|
श्रीमद् भागवत पुराण संन्यासधर्मवर्णनम्, अवधूतप्रह्रादसंवादश्च - यतिधर्माचे निरूपण आणि अवधूत-प्रल्हाद-संवाद - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
नारद उवाच -
(अनुष्टुप्) कल्पस्त्वेवं परिव्रज्य देहमात्रावशेषितः । ग्रामैकरात्रविधिना निरपेक्षश्चरेन्महीम् ॥ १ ॥
नारदजी सांगतात - (अनुष्टुप्) ब्रह्मविचार सामर्थ्य वानप्रस्थात बाणता । घ्यावा संन्यास तेंव्हाची त्यागोनी सर्व वस्तु त्या । धारिता देह तो एक स्थान व्यक्तिहि त्यागिणे । एकरात्रीच एका त्या ग्रामाते राहुनी त्यजो ॥१॥
कल्पः तु - सामर्थ्यवान पुरुषाने तर - एवं परिव्रज्य - याप्रमाणे संन्यास घेऊन - देहमात्रावशेषितः - देहमात्र अवशिष्ट राहिला आहे ज्याचा असा - निरपेक्षः - व निरिच्छ होत्साता - ग्रामैकरात्रविधिना - प्रत्येक गावांत एक रात्र राहणे - महीं चरेत् - या नियमाने पृथ्वीवर संचार करावा. ॥ १ ॥
नारद म्हणतात – वानप्रस्थाश्रम स्वीकारलेल्या पुरुषामध्ये जर ब्रह्मविचार करण्याचे सामर्थ्य असेल, तर शरीराव्यतिरिक्त इतर सर्व काही सोडून त्याने संन्यास घ्यावा. तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता, एका गावात एक रात्र राहण्याचा नियम करून पृथ्वीवर संचार करावा. (१)
बिभृयाद् यद्यसौ वासः कौपीनाच्छादनं परम् ।
त्यक्तं न दण्डलिंगादेः अन्यत् किञ्चिदनापदि ॥ २ ॥
जर वस्त्र असे अंगी तर कौपीन एकची । गुप्तांग झाकता यावे दंड आश्रमचिन्ह ते । विपत्ती नसता घ्यावे त्यागाव्या अन्य वस्तु त्या ॥२॥
असौ यदि वासः बिभृयात् (तर्हि) - तो वस्त्र धारण करील तर - परं कौपीनाच्छादनं (स्यात्) - केवळ लंगोटीचे आच्छादन धारण करावे - दंडलिंगादेः अन्यत् - दंड, संन्यास इत्यादिकांशिवाय - त्यक्तं किंचित् - त्याग केलेले काहीसुद्धा - अनापदि न (बिभृयात्) - आपत्तिकाळाशिवाय धारण करू नये. ॥ २ ॥
जर वस्त्र नेसावयाचे असेल, तर गुप्त अंग झाकण्यासाठी फक्त लंगोटी नेसावी. आणि काही आपत्ती नसेल तर दंड आणि आश्रमाचे चिन्ह असणार्या वस्तूंखेरीज, त्याग केलेली कोणतीही वस्तू पुन्हा ग्रहण करू नये. (२)
एक एव चरेद्भिक्षुः आत्मारामोऽनपाश्रयः ।
सर्वभूतसुहृच्छान्तो नारायणपरायणः ॥ ३ ॥
हितैषी सर्व प्राण्यांना शांत भक्ति परायण । नको आश्रित ते कोणी एकटे फिरणे सदा ॥३॥
आत्मारामः - आत्मरूपी रममाण झालेल्या - अनपाश्रयः सर्वभूतसुहृत् - अनासक्त व सर्व प्राण्यांशी मित्रत्वाने वागणार्या - शांतः नारायणपरायणः - शांत व परमेश्वराकडे सदा लक्ष ठेवणार्या - भिक्षुः एकः एव चरेत् - भिक्षूने एकटयानेच फिरावे. ॥ ३ ॥
संन्याशाने सर्व प्राण्यांचे हित चिंतावे, शांत राहावे, भगवत्परायण राहावे आणि कोणाचाही आश्रय न घेता स्वत:तच रमावे आणि एकट्यानेच संचार करावा. (३)
पश्येदात्मन्यदो विश्वं परे सदसतोऽव्यये ।
आत्मानं च परं ब्रह्म सर्वत्र सदसन्मये ॥ ४ ॥
विश्वाला पाहणे ईशी अतीत जरि तो असे । ब्रह्मस्वरूप आत्म्यात पाहणे परिपूर्ण ते ॥४॥
सदसतः परे - कार्य व कारण यांहून वेगळ्या अशा - अव्यये आत्मनि - नाशरहित आत्म्याच्या ठिकाणी - अदःविश्वं - हे विश्व - च परं ब्रह्म आत्मानं - आणि परब्रह्मरूपी आत्म्याला - सर्वत्र सदसन्मये पश्येत् - कार्यकारणरूप सर्व विश्वात पाहावे. ॥ ४ ॥
हे संपूर्ण विश्व, कार्य आणि कारणापासून वेगळ्या असलेल्या परमात्म्यामध्ये अंतर्भूत आहे असे जाणावे आणि कार्यकारणस्वरूप या जगामध्ये ब्रह्मस्वरूप असलेल्या आपल्या आत्म्याला परिपूर्ण रूपात पाहावे. (४)
सुप्तिप्रबोधयोः सन्धौ आत्मनो गतिमात्मदृक् ।
पश्यन्बन्धं च मोक्षं च मायामात्रं न वस्तुतः ॥ ५ ॥
संन्याशी आत्मदर्शी तो सूप्त-बोधांतरीहि तो । जापण स्वरूपाला नी बंध-मोक्ष द्वयो भ्रम ॥५॥
आत्मदृक् - आत्मस्वरूपीदृष्टी ठेवणारा - सुप्तप्रबोधयोः सन्धौ - निद्रा व जागृती यांच्या संधीवर - आत्मनः गतिं - आत्म्याची गती - बन्धं च मोक्षं च - आणि बंध व मोक्ष यांना - मायामात्रं न वस्तुतः - केवळ मायारूपाने वास्तविकपणे नव्हे असे - पश्यन् - पाहणारा. ॥ ५ ॥
आत्म्याकडेच लक्ष असणार्या संन्याशाने सुषुप्ती आणि जागृती या दोन्हींच्या संधिकालात आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यावा आणि बंधन व मोक्ष ही दोन्ही केवळ माया आहेत, सत्य स्वरूपात काही नाही, असे समजावे. (५)
नाभिनन्देद्ध्रुवं मृत्युं अध्रुवं वास्य जीवितम् ।
कालं परं प्रतीक्षेत भूतानां प्रभवाप्ययम् ॥ ६ ॥
नेच्छावा मृत्यु नी देह उदास द्वयि पाहणे । स्थितींचा कारणी काळ तयांची वाट पाहणे ॥६॥
अस्य अध्रुवं जीवितं - ह्याच्या अनिश्चित जीविताला - ध्रुवं मृत्यूम् - निश्चयात्मक मृत्यूला - न अभिनंदेत् - चांगले मानु नये - भूतानां प्रभवाप्यय - प्राण्यांची उत्पत्ति व संहार करणार्या - परं कालं प्रतीक्षेत - श्रेष्ठ काळाची वाट पाहावी. ॥ ६ ॥
शरीराच्या अवश्य होणार्या मृत्यूचे किंवा अनिश्चित जीवनाचेही अभिनंदन करू नये. सर्व प्राण्यांची उत्पत्ती आणि नाशाला कारणीभूत असणार्या काळाची फक्त वाट पाहात राहावे. (६)
नासच्छास्त्रेषु सज्जेत नोपजीवेत जीविकाम् ।
वादवादान् त्यजेत् तर्कान् पक्षं कंच न संश्रयेत् ॥ ७ ॥
असत्य शास्त्रि ना प्रीती जीविका साधने नको । टाळावा वाद तो नित्य पक्ष एक नको जगीं ॥७॥
असच्छास्रेषु न सज्जेत - खोटया शास्त्रांच्या ठिकाणी आसक्त होऊ नये - जीविकां न उपजीवेत - धंद्यावर उपजीविका करू नये - वादवादान् तर्कान् त्यजेत् - वितंडवादी तर्क सोडून द्यावे - कं च पक्षं न समाश्रयेत् - आणि कोणत्याही पक्षाचा अवलंब करू नये. ॥ ७ ॥
अनात्म वस्तूंचे प्रतिपादन करणार्या शास्त्रांची आवड नसावी. आपल्या जीवननिर्वाहासाठी काही काम करू नये. केवळ वाद-विवाद करण्यासाठी काही तर्क करू नये किंवा कोणाचीही बाजू घेऊ नये. (७)
न शिष्याननुबध्नीत ग्रन्थान्नैवाभ्यसेन् बहून् ।
न व्याख्यामुपयुञ्जीत नारम्भानारभेत्क्वचित् ॥ ८ ॥
न जोडो चमु शिष्यांचा न ग्रंथ वाचणे बहु । व्याख्याने टाळणे सर्व कार्यारंभी नकोचि ते ॥८॥
शिष्यान् न अनुबन्धीत - शिष्य जमवू नयेत - बहून् ग्रंथान् - पुष्कळ ग्रंथांचा - न एव अभ्यसेत् - अभ्यास करू नये - व्याख्यां न उपयुंजीत - व्याख्यानांवर निर्वाह करू नये - क्वचित् आरंभान् - कधीही मठादिक - न आरभेत् - स्थापू नयेत. ॥ ८ ॥
शिष्यसमुदाय जोडू नये, पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास करू नये, व्याख्यान देऊ नये आणि कोणतीही कामे सुरू करू नयेत. (८)
न यतेराश्रमः प्रायो धर्महेतुर्महात्मनः ।
शान्तस्य समचित्तस्य बिभृयाद् उत वा त्यजेत् ॥ ९ ॥
शांत नी समचित्ती त्या महात्म्या यतिशी नसे । मठाची बंधने कांही घ्यावे आश्रमचिन्ह ते ॥९॥
महात्मनः शांतस्य - उदार अंतःकरणाच्या व शांत अशा - समचित्तस्य यतेः आश्रमः - सर्वत्र समदृष्टि ठेवणार्या संन्याशाचा आश्रम - प्रायः धर्महेतुः न - बहुतकरून व्यावहारिक धर्मासाठी नाही - बिभृयात् उत वा त्यजेत् - धारण करावी किंवा सोडून द्यावी. ॥ ९ ॥
शांत, समदर्शी, महात्म्या संन्याशाला धर्म म्हणून कोणत्याही आश्रमाचे बंधन नाही. आपल्या आश्रमाची चिन्हे त्याने धारण करावीत किंवा करू नयेत. (९)
अव्यक्तलिङ्गो व्यक्तार्थो मनीषि उन्मत्तबालवत् ।
कविर्मूकवदात्मानं स दृष्ट्या दर्शयेन् नृणाम् ॥ १० ॥
मग्न आत्मानुसंधानी न चिन्ह घेतले जये । प्रतिभाशील तो जणा परी मूर्खची भासतो ॥१०॥
अव्यक्तलिंगः - ज्याचे बाह्य चिन्ह स्पष्ट नाही - व्यक्तार्थः - पण आत्मानुसंधान मात्र ज्याचे स्पष्ट आहे अशा - सः मनीषी कविः - त्या बुद्धिमान ज्ञानी पुरुषाने - उन्मत्त बालवत् - उन्मत्तासारखे किंवा अर्भकासारखे - (वा) मूकवत् - अथवा मुक्यासारखे - नृणां दृष्टया - मनुष्याच्या दृष्टीने - आत्मानं दर्शयेत् - स्वतःला भासवावे. ॥ १० ॥
त्याच्याजवळ आश्रमाचे काही चिन्ह नसो; परंतु त्याने आत्मानुसंधानात मग्न असावे. त्याने अत्यंत विचारशील असावे, परंतु लोकांत वेडा किंवा बालक असल्याप्रमाणे स्वत:ला दाखवावे. स्वत: प्रतिभाशाली असूनही माणसांना असे वाटले पाहिजे की, हा मुका आहे. (१०)
अत्रापि उदाहरन्ति इमं इतिहासं पुरातनम् ।
प्रह्रादस्य च संवादं मुनेराजगरस्य च ॥ ११ ॥
राजा एका इतिहासा वर्णितो, थोर संत ते । दतात्रय मुनी-भक्त प्रल्हादी वाद हा असा ॥११॥
अत्र अपि - ह्याविषयी सुद्धा - प्रह्लादस्य अजगरस्य मुनेः च - प्रल्हाद आणि अजगर नावाचा ऋषी - संवादं - संवादरूप - इमं पुरातनं इतिहासं - हा प्राचीन इतिहास - उदाहरंति - सांगत असतात. ॥ ११ ॥
याविषयी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. अजगराप्रमाणे राहणारा मुनी आणि प्रल्हाद यांच्यामधील तो संवाद आहे. (११)
तं शयानं धरोपस्थे कावेर्यां सह्यसानुनि ।
रजस्वलैस्तनूदेशैः निगूढामलतेजसम् ॥ १२ ॥ ददर्श लोकान् विचरन् लोकतत्त्वविवित्सया । वृतोऽमात्यैः कतिपयैः प्रह्रादो भगवत्प्रियः ॥ १३ ॥
एकदा भक्त प्रल्हादे मंत्र्याना घेउनी सवे । लोकांची जाणण्या इच्छा फिरला जनतेत तै ॥१२॥ तयांनी पाहिले की त्या कावरीतटि तो कुणी । पडला मुनि जो एक मातीने अंग माखले ॥१३॥
कतिपयैः अमात्यैः वृतः - कित्येक प्रधानांना बरोबर घेऊन - भगवत्प्रियः प्रह्लादः - परमेश्वराचा आवडता प्रल्हाद - लोकतत्त्वाविवित्सया - लोकातील तत्त्व जाणण्याच्या इच्छेने - लोकान् विचरन् - लोकांमध्ये फिरणारा - सह्यसानुनि कावेर्यां धरोपस्थे - सह्याद्रीच्या शिखरी कावेरी नदीजवळील भूमीवर - शयानं - निजलेल्या - रजस्वर्लैः तनूदेशैः - मळलेल्या अवयवांनी - निगूढामलतेजं - ज्याचे निर्मल तेज आच्छादून गेले आहे - तं - अशा त्या अजगर मुनीला - ददर्श - पाहता झाला. ॥ १२-१३ ॥
भगवंतांचा प्रिय भक्त प्रल्हाद एकदा काही मंत्र्यांसह लोकांचे मत जाणण्याच्या इच्छेने लोकांमध्ये फिरत होता. त्याने पाहिले की, सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटाकी जमिनीवरच एक मुनी पडून राहिले आहेत. त्यांचे अंग धुळीने माखले असल्याने त्यांचे निर्मळ तेज झाकले गेले होते. (१२-१३)
कर्मणाऽऽकृतिभिर्वाचा लिङ्गैर्वर्णाश्रमादिभिः ।
न विदन्ति जना यं वै सोऽसाविति न वेति च ॥ १४ ॥
तयांचे कर्म नी वाणी आकार वर्ण आश्रम । आदि चिन्ह्ये तया कोणी सिद्ध हा जाणिले नसे ॥१४॥
जनाः यं वै - लोक ज्याला खरोखर - कर्मणा आकृतिभिः वाचा - कृतीने, आकाराने व भाषणाने - वर्णाश्रमादिभिःलिंगैः च - आणि वर्ण व आश्रम इत्यादिक चिन्हांनी - सः असौ इति न वा इति - तोच हा की नव्हे असे - न विदंति - जाणत नाहीत. ॥ १४ ॥
त्यांचे कर्म, रूप, वाणी आणि वर्ण-आश्रम-चिन्हे यांवरून ते कोणी सिद्ध पुरूष आहेत किंवा नाहीत, हे लोकांना समजू शकत नव्हते. (१४)
तं नत्वाभ्यर्च्य विधिवत् पादयोः शिरसा स्पृशन् ।
विवित्सुरिदमप्राक्षीन् महाभागवतोऽसुरः ॥ १५ ॥
भगवत्प्रेमि प्रल्हादे तयांना शिर टेकुनी । वंदिले पूजिले आणि पुसला प्रश्न जाणण्या ॥१५॥
विवित्सुः महाभागवतः असुरः - ज्ञानाची इच्छा करणारा मोठा भगवद्भक्त प्रल्हाद - तं नत्वा - त्याला नमस्कार करून - विधिवत् अभ्यर्च्य - यथाशास्त्र पूजा करून - पादयोः शिरसा स्पृशन् - चरणांवर मस्तक ठेवून - इदं अप्राक्षीत् - असा प्रश्न करिता झाला. ॥ १५ ॥
भगवंतांचा भक्त प्रल्हादाने आपले मस्तक त्यांच्या चरणांवर ठेऊन नमस्कार केला आणि विधिपूर्वक त्यांची पूजा करून सत्य जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांना हा प्रश्न केला. (१५)
बिभर्षि कायं पीवानं सोद्यमो भोगवान्यथा ।
वित्तं चैवोद्यमवतां भोगो वित्तवतामिह । भोगिनां खलु देहोऽयं पीवा भवति नान्यथा ॥ १६ ॥
भगवन् ! आपुला देह उद्योगी भोगिच्या परी । धष्ट - पुष्ट असा आहे उद्योग्या मिळते धन । धनात मिळती भोग भोगाने पुष्टते तनू । आणखी अन्य ते कांही दुसरी कारणे नसो ॥१६॥
यथा सोद्यमः भोगवान् - उद्योगी व भोगी पुरुषाप्रमाणे - पीवानं कायं बिभर्षि - पुष्ट शरीर धारण करीत आहेस - इह उद्यमवतां वित्तं - ह्या लोकी उद्योग करणार्याला द्रव्य - वित्तवतां भोगः - द्रव्यवानाला भोग - भोगिनां अयं देहः (च) - व भोगी मनुष्याचा हा देह - खलु पीवा भवति - निश्चयेकरून पुष्ट होतो - अन्यथा न (भवती) - इतररीतीने होत नाही. ॥ १६ ॥
ब्रह्मन, उद्योगी आणि भोगी पुरुषांच्याप्रमाणे आपले शरीर धष्टपुष्ट आहे. जगाचा हा नियम आहे की, उद्योग करणार्यालाच धन मिळते, धनवानालाच भोग प्राप्त होतात आणि भोगी लोकांचेच शरीर धष्टपुष्ट असते. याखेरीज पुष्टीचे दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. (१६)
न ते शयानस्य निरुद्यमस्य
ब्रह्मन्नु हार्थो यत एव भोगः । अभोगिनोऽयं तव विप्र देहः पीवा यतस्तद्वद नः क्षमं चेत् ॥ १७ ॥
(इंद्रवज्रा) उद्योग ना तो पडुनीच तेथ न द्रव्य तेंव्हा मग भोग कैचे । भोगाविना हृष्ट कसाचि देह सांगा द्विजा ते अम्हि एकु इच्छो ॥१७॥
ब्रह्मन् - हे मुने - निरुद्यमस्य शया नस्य ते - उद्योगरहित व निजून राहणार्या तुला - यतः एव भोगः न ततः - ज्याअर्थी भोग नाही त्याअर्थी - विप्र - हे द्विजा - नु ह अभोगिनः तव - निश्चयेकरून भोगवान नसणार्या तुझा - अयं देहः - हा देह - यतः पीवा (अस्ति) - ज्या कारणास्तव पुष्ट आहे - तत् नः - ते कारण आम्हास - क्षमं चेत् (तर्हि) वद - सांगण्यासारखे जर असेल तर सांग. ॥ १७ ॥
आपण तर काही उद्योग करीत नाही, असेच पडून राहाता. म्हणून आपल्याजवळ धन नाही. मग आपल्याला भोग कोठून मिळणार ? भोगाखेरीजच आपले हे शरीर धष्टपुष्ट कसे ? हे विप्रवर, हे आम्ही ऐकण्यासारखे असेल, तर सांगावे. (१७)
कविः कल्पो निपुणदृक्चित्रप्रियकथः समः ।
लोकस्य कुर्वतः कर्म शेषे तद्वीक्षितापि वा ॥ १८ ॥
(अनुष्टुप्) विद्वान् समर्थ चतुरो तुमचे बोल प्रीयची । कर्मात गुंतले विश्व तुम्ही कां शांत पाहता ॥१८॥
(त्वं) कविः कल्पः - तू विद्वान दक्ष - निपुणदृक् चित्रप्रियकथः - चतुर, चमत्कार वाटण्यासारख्या कथा सांगणारा - समः - निःपक्षपाती - वा लोकस्य कर्म कुर्वतः - आणि लोक द्रव्योपार्जनादि कर्म करीत असता - तत् वीक्षिता अपि - ते पाहणाराही - शेषे - निजून राहिला आहेस. ॥ १८ ॥
आपण विद्वान, समर्थ आणि चतुर आहात. आपले बोलणे अत्यंत अद्भुत आणि प्रिय आहे. असे असताही आपण सर्व जग कर्म करीत असलेले पाहूनसुद्धा समभावाने पडून आहात, याचे कारण काय ? (१८)
नारद उवाच -
(अनुष्टुप्) स इत्थं दैत्यपतिना परिपृष्टो महामुनिः । स्मयमानः तमभ्याह तद् वाग् अमृतयन्त्रितः ॥ १९ ॥
नारदजी सांगतात - प्रल्हादे पुसता प्रश्न दतात्रेय महामुनी । करोनी स्मित ते ऐसे बोलले शब्द अमृत ॥१९॥
भत्रदैत्यपतिना इत्थं परिपृष्टः - प्रल्हादाने याप्रमाणे विचारलेला - स्मयमानः सः महामुनिः - हास्य करणारा तो महामुनि - तद्वागमृतयंत्रितः - प्रल्हादाच्या भाषणामृताने ज्याचे चित्त वळले आहे - तं अभ्याय - असा होऊन प्रल्हादाला म्हणाला. ॥ १९ ॥
नारद म्हणतात – जेव्हा प्रल्हादाने महामुनींना असा प्रश्न केला, तेव्हा त्याच्या अमृतमय वाणीला भुलून हास्य करीत ते म्हणाले. (१९)
ब्राह्मण उवाच -
वेदेदमसुरश्रेष्ठ भवान्नन्वार्यसम्मतः । ईहोपरमयोर्नॄणां पदान्यध्यात्मचक्षुषा ॥ २० ॥
दत्तात्रेय म्हणाले - दैत्येंद्रा सर्वची साधू तुम्हा सन्मानिती सदा । कर्माचे फळ नी वृत्ती ज्ञानाने जाणता तुम्ही ॥२०॥
असुरश्रेष्ठ - हे दैत्यराजा - आर्यसंमतः भवान् - सज्जनांना मान्य असा तू - अध्यात्मचक्षुषा - ज्ञानदृष्टीने - ईहोपरमयोः नृणां पदानि - प्रवृत्ति व निवृत्ति या मार्गात मनुष्यांना मिळणारी फळे - इदं ननु वेद - हे खरोखर जाणत असशीलच. ॥ २० ॥
महामुनी म्हणाले – दैत्यराज, सर्वश्रेष्ठ पुरुष तुझा सन्मान करतात. मनुष्यांना कर्मांची प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून काय फळ मिळते, ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणत आहेसच. (२०)
यस्य नारायणो देवो भगवान् हृद्गतः सदा ।
भक्त्या केवलयाज्ञानं धुनोति ध्वान्तमर्कवत् ॥ २१ ॥
अनन्य भक्तिने ईश तुमच्या हृदयीं वसे । सूर्याच्या परि तो नाशी तमांधकार सर्व तो ॥२१॥
यस्य (तव) अज्ञानं - ज्या तुझे अज्ञान - भगवान् नारायणः देवः - ऐश्वर्यवान जलशायी परमेश्वर - केवलया भक्त्या - शुद्ध भक्तीमुळे - सदा हृद्गत - सदोदित अंतःकरणात राहणारा असा - ध्वांतं अर्कवत् - अंधकाराला सूर्य नष्ट करितो त्याप्रमाणे - धुनोति - दूर करितो. ॥ २१ ॥
तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतात आणि सूर्य जसा अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात. (२१)
तथापि ब्रूमहे प्रश्नान् तव राजन्यथाश्रुतम् ।
सम्भाषणीयो हि भवान् आत्मनः शुद्धिमिच्छता ॥ २२ ॥
तरी राजा जसे कांही मजला कळले तसे । आत्मशुद्ध्यर्थ हे देतो उत्तरा मान राखुनी ॥२२॥
अथ अपि राजन् - तरीसुद्धा हे राजा - तव प्रश्नान् - तुझ्या प्रश्नांची उत्तरे - यथाश्रुतं ब्रूमहे - आमच्या ज्ञानाला अनुसरून सांगतो - हि भवान् - कारण तू - आत्मनः शुद्धिं इच्छतां - चित्तशुद्धि इच्छिणार्या - संभावनीयः (अस्ति) - सत्पुरुषांना मान्य आहेस. ॥ २२ ॥
तरीसुद्धा राजा, मी जसे जाणले आहे, त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. कारण आत्मशुद्धीची इच्छा असणार्यांनी तुझा सन्मान अवश्य केला पाहिजे. (२२)
तृष्णया भववाहिन्या योग्यैः कामैरपूर्यया ।
कर्माणि कार्यमाणोऽहं नानायोनिषु योजितः ॥ २३ ॥
तृष्णा एक अशी वस्तू भोगल्या नच ती सरे । भवचक्री तये जाणे कर्माने योनि त्या किती । लाभल्या मजला तैसे किती कर्मात गुंतलो । माझा थांग नसे माते कर्माचा खेळ आगळा ॥२३॥
योग्यैः कामैः अपूरया - योग्य उपभोग अर्पण केले तरी तृप्ति न होणार्या अशा - भववाहिन्या तृष्णया - संसार चालविण्याच्या तृष्णेने - कर्माणि कार्यमाणः अहं - कर्मे करावयास लाविला जाणारा मी - नानायोनिषु योजितः (अस्मि) - अनेक योनीत जन्म घेण्यास लाविलेला आहे. ॥ २३ ॥
इच्छेनुसार भोग प्राप्त होऊनही तृष्णा कधी पूर्ण होत नाही. तिच्यामुळेच जन्ममृत्यूच्या फेर्यात फिरावे लागते. तिने माझ्याकडून अनेक कर्मे करवून असंख्य योनींमध्ये मला जन्माला घातले. (२३)
यदृच्छया लोकमिमं प्रापितः कर्मभिर्भ्रमन् ।
स्वर्गापवर्गयोर्द्वारं तिरश्चां पुनरस्य च ॥ २४ ॥
मनुष्य देह हा येथ इच्छिता मोक्षही मिळे । पापाने क्षुद्रयोनी नी द्वये जन्म मनुष्य हा ॥२४॥
कर्मभिः भ्रमन् (अहं) - कर्मानुसार भ्रमण करणारा मी - स्वर्गापवर्गयोः तिरश्चां - स्वर्ग, मोक्ष, पशुयोनि यांचे - पुनः अस्य च द्वारं - तसेच या मनुष्य जन्माचे द्वार अशा - इमं लोकं - ह्या लोकाला - यदृच्छया प्रापितः (अस्मि) - दैवगतीने प्राप्त झालो. ॥ २४ ॥
कर्मांमुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे. ही स्वर्ग, मोक्ष, तिर्यग्योनी तसेच या मानवदेहाच्या प्राप्तीचे द्वार आहे. (२४)
तत्रापि दम्पतीनां च सुखायान्यापनुत्तये ।
कर्माणि कुर्वतां दृष्ट्वा निवृत्तोऽस्मि विपर्ययम् ॥ २५ ॥
दांपत्य इच्छिते सौख्य दुःखाचा नाश इच्छिते । उलटे घडते सर्व म्हणोनी कर्म सांडले ॥२५॥
अत्र अपि - येथेही - सुखाय अन्यापनुत्तये च - सुखाकरिता आणि दुःख दूर होण्याकरिता - कर्माणि कुर्वतां दंपतीनां - कर्मे करणार्या स्त्री-पुरुषांचे - विपर्ययं दृष्ट्वा - विपरीत फल पाहून - निवृत्तः (अस्मि) - मी निवृत्त झालो आहे. ॥ २५ ॥
संसारातील स्त्री-पुरुष सुखाची प्राप्ती आणि दु:खाची निवृत्ती व्हावी, यासाठी कर्मे करतात, परंतु त्याचे उलटेच फळ मिळते, हे पाहून मी कर्मांपासून निवृत्त झालो आहे. (२५)
सुखमस्यात्मनो रूपं सर्वेहोपरतिस्तनुः ।
मनःसंस्पर्शजान् दृष्ट्वा भोगान् स्वप्स्यामि संविशन् ॥ २६ ॥
आत्म्याचे रूप ते सौख्य निवृत्ती तनु ही असे । मनोराज्यापरी भोग मानोनी दैव भोगितो ॥२६॥
सुखं अस्य आत्मनः रूपं (अस्ति) - सुख हे आपल्या जीवाचे स्वरूप होय - सर्वेहोपरतिः (तस्य) तनुः (अस्ति) - सर्व कामांचा विराम हा त्याचे शरीर होय - मनःसंस्पर्शजान् भोगान् दृष्ट्वा - मनाच्या संबंधामुळे उत्पन्न होणारे भोग पाहून - (तान्) संविशन् स्वप्स्यामि - ते भोग भोगीत मी झोप घेतो. ॥ २६ ॥
सुखच आत्म्याचे स्वरूप आहे. सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचे शरीर आहे. तसेच सर्व भोग ही मनोराज्ये आहेत, असे समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहातो. (२६)
इत्येतदात्मनः स्वार्थं सन्तं विस्मृत्य वै पुमान् ।
विचित्रामसति द्वैते घोरामाप्नोति संसृतिम् ॥ २७ ॥
मानावा स्वार्थ तो सत्य आत्मरूपास पाहणे । परी तो द्वैत मानोनी भवात भटके पुन्हा ॥२७॥
पुनान् - पुरुष - इति एतत् - अशा ह्या - आत्मनः संतं स्वार्थं विस्मृत्य - स्वतःजवळ असणार्या स्वार्थाला विसरून - असति द्वैते - मिथ्या अशा द्वैतामध्ये - विचित्रां घोरां संसृतिं आप्नोति - विलक्षण व भयंकर अशा संसाराला प्राप्त होतो. ॥ २७ ॥
मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप, त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरे मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहातो. (२७)
जलं तदुद्भवैश्छन्नं हित्वाज्ञो जलकाम्यया ।
मृगतृष्णामुपाधावेत् यथान्यत्रार्थदृक्स्वतः ॥ २८ ॥
शेवाळा पाहुनी पाणी त्यजोनी झळयाझळ । धुंडावा तैचि हे होते भिन्नत्वे पळणे पुढे ॥२८॥
यथा अज्ञः - जसा अज्ञानी मनुष्य - तदुद्भवैः छंन्नं - पाण्यापासून झालेल्या शेवाळाने आच्छादिलेले - जलं हित्वा - उदक सोडून - जलकाम्यया - पाणी मिळण्याच्या इच्छेने - मृगतृष्णां उपधावेत् (तथा) - मृगजळाकडे धाव घेतो त्याप्रमाणे - स्वतः अन्यत्र - स्वस्वरूपाहून दुसर्या ठिकाणी - अर्थदृक् (धावति) - पुरूषार्थ आहे असे पाहणारा धावतो. ॥ २८ ॥
अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकले असता त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो, त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीज वेगळ्या वस्तूत सुख आहे असे समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो. (२८)
देहादिभिर्दैवतन्त्रैः आत्मनः सुखमीहतः ।
दुःखात्ययं चानीशस्य क्रिया मोघाः कृताः कृताः ॥ २९ ॥
प्रारब्धाधीन हा देह न पुरे सौख्य मेळिण्या । प्रयत्न करिता सर्व कार्यासिद्धी न होतसे ॥२९॥
देवतंत्रैः हादिभिः - दैवाच्या आधीन असणार्या देहादिकांनी - आत्मनः सुखं - आत्म्याला सुख - दुःखात्ययं च - आणि दुःखाचा नाश होण्याची - ईहतः अनीशस्य (नरस्य) - इच्छा करणार्या असमर्थ मनुष्याच्या - कृताः कृताः क्रियाः - पुनः पुनः केलेल्या क्रिया - मोघाः (भवन्ति) - निष्फळ होतात. ॥ २९ ॥
प्रारब्धाच्या अधीन असलेल्या शरीरादिकांनी तो आपल्यासाठी सुख मिळवू पाहातो आणि दु:ख नाहीसे करू इच्छितो. तो आपल्या प्रयत्नांत सफळ न होता त्याने वारंवार केलेली सर्व कामे वाया जातात. (२९)
आध्यात्मिकादिभिर्दुःखैः अविमुक्तस्य कर्हिचित् ।
मर्त्यस्य कृच्छ्रोपनतैः अर्थैः कामैः क्रियेत किम् ॥ ३० ॥
जीव हा देह नी चित्ते आक्रंदे दुःख भोगिता । नाशवंत असा देह धनाचा लाभ काय तो ॥३०॥
आध्यात्मिकादिभिः दुःखैः - आध्यात्मिक आधिभौतिक इत्यादि दुःखांनी - कर्हिचित् अविमुक्तस्त मर्त्यस्य - केव्हाही न सोडलेल्या मनुष्याला - कृच्छ्रोपनतैः अर्थैः कामैः - मोठया संकटांनी संपादिलेले द्रव्य व उपभोग यांशी - किं क्रियेत - काय करता येईल. ॥ ३० ॥
नेहमी शारीरिक वैगेरे दु:खांनी बेजार झालेल्या मनुष्याने अतिशय कष्टाने काही धन आणि भोग प्राप्त करून घेतले तरी, त्याला मरण हे येणारच असल्याने, त्यांचा काय उपयोग ? (३०)
पश्यामि धनिनां क्लेशं लुब्धानां अजितात्मनाम् ।
भयाद् अलब्धनिद्राणां सर्वतोऽभिविशङ्किनाम् ॥ ३१ ॥
लोभी नी विषयासक्त यांचे दुःख बघेच मी । भयाने नच त्या झोप सर्वांशी संशयो मनीं ॥३१॥
अजितात्मनां लुब्धानां - इंद्रिये न जिंकलेले व लोभी अशा - भयात् अलब्धनिद्राणां - भीतीने झोप न घेणार्या - सर्वतः अभिविशंकिनां धनिनां - सर्व ठिकाणी मनात भीति बाळगणार्या श्रीमंताचे - क्लेशं पश्यामि - दुःख मी पाहत आहे. ॥ ३१ ॥
लोभी आणि इंद्रियांच्या अधीन असणारे धनिक यांना होणारे दु:ख तर मी पाहातच आहे. भीतीने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो. (३१)
राजतश्चौरतः शत्रोः स्वजनात्पशुपक्षितः ।
अर्थिभ्यः कालतः स्वस्मान् नित्यं प्राणार्थवद्भयम् ॥ ३२ ॥
धनाचा लोभि त्या चोर शत्रू स्वजन याचक । काळाचे भय ही नित्य स्वता शंकीत होतसे । चुकोनी खोटना यावी भिती तो आपुलीहि की ॥३२॥
राजतः चोरतः शत्रोः स्वजनात् - राजापासून, चोरापासून, शत्रूपासून व स्वजनापासून - पशुपक्षितः अर्थिभ्यः - पशु, पक्षी व याचक यांपासून - कालतः स्वस्मात् - काळापासून आणि स्वतःपासून - नित्यं प्राणार्थवद्भयं (अस्ति) - सदा प्राण आणि द्रव्य ही धारण करणार्यांप्रमाणे भय असते. ॥ ३२ ॥
जे आपले जीवन आणि धन यांचे लोभी आहेत, ते राजा, चोर, शत्रू, स्वजन, पशु-पक्षी, याचक, काळ, इतकेच काय स्वत:लासुद्धा भीत असतात. (३२)
शोकमोहभयक्रोध रागक्लैब्यश्रमादयः ।
यन्मूलाः स्युर्नृणां जह्यात् स्पृहां प्राणार्थयोर्बुधः ॥ ३३ ॥
म्हणोनी शोक नी मोह क्रोध द्वेष नि ते भय । श्रमाची मृगया ना हो धन-देहासि लोभ ना ॥३३॥
बुधः - ज्ञानी पुरुषाने - नृणां शोकमोहभयक्रोध - मनुष्याचे शोक, मोह, भय, क्रोध, - रागक्लैब्यश्रमादयः - राग, दौर्बल्य व श्रम इत्यादि - यन्मूलाः स्युः - ज्यामुळे होतात - प्राणार्थयोः स्पृहां जह्यात् - ती प्राण व द्रव्य यांची इच्छा सोडून द्यावी. ॥ ३३ ॥
म्हणून ज्याच्यामुळे शोक, मोह, क्रोध, राग, भय, परिश्रम इत्यादी विकार उत्पन्न होतात, त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग करावा. (३३)
मधुकारमहासर्पौ लोकेऽस्मिन् नो गुरूत्तमौ ।
वैराग्यं परितोषं च प्राप्ता यच्छिक्षया वयम् ॥ ३४ ॥
अजगरो मधमाशी माझे श्रेष्ठ गुरूद्वय । तयांच्या अनुसाराने वैराग्य तोष लाभला ॥३४॥
अस्मिन् लोके - ह्या लोकांत - मधुकारमहासर्पौ नः गुरूत्तमौ - मधमाशी व अजगर हे दोन आमचे श्रेष्ठ गुरु होत - यच्छिक्षया - ज्यांच्या उपदेशाने - वैराग्यं परितोषं च वयं प्राप्ताः - वैराग्य आणि संतोष हे आम्ही मिळविले. ॥ ३४ ॥
अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वांत मोठे गुरू आहेत. त्यांच्या शिकवणुकीवरून आम्हांला वैराग्य आणि संतोष यांची प्राप्ती झाली आहे. (३४)
विरागः सर्वकामेभ्यः शिक्षितो मे मधुव्रतात् ।
कृच्छ्राप्तं मधुवद् वित्तं हत्वाप्यन्यो हरेत्पतिम् ॥ ३५ ॥
मधुमक्षी परी लोक कष्टाने धन संचिती । परी स्वामीस मारोनी लुटिती धन अन्यची । म्हणोनी शिकलो त्यांचे विरक्त राहणे सदा ॥३५॥
मधुव्रतात् - मधमाशीपासून - सर्वकामेभ्यः विरागः मे शिक्षितः - सर्व उपभोगांपासून विरक्तपणा मी शिकलो - पतिं हत्वा - धन्याला मारून - मधुवत् कृच्छ्राप्तं - मधाप्रमाणे संकटाने मिळविलेले द्रव्य - वित्तं अन्यः अपि हरेत् - दुसरा कोणीतरी हरण करितो. ॥ ३५ ॥
मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते, तसेच लोक मोठ्या कष्टाने धन-संचय करतात, परंतु दुसराच कोणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो. यावरून सर्व विषयभोगांपासून अलिप्त राहिले पाहिजे, हे मी शिकलो. (३५)
अनीहः परितुष्टात्मा यदृच्छोपनतादहम् ।
नो चेच्छये बह्वहानि महाहिरिव सत्त्ववान् ॥ ३६ ॥
अजगरा परी मीही पडोनी नित्य राहतो । दैवे जे मिळते त्यात संतुष्ट राहतो तसे । न मिळे दिनि कित्येक तरी धैर्येचि राह्तो ॥३६॥
अनीहः अहं - निरिच्छ असा मी - यदृच्छोपनतात् - सहजरीत्या मिळालेल्यावर - परितुष्टात्मा (अस्मि) - संतुष्ट आहे मन ज्याचे असा असतो - नो चत् - नाही तर - सत्त्ववन् - धैर्य धारण करणारा - महाहिः इव - अजगराप्रमाणे - बह्वहानि शये - पुष्कळ दिवस निजतो. ॥ ३६ ॥
मी अजगराप्रमाणे निश्चेष्ट पडून राहातो आणि दैवाने जे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट असतो. आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहातो. (३६)
क्वचिदल्पं क्वचिद् भूरि भुञ्जेऽन्नं स्वाद्वस्वादु वा ।
क्वचिद्भूरि गुणोपेतं गुणहीनमुत क्वचित् ॥ ३७ ॥
कधी थोडे कधी जास्त स्वादिष्ट चवहीन ही । कधी चोथा कधी सार भक्षोनी राहतो असा ॥३७॥
क्वचित् अल्पं - कधी थोडे - क्वचित् भूरि - कधी पुष्कळ - स्वादु वा अस्वादु - गोड किंवा कडु् - क्वचित् भूरिगुणोपेतं - कधी पुष्कळ गुणांनी युक्त - उत क्वचित् गुणहीनं - किंवा कधी ज्यात काहीच गुण नाही असे - अन्नं भुंजे - अन्न खातो. ॥ ३७ ॥
कधी थोडे अन्न खातो, तर कधी पुष्कळ. कधी स्वादिष्ट, तर कधी बेचव आणि कधी अनेक गुणांनी युक्त तर कधी अजिबात गुण नसलेले. (३७)
श्रद्धयोपाहृतं क्वापि कदाचिन्मानवर्जितम् ।
भुञ्जे भुक्त्वाथ कस्मिंश्चित् दिवा नक्तं यदृच्छया ॥ ३८ ॥
श्रद्धेने मिळता खातो अपमानेहि ते तसे । आपोआप मिळे तेंव्हा केंव्हाही एकदाचि ते ॥३८॥
क्व अपि - एखाद्या प्रसंगी - श्रद्धया उपाहृतं - श्रद्धेने आणिलेले - कदाचित् मानवर्जितम् - कधी अपमानाने दिलेले - भुञ्जे - मी खातो - अथ कस्मिंश्चित् (काले) - आणखी एखाद्या वेळी - यदृच्छया दिवानक्तं - सहजरीतीने दिवसा किंवा रात्री - भुक्त्वा (आस्से) - खाऊन पडलेला असतो. ॥ ३८ ॥
कधी मोठ्या प्रेमाने दिलेले अन्न खातो, तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर, कधी दिवसा, कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावरसुद्धा पुन्हा भोजन करतो. (३८)
क्षौमं दुकूलमजिनं चीरं वल्कलमेव वा ।
वसेऽन्यदपि सम्प्राप्तं दिष्टभुक्तुष्टधीरहम् ॥ ३९ ॥
प्रारब्धी मानितो तोष सुती रेशमी वस्त्र नी । वल्कले मृगचर्मादी मिळते तेचि धारितो ॥३९॥
दिष्टभुक् अहं - प्रारब्ध कर्म भोगणारा मी - तुष्टधीः - संतुष्ट आहे अंतःकरण ज्याचे असा होऊन - क्षौमं दुकूलं अजिनं चीरं वल्कलं - पीतांबर, कद, चर्म, व वल्कल - अन्यत् अपि वा संप्राप्तं एव वसे - किंवा दुसरेही मिळालेले नेसतो. ॥ ३९ ॥
मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणार्या भोगांवरच संतुष्ट असतो. म्हणून मला रेशमी, सुती, हरिणाचे कातडे किंवा फाटके वस्त्र, झाडाची साल किंवा आणखी काहीही, जे वस्त्र मिळेल ते मी अंगावर घालतो. (३९)
क्वचिच्छये धरोपस्थे तृणपर्णाश्मभस्मसु ।
क्वचित्प्रासादपर्यङ्के कशिपौ वा परेच्छया ॥ ४० ॥
तृणी पृथ्वी तसे पर्णीं राखेत पडतो कधी । दुजांची असता इच्छा महाली झोपतो कधी ॥४०॥
क्वचित् धरोपस्थे तृणपर्णाश्मभस्मसु - कधी पृथ्वीतलावर गवत, पातेरा, दगड किंवा राख ह्यांवर - क्वचित् परेच्छया - कधी दुसर्याच्या इच्छेने - प्रासादापर्यंके कशिपौ वा शये - राजवाडयात पलंगावर अथवा गादीवर निजतो. ॥ ४० ॥
मी कधी जमिनीवर, गवतावर, पानांवर, दगडावर किंवा राखेच्या ढिगावरही पडून राहातो, तर कधी दुसर्यांच्या इच्छेनुसार महालांतील पलंगावरील गादीवरही झोपतो. (४०)
क्वचित्स्नातोऽनुलिप्ताङ्गघ्गः सुवासाः स्रग्व्यलङ्कृतः ।
रथेभाश्वैश्चरे क्वापि दिग्वासा ग्रहवद् विभो ॥ ४१ ॥
स्नानादी करूनी केंव्हा शरीरा गंध लेपुनी । पुष्पमाळा गळ्यामध्ये लेवोनी रथि बैसतो । हत्ती घोडे कधी नेती कधी नग्नचि हिंडतो ॥४१॥
विभो - बा समर्था - क्वचित् स्नातः अनुलिप्तांगः - कधी स्नान केलेला व अंगाला उटी लाविलेला - सुवासाः स्रग्वी अलंकृतः - चांगले वस्त्र नेसलेला आणि माळा व अलंकार धारण केलेला - रथेभाश्र्वैः चरे - रथ, हत्ती किंवा घोडयावरून फिरतो - क्व अपि ग्रहवत् दिग्वासाः (चरामि) - कधी कधी पिशाच्चासारखा नग्न भटकतो. ॥ ४१ ॥
दैत्यराज, कधी स्नान करून, शरीराला चंदन लावून, सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि अलंकार घालून रथ, हत्ती आणि घोड्यांवर बसून हिंडतो, तर कधी पिशाच्चासारखा अगदी नग्नपणे हिंडतो. (४१)
नाहं निन्दे न च स्तौमि स्वभावविषमं जनम् ।
एतेषां श्रेय आशासे उतैकात्म्यं महात्मनि ॥ ४२ ॥
स्वभावे भिन्न त्या व्यक्ती न मी निंदी न वंदितो । कल्याण इच्छितो त्यांचे आत्म्याशी एकसंधता ॥४२॥
स्वभावविषमं जनं - स्वभावाने निरनिराळ्या असलेल्या लोकांना - अहं न निंदे न च स्तौमि - मी निंदित नाही अथवा स्तवीत नाही - एतेषां - ह्यांना - श्रेयः उत महात्मानि ऐकात्म्ये आशासे - कल्याणाच्या ठायी व परमात्म्याशी ऐक्य करितो. ॥ ४२ ॥
माणसांचे स्वभाव वेगवेगळे असतातच; म्हणून मी कोणाची निंदा करीत नाही की कोणाची स्तुती करीत नाही. मी फक्त त्यांचे कल्याण आणि परमात्म्याशी ऐक्य इच्छितो. (४२)
विकल्पं जुहुयाच्चित्तौ तां मनस्यर्थविभ्रमे ।
मनो वैकारिके हुत्वा तं मायायां जुहोत्यनु ॥ ४३ ॥
सत्याच्या अनुसंधानी तेणे वृत्तीत भेद ते । वृत्तीचे भ्रम चित्तात अहंकारात चित्त ते ॥४३॥
विकल्पं चित्तौ जुहुयात् - विकल्प भेदग्रहण करणार्या चित्तामध्ये हवन करावा - तां अर्थविभ्रमे - त्या चित्ताला ज्यांत व्यवहाराचे खेळ आहेत - मनसि जुहुयात् - अशा मनात लीन करावे - मनः वैकारिके हुत्वा - मनाला अहंकारात लीन करून - (तत्) अनु तं मायायां जुहोति - त्यानंतर अहंकाराला मायेत लीन करितो. ॥ ४३ ॥
सत्याचे अनुसंधान ठेवणार्या मनुष्याने, त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात, त्यांचे चित्तवृत्तीमध्ये हवन करावे. या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणार्या चित्तवृत्तीला मनामध्ये, मनाला सात्विक अहंकारात आणि सात्विक अहंकाराला महत्तत्त्वाद्वारे मायेत हवन करावे. (४३)
आत्मानुभूतौ तां मायां जुहुयात् सत्यदृङ्मुनिः ।
ततो निरीहो विरमेत् स्वानुभूत्यात्मनि स्थितः ॥ ४४ ॥
मायेमध्ये अहंकारा माया ज्ञानात हव्य हो । साक्षात्कारे तदा रूपी निष्क्रिय स्थित नित्य हो ॥४४॥
सत्यदृक् मुनिः - सत्यस्वरूप पाहणार्या मुनीने - तां मायां आत्मानुभूतौ जुहुयात् - त्या मायेला आत्मानुभावांत लीन करावे - ततः निरीहः (भूत्वा) - नंतर निरीच्छ होऊन - स्वानुभूत्या आत्मानि - स्वानुभावाने आत्म्याच्या ठिकाणी - स्थितः विरमेत् - स्थिर होऊन त्याने विराम पावावे. ॥ ४४ ॥
अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे, असा बुद्धीचा निश्चय करून नंतर त्या मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावे. अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराद्वारे आत्मस्वरूपात स्थित होऊन निष्क्रिय आणि विरक्त व्हावे. (४४)
स्वात्मवृत्तं मयेत्थं ते सुगुप्तमपि वर्णितम् ।
व्यपेतं लोकशास्त्राभ्यां भवान्हि भगवत्परः ॥ ४५ ॥
माझी आत्मकथा गुह्य परा शास्त्राहुनी अशी । प्रीय तू भगवंताशी म्हणोनी बोललो तुला ॥४५॥
इत्थं - याप्रमाणे - लोकशास्त्राभ्यां व्यपेतं - लोकाचाराहून वेगळे असे - सुगुप्तं अपि स्वात्मवृत्तं - गुप्त असलेलेही आपले चरित्र - ते मया वर्णितं - तुला मी सांगितले - भवान् हि भगवत्परः (असि) - कारण तू भगवद्भक्त आहेस. ॥ ४५ ॥
माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार व शास्त्रे यांच्या पलीकडची वस्तू आहे. तू भगवंतांचा परम भक्त आहेस, म्हणून मी तुला हे रहस्य सांगितले. (४५)
नारद उवाच -
धर्मं पारमहंस्यं वै मुनेः श्रुत्वासुरेश्वरः । पूजयित्वा ततः प्रीत आमन्त्र्य प्रययौ गृहम् ॥ ४६ ॥ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे युधिष्ठिरनारदसंवादे यतिधर्मे त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
नारदजी सांगतात - परमहंस असा धर्म प्रल्हादे ऐकिला पुन्हा । दत्तासी पूजिले आणि प्रसन्न लोटला घरा ॥४६॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ ७ ॥ १३ ॥ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ततः - नंतर - असुरेश्वरः - प्रल्हाद - मुनेः पारमहंस्यं धर्मं श्रुत्वा - मुनीपासून परमहंसाचा धर्म श्रवण करून - प्रातः - संतुष्ट झालेला - तं पूजयित्वा - त्याचा बहुमान करून - आमंत्र्य - निरोप घेऊन - गृहं वै प्रययौ - घरी गेला. ॥ ४६ ॥
नारद म्हणतात – मुनींकडून परमहंसांच्या या धर्मांचे श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने आपल्या राजधानीकडे प्रयाण केले. (४६)
स्कंध सातवा - अध्याय तेरावा समाप्त |