![]()  | 
|  
 
श्रीमद् भागवत पुराण  ब्रह्मकृतविविधसृष्टिवर्णनम् - ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन - संहिता  -  अन्वय  -  अर्थ  समश्लोकी - मराठी 
शौनक उवाच -  
महीं प्रतिष्ठामध्यस्य सौते स्वायम्भुवो मनुः । कानि अन्वतिष्ठद् द्वाराणि मार्गाय अवर जन्मनाम् ॥ १ ॥ 
शौनकांनी विचारिले -  ( अनुष्टुप् ) पृथ्वीचा घेउनी थारा स्वायंभूव मनू तदा । संतती निर्मिण्यासाठी करिता काय जाहला ॥ १ ॥ 
 सौते -  हे रोमहर्षणपुत्रा सूता  स्वायम्भुवः -  ब्रह्मदेवाचा पुत्र  मनुः -  मनु  महीम् -  पृथ्वीरूप  प्रतिष्ठाम् -  स्थानाला  अध्यस्य -  प्राप्त होऊन  अवरजन्मनाम् -  अर्वाचीन आहे उत्पत्ति ज्यांची अशा प्राण्यांच्या  मार्गाय -  उत्पत्तीकरिता  कानि -  कोणते  द्वाराणि -  उपाय  अन्वतिष्ठत् -  करता झाला ॥१॥  
 
शौनक म्हणाले - सूतमहोदय, पृथ्वीचा आधार मिळाल्यावर स्वायंभुव मनूने पुढे संतती उत्पन्न करण्यासाठी कोण-कोणते उपाय अवलंबिले ? (१) 
 
क्षत्ता महाभागवतः कृष्णस्यैकान्तिकः सुहृत् । 
यस्तत्याजाग्रजं कृष्णे सापत्यं अघवानिति ॥ २ ॥ 
विदूर भगवद्भक्त होते ते हरिचे सुह्रद् ।  बंधू नी पुतणे त्यागी कृष्णद्वेष्टे म्हणोनिया ॥ २ ॥ 
 क्षत्ता -  विदुर  महाभागवतः -  मोठा भगवद्भक्त  कृष्णस्य -  श्रीकृष्णाचा  ऐकान्तिकः -  अत्यन्त  सुहृत् -  मित्र  आसीत् -  होता  यः -  जो  सापत्यम् -  पुत्रासहित  अग्रजम् -  ज्येष्ठ बंधु अशा धृतराष्ट्राला  कृष्णे -  श्रीकृष्णाचे ठिकाणी  अघवान् -  अपराधी  अस्ति -  आहे  इति -  यास्तव  तत्याज -  त्यागिता झाला ॥२॥  
 
विदुर मोठा भगवद्भक्त आणि भगवान श्रीकृष्णांचा अनन्य सुहृद होता. म्हणून तर त्याने आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांनी भगवान श्रीकृष्णांचा अनादर केल्यामुळे त्यांना अपराधी समजून त्यांचा त्याग केला होता. (२) 
 
द्वैपायनादनवरो महित्वे तस्य देहजः । 
सर्वात्मना श्रितः कृष्णं तत्परांश्चाप्यनुव्रतः ॥ ३ ॥ 
व्यासांचे पुत्र ते होते महिमा श्रेष्ठही तसा ।  भगद्भक्त नी त्यांना कृष्णाचा आश्रयो असे ॥ ३ ॥ 
 महित्वे -  महिम्यात  कृष्णव्दैपायनात् -  व्यासाहून  अनवरः -  अन्यून असा  तस्य -  त्या व्यासाचा  देहजः -  पुत्र असा  सः -  तो विदुर  सर्वात्मना -  सर्वस्वी  कृष्णम् -  श्रीकृष्णाला  श्रितः -  अवलंबणारा  च -  आणि  तत्परान् अपि -  श्रीकृष्ण आहे श्रेष्ठ ज्यांना अशा भक्तांनाही  अनुव्रतः -  अनुसरणारा असा  आसीत् -  होता ॥३॥  
 
तो महर्षी द्वैपायनांचा पुत्र होता आणि महत्तेत कोणत्याही प्रकारे त्यांच्यापेक्षा कमी नव्हता. तसेच तो सर्व प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा आश्रित आणि कृष्णभक्तांचा अनुयायी होता. (३) 
 
किं अन्वपृच्छन् मैत्रेयं विरजास्तीर्थसेवया । 
उपगम्य कुशावर्त आसीनं तत्त्ववित्तमम् ॥ ४ ॥ 
तीर्थाटनातही शुद्धी चित्ताची जास्त जाहली ।  मैत्रैयाला हरिद्वारी आणखी काय तो पुसे ॥ ४ ॥ 
 तीर्थसेवया -  तीर्थाच्या सेवेने  विरजाः -  गेले आहे पाप ज्याचे असा  सः -  तो विदुर  तत्त्ववित्तमम् -  तत्त्वज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ अशा  कुशावर्ते -  हरिव्दारात  आसीनम् -  बसलेल्या अशा  मैत्रेयम् -  मैत्रेय ऋषीला  उपसङ्गम्य -  भेटून  किम -  काय  अन्वपृच्छत् -  विचारिता झाला ॥४॥  
 
तीर्थयात्रा केल्याने त्याचे अंतःकरण आणखीच शुद्ध झाले होते. त्याने कुशावर्तक्षेत्रात (हरिद्वार) राहणार्या तत्त्वज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ अशा मैत्रेयांकडे जाऊन आणखी काय विचारले ? (४) 
 
तयोः संवदतोः सूत प्रवृत्ता ह्यमलाः कथाः । 
आपो गाङ्गा इवाघघ्नीः हरेः पादाम्बुजाश्रयाः ॥ ५ ॥ 
हरीच्या चरणा ठेवी ऐशा त्यांच्यातल्या कथा ।  विष्णुपादौदकी गंगा तैशा पावन पुण्यदा ॥ ५ ॥ 
 हि -  कारण  तयोः संवदतोः -  मैत्रेय ऋषि व विदुर बोलू लागले असता  नूनम् -  निश्चयाने  अमलाः -  पवित्र अशा  कथाः -  कथा  प्रवृत्ताः -  सुरू झाल्या  स्युः -  असाव्या  तः -  त्या  हरेः -  श्रीकृष्णाच्या  पादाम्बुजाश्रयाः -  पादकमलांचा आहे आश्रय ज्यांना अशा  गाङ्गाः -  गंगेची  आपः इव -  उदकांप्रमाणे  अघघ्रीः -  पापांचा नाश करणार्या  सन्ति -  आहेत ॥५॥  
 
सूतमहोदय, त्या दोघांच्या वार्तालापात श्रीहरींच्या चरणांचा संबंध असलेल्या पवित्र कथा आल्या असतील. ज्या त्यांच्या चरणांपासून निघालेल्या गंगाजलाप्रमाणे संपूर्ण पापांचा नाश करणार्या आहेत. (५) 
 
ता नः कीर्तय भद्रं ते कीर्तन्योदारकर्मणः । 
रसज्ञः को नु तृप्येत हरिलीलामृतं पिबन् ॥ ६ ॥ 
(व्यासजी सांगतात)  शुभम् भवतु हो सूता ऐकवा पुढल्या कथा । कीर्तनीय अशा लीला रसिंका तृप्ति ना कधी ॥ ६ ॥ 
 कीर्तन्योदारकर्पणः -  वर्णनीय व उदार आहेत लीला ज्याच्या अशा  हरेः -  श्रीकृष्णाच्या  लीलामृताम् -  कथामृताला  पिबन् -  पिणारा  रसज्ञः -  रसज्ञ  कः -  कोण  अनुतृप्येत -  तृप्त होईल  अतः -  म्हणून  ताः -  त्या कथा  नः -  आम्हाला  कीर्तय -  सांग  ते -  तुझे  भद्रम् -  कल्याण  अस्तु -  असो ॥६॥  
 
सूतमहोदय, आपले कल्याण असो. आपण आम्हांला भगवंतांच्या त्या पवित्र कथा ऐकवा. प्रभूंचे उदार चरित्र तर कीर्तन करण्यायोग्य असतेच. जो श्रीहरींच्या लीलामृताचे पान करून तृप्त होईल, असा कोणी रसिक असेल काय ? (६)
 
एवं उग्रश्रवाः पृष्ट ऋषिभिः नैमिषायनैः । 
भगवति अर्पिताध्यात्मः तान् आह श्रूयतामिति ॥ ७ ॥ 
नैमिषारण्यवासी त्या मुनींनी पुसल्यावरी ।  ध्यानात चित्त लावोनी ऐका जे सुत बोलले ॥ ७ ॥ 
 नैमिषायनैः -  नैमिषारण्यात राहणार्या  ऋषिभिः -  ऋषींनी  एवम् -  याप्रमाणे  पृष्टः -  प्रश्न केलेला  भगवति -  श्रीकृष्णाच्या ठिकाणी  अर्पिताध्यात्मः -  अर्पिले आहे मन ज्याने असा  उग्रश्रवाः -  सूत  तान् -  त्या ऋषींना  श्रूयताम् -  श्रवण करावे  इति -  असे  आह -  म्हणाला ॥७॥  
 
नैमिषारण्यात निवास करणार्या मुनींनी अशाप्रकारे विचारल्यानंतर उग्रश्रवा सूतांनी भगवंतांच्या ठिकाणी चित्त एकाग्र करून ते त्यांना म्हणाले, ‘ऐका.’ (७)
 
सूत उवाच -  
हरेर्धृतक्रोडतनोः स्वमायया निशम्य गोरुद्धरणं रसातलात् । लीलां हिरण्याक्षमवज्ञया हतं सञ्जातहर्षो मुनिमाह भारतः ॥ ८ ॥ 
सूतजी सांगतात - ( इंद्रवज्रा )  वराहरुपास धरोनि पृथ्वी काढीयली नी वधिलेहि दैत्या । जै बाळ खेळे करि बाहुल्यांशी विदूर ऐकोनि पुसे पुढे हे ॥ ८ ॥ 
 भारतः -  विदुर  स्वमायया -  आपल्या मायेच्या योगाने  धृतक्रोडतनोः -  धारण केले आहे वराहशरीर ज्याने अशा  हरेः -  श्रीकृष्णाच्या  रसातलात् -  रसातलातून  गोः -  पृथ्वीच्या  उद्धरणम् -  उद्धाररूप  लीलाम् -  लीलेला  च -  आणि  अवज्ञया -  आदराने  हतम् -  मारलेल्या  हिरण्याक्षम् -  हिरण्याक्षाला  निशम्य -  ऐकून  संजातहर्षः -  उत्पन्न झाला आहे हर्ष ज्याला अशा  मुनिम्-  मैत्रेय ऋषीला  आह -  म्हणाला ॥८॥  
 
सूत म्हणाले - आपल्या मायेने वराहरूप धारण करणार्या श्रीहरींच्या रसातळातून पृथ्वीला वर काढणे आणि सहज तुच्छतेने हिरण्याक्षाला मारून टाकणे, या लीला ऐकून विदुराला फार आनंद झाला आणि तो मैत्रेयांना म्हणाला. (८)
 
विदुर उवाच -  
प्रजापतिपतिः सृष्ट्वा प्रजासर्गे प्रजापतीन् । किं आरभत मे ब्रह्मन् प्रब्रूह्यव्यक्तमार्गवित् ॥ ९ ॥ 
विदुरजी म्हणाले - ( अनुष्टुप् )  ब्रम्हन्! परोक्षही ज्ञान तुम्ही ते सांगणे पुढे । वाढण्या सृष्टि विस्तार ब्रह्म्याने काय योजिले ॥ ९ ॥ 
 ब्रह्मन् -  हे ब्रह्मज्ञे ऋषे  अव्यक्तमार्गवित् -  परमेश्वराच्या सृष्टिपद्धतीला जाणणारा  प्रजापतिपतिः -  प्रजापतींचा अधिपति  प्रजासर्गे -  सृष्टीच्या आरंभी  प्रजापतीन् -  प्रजापतीना  सृष्ट्वा -  उत्पन्न करून  किम् -  कोणते कार्य  आरभत -  आरंभिता झाला  तत् -  ते  मे -  मला  प्रब्रूहि -  सांगा ॥९॥  
 
विदुर म्हणाला- हे ब्रह्मन, आपण दृष्टीआड असलेल्या विषयांनाही जाणणारे आहात. म्हणून प्रजापतींचे पती ब्रह्मदेवांनी मरीची आदी प्रजापतींना उत्पन्न करून सृष्टी वाढविण्यासाठी काय केले ते सांगा. (९) 
 
ये मरीच्यादयो विप्रा यस्तु स्वायम्भुवो मनुः । 
ते वै ब्रह्मण आदेशात् कथं एतद् अभावयन् ॥ १० ॥ 
मरिचादि मुनिंनी मनू स्वायंभुवे तदा ।  ब्रह्म्याची घेउनी आज्ञा कैसी वाढविली प्रजा ॥ १० ॥ 
 ये -  जे  मरीच्यादयः -  मरीचीप्रभृति  विप्राः -  ब्राह्मण  यः -  जो  तु -  तर  स्वायम्भुवः -  स्वायंभुवनामक  मनुः -  मनु  ते -  ते  ब्रह्मणः -  ब्रह्मदेवाच्या  आदेशात् -  आज्ञेने  वै -  खरोखर  एतत् -  हे जग  कथम् -  कसे  अभावयन् -  उत्पन्न करते झाले ॥१०॥  
 
मरीची आदी मुनीश्वरांनी आणि स्वायंभुव मनूने सुद्धा ब्रह्मदेवांच्या आज्ञेने कशा प्रकारे प्रजेची वृद्धी केली ? (१०) 
 
सद्वितीयाः किमसृजन् स्वतन्त्रा उत कर्मसु । 
आहो स्वित्संहताः सर्व इदं स्म समकल्पयन् ॥ ११ ॥ 
पत्न्यांच्या सहयोगाने किंवा ते वेगळे असे ।  की एकत्र प्रजा त्यांनी निर्मिली रचण्या जगा ॥ ११ ॥ 
 सव्दितीयाः -  स्त्रियांसहित ते  किम् -  काय  असृजन् -  उत्पन्न करते झाले  उत -  किंवा  कर्मसु -  सृष्टीकर्मामध्ये  स्वतन्त्राः -  स्त्रियांची अपेक्षा न ठेवणारे असे  आहोस्वित् -  किंवा  सर्वे -  सर्व  संहताः -  एकत्र मिळालेले असे  इदम् -  ह्या सर्व जगाला  समकल्पयन् स्म -  निर्माण करते झाले ॥११॥  
 
त्यांनी हे जग पत्नीच्या सहयोगाने उत्पन्न केले की आपापल्या कार्यात स्वतंत्र राहून किंवा सर्वांनी मिळून या जगाची रचना केली ? (११)  
 
मैत्रेय उवाच -  
दैवेन दुर्वितर्क्येण परेणानिमिषेण च । जातक्षोभाद् भगवतो महान् आसीद् गुणत्रयात् ॥ १२ ॥ 
मैत्रैयजी म्हणाले -  अतर्क्य गति ती त्याची दैव काल नि नीयती । हेतुने क्षोभ होवोनी महत्तत्वचि जन्मले ॥ १२ ॥ 
 दुर्वितर्क्येण -  तर्क करण्यास अशक्य अशा  दैवेन -  जीवांच्या अदृष्ट कर्मांच्या योगाने  परेण -  प्रकृतिनियन्त्या परमेश्वराच्या योगाने  च -  आणि  अनीमिषेण -  कालाच्या योगाने  भगवतः -  निर्विकार परमेश्वरापासून  जातक्षोभात् -  उत्पन्न झाला आहे क्षोभ ज्यामध्ये अशा  गुणत्रयात् -  प्रधानापासून  महान् -  महतत्त्व  आसीत् -  उत्पन्न झाले ॥१२॥  
 
 मैत्रेय म्हणाले - विदुरा, तर्कापलीकडे असणारे जीवांचे प्रारब्ध, प्रकृतीचे नियंता पुरुष आणि काल या तीन हेतूंनी, तसेच भगवंतांच्या सान्निध्याने त्रिगुणमय प्रकृतीत क्षोभ उत्पन्न झाल्यावर त्यातून महत्तत्त्व उत्पन्न झाले. (१२) 
 
रजःप्रधानान् महतः त्रिलिङ्गो दैवचोदितात् । 
जातः ससर्ज भूतादिः वियदादीनि पञ्चशः ॥ १३ ॥ 
दैवाच्या प्रेरणे सत्व राजसी तामसी असा । प्रगटला अंहकार पाचांचे वार्ग जाहले ॥ १३ ॥ 
 दैवचोदितात् -  अदृष्टाने प्रेरित अशा  रजःप्रधानात् -  रजोगुण आहे अधिक ज्यामध्ये अशा  महतः -  महत्तत्त्वापासून  जातः -  उत्पन्न झालेला  त्रिलिङ्गः -  त्रिगुणात्मक अहंकार  भूतादिः -  सूक्ष्म पंचभूतांना कारण असा  पञ्चशः -  पाच प्रकाराने  वियदादीनि -  सूक्ष्म भूते, महाभूते, ज्ञानेन्द्रिय व कर्मेन्द्रिये व त्यांच्या त्यांच्या देवता ह्यांना  ससर्ज -  उत्पन्न करिता झाला ॥१३॥  
 
दैवाच्या प्रेरणेने रजःप्रधान महत्तत्त्वापासून सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला. त्याने आकाशादी पाच पाच तत्त्वांचे अनेक वर्ग प्रगट केले. (१३) 
 
तानि चैकैकशः स्रष्टुं असमर्थानि भौतिकम् । 
संहत्य दैवयोगेन हैमं अण्डं अवासृजन् ॥ १४ ॥ 
स्वतंत्र राहुनी कोष रचण्या ते समर्थ ना । भगवत् शक्तिने एकसंघ ते जाहले तदा ॥ सुवर्णवर्ण अंड्याला रचिले विश्व निर्मिण्या ॥ १४ ॥ 
 च -  आणि  एकैकशः -  पृथकपृथक्  स्त्रष्टुम् -  उत्पन्न करण्याकरिता  असमर्थानि -  असमर्थ अशी  तानि -  देवता, भूते व इन्द्रिये  दैवयोगेन -  अदृष्ट कर्माच्या योगाने  संहत्य -  एकत्र होऊन  भौतिकम् -  भूतांचे  हैमम् -  सुवर्णमय  अण्डम् -  अण्ड्याला  अवासृजन् -  उत्पन्न करती झाली ॥१४॥  
 
ते सर्वजण वेगवेगळे राहून भूतांच्या कार्यरूप ब्रह्मांडाची रचना करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी भगवंतांच्या शक्तीने एकमेकांशी संगठित होऊन एका सोन्याच्या रंगाच्या अंडयाची रचना केली. (१४) 
 
सोऽशयिष्टाब्धिसलिले आण्डकोशो निरात्मकः । 
साग्रं वै वर्षसाहस्रं अन्ववात्सीत् तं ईश्वरः ॥ १५ ॥ 
हजार वर्ष पर्यंत जळात अंड राहिले । पुन्हा तो भगवान् त्यात प्रविष्ट जाहला स्वयें ॥ १५ ॥ 
 निरात्मकः -  चैतन्यरहित असा  सः -  तो  आण्डकोशः -  अण्डकोश  अब्धिसलिले -  समुद्राच्या पाण्यात  साग्रं -  संपूर्ण  वर्षसाहस्त्रम् -  हजार वर्षे  वै -  खरोखर  अशयिष्ट -  राहिला  ईश्वरः -  परमेश्वर  तम् -  त्यामध्ये  अन्ववात्सीत् -  प्रवेश करिता झाला ॥१५॥  
 
ते अंडे चेतनाशून्य अवस्थेमध्ये एक हजार वर्षांपेक्षाही अधिक काळपर्यंत समुद्राच्या जलामध्ये पडून रहिले. नंतर त्यात श्रीभगवंतांनी प्रवेश केला. (१५) 
 
तस्य नाभेरभूत्पद्मं सहस्रार्कोरुदीधिति । 
सर्वजीवनिकायौको यत्र स्वयं अभूत्स्वराट् ॥ १६ ॥ 
तिथे नाभीत त्याच्याते हजारो सूर्य ते जसे । पद्म निष्पन्न झाले ज्या जगाचा समुदायची ॥ ब्रह्माही त्या समूदायी निष्पन्न झाले तदा ॥ १६ ॥ 
 तस्य -  त्या ईश्वराच्या  नाभेः -  नाभीपासून  सहस्त्रार्कोरुदीधिति -  हजार सूर्याप्रमाणे आहे मोठे तेज ज्यांचे असे  सर्वजीवनिकायौकः -  सर्व जीवसमुदायांचे स्थान असे  पद्मम् -  कमळ  अभूत् -  उत्पन्न झाले  यत्र -  ज्या कमळामध्ये  स्वराट् -  ब्रह्मदेव  स्वयम् -  स्वतः  अभूत् -  उत्पन्न झाला ॥१६॥  
 
त्यात अधिष्ठित झाल्यानंतर त्यांच्या नाभीपासून हजार सूर्यांच्या तेजासमान अत्यंत दैदीप्यमान असे एक कमळ प्रगट झाले. ते संपूर्ण जीवसमुदायांचे आश्रयस्थान होते. स्वतः ब्रह्मदेवांचा त्यातूनच आविर्भाव झाला. (१६)
 
सोऽनुविष्टो भगवता यः शेते सलिलाशये । 
लोकसंस्थां यथा पूर्वं निर्ममे संस्थया स्वया ॥ १७ ॥ 
ब्रह्मांड गर्भरूपात ब्रह्म्याच्या हृदयामध्ये । प्रवेशला हरी जेंव्हा ब्रह्मा उद्योगि लागला ॥ १७ ॥ 
 यः -  जो  सलिलाशये -  गर्भोदकात  शेते -  शयन करतो  तेन -  त्या  भगवता -  परमेश्वराने  अनुविष्टः -  अधिष्ठान केलेला  सः -  तो ब्रह्मदेव  यथापूर्वम् -  पूर्व कल्पाप्रमाणे  लोकसंस्थाम् -  लोकरचनेला  स्वया -  आपल्या  संस्थया -  नामरूप इत्यादिकांनी  निर्ममे -  निर्माण करिता झाला ॥१७॥  
 
जेव्हा ब्रह्मांडाच्या गर्भरूप जलात शयन करणार्या श्रीनारायणदेवांनी ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी पूर्वकल्पामध्ये आपणच निश्चित केलेल्या नाम-रूपमय व्यवस्थेनुसार लोकांची रचना करण्यास सुरुवात केली. (१७) 
 
ससर्ज च्छाययाविद्यां पञ्चपर्वाणमग्रतः । 
तामिस्रं अन्धतामिस्रं तमो मोहो महातमः ॥ १८ ॥ 
तामिश्र अंधतामिश्र तम मोहा सवे महा । मोह या पाच अविद्या छायेने निर्मिले तये ॥ १८ ॥ 
 ब्रह्मा -  ब्रह्मदेव  अग्रतः -  प्रथम  तमिस्त्रम् -  तमिस्त्र  अन्धतामिस्त्रम् -  अन्धतामिस्त्र  तमः -  तम  मोहः -  मोह  महातमः -  महामोह  इति -  अशी  पञ्चपर्वाणम् -  पञ्चपर्वा नावाच्या  अविद्याम् -  अविद्येला  छायया -  अज्ञानाने  ससर्ज -  उत्पन्न करिता झाला ॥१८॥  
 
सर्वप्रथम त्यांनी आपल्या छायेपासून तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह आणि महामोह, अशी पाच प्रकारची अविद्या उत्पन्न केली. (१८) 
 
विससर्जात्मनः कायं नाभिनन्दन् तमोमयम् । 
जगृहुर्यक्षरक्षांसि रात्रिं क्षुत्तृट्समुद्भवाम् ॥ १९ ॥ 
तममिश्रित तो देह ब्रह्म्याला नच रूचला । त्यागिता देह तो त्याला भूक तृष्णाचि लागली । रात्ररूप शरीराला भक्षिले दानवे तदा ॥ १९ ॥ 
 ब्रह्मा -  ब्रह्मदेव  तमोमयम् -  अज्ञानमय अशा  तं सर्गम् -  त्या सृष्टीला  न अभिनन्दन् -  पसंत न करणारा असा  आत्मनः -  आपल्या  कायम् -  शरीराला  विससर्ज -  त्यागिता झाला  तत् -  ते शरीर  रात्रिः -  रात्रिस्वरूप  अभूत् -  झाले  ततः -  त्या रात्रीपासून  जातानि -  उत्पन्न झालेले  यक्षरक्षांसि -  यक्ष व राक्षस  क्षुत्तृट्समुद्भवाम् -  क्षुधा व तृषा यांची उत्पत्ति जीमध्ये अशा  रात्रिम् -  रात्रीला  जगृहुः -  ग्रहण करिते झाले ॥१९॥  
 
आपले हे तमोगुणी शरीर ब्रह्मदेवांना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला. ज्याच्यामुळे तहान-भुकेची उत्पत्ती होते अशा त्या रात्रिरूप शरीराला त्या शरीरापासूनच उत्पन्न झालेल्या यक्ष आणि राक्षसांनी ग्रहण केले. (१९) 
 
क्षुत्तृड्भ्यां उपसृष्टास्ते तं जग्धुमभिदुद्रुवुः । 
मा रक्षतैनं जक्षध्वं इति ऊचुः क्षुत्तृडर्दिताः ॥ २० ॥ 
धावले जधि ते दैत्य भुकेने व्याकुळा असे । ब्रह्म्याला पाहुनी सारे खा खा रे पकडोनिया ॥ २० ॥ 
 क्षुतृड्भ्याम् -  क्षुधा व तृषा यांनी पीडलेले असे  ते -  ते यक्ष व राक्षस  तम् -  त्या ब्रह्मदेवाला  जग्धुम् -  खाण्याकरिता  अभिदुद्रुवः -  धावून आले  क्षुत्तृडर्दिताः -  क्षुधा व तृषा यांनी पीडिलेले असे  एनम् -  ह्या ब्रह्मदेवाचे  मा रक्षत -  रक्षू नका  जक्षध्वम् -  खाऊन टाका  इति -  याप्रमाणे  ऊचुः -  बोलते झाले ॥२०॥  
 
त्यावेळी तहान-भूक लागल्याने ते ब्रह्मदेवांनाच खायला उठले आणि म्हणू लागले, "याला ठेवू नका, खाऊन टाका," कारण ते तहान-भुकेने व्याकूळ झाले होते. (२०) 
 
देवस्तानाह संविग्नो मा मां जक्षत रक्षत । 
अहो मे यक्षरक्षांसि प्रजा यूयं बभूविथ ॥ २१ ॥ 
घाबरे बोलले ब्रह्मा अहो यक्ष नि राक्षसा ।  लेकरे तुम्हि माझे की रक्षा भक्षू नका मज ॥ २१ ॥ 
 देवः -  ब्रह्मदेव  संविग्नः -  घाबरलेला असा  तान् -  त्या यक्षराक्षसांना  आह -  म्हणाला  माम् -  मला  मा जक्षत -  खाऊ नका  रक्षत -  रक्षण करा  अहो -  अहो  यक्षरक्षांसि -  यक्षराक्षसांनो  यूयम् -  तुम्ही  मे -  माझे  प्रजाः -  पुत्र  बभूविथ -  झाला आहात ॥२१॥  
 
घाबरून जाऊन ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, "अरे यक्ष-राक्षसांनो ! तुम्ही माझे संतान आहात. म्हणून माझे भक्षण करू नका, माझे रक्षण करा," (त्यांपैकी "खाऊन टाका" असे जे म्हणाले, त्यांना राक्षस असे नाव पडले.) (२१)
 
देवताः प्रभया या या दीव्यन् प्रमुखतोऽसृजत् । 
ते अहार्षुर्देवयन्तो विसृष्टां तां प्रभामहः ॥ २२ ॥ 
ब्रह्माजी सात्विकी तेजे दैदिप्यमान होउनी ।  निर्मिल्या देवता श्रेष्ठ प्रकाश दिन त्या अशा ॥ २२ ॥ 
 दीव्यन् -  प्रकाशणारा  सः -  तो ब्रह्मदेव  प्रभया -  कान्तीने  याः याः -  ज्या ज्या  देवताः -  देवांना  प्रमुखतः -  प्राधान्याने  असृजत् -  उत्पन्न करता झाला  ते -  ते देव  विसृष्टाम् -  टाकलेल्या  ताम् -  त्या  अहः -  दिवसरूप  प्रभाम् -  प्रभेला  देवयन्तः -  खेळविणारे  अहार्षुः -  स्वीकार करते झाले ॥२२॥  
 
नंतर ब्रह्मदेवांनी सत्त्वगुणाच्या प्रभावाने दैदीप्यमान होऊन मुख्य मुख्य देवतांची निर्मिती केली. त्यांनी खेळता-खेळता, ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या दिवसांचे प्रकाशमय शरीर ग्रहण केले. (२२) 
 
देवोऽदेवाञ्जघनतः सृजति स्मातिलोलुपान् । 
ते एनं लोलुपतया मैथुनायाभिपेदिरे ॥ २३ ॥ 
पुन्हा ब्रह्मेचि मांड्यांनी असुरा निर्मिले असे ।  काम लोलूप त्या दैत्ये मैथुना विधि इच्छिला ॥ २३ ॥ 
 देवः -  ब्रह्मदेव  जघनतः -  कमरेच्या पुढच्या भागापासून  अतिलोलुपान् -  अत्यन्त विषयलोलुप अशा  अदेवान् -  दैत्यांना  सृजति स्म -  उत्पन्न करता झाला  ते -  ते दैत्य  लोलुपतया -  विषयलोलुपतेमुळे  एनम् -  ह्या ब्रह्मदेवाप्रत  मैथुनाय -  मैथुनाकरिता  अभिपेदिरे -  प्राप्त झाले ॥२३॥  
 
यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या नितंबापासून कामासक्त अशा असुरांना उत्पन्न केले. ते अत्यंत कामलोलुप असल्याने उत्पन्न होताच मैथुनासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. (२३) 
 
ततो हसन् स भगवान् असुरैर्निरपत्रपैः । 
अन्वीयमानस्तरसा क्रुद्धो भीतः परापतत् ॥ २४ ॥ 
पाहुनी हासला ब्रह्मा निर्लज्ज परि दैत्य ते ।  पाठिसी लागले तेंव्हा पळाले क्रोध नी भये॥ २४ ॥ 
 ततः -  नंतर  हसन् -  हास्य करणारा असा  सः -  तो  भगवान् -  ब्रह्मदेव  निरपत्रपैः -  निर्लज्ज अशा  असुरैः -  दैत्यांनी  अन्वीयमानः -  पाठलाग केलेला असा  क्रुद्धः -  रागावलेला  भीतः -  भ्यालेला  तरसा -  वेगाने  परापतत् -  पळू लागला ॥२४॥  
 
हे पाहून पहिल्यांदा त्यांना हसू आले. परंतु पुन्हा ते निर्लज्ज असुर आपला पाठलाग करीत आहेत हे पाहून भयभीत आणि क्रुद्ध होऊन ते वेगाने पळू लागले. (२४) 
 
स उपव्रज्य वरदं प्रपन्नार्तिहरं हरिम् । 
अनुग्रहाय भक्तानां अनुरूपात्मदर्शनम् ॥ २५ ॥ 
भक्तवत्सल जो विष्णु वरदायक श्रीहरी ।  त्यापाशी धाउनी गेले आणि त्या बोलले असे ॥ २५ ॥ 
 सः -  तो ब्रह्मदेव  प्रपन्नार्तिहरम् -  शरणागतांचे दुःख हरण करणार्या अशा  पदम् -  वर देणार्या अशा  भक्तानाम् -  भक्तांवर  अनुग्रहाय -  अनुग्रह करण्याकरिता  अनुरूपात्मदर्शनम् -  योग आहे दर्शन ज्यांचे अशा  हरिम् -  श्रीकृष्णाला  उपव्रज्य -  भेटून ॥२५॥  
 
तेव्हा भक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांच्या भावानुसार दर्शन देणार्या, शरणागतवत्सल, वरदायक अशा श्रीहरींच्याकडे जाऊन ते म्हणाले. (२५) 
 
पाहि मां परमात्मंस्ते प्रेषणेनासृजं प्रजाः । 
ता इमा यभितुं पापा उपाक्रामन्ति मां प्रभो ॥ २६ ॥ 
परमात्मन् मला रक्षी आज्ञा मी पाळिली तुझी ।  परंतु पापि हे लोक मलाच त्रासिती पहा ॥ २६ ॥ 
 परमात्मन् -  हे परमेश्वरा  माम् -  मला  पाहि -  राख  ते -  तुझ्या  प्रेषणेन -  आज्ञेने  प्रजाः -  प्रजा  असृजम् -  उत्पन्न केल्या  प्रभो -  प्रभो  पापाः -  पापी अशा  ताः -  त्या  इमाः -  ह्या  यभितुम् -  मैथुन करण्याकरिता  माम् -  मला  उपक्रामन्ति -  धरीत आहेत ॥२६॥  
 
हे परमात्म्या, माझे रक्षण करा ! मी आपल्याच आज्ञेने प्रजा उत्पन्न केली होती, परंतु ती तर पापी प्रजा माझ्याशीच मैथुनाला प्रवृत्त झाली आहे. (२६) 
 
त्वमेकः किल लोकानां क्लिष्टानां क्लेशनाशनः । 
त्वमेकः क्लेशदस्तेषां अनासन्न पदां तव ॥ २७ ॥ 
एकमात्र तुम्ही नाथा दुःख्यांचे दुःख नासिता ।  अभक्तास तसे तुम्ही क्लेश नी दुःख देतसा ॥ २७ ॥ 
 क्लिष्टानाम् -  दुःखी अशा  लोकानाम् -  लोकांच्या  क्लेशनाशनः -  दुःखांचा नाश करणारा असा  त्वम् -  तू  एकः -  एक  किल -  प्रसिद्ध  असि -  आहेस  तव -  तुझे  अनासन्नपदाम् -  प्राप्त केले नाहीत चरण ज्यांनी अशा  तेषाम् -  लोकांना  क्लेशदः -  क्लेश देणारा असा  एकः -  एक  त्वम् -  तू  असि -  आहेस ॥२७॥  
 
नाथ, आपणच एकमेव दुःखी जीवांचे दुःख दूर करणारे आहात आणि जे आपल्या चरणांना शरण येत नाहीत, त्यांना दुःख देणारेही एकमात्र आपणच आहात. (२७)
 
सोऽवधार्यास्य कार्पण्यं विविक्ताध्यात्मदर्शनः । 
विमुञ्चात्मतनुं घोरां इत्युक्तो विमुमोच ह ॥ २८ ॥ 
जाणितो हृदयी ईश ब्रह्म्याला पाहता वदे ।  कामलुप्त असे हेही शरीर त्याग तू त्वरे ॥ ऐकता भगवद् इच्छा ब्रह्म्याने त्यागिली तनू ॥ २८ ॥ 
 विविक्ताध्यात्मदर्शनः -  निःसंशय आहे दुसर्याच्या अन्तकरणाचे ज्ञान ज्याला असा  सः -  तो श्रीविष्णु  अस्य -  ह्या ब्रह्मदेवाचे  कार्पण्यम् -  दैन्याला  अवधार्य -  जाणून  घोराम् -  कामाने दूषित झालेल्या  आत्मतनुम् -  आपल्या शरीराला  विमुञ्च -  सोडून दे  इति -  असे  उक्तः -  सांगितलेला  सः ताम् -  तो ब्रह्मदेव त्या शरीराला  विमुमोच ह -  त्यागिता झाला ॥२८॥  
 
भगवान तर प्रत्यक्ष सर्वांचे हृदय जाणणारे आहेत. ब्रह्मदेवाची व्याकूळ स्थिती पाहून ते म्हणाले, "तू आपल्या या कामकलुषित शरीराचा त्याग कर !" भगवंतांनी असे म्हणताच त्यांनी ते शरीर सोडून दिले. (शरीराचा त्याग करणे म्हणजे ती भावना टाकणे आणि शरीर ग्रहण करणे म्हणजे ती भावना ग्रहण करणे.) (२८)
 
तां क्वणच्चरणाम्भोजां मदविह्वल लोचनाम् । 
काञ्चीकलापविलसद् दुकूलत् छन्न रोधसम् ॥ २९ ॥ 
त्यागिता तनु ती त्याने जाहली सांध्य सुंदरी ।  चरणी पैंजणीनाद नेत्रही भरले मदे । नटव्या साडिला शोभे कर्धनी कमरेस ती ॥ २९ ॥ 
 धर्म -  हे विदुरा  क्वणच्चरणाम्भोजां -  नूपुरांनी वाजत आहेत चरणकमले जिची अशा  मदविह्वललोचनाम् -  मदाने फिरत आहेत नेत्र जिचे अशा  काञ्चीकलापविलसद् -  कमरपट्ट्याने शोभणारे जे रेशमी वस्त्र  दुकूलच्छत्ररोधसम् -  त्याने झाकलेला आहे कटिभाग जिचा अशी ॥२९॥ 
 
ब्रह्मदेवांनी सोडलेल्या त्या शरीराचे एका सुंदर स्त्रीत-संध्यादेवीत रूपांतर झाले. तिच्या चरणकमलातील नूपुर झंकारत होते. तिचे डोळे अत्यंत मादक होते आणि कमरपट्टयाने सुशोभित झालेल्या साडीने कंबर आच्छादित होती. (२९) 
 
अन्योन्यश्लेषयोत्तुङ्ग निरन्तरपयोधराम् । 
सुनासां सुद्विजां स्निग्ध हासलीलावलोकनाम् ॥ ३० ॥ 
उभार स्तन ते ऐसे जागा ना मुळि त्या द्वयीं ।  नासिका दंतपंक्तीही सुघडा शोभल्या तशा । हासली मधुरा हास्य पाहुनी असुरास ती । टाकिते भावदृष्टि ती शोभली अशि सुंदरी ॥ ३० ॥ 
 अन्योन्यश्लेषया -  एकमेकांशी लागलेले असल्यामुळे  उत्तुङ्गनिरन्तपयोधराम् -  उंच व अवकाशरहित असे आहेत स्तन जिचे अशा  सुनासाम् -  सुंदर आहे नासिका जिची अशा  सुव्दिजाम् -  सुंदर आहेत दात जिचे अशा  स्निग्धहासलीलावलोकनाम् -  जिचे प्रेमळ हास्य व हावभावांनी युक्त दर्शन आहे अशा ॥३०॥ 
 
तिचे उत्तुंग स्तन अशाप्रकारे एकमेकांना चिकटले होते की, त्यांच्यामध्ये काही अंतर नव्हते. तिचे नाक आणि दात मोठे सुंदर होते. तसेच ती मधुर हास्य करीत, हावभाव करीत, असुरांच्याकडे भावपूर्ण दृष्टीने पाहात होती. (३०) 
 
गूहन्तीं व्रीडयात्मानं नीलालकवरूथिनीम् । 
उपलभ्यासुरा धर्म सर्वे सम्मुमुहुः स्त्रियम् ॥ ३१ ॥ 
निळ्या त्या नेत्रदृष्टिने कुमारी लाजुनी स्तना ।  पाहते भासली ऐसी मोहिले सर्व दैत्य ते ॥ ३१ ॥ 
 व्रीडया -  लज्जेने  आत्मनाम् -  शरीराला  गूहन्तीम् -  झांकणार्या अशा  नीलालकवरूथिनीम् -  काळ्या केसांचा आहे बुचडा जिचा अशा  ताम् -  त्या संध्येला  स्त्रियम् -  स्त्री असे  उपलभ्य -  मानून  सर्वे -  सर्वे  असुराः-  दैत्य  संमुमुहुः -  मोहित झाले ॥२९-३१॥  
 
काळ्याभोर केसांच्या बटांनी सुशोभित अशी ती सौंदर्यवती कुमारी लज्जेने चूर होऊन स्वतःला पदराआड लपवत होती. हे विदुरा, त्या सुंदरीला पाहून सर्व असुर मोहित झाले. (३१) 
 
अहो रूपमहो धैर्यं अहो अस्या नवं वयः । 
मध्ये कामयमानानां अकामेव विसर्पति ॥ ३२ ॥ 
ओ हो हे केवढे रुप यौवनी कोवळी अशी ।  धैर्याने कामुका आम्हा पुढती फिरते कशी ॥ ३२ ॥ 
 अहो -  कितीहो आश्चर्यजनक  रूपम् -  रूप  अहो -  केवढे हो  धैर्यम् -  धैर्य  अहो -  कितीहो मोहक  अस्याः -  ह्या स्त्रीचे  नवम् -  नूतन  वयः -  तारुण्य  अस्ति -  आहे  कामयमानाम् -  कामना करणार्यांच्या  मध्ये -  मध्ये  अकामा इव -  जणू काय कामनारहित अशी  विसर्पति -  फिरत असते ॥३२॥  
 
अहो, हिचे किती विलक्षण रूप ! केवढे अलौकिक धैर्य आणि कसे तरुण वय ! पहा ना ! आम्हा कामातुरांच्या मध्ये ही कशी निष्काम असल्यासारखी फिरत आहे ! (३२)
 
वितर्कयन्तो बहुधा तां सन्ध्यां प्रमदाकृतिम् । 
अभिसम्भाव्य विश्रम्भात् पर्यपृच्छन् कुमेधसः ॥ ३३ ॥ 
कुबुद्धि दैत्य ते सारे संध्येला पाहुनी तदा ।  वितर्के बोलले आणि प्रेमाने पुसु लागले ॥ ३३ ॥ 
 प्रमदाकृतिम् -  स्त्रीसारखी आहे आकृति जिची अशा  संध्याम् -  संध्येला  बहुधा -  अनेक प्रकाराने  वितर्कयन्तः -  तर्क करणारे असे  कुमेधसः -  पापी आहे बुद्धि ज्यांची असे  ते -  ते दैत्य  ताम् -  त्या संध्येला  अभिसंभाव्य -  मान देऊन  विश्रम्भात् -  विश्वासाने  पर्यपृच्छन् -  विचारु लागले ॥३३॥  
 
अशा प्रकारे त्या कुबुद्धी दैत्यांनी स्त्रीरूपिणी संध्यादेवीच्या विषयी निरनिराळे तर्क-वितर्क करून, नंतर तिचा मोठाच आदर करीत प्रेमाने तिला विचारले. (३३) 
 
कासि कस्यासि रम्भोरु को वार्थस्तेऽत्र भामिनि । 
रूपद्रविणपण्येन दुर्भगान्नो विबाधसे ॥ ३४ ॥ 
सुंदरी कोण तू पुत्री भामिनी कासया इथे ।  अफाट दाउनी रुपा कासया त्रासिसी अम्हा ॥ ३४ ॥ 
 रम्भोरु -  हे सुन्दरी  त्वम् -  तू  का -  कोण  असि -  आहेस  वा -  अथवा  भामिनि -  हे सुन्दरी  अत्र -  ह्या ठिकाणी  ते -  तुझे  कः -  कोणते  अर्थः -  प्रयोजन  अस्ति -  आहे  दुर्भगान् -  दुर्दैवी अशा  नः -  आम्हाला  रूपद्रविणपण्येन -  स्वरूपरूपी अमोल वस्तूच विकण्यास योग्य असल्यामुळे  विबाधेस -  पीडा करितेस ॥३४॥  
 
हे सुंदरी, तू कोण आहेस आणि कुणाची मुलगी आहेस ? भामिनी, तुझे येथे येण्याचे प्रयोजन काय ? तू तुझ्या या अनुपम सौंदर्याचे हे अनमोल प्रदर्शन करून आम्हां अभाग्यांना का त्रास देत आहेस ? (३४) 
 
या वा काचित्त्वमबले दिष्ट्या सन्दर्शनं तव । 
उत्सुनोषीक्षमाणानां कन्दुकक्रीडया मनः ॥ ३५ ॥ 
असो कोणीहि तू बाले भाग्याने दिसलीस तू ।  तुझे तूं झेलुनी चेंडू मनाच्या डोहि टाकिले ॥ ३५ ॥ 
 वा -  किंवा  अबले -  हे स्त्रिये  त्वम् -  तू  या -  जी  काचित् -  कोणीहि  एधि -  अस  तव -  तुझे  संदर्शनम् -  दर्शन  दिष्ट्या -  सुदैवाने  जातम् -  झाले  ईक्षमाणानाम् -  पहाणार्यांच्या  मनः -  मनाला  कन्दुकक्रीडया -  चेंडूच्या क्रीडेने  उत्सुनोषि -  क्षुब्ध करितेस ॥३५॥  
 
अबले, तू कोणी का असेनास ! आम्हांला तुझे दर्शन झाले हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. तू तर चेंडू खेळत खेळत आम्हा पहाणार्यांचे मन मोहित करीत आहेस. (३५) 
 
नैकत्र ते जयति शालिनि पादपद्मं  
घ्नन्त्या मुहुः करतलेन पतत्पतङ्गम् । मध्यं विषीदति बृहत्स्तनभारभीतं शान्तेव दृष्टिरमला सुशिखासमूहः ॥ ३६ ॥ 
( इंद्रवज्रा )  हे शालिनी पाय तुझा न थांबे स्थूलस्तनाचा जणु भार घेता । त्या कंबरेला थकवाच आला किती दिसे सुंदर केश भार ॥ ३६ ॥ 
 शालिनी -  हे सुन्दरी  पतत्पतङ्गम् -  आपटणार्या चेंडूला  करतलेन -  हाताच्या तलाने  मुहुः -  वारंवार  घ्रन्त्याः -  प्रहार करणार्या अशा  ते -  तुझे  पादपद्मम् -  चरणकमल  एकत्र -  एके ठिकाणी  न जयति -  स्थिर होत नाही  बृहत्स्तनभारभीतम् -  स्थूल अशा स्तनांच्या भाराने दडपलेली अशी  मध्यम् -  कमर  विषीदति -  थकून जात आहे  अमला -  स्वच्छ अशी  दृष्टिः -  दृष्टि  शान्ता इव -  शांत झाल्यासारखी  अस्ति -  आहे  च -  आणि  सुशिखासमूहः -  सुंदर केशकलाप  अस्ति -  आहे ॥३६॥  
 
सुंदरी, जेव्हा तू उसळलेल्या चेंडूवर आपल्या तळहाताने थापटी मारतेस, तेव्हा तुझे चरणकमल एका जागी स्थिर राहात नाहीत. तुझी कंबर स्थूल स्तनांच्या भारांनी थकल्यासारखी भासते आणि तुझ्या निर्मल दृष्टीतूनसुद्धा थकावट डोकावते. "अग ! तुझा केशसंभार किती सुंदर आहे !" (३६) 
 
इति सायन्तनीं सन्ध्यां असुराः प्रमदायतीम् । 
प्रलोभयन्तीं जगृहुः मत्वा मूढधियः स्त्रियम् ॥ ३७ ॥ 
( अनुष्टुप् )  स्त्री रुप श्याम संध्येने दैत्यांना मोह घातला । मूर्खांनी मानिली स्त्री ती तिलाचि कवटाळिले ॥ ३७ ॥ 
 मूढघियः -  विचाररहित झाली आहे बुद्धि ज्यांची असे  असुराः -  दैत्य  प्रमदायतीम् -  स्त्रीप्रमाणे आचरण करणार्या अशा  प्रलोभयन्तीम् -  भुलविणार्या अशा  सायन्तनीम् -  संध्याकाळच्या  सन्ध्याम् -  वेळेला  स्त्रियम् -  स्त्री असे  मत्वा -  मानून  जगृहुः -  स्वीकार करते झाले ॥३७॥  
 
अशा प्रकारे स्त्रीरूपाने प्रगट झालेल्या त्या सायंकालीन संध्यादेवीने त्यांना अत्यंत कामासक्त बनविले आणि त्या मूर्खांनी तिला कोणी रमणीरत्न समजून तिचे ग्रहण केले. (३७)
 
प्रहस्य भावगम्भीरं जिघ्रन्ति आत्मानमात्मना । 
कान्त्या ससर्ज भगवान् गन्धर्वाप्सरसां गणान् ॥ ३८ ॥ 
हासली मूर्ति तेजाची सौंदर्या क्रीडली निज ।  गंधर्व जन्मले तेंव्हा अप्सराही तशाच त्या ॥ ३८ ॥ 
 भगवान् -  ब्रह्मदेव  भावगम्भीरम् -  शृंगारिक गूढ अभिप्रायाने  प्रहस्य -  हास्य करून  आत्मना -  आपणच  आत्मानम् -  आपल्याला  जिघ्रन्त्या -  वास घेणार्या  कान्त्या -  सौंदर्याने  गन्धर्वाप्सरसाम् -  गन्धर्व व अप्सरा यांच्या  गणान् -  समूहांना  ससर्ज -  उत्पन्न करता झाला ॥३८॥  
 
त्यानंतर ब्रह्मदेवांनी गंभीरपणाने हसून आपल्या कांतिमय मूर्तीपासून ज्या आपल्या सौंदर्याचा जणू स्वतःच आस्वाद घेत होत्या, अशा गंधर्व आणि अप्सरांना उत्पन्न केले. (३८) 
 
विससर्ज तनुं तां वै ज्योत्स्नां कान्तिमतीं प्रियाम् । 
ते एव चाददुः प्रीत्या विश्वावसुपुरोगमाः ॥ ३९ ॥ 
तियेने त्यागिता देह चंद्रिकां कांति रुप जी ।  विश्वावस्वादि गंधर्व तियेनेच स्विकारले ॥ ३९ ॥ 
 सः -  तो ब्रह्मदेव  कान्तिमतीम् -  सौंदर्ययुक्त अशा  प्रियाम् -  आवडत्या अशा  तां तनुम् -  त्या शरीररूपी  जोत्स्नाम् -  चन्द्रिकेला  वै -  खरोखर  विससर्ज -  सोडिता झाला  विश्वावसुपुरोगमाः -  विश्वावसुपुप्रभृति  ते एव -  ते गंधर्वच  प्रीत्या -  प्रीतीने  ताम् -  त्या चंद्रिकेला  आददुः -  घेते झाले ॥३९॥  
 
ब्रह्मदेवांनी चंद्रिकारूप असलेल्या त्या कांतिमय प्रिय शरीराचा त्याग केला. त्यालाच विश्वावसू आदी गंधर्वांनी प्रसन्नतेने ग्रहण केले. (३९)
 
सृष्ट्वा भूतपिशाचांश्च भगवान् आत्मतन्द्रिणा । 
दिग्वाससो मुक्तकेशान् वीक्ष्य चामीलयद् दृशौ ॥ ४० ॥ 
पुढे तंद्रीत ब्रह्म्याने भूत प्रेतहि निर्मिले ।  नागवे केस विस्फार पाहुनी नेत्र झाकिले ॥ ४० ॥ 
 च -  आणि  भगवान् -  ब्रह्मदेव  आत्मतन्द्रिणा -  आपल्या आलस्याने  भूतपिशाचान् -  भूतांना व पिशाचांना  सृष्ट्वा -  उत्पन्न करून  च -  आणि  दिग्वाससः -  दिशा आहेत वस्त्र ज्यांचे अशा  मुक्तकेशान् -  मोकळे सोडले आहेत केस ज्यांनी अशा  तान् -  त्या भूतपिशाचांना  वीक्ष्य -  पाहून  दृशौ -  डोळे  अमीलयत् -  मिटता झाला ॥४०॥  
 
यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या आळसापासून भूत-पिशाच्च उत्पन्न केले. त्यांना वस्त्रहीन आणि केस विस्कटलेले पाहून त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. (४०) 
 
जगृहुस्तद्विसृष्टां तां जृम्भणाख्यां तनुं प्रभोः । 
निद्रां इन्द्रियविक्लेदो यया भूतेषु दृश्यते । येनोच्छिष्टान्धर्षयन्ति तमुन्मादं प्रचक्षते ॥ ४१ ॥ 
ब्रह्म्याने जांभळे रुप त्यागिता त्यांनि घेतले  शैथिल्य इंद्रियांमाजी जीवांची झोप तीच ही । उष्ट्या तोंडेचि झोपे जो उन्माद घडतो तया ॥ ४१ ॥ 
 प्रभो -  हे विदुरा  भूतपिशाचाः -  भूते व पिशाचे  तव्दिसृष्टाम् -  त्या ब्रह्मदेवाने टाकलेल्या अशा  जृम्भणाख्याम् -  जांभई आहे नाव ज्याचे अशा  तां तनुम् -  त्या शरीराला  जगृहुः -  घेते झाले  यया -  ज्या जांभईने  भूतेषु -  प्राण्यांमध्ये  इन्द्रियविक्लेदः -  इन्द्रियांचे शैथिल्य  दृश्यते -  आढळून येते  ताम् -  तिला  निद्राम् -  निद्रा  प्रचक्षते -  म्हणतात  येन -  ज्या इन्द्रियशैथिल्यामुळे  उच्छिष्टान् -  अपवित्र अशा प्राण्यांना  धर्षयन्ति -  भ्रान्तियुक्त करतात  तम् -  त्या भृतगणाला  उन्मादम् -  उन्माद असे  प्रचक्षते -  म्हणतात ॥४१॥  
 
ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या त्या जांभईरूप शरीराला भूत-पिशाच्चांनी ग्रहण केले. हिला निद्रा असेही म्हणतात, जिच्यामुळे जीवांच्या इंद्रियांना शिथिलता आल्यासारखी वाटते. जर एखादा मनुष्य उष्ट्या तोंडाने झोपला, तर भूत-पिशाच्चे त्याच्यावर आक्रमण करतात. त्यालाच उन्माद म्हणतात. (४१) 
 
ऊर्जस्वन्तं मन्यमान आत्मानं भगवानजः । 
साध्यान् गणान् पितृगणान् परोक्षेणासृजत्प्रभुः ॥ ४२ ॥ 
ब्रह्म्याने कल्पिले चित्ती मी तो तेजोमयी असा ।  तै अदृश्य गणसिद्ध पितृगणहि जन्मले ॥ ४२ ॥ 
 आत्मानम् -  आपल्याला  ऊर्जस्वन्तं -  बलवान असे  मन्यमानः -  मानणारा  भगवान् -  भगवान्  प्रभुः -  प्रभु  अजः -  ब्रह्मदेव  साध्यान् -  साध्यनामक  गणान् -  गणांना  पितृगणान् -  पितृगणांना  परोक्षेण -  अदृश्यरूपाने  असृजत् -  उत्पन्न करिता झाला ॥४२॥  
 
नंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपण बलवान असल्याची भावना करून आपल्या अदृश्यरूपाने साध्यगण आणि पितृगणांना उत्पन्न केले. (४२) 
 
ते आत्मसर्गं तं कायं पितरः प्रतिपेदिरे । 
साध्येभ्यश्च पितृभ्यश्च कवयो यद्वितन्वते ॥ ४३ ॥ 
अदृश्य रुप ते तैसे पित्रांनी घेतले असे ।  श्राद्धात कव्य ह्व्याते अर्पिती जन त्याजला ॥ ४३ ॥ 
 ते -  ते साध्यगण  च -  आणि  पितरः -  पितर  तम् -  त्या  आत्मसर्गम् -  आपली आहे उत्पत्ति ज्यापासून अशा  कायम् -  शरीराला  प्रतिपेदिरे -  मिळविते झाले  यत् -  ज्या शरीराच्या निमित्ताने  कवयः -  कर्ममार्गी  साध्येभ्यः -  साध्यांना  च -  आणि  पितृभ्यः -  पितरांना  वितन्वते -  हव्यकव्य देतात ॥४३॥  
 
पितरांनी आपले उत्पत्तीचे स्थान असलेल्या त्या अदृश्य शरीराला ग्रहण केले. हेच प्रमाण मानून कर्मकांडी लोक श्राद्ध आदिद्वारा पितर आणि साध्यगणांना अनुक्रमे पिंड आणि हव्य अर्पण करतात. (४३)
 
सिद्धान् विद्याधरांश्चैव तिरोधानेन सोऽसृजत् । 
तेभ्योऽददात् तं आत्मानं अन्तर्धानाख्यमद्भुतम् ॥ ४४ ॥ 
तिरोधान् शक्तिने ब्रह्मा सिद्ध विद्याधरास त्या ।  निर्मिले नि तया देह अंतर्धानच तो दिला ॥ ४४ ॥ 
 सः -  तो ब्रह्मदेव  सिद्धान् -  सिद्धांना  च -  आणि  विद्याधरान् -  विद्याधरांना  तिरोधानेन -  अदृश्य शक्तीने  असृजत् -  उत्पन्न करिता झाला  तेभ्यः एव -  त्या सिद्ध व विद्याधरांनाच  अन्तर्धानाख्यम् -  अन्तर्धान आहे नाव ज्याचे अशा  तम् -  त्या  अद्भुतम् -  आश्चर्योत्पादक अशा  आत्मानम् -  स्वतःच्या शरीराला  अदात् -  देता झाला ॥४४॥  
 
ब्रह्मदेवांनी आपल्या तिरोधानशक्तीने सिद्ध आणि विद्याधर यांची सृष्टी केली आणि त्यांना आपले ते अंतर्धाननामक अद्भुत शरीर दिले. (४४) 
 
स किन्नरान् किम्पुरुषान् प्रत्यात्म्येनासृजत्प्रभुः । 
मानयन् नात्मनात्मानं आत्माभासं विलोकयन् ॥ ४५ ॥ 
एकदा ब्रह्मजीपाही प्रति बिंब स्वये जधी  सौंदर्यवानरुपी त्या किंपुरुष नि किन्नर । ब्रह्म्याने निर्मिले तेंव्हा अद्भूतरुप ते असे ॥ ४५ ॥ 
 आत्माभासम् -  आपल्या प्रतिबिम्बाला  विलोकयन् -  अवलोकन करणारा असा  आत्मना -  स्वतःकडून  आत्मानम् -  स्वतःला  मानयन् -  मान देणारा असा  सः -  तो  प्रभुः -  ब्रह्मदेव  प्रत्यात्म्येन -  प्रतिबिंबाच्या योगाने  किन्नरान् -  किन्नरांना  किंपुरुषान् -  किंपुरुषांना  अजसृत् -  उत्पन्न करिता झाला ॥४५॥  
 
एक वेळ ब्रह्मदेवांनी आपले प्रतिबिंब पाहिले. तेव्हा आपल्याला फार सुंदर समजून त्या प्रतिबिंबापासून त्यांनी किन्नर आणि किंपुरुष उत्पन्न केले. (४५) 
 
ते तु तज्जगृहू रूपं त्यक्तं यत्परमेष्ठिना । 
मिथुनीभूय गायन्तः तं एवोषसि कर्मभिः ॥ ४६ ॥ 
त्यागिता रुप ब्रह्म्याने त्यांनीच घेतले असे ।  म्हणून सह पत्नीच्या उषेसी गात त्याजला ॥ ४६ ॥ 
 ते -  ते किन्नर व किंपुरुष  तु -  तर  परमेष्ठिना -  ब्रह्मदेवाने  त्यक्तम् -  टाकिलेले  यत् -  जे  रूपम् -  रूप  तत् -  त्या रूपाला  जगृहुः -  घेते झाले  मिथुनीभूय -  एकत्र मिळून  उषसि -  पहाटेच्या वेळेस  कर्मभिः -  चरित्रांनी  तम् एव -  त्या ब्रह्मदेवालाच  गायन्तः -  गाणारे  बभुवूः -  झाले ॥४६॥  
 
ब्रह्मदेवांनी त्याचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्यांचे ते प्रतिबिंब-शरीर ग्रहण केले. म्हणून ते सर्वजण उषःकाली आपल्या पत्नींसह ब्रह्मदेवांच्या गुण-कर्माचे गायन करतात.(४६)
 
देहेन वै भोगवता शयानो बहुचिन्तया । 
सर्गेऽनुपचिते क्रोधात् उत्ससर्ज ह तद्वपुः ॥ ४७ ॥ 
अपूर्ण सृष्टिने ब्रह्मा चिंतनेचि पहूडला ।  पसरी हात पायांना क्रोधिष्ट जाहला मनीं ॥ ४७ ॥ 
 भोरावता -  विस्तारयुक्त अशा  देहेन -  शरीराने  बहुचिंतया -  पुष्कळ काळजीमुळे  वै -  खरोखर  शयानः -  शयन करणारा असा  सर्गे अनुपचिते -  सृष्टि वाढलेली नसता  क्रोधात् -  क्रोधाने  तत् -  त्या  वपुः -  शरीराला  उत्ससर्ज ह -  टाकिता झाला ॥४७॥  
 
सृष्टीची वाढ होत नाही, असे पाहून एकदा फारच चिंताग्रस्त होऊन ते हात-पाय पसरून झोपी गेले आणि पुन्हा क्रोधावशात त्या भोगमय शरीराचा त्यांनी त्याग केला. (४७) 
 
येऽहीयन्तामुतः केशा अहयस्तेऽङ्ग जज्ञिरे । 
सर्पाः प्रसर्पतः क्रूरा नागा भोगोरुकन्धराः ॥ ४८ ॥ 
केसांच्या झटकार्यात अहिंचा जन्म जाहला ।  हातापायात सर्पांचा फणिंद्रा जन्म जाहला ॥ ४८ ॥ 
 अङ्ग -  हे विदुरा  अमुतः -  ह्या शरीरापासून  ये -  जे  केशाः -  केस  अहीयन्त -  गळून पडले  ते -  ते केस  अहयः -  सर्पविशेष  प्रसर्पतः -  हातपाय पसरून चळवळ करणार्या त्या शरीरापासून  सर्पाः -  सर्प  च -  आणि  क्रूराः -  क्रोधी असे  भोगोरुकन्धराः -  फणांमुळे मोठ्या आहेत माना ज्यांच्या असे  नागाः -  सर्प  जज्ञिरे -  उत्पन्न झाले ॥४८॥  
 
त्यातून जे केस झडून पडले ते अही झाले. तसेच त्यांच्या हात-पाय आखडून चालण्याने क्रूर स्वभावाचे साप आणि नाग झाले, ज्यांचे शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत फारच रुंद असते. (४८)
 
स आत्मानं मन्यमानः कृतकृत्यमिवात्मभूः । 
तदा मनून् ससर्जान्ते मनसा लोकभावनान् ॥ ४९ ॥ 
ब्रह्माजी एकदा धाले कृतकृत्यचि भाव तो ।  मनात मनुजी जन्मे वृद्धि जो मानवी करी ॥ ४९ ॥ 
 अन्ते -  शेवटी  आत्मानम् -  आपल्याला  कृतत्कृत्यम् इव -  कृतकृत्य झाल्याप्रमाणे  मन्यमानः -  मानणारा  सः -  तो  आत्मभूः -  ब्रह्मदेव  तदा -  त्यावेळी  मनसा -  अन्तःकरणाने  लोकभावनान् -  लोकांचे रक्षण करणार्या अशा  मनून् -  मनूंना  ससर्ज -  उत्पन्न करिता झाला ॥४९॥  
 
एकदा ब्रह्मदेवांनी स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेतला. त्यावेळी शेवटी त्यांनी आपल्या मनाने मनूंची सृष्टी निर्माण केली. हे सर्वजण प्रजेची वृद्धी करणारे आहेत. (४९) 
 
तेभ्यः सोऽसृजत्स्वीयं पुरं पुरुषमात्मवान् । 
तान् दृष्ट्वा ये पुरा सृष्टाः प्रशशंसुः प्रजापतिम् ॥ ५० ॥ 
थोर ब्रह्म्ये मनूसाठी मानुषी तनु त्यागिली । मनूंना पाहुनी देवे गंधर्वे स्तुति गायिली ॥ ५० ॥ 
 आत्मवान् -  जितेंद्रिय असा  सः -  तो ब्रह्मदेव  तेभ्यः -  त्या मनूंना  स्वीयम् -  आपले  पुरुषं पुरम् -  पुरुषरूप शरीराला  अत्यसृजत् -  सोडिता झाला  ये -  जे  पुरा -  पूर्वी  सृष्टाः -  उत्पन्न केले  ते -  ते देव, पितर व गन्धर्वादिक  तान् -  त्या मनूंना  दृष्ट्वा -  पाहून  प्रजापतिम् -  ब्रह्मदेवाला  प्रशशंसुः -  स्तुतिपूर्वक म्हणाले ॥५०॥  
 
मनस्वी ब्रह्मदेवांनी त्यांच्यासाठी आपल्या पुरुषाच्या आकाराच्या शरीराचा त्याग केला. मनूंना पाहून त्यांच्याआधी उत्पन्न झालेले देव-गंधर्व आदी ब्रह्मदेवांची स्तुती करू लागले. (५०) 
 
अहो एतत् जगत्स्रष्टः सुकृतं बत ते कृतम् । 
प्रतिष्ठिताः क्रिया यस्मिन् साकं अन्नमदाम हे ॥ ५१ ॥ 
म्हणाले विश्वकर्त्या रे सृष्टि ही छानची असे । अग्निहोत्रादि ते कर्म यांच्यातचि प्रतिष्ठिले ॥ यज्ञ्कर्मेचि यांच्याने मिळते अन्न ते अम्हा ॥ ५१ ॥ 
 अहो -  हे  जगत्स्रष्टः -  सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवा  एतत् -  हे  ते -  तुझे  कृतम् -  कृत्य  सकृतम् बत -  फार चांगले  अस्ति -  आहे  यस्मिन् -  ज्या मनुसृष्टीमध्ये  क्रियाः -  अग्निहोत्रादिक क्रिया  प्रतिष्ठिताः -  चाललेल्या  सन्ति -  आहेत  हे -  हे ब्रह्मदेवा  अतः वयम् अस्मिन् -  म्हणून आम्ही ह्या मनुसृष्टीत  साकम् -  बरोबर  अन्नम् -  हविर्भागाला  अदाम -  भक्षण करू ॥५१॥  
 
ते म्हणाले -"विश्वकर्त्या ब्रह्मदेवा, आपली ही सृष्टी फारच सुंदर आहे. हिच्यामध्ये अग्निहोत्र इत्यादी सर्व कर्मे प्रतिष्ठित आहेत. यांच्या साहाय्याने आम्ही आमचे अन्न ग्रहण करू शकू." (५१)
 
तपसा विद्यया युक्तो योगेन सुसमाधिना । 
ऋषीन् ऋषिः हृषीकेशः ससर्जाभिमताः प्रजाः ॥ ५२ ॥ 
आदीर्षि त्याच ब्रह्म्याने इंद्रिये सावरोनिया । विद्या योग तपे ध्याने ऋषिंना जन्म तो दिला ॥ ५२ ॥ 
 तपसा -  तपश्चर्येने  विद्यया -  ज्ञानपूर्वक उपासनेने  योगेन -  आसनादि योगाने  च -  आणि  सुसमाधिना -  वैराग्य व ऐश्वर्य इत्यादिकाने  युक्तः -  युक्त असा  हृषीकेश -  इन्द्रियांना वश करून घेतलेला असा  ऋषिः -  ऋषिस्वरूप ब्रह्मदेव  अभिमताः -  मान्य अशा  ऋषीन् -  ऋषिरूप  प्रजाः -  प्रजांना  ससर्ज -  उत्पन्न करिता झाला ॥५२॥  
 
नंतर आदिऋषी ब्रह्मदेवांनी इंद्रियसंयमपूर्वक तप, विद्या, योग आणि समाधीने संपन्न होऊन आपले प्रिय संतान अशा ऋषिगणांची निर्मिती केली (५२) 
 
तेभ्यश्चैकैकशः स्वस्य देहस्यांशमदादजः । 
यत्तत् समाधियोगर्द्धि तपोविद्याविरक्तिमत् ॥ ५३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे विंशोऽध्यायः ॥ २० ॥ 
तयांना योग ऐश्वर्य वैराग्य तप नीं तसा । विद्येचा दिधला अंश संतान लाडके असे ॥ ५३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ ॥ विसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥ 
 अजः -  ब्रह्मदेव  यत् -  जे  तत् -  ते शरीर  समाधियोगर्द्धितपोविद्याविरक्तिमत् -  समाधि, योग, ऋद्धि, तप, विद्या व वैराग्य यांनी युक्त असे  अभूत -  होते  तस्य -  त्या  स्वस्य -  आपल्या  देहस्य -  शरीराच्या  अंशम् -  भागाला  तेभ्यः -  त्या ऋषींना  एकैकशः -  प्रत्येकी  अदात् -  देता झाला ॥५३॥  
 
आणि त्यांपैकी प्रत्येकाला आपल्या समाधी, योग, ऐश्वर्य, तप, विद्या आणि वैराग्यमय शरीराचा अंश दिला. (५३) 
 
स्कंध तिसरा - अध्याय विसावा समाप्त  |