श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
षड्‌विंशोऽध्यायः

महदादि तत्त्वानां उत्पत्तिनिरूपणं सद्धर्मवर्णनं च -

महदादी विविध तत्त्वांच्या उत्पत्तीचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
अथ ते सम्प्रवक्ष्यामि तत्त्वानां लक्षणं पृथक् ।
यद्विदित्वा विमुच्येत पुरुषः प्राकृतैर्गुणैः ॥ १ ॥
श्री भगवान म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
आता मी सांगतो तुम्हा प्रकृती आदि सर्वची ।
विविधी लक्षणे यांनी मनुष्य मुक्त होतसे ॥ १ ॥

अथ - आता - ते - तुला - तत्त्वानाम् - तत्त्वांचे - पृथक् - वेगवेगळे - लक्षणम् - लक्षण - प्रवक्ष्यामि - सांगतो - यत् - ज्याला - विदित्वा - जाणून - पुरुषः - मनुष्य - प्राकृतैः - प्रकृतीसंबंधी - गुणैः - गुणांपासून - विमुच्येत - मुक्त होईल ॥१॥
श्रीभगवान म्हणाले - आता मी तुला प्रकृती इत्यादी सर्व तत्त्वांचे वेगवेगळे लक्षण सांगतो, जे जाणल्याने मनुष्य प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो. (१)


ज्ञानं निःश्रेयसार्थाय पुरुषस्यात्मदर्शनम् ।
यदाहुर्वर्णये तत्ते हृदयग्रन्थिभेदनम् ॥ २ ॥
आत्मदर्शन हे ज्ञान पुरुषां मोक्ष साधन ।
अहंता भेदणे त्याने त्याचे वर्णन सांगतो ॥ २ ॥

आत्मदर्शनम् - आत्म्याचे दर्शन करविणारे - हृदयग्रन्थिभेदनम् - हृदयातील अहंकाराच्या ग्रंथीला तोडणारे - यत् - जे - ज्ञानम् - ज्ञान - पुरुषस्य - पुरुषाच्या - निःश्रेयसार्थाय - मोक्षाकरिता - आहुः - म्हणतात - तत् - ते ज्ञान - ते - तुला - वर्णये - सांगतो ॥२॥
आत्मदर्शनरूप ज्ञानच पुरुषाच्या मोक्षाला कारण आहे आणि तेच त्याच्या अहंकाररूप हृदयग्रंथीचे छेदन करणारे आहे, असे पंडित म्हणतात. अशाच ज्ञानाचे मी तुला यापुढे वर्णन करून सांगतो. (२)


अनादिरात्मा पुरुषो निर्गुणः प्रकृतेः परः ।
प्रत्यग्धामा स्वयंज्योतिः विश्वं येन समन्वितम् ॥ ३ ॥
ज्याच्याने व्यापले विश्व आणि तैसे प्रकाशते ।
अनादी निर्गुणी ऐसा प्रकृतीहूनि वेगळा ॥
पुरुष तोचि तो आत्मा हृदयी स्फुरतो तसा ।
स्वयंप्रकाश तो नित्य ऐसे रुप तया असे ॥ ३ ॥

पुरुषः - पुरुषरूप - आत्मा - आत्मा - प्रत्यग्धामा - अन्तर्ज्ञानरूप - अनादिः - अनादि - प्रकृतेः - प्रकृतीहून - परः - निराळा - निर्गुणः - गुणरहित - स्वयं ज्योतिः - स्वयंप्रकाश - अस्ति - आहे - येन - ज्या आत्म्याच्या योगाने - समन्वितम् - युक्त असे - विश्वम् - जग - प्रकाशते - प्रकाशित होते ॥३॥
हे सर्व विश्व ज्याच्यामुळे व्याप्त होऊन प्रकाशित होते, तो आत्मा म्हणजेच पुरुष होय. तो अनादी, निर्गुण, प्रकृतीच्या पलीकडील, अंतःकरणात स्फुरणारा व स्वयंप्रकाशी आहे. (३)


स एष प्रकृतिं सूक्ष्मां दैवीं गुणमयीं विभुः ।
यदृच्छयैवोपगतां अभ्यपद्यत लीलया ॥ ४ ॥
अशा त्या सर्व व्यापिने अव्यक्त त्रिगुणात्मक ।
लीलेने घेतली माया इच्छेने वैष्णवी अशी ॥ ४ ॥

सः एषः - तो हा - विभुः - विश्वव्यापक परमेश्वर - सूक्ष्माम् - अव्यक्त अशा - गुणमयीम् - त्रिगुणात्मक अशा - दैवीम् प्रकृतिम् - विष्णूच्या मायेला - यदृच्छया - सहजगतीने - उपगताम् - प्राप्त झालेल्या अशा - लीलया - लीलेने - अभ्यपद्यत - स्वीकारिता झाला ॥४॥
त्या सर्वव्यापक पुरुषाने लीला-विलासपूर्वक आपल्याजवळ आलेल्या अव्यक्त आणि त्रिगुणात्मक वैष्णवी मायेचा स्वेच्छेने स्वीकार केला आहे. (४)


गुणैर्विचित्राः सृजतीं सरूपाः प्रकृतिं प्रजाः ।
विलोक्य मुमुहे सद्यः स इह ज्ञानगूहया ॥ ५ ॥
गुणांच्या त्या प्रकाराने सृष्टिची निर्मिती करी ।
भुलता नवरुपाला जाहली आत्मविस्मति ॥ ५ ॥

सः - तो परमेश्वर - गुणैः - गुणांनी - सरूपाः - सदृश अशा - विचित्राः - अनेक प्रकारच्या - प्रजाः - प्रजांना - सृजतीम् - उत्पन्न करणार्‍या अशा - प्रकृतिम् - मायेला - विलोक्य - पाहून - इह - ह्या वेळी - ज्ञानगूहया - ज्ञानाला झाकणार्‍या अशा त्या मायेने - सद्यः - तत्काळ - मुमुहे - मोहित झाला ॥५॥
लीलापरायण प्रकृती आपल्या सत्त्वादी गुणांनी त्यांच्यासारख्याच प्रजेची निर्मिती करू लागली, हे पाहून ज्ञान झाकणार्‍या तिच्या आवरणशक्तीने पुरुष तत्काळ मोहित झाला आणि आपल्या स्वरूपाला विसरला. (५)


एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृतेः पुमान् ।
कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते ॥ ६ ॥
या परी स्वरुपाहूनी भिन्न ही प्रकृती परी ।
गुणांनी करिते कर्म स्वरुप मनि तो तिला ॥ ६ ॥

एवम् - याप्रमाणे - पुमान् - पुरुष - प्रकृतेः - मायेच्या - गुणैः - गुणांकडून - कर्मसु क्रियमाणेषु - कर्मे केली जात असता - पराभिध्यानेन - प्रकृतीशी तादाम्य मानिल्याने - आत्मनि - आत्म्याच्या ठिकाणी - कर्तृत्वम् - कर्तृत्व - मन्यते - मानतो ॥६॥
अशा प्रकारे आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीलाच आपले स्वरूप समजल्याने पुरुष, प्रकृतीच्या गुणांकडून केल्या जाणार्‍या कर्मांचा आपणच कर्ता आहोत, असे मानू लागतो. (६)


तदस्य संसृतिर्बन्धः पारतन्त्र्यं च तत्कृतम् ।
भवति अकर्तुरीशस्य साक्षिणो निर्वृतात्मनः ॥ ७ ॥
अकर्ता साक्षि स्वाधीन आनंद रुप पूरुष ।
जाहला बंधना प्राप्त कर्माचा गर्व लाभला ॥ ७ ॥

तत् - कर्तृत्वाच्या अभिमानामुळे - अकर्तुः - काही न करणार्‍या - साक्षिणः - केवळ पुढील खेळ पाहणार्‍या - ईशस्य - सर्वसमर्थ - निर्वृतात्मनः - सुखस्वरूप - अस्य - ह्या पुरुषाला - संसृतिः - संसार - बन्धः - बंधन - च - आणि - तत्कृतम् - त्या बन्धाने उत्पन्न केलेली - पारतन्‌त्र्यम् - परतन्त्रता - भवति - होते ॥७॥
या कर्तृत्वाभिमानामुळेच अकर्ता, स्वाधीन, साक्षी आणि आनंदस्वरूप पुरुषाला जन्म-मृत्युरूप बंधन आणि पारतंत्र्य येते. (७)


कार्यकारणकर्तृत्वे कारणं प्रकृतिं विदुः ।
भोक्तृत्वे सुखदुःखानां पुरुषं प्रकृतेः परम् ॥ ८ ॥
कार्य कारण कर्तृत्वा कर्ता पंडित मानिती ।
सुखःदुखाहुनी न्यारा परी भोक्ताचि मानिती ॥ ८ ॥

कार्यकारणकर्तृत्वे - कार्य, कारण व कर्तृत्व यामध्ये - कारणम् - कारण - प्रकृतिम् - मायेला - सुखदुःखानाम् - सुख व दुःख यांच्या - भोक्तृत्वे - भोगण्यामध्ये - कारणम् - कारण - प्रकृतेः - प्रकृतीहून - परम् - भिन्न अशा - पुरुषम् - पुरुषाला - विदुः - समजतात ॥८॥
कार्यरूप शरीर, कारणरूप इंद्रिये तसेच कर्तारूप इंद्रियाधिष्ठात्या देवता यांना पुरुष जो ‘मी मानतो ’ त्याला प्रकृती हेच कारण आहे, असे पंडित मानतात. तसेच वास्तविक प्रकृतीच्या पलीकडचा असूनही जो प्रकृतीमध्येच राहातो, त्या पुरुषाला सुख-दुःख भोगण्याचे कारण मानले जाते. (८)


देवहूतिरुवाच -
प्रकृतेः पुरुषस्यापि लक्षणं पुरुषोत्तम ।
ब्रूहि कारणयोरस्य सदसच्च यदात्मकम् ॥ ९ ॥
देवहूती म्हणाली -
ज्याचे रुप असे विश्व स्थूल नी सूक्ष्मही असे ।
तसे प्रकृति पुरुषो यांचे लक्षण सांगणे ॥ ९ ॥

पुरुषोत्तम - हे पुरुषश्रेष्ठा - सत् - स्थूल - च - आणि - असत् - सूक्ष्म - यदात्मकम् - ज्याचे स्वरूप - अस्ति - आहे - तयोः - त्या - अस्य - ह्या विश्वाची - कारणयोः - कारणे अशा - प्रकृतेः - प्रकृतीचे - च - आणि - पुरुष्यस्य अपि - पुरुषाचे देखील - लक्षणम् - लक्षण - ब्रूहि - सांग ॥९॥
देवहूती म्हणाली- हे पुरुषोत्तमा, या विश्वातील स्थूल-सूक्ष्म कार्य ज्यांचे स्वरूप आहे. तसेच जे यांचे कारण आहे, ती, प्रकृती आणि पुरुष यांची लक्षणे सुद्धा आपण मला सांगावीत. (९)


श्रीभगवानुवाच -
यत्तत् त्रिगुणमव्यक्तं नित्यं सदसदात्मकम् ।
प्रधानं प्रकृतिं प्राहुः अविशेषं विशेषवत् ॥ १० ॥
श्री भगवान म्हणाले -
त्रिगुणात्मक अव्यक्त कार्य कारण मुक्त तो ।
आश्रयो सर्व धर्माचा प्रकृती नाम तत्व ते ॥ १० ॥

यत् - जे - अविशेषम् - विशेष धर्म ज्यात नाही असे - विशेषवत् - विशेष धर्मांचे आधारभूत असे - त्रिगुणम् - तीन गुण आहेत ज्यामध्ये असे - अव्यक्तम् - कार्यस्वरूप नव्हे असे - सदसदात्मकम् - कार्यकारण आहे स्वरूप ज्याचे असे - नित्यम् - नष्ट न होणारे असे - अस्ति - आहे - तत् - त्या - प्रधानम् - प्रधानाला - प्रकृतिः प्राहुः - प्रकृति समजतात ॥१०॥
श्रीभगवान म्हणाले - जे त्रिगुणात्मक, अव्यक्त, नित्य आणि कार्य-कारणरूप आहे, तसेच अव्यक्त असूनही संपूर्ण व्यक्त पदार्थांचा आश्रय आहे, त्या प्रधान नावाच्या तत्त्वालाच प्रकृती म्हणतात. (१०)


पञ्चभिः पञ्चभिर्ब्रह्म चतुर्भिर्दशभिस्तथा ।
एतत् चतुर्विंशतिकं गणं प्राधानिकं विदुः ॥ ११ ॥
महाभूते नि तन्मात्रा अंतःकरण इंद्रिय ।
चोवीस प्रकृती कार्य मानिती बुद्धिवान्‌ तसे ॥ ११ ॥

पञ्चभिः - पाच तन्मात्रांनी - पञ्चभिः - पाच महाभूतांनी - चतुर्भिः - चार अंतःकरणवृतींनी - तथा - त्याप्रमाणे - दशभिः - दहा इंद्रियांनी - एतच्चतुर्विशतिकम् - ही आहेत चोवीस तत्त्वे ज्यामध्ये अशा - गणम् - समूहाला - प्राधानिकम् - प्रधान कार्यस्वरूप असे - ब्रह्म - ब्रह्म - विदुः - समजतात ॥११॥
पंचमहाभूते, पाच तन्मात्रा, चार अंतःकरणे (मन, बुद्धी, चित्त, आणि अहंकार) आणि दहा इंद्रिये, या चोवीस तत्त्वांच्या समूहाला विद्वान लोक प्रकृतीचे कार्य मानतात. (११)


महाभूतानि पञ्चैव भूरापोऽग्निर्मरुन्नभः ।
तन्मात्राणि च तावन्ति गन्धादीनि मतानि मे ॥ १२ ॥
पृथिवी आप तेजादी महाभूतेहि पाच ते ।
जाणिव गंध रुपादी तन्मात्रा मानिल्या अशा ॥ १२ ॥

महाभूतानि - महाभूते - भूः - पृथ्वी - आपः - पाणी - अग्निः - तेज - मरुत् - वायु - नभः - आकाश - इति - याप्रमाणे - पञ्च एव - पाचच - सन्ति - आहेत - च - आणि - तन्मात्राणि - सूक्ष्मभूते - गन्धादीनि - गंध इत्यादी - तावन्ति - तितकी - मे - मला - मतानि - मान्य - सन्ति - आहेत ॥१२॥
माझ्या मते पृथ्वी, जल, तेज, वायू, आणि आकाश ही पंचमहाभूते व गंध, रस, रूप, स्पर्श, आणि शब्द या त्यांच्या पाच तन्मात्रा आहेत. (१२)


इन्द्रियाणि दश श्रोत्रं त्वग् दृक् रसननासिकाः ।
वाक्करौ चरणौ मेढ्रं पायुर्दशम उच्यते ॥ १३ ॥
त्वचा कान तसे डोळे जीभ नाक नि वाणिही ।
हात पाय उपस्थोनी पाय हे दश इंद्रिये ॥ १३ ॥

इन्द्रियाणि - इन्द्रिये - दश - दहा - श्रोत्रम् - कर्णेन्द्रिय - त्वक् - त्वचा - दृग्रसननासिकाः - दृष्टी, जिव्हा व नासिका - वाक्करौ - वाणी व हात - चरणौ - पाय - मेढ्रम् - शिश्र - दशमः - दहावे - पायुः - गुद - उच्यते - म्हटले जाते ॥१३॥
कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक, (ज्ञानेंद्रिये), वाणी, हात, पाय, शिश्न, आणि गुद (कर्मेंद्रिये) ही दहा इंद्रिये होत. (१३)


मनो बुद्धिरहङ्कारः चित्तमित्यन्तरात्मकम् ।
चतुर्धा लक्ष्यते भेदो वृत्त्या लक्षणरूपया ॥ १४ ॥
बुद्धि चित्त अहंकार मन हे चारि भेद नी ।
चिंता संकल्प निश्चेय गर्व या वृत्ति निर्मिती ॥ १४ ॥

मनः - मन - बुद्धिः - बुद्धि - अहंकारः - अहंकार - चित्तम् - चित्त - इति - याप्रमाणे - अन्तरात्मकम् - अन्तःकरण - चतुर्घा - चार प्रकारचे - अस्ति - आहे - तस्य - त्याचा - भेदः - भेद - लक्षणरूपया - भिन्नताबोधक - वृत्त्या - वृत्तीने - लक्ष्यते - ओळखिला जातो ॥१४॥
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार रूपात असलेले एकच अंतःकरण आपला संकल्प, निश्चय, चिंतन आणि ‘मी ’ ची जाणीव अशा चार प्रकारच्या वृत्तींनी ओळखले जाते. (१४)


एतावानेव सङ्ख्यातो ब्रह्मणः सगुणस्य ह ।
सन्निवेशो मया प्रोक्तो यः कालः पञ्चविंशकः ॥ १५ ॥
या परी ज्ञानवंतांनी ब्रह्माचे सन्निवेष जे ।
चोवीस बोधिली तत्व काल हे पंचवीसवे ॥ १५ ॥

एतावान् एव - एवढाच - संख्यातः - गणना केलेला - सगुणस्य ब्रह्मणः - सगुण ब्रह्माचा - संनिवेशः - समुदाय - अस्ति - आहे - यः - जो - कालः - काल - अस्ति - आहे - सः - तो - पंचविंशकः ह - पंचविसावाच - अस्ति - आहे ॥१५॥
अशा प्रकारे मी सगुण ब्रह्माचा आकारविशेष म्हणून ही चोवीस तत्त्वांची संख्या सांगितली. याखेरीज जो काळ आहे, ते पंचविसावे तत्त्व होय. (१५)


प्रभावं पौरुषं प्राहुः कालमेके यतो भयम् ।
अहङ्कारविमूढस्य कर्तुः प्रकृतिमीयुषः ॥ १६ ॥
वेगळा काल ना कोणी मानिता पंचवीसवा ।
अहंकारचि हा थोर जीवाचे भय मानिती ॥ १६ ॥

एके - कित्येक - कालम् - कालाला - पौरुषम् - ईश्वराचा - प्रभावम् - पराक्रम - आहुः - म्हणतात - यतः - ज्या कालापासून - प्रकृतिम् - मायेला - ईयुषः - प्राप्त झालेल्या अशा - अहंकारविमूढस्य - अहंकाराने मूढ झालेल्या अशा - कर्तुः - जीवाला - भयम् - भय - भवति - होते ॥१६॥
मायेचे कार्य असलेल्या देह इत्यादींना ‘मी ’ मानून आपल्यालाच कर्ता मानणार्‍या जीवालाच ज्याचे भय वाटते, त्या काळाला (वेगळे तत्त्व न मानता) काहीजण ईश्वराची संहारक शक्ती मानतात. (१६)


प्रकृतेर्गुणसाम्यस्य निर्विशेषस्य मानवि ।
चेष्टा यतः स भगवान् काल इत्युपलक्षितः ॥ १७ ॥
प्रकृती गुण साम्याने गती उत्पन्न होतसे ।
सत्य तो भगवान्‌ काल म्हणती पुरुषास त्या ॥ १७ ॥

मानवि - हे मनुकन्ये - निर्विशेषस्य - विशेषधर्मरहित अशा - गुणसाम्यस्य - गुणांची साम्यावस्थास्वरूप अशा - प्रकृतेः - प्रकृतीच्या - चेष्टाः - क्रिया - यतः - ज्यापासून - भवन्ति - होतात - सः - तो - भगवान् - भगवान - कालः - काल - इति उपलक्षितः - असे म्हटला जातो ॥१७॥
हे मनुपुत्री, ज्याच्या प्रेरणेमुळे गुणांची साम्यावस्थारूप अव्यक्त प्रकृतीत गती उत्पन्न होते, त्या भगवानांनाच काल म्हणतात. (१७)


अन्तः पुरुषरूपेण कालरूपेण यो बहिः ।
समन्वेत्येष सत्त्वानां भगवान् आत्ममायया ॥ १८ ॥
मायेद्वारा असे सर्व प्राण्यात जीवरुप तो ।
बाहेर कालरुपाने तत्वांनी भगवान्‌ असा ॥ १८ ॥

यः - जो - आत्ममायया - आपल्या मायेने - सत्त्वानाम् - प्राण्यांच्या - अन्तः - आत - पुरुषरूपेण - पुरुषस्वरूपाने - बहिः - बाहेर - कालरूपेण - कालरूपाने - समन्वेति - रहातो - एषः - हा - भगवान् - परमेश्वर किंवा काल - अस्ति - होय ॥१८॥
अशा प्रकारे जे आपल्या मायेच्या द्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने आणि बाहेर कालरूपाने व्याप्त आहेत, ते भगवानच पंचविसावे तत्त्व आहेत. (१८)


दैवात्क्षुभितधर्मिण्यां स्वस्यां योनौ परः पुमान् ।
आधत्त वीर्यं सासूत महत्तत्त्वं हिरण्मयम् ॥ १९ ॥
जेंव्हा या परमात्म्याने अदृष्ट पाहुनी जिवा ।
उत्पत्तीस्थान मायेशी वीर्यासी स्थापिले जधी ॥
तेजोमय महत्तत्व निर्माण जाहले तदा ॥ १९ ॥

परः - श्रेष्ठ असा - पुरुषः - परमेश्वर - दैवात् - जीवांच्या प्रारब्धामुळे - क्षुभितधर्मिण्याम् - क्षोभ पावलेले आहेत गुण जिचे अशा - स्वस्याम् - आपल्या - योनौ - प्रगट होण्याचे स्थान जी प्रकृति तिच्यामध्ये - वीर्यम् - वीर्याला - आधत्त - स्थापिता झाला - सा - ती प्रकृति - हिरण्मयम् - तेजोयुक्त - महत्तत्त्वम् - महत्तत्त्वाला - असूत - प्रसवती झाली ॥१९॥
जेव्हा परमपुरुषाने जीवांच्या अदृष्टानुसार कार्यप्रवण झालेल्या, समस्त जीवांचे उत्पत्तिस्थान अशा मायेमध्ये चैतन्यरूप वीर्य स्थापित केले, तेव्हा त्यापासून तेजोमय महत्तत्त्व उत्पन्न झाले. (१९)


विश्वमात्मगतं व्यञ्जन् कूटस्थो जगदङ्कुरः ।
स्वतेजसा पिबत् तीव्रं आत्मप्रस्वापनं तमः ॥ २० ॥
तेजाने पिउनी तेंव्हा लय नी अंधकार हे ।
विश्वाला निर्मिण्यासाठी जगदंकुर लाविले ॥ २० ॥

कूटस्थः - अविकारी असे - जगदङ्कुरः - जगाचे कारण असे महत्तत्त्व - आत्मगतम् - आपल्यामध्ये असलेल्या - विश्वम् - विश्वाला - व्यञ्जन् - व्यक्त करणार्‍या अशा - स्वतेजसा - आपल्या तेजाच्या योगाने - आत्मप्रस्वापनम् - आपल्याला आच्छादून टाकणार्‍या अशा - तीव्रम् - गाढ अशा - तमः - अंधकाराला - अपिबत् - गिळते झाले ॥२०॥
लय-विक्षेपादिरहित तसेच जगाचे अंकुररूप या महत्तत्त्वाने आपल्यात असलेल्या विश्वाला प्रगट करण्यासाठी आपल्या स्वरूपाला आच्छादित करणार्‍या प्रलयकालीन अंधकाराला आपल्याच तेजाने नाहीसे केले. (२०)


यत्तत्सत्त्वगुणं स्वच्छं शान्तं भगवतः पदम् ।
यदाहुर्वासुदेवाख्यं चित्तं तन्महदात्मकम् ॥ २१ ॥
सत्वगुणमयो स्वच्छ भगवत्‌स्थान चित्त जे ।
महत्तत्व अशा त्याला म्हणती वासुदेवची ॥ २१ ॥

यत् - जे - तत् - ते वेदप्रसिद्ध - सत्वगुणम् - सत्वगुणस्वरूप - स्वच्छम् - निर्मळ - शान्तम् - रागव्देषादिरहित - अस्ति - आहे - यत् - जे - भगवतः - परमेश्वराचे - वासुदेवाख्यम् - वासुदेवनावाचे - पदम् - स्थान असे - आहुः - म्हणतात - तत् - ते - महदात्मकम् - महत्तत्त्वस्वरूप - चित्तम् - चित्त - अस्ति - आहे ॥२१॥
जे सत्त्वगुणमय, स्वच्छ, शांत, आणि भगवंतांच्या उपलब्धीचे स्थानरूप चित्त आहे, तेच महत्तत्त्व आहे आणि त्यालाच "वासुदेव" म्हणतात. (२१)


स्वच्छत्वं अविकारित्वं शान्तत्वमिति चेतसः ।
वृत्तिभिर्लक्षणं प्रोक्तं यथापां प्रकृतिः परा ॥ २२ ॥
स्वभावे असते पाणी शांत नी स्वच्छचि जसे ।
तसे जे अविकारी नी शांत स्वच्छचि चित्त ते ॥ २२ ॥

यथा - ज्याप्रमाणे - अपाम् - पाण्याचे - परा - पृथ्वीचा संसर्ग होण्याच्या पूर्वीचे - प्रकृतिः - स्वरूप - अस्ति - असते - तथा - त्याप्रमाणे - स्वच्छत्वम् - निर्मळपणा - अविकारित्वम् - विकारराहित्य - शान्तत्वम् - शान्तता - इति - अशा - वृत्तिभिः - वृत्तींनी - चेतसः - अन्तःकरणाची - लक्षणम् - ओळख - प्रोक्तम् - सांगितली आहे ॥२२॥
ज्याप्रमाणे पाणी आपल्या मूळ अवस्थेमध्ये अत्यंत स्वच्छ, विकारशून्य आणि शांत असते, त्याचप्रमाणे स्वाभाविक अवस्थेत स्वच्छ, अविकारी आणि शांत असणारे ते चित्त असे हे वृत्तींसह चित्ताचे लक्षण सांगितले आहे. (२२)


महत्तत्त्वाद् विकुर्वाणाद् भगवद्‌वीर्यसम्भवात् ।
क्रियाशक्तिः अहङ्कारः त्रिविधः समपद्यत ॥ २३ ॥
वैकारिकस्तैजसश्च तामसश्च यतो भवः ।
मनसश्चेन्द्रियाणां च भूतानां महतामपि ॥ २४ ॥
त्याच्याचि वीर्यशक्तीने महत्तत्व विकारले ।
अहंकार तयामध्ये उत्पन्न होतसे पुन्हा ॥ २३ ॥
तेजो तामस नी झाले वैकारिक त्रयो पुढे ।
मन इंद्रिय नी भूते क्रमाने जाहले तयी ॥ २४ ॥

भगवव्दीर्यसंभवात् - परमेश्वराच्या ज्ञानशक्तीपासून उत्पन्न झालेल्या - विकुर्वाणात् - विकार पावणार्‍या अशा - महत्तत्त्वात् - महत्तत्त्वापासून - क्रियाशक्तिः - निरनिराळ्या क्रिया करण्याची आहे शक्ति ज्यामध्ये असा - त्रिविधः - तीन प्रकारचा - अहंकारः - अहंकार - समपद्यत - उत्पन्न झाला ॥२३॥ वैकारिकः - सात्त्विक - च - आणि - राजसः - राजस - च - आणि - तामसः - तामस - यतः - ज्या त्रिविध अहंकारांपासून - मनसः - अन्तःकरणाची - च - आणि - इन्द्रियाणाम् - इन्द्रियांची - च - आणि - महतां भूतानाम् - महाभूतांची - भवः - उत्पत्ति - आसीत - झाली ॥२४॥
त्यानंतर भगवंतांच्या वीर्यरूप चित्‌शक्तीपासून उत्पन्न झालेल्या महत्तत्त्वाच्या क्रियाशील होण्याने त्यापासून क्रियाशक्तिप्रधान असा अहंकार उत्पन्न झाला. तो वैकारिक, तैजस, आणि तामस भेदाने तीन प्रकारचा आहे. त्यापासूनच क्रमशः मन, इंद्रिये, आणि पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली. (२३-२४)


सहस्रशिरसं साक्षाद् यं अनन्तं प्रचक्षते ।
सङ्कर्षणाख्यं पुरुषं भूतेन्द्रियमनोमयम् ॥ २५ ॥
या पंचभूत इंद्रीयी अहंतेसीच पंडित ।
संकर्षण अशा नामे वदती ते अनंत ही ॥ २५ ॥

यम् - ज्याला - साक्षात् - प्रत्यक्ष - सहस्त्रशिरसम् - हजार आहेत मस्तके ज्याला असा - अनन्तम् - नाशरहित असा
या भूत, इंद्रिय आणि मनरूप अहंकारालाच पंडितलोक साक्षात "संकर्षण" नावाचा एक हजार शिरे असलेला अनंतदेव म्हणतात. (२५)


कर्तृत्वं करणत्वं च कार्यत्वं चेति लक्षणम् ।
शान्तघोरविमूढत्वं इति वा स्यादहङ्कृतेः ॥ २६ ॥
अहंकारा मधूनी त्या कर्तृत्व देवतांतुनी
कार्यत्व पंचभूतांचे इंद्रियी कारणत्व ते ।
यांचा संयोग तत्वाशी शांतवन तयातुनी
घोरत्व आणि मूढत्व हीही त्याचीच लक्षणे ॥ २६ ॥

कर्तृत्वम् - कर्तृत्व - च - आणि - करणत्वम् - करणत्व - च - आणि - कार्यत्वम् - कार्यत्व - इति - असे - वा - किंवा - शान्तघोरविमूढत्वम् - शान्त, भयंकर व मूढ - इति - असे - अहंकृतेः - अहंकाराचे - लक्षणम् - लक्षण - स्यात् - होय ॥२६॥
या अहंकाराचे देवतारूपाने कर्तृत्व, इंद्रियरूपाने करणत्व आणि पंचभूतरूपाने कार्यत्व हे लक्षण आहे. तसेच सत्त्वादी गुणांच्या संबंधाने शीतत्व, घोरत्व, आणि मूढत्व ही सुद्धा याचीच लक्षणे होत. (२६)


वैकारिकाद् विकुर्वाणात् मनस्तत्त्वमजायत ।
यत्सङ्कल्पविकल्पाभ्यां वर्तते कामसम्भवः ॥ २७ ॥
अशा तीन अहंकारे विकृती हो‌उनी पुन्हा ।
विकल्प मन संकल्प कामना जाहल्या पुढे ॥ २७ ॥

विकुर्वाणात् - विकार पावणार्‍या अशा - वैकारिकात् - सात्त्विक अहंकारापासून - मनस्तत्त्वम् - अन्तःकरणरूप तत्त्व - अजायत - उत्पन्न झाले - यत्संकल्पविकल्पाभ्यां - ज्याच्या संकल्पविकल्पांपासून - कामसंभवः - इच्छेचा प्रादुर्भाव - वर्तते - होतो ॥२७॥
वरील तीन प्रकारच्या अहंकारांपैकी वैकारिक अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून मन हे तत्त्व उत्पन्न झाले. त्याच्या संकल्प-विकल्पांमुळे कामना उत्पन्न होतात. (२७)


यद् विदुर्ह्यनिरुद्धाख्यं हृषीकाणां अधीश्वरम् ।
शारदेन्दीवरश्यामं संराध्यं योगिभिः शनैः ॥ २८ ॥
अनिरुद्ध अधिष्ठाता मन तत्वात देव तो ।
श्यामवर्णी अनिरुद्धा शनैः योगीहि प्रार्थिती ॥ २८ ॥

यत् - ज्या मनाला - हृषीकाणाम् - इन्द्रियांचा - अधीश्वरम् - अधिपती असे - शारदेन्दीवरश्यामम् - शरदृतूंतील कमलाप्रमाणे श्यामवर्ण असे - योगिभिः - योगी लोकांनी - शनैः - हळूहळू - आराध्यम् - आराधनीय असे - अनिरुद्धाख्यम् - अनिरुद्ध नावाचे - विदुः - समजतात ॥२८॥
हे मनतत्त्वच इंद्रियांचा अधिष्ठाता "अनिरुद्ध" या नावाने प्रसिद्ध आहे. योगीलोक शरद ऋतूतील नीलकमळाप्रमाणे श्यामवर्णाच्या या अनिरुद्धाची पुन्हा पुन्हा मनाला वश करून आराधना करीत असतात. (२८)


तैजसात्तु विकुर्वाणाद् बुद्धितत्त्वमभूत्सति ।
द्रव्यस्फुरणविज्ञानं इन्द्रियाणामनुग्रहः ॥ २९ ॥
संशयोऽथ विपर्यासो निश्चयः स्मृतिरेव च ।
स्वाप इत्युच्यते बुद्धेः लक्षणं वृत्तितः पृथक् ॥ ३० ॥
तैजसातून बुद्धित्व निर्माण होतसे पुन्हा ।
विज्ञानातून वस्तूचे ज्ञानास बुद्धि घेतसे ॥ २९ ॥
संशयो नी विपर्यस्त निद्रा स्मृति नि निश्चय ।
वृत्तीने भेदबुद्धीचे प्रद्युम्न तत्व हे असे ॥ ३० ॥

सति - हे पतिव्रते - विकुर्वाणात् - विकार पावणार्‍या अशा - तैजसात् - तैजस अहंकारापासून - बुद्धितत्त्वम् - बुद्धितत्व - अभूत् - उत्पन्न झाले - द्रव्यस्फुरणविज्ञानम् - द्रव्याचे स्वरूप समजण्याचे विशिष्ट ज्ञान - इन्द्रियाणाम् - इन्द्रियांवर - अनुग्रहः - विषयप्राप्तिरूप कृपा करणे - संशयः - संशय - अथ - आणि - विपर्यासः - विपरीत ज्ञान - निश्चयः - निश्चय - स्मृतिः - स्मरण - च - आणि - स्वापः - निद्रा - इति - अशा - वृत्तितः - वृत्तींपासून - बुद्धेः - बुद्धीचे - पृथक् - वेगवेगळे - लक्षणम् - लक्षण - उच्यते - म्हटले जाते ॥२९-३०॥
हे साध्वी, पुढे तेजस अहंकार क्रियाशील झाल्याने त्यापासून बुद्धितत्त्व उत्पन्न झाले. वस्तूचे स्फुरणरूप विज्ञान आणि इंद्रियांच्या कामांत साहाय्य करणे हे बुद्धीचे कार्य आहे. (२९) वृत्तींच्या भेदामुळे संशय, विपरीत ज्ञान, निश्चय, स्मृती आणि निद्रा ही बुद्धीची निरनिराळी लक्षणे होत. (३०)


तैजसानि इन्द्रियाण्येव क्रियाज्ञानविभागशः ।
प्राणस्य हि क्रियाशक्तिः बुद्धेर्विज्ञानशक्तिता ॥ ३१ ॥
इंद्रिया तैजसी कार्य कर्म ज्ञानानुसार ते ।
कर्माची प्राण ही शक्ती ज्ञानाची बुद्धीही असे ॥ ३१ ॥

क्रियाज्ञानविभागशः - कर्म व ज्ञान यांच्या विभागाने - इन्द्रियाणि - इन्द्रिये - तैजसानि एव - राजस अहंकाराचीच कार्ये - सन्ति - होत - हि - कारण - प्राणस्य - प्राणाची - क्रियाशक्तिः - कर्मरूप शक्ति - अस्ति - आहे - बुद्धेः - बुद्धीची - विज्ञानशक्तिता - विज्ञानरूप शक्ति - अस्ति - आहे ॥३१॥
इंद्रिये हेसुद्धा तैजस अहंकाराचेच कार्य होय. कर्म आणि ज्ञानाच्या विभागाने त्यांचे कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये असे दोन भेद आहेत. यांमध्ये कर्म ही प्राणांची आणि ज्ञान बुद्धीची शक्ती होय. (३१)


तामसाच्च विकुर्वाणाद् भगवद्‌वीर्यचोदितात् ।
शब्दमात्रं अभूत् तस्मात् नभः श्रोत्रं तु शब्दगम् ॥ ३२ ॥
भगवत्‌चेतना शक्तीमधुनी तम विकृती ।
हो‌उनी शब्द तन्मात्र नभ श्रोत्रहि जन्मले ॥ ३२ ॥

च - आणि - भगवव्दीर्यचोदितात् - परमेश्वराच्या शक्तीने प्रेरणा केलेल्या अशा - विकुर्वाणात् - विकार पावणार्‍या अशा - तामसात् - तामस अहंकारापासून - शब्दमात्रम् - शब्दरूप सूक्ष्म भूत - अभूत् - उत्पन्न झाले - तस्मात् - त्या सूक्ष्मभूत शब्दापासून - तु - तर - नभः - आकाश - च - आणि - शब्दगम् - शब्दाला ग्रहण करणारे असे - श्रोत्रम् - कर्णेन्द्रिय - अभूत् - झाले ॥३२॥
भगवंतांच्या चेतनाशक्तीच्या प्रेरणेने तामस अहंकार विकृत होऊन त्यापासून शब्दतन्मात्रेची उत्पत्ती झाली. शब्दतन्मात्रेपासून आकाश उत्पन्न झाले. शब्दाचे ज्ञान श्रोत्रेंद्रिय करून देते. (३२)


अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुर्लिङ्गत्वमेव च ।
तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदुः ॥ ३३ ॥
प्रकाशकचि अर्थाचा ओठासी स्पष्ट बोलणे ।
नभाचे सूक्ष्म जे रुप विबुधो शब्द मानिती ॥ ३३ ॥

कवयः - ज्ञानी लोक - अर्थाश्रयत्वम् - अर्थाचा बोध करण्याची शक्ति - च - आणि - द्रष्टुः - परोक्ष असलेल्या पहाणाराचे - लिङ्गत्वम् एव - बोधक चिन्हच - च - तसेच - नभसः - आकाशाचे - तन्मात्रत्वम् - सूक्ष्मस्वरूप - शब्दस्य - शब्दाचे - लक्षणम् - लक्षण - विदुः - समजतात ॥३३॥
शब्दाच्या अर्थाचे ज्ञान करून देणे, न दिसणार्‍याही बोलणार्‍याच्या स्थानाचे ज्ञान करून देणे आणि आकाशाचे सूक्ष्म रूप असणे हीच विद्वानांच्या मते शब्दाची लक्षणे होत. (३३)


भूतानां छिद्रदातृत्वं बहिरन्तरमेव च ।
प्राणेन्द्रियात्मधिष्ण्यत्वं नभसो वृत्तिलक्षणम् ॥ ३४ ॥
सर्वभूतीं अवकाश आत बाहेर राहणे ।
इंद्रिया नी मनोप्राणां आश्रयोवृत्ति त्याचि ती ॥ ३४ ॥

भूतानाम् - प्राण्यांना - छिद्रदातृत्वम् - अवकाश देणे - बहिः - बाहेर - च - आणि - अन्तरम् - आत - एव - सुद्धा - प्राणेन्द्रियात्मधिष्‌ण्यम् - प्राण, इन्द्रिये व मन यांचा आश्रय असणे - नभसः - आकाशाचे - वृत्तिलक्षणम् - वृत्तीचे लक्षण - अस्ति - होय ॥३४॥
सर्व वस्तूंना पोकळी उपलब्ध करून देणे, सर्वांच्या आत-बाहेर राहाणे, तसेच प्राण, इंद्रिये आणि मन यांचा आश्रय होणे, ही आकाशाची कार्यरूप लक्षणे होत. (३४)


नभसः शब्दतन्मात्रात् कालगत्या विकुर्वतः ।
स्पर्शोऽभवत्ततो वायुः त्वक् स्पर्शस्य च सङ्ग्रहः ॥ ३५ ॥
शब्द तन्मात्र कार्याने आकाशी कालचक्रने ।
स्पर्श तन्मात्र वायू हा त्वचेच्या सह जन्मला ॥ ३५ ॥

कालगत्या - कालाच्या गतीने - विकुर्वतः - विकार पावणार्‍या - शब्दतन्मात्रात् - शब्द आहे विषय ज्याचा अशा - नभसः - आकाशापासून - स्पर्शः - स्पर्शरूप सूक्ष्म भूत - अभूत् - उत्पन्न झाले - तत् - त्या स्पर्शापासून - वायुः - वायु - च - आणि - स्पर्शस्य - स्पर्शाचे - संग्रहः - ज्ञान करून देणारे - त्वक् - त्वगिन्द्रिय - अभूत् - उत्पन्न झाले ॥३५॥
नंतर शब्दतन्मात्रेचे कार्य असणार्‍या आकाशात कालगतीने विकार झाल्याकारणाने स्पर्शतन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून वायू उत्पन्न झाला. स्पर्शाचे उत्तम ज्ञान त्वचा करून देते. (३५)


मृदुत्वं कठिनत्वं च शैत्यमुष्णत्वमेव च ।
एतत्स्पर्शस्य स्पर्शत्वं तन्मात्रत्वं नभस्वतः ॥ ३६ ॥
कठीण कोवळे थंड उष्णतेतून वायूचे ।
रुप सूक्ष्महि स्पर्शाचे जाणवू लागले तदा ॥ ३६ ॥

मृदुत्वम् - मऊपणा - च - आणि - कठिनत्वम् - कठीणपणा - शैत्यम् - शीतत्व - उष्णत्वम् एव - उष्णतासुद्धा - च - आणि - नभस्वतः - वायूचे - तन्मात्रत्वम् - सूक्ष्मरूप असणे - एतत् - हे - स्पर्शस्य - स्पर्शाचे - स्पर्शत्वम् - स्पर्शपण - अस्ति - होय ॥३६॥
कोमलता, कठोरता,शीतलता, उष्णता आणि वायूचे सूक्ष्म रूप असणे ही स्पर्शाची लक्षणे होत. (३६)


चालनं व्यूहनं प्राप्तिः नेतृत्वं द्रव्यशब्दयोः ।
सर्वेन्द्रियाणां आत्मत्वं वायोः कर्माभिलक्षणम् ॥ ३७ ॥
वृक्षवेली हलविणे शब्द गंधास वाहुनी ।
नेणे नी इंद्रिया शक्ती देणे वृत्तीहि वायुची ॥ ३७ ॥

चालनम् - हालविणे - व्यूहनम् - एकत्र करणे - द्रव्यशब्दयोः - द्रव्य व शब्द यांचा - प्राप्तिः - संयोग करणे - नेतृत्वम् - नेणे - च - आणि - सर्वेन्द्रियाणाम् - सर्व इन्द्रियांना - आत्मत्वम् - उत्तेजित करणे - एतत् - हे - वायोः - वायूचे - कर्माभिलक्षणम् - कर्मरूपी लक्षण होय ॥३७॥
वृक्षाच्या फांद्या इत्यादींना हलविणे, तृण इत्यादींना एकत्रित करणे, सगळीकडे पोहोचविणे, गंधयुक्त द्रव्याला नाकाजवळ तसेच शब्दाला कानाजवळ नेणे, त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांमध्ये कार्यशक्ती उत्पन्न करणे,ही वायूच्या वृत्तीची लक्षणे होत. (३७)


वायोश्च स्पर्शतन्मात्राद् रूपं दैवेरितादभूत् ।
समुत्थितं ततस्तेजः चक्षू रूपोपलम्भनम् ॥ ३८ ॥
दैव ते प्रेरिता वायूरुप तन्मात्र जाहले ।
तेज रुपास दावाया नेत्रांचा जन्म जाहला ॥ ३८ ॥

च - आणि - स्पर्शतन्मात्रात् - स्पर्श आहे विषय ज्याचा अशा - दैवेरितात् - दैवाने प्रेरणा केलेल्या अशा - वायोः - वायूपासून - रूपम् - रूप - अभूत् - उत्पन्न झाले - ततः - त्या रूपापासून - तेजः - तेज - समुद्भूतम् - उत्पन्न झाले - रूपोपलम्भनम् - रूपाला ग्रहण करणारे - चक्षुः - नेत्रेन्द्रिय - अस्ति - होय ॥३८॥
त्यानंतर दैवाच्या प्रेरणेने स्पर्शतन्मात्रविशिष्ट वायूच्या विकृत होण्याने रूपतन्मात्र उत्पन्न झाले. तसेच त्यापासून तेज आणि रूपाला प्रगट करणार्‍या नेत्रेंद्रियाचा उगम झाला. (३८)


द्रव्याकृतित्वं गुणता व्यक्तिसंस्थात्वमेव च ।
तेजस्त्वं तेजसः साध्वि रूपमात्रस्य वृत्तयः ॥ ३९ ॥
आकार बोध गौणत्व द्रव्य तेजास रुप जे ।
रुप तन्मात्र वृत्ती या जाणाव्या त्या तयातुनी ॥ ३९ ॥

साध्वि - हे पतिव्रते - द्रव्याकृतित्वम् - द्रव्यांना आकार प्राप्त करून देणे - च - आणि - गुणता - द्रव्यांच्या आधाराने प्रतीतीस येणे - एव - तसेच - व्यक्तिसंस्थात्वम् - द्रव्याच्या रचनेप्रमाणे रचना असणे - तेजसः - तेजाचे - तेजस्त्वम् - तेजपण - इति - अशा - रूपमात्रस्य - सूक्ष्म रूपाच्या - वृत्तयः - वृत्ति - सन्ति - होत ॥३९॥
हे साध्वी, वस्तूच्या आकाराचे ज्ञान करून देणे, पदार्थाच्या अंगरूपाने असणे, पदार्थाचा जसा आकार-प्रकार आणि परिणाम इत्यादी असेल तसेच त्याचे स्वरूप दाखविणे आणि तेजोरूप असणे ह्या सर्व रूपतन्मात्राच्या वृत्ती होत. (३९)


द्योतनं पचनं पानं अदनं हिममर्दनम् ।
तेजसो वृत्तयस्त्वेताः शोषणं क्षुत्तृडेव च ॥ ४० ॥
चकाकी शिजणे आणि थंडीला दूर ठेवणे ।
शुष्कता भूकही देणे सेविणे वृत्तिही तया ॥ ४० ॥

द्योतनम् - प्रकाश करणे - पचनम् - पचन करणे - शोषणम् - सुकविणे - हिममर्दनम् - थंडी नाहीशी करणे - क्षुतू - क्षुधा लागणे - तृटू - तृषा लागणे - एव - तसेच - अदनम् - खाणे - च - आणि - पानम् - पिणे - एताः - ह्या - तु - तर - तेजसः - तेजाच्या - वृत्तयः - वृत्ति - सन्ति - होत ॥४०॥
चमकणे, पक्व करणे, थंडी दूर करणे, सुकविणे, तहान-भूक उत्पन्न करून त्यांच्या निवृत्तीकरिता भोजन करणे, पाणी पिणे या तेजाच्या वृत्ती होत. (४०)


रूपमात्राद् विकुर्वाणात् तेजसो दैवचोदितात् ।
रसमात्रं अभूत् तस्मात् अम्भो जिह्वा रसग्रहः ॥ ४१ ॥
विकृती रुप तन्मात्रा दैवाने जाहली पुढे ।
त्यातुनी रस तन्मात्रा जिव्हा ही जन्मली पुन्हा ॥ ४१ ॥

रूपमात्रात् - रूप आहे विशेष गुण ज्याचा अशा - दैवचोदितात् - दैवाने प्रेरणा केलेल्या अशा - विकुर्वाणात् - विकार पावणार्‍या अशा - तेजसः - तेजापासून - रसमात्रम् - रसरूप सूक्ष्म भूत - अभूत् - झाले - तस्मात् - त्यापासून - अम्भः - पाणी - च - आणि - रसग्रहा - रसाला ग्रहण करणारी - जिव्हा - जिव्हा - अभूत् - उत्पन्न झाली ॥४१॥
नंतर दैवाच्या प्रेरणेने रूपतन्मात्रमय तेज विकृत झाल्याने त्यापासून रसतन्मात्र उत्पन्न झाले आणि त्याच्यापासून पाणी व रसाला ग्रहण करणारी जीभ उत्पन्न झाली. (४१)


कषायो मधुरस्तिक्तः कट्वम्ल इति नैकधा ।
भौतिकानां विकारेण रस एको विभिद्यते ॥ ४२ ॥
शुद्धरुपी रस एक परी गोड कडू तसे ।
तुरटांबट नी तीक्ष्ण चवी खारट जाहल्यां ॥ ४२ ॥

रसः - रस - मधुरः - मधुर - एकः अपि - एक असून सुद्धा - भौतिकानाम् - संसर्गी द्रव्यांच्या - विकारेण - विकाराने - कषायः - तुरट - तिक्तः - कडु - कट्‌वम्लः - तिखट व आंबट - इति - अशा - नैकधा - अनेक प्रकारांनी - विभिद्यते - भेद पावतो ॥४२॥
एकच रस भौतिक पदार्थांशी संयोग झाल्याने तुरट, गोड, तिखट, कडू, खारट, आंबट, इत्यादी अनेक प्रकारचा होतो. (४२)


क्लेदनं पिण्डनं तृप्तिः प्राणनाप्यायनोन्दनम् ।
तापापनोदो भूयस्त्वं अम्भसो वृत्तयस्त्विमाः ॥ ४३ ॥
करणे तृप्त ओलावा आकार निर्मिती तशी ।
मृदुत्व, हरणेताप भूमीसी जन्मणे पुन्हा ।
जळाच्या वृत्ति या सार्‍या रसाच्याही तशाच त्या ॥ ४३ ॥

क्लेदनम् - भिजविणे - पिण्डनम् - गोळा करणे - तृप्तिः - तृप्ति होणे - प्राणानाप्यायनोन्दनम् - जिवंत राखणे, तहान भागविणे व मऊ करणे - तापापनोदः - ताप दूर करणे - भूयस्त्वम् - पुष्कळ होणे - इमाः - ह्या - तु - तर - अम्भसः - पाण्याच्या - वृत्तयः - वृत्ति - सन्ति - होत ॥४३॥
भिजविणे, माती इत्यादींचा गोळा करणे, तृप्त करणे, जिवंत ठेवणे, तहान भागविणे, पदार्थांना मृदू बनविणे, उष्णता नाहीशी करणे आणि विहिरी इत्यादीतून बाहेर काढल्यावरही तेथे पुन्हा पुन्हा प्रगट होणे या पाण्याच्या वृत्ती आहेत. (४३)


रसमात्राद् विकुर्वाणात् अम्भसो दैवचोदितात् ।
गन्धमात्रं अभूत् तस्मात् पृथ्वी घ्राणस्तु गन्धगः ॥ ४४ ॥
पाणी विकृत होवोनी गंध तन्मात्र जाहले ।
पृथिवी जाहली त्यात नासिका जन्मली तिथे ॥ ४४ ॥

दैवचोदितात् - दैवाने प्रेरणा केलेल्या - विकुर्वाणात् - विकार पावणार्‍या - रसमात्रात् - रस आहे विशेष गुण ज्याचा अशा - अम्भसः - पाण्यापासून - गन्धमात्रम् - गंधनामक सूक्ष्म भूत - अभूत् - झाले - तस्मात् - त्यापासून - पृथ्वी - पृथ्वी - च - आणि - गन्धगः - गन्धाला ग्रहण करणारे - तु - तर - घ्राणः - घ्राणेन्द्रिय - अभूत् - झाले ॥४४॥
यानंतर दैवाने प्रेरित झाल्याने पाणी विकृत होऊन त्यापासून गंधतन्मात्र उत्पन्न झाले आणि त्यापासून पृथ्वी व वास ग्रहण करणारे नाक प्रगट झाले. (४४)


करम्भपूतिसौरभ्य शान्तोग्राम्लादिभिः पृथक् ।
द्रव्यावयववैषम्याद् गन्ध एको विभिद्यते ॥ ४५ ॥
गंध तो एकची आहे परंतु द्रव्य मेळुनी ।
सुगंध मृदु तीव्राम्ल दुर्गंध जाहले पुढे ॥ ४५ ॥

एकः - एकटा - गन्धः - गन्ध - द्रव्यावयववैषम्यात् - द्रव्यांच्या अवयवांच्या न्यूनाधिकपणामुळे - करम्भपूतिसौरभ्यशन्तोग्राम्लादिभिः - मिश्र, दुर्गंध, सुगन्ध, शान्त, उग्र व आंबट इत्यादिकांनी - पृथक् - वेगवेगळा - विभिद्यते - भिन्न होतो ॥४५॥
परस्पर मिसळलेल्या पदार्थांच्या कमी-अधिकपणामुळे तो वास मिश्रगंध, दुर्गंध, सुगंध, मृदू, तीव्र,आंबट इत्यादी अनेक प्रकारचा होतो. (४५)


भावनं ब्रह्मणः स्थानं धारणं सद्विशेषणम् ।
सर्वसत्त्वगुणोद्‍भेदः पृथिवीवृत्तिलक्षणम् ॥ ४६ ॥
प्रतिमा ब्रह्मरुपाच्या भावना आश्रयो तसा
धारिणे जल आदींना प्राण्यांचे रुप निर्मिणे ।
कार्याची लक्षणे ऐसी पृथिवी दाविते पहा ॥ ४६ ॥

ब्रह्मणः - ब्रह्माला - भावनम् - साकारता प्राप्त करून देणे - स्थानम् - आश्रयावाचून स्थिर रहाणे - धारणम् - धारण करणे - सव्दिशेषणम् - आकाशादिकांचा भेद करून देणे - सर्वसत्त्वगुणोद्भेदः - सर्व प्राण्यांना व त्यांच्या गुणांना प्रगट करणे - पृथिवीवृत्तिलक्षणम् - पृथ्वीचे कार्यरूप लक्षण - अस्ति - होय ॥४६॥
प्रतिमा इत्यादी रूपांनी ब्रह्माचे साकार होणे, पाणी इत्यादी कारण तत्त्वांपासून भिन्न अशा दुसर्‍या कोणत्याही आश्रयाची अपेक्षा केल्याखेरीज राहणे, पाणी इत्यादी अन्य पदार्थांना धारण करणे, आकाश इत्यादींचे विभाग दाखविणे(घटाकाश, मठाकाश इत्यादी) तसेच सर्व प्राण्यांच्या स्त्रीत्व, पुरुषत्व, इत्यादी गुणांना प्रगट करणे ही पृथ्वीची कार्यरूप लक्षणे आहेत. (४६)


नभोगुणविशेषोऽर्थो यस्य तच्छ्रोत्रमुच्यते ।
वायोर्गुणविशेषोऽर्थो यस्य तत्स्पर्शनं विदुः ॥ ४७ ॥
आकाशा विषयो शब्द कान त्याचेच इंद्रिय ।
वायूचा स्पर्श हा धर्म त्वचा इंद्रिय त्याचिये ॥ ४७ ॥

नभोगुणविशेषः - आकाशाचा विशेष गुण शब्द - यस्य - ज्याचा - अर्थः - विषय - अस्ति - आहे - तत् - ते - श्रोत्रम् - कर्णेन्द्रिय - उच्यते - म्हटले जाते - वायोः - वायूचा - गुणविशेषः - विशेष गुण स्पर्श - यस्य - ज्याचा - अर्थः - विषय - अस्ति - आहे - तत् - त्याला - स्पर्शनम् - त्वगिन्द्रिय - विदुः - समजतात ॥४७॥
आकाशाचा विशेष गुण शब्द हा ज्याचा विषय आहे, ते श्रोत्रेंद्रिय(कान) होय. वायूचा विशेष गुण स्पर्श हा ज्याचा विषय आहे, ते त्वगिंद्रिय (त्वचा) होय. (४७)


तेजोगुणविशेषोऽर्थो यस्य तच्चक्षुरुच्यते ।
अम्भोगुणविशेषोऽर्थो यस्य तद्रसनं विदुः ।
भूमेर्गुणविशेषोऽर्थो यस्य स घ्राण उच्यते ॥ ४८ ॥
तेजाचे रुप वैशिष्ट्य नेत्र त्याचेचि इंद्रिय
जळाचे रस वैशिष्ट्य जीभ इंद्रीय त्यास ती ।
पृथ्वीचा गुण तो गंध नासिका त्यास बोलिजे ॥ ४८ ॥

तेजोगुणविशेषः - तेजाचा विशेष गुणरूप - यस्य - ज्याचा - अर्थः - विषय - अस्ति - आहे - तत् - ते - चक्षुः - नेत्र - उच्यते - म्हटले जाते - अम्भोगुणविशेषः - पाण्याचा विशेष गुण रस हा - यस्य - ज्याचा - अर्थः - विषय - अस्ति - आहे - तत् - त्याला - रसनम् - रसनेन्द्रिय - विदुः - समजतात - भूमेः - पृथ्वीचा - गुणविशेषः - विशेष गुण गंध - यस्य - ज्याचा - अर्थः - विषय - अस्ति - आहे - सः - तो - घ्राणः - घ्राणेन्द्रिय असे - उच्यते - म्हटले जाते ॥४८॥
तेजाचा विशेष गुण रूप हा ज्याचा विषय आहे, ते नेत्रेंद्रिय(डोळा) होय. पाण्याचा विशेष गुण रस हा ज्याचा विषय आहे ते रसनेंद्रिय(जीभ) होय आणि पृथ्वीचा विशेष गुण गंध ज्याचा विषय आहे, त्याला घ्राणेंद्रिय(नाक) म्हणतात. (४८)


परस्य दृश्यते धर्मो हि, अपरस्मिन् समन्वयात् ।
अतो विशेषो भावानां भूमावेवोपलक्ष्यते ॥ ४९ ॥
अन्याचा धर्म घेवोनी पंचभूते परस्परी ।
शब्द स्पर्श रस रुपो गंध पृथ्वीतची पहा ॥ ४९ ॥

हि - कारण - परस्य - कारणाचा - धर्मः - गुण - अपरस्मिन् - कार्याच्या ठिकाणी - समन्वयात् - संबन्धामुळे - दृश्यते - दिसतो - अतः - यास्तव - भावानाम् - पदार्थांचा - विशेषः - विशेष गुण - भूमौ एव - पृथ्वीमध्येच - उपलक्ष्यते - दिसून येतो ॥४९॥
वायू इत्यादी कार्य-तत्त्वांमध्ये आकाशादी कारणतत्त्वे राहात असल्यामुळे त्यांचे गुण त्यात दिसतात. म्हणून सर्व महाभूतांचे गुण शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि गंध केवळ पृथ्वीतच आढळतात. (४९)


एतान्यसंहत्य यदा महदादीनि सप्त वै ।
कालकर्मगुणोपेतो जगदादिरुपाविशत् ॥ ५० ॥
पंचभूते अहंकार वेगळे राहिले जधी ।
कालदृष्टनि सत्वांनी त्यात तो शिरला हरी ॥ ५० ॥

यदा - ज्या वेळी - महदादीनि - महत्तत्त्व इत्यादि - एतानि - ही - सप्त - सात - असंहत्य - न मिळून - स्थितानि - असतात - तदा - त्या वेळी - कालकर्मगुणोपेतः - काल, कर्म आणि सत्वादि गुण यांनी युक्त असा - जगदादिः - ईश्वर - तानि - त्या तत्त्वामध्ये - उपाविशत् - प्रवेश करता झाला ॥५०॥
जेव्हा महत्तत्त्व, अहंकार आणि पंचमहाभूते- ही सात तत्त्वे एकमेकात मिसळू शकली नाहीत, तेव्हा जगाचे आदिकारण श्रीनारायणांनी काल, अदृष्ट आणि सत्त्वादी गुणांसहित त्यांमध्ये प्रवेश केला. (५०)


ततस्तेनानुविद्धेभ्यो युक्तेभ्योऽण्डं अचेतनम् ।
उत्थितं पुरुषो यस्मात् उदतिष्ठदसौ विराट् ॥ ५१ ॥
ईशाच्या त्या प्रवेशाने मिळाले तत्व सर्व ही ।
उत्पन्न जाहले अंड विराट्‌ पुरुष जन्मला ॥ ५१ ॥

ततः - नंतर - तेन - त्या ईश्वराने - युक्तेभ्यः - युक्त असलेल्या अशा - अनुविद्धेभ्यः - क्षोभ पावलेल्या - भूतेभ्यः - भूतांपासून - अचेतनम् - चेतनारहित असे - अण्डम् - अण्ड - उत्थितम् - उत्पन्न झाले - यस्मात् - ज्या अंड्यापासून - असौ - हा - विराट् पुरुषः - विराट् पुरुष - उदतिष्ठत् - उत्पन्न झाला ॥५१॥
नंतर परमात्म्याने प्रवेश केल्याने क्षुब्ध झालेल्या आणि आपापसात मिसळलेल्या त्या तत्त्वांपासून एक अचेतन अंडे उत्पन्न झाले. त्यापासून या विराट पुरुषाची उत्पत्ती झाली. (५१)


एतदण्डं विशेषाख्यं क्रमवृद्धैर्दशोत्तरैः ।
तोयादिभिः परिवृतं प्रधानेनावृतैर्बहिः ।
यत्र लोकवितानोऽयं रूपं भगवतो हरेः ॥ ५२ ॥
विशेष नाम त्या अंडा त्यात विस्तार भूवने ।
पातोडे सात त्यां आत बाहेर प्रकृती असे ॥ ५२ ॥

यत्र - ज्या अंड्यामध्ये - अयम् - हा - लोकवितानः - लोकविस्तार - अस्ति - आहे - एतत् - हे - विशेषाख्यम् - विशेषनावाचे - अण्डम् - अंड - बहिः - बाहेर - प्रधानेन - प्रकृतीने - आवृतैः - वेष्टिलेली अशी - दशोत्तरैः - उत्तरोत्तर दहांनी - क्रमवृद्धैः - क्रमाने वाढलेली अशा - तोयादिभिः - पाणी इत्यदिकांनी - आवृतम् - वेष्टिलेले असे - भगवतः - ऐश्वर्यसंपन्न अशा - हरेः - श्रीहरीचे - रूपम् - रूप - अस्ति - आहे ॥५२॥
या अंडयाचे नाव ‘विशेष’ आहे. त्याच्या अंतर्गत श्रीहरींच्या स्वरूपभूत चौदाही भुवनांचा विस्तार आहे. हे सर्व बाजूंनी क्रमशः एक दुसर्‍यापेक्षा दहापट अधिक अशा पाणी, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, आणि महत्तत्त्व या सहा आवरणांनी आच्छादिले आहे. या सर्वांच्या बाहेर सातवे आवरण प्रकृतीचे आहे. (५२)


हिरण्मयाद् अण्डकोशाद् उत्थाय सलिले शयात् ।
तमाविश्य महादेवो बहुधा निर्बिभेद खम् ॥ ५३ ॥
तेजोमयी अशा अंडी जलासी स्थित जे रुपो ।
शिरले ते पुन्हा त्यात त्यासि छिद्रेहि पाडिली ॥ ५३ ॥

महादेवः - श्रेष्ठ देव - सलिलेशयात् - पाण्यामध्ये पडलेल्या अशा - हिरण्मयात् - तेजोमय अशा - अण्डकोशात् - अण्डकोशापासून - उत्थाय - उठून - तम् - त्या अण्डकोशात - आविश्य - प्रवेश करून - बहुधा - अनेकप्रकारे - खम् - छिद्र - निर्विभेद - पाडिता झाला ॥५३॥
कारणमय पाण्यात असणार्‍या त्या तेजोमय अंडयातून उठून त्या विराट पुरुषाने पुन्हा त्यातच प्रवेश केला आणि त्यात अनेक प्रकारची छिद्रे निर्माण केली. (५३)


निरभिद्यतास्य प्रथमं मुखं वाणी ततोऽभवत् ।
वाण्या वह्निरथो नासे प्राणोऽतो घ्राण एतयोः ॥ ५४ ॥
त्या मुळे मुख ते झाले वाचेसी अग्नि देवता ।
नाकाचे छिद्रही झाले श्वासाची वायु देवता ॥ ५४ ॥

प्रथमम् - प्रथम - अस्य - ह्या अण्डकोशाला - मुखम् - मुख - निरभिद्यत - फुटले - ततः - नंतर - वाणी - वाचा - अभवत् - उत्पन्न झाली - वाण्या सह - वाणीसह - वह्निः - अग्नि - अभवत् - उत्पन्न झाला - अथो - नंतर - नासे - दोन नाकपुड्या - अभवताम् - उत्पन्न झाल्या - एतयोः - ह्या नाकपुड्यांमध्ये - प्राणोतः - प्राणाने भरलेले असे - घ्राणः - घ्राणेंद्रिय - अभवत् - उत्पन्न झाले ॥५४॥
सर्वप्रथम त्यात मुख प्रगट झाले. त्यातून वाक्-इंद्रिय आणि वाणीसह वाणीचा अधिष्ठाता अग्नी प्रविष्ट झाला. नंतर नाकाची छिद्रे प्रगट झाली. प्राणसहित घ्राणेंद्रिय उत्पन्न झाले. (५४)


घ्राणात् वायुरभिद्येतां अक्षिणी चक्षुरेतयोः ।
तस्मात्सूर्यो न्यभिद्येतां कर्णौ श्रोत्रं ततो दिशः ॥ ५५ ॥
डोळे हेचि पुन्हा झाले दृष्टीचा देव सूर्य तो ।
कानांचे छिद्र ते झाले दिशा त्याच्याच देवता ॥ ५५ ॥

घ्राणात् - घ्राणेन्द्रियानंतर - वायुः - वायू - अभवत् - उत्पन्न झाला - अथ च - नंतर त्याला - अक्षिणी - दोन नेत्रस्थले - अभिद्येताम् - उत्पन्न झाली - एतयोः - ह्या नेत्रस्थलात - चक्षुः - चक्षुरिन्द्रिय - तस्मात् - त्याच्यानंतर - सूर्यः - सूर्य - कर्णौ - कर्ण - व्यभिद्येताम् - उत्पन्न झाले - ततः - नंतर - श्रोत्रम् - कर्णेन्द्रिय - दिशः - दिशा ॥५५॥
घ्राणेंद्रियानंतर त्याचा अधिष्ठाता वायू त्यात प्रविष्ट झाला. त्यानंतर नेत्रगोल प्रगट झाले. त्यापासून नेत्रेंद्रिय प्रगट झाले आणि तत्पश्चात त्याचा अधिष्ठाता सूर्य तेथे प्रविष्ट झाला. मग कानाची छिद्रे प्रगट झाली. त्यापासून त्याचे इंद्रिय श्रोत्र आणि त्याची अभिमानी दिशा-देवता त्यात प्रगट झाली. (५५)


निर्बिभेद विराजस्त्वग् रोमश्मश्र्वादयस्ततः ।
तत ओषधयश्चासन् शिश्नं निर्बिभिदे ततः ॥ ५६ ॥
विराटासी त्वचा आली रोम दाढी सकेश ती ।
वनस्पती तिथे झाल्या देवांच्या औषधीच त्या ॥ ५६ ॥

विराजः - विराट् पुरुषाला - त्वक् - त्वचा - निर्विभेदः - उत्पन्न झाली - ततः - नंतर - रोमश्मश्र्‌वोदयः - केस, दाढी, मिशा इत्यादिक - ततः - नंतर - च - आणि - औषधयः - औषधि - आसन् - उत्पन्न झाल्या - ततः - नंतर - शिश्नम् - जननेन्द्रिय - निर्बिभिदे - उत्पन्न झाले ॥५६॥
यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली. त्यापासून छिद्रे व तेथे दाढी-मिशा तसेच डोक्यावरील केस प्रगट झाले. यानंतर त्वचेची देवता औषधी उत्पन्न झाल्या. नंतर लिंग प्रगट झाले. (५६)


रेतस्तस्मादाप आसन् निरभिद्यत वै गुदम् ।
गुदादपानोऽपानाच्च मृत्युर्लोकभयङ्करः ॥ ५७ ॥
प्रगटले पुन्हा लिंग आपोदेव नि वीर्यही
शेवटी ती गुदा झाली अपान वायुच्या सवे ।
मृत्यु ती देवता तेथे लोकांना भय दाविते ॥ ५७ ॥

रेतः - वीय - तस्मात् - त्याच्यानंतर - आपः - पाणी - आसन् - उत्पन्न झाले - गुदम् - गुदद्वार - वै - खरोखर - निरभिद्यत - उत्पन्न झाले - गुदात् - गुदव्दारानंतर - अपानः - अपान इंद्रिय - अपानात् - अपानानंतर - लोकभयंकरः - लोकांना भय उत्पन्न करणारा - मृत्युः - मृत्यु - अभवत् - उत्पन्न झाला ॥५७॥
त्यापासून वीर्य आणि वीर्यानंतर लिंगाची अभिमानी जलदेवता उत्पन्न झाली. नंतर गुदद्वार प्रगट झाले. त्यापासून अपानवायू आणि अपानानंतर त्याची अभिमानी, लोकांना भयभीत करणारी, मृत्युदेवता प्रगट झाली. (५७)


हस्तौ च निरभिद्येतां बलं ताभ्यां ततः स्वराट् ।
पादौ च निरभिद्येतां गतिस्ताभ्यां ततो हरिः ॥ ५८ ॥
बळाने जाहले हात इंद्र तेथेचि जाहला ।
पायाने गति ती आली विष्णु तेथील देवता ॥ ५८ ॥

हस्तौ - दोन हात - निरभिद्येताम् - फुटले - ताभ्याम् - त्यांच्यानंतर - बलम् - बलनामक इंद्रिय - ततः - नंतर - स्वराट् - स्वर्गाचा राजा इन्द्र - अभूत् - उत्पन्न झाला - पादौ - दोन पाय - ताभ्याम् - त्याच्यानंतर - गतिः - गतिनामक इन्द्रिय - ततः - नंतर - हरिः - विष्णु - अभूत् - उत्पन्न झाला ॥५८॥
त्यानंतर हात प्रगट झाले, त्यापासून बल आणि बलानंतर हस्तेंद्रियाचा अभिमानी इंद्र प्रगट झाला. नंतर चरण प्रगट झाले. त्यापासून गती (गमनाची क्रिया) आणि मग चरणांची अभिमानी विष्णुदेवता प्रगट झाली. (५८)


नाड्योऽस्य निरभिद्यन्त ताभ्यो लोहितमाभृतम् ।
नद्यस्ततः समभवन् उदरं निरभिद्यत ॥ ५९ ॥
सरिता जाहल्या नाड्या रक्ताचा जन्म तेथला ।
पुन्हा ते जाहले पोट विराट रुपड्यास त्या ॥ ५९ ॥

नाड्यः - नाड्या - निरभिद्यत - उत्पन्न झाल्या - ताभ्यः - त्यांच्यानंतर - लोहितम् - रक्त इन्द्रिय - आभृतम् - भरले - ततः - नंतर - नद्यः - देवता नद्या - समभवत् - उत्पन्न झाल्या - उदरम् - उदर - निरभिद्यत - उत्पन्न झाले ॥५९॥
नंतर त्या विराट पुरुषाला नाडया उत्पन्न झाल्या. त्यापासून रक्त उत्पन्न झाले आणि नंतर त्यांच्या अभिमानी देवता नद्या प्रगट झाल्या. नंतर पोट प्रगट झाले. (५९)


क्षुत्पिपासे ततः स्यातां समुद्रस्त्वेतयोरभूत् ।
अथास्य हृदयं भिन्नं हृदयान्मन उत्थितम् । ६० ॥
भूक-तृष्णा अभिव्यक्ती समुद्र जन्मला तिथे
हृदयो जाहले तेथे तेथील चंद्र देवता ॥ ६० ॥

ततः - नंतर - क्षुत्पिपासे - क्षुधा व तहान - स्याताम् - उत्पन्न झाल्या - एतयोः - ह्यांच्या ठिकाणी - तु - तर - समुद्रः - देवता समुद्र - अभूत् - उत्पन्न झाला - अथ - नंतर - अस्य - ह्या विराट् पुरुषाला - हृदयम् - हृदय - निर्भिन्नम् - उत्पन्न झाले - हृदयात् - हृदयानंतर - मनः - अन्तःकरण - उत्थितम् - उत्पन्न झाले ॥६०॥
त्यापासून तहान-भूक अभिव्यक्त झाली आणि मग उदराची अभिमानी समुद्रदेवता उत्पन्न झाली. त्यानंतर हृदय प्रगट झाले. हृदयापासून मन उत्पन्न झाले. (६०)


मनसश्चन्द्रमा जातो बुद्धिर्बुद्धेर्गिरां पतिः ।
अहङ्कारस्ततो रुद्रः चित्तं चैत्यस्ततोऽभवत् । ६१ ॥
तेथेचि बुद्धिही झाली ब्रह्मा तेथील देवता
अहंकार तिथे तैसा अधिष्ठाताचि रुद्र तो ।
चित्तही जाहले तेथे क्षेत्रज्ञ देवता तिथे ॥ ६१ ॥

मनसः - अन्तःकरणापासून - चन्द्रमाः - देवता चंद्र - जातः - उत्पन्न झाला - बुद्धिः - बुद्धि - बुद्धेः - बुद्धीची - गिरां पतिः - देवता ब्रह्मदेव - अहंकारः - अहंकार - ततः - नंतर - रुद्रः - देवता रुद्र - चित्तम् - चित्त - ततः - नंतर - चैत्यः - देवता क्षेत्रज्ञ - अभवत् - उत्पन्न झाला ॥६१॥
नंतर त्याचा अभिमानी चंद्र उत्पन्न झाला. नंतर हृदयापासूनच बुद्धी आणि त्याचा अभिमानी ब्रह्मदेव प्रगट झाला. नंतर अहंकार व त्यापाठोपाठ त्याची अभिमानी रुद्रदेवता प्रगट झाली.यानंतर चित्त आणि त्याचा अभिमानी क्षेत्रज्ञ प्रगट झाला. (६१)


एते हि अभ्युत्थिता देवा नैवास्योत्थापनेऽशकन् ।
पुनराविविशुः खानि तमुत्थापयितुं क्रमात् । ६२ ॥
विराट पुरुषा कांही गमली ती अपूर्णता ।
उत्पत्तिस्थान शोधोनी शिरल्या आत देवता ॥ ६२ ॥

अभ्युत्थितः - उत्पन्न झालेले - एते - हे - देवाः हि - देवतासुद्धा - अस्य - ह्या विराट् पुरुषाला - उत्थापने - उठविण्याविषयी - न एव अशकन् - समर्थ झाले नाहीतच - तम् - त्याला - उत्थापयितुम् - उठविण्याकरिता - पुनः - पुनः - क्रमात् - अनुक्रमाने - खानि - आपापल्या छिद्रात - आविविशुः - प्रवेश करते झाले ॥६२॥
जेव्हा या क्षेत्रज्ञाव्यतिरिक्त सर्व देवता उत्पन्न होऊन सुद्धा विराट पुरुषाला उठविण्यास असमर्थ ठरल्या, तेव्हा त्याला उठवण्यासाठी त्या देवता क्रमशः पुन्हा आपापल्या उत्पत्तिस्थानांमध्ये प्रविष्ट होऊ लागल्या. (६२)


वह्निर्वाचा मुखं भेजे नोदतिष्ठत् तदा विराट् ।
घ्राणेन नासिके वायुः नोदतिष्ठत् तदा विराट् । ६३ ॥
अग्नी तो त्या मुखामाजी वायूही नासिकेत त्या ।
गेले परी न झाले ते विराट रुप जागृत ॥ ६३ ॥

वह्निः - अग्नि - वाचा - वाणीसह - मुखम् - मुखात - भेजे - शिरला - तदा - तेव्हाहि - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही - वायुः - वायु - घ्राणेन - घ्राणेन्द्रियासह - नासिके - नाकपुड्यात - भेजे - शिरला - तदा - तरीही - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही ॥६३॥
अग्नीने वाणीसह मुखामध्ये प्रवेश केला, परंतु त्यामुळे विराट पुरुष उठला नाही. वायूने घ्राणेंद्रियासह नाकांच्या छिद्रात प्रवेश केला, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. (६३)


अक्षिणी चक्षुषादित्यो नोदतिष्ठत् तदा विराट् ।
श्रोत्रेण कर्णौ च दिशो नोदतिष्ठत् तदा विराट् । ६४ ॥
नेत्रात सूर्य तो गेला दिशा कानात सर्वही ।
परी ना जाहला जागा विराट पुरुषोत्तम ॥ ६४ ॥

आदित्यः - सूर्य - चक्षुषा - चक्षुरिन्द्रियासह - अक्षिणी - नेत्रस्थानात - भेजे - शिरला - तदा - त्या वेळी - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही - च - आणि - दिशः - देवता दिशा - श्रोत्रेण - कर्णेन्द्रियासह - कर्णौ - कानाचा आश्रय करत्या झाल्या - तदा - त्या वेळी - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही ॥६४॥
सूर्याने चक्षूसह नेत्रात प्रवेश केला तरीपण विराट पुरुष उठला नाही. दिशांनी श्रवणेंद्रियांसहित कानांमध्ये प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. (६४)


त्वचं रोमभिरोषध्यो नोदतिष्ठत् तदा विराट् ।
रेतसा शिश्नमापस्तु नोदतिष्ठत् तदा विराट् । ६५ ॥
औषधी शिरल्या रोमी लिंगी जल नि वीर्यही ।
परी ना जाहला जागा विराट पुरुषोत्तम ॥ ६५ ॥

औषध्यः - औषधि - रोमभिः - रोमासह - त्वचम् - त्वगिन्द्रियाचा आश्रय करत्या झाल्या - तदा - तेव्हा - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही - आपः - पाणी - रेतसा - वीर्यासह - शिश्नम् - जननेंद्रियाचा आश्रय करते झाले - तदा - तेव्हा - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही ॥६५॥
औषधींनी रोमांसहित त्वचेमध्ये प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. पाण्याने वीर्यासह लिंगामध्ये प्रवेश केला, तरीसुद्धा विराट पुरुष उठला नाही. (६५)


गुदं मृत्युरपानेन नोदतिष्ठत् तदा विराट् ।
हस्ताविन्द्रो बलेनैव नोदतिष्ठत् तदा विराट् । ६६ ॥
गुदीं मृत्यु जरी गेला हातात इंद्रही परी ।
नच जागृत तो झाला विराट पुरुषोत्तम ॥ ६६ ॥

मृत्युः - मृत्यु - अपानेन - अपानेन्द्रियासह - गुदम् - गुदव्दाराचा आश्रय करता झाला - तदा - तेव्हा - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही - इन्द्रः - इन्द्र - बलेन - बलनामक इन्द्रियासह - हस्तौ एव - हस्ताचाच आश्रय करता झाला - तदा - तेव्हा - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही ॥६६॥
मृत्यूने अपानाबरोबर गुदस्थानात प्रवेश करूनही विराट पुरुष उठला नाही. इंद्राने शक्तीसह हातांमध्ये प्रवेश केला, परंतु यानेही विराट पुरुष उठला नाही. (६६)


विष्णुर्गत्यैव चरणौ नोदतिष्ठत् तदा विराट् ।
नाडीर्नद्यो लोहितेन नोदतिष्ठत् तदा विराट् । ६७ ॥
गतिच्या सह तो विष्णु पायामाजी प्रवेशला ।
रक्तासह नद्या गेल्या परी ना उठला हरी ॥ ६७ ॥

विष्णुः - विष्णु - गत्या - गतीसह - चरणौ - पायांचा आश्रय करता झाला - तदा - तेव्हा - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् एव - उठलाच नाही - नद्यः - नद्या - लोहितेन - रक्तासह - नाडीः - नाडींचा आश्रय करत्या झाल्या - तदा - त्या वेळी - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही ॥६७॥
विष्णूने गतीसह चरणांमध्ये प्रवेश केला, तरी विराट पुरुष उठला नाही. नद्यांनी रक्तासह नाडयांमध्ये प्रवेश केला, तरीही विराट पुरुष उठला नाही. (६७)


क्षुत्तृड्भ्यां उदरं सिन्धुः नोदतिष्ठत् तदा विराट् ।
हृदयं मनसा चन्द्रो नोदतिष्ठत् तदा विराट् । ६८ ॥
क्षुधा तृष्णा समुद्रोही गेले त्या उदरात पै ।
मनाच्या सह तो चंद्र जाता ही तो उठेचि ना ॥ ६८ ॥

सिंधुः - समुद्र - क्षुतृड्भ्याम् - क्षुधा आणि तृषा यासह - उदरम् - उदराचा आश्रय करता झाला - तदा - तेव्हा - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही - चन्द्रः - चन्द्र - मनसा - मनासह - हृदयम् - हृदयाचा आश्रय करता झाला - तदा - तेव्हा - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही ॥६८॥
समुद्राने तहान-भूकेसह उदरामध्ये प्रवेश केल्यानेही विराट पुरुष उठला नाही. चंद्राने मनासहित हृदयात प्रवेश केला, पण त्यानेही विराट पुरुष उठला नाही. (६८)


बुद्ध्या ब्रह्मापि हृदयं नोदतिष्ठत् तदा विराट् ।
रुद्रोऽभिमत्या हृदयं नोदतिष्ठत् तदा विराट् । ६९ ॥
बुद्धिच्या सह तो ब्रह्मा हृदयात प्रवेशला ।
अहंकारासवे रुद्र जाताही न उठे परी ॥ ६९ ॥

ब्रह्मा - ब्रह्मदेव - बुद्ध्या - बुद्धीसह - हृदयम् - हृदयाचा आश्रय करता झाला - तदा आपि - त्या वेळीही - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही - रुद्रः - रुद्र - अभिमत्या - अहंकारासह - हृदयम् - हृदयाचा आश्रय करता झाला - तदा - तेव्हा - विराट् - विराट् पुरुष - न उदतिष्ठत् - उठला नाही ॥६९॥
ब्रह्मदेवाने बुद्धीसहित हृदयात प्रवेश केल्यानंतरही विराट पुरुष उठला नाही. रुद्राने अहंकारासहित त्याच हृदयात प्रवेश केला, पण विराट पुरुष उठला नाही. (६९)


चित्तेन हृदयं चैत्यः क्षेत्रज्ञः प्राविशद्यदा ।
विराट्तदैव पुरुषः सलिलाद् उदतिष्ठत ॥ ७० ॥
चित्ताच्या सह क्षेत्रज हृदयात प्रवेशता ।
जागा झाला तदा तो नी उठोनी ठाकला उभा ॥ ७० ॥

यदा - ज्या वेळी - चैत्यः - चित्ताची अधिष्ठात्री देवता - क्षेत्रज्ञः - क्षेत्रज्ञ - चित्तेन - चित्तासह - हृदयम् - हृदयात - अविशत् - प्रवेश करता झाला - तदा एव - त्याच वेळी - विराट् पुरुष - विराट् पुरुष - सलिलात् - पाण्यातून - उदतिष्ठत - उठला ॥७०॥
परंतु जेव्हा चित्ताचा अधिष्ठाता क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव याने चित्तासहित हृदयात प्रवेश केला, त्याचवेळी विराट पुरुष पाण्यामधून उठून उभा राहिला. (७०)


यथा प्रसुप्तं पुरुषं प्राणेन्द्रियमनोधियः ।
प्रभवन्ति विना येन नोत्थापयितुमोजसा ॥ ७१ ॥
झोपल्या माणसा जेवी प्राण इंद्रिय नी मन ।
बुद्धि नी चित्त क्षेत्रज्ञा सोडता नच जागृती ॥
तसा तो उठला नाही चित्तक्षेत्रज्ञ या विना ॥ ७१ ॥

यथा - ज्याप्रमाणे - प्राणेन्द्रियमनोधियः - प्राण, इन्द्रिये, मन व बुद्धि - येन विना - ज्या क्षेत्रज्ञावाचून - प्रसुप्तम् - निजलेल्या - पुरुषम् - पुरुषाला - ओजसा - शक्तीने - उत्थापयितुम् - उठविण्याकरिता - न प्रभवन्ति - समर्थ होत नाहीत ॥७१॥
ज्याप्रमाणे लोकांमध्ये प्राण, इंद्रिये, मन. आणि बुद्धी चित्ताचा अधिष्ठाता असणार्‍या सहाय्याशिवाय झोपलेल्या शक्तीने उठवू शकत नाहीत, (त्याप्रमाणे विराट पुरुषालासुद्धा क्षेत्रज्ञ परमात्म्याशिवाय उठविता येत नाही.) (७१)


तमस्मिन् प्रत्यगात्मानं धिया योगप्रवृत्तया ।
भक्त्या विरक्त्या ज्ञानेन विविच्यात्मनि चिन्तयेत् ॥ ७२ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां
तृतीयस्कंधे षड्‌विंशोऽध्यायः ॥ २६ ॥
म्हणोनी भक्ति वैराग्य एक चित्त करोनिया ।
ज्ञानाने अंतरात्म्याला जाणोनी भजणे हित ॥ ७२ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥
॥ सव्विसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २६ ॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

तम् - त्या - प्रत्यगात्मानम् - अंतर्यामी राहणार्‍या क्षेत्रज्ञाला - भक्त्या - भक्तीच्या योगाने - विरक्त्या - वैराग्याने - योगप्रवृत्तया - योगाभ्यासात प्रवृत्त झालेल्या अशा - धिया - बुद्धीने - ज्ञानेन - ज्ञानाने - अस्मिन् - ह्या - आत्मनि - कार्यकारणसमूहाच्या ठिकाणी - विचित्र्य - ओळखून - चिन्तयेत् - चिन्तन करावे ॥७२॥
म्हणून भक्ती, वैराग्य आणि चित्ताच्या एकाग्रतेतून प्रगट झालेल्या ज्ञानाने त्या अंतरात्मस्वरूप क्षेत्रज्ञाचे या शरीरात साक्षिरूपाने चिंतन केले पाहिजे. (७२)


स्कंध तिसरा - अध्याय सव्विसावा समाप्त

GO TOP