![]()  | 
|  
 
श्रीमद् भागवत पुराण  
मनवंशवर्णनं प्रस्तुत्य कर्दमतपस्या, भगवद् वरप्रदानम्,  कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
विदुर उवाच - 
स्वायम्भुवस्य च मनोः अंशः परमसम्मतः । कथ्यतां भगवन्यत्र मैथुनेनैधिरे प्रजाः ॥ १ ॥ 
विदूरजींनी विचारिले -  ( अनुष्टुप् ) स्वायंभूव मनू वंश श्रेष्ठ तो भगवन् जगी । त्यांनी मैथून धर्माने निर्मिली ती प्रजा कशी ॥ १ ॥ 
 भगवन् -  हे मैत्रेया  च -  आणि  स्वायम्भुवस्य मनोः -  स्वायंभुव मनूचा  परमसंमतः -  अत्यन्त मान्य  वंशः -  वंश  कथ्थताम् -  सांगावा  यत्र -  ज्या वंशामध्ये  मैथुनेन -  मैथुनाने  प्रजाः -  प्रजा  एधिरे -  वाढू लागल्या ॥१॥  
 
विदुराने विचारले - "भगवन, स्वायंभुव मनूचा वंश मोठा आदरणीय मानला गेला आहे. त्यात मैथुनधर्माने प्रजेची वृद्धी झाली होती. आता आपण मला त्याची कथा ऐकवावी. (१) 
 
प्रियव्रतोत्तानपादौ सुतौ स्वायम्भुवस्य वै । 
यथाधर्मं जुगुपतुः सप्तद्वीपवतीं महीम् ॥ २ ॥ 
प्रियव्रतोत्तानपाद मुले स्वायंभुवास जे ।  सप्तद्वीप धरा त्यांनी धर्माने पाळिली सुखे ॥ २ ॥ 
 स्वायम्भुवस्य -  स्वायंभुव मनूचे  सुतौ -  पुत्र  प्रियव्रतोत्तानपादौ -  प्रियव्रत व उत्तानपाद  सप्तव्दीपवतीम् -  सात व्दीपांनी युक्त अशा  महीम् -  पृथ्वीला  यथाधर्मम् -  धर्मानुसार  वै -  खरोखर  जुगुपतुः -  रक्षिते झाले ॥२॥  
 
ब्रह्मन, आपण म्हणाला होतात की, स्वायंभुव मनूचे पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद यांनी सात द्वीपांनी वेढलेल्या पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन केले होते; (२) 
 
तस्य वै दुहिता ब्रह्मन् देवहूतीति विश्रुता । 
पत्नी प्रजापतेरुक्ता कर्दमस्य त्वयानघ ॥ ३ ॥ 
देवहूती तयां पुत्री नामे विख्यात जी जगी ।  तिने तो वरिला राजा प्रजापतिच कर्दम ॥ ३ ॥ 
 अनघ -  हे निष्पाप  ब्रह्मन् -  मैत्रेया  देवहूती -  देवहूती  इति -  या नावाने  विश्रुता -  प्रसिद्ध  तस्य -  त्या मनूची  दुहिता -  कन्या  कर्दमस्य -  कर्दम  प्रजापतेः -  प्रजापतीची  पत्नी -  स्त्री  वै -  खरोखर  त्वया -  तू  उक्ता -  सांगितली ॥३॥  
 
आणि त्यांची देवहूती नावाची कन्या हिचा कर्दमप्रजापतींशी विवाह झाला होता. (३) 
 
तस्यां स वै महायोगी युक्तायां योगलक्षणैः । 
ससर्ज कतिधा वीर्यं तन्मे शुश्रूषवे वद ॥ ४ ॥ 
होती ती योगसंपन्न महायोगीहि कर्दम ।  किती संतान त्यां झाले इच्छा खूपचि ऐकण्या ॥ ४ ॥ 
 महायोगी -  मोठा योगी  सः -  तो कर्दम ऋषि  योगलक्षणैः -  योगाच्या लक्षणांनी  युक्तायाम् -  युक्त अशा  तस्याम् -  त्या देवहूतीच्या ठिकाणी  वीर्यम् -  वीर्याला  कतिधा -  किती प्रकाराने  वै -  खरोखर  ससर्ज -  उत्पन्न करिता झाला  तत् -  ते  शुश्रूषवे -  श्रवणेच्छु अशा  मे -  मला  वद -  सांगा ॥४॥  
 
यम इत्यादी योगाच्या लक्षणांनी देवहूती संपन्न होती. तिच्यापासून महायोगी कर्दमांना किती संताने झाली ? तो सर्व प्रसंग आपण मला सांगावा. मला तो ऐकण्याची खूप इच्छा आहे. (४) 
 
रुचिर्यो भगवान् ब्रह्मन् दक्षो वा ब्रह्मणः सुतः । 
यथा ससर्ज भूतानि लब्ध्वा भार्यां च मानवीम् ॥ ५ ॥ 
ब्रह्म्याचे पुत्र जे दक्ष रुचि हे जे प्रजापती ।  वरिता मनुच्या कन्या झाले संतान कोणते ॥ ५ ॥ 
 ब्रह्मन् -  हे मैत्रेया  च -  आणि  ब्रह्मणः -  ब्रह्मदेवाचा  सुतः -  पुत्र  यः -  जो  भगवान् -  भगवान्  रुचिः -  रुचिनामक ऋषि  वा -  अथवा  दक्षः -  दक्षप्रजापति  मानवीम् -  मनु कन्या जी आकूति व प्रसूतिनामक  भार्याम् -  स्त्रीला  लब्ध्वा -  मिळवून  भूतानि -  प्राण्यांना  यथा -  जसे  ससर्ज -  उत्पन्न करिता झाला ॥५॥  
 
तसेच भगवान रुची आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापतींनीसुद्धा मनूंच्या कन्यांचे पाणिग्रहण करून त्यांच्यापासून कोणत्या प्रकारे कोणकोणती संतती उत्पन्न केली, ते सर्व चरित्र मला सांगावे. (५) 
 
मैत्रेय उवाच -  
प्रजाः सृजेति भगवान् कर्दमो ब्रह्मणोदितः । सरस्वत्यां तपस्तेपे सहस्राणां समा दश ॥ ६ ॥ 
मैत्रेयजी सांगतात -  ब्रह्म्याने कर्दमा आज्ञा केली संतान निर्मिण्या । सरस्वती तिरी त्याने केलेसे तप पद्म ते ॥ ६ ॥ 
 भगवान् -  भगवान  कर्दमः -  कर्दम ऋषि  प्रजाः -  प्रजांना  सृज -  उत्पन्न कर  इति -  याप्रमाणे  ब्रह्मणा -  ब्रह्मदेवाने  उदितः -  सांगितलेला असा  सरस्वत्याम् -  सरस्वती नदीवर  सहस्त्राणां दश समाः -  दहा हजार वर्षे  तपः -  तपश्चर्येला  तेपे -  करिता झाला ॥६॥  
 
मैत्रेय म्हणाले - जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान कर्दमांना आज्ञा केली की, तुम्ही प्रजोत्पत्ती करावी. तेव्हा त्यांनी दहा हजार वर्षांपर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली. (६) 
 
ततः समाधियुक्तेन क्रियायोगेन कर्दमः । 
सम्प्रपेदे हरिं भक्त्या प्रपन्नवरदाशुषम् ॥ ७ ॥ 
एकाग्र चित्त प्रेमाने पूजिले हरिला तये ।  शरणागतास जो देतो वर निश्चित पूजनी ॥ ७ ॥ 
 ततः -  नंतर  कर्दमः -  कर्दम ऋषि  समाधियुक्तेन -  एकाग्रचित्ताने युक्त अशा  क्रियायोगेन -  पूजा प्रकाराने  प्रपन्नवरदाशुषम् -  शरणागतांना वर देणार्या अशा  हरिम् -  श्रीविष्णूला  भक्त्या -  भक्तीने  संप्रपेदे -  शरण गेला ॥७॥  
 
ते एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक पूजादी उपचारांनी शरणागतवरदायक श्रीहरींची आराधना करू लागले. (७) 
 
तावत्प्रसन्नो भगवान् पुष्कराक्षः कृते युगे । 
दर्शयामास तं क्षत्तः शाब्दं ब्रह्म दधद्वपुः ॥ ८ ॥ 
विष्णु सत्य युगारंभी भगवान् कमलाक्ष तो ।  प्रसन्न जाहला चित्ती शब्द ब्रह्मचि मूर्तिमान् ॥ ८ ॥ 
 क्षत्तः -  हे विदुरा  तावत् -  त्यावेळी  कृते युगे -  कृतायुगामध्ये  पुष्कराक्षः -  कमलाप्रमाणे आहेत नेत्र ज्याचे असा  भगवान् -  विष्णु  शाब्दम् -  वेदांनी जाणण्यास योग्य अशा  ब्रह्म -  ब्रह्ममय  वपुः -  शरीराला  दधत् -  धारण करणार्या अशा  तम् -  त्या कर्दम ऋषीला  आत्मानम् -  स्वस्वरूप  दर्शयामास -  दाखविता झाला ॥८॥  
 
हे विदुरा, तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी कमलनयन भगवान श्रीहरींनी प्रसन्न होऊन आपल्या शब्दब्रह्ममय स्वरूपाने मूर्तिमान होऊन त्यांना दर्शन दिले. (८) 
 
स तं विरजमर्काभं सितपद्मोत्पलस्रजम् । 
स्निग्धनीलालकव्रात वक्त्राब्जं विरजोऽम्बरम् ॥ ९ ॥ 
तेजोमय जसा सूर्य तशी मूर्तीहि भव्य ती ।  नीलिमा मुखि नी माला कुमुदी वस्त्र निर्मळ ॥ ९ ॥ 
 सः -  तो कर्दम ऋषि  विरजम् -  निर्मळ अशा  अर्काभम् -  सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा  सितपद्मोत्पलस्त्रजम् -  शुभ्र कमळे व कमोद यांच्या माळेने युक्त अशा  स्निग्धनीलालकव्रात -  तुळतुळीत व काळ्या केसांचा समूह आहे  वक्त्राब्जम् -  ज्याच्या मुखकमलावर  विरजोम्बरम् -  स्वच्छ आहे वस्त्र ज्याचे अशा ॥९॥ 
 
भगवंतांची ती भव्य मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. त्यांनी गळ्यात पांढर्या आणि निळ्या कमळांची माळ धारण केली होती, त्यांचे मुखकमल काळ्या आणि सुंदर केसांच्या बटांनी सुशोभित दिसत होते. त्यांनी स्वच्छ वस्त्र परिधान केले होते. (९) 
 
किरीटिनं कुण्डलिनं शङ्खचक्रगदाधरम् । 
श्वेतोत्पलक्रीडनकं मनःस्पर्शस्मितेक्षणम् ॥ १० ॥ 
शंख चक्र गदा पद्म मुकूट स्वर्ण कुंडले । श्वेतपद्मांकितो ऐसा हासरा चित्त चोरटा ॥ १० ॥ 
 किरीटिनम् -  किरीटयुक्त अशा  कुण्डलिनम् -  कुण्डलांनी युक्त अशा  शंखचक्रगदाधरम् -  शंख, चक्र व गदा धारण करणार्या अशा  श्वेतोत्पलक्रीडनकम् -  श्वेतकमळ आहे खेळणे ज्याचे अशा  मनःस्पर्शस्मितेक्षणम् -  मनाला आनंद उत्पन्न करणारे आहे हास्य व दर्शन ज्याचे अशा  वक्षःश्रियम् -  वक्षस्थळावर आहे लक्ष्मी ज्याच्या अशा  कौस्तुभकन्धरम् -  कौस्तुभमणि आहे कण्ठामध्ये ज्याच्या अशा ॥१०॥ 
 
मस्तकावर झगमगणारा सुवर्णमय मुगुट, कानात चमकणारी कुंडले आणि हातांमध्ये शंख चक्र, गदा ही आयुधे होती. त्यांच्या एका हातात क्रीडेसाठी घेतलेले पांढरे कमळ शोभून दिसत होते. प्रभूंचे मधुर, हास्यमय मुखकमल चित्त आकर्षित करून घेत होते. (१०) 
 
विन्यस्तचरणाम्भोजं अंसदेशे गरुत्मतः । 
दृष्ट्वा खेऽवस्थितं वक्षः श्रियं कौस्तुभकन्धरम् ॥ ११ ॥ 
चरणांबुज ते त्याचे गरुडाखांदि शोभले । वक्षी श्रीचिन्हनी कंठी कौस्तभमणि शोभला ॥ ११ ॥ 
 गरुत्मतः -  गरुडाच्या  अंसदेशे -  खांद्यावर  विन्यस्तचरणाम्भोजम् -  ठेविलेली आहेत चरणकमळे ज्याने अशा  खे -  आकाशात  अवस्थितम् -  राहिलेल्या  तं -  त्या विष्णूला  दृष्ट्वा -  पाहून ॥११॥  
 
त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. वक्षःस्थळावर श्रीलक्ष्मी आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. प्रभूंच्या या आकाशस्थित मनोहर मूर्तीचे दर्शन करून कर्दमांना फार आनंद झाला. (११)  
 
जातहर्षोऽपतन्मूर्ध्ना क्षितौ लब्धमनोरथः । 
गीर्भिस्त्वभ्यगृणात्प्रीति स्वभावात्मा कृताञ्जलिः ॥ १२ ॥ 
आकाश स्थित ही मूर्ती कर्दमे वंदिली तदा ।  साष्टांग प्रणिपातोनी हात जोडोनि बोलला ॥ १२ ॥ 
 लब्धमनोरथः -  पूर्ण झाला आहे मनोरथ ज्याचा असा  जातहर्षः -  झाला आहे आनंद ज्याला असा तो ऋषि  मुर्धा -  मस्तकाने  क्षितौ -  पृथ्वीवर  अपतत् -  पडला  च -  आणि  प्रीतिस्वभावात्मा -  प्रीतीच आहे स्वतःसिद्ध धर्म ज्याचा असा तो ऋषि  तु -  तर  कृताञ्जलिः -  केला आहे नमस्कार ज्याने असा  गीर्भिः -  वाणींनी  अभ्यगृणात् -  स्तुति करिता झाला ॥१२॥  
 
त्यांच्या सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी प्रसन्न हृदयाने पृथ्वीवर मस्तक टेकवून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि नंतर प्रेमाने मनःपूर्वक हात जोडून सुमधुर वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले. (१२) 
 
ऋषिरुवाच -  
जुष्टं बताद्याखिलसत्त्वराशेः सांसिध्यमक्ष्णोस्तव दर्शनान्नः । यद्दर्शनं जन्मभिरीड्य सद्भिः आशासते योगिनो रूढयोगाः ॥ १३ ॥ 
कर्दम म्हणाले -  ( इंद्रवज्रा ) सत्वास आधार नि स्तुत्य देवा योगस्थ योगी शुभ कामना त्या । धरुनि जन्मोनि तुलाच ध्याति त्या दर्शनाचा मज लाभ झाला ॥ १३ ॥ 
 ईड्य -  स्तुति करण्यास योग्य अशा हे परमेश्वरा  अद्य -  आज  अखिलसत्वराशेः -  संपूर्ण सत्वगुणांचा निधि अशा  तव -  तुझ्या  दर्शनात् -  दर्शनामुळे  नः -  आमच्या  अक्ष्णोः -  नेत्रांचे  सांसिध्यम् साफल्य जुष्टम् बत -  खरोखर प्राप्त झाले आहे  योगिनः -  योगी  सद्भिः -  उत्तमोत्तम अशा  जन्मभिः -  जन्मांनी  रूढयोगाः -  वाढविला आहे योग ज्यांनी असे  यद्दर्शनम् -  ज्या तुझ्या दर्शनाची  आशासते -  इच्छा करितात ॥१३॥  
 
कर्दम म्हणाले - हे स्तुती करण्यायोग्य परमेश्वरा, आपण संपूर्ण सत्त्वगुणाचे निधी आहात. योगीजन उत्तरोत्तर शुभ योनींमध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनाची इच्छा करतात, तेच आपले दर्शन आज आम्हांला झाल्याने आमचे नेत्र धन्य झाले. (१३) 
 
ये मायया ते हतमेधसस्त्वत्  
पादारविन्दं भवसिन्धुपोतम् । उपासते कामलवाय तेषां रासीश कामान् निरयेऽपि ये स्युः ॥ १४ ॥ 
माया भवासी पद तारितात  त्यजोनि माया क्षण सौख्य सारे । जो मार्ग नर्कासचि दवितो तो तरी तसे भोग भक्तास देसी ॥ १४ ॥ 
 ये -  जे विषय  निरये अपि -  नरकात देखील  स्युः -  आहेत  तेषाम् -  त्या  कामलवाय -  विषयांच्या लेशाकरिता  ये -  जे लोक  भवसिन्धुपोतम् -  संसारसमुद्रात नौकारूप अशा  त्वत्पादारविन्दम् -  तुझ्या चरणकमलाला  उपासते -  सेवितात  ते -  ते लोक  ते -  तुझ्या  मायया -  मायेने  हतबुद्धयः -  नष्ट झाली आहे बुद्धि ज्यांची असे  सन्ति -  असतात  ईश -  परमेश्वरा  तेषाम् -  त्याच्या  कामान् -  कामांना  रासि -  तू देतोस ॥१४॥  
 
भवसागरातून पार होण्यासाठी आपले चरणकमल जहाज आहेत. असे असूनही ज्यांची बुद्धी आपल्या मायेने लोप पावली आहे, तेच केवळ नरकामध्येही मिळणार्या तुच्छ क्षणिक विषयसुखांसाठी, त्या चरणांचा आश्रय घेतात. परंतु स्वामी, आपण तर त्यांना ते विषयभोगही देताच. (१४) 
 
तथा स चाहं परिवोढुकामः  
समानशीलां गृहमेधधेनुम् । उपेयिवान् मूलमशेषमूलं दुराशयः कामदुघाङ्घ्रिपस्य ॥ १५ ॥ 
समस्त इच्छा पुरती पदासी  मी कामलोलूप शिलावतीया । कन्येसवेची वरण्यास इच्छी आलो तुझ्या पायि अशाच इच्छे ॥ १५ ॥ 
 तथा -  त्याप्रमाणे  दुराशयः -  दुष्ट आहे इच्छा ज्याची असा  समानशीलाम् -  तुल्य आहे स्वभाव जिचा अशा  गृहमेधधेनुम् -  गृहस्थाश्रमात धर्मादि अर्थांना साधून देणार्या अशा स्त्रीला  परिवोढुकामः -  वरण्याकरिता आहे इच्छा ज्याची असा  सः -  तो  च -  तर  अहम् -  मी  अशेषमूलम् -  संपूर्ण वस्तूचे मूल कारण अशा  कामदुघाङ्घ्रिपस्य -  सर्व इच्छा पुरविणार्या कल्पवृक्षाप्रमाणे असणार्या  तव -  तुझ्या  मूलम् -  पादमूळाला  उपेयिवान् -  प्राप्त झालो आहे ॥१५॥  
 
प्रभो, तसाच कामकलुषितहृदय असलेला मीसुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप आणि गृहस्थधर्म पालन करण्यास सहायक अशा कन्येशी विवाह व्हावा, म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना पुरविणार्या चरणकमलांना शरण आलो आहे. (१५) 
 
प्रजापतेस्ते वचसाधीश तन्त्या  
लोकः किलायं कामहतोऽनुबद्धः । अहं च लोकानुगतो वहामि बलिं च शुक्लानिमिषाय तुभ्यम् ॥ १६ ॥ 
सर्वेश्वरा लोकअधीपती तू  यज्ञास सारे फसले तयांना । बांधियले वेदरुपेचि दोरे सर्वोपचारे तुज मी पुजीतो ॥ १६ ॥ 
 अधीश -  हे लोकाधिपते  अयम् -  हा  कामहतः -  कामाने पीडिलेला  लोकः -  लोक  प्रजापतेः -  प्रजापालक अशा  ते -  तुझ्या  वचसा -  वाणीरूप  तन्त्या -  दावणीने  नु -  निश्चयाने  बद्धः -  बांधलेला  अस्ति -  आहे  शुक्ल -  हे शुद्धमूर्ते  अहम् -  मी  च -  तर  लोकानुगतः -  लोकांचे अनुकरण करणारा असा  अनिमिषाय -  कालरूप अशा  तुभ्यम् -  तुला  बलिम् -  पूजा  किल -  निश्चयाने  वहामि च -  अर्पण करतोच ॥१६॥  
 
सर्वेश्वरा, आपण सर्व लोकांचे अधिपती आहात. नाना प्रकारच्या कामनांमध्ये गुंतलेले हे लोक आपल्या वेदवाणीरूप दोरीने बांधलेले आहेत. हे धर्ममूर्ते, त्यांचेच अनुकरण करीत मीही कालरूप आपल्याला कर्ममय आज्ञापालनरूप पूजा समर्पण करीत आहे. (१६) 
 
लोकांश्च लोकानुगतान् पशूंश्च  
हित्वा श्रितास्ते चरणातपत्रम् । परस्परं त्वद्गुणवादसीधु पीयूषनिर्यापितदेहधर्माः ॥ १७ ॥ 
प्रभो तुझे भक्त न मोजितात  कामूक त्यांना, तुज आश्रयो त्यां । तुझ्या गुणांची पिउनी सुधा ती ते भूक तृष्णा विसरुन जाती ॥ १७ ॥ 
 भक्ताः -  भक्त  लोकान् -  लोकांना  च -  आणि  लोकानुगतान् -  लोकांना अनुसरणार्या अशा  पशून् -  पशूंना  हित्वा -  टाकून  ते -  तुझ्या  चरणातपत्रम् -  चरणरूपी छत्राला  आश्रिताः -  अवलंबणारे  परस्परम् -  एकमेकांशी  त्वद्गुणवादसीधुपीयूष -  तुझ्या गुणकथारूपी मद्यामृताने  निर्यापितदेहधर्माः -  नष्ट झाले आहेत देहधर्म ज्यांचे असे  भवन्ति -  होतात ॥१७॥  
 
आपले भक्त, विषयासक्त लोक आणि त्यांच्याच मार्गांचे अनुकरण करणार्या माझ्यासारख्या कर्मजड पशूंची पर्वा न करता आपल्य़ा चरणांच्या छत्रछायेचाच आश्रय घेतात. तसेच एकमेक आपल्या गुणगानरूप चविष्ट सुधेचे पान करून आपल्या तहान-भूक इत्यादी देहधर्मांना शांत करतात. (१७) 
 
न तेऽजराक्षभ्रमिरायुरेषां  
त्रयोदशारं त्रिशतं षष्टिपर्व । षण्नेम्यनन्तच्छदि यत्त्रिणाभि करालस्रोतो जगदाच्छिद्य धावत् ॥ १८ ॥ 
या कालचक्रात विधीहि धावे  आरे महीने दिन जोड त्याचे । पुठ्ठे ऋतू नी क्षण धाव त्यांची त्या चार मासात तशीच नाभी । संवत्सरेरुपचि कालचक्र आयूस तोडी जड जीव यांच्या । फिरे सदा कार्य असेच त्याचे भक्तास नाही भय काहि त्याचे ॥ १८ ॥ 
 अतः -  म्हणून  ते -  तुझे  अजराक्षभ्रमि -  ब्रह्मरूपी कण्यावरून फिरणारे असे  त्रयोदशारम् -  अधिक महिन्यासुद्धा तेरा महिनेरूप आहेत आरा ज्यामध्ये असे  त्रिशतम् षष्टिपर्व -  तीनशे साठ दिवसरूप आहेत पेरे ज्याला असे  षण्नेमि -  सहा ऋतू आहेत धावा ज्याला असे  अनन्तच्छदि -  अनंत आहेत क्षण, लव, निमेष इत्यादि पत्राकार धारा ज्याला असे  त्रिणाभि -  तीन चातुर्मास्य आहेत नाभि ज्याला अशा  करालस्त्रोतः -  तीव्र आहे वेग ज्याचा असे  जगत् -  त्रैलोक्याला  आच्छिद्य -  आकर्षण करून  धावत् -  धावणारे  यत् -  जे कालचक्र  अस्ति -  आहे  तत् -  ते  एषाम् -  ह्या भक्तांचे  आयुः -  आयुष्य  न छिनत्ति -  नष्ट करीत नाही ॥१८॥  
 
प्रभो, हे कालचक्र मोठे प्रबळ आहे. साक्षात ब्रह्म याची फिरण्याची धुरी आहे. अधिक मासासह तेरा महिने आरे आहेत. तीनशे साठ दिवस जोड आहेत, सहा ऋतू चाकाचा घेर, अनंत क्षण-पल इत्यादी याच्या तीक्ष्ण धारा आहेत. तसेच तीन चातुर्मास याची आधारभूत तीन वर्तुळे आहेत. हे अत्यंत वेगवान संवत्सररूप कलचक्र चराचर जगाचे आयुष्य संपवत फिरत असते; परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा र्हास करू शकत नाही. (१८) 
 
एकः स्वयं सन्जगतः सिसृक्षया  
अद्वितीययात्मन् अधि योगमायया । सृजस्यदः पासि पुनर्ग्रसिष्यसे यथोर्णनाभिः भगवन् स्वशक्तिभिः ॥ १९ ॥ 
जै कीट निर्मी मिटवीनि पाळी  जाळे स्वताचे तयि तूहि देवा । निर्मिसि सृष्टि नि तसाच पोषी माया रुपाने गिळितोस तूची ॥ १९ ॥ 
 भगवन् -  हे परमेश्वरा  स्वयम् -  स्वतः  एकः -  एक  सन् -  असलेला  जगतः -  जगाची  सिसृक्षया -  उत्पत्ति करण्याच्या इच्छेने  व्दितीयया -  दुसर्या  आत्मन् -  आपल्या ठिकाणी  अधियोगमायया -  स्वीकार केलेल्या योगमायेच्या योगाने  स्वीकृताः -  स्वीकारलेल्या  यथा -  ज्याप्रमाणे  ऊर्णनाभिः -  कोळी  स्वशक्तिभिः -  आपल्या सत्वादिक शक्तींनी  अदः -  ह्या जगाला  सृजसि -  उत्पन्न करतोस  पासि -  रक्षितोस  पुनः -  पुनः  ग्रसिष्यसे -  प्रलय करशील ॥१९॥  
 
भगवन, ज्याप्रमाणे कोळी-कीटक स्वतःच जाळे पसरतो, त्याचे रक्षण करतो आणि शेवटी ते गिळून टाकतो त्याचप्रमाणे आपण एकटेच या जगाची रचना करण्यासाठी आपल्याशी अभिन्न अशा योगमायेचा स्वीकार करून त्यातून अभिव्यक्त झालेल्या आपल्या सत्त्वगुणादी शक्तिद्वारा स्वतःच या जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करता. (१९) 
 
नैतद्बताधीश पदं तवेप्सितं  
यन्मायया नस्तनुषे भूतसूक्ष्मम् । अनुग्रहायास्त्वपि यर्हि मायया लसत्तुलस्या तनुवा विलक्षितः ॥ २० ॥ 
माया परिच्छिन्न तुम्ही असे ते  मंडीतमाळा तुळसीदळांच्या । दिले स्वयें दर्शन हे सुखाचे कल्याणकारीहि असे आम्हा ते ॥ २० ॥ 
 अधीश -  हे परमेश्वरा  मायया -  मायेच्या योगाने  नः -  आम्हाला  यत् -  ज्या  भूतसूक्ष्मम् -  सूक्ष्म भूतरूप  पदम् -  विषयसुखाला  तनुषे -  वाढवतोस  एतत् -  हे  तव -  तुझे  ईप्सितम् -  इच्छित  बत -  खरोखर  न -  नाही  अपि -  तरीसुद्धा  नः -  आमच्या  अनुग्रहाय -  अनुग्रहाकरिता  तत् -  ते विषयसुख  अस्तु -  असो  यर्हि -  ज्या अर्थी  मायया -  मायेच्या योगाने  परिच्छिन्नः इव -  जणू काय मर्यादित असा  लसत्तुलस्या -  शोभत आहे तुलसी ज्याच्या ठिकाणी अशा  तनुवा -  शरीराने  विलक्षितः -  दृष्टिगोचर झाला आहेस ॥२०॥  
 
प्रभो, यावेळी आपण आपल्या तुळसीमालामंडित, मायेने परिच्छिन्न दिसणार्या सगुण-मूर्तीचे आम्हांला दर्शन दिले आहे. आपण आम्हां भक्तांना जे शब्दादी विषयसुख प्रदान करता, ते मायिक असल्याकारणाने आपल्याला जरी पसंत नसले तरी परिणामतः आमचे कल्याण करण्यासाठी असल्याने ते आम्हांला प्राप्त होवो. (२०)
 
तं त्वानुभूत्योपरतक्रियार्थं  
स्वमायया वर्तितलोकतन्त्रम् । नमाम्यभीक्ष्णं नमनीयपाद सरोजमल्पीयसि कामवर्षम् ॥ २१ ॥ 
निष्क्रिय नाथा असुनी हि तूची  माये सवे तू जिववीसि जीवा । त्या कामनाही करितोस पूर्ण पुनःपुन्हा हा नमितो तुला मी ॥ २१ ॥ 
 स्वमायया -  आपल्या मायेच्या योगाने  आवर्तितलोकतन्त्रम् -  उत्पन्न केली आहेत जगतांची साधने ज्याने अशा  अनुभूत्या -  ज्ञानाने  उपरतक्रियार्थम् -  संपविलेला आहे कर्मफलाचा भोग ज्याचे ठिकाणी अशा  नमनीयपादसरोजम् -  वंद्य आहेत पदकमले ज्याची अशा  अल्पीयसी -  अत्यंत अल्प  आराधने -  भजन केले असता  कामवर्षम् -  मनोरथांचा वर्षाव करणार्या अशा  तम् -  त्या  त्वाम् -  तुला  अभिक्ष्णम् -  वारंवार  नमामि -  नमस्कार करतो ॥२१॥  
 
आपण स्वरूपतः निष्क्रिय असूनसुद्धा मायेच्या द्वारा सर्व जगाचा व्यवहार चालविणारे आहात. तसेच अल्पशी उपासना करणार्यांवरसुद्धा सर्व इच्छित वस्तूंचा वर्षाव करणार्या आपल्या वंदनीय चरणकमलांना मी वारंवार नमस्कार करतो. (२१) 
 
ऋषिरुवाच - 
इत्यव्यलीकं प्रणुतोऽब्जनाभः तं आबभाषे वचसामृतेन । सुपर्णपक्षोपरि रोचमानः प्रेमस्मित उद्वीक्षणविभ्रमद्भ्रूः ॥ २२ ॥ 
मैत्रेयजी सांगतात -  दृष्टी सदा श्रीहरिची अशीच हास्यात चांचल्य सकाम नेत्रा । सारे स्तवीता मग कर्दमाते बोले हरी अमृत वाणि ऐसी ॥ २२ ॥ 
 इति -  याप्रमाणे  अव्यलीकम् -  निष्कपटपणे  प्रणुतः -  स्तुती केलेला  सुपर्णपक्षोपरिरोचमानः -  गरुडाच्या पंखामुळे अधिक शोभणारा असा  अब्जनाभः -  कमल आहे नाभीच्या ठिकाणी ज्याच्या असा भगवान  प्रेमस्मित -  प्रेम व हास्य या दोन्हींच्या योगाने  उद्वीक्षणविभ्रमद्भ्रूः -  चंचल आहे भ्रुकुटि ज्याची असा  तम् -  त्या कर्दम ऋषीला  अमृतेन -  अमृततुल्य  वचसा -  भाषणाने  आबभाषे -  बोलता झाला ॥२२॥  
 
मैत्रेय म्हणाले - भगवंतांच्या भुवया प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त दृष्टीने चंचल होत होत्या. ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान झाले होते. कर्दमांनी जेव्हा निष्कपटभावाने त्यांची स्तुती केली, तेव्हा ते अमृतवाणीने बोलू लागले. (२२) 
 
श्रीभगवानुवाच -  
विदित्वा तव चैत्यं मे पुरैव समयोजि तत् । यदर्थं आत्मनियमैः त्वयैवाहं समर्चितः ॥ २३ ॥ 
श्रीभगवान म्हणाले -  ( अनुष्टुप् ) आत्मसंयमनादिके पूजिले तू मुनिवरा । पूर्वीच तव हेतू तो जाणिला योजिला असे ॥ २३ ॥ 
 त्वया -  तुझ्याकडून  यदर्थम् -  ज्याकरिता  आत्मनियमैः -  अंतःकरणाच्या नियमांनी  अहम् एव -  मीच  अर्चितः -  पूजिलो  तत् -  ते  तव -  तुझे  चैत्यम् -  हृद्गत  विदित्वा -  जाणून  मे -  मजकडून  पुरैव -  पूर्वीच  समयोजि -  उत्तमप्रकारे योजिले गेले ॥२३॥  
 
श्री भगवान म्हणाले - ज्यासाठी तू आत्मसंयम करून माझी आराधना केली आहेस, तो तुझ्या हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे. (२३) 
 
न वै जातु मृषैव स्यात् प्रजाध्यक्ष मदर्हणम् । 
भवद्विधेष्वतितरां मयि सङ्गृभितात्मनाम् ॥ २४ ॥ 
कधीही प्रार्थना माझी नच निष्फळ होतसे ।  नित्य ध्यातो मला त्याची कामना पूर्ण होतसे ॥ २४ ॥ 
 प्रजाध्यक्ष -  हे लोकाधिपते  मयि -  माझ्या ठिकाणी  संगृभितात्मनाम् -  एकाग्र केले आहे चित्त ज्यांनी अशा लोकांचे  मदर्हणम् -  माझे पूजन  जातु -  केव्हाही  मृषा -  व्यर्थ  वै -  खरोखर  न स्यात् -  होणार नाही  भवव्दिधेषु -  तुझ्या सारख्यांच्या ठिकाणी  अतितराम् एव -  सर्वथाच  मृषा न स्यात् -  निष्फळ होणार नाही ॥२४॥  
 
प्रजापते, माझी आराधना कधीच निष्फळ होत नाही; त्यातून ज्यांचे चित्त नेहमी माझ्या ठिकाणीच लागलेले असते, त्या तुझ्यासारख्या महात्म्या लोकांनी केलेली उपासना तर अधिकच फलदायी होते. (२४) 
 
प्रजापतिसुतः सम्राट् मनुर्विख्यातमङ्गलः । 
ब्रह्मावर्तं योऽधिवसन् शास्ति सप्तार्णवां महीम् ॥ २५ ॥ 
ब्रह्मावर्तास राहोनी सप्तद्वीपास राज्य हे ।  स्वयंभूव मनू श्रेष्ठ यशाने करितो पहा ॥ २५ ॥ 
 प्रजापतिसुतः -  ब्रह्मदेवाचा पुत्र  सम्राट् -  सार्वभौम राजा  मनुः -  मनु  अस्ति -  आहे  यः -  जो मनु  विख्यातमङ्गलः -  प्रसिद्ध आहे सदाचारादि गुण ज्याचे असा  ब्रह्मावर्तम् -  ब्रह्मवर्ताला  अधिवसन् -  राहणारा असा  सप्तार्णवाम् -  सात समुद्रांनी युक्त असा  महीम् -  पृथ्वीला  शास्ति -  रक्षितो ॥२५॥  
 
प्रजापतिपुत्र सदाचारसंपन्न सम्राट स्वायंभुव मनू ब्रह्मावर्तामध्ये राहून सात समुद्रांनी वेढलेल्या सर्व पृथ्वीचे राज्य करीत आहे. (२५) 
 
स चेह विप्र राजर्षिः महिष्या शतरूपया । 
आयास्यति दिदृक्षुस्त्वां परश्वो धर्मकोविदः ॥ २६ ॥ 
परं धर्मज्ञ राजा तो शतरुपा सवे इथे । येईल परवा नक्की तुजला भेटण्यास की ॥ २६ ॥ 
 विप्र -  हे कर्दम ऋषे  धर्मकोविदः -  धर्मशास्त्रात प्रवीण असा  सः -  तो  राजर्षिः -  राजर्षि मनु  च -  तर  त्वाम् -  तुला  दिदृक्षुः -  पाहण्याची इच्छा करणारा  महिष्या -  पट्टराणी  शतरूपया -  शतरूपेसह  परश्वः -  परवांच्या दिवशी  इह -  येथे  आयास्यति -  येईल ॥२६॥  
 
विप्रवर, तो धर्मज्ञ राजर्षी मनू शतरूपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा येथे येईल. (२६) 
 
आत्मजां असितापाङ्गीं वयःशीलगुणान्विताम् । 
मृगयन्तीं पतिं दास्यति अनुरूपाय ते प्रभो ॥ २७ ॥ 
सुशिला रुपसंपन्न गुणयौवन पुत्रि जी । अर्पिल तुज लग्नार्थ तेंव्हा ती श्यामलोचना ॥ २७ ॥ 
 प्रभो -  कर्दम ऋषे  पतिम् -  पतीला  मृगयन्तीम् -  शोधणार्या अशा  वयःशीलगुणान्विताम् -  वय, स्वभाव व गुण यांनी युक्त अशा  असितापाङ्गीम् -  काळेभोर आहेत नेत्र जीचे अशा  आत्मजाम् -  कन्येला  अनुरूपाय -  अनुरूप अशा  ते -  तुला  दास्यति -  देईल ॥२७॥  
 
त्याची एक रूप, यौवन, शील आदी गुणांनी संपन्न, काळेभोर डोळे असलेली कन्या या वेळी विवाहाला योग्य झाली आहे. प्रजापते, तू तिच्यासाठी सर्व दृष्टींनी योग्य आहेस. म्हणून तो तुलाच ती कन्या अर्पण करतील. (२७) 
 
समाहितं ते हृदयं यत्र इमान् परिवत्सरान् । 
सा त्वां ब्रह्मन् नृपवधूः काममाशु भजिष्यति ॥ २८ ॥ 
गुंतले कैक वर्षाने भार्येशी चित्त ज्या तुझे ।  शीघ्र होईल ती पत्नी सेवील इष्टची तुला ॥ २८ ॥ 
 यत्र -  ज्या स्त्रीचे ठिकाणी  ते -  तुझे  हृदयम् -  चित्त  समाहितम् -  जडलेले  भविष्यति -  असेल  ब्रह्मन् -  कर्दम ऋषे  सा -  ती  नृपवधूः -  राजकन्या  आशु -  लवकर  त्वाम् -  तुला  इमान् -  ह्या  परिवत्सरान् -  अनेक वर्षांच्या कालावधीपर्यंत  कामम् -  यथेच्छ  भजिष्यति -  सेवील ॥२८॥  
 
ब्रह्मन, गेल्या अनेक वर्षांपासून तुझे चित्त जशा पत्नीची इच्छा करीत आहे, तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्नी होऊन तुझी यथेष्ट सेवा करील. (२८) 
 
या ते आत्मभृतं वीर्यं नवधा प्रसविष्यति । 
वीर्ये त्वदीये ऋषय आधास्यन्ति अञ्जसात्मनः ॥ २९ ॥ 
नऊ कन्या तुझ्या वीर्यातुनी होतील तीजला ।  मरीच्यादि ऋषी त्यांना वरिती पुत्र कारणे ॥ २९ ॥ 
 या -  जी स्त्री  आत्मभृतम् -  आपल्या ठिकाणी धारण केलेल्या अशा  ते -  तुझ्या  वीर्यम् -  वीर्याला  नवधा -  नऊ प्रकाराने  प्रसविष्यति -  प्रसवेल  ऋषयः -  ऋषि  त्वदीये -  त्वत्संबंधी  वीर्ये -  वीर्योत्पन्न संततीच्या ठिकाणी  अञ्जसा -  अनायासे  आत्मनः -  पुत्रांना  आधास्यन्ति -  स्थापना करतील ॥२९॥  
 
ती तुझे वीर्य आपल्या गर्भात धारण करून त्यापासून नऊ कन्या उत्पन्न करील आणि पुन्हा त्या कन्यांपासून लोकरीतीला अनुसरून मरीची आदी ऋषिगण पुत्र उत्पन्न करतील. (२९) 
 
त्वं च सम्यग् अनुष्ठाय निदेशं मे उशत्तमः । 
मयि तीर्थीकृताशेष क्रियार्थो मां प्रपत्स्यसे ॥ ३० ॥ 
आज्ञेसी पाळिता माझ्या शुद्ध चित्त तुझे असे ।  होईल अर्पिता कर्म मलाच मिळसी पुन्हा ॥ ३० ॥ 
 च -  आणि  त्वम् -  तू  मे -  माझ्या  निदेशम् -  आज्ञेला  सम्यक् -  उत्तम प्रकारे  अनुष्ठाय -  पाळून  मयि -  माझ्या ठिकाणी  तीर्थीकृताशेषः -  अर्पण केली आहेत संपूर्ण कर्मफले ज्याने असा  उशत्तमः -  अत्यंत निर्मळ असा  माम् -  मला  प्रपत्स्यसे -  प्राप्त होशील ॥३०॥  
 
तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून शुद्धचित्त होऊन, नंतर आपली सर्व कर्मफळे मला अर्पण करून मलाच प्राप्त होशील. (३०) 
 
कृत्वा दयां च जीवेषु दत्त्वा चाभयमात्मवान् । 
मय्यात्मानं सह जगद् द्रक्ष्यस्यात्मनि चापि माम् ॥ ३१ ॥ 
भूतदयेतुनी प्राप्त होईल ज्ञान ते तुला ।  देसी अभय सर्वांना समान पाहसी जगा ॥ ३१ ॥ 
 जीवेषु -  प्राण्यांच्या ठिकाणी  दयाम् -  दयेला  कृत्वा -  करून  च -  आणि  आत्मवान् -  जितेन्द्रिय असा  अभयम् -  अभयाला  दत्वा -  देऊन  आत्मानम् -  स्वतःला  च -  आणि  जगत् -  जगाला  सह -  एकरूप  मयि -  माझ्या ठिकाणी  च -  आणि  माम् -  मलाहि  आत्मनि -  स्वतःचे ठिकाणी  द्रक्ष्यसि -  पाहशील ॥३१॥  
 
जीवांवर दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करशील आणि नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतःसहित संपूर्ण जगताला माझ्यामध्ये आणि मला तुझ्यात स्थित असलेला पाहाशील. (३१) 
 
सहाहं स्वांशकलया त्वद्वीर्येण महामुने । 
तव क्षेत्रे देवहूत्यां प्रणेष्ये तत्त्वसंहिताम् ॥ ३२ ॥ 
महामुनी तुझ्या वीर्यीं घेईन जन्म मी पुढे ।  देवहूती उदरासी रचील सांख्यशास्त्रही ॥ ३२ ॥ 
 महामुने -  हे मुनिश्रेष्ठा  अहम् -  मी  स्वांशकलया -  आपल्या अंशरूपाने  त्वव्दीर्येण सह -  तुझ्या वीर्यासह  तव -  तुझ्या  देवहूत्याम् -  देवहूतीनामक  क्षेत्रे -  क्षेत्रभूत अशा स्त्रीचे ठिकाणी  अवतीर्य -  अवतार घेऊन  तत्त्वसंहिताम् -  सांख्यनामक शास्त्राला  प्रणेष्ये -  निर्माण करीन ॥३२॥  
 
महामुनी, मीसुद्धा माझ्या अंश-कलारूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्यशास्त्राची रचना करीन.(३२) 
 
मैत्रेय उवाच -  
एवं तं अनुभाष्याथ भगवान् प्रत्यगक्षजः । जगाम बिन्दुसरसः सरस्वत्या परिश्रितात् ॥ ३३ ॥ 
मैत्रेयजी सांगतात -  प्रगटोनी असा विष्णु बिंदुसर सरोवरी । तीर्थात गुप्त झाला नी स्वलोका पातला असे ॥ ३३ ॥ 
 प्रत्यगक्षजः -  अन्तर्मुख इंद्रियांमध्ये प्रगट होणारा असा  भगवान् -  विष्णु  तम् -  त्या कर्दम ऋषीला  एवम् -  याप्रमाणे  अनुभाष्य -  बोलून  सरस्वत्या -  सरस्वती नदीने  परिश्रितात् -  वेष्टिलेल्या अशा  बिंदुसरसः -  बिंदुसरोवरापासून  जगाम -  गेला ॥३३॥  
 
मैत्रेय म्हणाले- कर्दमऋषींना असे सांगून इंद्रिये अंतर्मुख झाल्यावरच प्रकट होणारे श्रीहरी सरस्वती नदीने घेरलेल्या बिंदुसर तीर्थावरून निघून गेले. (३३) 
 
निरीक्षतस्तस्य ययावशेष  
सिद्धेश्वराभिष्टुतसिद्धमार्गः । आकर्णयन् पत्ररथेन्द्रपक्षैः उच्चारितं स्तोममुदीर्णसाम ॥ ३४ ॥ 
( इंद्रवज्रा )  वैकुंठमार्गासि प्रशंसिती ज्या सिद्धेश्वरादी अन त्याच मार्गी । गेला बसोनी गरुडावरी तो त्याच्या परातूनि ऋचा निघाल्या ॥ ३४ ॥ 
 अशेष -  अनेक साधनांनी सिद्ध झालेल्या  सिद्धेश्वराभिष्टुत सिद्धमार्गः -  योगी लोकांनी स्तविलेला आहे वैकुण्ठमार्ग ज्याचा असा  भगवान् -  विष्णु  पत्ररथेन्द्रपक्षैः -  गरुडाच्या पंखांनी  उच्चारितम् -  उच्चारिलेल्या अशा  उदीर्णसाम -  गायिलेल्या आहेत सामवेदाच्या ऋचा ज्यामध्ये अशा  स्तोमम् -  स्तवनाला  आकर्णयन् -  श्रवण करणारा असा  तस्य निरीक्षतः -  तो कर्दम ऋषि पाहात असता  ययौ -  गेला ॥३४॥  
 
भगवंतांच्या सिद्ध मार्गाची(वैकुंठ मार्गाची) सर्व सिद्धपुरुष प्रशंसा करतात. कर्दम पाहात असतानाच ते त्या मार्गाने गरुडाच्या पंखांतून प्रगट होणार्या सामवेदाच्या आधारभूत ऋचा ऐकत निघाले. (३४) 
 
अथ सम्प्रस्थिते शुक्ले कर्दमो भगवान् ऋषिः । 
आस्ते स्म बिन्दुसरसि तं कालं प्रतिपालयन् ॥ ३५ ॥ 
( अनुष्टुप् )  विदुरजी ! हरी जाता प्रतिक्षा करि कर्दम । बिंदुसरोवरापाशी बैसुनी एकटाचि तो ॥ ३५ ॥ 
 अथ -  नंतर  शुक्ले संप्रस्थिते -  शुक्लवर्ण विष्णु गेला असता  भगवान् -  भगवान्  कर्दमः ऋषिः -  कर्दम ऋषी  तं कालम् प्रतिपालयन् -  त्या कालाची वाट पाहणारा असा  बिन्दुसरसि -  बिन्दुसरोवराच्या ठिकाणी  आस्ते स्म -  स्वस्थ बसला ॥३५॥  
 
श्रीहरी निघून गेल्यावर त्यांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहात भगवान कर्दम ऋषी बिंदुसरोवरावरच राहिले. (३५) 
 
मनुः स्यन्दनमास्थाय शातकौम्भपरिच्छदम् । 
आरोप्य स्वां दुहितरं सभार्यः पर्यटन् महीम् ॥ ३६ ॥ तस्मिन् सुधन्वन्नहनि भगवान् यत्समादिशत् । उपायादाश्रमपदं मुनेः शान्तव्रतस्य तत् ॥ ३७ ॥ 
इकडे मनुजी सुद्धा सुवर्णरथि बैसले ।  पत्नी पुत्री सवे घेता निघाले इकडेच ते ॥ ३६ ॥ योजिल्या परि ते आले जेथे शांतिपरायण । महर्षि कर्दमच्या त्या आश्रमी पातले तिघे ॥ ३७ ॥ 
 मनुः -  मनु  शातकौम्भपरिच्छदम् -  सुवर्णाची आहेत भूषणे ज्याला अशा  स्यन्दनम् -  रथावर  आस्थाय -  बसून  स्वाम् -  आपल्या  दुहितरम् -  कन्येला  आरोप्य -  बसवून  सभार्यः -  भार्येसहित  महीम् -  पृथ्वीवर  पर्यटन् -  फिरत फिरत ॥३६॥   सुधन्वन् -  उत्तम आहे धनुष्य ज्याचे अशा हे विदुरा  भगवान् -  विष्णु  यत् -  ज्या दिवसाला  समादिशत् -  सांगता झाला  तस्मिन् अहनि -  त्या दिवशी  शान्तव्रतस्य -  शांत आहे आचरण ज्याचे अशा कर्दम ऋषीच्या  तत् -  त्या  आश्रमपदम् -  आश्रमस्थानाला  उपायात् -  प्राप्त झाला ॥३७॥  
 
वीरवर, इकडे मनूसुद्धा महाराणी शतरूपा आणि कन्या यांना सुवर्णजडित रथात बसवून पृथ्वीवर फिरत फिरत भगवंतांनी जो दिवस सांगितला होता, त्या दिवशी शांतिपरायण महर्षीं कर्दमांच्या त्या आश्रमात पोहोचले. (३६-३७) 
 
यस्मिन्भगवतो नेत्रान् न्यपतन् अश्रुबिन्दवः । 
कृपया सम्परीतस्य प्रपन्नेऽर्पितया भृशम् ॥ ३८ ॥ तद्वै बिन्दुसरो नाम सरस्वत्या परिप्लुतम् । पुण्यं शिवामृतजलं महर्षिगणसेवितम् ॥ ३९ ॥ 
सरस्वती जळाने ते भरलेले सरोवर ।  तेथेचि कर्दमासाठी देवे प्रेमाश्रु ढाळिले ॥ ३८ ॥ पवित्र तीर्थ ते मोठे कल्याणमय ते जळ । अमृतापरि जे गोड महर्षि प्राशिती सदा ॥ ३९ ॥ 
 यस्मिन् -  ज्या सरोवरामध्ये  प्रपन्ने -  शरणागताचे ठिकाणी  अर्पितया -  अर्पण केलेल्या  कृपया -  दयेने  भृशम् -  अत्यन्त  संपरीतस्य -  व्याप्त झालेल्या  भगवतः -  श्रीविष्णूच्या  नेत्रात् -  नेत्रापासून  अश्रुबिन्दवः -  अश्रुबिंदु  न्यपतन् -  गळले ॥३८॥   तत् -  ते  वै -  खरोखर  बिन्दुसरः नाम -  बिन्दुसर नावाचे सरोवर  पुण्यम् -  पवित्र असे  सरस्वत्या -  सरस्वती नदीने  परिप्लुतम् -  वेष्टिलेले असे  शिवामृतजलम् -  आरोग्यदायक व अमृतासारखे गोड आहे जल ज्यामध्ये असे  महर्षिगणसेवितम् -  व मोठमोठ्या ऋषिसमुदायाने सेविलेले असे  अस्ति -  आहे ॥३९॥  
 
सरस्वतीच्या पाण्याने भरलेले हे बिंदुसरोवर असे स्थान आहे की जेथे, आपला शरणागत भक्त कर्दमाबद्दल उत्पन्न झालेल्या अत्यंत करुणेने भगवंतांच्या डोळ्यांतून अश्रुबिंदू ओघळले होते. हे फार पवित्र तीर्थ आहे. याचे पाणी कल्याणप्रद आणि अमृतासारखे मधुर आहे. तसेच महर्षिगण नेहमी याचे सेवन करतात. (३८-३९) 
 
पुण्यद्रुमलताजालैः कूजत् पुण्यमृगद्विजैः । 
सर्वर्तुफलपुष्पाढ्यं वनराजिश्रियान्वितम् ॥ ४० ॥ 
घेरिले वृक्षवेलिंनी रमती पशु पक्षिही ।  फळां फुलां सदा डौर वनश्री शोभली अशी ॥ ४० ॥ 
 कूजत्पुण्यमृगव्दिजैः -  शब्द करीत आहेत मृग व पक्षी ज्यांचे ठिकाणी अशा  पुण्यद्रुमलता जालैः -  पवित्र वृक्ष व लता यांच्या समूहांनी  वनश्रिया -  वनशोभेने  अन्वितम् -  युक्त असे  सर्वर्तुफलपुष्पाढ्यम् -  सर्व ऋतूंतील फळे व पुष्पे यांनी युक्त असे ॥४०॥  
 
हे बिंदु-सरोवर पवित्र वृक्ष-वेलींनी वेढलेले होते. त्यात निरनिराळे शब्द करणारे पवित्र पशुपक्षी राहात होते. ते स्थान सर्व ऋतूंमधील फळांनी आणि फुलांनी संपन्न होते आणि सुंदर वनराई त्याची शोभा वाढवीत होती. (४०) 
 
मत्त-द्विजगणैर्घुष्टं मत्तभ्रमर विभ्रमम् । 
मत्त-बर्हिनटाटोपं आह्वयन् मत्तकोकिलम् ॥ ४१ ॥ 
उन्मत्त पक्षि नी भुंगे गुंजारव सदा तिथे ।  नाचती नटवे मोर कोकिळा बाहती नरा ॥ ४१ ॥ 
 मत्ताव्देजगणैः -  उन्मत्त अशा पक्षिगणांनी  घुष्टम् -  शब्दित असे  मत्तभ्रमरविभ्रमम् -  उन्मत्त अशा भ्रमरांचा आहे विनोद ज्यामध्ये असे  मत्तबर्हिन टाटोपम् -  उन्मत्त मयूररूपी नटांची आहे, नृत्याविषयी त्वरा ज्यामध्ये असे  आह्वयन्मत्तकोकिलम् -  बोलवित आहेत उन्मत्त कोकिला ज्यामध्ये असे ॥४१॥  
 
तेथे मदमस्त पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते. धुंद भ्रमर गुंजारव करीत होते. आनंदित मोर पिसारा पसरून नृत्य करीत होते आणि आनंदित झालेले कोकिळ कुहू-कुहू करून एकमेकांना बोलावीत होते. (४१) 
 
कदम्ब चम्पकाशोक करञ्ज बकुलासनैः । 
कुन्दमन्दारकुटजैः चूतपोतैः अलङ्कृतम् ॥ ४२ ॥ 
अशोक कुंद कदंबो चंपको बकुळीफुले ।  मंदार आम्र यांनी तो आश्रमो सजला असा ॥ ४२ ॥ 
 कदम्बचंपकाशोककरञ्जबकुलासनैः -  कदंब, चंपक, अशोक, करंज, बकुल व असाणा यांनी  कुन्दमन्दारकुटजैः -  कुंद, मंदार व कुडा यांनी  च -  आणि  चूतपोतैः -  आंब्याच्या रोपांनी  अलङ्कृतम् -  अलङ्कृत केलेले असे ॥४२॥  
 
तो आश्रम कदंब, चंपक, अशोक, करंज, बकुळ, आसणा, कुंद, मंदार, कुडा आणि लहान लहान आम्रवृक्षांनी अलंकृत झाला होता. (४२) 
 
कारण्डवैः प्लवैर्हंसैः कुररैः जलकुक्कुटैः । 
सारसैः चक्रवाकैश्च चकोरैः वल्गु कूजितम् ॥ ४३ ॥ 
सारस हंस कुरर चकोर चकवेहि ते ।  बदके कोंबड्यापाण मधूर स्वर बोलती ॥ ४३ ॥ 
 कारण्डवैः -  पाणकावळ्यांनी  प्लवैः -  पाण्यावर तरणार्या क्रौंचबकादिक पक्ष्यांनी  हंसैः -  हंसांनी  कुररैः -  टिटव्यांनी  जलकुक्कुटैः -  पाणकोंबड्यांनी  सारसैः -  सारसपक्ष्यांनी  चक्रवाकैः -  चक्रवाकपक्ष्यांनी  च -  आणि  चकोरैः -  चकोरपक्ष्यांनी  वल्गु -  मधुर  कूजितम् -  शब्द केलेले ॥४३॥  
 
तेथे कारंडव, बदक, बेडूक, हंस, कुरर, पाणकोंबडा, सारस, चकवे आणि चकोर पक्षी मधुर किलबिलाट करीत होते. (४३) 
 
तथैव हरिणैः क्रोडैः श्वावित् गवय कुञ्जरैः । 
गोपुच्छैः हरिभिः मर्कैः नकुलैः नाभिभिर्वृतम् ॥ ४४ ॥ 
हरिणे डुकरे सिंह हत्ती नी नीलगायि ही ।  वानरे माकडे मृग यांनी आश्रम वेढिला ॥ ४४ ॥ 
 तथा एव -  त्याचप्रमाणे  हरिणैः -  हरिणांनी  क्रोडैः -  डुकरांनी  श्वाविद्गवथकुञ्जरैः -  साळी, गवे व हत्ती यांनी  गोपुच्छैः -  गोपुच्छनामक वानरांनी  हरिभिः -  वानरांनी  मर्कैः -  माकडांनी  नकुलैः -  मुंगुसांनी  च -  आणि  नाभिभिः -  कस्तुरिमृगांनी  वृतम् -  वेष्टिलेल्या अशाच ॥४४॥  
 
तसेच हरीण, डुक्कर, साळी, गवे, हत्ती, वानर, सिंह, माकडे, मुंगुस, कस्तुरीमृग आदी पशूंनी तो आश्रम भरलेला होता. (४४) 
 
प्रविश्य तत्तीर्थवरं आदिराजः सहात्मजः । 
ददर्श मुनिमासीनं तस्मिन् हुतहुताशनम् ॥ ४५ ॥ 
आदिराज मनू तेथे कन्येच्यासह पातले ।  पाहिले कर्दमा त्यांनी अग्निहोत्रचि संपता ॥ ४५ ॥ 
 आदिराजः -  पहिला राजा स्वायंभुव मनु  तत् -  त्या  तीर्थवरम् -  श्रेष्ठ तीर्थात  प्रविश्य -  प्रवेश करून  तस्मिन् -  त्या आश्रमात  हुतहुताशनम् -  अग्नीमध्ये हवन केले आहे ज्याने अशा  आसीनम् -  बसलेल्या  मुनिम् -  ऋषीला  ददर्श -  पाहता झाला ॥४५॥  
 
आदिराजा मनू त्या श्रेष्ठ तीर्थाच्या ठिकाणी कन्येसह पोहोचल्यावर मुनिवर कर्दम अग्निहोत्र करून बसलेले त्यांनी पाहिले. (४५) 
 
विद्योतमानं वपुषा तपसि उग्रयुजा चिरम् । 
नातिक्षामं भगवतः स्निग्धापाङ्गावलोकनात् । तद्व्याहृतामृतकला पीयूषश्रवणेन च ॥ ४६ ॥ 
तपाच्या थोर सामर्थ्ये तेजस्वी देह तो दिसे ।  भगवान् वचनांनी त्यां तपाचा शीणही नसे ॥ ४६ ॥ 
 चिरम् -  पुष्कळ कालपर्यंत  तपसि -  तपश्चर्येमध्ये  उग्र युजा -  घोर आहे योग ज्याचा अशा  वपुषा -  शरीराने  विद्योतमानम् -  प्रकाशणार्या अशा  भगवतः -  विष्णूच्या  स्निग्धापाङ्गविलोकनात् -  प्रेमयुक्त कटाक्षाने केलेल्या अवलोकनामुळे  च -  आणि  तव्द्याहृतामृतकला -  विष्णूचे भाषण हाच कोणी चंद्र त्याच्या कलेतील  पीयूषश्रवणेन -  अमृताच्या श्रवणाने  न अतिक्षामम् -  फार कृश नसलेल्या अशा ॥४६॥  
 
पुष्कळ दिवसपर्यंत उग्र तपस्या केल्यामुळे त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी दिसत होते. तसेच भगवंतांनी स्नेहपूर्ण नजरेने पाहिल्यामुळे आणि त्यांनी उच्चारलेल्या कर्णामृतरूप मधुर वचनांच्या श्रवणाने इतके दिवस तपश्चर्या करूनही ते विशेष दुर्बल दिसत नव्हते. (४६) 
 
प्रांशुं पद्मपलाशाक्षं जटिलं चीरवाससम् । 
उपसंश्रित्य मलिनं यथार्हणं असंस्कृतम् ॥ ४७ ॥ 
उंचा-पुरा असा देह नेत्र कंज विशाल जै ।  जटाही शोभल्या तैशा पैलूविणचि रत्न जै ॥ ४७ ॥ 
 प्रांशुम् -  उंच अशा  पद्मपलाशाक्षम् -  कमलपत्राप्रमाणे आहेत नेत्र ज्याचे अशा  जटिलम् -  जटायुक्त अशा  चीरवाससम् -  वल्कले आहेत वस्त्र ज्याचे अशा  मुनिं -  ऋषीला  ददर्श -  पाहता झाला  उपसंसृत्य -  जवळ जाऊन  यथा -  ज्याप्रमाणे  असंस्कृतम् -  संस्कार न केलेले  अर्हणम् -  अमूल्य रत्न  दृश्यते -  दिसते  तथा -  त्याप्रमाणे  मलिनम् -  मलीन अशा  मुनिं -  ऋषीला  ददर्श -  पाहता झाला ॥४७॥  
 
ते उंच होते. त्यांचे नेत्र कमलदलासारखे होते. डोक्यावर जटा शोभून दिसत होत्या आणि कमरेला वल्कले होती. त्यांना जवळून पाहिले तर संस्कार न केलेल्या बहुमोल रत्नासारखे ते मलीन दिसत होते. (४७) 
 
अथोटजमुपायातं नृदेवं प्रणतं पुरः । 
सपर्यया पर्यगृह्णात् प्रतिनन्द्यानुरूपया ॥ ४८ ॥ 
कर्दमे मनु येताची वंदिले आदरे तदा ।  यथोचितचि सत्कार केले स्वागतही तसे ॥ ४८ ॥ 
 अथ -  नंतर  सः -  तो कर्दम ऋषि  उटजम् -  पर्णकुटिकेच्या  उपायातम् -  समीप आलेल्या अशा  पुरः -  अग्रभागी  प्रणतम् -  नमस्कार केलेल्या  नृदेवम् -  राजाला  प्रतिनन्द्य -  गौरवून  अनुरुपया -  योग्य अशा  सपर्यया -  पूजेने  प्रत्यगृह्णात् -  सत्कार करिता झाला ॥४८॥  
 
नंतर महाराज स्वायंभुव मनूला आपल्या पर्णकुटीत येऊन प्रणाम करताना पाहून त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन प्रसन्न केले आणि यथोचित आदरातिथ्य करून त्याचे स्वागत केले. (४८) 
 
गृहीतार्हणमासीनं संयतं प्रीणयन् मुनिः । 
स्मरन् भगवदादेशं इत्याह श्लक्ष्णया गिरा ॥ ४९ ॥ 
स्वीकार करुनी पूजा बसले स्वस्थ ते मनू ।  तेंव्हा ते कर्दमो त्यांना बोलले स्मरुनी हरी ॥ ४९ ॥ 
 भगवदादेशम् -  विष्णूच्या आज्ञेला  स्मरन् -  स्मरणारा  मुनिः -  कर्दम ऋषि  गृहीतार्हणम् ताहेणम्ः -  स्वीकारली आहे पूजा ज्याने अशा  संयतम् -  जितेन्द्रिय अशा  आसीनम् -  बसलेल्या  तम् -  त्या राजाला  प्रीणयन् -  संतुष्ट करीत  श्लक्ष्णया -  मधुर अशा  गिरा -  वाणीने  इति -  याप्रमाणे  आह -  बोलला ॥४९॥  
 
पूजेचा स्वीकार करून जेव्हा मनू स्वस्थ चित्ताने आसनावर बसला तेव्हा मुनिवर कर्दमांनी भगवंतांच्या आज्ञेचे स्मरण होऊन आपल्या मधुर वाणीने त्याला प्रसन्न करीत म्हटले. (४९) 
 
नूनं चङ्क्रमणं देव सतां संरक्षणाय ते । 
वधाय चासतां यस्त्वं हरेः शक्तिर्हि पालिनी ॥ ५० ॥ 
साक्षात्देव तुम्ही विष्णु पालनी शक्तिरुपची ।  तुमच्या फिरण्यां हेतू रक्षणार्थचि सज्जना॥ ५० ॥ 
 देव -  हे राजा  यः -  जो  त्वम् -  तू  हरेः -  विष्णूची  पालनी -  रक्षण करणारी अशी  शक्तिः -  शक्ति  असि -  आहेस  तस्य -  त्या  ते -  तुझे  चङ्क्रमणम् -  संचार  नूनम् -  खरोखर  सताम् -  साधूंच्या  संरक्षणाय -  संरक्षणाकरिता  च -  आणि  असताम् -  दुष्टांच्या  वधाय -  नाशाकरिता  अस्ति -  आहे ॥५०॥  
 
महाराज, आपण भगवान विष्णूचे पालनशक्तिरूप आहात. म्हणून आपले संचार करणे हे निश्चितच सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठीच आहे. (५०) 
 
योऽर्केन्दु अग्नीन्द्रवायूनां यमधर्मप्रचेतसाम् । 
रूपाणि स्थान आधत्से तस्मै शुक्लाय ते नमः ॥ ५१ ॥ 
चंद्र सूर्य यमो अग्नि इंद्र धर्म वरूणचि । तुमची कार्यरूपे ती नमस्कार तुम्हा असो ॥ ५१ ॥ 
 यः -  जो  स्थाने -  त्या त्या कार्याच्या वेळी  अर्केन्व्दग्नीन्द्रवायूनाम् -  सूर्य , चंद्र, अग्नि इन्द्र व वायु यांची  च -  आणि  यमधर्मप्रचेतसाम् -  यमधर्म व वरुण यांची  रूपाणि -  स्वरूपांना  आधत्से -  धारण करतोस  तस्मै -  त्या  शुक्लाय -  शुक्लवर्ण विष्णूरूप  ते -  तुला  नमः -  नमस्कार  अस्तु -  असो ॥५१॥  
 
आपण साक्षात विष्णुस्वरूप आहात. तसेच निरनिराळ्या कार्यांसाठी सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वायू, यम, धर्म, आणि वरुण इत्यादी रूपे धारण करता. आपणांस नमस्कार असो. (५१) 
 
न यदा रथमास्थाय जैत्रं मणिगणार्पितम् । 
विस्फूर्जत् चण्डकोदण्डो रथेन त्रासयन् अघान् ॥ ५२ ॥ स्वसैन्यचरणक्षुण्णं वेपयन् मण्डलं भुवः । विकर्षन् बृहतीं सेनां पर्यटसि अंशुमानिव ॥ ५३ ॥ तदैव सेतवः सर्वे वर्णाश्रमनिबन्धनाः । भगवद् रचिता राजन् भिद्येरन् बत दस्युभिः ॥ ५४ ॥ अधर्मश्च समेधेत लोलुपैर्व्यङ्कुशैर्नृभिः । शयाने त्वयि लोकोऽयं दस्युग्रस्तो विनङ्क्ष्यति ॥ ५५ ॥ 
रत्नांकित रथाचा त्या घर्घराट निनाद नी । टणत्कार धनुष्याचा पापिया भीति दावितो ॥ ५२ ॥ तुमच्या दळ-सेनेच्या पदाने कंपते भुई । ही विशाल अशी सेना घेउनी फिरत जगीं ॥ ५३ ॥ जर ना करिता ऐसे तर चोरचि माजती । वर्णाश्रमहि मोडोनि अधर्म पसरेल की ॥ ५४ ॥ तुम्ही निश्चिंत होताचि जग हे पापियां करी । पडोनि नष्ट होईल विश्वास टाकिता जगीं ॥ ५५ ॥ 
 विस्फूर्जच्चण्डकोदण्डः -  टणत्कार करणारे व प्रचण्ड आहे धनुष्य ज्याचे असा  रथेन -  रथाने  अघान् -  शत्रूंना  त्रासयन् -  त्रास उत्पन्न करणारा  स्वसैन्यचरणक्षुण्णाम् -  आपल्या सैन्याच्या पायांनी तुडविलेल्या  भुवः -  पृथ्वीच्या  मण्डलम् -  मंडलाला  वेपयन् -  कापविणारा  वृहतीम् -  मोठ्या  सेनाम् -  सेनेला  विकर्षन् -  खेचून नेणारा  त्वम् -  तू  मणिगणार्पितम् -  रत्नांचे समूह आहेत स्थापिलेले ज्यावर अशा  जैत्रम् -  विजयी  रथम् -  रथावर  आस्थाय -  बसून  अंशुमान् इव -  सूर्याप्रमाणे  यदा -  ज्यावेळी  न पर्यटसि -  फिरणार नाहीस ॥५२-५३॥   तदा एव -  त्याच वेळी  राजन् -  हे राजा  वर्णाश्रमनिबन्धनाः -  वर्ण व आश्रम यांच्या आहेत व्यवस्था ज्यामध्ये अशा  भगवद्रचिताः -  श्रीविष्णूंनी निर्माण केलेल्या  सर्वे -  सर्व  सेतवः -  धर्ममर्यादा  दस्युभिः -  शत्रूंनी  भिद्येरन् -  नष्ट होतील  बत -  खरोखर ॥५४॥   त्वयि शयाने -  तू स्वस्थ निजला असता  व्यङ्कुशैः -  निरंकुश अशा  लोलुपैः -  विषयलंपट  नृभिः -  मनुष्यांकडून  अधर्मः -  अधर्म  समेधेत -  वाढेल  च -  आणि  अयं लोकः -  हे जग  दस्युग्रस्तः -  शत्रूंना ग्रासलेले असे  विनंक्ष्यति -  नष्ट होईल ॥५५॥  
 
आपण रत्नजडित विजयी रथावर आरूढ होऊन आपल्या तेजस्वी प्रचंड धनुष्याचा टणत्कार करीत त्या रथाच्या गडगडाटानेसुद्धा पापी लोकांना भय उत्पन्न करता आणि आपल्या सेनेच्या पायांनी रगडलेल्या भूमंडलाचा थरकाप करीत आपल्या त्या विशाल सेनेला बरोबर घेऊन पृथ्वीवर सूर्यासारखे भ्रमण करता. आपण असे केले नाही तर भगवंतांनी निर्माण केलेल्या वर्णाश्रमधर्माची मर्यादा चोर, डाकू, इत्यादी तत्काळ नाहीशी करतील आणि विषयलोलुप निरंकुश मानवांच्या द्वारे सगळीकडे अधर्माचा प्रसार होईल. जर आपण जगाच्या बाबतीत निष्काळजी झालात तर हे जग दुराचारी लोकांच्या तावडीत सापडून नष्ट होईल. (५२-५५) 
 
अथापि पृच्छे त्वां वीर यदर्थं त्वं इहागतः । 
तद्वयं निर्व्यलीकेन प्रतिपद्यामहे हृदा ॥ ५६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥ 
वीरवर तरी तुम्ही येण्याचे ते प्रयोजन । सांगावी मजला आज्ञा हर्षे पाळीन मी तशा ॥ ५६ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ ॥ एक्केविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २१ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥ 
 वीर -  हे शूरा  अथ अपि -  असे असताहि  यदर्थम् -  ज्याच्याकरिता  त्वम् -  तू  इह -  येथे  आगतः -  आलास  तत् -  ते  वयम् -  आम्ही  निर्व्यलीकेन हृदा -  निष्कपट अंतःकरणाने  प्रतिपद्यामहे -  स्वीकारू ॥५६॥  
 
तरीसुद्धा वीरवर, मी आपल्याला विचारतो की, यावेळी आपले कोणत्या कारणाने इथे आगमन झाले आहे ? आपण मला आज्ञा करावी. तिचा मी निष्कपट भावाने स्वीकार करीन. (५६) 
 
स्कंध तिसरा - अध्याय एकविसावा समाप्त  |