श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्ंधः
अष्टमोऽध्यायः

उदधेरन्यान्यरत्‍नानां उत्पत्तिः, लक्ष्म्या आविर्भावः, तया भगवतो
वरणंच, दैत्यैश्च हृते सुधाकलशे भगवतो मोहिनीरूपधारणम् -

समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंतांचे मोहिनी अवतार धारण करणे -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
पीते गरे वृषाङ्‌केण प्रीतास्तेऽमरदानवाः ।
ममन्थुस्तरसा सिन्धुं हविर्धानी ततोऽभवत् ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
प्राशिता वीष शंभूने देव दैत्यहि तोषले ।
उत्साहे लागले कार्या तदा धेनू निघालिसे ॥ १ ॥

वृषाङ्‌केण - शंकराने - गरे पीते - विष प्राशन केले असता - प्रीताः - आनंदित झालेले - ते अमरदानवाः - ते देव व दानव - तरसा - वेगाने - सिंधुं - समुद्राला - ममंथुः - घुसळू लागले - ततः - त्यातून - हविर्धानी - कामधेनु - अभवत् - उत्पन्न झाली. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - शंकरांनी विष प्याल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली. नंतर समुद्रातून कामधेनू प्रगट झाली. (१)


तामग्निहोत्रीं ऋषयो जगृहुर्ब्रह्मवादिनः ।
यज्ञस्य देवयानस्य मेध्याय हविषे नृप ॥ २ ॥
अग्निहोत्रादि साहित्य देणारी अशि ती असे ।
पवित्र दूध नी तूप ब्रह्मलोकासि जाय जे ।
ब्रह्मवादी ऋषी यांनी धेनूला स्विकारिले ॥ २ ॥

नृप - हे परीक्षित राजा - ब्रह्मवादिनः ऋषयः - वेदवेत्ते ऋषि - अग्निहोत्रीं तां - अग्निहोत्राला उपयोगी पडणारी ती कामधेनु - देवयानस्य - ब्रह्मलोकी पोचविणार्‍या - यज्ञस्य - यज्ञाच्या - मेध्याय - पवित्र - हविषे - हविर्भागाकरिता - जगृहुः - स्वीकरिते झाले. ॥२॥
हे राजा, ती अग्निहोत्राला लागणारी सामग्री देणारी होती. म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचविणार्‍या यज्ञासाठी उपयोगी पडेल, असे पवित्र हविर्द्रव्य मिळविण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले. (२)


तत उच्चैःश्रवा नाम हयोऽभूत् चन्द्रपाण्डुरः ।
तस्मिन् बलिः स्पृहां चक्रे नेन्द्र ईश्वरशिक्षया ॥ ३ ॥
उच्चैश्रवा हयो श्वेत निघाला मंथनी पुन्हा ।
बळीने इच्छिले त्याला इंद्रे तो नच इच्छिला ॥ ३ ॥

ततः - नंतर - चंद्रपांडुरः - चंद्रासारखा पांढरा - उच्चैःश्रवाः नाम - उच्चैःश्रवा नावाचा - हयः - घोडा - अभूत् - उत्पन्न झाला - तस्मिन् - त्या घोडयाविषयी - बलिः - बलिराजा - स्पृहां - इच्छा - चक्रे - करिता झाला - इंद्रः - इंद्र - स्पृहां - इच्छा - ईश्वरशिक्षया - परमेश्वराच्या उपदेशामुळे - न (स्पृहां चक्रे) - इच्छा करिता झाला नाही. ॥३॥
नंतर उच्चैःश्रवा नावाचा घोडा निघाला. तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता. तो घेण्यासाठी बळीने इच्छा प्रकट करून तो घेतला. तेव्हा इंद्राने भगवंतांच्या आदेशावरून स्वतःची इच्छा आवरून धरली. (३)


तत ऐरावतो नाम वारणेन्द्रो विनिर्गतः ।
दन्तैश्चतुर्भिः श्वेताद्रेः हरन् भगवतो महिम् ॥ ४ ॥
पुन्हा ऐरावतो हत्ती निघाला मंथनात त्या ।
कैलासा परि जो स्वच्छ चौदंत लांब त्याजला ॥ ४ ॥

ततः - नंतर - चतुर्भिः दन्तैः - चार दातांनी - भगवतः श्वेताद्रेः महिम् हरन् ऐरावतः नाम वारणेन्द्रः - ऐश्वर्यवान कैलासपर्वताचा मोठेपणा हरण करणारा ऐरावत नावाचा मोठा हत्ती - विनिर्गतः - बाहेर निघाला. ॥४॥
यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला. कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील असे त्याला शिखरांसारखे चार दात होते. (४)


कौस्तुभाख्यमभूद् रत्‍नं पद्मरागो महोदधेः ।
तस्मिन्मणौ स्पृहां चक्रे वक्षोऽलङ्‌करणे हरिः ॥ ५ ॥
कौस्तूभ मणि हे रत्‍न निघाले सागरी पुन्हा ।
अजिते इच्छिले त्याला सदैव हृदयास तो ॥ ५ ॥

महोदधेः - महासागरातून - कौस्तुभाख्यं - कौस्तुभ नावाचे - पद्मरागः - पद्मराग जातीचे - रत्नं - रत्न - अभूत् - उत्पन्न झाले - हरिः - विष्णु - वक्षोऽलङकरणे तस्मिन् मणौ - वक्षस्थलावर भूषणाप्रमाणे शोभेल अशा त्या रत्नाविषयी - स्पृहां - इच्छा - चक्रे - करिता झाला. ॥५॥
त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा, असे भगवंतांना वाटले. (५)


ततोऽभवत् पारिजातः सुरलोकविभूषणम् ।
पूरयत्यर्थिनो योऽर्थैः शश्वद्‍भुवि यथा भवान् ॥ ६ ॥
पारिजात पुन्हा आला सुरलोक विभूषणो ।
इच्छिता सर्व जो देई जसे देता तुम्ही जगा ॥ ६ ॥

ततः - नंतर - सूरलोकविभूषणं - देवलोकांचा अलंकार झालेला - पारिजातः - पारिजात वृक्ष - अभवत् - उत्पन्न झाला - यथा - जसा - भुवि - पृथ्वीवर - भवान् - तू परीक्षित राजा - यः - जो - शश्वत् - नित्य - अर्थैः - पदार्थांनी - अर्थिनः - याचकांच्या इच्छा - पूरयति - पूर्ण करितो. ॥६॥
परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढविणारा कल्पवृक्ष पारिजात निघाला. तू ज्या पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस, त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता. (६)


ततश्चाप्सरसो जाता निष्ककण्ठ्यः सुवाससः ।
रमण्यः स्वर्गिणां वल्गु गतिलीलावलोकनैः ॥ ७ ॥
वस्त्रालंकार लेवोनी निघाल्या अप्सरा पुन्हा ।
पाहता चालता युक्त देवांना सुख देत ज्या ॥ ७ ॥

ततः च - त्यानंतर आणखी - निष्ककण्‌ठयः - सुवर्णपदके गळ्यात आहेत ज्यांच्या अशा - सुवाससः - सुंदर वस्त्रे नेसलेल्या - वल्गुगतिलीलावलोकनैः - सुंदर गमन, क्रीडापूर्वक अवलोकन ह्यांच्या योगाने - स्वर्गिणां - देवांना - रमण्यः - रमविणार्‍या - अप्सरसः - अप्सरा - जाताः - उत्पन्न झाल्या. ॥७॥
यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगट झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी देवांना सुख देणार्‍या ठरल्या. (७)


ततश्चाविरभूत्साक्षात् श्री रमा भगवत्परा ।
रञ्जयन्ती दिशः कान्त्या विद्युत् सौदामनी यथा ॥ ८ ॥
मूर्तिमंत अशी शोभा निघाली ती रमा पुन्हा ।
भगवत्‌शक्ति जी नित्य जिचे तेज विजे परी ॥ ८ ॥

ततः च - त्यानंतर आणखी - साक्षात् श्रीः - प्रत्यक्ष संपत्ती - यथा - ज्याप्रमाणे - सौदामनी - सुदामा पर्वतावर उत्पन्न झालेली - विद्युत् - वीज - कान्त्या - कांतीने - दिशः - दिशांना - रञ्जयन्ती - शोभविणारी - भगवत्परा - भगवंताविषयी निष्ठा आहे जिची अशी - रमा - लक्ष्मी - आविरभूत् - प्रगट झाली. ॥८॥
त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्यशक्ति लक्ष्मीदेवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणार्‍या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. (८)


तस्यां चक्रुः स्पृहां सर्वे ससुरासुरमानवाः ।
रूपौदार्यवयोवर्ण महिमाक्षिप्तचेतसः ॥ ९ ॥
तिचे सौंदर्य औदार्य यौवनो रंग रुप ते ।
पाहता दीपले सर्व सर्वांनी इच्छिले तिला ॥ ९ ॥

ससुरासुरमानवाः सर्वे - देव, दैत्य, व मनुष्य ह्यांसह सर्वजण - रूपौदार्यवयोवर्णमहिमाक्षिप्तचेतसः - रूप, औदार्य, तारुण्य व कांति ह्यांच्या माहात्म्याने आकर्षून टाकिली आहेत मने ज्यांची असे - तस्यां - त्या लक्ष्मीविषयी - स्पृहां - इच्छा - चक्रुः - करिते झाले. ॥९॥
तिचे सौंदर्य, औदार्य, तारुण्य, रूप-रंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले. देव, असुर, मनुष्य अशा सर्वांना वाटले की, ही आपल्याला मिळावी. (९)


तस्या आसनमानिन्ये महेन्द्रो महदद्‍भुतम् ।
मूर्तिमत्यः सरित् श्रेष्ठा हेमकुम्भैर्जलं शुचि ॥ १० ॥
स्वयं इंद्र तदा मोठे आला घेवोनि आसन ।
पाणीही स्वर्णपात्रात नद्यांनी अभिषेकिण्या ॥ १० ॥

महेन्द्रः - इंद्र - तस्यै - त्या लक्ष्मीकरिता - महत् - मोठे - अद्‌भुतं - विचित्र - आसनं - आसन - आनिन्ये - आणिता झाला - मूर्तिमत्यः - प्रत्यक्ष शरीरधारी - सरिच्छ्रेष्ठाः - श्रेष्ठ नद्या - हेमकुम्भैः - सुवर्णाच्या कलशांनी - शुचि जलं - शुद्ध उदक. ॥१०॥
तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन आणले. श्रेष्ठ नद्यांनी मूर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यांतून पवित्र पाणी आणले. (१०)


आभिषेचनिका भूमिः आहरत् सकलौषधीः ।
गावः पञ्च पवित्राणि वसन्तो मधुमाधवौ ॥ ११ ॥
औषधी अभिषेकाते पृथ्वीने सर्व आणिल्या ।
पंचगव्यहि गायींनी वसंते फल पुष्प ते ॥ ११ ॥

भूमिः - पृथ्वी - अभिषेचनिकाः - अभिषेकाला उपयोगी पडणार्‍या - सकलौषधीः - सर्व वनस्पती - आहरत् - आणिती झाली - गावः - गाई - पञ्च पवित्राणि - दूध दही तूप इत्यादि पाच पवित्र पदार्थ - वसन्तः - वसंत ऋतु - मधुमाधवौ - चैत्रवैशाखातील फुले-फळे ॥११॥
पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या. गाईंनी पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतूने चैत्र-वैशाखात मिळणारी सर्व फुलेफळे आणून दिली. (११)


ऋषयः कल्पयां चक्रुः अभिषेकं यथाविधि ।
जगुर्भद्राणि गन्धर्वा नट्यश्च ननृतुर्जगुः ॥ १२ ॥
योजुनी सर्व सामग्री ऋषिंनी अभिषेकिले ।
गंधर्व गायले सर्व नर्तक्या नाचल्या तदा ॥ १२ ॥

ऋषयः - ऋषि - यथाविधि - यथाशास्त्र - अभिषेकं - अभिषेक - कल्पयाञ्चक्रुः - कल्पिते झाले - च - आणि - नटयः - नाटकी स्त्रिया - ननृतुः - नाचू लागल्या - जगुः (च) - आणि गात्या झाल्या. ॥१२॥
ऋषींनी विधिपूर्वक तिला अभिषेक केला. गंधर्व मंगल गान करू लागले. नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या. (१२)


मेघा मृदंगपणव मुरजानकगोमुखान् ।
व्यनादयत् शंखवेणु वीणास्तुमुलनिःस्वनान् ॥ १३ ॥
मृदंग डमरू ढोल नगारे शंख शिंग नी ।
वेणू वीणा अशी वाद्ये ढगांनी वाजवीयली ॥ १३ ॥

मेघाः - मेघ - तुमुलनिः स्वनान् - गंभीर शब्द करणारी - मृदंगपणवमुरजानकगोमुखान् - मृदंग, पणव, मुरज, आनक व गोमुख ही वाद्ये - शङ्‌खवेणुवीणाः (च) - आणि शंख, वेणु व वीणा ही - व्यनादयन् - वाजविते झाले. ॥१३॥
मेघ देह धारण करून मृदंग, डमरू, ढोल, नगारे, रणशिंगे, शंख, वेणू आणि वीणा मोठमोठ्याने वाजवू लागले. (१३)


ततोऽभिषिषिचुर्देवीं श्रियं पद्मकरां सतीम् ।
दिगिभाः पूर्णकलशैः सूक्तवाक्यैर्द्विजेरितैः ॥ १४ ॥
हातात कमलो घेता शोभली लक्षुमी तदा ।
दिग्गजे घातले स्नान विप्र मंत्रहि बोलले ॥ १४ ॥

ततः - नंतर - दिगिभाः - दिग्गज - पद्मकरां - हातात कमळ धारण करणार्‍या - सतीं श्रियं देवीं - साध्वी लक्ष्मी देवीला - पूर्णकलशैः - उदकांनी भरलेल्या कलशांनी - द्विजेरितैः सुक्तवाक्यैः - ब्राह्मणांनी उच्चारिलेल्या श्रीसूक्तादि स्तोत्रांनी - अभिषिषिचुः - अभिषेक घालिते झाले. ॥१४॥
तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मीदेवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले. त्या वेळी ब्राह्मणांनी वेदमंत्र म्हटले. (१४)


समुद्रः पीतकौशेय वाससी समुपाहरत् ।
वरुणः स्रजं वैजयन्तीं मधुना मत्तषट्पदाम् ॥ १५ ॥
रेशमी पिवळी वस्त्रे समुद्रे अर्पिली तिला ।
वैजयंति गळा माळा वरुणे अर्पिली असे ।
जये गंधात ते भृंग मत्त होती सदैवची ॥ १५ ॥

समुद्रः - समुद्र - पीतकौशेयवाससी - दोन पिवळी रेशमी वस्त्रे - समुपाहरत् - अर्पण करिता झाला - वरुणः - वरुण - मधुना - पुष्परसाने - मत्तषट्‌पदां - उन्मत्त झाले आहेत भ्रमर ज्यामध्ये अशी - वैजयन्तीं स्रजं - वैजयंतीनामक माळ. ॥१५॥
तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली. वरुणाने वैजयंती माळ समर्पण केली. मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजारव करीत होते. (१५)


भूषणानि विचित्राणि विश्वकर्मा प्रजापतिः ।
हारं सरस्वती पद्मं अजो नागाश्च कुण्डले ॥ १६ ॥
भूषणे सुंदरो ऐशी विश्वकर्मेचि अर्पिली ।
ब्रह्म्याने कमळो आणि मोतीमाळ सरस्वत्ये ।
नाग ते कुंडले दोन अर्पिते जाहले तिला ॥ १६ ॥

विश्वकर्मा - विश्वकर्मानामक - प्रजापतिः - प्रजापति - विचित्राणि - चित्रविचित्र - भूषणानि - अलंकार - सरस्वती - सरस्वती - हारं - रत्नांचा हार - अजः - ब्रह्मदेव - पद्मं - कमळ - नागाः - सर्प - कुण्डले - दोन कुंडले. ॥१६॥
प्रजापती विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवाने कमळ आणि नागांनी दोन कुंडले तिला दिली. (१६)


ततः कृतस्वस्त्ययनोत्पलस्रजं
     नदद् द्विरेफां परिगृह्य पाणिना ।
चचाल वक्त्रं सुकपोलकुण्डलं
     सव्रीडहासं दधती सुशोभनम् ॥ १७ ॥
(इंद्रवज्रा)
पुन्हा द्विजे स्वस्तियनोहि केले
    नी पद्ममाला करि घेइ लक्ष्मी ।
सुलक्षणी त्या पुरुषा गळ्यात
    घालावया नी वरण्या निघाली ॥ १७ ॥

ततः - नंतर - कृतस्वस्त्ययना - मंगलकारक स्वस्तिवाचनादि विधि पूर्ण झाला आहे जिचा अशी - सुकपोलकुण्डलं - जिचे गाल सुंदर कुंडल प्रभेने लकाकत आहेत - सव्रीडहासं - लज्जा व हास्य यांनी युक्त असे - सुशोभनं वक्त्रं - अत्यंत सुंदर मुख - दधती - धारण करणारी - पाणिना - हाताने - नदद्‌द्विरेफां - जीवर भ्रमर शब्द करीत आहेत अशी - उत्पलस्रजं - कमळांची माळ - परिगृह्य - घेऊन - चचाल - इकडेतिकडे फिरू लागली. ॥१७॥
ब्राह्मणांनी स्वस्तिमंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तेथून निघाली. माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते. त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती. सुंदर गालांवर कुंडले डोलत होती. तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्याने शोभत होते. (१७)


स्तनद्वयं चातिकृशोदरी समं
     निरन्तरं चन्दनकुंमोक्षितम् ।
ततस्ततो नूपुरवल्गु शिञ्जितैः
     विसर्पती हेमलतेव सा बभौ ॥ १८ ॥
स्तनद्वयो ते दृढ एकमेका
    नी चंदनी केशरि लेप त्यासी ।
कृशोदरी ती चलता ध्वनी तो
    मनोहरी पैंजणि ही निघाला ।
ती पाहताना गमले मनासी
    सुवर्णवेली फिरते अशी ही ॥ १८ ॥

अतिकृशोदरी - अत्यंत कृश आहे उदर जीचे अशी - समं - सारख्या - निरन्तरं - एकमेकाला चिकटून राहिलेल्या - चन्दनकुङ्कुमोक्षितं - चंदन व केशर ह्यांचा लेप केलेल्या - स्तनद्वयं - दोन स्तनांना - दधती - धारण करणारी - च - आणि - नूपुरवल्गुसिञ्जतैः - पैंजणांच्या मधुर शब्दांनी - ततस्ततः - इकडून तिकडे - विसर्पती - चालणारी - सा - ती लक्ष्मी - हेमलता इव - सुवर्णवल्लीप्रमाणे - बभौ - शोभली. ॥१८॥
तिची कंबर बारीक होती. पुष्ट असे दोन्ही स्तन केशरी चंदनाची उटी लावलेले होते. जेव्हा ती चालत असे, तेव्हा तिच्या पायातील नूपुरांचा मधुर झंकार निघत होता. त्यावेळी ती फिरणार्‍या सुवर्णवेलीप्रमाणे शोभत होती. (१८)


विलोकयन्ती निरवद्यमात्मनः
     पदं ध्रुवं चाव्यभिचारिसद्‍गुणम् ।
गन्धर्वसिद्धासुरयक्षचारण
     त्रैविष्टपेयादिषु नान्वविन्दत ॥ १९ ॥
इच्छी मनी ती गुण‌उत्तमाला
    घालावयाला जलपुष्पमाला ।
गंधर्व यक्षीं असुरात तैसे
    ना कोणि देवांतहि युक्त तैसा ॥ १९ ॥

आत्मनः - स्वतःसाठी - निरवद्यं - निर्दोष - ध्रुवं - चिरस्थायी - च - आणि - अव्यभिचारिसद्‌गुणं - न ढळणारे आहेत सद्‌गुण ज्याचे असे - पदं - आश्रयस्थान - विलोकयन्ती - शोधीत - गन्धर्वयक्षासुरसिद्धचारणत्रैविष्टपेयादिषु - गंधर्व, यक्ष, दैत्य, सिद्ध, चारण, व स्वर्गातील देव ह्यामध्ये - (तत्) न अन्वविंदत - ते न मिळविती झाली. ॥१९॥
आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, चारण, देव इत्यादींमध्ये तिला असा पुरुष आढळला नाही. (१९)


नूनं तपो यस्य न मन्युनिर्जयो
     ज्ञानं क्वचित् तच्च न संगवर्जितम् ।
कश्चिन्महान् तस्य न कामनिर्जयः
     स ईश्वरः किं परतो व्यपाश्रयः ॥ २० ॥
तपस्वि पाही परिक्रोधपूर्ण
    आसक्त ज्ञानी गमले मनाला ।
सामर्थ्यशाली तर कामि तैसे
    ऐश्वर्यि हे तो नच आश्रयो ते ॥ २० ॥

नूनं यस्य तपः - खरोखर ज्याच्याजवळ तप आहे - मन्युनिर्जयः न - क्रोधाला जिंकिलेले नाही - च - आणि - क्वचित् - काही ठिकाणी - ज्ञानं - ज्ञान आहे - (किन्तु) तत् - पण ते ज्ञान - सङगवर्जितं न - आसक्तिरहित नाही - कश्चित् - कोणी एक - महान् - मोठा आहे - तस्य कामनिर्जयः न - त्याने कामाला जिंकिलेले नाही - परतः - दुसर्‍यावर - व्यपाश्रयः - अवलंबून राहणारा - सः - तो - ईश्वरः - समर्थ - किं (स्यात्) - कसा असेल. ॥२०॥
जो तपस्वी होता, त्याने क्रोधावर विजय मिळविलेला नव्हता. कोणाला ज्ञान होते, परंतु तो अनासक्त नव्हता. कोणी थोर होते, परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते. ज्याला दुसर्‍याचा आश्रय घ्यावा लागतो, त्याला ईश्वर कसे म्हणायचे ? (२०)


धर्मः क्वचित् तत्र न भूतसौहृदं
     त्यागः क्वचित् तत्र न मुक्तिकारणम् ।
वीर्यं न पुंसोऽस्त्यजवेगनिष्कृतं
     न हि द्वितीयो गुणसंगवर्जितः ॥ २१ ॥
धर्मज्ञ त्यांना नच जीवप्रेम
    त्यागी परी ते नच मुक्त कोणी ।
ते वीर होते परि कालबद्ध
    विरक्त अद्वैतचि ध्याति नित्य ॥ २१ ॥

क्वचित् - कोठे - धर्मः (अस्ति) - धर्म आहे - तत्र - तेथे - भूतसौहृदं न - प्राण्यांविषयी दयाळूपणा नाही - क्वचित् - कोठे - त्यागः (अस्ति) - दानशीलता आहे - तत्र - तेथे - मुक्तिकारणं न - मोक्षाला साधन नाही - पुंसः - काही पुरुषांमध्ये - वीर्यं (अस्ति) - पराक्रम आहे - (किन्तु) अजवेगनिष्कृतं न - पण काळाच्या वेगातून सुटलेला नाही - गुणसङगवर्जितः - गुणांविषयी आसक्ती सोडलेला असा - द्वितीयः - पत्नी स्वीकारून द्वैत मानणारा - नहि - नाही. ॥२१॥
काहीजण धर्माचे आचरण करणारे होते, परंतु त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते. क्वचित त्याग होता, परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता. काहींच्या मध्ये शौर्य होते, परंतु ते काळावर मात करणारे नव्हते. सनकादिकांसारखे जे गुणातीत होते, ते वर होणार नव्हते. (२१)


क्वचित् चिरायुर्न हि शीलमंगलं
     क्वचित् तदप्यस्ति न वेद्यमायुषः ।
यत्रोभयं कुत्र च सोऽप्यमंगलः
     सुमंगलः कश्च न कांक्षते हि माम् ॥ २२ ॥
दीर्घायु होते ऋषि कोणि त्यात
    अमंगलो योग्य न शील त्यांचे ।
ते शील ज्यांना परि अल्प आयू
    दोन्ही जिथे तो अतिहीन राहि ।
सुलक्षणी तो परि एक विष्णु
    न इच्छि तो तो मज लक्षुमीला ॥ २२ ॥

क्वचित् - कोठे - चिरायुः (अस्ति) - पुष्कळ आयुष्य आहे - शीलमङगलं नहि - चांगला स्वभाव नाही - क्वचित् - कोठे - तत् अपि - तो चांगला स्वभावसुद्धा - अस्ति - आहे - आयुषः - आयुष्यासंबंधाने - न वेद्यं - काही कळत नाही - च - आणि - यत्र कुत्र - ज्या कोठे - उभयं (अस्ति) - चांगला स्वभाव व आयुष्यस्थैर्य ही दोन्ही आहेत - सः अपि - तोसुद्धा - हि - खरोखर - अमङगलः - अमंगळ - च - आणि - (यः) कः - जो कोणी - सुमंगलः (अस्ति) - अत्यंत मंगल असा आहे - सः मां काङ्‌क्षते हि न - तो खरोखर माझी इच्छा करीत नाही. ॥२२॥
काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे, परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही. काहींचे वर्तन मला योग्य आहे, परंतु त्यांच्या आयुष्याविषयी सांगता येत नाही. काही जणांमध्ये दोन्हीही गोष्टी आहेत, परंतु त्यांचे वागणे अमंगळ असते आणि सर्व मंगल गुण ज्याच्या ठायी आहेत, ते मला इच्छित नाहीत. (२२)


एवं विमृश्याव्यभिचारिसद्‍गुणैः
     वरं निजैकाश्रयतया गुणाश्रयम् ।
वव्रे वरं सर्वगुणैरपेक्षितं
     रमा मुकुन्दं निरपेक्षमीप्सितम् ॥ २३ ॥
लक्ष्मी असे हे स्मरुनी मनात
    विष्णू वरीला गुणि लक्षुमीने ।
न प्राकृताचा मुळि स्पर्श त्याला
    खरा तिचा जो नित आश्रयो की ॥ २३ ॥

रमा - लक्ष्मी - एवं - याप्रमाणे - विमृश्य - विचार करून - अव्यभिचारिसद्‌गुणैः वरं - कधीही न ढळणार्‍या चांगल्या गुणांनी श्रेष्ठ अशा - निजैकाश्रयतया - स्वतःच्याच एका आधारावर राहणारा असल्यामुळे - अगुणाश्रयं - गुणांचा स्वीकार न करणारा - सर्वगुणैः अपेक्षितं - संपूर्ण गुणांनी इच्छिलेल्या - निरपेक्षं - ज्याला कशाचीही अपेक्षा नाही अशा - ईप्सितं मुकुन्दं - इष्ट अशा श्रीविष्णुला - वरं - पति - वव्रे - वरिती झाली. ॥२३॥
असा विचार करून श्रीलक्ष्मीदेवीने आपल्याला इष्ट वाटणार्‍या भगवंतांनाच वर म्हणून निवडले. कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्‌गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाहीत. अणिमादी सिद्धी, त्यांची इच्छा धरतात; परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत. शिवाय लक्ष्मीदेवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत. म्हणून तिने त्यांनाच वरले. (२३)


तस्यांसदेश उशतीं नवकञ्जमालां
     माद्यन्मधुव्रतवरूथगिरोपघुष्टाम् ।
तस्थौ निधाय निकटे तदुरः स्वधाम
     सव्रीडहासविकसन् नयनेन याता ॥ २४ ॥
(वसंततिलका)
घालोनि माळनवपंकज वक्ष त्याचे
    पाहोनि लाजलि बहू मनि ती रमा तै ।
चारी दिशासी फिरती अति मत्तभृंग
    गंधात डुंबुनिच गुंजन जे करीती ॥ २४ ॥

तस्य - त्या विष्णूच्या - अंसदेशे - खांद्यावर - माद्यन्मधुव्रतवरूथगिरा - मत्त भ्रमरसमुदायांच्या गुंजारवाने - उपघुष्टां - घुमविलेली - उशतीं - मनोहर - नवकञ्जमाला - ताज्या कमळांची माळ - निधाय - ठेवून - स्वधाम तदुरः - आपले राहण्याचे स्थान जे त्या विष्णूचे वक्षस्थळ त्याकडे - याता - गेलेली - सव्रीडहासविकसन्नयनेन - सलज्ज हास्याने शोभणार्‍या प्रफुल्लित नेत्राने पाहणारी अशी - निकटे - जवळ - तस्थौ - उभी राहिली. ॥२४॥
जिच्याभोवती चारी बाजूंनी धुंद भ्रमर मधुर गुंजारव करीत आहेत, अशी त्याज्या कमळांची सुंदर माळ लक्ष्मीदेवीने भगवंतांच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणार्‍या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षःस्थळाकडे पाहात ती त्यांच्याजवळच उभी राहिली. (२४)


तस्याः श्रियस्त्रिजगतो जनको जनन्या
     वक्षो निवासमकरोत् परमं विभूतेः ।
श्रीः स्वाः प्रजाः सकरुणेन निरीक्षणेन
     यत्र स्थितैधयत साधिपतीन् त्रिलोकान् ॥ २५ ॥
जो या जगास पितरो तयि लक्षुमी ही
    माता जगास तिजला हृदयात स्थान ।
देता विराजुनि तिये करुणामनाने
    ते लोकपाल जन यां अभिवृद्ध केले ॥ २५ ॥

जनकः - त्रैलोक्याला उत्पन्न करणारा विष्णु - विभूतेः - ऐश्वर्ययुक्त अशा - तस्याः - त्या - त्रिजगतः जनन्याः - त्रैलोक्याची माता अशा - श्रियः - लक्ष्मीला - (स्वं) वक्षः - आपले वक्षस्थल - परमं - श्रेष्ठ - निवासं - राहण्याचे स्थान - अकरोत् - करिता झाला - यत्र - ज्या वक्षस्थलावर - स्थिता - राहिलेली - श्रीः - लक्ष्मी - सकरुणेन - दयायुक्त - निरीक्षणेन - अवलोकनाने - स्वाः प्रजाः - आपल्या प्रजांना - साधिपतीन् त्रिलोकान् - लोकपालांसह त्रैलोक्याला - ऐधयत - वाढविती झाली. ॥२५॥
त्रैलोक्यनिर्मात्या भगवंतांनी त्या जगज्जननी श्रीलक्ष्मीदेवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावरच स्थान दिले. लक्ष्मीदेवीने तेथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्रकटाक्षांनी तिन्ही लोक, लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. (२५)


(अनुष्टुप्)
शंखतूर्यमृदंगानां वादित्राणां पृथुः स्वनः ।
देवानुगानां सस्त्रीणां नृत्यतां गायतामभूत् ॥ २६ ॥
(अनुष्टुप्‌)
त्या वेळी शंख भेर्‍यां नी मृदंग वाजु लागले ।
गंधर्व अप्सरा यांच्या सहाय्ये नाचु लागले ॥ २६ ॥

शंखतूर्यमृदङगानां वादित्राणां - शंख, तुतार्‍या, मृदंग ह्या वाद्यांचा - नृत्यतां - नाचणार्‍यांचा - गायतां - गाणार्‍यांचा - सस्त्रीणां देवानुगाःनां पृथुः स्वनः - स्त्रियांसह देवसेवकांचा मोठा शब्द - अभूत् - उत्पन्न झाला. ॥२६॥
त्यावेळी शंख, तुतारी, मृदंग इत्यादी वाद्ये वाजू लागली. गंधर्व अप्सरांसहित गाऊ नाचू लागले. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. (२६)


ब्रह्मरुद्राङ्‌गिरोमुख्याः सर्वे विश्वसृजो विभुम् ।
ईडिरेऽवितथैर्मन्त्रैः तल्लिङ्‌गैः पुष्पवर्षिणः ॥ २७ ॥
ब्रह्म्याने अंगिरे रुद्रे केलीसे पुष्पवृष्टि तै ।
गुणरुपादि लीलांची मंत्राने स्तुति गायिली ॥ २७ ॥

पुष्पवर्षिणः - फुलांची वृष्टि करणारे - ब्रह्मरुद्रङगिरोमुख्याः - ब्रह्मदेव, शंकर, अंगिरा आदिकरून - सर्वे - सर्व - विश्वसृजः - प्रजापति - तल्लिङगैः - त्याचेच वर्णन करणार्‍या - अवितथैः - खर्‍या - मंत्रैः - वेदमंत्रांनी - विभुं ईडिरे - विष्णूला स्तविते झाले. ॥२७॥
ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंतांचे गुण, स्वरूप, लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणार्‍या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. (२७)


श्रियावलोकिता देवाः सप्रजापतयः प्रजाः ।
शीलादिगुणसंपन्ना लेभिरे निर्वृतिं पराम् ॥ २८ ॥
कृपादृष्ट्ये श्रियेच्या त्या देवता नि प्रजापती ।
प्रजाही सुखसंपन्न जाहली उत्तमो गुणे ॥ २८ ॥

श्रिया - लक्ष्मीने - विलोकिताः - अवलोकन केलेले - देवाः - देव - च - आणि - सप्रजापतयः - प्रजापतींसह - शीलादिगुणसंपन्नाः - सुस्वभाव व सद्‌गुण ह्यांनी युक्त झालेल्या - परां निवृतिं - अत्यंत सुख - लेभिरे - पावल्या. ॥२८॥
देव, प्रजापती आणि प्रजा लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. परीक्षिता, इकडे लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. (२८)


निःसत्त्वा लोलुपा राजन् निरुद्योगा गतत्रपाः ।
यदा चोपेक्षिता लक्ष्म्या बभूवुर्दैत्यदानवाः ॥ २९ ॥
परीक्षिता ! जधी श्रीने त्यजिले दैत्य दानवा ।
निर्बलो लोभि ते झाले निर्लज्जहि तसेचि ते ॥ २९ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - लक्ष्म्या - लक्ष्मीने - यदा - जेव्हा - दैत्यदानवाः - दैत्य व दानव - उपेक्षिताः - उपेक्षिले - निःसत्त्वाः - दुर्बळ - लोलुपाः - आशाळभूत - निरुद्योगाः - आळशी - च - आणि - गतत्रपाः - निर्लज्ज - बभूवुः - झाले. ॥२९॥
परीक्षिता, इकडे लक्ष्मीदेवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली, तेव्हा ते निर्बल, आळशी, निर्लज्ज आणि लोभी झाले. (२९)


अथासीत् वारुणी देवी कन्या कमललोचना ।
असुरा जगृहुस्तां वै हरेरनुमतेन ते ॥ ३० ॥
पुन्हा त्या मंथना मध्ये वारुणी देवि जन्मली ।
कन्या रुपवती ऐशी दैत्यांनी घेतले तिला ॥ ३० ॥

अथ - नंतर - देवी - तेजस्वी - कमललोचना - कमळाप्रमाणे नेत्र असलेली - वारुणी - वरुण आहे देवता जीची अशी - कन्या - कन्या - आसीत् - उत्पन्न झाली - ते - ते - असुराः - दैत्य - हरेः - विष्णूच्या - अनुमतेन - संमतीने - तां - त्या कन्येला - वै - खरोखर - जगृहुः - अंगिकारते झाले. ॥३०॥
यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारुणीदेवी (सुरा) प्रगट झाली. भगवंतांच्या अनुमतीने दैत्यांनी ती घेतली. (३०)


अथ उदधेर्मथ्यमानात् काश्यपैः अमृतार्थिभिः ।
उदतिष्ठन् महाराज पुरुषः परमाद्‍भुतः ॥ ३१ ॥
महाराजा ! पुन्हा देवे दैत्यांनी इच्छुनी सुधा ।
मथिला सागरू तेंव्हा अलौकिकचि जाहले ॥ ३१ ॥

महाराज - हे परीक्षित राजा - अथ - नंतर - अमृतार्थिभिः - अमृताची इच्छा करणार्‍या - काश्यपैः - देवदैत्यांनी - मथ्यमानात् - घुसळलेल्या - उदधेः - समुद्रापासून - परमाद्‌भुतः - अत्यंत आश्चर्यजनक - पुरुषः - पुरुष - उदतिष्ठत् - वर आला. ॥३१॥
त्यानंतर महाराज, कश्यपपुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रगट झाला. (३१)


दीर्घपीवरदोर्दण्डः कम्बुग्रीवोऽरुणेक्षणः ।
श्यामलस्तरुणः स्रग्वी सर्वाभरणभूषितः ॥ ३२ ॥
पीतवासा महोरस्कः सुमृष्टमणिकुण्डलः ।
स्निग्धकुञ्चितकेशान्त सुभगः सिंहविक्रमः ॥ ३३ ॥
सावळा पुरुषो आला गळां माळाहि शोभल्या ।
गळा शंखापरी त्याचा लालिमा नेत्रि शोभली ।
शोभले पीतवस्त्रादी आणि कुंडल भूषणे ॥ ३२ ॥
रुंद छाती युवावस्थ सिंहापरि पराक्रमी ।
अमाप सुंदरो त्याचे केशही कुरुळे तसे ॥ ३३ ॥

दीर्घपीवरदोर्दंडः - लांब व पुष्ठ बाहु असलेला - कंबुग्रीवः - शंखाच्या आकाराची मान असलेला - अरुणेक्षण - आरक्त नेत्रांचा - श्यामलः - निळ्या कांतीचा - तरुणः - तरुण - स्रग्वी - गळ्यात पुष्पमाळा असलेला - सर्वाभरणभूषितः - सर्व अलंकारांनी शोभलेला. ॥३२॥ पीतवासाः - पिवळे वस्त्र नेसलेला - महोरस्कः - मोठे वक्षस्थळ आहे ज्याचे असा - सुमृष्टमणिकुंडलः - चकचकित आहेत रत्नांची कुंडले ज्याची असा - स्निग्धकुञ्जितकेशांतः - ज्याच्या कुरळ केसांची अग्रे तुकतुकीत आहेत असा - सुभगः - सुंदर - सिंहविक्रमः - सिंहाप्रमाणे पराक्रमी. ॥३३॥
त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यांत लालिमा होता. वर्ण सावळा होता. गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होते. पीतांबर परिधान केलेल्या त्याच्या कानांत चमचमणारी रत्‍नकुंडले होती. रुंद छाती, तारुण्यावस्था, सिंहासारखा पराक्रम, सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणार्‍या बटा यांमुळे तो फारच सुंदर दिसत होता. (३२-३३)


अमृतापूर्णकलशं बिभ्रद् वलयभूषितः ।
स वै भगवतः साक्षात् विष्णोरंशांशसम्भवः ॥ ३४ ॥
हाती कंकण नी एक अमृते भरला घट ।
अंशावतार तो होता साक्षात्‌ जो हरिची असे ॥ ३४ ॥

अमृतापूर्णकलशं बिभ्रत् - अमृताने भरलेला कलश धारण करणारा - वलयभूषितः - मनगटात कडी घातलेला - सः - तो - वै - खरोखर - साक्षात् - प्रत्यक्ष - भगवतः विष्णोः - भगवान विष्णूच्या - अंशांशसंभवः - अंशापासून उत्पन्न झालेला. ॥३४॥
त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तो साक्षात् विष्णूंचा अंशांशावतार होता. (३४)


धन्वन्तरिरिति ख्यात आयुर्वेददृगिज्यभाक् ।
तं आलोक्यासुराः सर्वे कलसं चामृताभृतम् ॥ ३५ ॥
लिप्सन्तः सर्ववस्तूनि कलसं तरसाहरन् ।
नीयमानेऽसुरैस्तस्मिन् कलसेऽमृतभाजने ॥ ३६ ॥
विषण्णमनसो देवा हरिं शरणमाययुः ।
इति तद् दैन्यमालोक्य भगवान् भृत्यकामकृत् ।
मा खिद्यत मिथोऽर्थं वः साधयिष्ये स्वमायया ॥ ३७ ॥
धन्वंतरी हवीभोक्ता आयुर्वेदप्रवर्तक ।
प्रसिद्ध पुढती तोची जगी या जाहला असे ।
दैत्यांनी पाहता त्याला बळाने घेतला घटो ॥ ३५ ॥
इच्छा करोनि ते होते पहिल्या पासुनी तशी ।
सर्वची वस्तु लाभाव्या आपणा मंथनातल्या ।
असुरे अमृता नेता देवता खिन्न जाहल्या ॥ ३६ ॥
तदा ते भगवंताच्या शरणी सर्व पातले ।
भक्तेच्छा कल्पद्रूमो तो दशा पाहून बोलला ।
न करा खेद तो कांही मायेने काम साधितो ॥ ३७ ॥

आयुर्वेदृक् - वैद्यशास्त्राचे ज्याने अवलोकन केले आहे असा - इज्यभाक् - ज्याला यज्ञात हविर्भाग दिला जातो असा - धन्वंतरिः इति ख्यातः - धन्वंतरि या नावाने प्रसिद्ध असा - सः - तो पुरुष - च - आणि - सर्वे - सर्व - असुराः - दैत्य - तं - त्या - अमृताभृतं - अमृताने भरलेल्या - कलशं - कलशाला - आलोक्य - पाहून - सर्ववस्तूनि - सर्व पदार्थ - लिप्सन्तः - इच्छिणारे - कलशं - अमृतकलशाला - तरसा - वेगाने - अहरन् - हरण करिते झाले - असुरैः - दैत्यांकडून - अमृतभाजने तस्मिन् कलशे नीयमाने - अमृताने भरलेला तो कलश नेला जात असता - विषण्णमनसः - खिन्न अंतःकरण झालेले - देवाः - देव - हरिं - श्रीविष्णूला - शरणं - शरण - आययुः - गेले - भृत्यकामकृत् - भक्तांची इच्छा पूर्ण करणारा - भगवान् - श्रीविष्णु - इति - याप्रमाणे - तद्दैन्यं - त्यांच्या दीन अवस्थेला - आलोक्य - पाहून - मिथः - आपापसात - स्वमायया - आपल्या मायेने - वः - तुमच्या - अर्थं - इष्ट सिद्धीला - साधयिष्ये - साधून देईन - मा खिद्यत - खेद करू नका. ॥३५-३७॥
तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक ’धन्वन्तरी’ या नावाने प्रसिद्ध झाला. यज्ञभाग घेण्यास तो पात्र होता. जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली, तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृतकलश हिसकावून घेतला. खरे तर समुद्रमंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या. असुर जेव्हा तो अमृतकलश घेऊन निघून गेले, तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले. त्यांची दीनवाणी दशा पाहून भक्तवांछाकल्पतरू भगवंत त्यांना म्हणाले, "देवांनो ! तुम्ही खेद करू नका. मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो." (३५-३७)


मिथः कलिरभूत्तेषां तदर्थे तर्षचेतसाम् ।
अहं पूर्वं अहं पूर्वं न त्वं न त्वं इति प्रभो ॥ ३८ ॥
अमृत वांछिता दैत्य आपसी भांडु लागले ।
आधी मी आधि मी ऐसे पिईन म्हणु लागले ॥ ३८ ॥

प्रभो - हे परीक्षित राजा - तदर्थे - त्या अमृताकरिता - तर्षचेतसां - अभिलाष करणार्‍या - तेषां - त्या दैत्यांमध्ये - मिथः - एकमेकांत - अहं पूर्वं अहं पूर्वं - मी अगोदर मी अगोदर - न त्वं न त्वं - तू नव्हे तू नव्हे - इति - असे - कलिः - भांडण - अभूत् - सुरू झाले. ॥३८॥
परीक्षिता, अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्याच्यासाठी आपापसात भांडण सुरू झाले. सर्वजण म्हणू लागले, "मी अगोदर पिणार, अगोदर मी; तू नाही, तू नाही." (३८)


देवाः स्वं भागमर्हन्ति ये तुल्यायासहेतवः ।
सत्रयाग इवैतस्मिन् एष धर्मः सनातनः ॥ ३९ ॥
इति स्वान् प्रत्यषेधन्वै दैतेया जातमत्सराः ।
दुर्बलाः प्रबलान् राजन् गृहीतकलशान् मुहुः ॥ ४० ॥
बळाने घेतला ज्याने कुंभ तो अमृती तया ।
दैत्य जे दुबळे त्यांनी पिण्यासी रोधिले असे ॥ ३९ ॥
वदले देवताही त्या मंथना कष्टल्या बहू ।
यज्ञाच्या परि हा भाग देणे कर्तव्य आपुले ॥ ४० ॥

राजन् - हे परीक्षित राजा - दुर्बलाः - दुर्बळ - दैतेयाः - दैत्य - जातमत्सराः - ज्यामध्ये मत्सर उत्पन्न झाला आहे असे - प्रबलान् - बलवान अशा - गृहीतकलशान् - हातात कलश घेतलेल्या - स्वान् - आपल्यापैकीच कित्येकांना - सत्त्रयागे इव - यज्ञांतील हविर्भागाप्रमाणे - एतस्मिन् - ह्या कार्यात - ये - जे - तुल्यायासहेतवः सन्ति - सारखे श्रम करण्याला कारणीभूत आहेत - देवाः - देव - स्वं - आपल्या - भागं - भागाला - अर्हन्ति - योग्य आहेत - एषः - हा - धर्मः - धर्म - सनातनः - प्राचीन काळापासून चालत आलेला - इति - असे म्हणून - मुहुः - वारंवार - वै - खरोखर - प्रत्यषेधन् - निषेधिते झाले. ॥३९-४०॥
हे राजा, ज्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता, त्या बलवान दैत्यांना दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले. ते त्यांना वारंवार म्हणू लागले की, "बंधूंनो, देवांनीसुद्धा आमच्या बरोबरीने परिश्रम केले आहेत. म्हणून त्यांनासुद्धा यज्ञभागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे. हा सनातन धर्म होय." (३९-४०)


एतस्मिन् अंतरे विष्णुः सर्वोपायविदीश्वरः ।
योषिद् रूपमनिर्देश्यं दधारपरमाद्‍भुतम् ॥ ४१ ॥
तू तू मी मी अशी दैत्यीं लागता चतुरो हरी ।
अद्‌भूत रुप ते स्त्रीचे घेवोनी तेथ पातले ॥ ४१ ॥

एतस्मिन् अन्तरे - इतक्या अवकाशामध्ये - सर्वोपायवित् - सर्व उपाय जाणणारा - ईश्वरः - ऐश्वर्यसंपन्न - विष्णुः - विष्णु - अनिर्देश्यं - अवर्णनीय - परमाद्‌भुतं - अत्यंत आश्चर्योत्पादक - योषिद्‌रूपं - स्त्रीस्वरूप - दधार - धारण करिता झाला. ॥४१॥
एवढ्यात सर्व युक्त्या जाणणार्‍या भगवंतांनी अत्यंत अद्‌भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले. (४१)


प्रेक्षणीयोत्पलश्यामं सर्वावयवसुन्दरम् ।
समानकर्णाभरणं सुकपोलोन्नसाननम् ॥ ४२ ॥
श्यामला मोहिनी रूप अतीव अंग मोहिता ।
कानात कुंडले तैशी गाल सुंदर शोभले ।
नासिका उंच ती तैशी रम्य ते मुख साजिरे ॥ ४२ ॥

प्रेक्षणीयोत्पलश्यामं - पाहाण्याजोग्या नीळ कमळाप्रमाणे श्याम वर्णाचे - सर्वावयवसुन्दरं - ज्याचे संपूर्ण अवयव सुंदर आहेत असे - समान कर्णाभरणं - दोन्ही कानांत सारखे अलंकार घातले आहेत ज्याने असे - सकपोलोन्नसाननम् - गोंडस गालांचे व उंच नाकाचे ॥४२॥
शरीराचा रंग सुंदर निळ्या कमलाप्रमाने श्यामल होता. अंगप्रत्यंगे अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कान समान असून कुंडलांनी सुशोभित होते. सुंदर गाल आणि उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते. (४२)


नवयौवननिर्वृत्त स्तनभारकृशोदरम् ।
मुखामोदानुरक्तालि झंकारोद्विग्नलोचनम् ॥ ४३ ॥
नव यौवन ते उंच गच्चही स्तन शोभले ।
नितंब भार वाहोनी जणू कृशचि जाहले ॥
मुखगंधात प्रेमाने गुंजनी भृंग गुंतले ।
तयाने बावरी नेत्री चालता दिसली असे ॥ ४३ ॥

नवयौवननिर्वृत्तस्तनभारकृशोदरं - नुकतेच तारुण्य प्राप्त झाल्यामुळे गोलाकार झालेल्या स्तनांच्या भाराने कंबर जिची कृश झाली आहे असे - मुखामोदानुरक्तालिझङकारोद्विग्नलोचनं - मुखाच्या सुगंधावर अनुरक्त झालेल्या भ्रमरांच्या गुंजारवामुळे जिचे डोळे घाबरून गेले आहेत असे ॥४३॥
नवतारुण्यामुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती. मुखातून निघणार्‍या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणार्‍या भ्रमरांमुळे तिच्या डोळ्यांत भिती तरळत होती. (४३)


बिभ्रत् स्वकेशभारेण मालां उत्फुल्लमल्लिकाम् ।
सुग्रीवकण्ठाभरणं सुभुजाङ्‌गदभूषितम् ॥ ४४ ॥
आपुल्या लांब केसात फुलांची माळ गुंफिली ।
गळ्यात दागिने तैसे बाजूबंदहि शोभले ॥ ४४ ॥

स्वकेशभारेण - आपल्या केसांच्या भाराने - उत्फुल्लमल्लिकां - फुललेल्या मोगर्‍यांच्या फुलांच्या - मालां - माळेला - बिभ्रत् - धारण करणारे - सुग्रीवकण्ठाभरणं - ज्याच्या सुंदर मानेवर अलंकार घातले आहेत अशी - सुभुजाङगदभूषितम् - ज्याच्या सुंदर बाहूंवर बाहुभूषणे घातली आहेत अशी ॥४४॥
आपल्या लांबसडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगर्‍यांची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते. (४४)


विरजाम्बरसंवीत नितम्बद्वीपशोभया ।
काञ्च्या प्रविलसद्वल्गु चलच्चरणनूपुरम् ॥ ४५ ॥
रुण्‌झूण चरणाच्या त्या नूपुरीं चालता असे ।
नितंबा स्वच्छ ते वस्त्र अपूर्व कर्धनी तशी ॥ ४५ ॥

बिरजाम्बरसंवीतनितम्बद्वीपशोभया - निर्मळ वस्त्राने वेष्टिलेल्या नितंबरूप हत्तीने शोभणारी - काञ्‌च्या - कमरपटटयाने - प्रविलसत् - शोभणारे - वल्गुलसच्चरणनूपुरं - सुंदर व चमकणारी आहेत पायातील पैंजणे जिच्या अशी ॥४५॥
तिच्या पायांतील नूपुर रुणझुण असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ पैठणी परिधान केलेल्या कटीवर कमरपट्टा शोभत होता. (४५)


सव्रीडस्मितविक्षिप्त भ्रूविलासावलोकनैः ।
दैत्ययूथपचेतःसु कामं उद्दीपयन् मुहुः ॥ ४६ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे भगवन्मायोपलम्भनं नाम अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
लाजरे हास्य नी नेत्र तिरके भुवया जशा ।
उडत्या नाचर्‍या भास विलासी दृष्टि साजिरी ।
मोहिनीरूप तो विष्णू दैत्यसेनापतीस त्या ।
कामोद्दीप असे कांही लागला तो करावया ॥ ४६ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णूदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ आठवा अध्याय हा ॥ ८ ॥ ८ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

सव्रीडस्मितविक्षिप्तभ्रूविलासावलोकनैः - लज्जेने मंदहास्य करून चालविलेल्या भुवयाच्या क्रीडेने युक्त अशा कटाक्षांनी - दैत्ययुथपचेतस्सु - दैत्यसेनापतींच्या अंतःकरणात - मुहुः - वारंवार - कामं - मदनाला - उद्दीपयत् - वाढविणारे - ॥४६॥
आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी मोहिनीरूपधारी भगवान दैत्यसेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले. (४६)


स्कंध आठवा - अध्याय आठवा समाप्त

GO TOP