श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
चतुर्विंशोऽध्यायः

कपिलाअवतारः, नवकन्यानां विवाहः,
कर्दमकपिलसंवादः कर्दमस्य भगवत्पद प्राप्तिश्च -

कपिलदेवांचा जन्म -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


मैत्रेय उवाच -
निर्वेदवादिनीमेवं मनोर्दुहितरं मुनिः ।
दयालुः शालिनीमाह शुक्लाभिव्याहृतं स्मरन् ॥ १ ॥
मैत्रेयजी सांगतात -
( अनुष्टुप्‌ )
देवहूती मनूपुत्री वैराग्य बोलली तदा ।
कर्दमा विष्णुचे शब्द स्मरता बोलले पुढे ॥ १ ॥

शुक्लाभिव्याहृतम् - शुक्लस्वरूपी श्रीहरीच्या वचनाला - स्मरन् - स्मरणारा असा - दयालुः - कृपाळू - मुनिः - कर्दम मुनि - एवम् - याप्रमाणे - निर्वेदवादिनीम् - खेदाने बोलणार्‍या अशा - शालिनीम् - स्तुत्य अशा - मनोः - मनूच्या - दुहितरम् - कन्येला - आह - म्हणाला. ॥१॥
मैत्रेय म्हणाले - उत्तम गुणांनी सुशोभित अशा मनुकुमारी देवहूतीने जेव्हा अशी वैराग्याची गोष्ट केली, तेव्हा कृपाळू कर्दम मुनींना भगवान विष्णूंनी सांगितलेल्याचे स्मरण झाले. ते तिला म्हणाले. (१)


ऋषिरुवाच -
मा खिदो राजपुत्रीत्थं आत्मानं प्रत्यनिन्दिते ।
भगवान् तेऽक्षरो गर्भं अदूरात्सम्प्रपत्स्यते ॥ २ ॥
कर्दमजी म्हणाले -
निर्दोष राजपुत्री तू न खेद करि मानसी ।
तुझ्या गर्भातुनी विष्णु जन्मेल शीघ्रची पहा ॥ २ ॥

अनिन्दिते - निन्दा करण्यास अयोग्य अशा - राजपुत्रि - हे राजकन्ये - आत्मानम् प्रति - स्वतःविषयी - इत्थम् - याप्रमाणे - मा खिदः - खेद करू नकोस - अक्षरः - अविनाशी - भगवान् - श्रीहरि - ते - तुझ्या - गर्भम् - गर्भाशयाप्रत - अदूरात - लवकर - प्रपत्स्यते - प्राप्त होईल. ॥२॥
कर्दम म्हणाले - "हे स्तुत्य राजकुमारी, तू याविषयी असा खेद करू नकोस. अविनाशी भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भात प्रवेश करतील. (२)


धृतव्रतासि भद्रं ते दमेन नियमेन च ।
तपोद्रविणदानैश्च श्रद्धया चेश्वरं भज ॥ ३ ॥
अनेक व्रत तू केले जेणे कल्याण होतसे ।
तप संयम नी दान करुनी भज श्रीहरी ॥ ३ ॥

धृतव्रता - धारण केली आहेत व्रते जिने अशी - असि - तू आहेस - ते - तुझे - भद्रम् - कल्याण असो - दमेन - इन्द्रियनिग्रहाने - च - आणि - नियमेन - स्वधर्माने - च - आणि - तपोद्रविणदानैः - तपश्चर्या व द्रव्यदाने यांच्या योगाने - च - आणि - श्रद्धया - भक्तीने - ईश्वरम् - श्रीहरीला - भज - भज. ॥३॥
तू अनेक प्रकारच्या व्रतांचे पालन केले आहेस म्हणून तुझे कल्याणच होईल. आता तू संयम, नियम, तप, आणि द्रव्य दान करीत श्रद्धापूर्वक भगवंतांचे भजन कर. (३)


स त्वयाऽऽराधितः शुक्लो वितन्वन् मामकं यशः ।
छेत्ता ते हृदयग्रन्थिं औदर्यो ब्रह्मभावनः ॥ ४ ॥
या परी भजता त्यासी जन्मेल गर्भि तो तुझ्या ।
वाढेल यश ते माझे दे‌ईल ज्ञान ही तुला ।
अहंकार रुपी ग्रंथी छेदील बोधिता तुझ्या ॥ ४ ॥

त्वया - तुजकडून - आराधितः - आराधिलेला - मामकम् - माझ्यासंबंधी - यशः - कीर्तीला - वितन्वन् - विस्तृत करणारा असा - ओदर्यः - पुत्र असा - ब्रह्मभावनः - ब्रह्माचा उपदेश करणारा - सः - तो - शुक्लः - शुक्लस्वरूपी श्रीहरि - ते - तुझ्या - हृदयग्रन्थिम् - अहंकाररूपी बन्धनाला - छेत्ता - तोडील ॥४॥
अशा प्रकारे तू आराधना केल्यानंतर श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझे यश वाढवतील आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तुझ्या हृदयातील अहंकारमय ग्रंथीचे छेदन करतील." (४)


मैत्रेय उवाच -
देवहूत्यपि सन्देशं गौरवेण प्रजापतेः ।
सम्यक् श्रद्धाय पुरुषं कूटस्थं अभजद्‍गुरुम् ॥ ५ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
पती गौरवुनी बोले विश्वासुनि तयावरी ।
आराधिला तिने विष्णु भगवान्‌ पुरुषोत्तम ॥ ५ ॥

देवहूती अपि - देवहूती देखील - प्रजापतेः - प्रजापति कर्दमाच्या - संदेशम् - आज्ञेवर - गौरवेण - आदराने - सम्यक् - उत्तमप्रकारे - श्रद्धाय - विश्वास ठेवून - कूटस्थम् - निर्वकार अशा - गुरुम् - उपदेशक अशा - पुरुषम् - श्रीहरीला - अभजत् - सेविती झाली ॥५॥
मैत्रेय म्हणाले - प्रजापती कर्दमांविषयी आदर असल्याने देवहूतीने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि ती निर्विकार अशा जगद्‌गुरू भगवान श्रीपुरुषोत्तमांची आराधना करू लागली. (५)


तस्यां बहुतिथे काले भगवान् मधुसूदनः ।
कार्दमं वीर्यमापन्नो जज्ञेऽग्निरिव दारुणि ॥ ६ ॥
बहू जाता असा काळ कर्दमीवीर्य‌आश्रये ।
जन्मला तो स्वये विष्णु अग्नि काष्ठा मधून जै ॥ ६ ॥

बहुतिथे - पुष्कळ दिवसांचा - काले गते - काळ निघून गेला असता - दारुणि - काष्ठांत - अग्निः इव - अग्नि जसा तसा - भगवान् - भगवान् - मधुसूदनः - विष्णू - कार्दमम् - कर्दम ऋषींच्या - वीर्यम् - वीर्याप्रत - आपन्नः - प्राप्त झालेला - तस्याम् - त्या देवहूतीमध्ये - जज्ञे - उत्पन्न झाला ॥६॥
अशा रीतीने पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन देवहूतीपासून, लाकडातून, अग्नी प्रगट व्हावा, त्याप्रमाणे प्रगट झाले. (६)


अवादयन् तदा व्योम्नि वादित्राणि घनाघनाः ।
गायन्ति तं स्म गन्धर्वा नृत्यन्ति अप्सरसो मुदा ॥ ७ ॥
मेघांनी गर्जुनी तेंव्हा वाद्ये वाजविली पहा ।
गंधर्वे गायिले आणि अप्सरा नाचल्या तदा ॥ ७ ॥

तदा - त्या वेळी - व्योम्नि - आकाशात - वादित्राणि - वाद्ये - अवादयन् - वाजवू लागले - घनाघनाः - वृष्टि करणारे मेघ - जगर्जुः - गर्जना करू लागले - गन्धर्वाः - गंधर्व - तम् - त्या भगवंताचे - गायन्ति स्म - गायन करू लागले - अप्सरसः - अप्सरा - मुदा - हर्षाने - नृत्यन्ति स्म - नाचू लागल्या ॥७॥
त्यावेळी आकाशात ढग जलाचा वर्षाव करीत गडगडाट करून वाद्ये वाजवू लागले, गंधर्व गाणे गाऊ लागले आणि अप्सरा आनंदित होऊन नाचू लागल्या. (७)


पेतुः सुमनसो दिव्याः खेचरैः अपवर्जिताः ।
प्रसेदुश्च दिशः सर्वा अम्भांसि च मनांसि च ॥ ८ ॥
देवतांनी नभातून पुष्पांची वृष्टि वर्षिली ।
सृष्टिही हर्षली चित्ती जलही शुद्ध जाहले ॥ ८ ॥

खेचरैः - देवांनी - अपवर्जिताः - उधळलेली - दिव्याः - दिव्य - सुमनसः - पुष्पे - पेतुः - पडू लागली - च - आणि - सर्वाः - सर्व - दिशः - दिशा - च - आणि - अम्भांसि - उदके - च - आणि - मनांसि - अन्तःकरणे - प्रसेदुः - प्रसन्न झाली ॥८॥
आकाशातून देवतांनी टाकलेल्या दिव्य फुलांचा वर्षाव होऊ लागला, सर्व दिशांमध्ये आनंद पसरला, जलाशयांतील पाणी निर्मळ झाले आणि सर्व जीवांची मने प्रसन्न झाली. (८)


तत्कर्दमाश्रमपदं सरस्वत्या परिश्रितम् ।
स्वयम्भूः साकं ऋषिभिः मरीच्यादिभिरभ्ययात् ॥ ९ ॥
मरीच्यादि ऋषि आणि ब्रह्माजी ते स्वयें तिथे ।
पातले मनि जाणोनी जन्मला विष्णु तो इथे ॥ ९ ॥

स्वयम्भूः - ब्रह्मदेव - मरीच्यादिभिः - मरीचि आहे प्रमुख ज्यांमध्ये अशा - ऋषिभिः साकम् - ऋषींसह - सरस्वत्या - सरस्वती नदीने - परिश्रितम् - वेष्टिलेल्या अशा - तत् - त्या - कर्दमाश्रमपदम् - कर्दम ऋषींच्या आश्रमस्थानाला - अभ्ययात् - प्राप्त झाला ॥९॥
याच वेळी सरस्वती नदीने वेढलेल्या कर्दमांच्या त्या आश्रमात मरीची इत्यादी मुनींसहित ब्रह्मदेव आले. (९)


भगवन्तं परं ब्रह्म सत्त्वेनांशेन शत्रुहन् ।
तत्त्वसङ्ख्यानविज्ञप्त्यै जातं विद्वानजः स्वराट् ॥ १० ॥
सभाजयन् विशुद्धेन चेतसा तच्चिकीर्षितम् ।
प्रहृष्यमाणैरसुभिः कर्दमं चेदमभ्यधात् ॥ ११ ॥
शत्रुघ्न विदुरा ऐका सांख्यशास्त्र वदावया ।
साक्षात्‌ ब्रह्मचि तो विष्णु जन्मला विधि जाणुनी ॥ १० ॥
भगवत्‌ कार्यहेतूचे केले त्यांनी समर्थन ।
आनंद व्यक्त तै केला बोलले कर्दमा असे ॥ ११ ॥

शत्रुहन् - हे शत्रुनाशका विदुरा - परं ब्रह्म - परब्रह्मस्वरूप - भगवन्तम् - श्रीहरीला - तत्त्वसंख्यानविज्ञप्त्यै - तत्त्वांची आहे गणना ज्यामध्ये अशा सांख्य शास्त्राचा उपदेश करण्याकरिता - सत्त्वेन अंशेन - सत्त्वगुणरूप अंशाने - जातम् - अवतरलेला असा - विव्दान् - जाणणारा असा - स्वराट् - स्वतःसिद्ध ज्ञानी - अजः - ब्रह्मदेव - विशुद्धेन - अत्यन्त शुद्ध अशा - चेतसा - अन्तःकरणाने - तच्चिकीर्षितम् - त्या कर्दमाच्या इष्ट कार्याची - सभाजयन् - प्रशंसा करणारा असा - प्रहृष्यमाणैः - प्रफुल्लित झालेल्या अशा - असुभिः - इन्द्रियांनी - उपलक्षितः - युक्त असा - कर्दमम् - कर्दम मुनीला - च - आणि - देवहूतीम् - देवहूतीला - इदम् - असे - अभ्यधात् - म्हणाला ॥१०-११॥
शत्रुदमन विदुरा, स्वतःसिद्ध ज्ञानाने संपन्न अशा अजन्मा ब्रह्मदेवांनी हे जाणले की, साक्षात परब्रह्म भगवान विष्णू सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठी आपल्या विशुद्ध सत्त्वमय अंशाने अवतीर्ण झाले आहेत. (१०) म्हणून भगवान जे कार्य करू इच्छित होते, त्या कार्याचा विशुद्ध चित्ताने आदर करीत आणि आपल्या सर्व इंद्रियांनी प्रसन्नता प्रगट करीत ते कर्दमांना म्हणाले. (११)


ब्रह्मोवाच -
त्वया मेऽपचितिस्तात कल्पिता निर्व्यलीकतः ।
यन्मे सञ्जगृहे वाक्यं भवान्मानद मानयन् ॥ १२ ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
तुम्ही तो पाळुनी आज्ञा केला सन्मान हा असा ।
निष्कपटी अशी पूजा संपन्न जाहली पहा ॥ १२ ॥

मानद - मान देणार्‍या - तात - हे कर्दममुने - यत् - ज्याअर्थी - मानयन् - मान देणारे - मे - माझ्या - वाक्यम् - वचनाला - भवान् - आपण - संजगृहे - पाळिते झाला - तत् - त्या अर्थी - त्वया - तुजकडून - मे - माझी - अपचितिः - पूजा - निर्व्यलीकतः - निष्कपटणाने - कल्पिता - केली गेली ॥१२॥
ब्रह्मदेव म्हणाले - प्रिय कर्दमा, माझ्या म्हणण्याला मान देऊन तू माझे म्हणणे मान्य केलेस, तीच तुझ्याकडून निष्कपट भावाने केलेली माझी पूजा आहे. (१२)


एतावत्येव शुश्रूषा कार्या पितरि पुत्रकैः ।
बाढं इति अनुमन्येत गौरवेण गुरोर्वचः ॥ १३ ॥
पित्याची मागुनी आज्ञा आदरे पूर्ण जो करी ।
त्या पुत्रे सत्य ती सेवा मनाने केलि मानणे ॥ १३ ॥

पुत्रकैः - पुत्रांनी - पितरि - पित्याच्या ठिकाणी - गुरोः - गुरूचे - वचः - आज्ञेचा - गौरवेण - आदराने - बाढम् - ठीक आहे - इति - असे म्हणून - अनुमन्येत - स्वीकार करावा - एतावती एव - एवढीच - शुश्रूषा - सेवा - कार्या - करावी ॥१३॥
पुत्रांनी ‘ठीक आहे’ असे म्हणून आदरपूर्वक पित्याच्या आज्ञेचा स्वीकार करणे, हीच त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. (१३)


इमा दुहितरः सभ्य तव वत्स सुमध्यमाः ।
सर्गमेतं प्रभावैः स्वैः बृंहयिष्यन्ति अनेकधा ॥ १४ ॥
पुत्रा रे सभ्य तू जाण तुझ्या सुंदर या मुली ।
विस्तार सृष्टिचा मोठा करितील परोपरी ॥ १४ ॥

सभ्य वत्स - बाळा कर्दमा - इमाः - ह्या - तव - तुझ्या - सुमध्यमाः - सुंदर आहे कटिभाग ज्यांचा अशा - दुहितरः - कन्या - एतम् - ह्या - सर्गम् - सर्गाला - स्वैः - आपल्या - प्रभावैः - वंशांनी - अनेकधा - अनेकप्रकारे - बृंहयिष्यंति - वाढवितील ॥१४॥
वत्सा, तू सुसंस्कृत आहेस. तुझ्या या सुंदर कन्या आपल्या वंशाने ही सृष्टी अनेक प्रकारे वाढवतील. (१४)


अतस्त्वं ऋषिमुख्येभ्यो यथाशीलं यथारुचि ।
आत्मजाः परिदेह्यद्य विस्तृणीहि यशो भुवि ॥ १५ ॥
मरिच्यादी मुनी यांना स्वभाव आवडी परी ।
अर्पाव्या न‌उही कन्या सुकीर्ती पसरी जगी ॥ १५ ॥

अतः - यास्तव - अद्य - आज - त्वम् - तू - आत्मजाः - कन्यांना - ऋषिमुख्येभ्यः - मुख्य ऋषींना - यथाशीलम् - स्वभावानुरूप - यथारुचि - आवडीनुसार - परिदेही - दान कर - भुवि - पृथ्वीवर - यशः - कीर्ति - विस्तृणीहि - पसर ॥१५॥
म्हणून तू आता या मरीची आदि मुनिवरांना त्यांच्या स्वभाव आणि आवडीनुसार आपल्या कन्या समर्पण कर आणि जगात आपली कीर्ती वाढव. (१५)


वेदाहमाद्यं पुरुषं अवतीर्णं स्वमायया ।
भूतानां शेवधिं देहं बिभ्राणं कपिलं मुने ॥ १६ ॥
मुनी मी जाणिले सर्व जीवांचा पोषिता जगीं ।
तो श्री नारायणो विष्णु मायने अवतीर्णला ॥ १६ ॥

मुने - हे ऋषे - अहम् - मी - आद्यं पुरुषम् - पुराणपुरुष विष्णूला - स्वमायया - आपल्या मायेने - अवतीर्णम् - अवतरलेला - भूतानाम् - प्राण्यांना - शेवधिम् - सर्व अभीष्ट वस्तु देणारा निधीच - कपिलम् - कपिलनामक - देहम् - शरीराला - विभ्राणम् - धारण करणारा असे - वेद - जाणतो ॥१६॥
हे मुनी, सर्व प्राण्यांचे निधान असणारे आदिपुरुष श्रीनारायण आपल्या योगमायेने कपिलाच्या रूपाने अवतीर्ण झाले आहेत हे मी ओळखले आहे. (१६)


ज्ञानविज्ञानयोगेन कर्मणां उद्धरन्जटाः ।
हिरण्यकेशः पद्माक्षः पद्ममुद्रापदाम्बुजः ॥ १७ ॥
एष मानवि ते गर्भं प्रविष्टः कैटभार्दनः ।
अविद्यासंशयग्रन्थिं छित्त्वा गां विचरिष्यति ॥ १८ ॥
(पुन्हा ब्रह्मदेव देवहूतीला म्हणतात)
सोनेरी केश हे याचे विशाल कमलाक्षही ।
पायासी पद्ममुद्रा या कैटभासूर मारक ॥ १७ ॥
श्रीहरी ज्ञान विज्ञाने वासना छेदनार्थ तो ।
जन्मला हा तुझ्या गर्भी स्वच्छंदे विचरेल की ॥ १८ ॥

मानवि - हे मनुकन्ये - ज्ञानविज्ञानयोगेन - शास्त्रोक्त ज्ञान व अपरोक्ष ज्ञान ह्या दोहोंच्या योगाने - कर्मणाम् - कर्मांच्या - जटाः - मुलांना - उद्धरन् - उपटणारा असा - कैटभार्दनः - कैटभ दैत्याचा नाश करणारा श्रीहरि - ते - तुझ्या - गर्भम् - गर्भाशयाप्रत - प्रविष्टः - प्रवेश केलेला असा - हिरण्यकेशः - सुवर्णासारखे आहेत केस ज्याचे असा - पद्माक्षः - कमलासारखे आहेत नेत्र ज्याचे असा - पद्ममुद्रापदाम्बुजः - पद्म चिन्हाने युक्त आहेत चरणकमले ज्याची असा - एषः - हा - अविद्यासंशयग्रन्थिम् - अज्ञानरूपी संशयाच्या बंधनाला - छित्वा - तोडून - गाम् - पृथ्वीवर - संचरिष्यति - संचार करील ॥१७-१८॥
हे राजकुमारी, सोनेरी केस, कमलासारखे विशाल नेत्र आणि कमलांकित चरणकमल असणार्‍या बालकाच्या रूपात कैटभासुराला मारणार्‍या साक्षात श्रीहरींनीच, ज्ञान-विज्ञानाच्या द्वारे कर्मवासना मूलतः उखडून टाकण्यासाठी, तुझ्या ठिकाणी जन्म घेतला आहे. हे अविद्याजनित मोहाच्या ग्रंथींना तोडून पृथ्वीवर विहार करतील. (१७-१८)


अयं सिद्धगणाधीशः साङ्ख्याचार्यैः सुसम्मतः ।
लोके कपिल इत्याख्यां गन्ता ते कीर्तिवर्धनः ॥ १९ ॥
सिद्धांचा स्वामि हा आणि सांख्याचार्यात श्रेष्ठही ।
त्रिलोक कीर्ति विस्तारी नावाने कपिलो मुनी ॥ १९ ॥

ते कीर्तिवर्धनः - तुझ्या कीर्तीला वाढविणारा असा - सिद्धगणाधीशः - सिद्धांच्या समुदायाचा अधिपति असा - सांख्याचार्यैः - सांख्यशास्त्रज्ञांनी - सुसंमतः - उत्तमप्रकारे मान दिलेला असा - अयम् - हा पुत्र - लोके - जगात - कपिलः - कपिल - इति - अशा - आख्याम् - नावाला - गन्ता - प्राप्त होईल ॥१९॥
हे सिद्धगणांचे स्वामी आणि सांख्याचार्यांनाही पूजनीय होतील. हे ‘कपिल’ नावाने प्रसिद्ध होतील आणि लोकांमध्ये तुझी कीर्ती पसरवतील. (१९)


मैत्रेय उवाच -
तौ आवाश्वास्य जगत्स्रष्टा कुमारैः सहनारदः ।
हंसो हंसेन यानेन त्रिधामपरमं ययौ ॥ २० ॥
मैत्रेयजी सांगतात -
जगत्‌ सृष्टिस निर्माता ब्रह्माजी बोलुनी असे ।
नारदा सह संतांना निघाले घेउनी पुढे ॥ २० ॥

सहनारदः - नारदासहित - कुमारैः सह - सनत्कुमारांसहित - जगत्स्त्रष्टा - जगाला उत्पन्न करणारा असा - हंसः - ब्रम्हदेव - तौ - त्या देवहूतीला व कर्दमाला - आश्वास्य - आश्वासन देऊन - हंसेन यानेन - हंसरूप वाहनाने - परमम् - श्रेष्ठ अशा - त्रिधाम - सत्यलोकाला - ययौ - गेला ॥२०॥
मैत्रेय म्हणाले - सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव त्या दोघांना अशा प्रकारे आश्वासन देऊन, आणि सनकादींना बरोबर हंसावर विराजमान होऊन ब्रह्मलोकाकडे गेले. (२०)


गते शतधृतौ क्षत्तः कर्दमस्तेन चोदितः ।
यथोदितं स्वदुहितॄः प्रादाद्विश्वसृजां ततः ॥ २१ ॥
ब्रह्मा तेथोनिया जाता कर्दमे योजिल्या परी ।
प्रजापती मरिच्यादि ऋषिंना पुत्रि अर्पिल्या ॥ २१ ॥

क्षत्तः - हे विदुरा - शतधृतौ गते - ब्रह्मदेव गेला असता - तेन - ब्रह्मदेवाने - चोदितः - प्रेरणा केलेला - कर्दमः - कर्दम मुनि - ततः - नंतर - यथोदितम् - सांगितल्याप्रमाणे - स्वदुहितृः - आपल्या कन्यांना - विश्वसृजाम् - सृष्टिकर्त्या प्रजापतींना - प्रादात् - देता झाला ॥२१॥
हे विदुरा, ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार कर्दमांनी मरीची आदी प्रजापतींच्या बरोबर आपल्या कन्यांचा विधिपूर्वक विवाह केला. (२१)


मरीचये कलां प्रादाद् अनसूयां अथात्रये ।
श्रद्धां अङ्‌गिरसेऽयच्छत् पुलस्त्याय हविर्भुवम् ॥ २२ ॥
मरिचीस कला आणि अनसूयाहि अत्रिला ।
श्रद्धा ती अंगिरा याला पुलस्त्यास हविर्भु ती ॥ २२ ॥

कलाम् - केलेला - मरीचये - मरीचि ऋषीप्रत - प्रादात् - देता झाला - अथ - आणि - अनसूयाम् - अनूसयेला - अत्रये - अत्रि ऋषीप्रत - श्रद्धाम् - श्रद्धेला - अङ्गिरसे - अङ्गिरा ऋषीप्रत - तथा - त्याप्रमाणे - हविर्भुवम् - हविर्भूला - पूलस्त्याय - पुलस्त्य ऋषीप्रत - अयच्छत् - देता झाला ॥२२॥
त्यांनी कला नावाची कन्या मरीचीला, अनसूया अत्रीला, श्रद्धा अंगिराला, आणि हविर्भू पुलस्त्याला दिली. (२२)


पुलहाय गतिं युक्तां क्रतवे च क्रियां सतीम् ।
ख्यातिं च भृगवेऽयच्छद् वसिष्ठायाप्यरुन्धतीम् ॥ २३ ॥
पुलहा गति ही कन्या क्रीया क्रतुस देउनी ।
भृगूला ख्याति आणिक वसिष्ठासी अरुंधती ॥ २३ ॥

युक्ताम् - योग्य अशा - गतिम् - गतीला - पुलहाय - पुलह ऋषीप्रत - सतीम् - गुणसंपन्न अशा - क्रियाम् - क्रियेला - क्रतवे - क्रतु ऋषीप्रत - च - आणि - ख्यातिम् - ख्यातीला - भृगवे - भृगु ऋषीप्रत - च - आणि - अरुन्धतीम् अपि - अरुन्धतीला देखील - वसिष्ठाय - वसिष्ठाप्रत - अयच्छत् - देता झाला ॥२३॥
पुलहाला अनुरूप अशी गती नावाची कन्या, क्रतूला साध्वी क्रिया, भृगूला ख्याती आणि वसिष्ठाला अरुंधती दिली. (२३)


अथर्वणेऽददाच्छान्तिं यया यज्ञो वितन्यते ।
विप्रर्षभान् कृतोद्वाहान् सदारान् समलालयत् ॥ २४ ॥
अथर्वा शांति देवोनि विवाह कर्दमे तदा ।
करोनी सगळ्या त्यांच्या मोठा सत्कार योजिला ॥ २४ ॥

यया - जिच्याकडून - यज्ञः - यज्ञ - वितन्यते - विस्तारिला जातो - ताम् - त्या - शान्तिम् - शान्तीला - अथर्वणे - अथर्वण ऋषीप्रत - अददात् - देता झाला - कृतोव्दाहान् - केले आहेत विवाह ज्यांचे अशा - सदारान् - स्त्रियांसह वर्तमान अशा - विप्रर्षभान् - ब्राह्मणश्रेष्ठांना - समलालयत् - संतोषित करिता झाला ॥२४॥
अथर्वा ऋषींना जिच्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार केला जातो, ती शांती नावाची कन्या दिली. कर्दमांनी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्‍न्यांसह उत्तम सत्कार केला. (२४)


ततस्त ऋषयः क्षत्तः कृतदारा निमन्त्र्य तम् ।
प्रातिष्ठन् नन्दिमापन्नाः स्वं स्वमाश्रम मण्डलम् ॥ २५ ॥
होता संपन्न ते लग्न आज्ञा घेवोनिया ऋषी ।
सर्वची मोद-हर्षाने गेले ते निज आश्रमी ॥ २५ ॥

क्षत्तः - हे विदुरा - ततः - नंतर - ते - ते - कृतदाराः - केल्या आहेत स्त्रिया ज्यांना असे - ऋषयः - ऋषि - नन्दिम् - हर्षाला - आपन्नाः - प्राप्त झालेले असे - तम् - त्या कर्दम ऋषीला - निमन्‌त्र्य - विचारून - स्वं स्वम् - आपआपल्या - आश्रममण्डलम् - आश्रमस्थानाला - प्रातिष्ठन् - निघून गेले ॥२५॥
विदुरा, विवाह झाल्यानंतर ते सर्व ऋषी कर्दमांचा निरोप घेऊन अतिशय आनंदाने आपापल्या आश्रमांकडे गेले. (२५)


स चावतीर्णं त्रियुगं आज्ञाय विबुधर्षभम् ।
विविक्त उपसङ्गम्य प्रणम्य समभाषत ॥ २६ ॥
देवाधिदेव जो साक्षात्‌ पुत्र तो पाहता घरी ।
एकांती नमुनी त्याला कर्दमो बोलले तया ॥ २६ ॥

सः - तो कर्दम मुनि - विबुधर्षभम् - देवश्रेष्ठ अशा - त्रियुगम् - तिन्ही युगांमध्ये उत्पन्न होणार्‍या श्रीहरीला - अवतीर्णम् - अवतार घेतलेला असे - आज्ञाय - जाणून - विविक्ते - एकान्तांत - उपसङ्गम्य - जवळ जाऊन - च - आणि - प्रणम्य - नमस्कार करून - समभाषत - म्हणाला ॥२६॥
कर्दमांनी आपल्या घरी साक्षात देवाधिदेव श्रीहरींनीच अवतार घेतला आहे, हे जाणून ते एकांतात त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले. (२६)


अहो पापच्यमानानां निरये स्वैरमङ्गलैः ।
कालेन भूयसा नूनं प्रसीदन्तीह देवताः ॥ २७ ॥
अहो त्या पापकर्माने दुःखाने पीडिता जग ।
अनंतकाळ तो जाता पावती मग देवता ॥ २७ ॥

अहो - अहो - इह - ह्या सृष्टीमध्ये - स्वैः - आपल्या - अमङ्गलैः - पापांनी - निरये - नरकासमान अशा संसारात - पापच्यमानानाम् - अत्यन्त पोळून निघणार्‍या अशा प्राण्यांना - भूयसा - पुष्कळ - कालेन - कालाने - देवताः - देवता - नूनम् - निश्चयाने - प्रसीदन्ति - प्रसन्न होतात ॥२७॥
अहो, आपल्या पापकर्मांमुळे या दुःखमय संसारात अनेक प्रकारच्या पीडा सहन करणार्‍या लोकांवर देव पुष्कळ काळाने प्रसन्न होतात. (२७)


बहुजन्मविपक्वेन सम्यग् योगसमाधिना ।
द्रष्टुं यतन्ते यतयः शून्यागारेषु यत्पदम् ॥ २८ ॥
स एव भगवानद्य हेलनं न गणय्य नः ।
गृहेषु जातो ग्राम्याणां यः स्वानां पक्षपोषणः ॥ २९ ॥
परंतु रुप जे ध्याती योगी ते दृढ साधने ।
सिद्ध समाधि द्वाराच पाहण्या यत्न साधती ॥ २८ ॥
भक्तांना रक्षिता तुम्ही प्रत्यक्ष श्रीहरी घरी ।
पातला जन्म घेवोनी ममावज्ञाहि सारुनी ॥ २९ ॥

यतयः - संन्यासी - बहुजन्मविपक्वेन - पुष्कळ जन्मांनी परिपक्व झालेल्या अशा - सम्यग्योगसमाधिना - भक्तियोगातील एकाग्रतेच्या योगाने - शून्यागारेषु - एकान्तस्थानात - यत्पदम् - ज्याच्या चरणाला - द्रष्टुम् - पाहाण्याकरिता - यतन्ते - यत्न करितात ॥२८॥ यः - जो - स्वानाम् - आपल्या भक्तांच्या - पक्षपोषणः - पक्षाला पुष्ट करणारा असा - अस्ति - आहे - सः एव - तोच - भगवान् - श्रीहरि - हेलनम् - अवज्ञेला - न गणय्य - न गणता - प्राम्याणाम् - खेडवळ अशा - नः - आमच्या - गृहेषु - घरांत - अद्य - आज - जातः - जन्मास आलेला - अस्ति - आहे ॥२९॥
परंतु ज्यांच्या स्वरूपाला योगीलोक अनेक जन्मांच्या साधनेने सिद्ध झालेल्या श्रेष्ठ समाधीने एकांतात पाहाण्याचा प्रयत्‍न करतात, तेच आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्रीहरी, आम्हा विषयलोलुपांकडून होणार्‍या आपल्या अवज्ञेचा काहीही विचार न करता, आज आमच्या घरी अवतीर्ण झाले आहेत. (२८-२९)


स्वीयं वाक्यमृतं कर्तुमं अतीर्णोऽसि मे गृहे ।
चिकीर्षुर्भगवान् ज्ञानं भक्तानां मानवर्धनः ॥ ३० ॥
वर्धिता मान भक्तांचा वचना सत्य दाविण्या।
सांख्ययोगप्रसारार्थ माझ्या या गृहि जन्मले ॥ ३० ॥

भक्तानाम् - भक्तांच्या - मानवर्धनः - मानाला वाढविणारा असा - ज्ञानम् - ज्ञानाचे साधन जे सांख्यशास्त्र - चिकीर्षुः - करण्याची इच्छा करणारा असा - भगवान् - भगवान श्रीहरि - स्वीय वाक्यम् - स्वकीय वचनाला - ऋतम् - सत्य - कर्तुम् - करण्याकरिता - मे - माझ्या - गृहे - घरी - अवतीर्णः - अवतरलेला - असि - आहेस ॥३०॥
भक्तांचा मान वाढविणार्‍या आपण आपले वचन सत्य करण्यासाठी आणि सांख्ययोगाचा उपदेश करण्यासाठीच माझ्या घरी अवतार घेतला आहे. (३०)


तान्येव तेऽभिरूपाणि रूपाणि भगवंस्तव ।
यानि यानि च रोचन्ते स्वजनानां अरूपिणः ॥ ३१ ॥
तुम्ही प्राकृत रुपाच्या वेगळे असुनी परी ।
चतुर्भुज रुपा घेता आवडे भक्त सज्जना ॥ ३१ ॥

भगवन् - हे श्रीहरे - स्वजनानाम् - आपल्या भक्तांना - यानि यानि - जी जी रूपे - रोचन्ते - आवडतात - तानि एव - तीच - ते - तुझी - रूपाणि - रूपे - अरूपिण - वस्तुतः रूपरहित अशा - ते - तुला - च - खरोखर - अभिरूपाणि - योग्य अशी - सन्ति - आहेत ॥३१॥
भगवन, आपण रूपरहित आहात. आपली जी चतुर्भुज इत्यादी अलौकिक रूपे आहेत, ती आपल्याला योग्यच आहेत. तसेच जी मनुष्य-सदृश रूपे आपल्या भक्तांना प्रिय वाटतात, तीही आपल्याला आवडतात. (३१)


त्वां सूरिभिस्तत्त्वबुभुत्सयाद्धा
     सदाभिवादार्हणपादपीठम् ।
ऐश्वर्यवैराग्ययशोऽवबोध
     वीर्यश्रिया पूर्तमहं प्रपद्ये ॥ ३२ ॥
( इंद्रवज्रा )
विद्वज्जनांना पदपीठ वंद्य
    ऐश्वर्य वैराग्य नि ज्ञान वीर्य ।
ती कीर्ति नी श्री परिपूर्ण साही
    ऐशा पदाला नमितो पुन्हा मी ॥ ३२ ॥

अहम् - मी - सूरिभिः - विव्दानांनी - तत्त्वबुभुत्सया - तत्त्व जाणण्याच्या इच्छेने - अद्धा - साक्षात् - सदा - निरंतर - अभिवादार्हणपादपीठम् - नमस्काराला योग्य आहे पादपीठ ज्याचे अशा - ऐश्वर्यवैराग्ययशोऽवबोधवीर्यश्रियाम् - ऐश्वर्य, वैराग्य, कीर्ति, ज्ञान, पराक्रम व शोभा यांनी - पूर्तम् - पूर्ण अशा - त्वाम् - तुला - प्रपद्ये - शरण आलो आहे ॥३२॥
तत्त्वज्ञानाची इच्छा करणार्‍या विद्वानांना आपले चरण ठेवण्याचे आसन नेहमी वंदनीय आहे. तसेच ते ऐश्वर्य, वैराग्य, यश, ज्ञान, सामर्थ्य, आणि श्री यांनी परिपूर्ण आहे. मी त्याला शरण आलो आहे. (३२)


परं प्रधानं पुरुषं महान्तं
     कालं कविं त्रिवृतं लोकपालम् ।
आत्मानुभूत्यानुगतप्रपञ्चं
     स्वच्छन्दशक्तिं कपिलं प्रपद्ये ॥ ३३ ॥
तिन्ही अहंकार नि शक्ति सर्व
    ते लोकपालादिहि सर्व लोक ।
घेसी करोनी लिन अंगि सारे
    देवा कपीला नमितो पुन्हा मी ॥ ३३ ॥

परम् - श्रेष्ठ - स्वच्छन्दशक्तिम् - स्वाधीन आहेत शक्ति ज्याच्या अशा - प्रधानम् - प्रकृतिरूप - पुरुषम् - प्रकृतीचा नियन्ता - महान्तम् - महत्तत्त्वरूप अशा - कालम् - कालस्वरूप अशा - त्रिवृतम् - त्रिगुणोत्पन्न अहंकाररूप - लोकपालम् - लोकांचे पालन करणार्‍या - आत्मानुभूत्या - आपल्या ज्ञानशक्तीमुळे - अनुगतप्रपञ्चम् - लय पावला आहे प्रपञ्च ज्याच्या ठिकाणी अशा - कविम् - सर्वज्ञ - कपिलम् - कपिलाला - प्रपद्ये - शरण आलो आहे ॥३३॥
भगवन, आपण परब्रह्म आहात. प्रकृती, पुरुष, महत्तत्त्व, काल, त्रिविध अहंकार, समस्त लोक आणि लोकपालांच्या रूपांमध्ये आपणच प्रकट आहात. तसेच आपण सार्‍या प्रपंचाला चेतनशक्तीने आपल्यात लीन करून घेता; म्हणून आपण याच्याही पलीकडचे आहात. अशा आपणा भगवान कपिलांना मी शरण आलो आहे. (३३)


आ स्माभिपृच्छेऽद्य पतिं प्रजानां
     त्वयावतीर्णर्ण उताप्तकामः ।
परिव्रजत्पदवीमास्थितोऽहं
     चरिष्ये त्वां हृदि युञ्जन् विशोकः ॥ ३४ ॥
तिन्ही ऋणातूनहि मुक्त झालो
    मनोरथेही मम पूर्ण झाली ।
संन्यास घेवोनि निवांत होतो
    प्रजापती तू मज देइ आज्ञा ॥ ३४ ॥

त्वया - तुजकडून - अवतीर्णार्णः - निवृत्त झाली आहेत दैवादि ऋणे ज्याची असा - उत - खरोखर - आप्तकामः - पूर्ण झालेले आहेत मनोरथ ज्याचे असा - अहम् - मी - प्रजानाम् - लोकांचा - पतिम् - रक्षक अशा - त्वाम् - तुला - अद्य - आज - आ अभिपृच्छे स्म - थोडे विचारतो - परिव्रजत्पदवीम् - संन्याशांच्या मार्गाचा - आस्थितः - आश्रय केलेला - विशोकः - शोकरहित असा - त्वाम् - तुला - हृदि - अन्तःकरणात - युञ्जन् - स्मरणारा असा - अहं - मी - चरिष्ये - संचार करीन ॥३४॥
आपण पुत्ररूपाने अवतरल्याने मी तिन्ही ऋणांतून मुक्त झालो आहे आणि माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत. आता मी संन्यास आश्रम ग्रहण करून आपले चिंतन करीत, शोकरहित होऊन विहार करीन. आपण समस्त प्रजेचे स्वामी आहात, म्हणून मी आपली आज्ञा मागतो. (३४)


श्रीभगवानुवाच -
मया प्रोक्तं हि लोकस्य प्रमाणं सत्यलौकिके ।
अथाजनि मया तुभ्यं यदवोचमृतं मुने ॥ ३५ ॥
श्री भगवान म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
प्रमाण ममची वाक्य प्रपंची कर्म वैदिकी ।
करण्या सत्य मी बोल घेतला अवतार हा ॥ ३५ ॥

मुने - कर्दम मुने - हि - खरोखर - मया - मजकडून - सत्यलौकिके - वैदिक आणि लौकिक कृत्यांमध्ये - प्रोक्तम् - सांगितलेले - लोकस्य - लोकांना - प्रमाणम् - प्रमाण - अस्ति - आहे - अथ - आता - यत् - जे - अहम् - मी - तुभ्यम् - तुला - अवोचम् - बोललो - तत् - त्याला - ऋतम् - खरे - कर्तुम् - करण्याकरिता - मया - मजकडून - अजनि - जन्म घेतला गेला ॥३५॥
श्रीभगवान म्हणाले - मुनिवर्य, वैदिक आणि लौकिक अशा सर्व कर्मांसाठी जगात माझे म्हणणेच प्रमाण आहे. म्हणून मी तुला जे सांगितले होते की "मी तुझ्या घरी जन्म घेईन." ते सत्य करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे. (३५)


एतन्मे जन्म लोकेऽस्मिन् मुमुक्षूणां दुराशयात् ।
प्रसङ्ख्यानाय तत्त्वानां सम्मतायात्मदर्शने ॥ ३६ ॥
लिंग या शरिरा मुक्त इच्छिती सर्व जे मुनी ।
आत्मदर्शी असे ज्ञान तत्वबोधार्थ जन्मलो ॥ ३६ ॥

अस्मिन् - ह्या - लोके - लोकामध्ये - एतत् - हा - मे - माझा - जन्म - जन्म - दुराशयात् - दुर्गम आहे आशय ज्याचा अशा षोडश कलात्मक लिङ्गदेहापासून - मुमुक्षूणाम् - मुक्त होण्याची इच्छा करणार्‍या पुरुषांना - आत्मदर्शने - आत्मज्ञानाविषयी - संमताय - संमत असलेल्या अशा - तत्त्वानाम् - तत्त्वांच्या - प्रसंख्यानाय - ज्ञानाकरिता - अस्ति - आहे ॥३६॥
या लोकांमध्ये माझा हा जन्म, लिंगशरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणार्‍या मुनींना, आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्त्वांचे विवेचन करण्यासाठी झाला आहे. (३६)


एष आत्मपथोऽव्यक्तो नष्टः कालेन भूयसा ।
तं प्रवर्तयितुं देहं इमं विद्धि मया भृतम् ॥ ३७ ॥
सूक्ष्म हा आत्मज्ञानाचा मार्ग तो लुप्त जाहला ।
प्रवर्तीत कराया तो धारिला देह मी असा ॥ ३७ ॥

एषः - हा - अव्यक्तः - सूक्ष्म असा - आत्मपथः - ज्ञानमार्ग - भूयसा - पुष्कळ - कालेन - कालाने - नष्टः - नष्ट झालेला - अस्ति - आहे - तम् - त्या ज्ञानमार्गाला - प्रवर्तयितुम् - प्रवृत्त करण्यासाठी - मया - मजकडून - धृतम् - धारण केलेल्या अशा - इमम् - ह्या - देहम् - देहाला - विद्धि - जाण ॥३७॥
आत्मज्ञानाचा हा सूक्ष्म मार्ग बर्‍याच काळापासून लुप्त झाला आहे. याला पुन्हा प्रवर्तित करण्यासाठीच मी हे शरीर धारण केले आहे, असे समज. (३७)


गच्छ कामं मयाऽऽपृष्टो मयि सन्न्यस्तकर्मणा ।
जित्वा सुदुर्जयं मृत्युं अमृतत्वाय मां भज ॥ ३८ ॥
मुनी माझीच आज्ञा ही इच्छेनुसार जा तुम्ही ।
मजला अर्पुनी कर्म भजनें मोक्ष साधणे ॥ ३८ ॥

मया - मजकडून - आपृष्टः - अनुमोदन दिलेला असा - कामम् - इच्छेप्रमाणे - गच्छ - गमन कर - मयि - माझ्या ठिकाणी - संन्यस्तकर्मणा - अर्पण केलेल्या कर्माच्या योगाने - सुदुर्जयम् - जिंकण्यास अशक्य अशा - मृत्युम् - मृत्यूला - जित्वा - जिंकून - अमृतत्त्वाय - मोक्षाकरिता - माम् - मला - भज - तू भज ॥३८॥
मी आज्ञा करतो की, तू इच्छेनुसार जा आणि आपली संपूर्ण कर्मे मला अर्पण करीत जिंकण्यास अत्यंत कठीण अशा मृत्यूला जिंकून मोक्षपद प्राप्त करण्यासाठी माझे भजन कर. (३८)


मामात्मानं स्वयंज्योतिः सर्वभूतगुहाशयम् ।
आत्मन्येवात्मना वीक्ष्य विशोकोऽभयमृच्छसि ॥ ३९ ॥
सर्वाचा अंतरात्मा मी स्वयंप्रकाशही तसा ।
साक्षात्कारचि होईल लाभेल मोक्षही पुन्हा ॥ ३९ ॥

स्वयंज्योतिः - स्वयंप्रकाश अशा - सर्वभूतगुहाशयम् - सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणार्‍या अशा - आत्मानम् - आत्मस्वरूप अशा - माम् - मला - आत्मनि एव - आत्म्यामध्येच - आत्मना - अन्तःकरणाने - वीक्ष्य - पाहून - विशोकः - दुःखरति असा - अभयम् - मोक्षाला - ऋच्छसि - प्राप्त होशील ॥३९॥
मी स्वयंप्रकाश आणि सर्व जीवांच्या अंतःकरणात राहाणारा आत्माच आहे. म्हणून तू विशुद्ध बुद्धीने आपल्या अंतःकरणात माझा साक्षात्कार करून घेशील आणि शोकमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करशील. (३९)


मात्र आध्यात्मिकीं विद्यां शमनीं सर्वकर्मणाम् ।
वितरिष्ये यया चासौ भयं चातितरिष्यति ॥ ४० ॥
मातेच्या मुक्तिसाठी मी आत्मज्ञानहि देइल ।
संसार भय हे सारे तिचे नष्टचि होय तै ॥ ४० ॥

सर्वकर्मणाम् - सर्व कर्मांचा - शमनीम् - नाश करणार्‍या अशा - आध्यात्मिकीं विद्याम् - आत्मज्ञानाला - मात्रे - मातेप्रत - वितरिष्ये - मी देईन - यया - ज्या अध्यात्मविद्येच्या योगाने - असौ - ही माता देवहूती - भवम् - संसाराला - अतितरिष्यति - तरून जाईल ॥४०॥
माता देवहूतीला सुद्धा मी संपूर्ण कर्मांपासून मुक्त करणारे आत्मज्ञान देईन. त्यामुळे या संसाररूप भयापासून ती पार जाईल. (४०)


मैत्रेय उवाच -
एवं समुदितस्तेन कपिलेन प्रजापतिः ।
दक्षिणीकृत्य तं प्रीतो वनमेव जगाम ह ॥ ४१ ॥
मैत्रेयजी सांगतात -
भगवान्‌ कपिलो ऐसे वदता ते प्रजापती ।
परिक्रमा करोनी त्यां हर्षाने निघती वना ॥ ४१ ॥

तेन कपिलेन - त्या कपिलाकडून - एवम् - याप्रमाणे - समुदितः - उत्तम प्रकारे बोलला गेलेला असा - प्रजापतिः - प्रजापति कर्दम - प्रीतः - संतुष्ट झालेला - तम् - त्या कपिलाला - प्रदक्षिणीकृत्य - प्रदक्षिणा करून - वनम् एव - वनातच - जगाम ह - गेला. ॥४१॥
मैत्रेय म्हणाले- भगवान कपिलांनी याप्रमाणे सांगितल्यावर प्रजापती कर्दम त्यांना प्रदक्षिणा करून प्रसन्न चित्ताने वनातच निघून गेले. (४१)


व्रतं स आस्थितो मौनं आत्मैकशरणो मुनिः ।
निःसङ्गो व्यचरत् क्षोणीं अनग्निरनिकेतनः ॥ ४२ ॥
अहिंसामय संन्यास घेवोनि ध्यानि नित्य त्या ।
श्रीकृष्णा, त्यजुनी अग्नी निःसंग फिरले पुन्हा ॥ ४२ ॥

मौनं व्रतम् आस्थितः - मौनव्रताचा आश्रय केलेला असा - आत्मैकशरणः - आत्मा हाच एक आहे रक्षक ज्याचा असा - अनग्निः - अग्नि ज्याला नाही असा - अनिकेतनः - गृह ज्याला नाही असा - निःसङ्गः - संगरहित असा - सः - तो - मुनिः - कर्दम ऋषि - क्षोणीम् व्यचरत् - पृथ्वीवर संचार करिता झाला. ॥४२॥
तेथे अहिंसादिक मुनिव्रतांचे पालन करीत ते केवळ श्रीभगवंतांना शरण गेले. तसेच अग्निहोत्र आणि गृहस्थ आश्रमाचा त्याग करून निःसंगभावाने पृथ्वीवर भ्रमण करू लागले. (४२)


मनो ब्रह्मणि युञ्जानो यत्तत् सदसतः परम् ।
गुणावभासे विगुण एकभक्त्यानुभाविते ॥ ४३ ॥
प्रकाशक गुणां सर्व कार्य करण मुक्त जो ।
अशा त्या निर्गुणी ब्रह्मीं चित्त गुंतविले सदा ॥ ४३ ॥

यत् यत् - जे ते - सदसतः - कारण व कार्य या दोन्हीहून - परम् - निराळे - अस्ति - आहे - तस्मिन् - त्या - गुणावभासे - त्रिगुणांचा प्रकाश करणार्‍या अशा - विगुणे - निर्गुण अशा - एकभक्त्या - एकनिष्ठ भक्तीने - अनुभाविते - अनुभविलेल्या अशा - ब्रह्मणि - परब्रह्माच्या ठायी - मनः - मनाला - युञ्जानः - युक्त करणारा. ॥४३॥
जे कार्यकारणाच्या पलीकडे आहे, सत्त्वादी गुणांचे प्रकाशक तसेच निर्गुण आहे आणि अनन्य भक्तीनेच ज्याची प्राप्ती होते, त्या परब्रह्मामध्ये त्यांनी आपले मन एकाग्र केले. (४३)


निरहङ्कृतिर्निर्ममश्च निर्द्वन्द्वः समदृक् स्वदृक् ।
प्रत्यक्प्रशान्तधीर्धीरः प्रशान्तोर्मिरिवोदधिः ॥ ४४ ॥
संदेह सुटला सारा समदर्शिच जाहले ।
अंतर्मुख सदा शांत प्रशांत उदधी जणू ॥ ४४ ॥

निरहङ्कतिः - अहंकाररहित - निर्ममः - निस्पृह - निर्व्दन्‌व्दः - सुखदुःखरहित - निर्वैरः - वैररहित - समदृक् - समदृष्टि - स्वदृक् - आत्म्याला पाहणारा - प्रत्यक्प्रशान्तधीः - परमेश्वराच्या ठिकाणी आसक्त आहे निश्चल बुद्धि ज्याची असा - च - आणि - प्रशान्तोर्मिः - शान्त झालेल्या आहेत वासनात्मक लाटा ज्याच्या अशा - उदधिःइव - समुद्राप्रमाणे - धीरः - गम्भीर असा - अभवत् - झाला. ॥४४॥
ते अहंकार, ममता आणि सुख-दुःखादी द्वंद्वांपासून अलग होऊन भेद-दृष्टिरहित झाले आणि सर्वांमध्ये आपल्याच आत्म्याला पाहू लागले. त्यांची बुद्धी अंतर्मुख आणि शांत झाली. त्यावेळी धीरोदात्त कर्दम लाटा नसलेल्या समुद्राप्रमाणे दिसत होते. (४४)


वासुदेवे भगवति सर्वज्ञे प्रत्यगात्मनि ।
परेण भक्तिभावेन लब्धात्मा मुक्तबन्धनः ॥ ४५ ॥
सर्वज्ञ वासुदेवात लाविता सर्व चित्त ते ।
सर्व त्या बंधनातूनी सदाचे मुक्त जाहले ॥ ४५ ॥

सर्वज्ञे - सर्वज्ञ अशा - प्रत्यगात्मनि - सर्व जीवांचा अन्तर्यामि अशा - भगवति - ऐश्वर्यसंपन्न अशा - वासुदेवे - श्रीहरीच्या ठिकाणी - परेण - अखंड अशा - भक्तियोगेन - भक्तियोगाने - लब्धात्मा - प्राप्त झाले आहे ज्ञान ज्याला असा - मुक्तबन्धनः - सुटलेली आहेत बन्धने ज्याची असा. ॥४५॥
परम भक्तिभावाने सर्वांतर्यामी, सर्वज्ञ भगवान वासुदेवांच्यामध्ये चित्त स्थिर झाल्याने ते सार्‍या बंधनातून मुक्त झाले. (४५)


आत्मानं सर्वभूतेषु भगवन्तं अवस्थितम् ।
अपश्यत्सर्वभूतानि भगवत्यपि चात्मनि ॥ ४६ ॥
पाहिलाचि स्व‌आत्मातो सर्वभूतात स्थीर जो ।
सर्वभूत हरीरुप पाहोनी शांत जाहले ॥ ४६ ॥

सर्वभूतेषु - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी - अवस्थितम् - असलेल्या - आत्मानाम् - परमात्म्याला - च - आणि - सर्वभूतानि - सर्व प्राण्यांना - भगवति - परमेश्वरामध्ये - आत्मनि अपि - आणि आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा - अपश्यत् - पाहता झाला. ॥४६॥
संपूर्ण भूतांमध्ये आपला आत्मा असलेल्या श्रीभगवंतांना आणि भूतमात्राला आत्मस्वरूप श्रीहरींमध्ये स्थित असलेले ते पाहू लागले. (४६)


इच्छाद्वेषविहीनेन सर्वत्र समचेतसा ।
भगवद्‍भक्तियुक्तेन प्राप्ता भागवती गतिः ॥ ४७ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां
तृतीयस्कंधे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
इच्छा द्वेषास सोडोनी सम्यक्‌ संपन्न जाहले ।
कर्दमा भक्तियोगाने मिळाली श्रेष्ठ ती गती ॥ ४७ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥
॥ चोविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २४ ॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

इच्छाद्वेषविहीनेन - इच्छा व द्वेष यांनी रहित अशा - सर्वत्र - सर्व ठिकाणी - समचेतसा - सारखे आहे चित्त ज्याचे अशा - भगवद्भक्तियुक्तेन - श्रीहरीच्या ठिकाणी जी भक्ति तिने युक्त अशा - तेन - त्या कर्दमाने - भागवती - भगवव्दिषयक - गतिः - स्थान - प्राप्ता - प्राप्त करून घेतले. ॥४७॥
अशा रीतीने इच्छा आणि द्वेषरहित होऊन, सर्वत्र समबुद्धी आणि भगवद्‌भक्तीने संपन्न होऊन श्रीकर्दमांनी भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेतले. (४७)


स्कंध तिसरा - अध्याय चोविसावा समाप्त

GO TOP