श्रीमद् भागवत पुराण
अष्टमः स्कंधः
सप्तमोऽध्यायः

समुद्रमंथनारम्भः, समुद्रोद्‍भूतहालाहलविषभयेन
भीतेर्देवैः स्तुतस्य भगवतः शिवस्य विषपानं च -

समुद्रमंथनाला प्रारंभ आणि शंकरांचे विषपान -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्)
ते नागराजमामंत्र्य फलभागेन वासुकिम् ।
परिवीय गिरौ तस्मिन् नेत्रमब्धिं मुदान्विताः ॥ १ ॥
आरेभिरे सुसंयत्ता अमृतार्थे कुरूद्वह ।
हरिः पुरस्तात् जगृहे पूर्वं देवास्ततोऽभवन् ॥ २ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या ।
अमृत भाग देण्याचे करोनी मान्य आणिले ॥
नेती वासुकिची केली पर्वता वेढिले तये ॥ १ ॥
अमृता इच्छुनी सर्व घुसळायासि लागले ।
अजीत वासुकीच्या त्या मुखाकडुनि राहता ॥
देवता राहिल्या त्याच बाजूने नेति ओढिण्या ॥ २ ॥

कुरूद्वह - हे कुरूश्रेष्ठा परीक्षित राजा - मुदान्विताः - आनंदित झालेले - ते - ते देव व दैत्य - फलभागेन - फळांतील भाग देऊ करून - नागराजं वासुकिं - सर्पाचा राजा जो वासुकि त्याला - आमन्त्र्य - बोलावून - (तं) नेत्रं - त्याला दोरी म्हणून - तस्मिन् - त्या - गिरौ - पर्वतावर - परिवीय - गुंडाळून - अमृतार्थं - अमृताकरिता - सुसंयत्ताः - सज्ज झालेले असे - अब्धिं (मथितुं) - समुद्राचे मंथन करण्यास - आरेभिरे - आरंभ करिते झाले - हरिः - श्रीविष्णु - पूर्वं - प्रथम - पुरस्तात् - पुढच्या बाजूस - जगृहे - धरिता झाला - ततः - त्याच्या मागोमाग - देवाः - देव - अभवन् - त्या बाजूला झाले. ॥१-२॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, समुद्रमंथनातून मिळणार्‍या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल, असे नागराज वासुकीला वचन देऊन, त्याला दोराप्रमाणे मंदराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली, म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले. (१-२)


तन्नैच्छन् दैत्यपतयो महापुरुषचेष्टितम् ।
न गृह्णीमो वयं पुच्छं अहेरङ्‌गं अमंगलम् ॥ ३ ॥
भगवत्‌कार्य दैत्यांना रुचले नच तेधवा ।
अशूभ शेपटी त्याची वदले आम्हि ना धरू ॥ ३ ॥

दैत्यपतयः - दैत्याधिपति - तत् - त्या - महापुरुषचेष्टितं - महाविष्णूच्या कृत्याला - न ऐच्छन् - न इच्छिते झाले - वयं - आम्ही - अहेः - सर्पाच्या - अमङगलं अङगम् - अशुद्ध अवयव अशा - पुच्छं - शेपटीला - न गृह्‌णीमः - धरणार नाही. ॥३॥
परंतु भगवंतांचे हे कृत्य दैत्यसेनापतींना पसंत पडले नाही. ते म्हणाले, शेपूट हे सापाचे अपवित्र अंग आहे. आम्ही ते पकडणार नाही. (३)


स्वाध्यायश्रुतसम्पन्नाः प्रख्याता जन्मकर्मभिः ।
इति तूष्णीं स्थिताब् दैत्यान् विलोक्य पुरुषोत्तमः ।
स्मयमानो विसृज्याग्रं पुच्छं जग्राह सामरः ॥ ४ ॥
आम्ही तो वेद शास्त्रांचा केला अभ्यास जै विधी ।
आम्ही तो उच्चवर्णीय शौर्याने कार्य साधितो ॥
देवतांहुनि ते काय आम्हा मध्ये उणे असे ।
असे वदुनि ते सर्व तेंव्हा निष्क्रीय राहिले ॥
अजिते मुख सर्पाचे सोडिता पुच्छ घेतले ॥ ४ ॥

स्वाध्यायश्रुतसंपन्नाः - वेदाध्ययन व शास्त्रश्रवण यांनी पूर्ण असे - जन्मकर्मभिः - चांगल्या कुळात जन्म व पराक्रमाची कृत्ये ह्यांनी - प्रख्याताः - प्रसिद्धीस आलेले - इति - असे म्हणून - तूष्णीं - स्तब्ध - स्थितान् - उभ्या राहिलेल्या - दैत्यान् - दैत्यांना - विलोक्य - पाहून - स्मयमानः - स्मित हास्य करणारा - सामरः पुरुषोत्तमः - देवांसह श्रीविष्णु - अग्रं - पुढच्या भागाला - विसृज्य - सोडून - पुच्छं - शेपटीला - जग्राह - धरिता झाला. ॥४॥
आम्ही वेदशास्त्रांचे विधिपूर्वक अध्ययन केले आहे, उच्च कुळात आमचा जन्म झाला आहे आणि शौर्याची मोठमोठी कामे आम्ही केली आहेत. असे म्हणून ते गुपचूपपणे एका बाजूला जाऊन उभे राहिले. ते पाहून, भगवंतांनी स्मित हास्य करून, वासुकीचे मुख सोडले आणि देवांसह शेपूट पकडले. (४)


कृतस्थानविभागास्त एवं कश्यपनन्दनाः ।
ममन्थुः परमायत्ता अमृतार्थं पयोनिधिम् ॥ ५ ॥
या परी निश्चयो केला अमृतप्राप्ति हेतुने ।
लागले मंथना कार्यी देवदानव सर्वही ॥ ५ ॥

एवं - याप्रमाणे - कृतस्थानविभागः - केली आहे स्थानांची वाटणी ज्यांनी असे - ते - ते - कश्यपनन्दनाः - कश्यपाचे मुलगे देव व दैत्य - परमायत्ताः - फार सावध असे - अमृतार्थं - अमृताकरिता - पयोनिधिम् - समुद्राला - ममन्थुः - घुसळिते झाले -. ॥५॥
अशा प्रकारे आपापले स्थान निश्चित करून देव आणि असुर अमृतप्राप्तीसाठी पूर्ण तयारीनिशी समुद्रमंथन करू लागले. (५)


मथ्यमानेऽर्णवे सोऽद्रिः अनाधारो ह्यपोऽविशत् ।
ध्रियमाणोऽपि बलिभिः गौरवात् पाण्डुनन्दन ॥ ६ ॥
परीक्षिता तये वेळी धरोनी देव दानवे ।
निराधार गिरी तेंव्हा समुद्रीं बुडु लागला ॥ ६ ॥

पाण्डुनन्दन - हे पाण्डुपुत्रा परीक्षित राजा - अर्णवे मथ्यमाने - समुद्र घुसळिला जात असता - अनाघारः सः अद्रिः - आधाररहित असा तो मंदर पर्वत - बलिभिः - बलवान अशा देवदैत्यांनी - ध्रियमाणः अपि - धरिला जात असताही - गौरवात् - जडपणामुळे - हि - खरोखर - अपः - पाण्यात - अविशत् - शिरू लागला - . ॥६॥
परीक्षिता, जेव्हा समुद्रमंथन सुरू झाले, तेव्हा बलवान देव आणि असुरांनी पकडून ठेवूनही खाली आधार नसल्याने मंदराचल समुद्रात बुडू लागला. ()


ते सुनिर्विण्णमनसः परिम्लानमुखश्रियः ।
आसन्स्वपौरुषे नष्टे दैवेनातिबलीयसा ॥ ७ ॥
अत्यंत बलवान्‌ दैत्य खचले मनि तेधवा ।
मातीत कार्य ते जाता सगळे खिन्न जाहले ॥ ७ ॥

अति बलीयसा दैवेन - अत्यंत बलवान अशा दैवाने - स्वपौरुषे नष्टे - आपला पराक्रम नष्ट केला असता - सुनिर्विण्णमनसः - अंतःकरण खिन्न झालेले असे - ते - ते देव व दैत्य - परिम्लानमुखश्रियः आसन् - ज्यांची मुखशोभा पार मावळून गेली आहे असे झाले. ॥७॥
अशा प्रकारे अत्यंत खडतर दैवामुळे आपले सर्व प्रयत्‍न धुळीस मिळत आहेत, असे पाहून त्यांचे मन खट्टू झाले. सर्वांच्या चेहर्‍यावर उदासीनता पसरली. (७)


विलोक्य विघ्नेशविधिं तदेश्वरो
     दुरन्तवीर्योऽवितथाभिसन्धिः ।
कृत्वा वपुः कच्छपमद्‍भुतं महत्
     प्रविश्य तोयं गिरिमुज्जहार ॥ ८ ॥
(इंद्रवज्रा)
विघ्नास पाहोनि तदा हरी तो
    विशाल ते कासव रुप घेई ।
जळीं घुसोनि गिरी पाठिशी तैं
    घेई तदा तो नच त्या कठीण ॥ ८ ॥

तदा - त्यावेळी ज्याच्या पराक्रमाचा अंत लागणे कठीण आहे असा - अवितथाभिसन्धिः - सत्य प्रतिज्ञ असा - ईश्वरः - परमेश्वर - विघ्नेशविधिं - विघ्नराजाचे कृत्य - विलोक्य - पाहून - महत् अद्‌भुतं - मोठे आश्चर्यजनक असे - काच्छपं वपुः - कासवाचे शरीर - कृत्वा - धारण करून - तोयं प्रविश्य - पाण्यात शिरून - गिरिं उज्जहार - मंदरपर्वताला वर आणिता झाला. ॥८॥
त्यावेळी भगवंतांनी ओळखले की, ही विघ्नराजाची करामत आहे. म्हणून त्यांनी त्याच्या निवारणाचा उपाय शोधून अत्यंत विशाल व विस्मयकारक कूर्मरूप धारण केले आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मंदराचलाला वर उचलले. भगवंतांची शक्ति अपार असून ते सत्यसंकल्प आहेत. त्यांना अशक्य ते काय ? (८)


तमुत्थितं वीक्ष्य कुलाचलं पुनः
     समुद्यता निर्मथितुं सुरासुराः ।
दधार पृष्ठेन स लक्षयोजन
     प्रस्तारिणा द्वीप इवापरो महान् ॥ ९ ॥
असूर देवे गिरि पाहिली नी
    मंथावयाते सरसावले की ।
जंबुद्विपाच्या परि पाठ मोठी
    त्या कासवाची गिरिखाली होती ॥ ९ ॥

सुरासुराः - देव व दैत्य - तं कुलाचलं - त्या मंदरपर्वताला - उत्थितं वीक्ष्य - वर आणिलेला पाहून - पुनः - फिरून - निर्मथितुं - मंथन करण्याकरिता - समुत्थिताः स्म - उठून तयार झाले - सः - तो पर्वत - लक्षयोजनप्रस्तारिणा पृष्ठेन - चार लक्ष कोस विस्ताराच्या पाठीने - अपरः महान् द्वीपः इव - दुसरे मोठे बेटच की काय अशा रीतीने - दधार - धारण करिता झाला. ॥९॥
देवांनी आणि असुरांनी मंदराचल वर आलेला पाहून ते मंथनासाठी पुन्हा उभे राहिले. त्यावेळी भगवंतांनी जंबूद्वीपाप्रमाणे एक लाख योजने विस्तार असलेल्या आपल्या पाठीवर मंदराचलाला धारण केले होते. (९)


सुरासुरेन्द्रैर्भुजवीर्यवेपितं
     परिभ्रमन्तं गिरिमङ्‌ग पृष्ठतः ।
बिभ्रत् तदावर्तनमादिकच्छपो
     मेनेङ्‌गकण्डूयनमप्रमेयः ॥ १० ॥
परीक्षिता श्रेष्ठचि दैत्य देवे
    बाहूबलाने मंथिला गिरी तै ।
पाठीस कोणी जणु खाजवी त्या ।
    असाचि कूर्मा तयि मोद झाला ॥ १० ॥

अङग - हे राजा - सुरासुरेन्द्रैः - देवदैत्यांच्या अधिपतींनी - भुजवीर्यवेपितं - बाहुबलाने घुसळल्या जाणार्‍या - परिभ्रमन्तं - फिरणार्‍या - गिरिं - मंदरपर्वताला - पृष्ठतः - पाठीवर - ब्रिभ्रत् - धारण करणारा - अप्रमेयः - मोजमाप करता न येणारा - आदिकच्छपः - कच्छपरूपी भगवान - तदावर्तनं - त्या पर्वताचे पाठीवर फिरणे - अङगकण्डूयनं - अंगाचे खाजविणे - मेने - मानिता झाला. ॥१०॥
परीक्षिता, मोठमोठ्या देवांनी आणि असुरांनी जेव्हा आपल्या बाहुबलाने मंदराचल फिरविण्यास सुरुवात केली, तेव्हा तो भगवंतांच्या पाठीवर फिरू लागला. अनंत शक्तिशाली आदिकच्छप भगवंतांना पर्वताचे ते फिरणे म्हणजे पाठ खाजविणे वाटत होते. (१०)


तथासुरानाविशदासुरेण
     रूपेण तेषां बलवीर्यमीरयन् ।
उद्दीपयन्देवगणांश्च विष्णुः
     दैवेन नागेन्द्रमबोधरूपः ॥ ११ ॥
असूरशक्ती करण्या विशेष
    दुज्या रुपाने हरि दैत्य झाला ।
निद्रीत त्या वासुकिसी करोनी
    दैत्याचिया बाजुस ओढि विष्णू ॥ ११ ॥

तथा - त्याप्रमाणे - तेषां - त्या देवदैत्यांच्या - बलवीर्यं - पराक्रमाला - ईरयन् - प्रेरणारा - उद्दीपयन् - उद्दीपित करणारा - विष्णुः - विष्णु - असुरान् - दैत्यांच्या शरीरात - आसुरेण रूपेण - दैत्यरूपाने - च - आणि - देवगणान् - देव संघांच्या शरीरात - दैवेन - देवरूपाने - च - आणि - अबोधरूपः - जडरूपाने - नागेन्द्रं - वासुकीमध्ये - अविशत् - शिरला. ॥११॥
त्याचबरोबर समुद्रमंथन यशस्वी करण्यासाठी भगवंतांनी असुरांची शक्ती आणि बळ वाढवीत आसुरी शक्तिरूपात त्यांच्यात प्रवेश केला. त्याप्रमाणे त्यांनी देवतांना उत्साहित करीत त्यांच्यामध्ये देवरूपाने प्रवेश केला आणि वासुकीनागामध्ये निद्रारूपाने प्रवेश केला. (११)


उपर्यगेन्द्रं गिरिराड् इवान्य
     आक्रम्य हस्तेन सहस्रबाहुः ।
तस्थौ दिवि ब्रह्मभवेन्द्रमुख्यैः
     अभिष्टुवद्‌भिः सुमनोऽभिवृष्टः ॥ १२ ॥
सहस्त्रबाहू तिसर्‍या रुपाने
    त्या पर्वता दाबियले कराने ।
ब्रह्मादिदेवे स्तविले तयाला
    नी पुष्पवृष्टी मग केलि त्यांनी ॥ १२ ॥

सहस्रबाहुः - हजार हातांचा विष्णु - अगेन्द्रं उपरि - मंदर पर्वताच्या वरती - अन्यःगिरिराट् इव - दुसर्‍या मोठया पर्वताप्रमाणे - हस्तेन - हाताने - आक्रम्य - आक्रमण करून - तस्थौ - राहता झाला - दिवि - स्वर्गामध्ये - अभिष्टुवद्‌भिः - स्तुती करणार्‍या - ब्रह्मभवेन्द्रमुख्यैः - शंकर, ब्रह्मदेव इंद्र इत्यादि मुख्य देवांनी - सुमनोऽभिवृष्टः - फुलांची वृष्टि केलेला असा. ॥१२॥
इकडे पर्वताच्या वर दुसर्‍या पर्वतासारखे होऊन सहस्रबाहू भगवंतांनी आपल्या हातांनी त्याला दाबून धरले. त्यावेळी आकाशात ब्रह्मदेव, शंकर, इंद्र वगैरे त्यांची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. (१२)


उपर्यधश्चात्मनि गोत्रनेत्रयोः
     परेण ते प्राविशता समेधिताः ।
ममन्थुरब्धिं तरसा मदोत्कटा
     महाद्रिणा क्षोभितनक्रचक्रम् ॥ १३ ॥
वरी नि खाली असुरो सुरांच्या
    शक्तीत आला हरि संचरोनी ।
उन्मत्त होता मथु लागले तै
    ते क्षुब्ध झाले जलजीवहिंस्त्र ॥ १३ ॥

गोत्रनेत्रयोः - पर्वत व दोरी ह्यांमध्ये - उपरि - वरती - अधः - खाली - च - आणि - आत्मनि - शरीरात - प्रावेशिता - प्रविष्ट झालेल्या - परेण - परमेश्वराने - समेघिताः - वृद्धिंगत केलेले - मदोत्कटाः - मदोन्मत्त असे - ते - देव व दैत्य - महाद्रिणा - मोठया पर्वताने - क्षोभितनक्रचक्रं अब्धिं - खवळून गेला आहे नक्रांचा समुदाय ज्यांतील अशा समुद्राला - तरसा - जोराने - ममन्थुः - घुसळिते झाले. ॥१३॥
अशा प्रकारे भगवंतांनी पर्वतावर त्याला दाबून ठेवून, देव आणि असुरांच्या शरीरांमध्ये शक्तीच्या व पर्वतात दृढतेच्या रूपाने प्रवेश करून आणि वासुकी नागामध्ये निद्रेच्या रूपाने राहून सगळीकडून सर्वांना शक्तिसंपन्न केले. आता ते आपल्या बळाने उत्साहित होऊन मंदराचलाच्या साह्याने वेगाने समुद्रमंथन करू लागले. त्यावेळी समुद्र आणि त्यात राहणारे जलचर यांच्यात खळबळ उडाली. (१३)


अहीन्द्रसाहस्रकठोरदृङ्‌मुख
     श्वासाग्निधूमाहतवर्चसोऽसुराः ।
पौलोमकालेयबलील्वलादयो
     दवाग्निदग्धाः सरला इवाभवन् ॥ १४ ॥
हजार तोंडींअन नेत्र भागी
    विषाग्नि आला तयि वासुकीच्या ।
पौलोम कालेय बळि इल्वलादी
    निस्तेज झाले धुर दाटताची ॥ १४ ॥

अहीन्द्रसाहस्रकठोरदृङमुखश्वासाग्निघूमाहतवर्चसः - सर्पराज वासुकीच्या हजारो नेत्र, मुख व श्वास ह्यांतून निघणार्‍या धूमयुक्त अग्नीने ज्यांची तेजे नष्ट झाली आहेत असे - पौलोमकालेयबलील्वलादयः - पौलोम, कालेय, बलि व इल्वल इत्यादि - असुराः - दैत्य - दवाग्निदग्धाः सरलाः इव - वणव्याने पोळलेल्या सरलवृक्षाप्रमाणे - अभवन् - झाले. ॥१४॥
नागराज वासुकीचे हजारो कठोर नेत्र, मुख आणि श्वासांमधून विषारी आग बाहेर पडू लागली. तिच्या धुरामुळे पौलोम, कालेय, बली, इल्वल इत्यादी असुर निस्तेज झाले. ते असे वाटू लागले की, वणव्याने होरपळून गेलेले जणू सागवान. (१४)


देवांश्च तच्छ्वासशिखाहतप्रभान्
     धूम्राम्बरस्रग् वरकञ्चुकाननान् ।
समभ्यवर्षन् भगवद्वशा घना
     ववुः समुद्रोर्म्युपगूढवायवः ॥ १५ ॥
त्या देवताच्या हततेज झाल्या
    धुराडले ते कवचो नि माला ।
वस्त्रे तसे ते मुखम्लान झाले
    हे पाहिले त्या जगदीश्वराने ।
त्या देवतांच्या वरि वृष्टि केली
    वायू जले स्पर्शित गंध झाला ॥ १५ ॥

भगवद्वशाः - भगवंताच्या आधीन असणारे - घनाः - मेघ - तच्छ्वासशिखाहतप्रभान् - त्या वासुकीच्या श्वासाच्या अग्रांनी ज्यांची तेजे लुप्तप्राय झाली आहेत असे - धूम्राम्बरस्रग्वरकञ्चुकाननान् - धुरकटलेली वस्त्रे, माळा, चिलखत व मुखे ज्यांची अशा - देवान् - देवांच्यावर - समभ्यवर्षन् - पाऊस पाडिते झाले - च - आणि - समुद्रोर्म्युपगूढवायवः - समुद्रांच्या लाटांच्या स्पर्शांनी शीतल झालेले वायु - ववुः - वाहू लागले. ॥१५॥
वासुकीच्या श्वासांच्या फुत्काराने देवांचेसुद्धा तेज फिके पडले. त्यांची वस्त्रे, माळा, श्रेष्ठ कवचे आणि मुखे धुरकट झाली. त्यांची ही दशा पाहून भगवंतांच्या प्रेरणेने मेघ देवतांच्यवर वर्षाव करून लागले आणि समुद्राच्या लाटांचा थंडपणा घेऊन त्यांच्या दिशेने वारे वाहू लागले. (१५)


मथ्यमानात्तथा सिन्धोः देवासुरवरूथपैः ।
(अनुष्टुप्)
यदा सुधा न जायेत निर्ममन्थाजितः स्वयम् ॥ १६ ॥
(अनुष्टुप्‌)
या परी मंथुनी कष्टे अमृत नच लाभता ।
स्वयं अजीत भगवान्‌ मंथना कार्यि लागले ॥ १६ ॥

देवासुरवरूथपैः - देवदैत्यांच्या सेनापतींकडून - तथा - तशा रीतीने - मथ्यमानात् - घुसळल्या जाणार्‍या - सिंधोः - समुद्रापासून - यदा - जेव्हा - सुधा - अमृत - न जायेत - उत्पन्न झाले नाही - अजितः - श्रीविष्णु - स्वयं - स्वतः - निर्ममंथ - घुसळू लागला. ॥१६॥
अशा रीतीने देव आणि असुर यांनी समुद्रमंथन करून सुद्धा जेव्हा अमृत निघाले नाही, तेव्हा स्वतः भगवान समुद्र मंथन करू लागले. (१६)


मेघश्यामः कनकपरिधिः कर्णविद्योतविद्युन्
     मूर्ध्नि भ्राजद् विलुलितकचः स्रग्धरो रक्तनेत्रः ।
जैत्रैर्दोर्भिर्जगदभयदैः दन्दशूकं गृहीत्वा
     मथ्नन् मथ्ना प्रतिगिरिरिवाशोभताथो धृताद्रिः ॥ १७ ॥
(मंदाक्रांता)
मेघःश्यामो कनकवसनो तेज ते कुंडलांचे ।
लालीमा ती कमलनयनी केश तैसे कुरूळे ॥
कंठी माळा अभयजगता वासुकी तो भुजांशी ।
धारोनीया मथन करितो मंदरापर्वताशी ॥ १७ ॥

अथो - त्यावेळी - मेघश्यामः - मेघाप्रमाणे निळ्या रंगाचा - कनकपरिघिः - सुवर्णाचे वस्र सभोवार ज्याने गुंडाळले आहे असा - कर्णविद्योतविद्युत् - ज्याच्या कानात विजेप्रमाणे चकाकणारी तेजस्वी कुंडले आहेत असा - मूर्घ्नि - मस्तकावर - भ्राजद्विलुलितकचः - लोळणारे सुंदर केश आहेत ज्याचे असा - स्रग्धरः - माळा धारण करणारा - रक्तनेत्रः - लाल नेत्रांचा - धृताद्रिः (विष्णुः) - पर्वताला धारण करणारा विष्णु - जैत्रैः - विजयी अशा - जगदभयदैः - जगाला अभय देणार्‍या - दोर्भिः - बाहूंनी - दंदशूकं - वासुकि सर्पाला - गृहीत्वा - घेऊन - मथ्ना - मंदाररूपी रवीने - मथ्नन् - मंथन करणारा असा - गिरिपतिः इव - दुसरा पर्वतराजच की काय असा - अशोभत - शोभला. ॥१७॥
मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर सोनेरी पीतांबर, कानामध्ये विजेसारखी चमकणारी कुंडले, कपाळावर झुलणारे कुरळे केस, डोळ्यांमध्ये लालसर झाक आणि गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसत होती. संपूर्ण जगाला अभय देणार्‍या आपल्या विश्वविजयी भुजांनी वासुकी नागाला पकडून तसेच कूर्मरूपाने पर्वताला धारण करून जेव्हा भगवंत मंदराचलाच्या रवीने समुद्रमंथन करू लागले, त्यावेळी ते दुसर्‍या पर्वताप्रमाणे अतिशय सुंदर दिसू लागले. (१७)


निर्मथ्यमानाद् उदधेरभूद्विषं
     महोल्बणं हालहलाह्वमग्रतः ।
सम्भ्रान्तमीनोन् मकराहिकच्छपात्
     तिमिद्विपग्राहतिमिंगलाकुलात् ॥ १८ ॥
(इंद्रवज्रा)
समुद्र ऐसा मथिता अजीते
    ते नक्र मासे भयभीत झाले ।
समुद्रहत्ती पळु लागले नी
    आधी हलाहालविषो निघाले ॥ १८ ॥

निर्मथ्यमानात् - घुसळल्या जाणार्‍या - संभ्रान्तमीनोन्मकराहिकच्छपात् - ज्यांतील मासे, मगर, सर्प व कासव घाबरून गेले आहेत अशा - तिमिद्विपग्राहतिमिङ्गिलाकुलात् - तिमि नावाचे मासे, पाणहत्ती, नक्र व तिमिंगल नावाचे जलचर ह्यांनी गजबजून गेलेल्या - उदधेः - समुद्रापासून - अग्रतः - प्रथम - महोल्बणं - मोठे - हालाहलह्वं - हालाहल नावाचे - विषं - विष - अभूत् - उत्पन्न झाले. ॥१८॥
अशा प्रकारे समुद्रमंथन चालू असता समुद्रातून सुरुवातीला हालाहाल नावाचे अत्यंत उग्र विष निघाले. त्यामुळे समुद्रातून मासे, मगरी, साप व कासवे भयभीत होऊन वर आली आणि तिमि, तिमिंगल इत्यादि मासे, समुद्रातील हत्ती आणि सुसरी व्याकूळ झाल्या. (१८)


तदुग्रवेगं दिशि दिश्युपर्यधो
     विसर्पदुत्सर्पदसह्यमप्रति ।
भीताः प्रजा दुद्रुवुरङ्‌ग सेश्वरा
     अरक्ष्यमाणाः शरणं सदाशिवम् ॥ १९ ॥
दिशा विदीशी विष पांगले ते
    उपाय कांही नच वाचण्याचा ।
प्रजा भयाने गतप्राण झाली
    प्रजापतीने स्तविले शिवा ते ॥ १९ ॥

अंग - हे राजा - उग्रवेगं - भयंकर वेगाच्या - उत्सर्पत् - उसळणार्‍या - अप्रति - अप्रतिम - दिशिदिशि - प्रत्येक दिशेला - उपरि - वरती - अधः - खाली - विसर्पत् - पसरणार्‍या - तत् - त्या - असह्यं - सहन न होणार्‍या - भीताः - भ्यालेल्या - सेश्वराः - अधिपतींसह - प्रजाः - प्रजा - अरक्ष्यमाणाः - कोणाकडूनही रक्षिल्या न जाणार्‍या अशा - सदाशिवं - शंकराला - शरणं - शरण - दुद्रुवुः - गेले. ॥१९॥
ते अत्यंत उग्र विष दिशा-दिशांना, वरखाली, सगळीकडे उडू आणि पसरू लागले. या असह्य विषापासून वाचण्याचा काही उपायही नव्हता. संपूर्ण प्रजा आणि प्रजापती भयभीत होऊन कोठूनही वाचण्याची आशा नसल्यामुळे भगवान सदाशिवांना शरण गेले. (१९)


विलोक्य तं देववरं त्रिलोक्या
     भवाय देव्याभिमतं मुनीनाम् ।
आसीनमद्रावपवर्गहेतोः
     तपो जुषाणं स्तुतिभिः प्रणेमुः ॥ २० ॥
कैलासि होता शिव तो विराज
    सेवेत होते मुनि श्रेष्ठ तेंव्हा ।
भद्रार्थ होते तप चालले तै
    प्रजापतीने स्तविले नमोनी ॥ २० ॥

त्रिलोक्याः - त्रैलोक्याच्या - भवाय - उत्कर्षाकरिता - देव्या - पार्वतीसह - अद्रौ - पर्वतावर - आसीनं - असलेल्या - मुनीनां - ऋषींना - अभिमतं - मान्य अशा - अपवर्गहेतोः - लोकांना मुक्ती मिळावी म्हणून - तपः - तपश्चर्या - जुषाणं - करणार्‍या - तं - त्या - देववरं - शंकराला - विलोक्य - पाहून - स्तुतिभिः - स्तोत्रांच्या पठणाने - प्रणेमुः - नमस्कार करित्या झाल्या. ॥२०॥
भगवान शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर विश्वकल्याणासाठी बसले होते. ते तेथे मुनींना संमत असणारे तप त्यांच्या मोक्षासाठी करीत होते. प्रजापतींनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती करीत त्यांना प्रणाम केला. (२०)


श्रीप्रजापतय ऊचुः -
(अनुष्टुप्)
देवदेव महादेव भूतात्मन् भूतभावन ।
त्राहि नः शरणापन्नान् त्रैलोक्यदहनाद्विषात् ॥ २१ ॥
प्रजापतींनी भगवान्‌ शिवास स्तविले -
(अनुष्टुप्‌)
देवदेवा महादेवा भूतात्मा भूत भावना ।
त्रिलोका विष ते जाळी प्रार्थितो रक्ष तू अम्हा ॥ २१ ॥

देवदेव - देवांचाही देव अशा - महादेव - हे महादेवा - भूतात्मन् - भूतांच्या अंतर्यामी राहणार्‍या - भूतभावन - सृष्टीचे पालन करणार्‍या - शरणापन्नान् - शरण आलेल्या - नः - आम्हाला - त्रैलोक्यदहनात् - त्रैलोक्याला जाळणार्‍या - विषात् - विषापासून - त्राहि - रक्षण कर. ॥२१॥
प्रजापती म्हणाले - हे देवाधिदेवा महादेवा, आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आणि त्यांचे जीवनदाते आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. त्रैलोक्याला भस्म करणार्‍या या उग्र विषापासून आपण आमचे रक्षण करावे. (२१)


त्वमेकः सर्वजगत ईश्वरो बन्धमोक्षयोः ।
तं त्वामर्चन्ति कुशलाः प्रपन्नार्तिहरं गुरुम् ॥ २२ ॥
समर्थ जगती तूची सगळे बंध मोचना ।
विवेकी पूजिती तूं ते तारिसी तू जगद्‌गुरू ॥ २२ ॥

त्वं - तू - सर्वजगतः - सर्व जगाच्या - बन्धमोक्षयोः - बंधनाला व मोक्षाला - एकः - एकटा - ईश्वरः - देण्यास समर्थ - कुशलाः - ज्ञानी पुरुष - प्रपन्नार्तिहरं - शरण आलेल्यांच्या पीडा दूर करणार्‍या - गुरुं - श्रेष्ठ अशा - तं - त्या - त्वां - तुला - अर्चन्ति - पूजितात. ॥२२॥
सार्‍या जगाला बंधनात टाकण्यात आणि मुक्त करण्यात एकमेव आपणच समर्थ आहात. म्हणून विवेकी पुरुष आपलीच आराधना करतात; कारण आपण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे जगद्‌गुरू आहात. (२२)


गुणमय्या स्वशक्त्यास्य सर्गस्थित्यप्ययान् विभो ।
धत्से यदा स्वदृग्भूमन् ब्रह्मविष्णुशिवाभिधाम् ॥ २३ ॥
जन्म स्थिति लयासाठी होसी प्रगट त्रैगुणे ।
ब्रह्मा विष्णु शिवो नाम धारिसी एक तू परी ॥ २३ ॥

स्वदृक् - हे स्वतःसिद्धज्ञानसंपन्ना - भूमन् - हे सर्वव्यापक - विभो - हे समर्था - गुणमय्या - त्रिगुणात्मक - स्वशक्त्या - आपल्या मायारूप शक्तीने - अस्य - ह्या जगाच्या - सर्गस्थित्यप्ययान् - उत्पत्ति, स्थिति व संहार ह्या कृत्यांना - यदा - जेव्हा - धत्से - चालवितोस - तदा - त्यावेळी - ब्रह्मविष्णुशिवाभिघां - ब्रह्मदेव, विष्णु, व शंकर ह्या संज्ञा - धत्से - धारण करितोस. ॥२३॥
हे प्रभो, आपल्या गुणमय शक्तीने या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय जेव्हा करता, तेव्हा स्वतःसिद्ध ज्ञानी आपण ब्रह्मा, विष्णू, शिव अशी नावे धारण करता. (२३)


त्वं ब्रह्म परमं गुह्यं सदसद्‍भावभावनम् ।
नानाशक्तिभिराभातः त्वमात्मा जगदीश्वरः ॥ २४ ॥
तू स्वयं ब्रह्मतत्वो नी स्वयंतेज असाचि तू ।
सर्वांचा जीवदाता तू सर्वात्मीं तूच एकटा ॥
अनेक शक्तिच्या द्वारा होशी तू तो जगद्‌गुरु ।
जगदीश्वर असा तूंची तुझे सामर्थ्य श्रेष्ठ ते ॥ २४ ॥

सदसद्‌भावभावनः - उच्चनीच वस्तु उत्पन्न करणारा - त्वं - तू - परमं - श्रेष्ठ - गुह्यं - गोपनीय - ब्रह्म - ब्रह्म - नानाशक्तिभिः - अनेक शक्तींनी - आभातः - भासलेला - त्वं - तू - आत्मा - अंतर्यामी असा - जगदीश्वरः - जगाचा अधिपति ॥२४॥
आपण स्वयंप्रकाश आहात. कारण आपण परम रहस्यमय ब्रह्मतत्त्व आहात. सर्व प्रकारच्या उच्च-नीच प्राण्यांना जीवन देणारे आपणच आहात. आपणच सर्वांचे आत्मा आहात. अनेक शक्तींच्याद्वारे आपणच जगद्‌रूपाने प्रतीत होता. आपणच जगाचे ईश्वर आहात. (२४)


त्वं शब्दयोनिर्जगदादिरात्मा
     प्राणेन्द्रियद्रव्यगुणः स्वभावः ।
कालः क्रतुः सत्यमृतं च धर्मः
     त्वय्यक्षरं यत्त्रिवृदामनन्ति ॥ २५ ॥
(इंद्रवज्रा)
तू शब्द योनी जगतासि आत्मा
    तू कालकर्ता अन धर्म सत्य ।
ॐकार त्रैगुण्य असाचि तू हे
    ते वेदगाती वदती सदाची ॥ २५ ॥

त्वं - तू - शब्दयोनिः - वेदांना उत्पन्न करणारा - जगदादिः - जगाचा आदि - प्राणेन्द्रियद्रव्यगुणस्वभावः - प्राण, इंद्रिये, द्रव्य, गुण व अहंकार ही सर्व ज्याची स्वरूपे आहेत असा - आत्मा - आत्मा - कालः - काल - क्रतुः - यज्ञ - सत्यं - सत्य - ऋतं - ऋत - धर्मं - धर्म - च - आणि - यत् - जे - त्रिवृत् - त्रिगुणात्मक - अक्षरं - ओम्‌काररूपी ब्रह्म - त्वयि - तुझ्या ठिकाणी - आमनन्ति - मानितात. ॥२५॥
सर्व वेद आपल्यापासून प्रगट झाले आहेत; आपणच जगताचे आदिकारण महत्तत्त्व आणि त्रिविध अहंकार आहात. तसेच प्राण, इंद्रिये, पंचमहाभूते, शब्द इत्यादी विषय आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव यांचे मूळ कारण आहात. आपणच काळ, यज्ञ, सत्य, ऋत, आणि धर्म आहात. आपणच ’अ-उ-म’ या तीन अक्षरांनी युक्त असा प्रणव आहात, असे वेदवेत्ते म्हणतात. (२५)


अग्निर्मुखं तेऽखिलदेवतात्मा
     क्षितिं विदुर्लोकभवाङ्‌घ्रिपंकजम् ।
कालं गतिं तेऽखिलदेवतात्मनो
     दिशश्च कर्णौ रसनं जलेशम् ॥ २६ ॥
देवस्वरूपाग्नि मुखो तुझेची
    त्रिलोक कल्याण करी हरा हे ।
ही भूमि आहे तव पादपद्म
    आहेस तू सर्वचिदेवरूप ।
हा काळ आहे गति ती तुझीच
    जिव्हा वरूणो नि दिशाहि कर्ण ॥ २६ ॥

अखिल देवतात्मा - संपूर्ण देवतांचा आत्मा - अग्निः - अग्नि - ते - तुझे - मुखं (अस्ति) - मुख आहे - लोकभव - हे लोकरक्षका शंकरा - क्षिंतिं - पृथ्वीला - अङिपङकजं - तुझे चरणकमळ - कालं - काळाला - अखिलदेवतात्मनः - सर्व देवतात्मक अशा - ते - तुझी - गतिम् - गति - दिशः - दिशांना - कर्णौ - कान - च - आणि - जलेशं - वरुणाला - रसनं - जिव्हा - विदुः - असे जाणतात. ॥२६॥
सर्वदेवस्वरूप अग्नी आपले मुख आहे. तिन्ही लोकांचे कल्याण करणार्‍या हे देवा, ही पृथ्वी आपले चरणकमल आहे. आपण अखिल देवस्वरूप आहात. हा काळ आपली गती आहे, दिशा कान आहेत आणि वरुण रसनेंद्रिय आहे. (२६)


नाभिर्नभस्ते श्वसनं नभस्वान्
     सूर्यश्च चक्षूंषि जलं स्म रेतः ।
परावरात्माश्रयणं तवात्मा
     सोमो मनो द्यौर्भगवन् शिरस्ते ॥ २७ ॥
आकाश नाभी अन श्वास वायू
    पाणी असे वीर्य नि सूर्य नेत्र ।
तू आश्रयो त्या सगळ्या जिवांचा
    ते चित्त चंद्रो अन स्वर्ग डोके ॥ २७ ॥

भगवान् - हे शंकरा - नभः - आकाश - ते - तुझी - नाभिः (अस्ति) - बेंबी होय - नभस्वान् - वायु - श्वसनं - श्वासोच्छ्‌वास - सूर्यः - सूर्य - चक्षूंषि - डोळे - च - आणि - जलं - उदक - रेतः (अस्ति) - वीर्य होय - तव - तुझा - आत्मा - आत्मा - परावरात्माश्रयणं - उच्चनीच जीवांचा आश्रय - सोमः - चंद्र - मनः - मन - द्यौः - स्वर्ग - ते - तुझे - शिरः - मस्तक - (अस्ति) स्म - होय. ॥२७॥
आकाश नाभी आहे, वायू श्वास आहे, सूर्य नेत्र आहेत, आणि पाणी वीर्य आहे. आपला अहंकार उच्च-नीच सर्व जीवांचा आश्रय आहे. चंद्र मन आहे आणि हे प्रभो, स्वर्ग आपले मस्तक आहे. (२७)


कुक्षिः समुद्रा गिरयोऽस्थिसंघा
     रोमाणि सर्वौषधिवीरुधस्ते ।
छन्दांसि साक्षात् तव सप्त धातवः
     त्रयीमयात्मन् हृदयं सर्वधर्मः ॥ २८ ॥
हे वेदरूपा जठरो तुझे तो
    समुद्र आहे गिरि अस्थि तैशा ।
वनस्पती नी तृण केश रोम
    छंदोचि धातू हृदयोचि धर्म ॥ २८ ॥

त्रयीमयात्मन् - हे वेदस्वरूपा शंकरा - समुद्राः - समुद्र - कुक्षिः - उदर - गिरयः - पर्वत - अस्थिसंघा - अस्थिसमुदाय - सर्वौषधिवीरुधः - संपूर्ण औषधि व वेली - ते - तुझे - रोमाणि - केस - साक्षात् - प्रत्यक्ष - छंदांसि - सात छंद - तव - तुझे - सप्त - सात - धातवः - धातु - सर्वधर्मः - संपूर्ण धर्म - हृदयं - हृदय. ॥२८॥
हे वेदस्वरूप भगवन, समुद्र आपले पोट आहे, पर्वत हाडे आहेत, सर्व प्रकारच्या औषधी आणि गवत आपले रोम आहेत. गायत्री इत्यादी छंद आपल्या शरीरातील सात धातू आहेत आणि सर्व प्रकारचे धर्म आपले हृदय आहे. (२८)


मुखानि पञ्चोपनिषदस्तवेश
     यैस्त्रिंशदष्टोत्तरमंत्रवर्गः ।
यत्तत् शिवाख्यं परमात्मतत्त्वं
     देव स्वयंज्योतिरवस्थितिस्ते ॥ २९ ॥
मुखोचि पंचोनिषदे तुझे ती
    छत्तीस मंत्रे तयि जन्मले की ।
वैराग्य त्याचे शिव हेचि नाम
    खरे असे ते परमात्म तत्व ॥ २९ ॥

ईश - हे समर्था - देव - शंकरा - पञ्चोपनिषदः - पाच उपनिषदे - तव - तुझी - मुखानि - मुखे होत - यैः - ज्यांनी - त्रिंशदष्टोत्तरमंत्रवर्गः (भवति) - अडतीस मंत्रांचा समुदाय होता - यत् - जे - शिवाख्यं - शिव नावाने प्रसिद्ध - परमार्थतत्त्वं - परब्रह्मरूपी श्रेष्ठ तात्त्विक अर्थमय स्वरूप - स्वयंज्योतिः (अस्ति) - स्वयंप्रकाश आहे - तत् - ते - ते - तुझे - अवस्थितिः - पूर्णावस्थायुक्त स्थान होय. ॥२९॥
हे स्वामी, पाच उपनिषदेच आपली पाच मुखे आहेत. त्यांच्याच पदच्छेदापासून अडतीस कलात्मक मंत्र निघाले आहेत. हे देवा, आपल्या स्वरूपामध्ये राहणे हेच आपले ’शिव’ नावाचे स्वयंप्रकाश परमार्थतत्त्व आहे. (२९)


छाया त्वधर्मोर्मिषु यैर्विसर्गो
     नेत्रत्रयं सत्त्वरजस्तमांसि ।
सांख्यात्मनः शास्त्रकृतस्तवेक्षा
     छन्दोमयो देव ऋषिः पुराणः ॥ ३० ॥
अधर्म दंभो अन लोभ यासी
    छाया तुझी त्याचचि सृष्टि होई ।
तिन्ही गुणांचे तव नेत्र तीन
    ते छंद नी वेद तुझा विचार ।
समस्त शास्त्रा शिव ! तूचि कर्ता
    नी सत्यरूपो तव तेचि आहे ॥ ३० ॥

देव - हे शंकरा - अधर्मो र्मिषु - अधर्मरूपी लाटामध्ये - यैः - ज्यांनी केलेला - विसर्गः - संहार - तु - तर - तव - तुझी - छाया - छाया - सत्त्वरजस्तमांसि - सत्त्व, रज व तम हे - नेत्रमयं - तीन डोळे - छंदोमयः - वेदरूपी - पुराणः - अति प्राचीन - ऋषिः - ऋषि - सांख्यात्मनः - सांख्यशास्त्रप्रतिपादक अशा - शास्त्रकृतः - शास्त्रे निर्माण करणार्‍या - ईक्षा - अवलोकन. ॥३०॥
दंभ, लोभ इत्यादी अधर्माच्या तरंगामध्ये आपली छाया आहे. ज्यापासून विविध प्रकारची सृष्टी निर्माण होते, ते सत्त्व, रज, तम हे आपले तीन नेत्र आहेत. प्रभो, छंदरूप सनातन वेद हे आपले ज्ञान आहे. आपणच सांख्य इत्यादी शास्त्ररूप असून त्यांचे कर्तेसुद्धा आपणच आहात. (३०)


न ते गिरित्राखिललोकपाल
     विरिञ्चवैकुण्ठसुरेन्द्रगम्यम् ।
ज्योतिः परं यत्र रजस्तमश्च
     सत्त्वं न यद्‍ब्रह्म निरस्तभेदम् ॥ ३१ ॥
ज्योतिर्मयो ब्रह्म तुझे स्वरूप
    तयात ना तो गुण भेदभाव ।
तुझ्या रुपाते नच कोणि जाणी
    विष्णू नि ब्रह्मा मग अन्य कोण ॥ ३१ ॥

गिरित्र - हे शंकरा - ते - तुझे - परं - श्रेष्ठ - ज्योतिः - तेज - अखिललोकपालविरिञ्चवैकुण्ठसुरेन्द्रगम्यं - संपूर्ण लोकपाल, ब्रह्मदेव, विष्णु व इंद्र ह्यांना कळण्याजोगे - न - नाही - यत्र - जेथे - रजः - रजोगुण - तमः - तमोगुण - च - आणि - सत्त्वं - सत्त्वगुण - न - नाही - यत् - जे - निरस्तभेदं - भेदभावरहित असे - ब्रह्म (अस्ति) - ब्रह्म होय. ॥३१॥
हे गिरिशा, आपले परम ज्योतिर्मय स्वरूप हेच ब्रह्म आहे. त्यामध्ये रजोगुण, तमोगुण किंवा सत्त्वगुण नाही की कोणत्याही प्रकारचा भेद नाही. आपल्या त्या स्वरूपाला सर्व लोकपाल, एवढेच काय परंतु ब्रह्मदेव, विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाहीत. (३१)


कामाध्वरत्रिपुरकालगराद्यनेक
     भूतद्रुहः क्षपयतः स्तुतये न तत् ते ।
यस्त्वन्तकाल इदमात्मकृतं स्वनेत्र
     वह्निस्फुलिंगशिखया भसितं न वेद ॥ ३२ ॥
(वसंततिलका)
कामो नि दैत्य त्रिपुरी असुरादि शत्रू
    ते जीवद्रोहि रिपुते वधिले स्वताची ।
ना ही स्तुती तव शिवा प्रलयात तू तो
    जै क्रोधसी जगत तै जळतेचि खाक ।
त्याचा तुला न कसला मुळि कांहि पत्ता
    तै तू स्वताच असशी तपध्यानमग्न ॥ ३२ ॥

कामाध्वरत्रिपुरकालगराद्यनेकभूतद्रुहः - मदन, दक्षयज्ञ त्रिपुरासुर, कालविष इत्यादि भूतांना छळणार्‍या अनेकांना - क्षपयतः - मारून टाकणार्‍या - ते - तुझे - तत् - ते चरित्र - स्तुतये - स्तुतीला - न (अलं अस्ति) - पुरणार नाही - यः तु - जो तर - अन्तकाले - प्रलयकाळी - आत्मकृतं - स्वतः निर्मिलेले - इदं - हे जग - स्वनेत्रवन्हिस्फुलिंङगशिखया - आपल्या नेत्राग्नीच्या ठिणग्यांनी व ज्वालांनी - भसितं - भस्म केलेले - न वेद - जाणत नाही. ॥३२॥
आपण कामदेव, दक्षाचा यज्ञ, त्रिपुरासुर, कालकूट विष इत्यादी अनेक जीवद्रोही व्यक्ती आणि वस्तू नष्ट केल्या आहेत, असे म्हणणे ही काही आपली स्तुती नव्हे. कारण आपण तयार केलेले हे विश्व प्रलयाच्या वेळी आपल्याच डोळ्यांतून निघालेल्या आगीच्या ठिणगीने जळून भस्म होऊन जाते आणि याचे आपल्याला भानही नसते. (३२)


ये त्वात्मरामगुरुभिर्हृदि चिन्तिताङ्‌घ्रि
     द्वन्द्वं चरन्तमुमया तपसाभितप्तम् ।
कत्थन्त उग्रपरुषं निरतं श्मशाने
     ते नूनमूतिमविदंस्तव हातलज्जाः ॥ ३३ ॥
चित्ती द्वयो पद तुझे धरिती सुमुक्त
    तैही तुची सतत ज्ञान तपात लीन ।
पाहूनिया सतिसवेहि तुला तरी ते
    संबोधिती तुजसि उग्र स्मशानवासी ।
आसक्त निष्ठुरहि ते म्हणतात मूढ
    अज्ञान ते खचितची अति लाजहीन ॥ ३३ ॥

ये - जे - आत्मरामगुरुभिः - आत्म्याच्याच ठिकाणी आराम पावल्यामुळे मोठेपणाला पावलेल्या ज्ञानांनी - हृदि - हृदयामध्ये - चिन्तिताङ्‌घ्रिद्वंद्वं - ज्याच्या पादयुगुलाचे चिंतन केले आहे अशा - तपसा अभितप्तं - तपश्चर्येने तेजस्वी झालेल्या - त्वां - तुला - उमया चरन्तं - पार्वतीसह संचार करणारा - उग्रपुरुषं - भयंकर व कठोर - श्मशाने निरंतं - श्मशानात आसक्त असणारा असे - कत्थन्ते - म्हणतात - ते हातलज्जाः - ते निर्लज्ज - नूनं - खरोखर - तव - तुझ्या - ऊर्ति - लीलेला - (किं) अविदन् - जाणतात काय ॥३३॥
जीवन्मुक्त आत्माराम पुरुष आपल्या हृदयामध्ये आपल्या चरणयुगलांचे ध्यान करीत राहतात. तसेच आपण नेहमी तपस्येमध्येच मग्न असता. असे असूनही पार्वतीच्या सान्निध्यात राहता. म्हणून जे लोक आपल्याला आसक्त आणि स्मशानवासी असल्याकारणाने उग्र किंवा निष्टुर आहात असे समजतात, ते निर्लज्ज आपल्या लीलांचे रहस्य काय जाणोत ! (३३)


तत्तस्य ते सदसतोः परतः परस्य
     नाञ्जः स्वरूपगमने प्रभवन्ति भूम्नः ।
ब्रह्मादयः किमुत संस्तवने वयं तु
     तत्सर्गसर्गविषया अपि शक्तिमात्रम् ॥ ३४ ॥
या कार्यकारण जगाहुनि पैल माया
    मायेहुनीहि अति पैल तुझे स्वरूप ।
ज्ञानी न कोणि शंकतो नच तो विधीही
    गाऊ शके स्तुति तुझी अम्हि कोण तेथे ।
पुत्रपौत्र असमर्थचि बोलण्यास
    शक्तीनुसार तरिही गुणगान केले ॥ ३४ ॥

तत् - म्हणून - ब्रह्मादयः - ब्रह्मादिदेव - सदसतोः - सत्पदार्थ व असत्पदार्थ ह्याहून - परतः - पलीकडे असणार्‍या - परस्य - श्रेष्ठ - भ्रूम्नः - व्यापक - तस्य - त्या - ते - तुझ्या - स्वरूपगमने - स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याविषयी - न प्रभवन्ति - समर्थ होत नाहीत - संस्तवने - स्तुती करण्याविषयी - किमुत (प्रभवन्ति) - कसे बरे समर्थ होतील - तत्सर्गसर्वविषयाः - त्याच्या सृष्टीतील सर्व विषय फक्त जाणणारे - वयं तु - आम्ही तर - अपि - सुद्धा - शक्तिमात्रं (स्तवनाय यतामहे) - यथाशक्ति स्तुति करीत आहो ॥३४॥
या कार्यकारणरूप जगताच्या पलीकडे असणार्‍या मायेपासूनही दूर असणार्‍या आपल्या अनंत स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान सहजासहजी ब्रह्मदेवादिकांनाही होत नाही; तर ते स्तुती कशी करू शकतील ? आम्ही तर त्यांच्या पुत्रांचेही पुत्र. आम्ही आपली यथार्थ स्तुती कशी करणार ? तरीसुद्धा आम्ही आपल्या शक्तीनुसार आपले थोडेसे गुणगान केले आहे. (३४)


(अनुष्टुप्)
एतत् परं प्रपश्यामो न परं ते महेश्वर ।
मृडनाय हि लोकस्य व्यक्तिस्तेऽव्यक्तकर्मणः ॥ ३५ ॥
(अनुष्टुप्‌)
लीलाविहारि हे रूप फक्त आम्हीच जाणतो ।
श्रेष्ठरूप न जाणो की कल्याणा व्यक्त होसि तू ॥ ३५ ॥

महेश्वर - हे शंकरा - ते - तुझ्या - एतत् - ह्या - परं - पुढे दिसणार्‍या स्वरूपाला - प्रपश्यामः - आम्ही पाहात आहो - परं - ह्यापेक्षा दुसर्‍या कशालाही - न - पाहात नाही - हि - कारण - अव्यक्तकर्मणः - ज्याची कर्मे गूढ आहेत अशा - ते - तुझे - व्यक्तिः - प्रत्यक्ष दिसणारे स्वरूप - लोकस्य - लोकांच्या - मृडनाय - सुखासाठी - अस्ति - आहे. ॥३५॥
आम्ही तर केवळ आपले हे लीलाविहारी रूप पाहात आहोत. आपले परम स्वरूप आम्ही जाणत नाही. हे महेश्वरा, आपल्या लीला जरी अव्यक्त असल्या, तरी संसाराचे कल्याण करणासाठी आपले व्यक्तरूप उपकारक आहे. (३५)


श्रीशुक उवाच -
तद्वीक्ष्य व्यसनं तासां कृपया भृशपीडितः ।
सर्वभूतसुहृद् देव इदमाह सतीं प्रियाम् ॥ ३६ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
परीक्षिता प्रजेचे हे शिवे संकट पाहुनी ।
व्यथीत जाहला चित्ती सतीला बोलला असा ॥ ३६ ॥

सर्वभूतसुहृत् - सर्व प्राण्यांवर प्रेम करणारा - देवः - शंकर - तासां - ब्रह्मादिदेवांच्या - तत् - त्या - व्यसनं - संकटाला - वीक्ष्य - पाहून - कृपया - दयेने - भृशपीडितः - अत्यंत पीडित झालेला - सतीं - साध्वी अशा - प्रियां - प्रिय पार्वतीला - इदं - याप्रमाणे - आह - म्हणाला. ॥३६॥
श्री शुक म्हणतात - परीक्षिता, त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणीमात्रांचे सुहृद भगवान शंकर करुणेने व्याकूळ होऊन आपल्या प्रिय पत्‍नीला म्हणाले - (३६)


श्रीशिव उवाच -
अहो बत भवान्येतत् प्रजानां पश्य वैशसम् ।
क्षीरोदमथनोद्‍भूतात् कालकूटाद् उपस्थितम् ॥ ३७ ॥
श्री शिवजी म्हणाले -
खेदाची गोष्ट की देवी पहा सागर मंथनी
हलाहल निघे वीष झाली दुःखी प्रजा तये ॥ ३७ ॥

अहो भवानि - हे पार्वती - बत - अरेरे - क्षीरोदमथनोद्‌भ्‌तात् - क्षीरसमुद्राचे मंथन केल्यामुळे उत्पन्न झालेल्या - कालकूटात् - कालकूट विषापासून - उपस्थितं - उत्पन्न झालेले - एतत् - हे - प्रजानां - लोकांचे - वैशसं - दुःख - पश्य - पाहा. ॥३७॥
श्रीशिव म्हणाले - देवी, फार वाईट झाले ! पहा ना ! समुद्र-मंथनातून निघालेल्या कालकूट विषामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे ! (३७)


आसां प्राणपरीप्सूनां विधेयं अभयं हि मे ।
एतावान् हि प्रभोरर्थो यद् दीनपरिपालनम् ॥ ३८ ॥
बिचारे इच्छिती प्राणा कर्तव्य मम हेच की
निर्भयी करणे त्यांना शक्ति सामर्थ्य ते मला ।
दीनांची करणे रक्षा त्यात साफल्य जीवना ॥ ३८ ॥

हि - खरोखर - प्राणपरीप्सूनां - प्राणरक्षणाची इच्छा करणार्‍या - आसां - ह्या ब्रह्मादि देवांना - मे - माझ्याकडून - अभयं - अभय - विधेयं - दिले गेले पाहिजे - यत् - कारण - दीनपरिपालनं - दीनांचे रक्षण - एतावान् - हा - प्रभोः - प्रभुशब्दाचा - अर्थः (अस्ति) - अर्थ होय. ॥३८॥
आपल्या प्राणांचे रक्षण करू इच्छिणार्‍या यांचे भय मला दूर केले पाहिजे. ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, त्यांनी दीन-दुःखितांचे रक्षण करावे, यातच त्यांच्या जीवनाची सफलता आहे. (३८)


प्राणैः स्वैः प्राणिनः पान्ति साधवः क्षणभंगुरैः ।
बद्धवैरेषु भूतेषु मोहितेष्वात्ममायया ॥ ३९ ॥
प्राणाचा बळिही देती पररक्षार्थ सज्जन ।
कल्याणी मोहि गुंतोनी प्राण्यांनी वैर बांधिले ॥ ३९ ॥

आत्ममायया मोहितेषु बद्धवैरेषु भूतेषु - आपल्या मायेने मोहून गेल्यामुळे प्राणी परस्परांशी वैर करू लागले असता - साधवः - साधु - क्षणभङ्‌गुरैः स्वैः प्राणैः - क्षणांत नाश पावणार्‍या आपल्या प्राणांनी - प्राणिनः - प्राण्यांचे - पान्ति - रक्षण करितात. ॥३९॥
आपल्या क्षणभंगुर प्राणांनी सज्जन दुसर्‍यांच्या प्राणांचे रक्षण करतात. आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत. (३९)


पुंसः कृपयतो भद्रे सर्वात्मा प्रीयते हरिः ।
प्रीते हरौ भगवति प्रीयेऽहं सचराचरः ।
तस्मात् इदं गरं भुञ्जे प्रजानां स्वस्तिरस्तु मे ॥ ४० ॥
तयांना लाविता प्रेम पावे श्रीकृष्ण तो हरी ।
कृपा ज्यासी तयाची त्यां प्रसन्न मीहि होतसे ॥
तदा मी प्राशिता वीष प्रजा होय सुखी पहा ॥ ४० ॥

भद्रे - हे कल्याणकारिणी पार्वती - कृपयतः - दया करणार्‍या - पुंसः - पुरुषावर - सर्वात्मा - सर्वव्यापी - हरिः - श्रीविष्णु - प्रीयेत - प्रसन्न होतो - भगवति हरौ प्रीते - सर्वैश्वर्यसंपन्न श्रीविष्णु प्रसन्न झाला असता - सचराचरः - स्थावरजंगमात्मक प्राण्यांसह - अहं - मी - प्रीये - प्रसन्न होतो - तस्मात् - त्याकरिता - इदं - हे - गरं - विष - भुञ्जे - भक्षण करितो - मे - माझ्या - प्रजानां - प्रजेचे - स्वस्ति - कल्याण - अस्तु - असो. ॥४०॥
हे कल्याणी, त्यांच्यावर जो कृपा करतो, त्याच्यावर सर्वात्मा श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात, तेव्हा चराचरासह मीसुद्धा प्रसन्न होतो. म्हणूने मी हे विष पिऊन टाकतो. त्यामुळे माझ्या प्रजेचे कल्याण होवो. (४०)


श्रीशुक उवाच -
एवमामंत्र्य भगवान् भवानीं विश्वभावनः ।
तद्विषं जग्धुमारेभे प्रभावज्ञान्वमोदत ॥ ४१ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
सतीला सांगुनी ऐसे शिव तो सिद्ध जाहला ।
प्यावया काळकूटाते सतीने अनुमोदिले ॥ ४१ ॥

विश्वभावनः - जगद्रक्षक - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न शंकर - भवानीं - पार्वतीला - एवं - याप्रमाणे - आमन्त्र्य - सांगून - तत् - ते - विषं - विष - जग्धुं - खाण्यास - आरेभे - आरंभ करिता झाला - प्रभावज्ञा - सामर्थ्य जाणणारी - अन्वमोदत - अनुमोदन देती झाली. ॥४१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - विश्वाचे जीवनदाते असणार्‍या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून ते विष पिण्याची तयारी केली. देवींना त्यांचा प्रभाव माहित असल्यामुखे त्यांनी या गोष्टीला संमती दिली. (४१)


ततः करतलीकृत्य व्यापि हालाहलं विषम् ।
अभक्षयन् महादेवः कृपया भूतभावनः ॥ ४२ ॥
कृपाळू शिव तो मोठा वीष ते ओंजळीत तै ।
घेतले प्राशिले सर्व जीवांचा तोचि रक्षक ॥ ४२ ॥

ततः - नंतर - भूतभावनः - प्राण्यांचे रक्षण करणारा - महादेवः - शंकर - कृपया - दयेने - व्यापि - व्यापणारे - हालाहलं - हालाहलनामक - विषं - विष - करतलीकृत्य - ओंजळीत घेऊन - अभक्षयत् - भक्षण करिता झाला. ॥४२॥
प्राणिमात्रांना जीवन देणार्‍या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेले हालाहल विष आपल्या हातात एकत्र करून पिऊन टाकले. (४२)


तस्यापि दर्शयामास स्ववीर्यं जलकल्मषः ।
यच्चकार गले नीलं तच्च साधोर्विभूषणम् ॥ ४३ ॥
वीष ते मळ पाण्याचा शंकरा व्यापिले तये ।
जाहला कंठ तो निल भूषणो जाहले हरा ॥ ४३ ॥

जलकल्मषः - पाण्याचा दोषच असे ते विष - तस्य अपि - शंकरालासुद्धा - स्ववीर्यं - आपला पराक्रम - दर्शयामास - दाखविते झाले - यत् - जे विष - (तत्) गले - ते कंठाच्या ठिकाणी - नीलं - निळा रंग - चकार - उत्पन्न करिते झाले - तत् च - तेसुद्धा - साधोः - सज्जनांचे - विभूषणं - भूषणच होय. ॥४३॥
पाण्याचा मळ असलेल्या त्याने शंकरांवरसुद्धा आपला प्रभाव दाखविला. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, परंतु प्रजेचे कल्याण करणार्‍या भगवान शंकरांना तो भूषण ठरला. (४३)


तप्यन्ते लोकतापेन साधवः प्रायशो जनाः ।
परमाराधनं तद्धि पुरुषस्याखिलात्मनः ॥ ४४ ॥
परोपकारि ते संत परार्थ दुःख झेलिती ।
परंतु नच ते दुःख पूजा ही हरिची असे ॥ ४४ ॥

साधवः - साधु - जनाः - पुरुष - प्रायशः - बहुतकरून - लोकतापेन - लोकांच्या दुःखाने - तप्यन्ते - पीडित होतात - हि - कारण - तत् - ते - अखिलात्मनः - सर्वांतर्यामी - पुरुषस्य - परमेश्वराचे - परं - श्रेष्ठ - आराधनं - पूजन होय. ॥४४॥
परोपकारी सज्जन, प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वतःच ते दुःख झेलतात. कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंतांची परम आराधना आहे. (४४)


निशम्य कर्म तच्छम्भोः देवदेवस्य मीढुषः ।
प्रजा दाक्षायणी ब्रह्मा वैकुण्ठश्च शशंसिरे ॥ ४५ ॥
देवाधिदेव तो सांब सर्वांचे हित साधितो ।
सती ब्रह्मा प्रजा विष्णू प्रशंसू लागले हरा ॥ ४५ ॥

देवदेवस्य - देवांचाही देव अशा - मीढुषः - सुखदायक - शंभोः - शंकराचे - तत् - ते - कर्म - कृत्य - निशम्य - ऐकून - प्रजाः - प्रजा - दाक्षायणी - पार्वती - ब्रह्मा - ब्रह्मदेव - च - आणि - वैकुण्ठः - विष्णु - शशंसिरे - प्रशंसा करू लागले. ॥४५॥
सर्वांची कामना पूर्ण करणार्‍या देवाधिदेव शंकरांचे हे कृत्य ऐकून प्रजा, दक्षकन्या सती, ब्रह्मदेव आणि विष्णू त्यांची प्रशंसा करू लागले. (४५)


प्रस्कन्नं पिबतः पाणेः यत् किञ्चित् जगृहुः स्म तत् ।
वृश्चिकाहिविषौषध्यो दन्दशूकाश्च येऽपरे ॥ ४६ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
अष्टमस्कन्धे अमृतमथने सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
वीष ते प्राशिता शंभू ठिबके अल्प तेधवा ।
पडता विंचु सर्पादी वीषवल्ली पिल्या तया ॥ ४६ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ सातवा अध्याय हा ॥ ८ ॥ ७ ॥ हरिःॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

पिबतः (शंकरस्य) - पिणार्‍या शंकराच्या - पाणेः - हातातून - यत् - जे - किंचित् - थोडेसे - प्रस्कन्नं - गळून पडले - तत् - ते विष - वृश्चिकाहिविषौषध्यः - विंचू, साप, व विषारी औषधि - च - आणि - ये - जे - अपरे - दुसरे - दंदशूकाः (सन्ति) - दंश करणारे विषारी प्राणी आहेत - जगृहुः स्म - स्वीकरिते झाले. ॥४६॥
ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते, त्यावेळी त्यांचे हातून विषाचे थेंब खाली सांडले. ते विंचू, साप, अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींनी ग्रहण केले. (४६)


स्कंध आठवा - अध्याय सातवा समाप्त

GO TOP