|
श्रीमद् भागवत पुराण गजेंद्रोपाख्याने गजग्राहयुद्धवर्णनम् - मगराने गजेंद्राला पकडणे - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
आसीद् गिरिवरो राजन् त्रिकूट इति विश्रुतः । क्षीरोदेनावृतः श्रीमान् योजनायुतमुच्छ्रितः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्) त्रिकूट गिरि तो होता घेरिला क्षीरसागरे । श्रीमान योजने उंच सुशोभित परीक्षिता ! ॥ १ ॥
राजन् - हे राजा - त्रिकूट इति विश्रुतः - त्रिकूट ह्या नावाने प्रसिद्ध असा - क्षीरोदेन आवृतः - क्षीरसमुद्राने वेष्टिलेला - श्रीमान् - शोभायमान - योजनायुतं उच्छ्रितः - दहा हजार योजने उंच असा - गिरिवरः - श्रेष्ठ पर्वत - आसीत् - होता. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा एक प्रसिद्ध, सुंदर, श्रेष्ठ पर्वत होता. तो दहा हजार योजने उंच होता. (१)
तावता विस्तृतः पर्यक्त्रिभिः श्रृङ्गैः पयोनिधिम् ।
दिशः खं रोचयन्नास्ते रौप्यायसहिरण्मयैः ॥ २ ॥
लांब रुंद तसाची तो शिखरे स्वर्ण चांदि नी । लोहाची तीन ती दिव्य झळाळी दाहिही दिशा ॥ २ ॥
तावता - तितक्याच प्रमाणाने - पयोनिधिं पर्यक् - समुद्राच्या सभोवती - विस्तृतः (सः) - पसरलेला तो - रौप्यायसहिरण्मयैः - रुप्याच्या, लोखंडाच्या व सोन्याच्या अशा - त्रिभिः शृंगैः - तीन शिखरांनी - दिशः - दिशांना - खं - आकाशाला - रोचयन् - शोभविणारा असा - आस्ते - आहे. ॥२॥
त्याची लांबी-रुंदी सुद्धा चारी बाजूंनी तेवढीच होती. त्याच्या चांदी, लोखंड आणि सोन्याच्या तिन्ही शिखरांच्या तेजाने समुद्र, दिशा आणि आकाश झगमगत असत. (२)
अन्यैश्च ककुभः सर्वा रत्नधातुविचित्रितैः ।
नानाद्रुमलतागुल्मैः निर्घोषैः निर्झराम्भसाम् ॥ ३ ॥
शिखरे सान ते कैक रत्नांनी तेज फाकले । अनंत जातिच्या वल्ली झरे कित्येक गात तै ॥ ३ ॥
(सः) - तो पर्वत - रत्नधातुविचित्रितैः - रत्ने व गैरिकादि धातु यांनी चित्रविचित्र दिसणार्या - नानाद्रुमलतागुल्मैः - अनेक वृक्ष, वेली व गुच्छ यांनी - च - आणि - अन्यैः - दुसर्या - निर्झराम्भसां - झर्यातील उदकाच्या - निर्घोषैः - शब्दांनी - सर्वाः ककुभः - सर्व दिशा ॥३॥
आणखीही त्याची कीतीतरी अशी शिखरे होती की जी रत्ने आणि धातूंच्या रंगीबेरंगी छटांनी सर्व दिशा प्रकाशित करीत असत. त्यांच्यावर वेगवेगळ्या जातीचे वृक्ष, वेली आणि झुडपे होती. झर्यांच्या झुळझुळ वाहणार्या पाण्याने ती निनादित होत. (३)
स चावनिज्यमानाङ्घ्रिः समन्तात् पयऊर्मिभिः ।
करोति श्यामलां भूमिं हरिन् मरकताश्मभिः ॥ ४ ॥
धुती त्या सागरी लाटा पाय त्याचे सदैव की । हिरवळी परी भासे पाचुंची खडि तेथली ॥ ४ ॥
च - आणि - समंतात् - सभोवार - पयऊर्मिभिः - उदकाच्या लाटांनी - अवनिज्यमानाङ्घ्रिः - धुतले जात आहेत पायथ्याचे पर्वत ज्याच्या असा - सः - तो त्रिकूटपर्वत - हरिन्मरकताश्मभिः - हिरव्या पाचेच्या शिळांनी - भूमिं - पृथ्वीला - श्यामलां - हिरवी - करोति - करितो. ॥४॥
सर्व बाजूंनी समुद्राच्या लाटा येऊन त्या पर्वताचे पाय धूत. त्या पर्वतावरील हिरवे पाचू रत्ने तेथील जमीन हिरवीगार करीत. (४)
सिद्धचारणगन्धर्व विद्याधरमहोरगैः ।
किन्नरैः अप्सरोभिश्च क्रीडद्भिः जुष्टकन्दरः ॥ ५ ॥
गुहांमाजी तिथे नित्य सिद्ध चारण अप्सरा । गंधर्व किन्नरे नाग विहारा नित्य नांदती ॥ ५ ॥
क्रीडद्भिः सिद्धचारणगंधर्वविद्याधरमहोरगैः - खेळणार्या सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर आणि मोठमोठे सर्प यांनी - किन्नरैः - किन्नरांनी - च - आणि - अप्सरोभिः - अप्सरांनी - जुष्टकंदरः - सेविल्या आहेत गुहा ज्याच्या असा ॥५॥
सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, किन्नर आणि अप्सरा तेथील गुहांमधून विहार करण्यासाठी येत. (५)
यत्र सङ्गीतसन्नादैः नदद्गुहममर्षया ।
अभिगर्जन्ति हरयः श्लाघिनः परशंकया ॥ ६ ॥
कड्यांच्या मधुनी त्याच्या गाण्यांचा तो प्रतिध्वनी । ऐकता मत्त ते सिंह गर्जती चेपण्यास त्या ॥ ६ ॥
यत्र - जेथे - श्लाघिनः हरयः - गर्विष्ठ सिंह - परशङकया - दुसर्या सिंहाच्या शंकेने - अमर्षया - सहन न झाल्यामुळे - संगीतसंन्नादैः - संगीताच्या मधुर नादांनी - नदद्गुहं - घुमून जात आहेत गुहा ज्याच्या अशा - अभिगर्जन्ति - गाजवून सोडतात. ॥६॥
जेव्हा त्यांच्या संगीताच्या ध्वनीचा गुहांमध्ये प्रतिध्वनी उमटत असे, तेव्हा मोठमोठे सिंह त्याला दुसर्या सिंहाचा आवाज समजून आपणही जोराने गर्जना करीत. (६)
नानारण्यपशुव्रात संकुलद्रोण्यलंकृतः ।
चित्रद्रुमसुरोद्यान कलकण्ठविहंगमः ॥ ७ ॥
जंगलात तळ्याकाठी झुंडिने प्राणि राहती । सुस्वरे गात ते पक्षी सुरोद्यानात नित्यची ॥ ७ ॥
नानारण्यपशुव्रातसङ्कुलद्रोण्यलंकृतः - अनेक जातीच्या वन्य पशूंच्या समूहांनी भरलेल्या गुहांच्या योगे सुशोभित - चित्रद्रुमसुरोद्यान - विविध वृक्ष ज्यामध्ये आहेत अशा देवांच्या उपवनांत - कलकण्ठविहङगमः - मधुर शब्द करणारे पक्षी जेथे राहात आहेत असा ॥७॥
त्या पर्वताचे कडे निरनिराळ्या जंगली जनावरांच्या झुंडींनी सुशोभित झालेले असत. अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या देवतांच्या उद्यानांमध्ये सुंदर पक्षी मधुर कंठाने गात असत. (७)
सरित्सरोभिरच्छोदैः पुलिनैः मणिवालुकैः ।
देवस्त्रीमज्जनामोद सौरभाम्ब्वनिलैर्युतः ॥ ८ ॥
नद्या सरोवरे होती तुडुंब स्वच्छ त्या जळें । तेजाळे वाळु रत्नांची न्हाती देवस्त्रिया तिथे ॥ गंधीत जल तै होई वायू गंधास नेइ त्या ॥ ८ ॥
अच्छोदैः सरित्सरोभिः - ज्यांमध्ये निर्मळ उदक आहे अशा नद्या व सरोवरे यांनी - च - आणि - मणिवालुकैः पुलिनैः - जेथे रत्नांची वाळू आहे अशा वाळवंटानी - देवस्त्रीमज्जनामोदसौरभाम्ब्वनिलैः - देवस्त्रियांच्या स्नानाचा जो सुगंध त्यायोगे सुगंधयुक्त झालेल्या उदकांनी व वायूंनी - युतः - युक्त ॥८॥
त्याच्यावर पुष्कळशा नद्या आणि सरोवरे होती. त्यातील पाणी अत्यंत निर्मळ होते. त्यांच्या काठावर रत्नांची वाळू चमकत असे. त्यांमध्ये देवांगना स्नान करीत असत. त्यामुळे त्यांतील पाणी अत्यंत सुगंधित होऊन जाई. तो सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहात असे. (८)
तस्य द्रोण्यां भगवतो वरुणस्य महात्मनः ।
उद्यानं ऋतुमन्नाम आक्रीडं सुरयोषिताम् ॥ ९ ॥
हरीभक्त वरूणाची राईत बाग शोभली । ॠतुमान् नाव त्या बागा क्रीडती देविया तिथे ॥ ९ ॥
तस्य - त्या पर्वताच्या - द्रोण्यां - दरीत - सुरयोषितां - देवस्त्रियांचे - आक्रीडं - क्रीडास्थान असे - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न - महात्मनः - महासमर्थ - वरुणस्य - वरुणाचे - ऋतुमन्नाम - ऋतुमत् नावाचे - उद्यानं - उपवन. ॥९॥
त्रिकूटाच्या दरीमध्ये महात्मा भगवान वरुणाचे एक उद्यान होते. ऋतुमान असे त्याचे नाव होते. देवांगना त्यात क्रीडा करीत असत. (९)
सर्वतोऽलंकृतं दिव्यैः नित्यपुष्पफलद्रुमैः ।
मन्दारैः पारिजातैश्च पाटलाशोकचम्पकैः ॥ १० ॥ चूतैः पियालैः पनसैः आम्रैः आम्रातकैरपि । क्रमुकैर्नारिकेलैश्च खर्जूरैः बीजपूरकैः ॥ ११ ॥ मधुकैः शालतालैश्च तमालै रसनार्जुनैः । अरिष्टोडुम्बरप्लक्षैः वटैः किंशुकचन्दनैः ॥ १२ ॥ पिचुमर्दैः कोविदारैः सरलैः सुरदारुभिः । द्राक्षेक्षु रम्भाजम्बुभिः बदर्यक्षाभयामलैः ॥ १३ ॥ बिल्वैः कपित्थैर्जम्बीरैः वृतो भल्लातकादिभिः । तस्मिन्सरः सुविपुलं लसत्काञ्चनपंकजम् ॥ १४ ॥
बहरो फळ पुष्पांचा सदैव वृक्ष शोभले । गुलाब पारिजातो नी चंपा आंबे अशोक नी ॥ १० ॥ मंदार कैक जातीचे जांभळी फणसे तशी । सुपारी नारळी आणि मोसंबी ताड अर्जुन ॥ ११ ॥ आवळी खजुरा लिंबू रिठा पालाश चंदन । बेहडा खैर नी बेल औदुंबर नि पिंपळ ॥ १२ ॥ देवदारो नि रुद्राक्ष लिंबादी वृक्ष कैक ते ॥ १३ ॥ डौरुनी शोभती वृक्ष बारामास वटादिही । सोनेरी कमळे तेथे पुष्करीं शोभती बहू ॥ १४ ॥
नित्यं - नेहमी - दिव्यैः पुष्पफलद्रुमैः - स्वर्गीय अशी फुले, फळे व वृक्ष ह्यांनी - सर्वतः - सर्व ठिकाणी - अलङ्कृतं - शोभणारे - मंदारैः - मंदारवृक्षांनी - पारिजातैः - पारिजातक वृक्षांनी - च - आणि - पाटलाशोकचंपकैः - गुलाब, अशोक व चाफे यांनी चूतैः - आम्रवृक्ष - प्रियालैः - खिरणी - पनसैः - फणस - आम्रैः - आम्र - आम्रातकैः - आंबाडा - अपि - आणि - क्रमुकैः - पोफळी - नालिकेरैः - नारळ - खर्जूरैः - खजूर - च - आणि - बीजपूरकैः - महाळुंग - मधूकैः - मोह - सालतालैः - साल व ताड - च - आणि - तमालैः - तमाल - असनार्जुनैः - असाणा व अर्जुनसादडा - अरिष्टोदुंबरप्लक्षैः - रिठा, उंबर, पिंपरी - वटैः - वड - च - आणि - किंशुकचंदनैः - पळस व चंदन - पिचुमंदैः - लिंब - कोविदारैः - कोविदार - सरलैः - सरल - सुरदारुभिः - देवदार - द्राक्षेक्षुरम्भाजम्बूभिः - द्राक्ष, ऊस, केळी, जांभळी - बदर्यक्षाभयामलैः - बोरी, बेहडे, हिरडे, आवळी - बिल्वैः - बेल - कपित्थैः - कवठ - जंबीरैः - ईड - भल्लातकादिभिः - बिब्बे इत्यादिकांनी - वृतः - वेष्टिलेला - तस्मिन् - त्या पर्वतावर - सुविपुलं - अत्यंत विस्तृत - लसत्काञ्चनपङकजम् - सुवर्णकमळांनी शोभणारे - सरः - सरोवर ॥१०-१४॥
तेथे सगळीकडे नेहमी फळाफुलांनी बहरलेले दिव्य वृक्ष शोभत होते. त्या उद्यानात मंदार, पारिजात, गुलाब, अशोक, चाफे, आम्रवृक्ष, चार, फणस, आंबाडा, सुपारी, नारळ, खजूर, महाळुंग, मोह, सागवान, ताड, तमाल, असणा, अर्जुन, रिठा, औदुंबर, पिंपरी, वड, पळस, चंदन, लिंब, कांचन, साल, देवदार, द्राक्ष ऊस, केळी, जांभूळ, बोर, रुद्राक्ष, हरडा, आवळा, बेल, कवठ, इडलिंबू, बिब्बा इत्यादी वृक्ष डोलत होते. त्या उद्यानात एक मोठे सरोवर होते. त्यात सोनेरी कमळे उमललेली होती. (१०-१४)
कुमुदोत्पलकह्लार शतपत्रश्रियोर्जितम् ।
मत्तषट्पदनिर्घुष्टं शकुन्तैश्च कलस्वनैः ॥ १५ ॥ हंसकारण्डवाकीर्णं चक्राह्वैः सारसैरपि । जलकुक्कुटकोयष्टि दात्यूहकुलकूजितम् ॥ १६ ॥ मत्स्यकच्छपसञ्चार चलत्पद्मरजःपयः । कदम्बवेतसनल नीपवञ्जुलकैर्वृतम् ॥ १७ ॥ कुन्दैः कुरुबकाशोकैः शिरीषैः कूटजेङ्गुदैः । कुब्जकैः स्वर्णयूथीभिः नागपुन्नाग जातिभिः ॥ १८ ॥ मल्लिकाशतपत्रैश्च माधवीजालकादिभिः । शोभितं तीरजैश्चान्यैः नित्यर्तुभिरलं द्रुमैः ॥ १९ ॥
कुमुदोत्पल कल्हार शतपत्रादि पद्म ही । गुंजती मत्त भुंगे तै चक्रवाकादि हंस नी ॥ १५ ॥ थवे त्या सारसाचे नी बदके जल कुक्कुट । कोकीळ कूंजती नित्य जळीं मासे नि कासवे ॥ १६ ॥ फिरता हलता पद्म जळ गंधीत होतसे । कदंब वृक्ष वेलिंनी वेढिले वन सर्व ते ॥ १७ ॥ अशोक सोनचाफा नी कन्हेरी तुळशी तसे । अडुळसा शिसवी तैसे चमेली पारिजात नी ॥ १८ ॥ मोगरा मोतिया आदी शतपत्रादि वृक्ष ते । सदैव बहरो त्यांना शोभले ते सरोवर ॥ १९ ॥
कुमुदोत्पलकल्हारशतपत्रश्रिया - कुमुदे, उत्पले, कल्हारे व शतपत्रे ह्यांच्या शोभेने - ऊर्जितं - सुंदर दिसणारे - मत्तषट्पदनिर्घुष्टं - मत्त भ्रमरांनी घुमवून सोडिलेले - च - आणि - कलस्वनैः - मधुर शब्द करणार्या - शकुन्तैः - पक्ष्यांनी - हंसकारण्डवाकीर्णं - हंस व कारंडव यांनी गजबजून गेलेले - चक्राह्वैः - चक्रवाकांनी - सारसैः अपि - सारसपक्ष्यांनी सुद्धा - जलकुक्कुट - पाणकोंबडे, - कोयष्टिदात्यूहकुलकूजितं - टिटव्या दात्यूह ह्यांच्या समुदायांनी निनादित केलेले ॥१५-१६॥ मत्स्यकच्छपसंचार - मासे व कासवे यांच्या इकडेतिकडे फिरण्याने - चलत्पद्मरजःपयः - हलणार्या कमळातील रजःकणांनी ज्यातील उदक गढूळ झाले आहे असे - कदंबवेतसनलनीपवंजुलकैः - कळंब, वेत, वेळू, नीप, बकुळ यांनी - वृतं - वेष्टिलेले - कुन्दैः - कुंद - कुरबकाशोकैः - कोरंटी व अशोक - शिरीषैः - शिरीष - कुटजेंगुदैः - कुडे व हिंगणबेट - कुब्जकैः - कुब्जक - स्वर्णयूथीभिः - सोनजाई - नागपुन्नागजातिभिः - नागचाफा, पुन्नाग, व जाई - मल्लिक्काशतपत्रैः - मोगरे व शतपत्रे - च - आणि - माधवीजालकदिभिः - माधवी व जालक इत्यादि - च - आणि त्याचप्रमाणे - तीरजैः - काठावर उत्पन्न झालेल्या - अन्यैः - दुसर्या - नित्यर्तुभिः - सर्व ऋतूंत फळाफुलांनी भरलेल्या - द्रुमैः - वृक्षांनी - अलं - अत्यंत - शोभितं - शोभणारे ॥१७-१९॥
याशिवाय निरनिराळ्या जातीच्या कुमुद, उत्पल, कल्हार, शतदल, कमळांच्या सौंदर्याने ते शोभून दिसत होते. त्यांवर धुंद भुंगे गुंजारव करीत होते. पक्ष्यांचा मनोहर किलबिलाट चालू होता. तेथे हंस, कारंडव, चक्रवाक, आणि सारस पक्ष्यांचे थवे होते. पाणकोंबडा आणि चातक यांचे कूजन चालू होते. मासे आणि कासव यांच्या हालचालींमुळे कमळपुष्पे डोलत होती आणि त्यांचे झडलेले पराग पाणी सुगंधित करीत होते. कदंब, वेत, बोरू, कंदबवेल इत्यादि वृक्षांनी ते वेढलेले होते. कुंद, कोरांटी, अशोक, शिरीष, कुडा, हिंगणबेट, कटिशेवंती, सोनजुई, नागचाफा, पुन्नाग, जाई, मोगरा, शेवंती, कस्तुरमोगरा, कदंब इत्यादि पुष्पवृक्ष, तसेच तटावरील प्रत्येक ऋतूमध्ये हिरव्यागार राहणार्या इतर वृक्षांनी ते सरोवर अत्यंत शोभायमान दिसत असे. (१५-१९)
तत्रैकदा तद्गिरिकाननाश्रयः
करेणुभिर्वारणयूथपश्चरन् । सकण्टकं कीचकवेणुवेत्रवद् विशालगुल्मं प्ररुजन् वनस्पतीन् ॥ २० ॥
(इंद्रवज्रा) तेथेचि हत्ती अन हत्तिणीत गजेंद्र होता निवसोनि नित्य । तो कुंजरांचाचि अधीप तेथे झाडीत वेतां तुडवीत राही ॥ २० ॥
तत्र - त्या सरोवराच्या काठी - एकदा - एके दिवशी - तग्दिरिकाननाश्रयः - त्या पर्वतावरील अरण्यात राहणारा - वारणयूथपः - गजेंद्र - करेणुभिः - हत्तीणींसह - चरन् - संचार करीत - कीचकवेणुवेत्रवद्विशालगुल्मं - ध्वनि करणारे वेळू, कळक, वेत व त्यावर वेली चढून बनलेले विस्तीर्ण गुच्छ ह्यांना - सकंटकान् वनस्पतीन् - काटेरी झाडांना - प्ररुजन् - मोडून टाकीत ॥२०॥
तेथे एकदा त्या पर्वताच्या जंगलामध्ये अनेक हत्तिणींसह राहणारा एक गजेंद्र काटाकुट्यांनी भरलेल्या वेळू, बांबू, वेत, मोठमोठी झुडपे, झाडे यांना तुडवीत फिरत होता. (२०)
यद्गन्धमात्राद्धरयो गजेन्द्रा
व्याघ्रादयो व्यालमृगाः सखड्गाः । महोरगाश्चापि भयाद्द्रवन्ति सगौरकृष्णाः सरभाश्चमर्यः ॥ २१ ॥
गंधे तयाच्या वनराज व्याघ्र गेंडे नि हत्ती अन वानरे ती । ते सर्प दंशी अन रानगाई भिवोनि सारेचि पळोनि जाती ॥ २१ ॥
हरयः - सिंह - गजेंद्राः - मोठे हत्ती - व्याघ्रादयः - वाघ आदिकरून - सखङगः - गेंडयासह इतर पशु - व्यालमृगाः - सर्प व मृग - महोरगाः - मोठमोठे साप - सगौरकृष्णाः - गौर व कृष्णवर्णाचे पशु - शरभाः - शरभ - च - आणि - चमर्यः - वनगाई - यद्वन्धमात्रात् - ज्या गजेंद्राच्या मदाचा नुसता वास आला असता - अपि - सुद्धा - भयात् - भीतीमुळे - द्रवन्ति - पळत सुटतात. ॥२१॥
त्या मदरसाच्या नुसत्या वासाने मोठेमोठे सिंह, हत्ती, वाघ, गेंडे, चित्ते, मोठमोठे नाग, काळी-गोरी वानरे, वन-गाई वगैरे भिऊन पळून जात. (२१)
वृका वराहा महिषर्क्षशल्या
गोपुच्छशालावृकमर्कटाश्च । अन्यत्र क्षुद्रा हरिणाः शशादयः चरन्त्यभीता यदनुग्रहेण ॥ २२ ॥
त्याच्या कृपे कोल्हि कुत्री नि रेडे ती माकडे रीस नि सायळादी । ससे वराहो अन क्षुद्रजीव सर्वत्र संचारति निर्भयो की ॥ २२ ॥
क्षुद्राः - सामान्य - वृकाः - लांडगे - वराहाः - डुक्कर - महिषर्क्षशल्याः - रानरेडे, अस्वल व साळई - गोपुच्छसालावृकमर्कटाः - गाईसारखे शेपूट असणारे वानर, काळ्या तोंडाचे वानर, तांबडया तोंडाची माकडे - हरिणाः - हरिण - च - आणि - शशादयः - ससे आदिकरून क्षुद्र प्राणी - यदनुग्रहेण - ज्या गजेंद्राच्या कृपेने - अभीताः - भीतिरहित होऊन - अन्यत्र - दुसरीकडे - चरन्ति - फिरतात. ॥२२॥
आणि त्याच्या मर्जीने लांडगे, डुकरे, रेडे, अस्वले, साळी, वानर, कुत्री, माकडे, हरिण, ससे इत्यादि लहानसहान प्राणी निर्भयतेने वावरत असत. (२२)
स घर्मतप्तः करिभिः करेणुभिः
वृतो मदच्युत्कलभैरनुद्रुतः । गिरिं गरिम्णा परितः प्रकम्पयन् निषेव्यमाणोऽलिकुलैर्मदाशनैः ॥ २३ ॥ सरोऽनिलं पङ्कजरेणुरूषितं जिघ्रन् विदूरान् मदविह्वलेक्षणः । वृतः स्वयूथेन तृषार्दितेन तत् सरोवराभ्याशमथागमद् द्रुतम् ॥ २४ ॥
मागे तयाच्या पळती पिले नी हत्ती नि हत्तीणित घेरिला तो । धाके तयाच्या गिरि कंपवावे गंडस्थली गंधि सदैव भृंग ॥ २३ ॥ मदेचि नेत्री विव्हळोनि आला व्याकूळला तृष्णित होउनीया । पराग गंधा मग हुंगिता तो आला त्वरेनेचि सरोवरी त्या ॥ २४ ॥
घर्मतप्तः - उन्हाने तापलेला - मदच्युत् - मद गाळणारा - करिभिः - गजांनी - करेणुभिः - हत्तिणींनी - वृतः - वेष्टिलेला - कलभैः - छाव्यांनी - अनुद्रुतः - अनुसरलेला असा - गरिम्णा - प्रचंडपणाने - गिरिं - त्रिकूट पर्वताला - परितः - सभोवार - प्रकंपयन् - कांपवीत - मदाशनैः - मद भक्षण करणार्या - अलिकुलैः - भ्रमरसमूहांनी - निषेव्यमाणः - सेविलेला - पङकजरेणुरूषितं - कमळतंतूंनी भरलेल्या - सरोऽनिलं - सरोवरांतील वायूचा - विदूरात् - लांबून - जिघ्रन् - वास घेणारा - मदविह्वलेक्षणः - ज्याचे नेत्र मदाने विव्हल झाले आहेत असा - तृषार्दितेन - तहानेने पीडिलेल्या - स्वयूथेन - आपल्या कळपाने - वृतः - वेष्टिलेला - सः - तो - गजेंद्रः - गजेंद्र - द्रुतं - लवकरच - तत्सरोवराभ्याशं - त्या सरोवराजवळ - अगमत् - आला. ॥२३-२४॥
हत्तीची वयात येणारी पिल्ले उन्हाने व्याकूळ झालेल्या त्याच्या पाठोपाठ येत होती. मोठमोठे हत्ती आणि हत्तिणी सुद्धा त्याच्याभोवती कडे करून चालल्या होत्या. त्याच्या प्रचंड शरीरामुळे पहाड सर्व बाजूंनी कापत होता. त्याच्या गंडस्थळातून स्रवणार्या मदाचे पान करण्यासाठी भ्रमर त्याच्या भोवती घिरट्या घालीत होते. लांबूनच कमळाच्या परागांनी सुगंधित झालेला वारा हुंगून त्याचे डोळे मदधुंद झाले होते. त्याला आणि त्याच्या कळपाला अतिशय तहान लागलेली होती. म्हणून तो लगबगीने सरोवराजवळ गेला. (२३-२४)
विगाह्य तस्मिन् अमृताम्बु निर्मलं
हेमारविन्दोत्पलरेणुवासितम् । पपौ निकामं निजपुष्करोद्धृतं आत्मानमद्भिः स्नपयन्गतक्लमः ॥ २५ ॥
सुधेपरी निर्मल तोय ते नी गंधीत तैसे अतिगोड होते । शुंडी भरोनी बहु तो पिला नी स्नाना करोनी मग शांत झाला ॥ २५ ॥
तस्मिन् - त्या सरोवरांमध्ये - विगाह्य - शिरून - अद्भिः - पाण्यांनी - आत्मानं - स्वतःला - स्नपयन् - स्नान घालून - गतक्लमः - श्रमरहित झालेला असा होत्साता - निजपुष्करोद्धृतं - आपल्या सोंडेने घेतलेले - हेमारविन्दोत्पलरेणुवासितं - सुवर्णकमळांतील सुगंधयुक्त तंतूंनी सुवासित झालेले - निर्मलं - स्वच्छ - अमृताम्बु - गोड उदक - निकामं - यथेच्छ - पपौ - प्याला. ॥२५॥
त्या सरोवराचे पाणी अत्यंत निर्मळ आणि अमृताप्रमाणे मधुर होते. सोनेरी आणि शुभ्र कमळांच्या परागांनी ते सुगंधित झाले होते. हत्ती अगोदर तेथे घुसून आपल्या सोंडेन भरपूर पाणी प्याला. नंतर त्या पाण्यात डुंबून त्याने आपला थकवा घालविला. (२५)
स पुष्करेणोद्धृतशीकराम्बुभिः
निपाययन् संस्नपयन्यथा गृही । घृणी करेणुः करभांश्च दुर्मदो नाचष्ट कृच्छ्रं कृपणोऽजमायया ॥ २६ ॥
गजेंद्र चित्ती तयि मोहिला नी जलें पिलांना मग न्हाउ घाली । हरिकृपेने ययि मत्त झाला न जाणि की संकट पातले ते ॥ २६ ॥
स्वपुष्करेण - आपल्या सोंडेने - उद्धृतसीकराम्बुभिः - घेतलेल्या थंड जलाने - करेणूः - हत्तिणींना - च - आणि - कलभान् - छाव्यांना - निपाययन् - पाणी पाजणारा - संस्नपयन् - स्नान घालणारा - घृणी - दयाळू - दुर्मदः - मदोन्मत्त - कृपणः - गरीब बिचारा - गजः - हत्ती - अजमायया - भगवंताच्या कृपेने - कृच्छ्रं - येणार्या संकटाला - न आचष्ट - पाहता झाला नाही. ॥२६॥
गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे मायेने तो हत्ती आपल्या सोंडेने पाण्याचे फवारे उडवीत आपल्या बरोबरच्या हत्तिणी आणि पिल्लांना न्हाऊ घालू लागला. तसेच त्यांच्या तोंडात आपली सोंड घालून त्यांना पाणी पाजू लागला. भगवंतांच्या मायेने अजाण बनलेल्या उन्मत्त गजेंद्राला आपल्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे याची कल्पनाही नव्हती. (२६)
तं तत्र कश्चिन्नृप दैवचोदितो
ग्राहो बलीयांश्चरणे रुषाग्रहीत् । यदृच्छयैवं व्यसनं गतो गजो यथाबलं सोऽतिबलो विचक्रमे ॥ २७ ॥
असा गजेंद्रो बहु माजला नी क्रोधेचि नक्रे धरिले तयाला । विपत्ति ऐसी बघताच शक्ती लावीयली पै नच तो सुटे की ॥ २७ ॥
नृप - हे परीक्षित राजा - तत्र - त्या ठिकाणी - कश्चित् - कोणीएक - दैवचोदितः - दैवाने पाठविलेला - बलीयान् - बलाढय - ग्राहः - नक्र - तं - त्या गजाला - रुषा - रागाने - चरणे - पायाच्या ठिकाणी - अग्रहीत् - धरिता झाला - यदृच्छया - विधिवशात - एवं - याप्रमाणे - व्यसनं - संकटाला - गतः - प्राप्त झालेला - अतिबलः - अत्यंत बळकट असा - सः - तो - गजः - गज - यथाबलं - यथाशक्ती - विचक्रमे - नक्राच्या हातून सुटण्याकरिता पराक्रम करू लागला. ॥२७॥
परीक्षिता, त्याचवेळी त्याच्या प्रारब्धामुळे एका बलाढ्य मगराने त्याचा पाय पकडला. अशा तर्हेने योगायोगाने संकटात सापडलेल्या त्या अत्यंत बलवान गजेंद्राने आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. (२७)
तथाऽऽतुरं यूथपतिं करेणवो
विकृष्यमाणं तरसा बलीयसा । विचुक्रुशुर्दीनधियोऽपरे गजाः पार्ष्णिग्रहास्तारयितुं न चाशकन् ॥ २८ ॥
स्वामी असा तो अति संकटात पाहूनि सारे गज दुःखि झाले । मुक्त्यर्थ सारे झटले बहू ही तरी न झाला उपयोग कांही ॥ २८ ॥
दीनधियः - दीनवाण्या - करेणवः - हत्तिणी - बलीयसा - बलाढय नक्राने - तरसा - वेगाने - तथा - त्याप्रमाणे - विकृष्यमाणं - ओढिल्या जाणार्या - आतुरं - पीडिलेल्या - यूथपतिं - गजेंद्राला उद्देशून - विचुक्रुशुः - आक्रोश करित्या झाल्या - च - आणि - अपरे - दुसरे - पार्ष्णिग्रहाः - पाठिराखे - गजाः - गज - तारयितुं - सोडविण्यास - न अशकन् - समर्थ झाले नाहीत. ॥२८॥
दुसरे हत्ती, हत्तिणी आणि त्यांच्या पिल्लांनी पाहिले की, त्यांच्या स्वामीला एक बलवान मगर मोठ्या वेगाने ओढून नेत आहे आणि तो अत्यंत घाबरलेला आहे. त्यांना अतिशय दुःख झाले. ते चित्कार करू लागले. पुष्कळांनी त्याला ओढून पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ते असमर्थ ठरले. (२८)
नियुध्यतोरेवमिभेन्द्रनक्रयोः
विकर्षतोरन्तरतो बहिर्मिथः । समाः सहस्रं व्यगमन् महीपते सप्राणयोश्चित्रममंसतामराः ॥ २९ ॥
लावोनि शक्ती गज-नक्र ठेले गजेंद्र ओढी कधि नक्रराजा । नक्रे कधी त्या गजराजियाला हजार वर्षे लढण्यात गेली । जिवंत दोघे तरि तेथ होते देखोनि देवा नवलाव झाला ॥ २९ ॥
महीपते - हे परीक्षित राजा - एवं - याप्रमाणे - नियुद्ध्यतोः - युद्ध करणारे - सप्राणयोः - बलाढय - इभेंद्रनक्रयोः - गजेंद्र व नक्र - अंतरतः - आत - च - आणि - बहिः - बाहेर - मिथः - एकमेकांना - विकर्षतोः - ओढीत असता - सहस्त्रं - हजार - समाः - वर्षे - व्यगमन् - निघून गेली - अमराः - देव - चित्रं - आश्चर्य - अमंसत - मानिते झाले. ॥२९॥
गजेंद्र आणि मगर आपापली संपूर्ण शक्ती पणाला लावून झुंजत होते. कधी गजेंद्र मगराला बाहेर ओढीत होता तर कधी मगर गजेंद्राला आत ओढीत होता. परीक्षिता, अशा प्रकारे झुंज चालू असता एक हजार वर्षे निघुन गेली. तरीही दोघेजण जिवंत होते, हे पाहून देवसुद्धा आश्चर्यचकित झाले. (२९)
ततो गजेन्द्रस्य मनोबलौजसां
कालेन दीर्घेण महानभूद् व्ययः । विकृष्यमाणस्य जलेऽवसीदतो विपर्ययोऽभूत् सकलं जलौकसः ॥ ३० ॥
लढ्यात ऐशा गज क्षीण झाला जळात नक्रा बळ वाढले की । उत्साह त्याचा बहु वाढला नी लावोनि शक्ती अति ओढु लागे ॥ ३० ॥
ततः - नंतर - दीर्घेण कालेन - पुष्कळ काळपर्यंत - जले - पाण्यात - विकृष्यमाणस्य - ओढिला गेल्यामुळे - अवसीदतः - दुःख पावलेल्या - गजेन्द्रस्य - गजेंद्राच्या - मनोबलौजसां - मानसिक शक्ति, इंद्रियशक्ती व शारीरिक शक्ति ह्यांचा - महान् - मोठा - व्ययः - नाश - अभूत् - झाला - जलौकसः - नक्राचे - सकलं - सगळे - विपर्ययः - गजेंद्राच्या उलट - अभूत् - झाले. ॥३०॥
पुष्कळ् काळपर्यंत वारंवार पाण्यात ओढला गेल्यामुळे शेवटी गजेंद्राचे शरीर थकले. त्याच्या शरीरात ताकद राहिली नाही की, मनामध्ये उत्साह राहिला नाही. इकडे मगर जलचरच होता. असे असल्याने त्याची शक्ति क्षीण होण्याऐवजी वाढली. (३०)
इत्थं गजेन्द्रः स यदाप संकटं
प्राणस्य देही विवशो यदृच्छया । अपारयन्नात्मविमोक्षणे चिरं दध्याविमां बुद्धिमथाभ्यपद्यत ॥ ३१ ॥
देहाभिमानी मग तो गजेंद्र त्या संकटी तै असमर्थ झाला । करोनि यत्नो बहु त्या गजेंद्रे मनात अंती उपयोजिले की ॥ ३१ ॥
देही - देहधारी - विवशः - परतंत्र - सः - तो - गजेन्द्रः - गजेंद्र - यदृच्छया - दैवयोगाने - इत्थं - याप्रमाणे - यदा - जेव्हा - प्राणस्य - प्राणावर आलेल्या - संकटं - संकटाला - आप - प्राप्त झाला - आत्मविमोक्षणे - स्वतःला सोडविण्याविषयी - अपारयन् - असमर्थ होऊन - चिरं - पुष्कळ काळपर्यंत - दध्यौ - विचार करीत राहिला - अथ - नंतर - इमां बुद्धिं - ह्या विचाराला - अभ्यपद्यत - प्राप्त झाला. ॥३१॥
अशा प्रकारे शरीरबलाचा अभिमान असणारा तो गजेंद्र एकाएकी प्राणसंकटात सापडला आणि स्वतःला सोडवून घेण्यात जेव्हा असमर्थ ठरला, तेव्हा आपल्या सुटकेच्या उपायावर त्याने पुष्कळ विचार केला. शेवटी त्याने ठरविले. (३१)
न मामिमे ज्ञातय आतुरं गजाः
कुतः करिण्यः प्रभवन्ति मोचितुम् । ग्राहेण पाशेन विधातुरावृतोऽपि अहं च तं यामि परं परायणम् ॥ ३२ ॥
हा नक्र आहे हरिचाच फास बलिष्ट साथी हत शक्त झाले । तो हत्तिणी त्या करतील काय ॥ ३२ ॥
इमे - हे - ज्ञातयः - जातभाई - गजाः - गज - आतुरं - पीडिलेल्या - मां - मला - मोचितुं - सोडविण्यास - न प्रभवन्ति - समर्थ होत नाहीत - करिण्यः - हत्तिणी - कुतः (प्रभवन्ति) - कशा समर्थ होतील - च - आणि - विधातुः - दैवाचा - पाशेन - पाश अशा - ग्राहेण - नक्राने - आवृतःअपि - वेष्टिलेला असताहि - अहं - मी - परायणं - श्रेष्ठ अशा - तं - त्या - परं - परमेश्वराला - यामि - जातो. ॥३२॥
हा मगर म्हणजे विधात्याने मला लावलेला फासच आहे. याने मी कासावीस झालो आहे. हे माझे बांधव हत्तीसुद्धा जर मला या संकटातून सोडवू शकत नाहीत, तर या बिचार्या हत्तिणी कोठून सोडवू शकतील ? म्हणून आता मी परमेश्वरालाच शरण जातो. (३२)
यः कश्चनेशो बलिनोऽन्तकोरगात्
प्रचण्डवेगादभिधावतो भृशम् । भीतं प्रपन्नं परिपाति यद्भयात् मृत्युः प्रधावत्यरणं तमीमहि ॥ ३३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां अष्टमस्कन्धे मन्वन्तरानुवर्णने गजेन्द्रोपाख्याने द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
तो काळसर्पो गिळण्यास धावे भयेहि ध्याता हरि नक्कि पावे । मृत्यू सुखाने स्मरता तया ये सर्वाश्रयो त्या प्रभुसी नमी मी ॥ ३३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ दुसरा अध्याय हा ॥ ८ ॥ २ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
यः - जो - कश्चन - कोणी - ईशः - परमेश्वर - बालिनः - बलाढय अशा - प्रचण्डवेगात् - मोठया वेगवान अशा - भृशं - अत्यंत - अभिधावतः अंतकोरगात् - धावणार्या मृत्यूरूपी सर्पापासून - भीतं - भ्यालेल्या - प्रपन्नं - शरणागतास - परिपाति - रक्षितो - यद्भयात् - ज्याच्या भयाने - मृत्यूः - मृत्यु - प्रधावति - पळतो - तं - त्याला - शरणं - शरण - ईमहि - जातो. ॥३३॥
अत्यंत प्रचंड वेगाने धावणार्या काळरूप सर्पाला भिऊन जो कोणी शरण येतो, त्याला जो वाचवतो, तसेच ज्याच्या भितीने मृत्यूसुद्धा आपले काम करतो, तो जो कोणी जगदीश्वर असेल, त्यालाच मी शरण आहे. (३३)
स्कंध आठवा - अध्याय दुसरा समाप्त |