श्रीमद् भागवत पुराण
तृतीयः स्कन्धः
अष्टादशोऽध्यायः

पृथिव्या उद्धारकाले हिरण्याक्षवराहसमागमः तयोयुद्धवर्णनं च -

हिरण्याक्षाबरोबर वराह-भगवानांचे युद्ध -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


मैत्रेय उवाच -
तदेवमाकर्ण्य जलेशभाषितं
     महामनास्तद् विगणय्य दुर्मदः ।
हरेर्विदित्वा गतिमङ्‌ग नारदाद्
     रसातलं निर्विविशे त्वरान्वितः ॥ १ ॥
मैत्रेयजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
ऐकोनि हे भाष्य मनीं प्रसन्न
    झाला तदा दैत्य स्मरे न मृत्यु ।
तो नारदाला पुसता ठाव
    गेला हरीच्याहि रसातळाला ॥ १ ॥

अङ्ग - हे विदुरा एवम् - याप्रमाणे तत् - ते जलेशभाषितम् - वरुणाचे भाषण आकर्ण्य - श्रवण करून महामनाः - मोठे आहे मन ज्याचे असा दुर्मदः - मदोन्मत्त असा सः - तो हिरण्याक्ष तत् - ते वरुणाचे भाषण विगणय्य - तुच्छ समजून नारदात् - नारदापासून हरेः - विष्णूचे गतिम् - वृत्त विदित्वा - जाणून त्वरान्वितः - त्वरेने युक्त असा रसातलम् - रसातळात निर्विविशे - शिरला ॥१॥
मैत्रेय म्हणाले - हे विदुरा, वरुणाचे हे बोलणे ऐकून तो मदोन्मत्त दैत्य अत्यंत खूष झाला. "तू त्यांच्या हातून मारला जाशील." या त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता नारदांना श्रीहरींचा ठाव-ठिकाणा विचारून तो तत्काळ रसातळात पोहोचला. (१)


ददर्श तत्राभिजितं धराधरं
     प्रोन्नीयमान अवनिं अग्रदंष्ट्रया ।
मुष्णन्तमक्ष्णा स्वरुचोऽरुणश्रिया
     जहास चाहो वनगोचरो मृगः ॥ २ ॥
तेथे तये पाहियले वराहा
    दाढेवरी घेतली पृथ्वि जेणे ।
नेत्रात लाली चमके बघून
    वदे पशू हा जलमार्गि कैसा ॥ २ ॥

तत्र - त्या रसातळात अभिजितम् - चोहोकडून वीरांना जिंकणार्‍या धराधरम् - पृथ्वीला धारण करणार्‍या अग्रदंष्ट्रया - दाढेच्या टोकाने प्रोन्नीयमानावनिम् - वर नेली जात आहे पृथ्वी ज्याकडून अशा अरुणाश्रिया - आरक्त आहे कांती ज्याची अशा अक्ष्णा - नेत्राने स्वरुचः - आपल्या कांतीला मुष्णन्तम् - फिक्की पाडणार्‍या अशा जहास - हसून म्हणाला अहो - कितीहो आश्चर्य आहे वनगोचरः - रानात किंवा पाण्यात संचार करणारा मृगः - पशु किंवा योगी ज्याचा शोध करतात असा ईश्वर ॥२॥
तेथे त्याने विश्वविजयी वराह भगवानांना आपल्या दाढेच्या टोकावर पृथ्वीला ठेवून वरच्या बाजूला जाताना पाहिले. ते आपल्या लालभडक चमकदार डोळ्यांनी त्याचे तेज हरण करीत होते. त्यांना पाहून तो खदखदा हसू लागला आणि म्हणाला, "अरे ! हा जंगली पशू इथे पाण्यात कोठून आला ?" (२)


आहैनमेह्यज्ञ महीं विमुञ्च नो
     रसौकसां विश्वसृजेयमर्पिता ।
न स्वस्ति यास्यस्यनया ममेक्षतः
     सुराधमासादितसूकराकृते ॥ ३ ॥
वदे तयतो इकडे असा ये
    मूढा कुठे चालविलीस पृथ्वी ।
ब्रह्म्ये इथे ठेवियली अम्हाते
    माझ्यापुढे ना सुखरूप जासी ॥ ३ ॥

सः - तो हिरण्याक्ष एनम् - ह्या आदिवराहाला आह - म्हणाला अज्ञ - मूर्खा एहि - इकडे ये महीम् - पृथ्वीला मुञ्च - सोड इयम् - ही पृथ्वी विश्वसृजा - ब्रह्मदेवाने रसौकसाम् - रसातळ आहे स्थान ज्यांचे अशा नः - आम्हाला अर्पिता - दिली आहे आसादितसूकराकृते - धारण केले आहे वरहाचे स्वरूप ज्याने अशा सुराधम - अधम देवा मम ईक्षतः - मी पाहत असता अनया - ह्या पृथ्वीने स्वस्ति - कल्याणप्रत न यास्यसि - प्राप्त होणार नाहीस ॥३॥
नंतर तो वराहांना म्हणाला, "अरे मूर्खा ! इकडे ये. या पृथ्वीला सोडून दे. विश्वविधात्या ब्रह्मदेवाने ही आम्हां रसातलवासियांच्या स्वाधीन केली आहे. अरे वराहरूपधारी सुराधमा, माझ्यादेखत तू हिला घेऊन सुखरूपपणे जाऊ शकणार नाहीस. (३)


त्वं नः सपत्‍नैः अभवाय किं भृतो
     यो मायया हन्त्यसुरान् परोक्षजित् ।
त्वां योगमायाबलमल्पपौरुषं
     संस्थाप्य मूढ प्रमृजे सुहृच्छुचः ॥ ४ ॥
मायें लपोनि वधितोस दैत्या
    शिकारिसाठी कुणि पाळले का ।
मूर्खा असा वेश धरून येसी
    मी मारितो तूज स्मरोनि वैर ॥ ४ ॥

त्वम् - तू सपत्नैः - शत्रूंकडून नः - आमच्या अभवाय - नाशाकरिता भृतः - पोसलेला अस्ति - आहे किम् - काय यः - जो मायया - मायेने परोक्षजित् - अप्रत्यक्षपणे जिंकणारा असुरान् - दैत्यांचा हन्ति- वध करतो मूढ - मूर्खा योगमायाबलम्- योगमाया आहे बल ज्याला अशा अल्पपौरुषम् - स्वल्प आहे पौरुष ज्यांचे अशा त्वाम् - तुला संस्थाप्य - मारून सुहृच्छुचः - बंधूचा शोक प्रमृजे - मी नाहिसा करितो ॥४॥
तू मायेने लपून-छपूनच दैत्यांना जिंकतोस आणि मारून टाकतोस. आमच्या शत्रूंनी आमचा नाश करण्यासाठीच तुला पाळले आहे काय ? योगमाया हेच तुझे बळ आहे. तुझ्यात पुरुषार्थ थोडाच आहे ? मूर्खा, आज तुला नाहीसा करूनच माझ्या बांधवांचा शोक मी दूर करीन. (४)


त्वयि संस्थिते गदया शीर्णशीर्षणि
     अस्मद्‍भुजच्युतया ये च तुभ्यम् ।
बलिं हरन्ति ऋषयो ये च देवाः
     स्वयं सर्वे न भविष्यन्त्यमूलाः ॥ ५ ॥
माझ्या गदेच्या पडता प्रहार
    माथा फुटोनी मग मृत्यु पाव ।
जे प्रार्थिती देव मला ऋषी ते
    काष्ठापरी नष्ट स्वयेचि होती ॥ ५ ॥

अस्मद्भुजच्युतया - आमच्या हातातून सुटलेल्या गदया - गदेने शीर्णशीर्षणि - फुटलेले आहे मस्तक ज्याचे असा त्वयि संस्थिते - तू मृत झाला असता ये - जे तुभ्यम् - तुला बलिम् - पूजा हरन्ति - अर्पण करितात च - आणि ये - जे ऋषयः - ऋषि च - आणि देवाः - देव सन्ति - आहेत ते - ते सर्वे - सर्व अमूलाः - निराधार असे स्वयम् - स्वतः न भविष्यन्ति - नष्ट होतील ॥५॥
जेव्हा माझ्या हातातून केवळ सुटलेल्या गदेच्या प्रहाराने डोके फुटून तू मरून जाशील, तेव्हा तुझी आराधना करणारे जे देव आणि ऋषी आहेत, ते सर्वजण मुळे तोडलेल्या झाडाप्रमाणे आपोआप नष्ट होऊन जातील." (५)


स तुद्यमानोऽरिदुरुक्ततोमरैः
     दंष्ट्राग्रगां गां उपलक्ष्य भीताम् ।
तोदं मृषन् निरगाद् अम्बुमध्याद्
     ग्राहाहतः सकरेणुर्यथेभः ॥ ६ ॥
दैत्य स्वशब्देचि हरीस छेडी
    साहोनि आघात न सोडि पृथ्वी ।
आला जळातून परी जसा तो
    गजेंद्र हत्ती मकराकडोनी ॥ ६ ॥

अरिदुरुक्तैः - शत्रूंच्या कठोर भाषणरूपी भाल्यांनी तुद्यमानः - पीडा केला जाणारा सः - तो आदिवराह दंष्ट्राग्रगाम् - दाढेच्या टोकावर असलेल्या गाम् - पृथ्वीला भीताम् - भ्यालेली अशी उपलक्ष्य - पाहून तोदम् - व्यथेला मृषन् - सहन करणारा यथा - ज्याप्रमाणे ग्राहाहतः - मगराने पीडिलेला सकरेणुः - हत्तिणीसह इभः - हत्ती तथा - त्याप्रमाणे अम्बुमध्यात् - पाण्यामधून निरगात् - वर निघाला ॥६॥
हिरण्याक्ष भगवंतांना कठोर भाषणरूप बाणांनी टोचीत होता, परंतु त्यांनी दाताच्या टोकावर स्थिर असलेली पृथ्वी भयभीत झालेली पाहून ते टोचणे सहन केले आणि ज्याप्रमाणे मगरीचा तडाखा खाऊनही हत्तिणीसह हत्ती पाण्याच्या बाहेर येतो, त्याप्रमाणे पृथ्वी घेऊन बाहेर आले. (६)


तं निःसरन्तं सलिलाद् अनुद्रुतो
     हिरण्यकेशो द्विरदं यथा झषः ।
करालदंष्ट्रोऽशनिनिस्वनोऽब्रवीद्‌
     गतह्रियां किं त्वसतां विगर्हितम् ॥ ७ ॥
आव्हान त्याचे त्यजिता पुढे तो
    हिरण्यनेत्रो निघतो वधाया ।
बोले, न लज्जा पळुनी निघाला
    असत्य त्याला नच कांही खोटे ॥ ७ ॥

यथा - ज्याप्रमाणे झषः - मगर व्दिरदम् - हत्तीच्या तथा - त्याप्रमाणे सलिलात् - पाण्यातून निःसरन्तम् - वर निघणार्‍या तम् - त्या आदिवराहाच्या अनुद्रुतः - मागे लागलेला हिरण्यकेशः - सुवर्णाप्रमाणे आहेत केस ज्यांचे असा करालदंष्ट्रः - भयंकर आहेत दाढा ज्याच्या असा अशनिनिःस्वनः - मेघगर्जनेप्रमाणे आहे शब्द ज्याचा असा सः - तो हिरण्याक्ष अब्रवीत् - बोलला गतह्रियाम् - गेली आहे लज्जा ज्यांची अशा असताम् - दुष्टांना विगर्हितम् - निंदा किम् - काय अस्ति - आहे ॥७॥
जेव्हा हिरण्याक्षाने दिलेल्या आह्वानाला प्रत्युत्तर न देता ते पाण्याच्या बाहेर येऊ लागले, तेव्हा मगर ज्याप्रमाणे हत्तीचा पाठलाग करते, त्याचप्रमाणे पिवळे केस आणि तीक्ष्ण दाढांच्या त्या दैत्याने त्यांचा पाठलाग केला आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण स्वरात तो म्हणू लागला, "निर्लज्ज दुर्जनांना न करण्यासारखी गोष्ट कोणती आहे ?" (७)


स गां उदस्तात् सलिलस्य गोचरे
     विन्यस्य तस्यां अदधात् स्वसत्त्वम् ।
अभिष्टुतो विश्वसृजा प्रसूनैः
     आपूर्यमाणो विबुधैः पश्यतोऽरेः ॥ ८ ॥
पाण्यावरी योग्य स्थळीच पृथ्वी
    ठेवोनि देवे दिधला सहारा ।
हिरण्यकेशी पुढतीच ब्रह्मा
    स्तुती करी वर्षिती देव पुष्पे ॥ ८ ॥

सः - तो आदिवराह उदस्तात् - पाण्यावर गोचरे - व्यवहारयोग्य स्थळी गाम् विन्यस्य - पृथ्वीला ठेवून तस्याम् - त्या पृथ्वीच्या ठिकाणी स्वसत्त्वम् - आपल्या आधारशक्तीला अदधात् - स्थापिता झाला अरेः पश्यतः - शत्रु हिरण्याक्ष पहात असता विबुधैः - देवांनी प्रसूनैः - पुष्पांनी आपूर्यमाणः - भरून टाकलेला असा विश्वसृजा - ब्रह्मदेवाने अभिष्टुतः - स्तुति केलेला असा तं बभाषे - त्या हिरण्याक्षाला बोलला ॥८॥
भगवंतांनी पृथ्वीला आणून पाण्याच्या वर व्यवहाराला योग्य ठिकाणी ठेवले आणि तीत आपली शक्ती स्थापन केली. त्यावेळी हिरण्याक्षाच्या समक्षच ब्रह्मदेवांनी त्यांची स्तुती केली आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली. (८)


परानुषक्तं तपनीयोपकल्पं
     महागदं काञ्चनचित्रदंशम् ।
मर्माण्यभीक्ष्णं प्रतुदन्तं दुरुक्तैः
     प्रचण्डमन्युः प्रहसन् तं बभाषे ॥ ९ ॥
येताच पाठीं हरि दैत्य पाही
    गदेस घेवोनि बिभत्स शब्दे ।
अंगी सुवर्णो कवचेहि होते
    क्रोधे हरी त्यास हसोनि बोले ॥ ९ ॥

सः - तो आदिवराह परानुषक्तम् - पाठीस लागलेल्या तपनीयोपकल्पम् - सुवर्णाचे आहेत अलंकार ज्याचे अशा महागदम् - मोठी आहे गदा ज्याची अशा काञ्चनचित्रदंशम् - सुवर्णाचे चित्रविचित्र आहे चिलखत ज्याचे अशा दुरुक्तैः - कठोर भाषणांनी मर्माणि - मर्मांना अभीक्ष्णम् - वारंवार प्रतुदन्तम् - टोचणार्‍या तम् - त्या हिरण्याक्षाला प्रचण्डमन्युः - प्रचण्ड आहे क्रोध ज्याचा असा प्रहसन् - उपहास करीत बभाषे - बोलला ॥९॥
तेव्हा भली मोठी गदा घेऊन आपला पाठलाग करणार्‍या सोन्याचे अलंकार आणि अद्‌भुत कवच धारण केलेल्या तसेच कठोर शब्दांनी एकसारखे मर्मभेदी घाव घालणार्‍या हिरण्याक्षाला अत्यंत क्रुद्ध श्रीहरी हसत हसत म्हणाले. (९)


श्रीभगवानुवाच -
सत्यं वयं भो वनगोचरा मृगा
     युष्मद्विधान्मृगये ग्रामसिंहान् ।
न मृत्युपाशैः प्रतिमुक्तस्य वीरा
     विकत्थनं तव गृह्णन्त्यभद्र ॥ १० ॥
श्रीभगवान्‌ म्हणाले -
खरेच मी जंगलि प्राणि आहे
    तुझ्या परी ग्रामसिंहास शोधी ।
दुष्टा! जया मृत्युहि बंध बांधी
    ते वीर त्यांना कधि ढुंकितात? ॥ १० ॥

भोः - अरे हिरण्याक्षा ! सत्यम् - खरोखर वयम् - आम्ही वनगोचराः - अरण्यात फिरणारे मृगाः - पशु स्मः - आहो तु अहम् - परंतु मी युष्मव्दिधान् - तुमच्यासारखा ग्रामसिंहान् - कुत्र्यांना मृगेय - शोधतो अभद्र - हे दुर्दैवी दैत्या मृत्युपाशैः - यमाच्या पाशांनी प्रतिमुक्तस्य - बांधलेल्या तुझी विकत्थनम् - वल्गना वीराः - वीर पुरुष न गृह्‌णन्ति - ग्रहण करीत नाहीत ॥१०॥
श्रीभगवान म्हणाले - "अरे ! तुझ्यासारख्या कुत्र्यांना शोधीत फिरणारे आम्ही खरोखरीच जंगली प्राणी आहोत. अरे दुष्टा ! तुझ्यासारख्या मृत्युपाशात अडकलेल्या जीवांच्या आत्मस्तुतीकडे वीर पुरुष लक्ष देत नाहीत. (१०)


एते वयं न्यासहरा रसौकसां
     गतह्रियो गदया द्रावितास्ते ।
तिष्ठामहेऽथापि कथञ्चिदाजौ
     स्थेयं क्व यामो बलिनोत्पाद्य वैरम् ॥ ११ ॥
हाँ मी धरा चोरुनि आणियेली
    तुला भिवोनी पळलो असा हा ।
सामर्थ्य कोठे मज अंगि मोठे
    तू बांधिता मी पळतोचि कोठे ॥ ११ ॥

एते - हे वयम् - आम्ही रसौकसाम् - रसातळ आहे स्थान ज्यांचे अशा लोकांची न्यासहराः - ठेव हरण करणारे गतह्रियः - गेली आहे लज्जा ज्यांची असे ते - तुझ्या गदया - गदेने द्राविताः - पळवून लाविलेले असे स्मः - आहो अथ अपि - असे असताहि कथञ्चित् - कसेतरी आजौ - युद्धात तिष्ठामहे - उभे रहातो यतः अस्माभिः - कारण आम्हाला स्थेयम् - उभे राहिलेच पाहिजे बलिना - बलवानाशी वैरम् - वैर उत्पाद्य - उत्पन्न करून क्व - कोठे यामः - जावे ॥११॥
रसातळात राहाणार्‍यांची भूमी चोरून आणून आणि लाज सोडून तुझ्या गदेने भयभीत होऊन आम्ही येथे पळून आलो आहोत, हे बरोबर आहे. तुझ्यासारख्या अद्वितीय वीरासमोर युद्धासाठी उभे राहाण्याचे सामर्थ्य आमच्यात कुठून असणार ? परंतु आता तर आम्ही तुझ्यासमोर कसे का असेना, उभे आहोत. तुझ्यासारख्या बलवानाशी वैर करून आम्ही तरी कुठे जाऊ शकतो ? (११)


त्वं पद्-रथानां किल यूथपाधिपो
     घटस्व नोऽस्वस्तय आश्वनूहः ।
संस्थाप्य चास्मान् प्रमृजाश्रु स्वकानां
     यः स्वां प्रतिज्ञां नातिपिपर्त्यसभ्यः ॥ १२ ॥
तू पैदळाचा सरदार शोभे
    निशंक होवोनि अस्त्रास सोडी ।
आम्हा वधोनी पुसि बंधु नेत्र
    संकल्प ना मोड असभ्य होसी ॥ १२ ॥

त्वम् - तू पद्रथानाम् यूथपाधिपः - पायदळांच्या समुदायातील जे श्रेष्ठ त्यांच्यामध्येहि श्रेष्ठ असा अनूहः - संशयरहित असा किल - खरोखर असि - आहेस नः - आमच्या अस्वस्तये - पराभवाकरिता आशु - लवकर घटस्व - सिद्ध हो च - आणि अस्मान् - आमचा संस्थाप्य - नाश करून स्वकानाम् - आपल्या बान्धवांचे अश्रु - अश्रु प्रमृजः - पुसून टाक सः - जो स्वाम् - आपली प्रतिज्ञाम् - प्रतिज्ञा न अतिपिपर्ति - पूर्ण करीत नाही स - तो असभ्यः - सभेमध्ये अयोग्य अस्ति - आहे ॥१२॥
तू पायदळ वीरांचा सेनापती आहेस, तेव्हा आता निःशंकपणे कोणताही विचार न करता तत्काळ आम्हांला मारून आपल्या बांधवांचे अश्रू पूस. जो आपल्या प्रतिज्ञेचे पालन करीत नाही, तो असभ्य होय. (१२)


मैत्रेय उवाच -
सोऽधिक्षिप्तो भगवता प्रलब्धश्च रुषा भृशम् ।
आजहारोल्बणं क्रोधं क्रीड्यमानोऽहिराडिव ॥ १३ ॥
मैत्रैयजी म्हणाले -
तिरस्कारुनिया देवे केले त्यां अवमानित ।
खेळात साप तो जैसा फुत्कारे दैत्य तै दिसे ॥ १३ ॥

क्रीड्यमानः - खेळविल्या जाणार्‍या अहिराट् इव - प्रचण्ड सर्पाप्रमाणे भगवता - भगवान आदिवराहाने अधिक्षिप्तः - तिरस्कृत केलेला च - आणि रुषा - क्रोधाने भृशम् - अत्यन्त प्रलब्धः - उपहास केलेला असा सः - तो हिरण्याक्ष उल्बणम् - दुःसह अशा क्रोधम् - क्रोधाला आजहार - धारण करिता झाला ॥१३॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, जेव्हा भगवंतांनी क्रोधाने त्या दैत्याचा अशा प्रकारे खूप उपहास आणि तिरस्कार केला, तेव्हा पकडून खेळ केल्या जाणार्‍या सापाप्रमाणे तो क्रोधाने जळफळू लागला. (१३)


सृजन् अमर्षितः श्वासान् मन्युप्रचलितेन्द्रियः ।
आसाद्य तरसा दैत्यो गदया न्यहनद् हरिम् ॥ १४ ॥
जोरात श्वास तो घेता जाहला तप्त मानसी ।
सगदा घेतली धाव भगवंतां प्रहारिले ॥ १४ ॥

अमर्षितः - रागावलेला असा श्वासान् - श्वासांना सृजन् - सोडणारा मत्युप्रचलितन्द्रियः - क्रोधाने खवळली आहेत इंद्रिये ज्याची असा दैत्यः - दैत्य हिरण्याक्ष तरसा - वेगाने आसाद्य - जवळ येऊन गदया - गदेने हरिम् - आदिवराहरूपी श्रीहरीला अभ्यहनत् - प्रहार करिता झाला ॥१४॥
तो खवळून उसासे टाकू लागला, त्याची इंद्रिये क्रोधाने क्षुब्ध झाली आणि त्या दैत्याने मोठया आवेशाने झेप घेऊन भगवंतांच्यावर गदेने प्रहार केला. (१४)


भगवान् तु गदावेगं विसृष्टं रिपुणोरसि ।
अवञ्चयत् तिरश्चीनो योगारूढ इवान्तकम् ॥ १५ ॥
वंचिका देउनी त्याला देवे घावहि टाकिला ।
योग सिद्ध असे योगी टाळिती मृत्यु ज्यापरी ॥ १५ ॥

भगवान् - भगवान् तिरश्चीनः - बाजूला वळलेला असा रिपुणा - शत्रूने उरसि - वक्षःस्थलावर विसृष्टम् - सोडलेल्या गदावेगम् - गदेच्या वेगाला योगारुढः - योगी अन्तकम् इव - मृत्यूला जसा तसा अवञ्चयत् - चुकविता झाला ॥१५॥
ज्याप्रमाणे योगसिद्ध पुरुष मृत्यूच्या आक्रमणापासून आपला बचाव करतो, अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या छातीवर केलेला त्या शत्रूच्या गदेचा प्रहार थोडेसे बाजूला होऊन चुकविला. (१५)


पुनर्गदां स्वां आदाय भ्रामयन्तं अभीक्ष्णशः ।
अभ्यधावद् हरिः क्रुद्धः संरम्भाद् दष्टदच्छदम् ॥ १६ ॥
क्रोधाने दैत्य ओठाते चाविता जाहला तदा।
गदेते फिरवी वेगे हरि तै सिद्ध जाहला ॥ १६ ॥

पुनः - पुनः स्वाम् - आपली गदाम् - गदा आदाय - घेऊन अभीक्ष्णशः - वारंवार भ्रामयन्तम् - फिरविणार्‍या संरम्भात् - क्रोधाने दष्टदच्छदम् - चावले आहेत ओठ ज्याने अशा तम् - त्या देवावर क्रुद्धाः - रागावलेला हरिः - आदिवराह अभ्यधावत् - धावला ॥१६॥
नंतर जेव्हा क्रोधाने दात-ओठ चावीत आपली गदा घेऊन तो वारंवार फिरवू लागला, तेव्हा रागाने लाल होऊन श्रीहरी वेगाने त्याच्यावर धावून गेले. (१६)


ततश्च गदयारातिं दक्षिणस्यां भ्रुवि प्रभुः ।
आजघ्ने स तु तां सौम्य गदया कोविदोऽहनत् ॥ १७ ॥
गदेने हरिने घाव घातला दैत्यमस्तकी ।
उजव्या भुवई बैसे परी कुशल तो रणी॥ १७ ॥

च - आणि ततः - नंतर प्रभु - भगवान् अरातिम् - शत्रूवर क्षिणस्याम् - उजव्या भ्रुवि - भुवईच्या ठिकाणी गदया - गदेने आजघ्रे - प्रहार करिता झाला तु - परंतु सौम्य - हे विदुरा कोविदः - कुशल असा सः - तो हिरण्याक्ष ताम् - त्या गदेवर गदया - गदेने अहनत - प्रहार करिता झाला ॥१७॥
विदुरा, तेव्हा प्रभूंनी शत्रूच्या उजव्या भुवईवर गदेचा प्रहार केला, परंतु गदायुद्धात प्रवीण असणार्‍या हिरण्याक्षाने मध्येच तो आपल्या गदेवर झेलला. (१७)


एवं गदाभ्यां गुर्वीभ्यां हर्यक्षो हरिरेव च ।
जिगीषया सुसंरब्धौ अन्योन्यं अभिजघ्नतुः ॥ १८ ॥
दुसरा घाव तो झेली आपुल्याचि गदेवरी ।
परस्पर प्रहाराने जाहले युद्ध थोर ते ॥ १८ ॥

एवम् - याप्रमाणे हर्यक्षः - श्रेष्ठ हिरण्याक्ष च - आणि हरिः - आदिवराहरूपी विष्णु सुसंरब्धौ - अतिशय रागावलेले असे गुर्वीभ्याम् - प्रचण्ड अशा गदाभ्याम् - दोन गदांनी जिगीषया - जिंकण्याच्या इच्छेने अन्योन्यम् - परस्परांना अभिजघ्रतुः - प्रहार करिते झाले ॥१८॥
अशा प्रकारे श्रीहरी आणि हिरण्याक्ष एक दुसर्‍याला जिंकण्याच्या इच्छेने अत्यंत क्रुद्ध होऊन एकमेकांवर आपल्या भारी गदांनी प्रहार करू लागले. (१८)


तयोः स्पृधोस्तिग्मगदाहताङ्‌गयोः
     क्षतास्रवघ्राणविवृद्धमन्य्वोः ।
विचित्रमार्गांश्चरतोर्जिगीषया
     व्यभादिलायामिव शुष्मिणोर्मृधः ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
दोघाहि वाटे जिततोच मी की
    दोघेहि घायाळ असेचि झाले ।
स्पर्धी जसे उंट न हाट ती ते
    इच्छे जयाच्या लढले तसे ते ॥ १९ ॥

शुष्मिणोः - उन्मत्त अशा दोन बैलांचे इलायाम् - गाईविषयी इव - जसे तथा इलायाम् - तसे पृथ्वीविषयी जिगीषया - जिंकण्याच्या इच्छेने स्पृधोः - स्पर्धा करणार्‍या तिग्मगदाहताङ्गयोः - तीक्ष्ण अशा दोन गदांनी ठेचलेले आहेत अवयव ज्यांचे अशा क्षत्तास्त्रवघ्राणविवृद्धमन्य्वोः - क्षतांपासून न गळणार्‍या रक्ताच्या वासाने वाढलेला आहे क्रोध ज्याचा अशा विचित्रमार्गान् - अनेक प्रकारचे गदांचे हात चरतोः - करणार्‍या अशा तयोः - यज्ञवराह व हिरण्याक्ष यांचे मृधः - युद्ध व्यभात् - भासले ॥१९॥
त्यावेळी त्या दोघांमध्ये जिंकण्याची स्पर्धा लागली. दोघांचीही शरीरे गदांच्या घावांनी घायाळ झाली होती. त्या घावांतून वाहाणार्‍या रक्ताच्या वासाने दोघांचाही क्रोध वाढत होता आणि ते दोघेही वेगवेगळे पवित्रे घेत होते. एका गायीसाठी दोन वळू भांडतात, त्याप्रमाणे एका पृथ्वीसाठी त्या दोघांमध्ये एकमेकांना जिंकण्याच्या इच्छेने मोठे भयंकर युद्ध झाले. (१९)


दैत्यस्य यज्ञावयवस्य माया
     गृहीतवाराहतनोर्महात्मनः ।
कौरव्य मह्यां द्विषतोर्विमर्दनं
     दिदृक्षुरागाद् ऋषिभिर्वृतः स्वराट् ॥ २० ॥
पृथ्वीकरीता धरि द्वेष देव
    दैत्यासवेही लढता असा तो ।
हे पाहण्या तेथ ऋषी नि विप्र
    आले तदा ब्रह्मदेवा सहीत ॥ २० ॥

कौरव्य - हे मैत्रेया यज्ञावयवस्य - यज्ञ आहेत अवयव ज्याचे अशा मायागृहीतवाराहतनोः - मायेच्या योगाने धारण केले आहे वराहाचे शरीर ज्याने अशा महात्मनः - परमेश्वराचे च - आणि दैत्यस्य - हिरण्याक्षाचे मह्याम् - पृथ्वीकरिता व्दिषतोः - व्देष करणार्‍यांचे विमर्दनम् - युद्ध दिदृक्षुः - पहाण्याची इच्छा करणारा असा ऋषिभिः - ऋषींनी वृत्तः - वेष्टिलेला असा स्वराट् - ब्रह्मदेव आगात् - प्राप्त झाला ॥२०॥
विदुरा, जेव्हा अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि मायेने वराहरूप धारण करणारे भगवान यज्ञमूर्ती पृथ्वीसाठी एकमेकांशी वैर धरून युद्ध करू लागले, तेव्हा ते पाहाण्यासाठी ब्रह्मदेव ऋषींसहित तेथे आले. (२०)


आसन्नशौण्डीरमपेतसाध्वसं
     कृतप्रतीकारमहार्यविक्रमम् ।
विलक्ष्य दैत्यं भगवान् सहस्रणीः
     जगाद नारायणमादिसूकरम् ॥ २१ ॥
घेरीयले त्यां ॠषिंना हजारो
    तै पाहिला दानववीर ऐसा ।
ते कार्य काठिण्य बघोनि ब्रह्मा
    नारायणाला वदला असा तो ॥ २१ ॥

सहस्त्रणीः - हजारो ऋषींचा नायक असा भगवान् - भगवान् ब्रह्मदेव आसन्नशौण्डीरम् - प्राप्त केले आहे शौर्य ज्याने अशा अपेतसाध्वसम् - गेले आहे भय ज्याचे अशा कृतप्रतीकारम् - केला आहे प्रतिकार ज्याने अशा अहार्यविक्रमम् - प्रतिकार करण्यास अशक्य आहे पराक्रम ज्याचा अशा दैत्यम् - हिरण्याक्षाला विलक्ष्य - पाहून अदिसूकरम् - आदिवराहरूपी नारायणम् - नारायणाला जगाद - बोलला ॥२१॥
हजारो ऋषींबरोबर असलेल्या ब्रह्मदेवांनी जेव्हा पाहिले की, दैत्य मोठा शूर आहे, त्याच्यात भयाचे नावही नाही. तो तोंड देण्यास समर्थ आहे. त्याचा पराक्रम मोडून काढणे मोठे कठीण काम आहे. तेव्हा आदिसूकररूप नारायणांना ते म्हणाले. (२१)


ब्रह्मोवाच -
एष ते देव देवानां अङ्‌‌घ्रिमूलमुपेयुषाम् ।
विप्राणां सौरभेयीणां भूतानां अपि अनागसाम् ॥ २२ ॥
आगस्कृद् भयकृद् दुष्कृद् अस्मद् राद्धवरोऽसुरः ।
अन्वेषन् अप्रतिरथो लोकान् अटति कण्टकः ॥ २३ ॥
ब्रह्मदेव म्हणाले - ( अनुष्टुप्‌ )
देवा हा दैत्य माझ्याची वराने माजला असा ।
या वेळी द्विज गाईंना ठरला त्रासदायक ॥ २२ ॥
याला जोडी असा कोणी योद्धा ना जगतातही ।
टक्करा द्यावया धुंडी योद्धा लोकात नित्य हा ॥ २३ ॥

देव - हे देवा ते - तुझ्या अङ्घ्रिमूलम् - पायाजवळ उपेयुषाम् - प्राप्त झालेल्या अशा देवानाम् - देवांचा विप्राणाम् - ब्राह्मणांचा सौरभेणीयाम् - गाईचा च - आणि अनागसाम् - निरपराधी अशा भूतानाम् अपि - प्राण्यांचा देखील आगस्कृत - अपराध करणारा भयकृत् - भय उत्पन्न करणारा दुष्कृत् - व अपकार करणारा असा एषः - हा असुरः - दैत्य अस्मद्राद्धवरः - आमच्याकडून मिळ्विला आहे वर ज्यने असा अप्रतिरथः - ज्याला प्रतिपक्ष नाही असा प्रतिपक्षम् - शत्रूला अन्वेषयन् - शोधीत कण्टकः - कंटकतुल्य असा लोकान् - त्रिभुवनात् अटति - फिरत आहे ॥२२-२३॥
ब्रह्मदेव म्हणाले - "देवा ! माझ्याकडून वर मिळवून हा दुष्ट दैत्य मोठाच प्रबळ झाला आहे. यावेळी तो आपल्या चरणांना शरण आलेले देव, ब्राह्मण, गायी आणि अन्य निरपराध जीव यांना मोठी हानी पोहोचविणारा, दुःख देणारा आणि भयप्रद होऊ लागला आहे. याच्या तोडीचा कोणी योद्धा नाही. म्हणून हा महाशत्रू आपल्याशी बरोबरी करू शकणार्‍या वीराच्या शोधात सर्व लोकांमध्ये फिरत आहे. (२२-२३)


मैनं मायाविनं दृप्तं निरङ्‌कुशमसत्तमम् ।
आक्रीड बालवद्देव यथाऽऽशीविषमुत्थितम् ॥ २४ ॥
निरंकुश नि मायावी घमेंडी दुष्ट हा असे ।
सर्पासी खेळते मूल तसा ना खेळ या करी ॥ २४ ॥

देव - हे देवा मायाविनम् - कपटी दृप्तम् - गर्विष्ठ निरङ्कुशम् - प्रतिबन्धरहित असत्तमम् - व अत्यन्त दुष्ट अशा एनम् - या हिरण्याक्षाला यथा - ज्याप्रमाणे उत्थितम् - संतापलेल्या अशा आशीविषम् - सर्पाचा बालकवत् - बालक खेळ करतो त्याप्रमाणे मा आक्रीड - खेळवू नको ॥२४॥
हा दुष्ट मायावी, घमेंडखोर आणि निरंकुश आहे. एखादे लहान मूल ज्याप्रमाणे क्रुद्ध झालेल्या सापाशी खेळते, तसे आपण याच्याशी खेळू नका. (२४)


न यावदेष वर्धेत स्वां वेलां प्राप्य दारुणः ।
स्वां देव मायां आस्थाय तावत् जह्यघमच्युत ॥ २५ ॥
देवारे अच्युता! दैत्य बळाने वाढला असा ।
योग माये त्वरे कांही करोनी मारणे यया ॥ २५ ॥

अच्युत - हे ईश्वरा यावत् - जोपर्यंत दारुणः - भयंकर असा एषः - हा हिरण्याक्ष स्वाम् - आपल्या वेलाम् - वेळेला प्राप्य - प्राप्त होऊन न वर्धेत - वाढणार नाही तावत् - तोपर्यंत स्वाम् - आपल्या देवमायाम् - देवमायेचा आस्थाय - आश्रय करून अधम् - पापी अशा एनम् - ह्या हिरण्याक्षाला जहि - ठार कर ॥२५॥
देवा, अच्युता, जोपर्यंत हा भयानक दैत्य आपली वेळ आल्यावर अत्यंत प्रबळ होत नाही, त्याअगोदरच आपण आपल्या योगमायेचा स्वीकार करून या पाप्याला मारून टाका. (२५)


एषा घोरतमा सन्ध्या लोकच्छम्बट्करी प्रभो ।
उपसर्पति सर्वात्मन् सुराणां जयमावह ॥ २६ ॥
प्रभो ही सर्व लोकांची संहारवेळ पतली ।
त्या पूर्वी मारणे ह्यासी देवांचा विजय करो ॥ २६ ॥

प्रभो - हे समर्था सर्वात्मन् - सर्वत्र वास करणार्‍या अशा परमेश्वरा एषा - ही घोरतमा - अतिशय भयंकर अशी लोकच्छम्बट्करी - लोकांचा नाश करणारी संध्या - संध्याकाळची वेळ उपसर्पति - जवळ आली आहे सुराणाम् - देवांचा जयम् - जय आवह - कर ॥२६॥
प्रभो, पहा ! लोकांचा संहार करणारी संध्याकाळची भयंकर वेळ येऊ लागली आहे. सर्वात्मन, आपण अगोदरच या असुराला मारून देवांना विजय मिळवून द्या. (२६)


अधुनैषोऽभिजिन्नाम योगो मौहूर्तिको ह्यगात् ।
शिवाय नस्त्वं सुहृदां आशु निस्तर दुस्तरम् ॥ २७ ॥
अभिजित्‌ शुभ हा योग मुहूर्त मंगलप्रद।
कल्याणा स्वजनांच्या त्या त्वरीत दैत्य मारणे ॥ २७ ॥

हि - कारण अधुना - यावेळी एषः - हा अभिजित नाम - अभिजित नावाचा मौहूर्तिकः - दोन घटकांचा योगः - शुभ योग अगात् - आला आहे त्वम् - तू सुहृदाम् - आप्त अशा नः - आमच्या शिवाय - कल्याणाकरिता दुरतरम् - मारण्यास कठीण एनम् - या हिरण्याक्षाचा आशु - लवकर निस्तर - नाश कर ॥२७॥
या वेळी अभिजित नावाचा मंगलमय मुहूर्ताचा योग आला आहे. म्हणून आपण आपले सुहृद असलेल्या आमचे कल्याण करण्यासाठी ताबडतोब या दुर्जय दैत्याला मारून टाका. (२७)


दिष्ट्या त्वां विहितं मृत्युं अयं आसादितः स्वयम् ।
विक्रम्यैनं मृधे हत्वा लोकान् आधेहि शर्मणि ॥ २८ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां
तृतीयस्कंधे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
प्रभो मरण हे याचे आपुल्या हाति बांधिले ।
सौभाग्य आमुचे आहे कालरुपासि पाहिले ।
बळाने मारणे याला लोकांना शांती द्या तशी ॥ २८ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥
॥ अठरावा अध्याय हा ॥ ३ ॥ १८ ॥ हरिः ॐ तत्सत्‌ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

आनम् - हा हिरण्याक्ष स्वयम् - स्वतः विहितम् - निर्माण केलेल्या अशा मृत्युम् - मृत्युरूप अशा त्वाम् - तुजप्रत दिष्ट्या - दैवाने आसादितः - प्राप्त झाला आहे एनम् - ह्या हिरण्याक्षाला मृधे - युद्धात विक्रम्य - पराक्रम करून हत्वा - मारून लोकान् - लोकांना शर्मणि - कल्पणाच्या ठिकाणी आधेहि - स्थापित कर ॥२८॥
प्रभो, याचा मृत्यू आपल्या हातूनच होणार आहे. आमचे मोठे भाग्य आहे की, हा स्वतः कालरूप असलेल्या आपल्याजवळ आला आहे. आपण आता युद्धात बलपूर्वक याला मारून लोकांना शांती मिळवून द्या. (२८)


स्कंध तिसरा - अध्याय अठरावा समाप्त

GO TOP