|
श्रीमद् भागवत पुराण
समाधिस्तस्य कर्दमस्य देवहूतिकृता परिचर्या, कर्दमद्वारा कर्दम आणि देवहूती यांचा विहार - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
मैत्रेय उवाच -
पितृभ्यां प्रस्थिते साध्वी पतिं इङ्कितकोविदा । नित्यं पर्यचरत् प्रीत्या भवानीव भवं प्रभुम् ॥ १ ॥
मैत्रेयजी सांगतात - ( अनुष्टुप् ) आई वडील जाताची संकेत जाणुनी मनी । पतीची नित्य ती सेवा करी जै पार्वती हरा ॥ १ ॥
पितृभ्याम् - मातापितरांनी प्रस्थिते - प्रस्थान केले असता इङ्गितकोविदा - हृद्गत जाणणारी अशी साध्वी - पतिव्रता देवहूती पतिम् - पतीला भवानी - पार्वती प्रभुम् भवम् - भगवान शंकराला इव - जशी तथा - तशी नित्यम् - नेहमी प्रीत्या - प्रीतीने पर्यचरत् - सेविती झाली ॥१॥
मैत्रेय म्हणाले - माता-पिता निघून गेल्यानंतर पतीचे मनोगत ओळखण्यात कुशल साध्वी देवहूती, श्रीपार्वती ज्याप्रमाणे भगवान शंकरांची सेवा करी, त्याप्रमाणे कर्दमांची दररोज प्रेमपूर्वक सेवा करू लागली. (१)
विश्रम्भेणात्मशौचेन गौरवेण दमेन च ।
शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुरया च भोः ॥ २ ॥ विसृज्य कामं दम्भं च द्वेषं लोभमघं मदम् । अप्रमत्तोद्यता नित्यं तेजीयांसमतोषयत् ॥ ३ ॥
वासना दंभ नी द्वेष लोभ पाप नि गर्व तो । त्यागुनी करि ती सेवा वाचे मधूर भाषण ॥ २ ॥ विश्वास आणि पावित्र्य शुश्रुषा तैचि गौरव । प्रेम संयम यांनी ती तोषवी नित्य तो पती ॥ ३ ॥
भोः - हे विदुरा अप्रमत्ता - असावध न राहणारी अशी नित्यम् - नेहमी उद्यता - कार्यतत्पर अशी सा - ती देवहूती विश्रम्भेण - विश्वासाने आत्मशौचेन - शारीरिक व मानसिक शुद्धतेने गौरवेण - आदराने दमेन - इन्द्रियनिग्रहाने शुश्रूषया - सेवेने च - आणि सौहृदेन - प्रेमाने च - आणि मधुरया - मधुर अशा वाचा - वाणीने कामम् - विषयभोगांच्या इच्छेला दम्भम् - कपटाला द्वेषम् - द्वेषाला लोभम् - लोभाला अघम् - निषिद्धाचरणाला च - आणि मदम् - उन्मत्तपणाला विसृज्य - टाकून तेजीयांसम् - अत्यंत तेजस्वी तम् - त्या कर्दमाला अतोषयत् - संतुष्ट करती झाली ॥२-३॥
हे विदुरा, तिने कामवासना, दंभ, द्वेष, लोभ, पाप आणि मद यांचा त्याग करून दक्षतेने आणि चिकाटीने पतीच्या सेवेत नित्य तत्पर राहून विश्वास, पवित्रता, गौरव, संयम, शुश्रूषा, प्रेम आणि मधुर भाषण आदी गुणांनी आपल्या परम तेजस्वी पतिदेवांना संतुष्ट केले. (२-३)
स वै देवर्षिवर्यस्तां मानवीं समनुव्रताम् ।
दैवाद्गरीयसः पत्युः आशासानां महाशिषः ॥ ४ ॥ कालेन भूयसा क्षामां कर्शितां व्रतचर्यया । प्रेमगद्गदया वाचा पीडितः कृपयाब्रवीत् ॥ ५ ॥
दैवाहुनी पतीश्रेष्ठ जाणिले देवहूतिने । त्यामुळे श्रेष्ठ आकांक्षा ठेउनी पति सेविला ॥ ४ ॥ करोनि व्रतवैकल्ये जाहली पत्नि दुर्बला । पाहुनी बोलला तेव्हा कर्दमो प्रेमवाणिने ॥ ५ ॥
सः - तो देवर्षिवर्यः - देवर्षिश्रेष्ठ कर्दम वै - खरोखर कृपया - दयेच्या योगाने पीडितः - पीडित झालेला असा समनुव्रताम् - उत्तमप्रकारे सेवा करणार्या अशा मानवीम् - मनुकन्या अशा दैवात् - प्रारब्धापेक्षा गरीयसः - अत्यंत श्रेष्ठ अशा पत्युः - पतीपासून महाशिषः - मोठ्या मनोरथांना आशासानाम् - इच्छिणार्या अशा भूयसा - पुष्कळ कालेन - काळाने क्षामाम् - क्षीण झालेल्या अशा व्रतचर्यया - व्रतांच्या आचरणाने कर्शिताम् - कृश झालेल्या अशा ताम् - त्या देवहूतीला प्रेमगद्गदया - अस्पष्ट अशा वाचा - वाणीने अब्रवीत - बोलता झाला ॥४-५॥
देवहूती दैवापेक्षाही श्रेष्ठ असणार्या पतीपासून मोठमोठया आशा मनाशी बाळगून त्यांच्या सेवेत तत्पर असे. या प्रकारे पुष्कळ काळपर्यंत सेवा करणार्या मनुपुत्रीला व्रतादींचे पालन केल्याने दुर्बल झालेली पाहून देवर्षी कर्दमांना कळवळा आला आणि प्रेमाने सद्गदित झालेल्या वाणीने ते तिला म्हणाले. (४-५)
कर्दम उवाच -
तुष्टोऽहमद्य तव मानवि मानदायाः शुश्रूषया परमया परया च भक्त्या । यो देहिनामयमतीव सुहृत्स देहो नावेक्षितः समुचितः क्षपितुं मदर्थे ॥ ६ ॥
कर्दमजी म्हणाले - (वसंततिलका) केलीस तू मजसवे बहु प्रेमभक्ती सर्वांस देह गमतो अतिप्रीय तोही । केलास क्षीण मज सेवुनिया सदैव सेवा नि भक्ति बघुनी बहु तोषलो मी ॥ ६ ॥
मानवि - हे मनुकन्ये अहम् - मी अद्य - आज मानदायाः - मान देणार्या अशा
कर्दम म्हंणाले - "हे मनुपुत्री, तू माझा मोठा आदर केला आहेस. तू करीत असलेली उत्तम सेवा आणि परम भक्ती यामुळे मी फार संतुष्ट झालो आहे. देह धारण करणार्या सर्वांना आपला देह ही अत्यंत प्रिय आणि आदराची वस्तू असते. परंतु तू माझ्यासाठी त्याच्या क्षीण होण्याची जराही पर्वा केली नाहीस. (६)
ये मे स्वधर्मनिरतस्य तपःसमाधि
विद्यात्मयोगविजिता भगवत्प्रसादाः । तानेव ते मदनुसेवनयावरुद्धान् दृष्टिं प्रपश्य वितराम्यभयानशोकान् ॥ ७ ॥
तू पाळिला तवचि धर्म मला म्हणोनी योगे समाधि तप आणि उपासनेने । विष्णुप्रसादविभुती बहु प्राप्त झाल्या देतो तुलाहि तशि दृष्टि पहा सुखाने ॥ ७ ॥
स्वधर्मनिरतस्य - स्वधर्मात अनुरक्त अशा मे - माझी तपःसमाधिविद्या - तपश्चर्या, समाधि व उपासना यांमध्ये आत्मयोगविजिताः - जी चित्ताची एकाग्रता तिच्या योगाने प्राप्त झालेले ये - जे भगवत्प्रसादाः - श्रीहरीचे प्रसाद सन्ति - आहेत अभयान् - ज्यांमध्ये भय नाही अशा अशोकान् - व ज्यामध्ये शोक नाही अशा मदनुसेवया - माझ्या नित्य सेवेने ते - तुजकडून अवरुद्धान् - मिळविलेल्या अशा तान् एव - त्या दिव्य भोगांनाच प्रपश्य - अवलोकन कर ते - तुला दृष्टिम् - दृष्टि वितरामि - देतो ॥७॥
म्हणून आपल्या धर्माचे पालन करीत राहिल्यामुळे मला तप, समाधी, उपासना आणि योगद्वारा भय आणि शोकरहित अशा ज्या भगवत्प्रसादस्वरूप विभूती प्राप्त झाल्या आहेत, त्यांवर माझ्या सेवेच्या प्रभावाने आता तुझाही अधिकार आहे. मी तुला दिव्य दृष्टी देतो, त्यायोगे तू त्या पहा. (७)
अन्ये पुनर्भगवतो भ्रुव उद्विजृम्भ
विभ्रंशितार्थरचनाः किमुरुक्रमस्य । सिद्धासि भुङ्क्ष्व विभवान् निजधर्मदोहान् दिव्यान् नरैर्दुरधिगान् नृपविक्रियाभिः ॥ ८ ॥
त्या श्रीहरीभ्रुकुटिमात्रचि भोग सारे जाती जळूनि सगळे तुहि धन्य झाली । पातीव्रतेचि मिळले लुटि भोग सारे श्रीमंतिगर्व असता नच लाभ ऐसा ॥ ८ ॥
उरुक्रमस्य - मोठा आहे पराक्रम ज्याचा अशा श्रीहरीच्या भ्रुवः - भ्रुकुटीच्या उद्विजृम्भविभ्रंशितार्थरचनाः - वक्रतेने नष्ट केले आहेत मनोरथ ज्यातील असे अन्ये - दुसरे भोग पुनः - पुनः किम् - काय त्वम् - तू सिद्धा - सिद्ध असि - आहेस अतः - यास्तव नरैः - मनुष्यांनी नृपविक्रियाभिः - राजांच्या भोग्य संपत्तीने दुरधिगान् - मिळविण्यास अशक्य अशा निजधर्मदोहान् - स्वतःच्या पातिव्रत्यधर्माने प्राप्त झालेल्या अशा दिव्यान् - दिव्य भोगान् भुङ्व - भोगांचा उपभोग घे ॥८॥
इतर जे भोग आहेत, ते श्रीहरींच्या वक्रदृष्टीने नाहीसे होणारे आहेत. म्हणून यांच्यासमोर ते भोग काहीच नाहीत. तू माझ्या सेवेने कृतार्थ झाली आहेस. आपल्या पतिव्रता धर्माचे पालन केल्याने तुला हे दिव्य भोग प्राप्त झाले आहेत, ते तू भोग. "आम्ही राजे आहोत, आम्हांला सर्व काही सहज मिळणे शक्य आहे." असा अभिमान असणार्या माणसांना या दिव्य भोगांची प्राप्ती होणे कठीण आहे." (८)
एवं ब्रुवाणमबलाखिलयोगमाया
विद्याविचक्षणमवेक्ष्य गताधिरासीत् । सम्प्रश्रयप्रणयविह्वलया गिरेषद् व्रीडावलोकविलसद् हसिताननाह ॥ ९ ॥
ऐकोनि बोले सगळे अन योगमाया जाणुनि या पतिसि तीहि निवांत झाली । संकोच दृष्टि अन हास्य मुखावरी ते प्रेमेचि बोल वदली मग हे असे ते ॥ ९ ॥
अबला - अबला अशी देवहूती अखिलयोगमायाविद्याविचक्षणम् - संपूर्ण योगमाया व त्यांच्या उपासना यांमध्ये निपुण अशा एवम् - याप्रमाणे ब्रुवाणम् - बोलणार्या अशा पतिम् - पतीला अवेक्ष्य - पाहून गताधिः - गेली आहे चिंता जिची अशी आसीत् - झाली ईषद्व्रीडावलोकविलसद्धसितानना - लज्जायुक्त पाहण्याने जिचे हास्ययुक्त मुख शोभत आहे सा - अशी ती देवहूती संप्रश्रयप्रणयविह्वलया - विनय व प्रेम यांनी अस्पष्ट अशा वाचा - वाणीने आह - म्हणाली ॥९॥
कर्दमांचे हे बोलणे ऐकून, आपले पतिदेव संपूर्ण योगमाया आणि विद्यांमध्ये निष्णात आहेत, असे जाणून त्या अबलेची सर्व चिंता नाहीशी झाली. तिचे मुखकमल लज्जायुक्त मधुर हास्याने प्रसन्न झाले आणि ती विनय व प्रेमाने सद्गदित झालेल्या वाणीने म्हणाली. (९)
देवहूतिरुवाच -
राद्धं बत द्विजवृषैतदमोघयोग मायाधिपे त्वयि विभो तदवैमि भर्तः । यस्तेऽभ्यधायि समयः सकृदङ्गसङ्गो भूयाद्गरीयसि गुणः प्रसवः सतीनाम् ॥ १० ॥
देवहूति म्हणाली - मी जाणिते द्विजवरा खरि योगशक्ती ऐश्वर्य द्रव्य सगळे मिळवाल माये । पत्नीस गर्भ भरिता त्यजि मी सुखाते केले तुम्ही वचन द्या मज गर्भ आता ॥ १० ॥
विभो - प्रभो द्विजवृष - हे ब्राह्मणश्रेष्ठा भर्तः - हे स्वामिन् एतत् - हे आमोघयोगमायाधिपे - अमोघ अशा योगमायेचा अधिपति अशा त्वयि - तुझ्या ठिकाणी राद्धम् - सिद्ध अस्ति - आहे तत् - ते अहम् - मी बत - खरोखर अवैमि - जाणत आहे यः - जो समयः - संकेत ते - तुजकडून अभ्यधायि - सांगितला गेला सः - तो अङगसङग - समागम सकृत - एकवार भूयात - व्हावा गरियसि - अतिशय श्रेष्ठ अशा पतीपासून प्रसवः - अपत्यप्राप्ति सतीनाम् - परिव्रता स्त्रियांचा गुणः - गुण अस्ति - आहे ॥१०॥
देवहूती म्हणाली - "हे द्विजश्रेष्ठ, स्वामी, योगशक्ती आणि त्रिगुणात्मक मायेवर निरंकुश अधिकार असणार्या आपल्याला हे सर्व ऐश्वर्य प्राप्त आहे, हे मला माहीत आहे. हे प्रभो, आपण जी प्रतिज्ञा केली होती की, "मी तुझ्याशी गृहस्थसुखाचा एकदा उपभोग घेईन, त्याची पूर्तता करावी. कारण श्रेष्ठ पतीकडून संतान प्राप्त होणे हा पतिव्रता स्त्रीला मोठा लाभ आहे. (१०)
तत्रेतिकृत्यमुपशिक्ष यथोपदेशं
येनैष मे कर्शितोऽतिरिरंसयाऽऽत्मा । सिद्ध्येत ते कृतमनोभवधर्षिताया दीनस्तदीश भवनं सदृशं विचक्ष्व ॥ ११ ॥
शास्त्रानुसार सगळे मज भोग आणा हा कृशदेह जळतो नित कामवेगे । मी अंगसंग करण्या सजवील काया कार्यार्थ या उचित थोर गृहा उभारा ॥ ११ ॥
ईश - हे स्वामिन् यथोपदेशम् - शास्त्राला अनुसरून तत्र - त्या समागमाविषयी इतिकृत्यम् - सामग्री उपशिक्ष - तयार करा येन - ज्या सामग्रीच्या योगाने अतिरिरंसया - भोगाच्या मोठ्या इच्छेमुळे कर्शितः - कृश झालेला ते - तुझ्याकडून कृतमनोभवधर्षितायाः - उत्पन्न केलेल्या कामाने पीडिलेल्या अशा मे - माझा एषः - हा दीनः - दीन आत्मा - देह सिद्धयेत - उपभोग घेण्यास समर्थ होईल तत् - यास्तव सदृशम् - योग्य अशा भवनम् विचक्ष्व - गृहाचा विचार करा ॥११॥
आपल्या समागमासाठी शास्त्रानुसार जे कर्तव्य असेल, ते आपण मला सांगावे, जेणेकरून मिलनाच्या तीव्र इच्छेने दुर्बल झालेले माझे हे शरीर आपल्या अंगसंगासाठी योग्य होईल. कारण आपणच वाढविलेली माझी ही कामवासना मला त्रस्त करीत आहे. म्हणून स्वामी, या कार्यासाठी योग्य भवनाचाही विचार करावा." (११)
मैत्रेय उवाच -
प्रियायाः प्रियमन्विच्छन् कर्दमो योगमास्थितः । विमानं कामगं क्षत्तः तर्ह्येवाविरचीकरत् ॥ १२ ॥
मैत्रेयजी सांगतात - ( अनुष्टुप् ) प्रियेच्या प्रीय इच्छेस करण्या पूर्ण कर्दमे । विमान रचिले योगे इच्छेनुसार जे उडे ॥ १२ ॥
क्षत्तः - हे विदुरा प्रियायाः - पत्नीच्या प्रियम् - मनोरथाला अन्विच्छन् - पूर्ण करू इच्छिणारा कर्दमः - कर्दम ऋषि योगम् आश्रितः - योगाचा आश्रय केलेला असा तर्हि एव - त्या क्षणीच कामगम् - इच्छेने जाणार्या अशा विमानम् - विमानाला आविरचीकरत् - प्रगट करता झाला ॥१२॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, आपल्या प्रियेची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्दम मुनींनी त्याचवेळी योगसामर्थ्याने इच्छित ठिकाणी जाणारे एक विमान तयार केले. (१२)
सर्वकामदुघं दिव्यं सर्वरत्नसमन्वितम् ।
सर्वर्द्ध्युपचयोदर्कं मणिस्तम्भैरुपस्कृतम् ॥ १३ ॥
इच्छिले सर्व दे भोग रत्नअंकित सुंदर । दिव्य संपन्न रत्नांनी खांब त्याचेच शोभले ॥ १३ ॥
सर्वकामदुघम् - सर्व मनोरथ पूर्ण करणार्या अशा दिव्यम् - दिव्य सर्वरत्नसमन्वित् - सर्व रत्नांनी युक्त अशा सर्वद्धर्युपचयोदर्कम् - सर्व संपत्तीच्या वृद्धीचा आहे उत्कर्ष ज्यामध्ये अशा मणिस्तम्भैः - रत्नांच्या स्तंभांनी उपस्कृतम् - शोभित अशा ॥१३॥
हे विमान सर्व प्रकारचे इच्छित भोग देणारे, अत्यंत सुंदर, सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त, उत्तरोत्तर सर्व संपत्तींची वाढ होत जाणारे आणि रत्नजडित खांबांनी सुशोभित होते. (१३)
दिव्योपकरणोपेतं सर्वकालसुखावहम् ।
पट्टिकाभिः पताकाभिः विचित्राभिः अलङ्कृतम् ॥ १४ ॥
दिव्य सामग्रि त्यां होता सर्वकाळ सुखावह । रेशमी शोभती झेंडे ऐसे यान अलंकृत ॥ १४ ॥
दिव्योपकरणोपेतम् - दिव्य साहित्याने युक्त अशा सर्वकालसुखावहं - सर्वकाळी सुखकारक अशा विचित्राभिः - विविध रंगाच्या पट्टिकाभिः - लहान पताकांनी च - आणि पताकाभिः - मोठ्या पताकांनी अलङ्कृतम् - सुशोभित अशा ॥१४॥
ते सर्व ऋतूंमध्ये सुखदायक होते. त्यात जिकडे तिकडे सर्व प्रकारची दिव्य सामग्री ठेवलेली होती. तसेच ते चित्र-विचित्र रेशमी झुंबरे आणि पताकांनी सजविले होते. (१४)
स्रग्भिर्विचित्रमाल्याभिः मञ्जुशिञ्जत् षडङ्घ्रिभिः ।
दुकूलक्षौमकौशेयैः नानावस्त्रैः विराजितम् ॥ १५ ॥
भ्रमरांकित पुष्पांच्या माळांनी शोभले तसे । रेशमी सुति वस्त्रांनी आतही सजवीयले ॥ १५ ॥
विचित्रमाल्याभिः - अनेक रंगांची आहेत पुष्पे ज्यामध्ये अशा मञ्जुसिञ्जत्षडङ्घ्रिभिः - मञ्जुळ शब्द करणारे भ्रमर आहेत ज्यात अशा स्त्रग्भिः - माळांनी दुकूलक्षौमकौशयैः - कापूस, लोकर आणि रेशीम यांच्या नानावस्त्रैः - विविध वस्त्रांनी विराजितम् - सुशोभित ॥१५॥
ज्याच्यावर भ्रमर मधुर गुंजारव करीत होते, अशा रंगी-बेरंगी फुलांच्या माळांनी तसेच अनेक प्रकारच्या सुती आणि रेशमी वस्त्रांनी ते अत्यंत शोभायमान दिसत होते. (१५)
उपर्युपरि विन्यस्त निलयेषु पृथक्पृथक् ।
क्षिप्तैः कशिपुभिः कान्तं पर्यङ्कव्यजनासनैः ॥ १६ ॥
प्रत्येक मजल्या माजी शय्या अंकित मंचकी । पंखे नी आसने यांनी अत्यंत शोभनीय जे ॥ १६ ॥
उपरि उपरि - एकावर एक विन्यस्तनिलयेषु - रचलेल्या गृहांमध्ये पृथक् पृथक् - निरनिराळ्या क्षिप्तैः - रचिलेल्या कशिपुभिः - शय्यांनी पर्यङ्कव्यजनासनैः - मञ्चक, पंखे व आसने यांनी कान्तम् - सुन्दर ॥१६॥
एकावर एक अशा तयार केलेल्या महालांमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या शय्या, पलंग, पंखे आणि आसने यांमुळे ते फारच सुंदर वाटत होते. (१६)
तत्र तत्र विनिक्षिप्त नानाशिल्पोपशोभितम् ।
महामरकतस्थल्या जुष्टं विद्रुमवेदिभिः ॥ १७ ॥
भिंतीसी रचिले शिल्प शोभायमान जाहले । पन्नाच्या फरशा होत्या मोत्यांची आसने तशी ॥ १७ ॥
तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी विनिक्षिप्तनानाशिल्पोपशोभितम् - अनेक प्रकारच्या कलायुक्त कस्तुरीच्या कामांनी सुशोभित असलेल्या महामरकतस्थल्या - मौल्यवान् पाचूच्या मण्यांच्या पटांगणाने विद्रुमवेदिभिः - पोवळ्यांच्या चौरंगांनी जुष्टम् - युक्त अशा ॥१७॥
सर्व भिंतीवर केलेली शिल्परचना अतिशय शोभत होती. तेथे पाचूची फरशी आणि पोवळ्याचे सोपे तयार केले होते. (१७)
द्वाःसु विद्रुमदेहल्या भातं वज्रकपाटवत् ।
शिखरेषु इन्द्रनीलेषु हेमकुम्भैः अधिश्रितम् ॥ १८ ॥
कोनाडे पोवळ्यांचे नी हिर्यांचेच कवाड ते । सुवर्ण कलशीं त्याच्या इंद्रनीलचि स्थापिले ॥ १८ ॥
द्रासुः - दरवाज्यांतील विद्रुमदेहल्या - पोवळ्यांच्या उंबरठ्यांनी भातम् - प्रकाशमान झालेले वज्रकपाटवत् - रत्नखचित दारांच्या फळ्यांनी युक्त इन्द्रनीलेषु - इन्द्रनीळ मण्यांच्या शिखरेषु - शिखरांवरील हेमकुम्भैः - सुवर्णकुम्भांनी अधिश्रितम् - आश्रय केलेले ॥१८॥
पोवळ्यांच्या उंबरठयांवर हिर्यांचे दरवाजे तसेच इंद्रनील मण्यांच्या शिखरांवर सोन्याचे कलश बसवले होते. (१८)
चक्षुष्मत् पद्मरागाग्र्यैः वज्रभित्तिषु निर्मितैः ।
जुष्टं विचित्रवैतानैः महार्हैः हेमतोरणैः ॥ १९ ॥
हिर्यांच्या भिंतींसी लाल त्यांचे नेत्रचि भासले । रंगीत चांदवे आणि पंखेही बसवीयले ॥ १९ ॥
वज्रभित्तिषु - रत्नांच्या भिंतीमध्ये निर्मितैः - बसविलेल्या पद्मरागाग्रैः - उत्कृष्ट अशा पद्मरागनामक रत्नांनी चक्षुष्मत् - नेत्रयुक्त दिसणारे महार्हैः - मोठ्या किंमतीच्या विचित्रवैतानेः - चित्रविचित्र छतांनी हेमतोरणैः - सुवर्णाच्या तोरणांनी जुष्टम् - युक्त ॥१९॥
हिरेजडित भिंतींवर पद्मराग मणी लावलेले होते. ते विमानाच्या डोळ्यांसारखे दिसत होते आणि त्यावर रंगीबेरंगी चांदवे आणि बहुमूल्य सोन्याच्या तोरणांनी ते सजविले होते. (१९)
हंसपारावतव्रातैः तत्र तत्र निकूजितम् ।
कृत्रिमान् मन्यमानैः स्वान् अधिरुह्याधिरुह्य च ॥ २० ॥
चिमण्या हंस यांच्याही प्रतिमा निर्मिल्या तयीं । अशा की पक्षिही त्यांशी खरे मानून बोलती ॥ २० ॥
च - आणि तत्र तत्र - जागोजाग कृत्रिमान् - कृत्रिम पक्ष्यांना स्वान् - सजातीय मन्यमानैः - मानणार्या हंसपारावतव्रातैः - हंस व पारवे यांच्या समूहांनी अधिरुह्य अधिरुह्य - चढून चढून निकूजितम् - दुमदुमविलेले ॥२०॥
त्या विमानात ठिकठिकाणी असलेल्या कृत्रिम हंस आणि कबुतरांना आपल्यासारखेच समजून पुष्कळसे (खरे) हंस आणि कबुतर त्यांच्याजवळ बसून आपल्या बोलीत बोलत होते. (२०)
विहारस्थानविश्राम संवेशप्राङ्गणाजिरैः ।
यथोपजोषं रचितैः व्प्स्मापनं इवात्मनः ॥ २१ ॥
क्रीडांगण तसे चौक शय्यागृह नि बैठका । होताचि पूर्ण हे यान कर्दमा हर्ष जाहला ॥ २१ ॥
यथोपजोषम् - सुखाला अनुरूप अशा रचितैः - रचिलेल्या विहारस्थानविश्राम - क्रीडास्थाने, शयनस्थाने, उपभोगाची स्थाने, संवेशप्राङ्गणाजिरैः - घराच्या बाहेरील चौक व तटाच्या बाहेरील मैदान यांनी आत्मनः - स्वतः कर्दमाला विस्मापनम् इव - जणू काय आश्चर्य उत्पन्न करणारे असे ॥२१॥
त्यात आवश्यकतेनुसार क्रीडांगणे, शयनगृहे, बैठका, अंगणे, आणि चौक बनविले गेले होते. त्यामुळे ते विमान स्वतः कर्दमांनाही आश्चर्यचकित करीत होते. (२१)
ईदृग्गृहं तत्पश्यन्तीं नातिप्रीतेन चेतसा ।
सर्वभूताशयाभिज्ञः प्रावोचत् कर्दमः स्वयम् ॥ २२ ॥
देवहूती हिने ऐसे गृह ना कधि पाहिले । अंतरा जाणुनी तेंव्हा कर्दमो बोल बोलिले ॥ २२ ॥
सर्वभूताशयाभिज्ञः - सर्व प्राण्यांचे हृद्गत जाणणारा असा कर्दमः - कर्दम ऋषि तत् - त्या ईदृक् - अशा प्रकारच्या गृहम् - गृहाला नातिप्रीतेन - अत्यन्त संतुष्ट न झालेल्या अशा चेतसा - अन्तःकरणाने पश्यन्तीम् - पाहणार्या अशा देवहूतिम् - देवहूतीला स्वयम् - स्वतः प्रावोचत् - म्हणाला ॥२२॥
असे सुंदर घर पाहूनसुद्धा जेव्हा देवहूती प्रसन्न झाली नाही, तेव्हा सर्वांच्या अंतरंगातील भाव जाणणारे कर्दम स्वतःच म्हणाले - (२२)
निमज्ज्यास्मिन् ह्रदे भीरु विमानं इदमारुह ।
इदं शुक्लकृतं तीर्थं आशिषां यापकं नृणाम् ॥ २३ ॥
बिंदुसरोवरामाजी स्नान तू करुनी भिरु । विमानी चढ गे वेगी तीर्थ ते कामदा असे ॥ २३ ॥
भीरु - हे भित्र्ये अस्मिन् - ह्या हृदे - बिन्दु सरोवरात निमज्ज्य - स्नान करून इदम् - ह्या विमानम् - विमानात आरुह - चढून बैस इदम् - हे शुक्लकृतम् - शुक्लस्वरूपी श्रीहरीने निर्माण केलेले तीर्थम् - तीर्थ नृणाम् - मनुष्यांच्या आशिषाम् - मनोरथांना यापकम् - प्राप्त करून देणारे अस्ति - आहे ॥२३॥
प्रिये ! तू या बिंदुसरोवरात स्नान करून या विमानात चढ. हे भगवान विष्णूंनी रचलेले तीर्थक्षेत्र मनुष्यांच्या सर्व कामना पुरविणारे आहे. (२३)
सा तद्भर्तुः समादाय वचः कुवलयेक्षणा ।
सरजं बिभ्रती वासो वेणीभूतांश्च मूर्धजान् ॥ २४ ॥ अङ्गं च मलपङ्केन सञ्छन्नं शबलस्तनम् । आविवेश सरस्वत्याः सरः शिवजलाशयम् ॥ २५ ॥
सुनेत्रा देवहूतीने पतीचे शब्द मानिले । पवित्र जल तीर्थात रिघली स्नान हेतुने ॥ २४ ॥ मलीन चुर्गळालेली साडी अंगावरी अशी । चिकट केस नी अंग स्तनही कांतिहीन ते ॥ २५ ॥
कुवलयेक्षणा - कमलाप्रमाणे आहेत नेत्र जिचे अशी सरजम् - मलीन अशा वासः - वस्त्राला वेणीभूतान् - जटा पडलेल्या केशान् - केसांना च - आणि मलपंकेन - मळरूपी चिखलाने संच्छिन्नम् - व्यापलेल्या शबलस्तनम् - व निस्तेज आहेत स्तन ज्यामध्ये अशा अङ्गम् - शरीराला बिभ्रतीम् - धारण करणारी अशी सा - ती देवहूती भर्तुः - पतीच्या तत् - त्या वचः - भाषणाला समादाय - ग्रहण करून सरस्वत्याः - सरस्वती नदीच्या शिवजलाशयम् - निर्मळ जळाचे आश्रयस्थान अशा सरः - बिन्दु सरोवरात आविवेश - प्रवेश करती झाली ॥२४-२५॥
कमललोचना देवहूतीने आपल्या पतींचे म्हणणे मानून सरस्वतीच्या पवित्र जलाने भरलेल्या त्या सरोवरात प्रवेश केला. त्या वेळी ती मलिन साडी नेसलेली होती, केसांच्या गुंडाळ्या झाल्या होत्या, तिचे शरीर मलिन झाले होते आणि स्तन निस्तेज झाले होते. (२४-२५)
सान्तः सरसि वेश्मस्थाः शतानि दश कन्यकाः ।
सर्वाः किशोरवयसो ददर्शोत्पलगन्धयः ॥ २६ ॥
सहस्त्र मुलि प्रासादी पाण्यात डुंबताक्षणी । दिसल्या यौवना सार्या कमळापरि गंधिता ॥ २६ ॥
अन्तःसरसि - सरोवरामध्ये सा - ती देवहूती सर्वाः - सर्व किशोरवयसः - तरुण आहे वय ज्यांचे अशा वेश्मस्थाः - घरात बसलेल्या अशा दशशतानि - दहाशे उत्पलगन्धीः - कमलाप्रमाणे आहे सुगन्ध ज्यांचा अशा कन्यकाः - दासींना ददर्श - पहाती झाली ॥२६॥
सरोवरात बुडी मारल्यानंतर तिने तेथे एका महालात एक हजार कन्या पाहिल्या. त्या सर्व किशोरवयीन होत्या आणि त्यांच्या शरीरातून कमलपुष्पांसारखा सुगंध येत होता. (२६)
तां दृष्ट्वा सहसोत्थाय प्रोचुः प्राञ्जलयः स्त्रियः ।
वयं कर्मकरीस्तुभ्यं शाधि नः करवाम किम् ॥ २७ ॥
पाहता देवहूतीला उभ्या सार्याचि राहिल्या । बोलल्या हात जोडोनी दासींना काम सांगणे ॥ २७ ॥
स्त्रियाः - स्त्रिया ताम् - त्या देवहूतीला दृष्ट्वा - पाहून सहसा - एकदम उत्थाय - उभ्या राहून प्राञ्जलयः - हात जोडलेल्या अशा प्रोचुः - म्हणाल्या वयम् - आम्ही तुभ्यम् - तुझ्या कर्मकरीः - दासी स्मः - आहो किम् - काय नः - आम्हाला शाधि - आज्ञा कर ॥२७॥
देवहूतीला पाहताच त्या सर्व स्त्रिया ताबडतोब उठून उभ्या राहिल्या आणि हात जोडून म्हणाल्या - "आम्ही आपल्या दासी आहोत. आपण आज्ञा करा. आम्ही आपली काय सेवा करू ? (२७)
स्नानेन तां महार्हेण स्नापयित्वा मनस्विनीम् ।
दुकूले निर्मले नूत्ने ददुरस्यै च मानदाः ॥ २८ ॥
गंध द्रव्यांनि ते स्नान देवहूतीस घालुनी । किमती दिधली साडी नवी निर्मळ नेसण्या ॥ २८ ॥
मानदाः - मान देणार्या अशा ताः - त्या दासी च - तर मनस्विनीम् - मानी अशा ताम् - त्या देवहूतीला महार्हेण - फार मूल्यवान अशा स्नानेन - स्नानाला योग्य अशा तैलादिकांनी स्नापयित्वा - स्नान घालून असौ - ह्या देवहूतीला नूत्ने - नूतन निर्मले - स्वच्छ दुकूले - दोन रेशमी वस्त्रे ददुः - देत्या झाल्या ॥२८॥
तेव्हा स्वामिनीचा सन्मान करणार्या त्या स्त्रियांनी बहुमूल्य उटणे आणि सुगंधित द्रव्यांनी मिश्रित अशा पाण्याने मनस्विनी देवहूतीला स्नान घातले. तसेच तिला दोन नवीन आणि निर्मल रेशमी वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. (२८)
भूषणानि परार्ध्यानि वरीयांसि द्युमन्ति च ।
अन्नं सर्वगुणोपेतं पानं चैवामृतासवम् ॥ २९ ॥
भोजने षड्रसाचे नी रत्नअंकीत दागिने । आसवो अमृता ऐसे प्राशिण्या दिधले तिला ॥ २९ ॥
वरीयांसि - अत्यन्त सुंदर परार्ध्यानि - अत्यन्त मूल्यवान् द्युमन्ति - तेजस्वी भूषणानि - अलंकार च - आणि सर्वगुणोपेतम् - संपूर्ण गुणांनी युक्त असे अन्नम् - अन्न च - आणि अमृतासवम् - अमृतासारखी रुचि असलेले पानम् - पेय ददुः - देत्या झाल्या ॥२९॥
नंतर त्यांनी मौल्यवान, सुंदर आणि तेजस्वी अलंकार, सर्वगुणसंपन्न भोजन आणि पिण्यासाठी अमृतासमान पेय तिला दिले. (२९)
अथादर्शे स्वमात्मानं स्रग्विणं विरजाम्बरम् ।
विरजं कृतस्वस्त्ययनं कन्याभिर्बहुमानितम् ॥ ३० ॥ स्नातं कृतशिरःस्नानं सर्वाभरणभूषितम् । निष्कग्रीवं वलयिनं कूजत् काञ्चननूपुरम् ॥ ३१ ॥
पाहिले देवहूतीने जळात प्रतिबिंब ते । पुष्प रत्ने नि वस्त्रांनी मुलींनी सजवीयले ॥ निर्मळा कांतिही झाली श्रृंगार जाहला तसा ॥ ३० ॥
अथ - नंतर सा - ती देवहूती आदर्शे - आरशात स्वम् - आपल्या आत्मानम् - शरीराला स्नातम् - स्नान केलेल्या अशा कृतशिरःस्नानम् - घातले आहे मस्तकावरून स्नान जिला अशा विरजम् - निर्मल अशा स्त्रग्विणम् - माळायुक्त अशा विरजाम्बरम् - निर्मळ आहे वस्त्र ज्यांचे अशा कृतस्वस्त्ययनम् - केले आहे मंगल ज्यांचे अशा कन्याभिः - कन्यांनी बहुमानितम् - बहुमान दिलेल्या अशा सर्वाभरणभूषितम् - सर्व अलंकारांनी अलंकृत अशा निष्कग्रीवम् - सुवर्णाची भूषणे आहेत कण्ठामध्ये जिच्या अशा वलयिनम् - कंकणांनी युक्त अशा कूजत्काञ्चननूपुरम् - खुळखुळणारी सुवर्णाची नूपुरे आहेत ज्यामध्ये अशा ॥३०-३१॥
यावेळी देवहूतीने आरशात पाहिले असता तिला दिसले की, तिने फुलांचा हार घातला आहे, स्वच्छ वस्त्रे परिधान केली आहेत, तिचे शरीर निर्मळ असून कांतिमान झाले आहे. तसेच त्या कन्यांनी मोठया आदराने तिचा मंगल श्रृंगार केला आहे. (३०) तिने डोक्यावरून स्नान केले आहे. अंगावर सर्व प्रकारचे दागिने घातले आहेत. तसेच गळ्यात हार, हातांमध्ये काकणे, आणि पायात झंकार करणारे सोन्याचे पैंजण आहेत. (३१)
श्रोण्योरध्यस्तया काञ्च्या काञ्चन्या बहुरत्नया ।
हारेण च महार्हेण रुचकेन च भूषितम् ॥ ३२ ॥
घालुनी न्हाउ त्यांनी ते दागिने चढवियले । कंकणे शोभली हाती पायी पैंजण वाजती ॥ ३१ ॥ कर्धनी शोभली आणि अंगाला कुंकुमादिक । लाविले मंगलो द्रव्य शोभली अंगकांति ती ॥ ३२ ॥
श्रोण्योः - कमरेत अध्यस्तया - घातलेल्या काञ्चन्या - सुवर्णाच्या बहुरत्नया - पुष्कळ आहेत रत्ने ज्यामध्ये अशा काञ्च्या - कमरपट्ट्याने च - आणि महार्हेण - मोठ्या किंमतीच्या हारेण - हाराने च - आणि रुचकेन - मंगलकारक अलंकाराने भूषितम् - सुशोभित अशा ॥३२॥
कमरेला सोन्याचा रत्नजडित कमरपट्टा, गळ्यात बहुमूल्य रत्नहार आणि अंगाला कुंकुमादि मंगलद्रव्ये लावली आहेत. (३२)
सुदता सुभ्रुवा श्लक्ष्ण स्निग्धापाङ्गेन चक्षुषा ।
पद्मकोशस्पृधा नीलैः अलकैश्च लसन्मुखम् ॥ ३३ ॥
सुरेख दंतपंक्ती त्या भुवया कमनीयशा । पद्मकळीपरी नेत्र मुखासी शोभले पहा ॥ ३३ ॥
सुदता - सुंदर दातांनी सुभ्रुवा - सुंदर भुवयांनी श्लक्ष्णस्निग्धापाङ्गेन - मनोहर व सप्रेम आहे कटाक्ष ज्यांचे अशा पद्मकोशस्पृधा - कमलाच्या कळ्यांशी स्पर्धा करणार्या अशा चक्षुषा - नेत्रांनी च - आणि नीलैः - काळ्या अलकैः - केसांनी लसन्मुखम् - शोभत आहे मुख ज्यांचे असे ॥३३॥
तिचे मुख, सुंदर दंतपंक्ती, मनोहर भुवया, कमळाच्या कळीशी स्पर्धा करणारे प्रेमकटाक्षमय सुंदर नेत्र आणि काळेभोर केस यांमुळे फारच सुंदर दिसत होते. (३३)
यदा सस्मार ऋषभं ऋषीणां दयितं पतिम् ।
तत्र चास्ते सह स्त्रीभिः यत्रास्ते स प्रजापतिः ॥ ३४ ॥
स्मरता देवहूतीने मनात पतिला तदा । मैत्रिणींसह ती आली जिथे कर्दम ते उभे ॥ ३४ ॥
सा - ती देवहूती ऋषीणाम् - ऋषींमध्ये ऋषभम् - श्रेष्ठ अशा दयितम् - प्रिय अशा पतिम् - पतीला यदा - ज्या वेळी सस्मार - स्मरती झाली तदा - त्या वेळी यत्र - जेथे सः - तो कर्दम प्रजापतिः - प्रजापति आस्ते - आहे तत्र - त्या ठिकाणी स्त्रीभिःसह - स्त्रियांसह सा - ती देवहूती च - पण आस्ते - आहे ॥३४॥
जेव्हा देवहूतीने आपल्या ऋषिश्रेष्ठ प्रिय पतिदेवांचे स्मरण केले, तेव्हा जेथे ते कर्दम प्रजापती होते, तेथेच सख्यांसहित आपण असल्याचे तिला दिसले. (३४)
भर्तुः पुरस्तादात्मानं स्त्रीसहस्रवृतं तदा ।
निशाम्य तद्योगगतिं संशयं प्रत्यपद्यत ॥ ३५ ॥
पाहिले प्राणनाथाला आपुल्या सखियां सह । योगाचे जाणुनी तेज मनीं विस्मित जाहली ॥ ३५ ॥
तदा - त्या वेळी भर्तुः - पतीच्या पुरस्तात् - पुढे स्त्रीसहस्त्रवृत्तम् - हजार स्त्रियांनी वेष्टिलेल्या अशा आत्मानम् - स्वतःला च - आणि तद्योगगतिम् - त्या कर्दमाच्या योगसामर्थ्याला निशाम्य - पाहून संशयम् - आश्चर्याप्रत प्रत्यपद्यत - प्राप्त झाली ॥३५॥
त्यावेळी पतीसमोर हजारो स्त्रियांसह आपण असल्याचे पाहून आणि ते त्यांचे योगसामर्थ्य पाहून देवहूतीला मोठे आश्चर्य वाटले. (३५)
स तां कृतमलस्नानां विभ्राजन्तीमपूर्ववत् ।
आत्मनो बिभ्रतीं रूपं संवीतरुचिरस्तनीम् ॥ ३६ ॥ विद्याधरीसहस्रेण सेव्यमानां सुवाससम् । जातभावो विमानं तद् आरोहयद् अमित्रहन् ॥ ३७ ॥
कर्दमे पाहिली पत्नी स्नाने निर्मळ जी अशी । विवाहपूर्व जे रुप शोभले हे तसेचि ही ॥ ३६ ॥ सेवेत सुंदर्या आल्या अंगासी वस्त्र नेसुनी । सर्वांना घेतले त्याने विमानी बैसवोनिया ॥ ३७ ॥
अमित्रहन् - शत्रूंचा नाश करणार्या अशा विदुरा सः - तो कर्दम ऋषि जातभावः - उत्पन्न झाले आहे प्रेम ज्याला असा कृतमलस्नानाम् - केले आहे मलनाशक स्नान जिने अशा विभ्राजन्तीम् - शोभणार्या अशा अपूर्ववत् - जणू काय पूर्वीपेक्षाही उत्तम अशा आत्मनः - आपल्या रूपम् - रूपाला विभ्रतीम् - धारण करणार्या अशा संवीतरुचिरस्तनीम - चोळीने झाकलेले आहेत सुन्दर स्तन जिचे अशा सुवाससम् - सुंदर आहे वस्त्र जिचे अशा विद्याधरीसहस्त्रेण - हजार गन्धर्व स्त्रियांकडून सेव्यमानाम् - सेविली जाणार्या अशा ताम् - त्या देवहूतीला तत् - त्या
हे शत्रुंजय विदुरा, कर्दमांनी जेव्हा पाहिले की, स्नान केल्याने देवहूतीचे शरीर निर्मळ झाले असून पूर्वीसारखेच अपूर्व शोभेने संपन्न झाले आहे, तिचे सुंदर वक्षःस्थळ चोळीने झाकले आहे, हजारो अप्सरा तिची सेवा करीत आहेत, तसेच उंची वस्त्रे तिच्या शरीरावर शोभून दिसत आहेत, तेव्हा त्यांनी मोठया प्रेमाने तिला विमानात बसवून घेतले. (३६-३७)
तस्मिन् अलुप्तमहिमा प्रिययानुरक्तो
विद्याधरीभिरुपचीर्णवपुर्विमाने । बभ्राज उत्कचकुमुद्गणवानपीच्यः ताराभिरावृत इव उडुपतिः नभःस्थः ॥ ३८ ॥
(वसंततिलका) प्रीया असोनि अनुरक्त तरी मुनी हे नाही मुळीच ढळले जरि सेविती त्यां । विद्याधरा कुसुममंडित त्या विमानी जै तारकात सजला शशि पौर्णिमेचा ॥ ३८ ॥
तस्मिन् - त्या विमाने - विमानात अनुरक्तः अपि - अनुरक्त असूनसुद्धा अलुप्तमहिमा - लुप्त झालेले नाही माहात्म्य ज्यांचे असा विद्याधरीभिः - गन्धर्व स्त्रियांनी उपचीर्णवपुः - सेविलेले आहे शरीर ज्याचे असा प्रिययासह - पत्नीसह मुनिः - कर्दम ऋषि उत्कचकुमुद्गणवान् - फुललेल्या कमलसमूहाने युक्त असा नभस्थः - आकाशात असलेला असा अपीच्यः - अत्यंत सुंदर असा ताराभिः - नक्षत्रांनी आवृतः - वेष्टिलेला असा उडुपतिः इव - चन्द्राप्रमाणे बभ्राजे - शोभता झाला ॥३८॥
त्या वेळी आपल्या प्रियतमेवर अनुरक्त होऊनसुद्धा कर्दमांची महत्ता (मन आणि इंद्रियांवरील संयम) कमी झाली नाही. अप्सरा त्यांची सेवा करीत होत्या. उमललेल्या लाल कमळांनी शृंगार करून अत्यंत सुंदर बनलेले ते, विमानात अशाप्रकारे शोभून दिसत होते की, जणू काही आकाशात तारकांनी वेढलेला चंद्रच. (३८)
तेनाष्टलोकपविहारकुलाचलेन्द्र
द्रोणीष्वनङ्गसखमारुतसौभगासु । सिद्धैर्नुतो द्युधुनिपातशिवस्वनासु रेमे चिरं धनदवल्ललनावरूथी ॥ ३९ ॥
यानात तो विहरला सह स्वप्रियेच्या मेरुगिरी नि शिखरे मधुगंध जेथे । स्वर्गातुनी उतरता करि गान गंगा तेथेहि सिद्ध करिती पदसंव्य त्यांचे ॥ ३९ ॥
सिद्धैः - सिद्धांनी नुतः - स्तविलेला असा ललनावरुथी - स्त्रियांच्या समुदायाने युक्त असा सः - तो कर्दम मुनि तेन - त्या विमानाच्या योगाने अनङ्गसखमारुतसौभगासु - मदनाचा मित्र असा जो वायु त्याच्या योगाने मनोहर अशा द्युधुनिपातशिवस्वनासु - गंगेच्या धबधब्याचा मनोहर ध्वनि आहे ज्यामध्ये अशा अष्टलोकप - आठ लोकपालांचे विहारकुलाचलेन्द्रद्रोणीषु - विहार करण्याचे जे कुलपर्वत त्यातील श्रेष्ठ अशा मेरूच्या गुहांमध्ये धनदवत् - कुबेराप्रमाणे रेमे - क्रीडा करता झाला ॥३९॥
त्या विमानावर निवास करून त्यांनी दीर्घकालपर्यंत कुबेराप्रमाणे मेरुपर्वताच्या दर्यांतून विहार केला. या दर्या आठ लोकपालांच्या विहारभूमी आहेत. यांमध्ये काम वाढविणारा शीतल, मंद, सुगंधी वायू वाहात असतो. आणि गंगानदीच्या स्वर्गातून पडण्याचा मंगलध्वनी नेहमी येत असतो. त्यावेळीसुद्धा दासींचा समुदाय त्यांच्या सेवेसाठी उपस्थित होता आणि सिद्धगण त्यांना वंदन करीत होते. (३९)
वैश्रम्भके सुरसने नन्दने पुष्पभद्रके ।
मानसे चैत्ररथ्ये च स रेमे रामया रतः ॥ ४० ॥
( अनुष्टुप् ) त्या वैश्रंभक उद्यानी सुरस पुष्पभद्रकीं । रमले चैत्ररथ्यात तसे मान जलाशयीं ॥ ४० ॥
रतः - संतुष्ट असा सः - तो कर्दम ऋषि रामया - स्त्रीसह वैश्रम्भके - वैश्रम्भक नावाच्या देवांच्या उद्यानात सुरसने - सुरसन उद्यानात नन्दने - नन्दन उद्यानात पुष्पभद्रके - पुष्पभद्रक उद्यानात जैत्ररथ्ये - जैत्ररथ्य उद्यानात च - आणि मानसे - मानस सरोवरात रेमे - क्रीडा करिता झाला ॥४०॥
अशा प्रकारे प्राणप्रिया देवहूतीबरोबर त्यांनी वैश्रम्भक, सुरसन, नंदन, पुष्पभद्र आणि चैत्ररथ अशा अनेक उद्यानांतून तसेच मानस सरोवरामध्ये प्रेमपूर्वक विहार केला. (४०)
भ्राजिष्णुना विमानेन कामगेन महीयसा ।
वैमानिकानत्यशेत चरन् लोकान यथानिलः ॥ ४१ ॥
इच्छानुगामि तेजाळ विमानी त्या बसोनिया । देवतांच्या पुढे गेले पाहुनी सर्व लोक ते ॥ ४१ ॥
महीयसा - अतिशय विस्तीर्ण अशा भ्राजिष्णुना - तेजस्वी अशा कामगेन - इच्छेप्रमाणे जाणार्या अशा विमानेन - विमानाने यथा - जसा अनिलः - वायु तथा - तसा लोकान् - लोकात चरन् - संचार करणारा असा सः - तो कर्दम मुनि वैमानिकान् - विमानात बसणार्या देवांना अत्यशेत - मागे टाकिता झाला ॥४१॥
त्या तेजस्वी आणि इच्छेनुसार चालणार्या श्रेष्ठ विमानात बसून वायूप्रमाणे वेगाने सर्व लोकांमध्ये भ्रमण करीत कर्दमांनी विमानविहारी देवांवरही मात केली. (४१)
किं दुरापादनं तेषां पुंसां उद्दामचेतसाम् ।
यैराश्रितस्तीर्थपदः चरणो व्यसनात्ययः ॥ ४२ ॥
भगवत्पदपद्माचा ज्या नरा आश्रयो असे । त्याला अशक्य ते काय शक्ती युक्ती हि लाभता ॥ ४२ ॥
यैः - ज्या पुरुषांनी व्यसनात्ययः - संसाराचा नाश आहे ज्यापासून अशा तीर्थपदः - श्रीहरीच्या चरणः आश्रितः - चरणाचा आश्रय केला तेषाम् - त्या उद्दामचेतसाम् - उदात्त आहे अन्तःकरण ज्यांचे अशा पुंसाम् - पुरुषांना दुरापादनम् - प्राप्त करण्यास अशक्य किम् - काय ॥४२॥
ज्यांनी भगवंतांच्या भवभयहारी पवित्र चरणांचा आश्रय घेतला आहे, त्या धीर पुरुषांना कोणती वस्तू किंवा शक्ती दुर्लभ आहे ? (४२)
प्रेक्षयित्वा भुवो गोलं पत्न्यै यावान् स्वसंस्थया ।
बह्वाश्चर्यं महायोगी स्वाश्रमाय न्यवर्तत ॥ ४३ ॥
यापरी पाहुनी विश्व द्वीपादी ते मनोरम । प्रियेच्या सह ते आले आश्रमी परतोनिया ॥ ४३ ॥
महायोगी - मोठा योगी असा सः - तो कर्दम ऋषि स्वसंस्थया - आपल्या द्वीपे खंडे इत्यादिक रचनेने पावान् - जेवढा आसीत् - होता तावन्तम् - तेवढ्या ब्रह्वाश्चर्यम् - पुष्कळ आहेत आश्चर्ये ज्यामध्ये अशा भुवः - पृथ्वीच्या गोलम् - मण्डलाला पत्न्यै - पत्नीला प्रेक्षयित्वा - दाखवून स्वाश्रमाय - आपल्या आश्रमाला न्यवर्तत - परतला ॥४३॥
अशा प्रकारे महायोगी कर्दमांनी हे सर्व भूमंडल - जे द्वीप, वर्ष इत्यादींच्या विचित्र रचनेमुळे मोठे आश्चर्यमय असे वाटत होते, ते आपल्या प्रियेला दाखवून ते आपल्या आश्रमात परतले. (४३)
विभज्य नवधाऽऽत्मानं मानवीं सुरतोत्सुकाम् ।
रामां निरमयन् रेमे वर्षपूगान् मुहूर्तवत् ॥ ४४ ॥
आपुल्या नउ रुपांना विभक्तचि करोनिया । अनंतकाळ ही त्याने भोगले रतिसौख्य ते । मुहूर्तापरितो थोडा गमला काळ अल्प की ॥ ४४ ॥
सः - तो आत्मानम् - स्वतःला नवधा - नऊ प्रकारे विभज्य - विभागून सुरतोत्सुकाम् - सुरतक्रीडेविषयी उत्सुक असलेल्या अशा मानवीम् - मनूची कन्या अशा रामाम् - स्त्रीला निरमयन् - रमविणारा असा वर्षपूगान - वर्षांच्या समूहांपर्यंत मुहूर्तवत् - दोन घटिका समजून रेमे - क्रीडा करिता झाला ॥४४॥
नंतर त्यांनी स्वतःला नऊ रूपात विभक्त करून रतिसुखासाठी अत्यंत उत्सुक अशा मनुकुमारी देवहूतीला आनंदित करीत तिच्याबरोबर पुष्कळ वर्षेपर्यंत विहार केला. परंतु एवढा दीर्घ कालावधीसुद्धा एका मुहूर्ताप्रमाणे निघून गेला. (४४)
तस्मिन् विमान उत्कृष्टां शय्यां रतिकरीं श्रिता ।
न चाबुध्यत तं कालं पत्यापीच्येन सङ्गता ॥ ४५ ॥
विमानातील ती शय्या वाढवी रतिसौख्यची । प्रियतमासवे काळ प्रियेला अल्प भासला ॥ ४५ ॥
तस्मिन् - ह्या विमाने - विमानात रतिकरीम् - प्रेमाला उत्तेजन देणार्या उत्कृष्टाम् - उत्तम अशा शय्याम् श्रिता - शय्येचा आश्रय केलेली अशी च - आणि अपीच्येन - सुंदर अशा पत्या - पतीने सङ्गता - युक्त अशी सा - ती देवहूती तम् - त्या कालम् - कालाला न अबुध्यत - न जाणती झाली ॥४५॥
त्या विमानातील रतिसुख वाढविणार्या मोठया सुंदर शय्येचा आश्रय घेऊन आपल्या परम रूपवान प्रियतमाबरोबर राहाणार्या देवहूतीला एवढा (दीर्घ) काळ कधी गेला, कळलाच नाही. (४५)
एवं योगानुभावेन दम्पत्यो रममाणयोः ।
शतं व्यतीयुः शरदः कामलालसयोर्मनाक् ॥ ४६ ॥
कामासक्त असे दोघे योगाचे बळ घेउनी । रमले शेकडो वर्षे गमला काळ अल्प तो ॥ ४६ ॥
कामलालसयोः - विषयभोगाची आहे इच्छा ज्यांना अशा एवम् - याप्रमाणे योगानुभावेन - योगाच्या सामर्थ्याने रममाणयोः - क्रीडा करणार्या अशा दम्पत्योः - पतिपत्नींचे शतम् - शंभर शरदः - वर्षे मनाक् - थोड्या कालाप्रमाणे व्यतीयुः - गेली ॥४६॥
अशा प्रकारे त्या कामासक्त दांपत्याचा तो काळ आपल्या योगबळाने शेकडो वर्षांपर्यंत विहार करीत असताना सुद्धा अगदी थोडया वेळाप्रमाणे निघून गेला. (४६)
तस्यां आधत्त रेतस्तां भावयन् आत्मनाऽऽत्मवित् ।
नोधा विधाय रूपं स्वं सर्वसङ्कल्पविद्विभुः ॥ ४७ ॥
आत्मज्ञानी मुनीं सर्व संकल्प जाणती मनी । धर्मपत्नींचिये गर्भीं झाले वीर्यास स्थापिते ॥ ४७ ॥
सर्वसंकल्पवित् - सर्व संकल्पांना जाणणारा असा विभुः - समर्थ असा आत्मवित् - आत्मज्ञानी असा सः - कर्दम ताम् - त्या देवहूतीला आत्मना - आपल्या अर्धाङ्गरूपाने भावयन् - भावना करणारा असा स्वम् - आपल्या रूपम् - स्वरूपाला नोधा - नऊ प्रकाराने विधाय - करून तस्याम् - त्या देवहूतीच्या ठिकाणी रेतः - वीर्याला आधत्त - स्थापिता झाला ॥४७॥
आत्मज्ञानी कर्दम सर्व प्रकारचे संकल्प जाणत होते. म्हणून देवहूती संतानप्राप्तीसाठी उत्सुक आहे, असे पाहून तसेच भगवंतांच्या आदेशाचे स्मरण करून त्यांनी आपल्या स्वरूपाचे नऊ विभाग केले आणि कन्यांच्या उत्पत्तीसाठी एकाग्रचित्ताने अर्धांगरूपाने आपल्या पत्नीची भावना करून तिच्या गर्भात वीर्य स्थापित केले. (४७)
अतः सा सुषुवे सद्यो देवहूतिः स्त्रियः प्रजाः ।
सर्वास्ताश्चारुसर्वाङ्ग्यो लोहितोत्पलगन्धयः ॥ ४८ ॥
गर्भे त्याच नउ कन्या जाहल्या ज्या जुळ्या अशा । सर्वांगसुंदरी गोर्या कमलापरि गंध ये ॥ ४८ ॥
अतः - यास्तव सद्यः - तत्काल सा - ती देवहूतिः - देवहूती स्त्रियः - स्त्रीरूप प्रजाः - संततीला सुषुवे - प्रसवती झाली ताः - त्या सर्वाः - सर्व चारुसर्वाङ्ग्यः - सुंदर आहेत सर्व अवयव ज्यांचे अशा लोहितोत्पलगंधयः - तांबड्या कमळाप्रमाणे आहे सुवास ज्यांचा अशा आसन् - होत्या ॥४८॥
यामुळे देवहूतीला एकाच वेळी नऊ कन्या झाल्या. त्या सर्व सर्वांगसुंदर होत्या आणि त्यांच्या शरीरातून लाल कमळाच्या सुगंधासारखा सुगंध येत होता. (४८)
पतिं सा प्रव्रजिष्यन्तं तदाऽऽलक्ष्योशती बहिः ।
स्मयमाना विक्लवेन हृदयेन विदूयता ॥ ४९ ॥ लिखन्त्यधोमुखी भूमिं पदा नखमणिश्रिया । उवाच ललितां वाचं निरुध्याश्रुकलां शनैः ॥ ५० ॥
शुद्धस्वभाव पत्नीने प्रतिज्ञा पतिचि मनी । आठवोनि वदे त्याला लाजता पाहुनी भुई ॥ ४९ ॥ उकरी अंगठ्यानेनी अश्रूस रोधुनी तदा । व्याकुळ दाह चित्तात असुनी गोड बोलली ॥ ५० ॥
सती - पतिव्रता उशती - सुंदर सा - ती देवहूती तदा - त्या वेळी प्रव्रजिष्यन्तम् - संन्यास घेणार्या अशा पतिम् - पतीला आलक्ष्य - पाहून विस्मयाना - आश्चर्यचकित झालेली विक्लवेन - व्याकुळ विदूयता - खिन्न हृदयेन - अंतःकरणाने उपलक्षिता - युक्त अशी ॥४९॥ अधोमुखी - खाली मान घातलेली अशी नखमणिश्रिया - नखरूप मण्यांची आहे शोभा ज्याला अशा पदा - चरणाने भुवम् लिखन्ती - पृथ्वीवर रेघा काढणारी अश्रुकलाम् - अश्रुबिंदूंना निरुध्य - आवरून शनैः - हळू हळू ललिताम् - मनोहर अशा वाचम् - वाणीला उवाच - बोलली ॥५०॥
यावेळी शुद्ध स्वभावाच्या सती देवहूतीने पाहिले की, अगोदर केलेल्या प्रतिज्ञेनुसार तिचे पती संन्यासाश्रम ग्रहण करून वनामध्ये जाऊ इच्छितात. तेव्हा ती आपले अश्रू आवरून धरून शिवाय हास्यवदनाने, व्याकूळ आणि संतप्त हृदयाने, हळुवारपणे, आपल्या मधुर वाणीने बोलू लागली. त्या वेळी मान खाली घालून नखरूप मणिमंडित बोटाने ती जमीन उकरीत होती. (४९-५०)
देवहूतिरुवाच -
सर्वं तद्भगवान् मह्यं उपोवाह प्रतिश्रुतम् । अथापि मे प्रपन्नाया अभयं दातुमर्हसि ॥ ५१ ॥
देवहूति म्हणाली - तुमची जाहली पूर्ण प्रतिज्ञा वदले तसी । शरणार्थी वदे मी हे अभयो मज देइजे ॥ ५१ ॥
भगवान् - ऐश्वर्यसंपन्न असे आपण मह्यम् - माझ्याकरिता प्रतिश्रुतम् - प्रतिज्ञा केलेल्या अशा तत् - त्या सर्वम् - सर्व वस्तूंना उपोवाह - संपादन करिते झाला अथ अपि - तरी सुद्धाही प्रपन्नायाः - शरण आलेल्या अशा मे - मला अभयम् - अभय दातुम् - देण्यास अर्हसि - योग्य आहेस ॥५१॥
देवहूती म्हणाली - "भगवन, आपण जी प्रतिज्ञा केली होती, ती पूर्ण केली, तरीसुद्धा मी आपल्याला शरण आले आहे, म्हणून आपण मला अभय द्यावे. (५१)
ब्रह्मन् दुहितृभिस्तुभ्यं विमृग्याः पतयः समाः ।
कश्चित्स्यान्मे विशोकाय त्वयि प्रव्रजिते वनम् ॥ ५२ ॥
वर ते नउ पुत्रिंना योग्यची शोधणे असे । भवाचे भय माझे ही हरण्या योजिण तुम्ही ॥ ५२ ॥
ब्रह्मन् - हे ब्राह्मणा तुभ्यम् - तुझ्या दुहितृभिः - कन्यानी समाः - योग्य पतयः - पति विमृग्याः - शोधावयाचे आहेत त्वयि वनं प्रवजिते - तू वनात गेला असता मे - माझ्या विशोकाय - शोकनाशार्थ ज्ञानोपदेश करण्याकरिता कश्चित् - कोणी तरी स्यात् - पाहिजेच ॥५२॥
ब्रह्मन, या कन्यांसाठी सुयोग्य वर शोधावे आणि आपण वनात गेल्यानंतर माझा जन्ममरणरूप शोक दूर करण्यासाठीसुद्धा कोणाची तरी आवश्यकता आहे. (५२)
एतावतालं कालेन व्यतिक्रान्तेन मे प्रभो ।
इन्द्रियार्थप्रसङ्गेन परित्यक्तपरात्मनः ॥ ५३ ॥
देवा विन्मुख राहोनि इंद्रीयसुख भोगिता । माझा तो सर्वची काळ व्यर्थ गेला असे पहा ॥ ५३ ॥
प्रभो - हे नाथा ! परित्यक्तपरात्मनः - सोडलेला आहे परमात्मा जिने अशा मे - माझा इंद्रियार्थप्रसङ्गेन - इंद्रियांच्या विषयांच्या संबंधाने व्यतिक्रांतेन - गेलेल्या एतावता - एवढ्या कालेन - कालाने अलम् - पुरे झाले ॥५३॥
प्रभो, आतापर्यंत परमात्म्याशी विन्मुख राहून माझा जो कालावधी इंद्रियसुख भोगण्यात व्यतीत झाला तो निरर्थक गेला. (५३)
इन्द्रियार्थेषु सज्जन्त्या प्रसङ्गस्त्वयि मे कृतः ।
अजानन्त्या परं भावं तथाप्यस्तु अभयाय मे ॥ ५४ ॥
प्रभाव तुमचा मी तो जाणिला नसता मनी । जाहले विषयासक्त कृपया भय नाशिणे ॥ ५४ ॥
इंद्रियार्थेषु - इंद्रियांच्या विषयांमध्ये सज्जन्त्या - आसक्त झालेल्या अशा परम् - सत्य अशा भावम् - स्वरूपाला अजानन्त्या - न जाणणार्या मे - माझ्याकडून त्वयि - तुझ्या ठिकाणी प्रसङ्गः - सङ्गति कृतः - केली गेली तथा अपि - तरीसुद्धा सः - तो प्रसङ्ग मे - मला अभयाय - मोक्षाकरिता अस्तु - होवो ॥५४॥
आपल्या अत्युच्च प्रभावाला न जाणल्याने मी इंद्रियांच्या विषयात आसक्त राहिले आणि आपल्यावर प्रेम केले. तथापि आपण माझे संसारभय नाहीसे करावे. (५४)
सङ्गो यः संसृतेर्हेतुः असत्सु विहितोऽधिया ।
स एव साधुषु कृतो निःसङ्गत्वाय कल्पते ॥ ५५ ॥
मूढाशी करिता संग भवाचा कारणीच तो । असंगज्ञानवंताचा भवाच्या कारणीच तो ॥ ५५ ॥
अधिया - अज्ञानाने असत्सु - दुर्जनांच्या ठिकाणी विहितः - केलेली यः - जी सङ्गः - सङ्गति संसृतेः - संसाराची हेतुः - कारण अस्ति - आहे सः एव - तीच संङ्गति साधुषु - सज्जनांच्या ठिकाणी कृतः - केलेली निःसंगत्वाय - मोक्षाकरिता कल्पते - समर्थ होते ॥५५॥
अज्ञानामुळे असत्पुरुषांशी केलेला संग संसारबंधनाला कारण होतो, तोच सत्पुरुषांशी केल्याने अनासक्ती प्राप्त करून देतो. (५५)
नेह यत्कर्म धर्माय न विरागाय कल्पते ।
न तीर्थपदसेवायै जीवन्नपि मृतो हि सः ॥ ५६ ॥
कर्माने पुरुषांच्या ज्या धर्म वैराग्य भक्ती नी । न घडे भगवत्सेवा ते जीत प्रेत मानणे ॥ ५६ ॥
इह - ह्या सृष्टीमध्ये यत्कर्म - ज्या प्राण्याचे कर्म धर्माय - धर्मप्राप्तीकरिता न कल्पते - समर्थ होत नाही विरागाय - वैराग्याकरिता न - नाही वा - किंवा तीर्थपदसेवायै - श्रीहरीच्या सेवेकरिता न - नाही हि - कारण सः - तो जीवन् अपि - जिवंत असूनही मृतः - मेलेला अस्ति - आहे ॥५६॥
संसारात ज्या कर्मामुळे धर्मसंपादन होत नाही, वैराग्य उत्पन्न होत नाही आणि भगवंतांची सेवाही होत नाही, तो मनुष्य जिवंत असूनही मेल्याप्रमाणेच होय. (५६)
साहं भगवतो नूनं वञ्चिता मायया दृढम् ।
यत्त्वां विमुक्तिदं प्राप्य न मुमुक्षेय बन्धनात् ॥ ५७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥
मायेने भगवंताच्या अशी मी ठकले पहा । असोनी मुक्त तो स्वामी न तो बंध सुटे मला ॥ ५७ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर॥ ॥ तेविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
यत् - जर विमुक्तिदम् - मुक्ती देणार्या अशा त्वाम् - तुला प्राप्य - प्राप्त होऊन बन्धनात् - संसारबंधनापासून न मुमुक्षेय - मी मुक्त होण्याची इच्छा करणार नाही तत् - तर सा अहम् - ती मी भगवतः - श्रीहरीच्या मायया - मायेने नूनम् - निश्चयाने दृढम् - पक्की वञ्चिता - फसविलेली होईन ॥५७॥
मी खरोखरच भगवंतांच्या मायेने पूर्णपणे फसले गेले. कारण आपल्यासारखा मुक्तिप्रदान करणारा पती प्राप्त होऊन सुद्धा मी संसारबंधनातून सुटण्याची इच्छा केली नाही." (५७)
स्कंध तिसरा - अध्याय तेविसावा समाप्त |