श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
एकोनविंशोऽध्यायः

ब्रह्मणः प्रार्थनामङ्‌गीकृत्य वराहकृतो हिरण्याक्षवधः -

हिरण्याक्षवध -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


मैत्रेय उवाच -
अवधार्य विरिञ्चस्य निर्व्यलीकामृतं वचः ।
प्रहस्य प्रेमगर्भेण तदपाङ्‌गेन सोऽग्रहीत् ॥ १ ॥
मैत्रेयजी सांगतात -
( अनुष्टुप्‌ )
निष्कपट सुधे ऐसे ब्रह्म्याचे शब्द ऐकुनी।
त्याची भोंळी अशी देवे प्रार्थना ऐकिली तदा ॥ १ ॥

सः - तो वराह विरिञ्चस्य - ब्रह्मदेवाचे निर्व्यलीकामृतम् - निष्कपट व अमृतासारखे गोड असे तत् - ते वचः - भाषण अवधार्य - ऐकून प्रहस्य - हास्य करून प्रेमगर्भेण - प्रेम आहे आत ज्याच्या अशा अपाङ्गेन - नेत्रकटाक्षाने अग्रहीत् - स्वीकारिता झाला ॥१॥
मैत्रेय म्हणाले - ब्रह्मदेवाचे कपटरहित असे हे अमृतमय वचन ऐकून भगवंतांनी त्याच्या भोळेपणावर हसून आपल्या प्रेमपूर्ण कटाक्षाद्वारे त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. (१)


ततः सपत्‍नं मुखतः चरन्तं अकुतोभयम् ।
जघानोत्पत्य गदया हनौ अवसुरमक्षजः ॥ २ ॥
सा हता तेन गदया विहता भगवत्करात् ।
विघूर्णित अपतद् रेजे तदद्‍भुतं इवाभवत् ॥ ३ ॥
हनुटीस गदा देवे मारिली शत्रुच्या जधी ।
तदा ती दैत्यराजाने स्वगदे आडवीयली ॥ २ ॥
सुटले भगवत्शस्त्र फिरली पडली गदा ।
फिरुन पडता खाली अद्‍भूत घडले तदा ॥ ३ ॥

ततः - नंतर अक्षजः - ब्रह्मदेवाच्या घ्राणेंद्रियापासून उत्पन्न झालेला तो आदिवराह मुखतः - समोर चरन्तम् - संचार करणार्‍या अशा अकुतोभयम् - निर्भय अशा सपत्नम् - शत्रुरूप अशा असुरम् - दैत्याच्या उत्पत्य - उडी मारून हनौ - हनुवटीवर गदया - गदेने जघान - प्रहार करिता झाला ॥२॥ सा - ती गदा तेन - त्या हिरण्याक्षाने गदया - गदेने हृता - ताडिलेली भगवत्करात् - भगवंताच्या हातातून विहता - सुटलेली अशी विघूर्णिता - गरगर फिरत अपतत् - पडली च - आणि रेजे - शोभली तत् - ती गोष्ट अद्‌भुतम् इव - आश्चर्य मानण्यासारखी अभवत् - झाली ॥३॥
नंतर ब्रह्मदेवाच्या नाकातून उत्पन्न झालेल्या त्यांनी उडी मारून आपल्यासमोर निर्भयपणे संचार करणार्‍या शत्रूच्या हनुवटीवर गदेचा प्रहार केला; पण हिरण्याक्षाच्या गदेला भिडून ती गदा भगवंतांच्या हातून निसटली आणि भिरभिरत जमिनीवर आदळून शोभू लागली. परंतु ही मोठी अद्‌भुत घटना घडली. (२-३)


स तदा लब्धतीर्थोऽपि न बबाधे निरायुधम् ।
मानयन् स मृधे धर्मं विष्वक्सेनं प्रकोपयन् ॥ ४ ॥
हिरण्याक्षा सुसंधीही मिळाली परि तो बघे ।
निशस्त्र जाहला शत्रू युद्धधर्मास पाळि तो ॥
वार ना करिता थांबे शत्रूचा क्रोध वाढण्या ॥ ४ ॥

तदा - त्या वेळी लब्धतीर्थः अपि - मिळाली आहे संधि ज्याला असा असूनहि सः - तो हिरण्याक्ष निरायुधम् - गेले आहे आयुध ज्याचे अशा तम् - त्या विष्णूला न बबाधे - प्रहार न करिता झाला सः - तो हिरण्याक्ष मृधे - युद्धात धर्मम् - धर्माला मानयन् - मानणारा असा विष्वक्सेनम् - विष्णूला प्रकोपयन् - क्रोध उत्पन्न करणारा बभूव - झाला ॥४॥
त्यावेळी शत्रूवर वार करण्याची चांगली संधी मिळूनही हिरण्याक्षाने त्यांना निःशस्त्र पाहून, युद्धधर्माचे पालन करीत, त्यांच्यावर आक्रमण केले नाही. भगवंतांचा क्रोध वाढावा, म्हणूनच त्याने असे केले. (४)


गदायां अपविद्धायां हाहाकारे विनिर्गते ।
मानयामास तद् धर्मं सुनाभं चास्मरद्विभुः ॥ ५ ॥
गदा ती पडता खाली लोकही शांत जाहले ।
शत्रूच्या धर्मबुद्धीला प्रभूने ही प्रशंसिले ।
आणि त्या आपुल्या अस्त्रा स्मरिले त्या सुदर्शना ॥ ५ ॥

विभुः - विष्णु गदायाम् अपविद्धायाम् - गदा धक्क्याने पडली असता हाहाकारे विनिर्गते - हाहाःकार उत्पन्न झाला असता तद्धर्मम् - त्या हिरण्याक्षाच्या सत्यधर्माला मानयाम्रास - प्रशंसिता झाला च - आणि सुनाभम् - सुदर्शन चक्राला अस्मरत् - स्मरता झाला ॥५॥
गदा खाली पडल्यानंतर आणि लोकांचा हाहाकार बंद झाल्यावर भगवंतांनी त्याच्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शनचक्राचे स्मरण केले. (५)


तं व्यग्रचक्रं दितिपुत्राधमेन
     स्वपार्षदमुख्येन विषज्जमानम् ।
चित्रा वाचोऽतद्विदां खेचराणां
     तत्रास्मासन् स्वस्ति तेऽमुं जहीति ॥ ६ ॥
( इंद्रवज्रा )
देवाकरीं चक्र त्वरेचि आले
    त्या पार्षदासी परि खेळले ते ।
प्रभाव ज्यांना कळला न तेची
    त्वरे वधा शब्द वदोनि गेले ॥ ६ ॥

तत्र - तेथे व्यग्रचक्रम् - उत्कंठित आहे सुदर्शनचक्र ज्याचे अशा स्वपार्षदमुख्येन - आपल्या पार्षदातील प्रमुख अशा दितिपुत्राधमेन - अधम दीतिपुत्राकडून विषज्जमानम् - लगट केल्या गेलेल्या तम् - त्या विष्णूप्रत अताव्ददाम् - विष्णूचा प्रभाव न जाणणार्‍या अशा खेचराणाम् - देवांची ते - तुझे स्वस्ति - कल्याण असो अमुम् - ह्या हिरण्याक्षाचा जहि - वध कर इति - याप्रमाणे चित्राः - आश्चर्यकारक वाचः - वाक्ये आ - सर्वप्रकारे आसन् स्म - उत्पन्न झाली ॥६॥
चक्र ताबडतोब येऊन भगवंतांच्या हातात फिरू लागले; परंतु ते विशेषतः आपला प्रमुख पार्षद दैत्याधम हिरण्याक्षाबरोबर खेळू लागले. त्या वेळी त्याच्या प्रभावाला न जाणणार्‍या देवांचे हे त्वरा करणारे शब्द ऐकू येऊ लागले की, "प्रभो ! आपले कल्य़ाण असो ! याला लगेच मारून टाका." (६)


स तं निशाम्यात्तरथाङ्‌गमग्रतो
     व्यवस्थितं पद्मपलाशलोचनम् ।
विलोक्य चामर्ष परिप्लुतेन्द्रियो
     रुषा स्वदन्तच्छदमादशच्छ्वसन् ॥ ७ ॥
तेव्हा हिरण्याक्ष बघे तदा तो
    श्रीचक्रधारी दिसला प्रभू तो ।
पाहूनि तो तो भरलाचि क्रोधे
    श्वासास घेई अधरोष्ठ चावी ॥ ७ ॥

सः - तो हिरण्याक्ष पद्मपलाशलोचनम् - कमलाप्रमाणे आहेत नेत्र ज्याचे अशा आत्तरथाङ्गम् - घेतले आहे चक्र ज्याने अशा तम् - त्या वराहाला निशाम्य - जाणून च - आणि अग्रतः - पुढे व्यवस्थितम् - उभा राहिलेला असा विलोक्य - पाहून अमर्षपरिप्लुतेन्द्रियः - क्रोधाने भरून गेली आहेत इंद्रिये ज्यांची असा श्वसन् - श्वास सोडणारा असा रुपा - क्रोधाने स्वदन्तच्छदम् - आपले ओठ आदशत् - चावू लागला ॥७॥
जेव्हा हिरण्याक्षाने पाहिले की, कमलदललोचन श्रीहरी आपल्यासमोर चक्र घेऊन उभे आहेत, तेव्हा त्याची सर्व इंद्रिये प्रक्षुब्ध झाली आणि तो रागाने उसासे टाकीत दात-ओठ चावू लागला. (७)


(अनुष्टुप्)
करालदंष्ट्रश्चक्षुर्भ्यां सञ्चक्षाणो दहन्निव ।
अभिप्लुत्य स्वगदया हतोऽसीत्याहनद् हरिम् ॥ ८ ॥
( अनुष्टुप्‌ )
तीक्ष्णदंत असा दैत्य क्रोधाने टवकारला ।
न तू रे वाचसी आता वदता मारिली गदा ॥ ८ ॥

करालदंष्ट्रः - भयंकर आहेत दाढा ज्याच्या असा चक्षुर्भ्याम् - डोळ्यांनी दहन् इव - जाळतोच की काय असा संचक्षाणः - पाहणारा सः - तो हिरण्याक्ष अभिप्लुत्य - उडी मारून हतः असि - हा पहा मेलास इति - असे उक्त्वा - बोलून स्वगदया - आपल्या गदेने हरिम् - वराहरूप श्रीहरीला अहनत - प्रहार करिता झाला ॥८॥
त्यावेळी तो तीक्ष्ण दाढा असलेला दैत्य, आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे अशा रीतीने पाहू लागला की, जणू तो आता भगवंतांना भस्म करून टाकील. उसळी मारून ‘अरे, आता तू वाचणार नाहीस’ अशी गर्जना करीत श्रीहरींवर त्याने गदेने प्रहार केला. (८)


पदा सव्येन तां साधो भगवान् यज्ञसूकरः ।
लीलया मिषतः शत्रोः प्राहरद् वातरंहसम् ॥ ९ ॥
आह चायुधमाधत्स्व घटस्व त्वं जिगीषसि ।
इत्युक्तः स तदा भूयः ताडयन् व्यनदद् भृशम् ॥ १० ॥
यज्ञमूर्ति वराहाने पाहता पाहता लिले ।
डाव्या पायेचि फेकोनी दैत्यासी बोलला असे ॥ ९ ॥
उचली तू तुझे शस्त्र एकदा वारची करी ।
ऐकता शब्द हे दैत्ये गर्जुनी फेकिली गदा ॥ १० ॥

साधो - हे विदुरा भगवान् - भगवान यज्ञसूकरः - यज्ञवराह शत्रोः मिषतः - शत्रु पाहत असता वातरंहसम् - वायुप्रमाणे आहे वेग जिचा अशा ताम् - त्या गदेला सव्येन पदा - डाव्या पायाने लीलया - लीलेने प्राहरत् - प्रहार करिता झाला ॥९॥ च - आणि आह - म्हणाला आयुधम् - आयुध आधत्स्व - घे च - आणि घटस्व - उद्योग कर यतः - कारण त्वम् - तू जिगीषसि - जिंकण्याची इच्छा करतोस इति उक्तः - असे म्हटलेला सः - तो हिरण्याक्ष तदा - त्या वेळी भूपः - पुनः ताडयन् - प्रहार करणारा असा भृशम् - मोठ्याने व्यनदत् - गर्जना करिता झाला ॥१०॥
हे साधो ! यज्ञमूर्ती श्रीवराह भगवानांनी शत्रूच्या देखत सहजपणे आपल्या डाव्या पायाने ती वायुवेगाने येणारी गदा पृथ्वीवर आदळली आणि ते त्याला म्हणाले -"अरे दैत्या, तू मला जिंकू इच्छितोस ना ? मग उचल ते शस्त्र आणि कर पुन्हा एकदा वार !" भगवंतांनी असे म्हणताच त्याने पुन्हा गदा फेकली आणि मोठी आरोळी ठोकली. (९-१०)


तां स आपततीं वीक्ष्य भगवान् समवस्थितः ।
जग्राह लीलया प्राप्तां गरुत्मानिव पन्नगीम् ॥ ११ ॥
हरीने पाहिली येता गदा ती आपुल्यावरी ।
सहजी धरिली जैसी गरुड सर्पिणी धरी ॥ ११ ॥

सः - तो भगवान् - विष्णू आपततीम् - जवळ येणार्‍या अशा ताम् - त्या गदेला वीक्ष्य - पाहून समस्थितः - व्यवस्थित उभा राहिला प्राप्तम् - व प्राप्त झालेल्या गदेला गरुत्मान् - गरुड पन्नगीम् - नागिणीला इव - जसा तथा - तसा लीलया - लीलेने जग्राह - धारण करिता झाला ॥११॥
आपल्या रोखाने गदा येत आहे असे पाहून भगवंतांनी ते जिथे उभे होते तिथूनच गरुड जसा नागिणीला पकडतो, तशी गदा सहज पकडली. (११)


स्वपौरुषे प्रतिहते हतमानो महासुरः ।
नैच्छद्‌गदां दीयमानां हरिणा विगतप्रभः ॥ १२ ॥
प्रयास व्यर्थ तो जाता घमेंड जिरली तयां ।
जाहले नष्टची तेज पुन्हा ना इच्छिली गदा ॥ १२ ॥

महासुरः - मोठा दैत्य स्वपौरुषे प्रतिहते - आपला पराक्रम नष्ट झाला असता हतमानः - नाहीसा झाला आहे गर्व ज्याचा अशा विगतप्रभः - गेली आहे कांती ज्याची अशा हरिणा - विष्णूने दीयमानाम् - दिलेल्या गदाम् - गदेला न ऐच्छत् - न इच्छिता झाला ॥१२॥
आपले शौर्य अशा प्रकारे व्यर्थ झालेले पाहून त्या महादैत्याचा गर्व नाहीसा झाला आणि त्याचे तेज नष्ट झाले. भगवंतांनी देऊ करूनही त्याने गदा घेणे पसंत केले नाही. (१२)


जग्राह त्रिशिखं शूलं ज्वलज्ज्वलनलोलुपम् ।
यज्ञाय धृतरूपाय विप्रायाभिचरन् यथा ॥ १३ ॥
ब्राह्मणावरी जै व्यर्थ विद्या जारण-मारणी ।
तशा व्यर्थ प्रयत्नाते तप्त त्रीशूळ घेउनी ॥ १३ ॥

सः - तो हिरण्याक्ष ज्वलज्ज्वलनलोलुपम् - पेटलेल्या अग्नीप्रमाणे ग्रासण्यास तयार असलेल्या त्रिशिखम् - तीन आहेत शल्ये ज्याला अशा शूलम् - शूळाला धृतरुपाय - धारण केले आहे वराहरूप ज्याने अशा यज्ञाय - यज्ञपुरुषाकरिता यथा - ज्याप्रमाणे अभिचरन् - जारणमारणादि करणारा पुरुष विप्राय - ब्राह्मणांकरिता तथा - त्याप्रमाणे जग्राह - ग्रहण करिता झाला ॥१३॥
परंतु ज्याप्रमाणे एखाद्या ब्राह्मणावर जारण-मारणादी प्रयोगाचा निष्फळ प्रयत्‍न करावा, त्याप्रमाणे त्याने श्रीयज्ञपुरुषावर प्रहार करण्यासाठी एक प्रज्वलित अग्नीसारखा तळपता त्रिशूळ हातात घेतला. (१३)


तदोजसा दैत्यमहाभटार्पितं
     चकासदन्तःख उदीर्णदीधिति ।
चक्रेण चिच्छेद निशातनेमिना
     हरिर्यथा तार्क्ष्यपतत्रमुज्झितम् ॥ १४ ॥
( इंद्रवज्रा )
महाबळी दैत्य त्रिशूळ वेगे
    आकाश मार्गे तळपोनि आले ।
जै इंद्र कापी पर त्या नगांचे
    चक्रे हरी त्या त्रिशुळास तोडी ॥ १४ ॥

सः - तो विष्णू ओजसा - जोराने दैत्यमाभटार्पितम् - महाशूर दैत्याने फेकलेल्या अशा उदीर्णदीधिति - अतिशय आहे तेज ज्याचे अशा अन्तःखे - आकाशात चकासत् - चकाकणार्‍या अशा तत् - त्या त्रिशूळाला निशातनेमिना - तीक्ष्ण आहे धारा ज्याची अशा चक्रेण - चक्राने यथा - ज्याप्रमाणे हरिः - इंद्र उज्झितम् - टाकिलेल्या तार्क्ष्यपतत्‌त्रम् - गरुडाच्या पिसाला तथा - त्याप्रमाणे चिच्छेद - तोडिता झाला ॥१४॥
महाबली हिरण्याक्षाने अत्यंत वेगाने सोडलेला तो त्रिशूल आकाशात मोठया तेजाने चमकू लागला. तेव्हा भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने तो इंद्राने गरुडाचा पंख तोडावा तसा तोडला. (१४)


वृक्णे स्वशूले बहुधारिणा हरेः
     प्रत्येत्य विस्तीर्णमुरो विभूतिमत् ।
प्रवृद्धरोषः स कठोरमुष्टिना
     नदन् प्रहृत्यान्तरधीयतासुरः ॥ १५ ॥
त्रिशूळ होता बहु भग्न तेंव्हा
    क्रोधिष्ठ झाला तयि दैत्य मोठा ।
धावोनि वक्षावरि मुष्टि ठोसा
    मारोनि झाला मग दैत्य गार ॥ १५ ॥

अरिणा - शत्रूने बहुधा - अनेकप्रकारे स्वशूले वृक्णे - आपला त्रिशूळ तोडिला असता सः असुरः - तो दैत्य प्रवृद्धरोषः - वाढलेला आहे क्रोध ज्याचा असा नदन् - गर्जना करीत प्रत्येत्य - समोर जाऊन हरेः - विष्णूचे विस्तीर्णम् - विशाल विभूतिमत् - व लक्ष्मीच्या चिन्हाने युक्त असे उरः - जे वक्षःस्थल त्यावर कठोरमुष्टिना - दृढ मुष्टीने प्रहृत्य - प्रहार करून अन्तरधीयत् - गुप्त झाला ॥१५॥
भगवंतांच्या चक्राने आपल्या त्रिशूळाचे असंख्य तुकडे झालेले पाहून त्याला फार राग आला. त्याने जवळ जाऊन, ज्याच्यावर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसते, त्या भगवंतांच्या विशाल वक्षःस्थळावर एक जोरात ठोसा मारला आणि मोठयाने गर्जना करून तो अंतर्धान पावला. (१५)


तेनेत्थमाहतः क्षत्तः भगवान् आदिसूकरः ।
नाकम्पत मनाक्क्वापि स्रजा हत इव द्विपः ॥ १६ ॥
( अनुष्टुप्‌ )
हत्तीला पुष्प माळेचा घाव तो होय ना कधी ।
त्या परी हरिला ठोसें कांही ना जाहले तदा ॥ १६ ॥

क्षत्तः - हे विदुरा तेन - त्या दैत्याने इत्थम् - याप्रमाणे आहतः - प्रहार केलेला असा भगवान् - भगवान् आदिसूकरः - आदिवराह
विदुरा, ज्याप्रमाणे फुलाच्या माळेच्या माराने हत्तीवर काहीही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे त्याने याप्रकारे मारलेल्या ठोशाने भगवान आदिवराह जराही ढळले नाहीत. (१६)


अथोरुधासृजन् मायां योगमायेश्वरे हरौ ।
यां विलोक्य प्रजास्त्रस्ता मेनिरेऽस्योपसंयमम् ॥ १७ ॥
मायावी योजिली विद्या दैत्याने श्रीहरीवरी ।
भेदरी जाहली सृष्टी वाटला लय पातला ॥ १७ ॥

अथ - नंतर सः - तो हिरण्याक्ष योगमायेश्वरे - योगमायेचा नियन्ता अशा हरौ - विष्णूच्या ठिकाणी उरुधा - अनेक प्रकारे मायाम् - मायेला असृजत् - उत्पन्न करिता झाला याम् - जिला विलोक्य - पाहून प्रजाः - लोक त्रस्ताः - त्रस्त झाले अस्य - व ह्या जगाच्या उपसंयमम् - प्रलयाला मेनिरे - मानू लागले ॥१७॥
तेव्हा त्या महामायावी दैत्याने मायापती श्रीहरींवर अनेक प्रकारच्या मायावी कृत्यांचा प्रयोग करणे सुरू केले. त्यामुळे सर्व प्रजा भयभीत झाली आणि तिला असे वाटू लागले की, आता जगात प्रलयकाल होणार. (१७)


प्रववुर्वायवश्चण्डाः तमः पांसवमैरयन् ।
दिग्भ्यो निपेतुर्ग्रावाणः क्षेपणैः प्रहिता इव ॥ १८ ॥
प्रचंड सुटले वारे धुळीने तम दाटला ।
अश्माची जाहली वृष्टी क्षेपणास्त्रचि भासले ॥ १८ ॥

चण्डाः - भयंकर असे वायवः - वायू प्रववुः - वाहू लागले च - आणि पांसवम् - धूळीने युक्त अशा तमः - अंधकाराला ऐरयन् - उत्पन्न करिते झाले क्षेपणः - गोफणींनी प्रहिताः - फेकलेले इव - जसे तथा - तसे ग्रावाणः - दगड दिग्‌भ्यः - दिशातून निपेतुः - पडू लागले ॥१८॥
प्रचंड वारे वाहू लागले आणि धुळीमुळे सगळीकडे अंधकार पसरला. सगळीकडून दगडांचा असा मारा होऊ लागला जणू गोफणीने दगड फेकले जात आहेत. (१८)


द्यौर्नष्टभगणाभ्रौघैः सविद्युत् स्तनयित्‍नुभिः ।
वर्षद्‌भिः पूयकेशासृग् विण्मूत्रास्थीनि चासकृत् ॥ १९ ॥
कडाडल्या विजा आणि ढगात लोपले ग्रह ।
रक्त पू केस विष्ठेची हाडाची वृष्टी जाहली ॥ १९ ॥

च - आणि द्यौः - आकाश सविद्युत्स्तनयित्नुभिः - विदुल्लता व गर्जना यांनी युक्त अशा पूयेकशासृग्विण्मूत्रास्थीनि - पू, केस, रक्त, विष्ठा, मूत्र व हाडे यांचा असकृत् - वारंवार वर्षद्भिः - वर्षाव करणार्‍या अभ्रोघैः - मेघांच्या समूहांनी नष्टभगणा - दिसत नाहीत नक्षत्रसमुदाय ज्यातील असे बभूव - झाले ॥१९॥
विजा चमकू लागल्या आणि त्यांच्या कडकडाटाबरोबरच मेघ दाटून आल्याने आकाशात सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह-तारे झाकले गेले. पाठोपाठ आकाशातून अखंडितपणे पू, केस, रक्त, विष्ठा, मूत आणि हाडे यांचा वर्षाव होऊ लागला. (१९)


गिरयः प्रत्यदृश्यन्त नानायुधमुचोऽनघ ।
दिग्वाससो यातुधान्यः शूलिन्यो मुक्तमूर्धजाः ॥ २० ॥
शस्त्रांची पर्वते तेंव्हा दरडी पडल्या तशा ।
नागव्या दैत्यिनी केस सोडिता पातल्या तिथे ॥ २० ॥

अनघ - हे निष्पाप विदुरा गिरयः - पर्वत नानायुधमुचः - अनेक प्रकारच्या शस्त्रांना सोडणारे असे च - आणि दिग्वाससः - दिशा आहेत वस्त्रे ज्यांची अशा मुक्तमूर्धजः - सोडिलेले आहेत केस ज्यांनी अशा शूलिन्यः - त्रिशूळ असलेल्या यातुधान्यः - राक्षसिणी प्रत्यदृश्यन्त - दिसू लागल्या ॥२०॥
हे विदुरा, हरतर्‍हेच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव करणारे मोठमोठे पहाड दिसू लागले. केस मोकळे सोडलेल्या आणि हातात त्रिशूळ घेतलेल्या नग्न राक्षसिणी दिसू लागल्या. (२०)


बहुभिर्यक्षरक्षोभिः पत्त्यश्व रथकुञ्जरैः ।
आततायिभिरुत्सृष्टा हिंस्रा वाचोऽतिवैशसाः ॥ २१ ॥
भासले सैन्यही मोठे आक्रोश वाढला तसा ।
मारा कापा असे शब्द सर्वत्र घुमु लागले ॥ २१ ॥

आततायिभिः - वध करण्यास उद्युक्त झालेल्या बहुभिः - अनेक यक्षरक्षोभिः - यक्ष व राक्षस यांनी पत्यश्वरथकुञ्जरैः - पायदळ, घोडेस्वार, हत्ती व रथ यांनी अतिवैशसाः - अत्यंत घातुक अशा हिंस्त्राः - भयंकर वाचः - वाणी उत्सृष्टाः - उच्चारिल्या ॥२१॥
पुष्कळसे पायदळ, घोडेस्वार, रथी आणि हत्तींवर चढलेल्या सैनिकांसह आततायी यक्ष-राक्षसांचा "मारा, मारा," असा अत्यंत क्रूर आणि हिंसक आरडाओरडा ऐकू येऊ लागला.(२१)


प्रादुष्कृतानां मायानां आसुरीणां विनाशयत् ।
सुदर्शनास्त्रं भगवान् प्रायुङ्‌क्त दयितं त्रिपात् ॥ २२ ॥
यापरी असुरी माया वारण्या हरिने तदा ।
सोडिले प्रिय ते चक्र भगवान्‌ यज्ञमूर्तिने ॥ २२ ॥

त्रिपात् - तीन आहेत पाय ज्याला असा भगवान् - विष्णू प्रादुष्कृतानाम् - प्रगट केलेल्या अशा आसरीणाम्ः - असुरसंबंधी मायानाम् - मायांना विनाशयत् - नाश करणारे असे दयितम् - प्रिय सुदर्शनास्त्रम् - सुदर्शनास्त्राची प्रायुङ्क्त - योजना करिता झाली ॥२२॥
अशा प्रकारे प्रगट झालेल्या त्या आसुरी मायाजालाचा नाश करण्यासाठी यज्ञमूर्ती भगवान वराहांनी आपले प्रिय सुदर्शन चक्र सोडले. (२२)


तदा दितेः समभवत् सहसा हृदि वेपथुः ।
स्मरन्त्या भर्तुः आदेशं स्तनात् च असृक् प्रसुस्रुवे ॥ २३ ॥
स्मरोनि पतिचे शब्द दीति तै थर्र्‌र कांपली ।
रक्ताच्या सुटल्या धारा दितीच्या त्या स्तनातुनी ॥ २३ ॥

तद - त्यावेळी भर्तुः - पतीच्या आदेशम् - वचनाचे स्मरन्त्याः - स्मरण करणार्‍या अशा दितेः - दितीच्या हृदि - हृदयात सहसा - एकाएकी वेपथुः - कंप समभवत् - उत्पन्न झाला च - आणि स्तनात् - स्तनांतून असृक् - रक्त प्रसुस्त्रुवे - वाहु लागले ॥२३॥
त्यावेळी आपल्या पतीच्या कथनाचे स्मरण होऊन दितीच्या हृदयाचा थरकाप होऊ लागला आणि तिच्या स्तनातून रक्त वाहू लागले. (२३)


विनष्टासु स्वमायासु भूयश्चाव्रज्य केशवम् ।
रुषोपगूहमानोऽमुं ददृशेऽवस्थितं बहिः ॥ २४ ॥
होताचि नष्ट ते जाल हरीचा करण्या चुरा ।
दाबले छातिशी दैत्ये परी तो दूरची दिसे ॥ २४ ॥

च - आणि सः - तो हिरण्याक्ष स्वमायासु विनष्टासु - आपल्या माया नष्ट झाल्या असता भूयः - पुनः केशवम् - विष्णूजवळ आव्रज्य - येऊन अमुम् - ह्याला रुषा - क्रोधाने उपगूहमानः - आपल्या बाहूंमध्ये घट्ट आवळणारा असा बहिः - बाहेर अवस्थितम् - असलेल्या विष्णुं - विष्णूला ददृशे - पाहता झाला ॥२४॥
आपले मायाजाल नष्ट झाल्यावर तो दैत्य पुन्हा भगवंतांच्या जवळ आला. त्याने त्यांना क्रोधाने आवळून धरून चिरडून टाकण्य़ाच्या इच्छेने कवेत घेतले, परंतु त्याने पाहिले तर ते बाहेरच उभे होते. (२४)


तं मुष्टिभिर्विनिघ्नन्तं वज्रसारैः अधोक्षजः ।
करेण कर्णमूलेऽहन् यथा त्वाष्ट्रं मरुत्पतिः ॥ २५ ॥
वज्रापरि मुठी त्याच्या प्रहार करु लागला ।
कान्‌शिलीं हरिने त्याच्या मारिली तेधवा बळे ॥ २५ ॥

अधोक्षजः - विष्णु वज्रसारैः - वज्रसारख्या कठोर अशा मुष्टिभिः - मुष्टींनी विनिघ्रन्तम् - प्रहार करणार्‍या अशा तम् - त्याला यथा - ज्याप्रमाणे मरुत्पतिः - इंद्र त्वाष्ट्रम् - वृत्रासुराला तथा - त्याप्रमाणे करेण - हाताने कर्णमूले - कानाच्या मुळाशी अहन् - मारता झाला ॥२५॥
आता तो भगवंतांवर आपल्या वज्रासारख्या कठोर बुक्क्या मारू लागला. तेव्हा इंद्राने ज्याप्रमाणे वृत्रासुरावर प्रहार केला होता, त्याप्रमाणे भगवंतांनी त्याच्या कानफटीत एक ठोसा मारला. (२५)


स आहतो विश्वजिता ह्यवज्ञया
     परिभ्रमद्‌गात्र उदस्तलोचनः ।
विशीर्णबाह्वङ्‌‌घ्रिशिरोरुहोऽपतद्
     यथा नगेन्द्रो लुलितो नभस्वता ॥ २६ ॥
( इंद्रवज्रा )
मारी जधी चापट विश्वजीत
    तै दैत्यदेहो फिरु लागला नी ।
निष्प्राण झाले कर पाद नेत्र
    वृक्षापरी तो पडला धरेसी ॥ २६ ॥

हि - खरोखर विश्वजिता - विश्वाला जिंकणार्‍या अशा विष्णूने अवज्ञया - अनादर करून आहतः - प्रहार केलेला सः - तो हिरण्याक्ष यथा - ज्याप्रमाणे नभस्वता - वायूने लुलितः - मोडलेला नगेन्द्रः - प्रचंड वृक्ष तथा - त्याप्रमाणे परिभ्रमद्‌गात्रः - सभोवर फिरत आहे शरीर ज्याचे असा उदस्तलोचनः - व बाहेर निघाले आहेत डोळे ज्याचे असा विशीर्णबाह्‌वङ्घ्रिशिरोरुहः - आणि तुटलेले आहेत हात, पाय व केस ज्याचे असा अपतत् - पडला ॥२६॥
विश्वविजयी भगवंतांनी जरी सहज ठोसा मारला होता, तरी त्या प्रहाराने हिरण्याक्षाचा देह गरगरू लागला, त्याचे डोळे बाहेर आले, हात, पाय आणि केस छिन्नभिन्न झाले आणि तो वावटळीमुळे उखडलेल्या विशाल वृक्षाप्रमाणे जमिनीवर आदळला. (२६)


क्षितौ शयानं तमकुण्ठवर्चसं
     करालदंष्ट्रं परिदष्टदच्छदम् ।
अजादयो वीक्ष्य शशंसुरागता
     अहो इमं को नु लभेत संस्थितिम् ॥ २७ ॥
तरीहि त्याचे नच नष्ट प्राण
    दातास चावूनि तनूस त्यागी ।
ब्रह्मादि देवे मग पाहुनिया
    प्रशंसिले त्यां किति थोर मृत्यु ॥ २७ ॥

आगताः - आलेले अजादयः - ब्रह्मदेवादिक अकुण्ठवर्चसम् - अकुण्ठित आहे पराक्रम ज्याचा अशा करालदंष्ट्रम् - भयंकर आहेत दाढा ज्याच्या अशा परिदष्टदच्छदम् - चावले आहेत ओठ ज्याने अशा क्षितौ - पृथ्वीवर शयानम् - शयन करणार्‍या अशा तम् - त्या हिरण्याक्षाला वीक्ष्य - पाहून शशंसुः - प्रशंसा करू लागले अहो - कितीहो आश्चर्य इमाम् - ह्या संस्थितिम् - मरणाला कः नु - कोण बरे लभेत - मिळवील ॥२७॥
हिरण्याक्षाचे तेज अजूनही कमी झाले नव्हते. त्या भयानक दाढा असलेल्या दैत्याला दात-ओठ चावीत पृथ्वीवर पडलेला पाहून तेथे युद्ध पाहाण्यासाठी आलेले ब्रह्मदेव इत्यादी देव त्याची प्रशंसा करीत म्हणू लागले की, ‘अहो ! असे मरण कोणाला प्राप्त होते ?’ (२७)


यं योगिनो योगसमाधिना रहो
     ध्यायन्ति लिङ्‌गादसतो मुमुक्षया ।
तस्यैष दैत्यऋषभः पदाहतो
     मुखं प्रपश्यन् तनुमुत्ससर्ज ह ॥ २८ ॥
मिथ्या उपाधी सुटण्यास योगी
    ध्याती समाधी मधुनीच नित्य ।
त्या लाथ लाभे सुख पावला नी
    सोडी शरीरा मग दैत्यराज ॥ २८ ॥

योगिनः - योगी पुरुष असतः - मिथ्यारूपी लिङ्गात् - लिङ्गशरीरापासून मुमुक्षया - सुटण्याच्या इच्छेने योगसमाधिना - समाधियोगाने रहः - एकांतात यम् - ज्या विष्णूचे ध्यायन्ति - ध्यान करितात तस्य - त्या विष्णूच्या मुखम् - मुखाला प्रपश्यन् - पाहणारा पदा - पायाने हतः - प्रहार केलेला एषः - हा दैत्यापसदः - दुष्ट दैत्य तनुम् - शरीराचा उत्ससर्ज ह - त्याग करिता झाला ॥२८॥
आपल्या मिथ्या लिंगशरीरापासून सुटण्यासाठी योगीजन समाधियोगाच्या द्वारा ज्यांचे ध्यान करतात, त्यांच्याच चरणांच्या प्रहाराने घायाळ झालेल्या या दैत्यराजाने त्यांचेच मुखकमल पाहात पाहात आपल्या शरीराचा त्याग केला. (२८)


(अनुष्टुप्)
एतौ तौ पार्षदावस्य शापाद् यातौ असद्‌गतिम् ।
पुनः कतिपयैः स्थानं प्रपत्स्येते ह जन्मभिः ॥ २९ ॥
( अनुष्टुप्‌ )
द्विजांच्या शापयोगाने पातले नीच योनिसी ।
असे पार्षद हे दोघे वैकुंठी पावती पुन्हा ॥ २९ ॥

तौ - ते एतो - हे अस्य - विष्णूचे पार्षदौ - व्दारपाल शापात् - शापामुळे असद्‌गतिम् - दुष्ट योनीत यातो - गेलेले असे कतिपंयैः - कित्येक जन्मभिः - जन्मांनी पुनः - पुन्हा स्थानम् - स्थानाला प्रपत्स्येते ह - खरोखर प्राप्त होतील ॥२९॥
हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघे भगवंतांचेच पार्षद आहेत. त्यांना शापामुळे ही अधोगती प्राप्त झाली आहे. आता काही जन्मातच हे पुन्हा आपल्या स्थानावर परत जातील. (२९)


देवा ऊचुः -
नमो नमस्तेऽखिलयज्ञतन्तवे
     स्थितौ गृहीतामलसत्त्वमूर्तये ।
दिष्ट्या हतोऽयं जगतामरुन्तुदः
     त्वत् पादभक्त्या वयमीश निर्वृताः ॥ ३० ॥
देवता म्हणाल्या - ( इंद्रवज्रा )
नमो नमस्ते तुज यज्ञसारा
    विश्वस्थिता मंगलनाम धामा ।
मारीयला दैत्यहि कष्टदायी
    तुझ्या पदीं शांति सुखासि धालो ॥ ३० ॥

इश - हे विष्णो अखिलयज्ञतन्तवे - सर्व यज्ञांचा विस्ताररूप अशा स्थितौ - सृष्टीच्या रक्षणाविषयी गृहीतामलसत्त्वमूर्तये - धारण केले आहे शुद्ध सत्त्वगुणांचे स्वरूप ज्याने अशा ते - तुला नमः नमः - वारंवार नमस्कार अस्तु - असो जगताम् - त्रैलोक्याचा अयम् - हा अरुन्तुदः - मर्मभेदी दिष्ट्या - सुदैवाने हतः - ठार केला अस्ति - आहे वयम् - आम्ही त्वत्पादभक्त्या - तुझ्या चरणाच्या भक्तीने निवृताः - सुखी स्मः - आहो ॥३०॥
देव म्हणू लागले- "प्रभो, आपणाला वारंवार नमस्कार असो ! आपण संपूर्ण यज्ञांचा विस्तार करणारे आहात. तसेच जगाच्या अस्तित्वासाठी शुद्ध सत्त्वमय असे मंगल शरीर धारण करीत आहात. जगाला कष्ट देणारा हा दुष्ट दैत्य मारला गेला ही मोठी आनंदाची गोष्ट झाली. आता आपल्या चरणांच्या भक्तीच्या प्रभावाने आम्हांलाही सुख मिळाले." (३०)


मैत्रेय उवाच -
एवं हिरण्याक्षमसह्यविक्रमं
     स सादयित्वा हरिरादिसूकरः ।
जगाम लोकं स्वमखण्डितोत्सवं
     समीडितः पुष्करविष्टरादिभिः ॥ ३१ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
हिरण्य‍अक्षास अशा प्रकारे
    मारोनि धामासहि विष्णु गेला ।
ब्रम्हादिके त्या समयी उचीत
    त्यांची स्तुती गायलि सर्व देवे ॥ ३१ ॥

सः - तो आदिसूकरः - आदिवराह हरिः - विष्णु असह्यविक्रमम् - असह्य आहे पराक्रम ज्याचा अशा हिरण्याक्षम् - हिरण्याक्षाला एवम् - याप्रमाणे सादयित्वा - मारून पुष्करविष्टरादिभिः - कमल आहे आसन ज्याचे अशा ब्रह्मदेवादि सर्व देवांनी समीडितः - स्तुति केलेला स्वम् - आपल्या अखण्डितोत्सवम् - निरंतर आहे उत्सव ज्यामध्ये अशा लोकम् - लोकाला जगाम - गेला ॥३१॥
मैत्रेय म्हणाले - अशा प्रकारे महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध करून ब्रह्मादी देवतांनी स्तुती केलेले भगवान आदिवराह आपल्या अखंड आनंदमय धामाकडे परतले. ३१()


मया यथानूक्तमवादि ते हरेः
     कृतावतारस्य सुमित्र चेष्टितम् ।
यथा हिरण्याक्ष उदारविक्रमो
     महामृधे क्रीडनवन्निराकृतः ॥ ३२ ॥
लीलाकरी तो अवतार घेता
    मारीयला दैत्यहि खेळ जैसा ।
जे ऐकले मी गुरुच्या मुखाने
ते मी विदूरा तुज ऐकवीले ॥ ३२ ॥

सुमित्र - हे विदुरा उदारविक्रमः - मोठा आहे पराक्रम ज्याचा असा हिरण्याक्षः - हिरण्याक्ष महामृधे - घोर संग्रामात क्रीडनकवत् - खेळण्याच्या वस्तूप्रमाणे यथा - जसा निराकृतः - मारला तत् - ते कृतावतारस्य - घेतलेला आहे अवतार ज्याने अशा हरेः - श्रीविष्णूचे चेष्टितम् - चरित्र मया - मी यथानूक्तम् - गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ते - तुला अवादि - सांगितले ॥३२॥
मित्रा विदुरा, भगवंतांनी अवतार घेऊन भीषण संग्रामात खेळणे मोडावे तसा महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध केला, ते सर्व चरित्र मी गुरुमुखातून जसे ऐकले, तसे तुला सांगितले. (३२)


सूत उवाच -
(अनुष्टुप्)
इति कौषारवाख्यातां आश्रुत्य भगवत्कथाम् ।
क्षत्तानन्दं परं लेभे महाभागवतो द्विज ॥ ३३ ॥
सूतजी सांगतात - ( अनुष्टुप्‌ )
असे ऐकून आख्यान मैत्रैया मुखिचे तया ।
शौनका भगवद्‌भक्त विदुरां तोष जाहला ॥ ३३ ॥

व्दिज - हे शौनक ऋषे महाभागवतः - मोठा भगवद्‌भक्त असा क्षत्ता - विदुर इति - याप्रमाणे कौषारवाख्याताम् - मैत्रेय ऋषींनी सांगितलेल्या अशा भगवत्कथाम् - श्रीविष्णूच्या कथेला आश्रुत्य - श्रवण करून परम् - अत्यंत आनन्दम् - आनंदाला लेभे - प्राप्त झाला ॥३३॥
सूत म्हणाले - शौनक महोदय, मैत्रेयांच्या मुखातून भगवंतांची ही कथा ऐकून परम भगवद्‌भक्त विदुराला फार आनंद झाला. (३३)


अन्येषां पुण्यश्लोकानां उद्दामयशसां सताम् ।
उपश्रुत्य भवेन्मोदः श्रीवत्साङ्‌कस्य किं पुनः ॥ ३४ ॥
पवित्र कीर्ति ही ऐसी चरित्रहि महान ते ।
ऐकता मोदची होतो भगवद्‌ गोष्टि आगळ्या ॥ ३४ ॥

पुण्यश्लोकानाम् - पवित्र आहे कीर्ति ज्यांची अशा उद्दामयशसाम् - मोठे आहे यश ज्यांचे अशा अन्येषाम् - दुसर्‍या सताम् - साधूंच्या कथाम् - कथेला उपश्रुत्य - ऐकून मोदः - आनंद भवति - होतो श्रीवत्साङ्कस्य - श्रीवत्स आहे लांछन ज्याचे अशा विष्णूच्या कथाम् उपश्रुत्य - कथेला ऐकून भवेत् - होईल इति - असे किम् - काय पुनः - पुन्हा वक्तव्यम् - सांगितले पाहिजे ॥३४॥
जर अन्य पवित्रकीर्ती आणि परम यशस्वी महापुरुषांचे चरित्र ऐकूनही फार आनंद होतो, तर श्रीवत्सधारी भगवंतांच्या लीला ऐकून आनंद होईल, यात काय सांगावे ? (३४)


यो गजेन्द्रं झषग्रस्तं ध्यायन्तं चरणाम्बुजम् ।
क्रोशन्तीनां करेणूनां कृच्छ्रतोऽमोचयद्द्रुतम् ॥ ३५ ॥
तं सुखाराध्यमृजुभिः अनन्यशरणैर्नृभिः ।
कृतज्ञः को न सेवेत दुराराध्यं असाधुभिः ॥ ३६ ॥
मगरें गजराजाते धरिता ध्यान तो करी ।
हत्तिणी दुःखवेगाने ओरडू लागल्या तदा ॥ ३५ ॥
त्या वेळी त्यास विष्णुने केले मुक्त असा असे ।
दुष्टां पावल तो कैसा शहाणा सोडिना पदा ॥ ३६ ॥

यः - जो भगवान् झषग्रस्तम् - मगराने पकडलेल्या अशा चरणाम्बुजम् - परमेश्वराच्या चरणकमलाला ध्यायन्तम् - चिंतणार्‍या गजेन्द्र - गजेन्द्राला करेणूनाम् क्रोशन्तीनाम् - हत्तिणी ओरडू लागल्या असता द्रुतम् - त्वरित कृच्छ्रतः - संकटापासून अमोचयत् - सोडविता झाला ॥३५॥ कृतज्ञः - कृतज्ञ असा कः - कोण पुरुष अनन्यशरणैः - ईश्वरावाचून दुसरा रक्षणकर्ता ज्यांना नाही अशा ऋजुभिः - सरल अशा नृभिः - मनुष्यांनी सुखाराध्यम् - सुखाने आराधना करण्यास योग्य अशा असाधुभिः - दुष्टांनी दुराराध्यम् - आराधना करण्यास अशक्य अशा तम् - त्या विष्णूला न सेवेत - सेवणार नाही ॥३६॥
ज्यावेळी मगरीने पकडल्यानंतर गजेंद्र प्रभूंच्या चरणांचे ध्यान करू लागला आणि त्याच्या हत्तिणी दुःखाने आक्रोश करू लागल्या, त्यावेळी ज्यांनी त्या सर्वांना तत्काळ दुःखातून सोडविले, तसेच जे सर्व बाजूंनी निराश होऊन आपल्याला शरण आलेल्या सरलहृदय भक्तांवर सहजपणे प्रसन्न होतात, परंतु दुष्टांना मात्र अत्यंत दुराराध्य आहेत, त्या प्रभूंच्या उपकारांना जाणणारा कोणता पुरुष त्यांची भक्ती करणार नाही ? (३५-३६)


यो वै हिरण्याक्षवधं महाद्‍भुतं
     विक्रीडितं कारणसूकरात्मनः ।
श्रृणोति गायत्यनुमोदतेऽञ्जसा
     विमुच्यते ब्रह्मवधादपि द्विजाः ॥ ३७ ॥
( इंद्रवज्रा )
घेवोनि देवेच वराहरुपा
    विमोचिले त्या पृथिवीस ऐसे ।
कथा हिरण्याक्ष वधास ऐके
    तो ब्रह्महत्येतुनि मुक्त होतो ॥ ३७ ॥

व्दिजाः - ऋषि हो यः - जो कारणसूकरात्मनः - पृथ्वीच्या उद्धाराकरिता वराहरूप धारण केलेल्या श्रीविष्णूच्या विक्रीडितम् - लीलारूप महाद्‌भूतम् - मोठ्या आश्चर्यकारक अशा हिरण्याक्षवधम् - हिरण्याक्षाच्या वधाला श्रृणोति - श्रवण करितो गायति - गायन करतो अनुमोदते - अनुमोदन देतो सः - तो वै - खरोखर ब्रह्मवधात् अपि - ब्रह्महत्येपासून देखील अञ्जसा - सहज विमुच्यते - मुक्त होतो ॥३७॥
शौनकादी ऋषींनो, कार्यासाठी वराहरूप धारण करणार्‍या श्रीहरींची हिरण्याक्षवधाची परम अद्‌भुत लीला जो पुरुष ऐकतो, गातो किंवा तिला अनुमोदन देतो, तो ब्रह्महत्येसारख्या घोर पापातूनही सहज सुटून जातो. (३५)


एतन् महापुण्यमलं पवित्रं
     धन्यं यशस्यं पदमायुराशिषाम् ।
प्राणेन्द्रियाणां युधि शौर्यवर्धनं
     नारायणोऽन्ते गतिरङ्‌ग श्रृण्वताम् ॥ ३८ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां
तृतीयस्कंधे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
अतीव पुण्यप्रद ही कथा नी
    ऐश्वर्य आयू धन कीर्ति देते ।
युद्धात शक्ती नि बळास देते
    ऐके तया श्रीभगवंत पावे ॥ ३८ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥
॥ एकोणविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ १९ ॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

अङ्ग - शौनक मुने महापुण्यम् - मोठे आहे स्वर्गादिक पुण्यफल ज्याचे असे अलम् - अतिशय पवित्रम् - पवित्र असे धन्यम् - धन देणारे असे यशस्यम् - कीर्ति मिळवून देणारे असे आयुराशिषाम् - आयुष्य व इष्टवस्तु यांचे च - आणि प्राणेन्द्रियाणाम् - प्राण व इंद्रिये याचे पदम् - आश्रयस्थान असे युधि - युद्धात शौर्यवर्धनम् - शौर्याला वाढविणारे असे एतत् - ह्या चरित्राला शृण्वताम् - ऐकणार्‍यांना अन्ते - शेवटी नारायणः गतिः - नारायणाची प्राप्ती भवति - होते ॥३८॥
हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद, परम पवित्र, धन व यशाची प्राप्ती करून देणारे, आयुष्य़वर्धक आणि कामनांची पूर्ती करणारे, युद्धात प्राण आणि इंद्रियांची शक्ती वाढविणारे आहे. जे लोक हे चरित्र ऐकतात, त्यांना अंती श्रीभगवंतांचा आश्रय प्राप्त होतो. (३८)


स्कंध तिसरा - अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP