|  | 
| 
श्रीमद् भागवत पुराण  प्रह्रादकृत भगवत्स्तुतिः - प्रल्हादाने केलेली भगवान नृसिंहांची स्तुती - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
नारद उवाच -  एवं सुरादयः सर्वे ब्रह्मरुद्रपुरः सराः । नोपैतुमशकन्मन्यु संरम्भं सुदुरासदम् ॥ १ ॥ 
नारदजी सांगतात -  (अनुष्टुप्) असे ब्रह्मादि देवांनी नृसिंहा स्तविले तरी । न शांत भगवान् झाले गेले समिप ना कुणी ॥१॥ 
 एवं -   याप्रमाणे -  ब्रह्मरुद्रपुरःसराः -   ब्रह्मदेव आणि रुद्र पुढे आहेत ज्यांच्या असे -  सर्वे -   सर्व -  सुरादयः -   देवादिक -  मन्युसंरंभं -   क्रोधामुळे आवेशयुक्त झालेल्या -  सुदुरासदं -   अगदी अजिंक्य अशा नरसिंहाच्या -  उपैतुं -   जवळ जाण्यास -  न अशकन् -   समर्थ झाले नाहीत. ॥ १ ॥  
 
नारद म्हणतात – अशा प्रकारे क्रोधावेशाने ज्यांच्या जवळही जाणे कठीण अशा श्रीनृसिंहांच्या जवळपासही ब्रह्मदेव, शंकरप्रमुख सर्व देवगण जाऊ शकले नाहीत. (१) 
 
साक्षात्श्रीः प्रेषिता देवैर्दृष्ट्वा तं महदद्भुतम् । अदृष्टाश्रुतपूर्वत्वात् सा नोपेयाय शङ्किता ॥ २ ॥ 
स्वयं लक्ष्मीही देवांनी शांत्यर्थ धाडिली तरी । भिली ती नच हे ऐसे कधीही रूप पाहिले ॥२॥ 
  देवैः -   देवांनी -  प्रेषिता -   पाठविलेली -  साक्षात् -   प्रत्यक्ष -  सा श्रीः -   ती लक्ष्मी -  तत् -   ते -  महत् -   मोठे -  अद्भुतं रूपं -   चमत्कारिक रूप -  दृष्टा -   पाहून -  तस्य अदृष्टाश्रुतपूर्वत्वात् -   असे त्याचे रूप पूर्वी कधी पाहिलेले व ऐकलेले नसल्यामुळे -  शङ्किता -   भ्यालेली -  न उपेयाय -   जवळ जाईना. ॥ २ ॥  
 
तेव्हा देवांनी साक्षात लक्ष्मींना पाठविेले. त्यांनी जेव्हा त्यांचे ते प्रचंड अद्भुत रूप पाहिले, तेव्हा भयभीत होऊन त्याही त्यांच्याजवळ जाऊ शकल्या नाहीत. कारण असे अपूर्व रूप त्यांनी कधी पाहिले नव्हते की ऐकले नव्हते. (२) 
 
प्रह्रादं प्रेषयामास ब्रह्मावस्थितमन्तिके । तात प्रशमयोपेहि स्वपित्रे कुपितं प्रभुम् ॥ ३ ॥ 
प्रल्हादा वदले ब्रह्मा भगवान् कोपले तुझ्या । पित्यासी तरि तू जावे तूचि शांत करी तयां ॥३॥ 
  ब्रह्मा -   ब्रह्मदेव -  अंतिके -   जवळ -  अवस्थितं -   असलेल्या -  प्रल्हादं -   प्रल्हादाला -  प्रेषयामास (उवाच च) -   पाठविता झाला व म्हणाला -  तात -   बा प्रल्हादा -  स्वपित्रे -   आपल्या बापावर -  कुपितं -   रागावलेल्या -  प्रभुं -   प्रभूच्या -  उपेहि -   जवळ जा -  (तं) प्रशमय -   त्याला शांत कर. ॥ ३ ॥  
 
तेव्हा ब्रह्मदेव आपल्याजवळच उभ्या असलेल्या प्रल्हादाला म्हणाले, "बाळ, तुझ्या पित्यावर भगवान कोपले होते. तर आता तूच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शांत कर," असे म्हणून त्यांनी त्याला पाठविले. (३) 
 
तथेति शनकै राजन् महाभागवतोऽर्भकः । उपेत्य भुवि कायेन ननाम विधृताञ्जलिः ॥ ४ ॥ 
जशी आज्ञा वदोनीया प्रल्हादा जोडिले कर । हरिच्यापाशि तो गेला साष्टांग नमिला हरी ॥४॥ 
  राजन् -   हे राजा -  तथा इति -   बरे आहे असे म्हणून -  महाभागवतः -   मोठा भगवद्भक्त -  अर्भकः -   बालक प्रल्हाद -  शनकैः -   हळूहळू -  उपेत्य -   जवळ जाऊन -  विघृतांजलिः -   हात जोडलेला असा -  भुवि -   पृथ्वीवर -  कायेन -   शरीराने -  ननाम -   नमस्कार घालिता झाला. ॥ ४ ॥  
 
राजा, परम भगवद्भक्त बाळ प्रल्हाद ’ठीक’ असे म्हणून सावकाश भगवंतांच्या जवळ जाऊन हात जोडून त्यांना त्याने भूमीवर साष्टांग नमस्कार घातला. (४) 
 
स्वपादमूले पतितं तमर्भकं  विलोक्य देवः कृपया परिप्लुतः । उत्थाप्य तच्छीर्ष्ण्यदधात् कराम्बुजं कालाहिवित्रस्तधियां कृताभयम् ॥ ५ ॥ 
(इंद्रवज्रा) नृसिंहा पाही पदि बाळ सान दया तयाच्या मनि दाटली तै । जो काळ सर्पी भय मुक्ति देतो तो हात बाळाशिरि ठेवियेला ॥५॥ 
  देवः -   देव -  स्वपादमूले पतितं -   आपल्या पायापाशी पडलेल्या -  तं -   त्या -  अर्भकं -   प्रल्हाद बाळाला -  विलोक्य -   पाहून -  कृपया -   कृपेने -  परिप्लुतः नृसिंहः -   उचंबळलेला नृसिंह -  (तं) उत्थाप्य -   त्याला उठवून -  तच्छीर्ष्णि -   त्याच्या मस्तकावर -  कालाहिवित्रस्तधियां -   काळसर्पाला भ्याल्या आहेत बुद्धि ज्यांच्या अशांना -  कृताभयं -   अभय देणारे -  करांबुजं -   आपले करकमळ -  अदधात् -   ठेविता झाला. ॥ ५ ॥  
 
आपल्या चरणांवर पडलेल्या त्या बाळाला पाहून देवांचे हृदय दयेने कळवळले. त्यांनी प्रल्हादाला उठवून त्याच्या डोक्यावर कालसर्पाने भयभीत झालेल्यांना अभयदान देणारे आपले करकमल ठेवले. (५) 
 
स तत्करस्पर्शधुताखिलाशुभः  सपद्यभिव्यक्तपरात्मदर्शनः । तत्पादपद्मं हृदि निर्वृतो दधौ हृष्यत्तनुः क्लिन्नहृदश्रुलोचनः ॥ ६ ॥ 
अशूभ सारे झडले तयाचे  साक्षातकारी मग दृष्टी झाली । प्रल्हादा पाया हृदयी धरी तै रोमांच होता ढळलेहि अश्रू ॥६॥ 
  तत्करस्पर्शधुताखिलाशुभः -   त्याच्या हस्तस्पर्शाने सर्व पापे धुवून गेली आहेत ज्याची असा -  सपदि -   तत्काळ -  अभिव्यक्तपरात्मदर्शनः -   प्रत्यक्ष परब्रह्माचे ज्ञान झालेला -  हृष्यत्तनुः -   रोमांचयुक्त झाले आहे शरीर ज्याचे असा -  क्लिन्नहृत् -   प्रेमाने ओले झाले आहे हृदय ज्याचे असा -  अश्रुलोचनः -   डोळ्यांतून अश्रु वाहात आहेत ज्याच्या असा -  सः -   तो प्रल्हाद -  निर्वृतः -   सुखी झालेला  -  हृदि -   हृदयाच्या ठिकाणी -  तत्पादपद्मं -   त्याचे चरणकमळ -  दघौ -   धारण करिता झाला. ॥ ६ ॥  
 
त्यांच्या करकमलाचा स्पर्श होताच त्याचे सारे पाप धुऊन गेले. त्याला त्याचक्षणी परमात्म तत्वाचा साक्षात्कार झाला. त्याने मोठ्या प्रेमाने आणि आनंदविभोर होऊन भगवंतांचे चरणकमल आपल्या हृदयात धारण केले. त्यावेळी त्याचे सर्व शरीर पुलकित झाले, हृदयामध्ये प्रेमधारा आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. (६) 
 
(अनुष्टुप्)  अस्तौषीद्धरिमेकाग्र मनसा सुसमाहितः । प्रेमगद्गदया वाचा तन्न्यस्तहृदयेक्षणः ॥ ७ ॥ 
(अनुष्टुप्) एकटक असे देवा प्रल्हाद पाहु लागला । समाधी लागली त्याला वाणीने स्तुति गायिली ॥७॥ 
  सुसमाहितः -   पूर्णपणे समाधान पावलेला -  तन्न्यस्तहृदयेक्षणः (प्रल्हादः) -   ज्याने मन व डोळे परमेश्वराच्या ठिकाणी लाविले आहेत असा तो प्रल्हाद -  हरिं -   नरहरीला -  एकाग्रमनसा -   एकाग्र अंतःकरणाने -  प्रेमगद्गदया -   प्रेमामुळे सद्गदित झालेल्या -  वाचा -   वाणीने -  अस्तौषीत् -   स्तविता झाला. ॥ ७ ॥  
 
प्रल्हाद भावपूर्ण हृदयाने आणि अनिमिष नेत्रांनी भगवंतांना पाहात होता. भावसमाधीत स्वत: एकाग्र होत, प्रेमगद्गद वाणीने त्याने त्यांची स्तुती सुरू केली. (७) 
 
प्रह्राद उवाच -  ब्रह्मादयः सुरगणा मुनयोऽथ सिद्धाः सत्त्वैकतानमतयो वचसां प्रवाहैः । नाराधितुं पुरुगुणैः अधुनापि पिप्रुः किं तोष्टुमर्हति स मे हरिरुग्रजातेः ॥ ८ ॥ 
(वसंततिलका) ब्रह्मादि देव ऋषि नी मुनि सिद्ध यांची सत्वात बुद्धि स्थिर राहुनि तुष्ट ना तू ? मी तो असूर कुळि या परि जन्मलेला संतुष्ट तू मजवरी हरि होसि कां तू ॥८॥ 
  सत्वैतानमतयः -   ज्यांची मने शुद्ध सत्त्वगुणमय झाली आहेत असे -  ब्रह्मादयः -   ब्रह्मादिके -  सुरगणाः -   देवगण  -  अथ -   तसेच -  मुनयः -   ऋषि -  सिद्धाः -   सिद्ध -  वचसां -   शब्दांच्या -  प्रवाहैः -   ओघांनी -  पुरुगुणैः -   विपुल गुणांनी -  अधुना अपि -   अजूनही -  (यं) आराधितुं -   ज्याची आराधना करण्यास -  न पिप्रुः -   समर्थ झाले नाहीत -  सः -   तो -  हरिः -   हरि -  उग्रजातेः मे -   क्रूर स्वभावाच्या आसुरी योनीत जन्मलेल्या माझ्या योगाने -  तोष्टुं -   संतुष्ट होण्यास -  अर्हति किं -   योग्य होईल काय. ॥ ८ ॥  
 
प्रल्हाद म्हणाला – ब्रह्मदेव इत्यादी देव, ऋषी, सिद्ध इत्यादींची बुद्धी नेहमी सत्वगुणी असते. तरीसुद्धा ते आपल्या प्रवाही वाणीने आपल्या विविध गुणांचे गायन करून अजूनही आपल्याला संतुष्ट करू शकले नाहीत. मी तर घोर असुर जातीत जन्मलेला. माझ्याकडून आपण संतुष्ट व्हाल काय ? (८) 
 
मन्ये धनाभिजनरूपतपःश्रुतौजः   तेजःप्रभावबलपौरुषबुद्धियोगाः । नाराधनाय हि भवन्ति परस्य पुंसो भक्त्या तुतोष भगवान् गजयूथपाय ॥ ९ ॥ 
जाणीतसे कि धन रूप तपो नि विद्या ओजोनि तेज कुल ना बल पौरूषाने । बुद्धि नि योग ययि ना तव तुष्टि होते भक्ति करी जरि पशू तरि पावसी त्या ॥९॥ 
  धनाभिजनरूपतपःश्रुतौजस्तेजः -   द्रव्य, सत्कुली जन्म, सौंदर्य, तप, पांडित्य, इंद्रियपटुता, कांति,  -  प्रभावबलपौरुषबुद्धियोगाः -   पराक्रम, बल, उद्योग, बुद्धि व अष्टांगयोग हे -  परस्य पुंसः -   श्रेष्ठ पुरुषाच्या -  आराधनाय -   संतोषाला -  न हि भवंति -   कारणीभूत होत नाहीत -  इति मन्ये -   असे मी मानितो -  भगवन् -   हे परमेश्वरा -  भक्त्या (एव) -   भक्तीनेच -  गजयूथपाय -   गजेंद्रावर -  तुतोष -   प्रसन्न झाला. ॥ ९ ॥  
 
मला तर वाटते की, धन, कुलीनता, रूप, तप, विद्या, ओज, तेज, प्रभाव, बल, पौरुष, बुद्धी आणि योग हे सर्व गुण परमपुरुष भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी पुरेसे नाहीत. परंतु भक्तीने मात्र भगवंत गजेंद्रावरसुद्धा संतुष्ट झाले होते. (९) 
 
विप्राद् द्विषड्गुणयुताद् अरविन्दनाभ  पादारविन्दविमुखात् श्वपचं वरिष्ठम् । मन्ये तदर्पितमनोवचनेहितार्थ प्राणं पुनाति स कुलं न तु भूरिमानः ॥ १० ॥ 
ते श्रेष्ठ गूण असुनी तरि हीन विप्र जो राहतो विमुख या पदपद्मभक्ती । कर्मो मनो नि वचनो धन प्राण सर्व चांडाळ ही तुजसि अर्पुनि प्रीय होती । चांडाळ तो करितसे कुळ शुद्ध सारे गर्वात त्या द्विजहि ते नच हो पवित्र ॥१०॥ 
  अरविंदनाभपादारविंदविमुखात् -   परमेश्वराच्या चरणकमली विमुख अशा -  द्विषट्गुणयुतात् -   बारा गुणांनी युक्त अशा -  विप्रात् -   ब्राह्मणांहून -  तदर्पितमनोवचनेहितार्थप्राणं -   परमेश्वराला ज्याने आपले मन, भाषण, व्यापार, अर्थ व प्राण अर्पण केले आहेत अशा -  श्वपचं -   चांडाळाला -  वरिष्ठं -   श्रेष्ठ -  मन्ये -   मानितो -  (तादृशः) सः -   तसला चांडाळ -  कुलं -   कुळाला -  पुनाति -   पवित्र करितो -  तु -   पण -  भूरिमानः (ब्राहणः) -   गर्विष्ठ ब्राह्मण -  न पुनाति -   पवित्र करीत नाही. ॥ १० ॥  
 
माझ्या समजुतीप्रमाणे बारा गुणांनी युक्त असलेला ब्राह्मणसुद्धा जर भगवान कमलनाभांच्या चरणकमलांना विन्मुख असेल, तर त्याच्यापेक्षा ज्या चांडाळाने आपले मन, वाणी, कर्म, धन आणि प्राण भगवंतांच्या चरणी समर्पित केले आहेत, तो श्रेष्ठ होय. तो आपल्या कुळालासुद्धा पवित्र करतो पण आपल्या मोठेपणाचा अभिमान बाळगणारा ब्राह्मण नाही. (१०) 
 
नैवात्मनः प्रभुरयं निजलाभपूर्णो  मानं जनादविदुषः करुणो वृणीते । यद् यज्जनो भगवते विदधीत मानं तच्चात्मने प्रतिमुखस्य यथा मुखश्रीः ॥ ११ ॥ 
तू शक्तिमान प्रभुरूप नि पूर्ण ध्यानी  नाही तुला गरज क्षुल्लक पूजनाची । भोळे असोत तरि ते तुज भक्त प्रीय चित्तात तू प्रगटसी प्रतिबिंब जैसे ॥११॥ 
  निजलाभपूर्णः -   आत्मानंदलाभाने पूर्ण -  च -   आणि -  करुणः -   कृपाळू -  अयं -   हा -  प्रभुः -   परमेश्वर -  अविदुषः -   अज्ञानी -  जनात् -   लोकांपासून -  आत्मनः -   स्वतःकरिता -  मानं -   पूजा -  न एव वृणीते -   मागतच नाही -  जनः -   लोक -  भगवते -   परमेश्वराला -  यत् यत् -   जी जी -  मानं -   पूजा -  विदधीत -   करितो -  तत् -   ती -  आत्मने (भवति) -   आत्म्याला होते -  यथा -   ज्याप्रमाणे -  मुखश्रीः -   मुखाची शोभा -  प्रतिमुखस्य (भवति तथा) -   प्रतिबिंबातील मुखाला दिसते तशी. ॥ ११ ॥  
 
सर्वशक्तिमान प्रभू आपल्या स्वरूपाच्या साक्षात्कारानेच परिपूर्ण आहेत. आपली अज्ञानी पुरुषांकडून पूजा करून घेण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही. भक्तांच्या हितासाठीच ते त्यांनी केलेल्या पूजेचा करुणेने स्वीकार करतात. जसे आपल्या मुखाचे सौंदर्य आरशात दिसणार्या प्रतिबिंबालाही सुंदर बनविते, तसेच भक्त भगवंतांचा जो जो सन्मान करतो तो परत त्यालाच प्राप्त होतो. (११) 
 
तस्मादहं विगतविक्लव ईश्वरस्य  सर्वात्मना महि गृणामि यथा मनीषम् । नीचोऽजया गुणविसर्गमनुप्रविष्टः पूयेत येन हि पुमान् अनुवर्णितेन ॥ १२ ॥ 
नाही मुळीहि मजला अधिकार तैसा  बुद्धि जसी करितसे तव वर्णने ही । अज्ञानि जे भव तमी अशि कीर्ति गाता तत्काळ ते विमल हो अशि कीर्ति आहे ॥१२॥ 
  तस्मात् -   त्याकरिता -  नीचः -   नीच जातीत उत्पन्न झालेला -  अहं -   मी -  विगतविक्लवः -   निर्भय होत्साता -  ईश्वरस्य -   ईश्वराचे -  महि -   माहात्म्य -  सर्वात्मना -   एकनिष्ठेने -  यथामनीषं -   यथामति -  गृणामि -   वर्णन करितो -  येन अनुवर्णितेन -   ज्या माहात्म्याच्या वर्णनाने -  अजया -   मायेने -  विसृष्टं -   गुणसृष्टीत -  अनुप्रविष्टः -   प्रविष्ट झालेला -  पुमान् -   पुरुष -  पूयेत हि -   खरोखर पवित्र होईल. ॥ १२ ॥  
 
म्हणूनच मी होणतीही शंका मनात न आणता, माझ्या बुद्धीनुसार सर्व प्रकारे भगवंतांचा महिमा वर्णन करीतआहे. या महिमा गायनामुळे अविद्येमुळे संसार चक्रात सापडलेला नीच जीव तत्काळ पवित्र होतो. (१२) 
 
सर्वे ह्यमी विधिकरास्तव सत्त्वधाम्नो  ब्रह्मादयो वयमिवेश न चोद्विजन्तः । क्षेमाय भूतय उतात्मसुखाय चास्य विक्रीडितं भगवतो रुचिरावतारैः ॥ १३ ॥ 
सत्वासि आश्रय तुझा तव भक्त सारे  दैत्या परी न करिती मुळि द्वेष तैसा । घेसी कितेक अवतार हि चांग चांग कल्याण या जगति ते करण्य लिला त्या ॥१३॥ 
  ईश -   हे परमेश्वरा -  उद्विजंतः -   भिणारे -  सर्वे -   सगळे -  अमी -   हे -  ब्रह्मादयः -   ब्रह्मादिक देव -  सत्त्वधाम्नः -   सत्त्वगुणरूप अशा -  तव -   तुझे -  विधिकराः हि (सन्ति) -   आज्ञाधारक आहेत -  वयं इव -   आमच्यासारखे विरोधी भक्त -  न -   नाहीत -  भगवतः -   भगवंताचे -  रुचिरावतारैः -   मनोहर अवतारांच्या योगे -  विक्रीडितं -   खेळणे -  अस्य -   ह्या जगाच्या -  क्षेमाय -   कल्याणाकरिता -  च -   आणि -  भूतये -   ऐश्वर्यवृद्धीकरिता -  उत च -   शिवाय आणि -  आत्मसुखाय (अस्ति) -   आत्मसुखाकरिता होय. ॥ १३ ॥  
 
भगवन, आपण सत्वगुणाचे आश्रय आहात. हे ब्रह्मदेवादी सर्व देव आपले आज्ञाधारक भक्त आहेत. आम्हा दैत्यांप्रमाणे ते आपला द्वेष करीत नाहीत. प्रभो, आपण उत्तमोत्तम अवतार ग्रहण करून या जगाचे कल्याण आणि अभ्युदय व्हावा, तसेच त्यांना आत्मानंद प्राप्त व्हावा म्हणून अनेक प्रकारच्या लीला करीत असता. (१३) 
 
तद् यच्छ मन्युमसुरश्च हतस्त्वयाद्य  मोदेत साधुरपि वृश्चिकसर्पहत्या । लोकाश्च निर्वृतिमिताः प्रतियन्ति सर्वे रूपं नृसिंह विभयाय जनाः स्मरन्ति ॥ १४ ॥ 
वृश्चीक आदि वधिता सुख सज्जनांना  दैत्याचिये मरणि सौख्य तसेचि सर्वां । ते सर्व वाट बघती करि शांत क्रोध भीती मधोनि निघण्या भजतील लोक ॥१४॥ 
  तत् -   यास्तव -  मन्युं -   क्रोध -  यच्छ -   आटोप -  त्वया -   तुझ्याकडून -  अद्य -   आज -  असुरः -   दैत्य -  च -   तर -  हतः -   मारिला गेला -  साधुः अपि -   साधु सुद्धा -  वृश्चिकसर्पहत्या -   विंचू व साप यांच्या वधाने -  मोदेत -   आनंद पावेल -  च -   आणि -  सर्वे -   सर्व -  लोकाः -   लोक -  निर्वृतिं -   सुखाला -  इतः -   प्राप्त झालेले -  (तव क्रोधस्य उपशमं) प्रतियंती -   तुझा कोप शांत होण्याची वाट पाहत आहेत -  नृसिंह -   हे नरहरे -  जनाः -   सर्व लोक -  रूपं -   तुझे रूप -  विभयाय -   निर्भय होण्याकरिता -  स्मरति -   स्मरतात. ॥ १४ ॥  
 
आपण असुराला मारले. आता आपला क्रोध शांत करावा. जसे विंचू, साप इत्यादींना मारल्यामुळे सज्जनसुद्धा सुखी होतात, त्याचप्रमाणे या दैत्याच्या नाशाने सर्व लोकांना सुख प्राप्त झाले आहे. आता सर्वजण आपल्या शांत स्वरूपाची वाट पाहात आहेत. नृसिंहदेवा, भयापासून मुक्त होण्यासाठी भक्तजन आपल्या या स्वरूपाचे स्मरण करतील. (१४) 
 
नाहं बिभेम्यजित तेऽतिभयानकास्य  जिह्वार्कनेत्र भ्रुकुटीरभसोग्रदंष्ट्रात् । आन्त्रस्रजःक्षतजकेशरशङ्कुकर्णान् निर्ह्रादभीतदिगिभादरिभिन्नखाग्रात् ॥ १५ ॥ 
ईशा तुझे वदन हे बहुही भयान सूर्यापरी नयन आणि लपाप जिव्हा । दाढी प्रचंड वरि ताणियल्या भृकुटी रक्तात ते भिजयले अति ते आयाळ । हा सिंहनाद करिता भयभीत हत्ती पाहूनी तीक्ष्ण नख हे मजला न धास्ती ॥१५॥ 
  अजित -   हे अपराजिता -  अतिभयानकास्यजिह्वार्कनेत्र -   अत्यंत भयंकर असे मुख, जिव्हा, सूर्यासारखे नेत्र,  -  भ्रुकुटीरभसोग्रदंष्ट्रात् -   चढविलेल्या भुवया, व भयंकर दाढा आहेत ज्याला अशा -  आन्त्रस्रजः -   गळ्यात आतडयाच्या माळा अडकविलेल्या -  क्षतजकेसरशङ्कुकर्णात् -   रक्ताने भिजलेल्या जटा व शङ्कुसारखे उभे कान आहेत ज्याला अशा -  निर्ह्नादभीतदिगिभात् -   ज्याच्या शब्दाने दिग्गज भिऊन गेले आहेत अशा -  अरिभिन्नखाग्रात् ते (रूपात्) -   ज्याची नखाग्रे शत्रूला फाडणारी आहेत अशा तुझ्या रूपाला -  न अहं बिभेमि -   मी भीत नाही. ॥ १५ ॥  
 
हे परमात्मन, आपले मुख अत्यंत भयानक आहे. आपली जीभ लवलवत आहे. डोळे सूर्यासारखे आहेत. भुवया उंचावलेल्या आहेत. दाढा तीक्ष्ण आहेत. आतड्यांची माळ, रक्ताने माखलेली आयाळ, भाल्याच्या टोकाप्रमाणे उभे असलेले कान, दिग्गजांनासुद्धा भयभीत करणारा सिंहनाद, आणि शत्रूला फाडणारी आपली ही नखे पाहून मी थोडासुद्धा भ्यालो नाही. (१५) 
 
त्रस्तोऽस्म्यहं कृपणवत्सल दुःसहोग्र  संसारचक्रकदनाद् ग्रसतां प्रणीतः । बद्धः स्वकर्मभिरुशत्तम तेऽङ्घ्रिमूलं प्रीतोऽपवर्गशरणं ह्वयसे कदा नु ॥ १६ ॥ 
मी भीतसे बहु भवीं दळुनी निघाया मी कर्म बद्ध असुनी जिवजंतु यात । स्वामी कधी मजसि तू पदि घेसि तैसे जेथे समस्त जिवही सुख मोक्ष घेती ॥१६॥ 
  कृपणवत्सल -   हे दीनदयाळा -  अहं -   मी -  दुःसहोग्रसंसारचक्रकदनात् -   दुःसह व भयंकर अशा संसारचक्राच्या दुःखाने -  त्रस्तः -   गांजलेला -  अस्मि -   आहे -  स्वकर्मभिः -   आपल्या कर्मांनी -  बद्धः -   बांधलेला -  ग्रसतां -   हिंस्त्रप्राण्यांमध्ये -  प्रणीतः -   पडलो आहे -  उशत्तम -   अतिप्रिय देवा -  प्रीतः त्वं -   संतुष्ट झालेला तू -  अपवर्गं -   मोक्षरूपी  -  अरणं -   आश्रय अशा -  ते अङ्घ्रिमूलं -   तुझ्या पायापाशी -  कदा -   केव्हा -  नु -   निश्चयेकरून -  (मां) ह्वयसे -   मला बोलावशील. ॥ १६ ॥  
 
हे दीनबंधो, मी भयभीत झालो आहे, तो या असह्य आणि उग्र संसारात भरडला गेल्यामुळे. आपल्या कर्मांनी बांधला जाऊन मी या भयंकर दैत्ययोनीमध्ये फेकला गेलो आहे. हे नाथ, आपण प्रसन्न होऊन सर्व जीवांसाठी शरण जाण्यास योग्य आणि मोक्षस्वरूप अशा आपल्या चरणकमलांजवळ मला केव्हा बोलवाल ? (१६) 
 
यस्मात् प्रियाप्रियवियोगसंयोगजन्म  शोकाग्निना सकलयोनिषु दह्यमानः । दुःखौषधं तदपि दुःखमतद्धियाहं भूमन्भ्रमामि वद मे तव दास्ययोगम् ॥ १७ ॥ 
योनीत मी जिथ तिथे फिरलो फिरोनी प्रीया वियोग अप्रियी घडताच शोक । त्या औषधीच तसल्या बहु दुःख देती सांगा कृपा करूनिया मज युक्त भक्ती ॥१७॥ 
  यस्मात् -   ज्याअर्थी -  अहं -   मी -  प्रियाप्रियवियोगसयोगजन्मशोकाग्निना -   प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूचा संयोग झाल्यामुळे उद्भवलेल्या शोकाग्नीने -  सकलयोनिषु -   सर्व योनींमध्ये -  दह्यमानः (अस्मि) -   जाळिला जात आहे -  (यस्मात् च) दुःखौषधं -   आणि ज्याअर्थी दुःख दूर होण्याचे औषध -  तत् अपि -   तेहि -  दुःखं (अस्ति) -   दुःखरूप असते -  तथा च -   तसेच -  भूमन् -   हे देवा -  अतद्धिया -   अचेतन देहाच्या अभिमानाने -  भ्रमामि -   मोह पावलो आहे -  मे -   मला -  तव -   तुझ्या -  दास्ययोगं -   सेवायोगाला -  वद -   सांग. ॥ १७ ॥  
 
हे अनंता, मी ज्या ज्या योनींमध्ये गेलो, त्या सर्व योनींमध्ये प्रियजनांचा वियोग आणि अप्रिय जनांचा संयोग करून देणार्या दु:खरूप आगीमध्ये होरपळत राहिलो. ते दु:ख नाहीसे करण्याचे जे औषध आहे, तेही दु:खरूपच आहे. आपल्यापासून वेगळ्याच वस्तूंना आत्मा समजून मी भटकत आहे. ज्यायोगे मी आपली सेवा करू शकेन, ते साधन मला सांगा. (१७) 
 
सोऽहं प्रियस्य सुहृदः परदेवताया  लीलाकथास्तव नृसिंह विरिञ्चगीताः । अञ्जस्तितर्म्यनुगृणन् गुणविप्रमुक्तो दुर्गाणि ते पदयुगालयहंससङ्गः ॥ १८ ॥ 
देवा हितैषि प्रियपूज्य सखाहि तूची ब्रह्मादि गाति तुझिया सगुणी क्रिया त्या । गाऊनि क्रोध अन अन्य करीन पार लाभेल संत सहवास मलाहि नित्य ॥१८॥ 
  नृसिंह -   हे नरहरे -  गुणाविप्रमुक्तः -   रागद्वेषादि गुणांनी सोडिलेला -  ते पदयुगालहंससंगः सः अहं -   तुझे दोन्ही चरण आहेत आश्रय ज्यांचे अशा त्या साधूंची संगती झालेला मी -  प्रियस्य सुहृदः -   प्रिय हितकर्ता अशा -  परदेवतायाः तव विरिञ्चगीताः -   तुज श्रेष्ठ देवतेच्या ब्रह्मदेवांनी गाइलेल्या -  लीलाकथाः -   लीलांच्या कथा -  अनुगृणन् -   वर्णन करीत -  दुर्गाणि -   दुःखे -  अंजः -   अनायासे -  तितर्मि -   तरून जाईन. ॥ १८ ॥  
 
हे प्रभो, आपणच आम्हांला प्रिय आहात. आमचे सुहृद आहात. आपणच सर्वांचे परम दैवत आहात. आपल्या चरणांपाशी राहणार्या भक्तांच्या संगतीत ब्रह्मदेवांनी गाइलेल्या आपल्या लीला-कथा गात मी सहजपणे त्रिगुणांपासून मुक्त होऊन या संसारसागरातून पलीकडे जाऊ शकेन. (१८) 
 
बालस्य नेह शरणं पितरौ नृसिंह  नार्तस्य चागदमुदन्वति मज्जतो नौः । तप्तस्य तत्प्रतिविधिर्य इहाञ्जसेष्टः तावद् विभो तनुभृतां त्वदुपेक्षितानाम् ॥ १९ ॥ 
देवा नृसिंह जगती हरण्यास दुःखा आहेत कर्म परि ते क्षणिकोचि सारे । रक्षू न ते शकति माय नि बाप बाळा त्या औषधी न करिती भयमुक्त रोग्या ॥१९॥ 
  नृसिंह -   हे नृसिंहा -  इह -   इहलोकी -  बालस्य -   बालकांचे -  शरणं -   रक्षणकर्ते -  पितरौ -   आईबाप -  न (स्तः) -   नव्हेत -  आर्तस्य -   रोगाने पीडिलेल्यांचे -  अगदं -   औषध -  च -   आणि -  उदन्वति -   समुद्रात -  मज्जतः -   बुडणार्याचे -  नौः -   नौका -  (तथा) इह -   तसेच इहलोकी -  न -   नव्हे -  विभो -   परमेश्वरा -  तप्तस्य -   तप्त झालेल्या प्राण्याला -  यः -   जो -  तत्प्रतिविधिः -   त्यातून सुटण्याचा उपाय -  प्रसिद्धः -   प्रसिद्ध आहे -  त्वदुपेक्षितानां -   तुझ्याकडून उपेक्षिलेल्या -  तनुभृतां -   प्राण्यांना -  तावत् -   तितका -  अंजसा -   यथार्थ -  इष्टः (स्यात् किम्) -   इष्ट होईल काय. ॥ १९ ॥  
 
हे नृसिंहदेवा, या जगातील दु:खी लोकांची दु:खे नाहीशी करण्याचे जे उपाय मानले जातात, ते आपण उपेक्षा केल्यास तात्पुरतेच असतात. जसे आई-वडील मुलांचे रक्षण करू शकत नाहीत, औषध रोग नाहीसा करीत नाही आणि समुद्रात बुडणार्याला नाव वाचवू शकत नाही. (१९) 
 
यस्मिन्यतो यर्हि येन च यस्य यस्माद्  यस्मै यथा यदुत यस्त्वपरः परो वा । भावः करोति विकरोति पृथक्स्वभावः सञ्चोदितस्तदखिलं भवतः स्वरूपम् ॥ २० ॥ 
ब्रह्मादि श्रेष्ठ अन काल कनिष्ठ कर्ता  प्रेरितसे तुचि तया मग साधनांना । योजूनि ते करिति निर्मिति या जगाची ते सर्व रूप तुझिये नच अन्य कांही ॥२०॥ 
  पृथक्स्वभावः -   निरनिराळ्या स्वभावाचा -  यः -   जो -  अपरः -   अर्वाचीन -  वा -   अथवा -  परः -   प्राचीन -  संचोदितः -   प्रेरणा केलेला -  भावः -   कर्ता -  तु -   तर -  यस्मिन् -   ज्या आधारावर -  यतः -   ज्या निमित्तामुळे -  यर्हि -   ज्यावेळी -  येन -   ज्या साधनाने -  यस्य -   ज्यासंबंधी -  यस्मात् -   ज्यास्तव -  यस्मै -   ज्याला -  यथा -   जसे -  उत -   शिवाय -  यत् -   जे -  करोति -   निर्मितो -  च -   आणि -  विकरोति -   अन्य स्वरूपास नेतो -  तत् -   ते -  अखिलं -   सर्व -  भवतः -   तुझे -  स्वरूपं (अस्ति) -   स्वरूप होय. ॥ २० ॥  
 
सत्त्वादी गुणांमुळे वेगवेगळ्या स्वभावाचे अर्वाचीन पिता वगैरे आणि प्राचीन ब्रह्मदेव इत्यादी कर्ते आहेत, त्यांना प्रेरणा देणारे आपणच आहात. ते आपल्या प्रेरणेने ज्या आधारामध्ये, ज्या निमित्ताने, ज्या साधनांनी, ज्यावेळी, ज्याच्या प्रेरणेने, ज्याच्यासंबंधी, ज्यापासून, ज्याच्यासाठी, ज्या रीतीने, जे काही उत्पन्न करतात किंवा रूपांपरित करतात, ते सर्वजण आणि ते सर्व काही आपलेच स्वरूप आहे. (२०) 
 
माया मनः सृजति कर्ममयं बलीयः  कालेन चोदितगुणानुमतेन पुंसः । छन्दोमयं यदजयार्पितषोडशारं संसारचक्रमज कोऽतितरेत् त्वदन्यः ॥ २१ ॥ 
माया तुझ्या अनुमते करि क्षोभ आणि मनप्रधान शरिरा मग निर्मिते ती । हा लिंगदेह बलवान् रूप नाम गर्वी सोळा विकार करूनी युत चक्र मोठे । नाही तुझ्या विण कुणी जगती पुरूष संसार चक्र भव हे परि पार होतो ॥२१॥ 
  कालेन -   काळाने -  चोदितगुणा -   ज्यात गुणांची प्रेरणा केली आहे अशी -  माया -   माया -  पुंसः -   पुरुषाच्या -  अनुमतेन -   संमतीने -  कर्ममयं -   कर्ममय -  बलीयः -   बलिष्ठ -  छन्दोमयं -   वेदमय -  अजया अर्पितषोडशारं -   अविद्येने ज्याला अकरा इंद्रिये व पाच भूते अशा सोळा पाकळ्या जोडिल्या आहेत अशा -  संसारचक्रं -   संसारचक्ररूपी -  यत् -   ज्या -  मनः -   मनाला -  सृजति -   उत्पन्न करिते -  अज -   हे प्रभो -  त्वदन्यः -   तुला विमुख असणारा -  कः -   कोणता प्राणी -  अतितरेत् -   तरून जाईल ॥ २१ ॥  
 
पुरुषांच्या संकल्पानुसार कालामुळे गुणांमध्ये क्षोभ झाल्याकारणाने माया मन:प्रधान लिंगशरीरनिर्मिती करते. हे लिंगशरीर बलवान, कर्ममय तसेच वेदोक्त कर्मप्रधान आहे. हेच अविद्येने जीवाच्या भोगासाठी कल्पिलेले मन, दहा इंद्रिये आणि पाच तन्मात्रा या सोळा विकाररूप आर्यांनी युक्त असे संसारचक्र आहे. हे जन्मरहित प्रभो, असा कोण पुरुष आहे की जो आपल्याला न भजता हे मनरूप संसार-चक्र पार करू शकेल ? (२१) 
 
स त्वं हि नित्यविजितात्मगुणः स्वधाम्ना  कालो वशीकृतविसृज्यविसर्गशक्तिः । चक्रे विसृष्टमजयेश्वर षोडशारे निष्पीड्यमानमुपकर्ष विभो प्रपन्नम् ॥ २२ ॥ 
 हे शक्तिमान प्रभू रे भवचक्रि माया ऊसा परीच पिळते चरकात तैशा । चैतन्य बुद्धि सगळे तव अंकितो ते आलो पदास तुझिया मज रक्षि देवा ॥२२॥ 
  विभो -   हे समर्था -  ईश्वर -   ईश्वरा -  स्वधाम्ना -   आपल्या चैतन्यशक्तीने -  नित्यविजितात्मगुणः -   ज्याने बुद्धीचे गुण जिंकले आहेत असा -  कालः -   काळरूपी -  वशीकृतविसृज्याविसर्गशक्तिः -   उत्पन्न झालेल्या सर्व शक्ति ज्याने आपल्या स्वाधीन केल्या आहेत असा -  सः -   तो -  त्वं -   तू -  हि -   खरोखर -  अजया -   अविद्येने -  विसृष्टं -   उत्पन्न केलेल्या  -  षोडशारे चक्रे -   सोळा पाकळ्यांच्या चक्रातून -  निष्पीडयमानं -   पिळून निघणार्या -  प्रपन्नं (मां) -   शरण आलेल्या -  उपकर्ष -   बाहेर काढ. ॥ २२ ॥  
 
हे सर्वशक्तिमान प्रभो ! माया मला या सोळा आरे असलेल्या चक्रात अडकवून उसाप्रमाणे पिळून काढीत आहे. आपण आपल्या चैतन्यशक्तीने बुद्धीच्या सर्व गुणांना नेहमी पराजित करता आणि कालरूपाने सर्व साध्य आणि साधने आपल्या अधीन ठेवता. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण मला या चक्रातून ओढून काढून आपल्याजवळ घ्या. (२२) 
 
दृष्टा मया दिवि विभोऽखिलधिष्ण्यपानाम्  आयुः श्रियो विभव इच्छति यान्जनोऽयम् । येऽस्मत्पितुः कुपितहासविजृम्भितभ्रू विस्फूर्जितेन लुलिताः स तु ते निरस्तः ॥ २३ ॥ 
संसारि लोक जगण्या करितात इच्छा  स्वर्गादि सौख्य सगळे बहु पाहिले मी । माझे पिता बघत वक्रदृष्टी तदा ते सोडूनि सर्व मग तै पळले हि सर्व । सार्यास धाक असल्या पितयास माझ्या मारीयलेस हरि तू असला समर्थ ॥२३॥ 
  विभो -   हे ईश्वरा -  अयं जनः -   हो लोक -  यान् -   ज्यांना -  इच्छति -   इच्छितो -  दिवि -   स्वर्गातील -  अखिलधिषपानां -   सर्व लोकपालांची -  विभवः -   ऐश्वर्ये -  आयुः -   आयुष्य -  श्रियः -   संपत्त्या -  मया -   मी -  दृष्टाः -   पाहिल्या -  ये -   जे लोकपाल -  अस्मत्पितुः -   आमच्या पित्याच्या -  कुपितहासविजृंभितभ्रूविस्फूर्जितेन -   क्रोधयुक्त हास्यामधील चढविलेल्या भुवयांच्या तेजाने -  लुलिताः -   लुले होत -  सः -   तो -  तु -   तर -  ते -   तुझ्याकडून -  निरस्तः -   मारिला गेला. ॥ २३ ॥  
 
भगवन, ज्याच्यासाठी संसारी लोक अतिशय हापापलेले असतात, ते स्वर्गात मिळणारे सर्व लोकपालांचे आयुष्य, लक्ष्मी आणि ऐश्वर्य मी पुष्कळ पाहिले आहे. ज्यावेळी माझे वडील थोडेसे रागावून हसत आणि त्यांच्या भुवया थोड्या वर चढत, तेव्हाच ती संपत्ती त्यांच्याजवळ राहात नसे, पण माझ्या अशा त्या पित्यालाही आपण मारले. (२३) 
 
तस्मादमूस्तनुभृतां अहमाशिषोऽज्ञ  आयुः श्रियं विभवमैन्द्रियमा विरिञ्च्यात् । नेच्छामि ते विलुलितानुरुविक्रमेण कालात्मनोपनय मां निजभृत्यपार्श्वम् ॥ २४ ॥ 
ब्रह्मादिलोक मय लक्षुमी भोग सारे इच्छी न मी तवचि घासहि सर्व आहे । ते काळरूप धरूनी गिळिसी हरी रे तेंव्हा सदैव मज हो तवभक्तसंग ॥२४॥ 
  तस्मात् -   यास्तव -  अमूः -   ह्या -  तनुभृतां -   देहधार्यांच्या -  आशिषः -   भोगांना -  ज्ञः -   जाणणारा -  अहं -   मी -  आयुः -   आयुष्याला -  श्रियं -   संपत्तीला -  आविरिञ्च्यात् -   ब्रह्मदेवापासून सर्व प्राण्यांच्या -  ऐंद्रियं -   इंद्रियसंबंधी -  तथा च -   तसेच -  विभवं -   ऐश्वर्याला -  ते -   तुझ्या -  उरुविक्रमेण कालात्मना -   महापराक्रमी कालगतीने -  विलुलितान् -   नष्ट होणार्या अणिमादि सिद्धी -  न इच्छामि -   इच्छित नाही -  मां -   मला -  निजभृत्यपार्श्वं -   आपल्या सेवकांच्या समीप -  उपनय -   ने. ॥ २४ ॥  
 
म्हणूनच संसारातील प्राणी ज्या ब्रह्मलोकापर्यंतचे आयुष्य, लक्ष्मी, ऐश्वर्य आणि इंद्रियभोग यांची इच्छा करतात ते मला नकोत; कारण अत्यंत शक्तिशाली काळाचे रूप धारण करून आपण त्यांना ग्रासले आहे, हे मी जाणतो. आपण मला आपल्या दासांच्या सान्निध्यात घेऊन चला. (२४) 
 
कुत्राशिषः श्रुतिसुखा मृगतृष्णिरूपाः  क्वेदं कलेवरमशेषरुजां विरोहः । निर्विद्यते न तु जनो यदपीति विद्वान् कामानलं मधुलवैः शमयन्दुरापैः ॥ २५ ॥ 
भोगार्थ गोष्टि सगळ्या गमतात चांग  सार्याचि त्या मृगजळा परि भास आहे । भोगात रोग सगळे बसती लपोनी इच्छाग्निसी नचहि भोग कधी शमीती ॥२५॥ 
  कुत्र -   कोठे -  श्रृतिसुखाः -   ऐकण्याला गोड -  मृगतृष्णिरूपाः -   मृगजळाप्रमाणे मिथ्या -  आशिषः -   भोग -  क्व (च) -   आणि कोठे -  अशेषरुजां -   सर्व रोगांचे -  विरोहः -   उत्पत्तिस्थान असे -  इदं कलेवरं -   हे शरीर -  यत् -   ज्यापासून -  इति विद्वान् अपि -   असे जाणणाराही -  जनः -   लोक -  दुरापैः -   दुर्मिळ असा -  मधुलवैः -   क्षुद्र सुखांनी -  कामानलं -   कामरूप अग्नीला -  शमयन् -   शांत करीत -  न तु निर्विद्यते -   विरक्त होतच नाही. ॥ २५ ॥  
 
विषयभोगाच्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात, परंतु त्या मृगजळाप्रमाणे फसव्या आहेत. तसेच हे शरीरसुद्धा अगणित रोगांचे उगमस्थान आहे. कोठे ते मिथ्या विषयभोग आणि कोठे हे रोगयुक्त शरीर ! दोन्हींची असारता जाणूनसुद्धा मनुष्य यापासून विरक्त होत नाही. मोठ्या कष्टाने प्राप्त होणार्या भोगांच्या लहान लहान मधुबिंदूंच्या द्वारा तो आपली इच्छारूपी आग विझविण्याचा प्रयत्न करतो ! (२५) 
 
क्वाहं रजःप्रभव ईश तमोऽधिकेऽस्मिन्  जातः सुरेतरकुले क्व तवानुकम्पा । न ब्रह्मणो न तु भवस्य न वै रमाया यन्मेऽर्पितः शिरसि पद्मकरः प्रसादः ॥ २६ ॥ 
मी तो तमोगुणी अशाचि कुळात झालो धन्यो कृपा हरि तुझी असली अनंता । तू हा तुझ्या सकलतापहरी कराते माझ्या शिरावरति ठेविसि काय योग । जो हात तूं कधि न ठेविसि त्या शिरासी लक्ष्मी नि शंकर तसा जगनिर्मित्यासी ॥२६॥ 
  ईश -   हे ईश्वरा -  क्व -   कोठे -  रजःप्रभवः -   रजोगुणापासून जन्म पावलेला -  तमोधिके -   तमोगुण ज्यात अधिक आहे अशा -  अस्मिन् -   ह्या -  सुरेतरकुले -   दैत्यकुलात -  जातः -   उत्पन्न झालेला -  अहं -   मी -  क्व (च) तव अनुकंपा -   आणि कोठे तुझी कृपा -  यत् -   ज्याअर्थी -  मे -   माझ्या -  शिरसि -   मस्तकावर -  प्रसादः -   प्रसादरूपी -  पद्मकरः -   कमलासारखा हा -  त्वया अर्पितः -   तुझ्याकडून ठेविला गेला -  ब्रह्मणः -   ब्रह्मदेवाच्या -  न -   नाही -  भवस्य -   शंकराच्या -  न -   नाही -  रमायाः तु -   लक्ष्मीच्याही -  वै -   खरोखर -  न -   नाही. ॥ २६ ॥  
 
हे प्रभो, कुठे या तमोगुणी असुर वंशात रजोगुणापासून उत्पन्न झालेला मी आणि कुठे आपली त्याच्यावरील कृपा ! धन्य आहे ! आपण आपला प्रसादस्वरूप जो कमलाकर माझ्या मस्तकावर ठेवला आहे, तो आपण ब्रह्मदेव, शंकर आणि लक्ष्मीच्या मस्तकावरसुद्धा कधी ठेवला नव्हता ! (२६) 
 
नैषा परावरमतिर्भवतो ननु स्याजत्  जन्तोर्यथाऽऽत्मसुहृदो जगतस्तथापि । संसेवया सुरतरोरिव ते प्रसादः सेवानुरूपमुदयो न परावरत्वम् ॥ २७ ॥ 
सर्वात्म तू असुनिया तुजला न भेद कल्पतरू परिहि तूं भजताच देसी । सेवा करी जिव जसा तयि पावसी तू जात्याभिमान तुजला नच उच्च नीच ॥२७॥ 
  एषा -   ही -  परावरमतिः -   उच्चनीच बुद्धि -  यथा -   जशी -  जंतोः -   साधारण प्राण्याची -  (तथा) जगतः आत्मसुहृदः -   तशी जगाचा आत्मा व हितकर्ता अशा -  भवतः -   तुला -  ननु -   खरोखर -  न स्यात् -   होणार नाही -  तथा अपि -   तथापि -  सुरतरोः इव -   कल्पवृक्षाप्रमाणे -  ते -   तुझा -  प्रसादः -   प्रसाद -  संसेवया -   चांगल्या सेवेने -  सेवानुरूपं -   सेवेला योग्य असा -  उदयः (भवति) -   धर्मादिकांचे फल मिळते -  (तत्र) परावरत्वं -   तेथे उच्च-नीच भाव  -  न (अस्ति) -   नाही. ॥ २७ ॥  
 
इतर संसारी जीवांप्रमाणे लहान-मोठा असा भेदभाव आपण करीत नाही; कारण आपण सर्वांचे आत्मा आणि अकारण प्रेमी आहात. कल्पवृक्षासारखा असलेला आपला प्रसादसुद्धा आपली सेवा केल्यामुळेच प्राप्त होतो. सेवेनुसारच जीवांवर आपल्या कृपेचा उदय होतो. त्यासाठी जातीची उच्चता किंवा नीचता कारणीभूत नाही. (२७) 
 
एवं जनं निपतितं प्रभवाहिकूपे  कामाभिकाममनु यः प्रपतन् प्रसङ्गात् । कृत्वाऽऽत्मसात् सुरर्षिणा भगवन् गृहीतः सोऽहं कथं नु विसृजे तव भृत्यसेवाम् ॥ २८ ॥ 
अंधारकूप असला भव यात सर्प  कालो रूपेचि वसतो अन डंख घेण्या । भोगी सदैव पडती तयि मीहि तैसा त्या नारदे मजसि सोडविले सदाचे ॥२८॥ 
  भगवन् -   हे परमेश्वरा -  एवं -   याप्रमाणे -  प्रभवाहिकूपे -   संसाररूपी सर्पयुक्त विहिरीत -  निपतितं -   पडलेल्या -  कामाभिकामं -   उपभोगांची इच्छा करणार्या -  जनं -   लोकाला -  अनु (गच्छन्) -   अनुसरणारा -  प्रसंगात् -   प्रसंगवशात -  यः -   जो -  सुरर्षिणा -   देवर्षि नारदाने -  आत्मसात् -   आपलासा -  कृत्वा -   करून -  गृहीतः -   स्वीकारिला गेला -  सः -   तो -  अहं -   मी -  तव भृत्यसेवां -   तुझा सेवक जो नारद त्याच्या सेवेला -  नु -   खरोखर -  कथं -   कसा -  विसृजे -   सोडू. ॥ २८ ॥  
 
भगवन, हा संसार ही एक अंधकारमय विहीर असून तीमध्ये कालरूपी सर्प डसण्यासाठी नेहमी तयार असतो. विषयभोगांची इच्छा असणारे पुरुष तीत पडलेले आहेत. त्यांच्या संगतीने मीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ तीत पडू लागलो होतो. परंतु भगवन, देवर्षी नारदांनी मला आपला समजून तीतून वाचविले. असे असता मी आपल्या भक्तजनांची सेवा कशी सोडू ? (२८) 
 
मत्प्राणरक्षणमनन्त पितुर्वधश्च  मन्ये स्वभृत्यऋषिवाक्यमृतं विधातुम् । खड्गं प्रगृह्य यदवोचदसद् विधित्सुः त्वामीश्वरो मदपरोऽवतु कं हरामि ॥ २९ ॥ 
माझा पिता मजसि तो वधण्यास आला कापीन शीर वदला परि रक्षिले तू । आणीक तोच वधिला करण्यास सत्य साधू ऋषीवचन ते सनकादिकांचे ॥२९॥ 
  अनंत -   हे अनंता -  असत् -   वाईट कृत्य -  विधित्सुः (मत्पिता) -   करण्याची इच्छा करणारा माझा पिता -  खड्गं -   तलवार -  प्रगृह्य -   घेऊन -  मदपरः -   माझ्याहून दुसरा -  ईश्वरः -   ईश्वर असला तर तो -  त्वां -   तुला -  अवतु -   राखो -  (तव) कं -   तुझे मस्तक -  हरामि -   हरण करितो -  इतियत -   असे जेव्हा -  अवोचत् -   बोलला -  मत्प्राणरक्षणं -   माझ्या प्राणाचे रक्षण -  च -   आणि -  पितुः -   बापाचा -  वधः -   वध -  स्वभृत्यऋषिवाक्यं -   आपला सेवक जो नारद त्याचे वचन -  ऋतं -   खरे -  विधातुं (आस्ताम्) -   करण्याकरिता होतो -  (इति) मन्ये -   असे मी मानितो. ॥ २९ ॥  
 
हे अनंता, ज्या वेळी माझ्या पित्याने मला मारण्यासाठी हातामध्ये खड्ग घेतले आणि म्हटले, "जर माझ्याखेरीज दुसरा कोणी ईश्वर असेल तर तो तुला वाचवील. मी आता तुझे डोके उडवितो," त्यावेळी आपण माझ्या प्राणांचे रक्षण केले आणि माझ्या पित्याचा वध केला. मला वाटते की आपण आपले सेवक असणार्या सनकादी ऋषींचे वचन सत्य करण्यासाठीच तसे केले होते. (२९) 
 
एकस्त्वमेव जगदेतममुष्य यत्त्वं  आद्यन्तयोः पृथगवस्यसि मध्यतश्च । सृष्ट्वा गुणव्यतिकरं निजमाययेदं नानेव तैरवसितस्तदनुप्रविष्टः ॥ ३० ॥ 
ही सर्व सृष्टि तवरूप अनादि तूची मध्ये नि अंति सगळी तव रूप आहे । माया गुणेचि रचिसी करिसी लिला या त्या युक्त गूण करूनी दिससी अनेक ॥३०॥ 
  एतत् -   हे -  जगत् -   जग -  त्वं एव -   तूच -  एकः (असि) -   एकटा आहेस -  यत् -   कारण -  अमुष्य -   ह्या जगाच्या -  आद्यन्तयोः -   प्रारंभी व अंती -  च -   आणि -  मध्यतः -   मध्ये -  पृथक् -   वेगळा -  अवस्यसि -   प्रत्ययास येतोस -  निजमायया -   आपल्या मायेच्या योगाने -  गुणव्यतिकरं -   गुणांचे परिणामरूप -  इदं -   हे जग -  सृष्ट्वा -   उत्पन्न करून -  तदनुप्रविष्टः -   त्यामध्ये प्रवेश केलेला -  तैः -   त्या गुणांच्या योगे -  नाना इव -   जणु काय अनेक प्रकारचा -  (त्वम् एव) अवसितः -   तूच प्रत्ययास आलेला आहेस. ॥ ३० ॥  
 
भगवन, हे संपूर्ण जग म्हणजे एकमात्र आपणच आहात. कारण यामध्ये आधी, अन्ती आणि मध्ये आपणच असून त्याहून वेगळे आहात. आपण आपल्या मायेने गुणांच्या परिणामस्वरूप या जगाची उत्पत्ती करून यात पहिल्यापासूनच असूनही प्रवेश करण्याची लीला करता आणि त्या गुणांनी युक्त होऊन अनेक आहात, असे भासविता. (३०) 
 
त्वं वा इदं सदसदीश भवांस्ततोऽन्यो  माया यदात्मपरबुद्धिरियं ह्यपार्था । यद् यस्य जन्म निधनं स्थितिरीक्षणं च तद् वै तदेव वसुकालवदष्टितर्वोः ॥ ३१ ॥ 
हे कार्य कारण रूपी दिसते हि जे जे  ते सर्व तूचि असुनी अससी निराळा । माझे - तुझे सगळि मायिक शब्द होती ते वृक्षबीज रूप जैं दिसते निराळे । त्या गंधमात्र करूनी रूप एक राही कार्या नि कारण गमे परि भिन्न सारे ॥३१॥ 
  ईश -   हे परमेश्वरा -  त्वं -   तू -  वै -   खरोखर -  इदं -   हे -  सदसत् (असि) -   खोटे असून खरे आहे असे भासणारे जग आहेस -  ततः -   त्या जगाहून -  भवान् -   तू -  अन्यः (अस्ति) -   वेगळा आहेस -  यत् -   कारण -  इयं -   ही -  आत्मपरबुद्धिः -   आपले व दुसर्याचे अशी जी बुद्धि -  हि -   खरोखर -  अपार्था -   निरर्थक -  माया (अस्ति) -   माया होय -  यत् -   ज्यापासून -  यस्य -   ज्याची  -  जन्म -   उत्पत्ति -  ईक्षणं -   प्रकाशन -  स्थितिः -   पालन -  च -   आणि -  निधनं (भवति) -   नाश होतो  -  तत् -   तो पदार्थ -  वै -   निःसंशय -  अष्टितर्वोः -   बीज व वृक्ष यांचे -  वसुकालवत् -   महाभूतांचे सूक्ष्मरूप व महाभूते हेच स्वरूप असते त्याप्रमाणे -  तत् एव (अस्ति) -   तद्रूपच होय. ॥ ३१ ॥  
 
भगवन, हे जे काही कार्यकारणरूपाने प्रचीतीला येत आहे, ते सर्व आपणच आहात आणि त्याहून वेगळेही आहात. आपला-परका हा भेदभाव, ही अर्थहीन शब्दांची माया आहे. कारण ज्याच्यापासून ज्याचा जन्म, स्थिती, लय आणि दिसणे असते ते त्याचे स्वरूपच असते. जसे बीज आणि झाड ही कारण आणि कार्याच्या दृष्टीने वेगवेगळी आहेत, तरीसुद्धा गुणधर्म आणि मूळ रूप यांच्या दृष्टीने दोन्ही एकच आहेत. (३१) 
 
न्यस्येदमात्मनि जगद् विलयाम्बुमध्ये  शेषैऽऽत्मना निजसुखानुभवो निरीहः । योगेन मीलितदृगात्मनिपीतनिद्रः तुर्ये स्थितो न तु तमो न गुणांश्च युङ्क्षे ॥ ३२ ॥ 
तू आपुल्यात मिटिसी अशि सृष्टि सारी भोगीसि तू स्वयचि सौख्य नि झोप घेसी । आत्मेय तेज अशि झोप तुरीय ब्रह्म स्वीकार ना करिसि तू विषयी तमाचा ॥३२॥ 
  इदं -   हे -  जगत् -   जग -  आत्मना -   स्वप्रकाशरूपाने -  आत्मनि -   आत्मस्वरूपी -  न्यस्य -   ठेवून -  निजसुखानुभवः -   आत्मसुखाचा अनुभव घेणारा -  निरीहः (त्वम्) -   निरीच्छ असा तू -  विलयांबुमध्ये -   प्रलयकाळाच्या उदकांत -  शेषे -   शयन करितोस -  योगेन -   योगबलाने -  मीलितदृक् -   दृष्टी मिटलेला -  आत्मनिपीतनिद्रः (त्वम्) -   स्वतःच्या प्रकाशरूपाने निद्रा नाहीशी केली आहे ज्याने असा तू -  तुर्ये -   चवथ्या अवस्थेत -  स्थितः (अस्ति) -   राहिलेला आहेस -  तु -   परंतु -  तमः -   अज्ञानाला -  न युंक्षे -   चिकटून राहात नाहीस -  च -   आणि -  गुणान् -   विषयांना -  न युंक्षे -   चिकटून राहात नाहीस. ॥ ३२ ॥  
 
भगवन, आपण हे संपूर्ण विश्व आपल्यामध्ये सामावून घेऊन आत्मसुखाचा अनुभव घेत निष्क्रीय होऊन प्रलयकालीन पाण्यात शयन करता. त्यावेळी आपल्या स्वयंसिद्ध योगाने बाह्य दृष्टी बंद करून आपण आपल्या स्वरूपाच्या प्रकाशात निद्रेलाही विलीन करून घेता आणि तुर्यावस्थेत राहता. त्यावेळी आपण झोपेतही नसता की विषयांचाही उपभोग घेत नसता. (३२) 
 
तस्यैव ते वपुरिदं निजकालशक्त्या  सञ्चोदितप्रकृतिधर्मण आत्मगूढम् । अम्भस्यनन्तशयनाद् विरमत्समाधेः नाभेरभूत् स्वकणिकावटवन्महाब्जम् ॥ ३३ ॥ 
तू कालशक्ति करूनी गुण प्रेरिसी नी ब्रह्मांड हे तव तनू म्हणुनी असे का । वैराट होय वट बीज तसेचि रूपा ब्रह्मांड पुष्प कमलो तव नाभितून ॥३३॥ 
  निजकालशक्त्या -   आपल्या कालशक्तीच्या योगाने -  संचोदितप्रकृतिधर्मणः -   प्रेरिले आहे प्रकृतीचे सत्त्वादि धर्म ज्याने अशा -  विरमत्समाधेः -   समाधिकाळ संपला आहे ज्याचा अशा -  तस्य एव -   तुझ्याच -  नाभेः -   नाभीपासून -  अनंतशयनात् -   शेषशयनापासून -  इदं वपुः -   हे शरीर -  अंभसि -   उदकात -  आत्मगूढं -   आत्म्यात गुप्त असलेले -  महाब्जं -   मोठया कमळाचे रूप आहे ज्याचे असे -  स्वकर्णिकावटवत् -   आपल्या सूक्ष्म बीजापासून जसे वडाचे झाड त्याप्रमाणे -  अभूत -   उत्पन्न झाले. ॥ ३३ ॥  
 
आपण आपल्या कालशक्तीने प्रकृतीच्या गुणांना प्रेरित करता, म्हणजेच हे ब्रह्मांड आपलेच शरीर आहे. प्रथम हे आपल्यातच लीन झालेले होते. जेव्हा प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषशय्येवर शयन करणार्या आपण योगनिद्रेचा त्याग केला, तेव्हा वटवृक्षाच्या बीजापासून विशाल वृक्ष होतो, त्याप्रमाणे आपल्या नाभीतून ब्रह्मांडकमल उत्पन्न झाले. (३३) 
 
तत्सम्भवः कविरतोऽन्यदपश्यमानः  त्वां बीजमात्मनि ततं स बहिर्विचिन्त्य । नाविन्ददब्दशतमप्सु निमज्जमानो जातेऽङ्कुरे कथमु होपलभेत बीजम् ॥ ३४ ॥ 
ब्रह्मा तयात प्रगटे अति सूक्ष्म त्यात  नाही तयास दिसले कमळा विना त्या । घूसोनियाहि शतवर्ष जळी बघे तो कांही न त्यास दिसले मुळि ते दुजे की । अंकूर ना बघु शके बिजिं जै वसोनी नाही तयास दिसले मुळि अन्य कांही ॥३४॥ 
  तत्संभवः -   त्या कमळापासून उत्पन्न झालेला -  कविः -   ब्रह्मदेव -  अतः -   या कमळापासून -  अन्यत् -   दुसरे -  अपश्यमानः -   न पाहणारा -  अब्दशतं -   शंभर वर्षे -  अप्सु -   उदकांत -  निमज्जमानः -   बुडालेला -  आत्मनि -   आत्म्याच्या ठिकाणी -  ततं -   पसरलेल्या -  बीजं -   बीजरूपी -  त्वां -   तुला -  स्वबहिः -   आत बाहेर -  विचिन्त्य -   शोधून -  न अविंदत -   प्राप्त करून घेता आला नाही -  उह -   अहो -  अंकुरे जाते -   अंकुर उत्पन्न झाला असता -  बीजं -   बी -  कथं -   कसे -  उपलभेत -   सापडेल. ॥ ३४ ॥  
 
त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाले. जेव्हा त्यांना कमळाखेरीज आणखी काहीच दिसले नाही, तेव्हा स्वत:मध्येच बीजरूपाने व्याप्त असलेल्या तुम्हांला ते जाणू शकले नाहीत आणि तुम्हांला आपल्याबाहेर तुम्ही आहात असे समजून पाण्यात घुसून शंभर वर्षेंपर्यंत शोधत राहिले. परंतु तेथे त्यांना काहीच मिळाले नाही. ते बरोबरच आहे. कारण अंकूर उगवल्यावर बी कसे दिसणार ? (३४) 
 
स त्वात्मयोनिरतिविस्मित आस्थितोऽब्जं  कालेन तीव्रतपसा परिशुद्धभावः । त्वामात्मनीश भुवि गन्धमिवातिसूक्ष्मं भूतेन्द्रियाशयमये विततं ददर्श ॥ ३५ ॥ 
साश्चर्य होउनि विधी कमळीं बसोनी  केले तपा हृदयि तै मग शुद्ध झाला । पृथ्वीत गंध असतो जइ पूर्ण तैसा झाला स्वयें अनुभवे परिपूर्ण तेंव्हा ॥३५॥ 
  ईश -   हे ईश्वरा -  अब्जम् आस्थितः -   कमळावर बसलेला -  अतिविस्मितः -   अत्यंत आश्चर्ययुक्त असा -  सः -   तो -  आत्मयोनिः -   स्वयंभू ब्रह्मदेव -  तु -   तर -  कालेन -   पुष्कळ काळाने -  तीव्रतपसा -   उग्र तपश्वर्येने -  परिशुद्धभावः -   शुद्ध अंतःकरण झाले आहे ज्याचे असा -  भुवि -   पृथ्वीमध्ये -  गंधं इव -   जसा गंध त्याप्रमाणे -  भूतेंद्रियाशयमये -   भूते, इंद्रिये, मन यांचा संघातरूप अशा -  आत्मनि -   आत्म्याच्या ठिकाणी -  अतिसूक्ष्मं -   अत्यंत सूक्ष्म अशा -  विततं -   व्यापून राहिलेल्या -  त्वां -   तुला -  ददर्श -   पाहता झाला. ॥ ३५ ॥  
 
तेव्हा ब्रह्मदेवांना मोठेच आश्चर्य वाटले. ते पुन्हा कमळात बसून राहिले. पुष्कळ काळानंतर तीव्र तपश्चर्या केल्याने जेव्हा त्यांचे हृदय शुद्ध झाले, तेव्हा त्यांना पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंत:करणरूप अशा आपल्या शरीरातच ओतप्रोत भरून असलेल्या तुमचा साक्षात्कार झाला. जसा पृथ्वीमध्ये व्यापून असलेल्या अतिसूक्ष्म गंधाचा साक्षात्कार होतो. (३५) 
 
एवं सहस्रवदनाङ्घ्रिशिरःकरोरु  नासास्यकर्ण नयनाभरणायुधाढ्यम् । मायामयं सदुपलक्षितसन्निवेशं दृष्ट्वा महापुरुषमाप मुदं विरिञ्चः ॥ ३६ ॥ 
सहस्त्र शीर्ष मुख हात नि नाक कान नेत्रे तसे भूषण त्याच विराट रूपा । आयूध युक्त भुवने तयि संगि सारे रूपा बघोनि विधिला बहु मोद झाला ॥३६॥ 
  एवं -   याप्रमाणे -  विरिञ्चः -   ब्रह्मदेव -  सहस्रवदनांघ्रिशिरः -   हजारो मुखे, पाय, मस्तके,  -  करोरुनासास्यकर्णनयनाभरणायुधाढयं -   हात, मांडया, नाक, कान, डोळे, आभरणे व आयुधे यांनी युक्त अशा -  मायामयं -   मायारूप -  सदुपलक्षितसंनिवेशं -   ज्याच्या शरीराची रचना प्रपंचरूपाने दिसून येते अशा -  महापुरुषं -   विराट पुरुषाला -  दृष्ट्वा -   पाहून -  मुदं -   हर्षाला -  आप -   प्राप्त झाला. ॥ ३६ ॥  
 
विराट पुरुष हजारो मुखे, चरण, डोकी, हात, मांड्या, नासिका, तोंड, कान, नेत्र, अलंकार आणि आयुधांनी संपन्न होता. त्याच्या विभिन्न अंगांच्या रूपात चौदा लोक दिसत होते. त्या महापुरुषाला पाहून ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला. (३६) 
 
तस्मै भवान् हयशिरस्तनुवं च बिभ्रद्  वेदद्रुहावतिबलौ मधुकैटभाख्यौ । हत्वाऽऽनयत् श्रुतिगणांश्च रजस्तमश्च सत्त्वं तव प्रियतमां तनुमामनन्ति ॥ ३७ ॥ 
रजोगुणी नि तम कैटभ नी मधू हे नामेचि दैत्य जधि वेदहि चोरिले नी । झालासि तू हयशिरा वधिले तयांना ब्रह्म्यासि वेद दिधले ऋषि गाति लीला ॥३७॥ 
  च -   आणि -  भवान् -   तू -  हयशिरस्तनुवं -   हयग्रीवाचे रूप -  बिभ्रद् -   धारण करणारा -  रजः -   रजोरूपी -  च -   आणि -  तमः -   तमोरूपी अशा -  वेदद्रुहौ -   वेदांचा द्वेष करणार्या -  अतिबलौ -   अत्यंत बलवान -  मधुकैटभाख्यौ -   मधु व कैटभ या नावाच्या दोन दैत्यांना -  हत्वा -   मारून -  तस्मै -   त्या ब्रह्मदेवाला -  श्रुतिगणान् -   वेदसमूह -  अनयत् -   आणून देता झालास -  तु -   म्हणून -  तव -   तुझ्या -  प्रियतमां -   अत्यंत आवडत्या अशा -  तनुं -   मूर्तीला -  सत्त्वं -   सत्त्वगुणी असे -  आमनंति -   मानितात. ॥ ३७ ॥  
 
मधू आणि कैटभ नावाचे रजोगुणी आणि तमोगुणी दोन मोठे बलाढ्य दैत्य होते. जेव्हा ते वेद चोरून घेऊन गेले, तेव्हा आपण हयग्रीव अवतार धारण केला आणि त्या दोघांना मारून सत्वगुणरूप श्रुती ब्रह्मदेवांना परत आणून दिल्या. तो सत्वगुणच आपले अत्यंत प्रिय शरीर आहे, असे महात्मे म्हणतात. (३७) 
 
इत्थं नृतिर्यग् ऋषिदेवझषावतारैः  लोकान् विभावयसि हंसि जगत्प्रतीपान् । धर्मं महापुरुष पासि युगानुवृत्तं छन्नः कलौ यदभवस्त्रियुगोऽथ स त्वम् ॥ ३८ ॥ 
पक्षी पशू नि ऋषि देव मनुष्ययोनी मत्स्यादि रूप धरूनी वधितोस दुष्टा । घेऊनी रूप युगधर्महि रक्षिसी तू ना तू कलीत दिससी तिन्हि यूगि जैसा ॥३८॥ 
  महापुरुष -   हे महापुरुषा -  इत्थं -   याप्रमाणे -  नृतिर्यगृषिंदेवझषावतारैः -   मनुष्य, पशु, ऋषि, देव व मासा या अवतारांनी -  लोकान् -   लोकांना -  विभावयसि -   रक्षितोस -  जगत्प्रतीपान् -   जगाच्या विरुद्ध वागणार्यांना -  हंसि -   मारितोस -  युगानुवृत्तं -   युगायुगात चालू असलेल्या -  धर्मं -   धर्माला -  पासि -   रक्षितोस -  यत् -   ज्याअर्थी -  कलौ -   कलियुगात -  छन्नः -   गुप्त -  अभवः -   झालास -  अथ -   म्हणून -  सः -   तो -  त्वं -   तू -  त्रियुगः (असि) -   त्रियुग या नावाने प्रसिद्ध आहेस. ॥ ३८ ॥  
 
पुरुषोत्तमा, अशा प्रकारे आपण मनुष्य, पशु-पक्षी, ऋषी, देव आणि मत्स्य इत्यादी रूपांत अवतार घेऊन लोकांचे पालन तसेच विश्वाचा द्रोह करणार्यांचा संहार करीत असता. या अवतारांच्या द्वारे आपण प्रत्येक युगात युगधर्माचे रक्षण करता. कलियुगात आपण गुप्तरूपाने राहाता. म्हणून आपले एक नाव ’त्रियुग’ असेही आहे. (३८) 
 
नैतन्मनस्तव कथासु विकुण्ठनाथ  सम्प्रीयते दुरितदुष्टमसाधु तीव्रम् । कामातुरं हर्षशोकभयैषणार्तं तस्मिन्कथं तव गतिं विमृशामि दीनः ॥ ३९ ॥ 
वैकुंठनाथ मन हे अति दुष्ट माझे हर्षादि लोभ धरिते अन दुःखि होते । लीला कथेत नच ते रस घेइ कांही तेणेचि दीन गमतो मग ध्याउ कैसा ॥३९॥ 
  वैकुंठनाथ -   हे वैकुंठपते -  दुरितदुष्टं -   पापाने दुष्ट झालेले -  असाधु -   नीच -  तीव्रं -   आवरण्यास कठीण -  कामातुरं -   विषयोन्मुख -  हर्षशोकभयैषणार्त -   हर्ष व शोक व भय या त्रिविध विकाराने पीडित असे -  एतत् -   हे -  मनः -   मन -  तव -   तुझ्या -  कथासु -   कथांमध्ये -  न संप्रीयते -   रममाण होत नाही -  तस्मिन् -   त्या स्थितीत -  तव -   तुझे -  गतिं -   स्वरूप -  कथं -   कसा -  विमृशामि -   जाणू. ॥ ३९ ॥  
 
हे वैकुंठनाथा, माझे मन पापवासनांनी कलुषित झाले आहे. ते मुळातच अत्यंत दोषयुक्त आहे. कामनांमुळे ते व्याकूळ असते आणि हर्ष, शोक, भय तसेच नाना चिंतांनी व्याकूळ असते. आपल्या कथांमध्ये त्याला गोडीच वाटत नाही. यामुळे मी दीन होऊन राहिलो आहे. अशा अशांत मनाने मी आपल्या स्वरूपाचे चिंतन तरी कसे करू ? (३९) 
 
जिह्वैकतोऽच्युत विकर्षति मावितृप्ता  शिश्नोऽन्यतस्त्वगुदरं श्रवणं कुतश्चित् । घ्राणोऽन्यतश्चपलदृक् क्व च कर्मशक्तिः बह्व्यः सपत्न्य इव गेहपतिं लुनन्ति ॥ ४० ॥ 
ही ओढिते जिभ रसा नच आवरे की स्त्रीयांकडे जनन ईंद्रिय कान गाणीं । स्पर्शा त्वचा नि मधुभोजनि पोट ओढी सौंदर्य नी परिमळा तयि इंद्रियो ते । स्त्रीया अनेक असता शयनगृहासी ओढिती ना निज जसी फजिती पुरूषा ॥४०॥ 
  अच्युत -   हे अच्युता -  जिह्वा -   जीभ -  अवितृप्ता -   तृप्त न होत्साती -  मा -   मला -  एकतः -   एकीकडे -  विकर्षति -   ओढिते -  शिश्नः -   लिंग -  अन्यतः (विकर्षति) -   दुसरीकडे ओढिते -  त्वक् -   त्वचा -  उदरं -   पोट -  श्रवणं -   कान -  कुतश्चित् (विकर्षति) -   कोठे तरी ओढितात -  घ्राणः -   नाक -  अन्यतः (विकर्षति) -   दुसरीकडे ओढिते -  चपलदृक् -   चंचल नेत्र -  च -   आणि -  कर्मशक्तिः -   कर्मेंद्रिये -  क्व (अपि विकर्षतः) -   कोठे तरी नेतात -  बव्ह्यः -   पुष्कळ -  सपत्न्यः -   सवती -  इव गेहपतिं -   जशा घरधन्याला तशी -  (इंद्रियाणी) मा -   इंद्रिये मला -  लुनंति -   तोडीत आहेत. ॥ ४० ॥  
 
हे अच्युता, ही कधीही तृप्त न होणारी जीभ मला अन्नाकडे, जननेंद्रिय स्त्रीकडे, त्वचा स्पर्शाकडे, पोट भोजनाकडे, कान शब्दकडे, नासिका गंधाकडे आणि हे चंचल डोळे रूपाकडे याप्रमाणे मला आपापल्याकडे खेचत राहातात. याशिवाय कर्मेंद्रियेसुद्धा आपापल्या विषयांकडे घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती खर्च करतात. एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्या त्याला आपापल्याकडे ओढतात, तशी माझी दशा होऊन राहिली आहे. (४०) 
 
एवं स्वकर्मपतितं भववैतरण्याम्  अन्योन्यजन्म मरणाशनभीतभीतम् । पश्यन्जनं स्वपरविग्रहवैरमैत्रं हन्तेति पारचर पीपृहि मूढमद्य ॥ ४१ ॥ 
संसार रूप नदिशी बुडातोय जीव  रहाट कुंभ फिरती तयि ही अवस्था । भीतीत हा करितसे पर-आप भाव तू मूढजीव बघूनी भवपार नेशी ॥४१॥ 
  पारचर -   हे पलीकडल्या तीरावर फिरणार्या ईश्वरा -  एवं -   याप्रमाणे -  भववैतरण्यां -   संसाररूप वैतरणीनदीमध्ये -  स्वकर्मपतितं -   आपल्या कर्मामुळे पडलेल्या -  अन्योन्य -   परस्परांच्या संगतीने भोगाव्या लागणार्या  -  जन्ममरणाशनभीतभीतं -   जन्ममणादि दुःखामुळे अत्यंत भ्यालेल्या -  स्वपरविग्रहवैरमैत्रं -   स्वकीयाविषयी प्रेम व परकीयांविषयी वैर वाटत असलेल्या -  मूढं -   अज्ञानी -  जनं -   मनुष्याला -  पश्यन् (त्वं) -   पहाणारा असा तू -  हंत इति -   अरेरे असे म्हणून  -  अद्य -   सांप्रत -  पीपृह -   उतरुन ने. ॥ ४१ ॥  
 
अशा प्रकारे हा जीव आपल्या कर्मबंधनात अडकून या संसाररूपी वैतरणी नदीमध्ये पडला आहे. जन्मापासून मृत्यू, मृत्यूपासून जन्म आणि या दोहोंद्वारा कर्मभोग भोगीत भोगीत हा भयभीत झाला आहे. हा आपला आहे, हा परका आहे, असा भेदभाव बाळगून तो कोणाशी मैत्री करतो, तर कोणाशी शत्रुत्व ! या मूढ जीवाची ही दुर्दशा पाहून आपल्याला त्याची दया येऊ दे. भवनदीच्या पैलतीराला असलेल्या भगवंता, या प्राण्यांनाही आता पार करा. (४१) 
 
को न्वत्र तेऽखिलगुरो भगवन्प्रयास  उत्तारणेऽस्य भवसम्भवलोपहेतोः । मूढेषु वै महदनुग्रह आर्तबन्धो किं तेन ते प्रियजनाननुसेवतां नः ॥ ४२ ॥ 
सत्ता तुझीच सगळी तूज काय ओझे वेड्या-मुड्याहि मिळतो गुरूचा प्रसाद । आम्ही सदैव वसतो तवभक्त पायी चिंता मुळी मज नसे भवपार व्हाया ॥४२॥ 
  अखिलगुरो -   सर्वांचा गुरु अशा -  भगवन् -   हे भगवंता -  अस्य -   ह्या जगाची -  भवसंभवलोपहेतोः -   उत्पत्ती, स्थिती व लय करण्याला कारणभूत अशा -  ते -   तुला -  नु -   खरोखर -  अत्र -   ह्या ठिकाणी -  उत्तारणे -   उतरुन नेण्यास -  कः -   काय -  प्रयासः (अस्ति) -   श्रम आहे -  मूढेषु -   अज्ञानी लोकांवर -  वैः -   निश्चयेकरून -  महदनुग्रहः (स्यात्) -   मोठी कृपा होईल -  आर्तबंधो -   पीडितांना सहाय्य करणार्या परमेश्वरा -  ते -   तुझ्या -  प्रियजनान् -   आवडत्या भक्तांची -  अनुसेवतां -   सेवा करणार्या -  नः -   आमच्या  -  तेन -   त्या कारणाने -  किं (स्यात्) -   काय होणार आहे. ॥ ४२ ॥  
 
हे जगद्गुरो, आपण या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असताना या जीवांना या भव-नदीतून पार करणे आपल्याला काय कठीण आहे ? हे दीननाथा, अज्ञानी जीवांनाच महापुरुषांच्या अनुग्रहाची आवश्यकता आहे. आपल्या भक्तांच्या आम्हां निरंतर सेवकांना त्याची काय जरूरी आहे ? (४२) 
 
नैवोद्विजे पर दुरत्ययवैतरण्याः   त्वद्वीर्यगायनमहामृतमग्नचित्तः । शोचे ततो विमुखचेतस इन्द्रियार्थ मायासुखाय भरमुद्वहतो विमूढान् ॥ ४३ ॥ 
अन्यास हा नद बहू तरण्या कठीण लीलाकथा सरिति या अम्हि पोहतो की । नाही म्हणूनि मजला मुळि कांहि चिंता विन्मूख त्यांचि करितो मनि नित्य चिंता ॥४३॥ 
  त्वद्वीर्यगायन -   तुझ्या पराक्रमाचे गायन  -  महामृतमग्नचित्तः (अहं) -   हेच जे मोठे अमृत त्यात ज्याचे चित्त मग्न झाले आहे असा मी -  परदुरत्ययवैतरण्याः -   तरुन जाण्यास अत्यंत कठीण अशा वेतरणीला -  न एव उद्विजे -   खरोखर भीत नाही -  ततः -   त्या अमृतापसून -  विमुखचेतसः -   ज्याचे चित्त पराङमुख आहे अशा -  इंद्रियार्थमायासुखाय -   इंद्रियांच्या तृप्तीकरिता मिथ्या सुखाच्या प्राप्तीसाठी -  भरं -   कुटुंबाचा भार -  उद्वहतः -   वहाणार्या -  विमूढान् -   अत्यंत मूर्ख लोकांविषयी -  शोचे -   मी शोक करितो. ॥ ४३ ॥  
 
हे परमात्मन, आपल्या परमामृतस्वरूप लीला-गायनात चित्त मग्न असलेल्या मला पार करण्यास कठीण अशा भववैतरणीचे थोडेसुद्धा भय वाटत नाही. परंतु आपल्यापासून विन्मुख असणार्या आणि इंद्रियांच्या विषयांचे मायामय खोटे सुख मिळविण्यासाठी संसाराचे ओझे वाहाणार्या अज्ञानी जीवांचे मला वाईट वाटत आहे. (४३) 
 
प्रायेण देव मुनयः स्वविमुक्तिकामा  मौनं चरन्ति विजने न परार्थनिष्ठाः । नैतान्विहाय कृपणान्विमुमुक्ष एको नान्यं त्वदस्य शरणं भ्रमतोऽनुपश्ये ॥ ४४ ॥ 
मौनी व्रतासि धरूनी बसती गुहेत चिंता नसे मनि तया दुसर्या जिवांची । मी एकटा न कधि मुक्त होण्या बघे की मूढास त्या नच कुठे तुजवीण थारा ॥४४॥ 
  देव -   हे देवा -  स्वविमुक्तिकामाः -   स्वतःच्या मुक्तीची इच्छा करणारे -  परार्थनिष्ठाः -   दुसर्याचे कार्य साधण्याविषयी तत्पर असे -  मुनयः -   ऋषि -  प्रायेण -   बहुतकरून -  विजनेन -   एकांती -  मौनं -   मौन -  चरंति -   आचरितात -  एतान् कृपणान् -   ह्या दीन लोकांना -  विहाय -   सोडून  -  एकः (अहं) -   एकटा मी -  न विमुमुक्षे -   मुक्तीची इच्छा करीत नाही -  भ्रमतः -   भ्रमण करणार्या  -  अस्य -   ह्या लोकांना -  त्वत् अन्यं -   तुझाहून दुसरे -  शरणं -   आश्रयस्थान  -  न अनुपश्ये -   मी पहात नाही ॥ ४४ ॥  
 
हे देवा, मुनी तर साधारणपणे आपल्या मुक्तीसाठी निर्जन वनात जाऊन मौनव्रत धारण करतात. ते दुसर्यांच्या भल्यासाठी काही प्रयत्न करीत नाहीत. परंतु मी या असहाय जीवांना सोडून एकटा मुक्त होऊ इच्छित नाही आणि या दिशाहीन भटकणार्या प्राण्यांना आपल्याखेरीज दुसर्या कोणाचा आश्रय दिसत नाही. (४४) 
 
यन्मैथुनादिगृहमेधिसुखं हि तुच्छं  कण्डूयनेन करयोरिव दुःखदुःखम् । तृप्यन्ति नेह कृपणा बहुदुःखभाजः कण्डूतिवन्मनसिजं विषहेत धीरः ॥ ४५ ॥ 
ती खाजता खरूज जै मग दुःख लाभे । मैथून आदि सुखिंही मग दुःख लाभे । भोगोनि दुःख कुणि तो तरि खाजवीतो तैसेचि मूढ विषया नच त्यागिती ते ॥४५॥ 
  यत् -   जे -  मैथुनादि -   मैथुनादिक -  गृहमेधिसुखं -   गृहस्थाश्रम्यांचे सुख ते -  करयोः -   हाताच्या  -  कंडूयनेन इव -   खाजविण्यासारखे -  दुःखदुःखं -   अत्यंत दुःखदायक -  तुच्छं (अस्ति) -   तिरस्करणीय होय -  हि -   म्हणून -  बहुदुःखभाजः -   अत्यंत दुःख सेवन करणारे -  कृपणाः -   दीन लोक -  इह -   ह्या लोकी -  न तृप्यंति -   तृप्त होत नाहीत -  धीरः -   धीर जन -  मनसिजं -   कामवासनेला -  कंडूतिवत् -   खरजेप्रमाणे -  विषहेत -   सहन करितो. ॥ ४५ ॥  
 
गृहस्थाश्रमी लोकांना मैथुन इत्यादींचे जे सुख मिळते ते अत्यंत तुच्छ आहे. जसे हाताला सुटलेली खाज नाहीशी करण्यासाठी खाजविताना सुरुवातीला थोडेसे सुख झाल्यासारखे वाटते, परंतु नंतर दु:खच दु:ख होते. परंतु हे बिचारे अज्ञानी पुष्कळसे दु:ख भोगूनही या विषयभोगांनी तृप्त होत नाहीत. याउलट धैर्यवान माणूस जशी सुटलेली खाज सहन करतो, तसाच तो कामाचा वेगही सहन करतो. (४५) 
 
मौनव्रतश्रुततपोऽध्ययनस्वधर्म  व्याख्यारहोजपसमाधय आपवर्ग्याः । प्रायः परं पुरुष ते त्वजितेन्द्रियाणां वार्ता भवन्त्युत न वात्र तु दाम्भिकानाम् ॥ ४६ ॥ 
स्वाध्याय मौन तप ध्यान समाधि व्याख्या  एकांत धर्म श्रवणो जप ब्रह्मचर्य । मोक्षार्थ साधन दहा पुरूषोत्तमारे दांभीक पोट भरण्या वरपांग दावी ॥४६॥ 
  पुरुष -   हे परमेश्वरा -  मौनव्रत -   मौन, व्रत,  -  श्रुततपोऽध्ययन -   विद्या, तप, अध्ययन,  -  स्वधर्मव्याख्यारहोजपसमाधयः -   स्वधर्माचरण, व्याख्यान, एकांतवास, जप व समाधि ही दहा -  आपवर्ग्याः (सन्ति) -   मोक्षसाधने होत -  ते तु -   ती तर -  प्रायः -   बहुतकरुन -  अजितेंद्रियाणां -   इंद्रिये न जिंकलेल्या मनुष्यांची -  परं -   श्रेष्ठ -  वार्ताः -   निर्वाहसाधने -  भवंति -   होतात -  अत्र -   ही -  उत दांभिकानां तु -   पण दांभिक लोकांना तर -  न वा (भवन्ति) -   निर्वाहाची साधने होतिल किंवा न होतील. ॥ ४६ ॥  
 
पुरुषोत्तमा ! मौन, ब्रह्मचर्य, शास्त्रश्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्मपालन, शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या, एकांतसेवन, जप आणि समाधी ही मोक्षाची दहा साधने प्रसिद्ध आहेत. परंतु ज्याला आपली इंद्रिये वश नाहीत, त्याच्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधने ठरतात. आणि दांभिक लोकांच्याबाबतीत तर त्यांचे ढोंग लोकांच्या लक्षात आल्यावर या गोष्टी उपजीविकेचे साधन म्हणूनही राहात नाहीत. (४६) 
 
रूपे इमे सदसती तव वेदसृष्टे  बीजाङ्कुराविव न चान्यदरूपकस्य । युक्ताः समक्षमुभयत्र विचक्षन्ते त्वां योगेन वह्निमिव दारुषु नान्यतः स्यात् ॥ ४७ ॥ 
ते कार्य कारण बिजापरि रूप वेद सांगे परी तुज नसे रूप रंग कांही । ती साधनेचि असती तुज जाणण्याची काष्ठाग्नि तुल्य तव तत्व असेच गुप्त ॥४७॥ 
  बीजांकुरौ इव -   बीजांकुरांप्रमाणे -  अरूपकस्य -   निराकार अशा -  तव -   तुझी -  सदसते -   कार्य व कारण अशी -  इमे -   ही -  रूपे -   दोन रूपे -  वेदसृष्टे (स्तः) -   वेदाने प्रकाशित केली आहेत -  अन्यत् -   दुसरे -  न -   काही नाही -  युक्ताः -   योगी लोक -  योगेन -   भक्तियोगाने -  त्वां -   तुला -  समक्षं -   प्रत्यक्ष -  उभयत्र -   दोन्ही ठिकाणी -  दारुषु -   काष्ठांत -  वह्निम् इव -   जसे अग्नीला तसे -  विचिन्वते -   शोधितात -  अन्यतः -   अन्यरीतीने -  (तव ज्ञानं) न स्यात् -   तुझे ज्ञान प्राप्त होत नाही. ॥ ४७ ॥  
 
बीज आणि अंकुर यांप्रमाणे वेदांनी कार्य आणि कारण ही आपली दोन रूपे सांगितली आहेत. वास्तविक आपण प्राकृत रूपरहित आहात. परंतु या कार्य आणि कारणरूपांना सोडून आपले ज्ञान होण्याचे अन्य कोणतेही साधन नाही. लाकडावर लाकूड घासून जसा अग्नि प्रगट केला जातो, त्याप्रमाणे योगीजन भक्तियोगाने आपल्याला कार्य आणि कारण ह्या दोन्हींमध्ये शोधतात, कारण ही दोन्ही आपल्या स्वरूपाहून वेगळी नाहीत. (४७) 
 
त्वं वायुरग्निरवनिर्वियदम्बु मात्राः   प्राणेन्द्रियाणि हृदयं चिदनुग्रहश्च । सर्वं त्वमेव सगुणो विगुणश्च भूमन् नान्यत् त्वदस्त्यपि मनोवचसा निरुक्तम् ॥ ४८ ॥ 
तन्मात्र पंच नभ नीर वसुंधरादी प्राणेंद्रियादि सगळे तव रूप सत्य । निर्गूण नी सगूण रूप तुझेचि देवा माझीहि वाणि तव रूप नसेचि भिन्न ॥४८॥ 
  भूमन् -   हे व्यापका -  त्वं -   तू -  वायुः -   वायु -  अग्निः -   अग्नि -  अवनिः -   पृथ्वी -  वियत् -   आकाश -  अंबु -   उदक -  मात्राः -   पंचमहाभूते -  प्राणेंद्रियाणि -   प्राण व इंद्रिये -  हृदयं -   मन -  चित् -   चित्त -  च -   आणि -  अनुग्रहः (असि) -   व अहंकार आहेस -  च -   आणि -  मनोवचसा -   मन व वाणी यांनी -  निरुक्तं -   प्रकाशित केलेला -  सगुणः -   सगुण -  विगुणः -   निर्गुण पदार्थ -  अपि -   सुद्धा -  सर्वं -   सर्व -  त्वं एव (असि) -   तूच आहेस -  त्वत् अन्यत् -   तुझ्याहून दुसरे -  न (किंचित्) अस्ति -   काही नाही. ॥ ४८ ॥  
 
हे अनंता ! वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, पाणी, पाच तन्मात्रा, प्राण, इंद्रिये, मन, चित्त, अहंकार, संपूर्ण विश्व तसेच सगुण व निर्गुण हे सर्व केवळ आपणच आहात. एवढेच काय, पण मन आणि वाणीने ज्यांचे वर्णन करता येते, ते सर्व आपल्याहून वेगळे नाही. (४८) 
 
नैते गुणा न गुणिनो महदादयो ये  सर्वे मनः प्रभृतयः सहदेवमर्त्याः । आद्यन्तवन्त उरुगाय विदन्ति हि त्वाम् एवं विमृश्य सुधियो विरमन्ति शब्दात् ॥ ४९ ॥ 
तू कीर्तिमंत हरि रे कळशी न कोणा  त्या देवता नि मनही तव रूप नेणे । ते नाशवंत सगळे अविनाशि तू तो ज्ञानी विचार करिती अन जाणितात ॥४९॥ 
  उरुगाय -   हे देवा -  आद्यंतवन्तः -   आदि व अंत ज्यांना आहेत असे -  एते -   हे -  गुणाः -   गुणाभिमानी देव -  त्वां -   तुला -  ये -   जे -  महदादयः -   महत्तत्वादिक -  मनःप्रभृतयः -   मनआदिकरून -  सहदेवमर्त्याः -   देव व मनुष्य यांसह -  गुणिनः -   जन्ममरणरूप ज्यांना आहेत असे -  सर्वे -   सर्व -  ते न विदन्ति -   ते जाणत नाहीत -  हि -   म्हणून -  एवं -   असा -  विमृश्य -   विचार करून -  सुधियः -   विद्वान लोक -  शब्दात् -   अध्ययनादि व्यापारापासून -  विरमंति -   विराम पावतात. ॥ ४९ ॥  
 
हे भगवन ! हे सत्त्वादी गुण, त्यांपासून उत्पन्न झालेली महत् आदी तत्त्वे, देव, मनुष्य, मन इत्यादी कोणीही आपले स्वरूप जाणण्यास समर्थ नाहीत. कारण या सर्वांना सुरुवात व शेवट आहे. असा विचार करून ज्ञानी जन शब्दांनी आपले स्वरूप सांगत नाहीत. (४९) 
 
तत्तेऽर्हत्तम नमः स्तुतिकर्मपूजाः  कर्म स्मृतिश्चरणयोः श्रवणं कथायाम् । संसेवया त्वयि विनेति षडङ्गया किं भक्तिं जनः परमहंसगतौ लभेत ॥ ५० ॥ 
सेवा स्तुती नि नमने तुज अर्पिणे नी पूजा नि पाय स्मरणे अन कीर्ति ऐको । साही अशी न करिता तव प्राप्ति कैशी तू भक्त जे परमहंस तयासि प्राण ॥५०॥ 
  तत् -   यास्तव -  अर्हत्तम -   हे अत्यंत पूजनीय ईश्वरा -  ते -   तुझ्या -  नमःस्तुतिकर्मपूजाः -   नमस्कार, स्तवन सर्व कर्माचे अर्पण -  कर्म -   सेवा -  चरणयोः स्मृति -   चरणांचे स्मरण -  कथायां -   कथेचे -  श्रवणं -   श्रवण -  इति -   अशा -  षडङ्गया -   सहाप्रकारच्या -  संसेवया विना -   सेवेशिवाय -  जनः -   लोक -  परमहंसगतौ -   परमहंसाचे आश्रयस्थान अशा -  त्वयि -   तुझ्याविषयीच्या -  भक्तिं -   भक्तीला -  किं लभेत -   कसा प्राप्त होईल. ॥ ५० ॥  
 
म्हणून हे परम पूज्य ! नमस्कार, स्तुती, सर्वकर्मसमर्पण, सेवा, चरणकमलांचे चिंतन आणि लीलाकथांचे श्रवण ही आपल्या सेवेची सहा अंगे आहेत. या सेवेशिवाय परमहंसांचे सर्वस्व असणार्या आपली भक्ती कशी प्राप्त होईल ? (५०) 
 
नारद उवाच -  (अनुष्टुप्) एतावद् वर्णितगुणो भक्त्या भक्तेन निर्गुणः । प्रह्रादं प्रणतं प्रीतो यतमन्युरभाषत ॥ ५१ ॥ 
नारदजी सांगतात -  (अनुष्टुप्) प्रल्हादे हे असे रूप परा प्रकृत वेगळे । वर्णिले वंदिले देवा तेंव्हा नृसिंह तो हरी । जाहला शांत आणि तो प्रसन्ने बोलला पहा ॥५१॥ 
  भक्तेन -   भक्ताने -  भक्त्या -   भक्तीने -  एतावद्वर्णितगुणः -   याप्रमाणे वर्णिले आहेत गुण ज्याचे असा -  प्रीतः -   प्रसन्न झालेला -  यतमन्युः -   आवरला क्रोध आहे ज्याने असा -  प्रणतं -   नम्र झालेल्या -  प्रल्हादं -   प्रल्हादाला -  अभाषत -   बोलला. ॥ ५१ ॥  
 
नारद म्हणाले – निर्गुण भगवंतांच्या गुणांचे, भक्त प्रल्हादाने भक्तिभावाने अशा प्रकारे वर्णन करून प्रणाम केला. तेव्हा संतुष्ट झालेले भगवान क्रोध आवरून त्याला म्हणाले. (५१) 
 
श्रीभगवानुवाच -  प्रह्राद भद्र भद्रं ते प्रीतोऽहं तेऽसुरोत्तम । वरं वृणीष्वाभिमतं कामपूरोऽस्म्यहं नृणाम् ॥ ५२ ॥ 
श्रीनृसिंह भगवान् म्हणाले - कल्याणरूप प्रल्हादा तुझे कल्याण हो सदा । दैत्येंद्रा तुजशी धालो माग इच्छा असेल ती । जीवांच्या सगळ्या इच्छा पूर्ण मी करितो पहा ॥५२॥ 
  भद्र -   हे कल्याणरूप -  प्रल्हाद -   प्रल्हादा -  ते -   तुझे -  भद्रं (अस्तु) -   कल्याण असो -  असुरोत्तम -   हे असुरश्रेष्ठा -  ते -   तुझ्यावर -  अहं -   मी -  प्रीतः (अस्मि) -   प्रसन्न झालो आहे -  अयं -   हा मी -  नृणां -   मनुष्यांच्या -  कामपूरः -   इच्छा पूर्ण करणारा -  अस्मि -   आहे -  अभिमतं -   इच्छित असा -  वरं -   वर -  वृणीष्व -   तू माग. ॥ ५२ ॥  
 
श्री भगवान म्हणाले – हे बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. हे दैत्यश्रेष्ठा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी जी इच्छा असेल, ती माग. मी मनुष्यांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. (५२) 
 
मामप्रीणत आयुष्मन् दर्शनं दुर्लभं हि मे । दृष्ट्वा मां न पुनर्जन्तुः आत्मानं तप्तुमर्हति ॥ ५३ ॥ 
आयुष्मंता न जो भक्त तया मी न दिसे कधी । ज्या जीवा भेटतो त्याची आग सर्वस्वी नष्टितो ॥५३॥ 
  आयुष्मन् -   हे दीर्घायुषी प्रल्हादा -  मां -   मला -  दर्शनं -   दर्शन -  दुर्लभं (अस्ति) -   दुर्लभ होय -  हि -   म्हणून -  जंतुः -   प्राणी -  मां -   मला -  दृषट्वा -   बघितल्यावर -  पुनः -   पुनः -  आत्मानं -   स्वतःला -  तप्तुं -   दुःख देण्यास -  न अर्हति -   योग्य होत नाही. ॥ ५३ ॥  
 
हे चिरंजीवा, जो मला प्रसन्न करून घेत नाही, त्याला माझे दर्शन होणे अत्यंत कठीण आहे. परंतु माझे दर्शन झाल्यावर माणसाला दु:ख करण्याचे कारण नाही. (५३) 
 
प्रीणन्ति ह्यथ मां धीराः सर्वभावेन साधवः । श्रेयस्कामा महाभाग सर्वासां आशिषां पतिम् ॥ ५४ ॥ 
मनोरथे करी पूर्ण कल्याणी साधु ते मज । इंद्रिया जिंकुनी यत्ने माझ्या तोषार्थ कष्टती ॥५४॥ 
  अथ -   म्हणून -  हि -   याकरितां -  धीराः -   धैर्यवान -  महाभागाः -   महाभाग्यशाली -  श्रेयस्कामाः -   कल्याणाची इच्छा करणारे -  साधवः -   साधु लोक -  सर्वभावेन -   एकनिष्ठ भक्तीने -  सर्वेषां आशिषां -   सर्व उपभोगांचा -  पतिः -   स्वामी अशा -  मां -   मला -  प्रीणंति -   संतुष्ट करितात. ॥ ५४ ॥  
 
मी सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. म्हणून कल्याणाची इच्छा करणारे परम भाग्यवान साधुजन सर्वतोपरी मला प्रसन्न करण्याचाच प्रयत्न करतात. (५४) 
 
श्रीनारद उवाच -  एवं प्रलोभ्यमानोऽपि वरैर्लोकप्रलोभनैः । एकान्तित्वाद् भगवति नैच्छत्तानसुरोत्तमः ॥ ५५ ॥ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंधे प्रह्रादचरिते भगवत्सवो नवमोऽध्यायः ॥ ९ ॥ 
कुलभूषण प्रल्हाद अनन्य भक्त तो असा । प्रलोभने वरा त्याने इच्छिले नच त्या मनीं ॥५५॥ । इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ ७ ॥ ९ ॥ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 
  असुरोत्तमः -   लोकांना भुलविणार्या अशा -  वरैः -   वरांनी  -  प्रलोभ्यमानः अपि -   भुलविला गेला असताहि -  भगवति -   परमेश्वराच्या ठिकाणी -  एकान्तित्वात् -   निस्सीम भक्ति असल्यामुळे -  तान् -   त्या वरांना -  न ऐच्छत् -   इच्छिता झाला नाही. ॥ ५५ ॥  
 
नारद म्हणाले – असुरकुळाचे भूषण असणारा प्रल्हाद भगवंतांचा अनन्य भक्त होता. म्हणून लोकांना मोह पाडणार्या वरांचे प्रलोभन दाखवूनही त्याने त्यांची इच्छा केली नाही. (५५) 
 स्कंध सातवा - अध्याय नववा समाप्त |