|
श्रीमद् भागवत पुराण भगवदाज्ञया देवानामसुरैः सन्धाय समुद्रमंथनार्थं उद्योगः - देव आणि दैत्य यांचे मिळून समुद्रमंथन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) एवं स्तुतः सुरगणैः भवान् हरिरीश्वरः । तेषां आविरभूद् राजन् सहस्रार्कोदयद्युतिः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्) सुरांनी स्तविता ऐसे भगवान् हरीरीश्वरो । हजारो सूर्यशा तेजे सर्वांमध्येचि ठाकला ॥ १ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - सुरगणैः - देवगणांनी - एवं - याप्रमाणे - स्तुतः - स्तविलेला - सहस्रार्कोदयद्युतिः - हजार सूर्यांच्या उदयाप्रमाणे कांति असलेला - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - हरिः - सर्वांची दुःखे हरण करणारा - ईश्वरः - परमेश्वर - तेषां - त्यांच्यासमोर - आविरभूत् - प्रगट झाला. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, जेव्हा देवांनी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुती केली, तेव्हा ते त्यांच्यामध्ये प्रगट झाले. त्यांचे तेज असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत, असे वाटावे. (१)
तेनैव सहसा सर्वे देवाः प्रतिहतेक्षणाः ।
नापश्यन् खं दिशः क्षौणीं आत्मानं च कुतो विभुम् ॥ २ ॥
दीपले नेत्र सर्वांचे नच तो दिसला कुणा । पृथिवी देह आकाश सर्व तेजात लोपले ॥ २ ॥
तेन - त्या - महसा एव - तेजानेच - प्रतिहतेक्षणाः - ज्यांचे नेत्र दिपून गेले आहेत असे - सर्वे - सर्व - देवाः - देव - खं - आकाशाला - दिशः - दिशांना - क्षोणिं - पृथ्वीला - च - आणि - आत्मानं - स्वतःला - न अपश्यन् - पाहू शकले नाहीत. - विभुं - परमेश्वराला - कुतः (पश्येयुः) - कोठून पाहणार ॥२॥
त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले. ते भगवंतांनाच काय पण आकाश, दिशा, पृथ्वी, किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाहीत. (२)
विरिञ्चो भगवान् दृष्ट्वा सह शर्वेण तां तनुम् ।
स्वच्छां मरकतश्यामां कञ्जगर्भारुणेक्षणाम् ॥ ३ ॥ तप्तहेमावदातेन लसत्कौशेयवाससा । प्रसन्नचारुसर्वांगीं सुमुखीं सुन्दरभ्रुवम् ॥ ४ ॥ महामणिकिरीटेन केयूराभ्यां च भूषिताम् । कर्णाभरणनिर्भात कपोलश्रीमुखाम्बुजाम् ॥ ५ ॥ काञ्चीकलापवलय हारनूपुरशोभिताम् । कौस्तुभाभरणां लक्ष्मीं बिभ्रतीं वनमालिनीम् ॥ ६ ॥ सुदर्शनादिभिः स्वास्त्रैः मूर्तिमद् भिरुपासिताम् । तुष्टाव देवप्रवरः सशर्वः पुरुषं परम् ॥ ७ ॥
भगवान् शंकरो ब्रह्मा यांनी केवळ पाहिला । सौंदर्य दिसले श्रेष्ठ दोघांनी नमिले तया ॥ नीलमण्यापरी देह विमलो श्यामसुंदर । आरक्त नयनो जैसे रक्तकमलवर्ण तो ॥ ३ ॥ पीतवस्त्रास त्या छान दशालालहि शोभल्या । सर्वांगसुंदरो देह रोम रोमात मोद तो ॥ भुवया धनुच्या ऐशा अतीव सुंदरो मुख । महामणी किरीटात हातास बाजुबंद ते ॥ ४ ॥ कपोल शोभले छान कुंडलीतेज फाकता । कर्धनी कमरेला छाती हाती कंकण वाजती ॥ ५ ॥ गळ्यात हार नी पायीं नूपुरे शोभली तशी । श्रीवत्सचिन्ह वक्षास गळा कौस्तुभ, माळही ॥ ६ ॥ सुदर्शनादि अस्त्रे ती मूर्तिमान् सेनिं राहिले । सर्वही देवतांनी त्या साष्टांग नमिले तयां ॥ सर्वांच्या सह त्या ब्रह्मे शंकरे स्तविला हरी ॥ ७ ॥
शर्वेण सह - शंकरासह - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - विरिञ्चः - ब्रह्मदेव - स्वच्छां - स्वच्छ - मरकतश्यामां - पाचूच्या मण्याप्रमाणे हिरव्या वर्णाच्या - कञ्जगर्भारुणेक्षणां - कमळाच्या गाभ्याप्रमाणे जिचे नेत्र आरक्तवर्णाचे आहेत - तप्तहेमावदातेन - तापलेल्या सुवर्णाप्रमाणे पिवळ्या - लसत्कौशेयवाससा (युक्तां) - तेजस्वी रेशमी वस्राने युक्त अशा - प्रसन्नचारुसर्वाङ्गिं - शांत व सुंदर आहेत सर्व अवयव जीचे अशी - सुमुखीं - सुंदर मुखाच्या - सुंदरभ्रुवं - सुंदर भुवयांच्या - महामणिकिरीटेन - महामोल रत्नांच्या मुकुटाने - च - आणि - केयूराभ्यां - दोन पोच्यांनी - भूषितां - शोभिवंत केलेल्या - कर्णाभरणनिर्भातकपोलश्रीमुखाम्बुजां - कानांतील कुंडलामुळे चकाकणार्या गालांनी ज्याच्या मुखकमलाला शोभा आली आहे अशा - तां - त्या - तनुम् - मूर्तीला - दृष्ट्वा - पाहून ॥३-५॥ काञ्चीकलापवलयहारनूपुरशोभिताम् - कमरपटटा, कडी, हार, पैंजणे, ह्यांनी शोभणार्या - कौस्तुभाभरणाम् - कौस्तुभमणि आहे अलंकार जीवर अशा - लक्ष्मीं - लक्ष्मीला - बिभ्रतीं - धारण करणार्या - वनमालिनीम् - ज्याने वनमाला धारण केली आहे अशा - मूर्तिमद्भिः - मूर्तिमंत - सुदर्शनादिभिः - सुदर्शनादिक - स्वास्रैः - स्वतःच्या अस्रांनी - उपासितां - सेविलेल्या - सशर्वः - शंकरासह - देवप्रवरः - ब्रह्मदेव - सर्वामरगणैः साकं - सर्व देवांसह - अवनिं गतैः सर्वाङ्गैः - पृथ्वीवर टेकलेल्या सर्व अवयवांनी लोटांगण घालून - परं पुरुषं - श्रेष्ठ पुरुषाला - तुष्टाव - स्तविता झाला. ॥६-७॥
फक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचे दर्शन घेतले. ते रूप अत्यंत सुंदर होते. पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीत, कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पीतांबर, प्रसन्न व सुंदर सारे अवयव, सुंदर भुवयांनी शोभणारे अतिशय सुंदर मुख, मस्तकावर रत्नजडित किरीट आणि भुजांमध्ये बाजूबंद, कानातील कुंडलांच्या तेजाने चमकणारे गाल असलेले मुखकमळ, कमरेला कमरपट्टा, हातात कडी, गळ्यामध्ये हार आणि पायांमध्ये नूपुर शोभून दिसत होते. वक्षस्थळावर लक्ष्मी आणि गळ्यात कौस्तुभमणी तसेच वनमाला शोभून दिसत होती. स्वतःची सुदर्शन चक्रादी अस्त्रे मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती. सर्व देवतांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला. नंतर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर आणि ब्रह्मदेव परमपुरुष भगवंतांची स्तुती करू लागले. (३-७)
सर्वामरगणैः साकं सर्वांगैरवनिं गतैः ॥ ७५ ।
श्रीब्रह्मोवाच - अजातजन्मस्थितिसंयमाया गुणाय निर्वाणसुखार्णवाय । अणोरणिम्नेऽपरिगण्यधाम्ने महानुभावाय नमो नमस्ते ॥ ८ ॥
ब्रह्मदेव म्हणाले - (इंद्रवज्रा) जन्म स्थिती नी लयि जो न गुंते जो सागरो मोक्षस्वरुप मोद । सूक्ष्माति सूक्ष्मो गगनापरीही महानुभावासि नमो नमो त्या ॥ ८ ॥
अगुणाय - निर्गुण - अजातजन्मस्थितीसंयमाय - जन्म, स्थिती, व संहार ज्याला नाहीत अशा - निर्वाणसुखार्णवाय - मोक्षसुखाचा समुद्र - अणोःअणिम्ने - परमाणूपेक्षाही लहान अशा - अपरिगण्यधाम्ने - ज्याचे तेज मोजता येणार नाही अशा - महानुभावाय - मोठा आहे पराक्रम ज्याचा अशा - ते - तुला - नमोनमः - वारंवार नमस्कार असो. ॥८॥
ब्रह्मदेव म्हणाले - ज्यांचा उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाशी काही संबंध नाही, जे प्राकृत गुणांपासून रहित आणि मोक्षस्वरूप परमानंदाचे महान समुद्र आहेत, जे सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप आनंद आहे, त्या परम ऐश्वर्यशाली प्रभूंना आम्ही वारंवार नमस्कार करीत आहोत. (८)
रूपं तवैतत् पुरुषर्षभेज्यं
श्रेयोऽर्थिभिर्वैदिकतांत्रिकेण । योगेन धातः सह नस्त्रिलोकान् पश्याम्यमुष्मिन् नु ह विश्वमूर्तौ ॥ ९ ॥
भद्रार्थ विप्रो पुरुषोत्तमारे वेदोक्त गाती रुप पंचरात्री । तुझ्यात सारे दिसतेचि विश्व माझाहि तू तो जनिताच होय ॥ ९ ॥
पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठा - धातः - हे जगत्पालका ईश्वरा - तव - तुझे - एतत् - हे - रूपं - स्वरूप - श्रेयोर्थिभिः - कल्याणाची इच्छा करणार्यांनी - वैदिकतान्त्रिकेण - वैदिक व तांत्रिक अशा - योगेन - उपासना पद्धतीने - सदा - नेहमी - ईज्यं (अस्ति) - पूजनीय आहे - उह - खरोखर - अमुष्मिन् विश्वमूर्तौ - ह्या विश्वरूपी तुझ्या शरीरात - त्रिलोकान् - त्रैलोक्याला - च नः - आणि आम्हाला - सह - एकत्र - पश्यामि - मी पाहतो. ॥९॥
हे पुरुषोत्तमा, आपले कल्याण इच्छिणारे साधक वेदांनी सांगितलेल्या तसेच पांचरात्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या या स्वरूपाची उपासना करतात. हे निर्मात्या, आपल्या या विश्वमय स्वरूपामध्ये मला देवांसह तिन्ही लोक दिसत आहेत. (९)
त्वय्यग्र आसीत् त्वयि मध्य आसीत्
त्वय्यन्त आसीत् इदमात्मतंत्रे । त्वं आदिरन्तो जगतोऽस्य मध्यं घटस्य मृत्स्नेव परः परस्मात् ॥ १० ॥
तुझ्यात हे विश्व सुलीन होते मधे नि अंती तुजआत राही । तू कारणी कार्य ययीं स्वतंत्र घटात माती जसि आदि अंती ॥ १० ॥
इदं - हे जग - अग्रे - प्रथम - आत्मतन्त्रे - स्वतंत्र अशा - त्वयि - तुझ्या ठिकाणी - आसीत् - होते - मध्ये - मध्ये - त्वयि - तुझ्या मध्ये - आसीत् - होते - अन्ते - शेवटी - त्वयि - तुझ्या ठिकाणी - आसीत् - होते - मृत्स्रा - माती - घटस्य इव - जसा घटाचा आदि, मध्य व अंत असतो त्याप्रमाणे - परस्मात् - प्रकृतीहूनही - परः त्वं - श्रेष्ठ असा तू परमेश्वर - अस्य - ह्या - जगतः - जगाचा - आदिः - आदि - मध्यम् - मध्य - अंतः - अंत. ॥१०॥
हे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते, मध्यकालातही हे आपल्यामध्येच स्थित आहे आणि शेवटीसुद्धा हे पुन्हा आपल्यातच लीन होऊन जाईल. आपण मात्र कार्य-कारणापलीकडील असून पूर्ण स्वतंत्र आहात. आपणच या जगाचे आदी, अंत आणि मध्य आहात. जसे घड्यामध्ये सुरुवातीला मध्ये आणि शेवटी मातीच असते त्याप्रमाणे. (१०)
त्वं माययात्माश्रयया स्वयेदं
निर्माय विश्वं तदनुप्रविष्टः । पश्यन्ति युक्ता मनसा मनीषिणो गुणव्यवायेऽप्यगुणं विपश्चितः ॥ ११ ॥
मायेकडोनी रचितोस विश्व नी सूप्त त्यांच्या मधि तू विराजे । विवेकि ज्ञानी अति सावधाने निर्गूणरूपा अनुभावतात ॥ ११ ॥
त्वं - तू - आत्माश्रयया - आत्म्याचा आश्रय करून राहिलेल्या - स्वया - स्वतःच्या - मायया - मायेने - इदं विश्वं - ह्या जगाला - निर्माय - उत्पन्न करून - तत् अनुप्रविष्टः (असि) - त्यात शिरला आहेस - युक्ताः - योगमुक्त - मनीषिणः - बुद्धिमान - विपश्चितः - ज्ञानी पुरुष - गुणव्यवाये - गुणांच्या परिणामात - अपि - सुद्धा - अगुणं - निर्गुण असे - मनसा - मनाने - पश्यन्ति - पाहतात. ॥११॥
आपल्या आश्रयाने राहणार्या आपल्या मायेने, आपण हे विश्व निर्माण करून त्यामध्ये पुन्हा प्रवेश करता. म्हणून विवेकी आणि शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत सावधानपणे आपले मन एकाग्र करून या गुणांच्या, विषयांच्या गर्दीमध्येसुद्धा आपल्या निर्गुण स्वरूपाचाच साक्षात्कार करून घेतात. (११)
यथाग्निमेधस्यमृतं च गोषु
भुव्यन्नमम्बूद्यमने च वृत्तिम् । योगैर्मनुष्या अधियन्ति हि त्वां गुणेषु बुद्ध्या कवयो वदन्ति ॥ १२ ॥
गायी कडोनी दुध अग्नि काष्ठी जलान्न भूमीत नि द्रव्य कष्टे । जै सर्व वस्तु मिळतात युक्त्ये विवेकि बुद्धी तसि योजितात । त्या भक्ती ज्ञाने तुज जाणितात नी जाणिवे वर्णिति गूण सारे ॥ १२ ॥
मनुष्याः - मनुष्य - यथा - ज्याप्रमाणे - एधसि - काष्ठामध्ये - अग्निं - अग्नीला - च - आणि - गोषु - गाईच्या ठिकाणी - अमृतं - दुग्धाला - भुवि - पृथ्वीच्या ठिकाणी - अन्नं - अन्नाला - च - आणि - अम्बु - पाण्याला - उद्यमने - उद्योगामध्ये - वृत्तिं - उपजीविकेला - योगैः - अनुरूप अशा कर्मांनी - हि - खरोखर - अधियन्ति - मिळवितात - कवयः - ज्ञानी पुरुष - बुद्ध्या - बुद्धीने - गुणेषु - गुणांच्या ठिकाणी - त्वां - तुला - वदन्ति - वर्णितात. ॥१२॥
जसे मनुष्य लाकडापासून अग्नी, गाईपासून दूध, पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात, त्याचप्रमाणे विवेकी पुरुषसुद्धा आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तियोग, ज्ञानयोग इत्यादींनी आपल्याला या विषयांमध्येच प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णनसुद्धा करतात. (१२)
तं त्वां वयं नाथ समुज्जिहानं
सरोजनाभातिचिरेप्सितार्थम् । दृष्ट्वा गता निर्वृतमद्य सर्वे गजा दवार्ता इव गाङ्गमम्भः ॥ १३ ॥
हे पद्म्नाभा वनव्यात हत्ती जै भाजता हो सुखि आम्हि तैसे । या दर्शनाने सुखि आम्हि तैसे आसूसलो कैक दिनात ज्याते ॥ १३ ॥
नाथ - हे स्वामी - सरोजनाभ - हे पद्मनाभ परमेश्वरा - सर्वे - सर्व - वयं - आम्ही - अद्य - आज - अतिचिरेप्सितार्थं - फार दिवसांपासून इच्छिलेल्या अशा - तं - त्या - समुज्जिहानं - उत्तम रीतीने प्रगट होणार्या - त्वां - तुला - दृष्ट्वा - पाहून - दवार्ताः - वणव्याने पीडिलेले - गजाः - गज - गाङगम् अम्भः इव - गंगोदकाला पाहून जसे तसे - निर्वृतिं - सुखाला - गताः - प्राप्त झाले. ॥१३॥
हे कमलनाभा, ज्याप्रमाणे वणव्याने व्याकूळ झालेले हत्ती गंगाजलात बुडी मारून सुखशांतीचा अनुभव घेतात, त्याचप्रमाणे आपल्या प्रगट होण्याने पुष्कळ काळापासून आपल्या दर्शनासाठी उत्सुक असलेले आम्ही अत्यंत आनंदित झालो आहोत. (१३)
स त्वं विधत्स्वाखिललोकपाला
वयं यदर्थास्तव पादमूलम् । समागतास्ते बहिरन्तरात्मन् किं वान्यविज्ञाप्यमशेषसाक्षिणः ॥ १४ ॥
बाहेर तू तै अन आत आत्मा धरूनि हेतू तव पायि आलो । तू साक्षि तेंव्हा तुज काय बोलो कृपा करोनी करि पूर्ण हेतू ॥ १४ ॥
अंतरात्मन् - आमच्या अंतर्यामी राहणार्या हे ईश्वरा - सः - तो - त्वं - तू - वयं अखिललोकपालाः - आम्ही सर्व लोकपाल असे - यदर्थाः - ज्या इच्छेने - तव पादमूलं - तुझ्या चरणाजवळ - समागताः - प्राप्त झालो - तं अर्थं विधत्स्व - ती आमची इच्छा पूर्ण कर - अशेषसाक्षिणः ते - सर्वत्र साक्षीरूपाने राहणार्या तुला - बहिः - बाहेर - अन्यविज्ञाप्यं - दुसर्यांना सांगण्याजोगे - किं वा (अस्ति) - काय आहे बरे. ॥१४॥
आपणच आमचे बाहेरचे आणि आतील आत्मा आहात. आम्ही सर्व लोकपाल ज्या उद्देशाने आपल्या चरणांना शरण आलो आहोत, तो उद्देश आपण पूर्ण करावा. आपण सर्वांचे साक्षी आहात, तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार ? (१४)
अहं गिरित्रश्च सुरादयो ये
दक्षादयोऽग्नेरिव केतवस्ते । किं वा विदामेश पृथग्विभाता विधत्स्व शं नो द्विजदेवमंत्रम् ॥ १५ ॥
मी शंकरो अन्यहि देवता नी प्रजापती नी ऋषि सर्वदेव । अग्नीचिया त्या ठिणग्या विभक्त तैसे तुझे अंशस्वरुप आम्ही । कल्याण व्हाया द्विज देवतांचे आदेश द्यावा अन ते घडावे ॥ १५ ॥
ईश - हे परमेश्वरा - अहं - मी - गिरित्रः - शंकर - च - आणि - सुरादयः - देवादिक - ये - जे - दक्षादयः - दक्ष आदिकरून - अग्नेः - अग्नीच्या - केतवः इव - ठिणग्याप्रमाणे - पूथक् - वेगवेगळे - विभाताः - चमकत आहो - ते - ते - शं - कल्याण - किं वा - कसे बरे - विदाम - जाणू - नः - आमच्या - द्विजदेवमन्त्रं - ब्राह्मण व देव ह्या विषयींचे कार्य - विधत्स्व - कर.॥१५॥
प्रभो ! मी, शंकर, अन्य देवता, ऋषी, दक्ष प्रजापती इत्यादी सगळे अग्नीपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत. तर मग आमचे कल्याण आम्हांला कोठून कळणार ? म्हणून ब्राह्मण, देव इत्यादींनी काय करावे, त्याची आज्ञा आपणच करावी. (१५)
श्रीशुक उवाच -
एवं विरिञ्चादिभिरीडितस्तद् विज्ञाय तेषां हृदयं तथैव । जगाद जीमूतगभीरया गिरा बद्धाञ्जलीन् संवृतसर्वकारकान् ॥ १६ ॥
श्री शुकदेवजी सांगतात- ब्रह्मादि देवे स्तवुनी असे तै जिंकोनि चित्ता उठले हळूच । जोडोनि हाता मग स्तब्ध झाले गंभीर शब्दे हरी बोलला त्यां ॥ १६ ॥
विरिञ्चादिभिः - ब्रह्मादिदेवांनी - एवं - याप्रमाणे - ईडितः - स्तविलेला - तेषां - त्यांचे - तत् - ते - हृदयं - अंतःकरण - तथा एव - त्याचप्रमाणे - विज्ञाय - जाणून - बद्धाञ्जलीन् - हात जोडलेल्या - संवृतसर्वकारकान् - सर्व इंद्रियांचा निग्रह केलेल्या - जीमूतगभीरया - मेघगर्जनेप्रमाणे गंभीर अशा - गिरा - वाणीने - जगाद - म्हणाला. ॥१६॥
श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे ब्रह्मदेवादी देवतांनी इंद्रियनिग्रहपूर्वक हात जोडून स्तुती केली. त्यांचे मनोगत जाणून भगवान मेघगंभीर वाणीने त्यांना म्हणाले. (१६)
(अनुष्टुप्)
एक एवेश्वरस्तस्मिन् सुरकार्ये सुरेश्वरः । विहर्तुकामस्तानाह समुद्रोन्मथनादिभिः ॥ १७ ॥
(अनुष्टुप्) सर्वांचा स्वामि तो राजा ! एकटा तो समर्थची । परी समुद्र मंथाया बोलला देवतांसि तो ॥ १७ ॥
तस्मिन् सुरकार्ये - त्या देवांच्या कार्याविषयी - एकः एव ईश्वरः - एकटाच समर्थ असा - सुरेश्वरः - परमेश्वर - समुद्रोन्मथनादिभिः - समुद्रमंथनादि कर्मांनी - विहर्तुकामः - क्रीडा करण्याची इच्छा करणारा असा - तान् - त्या ब्रह्मादि देवांना - आह - म्हणाला. ॥१७॥
सर्व देवतांचे स्वामी भगवान एकटेच त्यांचे ते कार्य करण्यास समर्थ होते, तरीसुद्धा समुद्रमंथनादी लीला करण्याच्या इच्छेने ते त्यांना म्हणाले - (१७)
श्रीभगवानुवाच -
हन्त ब्रह्मन् अहो शम्भो हे देवा मम भाषितम् । श्रृणुतावहिताः सर्वे श्रेयो वः स्याद् यथा सुराः ॥ १८ ॥
श्री भगवान म्हणाले- ब्रह्मा शंकर नी सारे ऐका सावध होउनी । ऐकता होय ते सर्व कल्याणमयची तसे ॥ १८ ॥
हंत ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा - अहो शंभो - हे शंकरा - हे देवाः - हे देवहो - सर्वे - सर्व - सुराः - देव - अवहिताः - एकाग्रचित्ताने - यथा - ज्यायोगे - वः - तुमचे - श्रेयः - कल्याण - स्यात् - होईल - मम भाषितं - माझे भाषण - शृणुत - ऐका. ॥१८॥
श्री भगवान म्हणाले - ब्रह्मदेव, शंकर आणि देवांनो, तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय ऐका. (१८)
यात दानवदैतेयैः तावत् सन्धिर्विधीयताम् ।
कालेनानुगृहीतैस्तैः यावद् वो भव आत्मनः ॥ १९ ॥
असुरांवरती आता आहे काळकृपा पहा । तुमचा काल येईतो तयांशी संधि साधणे ॥ १९ ॥
यात - जा - यावत् - जेव्हा - वः - तुमचा - आत्मनः - स्वतःचा - भवः (आगच्छति) - उर्जित काळ येईल - तावत् - तोपर्यंत - कालेन - काळाने - अनुगृहीतैः तैः - अनुग्रह केलेल्या त्या - दानवदैतेयैः - दानव व दैत्य यांच्याशी - संधिः - संधि - विधीयतां - करा. ॥१९॥
यावेळी असुरांवर काळाची कृपा आहे. म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवांकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा. (१९)
अरयोऽपि हि सन्धेयाः सति कार्यार्थगौरवे ।
अहिमूषिकवद् देवा ह्यर्थस्य पदवीं गतैः ॥ २० ॥
कार्य साधावया थोर शत्रुशी संधि साधणे । कार्य होता पुन्हा सर्प उंदिरा परि राहणे ॥ २० ॥
देवाः - देव हो - कार्यार्थगौरवे सति - साधावयाचे कार्य मोठे असता - अर्थस्य पदवीं गतैः - कार्याच्या उद्योगाला लागलेल्यांकडून - अहिमूषकवत् - साप जसा उंदराशी त्याप्रमाणे - अरयः अपि - शत्रूसुद्धा - हि - खरोखर - संधेयाः - संधि करण्यास योग्य आहेत. ॥२०॥
देवांनो, एखादे मोठे कार्य चालवायचे असेल, तर शत्रुंशी सुद्धा सख्य केले पाहिजे. परंतु काम झाल्यानंतर मात्र त्यांच्याबरोबर साप आणि उंदीर यांच्या गोष्टीप्रमाणे वर्तन करावे. (२०)
अमृतोत्पादने यत्नः क्रियतां अविलम्बितम् ।
यस्य पीतस्य वै जन्तुः मृत्युग्रस्तोऽमरो भवेत् ॥ २१ ॥
विलंब न करा कांही अमृत शोधणे त्वरे । पिताच मरणारेही अमरो होत सर्वथा ॥ २१ ॥
अविलम्बितं - लवकर - अमृतोत्पादने - अमृत उत्पन्न करण्याविषयी - यत्नः क्रियतां - प्रयत्न करा. - यस्य पीतस्य - जे अमृत प्राशन केले असता - मृत्यूग्रस्तः जंतुः - मृत्यूने गिळलेला प्राणी - वै - खरोखर - अमरः - अमर - भवेत् - होईल. ॥२१॥
वेळ न लावता तुम्ही अमृत काढण्याचा प्रयत्न करा. ते प्याल्यामुळे मरणारा प्राणीसुद्धा अमर होते. (२१)
क्षिप्त्वा क्षीरोदधौ सर्वा वीरुत्तृणलतौषधीः ।
मन्थानं मन्दरं कृत्वा नेत्रं कृत्वा तु वासुकिम् ॥ २२ ॥ सहायेन मया देवा निर्मन्थध्वमतन्द्रिताः । क्लेशभाजो भविष्यन्ति दैत्या यूयं फलग्रहाः ॥ २३ ॥
तृण काड्या नि त्या वेली टाकाव्या क्षीरसागरी । मंदराचल तो न्यावा वासुकीसर्प दोर तो ॥ माझे सहाय्य घेवोनीं समुद्र मंथनो करा ॥ २२ ॥ न वेळ आळसाची ही प्रमाद नच तो घडो । विश्वास ठेवणे शब्दी श्रम ते दानवास नी ॥ तुम्हास फळ ते सर्व अनायासे मिळेल की ॥ २३ ॥
देवाः - देव हो - क्षीरोदधौ - क्षीरसमुद्रात - सर्वाः वीरुत्तृणलतौषधीः - सर्व वेली, गवत, लता व औषधी ह्यांना - क्षिप्त्वा - टाकून - मंदरं - मंदरपर्वताला - मंथानं - रवी - कृत्वा - करून - वासुकिं तु - वासुकि सर्पाला तर - नेत्रं - दोरी - कृत्वा - करून - सहायेन मया - साहाय्य करणार्या माझ्यासह - अतन्द्रिताः - आळस सोडून - (सागरं) निर्मंथध्वं - समुद्र घुसळा - दैत्याः - दैत्य - क्लेशभाजः - क्लेश भोगणारे - भविष्यन्ति - होतील - यूयं - तुम्ही - फलग्रहाः - फळ घेणारे. ॥२२-२३॥
क्षीरसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत, वेली, औषधी वनस्पती टाका. नंतर तुम्ही मंदराचलाची रवी आणि वासुकी नागाची दोरी करून आळस टाकून माझ्या साहाय्याने समुद्राचे मंथन करा. या कामात दैत्यांना श्रम, आणि फळ मात्र तुम्हांला मिळेल. (२२-२३)
यूयं तदनुमोदध्वं यदिच्छन्ति असुराः सुराः ।
न संरम्भेण सिध्यन्ति सर्वार्थाः सान्त्वया यथा ॥ २४ ॥
तुमच्या कडुनी जे जे असुर मागतील ते । सर्वची करणे मान्य शांतीने कार्य साधते ॥ २४ ॥
सुराः - देव हो - यत् - जे - असुराः - दैत्य - इच्छन्ति - इच्छितील - तत् यूयं अनुमोदध्वं - त्याला तुम्ही संमति द्या - यथा - ज्याप्रमाणे - सर्वे - सर्व - अर्थाः - इष्ट मनोरथ - सांत्वया - गोडीगुलाबीने - सिध्द्यन्ति - सिद्धीस जातात - संरंभेण - द्वेषाने - न (सिध्द्यन्ति) - सिद्धीस जात नाहीत. ॥२४॥
देवांनो, तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करा. सामोपचाराने जशी सर्व कामे होतात, तशी क्रोधाने होत नाहीत. (२४)
न भेतव्यं कालकूटाद् विषात् जलधिसम्भवात् ।
लोभः कार्यो न वो जातु रोषः कामस्तु वस्तुषु ॥ २५ ॥
निघेल विष ते आधी काळकूट भयंकर । न भ्यावे त्याजला तैसे अन्य लोभ नको मनीं ॥ नको इच्छाच वस्तूची न क्रोधा न मिळे तदा ॥ २५ ॥
जलधिसंभवात् - समुद्रापासून उत्पन्न होणार्या - कालकुटात् विषात् - कालकूट विषाला - न भेतव्यं - भिऊ नका - वः - तुमच्याकडून - जातु - कधीही - वस्तुषु - पदार्थाच्या ठिकाणी - लोभः - लोभ - रोषः - क्रोध - तु - त्याचप्रमाणे - कामः - इच्छा - न कार्यः - केली जाऊ नये. ॥२५॥
समुद्रातून आलेल्या काळकूट विषाला घाबरू नका. कोणत्याही वस्तूला लोभ धरू नका. इच्छाही धरू नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून चिडू नका. (२५)
श्रीशुक उवाच -
इति देवान् समादिश्य भगवान् पुरुषोत्तमः । तेषामन्तर्दधे राजन् स्वच्छन्दगतिरीश्वरः ॥ २६ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - सांगोनी गुप्त ते झाले भगवान् पुरुषोत्तम । स्वतंत्र शक्तिमान् त्याचे रहस्य कोण जाणती ? ॥ २६ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - स्वच्छन्दगतिः - स्वेच्छेने गमन करणारा - ईश्वरः - ऐश्वर्यसंपन्न - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - पुरुषोत्तमः - महाविष्णु - इति - याप्रमाणे - देवान् - देवांना - समादिश्य - सांगून - तेषां - त्यांच्या समक्ष - अन्तर्दधे - गुप्त झाला. ॥२६॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, देवांना असा आदेश देऊन सर्वशक्तिमान स्वेच्छाविहारी भगवान पुरुषोत्तम त्यांच्यापुढेच अंतर्धान पावले. (२६)
अथ तस्मै भगवते नमस्कृत्य पितामहः ।
भवश्च जग्मतुः स्वं स्वं धामोपेयुर्बलिं सुराः ॥ २७ ॥
जाताचि शिव ब्रह्माने नमिले त्याजला पुन्हा । दोघे स्वधामा गेले नी इंद्रादी बळिच्या कडे ॥ २७ ॥
अथ - नंतर - पितामहः - ब्रह्मदेव - च - आणि - भवः - शंकर - तस्मै भगवते - त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा परमेश्वराला - नमस्कृत्य - नमस्कार करून - स्वं स्वं धाम - आपापल्या स्थानाला - जग्मतुः - गेले - सुराः - देव - बलिं - बलिराजाकडे - उपेयुः - गेले.॥२७॥
नंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतास नमस्कार करून आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर इंद्रादि देव बलिराजाकडे गेले. (२७)
दृष्ट्वा अरीनप्यसंयत्तान् जातक्षोभान् स्वनायकान् ।
न्यषेधद् दैत्यराट् श्लोक्यः सन्धिविग्रहकालवित् ॥ २८ ॥
शस्त्रास्त्राविणची गेले बघता दैत्य कोपले । इच्छिले बांधण्या त्यांना बळीने रोधिले तदा ॥ कीर्तिमान् बळि तो राजा संधी आदीस जाणता ॥ २८ ॥
संधिविग्रहकालवित् - संधि व युद्ध यांचा योग्य काळ जाणणारा - श्लोक्यः - स्तुत्य - दैत्यराट् - दैत्यांचा राजा बलि - असंयत्तान् अपि - युद्धाकरिता उद्युक्त नसलेल्या सुद्धा - अरीन् - शत्रूंना - दृष्ट्वा - पाहून - जातक्षोभान् - खवळून गेलेल्या - स्वनायकान् - आपल्या सेनापतींना - न्यषेधत् - निषेधिता झाला.॥२८॥
शस्त्रास्त्रे न घेता देव आपल्याकडे येत असल्याचे पाहून दैत्यसेनापती खवळले. परंतु समेट आणि विरोधाची योग्य वेळ जाणणार्या पुण्यश्लोक बळीने दैत्यांना थांबविले. (२८)
ते वैरोचनिमासीनं गुप्तं चासुरयूथपैः ।
श्रिया परमया जुष्टं जिताशेषमुपागमन् ॥ २९ ॥
त्रिलोक जिंकुनी सर्व संपत्ती मिळवोनिया । राजसिंहासनी राजा बसला बळि निर्भय ॥ २९ ॥
ते - ते देव - असुरयूथपैः - दैत्यसंघांच्या नायकांनी - गुप्तं - रक्षिलेल्या - च - आणि - परमया - सर्वोत्कृष्ट अशा - श्रिया - राज्यलक्ष्मीने - जुष्टं - सेविलेल्या - जिताशेषं - संपूर्ण त्रैलोक्य ज्याने जिंकले आहे अशा - आसीनं - सिंहासनावर बसलेल्या - वैरोचनिं - विरोचनाचा पुत्र अशा बलिराजाजवळ - उपागमन् - आले. ॥२९॥
बळीने तिन्ही लोक जिंकले होते. सर्व संपत्तींनी युक्त आणि असुर सेनापतींनी सुरक्षित असा तो आपल्या सिंहासनावर बसला होता. तेथे देव गेले. (२९)
महेन्द्रः श्लक्ष्णया वाचा सान्त्वयित्वा महामतिः ।
अभ्यभाषत तत्सर्वं शिक्षितं पुरुषोत्तमात् ॥ ३० ॥
बुद्धिमंत असा इंद्र गोड शब्दात बोलला । हरिने बोधिले तैशी साधिली संधि तेधवा ॥ ३० ॥
महामतिः - मोठा बुद्धिवान - महेंद्रः - इंद्र - श्लक्ष्णया - मधुर अशा - वाचा - शब्दांनी - सांत्वयित्वा - शांत करून - पुरुषोत्तमात् शिक्षितं तत् सर्वं - परमेश्वरापासून शिकलेले ते सर्व - अभ्यभाषत - सांगता झाला. ॥३०॥
बुद्धिमान इंद्राने, स्वतः भगवंतांनी त्याला जे शिकविले होते, ते सर्व मधुर शब्दांत सामोपचाराने बळीला सांगितले. (३०)
तदरोचत दैत्यस्य तत्रान्ये येऽसुराधिपाः ।
शम्बरोऽरिष्टनेमिश्च ये च त्रिपुरवासिनः ॥ ३१ ॥
बळीला रुचले सर्व शंबरारिष्ट नेमि नी । त्रिपूरनिवसी दैत्या रुचली गोष्ट ही तशी ॥ ३१ ॥
तत् - ते इंद्राचे भाषण - दैत्यस्य - बलिराजाला - अरोचत - आवडले - तत्र - तेथे - अन्ये - दुसरे - ये - जे - असुराधिपाः - दैत्यपति - च - आणि - शंबरः - शंबर - अरिष्टनेमिः - अरिष्टनेमि - च - आणि - ये - जे - त्रिपुरवासिनः (आसन्) - तीन नगरांत राहणारे होते॥३१॥
ही गोष्ट दैत्यराज बळीला मान्य झाली. तेथे बसलेल्या शंबर, अरिष्टनेमी आणि त्रिपुरनिवासी असुर राजांनासुद्धा आवडली. (३१)
ततो देवासुराः कृत्वा संविदं कृतसौहृदाः ।
उद्यमं परमं चक्रुः अमृतार्थे परंतप ॥ ३२ ॥
समजावुनि ती संधी मित्रता साधिली अशी । मेळिण्या अमृता सर्व मंथोनोद्योगि लागले ॥ ३२ ॥
परंतप - हे शत्रुतापना - ततः - नंतर - कृतसौहृदाः - मैत्री केलेले - देवासुराः - देव व दैत्य - संविदं - संकेत - कृत्वा - करून - अमृतार्थे - अमृतप्राप्तीकरिता - परमं उद्यमैमं - मोठा उद्योग - चक्रुः - करते झाले. ॥३२॥
तेव्हा देव आणि असुरांनी आपापसात समझोता करून मैत्री केली. आणि परीक्षिता, ते सर्व मिळून अमृतमंथनासाठी मोठ्या तयारीला लागले. (३२)
ततस्ते मन्दरगिरिं ओजसोत्पाट्य दुर्मदाः ।
नदन्त उदधिं निन्युः शक्ताः परिघबाहवः ॥ ३३ ॥
मंदराचल सर्वांनी कोरिला सर्व बाजुनी । जय् घोषे उचलोनीया निघाले सागराकडे ॥ शक्तिचा गर्व तो होता बलदंड शरीर ही ॥ ३३ ॥
ततः - नंतर - शक्ताः - समर्थ - परिघबाहृवः - अडसरांसारखे दंड असणारे - दुर्मदाः - मदाने धुंद झालेले - ते - ते देव व दैत्य - ओजसा - शक्तीने - मन्दरगिरिं - मंदर पर्वताला - उत्पाटय - उपटून - नन्दतः - गर्जना करणारे - उदधिं - समुद्राकडे - निन्युः - नेऊ लागले. ॥३३॥
त्यानंतर त्यांनी आपली ताकद लावून मंदराचल उखडला आणि आरडाओरडा करीत त्याला समुद्रतटाकडे घेऊन गेले. त्यांचे बाहू परिघाप्रमाणे होते. शरीरात शक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता. (३३)
दूरभारोद्वहश्रान्ताः शक्रवैरोचनादयः ।
अपारयन्तस्तं वोढुं विवशा विजहुः पथि ॥ ३४ ॥
मोठा पर्वत तो होता खूप अंतर ही तसे । बळी इंद्र तसे सर्व अर्ध्यात थकले पहा ॥ रस्त्यात टाकिला त्यांनी विवश होउनी गिरी ॥ ३४ ॥
दूरभारोद्वहश्रान्ताः - दूरपर्यंत ओझे नेल्यामुळे दमलेले - शक्रवैरोचनादयः - इंद्र, बलि, इत्यादि - तं - त्या मंदरपर्वताला - वोढुं - वाहून नेण्यास - अपारयन्तः - असमर्थ असे होत्साते - विवशाः - निरुपाय झाल्यामुळे - पथि - वाटेतच - विजहुः - टाकिते झाले. ॥३४॥
परंतु तो मंदार पर्वत एक तर अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जावयाचा होता. त्यामुळे इंद्र बळी वगैरे सारे थकले. ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. तेव्हा नाईलाजाने त्यांनी तो रस्त्यातच टाकला. (३४)
निपतन्स गिरिस्तत्र बहून् अमरदानवान् ।
चूर्णयामास महता भारेण कनकाचलः ॥ ३५ ॥
सोन्याचा गिरि तो मोठा पर्वतो मंदराचलु । कितेक देवता दैत्य तया खालीच चेपले ॥ ३५ ॥
तत्र - तेथे - निपतन् - पडणारा - सः कनकाचलः गिरिः - तो सोन्याचा मंदरपर्वत - महता भारेण - मोठया भारामुळे - बहून् - पुष्कळ - अमरदानवान् - देव व दानव यांना - चूर्णयामास - चुरडता झाला. ॥३५॥
तो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता. जमिनीवर पडतेवेळी त्याने पुषळशा देव आणि दानवांचा चक्काचूर केला. (३५)
तांस्तथा भग्नमनसो भग्नबाहूरुकन्धरान् ।
विज्ञाय भगवान् तत्र बभूव गरुडध्वजः ॥ ३६ ॥
हात कंबर नी खांदे तुटले मन ही तसे । उत्साह संपता सर्व गरुडी हरि पातला ॥ ३६ ॥
गरुडध्वजः - गरुडवाहन - भगवान् - परमेश्वर - तान् - त्या देवदैत्यांना - तथा - तशा रीतीने - भग्नमनसः - निराश झालेले - भग्नःबाहूकन्धरान् - मांडया, बाहू, व माना मोडून गेल्या आहेत ज्यांच्या असे झालेले - विज्ञाय - जाणून - तत्र - तेथे - बभूव - प्रगट झाला. ॥३६॥
त्या देव आणि असुरांचे हात, पाय आणि खांदे तुटून गेलेच, मनसुद्धा निराश झाले. त्यांचा उत्साह भंग पावल्याचे पाहून गरुडावर बसलेले भगवंत तेथे प्रगट झाले. (३६)
गिरिपातविनिष्पिष्टान् विलोक्यामरदानवान् ।
ईक्षया जीवयामास निर्जरान् निर्व्रणान्यथा ॥ ३७ ॥
पाहिले पर्वताखाली देव दैत्य चुरा असे । कृपेने पाहता त्यांना पहिल्यापरि जाहले ॥ ३७ ॥
गिरिपातविनिष्पिष्टान् - अंगावर पर्वत पडल्यामुळे चुरून गेलेल्या - अमरदानवान् - देव व दानव ह्यांना - विलोक्य - पाहून - यथा - जशा रीतीने - निर्जरान् - देव - निर्व्रणान् - व्रणरहित होतील - ईक्षया - अवलोकनाने - जीवयामास - जिवंत करिता झाला. ॥३७॥
पर्वत अंगावर पडल्याने देव आणि असुर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे व्रण आणि पीडा दूर केली. (३७)
गिरिं चारोप्य गरुडे हस्तेनैकेन लीलया ।
आरुह्य प्रययावब्धिं सुरासुरगणैर्वृतः ॥ ३८ ॥
घेतला एक हातेची गिरि तो खेळणी परी । गरूडी ठेविला आणि स्वयेही बैसले वरी ॥ असूर देवता यांच्या सवे सागरि पातले ॥ ३८ ॥
लीलया - सहजरीतीने - एकेन - एका - हस्तेन - हाताने - गिरिं - मन्दरपर्वताला - गरुडे - गरुडावर - आरोप्य - ठेवून - च - आणि - आरुह्य - स्वतः चढून - सुरासुरगणैः - देव व दैत्य ह्यांच्या समुदायांनी - वृत्तः - वेष्टिलेला - अब्धिं - क्षीरसमुद्राकडे - प्रययौ - जाउ लागलाच ॥३८॥
नंतर त्यांना पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि असुरांच्यासह ते समुद्राकडे निघाले. (३८)
अवरोप्य गिरिं स्कन्धात् सुपर्णः पततां वरः ।
ययौ जलान्त उत्सृज्य हरिणा स विसर्जितः ॥ ३९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे मंदराचल आनयनं नाम् षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
पक्षिराज गरूडाने तटी तो गिरि ठेविला । निरोप हरिने देता गरूड निघला पुढे ॥ ३९ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ सहावा अध्याय हा ॥ ८ ॥ ६ ॥ हरिःॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
पततां वरः - पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ असा - सः सुपर्णः - तो गरुड - स्कंधात् - खांदयावरून - गिरिं - मंदरपर्वताला - अवरोप्य - खाली उतरवून - जलान्ते - पाण्याजवळ - उत्सृज्य - ठेवून - हरिणा विसर्जितः - श्रीविष्णूने जाण्याची आज्ञा दिलेला - ययौ - निघून गेला. ॥३९॥
पक्षिराज गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावर उतरविला. नंतर भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर गरुड तेथून निघून गेला. (३९)
स्कंध आठवा - अध्याय सहावा समाप्त |