![]() |
श्रीमद् भागवत पुराण
मनुकर्दमसंवादः, कर्दमदेवहूतिविवाहः, मनोर्ब्रह्मावर्ताय प्रस्थानं च - देवहूतीबरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
मैत्रेय उवाच -
एवं आविष्कृताशेष गुणकर्मोदयो मुनिम् । सव्रीड इव तं सम्राड् उपारतमुवाच ह ॥ १ ॥
मैत्रेयजी सांगतात - ( अनुष्टुप् ) या परी गुणकर्मांना कर्दमे वर्णिता मनू । प्रश्र्न ते पुसते झाले निवृत्ति जाणुनी खरी ॥ १ ॥
एवम् - याप्रमाणे आविष्कृताशेषगुणकर्मोदयः - वर्णिला आहे सर्व गुण व कर्मे यांचा उत्कर्ष ज्याचा असा सम्राट् - सार्वभौम राजा मनु सव्रीड इव - जणू काय लज्जायुक्त अशा उपारतम् - बोलणे थांबविलेल्या अशा तम् - त्या मुनिं - कर्दम ऋषीला उवाच ह - म्हणाला ॥१॥
मैत्रेय म्हणाले - अशा प्रकारे जेव्हा कर्दमांनी मनूच्या संपूर्ण गुणांचे आणि कर्मांच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले, तेव्हा तो काहीसे संकोचून निवृत्तिपरायण मुनींना म्हणाला. (१)
मनुरुवाच -
ब्रह्मासृजत्स्वमुखतो युष्मान् आत्मपरीप्सया । छन्दोमयस्तपोविद्या योगयुक्तानलम्पटान् ॥ २ ॥ तत्त्राणायासृजत् चास्मान् दोः सहस्रात्सहस्रपात् । हृदयं तस्य हि ब्रह्म क्षत्रमङ्गं प्रचक्षते ॥ ३ ॥
मनुस्वायंभूपव म्हणाले - ब्रह्म्याने रक्षिण्या वेदा ब्राह्मणा निर्मिले मुखी । सहस्त्र चरणावाल्या विराट पुरुषा पुढे ॥ २ ॥ बाहूत क्षत्रिया जन्म द्विजांच्या रक्षणार्थची । हृदयो द्विज हे त्याचे क्षत्रीय तनुची तया ॥ ३ ॥
छन्दोमयः - वेदस्वरूप ब्रह्मा - ब्रह्मदेव आत्मपरीप्सया - आपल्या रक्षणाच्या इच्छेने स्वमुखतः - आपल्या मुखापासून तपोविद्यायोगयुक्तान् - तपश्चर्या, ज्ञान व योग यांनी युक्त अशा अलम्पटान् - निष्काम अशा युष्मान् - तुम्हा ब्राह्मणांना असृजत् - उत्पन्न करिता झाला ॥२॥ च - आणि सहस्रपात् - हजारो आहेत पाय ज्याला असा ब्रह्मदेव दोःसहस्रात् - हजारो बाहूंपासून अस्मान् - आम्हा क्षत्रियांना तत्त्राणाय - त्या ब्राह्मणांच्या संरक्षणाकरिता असृजत् - उत्पन्न करिता झाला ब्रह्म - ब्राह्मणवर्णाला तस्य - त्या ब्रह्मदेवाचे हृदयम् - हृदय क्षत्त्रम् - क्षत्रियवर्णाला अङ्गम् - शरीर प्रचक्षते - म्हणतात ॥३॥
मनू म्हणाला - वेदमूर्ती भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या वेदमय रूपाचे रक्षण करण्यासाठी तप, विद्या, आणि योगसंपन्न तसेच विषयांमध्ये अनासक्त अशा तुम्हां ब्राह्मणांना आपल्या मुखापासून प्रगट केले आहे. नंतर हजारो चरण असलेल्या त्या विराट पुरुषाने सर्वांचे रक्षण करण्यासाठीच आपल्या हजारो भुजांपासून आम्हां क्षत्रियांना उत्पन्न केले आहे. अशा प्रकारे ब्राह्मण त्यांचे हृदय आणि क्षत्रिय शरीर म्हणविले जाते. (२-३)
अतो ह्यन्योन्यमात्मानं ब्रह्म क्षत्रं च रक्षतः ।
रक्षति स्माव्ययो देवः स यः सदसदात्मकः ॥ ४ ॥
एकाचि त्या शरीराचे भाग हे वेगवेगळे । सर्वांचा रक्षिता तोची निर्विकार असोनिया ॥ ४ ॥
अतः - यास्तव ब्रह्म - ब्राह्मण च - आणि क्षत्त्रम् - क्षत्रिय आत्मानम् - शरीररूप अशा अन्योन्यम् - परस्परांनी हि - खरोखर रक्षतः - रक्षण करितात च - आणि यः - जो सदसदात्मकः - कार्यकारणरूप अस्ति - आहे सः - तो अव्ययः - निर्विकार असा देवः - देव तान् - त्या ब्राह्मणक्षत्रियांना रक्षति - रक्षितो ॥४॥
म्हणून एकाच शरीराशी संबंधित असल्याकारणाने स्वतःचे आणि एक-दुसर्याचे संरक्षण करणार्या त्या ब्राह्मण आणि क्षत्रियांचे वास्तविक श्रीहरीच रक्षण करतात. ते सर्व कार्यांचे कारणरूप असूनही वास्तविक पाहता निर्विकार आहेत. (४)
तव सन्दर्शनादेव च्छिन्ना मे सर्वसंशयाः ।
यत्स्वयं भगवान् प्रीत्या धर्ममाह रिरक्षिषोः ॥ ५ ॥
तुमच्या दर्शने सारे मिटले मम संशय । संसारी राजियां तुम्ही माझ्या रुपे प्रशंसिले ॥ ५ ॥
मे - माझे सर्व संशयाः - सर्व संशय तव - तुझ्या दर्शनात् एव - दर्शनानेच छिन्नाः - दूर झाले यत् - कारण स्वयम् - स्वतः भगवान् - श्रीविष्णु प्रीत्या - प्रेमाने रिराक्षषोः - रक्षण करण्याची इच्छा करणार्या राजाच्या धर्मम् - धर्माला आह - सांगता झाला ॥५॥
आपल्या केवळ दर्शनानेच माझे सर्व संदेह दूर झाले आहेत. कारण आपण माझ्य़ा प्रशंसेच्या निमित्ताने प्रजा पालन करण्याची इच्छा ठेवणार्या राजाच्या धर्मांचे मोठया प्रेमाने निरूपण केले आहे. (५)
दिष्ट्या मे भगवान् दृष्टो दुर्दर्शो योऽकृतात्मनाम् ।
दिष्ट्या पादरजः स्पृष्टं शीर्ष्णा मे भवतः शिवम् ॥ ६ ॥
दुर्लभो तुमची भेट श्रेष्ठ माझेचि भाग्य हे । दर्शनो जाहले आणि चरणी स्पर्श जाहला ॥ ६ ॥
यः - जो अकृतात्मनाम् - वशीकृत केले नाही चित्त ज्यांचे अशा लोकांनी दुर्दर्शः - पहाण्यास अशक्य सः - तो भगवान् - श्रीहरि मे - माझ्याकडून दिष्ट्या - सुदैवाने दृष्टः - पाहिला गेला मे - माझ्याकडून भवतः - तुझी शिवम् - पवित्र अशी पादरजः - पायधूळ शीर्ष्णा - मस्तकाने स्पृष्टं - स्पर्श केली गेली ॥६॥
ज्यांनी आपली इंद्रिये जिंकलेली नाहीत, अशांना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. माझे मोठे भाग्य की, मला आपले दर्शन झाले आणि मी आपल्या चरणांची पवित्र धूळ आपल्या मस्तकी ठेवू शकलो. (६)
दिष्ट्या त्वयानुशिष्टोऽहं कृतश्चानुग्रहो महान् ।
अपावृतैः कर्णरन्ध्रैः जुष्टा दिष्ट्योशतीर्गिरः ॥ ७ ॥
भाग्योदयेचि माझ्या या लाभले मार्गदर्शन । उजळले असे भाग्य ऐकिले कान देउनी ॥ ७ ॥
दिष्ट्या - सुदैवाने त्वया - तुझ्याकडून महान् - मोठा अनुग्रहः - अनुग्रह कृतः - केला गेला अहम् - मी अनुशिष्टः - उपदेशिलो च - आणि अपावृतैः - उघड्या असलेल्या कर्णरन्ध्रैः - कर्णच्छिद्रांनी उशतीः - मनोहर अशा गिरः - वाणी दिष्ट्या - सुदैवाने जुष्टाः - सेविल्या ॥७॥
माझा भाग्योदय झाला म्हणूनच आपण मला राजधर्माचा उपदेश देऊन माझ्यावर मोठीच कृपा केली आणि मी सुद्धा माझे प्रारब्ध उजाडल्यामुळेच आपली पवित्र वाणी एकाग्रतेने ऐकली. (७)
स भवान् दुहितृस्नेह परिक्लिष्टात्मनो मम ।
श्रोतुमर्हसि दीनस्य श्रावितं कृपया मुने ॥ ८ ॥
कन्येच्या स्नेह मोहाने चिंतीत जाहलो मनीं । दीनाची प्रार्थना ऐका कृपा करुनिया मुने ॥ ८ ॥
मुने - ऋषे सः - तो भवान् - तू दुहितृस्नेहपरिक्लिष्टात्मनः - कन्येवरील स्नेहाने खिन्न आहे मन ज्याचे अशा दीनस्य - दीन अशा मम - माझ्या श्रावितम् - विज्ञापनेला कृपया - कृपेने श्रोतुम् - श्रवण करण्याकरिता अर्हसि - योग्य आहेस ॥८॥
हे मुने, या कन्येच्या स्नेहामुळे माझे चित्त फार चिंताग्रस्त झाले आहे. म्हणून नम्र अशा माझी ही प्रार्थना आपण कृपया ऐकावी. (८)
प्रियव्रतोत्तानपदोः स्वसेयं दुहिता मम ।
अन्विच्छति पतिं युक्तं वयःशीलगुणादिभिः ॥ ९ ॥
प्रियव्रतोत्तानपाद यांची ही भगिनी असे । गुण शील अवस्थांनी युक्त ती इच्छिते पती ॥ ९ ॥
इयम् - ही प्रियव्रतोत्तानपदोः - प्रियव्रत व उत्तानपाद यांची स्वसा - बहीण मम - माझी दुहिता - कन्या वयःशीलगुणादिभिः - वय, स्वभाव, दया इत्यादी गुण यांनी युक्तम् - योग्य अशा पतिम् - पतीला अन्विच्छति - इच्छिते ॥९॥
प्रियव्रत आणि उत्तानपादाची बहीण असलेली माझी ही कन्या वय, शील, आणि गुण यांनी संपन्न असा पती मिळण्याची इच्छा करीत आहे. (९)
यदा तु भवतः शील श्रुतरूपवयोगुणान् ।
अशृणोत् नारदाद् एषा त्वय्यासीत् कृतनिश्चया ॥ १० ॥
तुमचे शील विद्या नी गुण आयु रुपासही । नारदे कथिले हीस तेंव्हा ठरविले हिने ॥ १० ॥
एषा - ही यदा - ज्या वेळी नारदात् - नारद ऋषीपासून भवत - तुझी शीलश्रुतवयोगुणान् - स्वभाव, विद्या, वय व गुण यांना अशृणोत् - श्रवण करती झाली तदा - तेव्हा तु - तर त्वयि - तुझ्या ठिकाणी कृतनिश्चया - केला आहे निश्चय जिने अशी आसीत् - झाली ॥१०॥
जेव्हा हिने नारदांच्या मुखातून आपले शील, विद्या, रूप, वय आणि गुणांचे वर्णन ऐकले, तेव्हापासूनच तिने आपल्याला पती म्हणून वरण्याचा निश्चय केला आहे. (१०)
तत्प्रतीच्छ द्विजाग्र्येमां श्रद्धयोपहृतां मया ।
सर्वात्मनानुरूपां ते गृहमेधिषु कर्मसु ॥ ११ ॥
श्रद्धेने अर्पितो विप्रा या कन्येला स्विकारणे । गृहस्थोचित कार्याला योग्य होईल सर्वची ॥ ११ ॥
तत् - त्यास्तव व्दिजाम्य - हे व्दिजश्रेष्ठा मया - मी श्रद्धया - श्रद्धेने उपहृताम् - अर्पण केलेल्या अशा गृहमेधिषु - गृहस्थाश्रमासंबंधी कर्मसु - कर्मांमध्ये सर्वात्मना - सर्वस्वी ते - तुला अनुरुपाम् - योग्य अशा इमाम् - ह्या कन्येला प्रतीच्छ - स्वीकार ॥११॥
हे द्विजवर, मी मोठया श्रद्धेने आपल्याला ही कन्या अर्पण करीत आहे, आपण हिचा स्वीकार करावा. गृहस्थाला उचित अशी सर्व कर्मे करण्यास ही सर्व दृष्टींनी आपल्याला योग्य आहे. (११)
उद्यतस्य हि कामस्य प्रतिवादो न शस्यते ।
अपि निर्मुक्तसङ्गस्य कामरक्तस्य किं पुनः ॥ १२ ॥
जाहला प्राप्त जो भोग विरक्तहि न त्यागिती । विषयासक्त जे होती त्यांचे तो पुसणे नको ॥ १२ ॥
हि - कारण निर्मुक्तसंगस्य - त्यागिला आहे सङ्ग ज्याने अशा पुरुषालादेखील उद्यतस्य - आपोआप प्राप्त झालेला कामस्य - विषयाचा प्रतिवादः - निषेध करणे न शस्यते - योग्य नाही कामरक्तस्य - विषयांमध्ये आसक्त असलेल्या मनुष्याला न शस्यते इति - योग्य नाही असे पुनः - पुनः किम् - काय वक्तव्यम् - सांगितले पाहिजे ॥१२॥
जो भोग स्वतःहून प्राप्त होईल, त्याची अवहेलना करणे विरक्त पुरुषाला सुद्धा योग्य नाही. तर मग विषयासक्ताबद्दल काय सांगावे ? (१२)
य उद्यतमनादृत्य कीनाशं अभियाचते ।
क्षीयते तद्यशः स्फीतं मानश्चावज्ञया हतः ॥ १३ ॥
स्वयंप्राप्त असे भोग त्यागुनी कृपणापुढे । जाता तै मानभंगोची यशही नष्ट होतसे ॥ १३ ॥
यः - जो उद्यतम् - आपोआप प्राप्त झालेल्या विषयाला अनादृत्य - झिडकारून कीनाशम् - कृपणाला अभियाचते - याचना करितो स्फीतम् - पसरलेले असे तद्यशः - त्याचे यश क्षीयते - नष्ट होते च - आणि मानः - मान अवज्ञया - दुसर्याच्या अपमानाने हतः - नष्ट भवति - होतो ॥१३॥
जो पुरुष स्वतः प्राप्त झालेल्या भोगाचा आदर करीत नाही आणि एखाद्या कंजुष माणसापुढे हात पसरतो, त्याचे सर्वदूर पसरलेले यशही नाहीसे होते आणि दुसर्यांनी तिरस्कार केल्याने त्याचा मानभंग होतो. (१३)
अहं त्वाश्रृणवं विद्वन् विवाहार्थं समुद्यतम् ।
अतस्त्वं उपकुर्वाणः प्रत्तां प्रतिगृहाण मे ॥ १४ ॥
विद्वाना! ऐकिले मी की विवाह इच्छिता तुम्ही । नैष्ठीक ब्रह्मचारी ना संकल्प तुमचा असे ही कन्या अर्पितो आता स्वीकार करणे हिचा ॥ १४ ॥
विव्दन् - हे ज्ञानी कर्दम मुने अहम् - मी त्वा - तुला विवाहार्थम् - विवाहाकरिता उद्यतम् - उद्युक्त झालेला असे अशृणवम् - ऐकता झालो अत - यास्तव उपकुर्वाणः - विवाहापर्यंतच ब्रह्मचर्य धारण करणारा त्वम् - तू मे - मी प्रत्ताम् - दिलेल्या कन्येला प्रतिगृहाण - घे ॥१४॥
हे विद्वन, मी असे ऐकले आहे की, आपण विवाह करण्यासाठी उत्सुक आहात. म्हणून ठराविक काळापुरते ब्रह्मचर्य पाळणार्या आपण या कन्येचा स्वीकार करावा. मी हिला आपल्याला अर्पण करीत आहे. (१४)
ऋषिरुवाच -
बाढमुद्वोढुकामोऽहं अप्रत्ता च तवात्मजा । आवयोः अनुरूपोऽसौ आद्यो वैवाहिको विधिः ॥ १५ ॥
कर्दमजी म्हणाले - विवाहेच्छूक मी आहे कुठे वाग्दान ना हिचे । श्रेष्ठ ब्राह्मविधिची तो विवाह करितो तसा ॥ १५ ॥
बाढम् - ठीक आहे उव्दोढुकामः - विवाह करण्याची इच्छा करणारा असा अहम् - मी अस्मि - आहे च - आणि तव - तुझी आत्मजा - कन्या अप्रत्ता - न दिलेली अशी अस्ति - आहे असौ - हा आद्यः - पहिला आवयोः - आमचा वैवाहिकः - विवाहसंबन्धी विधिः - विधि अनुरूपः - योग्य अस्ति - आहे ॥१५॥
कर्दम मुनी म्हणाले - ठीक आहे. विवाह करण्याची माझी इच्छा आहे आणि आपल्या कन्येचा अजून कोणाशी वाङ्निश्चय झालेला नाही. म्हणून आम्हां दोघांचा सर्वश्रेष्ठ अशा ब्राह्म-विधीने विवाह होणे उचित ठरेल. (१५)
कामः स भूयान् नरदेव तेऽस्याः
पुत्र्याः समाम्नायविधौ प्रतीतः । क एव ते तनयां नाद्रियेत स्वयैव कान्त्या क्षिपतीमिव श्रियम् ॥ १६ ॥
( इंद्रवज्रा ) वेदोक्त लग्नोचि विधी प्रसिद्ध तेणेचि संबंध सुखास जाई । रुपा धनाला तिटकारते ही ऐशा मुलीला मग कोण त्यागी ॥ १६ ॥
नरदेव - हे राजा समाम्नायविधौ - वेदांतील विधींमध्ये प्रतीतः - प्रसिद्ध असा सः - तो विवाहविधी भूयात् - व्हावा इति - अशी ते - तुझ्या अस्याः - ह्या पुत्र्याः - कन्येची कामः - इच्छा अस्ति - आहे स्वया - आपल्या अङ्गकान्त्या - शरीरकान्तीने श्रियम् एव - अलंकारांच्या शोभेलाच क्षिपन्तीम् - दूर करणार्या अशा ते - तुझ्या तनयाम् - कन्येचा कः एव - कोणता पुरुष न आद्रियेत - आदर करणार नाही ॥१६॥
हे राजन, तुझ्या या मुलीचा वेदोक्त विवाह-विधीमध्ये प्रसिद्ध असलेला संतान-उत्पादनरूप मनोरथ पूर्ण होईल. जी आपल्या अंगकांतीने शोभा देणार्या अलंकारांनाही तुच्छ करीत आहे, अशा आपल्या कन्येचा कोण आदर करणार नाही ? (१६)
यां हर्म्यपृष्ठे क्वणदङ्घ्रिशोभां
विक्रीडतीं कन्दुकविह्वलाक्षीम् । विश्वावसुर्न्यपतत् स्वात् विमानात् विलोक्य सम्मोहविमूढचेताः ॥ १७ ॥
ही एकदा खेळत चेंडु होती स्वमंदिराच्याच छतावरी नी । चेंडूसवे ती पळता तदा तै झंकारले पैंजण पायि छान ॥ ती चंचला दृष्टि बघोनि झाला गंधर्व मूर्छीत विश्वावसू तो । विमान भागी बसला असूनी सवेचि आला पडता भुईला ॥ १७ ॥
विश्वावसुः - विश्वावसुगंधर्व हर्म्यपृष्ठे - राजवाड्याच्या गच्चीवर विक्रीडतीम् - खेळणार्या अशा क्वणदङ्घ्रिशोभाम् - शब्द करणार्या पायांमुळे आहे शोभा जिची अशा कन्दुकविह्वलाक्षीम् - चेंडूमुळे चंचल झाले आहेत डोळे जिचे अशा याम् - जिला विलोक्य - पाहून संमोहविमूढचेताः - मोहाने व्याकुल झालेले आहे चित्त ज्याचे असा स्वात् - आपल्या विमानात् - विमानातून न्यपतत् - पडला ॥१७॥
ही कन्या एक दिवस आपल्या महालाच्या गच्चीवर चेंडू खेळत होती. चेंडूच्या मागे मागे पळताना हिचे डोळे चंचल होत होते आणि पायांतील नूपुर मधुर झंकार करीत होते. त्यावेळी हिला पाहून विश्वावसू गंधर्व मोहाने बेशुद्ध होऊन आपल्या विमानातून खाली पडला होता. (१७)
तां प्रार्थयन्तीं ललनाललामं
असेवितश्रीचरणैरदृष्टाम् । वत्सां मनोरुच्चपदः स्वसारं को नानुमन्येत बुधोऽभियाताम् ॥ १८ ॥
आली स्वये तीच वरावयाला ऐशा मुलीला मग कोण त्यागी । ज्यांनी कधी लक्ष्मि न पूजियेली त्यांना हिचे दर्शन होय कैसे ॥ १८ ॥
ललनाललामम् - स्त्रियांना भूषणभूत अशा प्रार्थयन्तीम् - प्रार्थना करणार्या अशा असेवितश्रीचरणैः - सेविलेले नाहीत लक्ष्मीचे चरण ज्यांनी अशा लोकांनी अदृष्टाम् - न पाहिलेल्या अशा मनोः - मनूच्या वत्साम् - कन्या अशा उच्चपदः - उत्तानपदाच्या स्वसारम् - बहीण अशा अभियाताम् - स्वतः प्राप्त झालेल्या ताम् - तिला कः - कोणता बुधः - सुज्ञ पुरुष न अनुमन्येत - स्वीकारणार नाही ॥१८॥
तीच यावेळी येथे स्वतः येऊन विनंती करीत आहे, अशा स्थितीत कोणता शहाणा पुरुष हिचा स्वीकार करणार नाही ? ही तर साक्षात महाराज श्रीस्वायंभुव मनूची कन्या आणि उत्तानपादाची प्रिय बहीण आहे. तसेच सुंदर स्त्रियांमध्ये ही रत्न आहे. ज्यांनी कधी श्रीलक्ष्मीच्या चरणांची उपासना केलेली नाही, त्यांना तर हिचे दर्शन सुद्धा होऊ शकणार नाही. (१८)
अतो भजिष्ये समयेन साध्वीं
यावत्तेजो बिभृयाद् आत्मनो मे । अतो धर्मान् पारमहंस्यमुख्यान् शुक्लप्रोक्तान् बहु मन्येऽविहिंस्रान् ॥ १९ ॥
या साध्विचा मी करतो स्विकार माझ्या पणाला परि ऐकणे ते । संतान होता यतिवृत्ति इच्छी शमा-दमादीत रमून जाण्या ॥ १९ ॥
अतः - यास्तव मे - माझ्या आत्मनः - देहापासून तेजः - गर्भाला बिभृयात् यावत् - धारण करी पर्यंत समयेन - अशा अटीवर साध्वीम् - साध्वीला भजिष्ये - सेवीन अतः - यापुढे शुक्लप्रोक्तान् - शुक्लस्वरूपी भगवन्ताने सांगितलेल्या पारमहंस्यमुख्यान् - ज्ञानसंपादनाविषयी मुख्य अशा अविहिंस्त्रान् - हिंसारहित अशा धर्मान् - धर्मांना बहु - विशेष असे मन्ये - मानितो ॥१९॥
म्हणून मी या आपल्या साध्वी कन्येचा अवश्य स्वीकार करीन, परंतु एका अटीवर. जोपर्यंत हिला संतान होणार नाही, तोपर्यंत गृहस्थधर्मानुसार मी हिच्यासमवेत राहीन. त्यानंतर(मात्र) भगवंतांनी सांगितलेल्या संन्यासप्रधान, हिंसारहित, शम-दमादी धर्मांना प्राधान्य देईन. (१९)
यतोऽभवद्विश्वमिदं विचित्रं
संस्थास्यते यत्र च वावतिष्ठते । प्रजापतीनां पतिरेष मह्यं परं प्रमाणं भगवान् अनन्तः ॥ २० ॥
ज्याने अशी सुंदर सृष्टि केली ज्याच्यात होणे लय सृष्टिचाही । ज्याच्याऽश्रयाने तशि सृष्टि सारी अनंत तो मान्य मला सदाचा ॥ २० ॥
यतः - ज्या परमेश्वरापासून इदम् - हे विचित्रम् - अनेक चमत्कारांनी भरलेले विश्वम् - विश्व अभवत् - उत्पन्न झाले वा - अथवा यत्र - जेथे संस्थास्यते - लय पावेल च - आणि अवतिष्ठते - रहाते एषः - हा प्रजापतीनाम् - प्रजापतीचा पतिः - स्वामी भगवान् - भगवान अनंतः - श्रीविष्णु मह्यम् - मला वै - खरोखर परम् - श्रेष्ठ प्रमाणम् - प्रमाण अस्ति - आहे ॥२०॥
ज्यांच्यापासून या वैचित्र्यपूर्ण जगाची उत्पत्ती झाली आहे, ज्यांच्यामध्ये हे लीन होते आणि ज्यांच्या आश्रयाने हे स्थित आहे, ते प्रजापतींचेही पती असलेले भगवान श्री अनंत मला श्रेष्ठ प्रमाण आहेत. (२०)
मैत्रेय उवाच -
स उग्रधन्वन् नियदेवाबभाषे आसीच्च तूष्णीं अरविन्दनाभम् । धियोपगृह्णन् स्मितशोभितेन मुखेन चेतो लुलुभे देवहूत्याः ॥ २१ ॥
मैत्रेयजी सांगतात - बोलोनि ऐसे मग मौन घेई ध्यानी निमाला मग कर्दमो तो । मंदस्मिता त्या बघुनी त्या बघुनी तदाच ती देवहूती मनि लुब्ध झाली ॥ २१ ॥
उग्रधन्वन् - उग्र आहे धनुष्य ज्याचे अशा हे विदुरा सः - तो कर्दम ऋषि इयत् एव - एवढेच आबभाषे - बोलला धिया - बुद्धीने अरविन्दनाभम् - विष्णूचे उपगृह्णन् - ध्यान करणारा असा तूष्णीम् - स्तब्ध असीत् - झाला च - आणि स्मितशोभितेन - हास्याच्या शोभेने युक्त अशा मुखेन - मुखाने देवहूत्याः - देवहूतीच्या चेतः - चित्ताला लुलुभे - लोभविता झाला ॥२१॥
मैत्रेय म्हणाले - धनुर्धर विदुरा, कर्दम मुनी केवळ एवढेच बोलू शकले. नंतर ते हृदयात भगवान कमलनाभांचे ध्यान करीत स्तब्ध झाले. त्यावेळी त्यांच्या मंद हास्ययुक्त मुखकमलाला पाहून देवहूतीचे चित्त त्यांच्यावर लुब्ध झाले. (२१)
(अनुष्टुप्)
सोऽनु ज्ञात्वा व्यवसितं महिष्या दुहितुः स्फुटम् । तस्मै गुणगणाढ्याय ददौ तुल्यां प्रहर्षितः ॥ २२ ॥
( अनुष्टुप् ) राजाने जाणिले चित्ती मुलीची संमती असे । अर्पिली कर्दमाला ती गुणसंपन्न पुत्रि की ॥ २२ ॥
प्रहर्षितः - आनन्दित झालेला सः - तो मनु महिष्याः - राणीच्या च - आणि दुहितुः - कन्येच्या व्यवसितम् - निश्चयाला स्फुटम् - स्पष्ट ज्ञात्वा - जाणून अनु - नंतर गुणगणाढ्याय - पुष्कळ गुणांनी युक्त अशा तस्मै - त्या कर्दम ऋषीला तुल्याम् - योग्य अशा ताम् - त्या देवहूतीला ददौ - देता झाला ॥२२॥
मनूने महाराणी शतरूपा आणि राजकुमारीची स्पष्ट अनुमती जाणून अनेक गुणांनी संपन्न असलेल्या कर्दमांना त्यांच्याचसारखी गुणवती कन्या आनंदाने प्रदान केली. (२२)
शतरूपा महाराज्ञी पारिबर्हान् महाधनान् ।
दम्पत्योः पर्यदात् प्रीत्या भूषावासः परिच्छदान् ॥ २३ ॥
माता त्या शतरुपाने उच्चवस्त्रादि भूषणे । गृहोपयोगि त्या वस्तू आंदनार्थचि त्या दिल्या ॥ २३ ॥
महाराज्ञी - महाराणी अशा शतरूपा - शतरूपा प्रीत्या - प्रीतीने दम्पत्योः - जोडप्याला पारिबर्हान् - आंदणरूप महाधनान् - मोठे आहे मूल्य ज्यांचे अशा भूषावासःपरिच्छदान् - अलंकार, वस्त्रे व संसाराचे साहित्य यांना पर्यदात् - देती झाली ॥२३॥
यावेळी महाराणी शतरूपाने सुद्धा कन्या आणि जावई यांना मोठया प्रेमाने पुष्कळशी बहुमोल वस्त्रे, अलंकार आणि गृहस्थाश्रमाला उचित असे साहित्य दिले. (२३)
प्रत्तां दुहितरं सम्राट् सदृक्षाय गतव्यथः ।
उपगुह्य च बाहुभ्यां औत्कण्ठ्योन्मथिताशयः ॥ २४ ॥ अशक्नुवन् तद्विरहं मुञ्चन् बाष्पकलां मुहुः । आसिञ्चद् अम्ब वत्सेति नेत्रोदैर्दुहितुः शिखाः ॥ २५ ॥
निश्र्चिंत जाहला राजा गुणी जामात गाठुनी । निघता तेथुनी त्याचे विव्हल चित्त जाहले ॥ २४ ॥ छातीसी तीस घेऊनी पुत्री पुत्रीच बोलता । रडला ढाळिता अश्रु भिजले केस पुत्रिचे ॥ २५ ॥
सम्राट् - सार्वभौम राजा मनु सदृक्षाय - योग्य अशा वराला प्रत्ताम् - दिलेल्या दुहितरम् - कन्येला बाहुभ्याम् - बाहूंनी उपगुह्य - आलिङ्गन देऊन गतव्यथः - गेली आहे व्यथा ज्याची असा तव्दिरहम् - तिच्या विरहाला सोढुम् - सहन करण्यास अशक्नुवन् - न शकणारा असा औत्कण्ठयोन्मथिताशयः - उत्कण्ठेने व्याकुळ झाले आहे अन्तःकरण ज्याचे असा मुहुः - वारंवार बाष्पकलाम् - अश्रूंना मुञ्चन् - सोडणारा अम्ब वत्स इति - हे मुली, हे लाडके पुत्री, असे वदन् - बोलणारा नेत्रोदैः - नेत्रांतील उदकांनी दुहितुः - कन्येच्या शिखाः - केसांना आसिञ्चत् - भिजविता झाला ॥२४-२५॥
अशा प्रकारे सुयोग्य वराला आपली कन्या देऊन महाराज मनू निश्चिंत झाला. निरोप घेताना तिचा वियोग सहन न होऊन उत्कंठेने चित्त व्याकूळ झाल्यामुळे तिला छातीशी कवटाळून "मुली, बाळे," म्हणत तो रडू लागला. तेव्हा त्याच्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्या अश्रूंनी त्याने देवहूतीची सारी वेणी भिजवली. (२४-२५)
आमन्त्र्य तं मुनिवं अमनुज्ञातः सहानुगः ।
प्रतस्थे रथमारुह्य सभार्यः स्वपुरं नृपः ॥ २६ ॥ उभयोः ऋषिकुल्यायाः सरस्वत्याः सुरोधसोः । ऋषीणां उपशान्तानां पश्यन् आश्रमसम्पदः ॥ २७ ॥
कर्दमास पुसोनिया आज्ञा घेवोनि ते पुन्हा । राणी सवे रथामध्ये बसोनी चालले पुढे ॥ २६ ॥ सरस्वती तिरानेच सेवकासह पातता । आश्रमा पाहता कैक राजधानिस पातले ॥ २७ ॥
नृपः - राजा मनु मुनिवरम् - मुनिश्रेष्ठ कर्दमाला आमन्त्र्य - विचारून अनुज्ञातः - अनुज्ञा दिलेला असा सहानुगः - सेवकांसहित सभार्यः - भार्येसह रथम् - रथावर आरुह्य - चढून स्वपुरम् - आपल्या नगरीला प्रतस्थे - प्रयाण करिता झाला ॥२६॥ ऋषिकुल्यायाः - ऋषिकुलाला हितकारक अशा सरस्वत्याः - सरस्वतीच्या उभयोः - दोन्ही सुरोधसोः - सुंदर तीरांवर उपशान्तानाम् - अत्यन्त शान्त अशा ऋषीणाम् - ऋषींच्या आश्रमसंपदः - आश्रमसंपत्तीना पश्यन् - पहात सः ययौ - तो जाता झाला ॥२७॥
नंतर कर्दमांचा निरोप घेऊन त्यांच्या अनुमतीने तो राणी व परिवारासह रथावर बसून ऋषिकुलांनी सेवन केलेल्या सरस्वती नदीच्या दोन्ही तीरांवरील शांत मुनींच्या आश्रमांची शोभा पाहात आपल्या राजधानीला परतला. (२६-२७)
तं आयान्तं अभिप्रेत्य ब्रह्मावर्तात्प्रजाः पतिम् ।
गीतसंस्तुतिवादित्रैः प्रत्युदीयुः प्रहर्षिताः ॥ २८ ॥
ब्रह्मवर्तात लोकांना कळले स्वामि येतसे आनंदे स्तुति गावोनि वाजंत्री लाविले तये । स्वागतार्थ पुरातून प्रजा सर्वचि पातली ॥ २८ ॥
प्रजाः - लोक आयान्तम् - येणार्या तम् - त्या पतिम् - राजा मनूला अभिप्रेत्य - जाणून प्रहर्षिताः - आनन्दित झालेले असे गीतसंस्तुतिवादित्रैः - गायन, स्तुति व वाद्ये यांसह ब्रह्मावर्तात् - ब्रह्मावर्तनामक देशाहून प्रत्युदीयुः - सामोरे गेले ॥२८॥
आपले महाराज येत आहेत, हे जाणून ब्रह्मावर्तातील प्रजा अत्यंत आनंदित होऊन, स्तुती, गाणी आणि मंगल-वाद्यांसह स्वागत करण्यासाठी सामोरी आली. (२८)
बर्हिष्मती नाम पुरी सर्वसंपत् समन्विता ।
न्यपतन्यत्र रोमाणि यज्ञस्याङ्गं विधुन्वतः ॥ २९ ॥
नामे बर्हिष्मतीपूर संपदायुक्त ते असे । वराहे झट्किता केस होते ते पडले इथे ॥ २९ ॥
तत्र - त्या देशामध्ये सर्वसंपत्समन्विता - सर्व संपत्तींनी युक्त अशी बर्हिष्मती नाम - बर्हिष्मतीनामक पुरी - नगरी आसीत् - होती यत्र - जीमध्ये अङ्गम् - शरीराला विधुन्वतः - कापविणार्या अशा यज्ञस्य - यज्ञवराहाचे रोमाणि - केस न्यपतन् - पडले ॥२९॥
सर्व वैभवाने संपन्न असणारी बर्हिष्मती नगरी मनूची राजधानी होती. पृथ्वीला रसातळातून वर आणल्यानंतर तेथे अंग झाडताना श्रीवराह भगवानांचे केस गळून पडले होते. (२९)
कुशाः काशास्त एवासन् शश्वद्धरितवर्चसः ।
ऋषयो यैः पराभाव्य यज्ञघ्नान् यज्ञमीजिरे ॥ ३० ॥
ते केश हिरवे झाले कुश-काश वनस्पती । त्या द्वारे ऋषिने दैत्या द्वेषुनी यज्ञ योजिले ॥ ३० ॥
ते एव - ते केसच शश्वत् - निरंतर हरितवर्चसः - हिरवा आहे वर्ण ज्यांचा असे कुशाः - दर्भ काशाः - मोळ आसन् - उत्पन्न झाले ऋषयः - ऋषि यैः - ज्या दर्भाच्या योगाने यज्ञघ्रान् - यज्ञनाश करणार्या राक्षसांना पराभाव्य - पराभूत करून यज्ञम् - यज्ञाला ईजिरे - पूजिते झाले ॥३०॥
तेच केस नंतर नेहमी हिरवेगार असणारे दर्भ आणि लव्हाळे झाले. त्यांच्याद्वारा मुनींनी यज्ञात विघ्न उत्पन्न करणार्या दैत्यांचा पराभव करून यज्ञ केले. (३०)
कुशकाशमयं बर्हिः आस्तीर्य भगवान् मनुः ।
अयजद् यज्ञपुरुषं लब्धा स्थानं यतो भुवम् ॥ ३१ ॥
वराहभगवान् रुप त्यागिता देह भूवरी । मनूने कुश-काशाच्या आसनी पूजिले तया ॥ ३१ ॥
भगवान् - ऐश्वर्यसंपन्न असा मनुः - मनु यतः - ज्या यज्ञवराहापासून भुवम् - पृथ्वीरूप स्थानम् - स्थानाला लब्ध्वा - मिळवून तम् - त्या यज्ञपुरुषम् - यज्ञपुरुषाला कुशकाशमयम् - कुशस्वरूप व काशस्वरूप बर्हिः - दर्भ आस्तीर्य - पसरून अयजत् - यज्ञ करिता झाला ॥३१॥
ज्यांच्याकडून भूमीरूप निवासस्थान प्राप्त झाले, त्या श्रीयज्ञभगवानांसाठी महाराज मनूने याच ठिकाणी दर्भ आणि लव्हाळे यांचे आसन आंथरून यज्ञ केले होते. (३१)
बर्हिष्मतीं नाम विभुः यां निर्विश्य समावसत् ।
तस्यां प्रविष्टो भवनं तापत्रयविनाशनम् ॥ ३२ ॥
बर्हिष्मति पुरामध्ये राजाची राजधानी ती । त्रितापनाशको ऐशा भवनी मनु पातले ॥ ३२ ॥
विभुः - समर्थ असा मनु बर्हिष्मतीम् नाम - बर्हिष्मतीनामक याम् - ज्या पुरीत समावसत् - रहात होता त्स्याम् - त्या नगरीमध्ये निर्विश्य - प्रवेश करून तापत्रयविनाशम् - तिन्ही तापांचा नाश करणार्या अशा भवनम् - गृहात प्रविष्टः - शिरला ॥३२॥
ज्या बर्हिष्मतीपुरीत मनू निवास करीत होता तेथे जाऊन त्याने आध्यात्मिक, आधिदैविक, व आधिभौतिक ताप नाहीसे करणार्या राजभवनामध्ये प्रवेश केला. (३२)
सभार्यः सप्रजः कामान् बुभुजेऽन्याविरोधतः ।
सङ्गीयमानसत्कीर्तिः सस्त्रीभिः सुरगायकैः । प्रत्यूषेष्वनुबद्धेन हृदा श्रृण्वन् हरेः कथाः ॥ ३३ ॥
चौपुरुषार्थ ते भोग पत्नी संतान या सवे । भोगी, ते गुण गंधर्व पातःकाळीच वर्णिती ॥ ३३ ॥
सभार्यः - पत्नीसहित सप्रजः - लोकांसहित प्रत्यूषेषु - प्रातःकाळी सस्त्रीभिः - स्त्रियांसहित सुरगायकैः - देवांचे गायक जे गंधर्व त्यांनी संगीयमानसत्कीर्तिः - गायिली जात आहे पवित्र कीर्ति ज्याची असा अनुबद्धेन - एकाग्र झालेल्या अशा हृदा - अन्तःकरणाने हरेः - श्रीहरीच्या कथाः - कथा श्रृण्वन् - ऐकणारा असा सः - तो मनु अन्याविरोधितः - धर्म आणि अर्थ या दुसर्या पुरुषार्थांना विरोध न करिता कामान् - विषयसेवनरूप पुरुषार्थाला बुभुजे - भोगिता झाला ॥३३॥
तेथे आपली पत्नी आणि संततीसह तो धर्म, अर्थ आणि मोक्षाला अनुसरून असणारे भोग भोगू लागला. तेथे प्रातःकाळी गंधर्व आपल्या पत्नींसह त्याचे गुणगान करीत; परंतु मनू मात्र त्यात आसक्त न होता प्रेमपूर्ण हृदयाने श्रीहरींच्या कथा ऐकत असे. (३३)
निष्णातं योगमायासु मुनिं स्वायम्भुवं मनुम् ।
यदाभ्रंशयितुं भोगा न शेकुर्भगवत्परम् ॥ ३४ ॥
न राही मनु गुंतोनी ऐके श्री हरिच्या कथा । इच्छेनुसार भोगांना भोगण्या कुशलोचि तो ॥ परी श्रीहरीच्या ध्याने भोगीं ना गुंजला कधी ॥ ३४ ॥
यत् - कारण भोगाः - विषय भगवत्परम् - श्रीहरीच आहे श्रेष्ठ ज्याला अशा योगमायासु - योगमायेमध्ये निष्णातम् - कुशल अशा मुनिम् - ऋषिरूप अशा स्वायम्भुवं मनुम् - स्वायंभुव मनूला आभ्रंशयितुम् - भ्रष्ट करण्याकरिता
मनू आपल्या इच्छेनुसार भोग निर्माण करण्यात कुशल असूनही मननशील आणि भगवत्परायण असलेल्या त्याला भोग जराही विचलित करू शकत नव्हते. (३४)
अयातयामाः तस्यासन् यामाः स्वान्तरयापनाः ।
श्रृण्वतो ध्यायतो विष्णोः कुर्वतो ब्रुवतः कथाः ॥ ३५ ॥
भगवान् विष्णुची कीर्ती ऐकोनी ध्यानही करी । रची नी ऐकवी लोकां त्या मुळे क्षण व्यर्थ ना ॥ ३५ ॥
अतः - यास्तव विष्णोः - श्रीविष्णूच्या कथाः - कथा कुर्वतः - रचणार्या ब्रुवतः - बोलणार्या शृण्वतः - श्रवण करणार्या ध्यायतः - ध्यान करणार्या तस्य - मनुराजाचे स्वान्तरयापनाः - मन्वन्तराला घालविणारे असे यामाः - प्रहर अयातयामाः - गेला नाही रस ज्यातील असे आसन् - झाले ॥३५॥
भगवान विष्णूंच्या कथांचे श्रवण, ध्यान, रचना आणि निरूपण करीत राहिल्याकारणाने त्याचे मन्वन्तर व्यतीत होत असतानाचे क्षण कधीच वाया जात नव्हते. (३५)
स एवं स्वान्तरं निन्ये युगानां एकसप्ततिम् ।
वासुदेवप्रसङ्गेन परिभूतगतित्रयः ॥ ३६ ॥
तिन्हीही त्या अवस्थेत ध्याता श्रीभगवान् मनी । एक्काहत्तर चौगूणे युग ते पूर्ण जाहले ॥ ३६ ॥
सः - तो मनु एवम् - याप्रमाणे वासुदेवप्रसङ्गेन - श्रीहरीवरील निष्ठेने परिभूतगतित्रयः - जिंकिल्या आहेत जाग्रत, स्वप्न व सुषुप्ति त्या तीन अवस्था ज्याने असा युगानाम् एकसप्ततिम् - एकाहत्तर महायुगांच्या अवधीचे स्वान्तरम् - मन्वन्तर निन्ये - घालविता झाला ॥३६॥
अशा प्रकारे आपल्या जागृती आदी तीन अवस्था किंवा तीन गुणांचा पराभव करून त्याने भगवान वासुदेवांच्या कथाप्रसंगांमध्ये आपल्या मन्वन्तराची एकाहत्तर चतुर्युगे घालविली. (३६)
शारीरा मानसा दिव्या वैयासे ये च मानुषाः ।
भौतिकाश्च कथं क्लेशा बाधन्ते हरिसंश्रयम् ॥ ३७ ॥
शरीर मन दैवाचे मानुषी भौतिकी असे । दुःख ना त्रासिती त्याला ज्याला आश्रय श्रीहरी ॥ ३७ ॥
वैयासे - हे व्यासपुत्रा विदुरा शारीराः - शरीरात उत्पन्न होणारे मानसाः - अन्तःकरणात उत्पन्न होणारे दिव्याः - आकाशात उत्पन्न होणारे च - आणि ये - जे मानुषाः - मनुष्यांपासून उत्पन्न होणारे च - आणि भौतिकाः - भूतांपासून उत्पन्न होणारे संति - आहेत ते - ते क्लेशाः - क्लेश हरिसंश्रयम् - श्रीहरि आहे आश्रय ज्याचा अशा प्राण्याला कथम् - कसे बाधन्ते - बाधा करतील ॥३७॥
व्यासपुत्र विदुरा, जो पुरुष श्रीहरींच्या आश्रयाने राहतो त्याला शारीरिक, मानसिक, दैविक, मानवी किंवा भौतिक दुःखे कशी त्रास देणार ? (३७)
यः पृष्टो मुनिभिः प्राह धर्मान् नानाविधान् शुभान् ।
नृणां वर्णाश्रमाणां च सर्वभूतहितः सदा ॥ ३८ ॥
समस्त हित प्राण्याचे मनूने पाहिले सदा । मुनींनी पुसता त्यांना मनुष्यांचे समस्त ते ॥ वर्ण आश्रमिचे धर्म सुमंगलचि वर्णिले ॥ ३८ ॥
सदा - निरंतर सर्वभूतहितः - सर्व प्राण्यांचे हित करणारा असा यः - जो मनु मुनिभिः - ऋषींनी पृष्टः - प्रश्न केलेला असा नृणाम् - मनुष्यांचे च - आणि वर्णाश्रमाणाम् - वर्ण व आश्रम यांचे नानाविधान् - अनेक प्रकारच्या शुभान् - कल्याणकारण अशा धर्मान् - धर्मांना आह - सांगता झाला ॥३८॥
मनू नेहमी सर्व प्राण्यांचे हित करण्यात व्यग्र असे. मुनींनी विचारल्यानंतर त्याने माणसांच्या वर्णाश्रमांचे अनेक प्रकारचे कल्याणकारक धर्म वर्णन केले आहेत. (ते ‘मनुस्मृती ’म्हणून आजही उपलब्ध आहेत.) (३८)
एतत्ते आदिराजस्य मनोश्चरितमद्भुतम् ।
वर्णितं वर्णनीयस्य तदपत्योदयं श्रृणु ॥ ३९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥
जगाचा आदिराजा तो युक्त कीर्तनी गायनी । चरित्र वर्णिले त्याचे कन्येची ऐकणे कथा ॥ ३९ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ ॥ बाविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २२ ॥ हरि ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
एतत् - हे वर्णनीयस्य - स्तुत्य असा आदिराजस्य - पहिला राजा मनोः - मनु त्याचे अद्भुतम् - आश्चर्यकारक असे चरितम् - चरित्र ते - तुला वर्णितम् - वर्णन केले अतः पर - यापुढे तदपत्योदयं - त्याच्या अपत्यांचा उत्कर्ष शृणु - श्रवण कर ॥३९॥
जगातील सर्वप्रथम सम्राट महाराज मनूच्या वर्णन करण्यास योग्य अशा अद्भुत चरित्राचे मी वर्णन केले. आता त्याच्या कन्येचा प्रभाव ऐक. (३९)
स्कंध तिसरा - अध्याय बाविसावा समाप्त |