|
श्रीमद् भागवत पुराण स्वायंभुवादि मन्वन्तरचतुष्टयवर्णनं यज्ञावतारचरितं च - मन्वंतरांचे वर्णन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीराजोवाच -
(अनुष्टुप्) स्वायम्भुवस्य इह गुरो वंशोऽयं विस्तरात् श्रुतः । यत्र विश्वसृजां सर्गो मनून् अन्यान् वदस्व नः ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारले - (अनुष्टुप्) स्वायंभूवमनूचा मी गुरो विस्तार ऐकिला । कन्यांचा वंशविस्तार सांगणे अन्य ते मनु ॥ १ ॥
गुरो - अहो आचार्य - इह - येथपर्यंत - अयं - हा - स्वायंभुवस्य - स्वायंभुवमनूचा - वंशः - वंश - विस्तरात् - विस्तृतरीतीने - यत्र - ज्या वंशामध्ये - विश्वसृजां सर्गः (वर्णितः) - प्रजापतींची सृष्टी सांगितली आहे. - अन्यान् मनून् - दुसर्या मनूंचा वृत्तांत - नः - आम्हाला - वदस्व - सांगा. ॥१॥
परीक्षिताने विचारले - गुरुदेव, स्वायंभुव मनूचा वंश मी विस्ताराने ऐकला. याच वंशात मरीची वगैरे प्रजापतींनी, आपली वंशपरंपरा चालविली होती. आता आपण आम्हांला दुसर्या मनूंविषयी सांगावे. (१)
यत्र यत्र हरेर्जन्म कर्माणि च महीयसः ।
गृणंति कवयो ब्रह्मन् तानि नो वद श्रृण्वताम् ॥ २ ॥
द्विजा ! ज्ञानी महात्म्यांनी ज्या ज्या मन्वंतरातल्या । गायिल्या भगवद्लीला कृपया मजला वदा ॥ २ ॥
ब्रह्मन् - हे ब्रह्मनिष्ठ मुने - कवयः - विद्वान लोक - यत्र यत्र - ज्या ज्या ठिकाणी - महीयसः - फार मोठया अशा - हरेः - भगवंताचा - जन्म - जन्म - च - आणि - कर्माणि - कर्मे - गृणन्ति - वर्णितात - तानि - ती कर्मे - शृण्वतां - श्रवण करणार्या - नः - आम्हांला - वद - सांग. ॥२॥
हे ब्रह्मन, ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वंतरामध्ये भगवंतांच्या ज्या ज्या अवतारांचे आणि लीलांचे वर्णन करतात, ते आपण सांगावे. आम्ही त्याचे श्रवण करू इच्छितो. (२)
यत् यस्मिन् अंतरे ब्रह्मन् भगवान् विश्वभावनः ।
कृतवान् कुरुते कर्ता हि अतीते अनागतेऽद्य वा ॥ ३ ॥
भगवन् ! भगवंताच्या भूत भावी नि आजच्या । मन्वंतरातल्या लीला सांगणे सर्व त्या मला ॥ ३ ॥
ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञ मुने - विश्वभावनः - जगाचा चालक - भगवान् - परमेश्वर - यस्मिन् - ज्या - अतीते - गेलेल्या - अन्तरे - मन्वन्तरामध्ये - यत् - जे - कृतवान् - करिता झाला - हि - त्याचप्रमाणे - अनागते (अन्तरे) - येणार्या मन्वन्तरामध्ये - कर्ता - करील - वा - किंवा - अद्य - आज - कुरुते - करीत आहे. ॥३॥
हे ब्रह्मन्, विश्वनिर्मात्या भगवंतांनी पूर्वीच्या मन्वंतरांमध्ये ज्या ज्या लीला केल्या, सध्या ज्या करीत आहेत आणि यापुढील मन्वंतरांमध्ये ज्या काही करतील, ते सर्व आम्हांस ऐकवावे. (३)
श्रीऋषिरुवाच -
मनवोऽस्मिन् व्यतीताः षट् कल्पे स्वायम्भुवादयः । आद्यस्ते कथितो यत्र देवादीनां च सम्भवः ॥ ४ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले - स्वायंभूवादि या कल्पी सहा मन्वंतरे अशी । जाहली पहिल्या मध्ये देवता जन्मला तदा ॥ ४ ॥
अस्मिन् कल्पे - ह्या कल्पामध्ये - स्वायंभुवादयः षट् मनवः - स्वायंभुवादि सहा मनु - व्यतीताः - होऊन गेले - यत्र - ज्यांमधील - आद्यः - पहिला मनु - देवादीनां संभवः च - आणि देवादिकांची उत्पत्ति - ते - तुला - कथितः - सांगितली आहे. ॥४॥
श्रीशुक म्हणाले - या कल्पात स्वायंभुव वगैरे सहा मन्वंतरे होऊन गेली आहेत. त्यांपैकी पहिल्या मन्वंतराचे मी वर्णन केले. त्यामध्ये देवता इत्यादींची उत्पत्ती झाली होती. (४)
आकूत्यां देवहूत्यां च दुहित्रोः तस्य वै मनोः ।
धर्मज्ञानोपदेशार्थं भगवान् पुत्रतां गतः ॥ ५ ॥
स्वायंभूवमनुपुत्री आकुती पासुनी हरी । यज्ञपुरूष रूपाने जन्मले धर्म सांगण्या ॥ कपिलो देवहूतीच्या पोटीही तेच जन्मले । ज्ञानाच्या उपदेशार्थ भगवान् जन्मले पुढे ॥ ५ ॥
भगवान् - परमेश्वर - तस्य - त्या - मनोः - स्वायंभूवमनूच्या - आकूत्यां - आकूतिनामक - च - आणि - देवहूत्यां - देवहूतिनामक - दुहित्रोः - कन्यांच्या ठिकाणी - वै - खरोखर - धर्मज्ञानोपदेशार्थं - धर्मज्ञानाचा उपदेश करण्याकरिता - पुत्रतां - पुत्रपणाप्रत - गतः - प्राप्त झाला. ॥५॥
स्वायंभुव मनूची कन्या आकूतीपासून यज्ञपुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी आणि देवहूतीपासून कपिल मुनींच्या रूपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी, भगवंतांनी त्यांच्या पुत्ररूपाने अवतार घेतला. (५)
कृतं पुरा भगवतः कपिलस्य अनुवर्णितम् ।
आख्यास्ये भगवान् यज्ञः यच्चकार कुरूद्वह ॥ ६ ॥
कपील महिमा पूर्वी तिसर्या स्कंधि बोलिलो । आता आकूति गर्भाच्या लीला त्या सांगतो तुम्हा ॥ ६ ॥
कुरूद्वह - हे कुरूश्रेष्ठा - पुरा - पूर्वी - भगवतः कपिलस्य - भगवान कपिल महामुनीचे - कृतं अनुवर्णितं - कृत्य वर्णन केले - भगवान् यज्ञः - भगवान यज्ञ - यत् चकार - जे करिता झाला - तत् आख्यास्ये - ते मी सांगतो. ॥६॥
परीक्षिता, भगवान कपिलांचे वर्णन मी या आधीच तिसर्या स्कंधामध्ये केले आहे. आता भगवान यज्ञपुरुषांनी जे काही केले, त्याचे वर्णन करतो. (६)
विरक्तः कामभोगेषु शतरूपापतिः प्रभुः ।
विसृज्य राज्यं तपसे सभार्यो वनमाविशत् ॥ ७ ॥
विरक्त कामभोगासी झाले स्वायंभुवो मुनी । त्यागुनी राज्य ते गेले तपा सपत्न ते वनी ॥ ७ ॥
कामभोगेषु - विषयसेवनाविषयी - विरक्तः - वैराग्य प्राप्त झालेला - प्रभुः - समर्थ - शतरूपापतिः - शतरूपेचा पति स्वायंभुव मनु - राज्यं विसृज्य - राज्य सोडून - सभार्यः - पत्नीसह - तपसे - तपश्चर्येकरिता - वनं आविशत् - अरण्यात जाता झाला. ॥७॥
भगवान स्वायंभुव मनू सर्व विषयभोगांपासून विरक्त होऊन राज्यत्याग करून पत्नी शतरूपेबरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. (७)
सुनंदायां वर्षशतं पदैकेन भुवं स्पृशन् ।
तप्यमानः तपो घोरं इदं अन्वाह भारत ॥ ८ ॥
सुनंदा नदिच्या काठी एकपायावरी उभे । शतवर्ष तपो केले तपीं श्रीहरि ध्यायिला ॥ ८ ॥
भारत - हे भरतकुलोत्पन्ना - सुनंदायां - सुनंदा नदीच्या काठी - वर्षशतं - शंभर वर्षे - एकेन पदा - एका पायाने - भुवं स्पृशन् - पृथ्वीला स्पर्श करून - घोरं तपः - भयंकर तप - तप्यमानः - करणारा - इदं - हे - अन्वाह - म्हणाला. ॥८॥
परीक्षिता, सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभे राहून शंभर वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली. त्यावेळी ते दररोज भगवंतांची अशी स्तुती करीत. (८)
श्रीमनुरुवाच -
येन चेतयते विश्वं विश्वं चेतयते न यम् । यो जागर्ति शयानेऽस्मिन् नायं तं वेद वेद सः ॥ ९ ॥
मनुजी म्हणत होते - जयाच्या चेतना स्पर्शे विश्व चेतन होय हे । परी विश्वाचिये स्पर्शे न लाभे चेतना जया ॥ जागा जो प्रलयामध्ये तया विश्व न जाणते । परी हे तत्व जो जाणी जाणावा तोचि ईश्वर ॥ ९ ॥
येन - ज्यामुळे - विश्वं - विश्व - चेतयते - चैतन्ययुक्त होते - विश्वं - विश्व - यं - ज्याला - न चेतयते - चेतना देऊ शकत नाही - अस्मिन् शयाने - हे विश्व लीन झाले असता - यः - जो - जागर्ति - जागा राहतो - तं - त्याला - अयं - हा लोक - न वेद - जाणत नाही - सः - तो - वेद - जाणतो. ॥९॥
मनू म्हणत - ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते, परंतु हे विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही, जे हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात, ज्यांना हे विश्व जाणू शकत नाही, परंतु विश्वाला जे जाणतात, तेच हे परमात्मा. (९)
आत्मावास्यं इदं विश्वं यत् किञ्चित् जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद् धनम् ॥ १० ॥
चराचर समस्तात भरला ओतप्रोत तो । म्हणोनी त्यागिता मोह निर्वाहा भोग भोगिणे ॥ हव्यास सोडणे सर्व कोणाचे सर्व हे धन ? ॥ १० ॥
जगत्यां - जगामध्ये - यत् किंचित् - जे काही - जगत् - गतियुक्त - इदं विश्वं - हे सर्व - आत्मावास्यं - परमात्म्याचेच राहण्याचे स्थान आहे - तेन - त्या परमात्म्याने - त्यक्तेन - दिलेल्या पदार्थाने - भुञ्जीथाः - आपली उपजीविका करा - कस्यस्वित् - कोणाच्याही - धनं मा गृधः - धनाचा अभिलाष करू नका. ॥१०॥
हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे सर्व चराचर त्या परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेले आहे. म्हणून मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थाविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्याने दिलेल्या वस्तूंचाच जीवन-निर्वाहासाठी उपभोग घ्यावा आणि कोणाच्याही धनाचा लोभ धरू नये. (१०)
यं पश्यति न पश्यंतं चक्षुर्यस्य न रिष्यति ।
तं भूतनिलयं देवं सुपर्णं उपधावत ॥ ११ ॥
भगवान् सर्वसाक्षी तो न दिसे बुद्धि इंद्रिया । ज्ञानशक्ति प्रभावे तो स्वतेजा स्मरणे सदा ॥ ११ ॥
पश्यन्तं यं - पहाणार्या ज्याला - न पश्यति - पाहात नाही - यस्य चक्षुः - ज्याचे नेत्र - न रिष्यति - नाश पावत नाहीत - तं - त्या - भूतनिलयं - प्राण्यांचे वसतिस्थान अशा - देवं - दैदिप्यमान - सुपर्णं - सुपर्णनामक ईश्वराला - उपधावत - भजा. ॥११॥
भगवंत सर्वांना पाहतात, पण त्यांना कोणी पाहात नाही. ज्यांची ज्ञानशक्ति अखंड आहे, त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणार्या असंग परमात्म्याला शरण जा. (११)
न यस्यादि अन्तौ मध्यं च स्वः परो नान्तरं बहिः ।
विश्वस्य अमूनि यत् यस्मात् विश्वं च तत् ऋतं महत् ॥ १२ ॥
आदि अंत नसे त्याला मग त्या मध्य कोठला । न आप-पर त्या कोणी सर्वत्र तोचि दाटला ॥ चालते जग ज्या सत्ते अनंत सत्य ब्रह्म तो ॥ १२ ॥
यस्य - ज्याला - आद्यन्तौ - आदि व अंत - च - आणि - मध्यं - मध्य - न - नाही - स्वः - स्वकीय - परः - परकीय - अंतरं - आत - बहिः - बाहेर - न - नाही - विश्वस्य अमूनि - जगाचे हे आद्यंतादि विकार - यस्मात् - ज्याच्यापासून - च - आणि - विश्वं - सर्व जग - यत् - ज्या ईश्वराचे रूपच होय - तत् - तेच - ऋतं - सत्य - महत् (अस्ति) - मोठे परब्रह्म होय. ॥१२॥
ज्यांचा आदी, अंत किंवा मध्य नाही, ज्यांना कोणी आपला नाही की परका नाही, कोणी बाहेर नाही की कोणी आत नाही, तेच विश्वाचे आदी, अंत, मध्य, आपले, परके, बाहेर, आत असे सर्व काही आहेत, ज्यांच्या सत्तेमुळेच विश्वाची सत्ता आहे, तेच सत्य परब्रह्म आहेत. (१२)
स विश्वकायः पुरुहूत ईशः
सत्यः स्वयंज्योतिः अजः पुराणः । धत्तेऽस्य जन्माद्यजयाऽऽआत्मशक्त्या तां विद्यया उदस्य निरीह आस्ते ॥ १३ ॥
(इंद्रवज्रा) तो विश्वरूपी परमात्म देव अनंत नामे अन शक्ति तैशी । स्वयंप्रकाशी नच जन्म त्याला जेठी असा तो अन निष्क्रियो ही ॥ १३ ॥
सः - तो - अजः - जन्मरहित - सत्यः - सत्यस्वरूप - स्वयंज्योतिः - स्वयंप्रकाश - पुराणः - अतिप्राचीन - विश्वकायः - जग हेच ज्याचे शरीर आहे असा - पुरुहूतः - पुष्कळ नावे असणारा - ईशः - ईश्वर - अस्य - ह्या जगाचे - जन्मादि - उत्पत्ति आदिकरून - आत्मशक्त्या - स्वतःची शक्ति अशा - अजया - मायेने - धत्ते - चालवितो - तां (च) - आणि त्या मायेला - विद्यया - ज्ञानाने - उदस्य - दूर करून - निरीहः - निरिच्छ असा - आस्ते - राहतो. ॥१३॥
तेच परमात्मा विश्वरूप आहेत. त्यांना अनंत नावे आहेत. ते सर्वशक्तिमान, सत्य, स्वयंप्रकाश, अजन्मा आणि पुराणपुरुष आहेत. आपल्या शक्तिरूप मायेने जन्म वगैरेंचा स्वीकार करतात आणि आपल्या विद्याशक्तीने त्याचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूपमात्र राहतात. (१३)
अथाग्रे ऋषयः कर्माणि ईहन्ते अकर्महेतवे ।
ईहमानो हि पुरुषः प्रायः अनीहां प्रपद्यते ॥ १४ ॥
(अनुष्टुप्) म्हणोनी कर्मयोगाते ऋषी प्रथम ध्यायिती । तेणे कर्मीहि निष्क्रिय होवोनी सुटती पुन्हा ॥ १४ ॥
अथ - आता - अग्रे - प्रथम - ऋषयः - ऋषि - अकर्महेतवे - कर्मातून सुटून मोक्ष मिळण्यासाठी - कर्माणि - कर्मे - ईहन्ते - इच्छितात - हि - कारण - (कर्माणि) ईहमानः - कर्मे इच्छिणारा - पुरुषः - पुरुष - प्रायः - बहुतकरून - अनीहां - निष्क्रियत्वाला - प्रपद्यते - पावतो. ॥१४॥
ऋषी नैष्कर्म्यसिद्धीसाठी आधी कर्मयोगाचे अनुष्ठान करतात. कारण कर्म करणारा पुरुषच शेवटी निष्क्रिय होऊन कर्मांपासून मुक्त होतो. (१४)
ईहते भगवान् ईशो न हि तत्र विषज्जते ।
आत्मलाभेन पूर्णार्थो न अवसीदन्ति ये अनु तम् ॥ १५ ॥
श्रीहरी करितो कर्म परी आसक्त तो नसे । त्यानुसार अनासक्त राहता बंधमुक्ति हो ॥ १५ ॥
आत्मलाभेन - आत्मप्राप्तीच्या योगे - पूर्णार्थः - कृतार्थ झालेला - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - ईशः - परमेश्वर - (कर्माणि) ईहते - कर्मे करण्याची इच्छा करितो - तत्र - त्या ठिकाणी - हि - खरोखर - न विषज्जते - आसक्त होत नाही - ये - जे - तम् - त्याला - अनु (सरन्ति) - अनुसरतात - न अवसीदन्ति - दुःख पावत नाहीत. ॥१५॥
सर्वशक्तिमान भगवंतसुद्धा कर्मे करतात. परंतु ते आत्मलाभाने परिपूर्ण असल्याने त्या कर्मांमध्ये आसक्त होत नाहीत. म्हणून त्यांचे अनुकरण करणारेसुद्धा कर्मबंधनांपासून मुक्त होतात. (१५)
तमीहमानं निरहंकृतं बुधं
निराशिषं पूर्णं अनन्यचोदितम् । नॄन् शिक्षयंतं निजवर्त्मसंस्थितं प्रभुं प्रपद्येऽखिलधर्मभावनम् ॥ १६ ॥
(इंद्रवज्रा) तो ज्ञानरूपी अन पूर्ण कामी म्हणोनि गर्वो नच कामना त्यां । स्वच्छंदरूपे करि सर्व कर्म निवांत राही शिकवी जगाला । तो धर्मकर्ता अन जीवदाता मी त्या प्रभूच्या शरणात आलो ॥ १६ ॥
निजवर्त्मसंस्थितं - आपल्या मार्गामध्ये उत्तम प्रकारे राहणार्या - ईहमानं - कर्मे करण्याची इच्छा करणार्या - बुधं - ज्ञानसंपन्न - निरहङ्कृतं - अहंकाररहित - पूर्णं - परिपूर्ण - निराशिषं - फलाची इच्छा न करणार्या - अनन्यचोदितं - दुसर्याने न प्रेरिलेल्या - अखिलधर्मभावनं - सर्व धर्म चालविणार्या - नृन् शिक्षयन्तं - मनुष्यांना शिकविणार्या - तं - त्या - प्रभुं - समर्थ ईश्वराला - प्रपद्ये - मी शरण जातो. ॥१६॥
भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही. ते सर्वथैव परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामना नाही. कोणाच्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंदरूपानेच कर्म करीत असतात. आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहून ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात. तेच सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि त्यांचे रक्षक आहेत. त्या प्रभूंना मी शरण आलो आहे. (१६)
श्रीशुक उवाच -
(अनुष्टुप्) इति मंत्रोपनिषदं व्याहरन्तं समाहितम् । दृष्ट्वासुरा यातुधाना जग्धुं अभ्यद्रवन् क्षुधा ॥ १७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्) अशा मंत्रोपनिषदा एकाग्र मनु ध्यायिता । झोपेत बरळे कोणी राक्षसा वाटले तदा ॥ भक्षिण्या पातले तेथे तुटोनी पडले पहा ॥ १७ ॥
इति - याप्रमाणे - मंत्रोपनिषदं - उपनिषन्मय मंत्राचा - व्याहरन्तं - जप करणार्या - समाहितं - समाधिस्थ अशा - दृष्ट्वा - पाहून - असुराः - असुर - यातुधानाः - राक्षस - क्षुधा - भुकेमुळे - जग्धुं - खाण्याकरिता - अभ्यद्रवन् - धावत आले. ॥१७॥
श्रीसुख म्हणतात - एकदा स्वायंभुव मनू एकाग्रचित्ताने या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करीत होते. ते झोपेत बरळत आहेत असे वाटून भुकेलेले असुर व राक्षस त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. (१७)
तान् तथा अवसितान् वीक्ष्य यज्ञः सर्वगतो हरिः ।
यामैः परिवृतो देवैः हत्वा अशासत् त्रिविष्टपम् ॥ १८ ॥
पाहुनी यज्ञपुरुषे यामदेवांसि घेउनी । मारिले सर्व ते दैत्य इंद्राच्या पदि बैसले ॥ १८ ॥
सर्वगतः - सर्वव्यापी - यज्ञः - यज्ञावतारी - हरिः - श्रीविष्णु - तथा - त्याप्रमाणे - अवसितान् - निश्चय केलेल्या - तान् - त्या असुरांना व राक्षसांना - वीक्ष्य - पाहून - हत्वा - त्यांना मारून - यामैः - यामनामक - देवैः - देवानी - परिवृतः - वेष्टिलेला असा - त्रिविष्टपं - स्वर्गाला - अशासत् - शासिता झाला. ॥१८॥
हे पाहून अंतर्यामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम नावांच्या देवांसह तेथे आले. खाण्याच्या उद्देशाने तेथे आलेल्या त्या असुरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले. (१८)
स्वारोचिषो द्वितीयस्तु मनुः अग्नेः सुतो अभवत् ।
द्युमत् सुषेण रोचिष्मत् प्रमुखाः तस्य च आत्मजाः ॥ १९ ॥
स्वारोचिष पुन्हा झाला अग्निपुत्र मनू दुजा । रोचिष्मान् द्युमान् तैसे सुषेण पुत्र आदि त्या ॥ १९ ॥
द्वितीयः - दुसरा - स्वारोचिषः - स्वारोचिष - मनुः - मनु - तु - तर - अग्नेः - अग्नीचा - सुतः - पुत्र - अभवत् - होता - च - आणि - तस्य - त्या स्वारोचिष मनूचे - द्युमत्सुषेणरोचिष्मत्प्रमुखाः - द्युमान्, सुषेण, रोचिष्मान् इत्यादि - आत्मजाः - पुत्र. ॥१९॥
स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झाला. तो अग्निपुत्र होता. धुमान, सुषेण, रोचिष्मान इत्यादी त्यांचे पुत्र होते. (१९)
तत्र इन्द्रो रोचनः त्वासीत् देवाश्च तुषितादयः ।
ऊर्जस्तम्भ आदयः सप्त ऋषयो ब्रह्मवादिनः ॥ २० ॥
तया मन्वंतरा मध्ये इंद्राचे नाम रोचन । तुषितादी प्रधान् देव सप्तर्षी ऊर्जस्तंभ ते ॥ २० ॥
तत्र - त्या स्वारोचिष मन्वन्तरामध्ये - इंद्रः - इंद्र - तु - तर - रोचनः - रोचन - आसीत् - होता - च - आणि - तुषितादयः - तुषित इत्यादि - देवाः - देव - ऊर्जस्तम्भादयः - ऊर्जस्तंभ आदिकरून - ब्रह्मवादिनः - ब्रह्मवेत्ते - सप्त - सात - ऋषयः - ऋषि. ॥२०॥
त्या मन्वंतरार इंद्राचे नाव रोचन होते. तुषित इत्यादि देवगण होते. ऊर्जस्तंभ इत्यादि वेदवेत्ते सप्तर्षी होते. (२०)
ऋषेस्तु वेदशिरसः तुषिता नाम पत्न्यभूत् ।
तस्यां जज्ञे ततो देवः विभुः इति अभिविश्रुतः ॥ २१ ॥
वेदशिराऋषी यांच्या तुषिता उदरी तदा । भगवान् विभु या नामे जन्मले प्रभू ते पहा ॥ २१ ॥
वेदशिरसः - वेदशिरा नावाच्या - ऋषेः तु - ऋषीची तर - तुषिता नाम - तुषिता नावाची - पत्नी - पत्नी - अभूत् - होती - ततः - त्या वेदशिरापासून - तस्यां - त्या तुषितेच्या ठिकाणी - विभुः - विभु - इति - अशा नावाने - अभिविश्रुतः - प्रसिद्ध - देवः - देव - जज्ञे - उत्पन्न झाला. ॥२१॥
त्या मन्वन्तरात वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्नी तुषिता होती. भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभू नावाने प्रसिद्ध झाले. (२१)
अष्टाशीति सहस्राणि मुनयो ये धृतव्रताः ।
अन्वशिक्षन् व्रतं तस्य कौमार ब्रह्मचारिणः ॥ २२ ॥
ब्रह्मचारी व्रती झाले आजीवन विभूमुनी । ऋषी अनुचरे त्यांचे अठठयाऐंशी हजार ते ॥ २२ ॥
अष्टाशीतिसहस्त्राणि - अठठयांशी हजार - धृतव्रताः - व्रताचरण करणारे - ये - जे - मुनयः - ऋषि - ब्रह्मचारिणः - बाल्यावस्थेपासून ब्रह्मचर्यव्रत पाळणारे - तस्य - त्याचे - व्रतं - व्रत - अन्वशिक्षन् - शिकले. ॥२२॥
आजीवन ब्रह्मचारी राहिले. त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन अठ्ठ्याऐंशी हजार व्रतनिष्ठ ऋषींनी सुद्धा ब्रह्मचर्य पालन केले. (२२)
तृतीय उत्तमो नाम प्रियव्रत सुतो मनुः ।
पवनः सृञ्जयो यज्ञ-होत्राद्याः तत्सुता नृप ॥ २३ ॥
उत्तमो प्रियव्रत्पुत्र तिसरा मनु जाहला । पवनो सृंजयो तैसे यज्ञहोत्रादि पुत्र त्यां ॥ २३ ॥
नृप - हे परीक्षित राजा - उत्तमः नाम - उत्तम नावाचा - प्रियव्रतसुतः - प्रियव्रताचा मुलगा - तृतीयः - तिसरा - मनुः - मनु - तत्सुताः - त्याचे मुलगे - पवनः - पवन - सृंजयः - सृंजय - यज्ञहोत्राद्याः - यज्ञहोत्र आदि करून ॥२३॥
उत्तम हा तिसरा मनू होता. तो प्रियव्रताचा मुलगा होता. त्याच्या पुत्रांची नावे पवन, सृंजय, यज्ञहोत्र इत्यादी होती. (२३)
वसिष्ठतनयाः सप्त ऋषयः प्रमदादयः ।
सत्या वेदश्रुता भद्रा देवा इंद्रस्तु सत्यजित् ॥ २४ ॥
सप्तर्षी प्रमदादी तै होते वासिष्ठय पुत्र ते । सत्य वेदश्रुतो भद्र प्रधान देवता गणो ॥ सत्यजित् नावचा होता स्वर्गीचा इंद्र तेधवा ॥ २४ ॥
प्रमदादयः - प्रमद इत्यादि - वसिष्ठतनयाः - वसिष्ठाचे मुलगे - सप्त - सात - ऋषयः - ऋषि - सत्याः - सत्य - वेदश्रुताः - वेदश्रुत - भद्राः - भद्र - देवाः - देव - सत्यजित् - सत्यजित - तु - तर - इंद्रः - इंद्र. ॥२४॥
त्या मन्वंतरात वसिष्ठांचे प्रमद इत्यादी सात पुत्र सप्तर्षी होते. सत्य, वेदश्रुत आणि भद्र नावाचे देवांचे प्रमुख गण होते आणि इंद्राचे नाव सत्यजित होते. (२४)
धर्मस्य सूनृतायां तु भगवान् पुरुषोत्तमः ।
सत्यसेन इति ख्यातो जातः सत्यव्रतैः सह ॥ २५ ॥
सुनृता धर्मपत्नीच्या गर्भात पुरुषोत्तम । सत्यसेन अशा नामे जन्मले अंशरुप ते ॥ सत्यव्रत अशा नामे देवतागण सोबती ॥ २५ ॥
भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - पुरुषोत्तमः - श्रीविष्णु - धर्मस्य - धर्माच्या - सूनृतायां तु - सूनृतानामक पत्नीच्या ठिकाणी तर - सत्यव्रतैः सह - सत्यव्रतांसह - सत्यसेनः इति ख्यातः - सत्यसेन ह्या नावाने प्रसिद्ध असा - जातः - जन्मला. ॥२५॥
त्यावेळी धर्माची पत्नी सूनृता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन या नावाचा अवतार घेतला. त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगण होते. (२५)
सो अनृतव्रत दुःशीलान् असतो यक्षराक्षसान् ।
भूतद्रुहो भूतगणांस्तु अवधीत् सत्यजित्सखः ॥ २६ ॥
सखा इंद्रासि होवोनी असत् दुःशील राक्षसा । जीवद्रोही अशा भूतां तये संहार साधिला ॥ २६ ॥
सः तु - तो तर - सत्यजित्सखः - सत्यजिताबरोबर मैत्री संपादिलेला असा - अनृतव्रतदुःशीलान् - मिथ्याचारी व स्वभावाने दुष्ट अशा - असतः - नीच - यक्षराक्षसान् - यक्ष व राक्षस यांना - भूतद्रुहः - प्राणिमात्रांना पीडा देणार्या - भूतगणान् - भूतगणांना - अवधीत् - मारिता झाला. ॥२६॥
त्यावेळचा इंद्र सत्यजित याचा मित्र बनून भगवंतांनी असत्यपरायण, दुराचारी आणि दुष्ट अशा यक्ष, राक्षस तसेच जीवद्रोही भूतगणांचा संहार केला. (२६)
चतुर्थ उत्तमभ्राता मनुर्नाम्ना च तामसः ।
पृथुः ख्यातिः नरः केतुः इत्याद्या दश तत्सुताः ॥ २७ ॥
तामसो मनु तो चौथा उत्तमाचाचि बंधु जो । नर केतू पृथू ख्याती इत्यादी दश पुत्र त्यां ॥ २७ ॥
च - आणि - नाम्ना - नावाने - तामसः - तामस - उत्तमभ्राता - उत्तमाचा भाऊ - चतुर्थः मनुः (आसीत्) - चवथा मनु होय - पृथुः - पृथु - ख्यातिः - ख्याति - नरः - नर - केतुः - केतु - इत्याद्याः - इत्यादि - दश - दहा - तत्सुताः (आसन्) - त्या तामस मनूचे पुत्र होत. ॥२७॥
चौथ्या मनूचे नाव तामस असे होते. तिसचा मनू उत्तमाचा तो भाऊ होता. पृथू, ख्याती, नर, केतू इत्यादी त्याचे दहा पुत्र होते. (२७)
सत्यका हरयो वीरा देवाः त्रिशिख ईश्वरः ।
ज्योतिर्धामादयः सप्त ऋषयः तामसेऽन्तरे ॥ २८ ॥
सत्यको हरि नी वीर प्रधान देवता गण । त्रिशिखो नाम तै इंद्रा सप्तर्षी ज्योतिधाम तै ॥ २८ ॥
तामसे अन्तरे - तामस मन्वन्तरामध्ये - सत्यकाः - सत्यक - हरयः - हरि - वीराः - वीर - देवाः - देव - त्रिशिखः - त्रिशिख - ईश्वरः - इंद्र - ज्योतिर्धामादयः - ज्योतिर्धाम आदिकरून - सप्त - सात - ऋषयः - ऋषि. ॥२८॥
सत्यक, हरी आणि वीर नावाचे देव होते. इंद्राचे नाव त्रिशिख असे होते. त्या मन्वंतरात ज्योतिर्धाम इत्यादी सप्तर्षी होते. (२८)
देवा वैधृतयो नाम विधृतेः तनया नृप ।
नष्टाः कालेन यैर्वेदा विधृताः स्वेन तेजसा ॥ २९ ॥
मन्वंतरात त्या झाले विधृती वैधृती द्वयो । नष्ट प्राय तदा वेदा तयांनी रक्षिले असे ॥ २९ ॥
नृप - हे परीक्षित राजा - वैधृतयः नाम - वैधृतिनामक - विधृतेः - विधृतीचे - तनयाः - पुत्र - देवाः - देव - यैः - त्यांनी - कालेन - कालगतीने - नष्टाः - नष्ट झालेले - वेदाः - वेद - स्वेन तेजसा - स्वतःच्या पराक्रमाने - विधृताः - धारण केले. ॥२९॥
परीक्षिता, त्यावेळी विधृतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते. कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचविले. (२९)
तत्रापि जज्ञे भगवान् हरिण्यां हरिमेधसः ।
हरिरित्याहृतो येन गजेंद्रो मोचितो ग्रहात् ॥ ३० ॥
हरिमेधा ऋषीपत्नी हरिणी पोटि तो हरी । नावाने अवतारो हा गजेंद्रा सोडिले जये ॥ ३० ॥
तत्र अपि - त्या मन्वन्तरामध्येही - भगवान् - श्रीविष्णु - हरिमेधसः - हरिमेधाच्या - हरिण्यां - हरिणीनामक पत्नीच्या ठिकाणी - हरिः इति आह्लतः - हरि या नावाने प्रसिद्ध असा - जज्ञे - जन्मास आला - येन - ज्याने - गजेन्द्रः - गजेंद्र - ग्रहात् - नक्रापासून - मोचितः - मुक्त केला. ॥३०॥
या मन्वंतरातही हरिमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरी नावाने अवतार घेतला. याच अवतारांत त्यांनी गजेंद्राचे मगरापासून रक्षण केले होते. (३०)
श्रीराजोवाच -
बादरायण एतत् ते श्रोतुं इच्छामहे वयम् । हरिर्यथा गजपतिं ग्राह ग्रस्तं अमूमुचत् ॥ ३१ ॥
राजा परीक्षिताने विचारले - मुनी ते ऐकण्या आम्ही सर्व उत्सुक तो असो । गजेंद्रा मगराचीया मिठीची सुटका कशी ? ॥ ३१ ॥
बादरायणे - हे शुकाचार्या - वयं - आम्ही - हरिः - हरि - ग्राहग्रस्तं - नक्राने गिळलेल्या - गजपतिं - गजेंद्राला - यथा - ज्याप्रकारे - अमूमुचत् - मुक्त करिता झाला - एतत् - हे - ते - तुझ्याकडून - श्रोतुं - श्रवण करण्याला - इच्छामहे - इच्छित आहो. ॥३१॥
परीक्षिताने विचारले, हे व्यासपुत्र, भगवंतांनी गजेंद्राला मगराच्या जबड्यातून कसे सोडविले, ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो. (३१)
तत्कथा सुमहत् पुण्यं धन्यं स्वस्त्ययनं शुभम् ।
यत्र यत्र उत्तमश्लोको भगवान् गीयते हरिः ॥ ३२ ॥
कथा सर्वोत्तमा ऐसी प्रशंसनीय पुण्यदा । मंगला शुभ जी आहे तीत कीर्तीहि गायिली ॥ हरिची संत थोरांनी पवित्र यशही तसे ॥ ३२ ॥
यत्रयत्र - ज्या ज्या कथांमध्ये - उत्तमश्लोकः - सर्वोत्कृष्ट कीर्ति मिळविलेला - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - हरिः - श्रीविष्णु - गीयते - गायिला जातो - तत्कथासु - त्या कथांच्या ठिकाणी - धन्यं - धन्यता देणारे - स्वस्त्ययनं - कल्याणाचे घरच असे - शुभं - चांगले - महत् - मोठे - पुण्यं (अस्ति) - पुण्यकारक फल असते. ॥३२॥
सर्व कथांमध्ये तीच कथा परम पुण्यमय, प्रशंसनीय, मंगलकारी आणि शुभ आहे की ज्यामध्ये महात्म्यांनी वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचे वर्णन केलेले असते. (३२)
श्रीसूत उवाच -
परीक्षितैवं स तु बादरायणिः प्रायोपविष्टेन कथासु चोदितः । उवाच विप्राः प्रतिनन्द्य पार्थिवं मुदा मुनीनां सदसि स्म शृण्वताम् ॥ ३३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे मन्वन्तरानुचरिते प्रथमोध्याऽयः ॥ १ ॥
सूतजी सांगतात - (इंद्रवज्रा) आजीव होता उपावासि राजा ही ऐकण्याला हरिकीर्तने नी । शुकास राये वदता असे हे हर्षोनिया तै मुनि बोलले ते ॥ ३३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ ॥ पहिला अध्याय हा ॥ ८ ॥ १ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
विप्राः - शौनकादिक ऋषिहो - प्रायोपविष्टेन - प्रायोपवेशन करण्याचा संकल्प करून बसलेल्या - परीक्षिता - परीक्षित राजाने - कथासु - कथांविषयी - एवं - याप्रमाणे - चोदितः - प्रेरिलेला - सः - तो - बादरायणिः तु - शुकाचार्य तर - मुदा - आनंदाने - पार्थिवं - परीक्षित राजाला - प्रतिनन्द्य - गौरवून - सदसि - सभेमध्ये - मुनीनां शृण्वतां - ऋषि ऐकत असता - उवाच स्म - म्हणाला. ॥३३॥
सूत म्हणतात - शौनकादी ऋषींनो, राजा परीक्षित आमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता. त्याने जेव्हा श्रीशुकदेवांना अशाप्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले, तेव्हा ते आनंदित झाले आणि परीक्षिताचे अभिनंदन करीत मुनींनी भरलेल्या सभेत ती कथा सांगू लागले. (३३)
स्कंध आठवा - अध्याय पहिला समाप्त |