसे ॥ ४ ॥

वयं - आम्ही - त्वां - तुला - अमरैः - देवांनी - दैत्यैः - दैत्यांनी - सिद्धगंधर्वचारणैः - सिद्ध, गंधर्व, व चारण ह्यांनी - च - आणि - लोकेशैः - लोकपालांनी - अस्पृष्टपूर्वां - पूर्वी स्पर्श न केलेली अशी - न जानीमः - जाणत नाही असे नाही - नृभिः - मनुष्यांनी - कुतः (स्पृष्टा) - कोठून स्पर्श केलेली असणार. ॥४॥
आम्ही तर असे समजतो की, आतापर्यंत देव, दैत्य, सिद्ध, गंधर्व, चारण आणि लोकपालांनीसुद्धा तुला स्पर्श केला नसेल ? तर मग मणूस तुला कोठून स्पर्श करील ? (४)


नूनं त्वं विधिना सुभ्रूः प्रेषितासि शरीरिणाम् ।
सर्वेन्द्रियमनःप्रीतिं विधातुं सघृणेन किम् ॥ ५ ॥
सुंदरी वाटते ईशे समस्त शरिरा सुख ।
देण्यासी धाडिले येथे तृप्त्यर्थ आमुचे मन ॥ ५ ॥

सुभ्रूः - हे सुंदरी - सघृणेन - दयाळू - विधिना - ईश्वराने - नूनं - खरोखर - त्वं - तू - शरीरिणां - प्राण्यांच्या - सर्वेंद्रियमनःप्रीतिं - सर्व इंद्रियांचा व मनाचा संतोष - विधातुं - उत्पन्न करण्याकरिता - प्रेषिता असि किं - पाठविलेली आहेस काय. ॥५॥
हे सुंदरी, विधात्याने दया येऊन शरीर धारण करणार्‍यांची सर्व इंद्रिये आणि मन तृप्त करण्यासाठी तुला इथे पाठविले आहे काय ? (५)


सा त्वं नः स्पर्धमानानां एकवस्तुनि मानिनि ।
ज्ञातीनां बद्धवैराणां शं विधत्स्व सुमध्यमे ॥ ६ ॥
मानिनी एकजातीचे आम्ही सर्वचि तो असू ।
एक वस्तु अम्हा सर्वां हवी म्हणुनि भांडलो ।
सुंदरी आमुचा वाद मिटवी वैरही तसे ॥ ६ ॥

मानिनि - हे मानशीले - सुमध्यमे - सुंदरी - सा - ती - त्वं - तू - एकवस्तुनि - एकाच वस्तूसाठी - स्पर्धमानानां - चढाओढ करणार्‍या - बद्धवैराणां - परस्परांशी वैर धरिलेल्या - ज्ञातीनां - संबंधी अशा - नः - आमचे - शं - कल्याण - विधत्स्व - कर. ॥६॥
हे मानिनी, आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे. म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झाले आहे. हे सुंदरी, तू आमचे भांडण मिटव. (६)


वयं कश्यपदायादा भ्रातरः कृतपौरुषाः ।
विभजस्व यथान्यायं नैव भेदो यथा भवेत् ॥ ७ ॥
कश्यपाचे अम्ही पुत्र भाउकी आम्हि सर्व ते ।
अमृत मेळवायासी केला हा पुरुषार्थची ।
न्यायाने वाट तू आम्हा आम्ही ना भांडु तेधवा ॥ ७ ॥

कृतपौरुषाः - पराक्रमी - वयं - आम्ही - कश्यपदायादाः - कश्यपाचे पुत्र - भ्रातरः (स्मः) - भाऊ आहोत - यथा - ज्या रीतीने - अस्माकं भेदः - आमच्यामध्ये लढा - न एव भवेत् - होणारच नाही - यथान्यायं - न्यायाला अनुसरून - विभजस्व - वाटून दे. ॥७॥
आम्ही सर्वजण कश्यपाचे पुत्र असल्याकारणाने सख्खे भाऊ आहोत. अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्‍न केले आहेत. म्हणून तू निःपक्षपातीपणे हे आम्हांला असे वाटून दे की, आमच्यात भांडण होणार नाही. (७)


इति उपामंत्रितो दैत्यैः मायायोषिद् वपुर्हरिः ।
प्रहस्य रुचिरापाङ्‌गैः निरीक्षन् इदमब्रवीत् ॥ ८ ॥
प्रार्थिता असुरे ऐसे स्त्रीवेशधारि तो हरी ।
हासला तिरक्या नेत्रे पाहुनी वदला असा ॥ ८ ॥

दैत्यैः - दैत्यांनी - इति - याप्रमाणे - उपामन्त्रितः - प्रार्थिलेला - मायायोषिद्वपुः - मायेने स्त्रीशरीर धारण करणारा - हरिः - श्रीविष्णु - प्रहस्य - हसून - रुचिरापाङगैः - सुंदर कटाक्षांनी - निरीक्षन् - पाहत - इदं - हे - अब्रवीत् - म्हणाला. ॥८॥
असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर लीलेने स्त्रीवेषधारी भगवान किंचितसे हसले आणि सुंदर नेत्रकटाक्ष टाकीत त्यांना म्हणाले. (८)


श्रीभगवानुवाच -
कथं कश्यपदायादाः पुंश्चल्यां मयि संगताः ।
विश्वासं पण्डितो जातु कामिनीषु न याति हि ॥ ९ ॥
श्री भगवान्‌ म्हणाले -
महर्षीचे तुम्ही पुत्र मी तो ही कुलटा अशी ।
न्यायभार मला कैसा देतसा तुम्हि हा असा ।
विश्वास नच तो ठेवी विवेकी स्वैरिणी वरी ॥ ९ ॥

कश्यपदायादाः - अहो कश्यपपुत्र दैत्य हो - पुञ्चल्यां - जारिणी अशा - मयि - माझ्यावर - कथं संगताः - कसे आसक्त झालात - पण्डितः - विद्वान - हि - खरोखर - कामिनीषु - स्त्रियांवर - जातु - कधीही - विश्वासं - विश्वास - न याति - ठेवीत नाही. ॥९॥
श्रीभगवान म्हणाले - आपण महर्षी कश्यपांचे पुत्र असून मज कुलटेच्या मागे कसे लागलात ? कारण विवेकी मनुष्य स्त्रियांवर कधी विश्वास ठेवीत नाही. (९)


सालावृकाणां स्त्रीणां च स्वैरिणीनां सुरद्विषः ।
सख्यान्याहुरनित्यानि नूत्‍नं नूत्‍नं विचिन्वताम् ॥ १० ॥
दैत्यांनो कुलटा आणि श्वान मैत्री खरी नसे ।
नित्य नव्या शिकारीला दोन्ही ही धुंडिती तसे ॥ १० ॥

सुरद्विषः - अहो दैत्य हो - नूत्नं नूत्नं - नवीन नवीन वस्तू - विचिन्वतां - शोधणार्‍या - सालावृकाणां - कोल्ह्यांची - च - आणि - स्वैरिणीनां स्त्रीणां - व्यभिचारी स्त्रियांची - सख्यानि - मैत्री - अनित्यानि - अस्थिर - आहुः - म्हणतात. ॥१०॥
दैत्यांनो, लांडगे आणि व्यभिचारिणी स्त्रिया यांच्याशी केलेली मैत्री टिकत नाही. कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीच्या शोधात असतात. (१०)


श्रीशुक उवाच -
इति ते क्ष्वेलितैस्तस्या आश्वस्तमनसोऽसुराः ।
जहसुर्भावगम्भीरं ददुश्चामृतभाजनम् ॥ ११ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
परीक्षिता ! सुहास्या ती वदता दैत्य भाळले ।
हासता गूढ ती दैत्ये घटो सोपविला तिला ॥ ११ ॥

इति - ह्याप्रमाणे - तस्याः - त्या स्त्रीस - क्ष्वेलितैः - थटटेच्या बोलण्यांनी - आश्वस्तमनसः - ज्यांच्या मनावर पूर्ण विश्वास बसला आहे असे - ते - ते - असुराः - दैत्य - भावगंभीरं - अभिप्रायाने गंभीर असे - जहसुः - हसू लागले - च - आणि - अमृतभाजनं - अमृताचा कलश - (तस्याः) हस्ते ददुः - तिच्या हाती देते झाले. ॥११॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, मोहिनीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला. त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला. (११)


ततो गृहीत्वामृतभाजनं हरिः
बभाष ईषत् स्मितशोभया गिरा ।
यद्यभ्युपेतं क्व च साध्वसाधु वा
कृतं मया वो विभजे सुधामिमाम् ॥ १२ ॥
(इंद्रवज्रा)
घेवोनि हाती कलशा हरीने
    हासोनि शब्दे मधु बोलले की ।
उचीत किंवा अनुचीत तेही
    घडले माझ्या कडुनी तथापी ।
ते मान्य व्हावे तर मी सुधा ही
    तुम्हास वाटील न अन्यथा ती ॥ १२ ॥

ततः - नंतर - हरिः - श्रीविष्णु - अमृतभाजनं - अमृताचा कलश - गृहीत्वा - घेऊन - ईषत्स्मित्‌शोभया - किञ्चित् हास्याने शोभणार्‍या - गिरा - वाणीने - बभाषे - बोलला - यदि - जर - मया - मी - कृतं - केलेले - क्व च - कोठे - साधु - चांगले - वा - किंवा - असाधु - वाईट - (युष्माभिः) अभ्युपेतं - तुम्ही मान्य कराल - वः - तुम्हाला - इमां - हे - सुधां - अमृत - विभजे - वाटून देते. ॥१२॥
नंतर अमृतकलश घेऊन किंचित सिमत हास्य करीत भगवान म्हणाले, "उचित असो वा अनुचित, मी जे काही करीन, ते तुम्हांला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटीन." (१२)


इत्यभिव्याहृतं तस्या आकर्ण्यासुरपुंगवाः ।
अप्रमाणविदस्तस्याः तत् तथेत्यन्वमंसत ॥ १३ ॥
(अनुष्टुप्‌)
मोठ मोठ्याहि दैत्यांनी ऐकता मधु बोल हे ।
मानिले मोहिनीचे ते न रूप जाणिता तसे ॥ १३ ॥

इति - याप्रमाणे - तस्याः - त्या स्त्रीचे - अभिव्याहृतं - भाषण - आकर्ण्य - ऐकून - तस्यां - त्या स्त्रीचा - अप्रमाणविदः - अंत न जाणणारे - असुरपुंगवाः - दैत्याधिपति - तत् तथा इति - ते बरे आहे असे म्हणून - अन्वमंसत - अनुमोदन देते झाले. ॥१३॥
मोहिनीचे हे बोलणे ऐकून मोठमोठ्या दैत्यांनाही त्यातील खुबी समजली नाही. म्हणून सर्वांनी ’ठीक आहे’ असे म्हणून ते मान्य केले. (१३)


अथोपोष्य कृतस्नाना हुत्वा च हविषानलम् ।
दत्त्वा गोविप्रभूतेभ्यः कृतस्वस्त्ययना द्विजैः ॥ १४ ॥
उपास करुनी एक स्नान सर्वेचि घेतले ।
हविष्ये हविला अग्नी गो विप्रा दानही दिले ।
स्वस्त्ययन द्विजांच्या त्या कडोनी करवीयले ॥ १४ ॥

अथ - नंतर - उपोष्य - उपवास करून - कृतस्नानाः - स्नान करून - हविषा - हविर्भागाने - अनलं - अग्नीला - हुत्वा - आहुति देऊन - गोविप्रभूतेभ्यः - गाई, ब्राह्मण व भूते ह्यांना - (अन्नं) दत्वा - अन्नादि अर्पण करून - च - आणि - द्विजैः - ब्राह्मणांनी - कृतस्वस्त्ययनाः - केले आहे मंगलकारक पुण्याहवाचन ज्यांच्याकरिता असे ॥१४॥
नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले. हविर्द्रव्याने अग्नीमध्ये हवन केले. गाई, ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना यथायोग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करविले. (१४)


यथोपजोषं वासांसि परिधायाहतानि ते ।
कुशेषु प्राविशन्सर्वे प्राग् अग्रेष्वभिभूषिताः ॥ १५ ॥
वस्त्र आभूषणे ल्याले सगळे आवडी परी ।
बैसले चटईशी ते पूर्व भागास दैत्य की ॥ १५ ॥

ते सर्वे - ते सर्व दैत्य - अहतानि - कोरी - वासांसि - वस्त्रे - परिधाय - धारण करून - अभिभूषिताः - अलंकार धारण केलेले - प्रागग्रेषु - पूर्वेला टोके असणार्‍या - कुशेषु - दर्भावर - प्राविशन् - बसते झाले. ॥१५॥
आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवी वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले. (१५)


प्राङ्‌मुखेषूपविष्टेषु सुरेषु दितिजेषु च ।
धूपामोदितशालायां जुष्टायां माल्यदीपकैः ॥ १६ ॥
तस्यां नरेन्द्र करभोरुरुशद्दुकूल
     श्रोणीतटालसगतिर्मदविह्वलाक्षी ।
सा कूजती कनकनूपुरशिञ्जितेन
     कुम्भस्तनी कलसपाणिरथाविवेश ॥ १७ ॥
धूप माला दिवे तेंव्हा मंडपा माजि शोभले ।
पूर्वाभिमुखि ते देव बैसले चटई वरी ॥ १६ ॥
(वसंततिलका)
घेवोनि हाति कलशो मग अमृताचा
    ती मोहिनी वसन उच्चचि नेसलेली ।
चाले हळूच जणु भार नितंबि झाला
    नेत्रात ती विव्हलता मद साठलेला ।
कुंभस्तनी अतिव सुंदर त्याहि मांड्या
    पायात स्वर्ण नुपुरीं झणकार होता ॥ १७ ॥

माल्यदीपकैः - फुलांनी व दीपांनी - जुष्टायां - सेविलेल्या - धूपामोदितशालायां - धूपांनी सुगंधित केलेल्या मंडपात - सुरेषु दितिजेषु च प्राङ्‌मुखेषु उपविष्टेषु - देव आणि दैत्य पूर्वेस तोंड करून बसले असता अथ - नंतर - नरेंद्र - हे परीक्षित राजा - तस्यां (पटशालायाम्) - त्या मंडपात - करभोरुः - हत्तीच्या सोंडेप्रमाणे आहेत मांडया जीच्या अशी - उशद्दुकूलश्रोणीतटालसगतिः - सुंदर रेशमी वस्त्र ज्यावर आहे अशा स्थूल नितंबामुळे मंद आहे चालणे जीचे अशी - मदविहव्‌लाक्षी - मद्यप्राशनाने जिचे डोळे चंचल झाले आहेत अशी - कनकनूपुरशिञ्जितेन - सुवर्णांच्या पैंजणांच्या ध्वनीने - कूजती - शब्द करणारी - कुंभस्तनी - जिचे स्तन घटासारखे आहेत अशी - कलशपाणिः - अमृताचा कलश आहे हातात जिच्या अशी - सा - ती स्त्री - आविवेश - शिरली. ॥१६-१७॥
जेव्हा देव आणि दैत्य दोघेही धुपाने सुगंधित केलेल्या, पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजविलेल्या, भव्य मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले, तेव्हा हातात अमृतकलश घेऊन मंद मंद पावले टाकीत मोहिनी तेथे आली. तिने सुंदर पैठणी परिधान केली होती. धुंदीने तिचे डोळे चंचल झाले होते. तिचे स्तन पुष्ट असून मांड्या हत्तीच्या पिल्लाच्या सोंडेप्रमाणे होत्या. तिच्या सुवर्णनूपुरांच्या झंकारांनी सभाभवन निनादून गेले होते. (१६-१७)


तां श्रीसखीं कनककुण्डलचारुकर्ण
     नासाकपोलवदनां परदेवताख्याम् ।
संवीक्ष्य सम्मुमुहुरुत्स्मितवीक्षणेन
     देवासुरा विगलित स्तनपट्टिकान्ताम् ॥ १८ ॥
ती स्वर्ण कुंडल नि नाक कपाळ छान
    ती मोहिनी सखिच लक्ष्मिहुनीहि श्रेष्ठ ।
ती हास्य दृष्टि बघता सुर दैत्य सर्व
    ते मोहिले, पदर तो ढळला स्तनीचा ॥ १८ ॥

देवासुराः - देव व दैत्य - श्रीसखीं - लक्ष्मीची मैत्रीण अशा - कनककुंडलचारुकर्णनासाकपोलवदनां - सुवर्णाच्या कुंडलांनी शोभणारे आहेत कान, नाक, गाल व मुख जिचे अशा - उत्स्मितवीक्षणेन - अत्यंत मंदहास्ययुक्त अवलोकाने - विगलितस्तनपट्टिकांतां - गळून गेला आहे स्तनावरील पदर जीच्या अशी - परदेवताख्यां - श्रेष्ठ देवता या नावाच्या - तां - त्या स्त्रीला - संवीक्ष्य - पाहून - संमुमुहुः - मोहित झाले. ॥१८॥
सुंदर कानांमध्ये सोन्याची कुंडले तळपत होती. तिचे नाक, गाल तसेच मुख अतिशय सुंदर होते. तिच्या स्तनांवरून साडीचा पदर थोडासा सरकला होता. जणू ती लक्ष्मीदेवीची ज्येष्ठ सखी वाटत होती. तिने आपल्या हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले, तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले. (१८)


(अनुष्टुप्)
असुराणां सुधादानं सर्पाणामिव दुर्नयम् ।
मत्वा जातिनृशंसानां न तां व्यभजदच्युतः ॥ १९ ॥
(अनुष्टुप्‌)
असूर मूळचे क्रूर मोहिनी आठवी मनीं ।
सर्पादूध तसे यांना अमृत पाजता घडे ।
न भाग इच्छिता त्यांना युक्ति केली अशी तिने ॥ १९ ॥

अच्युतः - श्रीविष्णु - जातिनृशंसानां - स्वभावतः क्रूर अशा - असुराणां - दैत्यांना - सुधादानं - अमृत देणे - सर्पाणां - सर्पांना - (क्षीरदानम्) इव - दूध देण्याप्रमाणे - दुर्नयं - अन्यायकारक - मत्वा - मानून - तां (सुधां) - ते अमृत - न व्यभजत - वाटून देता झाला नाही. ॥१९॥
जन्मतःच क्रूर असणार्‍या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखे अन्यायकारक होणार आहे; म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिले नाही. (१९)


कल्पयित्वा पृथक् पंक्तीः उभयेषां जगत्पतिः ।
तांश्चोपवेशयामास स्वेषु स्वेषु च पंक्तिषु ॥ २० ॥
दैत्य दानव ते केले वेगळे पंक्तिही तशा ।
पाडोनी श्रेणि त्यांची ही वेगळे बैसवीयले ॥ २० ॥

च - आणि - जगत्पतिः - श्रीविष्णु - उभयेषां - दोघांही देवदैत्यांच्या - पृथक् - निरनिराळ्या - पङ्‌क्तीः - रांगा - कल्पयित्वा - करून - च - आणि - तान् - त्या देवदैत्यांना - स्वेषु स्वेषु - आपापल्या - पङ्‌क्तिषु - रांगेत - उपवेशयामास - बसविता झाला. ॥२०॥
भगवंतांनी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसविले. (२०)


दैत्यान् गृहीतकलसो वञ्चयन् उपसञ्चरैः ।
दूरस्थान् पाययामास जरामृत्युहरां सुधाम् ॥ २१ ॥
पुन्हा कलश तो हाती घेता दैत्याकडे हरी ।
नेत्रांनी मिचकावोनी देवतांपाशि पातले ।
अमृत पाजिले देवां जेणे मृत्यू न ती जरा ॥ २१ ॥

गृहीतकलशः - हातात अमृतकलश घेतलेला श्रीविष्णु - उपसंचरैः - दैत्या जवळ फिरण्याने - दैत्यान् - दैत्यांना - वञ्चयन् - फसवीत - दूरस्थान् (देवान्) - दूर बसलेल्या देवांना - जरामृत्यूहरां - वार्धक्य व मृत्यू हरण करणारे - सुधां - अमृत - पाययामास - पाजिता झाला. ॥२१॥
यानंतर अमृतकलश हातात घेऊन भगवंत दैत्यांजवळ गेले आणि त्यांनी हावभाव आणि कटाक्षांनी त्यांना मोहित करून लांब बसलेल्या देवांना जरामरण हरण करणारे अमृत पाजले. (२१)


ते पालयन्तः समयं असुराः स्वकृतं नृप ।
तूष्णीमासन्कृतस्नेहाः स्त्रीविवादजुगुप्सया ॥ २२ ॥
परीक्षिता ! तयेवेळी वचना दैत्य जागले ।
स्नेहही मानिती चित्ती स्त्रियेसी भांडणे नको ।
निंद्य ते मानिती तेंव्हा गप्प बैसोनि राहिले ॥ २२ ॥

नृप - हे परीक्षित राजा - कृतस्नेहाः - केली आहे मैत्री ज्यांनी असे - स्वकृतं - आपल्या केलेल्या - समयं - वचनाला - पालयन्तः - पाळणारे - ते - ते - असुराः - दैत्य - स्त्रीविवादजुगुप्सया - स्त्रियांशी वादविवाद करणे निंद्य आहे अशा समजुतीने - तूष्णीं - स्तब्ध - आसन् - होते. ॥२२॥
परीक्षिता, आपण दिलेला शब्द असुर पाळत होते. त्यांचे तिच्यावर प्रेमही होते. शिवाय स्त्रीशी भांडणे त्यांना कमीपणाचे वाटत होते. म्हणून ते गप्प बसून राहिले. (२२)


तस्यां कृतातिप्रणयाः प्रणयापायकातराः ।
बहुमानेन चाबद्धा नोचुः किञ्चन विप्रियम् ॥ २३ ॥
प्रेमात गुंतले सारे प्रेमभंग न इच्छिती ।
सन्मान मिळला त्यांना म्हणोनी शांत राहिले ॥ २३ ॥

च - आणि - तस्यां - त्या स्त्रीच्या ठिकाणी - कृतातिप्रणयाः (ते) - अत्यंत प्रेम केले आहे ज्यांनी असे ते - प्रणयापायकातराः - प्रेमाचा भंग होईल या भीतीने व्याकूळ झालेले - बहुमानेन - पुष्कळ सत्कार केल्यामुळे - आबद्धाः - प्रेमपाशाने जखडून गेले - किञ्चन - काही एक - विप्रियं - अप्रिय - न ऊचुः - बोलते झाले नाहीत. ॥२३॥
मोहिनीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले होते. आपला प्रेमसंबंध तुटू नये म्हणून ते भिऊन होते. मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला होता. त्यामुळे ते मोहिनीला काही वेडेवाकडे बोलले नाहीत. (२३)


देवलिङ्‌गप्रतिच्छन्नः स्वर्भानुर्देवसंसदि ।
प्रविष्टः सोममपिबत् चन्द्रार्काभ्यां च सूचितः ॥ २४ ॥
अमृत पाजता देवां राहू वेष करोनिया ।
बैसला देवतांमाजी चंद्र सूर्येचि जाणिले ॥ २४ ॥

देवलिङगप्रतिच्छन्नाः - देवांचे सोंग घेऊन दैत्य स्वरूप ज्याने झाकून टाकिले आहे असा - स्वर्भानुः - राहु - देवसंसदि - देवांच्या रांगेत - प्रविष्टः - जाऊन बसला - च - आणि - सोमं - अमृत - अपिबत् - पिता झाला - चंद्रार्काभ्यां - चंद्र व सूर्य यांनी - सूचितः - सुचविला गेला. ॥२४॥
त्याचवेळी राहू दैत्य देवाचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवांबरोबर तोही अमृत प्याला. परंतु त्याचक्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्याचे बिंग फोडले. (२४)


चक्रेण क्षुरधारेण जहार पिबतः शिरः ।
हरिस्तस्य कबन्धस्तु सुधयाप्लावितोऽपतत् ॥ २५ ॥
अमृत पाजिता देवे राहूचे शिर छेदिले ।
पडले धड ते खाली अमृत पोचले न त्या ॥ २५ ॥

हरिः - श्रीविष्णु - क्षुरधारेण - वस्तर्‍याप्रमाणे धारेच्या - चक्रेण - सुदर्शनचक्राने - पिबतः तस्य - अमृत पिणार्‍या त्या राहूचे - शिरः - मस्तक - जहार - हरण करिता झाला - (तस्य) कबंधः तु - त्याचे धड तर - सुधया - अमृताने - अप्लावितः - न भिजलेले असे - अपतत् - खाली पडले. ॥२५॥
अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचे मस्तक उडविले. अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले. (२५)


शिरस्त्वमरतां नीतं अजो ग्रहमचीकॢपत् ।
यस्तु पर्वणि चन्द्रार्कौ अभिधावति वैरधीः ॥ २६ ॥
अमरो शिर ते झाले ब्रह्माने राहु तो पुन्हा ।
केला ग्रह तसा तोची राहू पर्वात चंद्रमा ।
सूर्याशी वैर ठेवोनी आक्रमायास येतसे ॥ २६ ॥

अजः - श्रीविष्णु - अमरतां - अमरस्थितीप्रत - नीतं - नेलेले - शिरः तु - मस्तक तर - ग्रहं - ग्रह म्हणून - अचीक्लृपत् - कल्पिता झाला - वैरधीः - वैरबुद्धि बाळगणारा - यः तु - परंतु जो - पर्वणि - अमावस्यापौर्णिमांस - चंद्रार्कौ - सूर्य व चंद्र यांच्यावर - अभिधावति - धावत जातो. ॥२६॥
परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवांनी त्याला ’ग्रह’ बनविले. तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्येला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो. (२६)


पीतप्रायेऽमृते देवैः भगवान् लोकभावनः ।
पश्यतां असुरेन्द्राणां स्वं रूपं जगृहे हरिः ॥ २७ ॥
अमृत पाजता देवां श्रेष्ठ दैत्यांपुढे हरी ।
प्रत्यक्ष सत्यरुपाने राहिला तो पुन्हा उभा ॥ २७ ॥

लोकभावनः - लोकांचे रक्षण करणारा - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - हरिः - श्रीविष्णु - देवैः - देवांनी - अमृते पीतप्राये - अमृत बहुतेक पिऊन टाकिले असता - असुरेन्द्राणां पश्यतां - दैत्याधिपती पाहात असता - स्वं रूपं - स्वतःच्या विष्णुस्वरूपाला - जगृहे - स्वीकारिता झाला. ॥२७॥
जेव्हा बहुतेक देव अमृत प्याले, तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणार्‍या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपले खरे रूप धारण केले. (२७)


एवं सुरासुरगणाः समदेशकाल
     हेत्वर्थकर्ममतयोऽपि फले विकल्पाः ।
तत्रामृतं सुरगणाः फलमञ्जसापुः
     यत्पादपंकजरजःश्रयणान्न दैत्याः ॥ २८ ॥
(वसंततिलका)
दैत्ये नि त्या सुरगणे सम कष्ट केले
    दैत्यासि ना फळ मुळी मिळले कसे ते ।
देवांसि तेचि मिळले हरिच्या कृपेने
    दैत्ये न तो कधि हरी मनि प्रार्थिला की ॥ २८ ॥

सुरासुरगणाः - देव व दैत्य यांचे समूह - एवं - याप्रमाणे - समदेशकालहेत्वर्थकर्ममतयः अपि - देश, काल, हेतु, अर्थ, कर्म व बुद्धि ज्यांची सारखी आहे असे असूनही - फलं - फलप्राप्तीविषयी - विकल्पाः - भेद पावले - तत्र - त्या ठिकाणी - सुरगणाः - देवसमूह - यत्पादपङकजरजःश्रयणात् - ज्याच्या चरणकमळाच्या परागांचा आश्रय केल्यामुळे - अमृतं फलं - अमृतरूपी फळ - अञ्जसा - तत्काळ - आपुः - मिळविते झाले - दैत्याः - दैत्य - न (आपुः) - मिळविते झाले नाहीत. ॥२८॥
परीक्षिता, पहा ना ! देव आणि दैत्य दोघांचीही एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच हेतूने, एकाच वस्तूसाठी, एक विचाराने, एकच कर्म केले होते. परंतु फळ मिळण्यात फरक झाला. त्यांपैकी देवांनी अगदी सहजपणे अमृतरूप फळ प्राप्त करून घेतले. कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमलरजाचा आश्रय घेतला होता. परंतु त्यांच्यापासून विन्मुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले. (२८)


यद् युज्यतेऽसुवसुकर्ममनोवचोभिः
     देहात्मजादिषु नृभिस्तदसत्पृथक्त्वात् ।
तैरेव सद्‍भवति यत् क्रियतेऽपृथक्त्वात्
     सर्वस्य तद्‍भवति मूलनिषेचनं यत् ॥ २९ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे अमृतमथने नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
प्राणी धना अन तना अन पुत्र यांना
    जे कार्य तो करितसे मुळि व्यर्थ सारे ।
योजोनि ईश पदि ते परि धन्य होते
    वृक्षास जै मिळतसे मुळिं आप देता ॥ २९ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ नववा अध्याय हा ॥ ८ ॥ ९ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

नृभिः - पुरुषांकडून - देहात्मजादिषु - शरीर, पुत्र इत्यादिकांविषयी - असुवसुकर्ममनोवचोभिः - प्राण, द्रव्य, कर्म, मन व वाणी ह्यांनी - यत् - जे - युज्यते - केले जाते - तत् - ते - पृथक्त्वात् - भेदबुद्धीमुळे - असत् (अस्ति) - मिथ्या होय - तैः एव - त्याच प्राणादि साधनांनी - यत् - जे - अपृथक्त्वात् क्रियते - ऐक्यभावनेने केले जाते - तत् - ते - सत् - सत्यरूप - भवति - होते - यत् - जे - मूलनिषेचनं - मुळाला पाणी घालणे - तत् - ते - सर्वस्य - सर्वाला - भवति - होते. ॥२९॥
मनुष्य आपले प्राण, धन, कर्म, मन, वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर, पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो, ते व्यर्थ होते. कारण त्याच्या मुळामध्ये भगवंतांहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते. परंतु त्याचे प्राण इत्यादी वस्तूंच्या द्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभावरहित असल्याकारणाने सफल होते. जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोड, फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते, त्याचप्रमाणे भगवंतांसाठी कर्म करण्याने ते सर्वांना मिळते. (२९)


स्कंध आठवा - अध्याय नववा समाप्त

GO TOP