|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  
प्रह्रादनृसिंहसंवादः, प्रह्रादाय वरप्रदानं तस्य  प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुरदहनाची कथा - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
नारद उवाच -  (अनुष्टुप्) भक्तियोगस्य तत् सर्वं अन्तरायतयार्भकः । मन्यमानो हृषीकेशं स्मयमान उवाच ह ॥ १ ॥ 
नारदजी सांगतात -  (अनुष्टुप्) वर तो भक्ति मार्गाचे विघ्न जाणोनि अर्भके । प्रल्हाद हासुनी चित्ती हरीला वदला असे ॥१॥ 
तत् -  ते  - सर्वं -  सगळे  - भक्तियोगस्य -  भक्तियोगाचे  - अंतरायतया -  विघ्न म्हणून  - मन्यमानः -  मानणारा  - अर्भकः (प्रल्हादः) -  बालक प्रल्हाद  - स्मयमानः -  हसत  - हृषीकेशं -  नरहरीला  - उवाच ह -  म्हणाला. ॥ १ ॥ 
 
नारद म्हणतात – वयाने लहान असूनही प्रल्हादाने जाणले की सर्व वर हे भक्तीमध्ये विघ्न आणणारे आहेत. म्हणून स्मित करीत तो भगवंतांना म्हणाला. (१) 
 
प्रह्राद उवाच -  मा मां प्रलोभयोत्पत्त्या ऽऽसक्तंकामेषु तैर्वरैः । तत्सङ्गभीतो निर्विण्णो मुमुक्षुस्त्वामुपाश्रितः ॥ २ ॥ 
प्रल्हाद म्हणाला - जन्मताचि प्रभो मी तो विषयासक्त हा असे । म्हणोनी मजला तुम्ही न दावा ती प्रलोभने । भोगासी भिउनी मी तो सुटण्या पदि लागलो ॥२॥ 
उत्पत्त्या -  जन्मतः  - कामेषु -  विषयांच्या ठिकाणी  - आसक्तं -  आसक्त अशा  - मां -  मला  - तैः -  त्या  - वरैः -  वरांनी  - मा प्रलोभय -  लालूच दाखवू नकोस  - तत्संगभीतः -  त्या उपभोगांच्या संगाला भ्यालेला  - निर्विण्णः -  खिन्न झालेला  - मुमुक्षुः (अहं) -  मुक्तीची इच्छा करणारा मी  - त्वां -  तुला  - उपाश्रितः -  शरण आलो आहे. ॥ २ ॥ 
 
प्रल्हाद म्हणाला – प्रभो, मी जन्मत:च विषयभोगात आसक्त झालेलो आहे. आता पुन्हा मला या वरांच्या लोभात पाडू नका. त्या भोगांच्या संगाला भिऊन व त्यांचा वीट येऊन मुक्तीच्या अभिलाषेनेच मी आपल्याला शरण आलो आहे. (२) 
 
भृत्यलक्षणजिज्ञासुः भक्तं कामेष्वचोदयत् । भवान् संसारबीजेषु हृदयग्रन्थिषु प्रभो ॥ ३ ॥ 
माझा भाव पहायाते वर कां देतसा तुम्ही । भोगाच्या हृदयोग्रंथी भवात टाकिती पुन्हा ॥३॥ 
प्रभो -  हे प्रभो  - भृत्यलक्षणजिज्ञासुः -  सेवकांची लक्षणे कळण्याची इच्छा करणारे  - भवान् -  आपण  - भक्तं -  भक्ताला  - संसारबीजेषु -  संसाराचे बीज अशा  - हृदयग्रंथिषु -  हृदयाला गाठीप्रमाणे बंधनरूप होणार्या  - कामेषु -  उपभोगांच्या ठिकाणी  - अचोदयत् -  प्रेरणा करिते झाला. ॥ ३ ॥ 
 
भगवन, माझ्यामध्ये भक्ताची लक्षणे आहेत की नाहीत, हे जाणून घेण्यासाठीच आपण आपल्या भक्ताला वरदान मागण्याची प्रेरणा दिली आहे. हे विषयभोग हृदयाची अज्ञानाची गाठ अधिकच मजबूत करणारे आणि जन्ममृत्यूचे कारण आहेत. (३) 
 
नान्यथा तेऽखिलगुरो घटेत करुणात्मनः । यस्त आशिष आशास्ते न स भृत्यः स वै वणिक् ॥ ४ ॥ 
जगद्गुरो परीक्षाच घेतसा वंचना नको । भक्तीची देव-घेवही भक्त केवळ जाणती । मागे अन्य वरा तो त्या भक्ती ना मुळि लाभते ॥४॥ 
अखिलगुरो -  हे सर्वांच्या गुरो  - अन्यथा -  असे नसेल तर  - करुणात्मनः -  कृपाळु अंतःकरणाच्या  - ते (भक्तानां विषयेषु प्रलोभनं) न घटेत् -  तुजकडून भक्ताला लालुच दाखविण्याकडे प्रवृत्ति झाली नसती  - यः -  जो  - ते -  तुझ्यापासून  - आशिषः -  भोग  - आशास्ते -  इच्छितो  - सः -  तो  - भृत्यः -  सेवक  - न (अस्ति) -  नव्हे  - सः -  तो  - वै -  खरोखर  - वणिक् (अस्ति) -  व्यापारी होय. ॥ ४ ॥ 
 
हे जगद्रुरो, या बाबतीत परीक्षा पाहण्याशिवाय दुसरे काही कारण दिसत नाही. कारण आपण दयाळू आहात. जो सेवक आपल्याकडून वर इच्छितो, तो सेवक नसून व्यापारी होय. (४) 
 
आशासानो न वै भृत्यः स्वामिन्याशिष आत्मनः । न स्वामी भृत्यतः स्वाम्यं इच्छन् यो राति चाशिषः ॥ ५ ॥ 
मागे तो नच हो दास इच्छी सेवा न स्वामि तो । जो स्वामी राबवू पाहे न स्वामी होय तो कधी ॥५॥ 
स्वामिनि -  स्वामीकडून  - आत्मनः -  स्वतःला  - आशिषः -  भोग  - आशासानः -  इच्छिणारा  - वै -  खरोखर  - भृत्यः -  सेवक  - न वै -  नव्हेच  - न च (सः) स्वामी -  आणि तो धनी नव्हे  - यः -  जो  - भृत्यतः -  चाकरापासून  - स्वाम्यं -  धनीपणाला  - इच्छन् -  इच्छिणारा  - भृत्याय आशिषः -  त्या सेवकाला भोग  - राति -  देतो. ॥ ५ ॥ 
 
जो स्वामीकडून आपल्या कामनांची पूर्तता करून घेऊ इच्छितो, तो सेवक नव्हे आणि जो त्याच्यावर सत्ता गाजविण्यासाठी त्याच्या कामना पूर्ण करतो तो स्वामी नव्हे. (५) 
 
अहं तु अकामः त्वद्भक्तः त्वं च स्वाम्यनपाश्रयः । नान्यथेहावयोरर्थो राजसेवकयोरिव ॥ ६ ॥ 
निष्कामी दास मी देवा तुम्ही स्वामी तसेच की । राजाच्या सेवकाऐसा न संबंध तसा मुळी ॥६॥ 
अहं तु -  मी तर  - अकामः -  निरिच्छ असा  - त्वद्भक्तः (अस्मि) -  तुझा भक्त आहे  - च -  आणि  - त्वं -  तू  - अनपाश्रयः -  निरिच्छ असा  - स्वामी (असि) -  स्वामी आहेस  - इह -  येथे  - राजसेवकयोः इव -  राजा व सेवक ह्यांच्या संबंधासारखे  - आवयोः -  उभयतांचे  - अन्यथा -  ह्याशिवाय दुसरे  - अर्थः न (अस्ति) -  प्रयोजन नाही. ॥ ६ ॥ 
 
मी आपला निष्काम सेवक आहे आणि आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात. राजा आणि सेवक यांचा कारणपरत्वे जसा स्वामी-सेवक असा संबंध असतो, तसा तर तुमचा व माझा संबंध नाही. (६) 
 
यदि रासीश मे कामान् वरांस्त्वं वरदर्षभ । कामानां हृद्यसंरोहं भवतस्तु वृणे वरम् ॥ ७ ॥ 
वरदा ! स्वामि माझ्या रे वर देऊच इच्छिसी । तर दे ’वासना बीज हृदयी नच अंकुरो’ ॥७॥ 
वरदर्षभ -  हे वरदोत्तमा  - ईश -  ईश्वरा  - त्वं -  तू  - मे -  मला  - कामान् वरान् -  इच्छित वर  - यदि -  जर  - रासि -  देशील  - तु -  तर  - भवतः -  तुझ्याजवळ  - हृदि -  हृदयात  - कामानां -  कामांचा  - असंरोहं -  अंकुर न उद्भवणे हा  - वरं -  वर  - वृणे -  मी मागतो. ॥ ७ ॥ 
 
हे वर देणार्यांचे शिरोमणी स्वामी, मी मागेन तो वर आपण मला देऊ इच्छित असाल, तर माझ्या हृदयात कधीही कोणत्याही कामनेचे बीज अंकुरितच होऊ नये, हा वर द्या. (७) 
 
इन्द्रियाणि मनः प्राण आत्मा धर्मो धृतिर्मतिः । ह्रीः श्रीस्तेजः स्मृतिः सत्यं यस्य नश्यन्ति जन्मना ॥ ८ ॥ 
हृदयी कामना येता इंद्रीय मन प्राण नी । देह धर्म स्मृती तेज धैर्य बुद्धी नि सत्य ते ॥८॥ 
यस्य -  ज्या कामाच्या  - जन्मना -  उत्पत्तीने  - इंद्रियाणि -  इंद्रिये  - मनः -  मन  - प्राणः -  प्राण  - आत्मा -  देह  - धर्मः -  धर्म  - धृतिः -  धैर्य  - मतिः -  बुद्धि  - ह्लीः -  लज्जा  - श्रीः -  संपत्ति  - तेजः -  तेज  - स्मृतिः -  स्मृति  - सत्यं च -  आणि सत्य  - नश्यंति -  नाश पावतात. ॥ ८ ॥ 
 
हृदयामध्ये कोणत्याही कामनेचा उदय होताच इंद्रिये, मन, प्राण, देह, धर्म, धैर्य, बुद्धी, लज्जा, लक्ष्मी, तेज, स्मृती आणि सत्य ही सर्व नष्ट होतात. (८) 
 
विमुञ्चति यदा कामान् मानवो मनसि स्थितान् । तर्ह्येव पुण्डरीकाक्ष भगवत्त्वाय कल्पते ॥ ९ ॥ 
नष्टोनी जातसे सर्व न राही मुळि कांहिही । सोडी जो कामना देवा तेंव्हा तो मिळवी तुज ॥९॥ 
पुंडरीकाक्ष -  हे कमलनयना  - यदा -  ज्यावेळी  - मानवः -  मनुष्य  - मनसि -  मनात  - स्थितान् -  राहणार्या  - कामान् -  वासनांना  - विमुंचति -  सोडून देतो  - तर्हि एव -  तेव्हाच  - भगवत्त्वाय -  भगवत्स्वरूपाला  - कल्पते -  तो प्राप्त होतो. ॥ ९ ॥ 
 
हे कमलनयना, ज्यावेळी मनुष्य आपल्या मनात घर करून राहिलेल्या कामनांचा त्याग करतो, त्याचवेळी तो भगवत्स्वरूपाला प्राप्त होतो. (९) 
 
ओं नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने । हरयेऽद्भुतसिंहाय ब्रह्मणे परमात्मने ॥ ॥ 
भगवंता नमो तूते सर्वांच्या हृदयात तू । वससी श्री नृसिंहा तू नमितो मी पुनः पुन्हा ॥१०॥ 
भगवते -  षड्गुणैश्वर्यसंपन्न  - पुरुषाय -  पुराणपुरुष  - महात्मने -  जगदात्मा  - ब्रह्मणे -  परब्रह्म  - परमात्मने -  परमात्मा अशा  - अद्भुतसिंहाय -  विलक्षण सिंहरूप धारण करणार्या  - हरये -  भक्तांची संकटे हरण करणार्या  - तुभ्यं -  तुला  - नमः -  नमस्कार असो. ॥ १० ॥ 
 
भगवन, आपल्याला नमस्कार असो. आपण सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले उदार व स्वत: परब्रह्म परमात्मा आहात. अद्भुत नृसिंहरूपधारी श्रीहरींच्या चरणांना मी नमस्कार करतो. (१०) 
 
नृसिंह उवाच -  नैकान्तिनो मे मयि जात्विहाशिष आशासतेऽमुत्र च ये भवद्विधाः । तथापि मन्वन्तरमेतदत्र दैत्येश्वराणामनुभुङ्क्ष्व भोगान् ॥ ११ ॥ 
श्रीनृसिंह भगवान् म्हणाले -  (इंद्रवज्रा) तुझ्या परी ते असतात भक्त एकांतप्रेमीच न कांहि इच्छा । न जास्त एका मनवंतरास या दैत्यराज्या करि भोग मान्य ॥११॥ 
ये -  जे  - मे -  माझे  - भवद्विधाः -  तुझ्यासारखे  - एकान्तिनः (भक्ताः सन्ति) -  निस्सीम भक्त आहेत  - ते-ते (जातु) -  कधीही  - इह -  ह्या लोकी  - च -  आणि  - अमुत्र -  परलोकी  - मयि -  माझ्यापासून  - आशिषः -  उपभोग  - न आशासते -  मागत नाहीत  - अथ अपि -  तथापि  - एतत् मन्वंतरं -  ह्या मन्वंतरापर्यंत  - अत्र -  येथे  - दैत्येश्वराणां -  दैत्य राजांच्या  - भोगान् -  ऐश्वर्यांना  - अनुभुंक्ष्व -  भोग. ॥ ११ ॥ 
 
श्रीनृसिंह म्हणाले – तुझ्यासारखे माझे अनन्य भक्त या किंवा परलोकातील कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करीत नाहीत. तरीसुद्धा एक मन्वन्तरापर्यंत तू दैत्याधिपतींचे सर्व विषय भोग. (११) 
 
कथा मदीया जुषमाणः प्रियास्त्वं  आवेश्य मामात्मनि सन्तमेकम् । सर्वेषु भूतेष्वधियज्ञमीशं यजस्व योगेन च कर्म हिन्वन् ॥ १२ ॥ 
भोक्ता रूपाने वसतो हृदयीं मी पाही मला तू हृदयात नित्य । नी कीर्तने नित्यही ऐकणे तू प्रारब्ध भोगा करि क्षीण तेणे ॥१२॥ 
प्रियाः -  आवडत्या अशा  - मदीयाः -  मत्संबंधी  - कथाः -  कथा  - जुषमाणः -  सेवन करणारा  - त्वं -  तू  - सर्वेषु भूतेषु -  सर्व प्राण्यांच्या ठिकाणी  - संतं -  वास करणार्या  - एकं -  अद्वितीय  - ईशं -  ऐश्वर्यवान अशा  - अधियज्ञं -  यज्ञाधिपती-पती अशा  - मां -  मला  - आत्मनि -  अंतःकरणात  - आवेश्य -  स्थापन करून  - च -  आणि  - योगेन -  मला अर्पण करण्याच्या योगाने  - कर्मं -  कर्म  - हिन्वन् -  सोडीत  - यजस्व -  पूजा कर. ॥ १२ ॥ 
 
सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये यज्ञभोक्ता ईश्वर एकटा मीच आहे. त्या माझी तू आपल्या हृदयात स्थापना कर आणि तुला प्रिय असणार्या माझ्या कथा ऐकत माझीच आराधना कर. आणि अशा प्रकारे आपल्या प्रारब्ध कर्मांचा क्षय कर. (१२) 
 
भोगेन पुण्यं कुशलेन पापं  कलेवरं कालजवेन हित्वा । कीर्तिं विशुद्धां सुरलोकगीतां विताय मामेष्यसि मुक्तबन्धः ॥ १३ ॥ 
भोगात पुण्योफळ आणि तैसे निष्काम कर्मे करि नाश पाप । नि मुक्त होता मजपाशि येई गातील स्वर्गी तव कीर्ति देव ॥१३॥ 
भोगेन -  उपभोगाने  - पुण्यं -  पुण्याला  - कुशलेन -  पुण्याचरणाने  - पापं -  पापाला  - कालजवेन -  कालगतीने  - कलेवरं -  देहाला  - हित्वा -  सोडून  - विशुद्धां -  अत्यंत निर्मळ अशा  - सुरलोकगीतां -  देवलोकांनी गाइलेल्या  - कीर्तिं -  कीर्तीला  - विताय -  पसरून  - मुक्तबंधः -  सर्व बंधनांपासून मुक्त झालेला  - मां -  मत्स्वरूपी  - एष्यसि -  प्राप्त होशील. ॥ १३ ॥ 
 
भोगांच्या द्वारे पुण्यकर्मांचे फळ आणि निष्काम पुण्यकर्मांनी पापाचा नाश करून देवलोकांनी सुद्धा गावी, अशी पवित्र कीर्ती जगात पसरवून, योग्य वेळी शरीराचा त्याग करून मुक्त होऊन तू माझ्याकडे येशील. (१३) 
 
(अनुष्टुप्)  य एतत् कीर्तयेन्मह्यं त्वया गीतमिदं नरः । त्वां च मां च स्मरन्काले कर्मबन्धात् प्रमुच्यते ॥ १४ ॥ 
(अनुष्टुप्) केली ती स्तुति तू सर्व गाता आठवि जो मनीं । तुजला मजला नित्य तो हो मुक्त भवातुनी ॥१४॥ 
यः -  जो  - नरः -  मनुष्य  - त्वां -  तुझे  - च -  आणि  - मां -  माझे  - च -  आणि  - इदं -  ह्या स्तवाचे  - स्मरन् -  स्मरण करीत  - काले -  वेळोवेळी  - मह्यं -  माझ्यासाठी  - त्वया -  तुझ्याकडून  - गीतं इदं (स्तोत्रं) -  गाईलेले हे स्तोत्र  - कीर्तयेत् -  पठण करील  - (सः) कर्मबंधात् -  तो कर्मबंधापासून  - विमुच्यते -  मुक्त होईल. ॥ १४ ॥ 
 
तू केलेल्या माझ्या या स्तुतीचे जो मनुष्य संकीर्तन करील आणि त्याचवेळी माझे आणि तुझे स्मरणसुद्धा करील, तो कर्मबंधनातून मुक्त होईल. (१४) 
 
प्रह्राद उवाच -  वरं वरय एतत् ते वरदेशान् महेश्वर । यद् अनिन्दत् पिता मे त्वां अविद्वांस्तेज ऐश्वरम् ॥ १५ ॥ विद्धामर्षाशयः साक्षात् सर्वलोकगुरुं प्रभुम् । भ्रातृहेति मृषादृष्टिः त्वद्भक्ते मयि चाघवान् ॥ १६ ॥ 
प्रल्हाद म्हणाला -  महेश्वरा वरदानी तुला आणिक मागतो । चराचरगुरू ईशा पित्याने निंदिले असे ॥१५॥ वधिले विष्णुने बंधू म्हणोनी क्रोधले बहू । भक्त मी म्हणुनी माझा द्रोह केला असे तये ॥१६॥ 
महेश्वर -  हे परमेश्वरा  - वरदेशात् -  वर देणार्यांमध्ये श्रेष्ठ अशा  - ते -  तुझ्यापासून  - एतत् वरं -  हा वर  - यत् -  की  - वरये -  मी मागतो  - ऐश्वरं -  ईश्वरी  - तेजः -  तेज  - अविद्वान् -  न जाणणारा  - विद्धामर्षाशयः -  ज्याचे मन क्रोधाने व्याप्त झाले आहे असा  - साक्षात् -  प्रत्यक्ष  - सर्वलोकगुरुं -  सर्व लोकांचा गुरु अशा  - प्रभुं -  ईश्वराविषयी  - भ्रातृहा -  भावाला मारणारा  - इति -  असा  - मृषादृष्टिः -  मिथ्या ग्रह करणारा  - त्वद्भक्ते -  तुझा भक्त अशा  - मयि -  माझ्या ठिकाणी  - अघवान् -  छळ करणारा  - मे -  माझा  - पिता -  बाप  - त्वां -  तुला  - अनिंदत् -  निंदिता झाला. ॥ १५-१६ ॥ 
 
प्रल्हाद म्हणाला – महेश्वरा, आपण वर देणार्यांचे स्वामी आहात. आपल्याकडे मी आणखी एक वर मागतो. आपले ईश्वरी तेज आणि शक्तिमान चराचर गुरू असलेल्या आपणास माझ्या पित्याने जाणून न घेता आपली निंदा केली. "ह्या विष्णूने आपल्या भावाला मारले" अशा खोट्या कल्पनेने माझे वडील क्रोधावेग आवरू शकले नाहीत. म्हणूनच त्यांनी आपला भक्त असल्याकारणाने माझ्याशीही द्रोह केला. (१५-१६) 
 
तस्मात् पिता मे पूयेत दुरन्ताद् दुस्तरादघात् । पूतस्तेऽपाङ्गसंदृष्टः तदा कृपणवत्सल ॥ १७ ॥ 
दीनबंधो ! तुझी दृष्टी होता ते शुद्ध जाहले । परी दुस्तर कर्मांना नष्टावे सत्वरी हरी ॥१७॥ 
तस्मात् -  त्या  - दुरंतात् -  अपरंपार अशा  - दुस्तरात् अघात् -  दुस्तर पापापासून  - मे -  माझा  - पिता -  पिता  - पूयेत -  पवित्र होवो  - कृपणवत्सल -  हे दीनदयाळा  - ते -  तुझ्या  - अपांगसंदृष्टः सः -  कटाक्षांनी पाहिलेला तो  - तदा -  तेव्हाच  - पूतः -  पवित्र झाला. ॥ १७ ॥ 
 
हे दीनबंधो, आपली दृष्टी पडताच जरी ते पवित्र झाले असले, तरीसुद्धा मी आपणास प्रार्थना करतो की, सहज नाश न पावणार्या दुस्तर दोषापासून माझे वडील शुद्ध व्हावेत. (१७) 
 
श्रीभगवानुवाच -  त्रिःसप्तभिः पिता पूतः पितृभिः सह तेऽनघ । यत्साधोऽस्य गृहे जातो भवान् वै कुलपावनः ॥ १८ ॥ 
श्रीनृसिंह भगवान् म्हणाले -  तुझ्यापरी कुळी पुत्र जन्मता भक्त पावन । तरती पितरे पूर्व एक्केविस पिढ्याचिये । पित्याचा नच तो प्रश्न स्वयं पावन जाहले ॥१८॥ 
अनघ -  हे निष्पाप  - साधो -  साधो प्रल्हादा  - ते -  तुझा  - पिता -  पिता  - त्रिःसप्तभिः -  एकवीस  - पितृभिः सह -  पूर्वजांसह  - पूतः -  पवित्र झाला आहे  - यत् -  कारण  - भवान् -  तू  - अस्य -  ह्याच्या  - गृहे -  घरी  - वै -  खरोखर  - कुलपावनः -  कुळाला पवित्र करणारा असा  - जातः -  उत्पन्न झालास. ॥ १८ ॥ 
 
श्रीभगनान म्हणाले – हे निष्पाप प्रल्हादा, तुझे वडील त्यांच्या एकवीस पिढ्यांतील पितरांसह पवित्र झाले. कारण कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा पुत्र त्यांना झाला. (१८) 
 
यत्र यत्र च मद्भक्ताः प्रशान्ताः समदर्शिनः । साधवः समुदाचाराः ते पूयन्तेऽपि कीकटाः ॥ १९ ॥ 
माझे भक्त समदर्शी सदाचारी नि शांत ते । ज्या वाटे जात तेथीच पवित्र कीट होतही ॥१९॥ 
यत्रयत्र च -  आणि जेथेजेथे  - प्रशांताः -  अत्यंत शांत  - समदर्शिनः -  समदृष्टि ठेवणारे  - साधवः -  सत्पुरुष  - समुदाचाराः -  ज्यांचा आचार चांगला आहे असे  - मद्भक्ताः (सन्ति) -  माझे भक्त होतात  - ते -  ते  - कीकटाः अपि -  कीकट देश सुद्धा  - पूयंति -  पवित्र होतात. ॥ १९ ॥ 
 
माझे शांत, समदर्शी आणि सदाचारी भक्त जेथे जेथे निवास करतात, ते देश पापांची खाण असले तरी पवित्र होऊन जातात. (१९) 
 
सर्वात्मना न हिंसन्ति भूतग्रामेषु किञ्चन । उच्चावचेषु दैत्येन्द्र मद्भावविगतस्पृहाः ॥ २० ॥ 
दैत्येंद्रा भक्त ते माझे भक्तीने मोह नाशिती । आत्मभक्तिकधी ना ते प्राण्यांना कष्ट पोचिती ॥२०॥ 
दैत्येंद्र -  हे दैत्यराजा  - मद्भावेन -  माझ्या भक्तिमुळे  - गतस्पृहाः -  निरिच्छ झालेले भक्त  - सर्वात्मना -  कायावाचामनाने  - उच्चावचेषु -  उच्च व नीच अशा  - भूतग्रामेषु -  भूतसमुदायांतील  - किंचन -  कोणाचीही  - न हिंसन्ति -  हिंसा करीत नाहीत. ॥ २० ॥ 
 
दैत्यराज, माझ्या भक्तिभावामुळे ज्यांच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहेत, ते लहान-मोठ्या कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास देत नाहीत. कारण त्यांचा सर्वांच्याबद्दल आत्मभाव निर्माण झालेला असतो. (२०) 
 
भवन्ति पुरुषा लोके मद्भक्तास्त्वां अनुव्रताः । भवान्मे खलु भक्तानां सर्वेषां प्रतिरूपधृक् ॥ २१ ॥ 
अनुयायी जगी जे जे तुझे ते अनुयायि ही । होतील भक्तची माझे पुत्रा आदर्श तू तया ॥२१॥ 
लोके -  जगात  - त्वां -  तुझ्या  - अनुव्रताः -  अनुरोधाने वागणारे  - पुरुषाः -  पुरुष  - मद्भक्ताः -  माझे भक्त  - भवंति -  होतील  - भवान् -  तू  - मे -  माझ्या  - सर्वेषां -  संपूर्ण  - भक्तानां -  भक्तांना  - प्रतिरूपधृक् (अस्ति) -  उपमा देण्याजोगा आहेस ॥ २१ ॥ 
 
जगात जे लोक तुझ्यावर प्रेम करतील, ते सुद्धा माझे भक्त होतील. माझ्या सर्व भक्तांचा तू आदर्श आहेस. (२१) 
 
कुरु त्वं प्रेतकार्याणि पितुः पूतस्य सर्वशः । मदङ्गस्पर्शनेनाङ्ग लोकान्यास्यति सुप्रजाः ॥ २२ ॥ 
पवित्र जरि तू झाला स्पर्शाने माझिया करे । अंत्येष्टी करणे त्यांची गती उत्तम त्यां असे ॥२२॥ 
अंग -  बा प्रल्हादा  - त्वं -  तू  - सर्वशः -  सर्वतोपरि  - पूतस्य -  पवित्र झालेल्या अशा  - पितुः -  पित्याची  - प्रेतकार्याणि -  और्ध्वदेहिक कार्ये  - कुरु -  कर  - सुप्रजाः -  तुझ्यासारखा सत्पुत्र ज्याच्या पोटी उत्पन्न झाला असा तुझा पिता  - मदङ्गस्पर्शनेन -  माझ्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळे  - लोकान् -  चांगल्या लोकांना  - यास्यति -  जाईल ॥ २२ ॥ 
 
माझ्या शरीराचा स्पर्श झाल्याने तुझे वडील पूर्णपणे पवित्र झाले असले, तरी तू त्यांची अंत्येष्टी कर. तुझ्यासारख्या मुलामुळेच त्यांना उत्तम लोकाची प्राप्ती होईल. (२२) 
 
पित्र्यं च स्थानमातिष्ठ यथोक्तं ब्रह्मवादिभिः । मय्यावेश्य मनस्तात कुरु कर्माणि मत्परः ॥ २३ ॥ 
वत्सा घेई पदभार त्यांचा नी वेदवादि त्या । मुनींची मानुनी आज्ञा चित्त माझ्यात लाव तू ॥२३॥ 
तात -  बाळा प्रल्हादा  - पित्र्यं -  पित्याच्या  - स्थानं -  सिंहासनावर  - आतिष्ठ -  बैस  - च -  आणि  - मयि -  माझ्याठिकाणी  - मनः -  अंतःकरण  - आवेश्य -  ठेवून  - मत्परः -  माझ्यावर निष्ठा ठेवणारा  - कर्माणि -  कर्मे  - कुरु -  कर ॥ २३ ॥ 
 
वत्सा, तू आपल्या पित्याच्या गादीवर बस आणि वेदज्ञ मुनींच्या आज्ञेनुसार माझे ठिकाणी मन ठेऊन आणि मला शरण येऊन माझ्या सेवेसाठीच आपली सर्व कर्मे कर. (२३) 
 
नारद उवाच -  प्रह्रादोऽपि तथा चक्रे पितुर्यत्साम्परायिकम् । यथाह भगवान् राजन् अभिषिक्तो द्विजोत्तमैः ॥ २४ ॥ 
नारदजी सांगतात -  केली अंत्येष्टि प्रल्हादे ईश आज्ञे युधिष्ठिरा । पुन्हा द्विजे तया केला राज्याभिषेक युक्त तो ॥२४॥ 
राजन् -  हे राजा  - द्विजोत्तमैः -  श्रेष्ठ ब्राह्मणांनी  - अभिषिक्तः -  राज्याभिषेक केलेला  - प्रल्हादः अपि -  प्रल्हादही  - भगवान् -  भगवान  - यथा -  जसे  - आह -  सांगता झाला  - तथा -  त्याप्रमाणे  - पितुः -  बापाचे  - यत् -  जे  - सांपरायिकं (कर्तव्यं) -  उत्तरकार्य करणे असते  - (तत्) चक्रे -  ते करिता झाला ॥ २४ ॥ 
 
नारद म्हणतात – युधिष्ठिरा, भगवंतांच्या आज्ञेनुसार प्रल्हादाने आपल्या पित्याचे क्रियाकर्म केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मणांनी त्याला राज्याभिषेक केला. (२४) 
 
प्रसादसुमुखं दृष्ट्वा ब्रह्मा नरहरिं हरिम् । स्तुत्वा वाग्भिः पवित्राभिः प्राह देवादिभिर्वृतः ॥ २५ ॥ 
या वेळी ऋषि नी ब्रह्म्ये प्रसन्न पाहता हरी । नृसिंहस्तुति गावोनी बोलले वाक्य हे असे ॥२५॥ 
ब्रह्मा -  ब्रह्मदेव  - देवादिभिः -  देवादिकांनी  - वृतः -  वेष्टिलेला  - नरहरिं -  नृसिंहरूपधारी  - हरिं -  परमेश्वराला  - प्रसादसुमुखं -  प्रसादाविषयी उद्युक्त झालेला असे  - दृष्टवा -  पाहून  - पवित्राभिः -  पवित्र अशा  - वाग्भिः -  शब्दांनी  - (तं) स्तुत्वा -  त्याची स्तुती करून  - प्राह -  बोलला. ॥ २५ ॥  
 
याचवेळी देव, ऋषी इत्यादींसह ब्रह्मदेवांनी, भगवान नृसिंह प्रसन्नवदन आहेत, असे पाहून पवित्र वचनांनी त्यांची स्तुती करून त्यांना म्हटले. (२५) 
 
ब्रह्मोवाच -  देवदेवाखिलाध्यक्ष भूतभावन पूर्वज । दिष्ट्या ते निहतः पापो लोकसन्तापनोऽसुरः ॥ २६ ॥ 
ब्रह्मदेव म्हणाले - देवाधिदेव सर्वात्म्या जीवदा मम पूर्वजा । दैत्याने त्रासिले सर्वां भाग्य की वधलास तो ॥२६॥ 
देवदेव -  हे देवाधिदेवा  - अखिलाध्यक्ष -  हे सर्वांच्या अध्यक्षा  - भूतभावनपूर्वज -  हे सृष्टि करणार्या प्रजापतीच्या पूर्वजा  - दिष्ट्या -  सुदैवाने  - ते -  तुझ्याकडून  - लोकस्रंतापनः -  लोकांना त्रास देणारा  - पापः -  पापी  - असुरः -  दैत्य  - हतः -  मारिला गेला ॥ २६ ॥ 
 
ब्रह्मदेव म्हणाले – हे देवांच्या आराध्यदेवा, आपण सर्वांतर्यामी, जीवांचे पालनकर्ते आणि सर्वांचे पूर्वज आहात. हा पापी दैत्य लोकांना फार त्रास देत असे. आपण याला मारलेत. ही फार चांगली गोष्ट झाली. (२६) 
 
योऽसौ लब्धवरो मत्तो न वध्यो मम सृष्टिभिः । तपोयोगबलोन्नद्धः समस्तनिगमानहन् ॥ २७ ॥ 
तसा वर तया मी तो दिधला कोणि ना वधो । म्हणोनी माजला होता तपे वेदां पुढेही तो ॥२७॥ 
यः -  जो  - असौ -  हा  - मत्तः -  माझ्यापासून  - लब्धवरः -  वर प्राप्त झाला आहे ज्याला असा  - मम सृष्टिभिः -  मी उत्पन्न केलेल्या प्राण्यांकडून  - न वध्यः -  मारिला जाण्यास अशक्य झालेला  - तपोयोगबलोन्नद्धः -  तपश्चर्या आणि योग यांच्या सामर्थ्याने उन्मत्त झालेला दैत्य  - समस्तनिगमान् -  सर्व वैदिक धर्मांना  - अहन् -  बुडविता झाला ॥ २७ ॥ 
 
मी याला वर दिला होता की, माझ्या सृष्टीतील कोणताच प्राणी तुझा वध करू शकणार नाही, त्यामुळे तो मस्तवाल झाला होता. तपश्चर्या, योग आणि बळ यांच्यायोगे उच्छृंखल होऊन याने सर्व वेदविधींचा उच्छेद करून टाकला होता. (२७) 
 
दिष्ट्यास्य तनयः साधुः महाभागवतोऽर्भकः । त्वया विमोचितो मृत्योः दिष्ट्या त्वां समितोऽधुना ॥ २८ ॥ 
आनंद यातही आहे प्रल्हादा रक्षिलेस तू । आनंदी शुभ ही गोष्ट तो आहे भक्त पावन ॥२८॥ 
दिष्ट्या -  सुदैवाने  - अस्य -  ह्या दैत्याचा  - तनयः -  मुलगा  - साधुः -  सज्जन  - महाभागवतः -  मोठा भगवद्भक्त  - अर्भकः -  बालक प्रल्हाद  - त्वया -  तुझाकडून  - मृत्योः -  मृत्यूपासून  - विमोचितः -  सोडविला गेला  - अधुना -  आता  - त्वां -  तुजप्रत  - समितः -  प्राप्त झाला ॥ २८ ॥ 
 
याचा पुत्र परमभागवत शुद्धहृदय बाळ प्रल्हाद याला आपण मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, हे याचे सौभाग्य आहे. तो आता आपल्याला शरण आला आहे, ही सुद्धा मोठी आनंदाची गोष्ट आहे. (२८) 
 
एतद् वपुस्ते भगवन् ध्यायतः प्रयतात्मनः । सर्वतो गोप्तृ सन्त्रासान् मृत्योरपि जिघांसतः ॥ २९ ॥ 
भगवान् तुमचे ध्यान करी तो भयमुक्तची । मृत्युही मारण्या येता न चाले कांहि त्या पुढे ॥२९॥ 
भगवन् -  हे भगवंता  - ते -  तुझे  - एतत् -  हे  - रूपं -  रूप  - ध्यायतः -  चिंतणार्या  - प्रयतात्मनः -  निग्रह केला आहे मनाचा ज्याने अशा पुरुषाला  - सर्वतः -  चोहोबाजूंनी  - जिघांसतः -  घात करू इच्छिणार्या  - मृत्योः अपि -  मृत्याच्याहि  - संत्रासात् -  भीतीपासून  - गोप्तृ (भवेत) -  राखणारे होईल ॥ २९ ॥ 
 
हे भगवन, जो कोणी एकाग्र मनाने आपल्या या नृसिंहरूपाचे ध्यान करील, त्याला हे रूप सर्व प्रकारच्या भयांपासून वाचवील; एवढेच काय, मारण्याच्या इच्छेने आलेल्या मृत्यूपासूनसुद्धा वाचवील. (२९) 
 
नृसिंह उवाच -  मैवं विभोऽसुराणां ते प्रदेयः पद्मसम्भव । वरः क्रूरनिसर्गाणां अहीनां अमृतं यथा ॥ ३० ॥ 
श्री नृसिंह भगवान् म्हणाले - ब्रह्माजी यापुढे ऐसा दैत्यांना नच द्या वर । सर्पाला दूध ते वीष तसा वर तयास तो ॥३०॥ 
पद्मसंभव -  हे ब्रह्मदेवा  - ते -  तुझ्याकडून  - एवं -  याप्रमाणे  - क्रूरनिसर्गाणां -  स्वभावतः क्रूर अशा  - असुराणां (दत्तः) -  दैत्यांना दिलेला  - वरः -  वर  - मा प्रदेयः -  दिला जाऊ नये  - वरः -  वर  - यथा -  जसे  - अहीनां -  सर्पांना  - अमृतं (तथा अस्ति) -  दूध त्याप्रमाणे होय ॥ ३० ॥ 
 
श्रीनृसिंह म्हणाले – ब्रह्मदेवा, आपण दैत्यांना असा वर देऊ नका. जे स्वभावाने क्रूर आहेत, त्यांना असा वर देणे म्हणजे सापाला अमृत पाजण्यासारखे आहे. (३०) 
 
नारद उवाच -  इत्युक्त्वा भगवान् राजन् ततश्चान्तर्दधे हरिः । अदृश्यः सर्वभूतानां पूजितः परमेष्ठिना ॥ ३१ ॥ 
नारदजी सांगतात - नृसिंह भगवान् ऐसे बोलले ब्रह्माजीस नी । स्वीकार करूनी पूजा अंतर्धानहि पावले ॥३१॥ 
राजन् -  हे राजा  - सर्वभूतानां -  सर्व प्राण्यांना  - अदृश्यः -  न दिसणारा  - परमेष्ठिना -  ब्रह्मदेवाने  - पूजितः -  पूजिलेला  - भगवान -  ऐश्वर्यसंपन्न  - हरिः -  नरहरि  - इति -  असे  - उक्त्वा -  बोलून  - तत्र एव -  तेथेच  - अंतर्दधे -  गुप्त झाला ॥ ३१ ॥ 
 
नारद म्हणतात – युधिष्ठिरा, असे म्हणून भगवान, ब्रह्मदेवांनी केलेल्या पूजेचा स्वीकार करून समस्त प्राण्यांच्या दृष्टीने तेथेच अंतर्धान पावले. (३१) 
 
ततः सम्पूज्य शिरसा ववन्दे परमेष्ठिनम् । भवं प्रजापतीन् देवान् प्रह्रादो भगवत्कलाः ॥ ३२ ॥ 
पुन्हा भगवद्रुपी जे जे ब्रह्मा शंकर आदिना । प्रल्हादे पूजिले आणि माथा टेकुनि वंदिले ॥३२॥ 
ततः -  नंतर  - प्रल्हादः -  प्रल्हाद  - भगवत्कलाः -  भगवंताचे अंश अशा  - परमेष्ठिनं -  ब्रह्मदेवाला  - भवं -  शंकराला  - प्रजापतीन् -  प्रजापतींना  - (देवान्) च -  आणि देवांना  - संपूज्य -  चांगला मान देऊन  - शिरसा -  मस्तकाने  - ववंदे -  वंदन करिता झाला ॥ ३२ ॥ 
 
यानंतर प्रल्हादाने भगवत्स्वरूप ब्रह्मदेव, शंकर, प्रजापती आणि देवांची पूजा करून त्यांना शिरसाष्टांग प्रणाम केला. (३२) 
 
ततः काव्यादिभिः सार्धं मुनिभिः कमलासनः । दैत्यानां दानवानां च प्रह्रादं अकरोत् पतिम् ॥ ३३ ॥ 
शुक्राचार्यादि साक्षीने दैत्ये-दानवनायक । प्रल्हादा स्थापिले ब्रह्म्ये अधीपति म्हणोनिया ॥३३॥ 
ततः -  तदनंतर  - काव्यादिभिः -  शुक्रादिक  - मुनिभिः सार्धं -  ऋषींसह  - कमलासनः -  ब्रह्मदेव  - प्रल्हादं -  प्रल्हादाला  - दैत्यांना -  दैत्यांचा  - च -  आणि  - दानवानां -  दानवांचा  - पतिं -  अधिपती  - अकरोत् -  करिता झाला. ॥ ३३ ॥ 
 
तेव्हा ब्रह्मदेवांनी शुक्राचार्य इत्यादी मुनींसह, प्रल्हादाला सर्व दानव आणि दैत्यांचा अधिपती म्हणून नेमले. (३३) 
 
प्रतिनन्द्य ततो देवाः प्रयुज्य परमाशिषः । स्वधामानि ययू राजन् ब्रह्माद्याः प्रतिपूजिताः ॥ ३४ ॥ 
प्रल्हादा परमाशीष ब्रह्म्याने दिधला पुन्हा । सत्कारिताचि सर्वांना स्वस्थानी सर्व पातले ॥३४॥ 
राजन् -  हे धर्मराजा  - ततः -  नंतर  - (प्रल्हादेन) प्रतिपूजिताः -  प्रल्हादाने पूजिलेले  - ब्रह्माद्याः -  ब्रह्मादिक  - देवाः -  देव  - (तं) प्रतिनंद्यः -  प्रल्हादाचे अभिनंदन करून  - परमाशिषः प्रयुज्य -  उत्तम आशीर्वाद देऊन  - स्वधामनि -  आपल्या स्थानी  - ययुः -  गेले ॥ ३४ ॥ 
 
 यानंतर इत्यादी देवांनी प्रल्हादाचे अभिनंदन करून त्याला शुभाशीर्वाद दिले. प्रल्हादानेसुद्धा सर्वांचा यथायोग्य सत्कार केला. नंतर ब्रह्मादिक देव आपापल्या लोकी निघून गेले. (३४) 
 
एवं च पार्षदौ विष्णोः पुत्रत्वं प्रापितौ दितेः । हृदि स्थितेन हरिणा वैरभावेन तौ हतौ ॥ ३५ ॥ 
या परी हरिचे दोघे पार्षदे दितिपुत्र हे । राहिले वैरभावाने देवे मुक्त्यर्थ मारिले ॥३५॥ 
एवं -  अशा प्रकारे  - तौ -  ते दोघे  - विष्णोः -  विष्णूचे  - पार्षदौ -  सेवक  - दितेः -  दितीच्या  - पुत्रत्वं -  पुत्रपणाला  - प्रापितौ -  पोचविले गेले  - तौ -  ते दोघे  - हृदि -  हृदयात  - स्थितेन -  राहिलेल्या  - हरिणा -  हरीकडून  - वैरभावेन -  वैरभावास्तव  - हतौ -  मारिले गेले. ॥ ३५ ॥ 
 
भगवंतांचे ते दोन्ही पार्षद जय आणि विजय अशा प्रकारे दितीचे पुत्र झाले होते. वैरभावाने त्यांच्या हृदयात राहणार्या भगवंतांनी त्यांना मारले. (३५) 
 
पुनश्च विप्रशापेन राक्षसौ तौ बभूवतुः । कुम्भकर्णदशग्रीवौ हतौ तौ रामविक्रमैः ॥ ३६ ॥ 
पुनश्च विप्रशापाने दोघे राक्षस जाहले । श्रीरामाने मारिले जे ते कुंभकर्ण नि रावण ॥३६॥ 
च -  आणि  - पुनः -  पुनः  - विप्रशापेन -  ब्राह्मणाच्या शापाने  - तौ -  ते दोघे  - कुंभकर्णदशग्रीवौ -  कुंभकर्ण व रावण या नावाचे दोन  - राक्षसौ बभूवतुः -  राक्षस झाले  - तौ -  ते दोघे  - रामविक्रमैः -  रामाच्या पराक्रमाने  - हतौ -  मारिले गेले. ॥ ३६ ॥ 
 
ऋषींनी दिलेल्या शापामुळे ते पुन्हा कुंभकर्ण आणि रावणाच्या रूपाने राक्षस झाले. भगवान श्रीरामांच्या पराक्रमामुळे त्यावेळी त्यांचा अंत झाला. (३६) 
 
शयानौ युधि निर्भिन्न हृदयौ रामसायकैः । तच्चित्तौ जहतुर्देहं यथा प्राक्तनजन्मनि ॥ ३७ ॥ 
काळीज फाटता युद्धीं भूमिसी पडल्यावरी । पूर्वजन्मापरी त्यांनी मरता हरि ध्यायिला ॥३७॥ 
रामसायकैः -  रामाच्या बाणांनी  - निर्भिन्नहृदयौ -  विदीर्ण झाले आहे हृदय ज्यांचे असे  - युधि शयानौ -  रणभूमीवर पडलेले  - यथा प्राक्तनजन्मनि -  जसे पूर्वजन्मी  - (तथा) तच्चितौ -  तसे परमेश्वराकडे आहे चित्त ज्यांचे असे झालेले  - देहं -  देह  - जहतुः -  सोडिते झाले. ॥ ३७ ॥ 
 
युद्धामध्ये भगवान रामांच्या बाणांनी त्यांचे हृदय विदीर्ण झाले. तेथेही पडल्या-पडल्या पूर्वजन्मीप्रमाणे भगवंतांचे स्मरण करीत करीत त्यांनी आपले शरीर सोडले. (३७) 
 
तौ इहाथ पुनर्जातौ शिशुपालकरूषजौ । हरौ वैरानुबन्धेन पश्यतस्ते समीयतुः ॥ ३८ ॥ 
वक्त्रदंत शिशूपाल दोघे ते जन्मले पुढे । वैरभाव असोनिया हरीसी मिळले पहा ॥३८॥ 
अथ -  नंतर  - तौ -  ते दोघे  - पुनः -  पुनः  - इह -  या जन्मी  - शिशुपालकरूषजौ -  शिशुपाल व दंतवक्त्र  - जातौ -  झाले  - हरौ -  श्रीकृष्णाविषयी  - वैरानुबंधेन -  नित्य वैर धारण केल्याने  - पश्यतः ते -  तू पाहत असता  - (तौ तं) समीयतुः -  ते दोघे कृष्णरूपात मिळून गेले. ॥ ३८ ॥ 
 
तेच आता या युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्त्राच्या रूपाने जन्माला आले होते. भगवंतांशी वैरभाव ठेवल्यामुळे तुझ्यासमोरच ते त्यांच्यामध्ये सामावून गेले. (३८) 
 
एनः पूर्वकृतं यत् तद् राजानः कृष्णवैरिणः । जहुस्त्वन्ते तदात्मानः कीटः पेशस्कृतो यथा ॥ ३९ ॥ 
वैरभाव असोनीया कृष्णाचे ध्यान ते मनीं । मरता करिता राजे गेले धामास कैक ते ॥३९॥ 
यथा -  ज्याप्रमाणे  - कीटः -  कीडा  - पेशस्कृतः (ध्यानेन यथा तद्रूपः भवति तथा) -  कुंभारिणीच्या ध्यानाने तद्रूप होतो त्याप्रमाणे  - कृष्णवैरिणः -  श्रीकृष्णाचा द्वेष करणारे  - राजानः -  राजे  - तदात्मानः -  कृष्णस्वरूप झालेले  - यत् -  जे  - पूर्वकृतं -  पूर्वी केलेले  - एनः -  पाप  - (तत्) तु अन्ते -  ते तर अंतकाळी  - जहुः -  सोडिते झाले. ॥ ३९ ॥ 
 
ज्याप्रमाणे गांधीलमाशीने पकडलेली अळी भीतीमुळे तिच्यासारखीच होते, त्याप्रमाणे श्रीकृष्णांशी शत्रुत्व करणारे सर्व राजे अंतसमयी त्यांचे स्मरण केल्याने पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्त होऊन तद्रूप झाले. (३९) 
 
यथा यथा भगवतो भक्त्या परमयाभिदा । नृपाश्चैद्यादयः सात्म्यं हरेस्तच्चिन्तया ययुः ॥ ४० ॥ 
अनन्यभक्त भक्तीने भगवद्रूप मेळिती । वैरी अनन्यभावाने भगवद्रूपि पावती ॥४०॥ 
यथायथा -  ज्याज्याप्रमाणे  - अभिदा -  भेददृष्टिरहित अशा  - परमया -  श्रेष्ठ  - भक्त्या -  भक्तीने  - भगवतः (सात्म्यं यान्ति) -  भगवंताच्या सायुज्याला प्राप्त होतात  - तथा -  त्याप्रमाणे  - चैद्यादयः -  शिशुपाल आदिकरून  - नृपाः -  राजे  - तच्चिंतया -  परमेश्वराच्या चिंतनाने  - हरेः -  श्रीहरीच्या  - सात्म्यं -  सायुज्यमुक्तीस  - ययुः -  प्राप्त झाले. ॥ ४० ॥ 
 
ज्याप्रकारे भगवंतांचे प्रिय भक्त आपल्या भेदभावविरहित अनन्य भक्तीने भगवत्स्वरूपाची प्राप्ती करून घेतात, त्याचप्रमाणे शिशुपाल इत्यादी राजेसुद्धा भगवंतांच्या वैरभावयुक्त अनन्य चिंतनाने भगवंतांच्या सारूप्याला प्राप्त झाले. (४०) 
 
आख्यातं सर्वमेतत् ते यन्मां त्वं परिपृष्टवान् । दमघोषसुतादीनां हरेः सात्म्यमपि द्विषाम् ॥ ४१ ॥ 
धर्मराजा तुझा प्रश्न होता की द्वेषि हे कसे । पावले भगवद्रूपी त्याचे उत्तर मी दिले ॥४१॥ 
यत् -  जे  - मां -  मला  - त्वं -  तू  - परिपृष्टवान् -  विचारिता झालास  - एतत् -  हे  - सर्वं -  सर्व  - ते -  तुला  - (मया) आख्यातं -  माझ्याकडून सांगितले गेले  - द्विषां -  शत्रु अशा  - दमघोषसुतादीनां -  शिशुपालादिकांचे  - हरेः -  परमेश्वराशी  - सात्म्यं अपि (आख्यातम्) -  सारूप्यही सांगितले. ॥ ४१ ॥ 
 
भगवंतांचा द्वेष करणार्या शिशुपाल इत्यादींना त्यांच्या सारूप्याची प्राप्ती कशी झाली, हे तू मला विचारले होतेस, त्याचे उत्तर मी तुला दिले. (४१) 
 
एषा ब्रह्मण्यदेवस्य कृष्णस्य च महात्मनः । अवतारकथा पुण्या वधो यत्रादिदैत्ययोः ॥ ४२ ॥ 
ब्रह्मण्य देव कृष्णाच्या लीला पावन या अशा । दैत्यांच्या इतिहासात वधाच्या वर्णनी पहा ॥४२॥ 
एषा -  अशी ही  - ब्रह्मण्यदेवस्य -  ब्रह्मज्ञानसंपन्न अशा  - च -  आणि  - महात्मनः -  उदार अंतःकरणाच्या  - कृष्णस्य -  श्रीकृष्णाची  - पुण्या अवतारकथा (अस्ति) -  पुण्यकारक अशी अवतारसंबंधी कथा आहे  - यत्र -  जीमध्ये  - आदिदैत्ययोः -  आदिदैत्य जे हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु यांचा  - वधः (वर्णितः) -  वध वर्णिला आहे. ॥ ४२ ॥ 
 
ब्राह्मणदेव परमात्मा श्रीकृष्णांचे हे परमपवित्र अवतारचरित्र आहे. दोन्ही आदिदैत्यांच्या वधाचे यामध्ये वर्णन आहे. (४२) 
 
प्रह्रादस्यानुचरितं महाभागवतस्य च । भक्तिर्ज्ञानं विरक्तिश्च याथात्म्यं चास्य वै हरेः ॥ ४३ ॥ सर्गस्थित्यप्ययेशस्य गुणकर्मानुवर्णनम् । परावरेषां स्थानानां कालेन व्यत्ययो महान् ॥ ४४ ॥ 
वैराग्य ज्ञान भक्ती नी कथा प्रल्हादि पावन । सृष्टिचा भगवद्हेतू हरिच्या दिव्यची लिला ॥४३॥ कथेत सर्व हे आले कालचक्र कसे फिरे । देवतांच्या पदांमध्ये वर्णिले परिवर्तन ॥४४॥ 
महाभागवतस्य -  परम भगवद्भक्त अशा  - प्रल्हादस्य -  प्रल्हादाचे  - अनुचरितं -  चरित्र  - च -  आणि  - भक्तिः -  भक्ति  - ज्ञानं -  ज्ञान  - च -  आणि  - विरक्तिः -  वैराग्य  - च -  आणि  - अस्य -  ह्या  - सर्गस्थित्यप्ययेशस्य -  उत्पत्ति, स्थिति व पालन करणार्या  - हरेः -  परमात्म्याचे  - याथात्म्यं -  वास्तविक स्वरूप  - गुणकर्मानुवर्णनं -  गुण व लीला यांचे वर्णन  - कालेन -  कालगतीमुळे  - परावरेषां -  उच्च-नीच अशा  - स्थानानां -  स्थानांची  - महान् व्यत्ययः -  मोठी उलटापालट  - च -  आणि  - येन -  ज्या योगाने  - भगवन् -  परमेश्वर  - गम्यते -  प्राप्त होतो; ॥ ४३-४४ ॥ 
 
या प्रसंगामध्ये भगवंतांचा परम भक्त प्रल्हाद याचे चरित्र, ज्ञान, वैराग्य तसेच विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे स्वामी असलेल्या श्रीहरींचे यथार्थ स्वरूप, तसेच त्यांचे दिव्य गुण व लीलांचे वर्णन आहे. देव आणि दैत्य यांच्या उच्चनीच पदांमध्ये कालक्रमानुसार जे महान परिवर्तन होते, त्याचेही निरूपण या आख्यानामध्ये केले गेले आहे. (४३-४४) 
 
धर्मो भागवतानां च भगवान्येन गम्यते । आख्यानेऽस्मिन् समाम्नातं आध्यात्मिकं अशेषतः ॥ ४५ ॥ 
हिच्याने पावतो विष्णु भागवद्धर्म हा असा । अध्यात्म सार ते हेची सर्व याच्यात वर्णिले ॥४५॥ 
(सः) भागवतानां -  तो भगवद्भक्ताचा  - धर्मः -  धर्म  - (इति एतत्) आध्यत्मिकं (ज्ञानं) -  असे हे आत्मानात्मविचारासंबंधी ज्ञान  - अस्मिन् आख्याने -  या आख्यांनात  - अशेषतः -  संपूर्णरीतीने  - समाम्नातं -  सांगितले आहे. ॥ ४५ ॥ 
 
ज्याच्याद्वारे भगवंतांची प्राप्ती होते, त्या भागवतधर्माचेसुद्धा वर्णन या आख्यानात आहे. अध्यात्मासंबंधीही सर्व वर्णन यात आहे. (४५) 
 
य एतत् पुण्यमाख्यानं विष्णोर्वीर्योपबृंहितम् । कीर्तयेत् श्रद्धया श्रुत्वा कर्मपाशैर्विमुच्यते ॥ ४६ ॥ 
ऐके जो भगवत् कीर्ति पवित्र भाव ठेवुनी । लाभते मुक्ति त्यां नित्य तुटती भवग्रंथि त्या ॥४६॥ 
यः -  जो  - एतत् -  हे  - विष्णोः -  विष्णुच्या  - वीर्योपबृहितम् -  पराक्रमांनी भरलेले  - पुण्यं -  पुण्यकारक  - आख्यानं -  आख्यान  - श्रद्धया -  श्रद्धेने  - श्रुत्वा -  श्रवण करून  - कीर्तयेत् -  वर्णन करील  - कर्मपाशैः विमुच्यते -  कर्मबंधनापासून मुक्त होईल. ॥ ४६ ॥ 
 
भगवंतांच्या पराक्रमांनी परिपूर्ण अशा या पवित्र आख्यानाचे जो कोणी श्रद्धेने कीर्तन आणि श्रवण करतो, तो कर्मबंधनातून मुक्त होतो. (४६) 
 
एतद्य आदिपुरुषस्य मृगेन्द्रलीलां  दैत्येन्द्रयूथपवधं प्रयतः पठेत । दैत्यात्मजस्य च सतां प्रवरस्य पुण्यं श्रुत्वानुभावमकुतोभयमेति लोकम् ॥ ४७ ॥ 
(वसंततिलका) जो ऐकतो परम ही नरसिंह कीर्ति दैत्येंद्र सैन्य वध वीरलीला अशी ही । प्रल्हादभक्ति अशि पावन ऐकिल्याने लाभे तया परम धाम हरीपदासी ॥४७॥ 
एतत् -  याप्रमाणे  - यः -  जो  - प्रयतः -  इंद्रियनिग्रही पुरुष  - आदिपुरुषस्य -  पुराणपुरुषाच्या  - मृगेंद्रलीला -  सिंहरूप घेऊन केलेली लीला  - दैत्येंद्रयूथप वधं -  दैत्यराज व त्याचा सेनापति याचा वध  - च -  आणि  - सतां -  सत्पुरुषांमध्ये  - प्रवरस्य -  श्रेष्ठ अशा  - दैत्यात्मजस्य -  प्रल्हादाचे  - पुण्यं -  पुण्यकारक  - अनुभावं -  माहात्म्य  - श्रुत्वा -  श्रवण करून  - पठेत -  पठण करील  - अकुतोभयं -  कोणापासूनही भय नाही अशा  - लोकं -  लोकाला  - एति -  जाईल. ॥ ४७ ॥ 
 
जो मनुष्य परमपुरुष परमात्म्याची ही श्रीनृसिंह-लीला, सेनापतींच्या सह हिरण्यकशिपूचा वध आणि संत शिरोमणी प्रल्हादाचा पवित्र प्रभाव एकाग्र मनाने वाचतो आणि ऐकतो त्याला भगवंतांचे अभयपद जे वैकुंठ, त्याची प्राप्ती होते. (४७) 
 
यूयं नृलोके बत भूरिभागा  लोकं पुनाना मुनयोऽभियन्ति । येषां गृहानावसतीति साक्षाद् गूढं परं ब्रह्म मनुष्यलिङ्गम् ॥ ४८ ॥ 
(इंद्रवज्रा) युधिष्ठिरा हो तुम्ही भाग्यवंत तुम्हा घरी ते तनु पांघरोनी । राही परब्रह्म, म्हणोनी साधू नी संत येती नित या घरासी ॥४८॥ 
बत -  खरोखर  - नृलोके -  मनुष्यलोकांमध्ये  - यूयं -  तुम्ही पांडव  - भूरिभागाः (स्थ) -  अत्यंत भाग्यवान आहात  - येषां गृहान् -  ज्यांच्या घरी  - लोकं -  लोकांना  - पुनानाः -  पवित्र करणारे  - मुनयः -  ऋषि  - मनुष्यलिंगं -  मनुष्यरूप धारण केलेले  - गूढं -  गुप्त असे  - परं -  श्रेष्ठ  - ब्रह्म -  ब्रह्म  - आवसति -  राहत आहे  - इति -  या कारणास्तव  - अभियंति -  चोहोकडून येतात. ॥ ४८ ॥ 
 
या मनुष्यलोकात तुमचे भाग्य फार मोठे आहे. कारण तुमच्या घरी साक्षात परब्रह्म मनुष्यरूपात गुप्तरूपाने निवास करते. म्हणूनच सार्या जगाला पवित्र करणारे ऋषी-मुनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे येत असतात. (४८) 
 
स वा अयं ब्रह्म महद्विमृग्य  कैवल्यनिर्वाणसुखानुभूतिः । प्रियः सुहृद् वः खलु मातुलेय आत्मार्हणीयो विधिकृद् गुरुश्च ॥ ४९ ॥ 
कैवल्य निर्वाण सुखानुभूती ज्यां शोधिती संत ऋषी मुनी ही । सखा हितैषी अन सोयरा तो श्रीकृष्ण आत्मा गुरू तोचि आहे ॥४९॥ 
वा -  अथवा  - सः -  तो  - अयं -  हा  - वः -  तुमचा  - प्रियः -  आवडता  - सुहृत् -  मित्र  - मातुलेयः -  मामेभाऊ  - आत्मा -  जिवलग  - अर्हणीयः -  पूज्य  - विधिकृत् -  आज्ञाधारक  - च -  आणि  - गुरुः (कृष्णः) -  उपदेश कर्ता असा श्रीकृष्ण  - खलु -  खरोखर  - महद्विमृग्य -  मोठमोठे साधु शोधित असलेल्या  - कैवल्यनिर्वाणसुखानुभूति ब्रह्म (अस्ति) -  कैवल्यरूप मोक्षसुखाचा अनुभव हे ज्याचे स्वरूप आहे असे परब्रह्म होय. ॥ ४९ ॥ 
 
महापुरुष नेहमी ज्यांच्या शोधात असतात, जे मायालेशविरहित परम शांत परमानंदानुभवस्वरूप परब्रह्म आहेत, तेच श्रीकृष्ण तुमचे प्रिय, हितैषी, मामेभाऊ, पूज्य, आज्ञाधारक, गुरू आणि स्वत: आत्मा आहेत. (४९) 
 
न यस्य साक्षाद्भवपद्मजादिभी  रूपं धिया वस्तुतयोपवर्णितम् । मौनेन भक्त्योपशमेन पूजितः प्रसीदतामेष स सात्वतां पतिः ॥ ५० ॥ 
ब्रह्मादि ध्याती रूप तेहि हेच न कोणि रूपा शकतोच वर्णू । भावे नि मौने पुजितोत आम्ही पावो अशा भक्तित तो अम्हाला ॥५०॥ 
यस्य -  ज्याचे  - रूपं -  रूप  - साक्षात् -  प्रत्यक्ष  - भवपद्मजादिभिः -  शंकर व ब्रह्मदेव इत्यादिकांनीही  - धिया -  बुद्धिच्या योगाने  - वस्तुतया -  वास्तविक रीतीने  - न उपवर्णितं -  वर्णिता आले नाही  - सः -  तो  - एषः -  हा  - मौनेन -  मौनव्रताने  - भक्त्योपशमेन -  भक्ति आणि उपशम ह्या साधनांनी  - पूजितः -  पूजिलेला  - सात्वतां पतिः -  यादवांचा पती श्रीकृष्ण  - प्रसीदतां -  प्रसन्न होवो. ॥ ५० ॥ 
 
शंकर, ब्रह्मदेव इत्यादीसुद्धा आपली बुद्धी पणाला लावूनही ज्यांचे खरेखुरे वर्णन करू शकले नाहीत, त्यांची आम्ही मौन, भक्ती आणि संयम यांनीच पूजा करतो. आमच्या या पूजेचा स्वीकार करून भक्तवत्सल भगवान आमच्यावर प्रसन्न होवोत. (५०) 
 
(अनुष्टुप्)  स एष भगवान् राजन् व्यतनोद् विहतं यशः । पुरा रुद्रस्य देवस्य मयेनानन्तमायिना ॥ ५१ ॥ 
(अनुष्टुप्) पूज्य हा एकलादेव रूद्रासी जधि दैत्य ते । कलंकलाविण्या आले तेंव्हा कृष्णेचि रक्षिले ॥५१॥ 
राजन् -  हे धर्मराजा  - सः -  तो  - एषः -  हा  - भगवान् -  परमेश्वर  - पुरा -  पूर्वी  - अनंतमायिना -  महामायावी अशा  - मयेन -  मयासुराने  - देवस्य -  प्रकाशमान अशा  - रुद्रस्य -  शंकराच्या  - विहतं -  नष्ट केलेल्या  - यशः -  कीर्तीला  - व्यतनोत् -  वाढविता झाला. ॥ ५१ ॥ 
 
युधिष्ठिरा, पूर्वी एकदा मोठ्या मायावी मयासुराने रुद्रदेवांच्या कीर्तीला कलंक लावला, तेव्हा याच भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा त्यांच्या यशाचे रक्षण आणि विस्तार केला होता. (५१) 
 
राजोवाच -  कस्मिन् कर्मणि देवस्य मयोऽहन् जगदीशितुः । यथा चोपचिता कीर्तिः कृष्णेनानेन कथ्यताम् ॥ ५२ ॥ 
राजा युधिष्ठिराने विचारले - रूद्राचे कोणत्या कार्यी इच्छिले मय दानवे । यशाते नाशिण्या आणि कृष्णाने रक्षिले कसे ॥५२॥ 
मयः -  मयासुर  - कस्मिन् -  कोणत्या  - कर्मणि -  कृत्यांत  - जगदीशितुः -  जगाचा ईश अशा  - देवस्य (यशः) -  शंकराची कीर्ति  - अहन् -  नष्ट करिता झाला  - च -  आणि  - यथा -  ज्यारीतीने  - अनेन कृष्णेन -  ह्या कृष्णाने  - (तस्य) कीर्तिः -  त्या शंकराची कीर्ति  - उपचिता -  वाढविली  - कथ्यतां -  सांगितले जावे. ॥ ५२ ॥ 
 
राजाने विचारले – नारदमुने, मयदानवाने कोणत्या कार्यामध्ये जगदीश्वर रुद्रदेवांचे यश नष्ट केले होते आणि भगवान श्रीकृष्णांनी कोणत्या प्रकारे त्यांच्या यशाचे रक्षण केले ? (५२) 
 
नारद उवाच -  निर्जिता असुरा देवैः युध्यनेनोपबृंहितैः । मायिनां परमाचार्यं मयं शरणमाययुः ॥ ५३ ॥ 
नारदजी सांगतात -  एकदा देवतांनी त्या याच श्रीकृष्णशक्तिला । मेळिता जिंकिले दैत्य तेंव्हा ते गुरू त्या मया । शरणी पातले सर्व तेंव्हाचे कार्य हे असे ॥५३॥ 
अनेन -  ह्या श्रीकृष्णाने  - उपबृंहितैः -  उत्कर्षास पोचविलेल्या  - देवैः -  देवांनी  - युधि -  युद्धात  - निर्जिताः -  पराजित केलेले  - असुराः -  दैत्य  - मायिनां -  मायावी कलेचा  - परमाचार्यं -  परम गुरु अशा  - मयं -  मयासुराला  - शरणं आययुः -  शरण गेले. ॥ ५३ ॥ 
 
नारद म्हणाले – याच भगवान श्रीकृष्णांकडून शक्ती प्राप्त करून घेऊन एकदा देवांनी युद्धामध्ये असुरांना जिंकले होते. त्यावेळी असुर, मायावी असुरांचे परम गुरु मय दानवाला शरण गेले. (५३) 
 
स निर्माय पुरस्तिस्रो हैमीरौप्यायसीर्विभुः । दुर्लक्ष्यापायसंयोगा दुर्वितर्क्यपरिच्छदाः ॥ ५४ ॥ 
शक्तिशाली मयासूरे लोह सोने नि चांदिचे । विमाने निर्मिली तीन नगरापरि थोर जी । आली गेली कधी कोणा तयाचा माग ना कळे । सामग्री बहुही त्यात भरूनी उरल्या पहा ॥५४॥ 
सः -  तो  - प्रभुः -  समर्थ मयासुर  - हैमीरौप्यायसीः -  सुवर्ण, रुपे व लोखंडे यांनी बनविलेली  - दुर्लक्षापायसंयोगाः -  ज्याचे जाणे व येणे कळत नाही अशी  - दुर्वितर्क्यपरिच्छदाः -  ज्यातील सामग्री जाणणे कठीण आहे अशी  - तिस्रः -  तीन  - पुरः -  नगरे  - निर्माय तेभ्यो ददौ -  निर्माण करून त्या दैत्यांना देता झाला. ॥ ५४ ॥ 
 
शक्तिशाली मयासुराने सोने, चांदी आणि लोखंड यांची तीन नगरे निर्माण केली. ती इतकी विलक्षण होती की त्यांचे येणे-जाणे समजून येत नसे. त्यात अपरिमित युद्धसामग्री भरलेली होती. (५४) 
 
ताभिस्तेऽसुरसेनान्यो लोकान् त्रीन् सेश्वरान् नृप । स्मरन्तो नाशयां चक्रुः पूर्ववैरमलक्षिताः ॥ ५५ ॥ 
त्रिलोकी लोकपालांचे वैर पूर्वीच वाढले । विमानी त्या लपोनीया दैत्यांनी र्हास मांडिला ॥५५॥ 
नृप -  हे धर्मराजा  - पूर्ववैरं -  पूर्वीचे वैर  - स्मरंतः -  आठवणारे  - ते -  ते  - असुर सेनान्यः -  दैत्यांचे सेनापति  - अलक्षिताः -  कोणाकडून पाहिले न गेलेले  - ताभिः -  त्या नगरीच्या साहाय्याने  - सेश्वरान् -  लोकपालांसह  - त्रीन् -  तिन्ही  - लोकान् -  लोकांना  - नाशयांचक्रुः -  नष्ट करिते झाले. ॥ ५५ ॥ 
 
युधिष्ठिरा, दैत्यसेनापतींच्या मनात तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपती यांचेविषयी पूर्वीचा वैरभाव होताच. आता त्याची आठवण येऊन त्या तीन विमानांच्या द्वारा त्यात लपून बसून ते सर्वांचा नाश करू लागले. (५५) 
 
ततस्ते सेश्वरा लोका उपासाद्येश्वरं विभो । त्राहि नस्तावकान्देव विनष्टान् त्रिपुरालयैः ॥ ५६ ॥ 
प्रजेने लोकपालांनी शंकरा स्तविले तदा । त्रिपुरीं राहुनी दैत्ये नाशिले रक्षि तू अता ॥५६॥ 
ततः -  नंतर  - ते -  ते  - सेश्वराः -  अधीपतींसह  - लोकाः -  लोक  - ईश्वरं उपासाद्य -  शंकराजवळ जाऊन  - विभो -  हे प्रभो  - देव -  शंकरा  - त्रिपुरालयैः -  तीन पुरात राहणार्या दैत्यांनी  - विनष्टान् -  नष्ट केलेल्या  - तावकान् -  तुझे म्हणविणार्या  - नः -  आम्हाला  - त्राहि -  राख. ॥ ५६ ॥ 
 
तेव्हा लोकपालांसह सर्व प्रजा भगवान शंकरांना शरण गेली आणि त्यांना प्रार्थना केली की, प्रभो, त्रिपुरात राहणार्या असुरांनी आमचा नाश करण्याचे ठरविले आहे. आम्ही आपले आहोत. म्हणून देवाधिदेवा, आमचे रक्षण करा. (५६) 
 
अथानुगृह्य भगवान् मा भैष्टेति सुरान्विभुः । शरं धनुषि सन्धाय पुरेष्वस्त्रं व्यमुञ्चत ॥ ५७ ॥ 
प्रार्थना ऐकता देवे वदला हो भिऊ नका । धनुष्या जोडिता बाण त्रिपुरीं सोडिला असे ॥५७॥ 
अथ -  तेव्हा  - अनुगृह्य -  कृपा करून  - भगवान् -  ऐश्वर्यसंपन्न  - विभुः -  शंकर  - मा भैष्ट -  भिऊ नका  - इति -  असे  - सुरान् -  देवांना  - धनुषि -  धनुष्यावर  - शरं -  बाण  - संधाय -  जोडून  - पुरेषु -  पुरांवर  - अस्रं -  अस्र  - व्यमुञ्चत -  सोडिता झाला. ॥ ५७ ॥ 
 
त्यांची प्रार्थना ऐकून भगवान शंकर करुणेने देवांना म्हणाले – "भिऊ नका !" नंतर त्यांनी धनुष्याला बाण लावून तिन्ही नगरांवर सोडला. (५७) 
 
ततोऽग्निवर्णा इषव उत्पेतुः सूर्यमण्डलात् । यथा मयूखसन्दोहा नादृश्यन्त पुरो यतः ॥ ५८ ॥ 
सूर्यमंडळरश्मींच्या परी बाण कितेक ते । निघाले एकबाणीं त्या तेजी ती लोपली पुरे ॥५८॥ 
यथा -  जसे  - सूर्यमंडलात् -  सूर्यमंडलापासून  - मयूखसंदोहाः (तथा) -  किरणांचे समुदाय त्याप्रमाणे  - ततः -  त्या बाणापासून  - अग्निवर्णाः -  अग्नीसारखे  - इषवः -  बाण  - उत्पेतुः -  बाहेर पडले  - यत् -  ज्यांमुळे  - पुरः -  नगरे  - न अदृश्यन्त -  दिसेनाशी झाली. ॥ ५८ ॥ 
 
त्यांच्या त्या बाणापासून सूर्यमंडलातून निघणार्या किरणांप्रमाणे इतर अनेक बाण बाहेर पडले. त्यातून आगीचे जणू काही लोळ येत होते. त्यामुळे ती नगरे दिसेनाशी झाली. (५८) 
 
तैः स्पृष्टा व्यसवः सर्वे निपेतुः स्म पुरौकसः । तान् आनीय महायोगी मयः कूपरसेऽक्षिपत् ॥ ५९ ॥ 
स्पर्शाने पडले खाली भूमिसी यान तेधवा । महामायावि दैत्याने अमृतकूपि सर्व ते ॥५९॥ 
तैः -  त्या बाणांनी  - स्पृष्टाः -  टोचिलेले  - सर्वे -  सगळे  - पुरौकसः -  नगरात राहणारे दैत्य  - व्यसवः -  गतप्राण झालेले  - निपेतुः स्म -  खाली पडले  - महायोगी -  महामायावी  - मयः -  मयासुर  - तान् -  त्या मेलेल्या दैत्यांना  - आनीय -  आणून  - कूपरसे -  विहीरीतील अमृतरसात  - अक्षिपत् -  टाकिता झाला. ॥ ५९ ॥ 
 
त्या बाणांच्या केवळ स्पर्शाने नगरातील सर्वजण निष्प्राण होऊन पडले. महायोगी मयाने दैत्यांना उचलून आणले आणि अमृताच्या विहीरीत टाकले. (५९) 
 
सिद्धामृतरसस्पृष्टा वज्रसारा महौजसः । उत्तस्थुर्मेघदलना वैद्युता इव वह्नयः ॥ ६० ॥ 
टाकता जाहले जीत तेजस्वी देहि सैन्य ते । विजेच्या परि ते सर्व उठले अग्निलोळ जै ॥६०॥ 
सिद्धामृतरसस्पृष्टाः -  सिद्ध अमृतरसाचा स्पर्श झालेले  - वज्रसाराः -  वज्राप्रमाणे बळकट  - महौजसः (ते दैत्याः) -  महाबलाढय असे ते दैत्य  - मेघदलनाः -  मेघाला फोडून काढणार्या  - वैद्युताः -  विजेपासून उत्पन्न होणार्या  - वह्नयः इव -  अग्नीप्रमाणे  - उत्तस्थुः -  उठले. ॥ ६० ॥ 
 
त्या सिद्ध अमृत-रसाचा स्पर्श होताच असुरांचे शरीर अत्यंत तेजस्वी आणि वज्राप्रमाणे सुदृढ झाले. ढगांना इतस्तत: करणार्या विजेच्या लोळाप्रमाणे ते उठून उभे राहिले. (६०) 
 
विलोक्य भग्नसङ्कल्पं विमनस्कं वृषध्वजम् । तदायं भगवान् विष्णुः तत्रोपायमकल्पयत् ॥ ६१ ॥ 
कृष्णाने पाहिले सर्व उदास हर जाहले । योजिली युक्ति त्याने तो संकल्प पूर्ण साधण्या ॥६१॥ 
तदा -  तेव्हा  - अयं -  हा  - भगवान् -  षड्गुणैश्वर्ययुक्त  - विष्णुः -  विष्णु  - भग्नसंकल्पं -  संकल्प भग्न झाला आहे ज्याचा अशा  - विमनस्कं -  दुःखी मनाच्या  - वृषध्वजं -  शंकराला  - विलोक्य -  पाहून  - तत्र -  त्या ठिकाणी  - उपायं -  उपाय  - अकल्पयत् -  योजिता झाला. ॥ ६१ ॥ 
 
श्रीविष्णूंनी जेव्हा पाहिले की, आपला संकल्प सिद्धीस न गेल्यामुळे महादेव विषण्ण झाले आहेत, तेव्हा त्या असुरांवर विजय मिळविण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. (६१) 
 
वत्स आसीत् तदा ब्रह्मा स्वयं विष्णुरयं हि गौः । प्रविश्य त्रिपुरं काले रसकूपामृतं पपौ ॥ ६२ ॥ 
घेतले रूप गायीचे ब्रह्मा वासरू जाहला । सिद्धरस कुपीं गेले सर्व अमृत प्राशिले ॥६२॥ 
तदा -  तेव्हा  - ब्रह्मा -  ब्रह्मदेव  - वत्सः -  वत्स  - आसीत् -  झाला  - हि -  आणि  - अयं -  हा  - विष्णुः -  विष्णु  - स्वयं -  स्वतः  - गौः आसीत् -  गाय झाला  - काले -  भर दोन प्रहरी  - त्रिपुरं -  तीन नगरांत  - प्रविश्य -  शिरून  - रसकूपामृतं -  अमृताच्या विहीरीतील सर्व अमृत  - पपौ -  प्राशन करिता झाला. ॥ ६२ ॥ 
 
हेच भगवान विष्णू त्यावेळी गाय झाले आणि ब्रह्मदेव वासरू झाले. मध्यान्हसमयी दोघेही त्या तिन्ही नगरात गेले आणि त्या सिद्धरसाच्या विहीरीतील सर्व अमृत त्यांनी पिऊन टाकले. (६२) 
 
तेऽसुरा ह्यपि पश्यन्तो न न्यषेधन्विमोहिताः । तद्विज्ञाय महायोगी रसपालानिदं जगौ ॥ ६३ ॥ स्वयं विशोकः शोकार्तान् स्मरन् दैवगतिं च ताम् । देवोऽसुरो नरोऽन्यो वा नेश्वरोऽस्तीह कश्चन ॥ ६४ ॥ आत्मनोऽन्यस्य वा दिष्टं दैवेनापोहितुं द्वयोः । अथासौ शक्तिभिः स्वाभिः शम्भोः प्राधानिकं व्यधात् ॥ ६५ ॥ धर्मज्ञानविरक्ति ऋद्धि तपोविद्याक्रियादिभिः । रथं सूतं ध्वजं वाहान् धन्धनुर्वर्मशरादि यत् ॥ ६६ ॥ 
दैत्यांनी पाहिले त्यांना परी मोहित होऊनी । रोधिले नच ते कोणी जाणता असुरोगुरू ॥६३॥ कृष्णाची जाणिता लीला न दुःखी जाहला मनीं । वदला थोर ते दैव होणारे ते टळेचि ना ॥६४॥ बंधूंनो ! शोक ना व्हावा सर्वांना दैव बांधिते । कृष्णाचे योजिली शक्ती निर्मिली युद्ध आयुधे ॥६५॥ धर्माचा रथ नी ज्ञान याचा सारथि नी ध्वजा । वैराग्यापासुनी तैसे ऐश्वर्याचेचि अश्व ते ॥ तपाचे धनु नी तैसे विद्येचे कवचो नि ते । क्रियेचे बाण नी अन्य वस्तू शक्तीत योजिल्या ॥६६॥ 
पश्यन्तः अपि -  पाहत असताही  - विमोहिताः -  मोहित झालेले  - ते -  ते  - असुराः -  दैत्य  - न न्यषेधन् -  निषेध करिते झाले नाहीत  - तत् -  ते  - विज्ञाय -  जाणून  - स्वयं -  स्वतः  - विशोकः -  शोकरहित असा  - च -  आणि  - तां -  त्या  - दैवगतिं -  दैवगतीला  - स्मरन् -  स्मरणारा  - महायोगी -  महामायावी मयासुर  - शोकार्तान् -  शोकाने पीडित झालेल्या  - रसपालान् -  अमृतरसाच्या रक्षकांना  - इदं -  हे  - जगौः -  म्हणाला. ॥ ६३ ॥ देवः -  देव  - असुरः -  दैत्य  - वा -  किंवा  - अन्यः -  दुसरा  - कश्चन -  कोणीही  - नरः -  मनुष्य  - इह -  ह्या सृष्टीत  - आत्मनः -  स्वतःचे  - अन्यस्य -  दुसर्याचे  - वा -  किंवा  - द्वयोः -  दोघांचे  - दैवेन -  दैवाने  - दिष्टं -  सिद्ध केलेले फळ  - अपोहितुं -  दूर करण्यास  - ईश्वरः -  समर्थ  - न अस्ति -  नाही. ॥ ६४ ॥ अथ -  नंतर  - असौ -  हा श्रीकृष्ण  - स्वाभिः -  स्वतःच्या  - धर्मज्ञानविरक्त्यृद्धितपोविद्याक्रियादिभिः -  धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, तप, विद्या व क्रिया इत्यादि  - शंभोः -  शंकराला  - रथं -  रथ  - सूतं -  सारथी  - ध्वजं -  ध्वज  - वाहान् -  घोडे  - धनुः -  धनुष्य  - वर्म -  कवच  - शरादि -  बाण इत्यादि सामग्री  - (इति) यत् -  असे जे  - प्राधानिकं -  युद्धाचे साहित्य  - व्यधान् -  सिद्ध करून देता झाला. ॥ ६६ ॥ 
 
त्या विहिरींचे रक्षक जरी या दोघांना पाहात होते, तरी भगवंतांच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांना ते रोखू शकले नाहीत. महामायावी मयासुराला ही गोष्ट समजली, तेव्हा ती दैवगती आहे, याचे स्मरण होऊन त्याला कोणत्याही प्रकारचा शोक झाला नाही. शोक करणार्या अमृत-रक्षकांना तो म्हणाला, "देव, असुर, मनुष्य किंवा कोणताही प्राणी, स्वत:साठी, दुसर्यासाठी किंवा दोघांसाठीही जे प्रारब्धाचे विधान असेल, ते बदलू शकत नाही." यानंतर भगवान श्रीविष्णूंनी आपल्या शक्तींच्या द्वारा शंकरांच्या युद्धाची सामग्री तयार केली. (६३-६५) त्यांनी धर्मापासून रथ, ज्ञानापासून सारथी, वैराग्यापासून ध्वज, ऐश्वर्यापासून घोडे, तपश्चर्येपासून धनुष्य, विद्येपासून कवच, क्रियेपासून बाण आणि आपल्या इतर अनेक शक्तींपासून पुष्कळ अन्य वस्तू निर्माण केल्या. (६६) 
 
सन्नद्धो रथमास्थाय शरं धनुरुपाददे । शरं धनुषि सन्धाय मुहूर्तेऽभिजितीश्वरः ॥ ६७ ॥ ददाह तेन दुर्भेद्या हरोऽथ त्रिपुरो नृप । दिवि दुन्दुभयो नेदुः विमानशतसङ्कुलाः ॥ ६८ ॥ 
शिवाला धनु बाणाच्या सवे स्यंदनि स्थापिले । भस्म चर्चोनि रूद्राने बाणे त्रिपुर जाळिले ॥६७॥ आकाशी दाटली याने दुंदुभी वाजल्या तशा ॥६८॥ 
नृप -  हे धर्मराजा  - अथ -  मग  - ईश्वरः -  ऐश्वर्यवान  - हरः -  शंकर  - सन्नद्धः -  सज्ज होत्साता  - रथं आस्थाय -  रथात बसून  - शरं -  बाण  - च -  आणि  - धनुः -  धनुष्य  - उपाददे -  ग्रहण करिता झाला. ॥ ६७ ॥ अभिजिति -  अभिजित् नावाच्या  - मुहूर्ते -  मुहूर्तावर  - धनुषि -  धनुष्यावर  - शरं -  बाण  - संधाय -  जोडून  - तेन -  त्या बाणाने  - दुर्भेद्याः -  फोडून टाकण्यास कठीण अशा  - त्रिपुरः -  तिन्ही नगरांना  - ददाह -  जाळिता झाला. दिवि -  आकाशात  - दुंदुभयः -  दुंदुभी  - नेदुः -  वाजू लागल्या  - विमानशतसंकुलाः -  शेकडो विमाने जमली आहेत ज्यांची असे  ॥ ६८ ॥ 
 
या सामग्रीने सज्ज होऊन भगवान शंकर रथावर आरूढ झाले आणि त्यांनी धनुष्य-बाण धारण केले. अभिजित मुहूर्तावर भगवान शंकरांनी धनुष्यावर बाण चढविला आणि ती तिन्ही दुर्भेद्य पुरे भस्मसात करून टाकली. युधिष्ठिरा, त्याचवेळी स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या. शेकडो विमानांची गर्दी झाली. (६७-६८) 
 
देवर्षिपितृसिद्धेशा जयेति कुसुमोत्करैः । अवाकिरन् जगुर्हृष्टा ननृतुश्चाप्सरोगणाः ॥ ६९ ॥ 
देवता पितरे यांनी जयोकार करोनिया । फुलांची वृष्टिही केली अप्सरा नाचल्या तदा ॥६९॥ 
देवर्षिपितृसिद्धेशाः -  देव, ऋषी, पितर व सिद्ध  - जय इति -  जय अशा शब्दाने  - कुसुमोत्करैः -  फुलांच्या राशींनी  - अवाकिरन् -  वर्षाव करिते झाले  - हृष्टाः -  आनंदित झालेले  - अप्सरोगणाः -  अप्सरांचे समुदाय  - जगुः -  गाते झाले  - च -  आणि  - ननृतुः -  नाचते झाले. ॥ ६६९ ॥ 
 
देव, पितर आणि सिद्धेश्वर आनंदाने जयजयकार करीत पुष्पवर्षाव करू लागले. अप्सरा नाचू आणि गाऊ लागल्या. (६९) 
 
एवं दग्ध्वा पुरस्तिस्रो भगवान् पुरहा नृप । ब्रह्मादिभिः स्तूयमानः स्वं धाम प्रत्यपद्यत ॥ ७० ॥ 
त्रिपुरा जाळिले तेणे शंकरा त्रिपुरारि ही । पदवी प्राप्त ती झाली ब्रह्म्याने स्तुति गायिली । ऐकोनी सगळे तेंव्हा स्वधामा सर्व पातले ॥७०॥ 
नृप -  हे राजा  - एवं -  याप्रमाणे  - पुरहा -  पुरांचा संहार करणारा  - भगवान् -  शंकर  - तिस्रः -  तीन्ही  - पुरः -  नगरांना  - दग्ध्वा -  जाळून  - ब्रह्मादिभिः -  ब्रह्मादिक देवांनी  - स्तूयमानः -  स्तविलेला असा  - स्वधाम -  स्वलोकी  - प्रत्यपद्यत -  गेला. ॥ ७० ॥ 
 
युधिष्ठिरा, अशा प्रकारे त्या तिन्ही पुरांना जाळून भगवान शंकर त्रिपुरारी झाले आणि ब्रह्मादिकांनी केलेली स्तुती ऐकत आपल्या धामाकडे निघून गेले. (७०) 
 
एवं विधान्यस्य हरेः स्वमायया  विडम्बमानस्य नृलोकमात्मनः । वीर्याणि गीतानि ऋषिभिर्जगद्गुरोः लोकं पुनानान्यपरं वदामि किम् ॥ ७१ ॥ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे युधिष्ठिरनारदसंवादे त्रिपुरविजयो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥ 
(इंद्रवज्रा) जगद्गुरू कृष्णा अशाचि लीला करीतसे तो जणु मानवोची । ऋषी करीती नित गुण गान आणीक सांगी तुज काय सांगू ॥७१॥ । इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ ७ ॥ १० ॥ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 
स्वमायया -  आपल्या मायेने  - नृलोकं -  मनुष्याच्या कृतीला  - विडम्बमानस्य -  अनुसरणार्या  - अस्य -  ह्या  - जगद्गुरो आत्मनः -  जगत्गुरु परमात्मा अशा  - हरेः -  श्रीकृष्णाचे  - एवंविधानि -  अशा प्रकारचे  - लोकान् -  लोकांना  - पुनानानि -  पवित्र करणारे  - वीर्याणि -  पराक्रम  - ऋषिभिः -  ऋषींनी  - गीतानि (सन्ति) -  गाइलेले आहेत  - अपरं -  आणखी दुसरे  - किं -  काय  - वदामि -  मी सांगू. ॥ ७१ ॥ 
 
आत्मस्वरूप जगद्रुरू भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने अशा प्रकारे ज्या मनुष्यासारख्या लीला करतात, त्याच अनेक लोकपावन लीलांचे ऋषी गायन करतात. आता मी तुला आणखी काय सांगू ते सांग. (७१) 
 स्कंध सातवा - अध्याय दहावा समाप्त |