श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
अष्टाविंशोऽध्यायः

सबीजयोगलक्षणं सगुणस्य भगवतः पृथ्गवयव ध्यानवर्णनं च -

अष्टांगयोगाचा विधी


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
योगस्य लक्षणं वक्ष्ये सबीजस्य नृपात्मजे ।
मनो येनैव विधिना प्रसन्नं याति सत्पथम् ॥ १ ॥
श्री भगवान म्हणाले-
( अनुष्टुप्‌ )
माते मी सांगतो योग सबीज लक्षणे अशी ।
जै चित्त शुद्ध होवोनी लागते मम भक्तिला ॥ १ ॥

नृपात्मजे - हे राजकन्ये - सबीजस्य - ईश्वरभक्तियुक्त अशा - योगस्य - योगाचे - लक्षणम् - लक्षण - वक्ष्ये - सांगतो - येन विधिना - ज्या योगाचरणाने - प्रसन्नम् - प्रसन्न झालेले असे - मनः - अंतःकरण - सत्पथम् एव - सन्मार्गालाच - याति - प्राप्त होते ॥१॥
श्रीभगवान म्हणतात - हे माते, आता मी तुला सबीज (ध्येयस्वरूपाच्या आलंबनाने युक्त) योगाचे लक्षण सांगतो, त्यामुळे चित्त प्रसन्न होऊन परमात्ममार्गाकडे प्रवृत्त होते. (१)


स्वधर्माचरणं शक्त्या विधर्माच्च निवर्तनम् ।
दैवाल्लब्धेन सन्तोष आत्मवित् चरणार्चनम् ॥ २ ॥
ग्राम्यधर्मनिवृत्तिश्च मोक्षधर्मरतिस्तथा ।
मितमेध्यादनं शश्वद् विविक्तक्षेमसेवनम् ॥ ३ ॥
अहिंसा सत्यमस्तेयं यावदर्थपरिग्रहः ।
ब्रह्मचर्यं तपः शौचं स्वाध्यायः पुरुषार्चनम् ॥ ४ ॥
मौनं सदाऽऽसनजयः स्थैर्यं प्राणजयः शनैः ।
प्रत्याहारश्चेन्द्रियाणां विषयान्मनसा हृदि ॥ ५ ॥
स्वधिष्ण्यानां एकदेशे मनसा प्राणधारणम् ।
वैकुण्ठलीलाभिध्यानं समाधानं तथात्मनः ॥ ६ ॥
एतैः अन्यैश्च पथिभिः मनो दुष्टमसत्पथम् ।
बुद्ध्या युञ्जीत शनकैः जितप्राणो ह्यतन्द्रितः ॥ ७ ॥
स्वधर्म आचरावा तो विधर्म त्यागणे तसे ।
संतुष्ट राहुनी चित्ती ज्ञात्याचे पद पूजिणे ॥ २ ॥
वासना कर्म सांडावे मोक्षकार्यास मांडणे ।
अल्प पवित्र ते खावे एकांती निर्भयी असे ॥ ३ ॥
अहिंसा सत्य अस्तेय मोचका वस्तु संग्रह ।
ब्रह्मचर्य तपो शौच स्वाध्याय ईश पूजिणे ॥ ४ ॥
बोलणे संयमी आणि निश्चयी दृढ आसनी ।
निवांत रोधणे प्राण हृदयी मन लाविणे ॥ ५ ॥
मूलाधारा मधेचित्त प्राणासी स्थिर ठेविणे ।
लावावे भगवंतासी गावोनी कीर्तने मनी ॥ ६ ॥
कुमार्ग बुद्धिने तोडा सन्मार्ग धरणे हित ।
हळूच लावणे चित्त एकाग्र परमेश्वेरीं ॥ ७ ॥

शक्त्या - शक्तीने - स्वधर्माचरणम् - स्वधर्माचे आचरण करणे - विधर्मात् - अधर्म किंवा परधर्म यापासून - निवर्तनम् - निवृत्त होणे - दैवात् - प्रारब्धामुळे - लब्धेन - मिळालेल्या वस्तूने - संतोषः - संतोष ठेवणे - च - आणि - आत्मविच्चरणार्चनम् - आत्मज्ञानी पुरुषांच्या चरणांची पूजा करणे ॥२॥ ग्राम्यधर्मनिवृत्तिः - धर्म, अर्थ आणि काम या ग्रामसंबंधी धर्मांपासून निवृत्त असणे - तथा - त्याप्रमाणे - मोक्षधर्मरतिः - मोक्षधर्मावर प्रेम ठेवणे - च - आणि - मितमेध्यादनम् - परिमित व शुद्ध असे अन्न भक्षण करणे - शश्वत् - निरंतर - विविक्तक्षेमसेवनम् - निर्भय अशा एकान्त स्थलाचे सेवन करणे ॥३॥ अहिंसा - अहिंसा - सत्यम् - सत्य - अस्तेयम् - चोरी न करणे - यादवर्थपरिग्रहः - कार्यापुरता वस्तूचा स्वीकार करणे - ब्रह्मचर्यम् - ब्रह्मचर्य - तपः - तपश्चर्या - शौचम् - देह व अंतःकरण यांची शुद्धि - स्वाध्यायः - वेदाध्ययन - पुरुषार्चनम् - परमेश्वराचे पूजन ॥४॥ मौनम् - मौन - सदासनजयस्थैर्यम् - उत्तम आसनाच्या जयाने स्थिरता - शनैः - हळूहळू - प्राणजयः - प्राणवायूचे वशीकरण - च - आणि - मनसा - मनाच्या योगाने - इन्द्रियाणाम् - इंद्रियांची - विषयात् - विषयापासून - हृदि - हृदयामध्ये - प्रत्याहारः - स्थापना करणे ॥५॥ स्वधिष्‌ण्याम् - प्राणांच्या स्थानांपैकी - एकदेशे - एका स्थानात - मनसा सह - मनासह - प्राणधारणम् - प्राणाचे धारण करणे - वैकुण्ठलीलाभिध्यानम् - श्रीहरीच्या लीलांचे चिंतन करणे - तथा - त्याप्रमाणे - आत्मनः - मनाची - समाधानम् - परमेश्वररूपात एकाग्रता करणे ॥६॥ जितप्राणः - वश केला आहे प्राणवायु ज्याने अशा - हि - खरोखर - अतन्द्रितः - आलस्यरहित अशा - पुरुषः - पुरुषाने - एतै - ह्या - च - आणि - अन्यैः - दुसर्‍या - पथिभिः - मार्गांनी - बुद्ध्या - बुद्धीने - असत्पथम् - दुष्ट आहे मार्ग ज्याचा अशा - दुष्टम् - दुष्ट अशा - मनः - अन्तःकरणाला - शनैः - हळूहळू - युञ्जीत - स्थिर करावे ॥७॥
शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचे यथाशक्ती पालन करणे, शास्त्राविरुद्ध आचरणाचा त्याग करणे, प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहाणे, आत्मज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहाणे, विषयवासना वाढविणार्‍या कर्मांपासून दूर राहणे, संसारातून मुक्त करणार्‍या धर्मावर प्रेम करणे, पवित्र आणि परिमित आहार घेणे, नेहमी एकांत आणि निर्भय अशा स्थानी राहाणे, मन, वाणी, आणि शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणे, सत्य बोलणे, चोरी न करणे, आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह न करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, तपश्चर्या करणे, अंतर्बाह्य पवित्र राहाणे, शास्त्रांचे अध्ययन करणे, भगवंतांची पूजा करणे, मौन पाळणे, उत्तम आसनांचा अभ्यास करून स्थिर बसणे, हळू हळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवणे, मनाच्या साहाय्याने इंद्रियांना विषयांपासून दूर करून हृदयात आणणे, मूलाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रात मनासहित प्राणाला स्थिर करणे, नेहमी भगवंतांच्या लीलांचे चिंतन करणे आणि चित्ताला सम राखणे, तसेच व्रतदानादी दुसर्‍या साधनांनीसुद्धा सावधानतेने प्राणांवर नियंत्रण ठेवून बुद्धीच्या द्वारा आपल्या कुमार्गाकडे धावणार्‍या चित्ताला हळू हळू एकाग्र करून परमात्म्याच्या ध्यानामध्ये लावावे. (२-७)


शुचौ देशे प्रतिष्ठाप्य विजितासन आसनम् ।
तस्मिन् स्वस्ति समासीन ऋजुकायः समभ्यसेत् ॥ ८ ॥
आसना जिंकणे आणि पवित्र देश पाहणे ।
मृगाजीन-कुशाच्यात्या आसना मेळवीयणे ॥
सुखाने बैसुनी तेथे अभ्यास करणे बरे ॥ ८ ॥

शुचौ - शुद्ध अशा - देशे - जाग्यावर - आसनम् - आसनाची - प्रतिष्ठाप्य - स्थापना करून - विजितासनः - वश केले आहे आसन ज्याने असा - तस्मिन् - त्या आसनावर - स्वस्ति - सुखाने - समासीनः - बसलेला असा - ऋजुकायः - सरळ आहे देह ज्याचा असा होत्साता - समभ्यसेत् - अभ्यास करावा ॥८॥
प्रथम आसनजय साधावा. नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन तयार करावे. त्याच्यावर शरीर सरळ आणि स्थिर ठेवून सुखपूर्वक बसून अभ्यास करावा. (८)


प्राणस्य शोधयेन्मार्गं पूरकुम्भकरेचकैः ।
प्रतिकूलेन वा चित्तं यथा स्थिरं अचञ्चलम् ॥ ९ ॥
प्राणाच्या शोधना मार्गा पूरक्‌ कुंभक रेचक ।
किंवा त्या उलट्या मार्गे करावे चित्त निश्चळ ॥ ९ ॥

पूरकुम्भकरेचकैः - पूरक, कुम्भक व रेचक यांनी - वा - किंवा - प्रतिकूलेन - उलट्या क्रमाने म्हणजे रेचक, कुम्भक व पूरक यांनी - चित्तम् - अन्तःकरण - स्थिरम् - स्थिर
प्रथम डाव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नाकपुडीने रेचक करावा. किंवा याउलट उजव्या नाकपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि डाव्या नाकपुडीने रेचक करावा. यामुळे प्राणमार्ग शुद्ध होऊन चित्त स्थिर आणि निश्चल होईल. (९)


मनोऽचिरात्स्याद् विरजं जितश्वासस्य योगिनः ।
वाय्वग्निभ्यां यथा लोहं ध्मातं त्यजति वै मलम् ॥ १० ॥
अग्नीत तापता सोने जसे ते मळ त्यागिते ।
प्राणायामे तसा योगी चित्तात शुद्ध होतसे ॥ १० ॥

यथा - ज्याप्रमाणे - वाय्वग्निभ्याम् - वायु आणि अग्नि यांच्या योगाने - ध्मातम् - तापविलेले असे - लोहम् - लोखण्ड - मलम् - मळाला - वै - निश्चयाने - त्यजति - टाकते - तथा - त्याप्रमाणे - जितश्वासस्य - वश केला आहे श्वासवायु ज्याने अशा - योगिनः - योगाभ्यासी पुरुषाचे - मनः - अन्तःकरण - अचिरात् - लवकर - विरजम् - निर्मल - स्यात् - होईल ॥१०॥
जसे वायू आणि अग्नीने तापविलेले सोने आपल्यातील मळ बाहेर काढून टाकते, त्याचप्रमाणे जो योगी प्राणवायूला जिंकतो, त्याचे मन अतिशय लवकर शुद्ध होते. (१०)


प्राणायामैः दहेद् दोषान् धारणाभिश्च किल्बिषान् ।
प्रत्याहारेण संसर्गान् ध्यानेनान् ईश्वरान्गुणान् ॥ ११ ॥
त्रिदोष जिंकणे येणे धारणेनेचि पाप ते ।
सोडणे विषयासक्ती रागद्वेषास त्यागिणे ॥ ११ ॥

प्राणायामः - प्राणायामांनी - दोषान् - वातादिदोषांना - धारणाभिः - धारणांच्या योगाने - किल्बिपान् - पापांना - प्रत्याहारेण - चित्ताच्या एकाग्रतेने - संसर्गान् - विषयांच्या संबन्धांना - च - आणि - ध्यानेन - ध्यानाच्या योगाने - अनीश्वरान् - ईश्वराचे नव्हेत अशा - गुणान् - रागलोभादि गुणांना - दहेत् - जाळून टाकावे ॥११॥
म्हणून योग्याने प्राणायामाने वात-पित्तादी दोषांना, धारणेने पापाला, प्रत्याहाराने विषयांच्या संबंधाला आणि ध्यानाने भगवद्‌विमुख करणार्‍या राग-द्वेषादी दुर्गुणांना दूर करावे. (११)


यदा मनः स्वं विरजं योगेन सुसमाहितम् ।
काष्ठां भगवतो ध्यायेत् स्वनासाग्रावलोकनः ॥ १२ ॥
योगाने ते असे चित्त शीघ्र एकाग्र होतसे ।
नासिकाग्री तदा दृष्टी लावुनी प्रभु चिंतिणे ॥ १२ ॥

यदा - ज्यावेळी - स्वम् - आपले - मनः - अन्तःकरण - योगेन - योगाभ्यासाने - विरजम् - निर्मल - सुसमाहितम् - स्थिर असे - भवति - होते - तदा - त्यावेळी - स्वनासाग्रावलोकनः - नासिकेच्या अग्राकडे आहे दृष्टी ज्याची असा होत्साता - भगवतः - परमेश्वराच्या - काष्ठाम् - मूर्तीचे - ध्यायेत् - ध्यान करावे ॥१२॥
जेव्हा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल, तेव्हा नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर करून भगवंतांच्या मूर्तीचे असे ध्यान करावे. (१२)


प्रसन्नवदनाम्भोजं पद्मगर्भारुणेक्षणम् ।
नीलोत्पलदलश्यामं शङ्खचक्रगदाधरम् ॥ १३ ॥
प्रसन्न वदनी विष्णु कमलाक्ष असाचि जो ।
शंखचक्रगदाधारी नीलोत्पलचि श्याम ता ॥ १३ ॥

प्रसन्नवदनाम्भोजम् - प्रसन्न आहे मुखकमल ज्याचे अशा - पद्मगर्भारुणेक्षणम् - कमलाच्या गाभ्याप्रमाणे किंचित तांबूस नेत्र आहेत ज्याचे अशा - नीलोत्पलदलश्यामम् - नीळ कमलाच्या पानाप्रमाणे श्याम आहे वर्ण ज्याचा अशा - शंखचक्रगदाधरम् - शंख, चक्र, गदा यांना धारण करणार्‍या अशा ॥१३॥
भगवंतांचे मुखकमल आनंदाने प्रफुल्लित आहे, नेत्र कमलकोशाप्रमाणे लालसर आहेत, शरीर नीलकमलदलाप्रमाणे श्यामवर्णाचे आहे. त्यांनी हातामध्ये शंख, चक्र, आणि गदा धारण केली आहे. (१३)


लसत्पङ्कज किञ्जल्क पीतकौशेयवाससम् ।
श्रीवत्सवक्षसं भ्राजत् कौस्तुभामुक्तकन्धरम् ॥ १४ ॥
कौमूदकेसरा ऐसे पीतवस्त्रहि शोभते ।
श्रीवत्सचिन्ह वक्षासी कंठी कौस्तुभ राजतो ॥ १४ ॥

लसत्पङ्कजकिञ्जझपीतकौशेयवाससम् - प्रफुल्लित कमलाच्या केसराप्रमाणे पीतवर्ण आहेत रेशमी वस्त्रे ज्याची अशा - श्रीवत्सवक्षसम् - श्रीवत्सनामक चिन्ह आहे वक्षस्थलाच्या ठिकाणी ज्याच्या अशा - भ्राजत्कौस्तुभामुक्तकन्धरम् - तेजःपुंज कौस्तुभ मण्याने वेष्टिलेला आहे कंठ ज्याचा अशा ॥१४॥
कमलातील केसराप्रमाणे त्यांचे पिवळे रेशमी वस्त्र शोभत आहे. वक्षःस्थळावर श्रीवत्सचिह्न आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे. (१४)


मत्तद्विरेफकलया परीतं वनमालया ।
परार्ध्यहारवलय किरीटाङ्गदनूपुरम् ॥ १५ ॥
गळींच्या वनमालेसी मत्तभृंगहि सेविती ।
किरीट हार रत्नांचा कंकणे पैंजणे तसी ॥ १५ ॥

मत्तव्दिरेफकलया - मत्त भ्रमरांच्या गुंजारवाचा मधुर ध्वनि जीत आहे अशा - वनमालया - वनमालेच्या योगाने - परीतम् - परिवेष्टित अशा - परार्ध्यहारवलयकिरीटाङ्गदनूपुरम् - बहुमोल आहेत हार, कडी, किरीट, बाहुभूषणे व नूपुर ज्याचे अशा ॥१५॥
वनमाला पायापर्यंत रुळत आहे, तिच्या चारी बाजूंनी भ्रमर सुगंधाने मोहित होऊन मधुर गुंजारव करीत आहेत. अंग-प्रत्यंगांवर मौल्यवान हार, कंकणे, किरीट, बाजूबंद, आणि नूपुरे इत्यादी अलंकार विराजमान आहेत. (१५)


काञ्चीगुणोल्लसत् श्रोणिं हृदयाम्भोजविष्टरम् ।
दर्शनीयतमं शान्तं मनोनयन वर्धनम् ॥ १६ ॥
कर्धनीच्या लड्या छान भक्तचित्ती विराजती ।
शांत आनंददाता तो श्यामसुंदर रुप जो ॥ १६ ॥

काञ्चीगुणोल्लसच्छ्‍रोणिम् - कमरपट्ट्याने शोभायमान आहे कटिभाग ज्याचा अशा - हृदयाभ्भोजविष्टरम् - भक्तांचे हृदयकमळच आहे आसन ज्याचे अशा - दर्शनीयतमम् - अतिशय मनोहर अशा - शान्तम् - गम्भीर अशा - मनोनयनवर्धनम् - अन्तःकरण व नेत्र यांना हर्ष उत्पन्न करणार्‍या अशा ॥१६॥
कमरेला कमरपट्टयाच्या लडी त्यांची शोभा वाढवीत आहेत. भक्तांचे हृदयकमल हेच त्यांचे आसन आहे. त्यांचे अतिशय दर्शनीय श्यामसुंदर शांत स्वरूप मन व नेत्रांना आनंदित करणारे आहे. (१६)


अपीच्यदर्शनं शश्वत् सर्वलोकनमस्कृतम् ।
सन्तं वयसि कैशोरे भृत्यानुग्रहकातरम् ॥ १७ ॥
किशोर देखणा डोळा आतूर भक्तवत्सल ।
विशेष शोभते शोभा जगद्‌वंद्यचि श्रीहरी ॥ १७ ॥

अपीच्यदर्शनम् - सुंदर आहे दर्शन ज्याचे अशा - शश्वत्सर्वलोकनमस्कृतम् - निरंतर सर्व लोकांनी नमस्कार केलेल्या अशा - कैशोरे वयसि - बालवयात - सन्तम् - असणार्‍या अशा - भृत्यानुग्रहकातरम् - भक्तांवर अनुग्रह करण्याविषयी उत्सुक अशा ॥१७॥
त्यांची अत्यंत सुंदर अशी किशोर अवस्था आहे. ते भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी आतुर झालेले आहेत. मोठी मनोहर मूर्ती आहे. नेहमी सर्व लोकांनी त्यांना वंदन केले आहे. (१७)


कीर्तन्यतीर्थयशसं पुण्यश्लोकयशस्करम् ।
ध्यायेद्देवं समग्राङ्गं यावन्न च्यवते मनः ॥ १८ ॥
कीर्तनीय परंयेश पुण्यवंतास येश दे ।
त्या श्री नारायणाअंगी अतूट ध्यान लाविणे ॥ १८ ॥

कीर्तन्यतीर्थयशसम् - वर्णनीय व पवित्र आहे कीर्ति ज्याची अशा - पुण्यलोकयशस्करम् - पुण्यश्लोक नलादिकांची कीर्ति वाढविणार्‍या अशा - समग्राङ्गम् - संपूर्ण आहेत अङ्गे ज्यामध्ये अशा - देवम् - श्रीहरीचे - ध्यायेत् - ध्यान करावे - यावत् - जोपर्यंत - मनः - अन्तःकरण - न च्यवते - ढळत नाही तोपर्यंत ॥१८॥
त्यांचे पवित्र यश परम कीर्तनीय आहे आणि ते पुण्यश्लोक भक्तांचेही यश वाढविणारे आहेत. अशा प्रकारे श्री नारायण देवांचे संपूर्ण अंगांसहित, जोपर्यंत मन(चित्त) तेथून हटत नाही, तोपर्यंत ध्यान करावे. (१८)


स्थितं व्रजन्तमासीनं शयानं वा गुहाशयम् ।
प्रेक्षणीयेहितं ध्यायेत् शुद्धभावेन चेतसा ॥ १९ ॥
पहुडोनि उभा आणि चालता बैसता हरी ।
श्रद्धेने शुद्ध चित्ताने चिंतावे सगळे असे ॥ १९ ॥

स्थितम् - उभा राहिलेल्या - व्रजन्तम् - चालणार्‍या - आसीनम् - बसलेल्या - शयानम् - निजलेल्या - वा - अथवा - गुहाशयम् - हृदयगुहेत वास करणार्‍या - प्रेक्षणीयेहितम् - मनोहर आहेत लीला ज्याच्या अशा - तम् - त्या श्रीहरीचे - शुद्धभावेन - शुद्ध आहे भक्ति ज्यामध्ये अशा - चेतसा - अन्तःकरणाने - ध्यायेत् - ध्यान करावे ॥१९॥
भगवंतांच्या सर्व लीला अतिशय दर्शनीय आहेत, म्हणून आपल्या आवडीनुसार उभे असलेले, चालत असलेले, बसलेले, पहुडलेले किंवा अंतःकरणात स्थित असलेले अशा त्यांच्या स्वरूपाचे विशुद्ध, भावयुक्त चित्ताने चिंतन करावे. (१९)


तस्मिन्लब्धपदं चित्तं सर्वावयवसंस्थितम् ।
विलक्ष्यैकत्र संयुज्याद् अङ्गे भगवतो मुनिः ॥ २० ॥
ध्यानात रमता चित्त योग्याने पाहता हरी ।
विशेष चित्त लावोनी एकेक अंग पाहणे ॥ २० ॥

मुनिः - योग्याने - तस्मिन् - त्या स्वरूपावर - लब्धपदम् - मिळविले आहे स्थैर्य ज्याने अशा - सर्वावयवसंस्थितम् - सर्व अवयवांवर स्थिर झालेल्या अशा - चित्तम् - अन्तःकरणाला - विलक्ष्य - पाहून - भगवतः - श्रीहरीच्या - एकत्र - एका - अङ्गे - अवयवावर - संयुज्यात् - लावावे ॥२०॥
अशा प्रकारे योग्याची जेव्हा खात्री होईल की, भगवत्स्वरूपात चित्त स्थिर झाले आहे, तेव्हा त्यांच्या सर्व अवयवांमध्ये लागलेल्या चित्ताला विशेष रूपाने एकेका अवयवांमध्ये लावावे. (२०)


सञ्चिन्तयेद् भगवतश्चरणारविन्दं
     वज्राङ्कुशध्वज सरोरुह लाञ्छनाढ्यम् ।
उत्तुङ्गरक्तविलसन् नखचक्रवाल
     ज्योत्स्नाभिराहतमहद् हृदयान्धकारम् ॥ २१ ॥
यच्छौचनिःसृतसरित् प्रवरोदकेन ।
     तीर्थेन मूर्ध्न्यधिकृतेन शिवः शिवोऽभूत् ।
ध्यातुर्मनःशमलशैलनिसृष्टवज्रं
     ध्यायेच्चिरं भगवतश्चरणारविन्दम् ॥ २२ ॥
(वसंततिलका)
ध्यावेचि नित्य भगवच्चरणारविंद
    वज्रांकुशो ध्वज नि पद्म जयास चिन्हे ।
शोभायमान नखचंद्र मनात ध्याता
    अज्ञान घोर तमही मग दूर होतो ॥ २१ ॥
तीर्थात ती प्रगटली नदि थोर गंगा
    मांगल्य श्रेष्ठ असले हर घे‌ई डोई ।
ध्याताचि पाप तुटते जणु इंद्रवज्र
    ध्यावे असेचि प्रभुचे चरणरविंद ॥ २२ ॥

वज्राङ्कुशध्वजसरोरुहलाञ्‌छनाढ्यम् - वज्र, अंकुश, ध्वज व कमल ह्या चिन्हांनी युक्त अशा - उत्तुङ्गरक्तविलसन्नखचक्रवालज्योत्स्नानाभिः - उंच, लाल व सुशोभित अशा मंडळांच्या किरणांनी - आहतमहद्धट्यान्धकारम् - नष्ट केला आहे ध्यान करणार्‍यांच्या हृदयांतील अंधकार ज्याने अशा - भगवतः - श्रीहरीच्या - चरणारविन्दम् - चरणकमलाचे - संचिन्तयेत् - ध्यान करावे ॥२१॥ मूर्न्धि - मस्तकावर - अधिकृतेन - धारण केलेल्या अशा - तीर्थेन - पवित्र अशा - यच्छौचनिःसृतसरित्प्रवरोदकेन - ज्या पादकमलाच्या प्रक्षालनाच्या उदकापासून उत्पन्न झालेल्या श्रेष्ठ नदीच्या उदकाने - शिवः - शंकर - शिवः - पवित्र - अभूत् - झाला - तत् - त्या चरणकमळाचे - ध्यातुः - ध्यान करणार्‍या पुरुषाच्या - मनःशमलशैलनिंसृष्टवज्रम् - मनातील पापरूपी पर्वतावर टाकलेले वज्रच अशा - भगवतः - श्रीहरीच्या - चरणारविन्दम् - चरणकमळाचे - चिरम् - चिरकाल - ध्यायेत् - ध्यान करावे ॥२२॥
(प्रथम) भगवंतांच्या चरणकमलांचे ध्यान करावे. ती वज्र, अंकुश,ध्वज आणि कमल या मंगल चिह्नांनी युक्त आहेत. तसेच ती आपल्या उंच व लाल-लाल शोभामय नखचंद्रमंडलाच्या चंद्रिकेने भक्तांच्या हृदयातील अज्ञानरूप घोर अंधकार दूर करतात. ही चरणकमले धुतलेल्या पाण्यापासूनच जी नद्यांमधील श्रेष्ठ गंगा नदी प्रगट झाली होती, तिचे पवित्र जल मस्तकावर धारण केल्यामुळे श्रीमहादेव अधिक मंगलमय झाले. ती ध्यान करणार्‍यांसाठी पापरूप पर्वतावर सोडलेल्या इंद्राच्या वज्राप्रमाणे आहेत. भगवंतांच्या अशा चरणकमलांचे चिरकालपर्यंत चिंतन करावे. (२१-२२)


जानुद्वयं जलजलोचनया जनन्या
     लक्ष्म्याखिलस्य सुरवन्दितया विधातुः ।
ऊर्वोर्निधाय करपल्लवरोचिषा यत्
     संलालितं हृदि विभोरभवस्य कुर्यात् ॥ २३ ॥
त्या पिंढर्‍या नि गुडघे मग ध्यानि घ्यावे
    ज्यासीच घे कमलनेत्रि स्व‌अंक भागी ।
लक्ष्मी स्वयें, नित जिला सुर वंदितात
    ती मानिते सुख पदा नित चेपण्यात ॥ २३ ॥

अखिलस्य - सर्व जगाला - विधातुः - उत्पन्न करणार्‍या ब्रह्मदेवाची - जनन्या - माता अशा - जलजलोचनया - कमळाप्रमाणे आहेत नेत्र जिचे अशा
(नंतर) भवभयहारी, अजन्मा श्रीहरीच्या दोन्ही पिंडर्‍या तसेच गुडघ्यांचे ध्यान करावे, ज्यांना विश्वविधाता ब्रह्मदेवाची माता, सुरांनी वंदिलेली कमललोचना लक्ष्मी आपल्या मांडयावर ठेवून आपल्या कांतिमान हातरूप पल्लवांनी हळुवारपणे चुरत असते. (२३)


ऊरू सुपर्णभुजयोरधि शोभमानौ
     वोजोनिधी अतसिकाकुसुमावभासौ ।
व्यालम्बिपीतवरवाससि वर्तमान
     काञ्चीकलापपरिरम्भि नितम्बबिम्बम् ॥ २४ ॥
मांड्याहि त्या मग मनीं स्मरणे सतेज
    कांती जया जवसपुष्प सुनील ऐसी ।
वाही गरुड सबळे निजपृष्ठभागी
    आलिंगिते करधनी कटिवस्त्र यासी ॥ २४ ॥

सुवर्णभुजयोः अधि - गरुडाच्या खांद्यावर - शोभमानौ - शोभणार्‍या अशा - ओजोनिधी - बलाचा आधार अशा - अतसिकाकुसुमानभासौ - जवसाच्या फुलाप्रमाणे शोभायमान अशा - ऊरु - मांड्याचे - च - आणि - व्यालम्बिपीतवरवाससि - घोट्यापर्यंत लोंबणार्‍या पिवळ्या उंची वस्त्राच्या ठिकाणी - वर्तमानकाञ्चीकलापपरिरम्भनितम्बबिम्बम् - असलेल्या कमरपट्ट्याने परिवेष्ठित अशा कटिप्रदेशाचे - ध्यायेत् - ध्यान करावे ॥२४॥
अळशीच्या फुलाप्रमाणे नीलवर्ण आणि बलवान अशा, गरुडाच्या खांद्यावर शोभणार्‍या भगवंतांच्या मांडयाचे ध्यान करावे. त्यानंतर ज्यावर सोन्याचा कमरपट्टा शोभत आहे. अशा टाचेपर्यंत नेसलेल्या पीतांबराने आच्छादित नितंबाचे ध्यान करावे. (२४)


नाभिह्रदं भुवनकोशगुहोदरस्थं
     यत्रात्मयोनिधिषणाखिललोकपद्मम् ।
व्यूढं हरिन्मणिवृषस्तनयोरमुष्य
     ध्यायेद् द्वयं विशदहारमयूखगौरम् ॥ २५ ॥
सर्वास आश्रय अशी उदरास नाभी
    ब्रह्म्यास आश्रय असे कमलो विशोभे ।
पाचूसमान मग ते ते स्तनही स्मरावे
    हारें गळ्यात गमते जणु गौरकांती ॥ २५ ॥

अमुष्य - श्रीहरीच्या - यत्र - ज्या नाभिरूपडोहाच्या ठिकाणी - आत्मयोनिधिषणाखिललोकपद्मम् - ब्रह्मदेवाचे स्थान असे संपूर्ण लोकरूपी कमल - व्यूढम् - उत्पन्न झाले - तत् - त्या - भुवनकोशगुहोदरस्थम् - भुवनांच्या समुदायाचे अधिष्ठान जे उदर त्याच्या ठिकाणी असलेल्या अशा - नाभिहृदम् - नाभिरूप डोहाचे - च - आणि - विशदहारमयूखगोरम् - स्वच्छ हाराच्या किरप्पांमुळे गौरवर्ण अशा - हरिन्मणिवृषस्तनयोः - पाचेच्या उत्तम मण्यांप्रमाणे जे स्तन त्यांच्या - व्दयम् - जोडीचे - ध्यायेत् - ध्यान करावे ॥२५॥
नंतर जेथून ब्रह्मदेवाला आधारभूत सर्वलोकमय कमळ प्रगट झाले अशा, संपूर्ण लोकांचे आश्रयस्थान असलेल्या भगवंतांच्या पोटावर असणार्‍या नाभिसरोवराचे ध्यान करावे. नंतर प्रभूंच्या श्रेष्ठ अशा पाचूच्या मण्याप्रमाणे असणार्‍या दोन्ही स्तनांचे चिंतन करावे. जे वक्षःस्थळावर पडलेल्या शुभ्र मोत्यांच्या हाराच्या किरणांमुळे गौरवर्णाचे दिसतात. (२५)


वक्षोऽधिवासमृषभस्य महाविभूतेः
     पुंसां मनोनयननिर्वृतिमादधानम् ।
कण्ठं च कौस्तुभमणेरधिभूषणार्थं
     कुर्यान्मनस्यखिल लोकनमस्कृतस्य ॥ २६ ॥
लक्ष्मीच जेथ वसते ययि वक्षभाग
    लोकास दे‌इ सुख मोद पुन्हा स्मरावे ।
कौस्तुभ रत्न विभवे भगवंतकंठी
    रत्नां सतेज करण्या करितो स्विकार ॥ २६ ॥

ऋषभस्य - श्रेष्ठ अशा श्रीहरीच्या - महाविभूतैः - महालक्ष्मीचे - अधिवासम् - वसतिस्थान अशा - पुंसाम् - पुरुषांच्या - मनोनयननिर्वृतिम् - मन व नेत्र यांच्या आनंदाला - आदधानम् - उत्पन्न करणार्‍या अशा - वक्षः - वक्षःस्थलाला - च - आणि - अखिललोकनमस्कृतस्य - संपूर्ण लोकांनी नमस्कार केलेल्या अशा श्रीहरीच्या - कौस्तुभमणिः - कौस्तुभमण्याच्या - अधिभुषणार्थम् - अतिशय शोभा आणणार्‍या अशा - कण्ठम् - कंठाला - मनासि - अंतःकरणात - कुर्यात् - करावे ॥२६॥
यानंतर महालक्ष्मीचे निवासस्थान आणि लोकांचे मन व नेत्रांना आनंद देणार्‍या पुरुषोत्तम भगवंतांच्या वक्षःस्थळाचे ध्यान करावे. मग सर्व लोकांना वंदनीय भगवंतांच्या कौस्तुभमण्याला सुशोभित करणार्‍या गळ्याचे चिंतन करावे. (२६)


बाहूंश्च मन्दरगिरेः परिवर्तनेन
     निर्णिक्तबाहुवलयान् अधिलोकपालान् ।
सञ्चिन्तयेद् दशशतारमसह्यतेजः
     शङ्खं च तत्करसरोरुहराजहंसम् ॥ २७ ॥
चारी भुजहि मग त्या स्मरणात घ्याव्या
    ज्यांच्या मुळेचि सगळे स्थिर लोकपाल ।
ती कंकणे मथनि जाहलि जे उजाळ
    तेजाळ चक्र बघणे मग अंगुलीत ।
हंसापरी धवल शंख नि ताम्र पद्म
ऐशा भुजाचि प्रभुच्या स्मरणात घ्याव्या ॥ २७ ॥

मन्दरगिरेः - मंदर पर्वताच्या - परिवर्तनेन - सभोवार फिरण्याने - निर्णिक्तबाहुवलयान् - उज्ज्वल झालेली आहेत दंडातील वलये ज्यातील अशा - अधिलोकपालान् - आश्रय केलेला आहे लोकपालांनी ज्याचा अशा - बाहून् - भुजांचे - च - आणि - असह्यतेजः - सहन करण्यास अशक्य आहे तेज ज्यांचे अशा - दशशतारम् - सहस्त्र रवे असलेल्या सुदर्शनचक्राचे - च - आणि - तत्करसरोरुहराजहंसम् - त्या श्रीहरीच्या करकमलावर राजहंसाप्रमाणे शोभणार्‍या अशा - शंखम् - शंखाचे - संचिन्तयेत् - ध्यान करावे ॥२७॥
समस्त लोकपालांना आश्रयभूत अशा भगवंतांच्या चारी भुजांचे ध्यान करावे. ज्यामध्ये धारण केलेले कंकण इत्यादी अलंकार समुद्रमंथनाच्या वेळी मंदर पर्वताच्या घुसळण्याने अधिकच तेजस्वी झाले आहेत. तसेच ज्याचे तेज असह्य आहे, त्या सहस्त्र आर्‍यांच्या सुदर्शन चक्राचे आणि त्यांच्या करकमळात राजहंसाप्रमाणे विराजमान असणार्‍या शंखाचे चिंतन करावे. (२७)


कौमोदकीं भगवतो दयितां स्मरेत
     दिग्धामरातिभटशोणितकर्दमेन ।
मालां मधुव्रतवरूथगिरोपघुष्टां
     चैत्यस्य तत्त्वममलं मणिमस्य कण्ठे ॥ २८ ॥
धाली विपक्ष रुधिरे स्मरणे गदा ती
    गुंजायमान वनमाळ तशी स्मरावी ।
जे निर्मळत्व सकळा प्रतिरुप ऐसे
    कौस्तूभरत्न मग ते स्मरणी पहावे ॥ २८ ॥

अरातिभटशोणितकर्दमेन - शत्रूंकडील वीरांच्या रक्ताच्या चिखलाने - दिग्धाम् - भरलेल्या अशा - भगवतः - श्रीहरीच्या - दयिताम् - प्रिय अशा - कौमोदकीम् - कौमोदकीनामक गदेचे - मधुव्रतवरूथगिरा - भ्रमरसमूहाच्या गुंजारवाने - उपघुष्टाम् - नादयुक्त झालेल्या - मालाम् - मालेचे - च - आणि - अस्य - ह्या श्रीहरीच्या - कण्ठे - कण्ठातील - चैत्यस्य - जीवाचे - तत्त्वम् - तत्त्वस्वरूप अशा - अमलम् मणिम् - निर्मळ कौस्तुभ मण्याचे - स्मरेत् - स्मरण करावे ॥२८॥
मग प्रभूच्या शत्रूंच्या रक्ताने माखलेल्या आवडत्या कौ‌मोदकी गदेचे, भ्रमरांच्या गुंजारवाने निनादित वनमालेचे आणि त्यांच्या कंठातील सुशोभित अशा सर्व जीवांच्या निर्मलतत्त्वरूप कौस्तुभमण्याचे ध्यान करावे. (२८)


भृत्यानुकम्पितधियेह गृहीतमूर्तेः
     सञ्चिन्तयेद् भगवतो वदनारविन्दम् ।
यद्विस्फुरन् मकरकुण्डलवल्गितेन ।
     विद्योतितामलकपोलमुदारनासम् ॥ २९ ॥
भक्तास वृष्टि करण्या बहु त्या कृपेचे
    साकार रुप प्रभुचे मुख नित्य ध्यावे ।
ती नासिका निटस कुंडल मत्स्य ऐसे
    गालासि जे दिपविती गमती असे ते ॥ २९ ॥

भृत्यानुकम्पितधिया - भक्तांवरील दयेने उत्पन्न झालेल्या बुद्धीने - इह - ह्या जगात - गृहीतमूर्तेः - धारण केला आहे अवतार ज्याने अशा - भगवतः - श्रीहरीच्या - यत् - जे मुखकमल - विस्फुरन्मकरकुण्डलवल्गितेन - चकचकीत अशा मकरावर कुण्डलांच्या हालण्याच्या योगाने - विद्योतितामलकपोलम् - शोभायमान आहेत निर्मल असे गाल ज्यातील असे - अस्ति - आहे - तत् - त्या
त्यानंतर भक्तांवर कृपा करण्यासाठीच येथे साकाररूप धारण करणार्‍या श्रीहरींच्या सुडौल नासिकेने शोभणार्‍या आणि झगमगणार्‍या मकरकुंडलांच्या हलण्याने अतिशय चमकणारे निर्मळ गाल असणार्‍या मुखकमलाचे ध्यान करावे. (२९)


यच्छ्रीनिकेतमलिभिः परिसेव्यमानं
     भूत्या स्वया कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् ।
मीनद्वयाश्रयमधिक्षिपदब्जनेत्रं
     ध्यायेन् मनोमयमतन्द्रित उल्लसद्‍भ्रु ॥ ३० ॥
काळा कुरुळ कचभार मुखास शोभे
    त्या कंज भृंग हि द्वया जणु लाजवीती।
पद्मावरी उडति मीन असेचि नेत्र
त्यागोनि आळस मनी भृकुटी स्मराव्या ॥ ३० ॥

यत् - जे - स्वया भूत्या - आपल्या शोभेने - अलिभिः - भ्रमरांनी - परिसेव्यमानम् - सेविले जाणारे असे - मीनव्दयाश्रयम् - दोन मत्स्यांना आश्रयभूत असे - कुटिलकुन्तलवृन्दजुष्टम् - कुरळ्या केसांच्या झुबक्याने युक्त असे - श्रीनिकेतम् - लक्ष्मीचे निवासस्थान जे कमळ त्याला - अधिक्षिपत् - तिरस्कार करणारे - अस्ति - आहे - तत् - त्या - उल्लसद्‌भ्रु - शोभायमान आहेत भुवया ज्यावर अशा - मनोमयम् - मनात प्रगट होणार्‍या अशा - अब्जनेत्रम् - कमलासारख्या नेत्रांचे - अतन्द्रितः - आलस्यरहित अशा योग्याने - ध्यायेत् - ध्यान करावे ॥३०॥
काळ्याभोर कुरळ्या केसांनी मंडित असे मुखकमल आपल्या सौंदर्याने भ्रमरांनी सेवन केलेल्या व माशाच्या जोडीने युक्त अशा कमलपुष्पाला सुद्धा फिके करीत आहे, अशा उन्नत भुवयांनी सुशोभित असणार्‍या भगवंतांच्या मनोहर मुखारविंदाची मनामध्ये धारणाकरून उत्साहाने त्याचे ध्यान करावे.(३०)


तस्यावलोकमधिकं कृपयातिघोर
     तापत्रयोपशमनाय निसृष्टमक्ष्णोः ।
स्निग्धस्मितानुगुणितं विपुलप्रसादं
     ध्यायेच्चिरं विपुलभावनया गुहायाम् ॥ ३१ ॥
गुंफेत त्या हृदयि ध्यावि अनंत दृष्टी
    कृपा नि प्रेमभरि स्मीत क्षणाक्षणाला ।
वृष्टी करी निजजना बहुही कृपेची
    हारी त्रिताप करि शांत असेचि ब्रीद ॥ ३१ ॥

तस्य - त्या श्रीहरीच्या - अधिकं कृपया - अतिशय दयेच्या योगाने - अतिघोरतापत्रयोपशमनाय - अत्यन्त भयंकर अशा तापत्रयाच्या शान्तीसाठी - निसृष्टम् - फेकलेल्या अशा - स्निग्धस्मितानुगुणितम् - सुंदर हास्याने युक्त अशा - विपुलप्रसादम् - पुष्कळ आहे प्रसाद ज्यामध्ये अशा - अक्ष्णोः अवलोकम् - नेत्रकटाक्षाचे - विपुलभावनया - विपुल भावनेच्या योगाने - गुहायाम् - अन्तःकरणात - चिरम् - चिरकाल - ध्यायेत् - ध्यान करावे ॥३१॥
भगवंतांच्या कृपापूर्ण हास्ययुक्त अमर्याद प्रसादाचा वर्षाव करणार्‍या आणि भक्तजनांच्या अत्यंत घोर अशा तिन्ही तापांना शांत करण्यासाठीच प्रगट झालेल्या दृष्टीचे भक्तिभावाने अंतःकरणात दीर्घकाळ ध्यान करावे. (३१)


हासं हरेरवनताखिललोकतीव्र
     शोकाश्रुसागरविशोषणमत्युदारम् ।
सम्मोहनाय रचितं निजमाययास्य
     भ्रूमण्डलं मुनिकृते मकरध्वजस्य ॥ ३२ ॥
भक्तास तो बरसतो मग प्रेम अश्रू
    जेणे मिटले मनिचा मग शोक सारा ।
मीनापरीच भुवया उडवी हितास
भक्ता, नि मोहवियण्यासचि कामदेवा ॥ ३२ ॥

हरेः - श्रीहरीच्या - अवनताखिललोकतीव्रशोकाश्रुसागरविशोषणम् - नम्र अशा सर्व लोकांचा भयंकर असा जो शोक त्यामुळे उद्भवणार्‍या अश्रूंच्या सागराला आटविणार्‍या अशा - अत्युदारम् - अतिशय सुंदर अशा - हासम् - हास्याचे - च - आणि - अस्य - ह्या श्रीहरीच्या - मुनिकृते - मुनीसाठी - निजमायया - आपल्या मायेच्या योगाने - मकरध्वजस्य - मदनाच्या - संमोहनाय - मोहाकरिता - रचितम् - रचिलेल्या अशा - अस्य - ह्या श्रीहरीच्या - भ्रूमण्डलम् - भ्रुकुटिमंडलाचे - ध्यायेत् - ध्यान करावे ॥३२॥
श्रीहरींचे हास्य शरणागत भक्तांच्या शोकाने उत्पन्न होणार्‍या अश्रूंना सुकविते. तसेच मुनिजनांच्या हितासाठी कामदेवाला मोहित करण्यासाठीच श्रीहरींनी आपल्या मायेने रचलेल्या विशाल भुवयांचे ध्यान करावे. (३२)


ध्यानायनं प्रहसितं बहुलाधरोष्ठ
     भासारुणायिततनुद्विजकुन्दपङ्‌क्ति ।
ध्यायेत्स्वदेहकुहरेऽवसितस्य विष्णोः
     भक्त्यार्द्रयार्पितमना न पृथग्दिदृक्षेत् ॥ ३३ ॥
प्रेमार्द्रभाव धरुनी प्रभु हासताना
    दंतावली चमकते अधरोष्ठ यांत ।
ध्यावा असाचि मनि तन्मय हो‌उनीया
ज्याच्या शिवाय मग कांहि न पाहि दृष्टी ॥ ३३ ॥

स्वदेहकुहरे - आपल्या देहातील हृदयकाशामध्ये - अवसितस्य - प्रकट होणार्‍या अशा - विष्णोः - विष्णूच्या - बहुलाधरोष्ठभासा - पुष्कळ अशा अधरोष्ठाच्या कान्तीने - अरुणायिततनुव्दिजकुन्दपङ्क्ति - आरक्त वर्ण अशा बारीक दन्तरूपी कुन्दाच्या कळ्यांची रांग ज्यामध्ये आहे अशा - ध्यानायनम् - ध्यानाचे विषय अशा - प्रहसितम् - हास्याचे - ध्यायेत् - ध्यान करावे - आर्द्रया भक्त्या - प्रेमयुक्त भक्तियोगाने - अर्पितमनाः - अर्पण केले आहे मन ज्याने असा - पृथक् - दुसरीकडे - न दिदृक्षेत् - पहाण्याची इच्छा करू नये ॥३३॥
ध्यानासाठी योग्य, तसेच ओठांवरील अत्यधिक लालसर रंगामुळे कुंदकळ्यांसारख्या शुभ्र छोटया छोटया दातांवर लाली शोभणार्‍या, आपल्या हृदयात विराजमान असणार्‍या श्रीहरींच्या खळखळून हसण्याचे अत्यंत प्रेमाने ध्यान करावे. अशा प्रकारे ध्यानात तन्मय होऊन त्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ पाहाण्याची इच्छा करू नये. (३३)


एवं हरौ भगवति प्रतिलब्धभावो
     भक्त्या द्रवद्‌धृदय उत्पुलकः प्रमोदात् ।
औत्कण्ठ्यबाष्पकलया मुहुरर्द्यमानः
     तच्चापि चित्तबडिशं शनकैर्वियुङ्क्ते ॥ ३४ ॥
ध्याता असाचि हरि साधक प्रेमि होतो
    रोमांच अंगि उठुनी हृदयो द्रवोनी ।
प्रेमाश्रुस्नान घडते तनुसी तयाला
    मासा गळास गवसे हरिलाभ तैसा ॥ ३४ ॥

एवम् - याप्रमाणे - भगवति - ऐश्वर्यसंपन्न अशा - हरौ - श्रीहरीच्या ठिकाणी - प्रतिलब्धभावः - मिळविले आहे प्रेम ज्याने असा - भक्त्या - भक्तीच्या योगाने - द्रवद्धृदयः - द्रवलेले आहे हृदय ज्याचे असा - प्रमोदात् - अत्यानंदामुळे - उत्पुलकः - उत्पन्न झालेले आहेत रोमाञ्च ज्याचे ठिकाणी असा - च - आणि - औत्कण्‌ठ्यबाष्पकलया - औत्सुक्याने उत्पन्न झालेल्या आनन्दाश्रूंनी - मुहुः - वारंवार - अर्घमानः - सद्‌गदित झालेला असा - मुनिः - मुनि - तत् - त्या - चित्तबडिशम् अपि - चित्तरूपी गळालासुद्धा - वियुङ्क्ते - सोडवितो ॥३४॥
अशा प्रकारे ध्यानाच्या अभ्यासाने साधकाचे श्रीहरींविषयी प्रेम उत्पन्न होते. त्याचे हृदय भक्तीने भरून येते. आनंदातिरेकाने शरीर रोमांचित होऊ लागते. उत्कंठाजनित प्रेमाश्रूंच्या धारांत तो वारंवार आपल्या शरीराला न्हाऊ घालतो आणि नंतर मासे पकडण्याच्या गळाप्रमाणे श्रीहरींना आपल्याकडे आकर्षित करण्याचे साधन असलेल्या आपल्या चित्तालाही हळू हळू ध्येय वस्तूपासून बाजूला सारतो. (३४)


मुक्ताश्रयं यर्हि निर्विषयं विरक्तं
     निर्वाणमृच्छति मनः सहसा यथार्चिः ।
आत्मानमत्र पुरुषोऽव्यवधानमेकम्
     अन्वीक्षते प्रतिनिवृत्तगुणप्रवाहः ॥ ३५ ॥
संपोनि वात विझते जशि ज्योत दीपी
    तैसेचि ते विषयराग शमोनि जाती ।
देहादि भान हरपे मग कोण ध्याता
    ध्येयादि सर्व विरुनी हरिरुप होई ॥ ३५ ॥

विरक्तम् - आसक्तिरहित असे - मुक्ताश्रयम् - टाकलेला आहे आश्रय ज्याने असे - मनः - अन्तःकरण - निर्वाणम् - मोक्षाला - ऋच्छति - प्राप्त होते - तदा - त्या वेळी - यथा - ज्याप्रमाणे - अर्चिः - ज्वाला - तथा - त्याप्रमाणे - पुरुषः - पुरुष - प्रतिनिवृत्तगुणप्रवाहः - दूर आहेत सत्त्वादि गुणांचे देह आदिकरून प्रवाह ज्याचे असा - सहसा - एकाएकी - अत्र - ह्या स्थितीत - एकम् - एकट्या - अव्यवधानम् - अखण्ड अशा - आत्मानम् - परमात्म्याला - अन्वीक्षते - अवलोकन करितो ॥३५॥
जसे तेल संपल्यानंतर दिव्याची ज्योत आपल्या कारणरूप तेजतत्त्वामध्ये लीन होऊन जाते. त्याचप्रमाणे आश्रय, विषय, आणि आसक्तिरहित होऊन मन शांत ब्रह्माकार होते. ही अवस्था प्राप्त झाल्यावर जीव गुणप्रवाहरूप देहादी उपाधीपासून वेगळा झाल्यामुळे एका परमात्म्यालाच सगळीकडे व्यापून असलेला पाहतो. (३५)


सोऽप्येतया चरमया मनसो निवृत्त्या
     तस्मिन् महिम्न्यवसितः सुखदुःखबाह्ये ।
हेतुत्वमप्यसति कर्तरि दुःखयोर्यत्
     स्वात्मन्विधत्त उपलब्धपरात्मकाष्ठः ॥ ३६ ॥
अज्ञान सर्व सरते मग योग योगे
    निवृत्त वृत्ति भरुनी स्थिररुप होई ।
जो भोग सर्व अपुले मनि नीज पाहे
    जो भोग सर्व अपुले बघतो अविद्यी ॥ ३६ ॥

सः अपि - तो साधकदेखील - एतया - ह्या - चरमया - शेवटच्या - मनसः - अंतःकरणाच्या - निवृत्या - निवृत्तीने - तस्मिन् - त्या - सुखदुःखबाह्ये - सुख व दुःख यांच्या पलीकडे असलेल्या अशा - महिम्नि - ब्रह्मस्वरूपात - अवसितः - लय पावलेला असा - उपलब्धपरात्मकाष्ठः - प्रत्यक्ष केले आहे आत्मस्वरूप ज्याने असा - यत् - जे - दुःखयोः - सुख व दुःख यांचे - हेतुत्वम् - भोक्तृत्व - स्वात्मन् - आपल्या आत्म्याच्या ठिकाणी - आसीत् - होते - तत् - ते - अपि - देखील - असति - अविद्येने उत्पन्न केलेल्या अशा - कर्तरि - अहंकाराच्या ठिकाणी - विधत्ते - करितो ॥३६॥
योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या चित्ताची अविद्यारहित लयरूप निवृत्ती झाल्याने आपल्या सुख-दुःखविरहित ब्रह्मरूप स्थितीत स्थिर होऊन परमात्मतत्त्वाचा साक्षात्कार करून घेतल्यावर तो योगी, ज्या सुख-दुःख भोगण्याला प्रथम अज्ञानाने आपले स्वरूप समजत होता, त्याला आता तो अविद्यारूपी अहंकारात पाहातो. (३६)


देहं च तं न चरमः स्थितमुत्थितं वा
     सिद्धो विपश्यति यतोऽध्यगमत्स्वरूपम् ।
दैवादुपेतमथ दैववशादपेतं
     वासो यथा परिकृतं मदिरामदान्धः ॥ ३७ ॥
दारु पिताचि मग वस्त्र कुठे गळाले
    नाही स्मरे मग तसी हरपेचि शुद्ध ।
सिद्धास नाहि सुखदुःख जरी फिरे तो
    आनंदरुप स्थिर तो विचरे जगात ॥ ३७ ॥

यथा - ज्याप्रमाणे - मदिरामदान्धः - मदिरेच्या मदाने धुन्द झालेला असा पुरुष - परिकृतम् - नेसलेल्या - वासः - वस्त्राला - न पश्यति - पहात नाही - तथा - त्याप्रमाणे - चरमः सिद्धः - पूर्ण स्थितीतील सिद्ध पुरुष - स्थितम् - बसलेल्या अशा - उत्थितम् - उठून उभ्या राहिलेल्या अशा - च - आणि - दैवात् - प्रारब्धामुळे - अपेतम् - दूर झालेल्या अशा - अथवा - किंवा - दैववशात् - दैवयोगाने - उपेतम् - प्राप्त झालेल्या अशा - तम् - त्या - देहम् - देहाला - न पश्यति - पहात नाही - यतः - कारण - सः - तो सिद्ध - स्वरूपम् - आपल्या स्वरूपात - अध्यगमत् - प्राप्त झाला ॥३७॥
जसे मदिरेने धुंद झालेल्या पुरुषाला आपल्या कमरेवरच्या वस्त्राची शुद्ध राहात नाही, तसे अंतिम अवस्थेला प्राप्त झालेल्या योग्यालाही आपल्या देहाचे उठणे-बसणे किंवा दैववशात कुठे जाणे किंवा परत येणे याविषयी काहीच ज्ञान नसते. कारण तो परमानंदमय स्वरूपात स्थिर असतो. (३७)


देहोऽपि दैववशगः खलु कर्म यावत्
     स्वारम्भकं प्रतिसमीक्षत एव सासुः ।
तं सप्रपञ्चमधिरूढसमाधियोगः
     स्वाप्नं पुनर्न भजते प्रतिबुद्धवस्तुः ॥ ३८ ॥
प्रारब्ध देइ तनु ही अन भोग तैसे
    ते सर्व भोग सरता मग त्यागितो ती ।
लाभे जयास असला मग सिद्ध योग
    पुत्रादि सर्व गमती परके तयाला ॥ ३८ ॥

यावत् - जोपर्यंत - स्वारम्भकम् - देहाच्या उत्पत्तीचे कारण असे - कर्म - कर्म - अस्ति - असते - तावत् - तोपर्यंत - दैववशगः - दैवाच्या अधीन असलेला असा - सासुः - इन्द्रियांसहित - देहः - देह - अति - देखील - खलु - निश्चयाने - प्रतिसमीक्षते एव - जिवंत असतोच - अधिरूढसमाधियोगः - सिद्ध झाला आहे समाधियोग ज्याचा असा - प्रतिबुद्धवस्तुः - जाणिलेले आहे आत्मतत्त्व ज्याने असा पुरुष
त्याचे शरीर पूर्वजन्मींच्या संस्कारांच्या अधीन असते. म्हणून जोपर्यंत त्याचे पूर्वीचे प्रारब्ध शिल्लक आहे, तोपर्यंत तो इंद्रियांसह जिवंत असतो; परंतु ज्याला समाधिपर्यंत योगाची स्थिती प्राप्त झाली आहे आणि ज्याने परमात्मतत्त्वाला चांगल्याप्रकारे जाणले आहे, तो सिद्धपुरुष सार्‍या प्रपंचासह या शरीराचा स्वप्नात जाणवणार्‍या शरीराप्रंमाणे पुन्हा स्वीकार करीत नाही.(पुन्हा त्यात ‘मी-माझेपण’ ठेवीत नाही.) (३८)


(अनुष्टुप्)
यथा पुत्राच्च वित्ताच्च पृथङ्‌मर्त्यः प्रतीयते ।
अप्यात्मत्वेनाभिमताद् देहादेः पुरुषस्तथा ॥ ३९ ॥
( अनुष्टुप्‌ )
धनासी गुंतता जीव बुद्धीने भ्रम नष्ट तो ।
शरीरा बघतो तैसा परके ज्ञानि पूरुष ॥ ३९ ॥

यथा - ज्याप्रमाणे - आत्मत्वेन - आपलेपणाने - अभिमतात् अपि - मान्य असलेल्या अशाहि - पुत्रात् - पुत्रापासून - च - आणि - वित्तात् - द्रव्यापासून - मर्त्यः - मनुष्य - पृथक् - निराळा - प्रतीयते - समजला जातो - तथा - त्याप्रमाणे - देहादेः - देहादिकापासून - पुरुषः - द्रष्टा - पृथक् प्रतीयते - निराळा समजला जातो ॥३९॥
जसे (अत्यंत स्नेहामुळे) पुत्र आणि धनामध्ये वाटणारा आपलेपणा विचारांती नाहीसा होऊन मनुष्य त्यांच्यापासून स्वतःला वेगळा मानतो, त्याप्रमाणे योगी ज्या देहाला आपला आत्मा मानत होता, त्यापेक्षा आपण वेगळाच असल्याचे जाणतो. (३९)


यथोल्मुकाद् विस्फुलिङ्गाद् धूमाद्वापि स्वसम्भवात् ।
अप्यात्मत्वेनाभिमताद् यथाग्निः पृथगुल्मुकात् ॥ ४० ॥
भूतेन्द्रियान्तःकरणात् प्रधानात् जीवसंज्ञितात् ।
आत्मा तथा पृथग्द्रष्टा भगवान् ब्रह्मसंज्ञितः ॥ ४१ ॥
काष्ठासी पेटतो अग्नी काष्ठ अग्नीच भासते ।
विचार करिता अग्नी-काष्ठही वेगळे गमे ॥ ४० ॥
भूत इंद्रीय चित्ताचा आत्मा तै साक्षिभूतची ।
ब्रह्मही भिन्न त्याचेनी सर्वांचा स्वामि तो हरी ॥ ४१ ॥

यथा - ज्याप्रमाणे - आत्मत्वेन - आपलेपणाने - अभिमतात् अपि - मान्य असलेल्या अशाहि - उल्मुकात् - कोलीताहून - विस्फुलिङ्गात् - ठिणग्यांहून - वा - किंवा - स्वसंभवात् - आपल्यापासून उत्पन्न झालेल्या अशा - धूमात् अपि - धूमाहून देखील - अग्निः - अग्नि - पृथक् - वेगळा असतो - यथा - ज्याप्रमाणे - उल्मुकात् - विझविलेल्या काष्ठाहून - पृथक् - निराळा - अस्ति - असतो ॥४०॥ तथा - त्याप्रमाणे - भूतेन्द्रियान्तःकरणात् - भूते, इन्द्रिये व अन्तःकरण यांहून - जीवसंज्ञितात् - जीव हे नाव असलेल्या पुरुषाहून - च - आणि - प्रधानात् - प्रकृतीहून - द्रष्टा - पहाणारा पुरुष - च - आणि - ब्रह्मसंज्ञितः - ब्रह्म हे नाव ज्याचे आहे असा - भगवान् - प्रकृतीचा प्रवर्तक पुरुष - पृथक् - निराळा - अस्ति - आहे ॥४१॥
जसे कोलीत,ठिणगी किंवा स्वतःपासून उत्पन्न झालेला धूर तसेच अग्निरूप झालेले लाकूड यांहून अग्नी वेगळा आहे, त्याचप्रमाणे भूत, इंद्रिये, अंतःकरण, जीव आणि प्रकृती यांहून साक्षी असलेला ब्रह्मसंज्ञक पुरुषोत्तम वेगळा आहे. (४०-४१)


सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षेतान् अन्यभावेन भूतेष्विव तदात्मताम् ॥ ४२ ॥
जसे सर्वचि ते प्राणी पंचभूतात्म जन्मती ।
तसेचि सर्व जीवांना पाहतो आत्मरुप तो ॥ ४२ ॥

भूतेषु - भूतांच्या ठिकाणी - तदात्मताम् इव - महाभूतस्वरूपतेला जसे तसे - अनन्यभावेन - अनन्यभक्तीने - सर्वभूतेषु - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी - आत्मानम् - आत्मस्वरूपाला - च - आणि - सर्वभूतानि - सर्व प्राण्यांना - आत्मनि च - आत्मस्वरूपाच्या ठिकाणी - ईक्षेत - पहावे ॥४२॥
जसे देहदृष्टीने जरायुज, अंडज, स्वेदज, आणि उद्‌भिज्ज चारी प्रकारचे प्राणी पंचभूतमात्र आहेत, तसेच संपूर्ण जीवांमध्ये आत्म्याला आणि आत्म्यामध्ये सर्व जीवांना अनन्यभावाने व्यापलेले पाहावे. (४२)


स्वयोनिषु यथा ज्योतिः एकं नाना प्रतीयते ।
योनीनां गुणवैषम्यात् तथात्मा प्रकृतौ स्थितः ॥ ४३ ॥
आश्रये अग्नि जै भिन्न रुपात दिसतो तसा ।
आत्माही वेगळा भासे सुरासुर मनुष्यिही ॥ ४३ ॥

यथा - ज्याप्रमाणे - एकम् - एक - ज्योतिः - अग्नि - योनीनाम् - प्रगट होण्याचे कारण जी काष्ठे त्यांच्या - गुणवैषम्यात् - गुणभेदामुळे - स्वयोनिषु - आपले उत्पत्तिकारण जी काष्ठे त्यांच्या ठिकाणी - नाना - अनेक प्रकारचा - प्रतीयते - दिसला जातो - तथा - त्याप्रमाणे - प्रकृतौ - देहामध्ये - स्थितः - असलेला - आत्मा - आत्मा - नाना प्रतीयते - अनेक प्रकारचा भासतो ॥४३॥
जसा एकच पक्षी निरनिराळ्या लाकडांत त्यांच्या वेगळेपणामुळे निरनिराळ्या आकाराचा दिसतो, तसेच देव-मनुष्यादी शरीरात राहाणारा एकच आत्मा आपल्या आश्रयांच्या गुणभेदामुळे भिन्न-भिन्न प्रकारचा भासतो. (४३)


तस्माद् इमां स्वां प्रकृतिं दैवीं सदसदात्मिकाम् ।
दुर्विभाव्यां पराभाव्य स्वरूपेणावतिष्ठते ॥ ४४ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां
तृतीयस्कंधे अष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥
भगवंत कृपेने तो माया त्याचीच सारुनी ।
खर्‍या त्या स्वरुपा मध्ये ब्रह्मरुपचि होतसे ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥
॥ अठ्ठाव्विसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २८ ॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

तस्मात् - म्हणून - इमाम् - ह्या - दुर्विभाव्याम् - जाणण्यास अशक्य अशा - सदसदात्मिकाम् - कार्यकारणस्वरूपाच्या - स्वाम् - आपल्या - दैवीम् - विष्णूस्वरूप अशा - प्रकृतिम् - प्रकृतीला - पराभाव्य - जिंकून - स्वरूपेण - आपल्या स्वरूपाने - अवतिष्ठते - रहातो ॥४४॥
म्हणून भगवंतांचा भक्त, जीवाच्या स्वरूपाला झाकणार्‍या कार्यकारणरूपाने परिणामाला प्राप्त झालेल्या भगवंतांच्या या अचिंत्य शक्तिमय मायेला भगवंतांच्या कृपेनेच जिंकून आपल्या वास्तविक स्वरूपात-ब्रह्मरूपात स्थित होतो. (४४)


स्कंध तिसरा - अध्याय अठ्ठाविसावा समाप्त

GO TOP