![]() |
श्रीमद् भागवत पुराण
हिरण्याक्षहिरण्यकशिप्वोर्जन्म, हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
मैत्रेय उवाच -
निशम्यात्मभुवा गीतं कारणं शङ्कयोज्झिताः । ततः सर्वे न्यवर्तन्त त्रिदिवाय दिवौकसः ॥ १ ॥
मैत्रेयजी सांगतात - ( अनुष्टुप् ) देवतांनी असे सारे ब्रह्म्याचे ऐकिले असे । निःशंक होउनी चित्ती स्वर्गा माजी प्रवर्तल्या ॥ १ ॥
सर्वे - सर्व - दिवौकसः - देव - आत्मभुवा - ब्रह्मदेवाने - गीतम् - गायिलेले - कारणम् - कारण - निशम्य - श्रवण करून - शंकया - शंकेने - ततः - तेथून - त्रिदिवाय - स्वर्गाला - न्यवर्तन्त - परत गेले ॥१॥
मैत्रेय म्हणाले - विदुरा, ब्रह्मदेवांनी सांगितल्यानंतर देवतांना अंधार होण्याचे कारण समजले आणि त्यांच्या शंकेचे निवारण झाले. नंतर ते सर्वजण स्वर्गलोकात परत आले. (१)
दितिस्तु भर्तुरादेशाद् अपत्यपरिशङ्किनी ।
पूर्णे वर्षशते साध्वी पुत्रौ प्रसुषुवे यमौ ॥ २ ॥
इकडे दीतिच्या चित्ती होती चिंता तशीच ती । सरली शतवर्षे तै जन्मले पुत्र दो जुळे ॥ २ ॥
भर्तुः - पतीच्या - आदेशात् - आज्ञेवरून - अपत्यपरिशंकिनी - पुत्रांपासून देवांना होणार्या पीडेची शंका बाळगिणारी - साध्वी - पतिव्रता - दितिः - दिति - तु - तर - वर्षशते पूर्णे - शंभर वर्षे पूर्ण झाली असता - यमौ - जुळ्या - पुत्रौ - पुत्रांना - प्रसुषुवे - प्रसवती झाली ॥२॥
इकडे दितीला आपल्या पतींनी सांगितल्याप्रमाणे पुत्रांकडून लोकांना उपद्रव होईल, अशी शंका होतीच. जेव्हा शंभर वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्या साध्वीने जुळ्या पुत्रांना जन्म दिला. (२)
उत्पाता बहवस्तत्र निपेतुर्जायमानयोः ।
दिवि भुव्यन्तरिक्षे च लोकस्य उरु भयावहाः ॥ ३ ॥
उत्पात जाहला स्वर्गी आकाशीही तसाचि तो । भयाने भरले सर्व पाहता अंतरीक्ष ते ॥ ३ ॥
तत्र - त्यावेळी - जायमानयोः - ते पुत्र उत्पन्न होत असता - दिवि - स्वर्गात - भुवि - पृथ्वीवर - च - आणि - अन्तरिक्षे - आकाशात - लोकस्य - लोकांना - उरुभयावहाः - मोठे भय उत्पन्न करणारे - बहवः - पुष्कळ - उत्पाताः - उत्पात - निपेतुः - उद्भवले ॥३॥
त्यांच्या जन्माच्या वेळी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षात अनेक अपशकुन होऊ लागले. त्यामुळे लोक अत्यंत भयभीत झाले. (३)
सहाचला भुवश्चेलुः दिशः सर्वाः प्रजज्वलुः ।
स उल्काश्च अशनयः पेतुः, केतवश्चार्तिहेतवः ॥ ४ ॥
दिशाही तापल्या तेंव्हा सर्व पर्वत डोलती । कडाडल्या विजा तैशा आकाशी धूम्र केतुही ॥ ४ ॥
सहाचलाः - पर्वतासहित - भुवः - पृथ्वीवरील प्रदेश - चेलुः - हालू लागले - सर्वाः - सर्व - दिशः - दिशा - प्रजज्वलुः - पेटू लागल्या - सोल्काः - तुटणार्या तारांसहित - अशनयः - विजा - पेतुः - पडल्या - च - आणि - आर्तिहेतवः - अरिष्टसूचक - केतवः - धुमकेतु - उदीयुः - उगवले ॥४॥
जिकडे तिकडे पृथ्वी आणि पर्वतांवर भूकंप होऊ लागले. सर्व दिशांमध्ये आगी लागू लागल्या. उल्कापात होऊ लागले, विजा पडू लागल्या आणि आकाशात अनिष्टसूचक धूमकेतू दिसू लागले. (४)
ववौ वायुः सुदुःस्पर्शः फूत्कारानीरयन्मुहुः ।
उन्मूलयन् नगपतीन् वात्यानीको रजोध्वजः ॥ ५ ॥
साँय साँय ध्वनीने त्या वार्याने वृक्ष मोडले । अंधारी दाटली सेना धुळीचे ध्वज डौलले ॥ ५ ॥
सुदुःस्पर्शः - अंगास झोंबणारा - फूत्कारान्ः - फूत्कार - ईरयन् - सोडणारा - वात्यनीकः - वावटळी आहेत सैन्ये ज्याची असा - रजोध्वजः - धूळ आहे निशाणे ज्याची असा - नगपतीन् - प्रचंड वृक्षांना - उन्मूलयन् - उपटणारा - वायुः - वारा - ववौ - वाहू लागला ॥५॥
वारंवार सूं सूं करीत मोठमोठया वृक्षांना उन्मळून टाकीत बोचरा आणि असह्य असा वारा, वावटळी सेना आणि धुळीचे ध्वज घेऊन वाहू लागला. (५)
उद्धसत् तडिदम्भोद घटया नष्टभागणे ।
व्योम्नि प्रविष्टतमसा न स्म व्यादृश्यते पदम् ॥ ६ ॥
थैथयाटी विजेच्या ते आकाशी घन दाटले । आकाशी लोप सूर्याचा दिसेना कांहिही तदा ॥ ६ ॥
उद्धसत्तदिडम्भोदघटया - मोठ्याने हसणार्याच अशा वीजांनी युक्त अशा मेघांच्या समूहाने - नष्टभागणे - दिसत नाहीसा झाला आहे नक्षत्रसमूह ज्यातील अशा - व्योम्नि - आकाशात - प्रविष्टतमसा - प्रवेश केलेल्या अंधकाराने - पदम् - पाऊलभर जागा - न व्यादृश्यते स्म - दिसत नव्हती ॥६॥
विजा जोरजोरात जणू हसत होत्या. मेघांनी असे रूप धारण केले होते की, सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह लुप्त होऊन आकाशात अंधार पसरला होता. त्यामुळे कोठेच काही दिसत नव्हते. (६)
चुक्रोश विमना वार्धिरुदूर्मिः क्षुभितोदरः ।
सोदपानाश्च सरितः चुक्षुभुः शुष्कपङ्कजाः ॥ ७ ॥
सागरीं जाहलाऽक्रोश लाटांनी जीव धावले। खळ्बळा नदिनाल्यात कमळे सुकली तदा ॥ ७ ॥
वार्घि - समुद्र - विमनाः इव - दुखणेकर्यासारखा - उदूर्मिः - उंच उंच उसळत आहेत लाटा ज्याच्या असा - क्षुभितोदरः - खवळलेले आहेत उदारातील मगरादिक प्राणी ज्याच्या असा - चुक्रोश - गर्जना करू लागला - च - आणि - सोदपानाः - तलाव, विहिरी इत्यादिकांसहित - सरितः - नद्या - शुष्कपंकजाः - शुष्क झाली आहेत कमळे ज्यातील अशा - चुक्षुभुः - गढूळ झाल्या ॥७॥
दुःखी मनुष्याप्रमाणे समुद्र आक्रोश करू लागला. त्यात मोठमोठया लाटा उसळू लागल्या आणि त्यात राहणार्या जलचरांत हलकल्लोळ उडाला. नद्या आणि जलाशयांमध्ये खळबळ माजली आणि त्यांतील कमळे सुकून गेली. (७)
मुहुः परिधयोऽभूवन् सराह्वोः शशिसूर्ययोः ।
निर्घाता रथनिर्ह्रादा विवरेभ्यः प्रजज्ञिरे ॥ ८ ॥
चंद्रसूर्यासही चक्र अशूभ दिसले पुन्हा । गर्जना स्वच्छ आकाशी गुंफेत घर्घराटही ॥ ८ ॥
सराह्वोः - राहूसहित - शशिसूर्ययोः - चंद्रसूर्यांना - परिधयः - खळी - मुहुः - वारंवार - अभूवन् - उत्पन्न होऊ लागली - निर्घाताः - निरभ्र आकाशात गर्जना - अभूवन् - होऊ लागल्या - च - आणि - विवरेभ्यः - पर्वतांच्या गुहांतून - रथनिह्रादाः - रथांचे खडखडाट - प्रजज्ञिरे - उत्पन्न होऊ लागले ॥८॥
राहूने ग्रासलेल्या सूर्य आणि चंद्र यांना खळी पडू लागली. आकाशात ढग नसतानाही गडगडाट होऊ लागला आणि गुहांमधून रथाच्या घडघडाटासारखा आवाज येऊ लागला. (८)
अन्तर्ग्रामेषु मुखतो वमन्त्यो वह्निमुल्बणम् ।
सृगाल उलूक टङ्कारैः प्रणेदुः अशिवं शिवाः ॥ ९ ॥
गावात घुबडे आणि गिधाडे घुग्घुकारले । आग ओकोनि कोल्हे ते अभद्र भुंकु लागले ॥ ९ ॥
अन्तर्ग्रामेषु - गावात - मुखतः - तोंडातून - उल्बणम् - भयंकर - अग्निम् - अग्नीला - वमन्त्यः - ओकणार्या - शिवाः - भालू - सृगालोलूकटंकारैः - कोल्हे व घुबडे यांच्या शब्दांसहित - अशिवम् - अरिष्टसूचक - प्रणेदुः - ओरडू लागल्या ॥९॥
गावांमधून गिधाडे आणि घुबडे यांच्या भयानक चित्कारांबरोबरच भालू तोंडातून धगधगती आग बाहेर ओकून अमंगल ओरडू लागल्या. (९)
सङ्गीतवद् रोदनवद् उन्नमय्य शिरोधराम् ।
व्यमुञ्चन् विविधा वाचो ग्रामसिंहाः ततस्ततः ॥ १० ॥
श्वान ते तोंड वासोनी मानेला करुनी वरी । गाणे नी रडणे ऐशा स्वरांनी रडले तदा ॥ १० ॥
ग्रामसिंहाः - कुत्रे - शिरोधराम् उन्नमय्यः - माना उंच करून - ततस्ततः - जिकडेतिकडे - संगीतवत् - गायन केल्यासारखे - रोदनवत् - रडल्यासारखे - विबिधाः - अनेक प्रकारच्या - वाचः - वाणींना - व्यमुञ्चन् - सोडू लागले ॥१०॥
सगळीकडे कुत्री माना वर करून कधी गाण्यासारखे तर कधी रडण्यासारखे निरनिराळे आवाज काढू लागली. (१०)
खराश्च कर्कशैः क्षत्तः खुरैर्घ्नन्तो धरातलम् ।
खार्कार रभसा मत्ताः पर्यधावन् वरूथशः ॥ ११ ॥
खुरांनी गाढवे झुंडीं पृथिवी खोदु लागले । माजुनी धावले तेंव्हा हुई कू शब्द दाटले ॥ ११ ॥
क्षत्तः - हे विदुरा - मत्ताः - उन्मत्त असे - खराः - गर्दभ - खार्काररभसा - आपल्या जातीप्रमाणे शब्द करण्याची आहे त्वरा ज्यांना असे - कर्कशैः - कठोर अशा - खुरैः - खुरांनी - धरातलम् - पृथ्वीतलाला - घ्रन्तः - आघात करणारे असे - वरूथशः - कळपांनी - पर्यधावन् - धावू लागले ॥११॥
विदुरा, गाढवांच्या झुंडीच्या झुंडी आपल्या कठोर खुरांनी जमीन उकरीत व खिंकाळत मस्तवाल होऊन इकडे तिकडे धावू लागल्या. (११)
रुदन्तो रासभत्रस्ता नीडाद् उदपतन्खगाः ।
घोषेऽरण्ये च पशवः शकृन् मूत्रमकुर्वत ॥ १२ ॥
हिसणे गाढवांचे ते ऐकोनी घरट्यातले । भीतीने उडले पक्षी पशुंनी मळ त्यागिला ॥ १२ ॥
रासभत्रस्ताः - गर्दभांनी त्रस्त झालेले - रुदन्तः - रडणारे असे - खगाः - पक्षी - नीडात् - घरट्यातून - उदपतन् - बाहेर पडू लागले - घोषे - गौळवाड्यात - च - आणि - अरण्ये - अरण्यात - पशवः - पशु - शक्रन्मूत्रम् - विष्ठा व मूत्र - अकुर्वत् - करू लागले ॥१२॥
गाढवांच्या खिंकाळण्याने भयभीत होऊन पक्षी चिवचिवाट करीत आपल्या घरटयांतून उडून जाऊ लागले. गोठयात बांधलेले आणि वनात चरणारे गाय-बैल आदी पशू भीतीने मल-मूत्र करू लागले. (१२)
गावः अत्रसन् असृग्दोहाः तोयदाः पूयवर्षिणः ।
व्यरुदन् देवलिङ्गानि द्रुमाः पेतुर्विनानिलम् ॥ १३ ॥
भीतीने रक्तधारा त्या गोस्तनातुनि वर्षती । पिवळी जाहली वृष्टी मूर्तींनी अश्रु गाळिले ॥ १३ ॥
गावः - गाई - अत्रसन् - घाबरून गेल्या - असृग्दोहाः - रक्ताची धार देणार्या अशा - बभूवुः - झाल्या - च - आणि - तोयदाः - मेघ - पूयवर्षिणः - पुवाचा वर्षाव करणारे असे - बभूवुः - झाले - देवलिङ्गानि - देवांच्या मूर्ती - व्यरुदन् - रडू लागल्या - द्रुमाः - वृक्ष - अनिलम् विना - वारा नसताहि - पेतुः - उपटून पडले ॥१३॥
गायी तर अशा घाबरून गेल्या की धार काढताना त्यांच्या आचळातून रक्त येऊ लागले. मेघ पुवाचा वर्षाव करू लागले. देवांच्या मूर्तींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि वादळाशिवाय वृक्ष उन्मळून पडू लागले. (१३)
ग्रहान् पुण्यतमानन्ये भगणांश्चापि दीपिताः ।
अतिचेरुः वक्रगत्या युयुधुश्च परस्परम् ॥ १४ ॥
प्रबळ जाहला राहू शनी तो वक्र चालला । बुध नी चंद्र यांच्याशी टकरे युद्ध जाहले ॥ १४ ॥
दीपिताः - विशेष उत्तेजित झालेले - अन्ये - दुसरे पापग्रह - पुण्यतमान् - अत्यंत मङ्गलकारक अशा - ग्रहान् - ग्रहांना - च - आणि - भगणान् अपि - नक्षत्र समूहांनाही - अतिचेरुः - उल्लंघू लागले - च - आणि - वक्रगत्या - उलट गतीने - परस्परम् - एकमेकांशी - युयुधुः - युद्ध करू लागले ॥१४॥
शनी, राहू इत्यादी क्रूर ग्रह प्रबळ होऊन चंद्र, गुरू इत्यादी सौम्य ग्रह आणि बर्याचशा नक्षत्रांना ओलांडून वक्र गतीने चालू लागले. तसेच आपापसात युद्ध करू लागले. (१४)
दृष्ट्वा अन्यांश्च महोत्पातान् अतत्-तत्त्वविदः प्रजाः ।
ब्रह्मपुत्रान् ऋते भीता मेनिरे विश्वसंप्लवम् ॥ १५ ॥
उत्पात जाहले कैक सनकादिक सोडुनी। भयाने भरले सारे प्रलयो भासला तयां ॥ १५ ॥
ब्रह्मपुत्रान् ऋते - सनत्कुमाराशिवाय - अततत्त्वविदः - उत्पातांचे कारण न जाणणारे - प्रजाः - लोक - च - आणि - अन्यान् - दुसर्या - महोत्पातान् - मोठमोठ्या उत्पातांना - दृष्ट्वा - पाहून - भीताः - भ्यालेले असे - विश्वसंप्लवम् - विश्वाच्या प्रलयाला - मेनिरे - मानते झाले ॥१५॥
असेच आणि इतरही अनेक भयंकर अपशकुन पाहून सनकादिक सोडून इतर सर्व जीव भयभीत झाले आणि त्या उत्पातांचे मर्म न कळल्यामुळे त्यांना वाटले की, जगाचा प्रलय होणार. (१५)
तौ आदिदैत्यौ सहसा व्यज्यमान आत्मपौरुषौ ।
ववृधातेऽश्मसारेण कायेन अद्रिपती इव ॥ १६ ॥
जन्मले आदिदैत्ये नी शिघ्रची वाढु लागले । पोलादा परि ते देही पर्वतापरि वाढले॥ दिसली बाल लीलेत तयांची वीरता तशी ॥ १६ ॥
व्यजमानात्मपौरुषैः - व्यक्त होत आहे पूर्वसिद्ध पराक्रम ज्यांचा असे - तौ - ते - आदिदैत्यौ - आदिदैत्य - अश्मसारेण - दगडासारख्या बळकट - कायेन - शरीराने - अद्रिपति इव - प्रचंड पर्वतासारखे - ववृधाते - वाढते झाले ॥१६॥
ते दोन्हीही आदिदैत्य जन्मानंतर लगेच आपल्या पोलादासारख्या कठीण शरीराने मोठे होत जाऊन विशाल पर्वतासारखे झाले. तसेच त्यांचा पूर्वीचा पराक्रमही प्रगट झाला. (१६)
दिविस्पृशौ हेमकिरीटकोटिभिः
निरुद्धकाष्ठौ स्फुरदङ्गदाभुजौ । गां कंपयन्तौ चरणैः पदे पदे कट्या सुकाञ्च्यार्कमतीत्य तस्थतुः ॥ १७ ॥
(इंद्रवज्रा) स्वर्गासि टेके शिरटोप त्यांचा दिशास व्यापोनि शरीर राही । भूकंप भासे पृथिवी वरी ते चालोनि जाता पदभार ऐसा । जै ते उभे ठाकुनि चालती तै शोभे कटीदोर फिकाहि सूर्य ॥ १७ ॥
हेमकिरीटकोटिभिः - सुवर्णमय किरीटांच्या अग्रांनी - दिविस्पृशौ - आकाशाला स्पर्श करणारे असे - निरुद्धकाष्ठौ - व्यापिलेल्या आहेत दिशा ज्यांनी असे - स्फुरदंगदाभुजौ - तेजस्वी बाहुभूषणे आहेत बाहूंमध्ये ज्यांच्या असे - पदेपदे - पावलोपावली - गाम् - पृथ्वीला - कम्पयन्तौ - कापविणारे - सुकाञ्च्या - सुंदर आहे कमरपट्टा जिचे ठिकाणी अशा - कट्या - कमरेने - अर्कम् - सूर्याला - अतीत्य - झाकला जाणे - तस्थतुः - उभे राहिले ॥१७॥
ते इतके उंच होते की, त्यांच्या सुवर्णमय मुकुटाचे टोक स्वर्गाला स्पर्श करीत होते आणि त्यांच्या विशाल शरीरामुळे सर्व दिशा आच्छादित झाल्या होत्या. त्यांच्या दंडांमध्ये सोन्याचे बाजूबंद चमचम करीत होते. ते जेव्हा पृथ्वीवर एक-एक पाऊल ठेवीत होते, त्यावेळी भूकंप जाणवत होता आणि ते जेव्हा उठून उभे राहात, तेव्हा त्यांच्या चमकणार्या कमरपट्टयाने सूर्यही निस्तेज वाटे. (१७)
प्रजापतिर्नाम तयोरकार्षीद्
यः प्राक् स्वदेहाद्यमयोरजायत । तं वै हिरण्यकशिपुं विदुः प्रजा यं तं हिरण्याक्षमसूत साग्रतः ॥ १८ ॥
प्रजापती नाव तयास ठेवी एका हिरण्योकशिपू नि दूजा । तो जो हिरण्याक्षचि दीतिसूत झाले पुढे दैत्य पराक्रमी जे ॥ १८ ॥
प्रजापतिः - कश्यप ऋषि - तयोः - त्या दोन पुत्रांना - नाम - नाव - अकार्षीत् - ठेविता झाला - यमयोः - जुळ्या त्या दोन पुत्रांपैकी - यः - जो - स्वदेहात् - आपल्या देहापासून - प्राक् - प्रथम - अजायत - उत्पन्न झाला - तम् - त्याला - हिरण्यकशिपुम् - हिरण्यकशिपु या नावाने - च - आणि - सा - ती दीति - यम् - ज्याला - अग्रतः - प्रथम - असूत् - प्रसवली - तम् - त्याला - हिरण्याक्षम् - हिरण्याक्ष या नावाने - प्रजाः - लोक - विदुः - ओळखू लागेल ॥१८॥
ते दोघे जुळे होते. प्रजापती कश्यपांनी त्यांचे नामकरण केले. त्यांच्यातील जो स्वतःच्या वीर्याने दितीच्या गर्भामध्ये प्रथम स्थापित झाला होता, त्याचे नाव हिरण्यकशिपू ठेवले, आणि जो दितीच्या उदरातून प्रथम बाहेर आला तो हिरण्याक्ष नावाने प्रसिद्ध झाला. (१८)
चक्रे हिरण्यकशिपुः दोर्भ्यां ब्रह्मवरेण च ।
वशे सपालान् लोकान् त्रीन् अकुतोमृत्युरुद्धतः ॥ १९ ॥
( अनुष्टुप् ) हिरण्यकश्यपू यास ब्रह्म्याचा वर लाभला । निर्भयी मृत्यु पासोनी तसा उद्धट जाहला ॥ बळाने लोकपालांना त्रिलोकाला हरीयले ॥ १९ ॥
हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - ब्रह्मवरेण - ब्रह्मदेवाच्या वराने - अकुतोमृत्युः - ज्याला कोठूनहि मृत्यु नाही असा - उद्धतः - व उन्मत्त झालेला असा - सपालान् - रक्षण करणार्या राजासहित - त्रीन् - तीन - लोकान् - लोकांना - दोर्भ्याम् - बाहूंनी - वशे - स्वाधीन - चक्रे - करिता झाला ॥१९॥
ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्यकशिपू मृत्युभयापासून मुक्त झाला असल्याकारणाने मोठाच उद्धट झाला होता. त्याने आपल्या बाहुबलाच्या जोरावर लोकपालांसहित तिन्ही लोकांना वश करून घेतले होते. (१९)
हिरण्याक्षो अनुजस्तस्य प्रियः प्रीतिकृदन्वहम् ।
गदापाणिर्दिवं यातो युयुत्सुः मृगयन् रणम् ॥ २० ॥
लहान आवडे बंधू तोही ते कर्म आचरी । युद्धाची शोधण्या संधी हिरण्याक्ष गदाधरी । स्वर्गात पातला आणि देवांना शोधु लागला ॥ २० ॥
तस्य - त्या हिरण्यकशिपूचा - प्रियः - आवडता - अनुजः - धाकटा बंधू - अन्वहम् - प्रतिदिवशी - प्रीतिकृत् - प्रीति करणारा - हिरण्याक्षः - हिरण्याक्ष - युयुत्सुः - युद्धाची इच्छा करणारा - गदापाणिः - गदा आहे हातात ज्याच्या असा - रणम् - युद्धाचा - मृगयन् - शोध करणारा - दिवम् - स्वर्गाला - यातः - गेला ॥२०॥
तो आपल्या लहान भावावर-हिरण्याक्षावर अतिशय प्रेम करीत होता आणि हाही आपल्या ज्येष्ठ बंधूला प्रिय असेल तेच करीत असे. एक दिवस तो हिरण्याक्ष हातात गदा घेऊन युद्धाची संधी शोधीत स्वर्गात जाऊन पोहोचला. (२०)
तं वीक्ष्य दुःसहजवं रणत् काञ्चन नूपुरम् ।
वैजयन्त्या स्रजा जुष्टं अंस न्यस्त महागदम् ॥ २१ ॥
असह्य वेग त्याचा तो नुपुरे झनकारती । गळ्यात विजयी माळा खांदी मोठीच ती गदा ॥ २१ ॥
दुःसहजवम् - दुःसह आहे वेग ज्याचा अशा - रणत्काञ्चननूपुरम् - खुळखुळ वाजत आहे सुवर्णांचे नूपुर ज्याचे अशा - वैजयन्त्यास्त्रजा - वैजयन्ती माळेने - जुष्टम् - युक्त अशा - अंसन्यस्तमहागदम् - खांद्यावर ठेविली आहे मोठी गदा ज्याने अशा २१॥
त्याचा वेग असह्य होता. त्याच्या पायातील सोन्याच्या पैंजणांचा झंकार होत होता, गळ्यामध्ये विजयसूचक माळ त्याने धारण केली होती आणि खांद्यावर विशाल गदा ठेवलेली होती. (२१)
मनोवीर्यवर उत्सिक्तं असृण्यं अकुतोभयम् ।
भीता निलिल्यिरे देवाः तार्क्ष्य त्रस्तः इवाहयः ॥ २२ ॥
माजला मन देहाने ब्रह्म्याच्या त्या वरे वसा । गरुडां भीति जै सर्प देवता लपली तसे ॥ २२ ॥
- मनोवीर्यवरोत्सिक्तम् - शौर्याने, बलाने व ब्रह्मदेवाच्या वराने गर्विष्ठ झालेल्या अशा - असृण्यम् - प्रतिबंध नसलेल्या अशा - अकुतोभयम् - कोठूनहि नाही भय ज्याला अशा - तम् - त्या हिरण्याक्षाला - वीक्ष्य - पाहून - देवाः - देव - भीताः - भय पावलेले असे - तार्क्ष्यत्रस्ताः - गरुडापासून त्रास पावलेल्या - अहयः इव - सर्पाप्रमाणे - निलिल्यिरे - लपून बसले ॥२२॥
मनोबल, शारीरिक बल आणि ब्रह्मदेवांनी दिलेला वर यांनी तो उन्मत्त झाला होता. त्यामुळे निरंकुश आणि निर्भय अशा त्याला पाहून, गरुडाला पाहून साप लपून बसतात, त्याप्रमाणे देव भीतीने लपून बसले. (२२)
स वै तिरोहितान् दृष्ट्वा महसा स्वेन दैत्यराट् ।
स-इन्द्रान् देवगणान् क्षीबान् अपश्यन् व्यनदद्भृशम् ॥ २३ ॥
पाहिले हिरण्याक्षाने तेजे इंद्रादि धाकती । समोर नसता कोणी गर्जना करि तो सदा ॥ २३ ॥
सः - तो - दैत्यराट् - दैत्यराज - सेन्द्रान् देवगणान् - इंद्रासहित देवगणांना - स्वेन महसा - आपल्या पराक्रमामुळे - तिरोहितान् - लपून बसलेले असे - दृष्ट्वा - पाहून - क्षीबान् - मत्त झालेले असे - अपश्यन् - न पाहणारा - भृशम् - मोठ्याने - व्यनदत् - गरजला ॥२३॥
दैत्यराज हिरण्याक्षाने जेव्हा असे पाहिले की, आपल्या तेजामुळे गर्विष्ठ इंद्रादी देवही लपून बसले आहेत. तेव्हा ते न दिसल्याने तो भयंकर गर्जना करू लागला. (२३)
ततो निवृत्तः क्रीडिष्यन् गम्भीरं भीमनिस्वनम् ।
विजगाहे महासत्त्वो वार्धिं मत्त इव द्विपः ॥ २४ ॥
परतोनि पुन्हा त्याने समुद्रीं घेतली उडी । हत्तीसा पोहताना तो लाटाही गर्जल्या तदा ॥ २४ ॥
ततः - नंतर - महासत्त्वः - मोठे आहे बल ज्याचे असा - निवृत्तः - परतलेला असा - क्रीडिप्यन् - क्रीडा करण्याची इच्छा करणारा - सः - तो हिरण्याक्ष - मत्तः व्दिपः इव - मदोन्मत्त हत्तीप्रमाणे - भीमनिःस्वनम् - भयंकर आहे गर्जना ज्याची अशा - गम्भीरम् - अपार - वार्धिम् - समुद्रात - विजगाहे - बुडी मारिता झाला ॥२४॥
नंतर तो महाबली दैत्य तेथून परत फिरला आणि जलक्रीडा करण्यासाठी एखाद्या उन्मत्त हत्तीप्रमाणे खोल व गरजणार्या समुद्रात घुसला. (२४)
तस्मिन्प्रविष्टे वरुणस्य सैनिका
यादोगणाः सन्नधियः ससाध्वसाः । अहन्यमाना अपि तस्य वर्चसा प्रधर्षिता दूरतरं प्रदुद्रुवुः ॥ २५ ॥
( इंद्रवज्रा ) जळाजले जीव वरुण यांचे त्यांना न दैत्ये मुळि कांहि केले । तरी भयाने भयभीत होता गेले पळोनी जल जीव सारे ॥ २५ ॥
तस्मिन् प्रविष्टे - तो समुद्रात शिरला असता - वरुणस्य - वरुणाचे - सैनिकाः - सैनिक - यादोगणाः - जलचरांचे समुदाय - सन्नधियः - नष्ट झाली आहे बुद्धि ज्यांची असे - ससाध्वसाः - भीतीने युक्त असे - अहन्यमानाः अपिः - मारले नसतानाहि - तस्य - त्या हिरण्याक्षाच्या - वर्चसा - तेजाने - प्रधर्षिता - घाबरलेले असे - दूरतरम् - फार लांब - प्रदुद्रुवुः - पळाले ॥२५॥
त्याने समुद्रात पाय ठेवला, त्याच वेळी भीतीने वरुणाचे सैनिक जलचर हबकून गेले आणि त्याने त्यांची छेड न काढताही त्याच्या धाकाने घाबरून ते खूप दूर पळून गेले. (२५)
स वर्षपूगान् उदधौ महाबलः
चरन् महोर्मीन् श्वसनेरितान्मुहुः । मौर्व्याभिजघ्ने गदया विभावरीं आसेदिवान् तास्तात पुरीं प्रचेतसः ॥ २६ ॥
अनेक वर्षे बुडुनी समुद्री न भेटता शत्रु कुणीच तेथे । लाटांवरी त्याच गदाप्रहारे मारुनि पाही अपुलीच शक्ती ॥ २६ ॥
तात - हे विदुरा - महाबलः सः - मोठे आहे बल ज्याचे असा तो हिरण्याक्ष - वर्षपूगान् - अनेक वर्षे - उदधौ - समुद्रात - चरन् - संचार करणारा असा - श्वसनेरितान् - वार्याने उसळलेल्या - महोर्मीन् - मोठ्या लाटांना - मौर्व्या गदया - पोलादी गदेने - मुहुः - वारंवार - अभिजघ्रे - ताडन करिता झाला - च - आणि - प्रचेतसः विभावरीम् पुरीम् - वरुणाच्या विभावरीनामक राजधानीस - आसेदिवान् - प्राप्त झाला ॥२६॥
महाबली हिरण्याक्ष पुष्कळ वर्षेपर्यंत समुद्रात फिरत आणि वारंवार वायुवेगाने उडणार्या प्रचंड लाटांवर आपल्या पोलादी गदेचे तडाखे देत होता. हे विदुरा, अशा प्रकारे फिरत फिरत वरुणाची राजधानी असलेल्या विभावरीपुरीत तो जाऊन पोहोचला. (२६)
तत्रोपलभ्यासुरलोकपालकं
यादोगणानां ऋषभं प्रचेतसम् । स्मयन् प्रलब्धुं प्रणिपत्य नीचवत् जगाद मे देह्यधिराज संयुगम् ॥ २७ ॥
स्वामी वरुणासचि तेथ गाठी नी हासुनी हीन नमूनि तुच्छे । युद्धेचि भिक्षा मज द्या नरांनो चेष्टेचि बोले मग अन्य कांही ॥ २७ ॥
तत्र - त्या राजधानीत - असुरलोकपालकम् - दैत्यांचा लोक जो पाताल त्याचा राजा अशा - यादोगणानाम् - जलचरांच्या समूहात - ऋषभम् - श्रेष्ठ अशा - प्रचेतसम् - वरुणाला - उप्लभ्य - प्राप्त होऊन - प्रलब्धुम् - उपहास करण्याकरिता - नीचवत् - नीचाप्रमाणे - प्रणिपत्य - नमस्कार करून - स्मयन् - हसत - जगाद - बोलला - अधिराज - हे राजाधिराज - मे - मला - संयुगम् - युद्ध - देहि - दे ॥२७॥
तेथे पाताळ लोकाचे स्वामी, जलचरांचे अधिपती वरुणराजांना पाहून त्याने त्यांची खिल्ली उडविली आणि एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे प्रणाम करून थोडेसे हसून छद्मीपणाने तो म्हणाला, "महाराज, मला युद्धाची भिक्षा घाला. (२७)
त्वं लोकपालोऽधिपतिर्बृहच्छ्रवा
वीर्यापहो दुर्मदवीरमानिनाम् । विजित्य लोकेऽखिलदैत्यदानवान् यद् राजसूयेन पुरायजत्प्रभो ॥ २८ ॥
कीर्तीवतंसा तुचि लोकपाल तू मन्य लोकात पराक्रमीही । तू राजसूयो मख पूर्ण केला जिंकोनि दैत्यास असाचि थोर ॥ २८ ॥
प्रभो - अहो महाराज - त्वम् - तू - लोकपालः - लोकांचे रक्षण करणारा - अधिपतिः - राजा - दुर्मदवीरमानिनाम् - मदोन्मत्त व पराक्रमी असे स्वतःला मानणार्यांच्या - वीर्यापहः - पराक्रमाला नाहीसा करणारा - बृहच्छ्रवाः - महाकीर्तिवान् - असि - आहेस - यत् - कारण - भवान् - तू - पुरा - पूर्वी - लोके - जगातील - अखिलदैत्यदानवान् - संपूर्ण दैत्य व दानव यांना - विजित्य - जिंकून - राजसूयेन अयजत् - राजसूय यज्ञ केलास ॥२८॥
प्रभो, आपण तर लोकपाल, राजा आणि मोठे कीर्तिमान आहात ! जे लोक स्वतःला मोठे वीर समजत, त्यांच्या सामर्थ्याचा आपण चक्काचूर केला आणि पूर्वी आपण जगातील सर्व दैत्य-दानवांना जिंकून राजसूय यज्ञसुद्धा केला होता." (२८)
स एवं उत्सिक्त मदेन विद्विषा
दृढं प्रलब्धो भगवान् अपां पतिः । रोषं समुत्थं शमयन् स्वया धिया व्यवोचदङ्गोपशमं गता वयम् ॥ २९ ॥
पाहूनि तो माज शत्रुस ऐसा तो क्रोध आला भगवान् वरुणा । बोले तया बंधु मुळीच नाही आव्हानिले ना तुज हेतु कांही ॥ २९ ॥
उत्सिक्तमदेन - वाढला आहे गर्व ज्याचा अशा - विव्दिषा - शत्रूने - एवम् - याप्रमाणे - दृढम् - अत्यंत - प्रलब्धः - उपहास केलेला - सः - तो - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - अपां पतिः - उदकाचा राजा वरुण - समुत्थम् - उत्पन्न झालेल्या - रोषम् - क्रोधाला - स्वया धिया - आपल्या बुद्धीने - शमयन् - शांत करीत - व्यवोचत् - म्हणाला - अङ्ग - अहो - वयम् - आम्ही - उपशमम् - शांतीला - गताः - प्राप्त झालेले आहोत ॥२९॥
त्या मदोन्मत्त शत्रूने याप्रमाणे उपहास केल्याने भगवान वरुणांना अतिशय क्रोध तर आलाच, परंतु आपल्या विवेकाने तो गिळून त्याऐवजी ते त्याला म्हणाले, "बंधो, आम्हांला आता युद्ध करण्याची इच्छाच राहिली नाही. (२९)
पश्यामि नान्यं पुरुषात् पुरातनाद्
यः संयुगे त्वां रणमार्गकोविदम् । आराधयिष्यति असुरर्षभेहि तं मनस्विनो यं गृणते भवादृशाः ॥ ३० ॥
युद्धीं तुला त्या हरिच्या शिवाय ना कोणि तोषि विर दैत्यराज । इच्छा तुझी तो पुरवील छान ते वीर सारे गुण गाति त्याचे ॥ ३० ॥
असुरर्षभ - हे असुरश्रेष्ठा - रणमार्गकोविदम् - युद्धकलेत कुशल अशा - त्वाम् - तुला - संयुगे - युद्धात - यः - जो - आराधयिष्यति - संतुष्ट करील - एतादृशम् - अशा प्रकारचा - पुरातनात् पुरुषात् - पुराणपुरुषावाचून - अन्यम् - दुसर्याला - न पश्यामि - मी पाहत नाही - तम् - त्या पुराणपुरुषाजवळ - इहि - जा - भवादृशाः - आपल्यासारखे - मनस्विनः - गुणी लोक - यम् - ज्याला - स्तुवते - स्तवितात ॥३०॥
जो तुझ्यासारख्या रणकुशल वीराला युद्धामध्ये संतुष्ट करील, असा आम्हांला भगवान पुराणपुरुषाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. दैत्यराज, तू त्यांच्याकडे जा, ते तुझी इच्छा पूर्ण करतील. तुझ्यासारखे वीर त्यांचेच गुणगान करीत असतात. (३०)
तं वीरमारादभिपद्य विस्मयः
शयिष्यसे वीरशये श्वभिर्वृतः । यस्त्वद्विधानां असतां प्रशान्तये रूपाणि धत्ते सदनुग्रहेच्छया ॥ ३१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां तृतीयस्कंधे सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
तो वीर मोठा तुज श्वान ऐसा मारोनि फेकील भुमीसि दूर । दुष्टास मारोनि कृपा करी तो संतांवरी नित्य सदाचि भाळे ॥ ३१ ॥ ॥ इति श्रीमद्भागवता महापुराणी पारमहंसी संहिता ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रुपांतर ॥ ॥ सतरावा अध्याय हा ॥ ३ ॥ ॥ १७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
यः - जो पुराणपुरुष - त्वव्दिधानाम् - तुझ्यासारख्या - असताम् - दुष्टांचा - प्रशान्तये - निग्रह करण्याकरिता - सदनुग्रहेच्छया - साधूंवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने - रूपाणि - अवतार - धत्ते - धारण करितो - तं वीरम् - त्या वीर पुराणपुरुषाच्या - आरात् - जवळ - अभिपद्य - प्राप्त होऊन - विस्मयः - गर्वरहित असा - श्वभिः - कुत्र्यांनी - वृतः - वेष्टिलेला - वीरशय्ये - वीरशय्येवर म्हणजे रणांगणावर - शयिष्यसे - झोप घेशील ॥३१॥
ते मोठे शूर आहेत. त्यांच्याजवळ जाताच तुझा सगळा ताठा जिरून जाईल आणि तू कुत्र्यांनी घेरला जाऊन वीरशय्येवर निद्रा घेशील. ते तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी अनेक प्रकारची रूपे धारण करतात." (३१)
स्कंध तिसरा - अध्याय सतरावा समाप्त |