|
श्रीमद् भागवत पुराण
प्रकृतिपुरुषयोर्विवेकद्वारा मोक्षप्राप्तिवर्णनं भक्तियोगेन प्रकृतेस्तिरोधानकथनं च - प्रकृति-पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीभगवानुवाच -
प्रकृतिस्थोऽपि पुरुषो नाज्यते प्राकृतैर्गुणैः । अविकारात् अकर्तृत्वात् निर्गुणत्वाज्जलार्कवत् ॥ १ ॥
श्री भगवान म्हणाले - ( अनुष्टुप् ) भानुचा नच संबंध प्रति बिंबी जळातल्या । सुखदुःखादि धर्मांचा आत्म्याचा तनुसी तसा ॥ १ ॥
प्रकृतिस्थः अपि - देहात रहाणारा असूनही - पुरुषः - जीव - निर्गुणत्वात् - निर्गुण असल्यामुळे - अकर्तृत्वात् - क्रिया करीत नसल्यामुळे - अविकारात् - विकार नसल्यामुळे - जलार्कवत् - पाण्यातील सूर्याप्रमाणे - प्राकृतैः - प्रकृतीच्या - गुणैः - गुणांनी - न अज्यते - लिप्त होत नाही ॥१॥
श्रीभगवान म्हणाले - ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या सूर्याचा पाण्याची शीतलता, चंचलता आदी गुणांशी संबंध येत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीचे कार्य असणार्या शरीरात राहूनही आत्मा त्याच्या सुख-दुःखादी धर्मांनी लिप्त होत नाही. कारण तो निर्विकार, अकर्ता, आणि निर्गुण आहे. (१)
स एष यर्हि प्रकृतेः गुणेष्वभिविषज्जते ।
अहङ्क्रियाविमूढात्मा कर्तास्मीति अभिमन्यते ॥ २ ॥
गुण प्राकृत योगाने परी संबंध स्थापितो । होतो मोहीतऽहोकार कर्ता मी मानु लागतो ॥ २ ॥
यर्हि - जेव्हा - सः एषः - तो हा जीव - प्रकृतेः - देहाच्या - गुणेषु - गुणांच्या ठिकाणी - अभिविषज्जते - आसक्ति ठेवितो - अहंक्रियाविमूढात्मा - अहंकारामुळे मूढ झाले आहे चित्त ज्याचे असा - अहम् - मी - कर्ता - करणारा - अस्मि - आहे - इति - असा - अभिमन्यते - अभिमान बाळगतो ॥२॥
परंतु जेव्हा तो प्रकृतीच्या गुणांशी आपला संबंध जोडतो, तेव्हा अहंकाराने मोहित होऊन ‘मी कर्ता ’असे मानू लागतो. (२)
तेन संसारपदवीं अवशोऽभ्येत्यनिर्वृतः ।
प्रासङ्गिकैः कर्मदोषैः सदसन् मिश्रयोनिषु ॥ ३ ॥
अशा त्या अभिमानाने देह संसर्ग होउनी । कर्माचे दोष घेवोनी भवाच्या चक्रि तो फिरे ॥ ३ ॥
तेन - त्या अभिमानामुळे - अवशः - पराधीन असा - अनिर्वृतः - समाधान नसलेला असा - सः - तो जीव - प्रासङ्गिकैः - आसक्तीने उत्पन्न झालेल्या - कर्मदोषेः - कर्मांच्या दोषांनी - सदसन्मिश्रयोनिषु - उत्तम, अधम व मिश्र अशा योनींमध्ये - संसारपदवीम् - संसारमार्गाला - अभ्येति - प्राप्त होतो ॥३॥
त्यामुळे तो देहाच्या संबंधाने केलेल्या पुण्य-पापरूप कर्मांच्या दोषांमुळे आपले स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो आणि उत्तम, मध्यम, आणि नीच योनींमध्ये जन्म घेऊन संसारचक्रात फिरत राहातो. (३)
अर्थे हि अविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते ।
ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥ ४ ॥
स्वप्नात नसता कांही भय शोकादि भासती । अविद्येने तया जीव निवृत्त कधि होय ना ॥ ४ ॥
हि - कारण - अर्थे अविद्यमाने अपि - विषय नसता देखील - विषयान् - विषयांचे - ध्यायतः - चिन्तन करणार्या अशा - अस्य - ह्या जीवाचा - यथा - ज्याप्रमाणे - स्वप्ने - स्वप्नात - अनर्थागमः - भय इत्यादी अनर्थांची प्राप्ती - भवति - होते - तथा - त्याप्रमाणे - संसृतिः - संसार - न निवर्तते - निवृत्त होत नाही ॥४॥
ज्याप्रमाणे स्वप्नातील भयशोकाचे काहीही कारण नसतानासुद्धा स्वप्नातील पदार्थांशी संबंध जोडल्यामुळे सुख-दुःख भोगावे लागते, त्याचप्रमाणे संसाराचे अस्तित्व नसून सुद्धा अज्ञानाने विषयांचे चिंतन करीत राहिल्याने जीवाची संसारचक्रातून कधी सुटका होत नाही. (४)
अत एव शनैश्चित्तं प्रसक्तं असतां पथि ।
भक्तियोगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम् ॥ ५ ॥
म्हणोनी बुद्धिवंतांनी विषयीं चित्त गुंतता । भक्ति वैराग्य यांच्याने चित्तासी स्थिरणे हळू ॥ ५ ॥
अतः एव - म्हणूनच - असताम् - दुष्ट अशा इंद्रियांच्या - पथि - मार्गात - प्रसक्तम् - अतिशय आसक्त झालेले असे - चित्तम् - अन्तःकरण - तीव्रेण - दृढतर अशा - भक्तियोगेन - भक्तियोगाने - च - आणि - विरक्त्या - वैराग्याने - शनैः - हळूहळू - वशम् - स्वाधीन - नयेत् - करावे ॥५॥
म्हणूनच मनुष्याने विषयचिंतनाच्या मार्गात गुंतलेल्या चित्ताला तीव्र भक्तियोग आणि वैराग्य यांच्या योगाने हळू हळू आपल्या स्वाधीन करून घ्यावे. (५)
यमादिभिः योगपथैः अभ्यसन् श्रद्धयान्वितः ।
मयि भावेन सत्येन मत्कथाश्रवणेन च ॥ ६ ॥ सर्वभूतसमत्वेन निर्वैरेणाप्रसङ्गतः । ब्रह्मचर्येण मौनेन स्वधर्मेण बलीयसा ॥ ७ ॥ यदृच्छयोपलब्धेन सन्तुष्टो मितभुङ् मुनिः । विविक्तशरणः शान्तो मैत्रः करुण आत्मवान् ॥ ८ ॥ सानुबन्धे च देहेऽस्मिन् अकुर्वन् असदाग्रहम् । ज्ञानेन दृष्टतत्त्वेन प्रकृतेः पुरुषस्य च ॥ ९ ॥ निवृत्तबुद्ध्यवस्थानो दूरीभूतान्यदर्शनः । उपलभ्यात्मनात्मानं चक्षुषेवार्कमात्मदृक् ॥ १० ॥ मुक्तलिङ्गं सदाभासं असति प्रतिपद्यते । सतो बन्धुमसच्चक्षुः सर्वानुस्यूतमद्वयम् ॥ ११ ॥
यमादी योगमार्गाने श्रद्धेने चित्त लाविता । माझ्यात भाव ठेवावा कथा माझ्याचि ऐकणे ॥ ६ ॥ सर्वांशी सम ती दृष्टि न वैर नच लोभही । ब्रह्मचर्य तसे मौन स्वधर्मी बळ वाढवी ॥ ७ ॥ मित भोजन संतुष्ट एकांत आवडे तसा । स्वभावी शांत नी मित्र सर्वांसाठी दयाळुही ॥ ८ ॥ धैर्यवान् ज्ञानवान् ऐसा व्यर्थ गर्व न तो करी । बुद्धिच्या वेगळा राही जागाही तो असोनिया ॥ ९ ॥ परमात्म्या बघे नित्य न पाही अन्य कांहिही । आत्मदर्शी मुनी ऐसा सूर्यासी पाहतो जसा ॥ १० ॥ हृदयी शुद्ध होवोनी साक्षात्कारचि पावतो । त्याला ते लाभले जाणा ब्रह्मपदचि जीवनी ॥ ११ ॥
यमादिभिः - यमनियमप्रभृति - योगपथैः - योगमार्गांनी - अभ्यसन् - अभ्यास करणारा असा - श्रद्धया - श्रद्धेने - अन्वितः - युक्त असा - मयि - माझ्या ठिकाणी - सत्येन - दृढ अशा - भावेन - भक्तीने - च - आणि - मत्कथाश्रवणेन - माझ्या कथांच्या श्रवणाने ॥६॥ सर्वभूतसमत्वेन - सर्व प्राण्यांवरील समतेच्या योगाने - निर्वैरेण - निर्वैराच्या योगाने - अप्रसङ्गतः - विषयासक्तीच्या शून्यतेच्या योगाने - ब्रह्मचर्येण - ब्रह्मचर्यव्रताच्या योगाने - मौनेन - मौनव्रताच्या योगाने - च - आणि - बलीयसा - अतिशय बलवान अशा - स्वधर्मेण - अधर्माच्या योगाने ॥७॥ यदृच्छया - अनायासाने - उपलब्धेन - मिळालेल्या वस्तूने - संतुष्टः - संतोष पावलेला असा - मितभुक् - अल्प भोजन करणारा असा - मुनिः - मुनि - विविक्तशरणः - एकान्त स्थलाचा आश्रय केला आहे ज्याने असा - शान्तः - गंभीर असा - मैत्रः - सर्वत्र मित्रभाव ठेवणारा असा - करुणः - दयाळू असा - आत्मवान् - आत्मसंयमन् करणारा असा ॥८॥ च - आणि - सानुबन्धे - परिवार युक्त अशा - अस्मिन् - ह्या - देहे - देहावर - असदाग्रहम् - मीपणाच्या आसक्तीला - अकुर्वन् - न करणारा असा - प्रकृतेः - प्रकृतीचा - च - आणि - पुरुषस्य - पुरुषाचा - दृष्टतत्त्वेन - पाहिलेला आहे खरेपणा ज्याने अशा - ज्ञानेन - ज्ञानाने ॥९॥ निवृत्तबुद्धयवस्थानः - निवृत्त झाल्या आहेत जाग्रत् आदिकरून अवस्था ज्याच्या असा - दूरीभूतान्यदर्शनः - दूर झालेली आहे भेददृष्टि ज्याची असा - चक्षुषा - नेत्राने - अर्कम् - सूर्याला - इव - जसे तसे - आत्मना - जीवात्म्याच्या योगाने - आत्मानम् - परमात्म्याला - उपलभ्य - जाणून - आत्मदृक् - परमात्म्याला पहाणारा असा ॥१०॥ मुक्तलिङ्गम् - टाकलेली आहे उपाधि ज्याने अशा - असति - मिथ्याभूत अहंकाराच्या ठिकाणी - सदाभासम् - सद्रूपाने भासणार्या अशा - सतो - प्रकृतीचे - बन्धुम् - अधिष्ठान अशा - असच्चक्षुः - प्रपञ्चाला चक्षूप्रमाणे प्रकाशित करणार्या अशा - सर्वानुस्यूतम् - सर्व पदार्थांच्या ठिकाणी व्यापून राहिलेल्या अशा - अव्दयम् - परिपूर्ण अशा ब्रह्माला - प्रतिपद्यते - प्राप्त होतो ॥११॥
यम इत्यादी योगसाधनांच्या द्वारा श्रद्धापूर्वक चित्ताला वारंवार एकाग्र करीत माझ्यामध्ये खरीखुरी भक्ती ठेवणे, माझ्या कथा श्रवण करणे, सर्व प्राण्यांविषयी समभाव ठेवणे, कोणाशी वैर न करणे, आसक्तीचा त्याग करणे, ब्रह्मचर्य, मौनव्रत, आणि निष्ठेने केलेल्या स्वधर्माचरणाने, प्रारब्धानुसार जे काही मिळते त्यात संतुष्ट राहण्याने,शरीररक्षणाला आवश्यक तितकेच भोजन करण्याने,नेहमी एकांतात राहण्याने, शांत स्वभावाने, सर्वांचा मित्र बनून दयाळू व धैर्यवान राहण्याने, प्रकृती आणि पुरुषाच्या वास्तविक स्वरूपाच्या अनुभवाने प्राप्त झालेल्या तत्त्वज्ञानामुळे स्त्री-पुत्रादी संबंधितांसह या देहाबद्दल मी-माझे असा खोटा अभिमान धारण न करण्याने, बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थांपासून अलिप्त राहण्याने, तसेच परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू न पाहण्याने, आत्मदर्शी मुनी डोळ्यांनी सूर्य पाहावा तसा आपल्या शुद्ध अंतःकरणाने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो, आणि जे देहादी उपाधींपासून वेगळे, अहंकारादी, खोटया गोष्टीमध्ये सत्यरूपाने भासणारे जगाचे कारण असलेल्या प्रकृतीचे अधिष्ठान, महदादी कार्यवर्गाचे प्रकाशक आणि कार्य-कारणरूप संपूर्ण पदार्थांमध्ये व्यापलेले आहे, त्या अद्वितीय ब्रह्मपदाला प्राप्त होतो. (६-११)
यथा जलस्थ आभासः स्थलस्थेनावदृश्यते ।
स्वाभासेन तथा सूर्यो जलस्थेन दिवि स्थितः ॥ १२ ॥ एवं त्रिवृद् अहङ्कारो भूतेन्द्रियमनोमयैः । स्वाभासैः लक्षितोऽनेन सदाभासेन सत्यदृक् ॥ १३ ॥ भूतसूक्ष्मेन्द्रियमनो बुद्ध्यादिष्विह निद्रया । लीनेष्वसति यस्तत्र विनिद्रो निरहङ्क्रियः ॥ १४ ॥
प्रतिबिंबे जळातील सूर्याचे ज्ञान होतसे । भिंतीसी दिसते तो तो भ्रमची केवलो असे ॥ १२ ॥ दिसे तसा अहंकार मन देह नि इंद्रियी । अहंकारात ईशाचे होतसे आत्मदर्शन ॥ १३ ॥ सुषुप्तीच्याहि निद्री जो लोपला मन इंद्रिये । अव्याकृता मधेही जो जागतो निर्विकार तो ॥ १४ ॥
यथा - ज्याप्रमाणे - जलस्थः - पाण्यात पडलेले - आभासः - सूर्याचे प्रतिबिम्ब - स्थलस्थेन - पृथ्वीवर असलेल्या - स्वाभासेन - सूर्यप्रतिबिम्बाच्या योगाने - अवदृश्यते - जाणले जाते - तथा - त्याप्रमाणे - जलस्थेन - पाण्यात असलेल्या - स्वाभासेन - सूर्यप्रतिबिम्बाच्या योगाने - दिवि - आकाशात - स्थितः - असलेला - सूर्यः - सूर्य - अवदृश्यते - जाणिला जातो ॥१२॥ एवम् - याप्रमाणेच - भूतेन्द्रियमनोमयैः - भूते, इन्द्रिये व मन यांच्या स्वरूपाच्या - स्वाभासैः - अहंकाराच्या प्रतिबिम्बांनी - त्रिवृत् - तीन प्रकारचा - अहंकारः - अहंकार - लक्षितः भवति - लक्षित होतो - सदाभासेन - ब्रह्माचा आहे आभास ज्यामध्ये अशा - अनेन - ह्या अहंकाराने - सत्यदृक् - सत्य आहे ज्ञान ज्याचे असा आत्मा - लक्षितः (भवति) - लक्षित होतो ॥१३॥ इह असति - ह्या नसल्यासारख्या प्रकृतीच्या ठिकाणी - निद्रया - निद्रेच्या योगाने - भूतसूक्ष्मेन्द्रियमनोबुद्ध्यादिषुलिनेषु - महाभूते, सूक्ष्मभूते, इन्द्रिये व मन, बुद्धि इत्यादिक लय पावली असता - तत्र - त्या वेळी - विनिद्रः - निद्रारहित असा - निरहंकारः - अहंकाररहित असा ॥१४॥
ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब भिंतीवर पडलेल्या कवडशामुळे पाहिले जाते आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबामुळे आकाशातील सूर्याचे ज्ञान होते, त्याप्रमाणे वैकारिक आदी भेदांमुळे तीन प्रकारचा अहंकार, देह, इंद्रिय आणि मन यांत असलेल्या आपल्या प्रतिबिंबामुळे जाणला जातो आणि पुन्हा परमात्म्याच्या प्रतिबिंबामुळे त्या अहंकाराच्या द्वारा सत्यज्ञानस्वरूप त्या परमात्म्याचे दर्शन होते. जो गाढ झोपेत शब्दादी सूक्ष्म भूते, इंद्रिये, मनबुद्धी इत्यादी प्रकृतीत लीन झालेल्यावेळी स्वतः जागा राहतो आणि सर्वथा अहंकारशून्य असतो. (१२-१४)
मन्यमानस्तदात्मानं अनष्टो नष्टवन्मृषा ।
नष्टेऽहङ्करणे द्रष्टा नष्टवित्त इवातुरः ॥ १५ ॥
पडता भ्रम जीवाला जन्ममृत्यूत सापडे । धनार्थ जै रडे जीव अज्ञानी बरळे तसा ॥ १५ ॥
तदा - त्या वेळी - अहङ्करणे नष्टे - अहंकार नष्ट झाला असता - अनष्ट (अपि) - नाश पावलेला नसून सुद्धा - द्रष्टा - पाहणारा आत्मा - नष्टवित्तः - नष्ट झाले आहे धन ज्याचे अशा - आतुरः इव - दुःखी मनुष्याप्रमाणे - आमानम् - आपल्याला - मृषा - व्यर्थ - नष्टवत् - नष्ट झाल्याप्रमाणे - मन्यमानः - मानणारा असा ॥१५॥
ज्याप्रमाणे धनाचा नाश झाल्यानंतर मनुष्य आपणच नष्ट झालो असे मानून अत्यंत व्याकूळ होतो, त्याचप्रमाणे हा द्रष्टा आत्मासुद्धा सुषुप्ती-अवस्थेत आपल्या उपाधिभूत अहंकाराचा नाश झाल्याकारणाने भ्रमाने आपणच नष्ट झालो, असे समजतो. (१५)
एवं प्रत्यवमृश्यादौ आत्मानं प्रतिपद्यते ।
साहङ्कारस्य द्रव्यस्य योऽवस्थानमनुग्रहः ॥ १६ ॥
माते गे सर्व गोष्टींचे विवेके आत्मदर्शन । करिता तो अहंकार तत्वांचे स्थान तेजची ॥ १६ ॥
एवम् - याप्रमाणेच - प्रत्यवमृश्य - विचार करून - साहंङ्कारस्य - अहंकारासहित अशा - द्रव्यस्य - कार्यकारणसमूहाचा - अनुग्रहः - प्रकाशक असा - यः - जो - अवस्थानम् - पहाणारा - अस्ति - आहे - असौ - हा विचारी पुरुष - तम् - त्या - आत्मानम् - आत्म्याला - प्रतिपद्यते - प्राप्त होतो ॥१६॥
या सर्व गोष्टींचे मनन करून विवेकी पुरुष जो अहंकारासहित सर्व तत्त्वांचे अधिष्ठान आणि प्रकाशक आहे, त्या आपल्या आत्म्याचा अनुभव घेतो. (१६)
देवहूतिरुवाच -
पुरुषं प्रकृतिर्ब्रह्मन् न विमुञ्चति कर्हिचित् । अन्योन्यापाश्रयत्वाच्च नित्यत्वाद् अनयोः प्रभो ॥ १७ ॥
देवहूती म्हणाली- प्रकृती पुरुषो दोघे आश्रये ती परस्परा । म्हणून प्रकृती त्याला न राहे सोडुनी कधी ॥ १७ ॥
ब्रह्मन् - ब्रह्मस्वरूप अशा - प्रभो - हे प्रभो कपिला ! - एतयोः - ह्या माया पुरुषांना - अन्योन्याश्रयत्वात् - परस्परांचा आश्रय असल्यामुळे - च - आणि - नित्यत्वात् - नित्य असल्यामुळे - कर्हिचित - केव्हाही - प्रकृतिः - माया - पुरुषम् - पुरुषाला - न विमुञ्चति - सोडीत नाही ॥१७॥
देवहूतीने विचारले - प्रभो ! पुरुष आणि प्रकृती दोन्हीही नित्य आणि एकमेकांच्या आश्रयाने राहाणारी आहेत. म्हणून प्रकृती तर पुरुषाला कधीच सोडू शकत नाही. (१७)
यथा गन्धस्य भूमेश्च न भावो व्यतिरेकतः ।
अपां रसस्य च यथा तथा बुद्धेः परस्य च ॥ १८ ॥
ब्रह्मन्! गंध नि ती पृथ्वी रस नी जळ वेगळे । न होती कधि ते जैसे तसे पुरुष प्रकृती ॥ १८ ॥
यथा - ज्याप्रंमाणे - गन्धस्य - गन्धाचा - च - आणि - भूमेः - पृथ्वीचा - यथा - ज्याप्रमाणे - अपाम् - पाण्याचा - च - आणि - रसस्य - रसाचा - व्यतिरेकतः - भिन्न भिन्नपणे - भावः न - अस्तित्व नाही - तथा - त्याप्रमाणे - बुद्धेः - प्रकृतीचे - च - आणि - परस्य - पुरुषाचे - व्यतिरेकतः भावः न - भिन्नपणे अस्तित्व नाही ॥१८॥
जसे गंध आणि पृथ्वी, रस आणि पाणी ही एकमेकांपासून वेगळी राहात नाहीत, त्याचप्रमाणे पुरुष आणि प्रकृतीसुद्धा एक-दुसर्याला सोडून राहात नाहीत. (१८)
अकर्तुः कर्मबन्धोऽयं पुरुषस्य यदाश्रयः ।
गुणेषु सत्सु प्रकृतेः कैवल्यं तेष्वतः कथम् ॥ १९ ॥
जिच्या योगे पुरुषाला कर्मबंधन लाभते । प्रकृतीत अशा त्याला कैवल्य लाभणे कसे ॥ १९ ॥
अकर्तुः - क्रिया न करणार्या अशा - पुरुषस्य - पुरुषाला - यदाश्रयः - जे गुण आहेत आश्रय ज्याचे असा - अयम् - हा - कर्मबन्धः - संसार - अस्ति - आहे - तेष प्रकृतेः गुणेषु सत्सु - ते प्रकृतीचे गुण अस्तित्वात असता - अतः - यास्तव - कैवल्यम् - मोक्ष - कथम् - कसा - पुरुषस्य प्राप्नुयात् - पुरुषाला प्राप्त होईल ॥१९॥
म्हणून जिच्या आश्रयाने अकर्त्या पुरुषाला हे कर्मबंधन प्राप्त झाले आहे, त्या प्रकृतीचे गुण शिल्लक असताना पुरुषाला कैवल्यपद कसे प्राप्त होईल ? (१९)
क्वचित् तत्त्वावमर्शेन निवृत्तं भयमुल्बणम् ।
अनिवृत्तनिमित्तत्वात् पुनः प्रत्यवतिष्ठते ॥ २० ॥
तत्वांनी चिंतिता चित्ती नासेल भव बंधही । तरी फिरोनि मायेने तयाचे भय संभवे ॥ २० ॥
क्वचित् - काही ठिकाणी - तत्त्वावमर्शेन - तत्त्वांच्या विचाराने - निवृत्तम् - निवृत्त झालेले - उल्बणम् - प्रचण्ड - भयम् - संसारभय - अनिवृत्तनिमित्तत्त्वात् - कारणाची निवृत्ति नसल्यामुळे - पुनः - पुनः - प्रत्यवतिष्ठते - उत्पन्न होते ॥२०॥
जरी तत्त्वांचा विचार केल्याने एखादे वेळी हे संसारबंधनाचे तीव्र भय नाहीसे झाले, तरी त्याला कारण असणार्या प्रकृतीच्या गुणांचा नाश न झाल्याने ते भय पुन्हा उपस्थित होऊ शकते. (२०)
श्रीभगवानुवाच -
अनिमित्तनिमित्तेन स्वधर्मेणामलात्मना । तीव्रया मयि भक्त्या च श्रुतसम्भृतया चिरम् ॥ २१ ॥ ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येण बलीयसा । तपोयुक्तेन योगेन तीव्रेणात्मसमाधिना ॥ २२ ॥ प्रकृतिः पुरुषस्येह दह्यमाना त्वहर्निशम् । तिरोभवित्री शनकैः अग्नेर्योनिरिवारणिः ॥ २३ ॥
श्री भगवान् म्हणाले - काष्ठारणी निघे अग्नी अरणी भस्म होतसे । तसे निष्काम भावाने स्वधर्म पाळता पुढे ॥ २१ ॥ तत्वाचे ज्ञान भक्तीने वैराग्य लाभते तया । तदा नित्य तया लागे ईशाचे ध्यान अंतरी ॥ २२ ॥ निवांत साधने द्वारे चित्त एकाग्र होतसे । अविद्या लोपते सारी पुढे ती क्षीण होउनी ॥ २३ ॥
अनिमित्तनिमित्तेन - फल नाही हेतु ज्याचा अशा - स्वधर्मेण - स्वधर्माच्या योगाने - अमलात्मना - निर्मल अंतःकरणाने - च - आणि - चिरम् - पुष्कळ कालपर्यंत - श्रुतसंभृतया - श्रवणाने वाढलेल्या अशा - तीव्रया - दृढ अशा - मयि - माझ्या ठिकाणी - भक्त्या - भक्तीच्या योगाने ॥२१॥ दृष्टतत्त्वेन - पाहिलेला आहे यथार्थ स्वरूप ज्यामध्ये अशा - ज्ञानेन - ज्ञानाच्या योगाने - बलीयसा - अतिशय प्रबल अशा - वैराग्येण - वैराग्याच्या योगाने - तपोयुक्तेन - तपश्चर्येने युक्त अशा - योगेन - अष्टाङ्गयोगाने - च - आणि - तीव्रेण - प्रबल अशा - आत्मसमाधिना - चित्ताच्या एकाग्रतेच्या योगाने ॥२२॥ अहर्निशम् - दिवसरात्रीत - शनैः - हळूहळू - दह्यमाना - क्षीण होत गेलेली अशी - पुरुषस्य - पुरुषाची - प्रकृतिः - प्रकृति - अग्नेः - अग्नीला - योनिः - उत्पन्न करणार्या अशा - अरणिः इव - अरणि नावाच्या काष्ठाप्रमाणे - इह - ह्या पुरुषाच्या ठिकाणी - तिरोभवित्री - नाहीशी होणारी - भवति - होते ॥२३॥
श्रीभगवान म्हणाले - ज्याप्रमाणे अग्नीचे उत्पत्तिस्थान असलेले लाकूड आपणच उत्पन्न केलेल्या अग्नीपासून जळून भस्म होते, त्याचप्रमाणे निष्कामभावाने केलेल्या स्वधर्मपालनाने अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे, पुष्कळ काळपर्यंत भगवत्कथा श्रवणामुळे वाढलेल्या माझ्या तीव्र भक्तीने, तत्त्वसाक्षात्कार करणार्या ज्ञानाने, प्रबळ वैराग्याने, व्रतनियमादींसह केलेल्या ध्यानाभ्यासाने आणि चित्ताच्या प्रगाढ एकाग्रतेने पुरुषाची प्रकृती रात्रंदिवस क्षीण होत होत हळू हळू नाहीशी होते. (२१-२३)
भुक्तभोगा परित्यक्ता दृष्टदोषा च नित्यशः ।
नेश्वरस्याशुभं धत्ते स्वे महिम्नि स्थितस्य च ॥ २४ ॥
भक्तांनी भोगिता माया भक्तियोगेचि त्यागिता । मुक्त त्या पुरुषांलागी मायेचे कांहि ना चले ॥ २४ ॥
भुक्तभोगा - भोगिलेले आहेत भोग जिचे अशी - नित्यशः - नेहमी - च - आणि - दृष्टदोषा - पाहिलेले आहेत दोष जिचे अशी - परित्यक्ता - टाकलेली अशी - सा - ती प्रकृति - स्वे महिम्नि - आत्मानंदात - स्थितस्य - असलेल्या अशा - च ईश्वरस्य - आणि स्वतंत्र अशा पुरुषाचे - अशुभम् - अकल्याण - न धत्ते - करीत नाही ॥२४॥
नंतर नेहमी दोष दिसल्याने भोगून त्यागलेली ती प्रकृती आपल्या स्वरूपात स्थित आणि स्वतंत्र असलेल्या त्या पुरुषाचे काहीही बिघडवू शकत नाही. (२४)
यथा हि अप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्वनर्थभृत् ।
स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते ॥ २५ ॥ एवं विदिततत्त्वस्य प्रकृतिर्मयि मानसम् । युञ्जतो नापकुरुत आत्मारामस्य कर्हिचित् ॥ २६ ॥
स्वप्नीच्या त्या अनर्थांना स्वप्नात भोगिले तरी । होता जागृत त्याचा तो जसा मोह मुळी नुरे ॥ २५ ॥ तत्वज्ञान असे होता माझ्यात रमतो सदा । प्रकृती त्यास कांहीही सतावेना मुळी कधी ॥ २६ ॥
हि - कारण - यथा - ज्याप्रमाणे - प्रस्वापः - स्वप्न - अप्रतिबुद्धस्य - निजलेल्या पुरुषाला - बह्वनर्थभृत - अनेक अनर्थ उत्पन्न करणारे - अस्ति - असते - सः एव - तेच स्वप्न - प्रतिबुद्धस्य - जागा झालेल्या पुरुषाला - मोहाय - मोहासाठी - वै - खरोखर - न कल्पते - समर्थ होत नाही ॥२५॥ एवम् - याप्रमाणे - प्रकृतिः - माया - विदिततत्त्वस्य - जाणिलेली आहेत तत्त्वे ज्याने अशा - मयि - माझ्या ठिकाणी - मानसम् - अंतःकरण - युञ्जन् - स्थिर करणार्या अशा - आत्मारामस्य - आत्मस्वरूपात रममाण होणार्या अशा पुरुषाचा - कर्हिचित् - केव्हाहि - न अपकुरुते - अपकार करीत नाही ॥२६॥
ज्याप्रमाणे निद्रिस्त पुरुषाला स्वप्न कितीही अनर्थाचा अनुभव देत असले तरी जाग आल्यावर त्याला ते कोणत्याही प्रकारे मोह उत्पन्न करीत नाही. त्याचप्रमाणे ज्याला तत्त्वज्ञान झाले आहे आणि जो नेहमी माझ्यामध्येच मन लावून राहतो, त्या आत्माराम मुनीचे प्रकृती काहीही बिघडवू शकत नाही. (२५-२६)
यदैवमध्यात्मरतः कालेन बहुजन्मना ।
सर्वत्र जातवैराग्य आब्रह्मभुवनान्मुनिः ॥ २७ ॥
जन्मोजन्मी असे नित्य आत्मचिंतनि राहता । तेंव्हा त्या पुरुषालागी ब्रह्मलोकहि तुच्छ तो ॥ २७ ॥
यदा - ज्या वेळी - एवम् - याप्रमाणे - बहुजन्मना - पुष्कळ आहेत जन्म ज्यामध्ये अशा - कालेन - कालाने - अध्यात्मरतः - आत्मस्वरूपात रत असलेला असा - मुनिः - मुनि - आब्रह्मभवनात् - ब्रह्मलोक सुद्धा - सर्वत्र - सर्व ठिकाणी - जातवैराग्यः - उत्पन्न झाले आहे वैराग्य ज्याला असा ॥२७॥
जेव्हा मनुष्य अनेक जन्मांमध्ये पुष्कळ काळापर्यंत अशा प्रकारे आत्मचिंतनातच निमग्न राहातो, तेव्हा त्याला ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व प्रकारच्या भोगांविषयी वैराग्य निर्माण होते. (२७)
मद्भक्तः प्रतिबुद्धार्थो मत्प्रसादेन भूयसा ।
निःश्रेयसं स्वसंस्थानं कैवल्याख्यं मदाश्रयम् ॥ २८ ॥ प्राप्नोतीहाञ्जसा धीरः स्वदृशा च्छिन्नसंशयः । यद्गत्वा न निवर्तेत योगी लिङ्गाद् विनिर्गमे ॥ २९ ॥
माझ्याकृपे अशा भक्ता ज्ञाने संशय ना उरे । मुक्त तो होउनी जातो लिंगदेहास नष्टि तो ॥ २८ ॥ एकट्या आश्रयी माझ्या कैवल्यधाम पावतो । पुन्हा तो कधि ना येई भवाचा लेश ना उरे ॥ २९ ॥
मद्भक्तः - माझा भक्त - प्रतिबुद्धार्थः - जाणिलेले आहे आत्मतत्त्व ज्याने असा - भवति - होतो - तदा - तेव्हा - धीरः - गंभीर असा - स्वदृशा - आत्मज्ञानाने - छिन्नसंशयः - नष्ट झाले आहेत संशय ज्याचे असा - इह - ह्या ठिकाणी - भूयसा - अत्युत्तम अशा - मत्प्रसादेन - माझ्या अनुग्रहाने - कैवल्याख्यम् - मोक्ष नावाचे - स्वसंस्थानम् - देहादिव्यतिरिक्त स्वतःचे रूप अशा - मदाश्रयम् - मी आहे आधार ज्याचा अशा - निःश्रेयसम् - निरतिशयानन्दस्वरूपाला - अञ्जसा - सहज - प्राप्नोति - प्राप्त होतो - योगी - योगाभ्यासी - यत् - ज्याला - गत्वा - प्राप्त होऊन - लिङ्गात् विनिर्गमे - लिङ्गदेहातून पार पडल्यावर - न निवर्तेत - परत येत नाही ॥२८-२९॥
माझा तो धैर्यवान भक्त माझ्याच मोठया कृपेने तत्त्वज्ञान आत्मसात करून आत्मानुभावाने सर्व संशयातून मुक्त होतो आणि पुन्हा लिंगदेहाचा नाश झाल्यावर एकमात्र माझाच आश्रय असणार्या आपल्या स्वरूपभूत कैवल्यसंज्ञा असणार्या माझ्या त्या मंगलमय पदाला सहजच प्राप्त करून घेतो. तेथे गेल्यानंतर योगी पुन्हा संसारात येत नाही. (२८-२९)
यदा न योगोपचितासु चेतो
मायासु सिद्धस्य विषज्जतेऽङ्ग । अनन्यहेतुष्वथ मे गतिः स्याद् आत्यन्तिकी यत्र न मृत्युहासः ॥ ३० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥
( इंद्रवज्रा ) योगेचि सिद्धी जरि प्राप्त होती त्यांच्यात योगी जर ना फसे तो । तेंव्हा तयाला अविनाश ऐसे लाभेचि ते स्थान न मृत्युही त्यां ॥ ३० ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ ॥ सत्ताविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
अङ्ग - हे माते - यदा - ज्यावेळी - सिद्धस्य - सिद्धीच्या ठिकाणी - न विषज्जते - आसक्त होत नाही - अथ - तेव्हाच - यत्र - ज्या गतीच्या ठिकाणी - मृत्युहासः - मृत्यूचे हास्य - न - नाही - सा - ती - मे - माझी - आत्यन्तिका - अत्यंत श्रेष्ठ अशी - गतिः - गति - स्यात् - प्राप्त होते ॥३०॥
हे माते, जर योग्याचे चित्त योगसाधनेमुळे वृद्धिंगत झालेल्या आणि ज्यांच्या प्राप्तीसाठी योगाखेरीज दुसरे साधन नाही अशा मायामय अणिमादी सिद्धींमध्ये अडकून पडले नाही, तर त्याला माझे ते अविनाशी पद प्राप्त होते, तेथे मृत्यूचे काहीच चालत नाही. (३०)
स्कंध तिसरा - अध्याय सत्ताविसावा समाप्त |