![]() |
श्रीमद् भागवत पुराण
देवहूतिकपिलसंवादः, कपिलद्वारा भक्तियोगनिरूपणं च - देवहूतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
शौनक उवाच -
कपिलस्तत्त्वसङ्ख्याता भगवान् आत्ममायया । जातः स्वयमजः साक्षाद् आत्मप्रज्ञप्तये नृणाम् ॥ १ ॥
शौनकांनी विचारिले - ( अनुष्टुप् ) अजन्मा असुनी जन्म घेतला ज्ञान सांगण्या । कपिले तत्वसंख्या ती योजिली बुद्धिपूर्वक ॥ १ ॥
तत्त्वसंख्याता - प्रकृत्यादि तत्त्वांची गणना करणारा- साक्षात् - प्रत्यक्ष- भगवान् - श्रीहरिस्वरूप- कपिलः - कपिल- स्वयम् - स्वतः - अजः अपि - जन्मरहित असूनसुद्धा- नृणाम् - मनुष्यांना- आत्मप्रज्ञप्तये - आत्मज्ञान सांगण्याकरिता- आत्ममायया - आपल्या योगमायेने- जातः - जन्मास आला आहे ॥१॥
शौनकांनी विचारले - तत्त्वांची संख्या करणारे भगवान कपिल साक्षात अजन्मा नारायण असूनसुद्धा लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपल्या मायेने उत्पन्न झाले होते. (१)
न ह्यस्य वर्ष्मणः पुंसां वरिम्णः सर्वयोगिनाम् ।
विश्रुतौ श्रुतदेवस्य भूरि तृप्यन्ति मेऽसवः ॥ २ ॥
कथा मी ऐकिल्या खूप परी या कपिलांचिही । कीर्ति ऐकोनि माझी ना तृप्ति ती जाहली मुळी ॥ २ ॥
पुंसाम् - पुरुषांमध्ये - वर्ष्मणः - वृद्ध अशा - सर्वयोगिनाम् - सर्व योग्यांमध्ये - वरिम्णः - श्रेष्ठ अशा - अस्य - कपिलाच्या - विश्रुतौ - कीर्तीविषयी - श्रुतदेवस्य - श्रवण केला आहे देव ज्याने अशा - मे - माझी - असवः - इन्द्रिये - हि - खरोखर - भूरि - अतिशय - न तृप्यन्ति - तृप्त होत नाहीत ॥२॥
मी भगवंतांची पुष्कळशी चरित्रे ऐकली आहेत, परंतु या योगिप्रवर पुरुषश्रेष्ठ कपिलांची कीर्ती ऐकूनही माझे मन तृप्त होत नाही. (२)
यद् यद् विधत्ते भगवान् स्वच्छन्दात्मात्ममायया ।
तानि मे श्रद्दधानस्य कीर्तन्यान्यनुकीर्तय ॥ ३ ॥
स्वच्छंदात्मा स्वमायेने भक्तासाठीच जन्मतो । कीर्तनीय करी लीला सांगा श्रद्धेचि ऐकतो ॥ ३ ॥
स्वच्छन्दात्मा - भक्तांच्या इच्छेनुसार आहे देहधारणा ज्याची असा - भगवान् - श्रीहरि - आत्ममायया - आपल्या योगमायेने - यत् यत् - जे जे - विधत्ते - करतो - कीर्तन्यानि - वर्णनीय अशा - तानि - त्या चरित्रांना - श्रद्दधानस्य - श्रद्धायुक्त अशा - मे - मला - अनुकीर्तय - सांग ॥३॥
सर्वथा स्वतंत्र असे श्रीहरी आपल्या योगमायेने ज्या ज्या लीला करतात, त्या सर्व कथन करण्यायोग्य कथा श्रद्धावान मला आपण ऐकवाव्यात. (३)
सूत उवाच -
द्वैपायनसखस्त्वेवं मैत्रेयो भगवांस्तथा । प्राहेदं विदुरं प्रीत आन्वीक्षिक्यां प्रचोदितः ॥ ४ ॥
सूतजी सांगतात - मुनीजी आपुल्या ऐसा विदूरे प्रश्र्न छेडिता । द्वैपायनसखा ऐसे मैत्रेये वदले पुढे ॥ ४ ॥
एवम् - याप्रमाणे - आन्वीक्षिक्याम् - आत्मज्ञानाविषयी - प्रचोदितः - प्रेरणा केलेला असा - व्दैपायनसुखः - व्यासाचा मित्र - भगवान् - भगवान - मैत्रयः - मैत्रय ऋषि - तु - तर - प्रीतः - संतुष्ट झालेला - विदुरम् - विदुराला - तथा - त्याच्या प्रश्नाप्रमाणे - इदम् - असे - प्राह - म्हणाला ॥४॥
सूत म्हणाले - मुनिवर्य, आपल्याप्रमाणेच जेव्हा विदुराने सुद्धा हाच आत्मज्ञानविषयक प्रश्न विचारला, तेव्हा श्रीव्यासांचे सुहृद भगवान मैत्रेय प्रसन्न होऊन म्हणाले. (४)
मैत्रेय उवाच -
पितरि प्रस्थितेऽरण्यं मातुः प्रियचिकीर्षया । तस्मिन् बिन्दुसरेऽवात्सीत् भगवान् कपिलः किल ॥ ५ ॥
मैत्रेयजी सांगतात - पिता वनास जाताची मातेला तोषवावया । कपील राहण्या गेले बिंदूसर तटासि त्या ॥ ५ ॥
पितरी - पिता - अरण्यं प्रस्थिते - अरण्यात गेला असता - भगवान् - भगवान - कपिलः - कपिल - मातुः - मातेचे - प्रियचिकीर्षया - प्रिय करण्याच्या इच्छेने - तस्मिन् - त्या - बिन्दुसरोवरे किल - बिन्दु सरोवरावरच - अवात्सीत् - राहिला ॥५॥
मैत्रेय म्हणाले - पिता वनात निघून गेल्यानंतर भगवान कपिल मातेला आनंद देण्याच्या इच्छेने बिंदुसर तीर्थावर राहू लागले. (५)
तमासीनमकर्माणं तत्त्वमार्गाग्रदर्शनम् ।
स्वसुतं देवहूत्याह धातुः संस्मरती वचः ॥ ६ ॥
विरागी तत्वज्ञाता तो कपील भगवान् मुनी । आसनी बैसले तेंव्हा मातेने प्रश्र्न छेडिला ॥ ६ ॥
धातुः - ब्रह्मदेवाचे - वचः - भाषणाला - संस्मरन्ती - स्मरणारी अशी - देवहूती - देवहूती - अकर्माणम् - कर्म नाही ज्याला असा - तत्त्वमार्गाप्रदर्शनम् - ज्ञानमार्गाच्या सिद्धान्ताला दाखविणार्या अशा - आसीनम् - बसलेल्या अशा - तम् - त्या - स्वसुतम् - आपल्या पुत्राला - आह - म्हणाली ॥६॥
तत्त्वसमूहाचे पारदर्शी भगवान कपिल एक दिवस स्वस्थपणे आसनावर बसले होते. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या वचनाचे स्मरण होऊन देवहूती आपल्या मुलाला म्हणाली. (६)
देवहूतिरुवाच -
निर्विण्णा नितरां भूमन् असत् इन्द्रियतर्षणात् । येन सम्भाव्यमानेन प्रपन्नान्धं तमः प्रभो ॥ ७ ॥
देवहूती म्हणाली - भूमन्! उबग हा आला दुष्ट इंद्रीय लालसी । तमीं या घोर अज्ञानी पडिले चोजिता तया ॥ ७ ॥
भूमन् - हे सर्वव्यापका - प्रभो - प्रभो कपिला - अहम् - मी - असदिन्द्रियतर्षणात् - तुच्छ अशा इंद्रियाच्या उपभोगतृष्णेमुळे - नितराम् - अत्यन्त - निर्विण्णा - खिन्न झालेली अशी - येन संभाव्यमानेन - ज्या तृष्णेच्या पूर्ण करण्याने - अन्धम् - गाढ - तमः - अन्धकारात - प्रपन्ना - सापडलेली - अस्मि - आहे ॥७॥
देवहूती म्हणाली - हे सर्वव्यापी प्रभो, या इंद्रियांच्या विषयलालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले आहे आणि यांची इच्छा पूर्ण करण्यामुळे मी घोर अज्ञानांधकारात पडले आहे. (७)
तस्य त्वं तमसोऽन्धस्य दुष्पारस्याद्य पारगम् ।
सच्चक्षुर्जन्मनामन्ते लब्धं मे त्वदनुग्रहात् ॥ ८ ॥
कृपेने तुमच्या झाले जीवन्मुक्तचि मी अशी । तुम्हीच लाभले डोळे पार होण्या तमातुनी ॥ ८ ॥
दुष्पारस्य - दुष्ट आहे शेवट ज्याचा अशा - त्वम् - तू - सत् - उत्तम - चक्षुः - दृष्टि - जन्मनाम् - जन्मांच्या - अन्ते - शेवटी - अद्य - आज - मे - मजकडून - त्वदनुग्रहात् - तुझ्या अनुग्रहामुळे - लब्धम् - मिळविलेली - अस्ति - आहे ॥८॥
आता आपल्या कृपेने माझी जन्मपरंपरा समाप्त झाली आहे आणि त्यामुळे या दुस्तर अंधकारातून पार पडण्यासाठी उत्कृष्ट नेत्ररूप असे आपण मला प्राप्त झाला आहात. (८)
य आद्यो भगवान् पुंसां ईश्वरो वै भवान्किल ।
लोकस्य तमसान्धस्य चक्षुः सूर्य इवोदितः ॥ ९ ॥
तुम्ही तो आदिपुरुष स्वामी ही सर्व सृष्टिचे । अज्ञानी पुरुषांसाठी तुम्ही तो सूर्यची अहा ॥ ९ ॥
पुंसाम् - पुरुषांमध्ये - आद्यः - पहिला - भगवान् - भगवान - ईश्वरः - श्रीहरि - उदितः - उदयाला आलेल्या - सूर्यः इव - सूर्याप्रमाणे - तमसा - अज्ञानाने - अंधस्य - अंध अशा - लोकस्य - लोकांची - चक्षुः - दृष्टि - वै - खरोखर - किल - निश्चयाने - स - तो - भवान् - आपण - अस्ति - आहा ॥९॥
आपण सर्व जीवांचे स्वामी भगवान आदिपुरुष आहात. तसेच अज्ञानांधकाराने अंध झालेल्या लोकांसाठी नेत्रस्वरूप असणारे आपण सूर्याप्रमाणे प्रगट झाला आहात. (९)
अथ मे देव सम्मोहं अपाक्रष्टुं त्वमर्हसि ।
योऽवग्रहोऽहं मम इति इति एतस्मिन् योजितस्त्वया ॥ १० ॥
देह गेहात या देवा गुंततो जीव ही तशी । करणी तुमची आहे आता मोहास सारणे ॥ १० ॥
अथ - आता - देव - हे देवा ! - मे - माझ्या - संमोहम् - अज्ञानाला - अपाक्रष्टुम् - दूर करण्याकरिता - त्वम् - तू - अर्हसि - योग्य आहेस - त्वया - तुजकडून - एतस्मिन् - ह्या देहाच्या ठिकाणी - यः - जो - अहंमम - मी व माझे - इति - असा - अवग्रहः - आग्रह - योजितः - निर्मिलेला - अस्ति - आहे ॥१०॥
देवा, या देह गृह इत्यादींमध्ये जो मी-माझेपणाचा दुराग्रह असतो, तोही आपणच निर्माण केलात. म्हणून आता आपण माझा हा महामोह नाहीसा करा. (१०)
तं त्वा गताहं शरणं शरण्यं
स्वभृत्यसंसारतरोः कुठारम् । जिज्ञासयाहं प्रकृतेः पूरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम् ॥ ११ ॥
( इंद्रवज्रा ) संसारवृक्षास कुठार तुम्ही पुरुष प्रकृतिस जाणण्याला । आले तुम्हा आश्रयि मी अशी की सद्धर्म ज्ञात्या नमिते तुला मी ॥ ११ ॥
अहम् - मी - प्रकृतेः - मायेला - च - आणि - पुरुषस्य - ईश्वराला - जिज्ञासया - जाणण्याच्या इच्छेने - तम् - त्या - त्वा - तुला - शरणम् - शरण - आगता - आलेली - अस्मि - आहे - अहम् - मी - शरण्यम् - रक्षण करणार्या अशा - स्वभृत्यसंसारतरोः - आपल्या भक्तांच्या संसाररूपी वृक्षाला - कुठारम् - कुर्हाडीप्रमाणे असणार्या अशा - सद्धर्मविदाम् - खर्या धर्माला जाणणार्यांमध्ये - वरिष्ठम् - श्रेष्ठ अशा - त्वाम् - तुला - नमामि - नमस्कार करित्ये ॥११॥
आपण आपल्या भक्तांच्या संसाररूप वृक्षासाठी कुर्हाडीप्रमाणे आहात. प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी शरणागतवत्सल आपणास शरण आले आहे. भागवतधर्म जाणणार्यांत आपण सर्वश्रेष्ठ आहात. मी आपणांस प्रणाम करीत आहे. (११)
मैत्रेय उवाच -
इति स्वमातुर्निरवद्यमीप्सितं निशम्य पुंसां अपवर्गवर्धनम् । धियाभिनन्द्यात्मवतां सतां गतिः बभाष ईषत् स्मितशोभिताननः ॥ १२ ॥
मैत्रेयजी म्हणाले - अशी स्व माता वदुनी मनीची इच्छा करी व्यक्तचि जी पवित्र । मनात ऐकोनि त्यांनी प्रतिज्ञा करोनि वाक्ये अशि बोलले ते ॥ १२ ॥
इति - याप्रमाणे - स्वमातुः - आपल्या मातेचे - निरवद्यम् - निर्दोष अशा - ईप्सितम् - मनोरथाला - निशम्य - ऐकून - पुंसाम् - पुरुषांना - अपवर्गवर्धनम् - मोक्षाविषयी प्रेम उत्पन्न करणार्या अशा - तम् - त्या मनोरथाचे - धिया - बुद्धीने - अभिनंद्य - अभिनंदन करून - आत्मवताम् - ज्ञानी अशा - सताम् - साधूंचा - गतिः - रक्षक असा - सः - तो कपिल - ईषत्स्मितशोभिताननः - मंद हास्याने शोभायमान झाले आहे मुख ज्याचे असा - बभाषे - म्हणाला ॥१२॥
मैत्रेय म्हणाले - अशा प्रकारे माता देवहूतीने परम पवित्र आणि लोकांना मोक्षमार्गाबद्दल प्रेम उत्पन्न करणारी आपली इच्छा प्रगट केली. ती ऐकून आत्मज्ञ सत्पुरुषांचे गन्तव्य असणारे श्री कपिलमुनी तिची मनापासून प्रशंसा करू लागले आणि नंतर मंद हास्याने शोभणार्या मुखाने म्हणाले. (१२)
श्रीभगवानुवाच -
योग आध्यात्मिकः पुंसां मतो निःश्रेयसाय मे । अत्यन्तोपरतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च ॥ १३ ॥
श्री भगवान् कपिल म्हणाले - ( अनुष्टुप् ) माते गे मज विश्वास अध्यात्म हेचि मानवा । बंधना तोडुनी मोक्ष देते ईशास ध्यायिता ॥ १३ ॥
आध्यात्मिकः - परमात्म्याची प्राप्ती करून देणारा - योगः - भक्तियोग - पुंसाम् - पुरुषांच्या - निःश्रेयसाय - कल्याणाकरिता - मे - मला - मतः - अभिमत - अस्ति - आहे - यत्र - ज्या भक्तियोगामध्ये - दुःखस्य च सुखस्य च - दुःखाची आणि सुखाची - अत्यन्तोपरतिः - सर्वथैव शांति - भवति - होते ॥१३॥
भगवान कपिल म्हणाले - माते, सुखादुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या आत्यंतिक कल्याणाचे प्रमुख साधन आहे, असे माझे मत आहे. (१३)
तमिमं ते प्रवक्ष्यामि यं अवोचं पुरानघे ।
ऋषीणां श्रोतुकामानां योगं सर्वाङ्गनैपुणम् ॥ १४ ॥
संपन्न सर्व अंगासी योग तो नारदा पुढे । वर्णिला वर्णितो तोची ऐक सावध होउनी ॥ १४ ॥
अनघे - हे निष्पाप - तम् - त्या - इमम् - ह्या योगाला - ते - तुला - प्रवक्ष्यामि - सांगतो - श्रोतुकामानाम् - श्रवणाची आहे इच्छा ज्यांना अशा - ऋषीणाम् - ऋषींना - सर्वांगनैपुणम् - सर्व अङ्गांनी परिपूर्ण अशा - यम् - ज्या - योगम् - योगाला - पुरा - पूर्वी - अवोचम् - मी बोललो ॥१४॥
माते, पूर्वी नारद आदी ऋषींनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर, सर्व अंगांनी संपन्न अशा योगाचे मी वर्णन केले होते, तेच मी आता तुला सांगतो. (१४)
चेतः खल्वस्य बन्धाय मुक्तये चात्मनो मतम् ।
गुणेषु सक्तं बन्धाय रतं वा पुंसि मुक्तये ॥ १५ ॥
जीवांच्या बंध मोक्षाला एकची मन कारण । आसक्ता बंधनी नेते भक्तांना मोक्ष दावि ते ॥ १५ ॥
चेतः - अंतःकरण - अस्य - ह्या - आत्मनः - जीवात्म्याच्या - बन्धाय - बंधासाठी - च - आणि - मुक्तये - मोक्षासाठी - खलु - निश्चयाने - मतम् - मानलेले - अस्ति - आहे - गुणेषु - विषयांमध्ये - सक्तम् - आसक्त असलेले असे - बन्धाय - बंधासाठी - वा - किंवा - पुंसि - श्रीहरीच्या ठिकाणी - रतम् - आसक्त असलेले असे - मुक्तये - मोक्षासाठी - भवति - होते ॥१५॥
या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानले गेले आहे. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरते; तर परमात्म्यात रमल्यास मोक्षाला कारण ठरते. (१५)
अहं ममाभिमानोत्थैः कामलोभादिभिर्मलैः ।
वीतं यदा मनः शुद्धं अदुःखं असुखं समम् ॥ १६ ॥
मन जै मी पणा लागी विकारासहि त्यागिते । तदा ते सुखदुःखाच्या पासुनी मुक्त होतसे ॥ १६ ॥
यदा - ज्या वेळी - अहंममाभिमानोत्थैः - मी व माझे अशा अभिमानाने उत्पन्न झालेल्या - कामलोभादिभिः - काम, लोभ इत्यादिक - मलैः - विकारांनी - वीतम् - रहित असे - मनः - अंतःकरण - शुद्धम् - शुद्ध असे - अदुःखम् - दुःखरहित असे - असुखम् - सुखरहित असे - भवति - होते ॥१६॥
ज्यावेळी हे मन ‘मी आणि माझे ’ या अभिमानाने उत्पन्न होणार्या काम, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होते, त्यावेळी ते सुख-दुःखापासून वेगळे होऊन सम अवस्थेला प्राप्त होते. (१६)
तदा पुरुष आत्मानं केवलं प्रकृतेः परम् ।
निरन्तरं स्वयंज्योतिः अणिमानं अखण्डितम् ॥ १७ ॥ ज्ञानवैराग्ययुक्तेन भक्तियुक्तेन चात्मना । परिपश्यति उदासीनं प्रकृतिं च हतौजसम् ॥ १८ ॥
तदा तो ज्ञान वैराग्य हृदये भक्तियुक्त त्या । आत्म्याला प्रकृतीहून परा नी एकमात्रची ॥ १७ ॥ भेदशून्य उदासीन स्वतेज सूक्ष्म पाहतो । तसेची प्रकृती लागी शक्तिहीनहि जाणितो ॥ १८ ॥
तदा - त्या वेळी - पुरुषः - पुरुष - ज्ञानवैराग्ययुक्तेन - ज्ञान व वैराग्य यांनी युक्त अशा - च - आणि - भक्तियुक्तेन - भक्तीने युक्त अशा - आत्मना - अंतःकरणाने - आत्मानम् - आत्म्याला - प्रकृतेः - मायेच्या - परम् - पलीकडे असणार्या - केवलम् - स्वगतभेदाने रहित - स्वयंज्योतिः - स्वयंप्रकाश - अणिमानम् - अत्यंत सूक्ष्म - अखण्डितम् - परिमाणरहित - उदासीनम् - क्रियारहित - च - आणि - हतौजसम् - क्षीण झाले आहे बल जिचे अशा - प्रकृतिम् - मायेला - परिपश्यति - पाहतो ॥१७-१८॥
त्यावेळी जीव आपल्या ज्ञान, वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्मा प्रकृतीच्या पलीकडील, अद्वितीय, भेदरहित, स्वयंप्रकाश, सूक्ष्म, अखंड आणि सुख-दुःखरहित असून प्रकृती शक्तिहीन आहे, असा अनुभव करतो. (१७-१८)
न युज्यमानया भक्त्या भगवति अखिलात्मनि ।
सदृशोऽस्ति शिवः पन्था योगिनां ब्रह्मसिद्धये ॥ १९ ॥
योग्यांना भगवत् प्राप्ती निमित्त भक्तिचे असे । हिताचे अन्य ना कांही ते एक मंगलप्रद ॥ १९ ॥
योगिनाम् - योगी पुरुषांना - ब्रह्मसिद्धये - ब्रह्मप्राप्तीकरिता - अखिलात्मनि - सर्वांतर्यामी अशा - भगवति - षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा श्रीहरीच्या ठिकाणी - युज्यमानया - योजिल्या जाणार्या - भक्त्या - भक्तीशी - सुदृशः - तुल्य - शिवः - कल्याणकारक - पन्थाः - मार्ग - न अस्ति - नाही ॥१९॥
योग्यांना भगवत्प्राप्तीसाठी सर्वात्मा श्रीहरीच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारक मार्ग नाही. (१९)
प्रसङ्गमजरं पाशं आत्मनः कवयो विदुः ।
स एव साधुषु कृतो मोक्षद्वारं अपावृतम् ॥ २० ॥
संग आसक्ति हे दोन आत्म्याची बंधने तशी । परी त्यातून संताना मोक्षाचे दार ते खुले ॥ २० ॥
कवयः - विव्दान लोक - प्रसङ्गम् - विषयासक्तीला - आत्मनः - आत्म्याचे - अजरम् - बळकट अशा - पाशम् - बंधनस्वरूप अशा - विदुः - समजतात - सः एव - तीच असक्ती - साधुषु - सत्पुरुषांच्या ठिकाणी - कृतः - केलेली अशी - अपावृतम् - उघडिलेले - मोक्षव्दारम् - मोक्षाचे व्दार - अस्ति - आहे ॥२०॥
आसक्तीलाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन मानतात. परंतु तीच जेव्हा महापुरुषांच्या बाबतीत निर्माण होते, तेव्हा तीच मोक्षाचे उघडलेले दार समजावी. (२०)
तितिक्षवः कारुणिकाः सुहृदः सर्वदेहिनाम् ।
अजातशत्रवः शान्ताः साधवः साधुभूषणाः ॥ २१ ॥ मय्यनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढाम् । मत्कृते त्यक्तकर्माणः त्यक्तस्वजनबान्धवाः ॥ २२ ॥ मदाश्रयाः कथा मृष्टाः शृण्वन्ति कथयन्ति च । तपन्ति विविधास्तापा नैतान् मद्गतचेतसः ॥ २३ ॥
सर्वजीवांसही क्षेमा दया मित्रत्व सारखे । अशत्रु शांत सर्वांशी संतांचा मान वाढवी ॥ २१ ॥ अनन्यभाव ठेवोनी मला प्रेमचि अर्पिती । तोडिती कर्म आप्तांना माझ्यासाठीच केवळ ॥ २२ ॥ माझे परायणो होता कथा कीर्तनि बैसती । विभिन्न ताप त्या भक्ता कधी ना कष्टदायक ॥ २३ ॥
तितिक्षवः - सहनशील - कारुणिकाः - दयाळू असे - सर्वदेहिनाम् - सर्व प्राण्यांचे - सुहृदः - मित्र - अजातशत्रवः - उत्पन्न झालेला नाही शत्रु ज्यांना असे - शांताः - गंभीर - साधवः - साधु - साधुभूषणाः - सुशील हेच आहे भूषण ज्यांचे असे - भवन्ति - असतात ॥२१॥ ये - जे - मयि - माझ्या ठिकाणी - अनन्येन - एकनिष्ठ - भावेन - प्रेमाने - दृढाम् - दृढ अशा - भक्तिम् - भक्तीला - कुर्वन्ति - करितात - मत्कृते - माझ्याकरिता - त्यक्तकर्माणः - टाकिलेले आहे कर्म ज्यांनी असे - त्यक्तस्वजनबान्धवाः - सोडिलेले आहेत आप्तलोक व बांधव ज्यांनी असे ॥२२॥ मदाश्रयाः - मी आहे आश्रय ज्यांना अशा - मृष्टाः - शुद्ध अशा - कथाः - कथांना - शृण्वन्ति - श्रवण करितात - च - आणि - कथयन्ति - सांगतात - मद्गचेतसः - माझ्या ठिकाणी गेलेले आहे अंतःकरण ज्यांचे अशा - एतान् - ह्या भक्तांना - विविधाः - नानाप्रकारचे - तापाः - ताप - न तपन्ति - ताप देत नाहीत ॥२३॥
जे लोक सहनशील, दयाळू, सर्व प्राण्यांचे निष्काम हितेच्छू, कोणाबद्दलही शत्रुत्वाची भावना न ठेवणारे, शांत, सरळ स्वभावाचे आणि सत्पुरुषांचा सन्मान करणारे असतात, जे माझ्यावर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात. माझ्यासाठी सर्व (सकाम) कर्मांचा तसेच आपल्या सग्या-सोयर्यांचा त्याग करतात आणि मत्परायण होऊन माझ्या पवित्र कथांचे श्रवण, कीर्तन करतात तसेच माझ्यातच चित्त लावतात, त्या भक्तांना संसारातील निरनिराळे ताप मुळीच दुःख देऊ शकत नाहीत. (२१-२३)
ते एते साधवः साध्वि सर्वसङ्गविवर्जिताः ।
सङ्गस्तेष्वथ ते प्रार्थ्यः सङ्गदोषहरा हि ते ॥ २४ ॥
सर्वसंगपरि त्यागी जाणावा संत साधु तो । त्यांचाचि संग व्हावा ते दोषासक्तीस हारिती ॥ २४ ॥
साध्वि - हे पतिव्रते - ते एते - ते हे - सर्वसङ्गविवर्जिताः - सर्वसङ्गपरित्याग केलेले असे - साधवः - साधु - सन्ति - होत - अथ - म्हणून - तेषु - त्या साधूच्या ठिकाणी - सङ्गः - सङ्गति - ते - तुजकडून - प्रार्थ्यः - प्रार्थना करण्यास योग्य आहे - हि - कारण - ते - ते साधु - सङ्गदोषहरा - विषयांच्या आसक्तीच्या दोषांना दूर करणारे - सन्ति - आहेत ॥२४॥
हे साध्वी, अशा रीतीने सर्वसंगपरित्याग केलेले महापुरुषच साधू समजावेत. तू त्यांच्याच सहवासाची इच्छा धरावीस, कारण आसक्तीमुळे निर्माण होणार्या दोषांचे ते निराकरण करतात. (२४)
सतां प्रसङ्गान् मम वीर्यसंविदो
भवन्ति हृत्कर्णरसायनाः कथाः । तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति ॥ २५ ॥
( इंद्रवज्रा ) पराक्रमाच्या मम गोष्टि होती नी प्रीय गाथा श्रवणास येते । ज्या ऐकता प्रेमचि वाढुनीया क्रमेचि मोक्षा प्रत जीव जातो ॥ २५ ॥
सताम् - साधूंच्या - प्रसङ्गात् - संगतीमुळे - मम - माझ्या - वीर्यसंविदः - पराक्रमांचे आहे ज्ञान ज्यांमध्ये अशा - हृत्कर्णरसायनाः - हृदय व कर्ण यांना सुख देणार्या अशा - कथाः - कथा - भवन्ति - होतात - तज्जोषणात् - त्यांच्या सेवनामुळे - अपवर्गवर्त्मनि - मोक्षाच्या मार्गाविषयी - आशु - लवकर - श्रद्धा - श्रद्धा - रतिः - प्रेम - भक्तिः - भक्ति - अनुक्रमिष्यति - अनुक्रमाने उत्पन्न होतात ॥२५॥
सत्पुरुषांच्या सहवासातच माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान करून देणार्या तसेच मनाला आणि कानांना प्रिय वाटणार्या कथा होतात. अशा कथांचे सेवन केल्यानेच मोक्षमार्गामध्ये श्रद्धा, प्रेम, आणि भक्तीचा क्रमशः विकास होतो. (२५)
भक्त्या पुमान्जातविराग ऐन्द्रियाद्
दृष्टश्रुतान् मद्रचनानुचिन्तया । चित्तस्य यत्तो ग्रहणे योगयुक्तो यतिष्यते ऋजुभिर्योगमार्गैः ॥ २६ ॥ असेवयायं प्रकृतेर्गुणानां ज्ञानेन वैराग्यविजृम्भितेन । योगेन मय्यर्पितया च भक्त्या मां प्रत्यगात्मानमिहावरुन्धे ॥ २७ ॥
सृष्टी नि लीला मम चिंतनाने वैराग्य लाभे मग भक्तिने त्या । सोप्या अशा भक्ति मार्गेचि जाता प्रयत्न होतो मन निग्रहाचा ॥ २६ ॥ जो प्रकृतीचे गुण-शब्द टाकी वैराग्य ज्ञानासचि पात्र तो हो । ही योगपुष्टी मग शक्तिने तो स्वअंतरात्मा- तनि मेळवीतो ॥ २७ ॥
मद्रचनानुचिन्तया - माझ्या लीलांच्या चिंतनाने - संजातया - उत्पन्न झालेल्या - भक्त्या - भक्तीने - दृष्टश्रुतात् - पाहिलेल्या व ऐकिलेल्या - ऐन्द्रियात् - इन्द्रियसुखापासून - जातविरागः - उत्पन्न झाले आहे वैराग्य ज्याला असा - पुमान् - पुरुष - यत्तः - उद्योग करणारा असा - योगयुक्तः - योगाभ्यासयुक्त असा - ऋजुभिः - सरळ अशा - योगमार्गैः - योगमार्गांनी - चित्तस्य - अन्तःकरणाच्या एकाग्रतेविषयी - यतिष्यते - यत्न करील - अयम् - हा पुरुष - प्रकृतेः - प्रकृतीच्या - गुणानाम् - गुणांचे - असेवया - सेवन न केल्यामुळे - वैराग्यविजृम्भितेन - वैराग्याने वाढलेल्या अशा - ज्ञानेन - ज्ञानाने - योगेन - योगाभ्यासाने - च - आणि - मयि - माझ्या ठिकाणी - अर्पितया - ठेविलेल्या - भक्त्या - भक्तीने - प्रत्यगात्मानम् - सर्वांच्या अन्तर्यामी राहणार्या अशा - माम् - मला - इह - ह्या देहामध्येच - अवरुन्धे - प्राप्त होतो ॥२६-२७॥
नंतर माझ्या विश्वोपत्ती इत्यादी लीलांचे चिंतन केल्याने उत्पन्न झालेल्या भक्तीने लौकिक आणि पारलौकिक सुखांच्या बाबतीत वैराग्य उत्पन्न झाल्याने मनुष्य दक्षतेने योगाच्या भक्तिप्रधान सरळ साधन मार्गांनी एकाग्र होऊन मनोनिग्रहासाठी प्रयत्न करतो. (२६) अशा प्रकारे प्रकृतीच्या गुणांपासून उत्पन्न झालेल्या शब्दादी विषयांचा त्याग केल्याने, वैराग्ययुक्त ज्ञानाने, योगामुळे आणि माझ्या दृढ भक्तीने, अंतरात्मा असलेल्या मला, मनुष्य या देहातच प्राप्त करून घेतो. (२७)
देवहूतिरुवाच -
काचित् त्वय्युचिता भक्तिः कीदृशी मम गोचरा । यया पदं ते निर्वाणं अञ्जसा अन्वाश्नवै अहम् ॥ २८ ॥
देवहूती म्हणाली - ( अनुष्टुप् ) कोणती भक्ति ती योग्य मजला करण्या बरी । जिने मी कष्ट ना होता निर्वाणपद मेळवी ॥ २८ ॥
काचित् - कोणती - भक्तिः - भक्ती - त्वयि - तुझ्या ठिकाणी - उचिता - योग्य अशी - कीदृशी - कोणत्या प्रकारची - अस्ति - आहे - यया - जिच्या योगाने - अहम् - मी - निर्वाणम् - मोक्षरूप अशा - ते - तुझ्या - पदम् - पदाला - अञ्जसा - लवकर - अन्वाश्नवै - प्राप्त होईन ॥२८॥
देवहूती म्हणाली - आपल्या समुचित भक्तीचे स्वरूप काय आहे ? आणि मला कशा प्रकारची भक्ती योग्य आहे ? ज्यायोगे मी सहजपणे आपले निर्वाणपद प्राप्त करू शकेन ? (२८)
यो योगो भगवद्बाणो निर्वाणात्मंस्त्वयोदितः ।
कीदृशः कति चाङ्गानि यतस्तत्त्वावबोधनम् ॥ २९ ॥
बाण जै वेधितो लक्ष तसेचि तत्वज्ञान ते । योगाचे त्या किती अंग असती प्राप्तिसी तुझ्या ॥ २९ ॥
हे निर्वाणात्मन् - हे मोक्षस्वरूपा - त्वया - तुजकडून - यः - जो - भगवद्बाणः - श्रीहरीच्या ठिकाणी बाणरूप असा - योगः - योग - उदितः - सांगितला गेला - यतः - ज्या योगापासून - तत्त्वावबोधनम्- तत्त्वज्ञान - भवति - होते - सः - तो - कीदृशः - कशाप्रकारच्या - अस्ति - आहे - च - आणि - तस्य - त्याची - कति - किती - अङ्गानि - अङ्गे - सन्ति - आहेत ॥२९॥
हे निर्वाणस्वरूप प्रभो ! ज्याच्यामुळे तत्त्वज्ञान होते आणि जो लक्ष्याचा वेध घेणार्या बाणाप्रमाणे भगवंतांची प्राप्ती करून देणारा आहे, तो आपण सांगितलेला योग कसा आहे आणि त्याची किती अंगे आहेत ? (२९)
तद् एतन्मे विजानीहि यथाहं मन्दधीर्हरे ।
सुखं बुद्ध्येय दुर्बोधं योषा भवदनुग्रहात् ॥ ३० ॥
हरी हे सगळे सांगा कृपेने मज सारख्या । मंद बुद्धि स्त्रियांनाही सहज समजू शके ॥ ३० ॥
हरे - हे कपिल महामुने - मन्दधीः - मन्द आहे बुद्धि जिची अशी - योषा - स्त्री - अहम् - मी - तत् - त्या - एतत् - ह्याला - यथा - ज्याप्रमाणे - सुखम् - सुखाने - बुध्येयम् - जाणीन - तथा - त्याप्रमाणे - मे - मला - विजानीहि - सांग ॥३०॥
हे हरे, हे सर्व आपण मला अशा प्रकारे समजावून सांगा की ज्यामुळे आपल्या कृपेने मी मंदबुद्धी स्त्री हा कठीण विषय सहजपणे समजू शकेन. (३०)
मैत्रेय उवाच -
विदित्वार्थं कपिलो मातुरित्थं जातस्नेहो यत्र तन्वाभिजातः । तत्त्वाम्नायं यत्प्रवदन्ति साङ्ख्यं प्रोवाच वै भक्तिवितानयोगम् ॥ ३१ ॥
मैत्रेयजी सांगतात - ( इंद्रवज्रा ) जिच्या शरीरी स्वय जन्मला तो ऐके तिचे बोल नि स्नेह झाला । तत्त्वार्थ जे शास्त्र वदोनि गेले प्रसिद्ध तो सांख्य नि भक्ति योग ॥ ३१ ॥
कपिलः - कपिल मुनि - यत्र - जिच्या ठिकाणी - तन्वा - देहाने - अभिजातः - उत्पन्न झाला - तस्याः - त्या - मातुः - मातेच्या - इत्थम् - याप्रमाणे - अर्थम् - अभिप्रायाला - विदित्वा - जाणून - जातस्नेहः - उत्पन्न झाला आहे स्नेह ज्याला असा - तत्त्वाम्नायम् - ज्यात अनुक्रमाने तत्त्वे सांगितली आहेत अशा - यत् - ज्याला - सांख्यम् - सांख्यशास्त्र - वदन्ति - म्हणतात - तत् - त्याला - च - आणि - भक्तिवितानयोगम् - भक्तिविस्ताररूप योगाला - वै - खरोखर - प्रोवाच - सांगता झाला ॥३१॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, जिच्यापासून त्यांनी स्वतः जन्म घेतला होता, त्या आपल्या मातेचा असा अभिप्राय ऐकून कपिलांच्या हृदयात स्नेह दाटून आला आणि त्यांनी प्रकृती इत्यादी तत्त्वांचे निरूपण करणार्या सांख्यशास्त्राचा आणि भक्ती व योग यांचा उपदेश केला. (३१)
श्रीभगवानुवाच -
देवानां गुणलिङ्गानां आनुश्रविककर्मणाम् । सत्त्व एवैकमनसो वृत्तिः स्वाभाविकी तु या ॥ ३२ ॥ अनिमित्ता भागवती भक्तिः सिद्धेर्गरीयसी । जरयत्याशु या कोशं निगीर्णमनलो यथा ॥ ३३ ॥
भगवान कपिल म्हणाले - ( अनुष्टुप् ) माझ्यासी लाविले चित्त असा जो पुरुषोत्तम । वेद कर्मे नि ज्ञानाने त्याची वृत्ती स्थिरावते ॥ ३२ ॥ अहैतुक अशी भक्ती मुक्तीच्याहुनि श्रेष्ठची । खाऊनी पचते जैसे तसी तो जाळितो तनू ॥ कर्मसंस्कार भांडार लिंगरुप शरीर ते ॥ ३३ ॥
गुणलिङ्गानाम् - ज्यांनी विषय जाणिले जातात अशा - आनुश्रविककर्मणाम् - वेदात सांगितलेली आहेत कर्तव्यकर्मे ज्यांची अशा - एकमनसः - एकरूप आहे मन ज्याचे अशा पुरुषांच्या - देवानाम् - इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवतांची - सत्त्वे एव - सत्त्वमूर्ति अशा श्रीहरीच्याच ठिकाणी - स्वाभाविकी - यत्नावाचून सिद्ध झालेली अशी - अनिमित्ता - निष्काम अशी - या - जी - वृत्तिः - वृत्ती - सा - ती - भागवती - श्रीहरीसंबंधी - भक्तिः - भक्ती - अस्ति - होय - इयम् - ही - सिद्धेः - सिद्धीपेक्षा - गरीयसी - अतिशय श्रेष्ठ अशी - अस्ति - आहे - या - जी - यथा - ज्याप्रमाणे - अनलः - जठराग्नि - विगीर्णम् - गिळलेल्या अन्नाला - तथा - त्याप्रमाणे - कोशम् - लिङ्गशरीराला - आशु - लवकर - जयति - जीर्ण करिते ॥३२-३३॥
श्रीभगवान म्हणाले - माते, ज्यांचे चित्त एकमात्र भगवंतांमध्येच लागले आहे, अशा माणसांची वेदविहित कर्मांमध्ये लागलेली तसेच विषयांचे ज्ञान करून देणार्या इंद्रियांची जी सत्त्वमूर्ती श्रीहरींच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्ती होते, तीच भगवंतांची निर्हेतुक भक्ती होय. ही मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण ज्याप्रमाणे जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो, त्याचप्रमाणे हीसुद्धा कर्मसंस्कारांचे भांडार असलेल्या लिंगशरीराला तत्काळ भस्म करते. (३२-३३)
नैकात्मतां मे स्पृहयन्ति केचिन्
मत्पादसेवाभिरता मदीहाः । येऽन्योन्यतो भागवताः प्रसज्य सभाजयन्ते मम पौरुषाणि ॥ ३४ ॥
( इंद्रवज्रा ) माझ्या पदासी स्मरता प्रसन्ने अभागिही कोणि असोत भक्त । माझीच चर्चा करिती सदाही सायुज्य मोक्षा नच इच्छिती ते ॥ ३४ ॥
मत्पादसेवाभिरताः - माझ्या चरणसेवेमध्ये निमग्न झालेले असे - मदीहाः - माझ्यासाठीच आहे क्रिया ज्यांची
माझ्या चरणसेवेत प्रेम असणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी सर्व कर्मे करणारे जितके भाग्यवान भक्त आहेत, जे एकमेकांना भेटून प्रेमाने माझ्याच पराक्रमांची चर्चा करतात, ते माझ्याशी एकरूप होण्याचीही इच्छा करीत नाहीत. (३४)
पश्यन्ति ते मे रुचिराण्यम्ब सन्तः
प्रसन्नवक्त्रारुणलोचनानि । रूपाणि दिव्यानि वरप्रदानि साकं वाचं स्पृहणीयां वदन्ति ॥ ३५ ॥
अरुणनेत्री स्वमुखारविंदा शोभा करीती मम ऐसि दिव्य । प्रेमेचि बोले मग कोणि त्यांना इच्छा तपस्व्या मनि ती अशीच ॥ ३५ ॥
अम्ब - माते - ते - ते - सन्तः - साधु - रुचिराणि - सुंदर अशा - प्रसन्नवक्त्रारुणलोचनानि - प्रसन्न मुख व किंचित् लाल आहेत नेत्र ज्यांमध्ये अशा - वरप्रदानि - वर देणार्या अशा - मे - माझ्या - दिव्यानि रुपाणि - अलौकिक रूपांना - पश्यन्ति - पाहतात - साकम् - त्यांच्याबरोबर - स्पृहणीयाम् - प्रेमळ अशा - वाचम् - वाणीला - वदन्ति - बोलतात ॥३५॥
माते, ते साधुपुरुष अरुणनयन आणि मनोहर मुखाने युक्त अशा माझ्या परमसुंदर आणि वरदायक दिव्य रूपाचे अवलोकन करतात आणि त्यांच्याबरोबर प्रेमपूर्वक संभाषणही करतात की, ज्याच्यासाठी मोठमोठे तपस्वीही उत्सुक असतात. (३५)
तैर्दर्शनीयावयवैरुदार
विलासहासेक्षितवामसूक्तैः । हृतात्मनो हृतप्राणांश्च भक्तिः अनिच्छतो मे गतिमण्वीं प्रयुङ्क्ते ॥ ३६ ॥
जो अंग प्रत्यंगि उदार हास्य विलास नी स्मीत मधूर वाणी । माझ्या रुपा गुंतुनि ठेवि नित्य नेच्छी कशाला मग मुक्त तो हो ॥ ३६ ॥
दर्शनीयावयवैः - दर्शन करण्यास योग्य आहेत अवयव ज्यांचे अशा - उदारविलासहासेक्षितवामसूक्तैः - उत्कृष्ट आहेत लीला, हास्य, अवलोकन व मधुर भाषण ज्यामध्ये अशा - तैः - त्या स्वरूपांनी - हृतात्मनः - हरण केले आहे चित्त ज्यांचे अशा - हृतप्राणान् - हरण केलेली आहेत इंद्रिये ज्याची अशा - अनिच्छतः अपि - इच्छा न करणारे असूनही - तान् - त्यांना - मे - माझी - भक्तिः - भक्ती - अण्वीम् - सूक्ष्म अशा - गतिम् - मोक्षाला - प्रयुङ्क्ते - प्राप्त करिते ॥३६॥
सुंदर अंग-प्रत्यंग, मधुर हास्य-विलासयुक्त मनोहर दृष्टी आणि सुमधुर वाणीने युक्त माझ्या त्या रूपाच्या सौंदर्यात त्यांची मने आणि इंद्रिये तल्लीन होतात. माझी अशी भक्ती त्यांची इच्छा नसतानाही, त्यांना परमपदाची प्राप्ती करून देते. (३६)
अथो विभूतिं मम मायाविनस्तां
ऐश्वर्यमष्टाङ्गमनुप्रवृत्तम् । श्रियं भागवतीं वास्पृहयन्ति भद्रां परस्य मे तेऽश्नुवते तु लोके ॥ ३७ ॥
विभूति माझ्या मिळती तयाला जरी न इच्छा धरितो मनासी । माया रुपी सिद्धि नि धाम माझे ऐश्वर्य सारे मिळते तयाला ॥ ३७ ॥
अथो - अज्ञाननिवृत्तीनंतर - मायाविनः - मायावी अशा - मे - माझ्या - ताम् - त्या - विभूतिम् - ऐश्वर्याला - अनुप्रवृत्तम् - भक्तीच्या मागोमाग आपोआप प्राप्त झालेल्या अशा - अष्टाङ्गम् ऐश्वर्यम् - अणिमादिक अष्टसिद्धींना - वा - किंवा - भागवतीम् - परमेश्वराची - भद्राम् - कल्याणकारक अशा - श्रियम् - ऐश्वर्याला - अस्पृहयन्ति - इच्छित नाहीत - परस्य - श्रेष्ठ अशा - मे - माझ्या - लोके - लोकांत - तु - तर - ते - ते भक्त - ताम् - त्या ऐश्वर्याला - अश्नुवते - प्राप्त होतात ॥३७॥
अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर जरी ते माझ्या मायापतीच्या सत्यादी लोकांमधील भोगसंपत्ती, भक्तीनंतर स्वतः प्राप्त होणार्या अष्टसिद्धी किंवा वैकुंठ लोकातील भगवत्स्वरूप ऐश्वर्याची सुद्धा इच्छा करीत नाहीत. तरीसुद्धा माझ्या धामाला पोहोचल्यानंतर त्यांना या सर्व विभूती आपणहून प्राप्त होतात. (३७)
न कर्हिचिन्मत्पराः शान्तरूपे
नङ्क्ष्यन्ति नो मेऽनिमिषो लेढि हेतिः । येषामहं प्रिय आत्मा सुतश्च सखा गुरुः सुहृदो दैवमिष्टम् ॥ ३८ ॥
ज्यां एकची मी प्रिय पुत्र मित्र आत्मा गुरु इष्ट तसाचि देव । माझ्या इथे दिव्यचि भोग घेती कधीहि तो काळ तया न ग्रासी ॥ ३८ ॥
शान्तरूपे - हे शान्तस्वरूपाच्या माते - मत्पराः - मीच आहे श्रेष्ठ ज्यांना असे भक्त - कर्हिचित् - केव्हाही - न नङ्क्ष्यन्ति - नाश पावत नाहीत - मे - माझे - अनिमिषः - सतत चालू असणारे - हेतिः - कालरूपी हत्यार - तान् - त्यांना - नो लेढि - ग्राशीत नाही - येषाम् - ज्यांचा - अहम् - मी - प्रियः - प्रिय - आत्मा - आत्मा - सुतः - पुत्र - सखा - मित्र - गुरुः - गुरु - सुहृदः - आप्त - च - आणि - इष्टम् दैवम् - उपास्य देवता - भवति - होती ॥३८॥
ज्यांचा एकमात्र मीच प्रिय आत्मा, पुत्र, मित्र, गुरू, सुहृद आणि इष्टदेव आहे, ते माझ्याच आश्रयाला राहाणारे भक्तजन शांतिमय अशा वैकुंठधामात गेल्यावर कोणत्याही प्रकारे या भोगांपासून वंचित राहात नाहीत आणि त्यांना माझे कालचक्र ग्रासू शकत नाही. (३८)
इमं लोकं तथैव अमुं आत्मानं उभयायिनम् ।
आत्मानं अनु ये चेह ये रायः पशवो गृहाः ॥ ३९ ॥ विसृज्य सर्वान् अन्यांश्च मामेवं विश्वतोमुखम् । भजन्ति अनन्यया भक्त्या तान्मृत्योरतिपारये ॥ ४० ॥
( अनुष्टुप् ) या लोकी परलोकात वासनामय लिंग जो । देह तो शरिरासी नी धनासी आस ठेवितो ॥ ३९ ॥ पशू नी धन सारेचि सोडोनी भक्ति जो करी । तयाला मी भवा मध्ये तारुन नेतसे स्वये ॥ ४० ॥
ये - जे - इमम् - ह्या - लोकम् - लोकाला - तथा एव - त्याचप्रमाणे - अमुम् - परलोकाला - उभयायिनम् - दोन्ही लोकांत फिरणार्या अशा - आत्मानम् - लिङ्गदेहयुक्त जीवाला - आत्मानम् अनु - देहाबरोबर - इह - ह्या जगांत - ये - जे - रायः - ऐश्वर्य - पशवः - पशु - च - आणि - गृहा - घरे - सन्ति - आहेत - तान् - त्यांना - च - आणि - अन्यान् सर्वान् - इतर सर्व पदार्थांना - विसृज्य - सोडून - अनन्यया भक्त्या - एकनिष्ठ भक्तीने - विश्वतोमुखम् - सर्वतोमुख अशा - माम् - मला - एवम् - याप्रमाणे - भजन्ति - सेवितात - तान् - त्यांना - मृत्योः - संसारापासून - अतिपारये - मी सोडवितो ॥३९-४०॥
जे लोक इहलोक, परलोक आणि या दोन्ही लोकांमध्ये बरोबर जाणार्या वासनामय लिंगदेहाला तसेच शरीराशी संबंध ठेवणारे जे धन, पशू तसेच गृह इत्यादी पदार्थ आहेत, त्या सर्वांना आणि तत्संबंधी संग्रहालासुद्धा सोडून देऊन अनन्य भक्तीने सर्व प्रकारे माझेच भजन करतात, त्यांना मी मृत्युरूप संसारसागरातून पार करतो. (३९-४०)
नान्यत्र मद्भगवतः प्रधानपुरुषेश्वरात् ।
आत्मनः सर्वभूतानां भयं तीव्रं निवर्तते ॥ ४१ ॥
मी साक्षात् परमात्मा की मला सोडोनिया कुणी । मृत्युच्या त्या भयातून कोणी ना सोडवीतसे ॥ ४१ ॥
भगवतः - ऐश्वर्यसंपन्न अशा - प्रधानपुरुषेश्वरात् - प्रकृति व पुरुष यांचा नियन्ता अशा - भूतानाम् - प्राण्यांच्या - आत्मनः - अन्तरी वास करणार्या अशा - मत् - माझ्या - अन्यत्र - वाचून - तीव्रम् - कठीण - भयम् - दुःख - न निवर्तते - निवृत्त होत नाही ॥४१॥
मी साक्षात भगवान आहे. प्रकृती आणि पुरुषाचा मी स्वामी आहे. तसेच समस्त प्राण्यांचा आत्मा आहे. माझ्याखेरीज अन्य कोणाचाही आश्रय घेतल्याने मृत्युरूप महाभयापासून सुटका होत नाही. (४१)
मद्भयाद् वाति वातोऽयं सूर्यस्तपति मद्भयात् ।
वर्षतीन्द्रो दहत्यग्निः मृत्युश्चरति मद्भयात् ॥ ४२ ॥
धावतो वायु तो नित्य सूर्यही तप्त जाहला । जळतो जाळितो अग्नी इंद्र पर्जन्य वर्षितो ॥ माझेच भय घेवोनी मृत्यूही कार्य साधितो ॥ ४२ ॥
अयम् - हा - वातः - वायु - मद्भयात् - माझ्या भीतीमुळे - वाति - वहातो - मद्भयात् - माझ्या भीतीमुळे - सूर्यः - सूर्य - तपति - प्रकाश देतो - इन्द्रः - इन्द्र - वर्षति - वृष्टि करितो - अग्निः - अग्नि - दहति - जाळितो - च - आणि - मद्भयात् - माझ्या भीतीमुळे - मृत्युः - मृत्यू - चरति - संचार करितो ॥४२॥
माझ्या भयानेच वारा वाहतो. माझ्या भयानेच सूर्य तापतो. माझ्या भयानेच इंद्र पाऊस पाडतो आणि अग्नी जाळतो. तसेच माझ्याच भयाने मृत्यु आपल्या कार्यात प्रवृत्त होतो. (४२)
ज्ञानवैराग्ययुक्तेन भक्तियोगेन योगिनः ।
क्षेमाय पादमूलं मे प्रविशन्ति अकुतोभयम् ॥ ४३ ॥
ज्ञान वैराग्य भक्तीच्या योगाने शांति मेळण्या । योगीही चरणा येती त्यांचा मी आश्रयो असे ॥ ४३ ॥
योगिनः - योगी पुरुष - क्षेमाय - कल्याणासाठी - ज्ञानवैराग्ययुक्तेन - ज्ञान व वैराग्य यांनी युक्त अशा - भक्तियोगेन - भक्तियोगाने - अकुतोभयम् - कोठूनहि भय नाही अशा - मे - माझ्या - पादमूलम् - चरणाच्या आश्रयाला - प्रविशन्ति - रहातात ॥४३॥
योगीजन ज्ञान-वैराग्ययुक्त भक्तियोगाच्या द्वारे शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या निर्भय चरणकमलांचा आश्रय घेतात. (४३)
एतावान् एव लोकेऽस्मिन् पुंसां निःश्रेयसोदयः ।
तीव्रेण भक्तियोगेन मनो मय्यर्पितं स्थिरम् ॥ ४४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
भक्तिद्वारे मला चित्त अर्पिता हित श्रेष्ठची । जगात मानवा लाभे कल्य़ाण श्रेष्ठ हे असे ॥ ४४ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ ॥ पंचेविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २५ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
अस्मिन् लोके - ह्या लोकामध्ये - मयि - माझ्या ठिकाणी - तीव्रेन - तीव्र अशा - भक्तियोगेन - भक्तियोगाने - अर्पितम् - ठेविलेले असे - मनः - अन्तःकरण - स्थिरम् - स्थिर - भवति - होते - एतावान् एव - एवढाच - पुंसाम् - पुरुषांचा - निःश्रेयसोदयः - कल्याणाचा उत्कर्ष - अस्ति - आहे ॥४४॥
संसारात मनुष्यांचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की, त्यांचे चित्त भक्तियोगाने माझ्यातच लागून तेथेच स्थिर व्हावे. (४४)
स्कंध तिसरा - अध्याय पंचविसावा समाप्त |