![]() |
श्रीमद् भागवत पुराण
भक्तियोगरहस्यं कालप्रभाववर्णनं च - भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
देवहूतिरुवाच -
लक्षणं महदादीनां प्रकृतेः पुरुषस्य च । स्वरूपं लक्ष्यतेऽमीषां येन तत्पारमार्थिकम् ॥ १ ॥ यथा साङ्ख्येषु कथितं यन्मूलं तत्प्रचक्षते । भक्तियोगस्य मे मार्गं ब्रूहि विस्तरशः प्रभो ॥ २ ॥
देवहूति म्हणाली - ( अनुष्टुप् ) लक्षणे महदादिंची प्रकृती पुरुषाचिही । वेगळे रुप ते त्यांचे सांख्ययोगे प्रबोधिली ॥ १ ॥ भक्तियोगाचिसाठी ते प्रयोजन कथीयले । आता संपूर्ण सांगावा भक्तियोग मला प्रभो ॥ २ ॥
प्रभो - हे कपिल मुने - अमीषाम् - ह्या प्रकृत्यादि तत्त्वांचे - पारमार्थिकम् - खरे - स्वरूपम् - स्वरूप - येन - ज्या लक्षणाने - लक्ष्यते - समजते - तत् - ते - महदादीनाम् - महत्तत्त्वादिकांचे - प्रकृतेः - प्रकृतीचे - च - आणि - पुरुषस्य - पुरुषाचे - लक्षणम् - लक्षण - यथा - जसे - सांख्येषु - सांख्यशास्त्रात - अस्ति - आहे - तथा - तसे - कथितम् - सांगितले - तत् - ते लक्षण - यन्मूलम् - जो भक्तियोग आहे मूल ज्याचे असे - प्रचक्षते - म्हणतात - तस्य - त्या - भक्तियोगस्य - भक्तियोगाच्या - मार्गम् - मार्गाला - मे - मला - विस्तरशः - विस्ताराने - ब्रूहि - सांग ॥१-२॥
देवहूतीने विचारले- प्रभो ! प्रकृती, पुरुष आणि महत्तत्त्वादींचे जे लक्षण सांख्यशास्त्रात सांगितले आहे, तसेच ज्या शास्त्राने त्यांचे वास्तविक स्वरूप वेगवेगळे जाणले जाते आणि भक्तियोग हेच ज्याचे प्रयोजन सांगितले जाते ते शास्त्र आपण मला कथन केले. आता भक्तियोगाचा मार्ग मला विस्तारपूर्वक सांगावा. (१-२)
विरागो येन पुरुषो भगवन् सर्वतो भवेत् ।
आचक्ष्व जीवलोकस्य विविधा मम संसृतीः ॥ ३ ॥
शिवाय जन्म मृत्युच्या गती सर्वचि सांगणे ज्याचे ऐकोनि जीवांना वैराग्य लाभते खरे ॥ ३ ॥
भगवान् - हे कपिल मुने - येन - ज्या जन्मकथनाने - पुरुषः - पुरुष - सर्वतः - सर्व ठिकाणी - विरागः - आसक्तिरहित असा - भवेत् - होईल - ताः - त्या - जीवलोकस्य - जीवसमुदायाच्या - विविधाः - नानाप्रकारच्या - संसृतीः - जन्मांना - मम - मला - आचक्ष्व - सांग ॥३॥
हे भगवन, याशिवाय जीवाच्या जन्म-मरणरूप अनेक प्रकारच्या गतींचे सुद्धा वर्णन करावे. जे ऐकल्यामुळे जीवाला सर्व प्रकारच्या वस्तूंविषयी वैराग्य निर्माण होते. (३)
कालस्येश्वररूपस्य परेषां च परस्य ते ।
स्वरूपं बत कुर्वन्ति यद्धेतोः कुशलं जनाः ॥ ४ ॥
ज्या भये लोक सत्कर्मा प्रवृत्त होत ते पुन्हा । ब्रह्मादिकाहि शास्ता जो तो कालरुप सांगणे ॥ ४ ॥
जनाः - लोक - यद्धेतोः - ज्याच्यामुळे - कुशलम् - पुण्य - कुर्वन्ति - करितात - तस्य - त्या - परेषाम् - श्रेष्ठ अशा ब्रह्मदेवादिकांचा - परस्य - नियन्ता अशा - च - आणि - ईश्वररूपस्य - मोठा आहे प्रभाव ज्याचा अशा - ते - तुझ्या - कालस्य - कालाचे - बत - खरे - स्वरूपम् - स्वरूप - आचक्ष्व - सांग ॥४॥
तसेच ज्याच्या भयामुळे लोक शुभकर्मांना प्रवृत्त होतात आणि जो ब्रह्मादिकांहूनही श्रेष्ठ आहे, त्या सर्वसमर्थ अशा काळाचे स्वरूपही आपण मला सांगावे. (४)
लोकस्य मिथ्याभिमतेरचक्षुषः
चिरं प्रसुप्तस्य तमस्यनाश्रये । श्रान्तस्य कर्मस्वनुविद्धया धिया त्वमाविरासीः किल योगभास्करः ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा ) होती बहूकष्टिच सर्व जीव मिथ्याचि माझे म्हणतात सर्व । जागे तयांना करण्या उदेला योगप्रकाशी तुम्हि सूर्य त्यांना ॥ ५ ॥
अचक्षुषः - अज्ञानी अशा - मिथ्याभिमतेः - मिथ्याभूत देहादिकांच्या ठिकाणी आहे अभिमान ज्याला अशा - कर्मसु - कर्मामध्ये - अनुविद्धया - आसक्त असलेल्या अशा - धिया - बुद्धीच्या योगाने - श्रान्तस्य - थकलेल्या अशा - अनाश्रये - अपार - तमसि - संसारामध्ये - चिरम् - पुष्कळ कालपर्यंत - प्रसुप्तस्य - झोपी गेलेल्या अशा - लोकस्य - लोकाचा - योगभास्करः - योगाला सूर्याप्रमाणे प्रकाशित करणारा असा - त्वम् - तू - किल - निश्चयाने - आविः आसीः - प्रगट झालास ॥५॥
ज्ञानदृष्टी लुप्त झाल्यामुळे देहादी मिथ्या वस्तूंमध्ये ज्यांना आत्माभिमान झाला आहे, तसेच बुद्धी कर्मासक्त राहिल्याकारणाने अत्यंत श्रम घेऊनही जे पुष्कळ काळापासून अपार अंधकारमय अशा संसारात निद्रिस्त झाले आहेत, त्यांना जागविण्यासाठी आपण(जणू) योगप्रकाशक सूर्यच झाला आहात. (५)
मैत्रेय उवाच -
(अनुष्टुप्) इति मातुर्वचः श्लक्ष्णं प्रतिनन्द्य महामुनिः । आबभाषे कुरुश्रेष्ठ प्रीतस्तां करुणार्दितः ॥ ६ ॥
मैत्रेयजी सांगतात - ( अनुष्टुप् ) कुरुश्रेष्ठा अशी माता वदता ते महामुनी । प्रशंसिता द्रवीभूत प्रसन्नचित्त बोलले ॥ ६ ॥
करुश्रेष्ठ - हे कुरुकुलश्रेष्ठा विदुरा - इति - याप्रमाणे - मातुः - मातेच्या - श्लक्ष्णम् - मधुर - वचः - भाषणाचा - प्रतिनन्द्य - गौरव करून - प्रीतः - संतुष्ट झालेला असा - करुणयार्दितः - दयेने पीडित झालेला असा - महामुनिः - कपिलमहामुनि - ताम् - त्या देवहूतीला - आबभाषे - म्हणाला ॥६॥
मैत्रेय म्हणतात- कुरुश्रेष्ठ विदुरा, मातेचे हे मनोहर वचन ऐकून महामुनी कपिलांनी तिची स्तुति केली आणि दयेने कळवळा येऊन अत्यंत प्रसन्नतेने ते तिला म्हणाले. (६)
श्रीभगवानुवाच -
भक्तियोगो बहुविधो मार्गैर्भामिनि भाव्यते । स्वभावगुणमार्गेण पुंसां भावो विभिद्यते ॥ ७ ॥
श्री भगवान म्हणाले - भक्ताचा भाव तो जैसा तैसाची भक्तियोग तो । स्वभावे भिन्न तो भाव तैसा योगहि संभवे ॥ ७ ॥
भामिनी - हे देवहूति - भक्तियोगः - भक्तियोग - मार्गैः - विविध मार्गांनी - बहुविधः - अनेक प्रकारचा - भाव्यते - समजतो - पुसाम् - पुरुषांचा - भावः - अभिप्राय - स्वभावगुणभेदेन - स्वभावभूत गुणांच्या भिन्न भिन्न वृत्तींनी - भिद्यते - भेद पावतो ॥७॥
श्रीभगवान म्हणाले- हे माते, साधकांच्या भावानुसार भक्तियोग अनेक प्रकारे प्रगट झाला आहे. कारण स्वभाव आणि गुणांच्या भेदामुळे मनुष्याच्या भावनांमध्ये भिन्नता असते. (७)
अभिसन्धाय यो हिंसां दम्भं मात्सर्यमेव वा ।
संरम्भी भिन्नदृग्भावं मयि कुर्यात्स तामसः ॥ ८ ॥
भेददर्शी नि क्रोधी जो हृदयी देभ मत्सर । हिंसेचा भाव ठेवोनी भजे तामस भक्त तो ॥ ८ ॥
संरम्भी - क्रोधी असा - भिन्नदृक् - भेदयुक्त आहे दृष्टि ज्याची असा - यः - जो पुरुष - हिंसाम् - हिंसा - दम्भम् - दम्भ - वा - किंवा - मात्सर्यम् - मत्सर - अभिसंधाय - मनात ठेवून - मयि - माझ्या ठिकाणी - भावम् - भक्ति - कुर्यात् - करील - सः - तो - तामसः - तामसी भक्त - अस्ति - होय ॥८॥
प्राणी व ईश्वर यांच्यात भेद पाहणारा जो क्रोधी पुरुष हृदयात हिंसा, दंभ किंवा मत्सर असा भाव ठेवून माझ्यावर प्रेम करतो, तो माझा तामस भक्त होय. (८)
विषयान् अभिसन्धाय यश ऐश्वर्यमेव वा ।
अर्चादौ अर्चयेद्यो मां पृथग्भावः स राजसः ॥ ९ ॥
ऐश्वर्य विषयो येश कामना धरि जो मनी । प्रतिमाभेद मानोनी भजे राजस भक्त तो ॥ ९ ॥
पृथग्भावः - भिन्न आहे बुद्धि ज्याची असा - यः - जो पुरुष - विषयान् - विषयसुखाची - यशः - कीर्तीची - वा - किंवा - ऐश्वर्यम् एव - ऐश्वर्याचीच - अभिसंधाय - इच्छा ठेवून - अर्चादौ - मूर्ति इत्यादिकांच्या ठिकाणी - माम् - मला - अर्चयेत् - पूजील - सः - तो - राजसः - राजसभक्त - अस्ति - होय ॥९॥
जो पुरुष विषय, यश आणि ऐश्वर्य (मिळविण्याच्या) कामनेने प्रतिमा इत्यादींमध्ये भेदभाव बाळगून माझे पूजन करतो, तो राजस भक्त होय. (९)
कर्मनिर्हारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणम् ।
यजेद् यष्टव्यमिति वा पृथग्भावः स सात्त्विकः ॥ १० ॥
पापांचा क्षय इच्छोनी अर्पिता पूजितो मला । अशा भेदे पुजी जो तो सात्वीक भक्त जाणणे ॥ १० ॥
पृथग्भावः - भिन्न आहे बुद्धि ज्याची असा - यः - जो पुरुष - कर्मनिर्हारम् - पापक्षयाची - वा - किंवा - परस्मिन् - परमेशवराच्या ठिकाणी - तदर्पणम् - कर्माच्या अर्पणाची - वा - अथवा - यष्टव्यम् इति - आराधना करणे कर्तव्य आहे असा - उद्दिश्य - उद्देश ठेवून - यजेत - आराधना करील - सः - तो - सात्त्विकः - सात्त्विक भक्त - अस्ति - होय ॥१०॥
जो मनुष्य पापांचा क्षय करण्यासाठी किंवा परमात्म्याला अर्पण करण्यासाठी पूजन करणे आपले कर्तव्य समजून भेदबुद्धीने माझे पूजन करतो, तो सात्त्विक भक्त होय. (१०)
मद्गुणश्रुतिमात्रेण मयि सर्वगुहाशये ।
मनोगतिः अविच्छिन्ना यथा गङ्गाम्भसोऽम्बुधौ ॥ ११ ॥ लक्षणं भक्तियोगस्य निर्गुणस्य ह्युदाहृतम् । अहैतुक्यव्यवहिता या भक्तिः पुरुषोत्तमे ॥ १२ ॥
अखंड वाहते गंगा जशी ती सागराकडे । तेल धारे प्रमाणे जो अखंड मन लाविता ॥ ११ ॥ सर्वांच्या अंतरी व्हावे निष्काम ठेउनी मन । अनन्य प्रेमभक्ती ती निर्गुणभक्ति जाणणे ॥ १२ ॥
यथा - ज्याप्रमाणे - गंगाम्भसः - गंगेच्या पाण्याची - गतिः - गमन - अम्बुधौ - समुद्रामध्ये - तथा - त्याप्रमाणे - सर्वगुहाशये - सर्वांच्या हृदयात वास करणार्या अशा - मयि - माझ्या ठिकाणी - मग्दुणश्रुतिमात्रेण - माझ्या गुणांच्याच केवळ श्रवणाने - अविच्छिन्ना - एकसारखी - मनोगतिः - मनाची गति - इति - अशी - या - जी - पुरुषोत्तमे - पुरुषांमध्ये उत्तम अशा श्रीहरीच्या ठिकाणी - अहैतुकी - हेतुविरहित - अव्यवहिता - भेददृष्टिने रहित - अस्ति - आहे - सा - ती - भक्तिः - भक्ति - निर्गुणस्य - निर्गुण अशा - भक्तियोगस्य - भक्तियोगाचे - लक्षणम् - लक्षण - हि - निश्चयाने - उदाहृतम् - सांगितले आहे ॥११-१२॥
ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह अखंडपणे समुद्राकडे वाहात जातो, त्याचप्रमाणे माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने ज्याच्या मनाची वृत्ती तेलाच्या धारेप्रमाणे अखंड सर्वांतर्यामी असणार्या माझ्याकडे असते, तसेच पुरुषोत्तम अशा माझ्याबद्दल जे निष्काम आणि अनन्य प्रेम असते, ते निर्गुण भक्तियोगाचे लक्षण सांगितले गेले आहे. (११-१२)
सालोक्यसार्ष्टिसामीप्य सारूप्यैकत्वमप्युत ।
दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जनाः ॥ १३ ॥
सालोक्य सार्ष्टि सामिप्य सारुप्य अन सायुज । मोक्षही दिधला त्याते तरी तो नच घेइ की ॥ १३ ॥
जनाः - भक्त लोक - मत्सेवनं विना - माझ्या सेवेवाचून - सालोक्यसार्ष्टिसामीप्यसारुप्यैकत्वम् - सालोक्य, सार्ष्टि, सामीप्य व सारुप्य अशा चार प्रकारच्या मुक्ति - दीयमानम् अपि उत - दिल्या जात असता सुद्धा - न गृह्णन्ति - ग्रहण करीत नाहीत ॥१३॥
असे निष्काम भक्त, मी देण्यास तयार असतानाही माझी सेवा सोडून सलोकता, सार्ष्टी, समीपता, सरूपता आणि सायुज्य मुक्तीसुद्धा घेत नाहीत. [ १. सलोकता - भगवंतांच्या लोकात राहणे, २. सार्ष्टी - भगवंताच्या समान ऐश्वर्य असणे, ३. समीपता - भगवंताच्या जवळ राहणे, ४. सरूपता - भगवंतांच्या सारखे रूप असणे, ५. सायुज्य - भगवंताशी एकरूप होणे. ] (१३)
स एव भक्तियोगाख्य आत्यन्तिक उदाहृतः ।
येनातिव्रज्य त्रिगुणं मद्भावायोपपद्यते ॥ १४ ॥
भगवद्भक्तिच्या साठी मुक्तीला त्यागि तो असा । पुरुषार्था खरा तोची मिळतो मम रुपि तो ॥ १४ ॥
सः एव - तोच - भक्तियोगाख्यः - भक्तियोग नावाचा - आत्यन्तिकः - अत्यन्त श्रेष्ठ असा - योगः - योग - उदाहृतः - सांगितला आहे - येन - ज्याच्या योगाने - त्रिगुणम् - तीन गुणांचा परिणाम अशा संसाराला - अतिव्रज्य - उल्लंघून - मद्भावाय - माझ्या स्वरूपाला - उपपद्यते - प्राप्त होते ॥१४॥
हाच भक्तियोग परम पुरुषार्थ मानला गेला आहे. याच्या योगाने मनुष्य तिन्ही गुणांना ओलांडून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. (१४)
निषेवितेनानिमित्तेन स्वधर्मेण महीयसा ।
क्रियायोगेन शस्तेन नातिहिंस्रेण नित्यशः ॥ १५ ॥ मद्धिष्ण्य दर्शनस्पर्श पूजास्तुति अभिवन्दनैः । भूतेषु मद्भावनया सत्त्वेनासङ्गमेन च ॥ १६ ॥ महतां बहुमानेन दीनानां अनुकम्पया । मैत्र्या चैवात्मतुल्येषु यमेन नियमेन च ॥ १७ ॥ आध्यात्मिकानुश्रवणात् नामसङ्कीर्तनाच्च मे । आर्जवेनार्यसङ्गेन निरहङ्क्रियया तथा ॥ १८ ॥ मद् धर्मणो गुणैः एतैः परिसंशुद्ध आशयः । पुरुषस्याञ्जसाभ्येति श्रुतमात्रगुणं हि माम् ॥ १९ ॥
निष्कामभाव ठेवोनी नैमित्तिक नि नित्य ते । कर्तव्य पाळणे आणि अहिंसा योग साधणे ॥ १५ ॥ माझीच मूर्ति ती ध्यावी स्पर्शावी पूजनी बरी । स्तवावे वंदनी यावे सर्वभूतांत पाहणे ॥ १६ ॥ धैर्य वैराग्य सन्मान संतांचा करणे बरा । दीनांसी करणे माया व्हावे जै जगमित्रची ॥ १७ ॥ अध्यात्मशास्त्र ऐकावे पाळावे नियमो यम । उच्चार मम नामाचा कीर्तने करणे हित ॥ १८ ॥ संतांच्या सहवासात अहंकारहि सोडणे । वर्तता भगवद्धर्म चित्त ते शुद्ध होतसे ॥ ऐकता गुण ते माझे चित्त माझ्यात गुंतते ॥ १९ ॥
अनिमित्तेन - कामनारहित अशा - निषेवितेन - उत्तमप्रकारे आचरण केलेल्या अशा - स्वधर्मेण - स्वधर्माच्या योगाने - महीयसा - श्रद्धादिकांनी युक्त अशा - शस्तेन - निष्काम अशा - न अतिहिंस्त्रेण - विशेष हिंसा नसलेल्या अशा - नित्यशः - नित्य - क्रियायोगेन - विशेष पूजा प्रकाराच्या योगाने ॥१५॥ मद्धिषदर्शनस्पर्शपूजास्तुत्यभिवन्दनैः - माझ्या मूर्ती इत्यादिकांचे दर्शन, पूजन, स्तवन व अभिवन्दन यांच्या योगाने - भूतेषु - प्राण्यांच्या ठिकाणी - मद्भावनया - माझ्या भावनेच्या योगाने - सत्त्वेन - धैर्याने - च - आणि - असङ्गमेन - वैराग्याच्या योगाने ॥१६॥ महताम् - सत्पुरुषांच्या - बहुमानेन - बहुमानाने - दीनानाम् - अनाथावरील - अनुकम्पया - दयेने - आत्मतुल्येषु - आपल्याशी स्वभावादिकांनी समान असलेल्यांच्या ठिकाणी - मैत्र्या एव - मित्रभावानेच - च - आणि - यमेन - यमाच्या योगाने - च - आणि - नियमेन - नियमाच्या योगाने ॥१७॥ आध्यात्मिकानुश्रवणात् - आत्मस्वरूपाचे प्रतिपादन करणार्या शास्त्रांच्या श्रवणाने - मे - माझ्या - नामसंकीर्तनात् - नावाच्या उत्तम कीर्तनामुळे - च - आणि - आर्जवेन - निष्कपटपणाने - आर्यसङ्गेन - श्रेष्ठ लोकांच्या संगतीच्या योगाने - तथा - तसे - निरहंक्रियया - अहंकार सोडून ॥१८॥ एतैः - ह्या - गुणैः - गुणांनी - परिसंशुद्धः - अत्यंत शुद्ध झालेले असे - मद्धर्मणः - भागवत धर्माचे अनुष्ठान करणार्या अशा - पुरुषस्य - पुरुषाचे - आशयः - अन्तःकरण - श्रुतमात्रगुणम् - केवळ श्रवण केले आहेत गुण ज्याचे अशा - माम् - मला - अञ्जसा - अनायासे - हि - निश्चयाने - अभ्येति - प्राप्त होते ॥१९॥
निष्काम भावाने श्रद्धापूर्वक आपल्या नित्य-नैमित्तिक कर्तव्यांचे पालन करणे, नियमितपणे हिंसारहित उत्तम शास्त्रविहित उपासना करणे, माझ्या प्रतिमेचे दर्शन, चरणस्पर्श, पूजा, स्तुती, आणि वंदन करणे, प्राण्यांच्या मध्ये माझी भावना करणे, धैर्य आणि वैराग्य धारण करणे, महापुरुषांना मान देणे, दीनांवर दया करणे, आणि आपल्यासारखीच स्थिती असणार्य़ांबरोबर मित्रत्वाने वागणे, यम-नियमांचे पालन, अध्यात्मशास्त्रांचे श्रवण, नामसंकीर्तन, मनाची सरलता, सत्पुरुषांची संगती, अहंकाराचा त्याग याप्रकारे माझ्या भागवतधर्माचे अनुष्ठान करणार्या भक्तांचे चित्त अत्यंत शुद्ध होऊन माझ्या गुणांच्या केवळ श्रवणाने अनायासे माझ्याकडे लागते. (१५-१९)
यथा वातरथो घ्राणं आवृङ्क्ते गन्ध आशयात् ।
एवं योगरतं चेत आत्मानं अविकारि यत् ॥ २० ॥
फुलांचा गंध वायूने उडोनी नाकिं पोचतो । विकार शून्य तै चित्त परेशाप्रत पोचते ॥ २० ॥
यथा - ज्याप्रमाणे - वातरथः - वायु आहे वाहून नेणारा ज्याचा असा - गन्धः - गन्ध - आशयात् - पुष्पादिकांच्या स्थानापासून - घ्राणम् - घ्राणेन्द्रियाला - आवृङ्क्ते - आकर्षून घेतो - एवम् - याप्रमाणे - यत् - जे - अविकारि - विकाररहित असे - योगरतम् - भक्तियोगात रममाण झालेले असे - चेतः - अन्तःकरण - तत् - ते - आत्मानम् - आत्म्याला - आवृङ्क्ते - वश करिते ॥२०॥
ज्याप्रमाणे वार्याने उडून जाणारा वास आपला आश्रय असलेल्या फुलातून नाकापर्यंत पोहोचतो, त्याचप्रमाणे भक्तियोगात तत्पर आणि राग-द्वेषादी विकाररहित चित्त परमात्म्याकडेच ओढ घेते. (२०)
अहं सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थितः सदा ।
तं अवज्ञाय मां मर्त्यः कुरुतेऽर्चाविडम्बनम् ॥ २१ ॥
जीवात वसतो मी तो आत्मरुपचि होउनी । म्हणोनी प्राणिमात्रासी वैर ना करिता मज ॥ भजावे नसता व्यर्थ सर्व योग नि साधने ॥ २१ ॥
भूतात्मा - प्राण्यांचा आत्मा असा - अहम् - मी - सर्वेषुभूतेषु - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी - सदा - निरंतर - अवस्थितः - राहिलेला असा - अस्मि - आहे - मर्त्यः - मनुष्य - तम् माम् - त्या माझी - अवज्ञाय - अवज्ञा करून - अर्चाविडम्बनम् - पूजेच्या योगाने उपहास - कुरुते - करतो ॥२१॥
मी आत्मरूपाने सर्व जीवांमध्ये राहतो. त्या मज परमात्म्याचा अनादर करून जे प्रतिमारूपातच माझी पूजा करतात, त्यांची ती पूजा म्हणजे केवळ देखावा होय. (२१)
यो मां सर्वेषु भूतेषु सन्तमात्मानमीश्वरम् ।
हित्वार्चां भजते मौढ्याद् भस्मन्येव जुहोति सः ॥ २२ ॥
सर्वभूतात आत्मा मी मला ना पाहता तसे । करी जो प्रतिमापूजा भस्माच्या आहुतीच त्या ॥ २२ ॥
सर्वेषु भूतेषु - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी - सन्तम् - असलेल्या अशा - आत्मानम् - आत्मस्वरूप अशा - ईश्वरम् - सर्वसमर्थ अशा - माम् - मला - हित्वा - सोडून - यः - जो - मौढ्यात् - मूर्खपणामुळे - अर्चाम् - मूर्तिपूजा - भजते - करतो - सः - तो पुरुष - भस्मनि एव - भस्मामध्येच - जुहोति - होम करतो ॥२२॥
सर्व भूतमात्रांमध्ये स्थित, सर्वांचा आत्मा, परमेश्वर अशा माझी मूर्खपणाने उपेक्षा करून केवळ प्रतिमा-पूजनातच जो गढलेला असतो, तो जणू अग्नी सोडून भस्मामध्येच हवन करतो. (२२)
द्विषतः परकाये मां मानिनो भिन्नदर्शिनः ।
भूतेषु बद्धवैरस्य न मनः शान्तिमृच्छति ॥ २३ ॥
भेददर्शी तसा द्वेषी अनेक वैर बोधतो । मानावा मजसी द्वेषी कधी ना शांति त्या मिळे ॥ २३ ॥
परकाये - दुसर्याच्या देहामध्ये - माम् - माझा - व्दिषतः - द्वेष करणार्या अशा - मानिनः - अहंकारी अशा - भिन्नदर्शिनः - भेददृष्टीने पहाणार्या अशा - भूतेषु - प्राण्यांच्या ठिकाणी - बद्धवैरस्य - धरिले आहे वैर ज्याने अशा - पुरुषस्य - पुरुषाचे - मनः - अन्तःकरण - शान्तिम् - शान्तीला - न ऋच्छति - प्राप्त होत नाही ॥२३॥
जो भेदबुद्धीने पाहणारा अहंकारी मनुष्य दुसर्या जीवांशी वैर करतो आणि अशा प्रकारे त्यांच्या शरीरात असणार्या माझाच द्वेष करतो, त्याच्या मनाला कधीच शांती मिळत नाही. (२३)
अहमुच्चावचैर्द्रव्यैः क्रिययोत्पन्नयानघे ।
नैव तुष्येऽर्चितोऽर्चायां भूतग्रामावमानिनः ॥ २४ ॥
अवमान दुजांचा जो करोनी मज पूजितो । सामग्री नी विधी यांनी तरी त्यां मी न पावतो ॥ २४ ॥
अनघे - हे निष्पापे - अहम् - मी - भूतग्रामावमानिनः - प्राण्यांच्या समूहाची अवहेलना करणार्या अशा - पुरुषस्य - पुरुषाच्या - उच्चावचैः - लहानमोठ्या - द्रव्यैः - द्रव्यांच्या योगाने - उत्पन्नया - उत्पन्न केलेल्या - क्रियया - उपचाराच्या योगाने - अर्चायाम् - मूर्तीच्या ठिकाणी - अर्चितः - पूजिलेला असा - न एव तुष्ये - संतुष्टच होत नाही ॥२४॥
हे माते, जो दुसर्या जीवांचा अपमान करतो आणि श्रेष्ठ-कनिष्ठ पदार्थांनी माझ्या मूर्तीचे पूजन करतो, त्याच्यावर मी प्रसन्न होत नाही. (२४)
अर्चादौ अर्चयेत्तावद् ईश्वरं मां स्वकर्मकृत् ।
यावन्न वेद स्वहृदि सर्वभूतेष्ववस्थितम् ॥ २५ ॥
स्वतात सर्वप्राण्यात माझा प्रत्यय होइ तो । पूजाव्या प्रतिमा माझ्या धर्माने वागणे हित ॥ २५ ॥
यावत् - जोपर्यंत - सर्वभूतेषु - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी - अवस्थितम् - असलेल्या अशा - माम् ईश्वरम् - मी जो ईश्वर त्याला - स्वहृदि - आपल्या हृदयात - न वेद - जाणत नाही - तावत् - तोपर्यंत - स्वकर्मकृत् - आपल्या क्रिया करणार्या अशा - पुरुषः - पुरुषाने - अर्चादौ - मूर्ति इत्यादिकांच्या ठिकाणी - तम् - त्याला - अर्चयेत - पूजावे ॥२५॥
मनुष्याने आपल्या धर्माचे अनुष्ठान करीत तोपर्यंतच मज ईश्वराची प्रतिमा आदींमध्ये पूजा करीत राहावे, जोपर्यंत त्याला आपल्या हृदयात, तसेच संपूर्ण प्राण्यात स्थित असलेल्या परमात्म्याचा अनुभव येत नाही. (२५)
आत्मनश्च परस्यापि यः करोत्यन्तरोदरम् ।
तस्य भिन्नदृशो मृत्युः विदधे भयमुल्बणम् ॥ २६ ॥
आत्मा नी परमात्म्यात भेद थोडाहि मानि जो । अशा भेद्यास मृत्युचे भय मी घोर दावितो ॥ २६ ॥
यः - जो - आत्मनः - स्वतःच्या - च - आणि - परस्य - दुसर्याच्या - अरम् उत् - स्वल्प अशाहि - अन्तरा - भेदाला - करोति - करतो - मृत्युः - मृत्युस्वरूप असा - अहम् - मी - भिन्नदृशः - भेदयुक्त आहे दृष्टि ज्याची असा - तस्य - त्या पुरुषाला - उल्बणम् - मोठे - भयम् - भय - विदधे - करितो ॥२६॥
जी व्यक्ती आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडे सुद्धा अंतर आहे असे समजते, त्या भेददर्शी व्यक्तीला मी मृत्युरूप मोठे भय उत्पन्न करतो. (२६)
अथ मां सर्वभूतेषु भूतात्मानं कृतालयम् ।
अर्हयेद् दानमानाभ्यां मैत्र्याभिन्नेन चक्षुषा ॥ २७ ॥
म्हणोनी प्राणिमात्राच्या तनूसी मम गेहची । मानुनी दान सन्माने मित्रत्वे पूजिणे तयां ॥ २७ ॥
अथ - यास्तव - सर्वभूतेषु - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी - कृतालयम् - केले आहे स्थान ज्याने अशा - भूतात्मानम् - प्राण्यांचा आत्मा अशा - माम् - मला - दानमानाभ्याम् - दान व मान यांच्या योगाने - मैत्र्या - मित्रतेने - च - आणि - अभिन्नेन - भेदरहित अशा - चक्षुषा - दृष्टीने - अर्चयेत् - पूजावे ॥२७॥
म्हणून सर्व प्राण्यांमध्ये घर करून त्या प्राण्यांच्याच रूपात असलेल्या मज परमात्म्याचे यथायोग्य दान, मान, मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समदृष्टी याद्वारे पूजन केले पाहिजे. (२७)
जीवाः श्रेष्ठा हि अजीवानां ततः प्राणभृतः शुभे ।
ततः सचित्ताः प्रवराः ततश्चेन्द्रियवृत्तयः ॥ २८ ॥ तत्रापि स्पर्शवेदिभ्यः प्रवरा रसवेदिनः । तेभ्यो गन्धविदः श्रेष्ठाः ततः शब्दविदो वराः ॥ २९ ॥
पाषाणाहूनि ते श्रेष्ठ वृक्ष नी कृमि कीटके । त्याहुनी श्वास घेणारे त्यातही मन ज्यास ते ॥ २८ ॥ सेंद्रीय प्राणियांमाजी मीनादी रस स्पर्शि ते । त्याहुनी गंध घेणारे त्याहुनी ऐकणार ते ॥ २९ ॥
शुभे - हे कल्याणि - आजीवानाम् - निर्जीव पदार्थामध्ये - जीवाः - सजीव पदार्थ - हि - निश्चयाने - श्रेष्ठाः - श्रेष्ठ - ततः - सजीवांहून - प्राणभृतः - प्राणाला धारण करणारे - ततः - त्यापेक्षा - सचित्ताः - ज्ञानवान् - च - आणि - ततः - त्याहून - इन्द्रियवृत्तयः - इन्द्रियांच्या आहेत क्रिया ज्यामध्ये असे जीव - प्रवराः - श्रेष्ठ - ( सन्ति - होत ) ॥२८॥ तत्र अपि - त्यामध्येही - स्पर्शवेदिभ्यः - स्पर्श जाणणार्या जीवांपेक्षा - रसवेदिनः - रस जाणणारे जीव - प्रवरा - श्रेष्ठ - तेभ्यः - त्याहून - गन्धविदः - गन्ध जाणणारे प्राणी - श्रेष्ठाः - श्रेष्ठ - ततः - त्याहून - शब्दविदः - शब्द जाणणारे प्राणी - वराः - श्रेष्ठ - सन्ति - होत ॥२९॥
हे माते, पाषाणादी अचेतनांपेक्षा वृक्षादी जीव श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा श्वास घेणारे प्राणी श्रेष्ठ आहेत. त्यातसुद्धा मन असणारे प्राणी उत्तम आणि त्यांच्याहीपेक्षा इंद्रियवृत्तींनी युक्त प्राणी श्रेष्ठ होत. इंद्रियवृत्तियुक्त प्राण्यांमध्ये सुद्धा केवळ स्पर्शाचा अनुभव करणार्यांपेक्षा रसाचे ग्रहण करू शकणारे मासे वगैरे उत्कृष्ट आहेत. तसेच रसवेत्त्यांपेक्षा गंधाचा अनुभव घेणारे भ्रमर आदी आणि गंध ग्रहण करणार्यांपेक्षासुद्धा शब्द ग्रहण करणारे श्रेष्ठ आहेत. (२८-२९)
रूपभेदविदस्तत्र ततश्चोभयतोदतः ।
तेषां बहुपदाः श्रेष्ठाः चतुष्पादस्ततो द्विपात् ॥ ३० ॥
रुपासी जाणिती काक त्याहुनी दंतधारि ते । पादहीनांहुनी श्रेष्ठ बहुपादी पुन्हा पुढे ॥ त्याहुनी चार पायांचे द्विपादी सर्व श्रेष्ठची ॥ ३० ॥
तेभ्यः - त्याहून - रूपभेदविदः - रूपांचा भेद जाणणारे प्राणी श्रेष्ठ होत - ततः - त्याहून - उभयतोदतः - खाली वर दात असणारे प्राणी श्रेष्ठ आहेत - तेषाम् - त्यामध्ये - बहुपदाः - अनेक आहेत पाय ज्यांना असे प्राणी - श्रेष्ठः - श्रेष्ठ - ततः - त्याहून - चतुष्पादः - चार आहेत पाय ज्यांना असे प्राणी - ततः - त्याहून - व्दिपात् - दोन आहेत पाय ज्यांना असे प्राणी - श्रेष्ठाः - श्रेष्ठ - सन्ति - होत ॥३०॥
त्यांच्याहीपेक्षा रूपाचा अनुभव घेणारे कावळे इत्यादी उत्तम आहेत. त्यांच्यापेक्षा ज्यांना तोंडामध्ये वर-खाली दोन्ही बाजूस दात असतात, ते जीव श्रेष्ठ आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा पाय नसणार्यांपेक्षा पुष्कळ पाय असणारे श्रेष्ठ होत. तसेच पुष्कळ पाय असणार्यांपेक्षा चार पाय असणारे आणि चार पाय असणार्यांपेक्षासुद्धा दोन पाय असणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. (३०)
ततो वर्णाश्च चत्वारः तेषां ब्राह्मण उत्तमः ।
ब्राह्मणेष्वपि वेदज्ञो हि, अर्थज्ञोऽभ्यधिकस्ततः ॥ ३१ ॥
मनुष्यीं चार वर्णाचे त्यातही द्विज श्रेष्ठ ते । द्विजात वेदज्ञानी ते ज्ञात्यात सारज्ञानि ते ॥ ३१ ॥
च - आणि - ततः - त्याहून - चत्वारः - चार - वर्णाः - वर्ण - तेषाम् - त्या वर्णांमध्ये - ब्राह्मणः - ब्राह्मण - उत्तमः - उत्तम - ब्राह्मणेषु अपि - ब्राह्मणांमध्ये देखील - वेदज्ञः - वेद पठण करणारा - ततः - त्याहून - अर्थज्ञः - अर्थ जाणणारा - हि - निश्चयाने - अभ्यधिकः - अतिशय अधिक - अस्ति - होय ॥३१॥
मनुष्यांमध्ये सुद्धा चार वर्ण श्रेष्ठ आहेत. त्यांमध्ये सुद्धा ब्राह्मण श्रेष्ठ होत. ब्राह्मणांमध्येही वेद म्हणणारा उत्तम होय आणि वेद म्हणणार्यांमध्येसुद्धा वेदांचा अर्थ जाणणारा श्रेष्ठ आहे. (३१)
अर्थज्ञात्संशयच्छेत्ता ततः श्रेयान् स्वकर्मकृत् ।
मुक्तसङ्गस्ततो भूयात् अदोग्धा धर्ममात्मनः ॥ ३२ ॥
अर्थज्ञीं संशयो छेदी त्यातही धर्मपालक । निष्कामी थोर सर्वात आसक्ती त्यागिता मनीं ॥ ३२ ॥
अर्थज्ञात् - अर्थ जाणणार्याहून - संशयच्छेत्ता - संशय दूर करणारा - ततः - त्याहून - स्वकर्मकृत् - आपले विहित कर्म करणारा - श्रेयान् - श्रेष्ठ - ततः - त्याहून - मुक्तसङ्गः - टाकलेला विषयाभिलाष ज्याने असा - आत्मनः - आपल्या - धर्मम् - धर्माच्या - अदोग्धा - फलाची इच्छा न करणारा असा - भूयान् - श्रेष्ठ - अस्ति - होय ॥३२॥
अर्थ जाणणार्यांपेक्षा संशयनिवृत्ती करणारा श्रेष्ठ होय. त्यापेक्षा वर्णाश्रमानुसार कर्म करणारा श्रेष्ठ होय. त्याच्यापेक्षा आस सोडून आपल्या धर्माचे निष्काम भावाने आचरण करणारा अधिक श्रेष्ठ आहे. (३२)
तस्मान्मय्यर्पिताशेष क्रियार्थात्मा निरन्तरः ।
मय्यर्पितात्मनः पुंसो मयि सन्न्यस्तकर्मणः । न पश्यामि परं भूतं अकर्तुः समदर्शनात् ॥ ३३ ॥
त्यातही सर्वकर्मांना फळांना त्या तनूसह । मला जो भेद सोडोनी अर्पी तो श्रेष्ठ त्याहुनी ॥ असा जो मजला चित्त अर्पी तो समदर्शि जो । अकर्ता सर्वप्राण्यात श्रेष्ठची नच संशय ॥ ३३ ॥
तस्मात् - त्याहून - मयि - माझ्या ठिकाणी - अर्पिताशेषक्रियार्थात्मा - अर्पण केली आहेत संपूर्ण कर्मफले व देह ज्याने असा - निरन्तरः - अन्तर न मानणारा असा - पुरुषः - पुरुष - श्रेष्ठः - श्रेष्ठ - अस्ति - होय - मयि - माझ्या ठिकाणी - अर्पितात्मनः - अर्पण केला आहे देह ज्याने अशा - मयि - माझ्या ठिकाणी - संन्यस्तकर्मणः - अर्पण केली आहेत कर्मे ज्याने अशा - अकुर्तुः - कर्तृत्वाच्या अभिमानाने शून्य अशा - समदर्शनात् - सम आहे दृष्टी ज्याची अशा - पुंसः - पुरुषाहून - परम् - श्रेष्ठ अशा - भूतम् - प्राण्याला - न पश्यति - पहात नाही ॥३३॥
त्याच्याहीपेक्षा जो आपली सर्व कर्मे, त्यांची फळे तसेच आपले शरीरही मला अर्पण करून आत्मा-परमात्म्यात भेद न मानता माझी उपासना करतो तो श्रेष्ठ आहे. अशा कर्तेपण सोडणार्या समदर्शी पुरुषापेक्षा मला दुसरा कोणी श्रेष्ठ मनुष्य दिसत नाही. (३३)
मनसैतानि भूतानि प्रणमेद्बहुमानयन् ।
ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानिति ॥ ३४ ॥
माझाचि सर्वप्राण्यात अंश जो बघतो सदा । करितो सर्वजीवांना आदरे प्रणिपातची ॥ ३४ ॥
एतानि - ह्या - भूतानि - प्राण्यांमध्ये - जीवकलया - जीवरूपाने - भगवान् - भगवान - ईश्वरः - ईश्वर - प्रविष्टः - प्रवेश केलेला - अस्ति - आहे - इति - अशा - मनसा - सदसव्दिवेकबुद्धीने - बहु मानयन् - बहुमान देणार्या अशा पुरुषाने - प्रणमेत् - नमस्कार करावा ॥३४॥
म्हणून जीवरूप आपल्या अंशाने साक्षात भगवंतच सर्वांमध्ये राहात आहेत, असे मानून सर्व प्राण्यांना मोठया आदराने मनाने नमस्कार करावा. (३४)
भक्तियोगश्च योगश्च मया मानव्युदीरितः ।
ययोरेकतरेणैव पुरुषः पुरुषं व्रजेत् ॥ ३५ ॥
अष्टांग योग नी भक्ती तुम्हासाठीच बोललो । एकाही साधनाने त्या जीवाला भगवान् मिळे ॥ ३५ ॥
मानवि - हे मनुकन्ये - मया - माझ्याकडून - भक्तियोगः - भक्तियोग - च - आणि - योगः च - अष्टाङ्गयोग - उदीरितः - सांगितला गेला - ययोः - ज्यापैकी - एकतरेण - एकानेच - पुरुषः - मनुष्य - पुरुषम् - परमेश्वराला - व्रजेत - प्राप्त होईल ॥३५॥
हे माते, मी तुला असा हा भक्तियोग आणि अष्टांगयोग सांगितला. यांपैकी एक योग करण्यानेही जीव भगवंतांना प्राप्त होऊ शकतो. (३५)
एतद्भगवतो रूपं ब्रह्मणः परमात्मनः ।
परं प्रधानं पुरुषं दैवं कर्मविचेष्टितम् ॥ ३६ ॥ रूपभेदास्पदं दिव्यं काल इत्यभिधीयते । भूतानां महदादीनां यतो भिन्नदृशां भयम् ॥ ३७ ॥
प्रभाव श्रेष्ठ ब्रह्माचा नाना वैचित्र्य त्याचिची । तयाचा मूळ तो हेतू काळ नाम तया असे ॥ ३६ ॥ पुरुष प्रकृती रुपे त्याची त्याहूनि वेगळी । कर्माचे मूळ अदृष्ट भेद्यांना भय लाभते ॥ ३७ ॥
एतत् - हे - परमात्मनः - परमात्मस्वरूप अशा - भगवतः - षड्गुणैश्वर्य संपन्न अशा - ब्रह्मणः - ब्रह्माचे - रूप - रूप - यत् - जे - तत् - ते - प्रधानम् - प्रकृति - पुरुषम् - पुरुष - च - आणि - परम् - त्यापलीकडचे श्रेष्ठ तत्त्व - अस्ति - आहे - च - आणि - तत् - ते - कर्मविचेष्टितम् - कर्मांच्या आहेत विविध जन्ममरणरूप गति ज्यापासून असे - दैवम् - दैव - आहुः - म्हणतात ॥३६॥ रूपभेदास्पदम् - पदार्थांच्या निराळेपणाला कारण अशा - दिव्यम् - अलौकिक अशा रूपाला - कालः - काल - इति - असे - अभिधीयते - म्हटले जाते - यत् - ज्या कालापासून - महदादीनाम् - महतत्त्व इत्यादि - भूतानाम् - भूतांचा - च - आणि - भिन्नदृशाम् - भेदयुक्त आहे दृष्टि ज्यांची अशा जीवांना - भयम् - भय - भवति - होते ॥३७॥
भगवान परमात्मा परब्रह्माचा अद्भुत प्रभावसंपन्न, तसेच जगातील पदार्थांच्या नानाविध वैचित्र्याला कारण असणारा स्वरूपविशेषच ‘काल’ या नावाने प्रसिद्ध आहे. प्रकृती आणि पुरुष याचीच रूपे आहेत. तसेच ही त्याच्यापासून वेगळी सुद्धा आहेत. नाना प्रकारच्या कर्मांचे मूळ अदृष्ट तो हाच होय आणि याच्यापासून महत्तत्त्वादींच्या अभिमानी भेददर्शी प्राण्यांना नेहमी भय असते. (३६-३७)
योऽन्तः प्रविश्य भूतानि भूतैरत्त्यखिलाश्रयः ।
स विष्ण्वाख्योऽधियज्ञोऽसौ कालः कलयतां प्रभुः ॥ ३८ ॥
सर्वांचा आश्रयो विष्णु संहारी त्यात राहुनी । यज्ञाचे फळ तो देतो ब्रह्म्यासी काळ तोच की ॥ ३८ ॥
अखिलाश्रयः - सर्व पदार्थांचा आधार असा - यः - जो काल - अन्तः - आत - प्रविश्य - प्रवेश करून - भूतैः - भूतांकडून - भूतानि - भूतांचा - अत्ति - संहार करितो - सः - तो - असौ - हा - कलयताम् - स्वाधीन ठेवणार्या ब्रह्मदेवादिकांचा - प्रभुः - नियन्ता असा - अधियज्ञः - यज्ञाचे फल देणारा - विष्ण्वाख्यः - विष्णु आहे नाव ज्याचे असा - कालः - काल - अस्ति - होय ॥३८॥
जो सर्वांचा आश्रय असल्याकारणाने सर्व प्राण्यांमध्ये प्रविष्ट होऊन भूतांच्या द्वारेच त्यांचा संहार करतो, तो जग चालविणार्या ब्रह्मदेवादिकांचाही प्रभू भगवान कालच यज्ञांचे फळ देणारा विष्णू होय. (३८)
न चास्य कश्चिद् दयितो न द्वेष्यो न च बान्धवः ।
आविशत्यप्रमत्तोऽसौ प्रमत्तं जनमन्तकृत् ॥ ३९ ॥
सखा शत्रू नि आप्तष्ट तयासी कोणिही नसे । विसरे आपले रुप प्रमादे सर्व मारितो ॥ ३९ ॥
अस्य - ह्या कालाचा - कश्चित् - कोणी - दयितः - प्रिय - न - नाही - च - आणि - व्देष्यः - अप्रिय - न - नाही - च - आणि - बान्धवः - बान्धव - न - नाही - अन्तकृत् - संहार करणारा असा - असौ - हा काल - अप्रमत्तः - सावध राहणारा असा - प्रमत्तम् - सावध न राहणार्या - जनम् - मनुष्यामध्ये - आविशति - प्रवेश करतो ॥३९॥
हा काल कोणाचा मित्र नाही, कोणाचा शत्रू नाही आणि कोणाचा सगासोयराही नाही. हा नेहमी सावध राहातो आणि आपल्या स्वरूपभूत अशा श्रीभगवंतांचे विस्मरण होऊन भोगरूपी प्रमादात पडलेल्या प्राण्यांवर आक्रमण करून त्यांचा संहार करतो. (३९)
यद्भयाद् वाति वातोऽयं सूर्यस्तपति यद्भयात् ।
यद्भयाद् वर्षते देवो भगणो भाति यद्भयात् ॥ ४० ॥
वाहतो वायू नी सूर्य तापतो इंद्र वर्षितो । तारे तेजाळती सर्व त्याचेच भय घेउनी ॥ ४० ॥
यद्भयात् - ज्या कालाच्या भीतीमुळे - अयम् - हा - वातः - वायु - वाति - वहातो - यद्भयात् - ज्याच्या भयामुळे - सूर्यः - सूर्य - तपति - प्रकाशतो - यद्भयात् - ज्याच्या भीतीमुळे - देवः - इन्द्र - वर्षते - वृष्टि करितो - भगणः - नक्षत्रसमूह - यद्भयात् - ज्याच्या भीतीमुळे - भाति - प्रकाशतो ॥४०॥
याच्या भीतीनेच वारा वाहातो. याच्या भयानेच सूर्य तापतो, याच्या भयाने इंद्र वर्षाव करतो आणि याच्याच भयाने तारे चमकतात. (४०)
यद् वनस्पतयो भीता लताश्चौषधिभिः सह ।
स्वे स्वे कालेऽभिगृह्णन्ति पुष्पाणि च फलानि च ॥ ४१ ॥
औषधी वृक्ष वेलीही त्यांचेच भय घेउनी । फुलती फळती नित्य नियमा नच मोडिती ॥ ४१ ॥
वनस्पतयः - वनस्पती - च - आणि - औषधिभिःसह - औषधीसह - लताः - लता - यतः - ज्याच्यापासून - भीताः - भ्यालेल्या अशा - स्वे स्वे काले - आपापल्या ऋतूत - पुष्पाणि - पुष्पांना - च - आणि - फलानि - फलांना - अभिगृहणन्ति च - प्रसवतात ॥४१॥
याच्या भयानेच वनस्पती वेली इत्यादी योग्य वेळी फुले-फळे धारण करतात. (४१)
स्रवन्ति सरितो भीता नोत्सर्पत्युदधिर्यतः ।
अग्निरिन्धे सगिरिभिः भूर्न मज्जति यद्भयात् ॥ ४२ ॥
नद्याही वाहती आणि रेषा नुल्लंघि सागर । भयाने जळतो अग्नी पृथिवी स्थिर ती जळी ॥ ४२ ॥
यतः - ज्याच्यापासून - भीताः - भ्यालेल्या अशा - सरितः - नद्या - स्त्रवन्ति - वहातात - उदधिः - समुद्र - न उत्सर्पति - वाढत नाही - यद्भयात् - ज्याच्या भयामुळे - अग्निः - अग्नि - इन्धे - प्रदीप्त होतो - सगिरिभिः - पर्वतांसह - भूः - पृथ्वी - न मज्जति - बुडत नाही ॥४२॥
याच्याच भीतीने नद्या वाहातात आणि समुद्र किनार्याच्या बाहेर जात नाहीत. याच्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो आणि पर्वतांसह पृथ्वी पाण्यात बुडत नाही. (४१)
नभो ददाति श्वसतां पदं यन्नियमाददः ।
लोकं स्वदेहं तनुते महान् सप्तभिरावृतम् ॥ ४३ ॥
श्वासोच्छ्वासास दे वेळ याचिया शासने नभ । अहंकार शरीराला ब्रह्मांड रुप देतसे ॥ ४३ ॥
अदः - हे - नभः - आकाश - श्वसताम् - प्राण्यांना - पदम् - स्थान - ददाति - देते - महान् - महत्तत्त्व - लोकम् - लोकस्वरूप अशा - स्वदेहम् - आपल्या देहाला - सप्तभिः - सात लोकांनी - आवृतम् - वेष्टिलेल्या अशा - तनुते - पसरिते ॥४३॥
याच्या आज्ञेनेच आकाश जिवंत प्राण्यांना अवकाश देते आणि महत्तत्त्व अहंकाररूप शरीराचा सात आवरणांनी युक्त अशा ब्रह्मांडाच्या रूपाने विस्तार करते. (४३)
गुणाभिमानिनो देवाः सर्गादिष्वस्य यद्भयात् ।
वर्तन्तेऽनुयुगं येषां वश एतच्चराचरम् ॥ ४४ ॥
काळासी विष्णु इत्यादी आधीन जग सर्वहे । युगक्रमास जाणोनी जगासी रचिती पहा ॥ ४४ ॥
येषाम् - ज्यांच्या - वशे - स्वाधीन - एतत् - हे - चराचरम् - स्थावरजंगम - अस्ति - आहे - ते - ते - गुणाभिमानेन - सत्त्वादि गुणांचे नियंते असे - देवाः - ब्रह्मादिक देव - अनुयुगम् - प्रत्येक युगात - अस्व - ह्या जगाच्या - सर्गादिषु - उत्पत्ति इत्यादिकांमध्ये - यद्भयात् - ज्याच्या भीतीमुळे - वर्तन्ते - प्रवृत्त होतात ॥४४॥
या कालाच्याच भयाने सत्त्वादी गुणांचे अभिमानी विष्णू आदी देव ज्यांच्या अधीन हे सर्व चराचर जग आहे, आपल्या जगत रचना इत्यादी कार्यांत युगक्रमानुसार तत्पर असतात. (४४)
सोऽनन्तोऽन्तकरः कालो अनादिरादिकृदव्ययः ।
जनं जनेन जनयन् मारयन् मृत्युनान्तकम् ॥ ४५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे एकोनत्रिंशोऽध्यायः ॥ २९ ॥
अनादी काळ तो ऐसा कर्ता तो दुसर्यासची । पितापुत्रास जन्मी नी यमासी मारितो पुन्हा ॥ ४५ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ ॥ एकोणतिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
सः - तो - अन्तकरः - संहार करणारा असा - अन्ततः - ज्याचा अन्त नाही असा - अनादिः - अनादि - आदिकृत् - जगाला आरंभ करणारा - अव्ययः - अव्यय - जनेन - लोकांकडून - जनम् - लोकांना - जनयन् - उत्पन्न करणारा असा - मृत्युना - मृत्युरूपाने - अन्तकम् - मृत्यूचा - मारयन् - संहार करणारा असा - कालः - काल - अस्ति - आहे ॥४५॥
अविनाशी काल स्वतः अनादी, परंतु दुसर्यांना उत्पन्न करणारा आहे. तसेच स्वतः अनंत असूनही दुसर्यांचा अंत करणारा आहे. हा पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करीत सर्व जगाची निर्मिती करतो आणि आपली संहारशक्ती जो मृत्यू त्याच्याकडून यमराजाला सुद्धा मारून त्याचा अंत करतो. (४५)
स्कंध तिसरा - अध्याय एकोणतिसावा समाप्त |