![]() |
श्रीमद् भागवत पुराण
देहगेहासक्तपुरुषाणां पात् अधोगतिकथनम् - देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
कपिल उवाच -
तस्यैतस्य जनो नूनं नायं वेदोरुविक्रमम् । काल्यमानोऽपि बलिनो वायोरिव घनावलिः ॥ १ ॥
भगवान कपिलदेव म्हणाले - ( अनुष्टुप् ) वायूने उडुनी मेघ वायूचे बळ नेणती । काळशक्त्ये तसे जीव भ्रमती बळ नेणती ॥ १ ॥
काल्यमानः अपि - चाळविलेला असताहि - अयम् - हा - जनः - लोक - तस्य - त्या - बलिनः - बलाढ्य अशा - एतस्य - ह्या कालाच्या - उरुक्रमम् - प्रचण्ड पराक्रमाला - घनावलिः - मेघपंक्ति - वायोः - वायूच्या - विक्रमम् - पराक्रमाला - इव - जसे तसे - नूनम् - निश्चयाने - न वेद - जाणत नाही ॥१॥
श्रीकपिलदेव म्हणतात- जसा वार्य़ाने उडून जाणारा मेघांचा समूह त्याची ताकद जाणत नाही, त्याचप्रमाणे हा जीवसुद्धा बलवान काळाच्या प्रेरणेने निरनिराळ्या अवस्था व योनींमध्ये भ्रमण करीत राहातो; परंतु त्याचा महान पराक्रम जाणत नाही. (१)
यं यं अर्थमुपादत्ते दुःखेन सुखहेतवे ।
तं तं धुनोति भगवान् पुमान्छोचति यत्कृते ॥ २ ॥
सुखासाठीच वस्तूंचा करितो जीव संग्रह । काळ तो नष्टितो सारे जीवांना शोक होतसे ॥ २ ॥
पुमान् - पुरुष - यं यम् - ज्या ज्या - अर्थम् - वस्तूला - सुखहेतवे - सुखासाठी - दुःखेन - कष्टाने - उपादत्ते - ग्रहण करितो - तं तम् - ती ती - भगवान् - सर्वसमर्थ काल - धुनोति - नष्ट करितो - यत्कृते - ज्याच्याकरिता - पुमान् - पुरुष - शोचति - शोक करितो ॥२॥
जीव सुखाच्या अभिलाषेने ज्या ज्या वस्तू मोठया कष्टाने मिळवितो, त्या त्या भगवान काल नष्ट करतो.त्यामुळे त्याला अत्यंत दुःख होते. (२)
यदध्रुवस्य देहस्य सानुबन्धस्य दुर्मतिः ।
ध्रुवाणि मन्यते मोहाद् गृहक्षेत्रवसूनि च ॥ ३ ॥
अज्ञानी धन नी शेती तनू घरहि नाश्य या । वस्तूस मोह पाशाने नित्य सत्यचि मानिती ॥ ३ ॥
यत् - कारण - दुर्मतिः - दुष्ट आहे बुद्धि ज्याची असा पुरुष - मोहात् - अज्ञानामुळे - सानुबन्धस्य - परिवारयुक्त अशा - अध्रुवस्य - विनाशी अशा - देहस्य - देहाच्या - गृहक्षेत्रवसूनि - घर, शेते आणि द्रव्य - च - इत्यादिकांना - ध्रुवाणि - शाश्वत अशी - मन्यते - मानितो ॥३॥
याचे कारण हेच की, हा मंदमती जीव मोहामुळे आपले हे नाशवान शरीर व त्याच्याशी संबंधित घर, शेत, धन, इत्यादी नित्य आहे, असे मानतो. (३)
जन्तुर्वै भव एतस्मिन् यां यां योनिमनुव्रजेत् ।
तस्यां तस्यां स लभते निर्वृतिं न विरज्यते ॥ ४ ॥
संसारी जीव या योनी मधुनी जन्मतो तिचा । आनंद मानितो आणि विरक्त नच होतसे ॥ ४ ॥
जन्तुः - प्राणी - एतस्मिन् - ह्या - भवे - संसारात - यां याम् - ज्या ज्या - योनिम् - योनीला - अनुव्रजेत् - प्राप्त होईल - तस्यां तस्याम् - त्या त्या योनीमध्ये - सः - तो प्राणी - निर्वृतिम् - सुखाला - लभते - प्राप्त होतो - वै - खरोखर - न विरज्यते - विरक्त होत नाही ॥४॥
या संसारात हा जीव ज्या ज्या योनीत जन्म घेतो, त्यातच आनंद मानू लागतो आणि त्यापासून विरक्त होत नाही. (४)
नरकस्थोऽपि देहं वै न पुमान् त्यक्तुमिच्छति ।
नारक्यां निर्वृतौ सत्यां देवमायाविमोहितः ॥ ५ ॥
मायेने मोहतो आणि नारकी योनि जन्मता । विष्टादी भोगही लाभ मानोनी नच सोडितो ॥ ५ ॥
नरकस्थः अपि - नरकात असलेलाहि - पुमान् - पुरुष - नारक्याम् - नरकसेवनाने उत्पन्न झालेले असे - निर्वृतौ सत्याम् - सुख असता - देवमायाविमोहितः - ईश्वराच्या मायेने मोहित झालेला असा - देहम् - शरीराला - त्यक्तुम् - सोडण्यास - वै - खरोखर - न इच्छति - इच्छित नाही ॥५॥
हा भगवंतांच्या मायेने असा मोहित होतो की, कर्माप्रमाणे नरकातल्या योनींमध्ये जन्म घेऊनही तेथील विष्ठा आदी तुच्छ भोगांमध्येच सुख मानल्याकारणाने ती योनी सोडू इच्छित नाही. (५)
आत्मजायासुतागार पशुद्रविण बन्धुषु ।
निरूढमूलहृदय आत्मानं बहु मन्यते ॥ ६ ॥
आपुली तनु स्त्री पुत्र बंधू गेह पशू धनीं । आसक्त होउनी भाग्य मानितो रचि कल्पना ॥ ६ ॥
आत्मजायासुतागारपशुद्रविणबन्धुषु - शरीर, स्त्री, पुत्र, घर, पशु, द्रव्य आणि बन्धु यांच्या ठिकाणी - निरूढमूलहृदयः - मनोराज्याने भरलेले आहे अन्तःकरण ज्याचे असा - सः - तो प्राणी - आत्मानम् - आपल्याला - बहुमन्यते - मोठा मानीत असतो ॥६॥
हा मूर्ख आपले शरीर, स्त्री, पुत्र, गृह, पशू, धन, आणि बांधवांमध्ये आसक्त होऊन त्यांच्या संबंधात अनेक प्रकारचे मनोरथ करीत स्वतःला मोठा भाग्यशाली समजतो. (६)
सन्दह्यमानसर्वाङ्ग एषां उद्वहनाधिना ।
करोति अविरतं मूढो दुरितानि दुराशयः ॥ ७ ॥
तयाच्या पालनी चिंता करिता देह जाळितो । परी दुर्वासनी चित्ते मूढ तो पापची करी ॥ ७ ॥
एषाम् - ह्या स्त्रीपुत्रादिकांच्या - उव्दहनाधिना - पोषणाच्या चिन्तेने - संदह्य मानसर्वाङ्गः - जाळले जात आहे सर्वाङ्ग ज्याचे असा - दुराशयः - दुष्ट आहे अन्तःकरण ज्याचे असा - मूढः - मूर्ख असा - सः - तो प्राणी - दुरितानि - पापे - अविरतम् - निरन्तर - करोति - करितो ॥७॥
त्यांच्या पालन-पोषणाच्या चिंतेने याचे संपूर्ण अंग काळजीने जळत असते, तरी दुर्वासनांमुळे हृदय दूषित झाल्याकारणाने हा मूर्ख नेहमी यांच्यासाठी निरनिराळी पापे करीत राहातो. (७)
आक्षिप्तात्मेन्द्रियः स्त्रीणां असतीनां च मायया ।
रहो रचितयालापैः शिशूनां कलभाषिणाम् ॥ ८ ॥ गृहेषु कूटधर्मेषु दुःखतन्त्रेष्वतन्द्रितः । कुर्वन् दुखप्रतीकारं सुखवन्मन्यते गृही ॥ ९ ॥
कपटी कुलटा स्त्रीच्या एकांता प्रेम मानितो । मुलांच्या गोड गोष्टीत कर्मी लिंपोनिया फसे ॥ ८ ॥ सावधान असोनिया दुःखासी दूर लाविता । वाटते त्यात त्यां मोठे सुखाचे क्षण सर्वही ॥ ९ ॥
असतीनाम् - व्यभिचरिणी अशा - स्त्रीणाम् - स्त्रियांनी - रहोरचितया - एकांतात रचलेल्या अशा - मायया - मायेच्या योगाने - च - आणि - कलभाषिणाम् - मधुर भाषण करणार्या अशा - शिशूनाम् - बालकांच्या - आलापैः - भाषणांनी - आक्षिप्तात्मेन्द्रियः - ओढली गेली आहेत अन्तःकरण व इन्द्रिये ज्याची असा - भवति - होतो ॥८॥ अतन्द्रितः - आलस्यरहित असा - गृही - गृहस्थ - कूटधर्मेषु - कपटी आहेत व्यवहार ज्यातील अशा - गृहेषु - घरात - दुःखप्रतीकारम् - दुःखाच्या प्रतीकाराला - कुर्वन् - करणारा असा - सुखवत् - सुखाप्रमाणे - मन्यते - मानितो ॥९॥
कुलटा स्त्रियांनीही एकांतात दाखविलेल्या कपटपूर्ण प्रेमामुळे आणि मुलांशी गोड गोड गोष्टी बोलण्यात मन आणि इंद्रिये गुंतल्याने, गृहस्थ घरातील दुःखप्रधान तुच्छ कर्मांमध्ये लिप्त होऊन जातो. त्यावेळी सावध होऊन जर त्याला एखाद्या दुःखाचा प्रतिकार करण्यात यश मिळाले तर तो त्यालाच सुखासारखे मानतो. (८-९)
अर्थैरापादितैर्गुर्व्या हिंसयेतः ततश्च तान् ।
पुष्णाति येषां पोषेण शेषभुग्यात्यधः स्वयम् ॥ १० ॥
हिंसेने मिळवी वित्त पोसितो लोक गेहिचे । उरले स्वय तो भक्षी नरकी जातसे पुन्हा ॥ १० ॥
गुर्व्या - मोठ्या - हिंसया - हिंसेच्या योगाने - इतस्ततः - इकडून तिकडून - आपादितैः - प्राप्त केलेल्या अशा - अर्थैः - द्रव्यांनी - तान् - त्या स्त्रीपुत्रादिकांना - पुष्णाति - पोशितो - च - आणि - शेषभुक् - शेष वस्तूंचा उपभोग घेणारा असा - येषाम् - ज्यांच्या - पोषेण - पोषणाने - स्वयम् - स्वतः - अधः - अधोगतीत - याति - जातो ॥१०॥
इथून तिथून भयानक हिंसावृत्तीने धनाचा संचय करून अशा लोकांचे पोषण करतो की, ज्यांचे पोषण करण्यामुळे हा नरकात जातो. स्वतः तर त्यांच्या खाण्या-पिण्यातून उरलेले अन्न खाऊनच राहातो. (१०)
वार्तायां लुप्यमानायां आरब्धायां पुनः पुनः ।
लोभाभिभूतो निःसत्त्वः परार्थे कुरुते स्पृहाम् ॥ ११ ॥
यत्नाने न जगे तेंव्हा लोभाला वश पावतो । अधीर होउनी इच्छी अन्यांचे धन जिंकण्या ॥ ११ ॥
पुनः पुनः - फिरून फिरून - आरब्धायाम् - आरंभ केलेले - वार्तायां लुप्यमानायाम् - उपजीविकेचे साधन लुप्त होऊ लागले असता - लोभाभिभूतः - लोभाने ग्रासलेला असा - निःसत्त्वः - निर्बल असा - परार्थे - दुसर्याच्या द्रव्याविषयी - स्पृहाम् - इच्छा - कुरुते - करितो ॥११॥
वारंवार प्रयत्न करूनही जेव्हा याची उपजीविका चालत नाही, तेव्हा हा लोभाने अधीर होऊन दुसर्याच्या धनाची इच्छा करू लागतो. (११)
कुटुम्बभरणाकल्पो मन्दभाग्यो वृथोद्यमः ।
श्रिया विहीनः कृपणो ध्यायन् श्वसिति मूढधीः ॥ १२ ॥
मंद भाग्यामुळे जेंव्हा प्रयत्न करुनी पुरे । धनहीन कुटुंबाला पोसण्या असमर्थ हो ॥ चिंतीत होउनी तेंव्हा दीर्घ श्वासास सोडितो ॥ १२ ॥
मन्दभाग्यः - मंद आहे दैव ज्याचे असा - वृथोद्यमः - निष्फल आहे उद्योग ज्याचा असा - श्रिया - लक्ष्मीने - विहीनः - विरहित असा - कृपणः - दीन - कुटुम्बभरणाकल्पः - कुटुम्बाच्या पोषणाविषयी असमर्थ असा - मूढधीः - मलीन झाली आहे बुद्धि ज्याची असा - ध्यायन् - काही तरी विचार करणारा असा - श्वसिति - उसासे टाकीत असतो ॥१२॥
जेव्हा दुर्दैवाने याचे कोणतेही प्रयत्न सफल होत नाहीत आणि हा मंदबुद्धी निर्धन होऊन कुटुंबाचे भरण-पोषण करण्यास असमर्थ होतो, तेव्हा अत्यंत दीन आणि चिंतातुर होऊन दीर्घ सुस्कारे सोडू लागतो. (१२)
एवं स्वभरणाकल्पं तत्कलत्रादयस्तथा ।
नाद्रियन्ते यथा पूर्वं कीनाशा इव गोजरम् ॥ १३ ॥
असमर्थ अशा त्याला स्त्रीया पुत्र उपेक्षिती । किसान वृद्ध बैलांना जसे नित्य उपेक्षिती ॥ १३ ॥
तत्कलत्रादयः - त्याची स्त्रीपुत्र इत्यादिक - एवम् - याप्रमाणे - स्वभरणाकल्पम् - आपल्या पोषणाविषयी असमर्थ अशा - पुरुषम् - पुरुषाचा - कीनाशाः - कृपण शेतकरी - गोजरम् - वृद्ध बैलाला - इव - जसे तसे - यथा - जसा - पूर्वम् - पूर्वी - तथा - तसा - न आद्रियन्ते - आदर करीत नाही ॥१३॥
हा आपले पालन-पोषण करण्यास असमर्थ आहे असे पाहून ते स्त्री-पुत्रादी याचा पहिल्यासारखा आदर करीत नाहीत, जसे कंजूष शेतकरी म्हातार्या बैलाची उपेक्षा करतात. (१३)
तत्राप्यजातनिर्वेदो भ्रियमाणः स्वयम्भृतैः ।
जरयोपात्तवैरूप्यो मरणाभिमुखो गृहे ॥ १४ ॥ आस्तेऽवमत्योपन्यस्तं गृहपाल इवाहरन् । आमयाव्यप्रदीप्ताग्निः अल्पाहारोऽल्पचेष्टितः ॥ १५ ॥
विरागी तरि ना होतो जयांना पोसिले यये । आता ते पोसिती याला वृद्धत्वी रुप नासते ॥ १४ ॥ अग्निही मंद होतोनी जरा व्याधिहि ग्रासिती । कुत्र्यापरी जगे आणि मरणोन्मुख लौंड तो ॥ १५ ॥
तत्र अपि - त्यावेळी सुद्धा - अजातनिर्वेदः - उत्पन्न झाला नाही उव्देग ज्याला असा - जरया - वार्धक्याने - उपात्तवैरुप्यः - प्राप्त झाली आहे रूपहीनता ज्याला असा - मरणाभिमुखः - मरण आहे सन्मुख ज्याच्या अशा - आमयावी - रोगी असा - अप्रदीप्ताग्निः - मंद झाला आहे जठराग्नी ज्याचा असा - अल्पाहारः - अल्प आहे आहार ज्याचा असा - अल्पचेष्टितः - अल्प आहेत क्रिया ज्याच्या असा - स्वयम्भृतैः - स्वतः पोषिलेल्यांकडून - भ्रियमाणः - पोषिला जाणारा - गृहपालः इव - घराचा रक्षक अशा कुत्र्यांप्रमाणे - अवमत्य - तिरस्कार करून - उपन्यस्तम् - ठेविलेल्या पदार्थाला - आहरन् - भक्षण करणारा असा - गृहे - घरात - आस्ते - असतो ॥१४-१५॥
एवढे होऊनही त्याला वैराग्य येत नाही. ज्यांचे याने स्वतः पालन केले होते, तेच आता याचे पालन करतात. वृद्धावस्था आल्याकारणाने हा कुरूप होतो. शरीर रोगी बनते. जठराग्नी मंद होतो, भोजन आणि पुरुषार्थ दोन्हीही कमी होतात. तो मरणोन्मुख अवस्थेत घरी पडून राहातो आणि कुत्र्याप्रमाणे स्त्री-पुत्रादिकांनी अपमानपूर्वक दिलेले अन्न खाऊन उदरनिर्वाह करतो. (१४-१५)
वायुनोत्क्रमतोत्तारः कफसंरुद्धनाडिकः ।
कासश्वासकृतायासः कण्ठे घुरघुरायते ॥ १६ ॥
मरणासमयी श्वास कफाने आडके सदा । खोकणे श्वासही कष्ट कंठी घर्घर लागते ॥ १६ ॥
उत्क्रमता - वर येणार्या अशा - वायुना - वायूच्या योगाने - उत्तारः - बाहेर आले आहेत नेत्र ज्याचे असा - कफसंरुद्धनाडिकः - कफाने दाटल्या आहेत शिरा ज्याच्या असा - कासश्वास कृतायासः - कास व श्वास यांनी केली आहे पीडा ज्याला असा - कण्ठे - कण्ठात - घुरघुरायते - घुरघुर शब्द करितो ॥१६॥
मृत्युसमय जवळ आल्याकारणाने वाताचे उत्क्रमण होऊन डोळ्यांची बुबुळे बाहेर येतात, श्वासनलिका कफामुळे चोंदून जाते, खोकताना आणि श्वासोच्छ्वास करताना याला मोठे कष्ट होतात. तसेच कफ वाढल्याने कंठामध्ये घरघर होऊ लागते. (१६)
शयानः परिशोचद्भिः परिवीतः स्वबन्धुभिः ।
वाच्यमानोऽपि न ब्रूते कालपाशवशं गतः ॥ १७ ॥
शोकाकुलचि आप्तात घेरुनी पडतो असा । मृत्युच्या पथि जाताना बोलता बोलु ना शके ॥ १७ ॥
शयानः - निजलेला असा - परिशोचद्भिः - शोक करणार्या अशा - स्वबन्धुभिः - आपल्या आप्तांकडून - परिवीतः - वेढिलेला असा - कालपाशवशम् - मृत्यूच्या पाशाच्या अधीनतेला - गतः - प्राप्त झालेला असा - वाच्यमानः - बोलविला जाणारा असाहि - न ब्रूते - बोलत नाही ॥१७॥
शोकाकुल नातलगांनी घेरलेला हा पडून राहातो आणि मृत्युपाशात बांधला गेल्याने त्यांनी बोलवूनही काही बोलत नाही. (१७)
एवं कुटुम्बभरणे व्यापृतात्माजितेन्द्रियः ।
म्रियते रुदतां स्वानां उरुवेदनयास्तधीः ॥ १८ ॥
न जिंकी इंद्रिया जोतो पोसितोचि कुटुंबिया । रडत्या स्वजनांमध्ये भोगितो अंति वेदना ॥ १८ ॥
एवम् - याप्रमाणे - कुटुम्बभरणे - कुटुंबाच्या पोषणाविषयी - व्यापृतात्मा - गुंतलेले आहे शरीर ज्याचे असा - अजितेन्द्रियः - जिंकलेली नाहीत इन्द्रिये ज्याने असा - उरुवेदनया - मोठ्या वेदनेच्या योगाने - अस्तधीः - नष्ट झाली आहे बुद्धि ज्याची असा - स्वाना रुदताम् - आप्त लोक रडू लागले असता - म्रियते - मरतो ॥१८॥
अशा प्रकारे जो मूर्ख मनुष्य इंद्रियांवर विजय न मिळविता नेहमी कुटुंबाचे पालन-पोषण करण्यातच व्यग्र राहातो, तो रडणार्या स्वजनांच्यामध्ये अत्यंत वेदनांनी बेशुद्ध होऊन मृत्यूला प्राप्त होतो. (१८)
यमदूतौ तदा प्राप्तौ भीमौ सरभसेक्षणौ ।
स दृष्ट्वा त्रस्तहृदयः शकृन् मूत्रं विमुञ्चति ॥ १९ ॥
अशा त्या मरणावस्थीं क्रोधिष्ठ यमदूत तो । पाहता भीति वाटोनी मलमूत्रास त्यागितो ॥ १९ ॥
तदा - त्यावेळी - सः - तो - सरभसेक्षणौ - क्रोधयुक्त आहे दृष्टि ज्यांची अशा - भीमौ - भयंकर - प्राप्तौ - प्राप्त झालेल्या - यमदूतौ - यमाच्या दोघा दूतांना - दृष्ट्वा - पाहून - त्रस्तहृदयः - घाबरलेले आहे हृदय ज्याचे असा - शकृत् - मलाला - च - आणि - मूत्रम् - मूत्राला - विमुञ्चति - सोडितो ॥१९॥
यावेळी त्याला नेण्यासाठी अतिभयंकर आणि रागाने डोळे लाल झालेले जे दोन यमदूत येतात, त्यांना बघून हा भयाने मल-मूत्र-त्याग करू लागतो. (१९)
यातनादेह आवृत्य पाशैर्बद्ध्वा गले बलात् ।
नयतो दीर्घमध्वानं दण्ड्यं राजभटा यथा ॥ २० ॥
यातना देहि त्याला ते यमाचे दूत लोटिती । गळ्यास बांधुनी दोर यमलोकात ओढिती ॥ २० ॥
यातनादेहे - यातनायुक्त अशा शरीरात - तम् - त्याला - आवृत्य - कोंडून - बलात् - बलात्काराने - गले - गळ्यामध्ये - पाशैः - पाशांनी - बध्वा - बांधून - यथा - ज्याप्रमाणे - राजभटाः - राजाचे दूत - दण्ड्यम् - अपराध्याला - तथा - त्याप्रमाणे - दीर्घम् - लांब अशा - अध्वानम् - रस्त्यावर - नयतः - नेतात ॥२०॥
ते यमदूत त्याला यातनादेहात टाकतात आणि नंतर शिपाई एखाद्या अपराध्याला घेऊन जातात, त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात दोरी बांधून बळजबरीने यमलोकीच्या दीर्घ सफरीवर त्याला घेऊन जातात.(२०)
तयोर्निर्भिन्नहृदयः तर्जनैर्जातवेपथुः ।
पथि श्वभिर्भक्ष्यमाण आर्तोऽघं स्वमनुस्मरन् ॥ २१ ॥
हृदयो फाटते धाके शरीरीं कापरे भरे । लचके तोडिती कुत्रे व्याकुळ पाप आठवी ॥ २१ ॥
तयोः - त्या यमदूतांच्या - तर्जनैः - दटावण्यांनी - निर्भिन्नहृदयः - फाटले आहे हृदय ज्याचे असा - जातवेपथुः - उत्पन्न झाला आहे कंप ज्याला असा - पथि - मार्गात - श्वभिः - कुत्र्यांनी - भक्ष्यमाणः - खाल्ला जाणारा - आर्तः - खिन्न झालेला - स्वम् - आपल्या - अघम् - पापाला - अनुस्मरन् - स्मरणारा ॥२१॥
त्यांच्या दरडावण्याने याचे हृदय विदीर्ण होते आणि शरीर थरथरा कापू लागते. वाटेत कुत्री त्याचे लचके तोडतात. त्यावेळी आपण केलेल्या पापांचे स्मरण करून तो व्याकूळ होतो. (२१)
क्षुत्तृट्परीतोऽर्कदवानलानिलैः
सन्तप्यमानः पथि तप्तवालुके । कृच्छ्रेण पृष्ठे कशया च ताडितः चलत्यशक्तोऽपि निराश्रमोदके ॥ २२ ॥
( इंद्रवज्रा ) तृष्णा क्षुधे व्याकुळ घामघूम दावानली तप्तहि वाळु मध्ये । ना ओढतो पाय पुढे हि एक चाले तसाची यमदूत ठोकी ॥ २२ ॥
क्षुट्तृट्परीतः - क्षुधा आणि तृषा यांनी व्याप्त झालेला असा - अर्कदवानलानिलैः - सूर्य, वणवा आणि वायु यांनी - तप्तवालुके - तापलेली आहे वाळू ज्यातील अशा - निराश्रमोदके - नाही आश्रम व उदक ज्यामध्ये अशा - पथि - मार्गात - संतप्यमानः - भाजला जाणारा असा - च - आणि - अशक्तःअपि - अशक्त असा असूनसुद्धा - पृष्ठे - पाठीवर - कशया - चाबुकाने - ताडितः - मारलेला असा - कृच्छेन - कष्टाने - चलति - चालतो ॥२२॥
तहान-भुकेने तो व्याकूळ होतो, तसेच घाम, आगीचा वणवा व गरम वार्याची झळ यांमुळे तो तप्त होऊन जातो. पाणी नाही, विश्रांती नाही, अशा स्थितीत तो तापलेल्या वाळूच्या मार्गातून जात असता एक पाऊलही पुढे टाकण्याची त्याला शक्ती नसते. यमदूत त्याच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारतात, तेव्हा मोठया कष्टाने तो चालू लागतो. (२२)
तत्र तत्र पतन्छ्रान्तो मूर्च्छितः पुनरुत्थितः ।
पथा पापीयसा नीतस्तरसा यमसादनम् ॥ २३ ॥
( अनुष्टुप् ) थकतो पडतो मूर्छे पुन्हा उठुनि चालतो । अशा दुःखतमी मार्गी क्रुर दूतहि ओढिती ॥ २३ ॥
तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी - पतन् - पडणारा - श्रान्तः - थकलेला - मूर्छितः - घेरी आलेला - पुनः - पुनः - उत्थितः - उठलेला - पापीयसा - अत्यंत कठीण - तमसा - अन्धकारयुक्त - पथा - मार्गाने - यमसादनम् - यमाच्या घरी - नीतः - नेलेला ॥२३॥
तो ठिकठिकाणी जमिनीवर पडतो, त्याला मूर्च्छा येते, तरतरी आल्यावर तो पुन्हा उठतो. अशा प्रकारे अतिशय दुःखमय अंधार्या मार्गाने, यमदूत त्याला यमपुरीला घेऊन जातात. (२३)
योजनानां सहस्राणि नवतिं नव चाध्वनः ।
त्रिभिर्मुहूर्तैर्द्वाभ्यां वा नीतः प्राप्नोति यातनाः ॥ २४ ॥
नव्यान्नव् योजने पद्म दूर तो यम लोक जो । दोन तीन मुहूर्तात जाऊनी नरकी पडे ॥ २४ ॥
अध्वनः - मार्गाच्या - योजनानाम् - योजनांचे - नवतिम् - नव्वद - च - आणि - नव - नऊ - सहस्त्राणि - हजार - त्रिभिः - तीन - मुहूर्तैः - मुहूर्तांनी - वा - किंवा - व्दाभ्याम् - दोन मुहूर्तांनी - नीतः - नेलेला - सः - तो पुरुष - यातनाः - यातनांना - प्राप्नोति - प्राप्त होतो ॥२४॥
यमलोकाकडे जाणारा मार्ग नव्याण्णव हजार योजने आहे. इतका लांबचा मार्ग पाचसहा घटकांत चालत जाऊन तो नरकातील अनेक प्रकारच्या यातना भोगतो. (२४)
आदीपनं स्वगात्राणां वेष्टयित्वोल्मुकादिभिः ।
आत्ममांसादनं क्वापि स्वकृत्तं परतोऽपि वा ॥ २५ ॥
धग्धगी विस्तावामाजी तनू ती फेकिती पुन्हा । शरीर कापुनी त्याचे देती खाण्या तयासची ॥ २५ ॥
उल्मुकादिभिः - जळक्या लाकडांनी - वेष्टियित्वा - वेढून - स्वगात्राणाम् - आपल्या अवयवाचे - आदीपनम् - जाळणे - स्वकृत्तम् - आपल्याकडून तोडलेले असे - वा - किंवा - क्व अपि - कोठे सुद्धा - परतः अपि - दुसर्याकडून सुद्धा - कृत्तम् - तोडलेले असे - आत्ममांसादनम् - आपले मांस खाणे ॥२५॥
तेथे त्याच्या शरीराला धगधगत्या आगीत टाकून जाळले जाते, कधी स्वतः तर कधी दुसर्यांनी त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांचेच मांस त्याला खाऊ घातले जाते. (२५)
जीवतश्चान्त्राभ्युद्धारः श्वगृध्रैर्यमसादने ।
सर्पवृश्चिक दंशाद्यैः दशद्भिश्चात्मवैशसम् ॥ २६ ॥
जिवंत असुनी त्याचे कुत्रे आतडि तोडिती । साप विंचू नि ते डास चाउनी त्रासिती जिवा ॥ २६ ॥
च - आणि - यमसादने - यमाच्या नगरीत - श्वगृध्रैः - कुत्रे आणि गिधाड यांकडून - जीवतः - जिवंत प्राण्यांची - अन्त्राभ्युद्धारः - आतडी बाहेर ओढून काढणे - च - आणि - दशद्भिः - चावणार्या अशा - सर्पवृश्चिकदंशाद्यैः - सर्प, विंचू, डास इत्यादि प्राण्यांकडून - आत्मवैशसम् - शरीराला पीडा करणे ॥२६॥
यमपुरीतील कुत्री अगर गिधाडे यांच्याकडून जिवंतपणीच त्याची आतडी बाहेर खेचली जातात. साप, विंचू आणि डास अशा चावणार्या किंवा डंख मारणार्या जीवांकडून त्याला पीडित केले जाते. (२६)
कृन्तनं चावयवशो गजादिभ्यो भिदापनम् ।
पातनं गिरिशृङ्गेभ्यो रोधनं चाम्बुगर्तयोः ॥ २७ ॥
तुकडे करिती दूत हत्तीच्या पायि देतही । फेकिती पर्वताहून किंवा डब्क्यात कोंडिती ॥ २७ ॥
अवयवशः - अवयवांना क्रमाने - कृन्तनम् - तोडणे - च - आणि - गजादिभ्यः - हत्ती इत्यादिकांकडून - भिदापनम् - तुकडे करणे - गिरिशृङ्गेभ्यः - पर्वतांच्या शिखरांवरून - पातनम् - पाडणे - च - आणि - अम्बुगर्तयोः - पाण्यात आणि खाड्यात - रोधनम् - अवरोध करणे ॥२७॥
शरीर कापून त्याचे तुकडे तुकडे केले जातात. त्याला हत्तीकडून तुडविले जाते. पर्वतशिखरांवरून खाली ढकलले जाते किंवा पाणी आणि खड्डयात टाकून त्याला बुजवून टाकले जाते. (२७)
यास्तामिस्रान्धतामिस्रा रौरवाद्याश्च यातनाः ।
भुङ्क्ते नरो वा नारी वा मिथः सङ्गेन निर्मिताः ॥ २८ ॥
तमिस्त्र अंधकारात रौरवो नरकात त्या । स्त्रिया वा पुरुषी जीव पापाचे फळ भोगिती ॥ २८ ॥
नरः - पुरुष - नारी वा - किंवा स्त्री - मिथः - परस्परांवरील - सङ्गेन - आसक्तीने - निर्मिताः - उत्पन्न केलेल्या अशा - याः - ज्या - तामिस्त्रान्धतामिस्त्राः - तामिस्त्र व अन्धतामिस्त्र - च - आणि - रौरवाद्याः - रौरव नरक इत्यादिक - यातनाः - यातनांना - भुङ्क्ते - भोगितो ॥२८॥
या सर्व यातना तसेच अशा प्रकारच्या तामिस्त्र, अंध-तामिस्त्र, रौरव इत्यादी नरकांच्या अनेक यातना, स्त्री असो वा पुरुष, त्या जीवाला परस्परांच्या संसर्गाने होणार्या पापांमुळे भोगाव्याच लागतात. (२८)
अत्रैव नरकः स्वर्ग इति मातः प्रचक्षते ।
या यातना वै नारक्यः ता इहाप्युपलक्षिताः ॥ २९ ॥
काहींचे म्हणणे ऐसे स्वर्ग मृत्यु इथेचि ते । नारकी यातना येथे पाहाया मिळती सदा ॥ २९ ॥
मातः - हे माते - अत्रएव - येथेच - नरकः - नरक - स्वर्गः - स्वर्ग - अस्ति - आहे - इति - असे - प्रचक्षते - म्हणतात - याः - ज्या - नारक्यः - नरकसंबन्धी - यातनाः - यातना - सन्ति - आहेत - ताः - त्या यातना - इह अपि - ह्या पृथ्वीवर देखील - उपलक्षिताः - नमुन्याकरिता पहावयास मिळतात ॥२९॥
हे माते, काही लोकांचे असे म्हणणे आहे की, स्वर्ग आणि नरक तर याच लोकी आहे. कारण ज्या नरकयातना आहेत, त्या येथेही दिसतात. (२९)
एवं कुटुम्बं बिभ्राण उदरम्भर एव वा ।
विसृज्येहोभयं प्रेत्य भुङ्क्ते तत्फलमीदृशम् ॥ ३० ॥
असे ते कष्ट भोगोनी कुटुंबा जीव पोसितो । सर्वास सोडुनी जातो भोगतो दुःख एकटा ॥ ३० ॥
एवम् - याप्रमाणे - कुटुम्बम् - कुटुम्बाचे - बिभ्राणः - पोषण करणारा असा - वा - किंवा - उदरम्भरः एव - पोट भरणाराच - इह - ह्या लोकात - उभयम् - कुटुम्ब आणि उदरभरण या दोन्हींना - विसृज्य - सोडून - प्रेत्य - परलोकी जाऊन - ईदृशम् - अशा प्रकारच्या - तत्फलम् - त्याच्या फलाला - भुङ्क्ते - भोगितो ॥३०॥
अशा प्रकारे अनेक कष्ट भोगून आपल्या कुटुंबाचे पालन करणारा किंवा फक्त आपलेच पोट भरणारा पुरुष ते कुटुंब आणि शरीर या दोघांनाही सोडून आपण केलेल्या पापांचे मेल्यानंतर असे फळ भोगतो. (३०)
एकः प्रपद्यते ध्वान्तं हित्वेदं स्वकलेवरम् ।
कुशलेतरपाथेयो भूतद्रोहेण यद् भृतम् ॥ ३१ ॥
सोडितो शरीरा आणि प्राण्यांचा द्वेष सर्वही । शिदोरी बांधितो पाप एकटा नर्क भोगतो ॥ ३१ ॥
यत् - जे - भूतद्रोहेण - प्राण्यांच्या द्रोहाच्या योगाने - भृतम् - पोषिलेले असे - अस्ति - असते - तत् - त्या - इदम् - ह्या - स्वकलेवरम् - आपल्या शरीराला - हित्वा - टाकून - कुशलेतरपाथेयः - पाप हीच आहे वाटखर्ची ज्याची असा - एकः - एकटा - ध्वान्तम् - अन्यतामिस्त्र नरकात - प्रपद्यते - प्राप्त होतो ॥३१॥
आपले शरीर येथेच सोडून देऊन प्राण्यांचा द्वेष केल्याने एकत्रितपणे केलेली पापरूप शिदोरी बरोबर घेऊन तो एकटाच नरकात जातो. (३१)
दैवेनासादितं तस्य शमलं निरये पुमान् ।
भुङ्क्ते कुटुम्बपोषस्य हृतवित्त इवातुरः ॥ ३२ ॥
पोटाच्या साठि ते पाप करितो भोगतो फळ । व्याकुळ बहु तो होतो लुटला जणु सर्वची ॥ ३२ ॥
पुमान् - पुरुष - दैवेन - प्रारब्धाने - आसादितम् - प्राप्त केलेल्या अशा - तस्य - त्या - कुटुम्बपोषस्य - कुटुम्बपोषणाच्या - शमलम् - पापाला - हृतवित्तः इव - हरण केलेले आहे द्रव्य ज्याचे अशा मनुष्याप्रमाणे - आतुरः - खिन्न होत्साता - निरये - नरकात - भुङ्क्ते - भोगितो ॥३२॥
मनुष्य आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी जे पाप करतो, त्याचे दैवाने दिलेले अनिष्ट फळ तो नरकात जाऊन भोगतो. त्यावेळी तो इतका व्याकूळ होतो की, जणू त्याचे सर्वस्व लुटले गेले आहे. (३२)
केवलेन हि अधर्मेण कुटुम्बभरणोत्सुकः ।
याति जीवोऽन्धतामिस्रं चरमं तमसः पदम् ॥ ३३ ॥
पापाच्या धन मार्गाने रमुनी घर पोषि जो । अंधतामिस्त्र तो नर्क भोगितो कष्टदायक ॥ ३३ ॥
केवलेन अधर्मेण - केवळ अधर्माच्या योगाने - कुटुम्बभरणोत्सुकः - कुटुम्बाच्या पोषणाविषयी उत्सुक असलेला असा - जीवः - प्राणी - तमसः - नरकाचे - चरमं पदम् - शेवटचे स्थान अशा - अन्धतामिस्त्रम् - अन्धतामिस्त्र नावाच्या नरकाला - याति - जातो ॥३३॥
जो मनुष्य फक्त पापकर्मे करूनच आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करण्यात व्यस्त राहातो, तो नरकांमधील सर्वांत कष्टप्रद स्थान असलेल्या अंधतामिस्त्र नरकात जातो. (३३)
अधस्तात् नरलोकस्य यावतीर्यातनादयः ।
क्रमशः समनुक्रम्य पुनरत्राव्रजेच्छुचिः ॥ ३४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥
श्वान सूकर इत्यादी योनींचे दुःख भोगुनी । क्रमाने शुद्ध होवोनी मानवी जन्म लाभतो ॥ ३४ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ ॥ तिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ ३० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
नरलोकस्य - मनुष्यलोकाच्या - अधस्तात् - खाली - यावत्यः - जितक्या - यातनादयः - नरकयातना, जन्म इत्यादिक - सन्ति - आहेत - ताः - त्यांना - क्रमशः - क्रमाने - समनुक्रम्य - अतिक्रमण करून - शुचिः - शुद्ध असा - पुनः - पुनः - अत्र - ह्या मनुष्यलोकात - आव्रजेत् - तो प्राणी प्राप्त होईल ॥३४॥
मनुष्यजन्म मिळण्यापूर्वी जितक्या यातना भोगाव्या लागतात तसेच डुक्कर-कुत्रा इत्यादी योनींमध्ये जितके कष्ट आहेत, ते सर्व क्रमाक्रमाने भोगून शुद्ध झाल्यानंतर पुन्हा मनुष्य योनीमध्ये जन्म होतो. (३४)
स्कंध तिसरा - अध्याय तिसावा समाप्त |