|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  देशाकालादि विशेषेण गृहस्थधर्मनिरूपणम् - गृहस्थाचे सदाचार - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
युधिष्ठिर उवाच -  गृहस्थ एतां पदवीं विधिना येन चाञ्जसा । याति देवऋषे ब्रूहि मादृशो गृहमूढधीः ॥ १ ॥ 
राजा युधिष्ठिराने विचारले -  (अनुष्टुप्) माझ्या ऐशा गृहस्थाला सहजी साध्य हे कसे । देवर्षी कृपया सांगा प्राप्त्यर्थ काय साधणे ॥१॥ 
देवऋषे -  हे नारदा - मादृशः च गृहमूढघीः - गृहस्थः -  माझ्यासारखा घरात आसक्त झाले आहे मन ज्याचे असा गृहस्थ - एतां पदवीं -  ह्या मार्गाला - येन विधिना -  ज्या रीतीने - अंजसा याति (तं) ब्रूहि -  सत्त्वर प्राप्त होतो तो विधि सांगा. ॥ १ ॥ 
 
युधिष्ठिराने विचारले – हे देवर्षी, माझ्यासारखा गृहासक्त माणूस सहजपणे कोणत्या साधनाने हे पद प्राप्त करू शकेल ? (१) 
 
श्रीनारद उवाच -  गृहेष्ववस्थितो राजन् क्रियाः कुर्वन्यथोचिताः । वासुदेवार्पणं साक्षाद् उपासीत महामुनीन् ॥ २ ॥ 
नारदजी म्हणाले - राजा ! गृहस्थधर्माने गृहस्थे वागणे असे । कृष्णार्पण असो बुद्धी संतसेवा घडो सदा ॥२॥ 
राजन् -  हे राजा - गृहेषु अवस्थितः -  घरात राहणार्या पुरुषाने - गृहोचिताः क्रियाः कुर्वन् -  गृहस्थाश्रमाला योग्य अशी क्रिया करीत - साक्षात् वासुदेवार्पणं (कृत्वा) -  प्रत्यक्ष परमेश्वराला अर्पण करून - महामुनीन् उपासीत् -  मोठमोठया ऋषींची सेवा करावी. ॥ २ ॥ 
 
नारद म्हणाले – राजा ! मनुष्याने गृहस्थाश्रमात गृहस्थधर्मानुसार सगळी कामे करून ती भगवंतांना समर्पण करावीत आणि महात्म्यांची सेवा करावी. (२) 
 
श्रृण्वन्भगवतोऽभीक्ष्णं अवतारकथामृतम् । श्रद्दधानो यथाकालं उपशान्तजनावृतः ॥ ३ ॥ 
विरक्तसंगमी जावे आकाशापरि मोकळे । भगवद्लीला -सुधापान श्रद्धेने करणे सदा ॥३॥ 
श्रद्दधानं -  श्रद्धायुक्त होत्साता - यथाकालं उपशांतजनावृतः -  यथाकाली विरक्त पुरुषांना बरोबर घेऊन - अभीक्ष्णं -  वारंवार - भगवतः अवतारकथामृतं शृण्वन् -  परमेश्वराचे अवतारचरित्ररूपी अमृत श्रवण करीत. ॥ ३ ॥ 
 
सवडीप्रमाणे विरक्त पुरुषांबरोबर वारंवार श्रद्धापूर्वक भगवंतांच्या अवतारांच्या कथामृताचे पान करीत राहावे. (३) 
 
सत्सङ्गाच्छनकैः सङ्गं आत्मजायात्मजादिषु । विमुञ्चेन् मुच्यमानेषु स्वयं स्वप्नवदुत्थितः ॥ ४ ॥ 
भंगता स्वप्न ना होतो मोह वस्तूत स्वप्निच्या । तशी शुद्ध मती व्हावी नाशवंतचि सर्व हे ॥४॥ 
सत्संगात् शनकैः -  सत्संगाने हळू हळू - आत्मजायात्मजादिषु संगं विमुच्येत् -  शरीर, स्त्री, पुत्र इत्यादिकांविषयीचा संग सोडावा - (तेषु) मुच्यमानेषु -  त्यांचा संग सुटत असता - स्वयं स्वप्नवत् उत्थितः (भवति) -  स्वतः स्वप्नातून जणु उठतो. ॥ ४ ॥ 
 
जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नातील गोष्टींशी आसक्त राहत नाही, तसेच सत्संगाने जसजशी बुद्धी शुद्ध होत जाईल, तसतशी आपोआप सुटणार्या शरीर, स्त्री, पुत्र इत्यादींची आसक्ती आपणहून सोडावी. (४) 
 
यावद् अर्थमुपासीनो देहे गेहे च पण्डितः । विरक्तो रक्तवत् तत्र नृलोके नरतां न्यसेत् ॥ ५ ॥ 
बुद्धिवंते तनू गेहा गरजेपुरते बघो । विरक्त राहणे चित्ती बाह्य सामान्य राहणे ॥५॥ 
देहे गेहे च -  देह आणि घर याठिकाणी - यावदर्थं उपासीनः पंडितः -  कामापुरता संबंध ठेवणार्या ज्ञानी पुरुषाने - विरक्तः (सन्) रक्तवत् -  विरक्त असताहि आसक्ताप्रमाणे - तत्र नृलोके -  त्या मनुष्यलोकात - नरतां न्यसेत् -  मनुष्यपणाच ठेवावा. ॥ ५ ॥ 
 
बुद्धिमान पुरुषाने आवश्यक तेवढीच घर आणि शरीर यांची काळजी घ्यावी. अधिक नको. आतून विरक्त राहून बाहेरून विषयासक्त असल्याप्रमाणे लोकांमध्ये व्यवहार करावा. (५) 
 
ज्ञातयः पितरौ पुत्रा भ्रातरः सुहृदोऽपरे । यद् वदन्ति यदिच्छन्ति चानुमोदेत निर्ममः ॥ ६ ॥ 
पितरे बंधुपुत्रादी तयांच्यापरि वागणे । परी आत नको माया सर्वांशी वागणे असो ॥६॥ 
निर्ममः च (भूत्वा) -  आणि ममत्व सोडून - ज्ञातयः पितरौ -  ज्ञातिजन, आईबाप, - पुत्राः भ्रातरः अपरे सुहृदः -  पुत्र, भाऊ आणि दुसरे इष्टमित्र - यत् वदंति -  जे म्हणतील - यत् इच्छंति -  जे इच्छितील - (तत्) अनुमोदेत -  त्याला अनुमोदन द्यावे. ॥ ६ ॥ 
 
माता-पिता, बंधू-बांधव, पुत्र-मित्र आणि दुसरे जे काही म्हणतील किंवा जे काही इच्छितील, त्याला आतून ममता न ठेवता होकार द्यावा. (६) 
 
दिव्यं भौमं चान्तरीक्षं वित्तं अच्युतनिर्मितम् । तत्सर्वं उपयुञ्जान एतत्कुर्यात् स्वतो बुधः ॥ ७ ॥ 
लाभता अन्न नी सोने ईशाची देण मानणे । भोगता नच तो संच साधूसेवा घडो सदा ॥७॥ 
दिव्यं -  स्वर्गातील वृष्टि होऊन उत्पन्न झालेले धान्य, - भौमं -  भूमीतील ठेव - अंतरिक्षं च वित्तं -  आणि आपोआप मिळालेले द्रव्य - अच्युतनिर्मितं (अस्ति) -  परमेश्वराने निर्माण केलेले होय - बुधः तत् सर्वं स्वतः उपभुंजानः -  त्या सर्वाचा उपभोग घेणार्या ज्ञानी मनुष्याने - एतत् कुर्यात् -  ही कर्मे करावी. ॥ ७ ॥ 
 
बुद्धिमान पुरुषाने पाऊस वगैरेमुळे उत्पन्न होणारे अन्न वगैरे, पृथ्वीपासून उत्पन्न होणारे सोने इत्यादी, तसेच अकस्मात प्राप्त होणारे द्रव्य इत्यादी सर्व भगवंतांनीच दिले आहे असे समजून प्रारब्धानुसार त्याचा उपभोग घ्यावा व उरलेल्याचा सत्कृत्यात उपयोग करावा. (७) 
 
यावद् भ्रियेत जठरं तावत् स्वत्वं हि देहिनाम् । अधिकं योऽभिमन्येत स स्तेनो दण्डमर्हति ॥ ८ ॥ 
अधिकार जिवाचा तो पोटाच्या पुरता असे । अधीक संचित द्रव्य चोर तो दंडितीच त्यां ॥८॥ 
यावत् जठरं ध्रियेत -  जेवढयाने पोट भरेल - तावत् देहिनां स्वत्वं (अस्ति) -  तेवढेच मनुष्याचे स्वतःचे होय - हि यः अधिकं अभिमन्येत -  याकरिता जो यापेक्षा अधिकाचा अभिमान करतो - सः स्तेनः -  तो चोर - दंडं अर्हति -  दंडाला पात्र आहे. ॥ ८ ॥ 
 
जेवढ्यावर भूक भागेल, तेवढ्यावरच मनुष्याचा अधिकार आहे. यापेक्षा अधिक संपत्ती जो आपली आहे, असे मानतो, तो चोर होय. तो शिक्षेला पात्र ठरतो. (८) 
 
मृगोष्ट्रखरमर्काखु सरीसृप्खगमक्षिकाः । आत्मनः पुत्रवत्पश्येत् तैरेषामन्तरं कियत् ॥ ९ ॥ 
मृग उंट गधे चूहे सर्पादि पक्षि कीटही । पुत्राच्या परि ते माना न भेद मुळि त्या द्वयीं ॥९॥ 
मृगोष्ट्रखरमर्काखुसरीसृप्खगमक्षिकः -  हरिण, उंट, गाढव, माकडे, उंदीर, साप, पक्षी आणि माशा यांना - आत्मनः पुत्रवत् पश्येत् -  आपल्या मुलाप्रमाणे पाहावे - तैः एषां अंतरं कियत् (अस्ति) -  पुत्रामध्ये आणि ह्यांच्यात कितीसा भेद आहे. ॥ ९ ॥ 
 
हरीण, उंट, गाढव, वानर, उंदीर, सरपटणारे प्राणी, पक्षी, माशी इत्यादींना आपल्या पुत्राप्रमाणेच समजावे. तसे पाहाता त्यांच्यात आणि पुत्रात काय फरक आहे ? (९) 
 
त्रिवर्गं नातिकृच्छ्रेण भजेत गृहमेध्यपि । यथादेशं यथाकालं यावद् दैवोपपादितम् ॥ १० ॥ 
धर्मार्थ काम यांच्यात न कष्ट पडती बहू । परी दैवे जसे लाभे त्यात संतुष्ट राहणे ॥१०॥ 
गृहमेधी अपि -  गृहस्थाश्रमाने सुद्धा - त्रिवर्गं अतिकृच्छ्रेण न भजेत् -  धर्म, अर्थ व काम ह्यांना मोठया कष्टाने सेवन करू नये - यथादेशं यथाकालं -  ज्या स्थली व ज्या काळी - यावत् दैवोपपादितं (भजेत्) -  जेवढे दैवाने प्राप्त होईल तेवढेच सेवावे. ॥ १० ॥ 
 
गृहस्थाश्रमी मनुष्यानेसुद्धा धर्म, अर्थ आणि काम यांच्यासाठी फार कष्ट करू नयेत. परंतु देश, काल आणि प्रारब्धानुसार जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असावे. (१०) 
 
आश्वाघान्तेऽवसायिभ्यः कामान् सविभजेद् यथा । अप्येकामात्मनो दारां नृणां स्वत्वग्रहो यतः ॥ ११ ॥ 
कुत्रे चांडाळ पाप्यांना योग्य तो भाग अर्पुनी । लागावे आपुल्या कामा सपत्नी अतिथी पुजा ॥११॥ 
आश्वाघान्तेऽवसायिभ्यः -  कुत्रे, पतित, चांडाळ ह्या सर्वांना - यथावत् कामान् संविभजेत् -  योग्य रीतीने इष्ट असे अन्न वाटून द्यावे - यतः नृणां स्वत्वग्रहः (अस्ति) -  जिच्या ठिकाणी मनुष्यांना आपलेपणाचा मोठा अभिमान असतो - एकां आत्मनः दारां अपि -  आपली एकुलती एक बायको सुद्धा. ॥ ११ ॥ 
 
आपल्याकडील सर्व सामग्री कुत्री, पतित, चांडाळ इत्यादी सर्व प्राण्यांना यथायोग्य वाटून नंतरच स्वत: उपयोगात आणावी. एवढेच काय, जिला मनुष्य आपली समजतो, त्या आपल्या पत्नीलासुद्धा अतिथी इत्यादींच्या निर्दोष सेवेत लावावे. (११) 
 
जह्याद्यदर्थे स्वप्राणान् हन्याद्वा पितरं गुरुम् । तस्यां स्वत्वं स्त्रियां जह्याद् यस्तेन ह्यजितो जितः ॥ १२ ॥ 
स्त्रियेशी अर्पिती लोक स्वप्राण ! पितरे गुरू । यांनाही मारिती ठार ममता सोडि साधु तो ॥१२॥ 
यदर्थे स्वप्राणान् जह्यात् -  जिच्याकरिता आपण प्राण देतो - वा पितरं गुरुं हन्यात् -  अथवा बापाला व गुरूला मारितो - तस्यां स्त्रियां -  अशा स्त्रीच्या ठिकाणी - यः स्वत्वं जह्यात् -  जो आपलेपणा सोडतो - तेन अजितः हि जितः (स्यात्) -  त्याने दुसर्या कोणीही न जिंकलेला असा परमेश्वरही जिंकला आहे असे समजावे. ॥ १२ ॥ 
 
जिच्यासाठी लोक प्राणसुद्धा देतात, प्रसंगी आपले आई-बाप आणि गुरूलासुद्धा मारतात, त्या पत्नीवरचे प्रेम ज्याने काढून घेतले, त्याने नित्यविजयी भगवंतांवरसुद्धा विजय मिळविला असे समजावे. (१२) 
 
कृमिविड्भस्मनिष्ठान्तं क्वेदं तुच्छं कलेवरम् । क्व तदीयरतिर्भार्या क्वायमात्मा नभश्छदिः ॥ १३ ॥ 
राखेचा ढीग विष्ठा किडेही तनु भक्षिती । तिची आसक्ति सोडावी आत्म्यासी पाहणे सदा ॥१३॥ 
कृमिविड्भस्मनिष्ठांतं -  किडे, विष्ठा व भस्म यात अंत होणारे - इदं तुच्छं कलेवरं क्व -  हे तुच्छ शरीर कोणीकडे - तदीयरतिः भार्या क्व -  ह्या शरीराचे सुखस्थान अशी स्त्री कोणीकडे - अयं नभच्छदिः आत्मा (च) क्व -  आणि आकाशाला आच्छादणारा आत्मा कोणीकडे. ॥ १३ ॥ 
 
शेवटी किडे, विष्ठा किंव राखेचा ढीग होऊन जाणारे हे तुच्छ शरीर कोठे आणि यासाठी जिच्याविषयी आसक्ती असते ती स्त्री कोठे आणि आपल्या महिम्याने आकाशालाही झाकून टाकणारा हा आत्मा कोठे ? (१३) 
 
सिद्धैर्यज्ञावशिष्टार्थैः कल्पयेद् वृत्तिमात्मनः । शेषे स्वत्वं त्यजन् प्राज्ञः पदवीं महतामियात् ॥ १४ ॥ 
शेष जो पंच यज्ञाचा गृहस्थे तोचि भक्षिणे । राखणे तेवढे स्वत्व मानावा तोचि संत की ॥१४॥ 
प्राज्ञः -  सुज्ञ मनुष्याने - सिद्धैः यज्ञावशिष्ठार्थैः -  सिद्ध केलेल्या अशा यज्ञ करून उरलेल्या अन्नाने - आत्मनः वृत्तिं कल्पयेत् -  आपला चरितार्थ चालवावा - शेषे स्वत्वं त्यजन् -  बाकींच्यावरील स्वत्व सोडणारा मनुष्य - महतां पदवीं इयात् -  परमहंसाच्या पदवीला प्राप्त होतो. ॥ १४ ॥ 
 
प्रारब्धाने प्राप्त झालेल्या आणि पंचमहायज्ञ इत्यादीतून उरलेल्या अन्नानेच गृहस्थाने आपला उदरनिर्वाह करावा. जो बुद्धिमान पुरुष याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूमध्ये माझेपण ठेवीत नाही, त्याला संतपद प्राप्त होते. (१४) 
 
देवानृषीन् नृभूतानि पितॄनात्मानमन्वहम् । स्ववृत्त्यागतवित्तेन यजेत पुरुषं पृथक् ॥ १५ ॥ 
देवता ऋषि नी पित्रे माणसे भूत आणि तो । स्वप्राण पूजिणे रोज प्राप्त सामग्रि योजुनी ॥१५॥ 
अन्वहं स्ववृत्त्यागतवित्तेन -  प्रतिदिनी आपल्या धंद्यात जे द्रव्य मिळेल त्याने - देवान् ऋषीन् नृभूतानि -  देव, ऋषी, मनुष्य, भूते, - पितृन् आत्मानं पृथक् पुरुषं -  पितर आणि स्वतःच अंतर्यामी असा सर्वांहून परमात्मा यांना निरनिराळे - यजेत् -  पूजावे. ॥ १५ ॥ 
 
आपल्या वर्णाश्रमानुसार असलेल्या व्यवसायाने मिळालेल्या सामग्रीने दररोज देव, ऋषी, मनुष्य, भूत, पितृगण आणि आपल्या आत्म्याचे पूजन करावे. एकाच परमेश्वराची वेगवेगळ्या रूपांतील ही आराधना होय. (१५) 
 
यर्ह्यात्मनोऽधिकाराद्याः सर्वाः स्युर्यज्ञसम्पदः । वैतानिकेन विधिना अग्निहोत्रादिना यजेत् ॥ १६ ॥ 
सामर्थ्य असता थोर श्रेष्ठ ते यज्ञ योजुनी । अथवा अग्निहोत्राने पूजावा भगवान् हरी ॥१६॥ 
यहिं आत्मनः अधिकाराद्याः -  जर स्वतःच्या अधिकारादिक - सर्वाः यज्ञसंपदः स्युः -  सर्व यज्ञसंपत्ति असतील - वैतानिकेन अग्निहोत्रादिना विधिना -  यज्ञासंबंधी अग्निहोत्रादि विधीने - यजेत् -  अनुष्ठान करावे. ॥ १६ ॥ 
 
जर आपला अधिकार इत्यादी आणि यज्ञासाठी आवश्यक सर्व वस्तू प्राप्त झाल्या, तर मोठ मोठे यज्ञ किंवा अग्निहोत्र इत्यादी करून भगवंतांची आराधना करावी. (१६) 
 
न ह्यग्निमुखतोऽयं वै भगवान् सर्वयज्ञभुक् । इज्येत हविषा राजन् यथा विप्रमुखे हुतैः ॥ १७ ॥ 
भगवान् सर्व यज्ञाच्या हविष्यान्नेचि तृप्त हो । परी द्विजमुखाने तो विशेष तृप्त होतसे ॥१७॥ 
राजन् -  हे राजा - अयं सर्वयज्ञभुक् भगवान् -  हा सकलयज्ञभोक्ता परमेश्वर - विप्रमुखे हुतैः -  ब्राह्मणांच्या मुखी हवन केलेल्या अन्नाने - यथा हि इज्येत (तथा) -  जसा खरोखर पूजिला जातो तसा - अग्निमुखतः हविषा न वै -  अग्निमुखी हवन केलेल्या अन्नाने निश्चये करून होत नाही. ॥ १७ ॥ 
 
राजा, सर्व यज्ञांचे भोक्ते भगवंतच आहेत. परंतु ब्राह्मणाच्या मुखात अर्पण केलेल्या अन्नाने त्यांची जशी तृप्ती होते, तशी अग्निमुखात हवन केल्यानेही होत नाही. (१७) 
 
तस्माद् ब्राह्मणदेवेषु मर्त्यादिषु यथार्हतः । तैस्तैः कामैर्यजस्वैनं क्षेत्रज्ञं ब्राह्मणाननु ॥ १८ ॥ 
म्हणोनी योग्य वस्तूंनी देवतादीमधील तो । पूजावा श्रीहरी नित्य ब्राह्मणात विशेषची ॥१८॥ 
तस्मात् -  त्याकरिता - ब्राह्मणदेवेषु मर्त्यादिषु -  ब्राह्मण, पंचमहायज्ञांतील देवता आणि मनुष्ये यांच्यासाठी - यथार्हतः तैः तैः कामैः -  योग्यतानुसार त्या त्या उपभोगांनी - ब्राह्मणान् अनु -  प्रथम ब्राह्मणानंतर इतर अशा पद्धतीने - एनं क्षेत्रज्ञं यजस्व -  ह्या क्षेत्रज्ञाची आराधना करावी. ॥ १८ ॥ 
 
म्हणून ब्राह्मण, देवता, मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांना त्यांना उपयुक्त असणार्या वस्तू देऊन सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असलेल्या भगवंतांची पूजा करावी. यांत ब्राह्मणांना प्राधान्य द्यावे. (१८) 
 
कुर्याद् आपरपक्षीयं मासि प्रौष्ठपदे द्विजः । श्राद्धं पित्रोर्यथावित्तं तद्बन्धूनां च वित्तवान् ॥ १९ ॥ 
भाद्रपद अमास्येला धनीक द्विज ते करो । महालय असे श्राद्ध पितरे बंधु यांचिये ॥१९॥ 
वित्तवान् द्विजः -  धनवान ब्राह्मणाने - प्रौष्ठपदे मासि -  भाद्रपद महिन्यात - पित्रोः तद्बंधूनां च -  मातापितरांचे व त्यांच्या बंधूंचे - अपरपक्षीयं श्राद्धं -  कृष्णपक्षातील श्राद्ध - यथावित्तं कुर्यात् -  जसे द्रव्य असेल त्याप्रमाणे करावे. ॥ १९ ॥ 
 
धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात आपल्या पितरांचे महालय श्राद्ध करावे. (१९) 
 
अयने विषुवे कुर्याद् व्यतीपाते दिनक्षये । चन्द्रादित्योपरागे च द्वादश्यां श्रवणेषु च ॥ २० ॥ 
संक्रांत व्यतिपाताला विषुवी नी दिनक्षयी । ग्रहणीं चंद्रसूर्याच्या द्वादशीच्या दिनी तसे । अनुराधा धनिष्ठा नी नक्षत्र श्रवणात या ॥२०॥ 
अयने विषुवे -  दक्षिणायन, उत्तरायण, मेषसंक्रांत व तूळसंक्रांत या काळी - व्यतीपाते दिनक्षये -  व्यतीपात योग, तिथिक्षय या प्रसंगी - चंद्रादित्योपरागे च -  आणि चंद्रग्रहण व सूर्यग्रहण या समयी - द्वादशीश्रवणेषु च -  आणि श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशीला. ॥ २० ॥ 
 
याशिवाय कर्क व मकर संक्रांत, तुला व मेष संक्रांत, व्यतीपात, दिनक्षय, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाची वेळ, द्वादशी, श्रवण, धनिष्ठा आणि अनुराधा नक्षत्रांच्या वेळी, (२०) 
 
तृतीयायां शुक्लपक्षे नवम्यामथ कार्तिके । चतसृष्वप्यष्टकासु हेमन्ते शिशिरे तथा ॥ २१ ॥ 
अक्षयो तृतिया आणि अक्षयो नवमीसही । अगहन् पौष माघात फाल्गून कृष्ण अष्टमी । सप्तमी माघ शुक्लाची मघायुक्तचि पोर्णिमा ॥२१॥ 
शुक्लपक्षे तृतीयायां -  वैशाख शुक्ल तृतीयेच्या दिवशी - अथ कार्तिके नवम्यां -  आणि कार्तिकातील नवमीला - तथा हेमंते शिशिरे चतसृषु अष्टकासु -  त्याचप्रमाणे हेमंत व शिशिर ऋतूंतील चार अष्टका ह्या दिवशी. ॥ २१ ॥ 
 
अक्षय्य तृतीया, कार्तिक शुद्ध नवमी, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांची कृष्णाष्टमी, (२१) 
 
माघे च सितसप्तम्यां मघाराकासमागमे । राकया चानुमत्या च मासर्क्षाणि युतान्यपि ॥ २२ ॥ 
मास नक्षत्र चित्रा नी विशाखा ज्येष्ठही युत । पूर्ण चंद्र न हो वा हो नक्षत्रे द्वादशीसही ॥२२॥ 
माघे सितसप्तम्यां च -  आणि माघ शुक्ल सप्तमीला - मघाराकासमागमे -  मघानक्षत्रयुक्त पौर्णिमेला - राकया च अनुमत्या वा युतानि -  आणि पूर्ण चंद्रबिंबयुक्त पौर्णिमा किंवा एका कलेने न्यून चंद्रबिंब असलेली पौर्णिमा यांनी युक्त अशा - मासर्क्षाणि अपि -  मासनक्षत्राच्या दिवशीसुद्धा. ॥ २२ ॥ 
 
माघ शुद्ध सप्तमी, माघ महिन्यातील मघा नक्षत्राने युक्त पौर्णिमा, आणि प्रत्येक महिन्यातील मासनक्षत्र, जसे चित्रा, विशाखा, ज्येष्ठा इत्यादींनी युक्त असेल ती पौर्णिमा; मग त्या दिवशी चंद्र संपूर्ण असो किंवा नसो, (२२) 
 
द्वादश्यां अनुराधा स्यात् श्रवणस्तिस्र उत्तराः । तिसृष्वेकादशी वाऽऽसु जन्मर्क्षश्रोणयोगयुक् ॥ २३ ॥ 
श्रवणो अनुराधा नी उत्तरा उत्तराषढा । उत्तरा भादवी योग तिघांचीच हरीदिनी ॥२३॥ 
द्वादश्यां अनुराधा स्यात् -  तसेच द्वादशीला अनुराधा नक्षत्र असेल तर - श्रवणः तिस्रः उत्तराः -  श्रवण अथवा उत्तरा उत्तराषाढा व उत्तराभाद्रपदा ही नक्षत्रे असतील तर - वा आसु तिसृषु एकादशी (यदि स्यात्) -  किंवा अनुराधा, श्रवण व तीन उत्तरा ह्या नक्षत्री एकादशी आली असेल तर - जन्मर्क्षश्रोणयोगयुक् श्राद्धं कुर्यात् -  जन्मनक्षत्र व श्रवण ज्या दिवशी असेल, त्या दिवशी श्राद्ध करावे. ॥ २३ ॥ 
 
द्वादशी तिथीचा अनुराधा, श्रवण, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तराभाद्रपदासह झालेला योग, एकादशी तिथीचा तिन्ही उत्तरा नक्षत्रांचा योग किंवा जन्म नक्षत्र वा श्रवण नक्षत्राचा योग, (२३) 
 
त एते श्रेयसः काला नॄणां श्रेयोविवर्धनाः । कुर्यात् सर्वात्मनैतेषु श्रेयोऽमोघं तदायुषः ॥ २४ ॥ 
सगळे करण्या श्राद्ध पुण्यकर्मास युक्तची । सर्व शक्तीस योजोनी करिता फळ लाभते ॥२४॥ 
ते एते -  ते हे - नृणां श्रेयोविवर्धनाः -  मनुष्यांचे कल्याण वाढविणारे - श्रेयसः कालाः (सन्ति) -  श्रेष्ठ काल होत - एतेषु सर्वात्मना श्रेयः कुर्यात् -  ह्या काली सर्वतोपरी धर्मकृत्ये करावीत - तत् आयुषः अमोघं (स्यात्) -  तेच खरे आयुष्याचे साफल्य होय. ॥ २४ ॥ 
 
या सर्व वेळा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी योग्य व श्रेष्ठ होत. हे योग फक्त श्राद्धासाठीच नव्हेत, तर सर्व पुण्य कर्मांसाठी उपयोगी आहेत. हे कल्याणकारक आणि कल्याणाची अभिवृद्धी करणारे आहेत. या वेळी सर्वप्रकारे शुभ कर्मे केली पाहिजेत. त्यातच आयुष्याची सार्थकता आहे. (२४) 
 
एषु स्नानं जपो होमो व्रतं देवद्विजार्चनम् । पितृदेवनृभूतेभ्यो यद् दत्तं तद्ध्यनश्वरम् ॥ २५ ॥ 
पर्वकाळी अशा जाप्य व्रत होम तशी पुजा । देव ब्राह्मण यांची ती करिता फळ लाभते ॥२५॥ 
एषु -  ह्या योगांवर - स्नानं जपः होमः व्रतं देवाद्विजार्चनं -  स्नान, जप, होम, व्रत व देव आणि ब्राह्मण यांची पूजा - पितृदेवनृभुतेभ्यः यत् दत्तं -  पितर, देव, मनुष्य व भूते ह्यांना जे दिलेले असते - तत् हि अनश्वरं भवति -  ते निश्चयेकरून अक्षय्य होते. ॥ २५ ॥ 
 
या शुभ संयोगांच्या वेळी जे काही स्नान, जप, होम, व्रत, देव, ब्राह्मणांची पूजा केली जाते, किंवा जे काही देव, पितर, मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते, त्याचे मिळणारे फळ चिरकाल टिकणारे असते. (२५) 
 
संस्कारकालो जायाया अपत्यस्यात्मनस्तथा । प्रेतसंस्था मृताहश्च कर्मण्यभ्युदये नृप ॥ २६ ॥ 
यज्ञदीक्षादि संस्कार श्राद्धादी पुंसव्रत ते । शुभ वेळी अशा व्हावे सर्व मंगल कर्म ते ॥२६॥ 
नृप -  हे राजा - जायाया -  स्त्रीचे पुंसवनादि संस्कार, - अपत्यस्य -  मुलाचे जातकर्मादि संस्कार, - तथा आत्मनः संस्कारकालः -  त्याप्रमाणे स्वतःचे यज्ञदीक्षादि संस्कार यांचा काळ - प्रेतसंस्था मृताहः च -  प्रेताचे दहनकर्म आणि सांवत्सरिक श्राद्धदिवस - अभ्युदये कर्मणि च -  आणि दुसर्या मांगलिक कृत्यात. ॥ २६ ॥ 
 
युधिष्ठिरा, याचप्रमाणे पत्नीचे पुंसवनादी संस्कार, मुलांचे जातकर्मादी संस्कार, तसेच स्वत:चे यज्ञदीक्षादी संस्कार, प्रेतसंस्कार, वार्षिक श्राद्धे तसेच अन्य मंगल कर्मांच्या वेळी दान इत्यादी पुण्यकर्मे केली असता ती अक्षय्य फळ देतात. (२६) 
 
अथ देशान् प्रवक्ष्यामि धर्मादिश्रेय आवहान् । स वै पुण्यतमो देशः सत्पात्रं यत्र लभ्यते ॥ २७ ॥ 
वर्णितो स्थान मी आता धर्मादी श्रेयप्राप्तिचे । पवित्र देश तो माना सत्पात्र मिळती जिथे ॥२७॥ 
अथ धर्मादिश्रेयआवाहन् देशान् प्रवक्ष्यामि -  आता धर्माचरण करावयास शुभ देश सांगतो. - यत्र सत्पात्रं लभ्यते -  जेथे सत्पात्र मिळते - सः वै पुण्यतमः देशः अस्ति -  तो खरोखर अत्यंत पुण्यकारक देश होय. ॥ २७ ॥ 
 
जेथे धर्म केल्याने कल्याणाची प्राप्ती होते, त्या स्थानांचे मी आता वर्णन करतो. जेथे सत्पात्र व्यक्ती आढळतात, तो सर्वांत पवित्र देश होय. (२७) 
 
बिम्बं भगवतो यत्र सर्वमेतच्चराचरम् । यत्र ह ब्राह्मणकुलं तपोविद्यादयान्वितम् ॥ २८ ॥ 
चराचर उभे ज्यात हरीची प्रतिमा असो । तप विद्या दयायुक्त द्विजाचा परिवार हो ॥२८॥ 
यत्र -  ज्यात - एतत् सर्वं चराचरं -  हे सर्व स्थावरजंगम विश्व - भगवतः बिंबं (अस्ति) -  परमेश्वराची मूर्ति मानण्यात येते - यत्र ह तपोविद्यादयान्वितं -  आणि जेथे खरोखरच तपश्चर्या, विद्या, दया ह्यांनी युक्त - ब्राह्मणकुलं (विद्यते) -  असा ब्राह्मणांचा समुदाय असतो. ॥ २८ ॥ 
 
ज्यांच्यामध्ये हे चराचर जग राहिले आहे, त्या भगवंतांच्या मूर्ती ज्या ठिकाणी असतील, जेथे तप, विद्या, दया आदी गुणांनी संपन्न ब्राह्मण निवास करीत असतील, (२८) 
 
यत्र यत्र हरेरर्चा स देशः श्रेयसां पदम् । यत्र गंगादयो नद्यः पुराणेषु च विश्रुताः ॥ २९ ॥ 
भगवन्पूजने वार्ता गंगा आदी नद्या असो । कल्याणकारि ती माना सर्व स्थाने पवित्र ती ॥२९॥ 
यत्र यत्र हरेः अर्चा (भवति) -  जेथे जेथे परमेश्वराची पूजा होते. - यत्र च -  आणि जेथे - पुराणेषु विश्रुताः -  पुराणात प्रसिध्द अशा - गंगादयः नद्यः (सन्ति) -  गंगादिक नद्या आहेत - सः देशः श्रेयसां पदं (अस्ति) -  तो देश पुण्यस्थान होय. ॥ २९ ॥ 
 
जेथे जेथे भगवंतांची पूजा होते आणि जेथे पुराणप्रसिद्ध गंगा इत्यादी नद्या आहेत, ती सर्व स्थाने कल्याणकारी होत. (२९) 
 
सरांसि पुष्करादीनि क्षेत्राण्यर्हाश्रितान्युत । कुरुक्षेत्रं गयशिरः प्रयागः पुलहाश्रमः ॥ ३० ॥ 
सरोवरे पुष्करादी सिद्धांचे क्षेत्र ते असो । कुरूक्षेत्र गया आणि प्रयाग पुलहाश्रम । फाल्गूनक्षेत्र नी तैसे नैमिषारण्य द्वारका ॥३०॥ 
राजन् -  हे राजा - पुष्करादीनि सरांसि -  पुष्करादिक सरोवरे - उत अर्हाश्रितानि क्षेत्राणि -  किंवा सत्पुरुषांनी सेविलेली क्षेत्रे - कुरुक्षेत्रं गयशिरः -  कुरुक्षेत्र, गया - प्रयागः पुलहाश्रमः -  प्रयाग, पुलहऋषीचा आश्रम -   ॥ ३० ॥
 
पुष्कर वगैरे सरोवरे, सिद्धपुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्रे, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग, पुलहाश्रम, (३०) 
 
नैमिषं फाल्गुनं सेतुः प्रभासोऽथ कुशस्थली । वाराणसी मधुपुरी पम्पा बिन्दुसरस्तथा ॥ ३१ ॥ 
सेतुबंध प्रभासो वा मथुरा काशि नी तसे । बद्रिकाश्रम नी तैसे पंपा बिंदुसरोवर ॥३१॥ 
नैमिषं फल्गुनं -  नैमिषक्षेत्र, फल्गुतीर्थ - सेतुः प्रभासः -  सेतुबंधरामेश्वर, प्रभासक्षेत्र - अथ कुशस्थली -  आणि कुशस्थली - वाराणसी मधुपुरी -  वाराणसी व मथुरा - पंपा तथा बिंदुसरः -  पंपा तसेच बिंदुसरोवर -   ॥ ३१ ॥
 
नैमिषारण्य, फाल्गुन क्षेत्र (कन्याकुमारी), सेतुबंध, प्रभास, द्वारका, काशी, मथुरा, पंपासरोवर, बिंदुसरोवर, (३१) 
 
नारायणाश्रमो नन्दा सीतारामाश्रमादयः । सर्वे कुलाचला राजन् महेन्द्रमलयादयः ॥ ३२ ॥ 
अलक्नंदा चित्रकूट अयोध्या मलयो तसे । कुलपर्वत सगळे जिथे अर्चावतार ते ॥३२॥ 
नारायणाश्रमः नंदा -  बदरीनारायणाश्रम, नंदा नदी - सीतारामाश्रमादयः -  सीतेचा व रामाचा आश्रम आदिकरून - सर्वे महेंद्रमलयादयाः कुलाचलाः -  महेंद्र, मलय इत्यादि सर्व कुलपर्वत -   ॥ ३२ ॥
 
बदरिकाश्रम, अलकनंदा, भगवान सीतारामांचे आश्रम, महेंद्र, मलय इत्यादी कुलपर्वत, (३२) 
 
एते पुण्यतमा देशा हरेरर्चाश्रिताश्च ये । एतान्देशान् निषेवेत श्रेयस्कामो ह्यभीक्ष्णशः । धर्मो ह्यत्रेहितः पुंसां सहस्राधिफलोदयः ॥ ३३ ॥ 
पवित्र सगळे देश कल्याणा नित्य सेविणे । तेथिल्या नित्य कर्माचे सहस्त्रागुण ते फळ ॥३३॥ 
च ये हरेः अर्चाश्रिताः -  आणि जे विष्णुच्या पूजेचा आश्रय करितात - एते पुण्यतमाः देशाः (सन्ति) -  हे अत्यंत पुण्यकारक देश होत. - श्रेयस्कामः एतान् -  कल्याणाची इच्छा करणार्या पुरुषाने - अभीक्षणशः निषेवेत -  ह्या देशाचे वारंवार सेवन करावे - अत्र हि पुंसां ईहितः धर्मः -  कारण येथे पुरुषांनी केलेला धर्म - सहस्राधिफुलोदयः (भवति) -  सहस्रपट फळ देणारा होतो.  ॥ ३३ ॥ 
 
तसेच जेथे जेथे भगवंतांच्या स्थिर प्रतिमांची पूजा होते, ते सर्व देश अत्यंत पवित्र होत. आपले कल्याण इच्छिणार्याने वारंवार या स्थानी गेले पाहिजे. या ठिकाणी जी पुण्यकर्मे केली जातात, त्यांचे माणसांना हजार पटीने फळ मिळते. (३३) 
 
पात्रं त्वत्र निरुक्तं वै कविभिः पात्रवित्तमैः । हरिरेवैक उर्वीश यन्मयं वै चराचरम् ॥ ३४ ॥ 
निर्णया जाणते ऐसे विवेकी सांगती असे । एक तो हरि सत्पात्र चराचर दिसे जये ॥३४॥ 
उर्वीश -  हे पृथ्वीपते - अत्र तु पात्रवित्तमैः कविभिः -  याठिकाणी तर उत्तम सत्पात्री ज्ञानी विद्वानांनी - चराचरं यन्मयं (अस्ति) -  स्थावरजंगमात्मक विश्व ज्याचे स्वरुप आहे - सः एकः हरिः एव -  असा एक परमेश्वरच - वै पात्रं निरुक्तं -  खरोखर सत्पात्र म्हणून सांगितला आहे. ॥ ३४ ॥ 
 
युधिष्ठिरा, योग्य कोण याचा निर्णय करतेवेळी पात्रतेचे निकष जाणणार्या विवेकी पुरुषांनी हे चराचर जग ज्यांचे स्वरूप आहे, त्या एकमात्र भगवंतांनाच सत्पात्र ठरविले आहे. (३४) 
 
देवर्ष्यर्हत्सु वै सत्सु तत्र ब्रह्मात्मजादिषु । राजन् यद् अग्रपूजायां मतः पात्रतयाच्युतः ॥ ३५ ॥ 
तुमच्या यज्ञिची गोष्ट देवता ऋषि सिद्ध नी । असोनी सनकादिक श्रीकृष्ण आद्य पूजनी ॥३५॥ 
राजन् -  हे धर्मराजा - यत् तत्र (तव राजसूये) अग्रपूजायां -  म्हणूनच त्या तुझ्या राजसूय यज्ञातील अग्रपूजेच्या वेळी - देवर्ष्यर्हत्सु -  देव व ऋषि ह्यांतील मोठमोठे योग्य असे - ब्रह्मात्मजादिषु सत्सु वै -  सनत्कुमारादिक मुनि आले असताहि - पात्रतया अच्युतः मतः -  उत्तम पात्र म्हणून कृष्णच मान्य झाला. ॥ ३५ ॥ 
 
राजा, तुझ्या या यज्ञात देव, ऋषी, सिद्ध आणि सनकादिक असूनही अग्रपूजेसाठी भगवान श्रीकृष्णांनाच पात्र ठरविले. (३५) 
 
जीवराशिभिराकीर्ण अण्डकोशाङ्घ्रिपो महान् । तन्मूलत्वाद् अच्युतेज्या सर्वजीवात्मतर्पणम् ॥ ३६ ॥ 
ब्रह्मांडरूप वृक्षाचे श्रीकृष्ण एक मूळ ते । तयाच्या पूजनी सर्व जीवात्मे तृप्त होत ते ॥३६॥ 
महान् आंडकोशांघ्रिपः -  मोठा ब्रह्मांडवृक्ष - जीवराशिभिः आकीर्णः (अस्ति) -  जीवसमूहांनी भरलेला आहे - तन्मूलत्वात् अचुतेज्या -  परमेश्वर ब्रह्मांडाचा आधार असल्यामुळे त्याची पूजा म्हणजे - सर्वजीवात्मतर्पणं (अस्ति) -  सर्व जीवात्म्यांचा संतोष होय. ॥ ३६ ॥ 
 
असंख्य जीवांनी भरलेल्या या ब्रह्मांडरूप महावृक्षाचे एकमात्र मूळ भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून त्यांची पूजा केल्याने सर्व जीवांचा आत्मा तृप्त होतो. (३६) 
 
पुराण्यनेन सृष्टानि नृ तिर्यग् ऋषिदेवताः । शेते जीवेन रूपेण पुरेषु पुरुषो ह्यसौ ॥ ३७ ॥ 
पुरेही निर्मिले त्याने मनुष्य पशु पक्षि नी । ऋषी नी देवता देही झोपतो त्यात श्रीहरी । म्हणोनी पुरूषो नाम तयासी बोलले असे ॥३७॥ 
अनेन नृतिर्यगृषिदेवताः (सृष्टाः) -  ह्या परमेश्वराने मनुष्य, पशुपक्षी, ऋषि व देवता ही उत्पन्न केली - पुराणि सृष्टानि -  शरीरे निर्माण केली - हि असौ पुरुषः -  म्हणून हा पुरुष - जीवेन रूपेण -  जीवरुपाने - पुरेषु शेते -  शरीरांच्या ठिकाणी रहातो. ॥ ३७ ॥ 
 
त्यांनी मनुष्य, पशु-पक्षी, ऋषी, देव इत्यादींची शरीररूप नगरे निर्माण केली आणि तेच या नगरांमध्ये जीवरूपाने राहातात, म्हणून त्यांना पुरुष म्हणतात. (३७) 
 
तेष्वेव भगवान् राजन् तारतम्येन वर्तते । तस्मात् पात्रं हि पुरुषो यावानात्मा यथेयते ॥ ३८ ॥ 
एकरस असोनिया अधीक न्यून तो गमे । मनुष्य श्रेष्ठ सर्वात तपी सर्वात श्रेष्ठ तो ॥३८॥ 
राजन् -  हे राजा - तेषु एषु (पुरेषु) -  परमेश्वर त्या ह्या शरीरात - तारतम्येन वर्तते -  न्यूनाधिकपणाने रहातो - हि तस्मात् -  याकरिता - यावान् आत्मा-  जेवढ्या प्रमाणात आत्मस्वरुप - यथा ईयते -  अनुभवास येते - पुरुषः -  तो पुरुष - पात्रं अस्ति -  सत्पात्र होय. ॥ ३८ ॥ 
 
युधिष्ठिरा, भगवंत या मनुष्यादी शरीरांमध्ये त्यांच्या वेगवेगळेपणामुळे कमी-अधिक रूपाने प्रकाशमान झालेले आहेत. म्हणून मनुष्यच अधिक श्रेष्ठ पात्र आहे आणि मनुष्यांमध्येसुद्धा ज्यांच्यामध्ये तप, योग वगैरे भगवंतांचा अंश अधिक आढळतो, ते तितकेच अधिक श्रेष्ठ होत. (३८) 
 
दृष्ट्वा तेषां मिथो नृणां अवज्ञानात्मतां नृप । त्रेतादिषु हरेरर्चा क्रियायै कविभिः कृता ॥ ३९ ॥ 
त्रेतायूगामधे राजा ! विद्वाने पाहिले असे । मत्सरो वाढला लोकीं अन्याला अवमानिती । विद्वाने प्रतिमा केल्या हरिसिद्धार्थ तेधवा ॥३९॥ 
नृप -  हे राजा - कविभिः तेषां नृणां -  विद्वान् लोकांनी त्या मनुष्यात - मिथः अवज्ञात्मतां दृष्टवा -  परस्परांमध्ये तिरस्कार उत्पन्न झालेला पाहून - त्रेतादिषु हरेः अर्चा -  त्रेतादियुगांमध्ये हरीची मूर्ति - क्रियायै कृता -  उपासनेकरिता निर्माण केली. ॥ ३९ ॥ 
 
युधिष्ठिरा, त्रेतादी युगांमध्ये जेव्हा विद्वानांना आढळले की, मनुष्ये परस्परांचा तिरस्कार, द्वेष, अपमान करतात, तेव्हा त्या लोकांनी उपासनेसाठी भगवंतांच्या प्रतिमांची योजना केली. (३९) 
 
ततोऽर्चायां हरिं केचित् संश्रद्धाय सपर्यया । उपासत उपास्तापि नार्थदा पुरुषद्विषाम् ॥ ४० ॥ 
कितेक भजती श्रद्धे तेव्हापासूनि मूर्ति या । जीवांना द्वेषिती त्यांना सिद्धी ना मिळते कधी ॥४०॥ 
ततः केचित् -  तेव्हापासून कोणी - अर्चायां हरिं संश्रद्धाय -  मूर्तीच्या ठिकाणी हरीची भावना ठेवून - सपर्यया उपासते -  पूजासामगीने आराधना करितात - उपास्ता अपि -  उपासना केलेली हरीची मूर्ती सुद्धा - पुरुषद्विषां अर्थदा न (भवति) -  परमेश्वराचा द्वेष करणारांना फलद्रूप होत नाही. ॥ ४० ॥ 
 
तेव्हापासून पुष्कळसे लोक अत्यंत श्रेद्धेने प्रतिमांमध्ये भगवंतांची पूजा करतात. परंतु जे माणसांचा द्वेष करतात, त्यांना प्रतिमेची उपासना करूनसुद्धा फळ मिळू शकत नाही. (४०) 
 
पुरुषेष्वपि राजेन्द्र सुपात्रं ब्राह्मणं विदुः । तपसा विद्यया तुष्ट्या धत्ते वेदं हरेस्तनुम् ॥ ४१ ॥ 
युधिष्ठिरा मनुष्यात सुपात्र द्विज तो असे । तपे विद्ये नि संतोषे भगवद् वेद रूप ते ॥४१॥ 
राजेंद्र -  हे राजाधिराजा - पुरुषेषु अपि -  पुरुषांमध्येही - तपसा विद्यया तुष्ट्या -  तपश्चर्येने, विद्येने व संतोषाने - हरेः तनुं वेदं धत्ते -  वेदरुपी हरीचे शरीर धारण करितो - ब्राह्मणं सुपात्रं विदुः -  ब्राह्मणाला सुपात्र मानतात. ॥ ४१ ॥ 
 
युधिष्ठिरा, मनुष्यांमध्येसुद्धा ब्राह्मण उत्तम पात्र मानला गेला आहे. कारण तो आपली तपश्चर्या, विद्या, संतोष वगैरे गुणांनी भगवंतांचे वेदरूप शरीर धारण करतो. (४१) 
 
नन्वस्य ब्राह्मणा राजन् कृष्णस्य जगदात्मनः । पुनन्तः पादरजसा त्रिलोकीं दैवतं महत् ॥ ४२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे सदाचारनिर्णयो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥ 
महाराजा तुम्ही मी नी सर्वात्म कृष्णदेव हा । सर्वाचे द्विज ते पूज्य तयांच्या पदधूळिने । पावित्र्य मिळत लोका स्वर्ग पाताळ मृत्यु ते ॥४२॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥ ७ ॥ १४ ॥ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 
राजन् -  हे राजा - पादरजसा त्रिलोकीं पुनंतः ब्राह्मणाः -  पायाच्या धुळीने त्रैलोक्याला पवित्र करणारे ब्राह्मण - अस्य जगदात्मनः कृष्णस्य -  जगाचा आत्मा अशा या कृष्णाचे - ननु महत् दैवतं (अस्ति) -  खरोखर मोठे दैवत होय. ॥ ४२ ॥ 
 
महाराज, हे जे सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे श्रेष्ठ देवही ब्राह्मणच आहेत, जे आपल्या चरणधुळीने तिन्ही लोक पवित्र करतात. (४२) 
 स्कंध सातवा - अध्याय चवदावा समाप्त |